मी चौथ्या इयत्तेत असताना बावधन येथील प्राथमिक शाळेच्या मैदानावर तालुकास्तरीय खो-खोच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्यात बावधन हायस्कूलच्या खो-खोच्या संघाने बाजी मारली होती. खेळाडूंमध्ये कमालीची इर्षा आणि आणि श्रोत्यांमध्ये अनोखा उत्साह दिसत होता. त्यावेळेस मला क्रिडास्पर्धा हा काय प्रकार असतो हे समजले होते. भविष्यात आपणही अशा पद्धतीच्या क्रिडा स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, क्रिडा कौशल्यांमध्ये निपून व्हावं असं वाटलं होतं. शैक्षणिक जीवनात अभ्यासक्रमा व्यतिरिक्तही इतर नैपुण्य मिळवता येतात याची जाणीव झाली होती. विविध स्पर्धा खेळून चुरस जोपासत अव्वल राहण्याचे गुण जोपासायचे होते. माझे बालपण एका खेड्यात आणि डोंगरकपारीत गेल्यामुळे शारीरिकदृष्ट्या तसा मी काटक होतो तसेच खेळास आवश्यक निग्रह, जिद्द आणि चिकाटी नसानसात भरलेली होतीच.
जून १९८१ मध्ये मी पाचवीला बावधन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. शरीरयष्टी सडपातळ असल्यामुळे इतर खेळांच्या मानाने सुरुवातीपासूनच खो-खो क्रिडा प्रकाराकडे मी आकर्षिले गेलो. खो-खोत आपण निपुण व्हावं हा मानस केला होता. वरच्या वर्गातील मुलांच्यात खेळून खो-खोचा सराव करत असे. कठोर सराव केल्यामुळे खेळात तरबेज झालो. आठवी ते दहावी दरम्यान हायस्कूलच्या खो-खो क्रिडा संघात होतो. आदरणीय पी.एन. पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली बावधन खो-खो संघाने तेव्हा वाई, बोरगाव, ओझर्डे तसेच खंडाळा संघांना हरवले होते. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये माझा वर्ग नेहमी पहिल्या दोन क्रमांकामध्ये येत असे. त्यामुळे शाळेपासूनच खेळाचे आकर्षण होते.
पुढे बावधन-खंडाळा-कराड मार्गे वाई येथे किसन वीर महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतल्या नंतर मात्र खो-खोपासून दूर गेलो. दिवसभर व्याख्याने आणि प्रात्यक्षिकांमुळे मैदानावर जाण्याचा क्वचितच योग यायचा. तसा कनिष्ठ महाविद्यालयातील त्या दोन वर्षात अथलेटिकची परिक्षा सोडली तर ग्राऊंडवर जाण्याचा संबंध आलाच नाही. त्यामुळे ज्या खेळात इतकं प्रवीण होतो तो खो-खो खेळ जवळजवळ विसरल्यात जमा होता. कारण खेळातलं प्राविण्य सरावाने कायम राहत.
सुट्टीत सहसा मी बहिणीकडे खंडाळ्याला रहात असे. तिथं राजेंद्र विद्यालयातील मैदानावर टेनिसबॉल क्रिकेट पाहून क्रिकेट या नवीन क्रिडा प्रकाराची आवड निर्माण झाली. अंगी क्रिडाकौशल्य असल्याने या खेळाची तोंडओळख व्हायला वेळ लागला नाही. तेव्हा मी बॅटिंग बरोबर बॉलिंग सुद्धा चांगला करू लागलो होतो. राजेंद्र विद्यालयाच्या बांधकाम चालू असलेल्या तिसऱ्या मजल्यावर चेंडू मारण्याच्या शर्ती लावल्याचे बरेच किस्से आहेत. मला आठवते, खंडाळा कोर्टाच्या इमारतीच्या मागच्या बाजूच्या आयताकृती ग्राउंडवर सतीश काळभोर, विजय गाढवे, जालिंदर यादव, जितेंद्र गोरे, रवींद्र गाढवे, संजय खंडागळे तसेच बाबु शहा यांच्या बरोबर आमचा खेळ रंगत असे. लोणंद महाविद्यालयामध्ये बी. एस्सी.ला प्रवेश घेतल्यानंतर मात्र टर्फवरील लेदर बॉल क्रिकेटची ओळख झाली. यात अंदाज यायला वेळ लागला पण त्यासही परिचित झालो. आत्मविश्वासानं बॅटिंग करत असल्यामुळे आपोआप वर्गाच्या आणि महाविद्यालयाच्या संघामध्ये प्रवेश मिळवला. पण या खेळास आवश्यक नपरवडणारे किट तसेच बॅट्स लागत असल्याने हा खेळ महागडा वाटे.
