Thursday, December 1, 2022

कणखर कार्यमग्न माऊली

 माऊलीच्या कष्टमय जीवनाचे फलित


(कृपया माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये तिच्याबद्दल अधिक वाचा)

वैराटगडाच्या दक्षिण पायथ्याशी वसलेल्या जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे येथे इ. सन १९३५ दरम्यान माझी आई अंजिरा हीचा जन्म झाला. तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम दोन भाऊ व तीन बहिणी.  तिने तिसरीपर्यंत शिक्षण घेतल्याने साक्षर आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेली माझी आई लहानपणापासूनच सर्व कामात निपुण आणि तरबेज ! वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तिचा शेतमजूर असलेले माझे वडील कै यशवंत राजपुरे यांच्याशी विवाह झाला. त्या चिमुरडीस तुलनेने गरीब शेतकरी कुटुंबात जुळवून घेण्यासाठी जास्त वेळ लागला नाही.

सासरी आल्यापासूनच तिचं घर आणि शेतातील काबाडकष्टाशी घट्ट नातं जुळलं. आईने वडिलांच्या खांद्याला खांदा लावून पहिल्यापासूनच अतिशय मन लावून संसार केला. गरीब व भोळ्याभाबड्या नवऱ्याबरोबर संसार कसा करावा याचे मूर्तीमंत उदाहरण ती आहे. मोठं कुटुंब आणि जबाबदारीचा डोलारा तिने अगदी लीलया पेलला आहे.

आम्ही पाच भाऊ आणि पाच बहिणी अशी तिला एकूण दहा अपत्य ! गरिबीत सुद्धा आपल्या मर्यादा ओळखून आईने आम्हाला शिकवलं. सर्वांची लग्ने सुसंस्कृत घरांमध्ये कर्जबाजारी न होता पार पाडली. वडिलोपार्जित डोंगर उतारावरील ३ एकर जमीन कसत तिने कुळकायद्यात मिळालेली ६ एकर जमीन टिकवण्यात वडिलांना सखोल पाठिंबा दिला.

‘फाटक्यात पण नेटके रहा’ ही तिची आम्हास कायमची शिकवण. पैसे नाहीत म्हणून तिने कधीही घरांमध्ये तक्रार केल्याचे आठवत नाही. घरात अठरा विश्व दारिद्र्य असूनही प्राप्त परिस्थितीत अगदी कसरतीत संसार गाढा आयुष्यभर ओढला. अशात आम्हा भावंडांना हौसमौजेसाठी तर सोडाच पण शिक्षणासाठी पैसे ती आणणार कुठून होती? पेहरावाची साडी तिच्यासाठी हौसेची गोष्ट असायची. तरीसुद्धा जोडीदाराच्या मजुरीच्या मदतीने तिने मुलांना उच्चशिक्षित केलं ही गोष्ट लाखमोलाची आहे.

मी शाळेत नेहमी पहिला यायचो. दहावीत पहिला येऊनही व पुढे शिकायचं असूनही निव्वळ क्षुदाशांतीसाठी मला लगेचच शिक्षण थांबवावं लागणार होतं. पण माझी महत्वाकांक्षा आणि आईचा पाठींबा यामुळेच पुढे शिकू शकलो. तिच्याच संस्कारांच्या आणि स्वाभिमानाच्या वर्तुळात राहून मी माझं पीएचडी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पीएचडी करत असताना माझे वडील निर्वतले त्यावेळी माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होतीच पण आईने मला परिस्थितीचा चटका लागू दिला नाही. शिक्षण घेताना व पुढे आयुष्यात मला वेळोवेळी आर्थिक व इतर संकटांना सामोरं जावं लागलं. पण आईच्या ‘तक्रार करायची नाही, आहे त्या परिस्थितीवर मात करून पुढे जायचं’ अर्थात 'जीवन जसे आहे तसे स्वीकारा' या मंत्रामुळे मी तग धरू शकलो. 

शिवाजी विद्यापीठासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेत पीएचडी पूर्ण करून मी तिथेच भौतिकशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो, सध्या तिथे अधिविभाग प्रमुख म्हणून काम करतोय ही तिचीच प्रेरणा आणि पुण्याई म्हणावी लागेल. मी नेमका काय शिकलो हे तिला अजूनही माहीत नसेल, तसेच माझे पद, पदाचे महत्त्व यास अनभिज्ञ असली तरी आपल्या मुलाने जीवनात उत्कृष्टता मिळवली आहे इतकंच तिला कळतं. तिने दिलेल्या बळामुळे मी अनेक शिखरे गाठली. जागतिक शीर्ष शास्त्रज्ञांच्या यादीत मानाचे स्थान मिळवले. रोजचा दिवस काहीतरी नवीन देऊन जातो. अशावेळी पदाचा-प्रतिष्ठेचा गर्व होऊ लागला तर आईची नुसती आठवण मला अस्तित्वाची जाणीव करून देते आणि उद्याच्या नव्या कामगिरीसाठी दिशा देते. आईच्या मायेची शिदोरी अशीच असते, ती कधीच कमी पडत नाही.

माझा स्वभाव आईवर गेल्याचं माणसं मानतात. खरंच आहे ते, कारण शिस्तप्रियता, कष्टाळूपणा, कणखरपणा, सहनशीलता इत्यादी गोष्टी मला तिच्यामुळेच जन्मजात मिळाल्या आहेत. ती तिच्या कर्तव्याबाबत प्रामाणिक राहिली, तिनं जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलं, तिचा हाच स्वभाव माझ्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबिंबित झाला आहे. आम्ही मुलांनी आळशी न बनता नेहमी कार्यमग्न राहावं अशी तिची शिकवण होती. कष्ट करायला लाज बाळगू नये असं ती म्हणायची. लहानपणी मी विहिरीवर आठवडाभर कामाला गेलो होतो. त्याचे जे पैसे आले त्यातून मी माझ्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा रंगीत शर्ट-पॅंट घेतले. त्यावेळी जर तिने माझ्या हट्टापायी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून कपडे घेऊन दिले असते तर मला त्या कपड्याचं महत्व राहिलं नसतं आणि श्रमप्रतिष्ठा स्पर्धात्मक जगाच्या उंबरठ्यावर उमजली नसती. तिने दिलेल्या अशा अनेक धड्यांमुळे माझ्या आयुष्याचा अभ्यास लवकर पक्का झाला.

माझ्या मार्गदर्शनाखाली २० विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे. आपण संशोधन नावीन्यपूर्ण असावं असा माझा कायम आग्रह असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना कधीकधी ते अवघड वाटतं. आजकाल संशोधन क्षेत्रात गुणवत्ता राखणं जिकिरीचं होत असल्याने मला त्याबाबतीत कठोर व्हावं लागतं. संशोधन कार्य निर्देश आणि इच्छेनुसारच असाव असं विद्यार्थ्यांना मी सांगत असताना मी स्वतःला माझ्या आईच्या भूमिकेत व समोरच्या विद्यार्थ्यांना माझ्या भूमिकेत पाहत असतो. माझ्या आईने जशी मला सर्वोत्कृष्टतेची सवय लावली, त्यासाठी पडेल ते कष्ट करायला लावले ते माझ्या विद्यार्थ्यांकडूनही घडावं इतकीच माझी माफक व रास्त भावना असते. विद्यार्थ्याला काय वाटेल याची मी कधीही तमा बाळगत नाही. पण कालांतराने हे विद्यार्थी याचसाठी आभार व्यक्त करतात तेव्हा ते एकार्थी माझ्या आईचे आभार मानत असतात कारण ती तिचीच देण आहे. 

ती जे जगली, जे तिच्या नशिबी आलं त्याचा तिने खुशीने स्वीकार केला. तिने तिचा चंदन देह आमच्यासाठी झिजवला. शेती हीच आपली जीवनदायी ठेवा आहे आणि तीत राबल्याशिवाय गत्यंतर नाही ही खूणगाठ तिने कायम मनाशी बांधली होती. तिच्या चार मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या, शेतात काम करत असताना दोनदा विहिरीत पडली, एकदा सर्पदंशही झाला. ते तिच्यातलं आमच्यासाठीचं वात्सल्यच म्हणावं लागेल ज्यामुळे ती त्यातून पुन्हा पुन्हा जन्मली.


आयुष्यभर स्वाभिमान जपलेली आई अजूनही तशीच जगत आहे. सुरुवातीला कष्टाचे व नंतर आजारपणाचे सर्व त्रास तिने सोसले. कोणत्याही गोष्टीसाठी ती कुणावरही अवलंबून राहिल्याचे मला आठवत नाही. तिला अन्याय आणि कपटाची नेहमीच चीड वाटते. प्रत्येकाने आपल्या वाट्याचे काम न थकता आणि कारणे न देता प्रामाणिकपणे करावे असे तिला वाटते. स्वतःच्या मुलींच्या बाबतीतही ती अशीच तत्वनिष्ठ राहिली. त्यांच्या कुटुंबात तिने कधीही ढवळाढवळ केली नाही किंवा त्यांना माहेरावर अवलंबून राहू दिले नाही. त्या त्यांच्या कुटुंबात स्वावलंबी व्हाव्यात यासाठी ती त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत राहिली. 

वयाच्या ऐंशी पर्यंत ती अजिबात थकली नव्हती. पण पाच वर्षापूर्वी उद्भवलेल्या हृदयविकाराच्या आजारानंतर मात्र ती थोडी खचल्यासारखी वाटते. आजकाल तिला दिसायला व ऐकायला कमी येते. पण तिच्यात तो जून स्वाभिमान व कणखरपणा अजून तसाच अढळ आहे. तिचं असणं आमच्यासाठी मोठा आधार आहे. माझ्या कुटुंबाने आजपर्यंत अनेक चढउतार पहिले, पराकोटीचा संघर्ष करून सुखाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा त्या प्रयत्नांना अपयश आले, सुखाने अनेकदा हुलकावणी दिली. तरीही आम्ही थांबलो नाही. आईच्या मार्गदर्शनाखाली धावत राहिलो. माझे आताचे यश सर्वांना माझ्या अविश्रांत प्रयत्न आणि मेहनतीचे संचित वाटत असले तरी ते माझ्या माऊलीच्या कष्टमय जीवनाचे फलित आहे, हे नक्की.