याखेळासाठी आवश्यक सराव मी खंडाळ्याच्या एकता क्रिकेट क्लबमध्ये कॉर्क बॉल क्रिकेट खेळून करत असे. यावेळी क्रिकेटचे सगळे धडे गिरवले. सकाळ संध्याकाळ भरपूर सराव केला. क्लबमध्ये या खेळाचे मूलभूत तांत्रिक प्रशिक्षण मिळाले. तो तीन वर्षाचा काळ मी बराच वेळ मैदानावर असे. एकता मधील जावेद पठाण, मुन्ना शेख, दत्तात्रय चौधरी, चंद्रकांत वळकुंडे, जावेद शेख, धनंजय देशमुख, बाळाभाई शेख, लहूचंद पवार, अशोक जाधव, विकास गाढवे, जितेंद्र अगरवाल, आणि बंडू चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभलं. शिरवळ, असवली, आनेवाडी, लोणंद, वाठार, पाचवड, करंदी, भादवडे, अहिरे, मोर्वे तसेच सुरूर इथल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतल्याचे आठवते. त्यावेळी मी मध्यमगती बॉलिंग करत असे आणि बॅटिंगला शेवटी जात असे.. एकतामध्ये खेळताना खंडाळा गावातील सुहास जाधव, शिवाजी खंडागळे, मंगेश माने, संतोष जाधव, प्रमोद खंडागळे, मंगेश खंडागळे, महंमद शेख, शकील शेख, दयानंद खंडागळे, जितेंद्र धरू, प्रल्हाद राऊत, प्रदीप जाधव, शशिकांत गाढवे, मुस्ताक शेख, संजय गाढवे, जितेंद्र गाढवे, शैलेश गाढवे, चंद्रकांत खंडागळे, शकील शेख, उन्मेश जगदाळे, सचिन गुळूमकर, विष्णू गाढवे, तुषार ठोंबरे इत्यादी सारखे बरेच सहकारी मित्र लाभले. आम्ही अजून मैत्री जपली आहे.
या अनुभवाच्या जोरावर मी महाविद्यालयातर्फे विभागीय क्रिकेट स्पर्धेत सातारा तसेच कराड येथे खेळलो होतो. या खेळामुळे खंडाळा, लोणंद तसेच वाई परिसरातले भरपूर मित्र झाले. महाविद्यालयाच्या संघामधील शाम करमळकर, धनंजय भोसले, अमोद शेळके, अतुल चंद, नाना शेळके, उत्तम कुचेकर, सुरेश पवार, राजू कचरे, अस्लम शेख, आप्पा गायकवाड, भरत जाधव, पापा पानसरे, सुनील शहा, विठ्ठल शिंदे, दशरथ क्षीरसागर, भाऊ धायगुडे, प्रवीण डोईफोडे यांच्याशी परस्परसंवाद वाढून मैत्री झाली. लेदर बॉलवर ताकदीने टोलेबाजी करत नसलो तरी तंत्रशुद्ध बॅटिंग करत असे. आमच्या वर्गाच्या टीममध्ये हेमंत घाडगे, आमोद शेळके, मुकुंद जाधव, संतोष पवार, प्रदीप भोईटे, उत्तम भोईटे, महेंद्र जाधव, राजू चिखले हे समाविष्ट असायचे. कराडमधील सामन्याची आठवण अशी की; मी आणि राजू कचरेने सलामीस जावून दहा षटके खेळून काढत ५० धावांची भागीदारी केली होती. त्यांच्यातील एका गोलंदाजाचे बरेचसे चेंडू माझ्या डाव्या मांडीवर आपटून गोलाकार उठलेले व्रण तीन महिनेतरी गेले नव्हते. नेहमी अटीतटीचे सामने खेळायला आवडायचे. आपल्या आवडत्या मित्रांची बॅटिंग आणि बॉलिंग बघायला मला नेहमी आवडे.
महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात असताना कराडला विभागीय क्रिकेट स्पर्धा खेळायला मी जाणार होतो हे आदरणीय प्राचार्य महानवर सरांना समजले. सरांना माझी एव्हढी काळजी की खेळताना केशवला लेदरचा बॉल लागून दुखापत होईल, मग परीक्षेतील कामगिरीवर परिणाम होईल म्हणून 'यावेळी तू नाही गेलं तर चालणार नाही का ?' असं चिंतातुर नजरेने विचारणारे सर आठवतायंत ... खेळायला मिळणार नाही म्हंटल्यावर माझा हिरमुसलेला चेहरा सरांना पाहावेना. लगेच क्रीडाशिक्षक आदरणीय डीपी ननावरे सर यांना सूचना देऊन दोन दिवसात हेल्मेट, पॅड्स आणि इतर संरक्षक साहित्य आमच्या सेवेस हजर ! याबाबतीत माझ्या सहकारी मित्रांनी माझे खूपखूप आभार मानले होते. विद्यार्थ्याला दुखापत होऊ नये म्हणून कळकळ करणारे सर पुन्हा होणे नाही !
उन्हाळी सुट्टीत वाडीला गेलो की क्रिकेट खेळायची पंचाईत होई. कारण खेळण्यासाठी अकराजण तयार नसायचे. एक वर्षी मित्रवर्य हनुमंत मांढरे यांनी खालच्या आळीला जोशी काकांच्या शेतात मधोमध एक खेळपट्टी तयार केली. सभोवताली माती ! तिथं काही दिवस गावातील राजेंद्र मांढरे, निवास अनपट, अनिल अनपट, रवींद्र अनपट, विजय मांढरे, दुर्योधन मांढरे या मित्रांना सराव दिला. झाली आमची टीम तयार ! तेवढ्या तयारीवर लगेच बावधन मधील मुलांसोबत मॅच ठरली. आमचे दोनच बॉलर चांगले ! इतरांची झाली धुलाई.. अपेक्षेप्रमाणं आम्ही मॅच हरलो. परंतु त्यामुळे इतरांना खेळाची आणि मॅचमधील इर्षेचा तसेच पराभव स्वीकारायचा अनुभव आला. पुढच्या वर्षी मात्र आम्ही तयारीनिशी उतरलो. आमच्याकडे यावेळी चार उत्तम बॉलर होते. बॅटिंग चांगली झाली आणि त्या सामन्यात अगोदरच्या वर्षाच्या पराभवाचा आम्ही वचपा काढत दणदणीत विजय मिळवला. विजयाचा आनंद पुरेपूर लुटला होता. असे छोटे छोटे क्षण जरी आठवले तरी फार भावनावश व्हायला होतं.
एम एस्सी. दरम्यान शिवाजी विद्यापीठात शिकत असताना मात्र अपवाद वगळता लेदरबॉल क्रिकेट पासून दूर गेलो. त्या दोन वर्षातील बराच काळ मी मैदानावरच घालवला होता. प्रॅक्टिकलनंतरचा वेळ शक्यतो मी मैदानावरच असे. एकतर अभ्यास नाहीतर मित्रांसोबत क्रिकेट असे समीकरण झाले होते. त्यामुळे मी किती क्रिकेट खेळलो आहे याचा आपणास अंदाज येऊ शकतो. तेव्हा संजय गोडसे, संतोष पोरे, राजू लाटणे, शशिकांत मुळीक यांची क्रिकेटमुळे सलगी वाढली. इथेदेखील बरेच अटीतटीचे सामने खेळलो होतो.