मी जागतिक स्तरावर संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात थोडेफार नाव कमावले आहे, त्याचे सगळे श्रेय तिलाच असले तरी ती त्या मोठपणापासून अलिप्त राहते. कारण तिनं जे काही कष्ट सोसले ते मुलांच्या मोठेपणासाठी होते, स्वतःसाठी नव्हतेच मुळी. वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर तिला आरोग्यदायी आयुष्य लाभवे व तिची शतकोत्तर साथ आम्हास लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.







- प्राध्यापक डॉ. केशव यशवंत राजपुरे

मोबाईल ९६०४२५०००६

rajpureky@gmail.com

Thursday, October 27, 2022

भौतिकशास्त्र जगणारा कलाकार शिक्षक


३१ ऑक्टोबर २०२२ रोजी माझे विभागातील सहकारी डॉक्टर मानसिंग वसंतराव टाकळे हे वयाच्या साठाव्या वर्षी त्यांच्या विभागातील शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. आज २७ ऑक्टोबर रोजी त्यांचा साठावा वाढदिवस ! यानिमित्ताने त्यांच्याविषयी माझ्या भावना विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील या उद्देशाने इथं मांडत आहे. 

नम्रता कशी असावी हे जर एखाद्याला बघायचं असेल तर त्यांनी टाकळे सरांच्या व्यक्तिमत्वाकडे बघावं. अतिशय देखणं व्यक्तिमत्व लाभलेले, एक विद्यार्थीप्रिय, निगर्वी आणि आजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे टाकळे सर ! सर म्हणजे भौतिकशास्त्र जगणारा कलाकार शिक्षक ! त्यांना विषयाला वाहून घेतलेल्या दुर्मिळ व्यक्तिमत्वांपैकी एक म्हटलं तर वावगं ठरू नये.

सर मिरजेपासून १० किमी दक्षिणेला असलेल्या म्हैसाळ या गावचे ! त्यांनी आपले प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण कर्मवीर विद्यालय म्हैसाळ, महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर व महाविद्यालयीन शिक्षण न्यू कॉलेज कोल्हापूर येथून पूर्ण केले. १९८७ साली थेरेटिकल फिजिक्स मध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एमएससी पूर्ण केली. त्यांचे वडील महाराष्ट्र पोलिसात अधिकारी होते. त्यांना एक भाऊ आणि विवाहित बहीण आहे. जरी ते म्हैसाळ चे असले तरी ते कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेतील आपल्या मामाच्या घरीच घडले. त्यामुळे त्यांच्या व्यंक्तीमत्वात अस्सल कोल्हापुरी बाज आहे.  

सरांनी वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष केला. अस्तित्वाची लढाई जन्मभर लढले. वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. जरी ते शिक्षक सेवेत वेळेत रुजू झाले असले तरी ते कायमस्वरूपी शिक्षक होण्यासाठी खूप अवधी जावा लागला. शिक्षकी सेवेतील ३० वर्षाच्या कालावधीतील बराच काळ त्यांनी हंगामी शिक्षक म्हणून सेवा केली. या दरम्यान त्यांनी हायस्कूल, जुनियर कॉलेज, सीनियर कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणि सरते शेवटी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केलं. शिक्षक म्हणून त्यांनी भोगावती, न्यू कॉलेज कोल्हापूर, बिद्री महाविद्यालय आणि मग शिवाजी विद्यापीठ अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला. यापैकी बराच काळ त्यांनी बिद्री महाविद्यालयात सेवा केली. 

आयुष्यात इतक्या अडचणी येऊन देखील ते नाउमेद झाले नाहीत किंवा जीवन प्रवासातील कोणत्याही वळणावर ते भरकटले नाहीत. प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला शांत ठेवून त्यांनी नीतिमूल्य आणि माणुसकी याची कायम जपणूक केली. उलट त्यांनी नाती वाढवून ती कायम जतन केली. हे स्नेहबंध वेळोवेळी फोन, समक्ष भेटी आणि स्वतः चित्रीत करून रंगवलेली भेटकार्ड देऊन चिरतरुण ठेवण्याचे काम त्यांनी केलं. ते स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहेत. कुठलेही प्रशिक्षण न घेता त्यांनी निरीक्षणातून चित्रकला आपली केली. कलेशी निगडित कोणताही कार्यक्रम त्यांनी निष्कारण चुकवल्याचे त्यांनाही आठवत नसेल. यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रयत्नातून माझी मोठी कन्या आत्ता आर्किटेक्चर चे शिक्षण घेत आहे.

२००१ दरम्यान सरांची माझी ओळख झाली. तेव्हा ते सौदागर सरांच्या कडे पीएचडी करत होते. आदरणीय पी एस पाटील सर यांचे वर्गमित्र एवढाच त्यांचा मला परिचय होता. त्यांचं बोलणं अतिशय हळुवार आणि पुणेरी पद्धतीच असल्यामुळे मी सुरुवातीला त्यांच्याशी जपून बोलत असे. त्यानंतर त्यांचा मोकळा ढाकळा आणि विनोदी स्वभाव जाणून त्यांच्याशी सलगी वाढली. मी बराच वेळ कम्प्युटर समोर बसे आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करे. सरांचं पीएचडी काम देखील कम्प्युटर वर असल्यामुळे आमची आणखी ओळख वाढली. त्यांचे स्पेशलायझेशन थेरेटीकल फिजिक्स, म्हणजे फिजिक्स मधील सगळ्यात कठीण विषय. त्यात त्यांची पीएचडी देखील थेरी मध्ये असल्यामुळे त्यांच्याविषयी सुरुवातीपासूनच आदर. पीएचडी चा विद्यार्थी ते विद्यापीठातील शिक्षक या प्रवासाचा मी साक्षीदार आहे पण त्यांच्या वृत्तीमध्ये तसूभरही बदल झालेला मला आढळला नाही.

सर श्रद्धाळू आहेत आणि नित्य पूजा अर्चा अगदी भक्तिभावाने करतात. त्यांनी आध्यात्मिकता मनापासून जोपासली आहे. याविषयी त्यांची स्वतःची मत आहेत. टाकळे सर मला आध्यात्मिक विचारांचे बरेच व्हिडिओ पाठवत असत. मी ते कधीतरी बघत असे. कोरोना काळामध्ये मी जेव्हा क्वारंटाईन होतो तेव्हा त्यांनी पाठवलेले अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांचे मी बरेचशे व्हिडिओ पाहिले आणि त्यांचे विचार आणि भाषण यावर खूप प्रभावीत झालो. त्यानंतर मी सद्गुरूंना अनुकरण करू लागलो ते सरांच्या मार्गदर्शनातून. भौतिकशास्त्रासारखा विषय शिकवत असताना अध्यात्माशी नाळ जोडलेला हा दुर्मिळ शिक्षक आहे.

बोलताना भौतिकशास्त्राची परिभाषा सर सहज वापरतात. उदा. 'तुमची आमची वेव्हफक्शन ओव्हरलैप होतायत म्हणून आपलं जमतं' किंवा 'अमुक एक गोष्ट अशी इव्हॉल्व्ह होते', 'जगताना कमीत कमी फ्रिक्शन व्हावं असं पहावं', 'परटरबेशन फार ठेऊ नयेत' इ. थिअरीचा माणूस उत्तरोत्तर तत्वज्ञानाकडे वळतो असा आपला अनुभव. भौतिकशास्त्रामधील निरीक्षक आणि तत्वज्ञानामधील साक्षीभाव यावर सरांकडून ऐकतांना खूपच नवल वाटतं. सरांकडे दोन्ही गोष्टींची प्रगल्भता आहे आणि ती प्रत्यक्षपणे ते जगतात. एवढं सारं सांगूनही ते त्यांच्या पहाडी शैलीत खळखळून हसत 'सोडून दे फार विचार करु नकोस' असं सहज सांगतात.

त्यांचा सहवास नेहमीच प्रेमळ असतो. त्यांचे सानिध्य नेहमीच खळखळत्या झऱ्यासारखं वाहणारं आहे. त्यात त्यांचे विनोदी चुटके वातावरणातील गंभीरता कधी घालवून टाकतात ते समजत नाही. सर पराकोटीचे प्रामाणिक.. छक्के पंजे त्यांना माहीत नाहीत. त्यांच्या बोलण्यात कुठली गुपित रहस्य नसतात किंवा ते कधी गॉसिप केलेल मला आठवत नाही, अतिशय मोकळ ढाकळ व्यक्तिमत्व आम्ही अनुभवल आहे. ते आमच्या सहकाऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचं कोणाशीही वैर नाही.

कौटुंबिक पार्श्वभूमीवर सुद्धा सरांचं ईतरांशी फार छान जुळतं. त्यांचे स्फूर्तीस्थान त्यांचे मामा कै. उदय पवारसाहेब यांचंदेखील सरांवर पुत्रवत प्रेम होतं आणि त्यांच्या ईच्छेबाहेर सर कधीच वागल्याचं स्मरत नाही. अंथरुणाला खिळलेल्या आईची सुश्रुषा करत ते दैवी काम करत आहेत. त्यांनी आपल्या बंधूना आहे तसा स्वीकारला आहे. सरांच्या अर्धांगिनी सौ. टाकळे वहिनींनी देखील सरांना त्यांच्या जीवन प्रवासात मोलाची साथ हसतमुखाने दिली आहे. त्यांचा उल्लेख करणं अगदी आवश्यकच आहे. सरांबरोबरचं प्रपंचाचं इंटिग्रेशन यशस्वीपणे हाताळण्यात त्यांच महत्वाचं योगदान आहेच.
भौतिकशास्त्र विभागात ज्ञानदानाच्या कार्याव्यतिरिक्त त्यांनी विभागास फार मोलाचे योगदान दिल आहे. इटली येथील थेर्टिकल फिजिक्स च्या इंटरनॅशनल सेंटर मधून विभागास थेरीची कित्येक पुस्तके मिळवून देण्यात त्यांनी स्वतः प्रयत्न केले होते. विभागात आल्यापासून थेरी स्पेशलयझेशन चे ते आधारस्तंभ झाले आहेत. थेरी अर्थात सैद्धांतिक भौतिकशास्त्र हा भौतिकशास्त्राचा कणा मानला जातो. या विषयात मुलांना तयार करणे व या विषयाची गोडी लावणे ही फार मोठी जबाबदारी त्यांनी पेलेली आहे तसेच याच विषयात संशोधन करणारे ते एकमेव आहेत. अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी नॅक चे समन्वयक म्हणून अतिशय प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडली आहे. विभागातील शिक्षक सचिव म्हणून त्यांनी बराच वेळ काम बघितले आहे. आतापर्यंत त्यांचे पन्नास शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी सात विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आहे. डेन्सिटी फंक्शनल थेरी चा वापर करून भौतिकशास्त्रातील आकडेमोड करण्यासाठी त्यांनी मॅथेमॅटिका तसेच क्वांटम एस्प्रेसो व बुराई या सॉफ्टवेअर चे ज्ञान आत्मसात केले आहे. आधुनिक तंत्रज्ञान शिकताना पेन व पेपरची गोडी मात्र त्यांनी सोडली नाही. अंतरंगात मूळचे कलाकार असल्याने की काय पण त्यांचं बोर्ड रायटिंग म्हणजे "फिजिक्स मधील कलेचा"एक उत्तम नमुनाच. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन विभागाने देखील सेवानिवृत्तीपूर्वीच रिसर्च प्रोफेसर म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. 

त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यपैकी एक म्हणजे ते एक आधार देणारे व्यक्तिमत्व आहे, ते आपली चूक प्रामाणिकपणे कबूल करतात, ते लगेच भावनावश होतात त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. मिल्या, मंद्या, पम्या, अन्या आणि सच्या अशी मित्रांना संबोधन वापरून ते कधी दुरवू देत नाहीत. नात्यांची जपणूक त्यांनीच करावी. असे हे उत्कृष्ट व्यक्तिमत्व सेवानिवृत्त होत आहे. नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे ‘सेवानिवृत्तीचा. मी तर म्हणेन यानंतर सरांना चुकल्यासारखं न वाटता अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला असे वाटावे. त्यांनी जे जे ठरवलंय ते सगळं करावं. सरांना जे जे हवे ते सारे मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो ! सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ईश्वराने त्यांना निरोगी दिर्घाआयुष्य प्रदान करावं हीच अपेक्षा.

- केशव राजपुरे

Saturday, October 22, 2022

जागतिक संशोधकांच्या यादीत सलग तिसऱ्यांदा

जागतिक शीर्ष संशोधकांच्या यादीत प्राध्यापक डॉ केशव राजपुरे यांना सलग तिसऱ्या वर्षीही स्थान 

गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील अभ्यासकांकडून विविध विषयात संशोधन करणाऱ्या शीर्ष २% संशोधकांची यादी प्रसिद्ध केली जात आहे. यावर्षीच्या यादीत देखील शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आणि बावधन-अनपटवाडी (ता. वाई) गावचे सुपुत्र डॉ केशव यशवंत राजपुरे यांनी आपले नाव टिकवले आहे. अभ्यासकांनी जगातल्या जवळपास एक कोटी संशोधकांच्या संशोधन कार्याचा अभ्यास करून त्यातील २ लाख व्यक्तींची ही यादी प्रसिद्ध केली आहे. अत्याधुनिक सुविधा नसताना देखील प्राप्त सुविधांमध्ये जगातील उच्च कोटीच्या प्रयोगशाळांतील संशोधकांच्या पंक्तीत जाऊन बसणे ही फार मोठी उपलब्धी आहे कारण त्यांचे संशोधन जागतिक दर्जाचे व महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध घेणार आहे. ते मूळतः प्रामाणिक आणि उत्कृष्ट शिक्षक, त्यातच संशोधनातील ही उत्कृष्टता त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा पुरावा सादर करते. खेड्यातील अतिशय जिद्दी तरुण प्रतिकूल परिस्थितीतून स्वप्नवत यश मिळवत इथपर्यंत मजल मारतो ही इतरांसाठी खूपच प्रेरणादायी गोष्ट आहे.

संशोधकांची गुणवत्ता ठरवण्यासाठी पारंपारिकपणे त्यांच्या एच-इंडेक्सचा वापर केला जाई. वेगवेगळ्या विषयातील संशोधकांची गुणवत्ता ठरवताना ही पद्धत अपुरी पडे. म्हणून स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक जॉन इयोनिदिस व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्कोपस डेटाबेसमधील माहितीचा उपयोग करत संशोधकांचा कोम्पॉसिट इंडिकेटर काढण्याची पद्धत तयार केली व त्याआधारे ते दरवर्षी शीर्ष २% संशोधकांची यादी प्रसिद्ध करतात. ही यादी वार्षिक शीर्ष २% व सार्वकालिन २% अशा दोन प्रकारात जाहीर केली जाते. गेल्या तीन वर्षांपासून डॉ राजपुरे यांचे नाव दोन्ही प्रकारच्या यादीत सातत्याने येत आहे.
गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी संशोधनासाठी व्यतीत केला आहे. ते करत असलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनात खालील क्षेत्रांचा समावेश आहे: विद्युत घट, गॅस सेन्सर, फोटो डिटेक्टर, फोटोकॅटालायसिस, मेमरीस्टर इत्यादींसाठी उपयोगात येणाऱ्या विविध पदार्थांचा अभ्यास. सेमीकंडक्टर व प्रकाश वापरुन पाण्यातील घातक द्रव्यांचे विघटन करणारे फोटोकॅटालायसिस हे त्यांचे विशेष आवडीचे संशोधन क्षेत्र असून या विषयात त्यांनी मोठे संशोधन करून वेळोवेळी ते आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केले आहे. याशिवाय त्यांनी विशेष फोटोकॅटालायटीक पदार्थांचे पेटंट देखील मिळवले आहेत, यावरून त्यांच्या संशोधनाची नविण्यपूर्णता व सामाजिक उपयोजकता दिसून येते. आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ विद्यार्थ्यांनी पीएचडी व दोघांनी एमफीलचे संशोधन पूर्ण केले असून सध्या आठजण पीएचडी करीत आहेत. त्यांनी शैक्षणिक व संशोधन कार्यासोबतच विद्यापीठातील अभ्यासमंडळ चेअरमन, अधिविभागप्रमुख, समन्वयक वगैरे अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी पार पाडली आहे. युसिक-सीएफसीचे प्रमुख असताना त्यांनी अनेक संशोधन सुविधा विद्यापीठात उपलब्ध केल्या. त्या सुविधांचा उपयोग विद्यापीठातील संशोधनाची गुणवत्ता वाढण्यास होत आहे.

सध्या भौतिकशास्त्र अधिविभागात प्रमुख म्हणून कार्यरत असताना विविध संशोधन सुविधा निर्माण करण्यावर त्यांचा भर असून त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या तालमीत तयार झालेले या विभागातील १५० हून अधिक विद्यार्थी युरोप, अमेरिका, जपान तसेच दक्षिण कोरिया सारख्या देशांत प्रतिष्ठित फेलोशिपवर संशोधन करत आहेत. संशोधनातील महत्त्वाकांक्षेच्या बळावर त्यांनी आजवर भरपूर गोष्टी मिळवल्या. केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून निधी मिळवून त्यांनी दर्जेदार संशोधन तर केलंच सोबत त्यातून अनेक वैज्ञानिक उपकरणेही आणली. त्यांच्या प्रत्येक विद्यार्थाचे संशोधन विषय पाहिल्यास त्यात नविण्यापूर्णता जाणवते. शोधनिबंधात नुसते पदार्थांचे गुणधर्म मांडण्याऐवजी त्यात पदार्थांच्या विशिष्ट गुणधर्मामागील विज्ञान उलघडण्यात त्यांचा भर असतो. म्हणूनच त्यांच्या जवळपास २०० शोधनिबंधांना नऊ हजार पेक्षा जास्त उद्धरणे (सायटेशन्स) मिळाली आहेत. 

राज्यातील इतर विद्यापीठातील संशोधकांच्या क्रमवारीच्या तुलनेत डॉ राजपूरे यांचे नाव अगदी वरती आहे. ज्ञान म्हणजे कृतीतील माहिती यावर त्यांचा विश्वास आहे आणि ज्ञानी पिढी घडविण्यासाठी ते नेहमी आपल्या स्तरावर सर्वोत्तम प्रयत्न करतात. हे मिळालेलं मानांकन ते त्यांचे आई-वडील, कुटुंबीय, विद्यार्थी, मित्रपरिवार, सकळ पंचक्रोशी ह्या सर्वांच्या वेळोवेळी मिळालेल्या सहकार्य, पाठींबा आणि सदिच्छांचा परिपाक आहे अशी त्यांची धारणा आहे. हि गोष्ट तरुण पिढीला त्यांच्यातील सर्वोत्कृष्टता शोधण्यासाठी आणि ज्ञान निर्मिती प्रक्रियेत सक्रिय रित्या सहभागी होण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल. अशा मानांकनामुळे संशोधनाचा दर्जा खूपच प्रमाणात सुधारला आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील कलागुणांना हे सर्व आपल्या आवाक्यात असल्याचा विश्वास मिळतो.