पुढे संशोधनास रुजू झाल्यानंतर दिवसभर जरी खेळायला मिळत नसायचे तरी सुट्टीचा दिवस आणि दररोज सकाळी एक तास हा क्रिकेट साठी ठरलेला. संशोधक सहकाऱ्यांबरोबर खेळण्याचा दुर्मिळ योग येई परंतु विभागाचे एम.एस्सी. चे विद्यार्थी हे माझे ठरलेले सहकारी खेळाडू असायचे. त्यामुळे मी प्रत्येक बॅचच्या फार जवळ यायचो. त्यांचा ग्राउंडवर जादा संपर्क यायचा त्यामुळे जवळजवळ सर्वच्यासर्व विद्यार्थ्यांना मी जवळून ओळखायचो. त्यामुळे अभ्यासात हुशार आणि अवघड विषयात संशोधन करणारे सर आपल्या ओळखीचे आहेत या भावनेतून माझ्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात जरी आदरयुक्त भीती असली तरी लगट वाढायची. इतर विषयाचे बरेचसे विद्यार्थी माझ्या क्रिकेट वेडामुळे माझ्या परिचयाचे आहेत.
याप्रसंगी आठवते ती जून १९९७ ला पास झालेली एम. एस्सी. ची बॅच ! कारण या दरम्यान विद्यापीठाच्या मैदानावर होस्टेलवरील विद्यार्थ्यांनी एक क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली होती. योगायोगाने माझ्या बॉलिंगमुळे भौतिकशास्त्र विभागाच्या टीममध्ये मला खेळायला संधी मिळाली होती. त्या वेळची आमची टीम फारच समतोल होती. चार वेगवान गोलंदाज, दोन ऑलराऊंडर आणि पाच उत्कृष्ट फलंदाज. बाद पद्धतीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत आमचे एकूण पाच सामने झाले होते. फायनलपर्यंत सर्व सामने लिलया जिंकले होते. मला आठवते आमचे जास्तीत जास्त पाच गडी बाद व्हायचे. संघामध्ये चार तंत्रशुद्ध फलंदाज आणि बॉलिंग तर अतिशय शिस्तबद्ध केली जाई त्यामुळे तो चषक आम्हीच जिंकणार हा सर्वाना विश्वास होता.
सर्व सामने अटीतटीचे झाले; विशेषत: केमिस्ट्रीविरुद्धचा उपांत्य सामना आम्ही अगदी जिद्दीने जिंकला होता. तशी तुलना केली तर केमिस्ट्रीचा संघ आमच्यापेक्षा सरस होता, फक्त आमची एकजूट महान होती, त्याचेच हे फळ ! स्पर्धेमध्ये केमिस्ट्री इतका बलवान कुठलाच संघ नव्हता. त्यांच्याच पुढाकाराने स्पर्धेचे आयोजन झालेेे होते. त्यांचा पराजय फक्त आम्हीच करू शकत होतो. प्रथम फलंदाजी करत आम्ही त्यांच्यासमोर सोळा षटकांत ८० धावांचे आव्हान ठेवलं होतं. निव्वळ उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण याच्या जोरावर आम्ही ही मॅच वीस धावांनी जिंकली होती. विभागातील मुला-मुलींचे, विशेषता चंद्रकांत धर्माधिकारी यांचे, जोरदार प्रोत्साहन संघातील खेळाडूंचे मनोधैर्य कमालीचे वाढवत होते.
आणि फायनल चा सामना आला ! लायब्ररी विरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात सोळा षटकात त्यांना मात्र ६४ धावांमध्ये आम्ही रोखले होते. सर्वांना वाटत होतं आता आम्ही सहजासहजी हा सामना जिंकणार... पण झालं उलटच ! धावांचा पाठलाग करताना आमचे समीर शेख, पवन गोंदकर, रणजीत देसाई, आशुतोष अभ्यंकर, विजय खुळपे असे पाच फलंदाज अवघ्या ३ धावांत बाद झाले होते. पराभव समोर दिसत होता. माझ्या अगोदर फलंदाजीस गेलेला सोलापूरचा राजू गायकवाड चौकार-षटकार मारण्यात पटाईत होता. परंतु त्यापरिस्थितीत मात्र त्याची फलंदाजी बेभरवशाची वाटू लागली..