शब्दांकन - डॉ सुरज मडके
मोबाइल - 8208283069

Sunday, October 16, 2022

शिवाजी विद्यापीठाचे दहा प्राध्यापक जागतिक दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत

अमेरिकेतील जगप्रसिद्ध स्टॅनफर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या जागतिक दोन टक्के प्रतिभावान शास्त्रज्ञांच्या यादीत शिवाजी विद्यापीठातील एकूण १० प्राध्यापकांचा समावेश झाला आहे. संशोधकांचे शोध निबंधांची संख्या, सायटेशन, एच निर्देशांक, सहलेखकत्व, भूमिका तसेच स्वत:ची सायटेशन यां सर्वांचा सारासार विचार करून सर्वसमावेशक एक संयुक्त निर्देशांक काढून ही क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. गेले तीन वर्षे सातत्याने या यादीत विद्यापीठातील प्राध्यापकांनी स्थान टिकवले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्र-कुलगुरू प्रा. पी.एस. पाटील, प्रा. के.वाय. राजपुरे आणि डॉ. ए.व्ही. मोहोळकर (भौतिकशास्त्र), प्रा. जे.पी. जाधव (जीवरसायनशास्त्र), प्रा के.एम. गरडकर (रसायनशास्त्र), डॉ. टि.डी. डोंगळे, डॉ. एच.एम. यादव आणि डॉ. एस.व्ही. ओतारी (नॅनोविज्ञान) तसेच निवृत्त प्रा ए.व्ही. राव व प्रा. एस.पी. गोविंदवार यांचा समावेश आहे. ही क्रमवारी संपूर्ण कारकिर्दीतील व गेल्या वर्षाच्या कामगिरीवर आधारित अशा दोन गटामध्ये जाहीर केली असून कारकिर्दीतील गटात प्रा पाटील, प्रा, राव, प्रा गोविंदवार व प्रा राजपुरे यांचा समावेश आहे.
दर्जेदार संशोधनामुळे विद्यापीठातील मटेरियल्स सायन्स क्षेत्रात काम करणाऱ्या प्राध्यापकांनी सलग तीन वर्षे या यादीत आपली नावे कायम ठेवली आहेत. शिवाजी विद्यापीठ मटेरियल्स सायन्स संशोधनात भारतात अग्रेसर असून हे मानांकन म्हणजे त्यांच्या या क्षेत्रातील संशोधनातील गुणवत्तापूर्ण योगदानाची पोहोच पावती आहे. ही विद्यापीठाच्या दृष्टीने अतिशय भूषणावह बाब आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यापीठातही उत्कृष्ट संशोधन करण्यासाठी तरुण पिढीमध्ये आवश्यक विश्वास निर्माण होईल. तसेच या यादीत आपले नाव यावे म्हणून इतरही प्राध्यापक कसोसीने प्रयत्नशील राहतील आणि त्यायोगे विद्यापीठाचे जागतिक मानांकन सुधारणयास मदत होईल. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डि टी शिर्के यांनी या सर्वांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करून विद्यापीठाच्या वतीने अभिनंदन केले.
________________________________________
या क्रमवारीत भौतिकशास्त्र विभागाचे ४ शिक्षक आणि २५ माजी विद्यार्थी: शिवाजी विद्यापीठातील दर्जेदार संशोधन विभागाने केले अधोरेखित 

एल्सव्हियरने अलीकडे जगभरातील दोन टक्के शीर्ष शास्त्रज्ञांचा समावेश असलेली "प्रमाणीकृत साइटेशन्स निर्देशांकाचे अद्यावत विज्ञान व्यापी लेखक डेटाबेस" जागतिक क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्व विज्ञान विषयांत मिळून जगभरातील एक कोटी संशोधक विचारात घेतले होते व त्यातील २% म्हणजे जवळ जवळ २ लाख इतके लेखक त्यांच्या निर्देशांकाच्या उतरत्या क्रमाने डिओआय असलेल्या एका संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध केले आहेत. गेले तीन वर्षे ही क्रमवारी प्रसिद्ध होत आहे. २०२२ च्या २% संशोधक डेटाबेसमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे चार शिक्षक आणि तब्बल २५ माजी विद्यार्थी झळकले आहेत. त्यापैकी बहुतेकजण परदेशात पोस्ट डॉक्टरेट करत आहेत. ही विभागाच्या आणि विद्यापीठाच्या दृष्टीने अगदी भूषणावह बाब आहे. आम्ही जागतिक दर्जाचे संशोधन करत आहोत याचा हा दाखलाच आहे. हे यश एका रात्रीत मिळालेले नसून विद्यापीठ प्रशासनाचे सहकार्य तसेच आजीमाजी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नांचे फलित आहे.

संशोधनाची गुणवत्ता चिन्हांकित करण्यासाठी सायटेशनवर आधारित काढलेला निर्देशांक मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शोधनिबंधांची संख्या, तसेच त्याला मिळालेल्या साइटेशन्स वरून काढला जाणारा एच निर्देशांक मोजणीत एकरूपता नसते व त्याबद्दल काही मतमतांतरे आहेत. त्यामुळे त्याला सर्वमान्यता नव्हती. म्हणून स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या पुढाकाराने सायटेशन, एच निर्देशांक, सहलेखकत्व, लेखकाची नेमकी भूमिका तसेच स्वत:ची सायटेशन यां सर्वांचा सारासार विचार करून सर्वसमावेशक आणि सर्वमान्य एक संयुक्त सूचक (सी स्कोर) निर्देशांक काढून ही क्रमवारी प्रसिद्ध केली. ही प्रणाली आयसीएसआर लॅब द्वारे एल्सेव्हियरने प्रदान केलेल्या स्कॉपस डेटाचा वापर करते. दरवर्षी ही प्रमाणित क्रमवारी जाहीर होत असते. या रँकिंगमुळे केवळ एका विषयांमधीलच नव्हे तर सर्व विषयांमधील गुणवत्तेची तुलना करणे शक्य झाले आहे. शीर्ष २% शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळवणे हीच एक मोठी उपलब्धी असते. गेल्या तीन वर्षात त्या यादीत आम्ही आमचं स्थान टिकवून ठेवले आहे. हि गोष्ट तरुण पिढीला त्यांच्यातील सर्वोत्कृष्टता शोधण्यासाठी आणि ज्ञान निर्मिती प्रक्रियेत सक्रिय रित्या सहभागी होण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल.

पदार्थविज्ञान अधिविभागातील सुरवातीचं संशोधन शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून केलं गेलं असलं तरी काळानुरून त्यात आधुनिकता आली आहे. आताचे संशोधन सामाजिक गरजा अधिक कार्यक्षमतेने भागवतील या दृष्टीने केले जात आहे. हल्ली इथली संशोधन प्रेरणा नॅनोमटेरियल्सवर केंद्रीभूत आहे. अधिविभागात सध्या मटेरियल्स सायन्स च्या एरोजेल, नॅनो-प्रतिजैविके, सेन्सर, सुपर कॅपॅसिटर, मायक्रोवेव्ह-शोषक, सौर उत्प्रेरके, मेमरी, घन चुंबकीय शीतलता, जलापकर्षी थर, अतिनील किरणे शोधक आदि विविध प्रगत क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन चालू आहे. आतापर्यंत सुमारे ४०० विद्यार्थी पीएचडी झाले आहेत तर विभागाचे संशोधन २५०० पेक्षा जास्त शोधनिबंधातून प्रकाशित झाले आहे. अधिविभागाला वित्तीय संस्थांकडून जवळजवळ २६ कोटी रुपये इतके अनुदान प्राप्त केले आहे. या अनुदानातून पीआयएफसी सारखे अद्वितीयसंशोधन सुविधा केंद्र निर्माण झाले आहे. आतापर्यंत या विभागातील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी युरोप, अमेरिका, जपान तसेच दक्षिण कोरिया सारख्या देशांत पोस्ट डॉक संशोधन केले आहे आणि काहीजण अद्यापही प्रतिष्ठित फेलोशिपवर कार्यरत आहेत. या संशोधन पायाभूत सुविधा आणि नामवंत संस्थांच्या सहकार्यामुळे या विभागाच्या संशोधनाचा दर्जा निश्चितच सुधारला आहे. विद्यार्थी त्यांचे संशोधन उच्च प्रभाव-घटक जर्नल्समध्ये प्रकाशित करण्यास प्राधान्य देतात. विद्यापीठाने मटेरियल्स सायन्स संशोधनात अव्वल स्थान मिळवले आहे त्यात भौतिकशास्त्र विषयाचा सिंहाचा वाटा आहे.

विद्यार्थी हळूहळू पोस्ट-डॉक्टरेट काम करण्यासाठी परदेशी लॅबमध्ये गेले आणि मानव-दुवा विकसित झाला. तीथल्या संशोधनाचा दर्जा, सुविधा यांमुळे त्यांच्या कल्पनांना वाव मिळाला आणि नवनवीन संशोधन उपक्रम आणि उत्तरे शोध मोहीम सुरू झाली. जर आपण तीन दशकांपूर्वीची या विभागाची संशोधन संस्कृती व संशोधनाच्या विषयावर आत्ताच्या विषयांशी तुलना केली तर त्यात संशोधन निर्देशांकावर आधारित युजीसी तसेच डीएसटी ने विभागीय संशोधन प्रकल्पांसाठी मोठ्या निधीसाठी हा विभाग निवडला तोपर्यंत आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. चांगल्या दर्जाचे संशोधन करण्यासाठी विद्यापीठातील मूलभूत पायाभूत सुविधा सुधारल्या. मग शिक्षकांनी त्यांच्या दडलेल्या कल्पनांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हल्ली विद्यार्थी ५ किंवा १० नव्हे तर तब्बल १५ इम्पॅक्ट फॅक्टर असलेल्या जर्नल मध्ये पेपर प्रकाशित करण्याचा ध्यास ठेवून आहेत. यामुळे संशोधनाचा दर्जा अधिक प्रमाणात सुधारला आहे. या नावे याच गोष्टीचे परीपाक आहेत असे मला वाटते.

हे रँकिंग दोन गटांमध्ये केले आहे: एक करिअरच्या कामगिरीवर आणि दुसरे गेल्या वर्षीच्या कामगिरीवर. करिअर परफॉर्मन्स डेटाबेसमध्ये खालील संशोधकांनी स्थान मिळवले आहे: शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू पी.एस. पाटील, निवृत्त शिक्षक ए. व्यंकटेश्वरा राव आणि सी.डी. लोखंडे, अधिविभागप्रमुख के.वाय. राजपुरे, आर.एस. माने, बी.आर. संकपाळ, दिपक डुबल आणि संभाजी एस.शिंदे. मागील वर्षाच्या कामगिरीच्या डेटाबेसमध्ये खालील लोकांनी स्थान मिळवले आहे: पी.एस. पाटील, के.वाय. राजपुरे, ए. व्ही. मोहोळकर, आर.एस. माने, बी.आर. संकपाळ, आर.एस. देवण, व्ही.एल. मथे, एच.एम. पठाण, दिपक डुबल, एस.एम. पवार, आर.जे. देवकते, आर.आर.साळुंखे, वाय.एम. हुंगे, एस.एस.माळी, आर.सी. कांबळे, एस.एस.लठ्ठे, एस.एस.शिंदे, एन.आर. चोडणकर, एस.जे. पाटील, एस.के. शिंदे, अकबर आय. इनामदार, गिरीश गुंड, आर.सी. पवार, उमाकांत एम. पाटील, ए.डी. जगदाळे आणि एम.पी. उर्यवंशी. याद्वारे या संशोधकांनी एसएच पवार, बीके चौगुले, सीडी लोखंडे, सीएच भोसले, एव्ही राव आणि व्हीआर पुरी यांच्या संशोधनाचा वारसा अधिक परिणामकारकरीत्या पुढे चालवला आहे.