त्याच्या जोडीला मी गेलो. आमच्याकडं अजून बारा षटक बाकी होती. मी त्याला सांगितलं - धावा झाल्या नाही तरी चालतील पण खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहायचं. आपण जर दोघांनीच ही षटके खेळून काढली तर धावा आपोआप होतील आणि सामना आपणच जिंकू... राजूच्या सर्व खेळाचे मी नॉनस्ट्राईकवर उभा राहून नियंत्रण केले. मीदेखील बॉलच्या रेषेत जाऊन बचावात्मक पवित्रा घेतला. एकेरी दुहेरी धावांवर भर दिला. क्षेत्ररक्षकांमधील गॅप शोधत मध्येच चौकार वसूल केले. बघता-बघता धावसंख्या ५० झाली. आव्हान आवाक्यात आल्याने मात्र राजूचा संयम सुटला. राजूने हवेत उंच मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाने पकडला आणि राजू झेलबाद झाला. नंतर आलेला प्रशांत शिंदे देखील लगेच बाद झाला. विजय समीप असताना दुहेरी धाव घेताना मीही धावबाद झालो. लायब्ररीला आता विजय दृष्टीक्षेपात वाटू लागला.... नंतर आलेल्या प्रशांत ढगेने मात्र षटकार मारून विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे अजून आमचे अविनाश ढेबे आणि आणि संदेश कांबळे हे गडी बाद व्हायचे बाकी होते. हा सामना माझ्या दृष्टीने अतिशय अविस्मरणीय आहे. फटकेबाजी केली नसली तरी सुरुवातीला मी अचूक गोलंदाजी व नंतर नियंत्रित फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिले होते. आवर्जून हा सामना बघायला आलेल्या आमच्या सरांना देखील माझ्या खेळाचे आश्चर्य वाटले होते. शैक्षणिक प्राविण्याव्यतिरिक्त त्यांना या निमित्ताने माझ्या व्यक्तिमत्वाचा दुसरा पैलू पाहायला मिळाला होता. मनाच्या खोल कप्यात हा सामना मी कोरून ठेवलेला आहे कारण सर्व अडचणीतून शांत डोक्याने मार्गक्रमण केल्यानंतर बाहेर येता येते हा धडा मला यातून मिळाला होता.
त्यानंतर संशोधक विद्यार्थीदशेतच मी विद्यापीठाच्या कर्मचारी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दर रविवारी सरावाच्या दृष्टीने विद्यापीठाच्या मैदानावर आम्ही लेदर बॉलवर स्थानिक क्रिकेट क्लब विरुद्ध पन्नास षटकांचा सामना खेळत असू. मी अतिशय किफायतशीर अशी मध्यमगती गोलंदाजी करत असे. एका सामन्यामध्ये आमच्या सागर पवार या कप्तानाने मला सलग सहा षटके एका बाजूने गोलंदाजी करायला लावली होती. अधिक टिच्चून गोलंदाजी करत केवळ पंधरा धावा देत मी दोन बळी घेतल्याचे आठवते. तेव्हा मी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेत त्यांच्या विविध स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून नावनोंदणी देखील केली होती. त्यावेळी विद्यापीठातील कॅप्टन आनंदराव पाटील, मोहन मिस्त्री, यशवंत साळोखे (सिडने), प्रियेदाद रॉड्रिक्स, आप्पा सरनाईक, उदय करवडे, शिंगे इत्यादी अनुभवी सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले तसेच राजू कोळी, रमेश ढोणुक्षे, राजेश चव्हाण, अजय आयरेकर, योगेश दळवी, अनिल साळोखे, अनिल पाटील, अवधूत पाटील, अभिजीत लिंग्रस, सुरेश बंडगर, अनिल जाधव, दिवंगत विजय जाधव सारखे सहकारी मित्र लाभले. दुपारच्या सुट्टीत व स्थानिक स्पर्धा खेळत खेळत मी तेव्हा भाग असलेला कर्मचारी संघ आता देश पातळीवर खेळू लागला आहे (मुंबई, नाशिक, जळगाव, अमरावती, नागपूर, गोरखपूर, दिल्ली, लुधियाना, पतियाळा, श्रीनगर). आता मात्र या संघात खेळता येत नसल्याच श्यल्य आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो की मित्र अजित पिसाळ बरोबर बावधनसाठी वाई, ओझर्डे, भुईंज, पाचवड येथे क्रिकेट स्पर्धा खेळल्याचं आठवतं.