अशा प्रकारच्या मानांकनामुळे लोकांना त्यांच्या संशोधनाचे मोल आहे असे हे पटते. संस्थेची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठा देखील सुधारते. अतिशय महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील कलागुणांना हे सर्व आपल्या आवाक्यात असल्याचा विश्वास मिळतो.

Tuesday, July 26, 2022

सामाजिक परिवर्तनात ज्ञानी प्रतिभेचे योगदान

केएलई सोसायटीचे श्री काडसिद्धेश्वर कला महाविद्यालय आणि एच.एस.कोटंबरी विज्ञान संस्था, हुब्बळी
शून्य सावली दिवस विषयावर दोन दिवसांची कार्यशाळा (२१, २२ जुलै २०२२)

(या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शनपर केलेल्या भाषणाचा भाषांतरित भाग)
___________________________________

सर्वांना सुप्रभात ! सर्वप्रथम, मी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ उमादेवी नेर्ले मॅडम आणि आयोजन समितीचे आभार मानतो की त्यांनी मला येथे निमंत्रित केले आणि शून्य सावली दिनानिमित्त या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित केले. विज्ञान बंधुत्वासाठीच्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमादरम्यान तुम्हां सर्वांमध्ये असल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे.

या कार्यशाळेत तुम्ही शून्य सावली दिवस या विषयावर ऐकणार आहातच तसेच तज्ञांची तांत्रिक सत्रे असतील. तरी मी या दिवसाचे महत्त्व सांगू इच्छितो. 'शून्य सावली दिवस' ही एक खगोलशास्त्रीय घटनांपैकी एक आहे. पृथ्वीच्या अक्षीय झुकावामुळे, सूर्य वर्षभर वेगवेगळ्या अक्षांशावर वेगवेगळ्या कोनातून चमकतो. यामुळे ऋतू येतात. जेव्हा सूर्य डोक्यावर (झेनिथवर) असतो तेव्हा शून्य सावली दिवस कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यान दिसून येतो. ही द्विवार्षिक घटना अनुक्रमे दक्षिणायन आणि उत्तरायण दरम्यान जेव्हा सूर्य खर्‍या पूर्वेकडे उगवतो आणि खर्‍या पश्चिमेला मावळतो तेव्हा दिसून येते. आपल्या देशात ही घटना उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या मध्यात दिसते. हुब्बालीमध्ये, दरवर्षी १ मे आणि ११ ऑगस्टच्या आसपास दिसून येतो. या दिवसाचे महत्त्व लगेच तपासता येईल. या निरीक्षणांच्या सहाय्याने पृथ्वीच्या परिभ्रमणाचा परिघ आणि वेग मोजता येतो. ही निरीक्षणे २००० वर्षांपूर्वी आपल्या भारतीय शास्त्रज्ञानी केली होती. या खगोलीय घटनांवरील परिसंवाद आणि कार्यशाळा तरुण प्रतिभा जागृत ठेवण्यास उपयुक्त आहेत.

तरुणांमध्ये वैज्ञानिक वृत्ती बळकट करून त्यांना ज्ञाननिर्मिती प्रक्रियेचा भाग होण्यासाठी प्रेरित करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे, जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अशा महत्त्वाच्या विषयावर शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मी महाविद्यालयाचे अभिनंदन करतो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती वृद्धीस आवश्यक शिक्षकांची मने नक्की प्रज्वलित होतील. आपल्या देशातील संशोधन प्रतिभांना सक्षम करण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वाच्या आहेत. विज्ञान हे पुस्तकात न ठेवता आपल्या जगण्याचा भाग बनवण्यात अशा कार्यशाळा महत्त्वाची भूमिका बजावतील.

मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी तत्वज्ञानी नाही किंवा मी महान वैज्ञानिकही नाही, पण प्रामाणिकपणे सांगायचे तर मी एक प्रामाणिक शिक्षक आहे. सामाजिक सुधारणांमध्ये शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. राष्ट्र किंवा समाज घडवणारा तो कलाकार आहे असे कोणी म्हणू शकतो. मला पहिल्यापासूनच शिक्षक व्हायचे होते. त्यामुळे कदाचित मी इंजिनीअरिंगला घेतलेला प्रवेश रद्द केला असेल. मला वाटत असे की शिक्षक हा असा एक घटक आहे जो आपल्याला अशक्य गोष्टी करण्यास मदत करतो. उत्कृष्ट शिक्षक हे एक रत्न असते. आणि ती काळाची गरज आहे. एक चांगला शिक्षक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती आणि ज्ञानाची मशाल घेऊन जातो. मी गेल्या ३० वर्षांपासून या प्रणालीस जवळून अनुभवले आहे म्हणून याप्रसंगी माझे अनुभव आणि समज तुमच्याशी मुक्तपणे शेअर करण्याचा माझा मानस आहे.

मला वाटते कोणत्याही शिक्षण प्रणालीचा उद्देशच मुळी ज्ञाननिर्मिती करणे असावा. पण ज्ञान निर्मती तेव्हाच होईल जेव्हा अस्तित्वात असणारे ज्ञान आपणास माहिती असेल. तसेच आपल्या विचारांना चालना देत तार्किक आणि विश्लेषणात्मक पद्धतीने अस्तित्वातील माहितीवर मत मांडून नाविन्यपूर्ण विचार करणे म्हणजेच ज्ञाननिर्मिती होय. माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. गुगल किंवा पुस्तकात मिळते ती माहिती. माहितीच्या आधारे जर एखाद्याने भौतिक घटना समजून घेण्यासाठी स्वतः नाविन्यपूर्णपणे कृती केली तर त्याला ज्ञान म्हणता येईल. म्हणजेच कृतीतील माहिती म्हणजे ज्ञान. उदाहरणार्थ कदाचित आपण गुगलवर पोहण्याचा व्हिडिओ बघू शकतो, पण प्रत्यक्षात पोहण्याचा सराव करण्यासाठी आपणास पाण्यात उडी मारावी लागते. तसं बघितलं तर प्रत्यकजण नाविन्यपूर्ण विचार सक्षम असतो. पण हे करण्यासाठी आपण त्यांच्या मनाला प्रशिक्षित केले पाहिजे.

रिचर्ड फेनमन शंभर वर्षांपूर्वी ब्राझीलमधील व्याख्यानमालेच्या एका समारोप सत्रात म्हणतात - आपण या स्वयं-प्रचार प्रणालीद्वारे शिक्षित होऊ शकत नाही ज्यामध्ये लोक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करतात, आणि इतरांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिकवतात, परंतु कोणालाही काही कळत नाही. १०० वर्षांपूर्वी ब्राझीलमधील तत्कालीन शिक्षण पद्धतीची ही स्थिती होती. तसं पाहिलं तर आपणही यापासून फार दूर नाही. सर्वच बाबतीत मला वाटते की या प्रणालीमध्ये शिक्षक घटक महत्त्वपूर्ण आहे. मला सध्याच्या शिक्षणपद्धतीवर टीका करायची नाही पण निदान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तरी मूल्यमापन पद्धतीत काही सुधारणा अपेक्षित आहेत. 

तुम्ही स्वतः काहीतरी करून, प्रश्न विचारून, विचार करून आणि प्रयोग करून काहीतरी शिकता. त्यामुळे तरुण पिढीमध्ये नाविन्यपूर्ण विचार रुजवायचे असतील तर त्यांनी त्यांच्यातील प्रश्न विचारण्याची वृत्ती जपली पाहिजे. त्यांना पुस्तकांतून किंवा त्यांच्या शिक्षकांकडून किंवा वरिष्ठांकडून उत्तरे मिळण्याची शक्यता नाही. जर त्यांना उत्तरे मिळाली तर कदाचित त्यांना ते कायमचे लक्षात राहणार नाहीत आणि स्वतंत्र विचारांसाठी ते उपयुक्त ठरणार नाहीत. त्यांनी स्वतःच विचार करून उत्तरे शोधली पाहिजेत.

जर त्यांना मनातील प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर त्यांनी घाबरून न जाता ते सर्व प्रश्न गोळा करावेत. प्रश्नांचा ढीग हा एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखा असतो. त्या बंगल्याचे एक पान जरी आपण काढले तरी संपूर्ण इमारत आपोआप कोसळते. त्याचप्रकारे, जर ढिगाऱ्यातील एका प्रश्नाचे उत्तर मिळू शकले तर उर्वरित सर्व उत्तरे आपोआप मिळतील. आठवा, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवून आपण कसे शिकत होतो. त्यामुळे ज्ञान निर्माण करण्यासाठी आपली प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती सोडू नये.

असं झालं तर नाविन्यपूर्णता सापडणे दूर नाही आणि ज्ञानी पिढी घडवण्यास आपोआप मदत होईल. निसर्ग आणि भौतिक घटनांबद्दल अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. हि गोष्ट मानवजातीच्या पुढील विकासास नक्कीच उपयुक्त ठरेल. विद्यमान व्यवस्थेतील दोष दाखवून त्यावर दोषारोप करण्याऐवजी, सतत सकारात्मकतेने शहाणे कसे व्हायचे हे आपण नवीन पिढीला शिकवले पाहिजे. मला व्यक्तिशः असे वाटते की विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवण्याऐवजी आपण त्यांना शिकायचं कसं हे शिकवलं पाहिजे. ज्ञानास मूर्त स्वरूप देण्याचे शिकवले पाहिजे. युवकांमध्ये अफाट ताकद असते. या ताकदीचा त्यांच्यातील कौशल्य आणि सामर्थ्य हेरून योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे.

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी पदवी शिक्षणामध्ये संशोधनाचा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच, या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थी बहुकुशल, स्वयंपूर्ण असावा, अशी अपेक्षा आहे. आपण आपल्या युवकांना संशोधनासाठी प्रवृत्त केले पाहिजे. संशोधन करून स्वतःचे तार्किक आणि विश्लेषणात्मक मन विकसित होते. आपली वैज्ञानिक वृत्ती आणि समज सुधारते. संशोधनाचे मूलभूत आणि उपयोजित असे दोन प्रकार आहेत. विद्यापीठांमध्ये साधारणपणे मूलभूत संशोधन केले जाते. आयआयटी आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये मूलभूत तसेच उपयोजित असे दोन्ही प्रकारचे संशोधन चालते. पण सामान्यपणे मूलभूत संशोधनामुळे ज्ञान निर्मिती होते हे मात्र नक्की.

संशोधनासाठी कोणता विषय निवडायचा हेही महत्त्वाचे आहे. स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी केलेले संशोधन देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त असते. संशोधनाची अनेक क्षेत्रे आहेत ज्यात युवक सहभागी होऊ शकतात आणि ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी योगदान देऊ शकतात. पर्सनल कॉम्प्युटर प्रोसेसरचा वेग वाढवण्यावर संशोधन करता येईल. मेमरी डिव्हाईसच्या सूक्ष्मीकरणाची समस्या खूप महत्त्वाची आहे. एखादी व्यक्ती ऑटोमोबाईल्सची इंधन कार्यक्षमता वाढविण्यावर काम करू शकते. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा इंधनाचा पर्याय म्हणून वापर करण्याचा विचार करणे काळाची गरज होऊन बसली आहे. कारखान्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन हे संशोधनाचे ज्वलंत विषय आहेत.  मेंदूच्या न्यूरॉन्ससाठी अल्गोरिदम लिहिणे खूप कठीण आहे. मानवी मेंदूसाठी अल्गोरिदम लिहिणे आणि मानवी चेतनेचे कारण शोधणे हे मूलभूत संशोधनात मोठे योगदान असेल. हरित तंत्रज्ञानाचा वापर यास आता पर्याय नाही. प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या मोठ्या आव्हानातून जगाला घेऊन जाण्याबाबतचा अभ्यास जगभरातील समस्या बनला आहे.

इतके मोठे संशोधन विषय लगेच हाताळायला हवेत असंही नाही. महत्वाचे हे आहे कि आपण आपला शास्त्रीय दृष्टिकोन दृढ करून उत्कृष्टतेच्या मार्गाने नावीन्यतेचा ध्यास घेणे. घरगुती इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या दुरुस्तीपासून सुरुवात करता येऊ शकेल. यामुळे कदाचित सर्वसाधारण घरगुती कार्ये करण्यासाठी कोणते तर्कशास्त्र वापरतात हे शिकण्यास सक्षम करेल, ज्यामुळे कठोर परिश्रम सुलभ करून दैनंदिन कार्य नाविन्यपूर्ण मार्गाने करण्याची विचार प्रक्रिया विकसित होईल. संशोधन करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही संशोधन प्रयोगशाळेत जाण्याची गरज नाही. निसर्ग आणि भौतीक प्रक्रिया समजून घेण्यासाठी तुमच्या मेंदूमध्ये विचार प्रक्रिया विकसित करणे महत्त्वाचे आहे.

परंतु या ज्ञान निर्मिती प्रक्रियेत आपल्याला निसर्गाची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना माणसाने निसर्गाची उठाठेव करू नये ही अपेक्षा असते. अन्यथा, गेल्या दोन वर्षांत संपूर्ण मानवजात साथीच्या रोगात होरपळल्याचे आपण पाहिले आहे. कारण प्रत्येक गोष्ट पूर्ववत करण्यासाठी निसर्गाची स्वतःची यंत्रणा असते.

सरतेशेवटी, मी असा प्रस्ताव मांडतो की, मुलांना नैतिकता शिकवली पाहिजे आणि स्वत: आचरण करून त्यांना आचरण करण्यास भाग पाडले पाहिजे. माणसाला आनंदाने जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा याबरोबरच समाधानाची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानवजातीच्या कल्याणासाठी संतुलित आयुष्य जगण्यास प्रवृत्त केले पाहिजे.

पुन्हा एकदा, मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

© प्राध्यापक डॉ केशव यशवंत राजपुरे

Monday, May 30, 2022

सप्तरंगी योग



सप्तरंगी योग (२९ मे २०२२)

कालच १९९३ च्या सीनियर मित्रांचा 'स्नेह मेळावा' कोल्हापूर परिसरात साजरा झाला. ते सर्वजण विभागाला भेट देऊन गेले होते. आमचे वर्गमित्र बाजीराव कुंभार यांनी गेल्या आठवड्यात या रविवारी म्हणजे २९ मे रोजी आमच्याही बॅचचा स्नेहमेळावा कोल्हापुरात आयोजित करण्यासंदर्भात आणि सामील होण्यासंदर्भात ग्रुपवर आवाहन केले होते. इथे वास्तव्यास असलेल्या सर्व मित्रांनी याअगोदर वेळोवेळी कोल्हापूरात स्नेहमेळावा आयोजित करण्याविषयी ग्रुप वर चर्चा तसेच आवाहन केले होते. पण कुणीही याबाबत उचल खाल्ली नव्हती त्यामुळे पहिला गेट-टुगेदर पाच वर्षापूर्वी होऊन देखील आमच्या वर्गाचा गेट-टुगेदर आज होईल का नाही याबाबत शंकाच होती. त्यामुळे कुणालाच रविवारी गेट-टुगेदर होईल याची खात्री नव्हती. तरीही काल संध्याकाळी मी बाजीराव कुंभार यांना फोन केला आणि उद्या डॉक्टर आण्णासाहेब मोहोळकर यांना घेऊन टाकळा परिसरात पांडुरंग (पीजे) गोरे यांचे ऑफिसवर येणार आहे असा निरोप दिला होता.

गेट टुगेदर ठरलाच तर जावे लागेल म्हणून आज काही कामानिमित्त मी लवकरच विद्यापीठात गेलो. ठरल्याप्रमाणे आण्णासाहेब दहा वाजता विद्यापीठात आले. मग आम्ही दोघं टाकाळा येथे पीजे गोरे यांच्या ऑफिस मध्ये पोहोचलो. तिथे एव्हाना झाडलोट सुरू होती. गेट-टुगेदर होणार का ? किती मुले येणार याबाबत तोपर्यंत आम्हाला तिघांना देखील अजिबात माहिती नव्हती. दरम्यान आमचा बाजीरावशी संपर्क झाला आणि आम्ही पोहोचलो असल्याचा मी ग्रुप वर देखील मेसेज टाकला. तेव्हा समजले की बाजीराव शुभदा आणि सुनीता यांना घेऊन तिथे येणार आहे. त्यांना यायला अजून वेळ होता. दरम्यान भुक लागल्यामुळे आम्ही काहीतरी खाण्याच्या दृष्टीने बस स्थानकाच्या दिशेने गेलो. तिथं सुनिता भेटली. मग आम्ही पुन्हा गोरे यांच्या ऑफीसमध्ये आलो. काही वेळानंतर बाजीराव आणि शुभदा देखील दाखल झाले. नीलम देखील प्रवासात असल्याने दुपारी वेळाने येणार होती. एव्हाना मला अंदाज आला होता की आज गेट टुगेदर नक्की होणार. वर्गातील ५० पैकी ३४ मित्र व्हाट्सअँप ग्रुपवर आहेत त्यातील केवळ ६ जणच एकत्र जमणार होतो.  

याप्रसंगी शुभदा ने मिठाई आणि पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले. शुभदा पहिल्यांदाच आल्यामुळे तिच्यासाठी बऱ्याच गोष्टींचे कुतूहल होते. सुरुवातीला एकमेकांची विचारपूस तसेच चौकशी झाल्यानंतर इतर चर्चांस सुरुवात झाली. पुढे प्रश्न होता गेट-टुगेदरचं ठिकाण कुठचं ? गगनबावडा की पन्हाळ्यावर की एखाद्या हॉटेलमध्ये यावर चर्चा झाली. नीलम एक तासाभराने येणार असल्यामुळे गोरे सरांच्या ऑफिस मध्येच गप्पा मारून साजरा करण्याचे ठरले. बाजीरावचा न्याहारीस मांसाहारीचा बेत करण्यावर भर होता. इतरांना मात्र वाटले सर्वांसाठी एकच मेनू असावा. थोड्या वेळासाठी हा मुद्दा बाजूला पडला आणि सर्वजण सुसंवादात मढगूळ झाले. यावेळी आपले मित्र कोण कुठे याबाबत चौकशी झाली.


सुरुवातीला तणावात असूनही वर्तमान स्वीकारत आनंदी राहण्याबद्दल चर्चा झाली. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या आयुष्यात आपापल्या परीने कठोर परिश्रम केले होते. काही वर्गमित्र अजूनही त्यांच्या आयुष्यात स्थिरावले नाहीत तर काहींनी अनपेक्षित उंची गाठली होती. म्हणून मित्रांच्या सद्यस्थितीची तुलना न करता विद्यार्थीदशेत जगलेल्या आठवणी जातं करत सर्वाना संतुलित राहण्याविषयी समर्थन आणि प्रेरित करण्याचे ठरले. आम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये संतुलित कसे राहायचे याबद्दल बोललो. जर आपण सुशिक्षित असलो तर आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास आणि आपल्या जीवनातील कोणत्याही समस्येला तोंड देण्यास सक्षम आहोत, असे सांगण्यात आले.

आम्हांस तीस वर्षांपूर्वी विद्यापीठात घालवलेले दिवस आठवू लागले. एमएससी दरम्यानची त्यांची वैशिष्ट्ये सांगण्यात आली. तेव्हा कोण कुणाचे जवळचे मित्र-मैत्रिणी यावरही टोमणे मारून झाले. गमतीदार किस्से, प्रसंग, घटना, आठवून सर्वच भूतकाळात रममान झाले. दरम्यान पीजेच्या ऑफिसमध्ये छान चहा घेतला. ऑफिसमधील चर्चेचे छायाचित्र मी व्हाट्सअँप ग्रुपवर टाकताच खटावकर, शिनगारे, सूर्यवंशी तसेच जमादार यांसारख्या मोजक्या मित्रांनी फोन करून कार्यक्रमाचा आढावा घेतला. मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपकॉलवर संपर्क साधला आणि त्यांना आमच्या उल्हासात आभासीपणे सहभागी करून घेतले. त्यापैकी पांडुरंग जाधव, माधुरी पाटील व माधुरी पावले यांचेशी संपर्क होऊ शकला. एवढ्यात नीलम पुणे ते कोल्हापूर हा सहा तासाचा प्रवास करूनही अगदी लगबीगीने आमच्यात सामील झाली. त्यामुळे उत्साहात मोठी भर पडली.