पुढे भौतिकशास्त्र विभागात शिक्षक झाल्यानंतर विभागातील विद्यार्थ्यांच्या सोबत भरपूर क्रिकेट खेळायचो. सुट्टीच्या दिवशी आम्ही ज्या गल्लीत राहत असू तिथल्या मित्रांसोबत दोन तासांच क्रिकेट ठरलेल. या सकाळच्या खेळाला मी व्यायाम म्हणून बघायचो. खेळाचा पुरेसा अनुभव असल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाबरोबरच मैदानावर देखील खेळाने प्रभावित करायचो. मी कधी पुढे सरसावत तसे उंच फटके मारायचो नाही. पण मला आठवते मी दिपक गायकवाडच्या एका षटकात लागोपाठ चार षटकार खेचले होते. दिपकची लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी माझ्या हिटिंग झोनमध्ये पडत होती. त्यानंतर त्याने मला नेहमी अराउंड द विकेट गोलंदाजी केली होती.
विद्यार्थ्यांसोबत खेळतानाचे काही कटू प्रसंग देखील आठवतात; धाव घेत असताना सध्या पोलिस अधिकारी असलेला रवींद्र पाटील क्षेत्ररक्षकाकडे बघत धाव घेताना त्याची विकेटकिपरशी धडक झाली व घसा दुखावल्याने काही महिने त्याचा आवाज गेला होता. सुदैवाने उपचारांती त्याचा आवाज परत आला. वेगवान गोलंदाजी करताना पाटण येथील प्रमोद कुंभार या विद्यार्थ्याचा हात खांद्यातून निखळला होता. त्याच्या खांद्यावर दोन्ही पाय ठेवून हाताने त्याचा हात फिरवून आश्चर्यकारकरित्या मी बसवला होता. त्यानंतर आयुष्यात त्याने वेगवान गोलंदाजी केली नाही. अभ्यासात अत्यंत हुशार आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू असलेल्या दिवंगत युवराज गुदगेची आठवण अविस्मरणीय आहे. तांत्रिकदृष्ट्या अतिशय मजबून असलेल्या या डावखुऱ्या क्रिकेटपटूने कोल्हापुरात भरपूर क्लब क्रिकेट खेळले होते. साडेसहा फूट उंचीच्या युवराजने विद्यापीठाच्या मैदानावर कित्येक षटकार सहज मारले होते. खेळायला गेला कि सामना जिंकूनच येई. त्याने अनेक सामन्यात अर्धशतक ठोकले होते. पुढे तो प्राध्यापक झाल्यावर सहलीवर असताना आपल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समुद्रात बुडताना वाचवताना बुडून त्याचा दुर्दैवी देहांत झाला. आमचा एक विद्वान, आज्ञाधारक आणि सदगृहस्थ विद्यार्थी नियतीने हिरावून नेला.
भौतिकशास्त्र विभागातील शिक्षक कायम उत्तम क्रिकेट खेळत. याप्रसंगी आठवण येते ती विभागाच्या वेलकम तसेच सेंडऑफ निमित्ताने शिक्षक विरुद्ध विद्यार्थी अशा आयोजित सामन्यांची.. वयोमानपरत्वे तसेच सराव नसल्यामुळे शिक्षकांच्या बॅटला चेंडू लागत नसे. मुलं शिक्षकांविषयीच्या आदरापोटी त्यांना लवकर बाद करत नसत. चुकून बाद झालेच तर त्यांच्या पोटात गोळा येई. तो एक सामना पूर्ण करमणूक असे. एकदा या प्रसंगी मुलांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. या सामान्याच्या नाणेफेकीसाठी एकाच वर्गाचे चक्क दोन कॅप्टन आपल्या दोन संघासह आले होते. यासंदर्भात आदल्यारात्री विद्यार्थ्यांच्यात काहीतरी वाद झाला होता. मैदानातही थोडासा गोंधळ झाला. शिक्षकांनी मध्यस्थी करत तो वाद मिटवला आणि स्पर्धा सुरळीत पार पडल्या. आता शिक्षकांच्या टीम ची जागा संशोधक विद्यार्थ्यांच्या टीमने घेतली आहे आणि सतत हा सामना ते जिंकत आले आहेत.
माझ्या क्रिकेटप्रेमामुळे आमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट खेळ माझ्या स्मरणात आहे. क्रिकेटमुळं लक्षात राहिलेले आमचे काही विद्यार्थी असे; दत्तात्रय पन्हाळकर, विजय खुळपे, सुदर्शन शिंदे, प्रशांत शिरगे, शिवाजी सादळे, शिवाजी जमदाडे, राजू तांबेकर, प्रशांत जाधव, शरद भगत, रूपेश देवण, सर्फराज मुजावर, विनायक राजपूत, प्रशांत पाटील, प्रदीप कांबळे, दिपक पाटील, राम कलुबरमे, मुरलीधर चौरशिया, जयवंत गुंजकर, उमाकांत पाटील, विजय रासकर, निषाद देशपांडे, माणिक रोकडे, अवधूत वेदपाठक, सचिन पोतदार, सुनील आणि रमेश फासे, दिवंगत सुनील भोसले, सिकंदर तांबोळी, सुनील काटकर, गुरुदास माने, गजेंद्र राऊत, परवेज शेख, रुपेश बनसोडे, हर्षराज जाधव, सदानंद जाधव, दत्तात्रय जगदाळे, महेश शेलार, संदीप कामत, प्रशांत शेवाळे, इंद्रजीत बागल, विनायक पारळेे, गोविंद कदम, राहुल पाटील, गोपाळ कुलकर्णी, सचिन पवार, विशाल साळुंखे, रोहित कांबळे, सतीश रेपे, गौरव लोहार, श्रेयस गुजर, प्रशांत कांबळे, प्रतीक माने, गणेश करपे, किरण हुबाळी इत्यादी.. अर्थात ही संपूर्ण यादी नाही.
त्यानंतर विद्यापीठातील बॉटनी विभागाच्या संशोधक विद्यार्थ्यांचा एक गट दररोज सकाळी सहा ते आठ दरम्यान भवन जवळील छोट्या ग्राउंडवर नित्याने क्रिकेट खेळत असे. मग त्या गटात सामील झालो. सातत्यानं पाच वर्ष आम्ही एकत्र क्रिकेट खेळत होतो. यादरम्यान देखील संदीप पै, मानसिंग निंबाळकर, जय चव्हाण, निवास देसाई, निलेश पवार यांसारखे बरेच सहकारी मित्र लाभले. या चमुतील राजाराम पाटील या मित्राची 'अर्ली एक्झिट' मात्र मनाला चटका लावून जाणारी ! यादरम्यान फलंदाजीचे उत्तम कौशल्य मी जपले होते. इथल्या मैदानाच्या आयताकृती आकारामुळे त्यादरम्यान माझ्यात 'लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव' चे कौशल्य विकसित झाले. एकदा धाव घेताना पाय घसरून हातावर सर्व बोजा आल्याने खाद्यातील स्नायूमध्ये ताण आल्यापासून मी माझ्या गोलंदाजीत बदल करत फिरकी गोलंदाजीकडे मोर्चा वळवला होता तो आजतागायत आहे. फिरकी गोलंदाजी ही उत्कृष्ट करू लागलो. बरेच चेंडू निर्धाव टाकल्याचे आठवते.