आजच्या भेटीची एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे आमच्या एमएससी फिजिक्स कोर्सच्या प्रत्येक स्पेशलायझेशनमधून किमान एक प्रतिनिधी उपस्थित होता: 'मटेरिअल्स सायन्स'- सुनीता, 'स्पेस सायन्स'- बाजीराव, 'सॉलिड स्टेट फिजिक्स'- केशव, शुभदा, 'थीरीटिकल फिजिक्स'- अण्णासाहेब, 'स्पेक्ट्रोस्कोपी'- पांडुरंग, 'एनर्जी स्टडीज'- नीलम. आम्ही सात मित्रांनी स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून रंगंत आणली म्हणून या लेखास 'सप्तरंगी योग' हे शीर्षक समर्पक वाटते.  

व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बरेच मित्र असूनही दुर्दैवाने फक्त सात जणांना सेलिब्रेशनचा भाग व्हावेसे वाटणे इतके उत्साहवर्धक नव्हते. सर्व मित्रांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांना आमंत्रित केले असते तर बरे झाले असते असे देखील वाटले. पण शेवटी व्हॉट्सअप ग्रुपवर तारीख, ठिकाण आणि वेळ जाहीर करणे पुरेसे होते असे आम्हाला वाटले. हेही आमच्या लक्षात आले की बहुतेक मित्र कोल्हापुरपासून दूर राहतात त्यामुळे सुमारे २०० किमी पर्यंतचा प्रवास करणे कंटाळवाणे असेलही पण मित्रांना भेटण्याची इच्छा उत्कट असेल तर कोणतेही अंतर हे कमीच असते हेही तितकेच खरे आहे.

या वेगवान युगात, संपर्कात राहणे आणि भेटण्याची अनुभूती ही एक महत्त्वाची भावना आहे. आजकाल हे फार दुर्मिळ झाले आहे. या भेटींमध्ये कोणताही निहित स्वार्थ नसतो. निखळ आनंद मिळवणे आणि आनंद वाटणे हेच काय ते स्वारस्य. पण या स्मार्टफोनवरील व्हॉट्सअपच्या जगात मी जे पाहिलं आहे ते असे: सुरुवातीस व्हॉट्सअप ग्रुप तयार झाल्यावर लोक आपल्या मित्रांना भेटण्यास तसेच त्यांच्याविषयी जाणून घेण्यास खूप उत्सुक असतात. पहिल्या गेट टुगेदरनंतर मित्रांना भेटण्याची उत्सुकता आणि आपुलकी हळू हळू कमी होऊ लागते जणू ! नाती कृत्रिमरित्या जपली जातात कि काय अशी परिस्थिती ! ही वस्तुस्थितीची अत्यंत दुःखद बाजू आहे. वास्तविकपणे व्हॉट्सअप ग्रुप्स आणि स्नेह मेळावे हे समकालीन लोकांशी जोडून राहण्यासाठी आणि आपल्या तणावपूर्ण जबाबदाऱ्यांपासून मुक्त होण्यासाठी उत्तम औषध असतात असे माझे मत आहे. पण कुठे माशी शिंकते कोणास ठाऊक आणि माणूस पुन्हा आपल्या अलिप्त जगात वावरू लागतो.  मी अशा मित्रांची अनेक उदाहरणे अनुभवली आणि ऐकली आहेत की जे जाणूनबुजून घराजवळ आलेल्या मित्रांना भेटणे जाणीवपूर्वक टाळतात. तसं बघितलं तर याचं कारण काहीच नसते. इतक्या दिवसांच्या दुराव्यानंतर परत एकत्र राहताना या नात्याविषयी विचित्र धारणेसह ते जरुरीपेक्षा अधिक विचार करतात. मित्र भेट त्यांच्या मनाला बोजा वाटू लागते. मित्राच्या वागणुकीविषयीच्या स्वतःच्या मनातील प्रश्नांची ते स्वतः:च पूर्वग्रहदूषित उत्तरे शोधतात. अपुऱ्या स्नेहापायी नाती अपयशी ठरतात. पण एक जवळचा मित्र आपल्या तीक्ष्ण निरीक्षणातून अशा मित्राचा मनसुबा हेरल्याखेरीज राहत नाही.

पुरेशी चर्चा झाल्यानंतर टाकाळा परिसरातील एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करण्याची इच्छा झाली. पण बाजीरावच्या हट्टापाई आमच्यात शाकाहारी की मांसाहारी जेवण घेण्याच्या बाबतीत एकमत मात्र होत नव्हते. घराबाहेर पडल्यावर मांसाहारच करावा असा बाजीरावचा आग्रह होता. आम्ही जिथे दोन्ही प्रकारचे जेवण उपलब्ध होते अशा देहाती हॉटेलमध्ये गेलो पण दुर्दैवाने ते हॉटेल हाऊसफुल्ल .. मग आम्हाला फक्त शाकाहारी असलेल्या दुसऱ्या हॉटेलमध्ये जावे लागले. आम्ही गोरे यांच्या ऑफिसच्या अगदी जवळच असलेल्या रामकृष्ण या उत्तम शाकाहारी हॉटेलमध्ये गेलो. एकत्रितपणे गप्पा ठोकत, हसत, खिदळत जेवणाचा आस्वाद घेतला. सर्वांसाठी एकत्र जेवण करण्याचा हा खूप छान अनुभव होता. 


जेवणानंतर पीजे च्या इनोव्हा गाडीतून कोल्हापूरच्या आजूबाजूच्या पन्हाळा किंवा जोतिबासारख्या ठिकाणी जाण्याचा विचार केला. पण शेवटी जिथे आपण शिक्षण घेतले आणि ३० वर्षांपूर्वी दोन मौल्यवान वर्षे घालवली अशा शिवाजी विद्यापीठाला भेट द्यायचे ठरले. इतक्या दिवसानंतर आम्ही मित्रगण भौतिकशास्त्र विभागात जात होतो. एमेस्सीपासून आजवर इथेच असणारा त्यांच्यात मी एकमेव देखील नवखा वाटत होतो. त्यावेळी आम्ही विभागप्रमुखांच्या कशात जायला कचरत असू पण आज मात्र मित्राच्या केबिनमध्ये बिनधास्त प्रवेश होता. विभागाचे यश आणि नुकत्याच विभागात निर्माण करण्यात आलेल्या सुविधांमुळे सर्वजण खूप प्रभावित झाले. विभागाच्या उपकरण सुविधा केंद्रामधून एक फेरी मारली. आपल्या वर्गमित्राला विभागप्रमुखाच्या खुर्चीवर बसलेले पाहून सर्वांना आनंद तर झालाच पण अभिमानाने उर भरून आला. त्यांना इथे पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याचा अनुभव आला. विभागातील सुंदर क्षणांमुळे सर्वजण उत्तेजित आणि उत्साही झाले. सर्वजण ३० वर्षापूर्वीचे क्षण जगले. स्मृती जागृत झाल्या आणि आपण एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय संस्थेचे विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटला.  




शुभदा च्या आई बाबांना गांधी मैदानाजवळील त्यांच्या घरी भेटल्याच्या आनंदात या मेळाव्याची गोड सांगता झाली.

- डॉ. केशव राजपुरे


Sunday, March 13, 2022

पोलीस उपनिरीक्षक सूरज



तिरंदाज सूरज झाला पोलीस अधिकारी

नुकतीच राष्ट्रीय तिरंदाज तसेच अनपटवाडी गावाचे तरुण आणि उमदे व्यक्तिमत्व श्री सुरज सुनील अनपट याची महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबातील प्रतिकूल परिस्थितीत कारकीर्द घडवायच्या मार्गावर असणाऱ्या प्रतिभेसाठी त्याचे हे यश खरोखर प्रेरणादायी आहे. माझ्या मागील ब्लॉगमध्ये आम्ही त्याच्या तिरंदाजी खेळातील रुची आणि नैपुण्याबद्दल लिहिले आहेच. स्पर्धा परीक्षेतील त्याच्या यशाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी तसेच तरुणांना प्रेरित करण्यासाठी हा ब्लॉग लिहित आहे.

सुरुवातीपासूनच अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेचा असल्याने सुरज प्रतीभेच्या जोरावर या स्पर्धेच्या युगात कायम सर्वोच्च स्थानी राहिला आहे. तिरंदाजी अर्थात धनुर्विद्या हा छंद जोपासत यात उत्कृष्टता मिळवायची तसेच कुटुंबाचे, पंचक्रोशीचे, राज्याचे व पर्यायाने देशाचे नाव मोठे करायचे हे त्याने बाळगलेले सर्वकालीन स्वप्न ! कुटुंबियांकडून याबाबत पूर्ण पाठींबा असल्याने त्याने इतर कुठल्याही क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला नाही. परंतु त्याची आर्थिक परिस्थिती त्याच्या या स्वप्नाचा पाठपुरावा करण्याइतपत मजबूत नसल्याने प्रथमतः त्याने नोकरीत स्थिरस्थावर होऊन कुटुंबाचा आर्थिक बोजा उचलावा असा विचार केला. हल्ली बहुजन समाजातील तरुणांना सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे आणि मिळालीच तर क्षुधाशाती पुरते पैसे मिळतात. त्यामुळे नोकरी करायची आणि आपला छंद देखील जोपासायचा या दुहेरी हेतुतून त्याने आपली कारकीर्द घडवायची हे मनात पक्क केलं होतं.


देशाच्या सैन्य, रेल्वे आणि पोलिस सेवांमध्ये क्रिडा कोटा आहे ज्यायोगे खेळाडूंसाठी काही जागा राखीव असतात हे त्यास समजले. सुदैवाने तो पारंगत असलेला आणि त्याचे स्वप्न पाहिलेला तिरंदाजी हा खेळ क्रिडा कोट्याच्या यादीत असल्याने त्याने स्पर्धा परीक्षांमार्फत पोलीस दलात अधिकारी होण्याचा निर्धार केला. शालांत शिक्षणादरम्यान राष्ट्रीय स्तरावरील पदके मिळवली असल्याने तो यांस पूर्णतः पात्र होता. नोकरी करत असताना क्रीडा स्पर्धेत भाग घेत तो आपली क्रीडाभावना जागृत ठेवू शकतो हे त्याच्या लक्षात आले. यासाठी त्याला कठोर परिश्रम घ्यावे लागणार होते पण यामुळे त्याचे धनुर्विद्येमध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्याचे दीर्घकाळचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार होती.