यावेळी आठवते ती कर्मचाऱ्यांची दोन ते अडीच दरम्यानची पदवीदान समारंभाच्या मैदानावरील क्रिकेट स्पर्धा ! एक सामना दोन दिवस चाले. आज आमची फलंदाजी तर उद्या गोलंदाजी. संशोधक विद्यार्थी असताना प्रकल्पावर रिसर्च फेलो असल्याने विद्यापीठाचा कर्मचारी म्हणून भौतिकशास्त्र विभागामार्फत खेळायला मिळे. डोंगरे सर, सावंत सर, कदम सर, संकपाळ सर, मांगोरे पाटील सर यांची नेहमीच माझ्या खेळावर भिस्त असायची. या स्पर्धेची दोन चषक पटकावणाऱ्या चमूचा मी सदस्य होतो याचा अभिमान आहे. त्यानंतरच्या काळामध्ये पीटी पाटील, प्रताप वाघ, प्रशांत शिरगे, सागर पवार, पप्पू चव्हाण, शरद भगत, प्रशांत पाटील, प्रकााश चौगुले, मनोज कुंटेे यांच्या योगदानातून आम्ही तीनदा उपांत्य फेरी गाठली होती.
मैदानात खेळायला उतरल्यानंतर प्रत्येक वेळी मी अतिशय ईर्षेने आणि आत्मीयतेने खेळल्याचे आठवते. 'कुलगुरू एकादश' विरुद्ध 'प्र-कुलगुरू एकादश' या विद्यापीठातील प्राध्यापकांमधील क्रिकेट सामन्यात विद्यमान प्र-कुलगुरू पीएस पाटील सर आणि मी कुलगुरू एकादश संघात खेळलो होतो. मी सर्वांपेक्षा तरुण होतो. जिंकायला आठ षटकात १२० धावांची गरज असूनही मी आणि पाटील सरांनी सातव्या षटकातच संघाला मोठा विजय मिळवून दिला होता. पाटील सर देखील उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत.
वयोमानपरत्वे ग्राउंडवर जाण्याचा योग कमी येऊ लागला. फक्त रविवारी किंवा वेलकम आणि सेंडऑफ च्या मॅचेस वेळी ग्राउंड वर जाऊ लागलो. विभागाच्या स्पोर्ट डे निमित्त आयोजित केलेल्या मॅचेस दरम्यान संशोधक विद्यार्थी मला त्यांच्या टीममध्ये सामील करू लागले. वाद टाळण्यासाठी सर्व सामन्यादरम्यान पंच म्हणून मी उपस्थित राहतोच. कधी कधी विद्यार्थ्यांना माझे निर्णय रुचत नाहीत. कित्येकदा या मॅचेस इतक्या अटीतटीच्या आणि चुरशीच्या व्हायच्या की विद्यार्थी चिडीला जाऊन आपापसात भांडण करायची. अर्थात हे वाद मैदानापुरतेच मर्यादित असायचे. या अनुषंगाने मुरली, सचिन, प्रद्युम्नन, सदानंद, विनायक हे विद्यार्थी कायम लक्षात राहिले आहेत. पण त्यांना दिलेले निर्णय खिलाडीवृत्तीने घ्यायची सवय लावली आहे. विद्यार्थ्यांमध्ये एकता दृढ व्हावी आणि निर्माण झालेली कटुता कमी व्हावी यासाठी कायम आग्रही असतो. अजुनही खेळण्याची कुवत आणि जिद्द आहे.
विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये अजूनही सहभागी होत असतोच. दोन वर्षांपूर्वी आमच्या युसिक विभागाच्या संघाने माझ्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.
वर्षानुवर्षे या खेळाने माझ्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित केला आहे तसेच जीवनातल्या कठीण परिस्थितीला तोंड देण्याची किंवा अडचणींवर मात करण्याची मानसिकता विकसित केली आहे. आपल्या वैयक्तिक जीवनात अंगभूत गुण आणि कौशल्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. खेळामुळे व्यक्तिमत्व विकास होतोच पण त्याच बरोबर आपले मनोबल उंचावते आणि शारीरिक क्षमता दृढ होते. याद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमापलीकडील ज्ञान देण्याचा हा माझा प्रयत्न असतो. दैनंदिन जीवनातली सकारात्मकता या अशा क्रीडा कौशल्यातून येते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सुदृढ होतो.
- डॉ. केशव यशवंत राजपुरे (९६०४२५०००६)