एप्रिल २०१८ मध्ये पदवीची अंतिम परीक्षा दिल्यानंतर त्याने महाराष्ट्र पोलीस सेवेच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. इतरांप्रमाणे तोदेखील या स्पर्धा परीक्षा पद्धतीला पूर्णपणे नवखा होता. त्याला तयारीचा प्रारंभ बिंदू माहित नव्हता. इतरांप्रमाणे त्यालाही तयारीसाठी पुस्तके आणि विषय निश्चित करायचे होते. हा निर्णय घेताना सीए विजय अनपट हीदेखील त्याच्यामागे प्रेरणादायी शक्ती होती. दरम्यान वाई येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या महेश थोरवे या मित्राचे त्यास याबाबत मार्गदर्शन लाभले आणि अशा रितीने त्याच्या अभ्यासास सुरुवात झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी शासनाच्या पीएसआय/ एसटीआय/ एएसओ या अराजपत्रित वर्ग दोन च्या पदांसाठी परीक्षा आयोजित करते. यांतील पीएसआय अर्थात पोलीस उपनिरीक्षक या पदासाठीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. त्यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची पूर्व तसेच मुख्य लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी तसेच मुलाखत यांचा समावेश असतो. मुख्य परीक्षेसाठी सामान्य विज्ञाना व्यतिरिक्त स्वतंत्र विषय निवडावा लागतो.

कॉलेजमध्ये असताना धनुर्विद्येस वाहून घेतले असल्यामुळे त्याला परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. अशा प्रकारे त्याने फक्त परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान भागाचा अभ्यास केला होता. या कारणास्तव स्पर्धा परीक्षेसाठी त्यास शून्यातून सुरुवात करावी लागणार होती. त्याने आवश्यक शालेय पुस्तकांचा संदर्भ घ्यावयाचे ठरवले. यात सहावी ते दहावी पर्यंतच्या इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राच्या शालेय क्रमिक पुस्तकांचा अभ्यास केला. बारावीपर्यंत तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता त्यामुळे त्याला विज्ञान आणि गणिताचा फारसा अभ्यास करावा लागला नाही. पण अर्थशास्त्र हा संकल्पना तर कायदा हा न्यायविषयक विषय असल्याने यांच्या अभ्यासासाठी काही काळ त्याला खासगी शिकवणी लावावी लागली.

तो पुण्यात वसतिगृहात राहत असल्याने घरच्या आरामदायी गोष्टींपासून दूर होता. तसेच स्वतःला सोशल मीडियापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. या काळात तो निश्चयवादी होता. त्याने एक वर्षभर दिवसातून सुमारे बारा तास सततचा आणि परिश्रमपूर्वक अभ्यास केला. त्यामुळे वर्षभराच्या कठोर मेहनतीनंतर तो पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला. साधारणपणे पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा यशस्वी झालेले विद्यार्थी अत्यल्प असतात. पण सुरज त्याच्या अंगभूत प्रतिभा, खेळाच्या भावनेतून मिळालेली शिस्त आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने हे करू शकला अशी माझी धारणा आहे. यशाने हुरळून तर अपयशाने खचून जाणारा तो विद्यार्थी नाही. परीक्षा निकालास स्वीकारताना त्याच्याकडे विविध पर्याय उपलब्ध असत. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेचे आव्हान त्याला पेलायचे होते. पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला होता. त्यामुळे जोमाने तो मुख्य परीक्षेची तयारी करू लागला.

मुख्य परीक्षा ही एकूण ४०० गुणांची व दोन पेपर्सची होते. त्यात मराठी, इंग्रजी व सामान्यज्ञान हा पहिला पेपर आणि सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्त्यव्यासाठी आवश्यक ज्ञान हा दुसरा स्वतंत्र पेपर असतो. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी त्यास मुलभूतरित्या "कायदा" हा स्वतंत्र विषय होता. यासाठी त्याने खाजगी शिकवणी लावली होती मात्र भाषा विषयाचा त्याने स्वतः अभ्यास केला होता. सूरजला इतका आत्मविश्वास असे की तो पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षा नक्की उत्तीर्ण होईल असे त्याला निकाल जाहीर होण्यापूर्वीच माहित होते. आणि झालंही तसंच ! तो मुख्य परीक्षा देखील उत्तीर्ण झाला. मुख्य परीक्षा हा या परीक्षेतील महत्त्वाचा टप्पा असल्याने निकाल जाणून त्याला खूप आनंद झाला. क्रीडापटू असल्याने उरलेल्या तिसऱ्या टप्प्यात शारिरीक चाचणीतून जाणे ही त्याच्यासाठी केवळ औपचारिकता होती असे त्याला वाटले.

पीएसआय पदासाठी २०० गुणांची मुख्य, १०० गुणांची शारीरिक चाचणी आणि ४० गुणांची मुलाखत अशी एकूण ३४० गुणांची विभागणी असते. शारीरिक चाचणीत उमेदवाराचे गोळाफेक, पुल अप्स, लांब उडी तसेच धावणे यातील कामगिरीवर एकूण १०० पैकी गुण दिले जातात. मुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० गुण मिळविणे आवश्यक असते. जरी सूरजने जुलै २०१९ मध्ये पीएसआय मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी, शारिरीक चाचणी आणि मुलाखतीसाठी डिसेंबर २०२१ उजाडला होता. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया स्थगित होती आणि परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी अडीच वर्षे लागली.

कडक लॉकडाऊन असतानाही सूरजने शारिरीक चाचणीसाठी धावण्याचा महत्वाचा सराव सुरू ठेवला होता. या चाचणीसाठी व्यायाम करून त्याने जवळपास ११ किलो वजन कमी केले होते. कोल्हापुर जिल्हा पोलिस मुख्यालयात १ डिसेंबर २०२१ ही त्याची शारीरिक चाचणीची तारीख ठरली. त्याने मोठ्या जिद्दीने शारीरिक चाचणी दिली. सर्व चाचण्या निर्धारित निकषात पूर्ण केल्या. शारीरिक चाचण्यांमध्ये त्याला ९३ गुण मिळाल्यामुळे तो मुलाखतीसाठी पात्र ठरला. मोठ्या जिद्दीने मुलाखतीला तोंड दिले आणि सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत ४० पैकी सर्वोच्च २६ गुण प्राप्त केले. शेवटी ८ मार्च २०२२ रोजी त्याची पीएसआय पदावर निवड झाल्याचे पत्र प्राप्त झाले आणि सरकारी नोकरी मिळाल्याने केलेल्या कष्टाचे चीज झाले.

अशा पद्धतीने अथक परिश्रमाच्या जोरावर सुरज ने यशश्री खेचून आणली आहे. पीएसआय पदी निवड झाल्यानंतर सुरजला एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिकमध्ये रुजू व्हावे लागेल. पुढे शारीरिक आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला एक वर्षाच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी कोणत्यातरी जिल्ह्यात पाठवले जाईल व नंतर समाधानकारक कामगिरीनंतर तो नियमित पीएसआय म्हणून रुजू होईल.

अनपटवाडी गाव हे एकी आणि विविध क्षेत्रांतील कारकीर्दीतील विविधतेसाठी ओळखले जाते. गावातील लहान सान यशाचे कौतुक तसेच सन्मान केला जातो तर पुढील वाटचालीसाठी नेहमी प्रोत्साहित केलं जातं. धनुर्विद्येमधील यशाच्या विविध टप्प्यांवर गावकऱ्यांकडून मिळालेले प्रोत्साहन आणि कौतुक यामुळे आत्मविश्वास वाढण्यास खूप मदत झाली असे त्याला वाटते. कोरोना लॉकडाउन दरम्यान गावकऱ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर यशस्वी व्यक्तिमत्त्व आणि पंचक्रोशीतील देवस्थानं या विषयी केलेल्या लिखानामुळे इथली माती वेगळ्या दृष्टिकोनातून जाणून घेण्यास मदत झाली असे तो सांगतो. ज्याचा मुलाखतीदरम्यान आत्मविश्वासाने उत्तरे देण्यास खूपच उपयोग झाला अशी सूरज ची धारणा आहे.

अनपटवाडी सारख्या छोट्याश्या खेड्यातून स्पर्धा परीक्षा मार्फत स्पोर्ट कोट्यातून पोलीस उपनिरीक्षक होण्याचा प्रथम बहुमान सुरज ला जातो. सुरजने खेड्यातील जीवन जवळून अनुभवले आहेत. प्रतिकूल पार्श्वभूमीवर निव्वळ वडिलांच्या दांडग्या इछाशक्तीच्या आणि स्वतःतील हिमतीच्या जोरावर तो आज पोलीस अधिकारी झाला आहे. या नोकरीच्या माध्यमातून त्याने लहानपणापासून जोपासलेला तिरंदाजीचा छंद जोपासत त्यात उत्कृष्टता मिळवण्याची त्याला संधी प्राप्त झाली आहे. सूरजच्या या यशामुळे ग्रामीण पार्श्वभूमीतील तरुण प्रतिभांच्या मनामध्ये "हे शक्य असल्याचा" विश्वास निर्माण झाला आहे.

प्रत्येक तरुणामध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी ती जपावी, अशी सूरजची इच्छा आहे. तरुण वयातील व्यायाम आणि खेळ ही तुमच्या भावी आयुष्याची गुंतवणूक असते, असे त्यास वाटते. खेळामुळे जीवन संतुलित आणि शिस्तबद्धपणे जगण्यास मदत होते. चयापचय सुधारुण आपणास निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी खेळाची मदत होते. जर आपण खेळाची भावना सतत जपली तर हा छंद तुमची कारकीर्द घडवण्यास मदत करू शकतो हे त्याच्या यशाने सिद्ध झाले आहे.

चिकाटी आणि निर्धाराने मिळवलेल्या या यशाबद्दल सूरजचे हार्दिक अभिनंदन आणि त्याच्या भावी कारकिर्दीसाठी सहृदय शुभेच्छा. याद्वारे आपल्या ध्येयाचा पाठलाग करत जोपासलेल्या छंदाचे अनुसरण करण्याची तसेच मानवजातीची सेवा करण्याची नामी संधी सूरज ला प्राप्त झाली आहे. सुरजने अवलंबलेला यशाचा मार्ग इतरांना प्रेरणास्रोत तर होणार आहेच पण त्याचे मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अडीअडचणीवर मात करून शासकीय सेवेत नोकरी मिळवण्यात नक्कीच उपयोगी पडेल. 

- डॉ केशव यशवंत राजपूरे

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...