(एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व)
एका मातीचे अनेक रंग असतात
एका विचाराचे अनेक विचार असतात
एका बिंबाची अनेक प्रतिबिंब दिसतात
एका ध्वनीचे अनेक प्रतिध्वनी उमटतात
एक, एक नसतचं
त्या एकात अनेक एक एकवटलेले असतात... अंतराळातल्या सूर्यमालेप्रमाणे... असे एकात अनेक पैलू धारण केलेले एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे माझे गुरुवर्य आदरणीय प्रा. डॉ. केशव यशवंत राजपुरे सर...
विद्यार्थ्याची जिज्ञासा व बुद्धी तीव्रतम असेल तर शिक्षकरुपी परीस त्या विद्यार्थ्याचे सोने केल्याशिवाय रहात नाहीत, हे ध्येय सत्यात आणणारे जिद्दी विद्यार्थी... शारीरिक आणि मानसिक वेदनांना ठेचत आणि चुचकारत स्वाभिमान ज्वलंत ठेवून आई-वडिलांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे यश खेचून आणणारे आदर्श पुत्र... आयुष्याच्या यज्ञात आणि यशाच्या मार्गावर साथ देणारे गुरूवर्य, मित्रमंडळी, सहकारी, आप्त आणि असंख्य विद्यार्थी यांना हृदयात स्थान देवून नाती जोपासणारे मायाळू आणि हळवे स्नेही... एक उत्कृष्ट आणि संयमी शिक्षक, आपुलकी आणि जिव्हाळा असलेलं प्रेमळ व्यक्तिमत्व... सामाजिक भान असलेले एक सुजाण नागरिक... आपल्या मार्गाने येणाऱ्या आपल्याच बांधवांना प्रोत्साहन देणारी प्रेरणा... 'गावच्या मातीत वेगळीच चमक आणि धमक आहे’.. या वाक्याला सप्रमाण सिध्द करून दाखवणारे एक जिद्दी व्यक्तिमत्व... ‘केसू येसू’ पासून शैक्षणिक प्रवास सुरु करून, अविरतपणे आपल्या स्वप्नांना स्फूर्तीदायक प्रयत्नांची जोड देऊन, वडिलांचे ‘यशवंत’ नाव सत्यात उतरवून जीवनात यशस्वी झालेले ‘यशवंत डॉ केशव सर’ ...
सरांचा जन्म वाई तालुक्यातील बावधन गावच्या एका छोट्याश्या वाडीत 'अनपटवाडी' येथे पिता यशवंत व मातोश्री अंजीरा यांचे पोटी दि. २४ जुलै १९७१ रोजी झाला. मूळचे दरेवाडीचे असणारे राजपुरे कुटुंबीय अत्यंत गरीब परिस्थितीमुळे चरितार्थासाठी १९७० दरम्यान अनपटवाडी येथे शेतातील वस्तीवर स्थायिक झाले होते. हलाखीची परिस्थिती, निरक्षर आई-वडील, उपजीविकेचा आधार फक्त शेती, अन्य उत्पन्नाचे साधन नव्हते तसेच घरात इतर भावंडं (पाच बहिणी आणि एक भाऊ) असलेले हे कुटुंब सरांच्या मेहनतीमुळे पुढे यशस्वी कुटुंब म्हणून नावलौकिक मिळवेल, असे कोणाला स्वप्नातही वाटले नसते. वडील कै यशवंत राजपूरे यांना नेहमी असे वाटे की माझी मुले शिकून खूप मोठी व्हावीत आणि त्यांनी यशस्वी व सुखी आयुष्य जगावं. कोणत्या पालकांना असे वाटत नाही ? परंतु परिस्थितीने तर साथ द्यावयास हवी. त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी काबाडकष्ट, मजुरी आणि शेतीची उरफोड करणारी कामे करत व्यतीत केले. प्रतिकूलतेमध्ये रूजनारे 'बीज' च पुढे वटवृक्ष बनते याचा सर पुरावा आहेत.
अशा परिस्थितीत सन १९७७ ते १९८० या काळात सरांचे इयत्ता पहिली ते तिसरीचे प्राथमिक शिक्षण अनपटवाडी या मूळगावी झाले. प्राथमिक शाळेत प्रवेश घेते वेळी - मुलाचे नाव काय - म्हणून वडीलांना विचारले असता त्यांनी 'केसू येसू राजपुरे' असे नाव लावण्यास सांगितले कारण सरांच्या आजोबांचे नाव केसू असे होते, त्यांवरील प्रेम म्हणून सरांचे केसू हे नाव अजूनही खूप ठिकाणी आपणास पहावयास मिळते. खर तर सरांचे नाव पाळण्यात घालून ठेवले नव्हतेच. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचे ‘केशव’ हे विधिवत नामकरण केले गेले. हा नावाचा किस्सा अजूनही सरांना आठवतो. पुढील आयुष्यात नावातील या गडबडीमुळे (राशन कार्ड व शाळेतील नोंदी वेगवेगळ्या नावाने) सरांना पासपोर्ट वेळेवर मिळाला नाही आणि त्यांची परदेशी जायची संधी हुकली होती. इयत्ता पहिलीत प्रवेशित झाल्यानंतर वर्गाचा पट होता नऊ; सहा मुली आणि तीन मुले. सर, हनुमंत मांढरे, स्व. संतोष (पिंटू) यादव, जयश्री, प्रमिला, संगीता, सुनीता, वनिता आणि शारदा. हसत खेळत आणि गावगुंडी अनुभवत सरांचे प्राथमिक शिक्षण झाले. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले सर त्यादरम्यान कायम ८५ % गुणांच्या वरच असत. इयत्ता पहिली ते तिसरी या काळात सरांना कोदे गुरुजी हे अतिशय शिस्तप्रिय शिक्षक लाभले. त्यांच्यामुळे सरांच्या आयुष्यात पूर्वीपासूनच शिस्तीला महत्व आले. तेव्हाचे दोन किस्से सांगावेसे वाटतात; एक म्हणजे लहान बहिणीच्या शिक्षणासाठी सर इयत्ता पहिली मध्ये दोन वेळा बसले होते; याचा परिणाम म्हणजे त्यांच्या शिक्षणाची सुरुवातच भक्कमपणे झाली होती. दुसरी गोष्ट म्हणजे मित्र हनुमंत मांढरे आणि सर यांनी केलेल्या दंग्यामुळे कोदे गुरुजींनी तीन तासांची ओणव्यातून पायाचे अंगठे धरण्याची शिक्षा केली होती. सरांचा कुशाग्र आणि खोडकर स्वभाव अशा गोष्टींनी फुलत गेला. सरांचा अभ्यासाचा आवाका आणि कुतूहल वाढण्यामागे हेच कारण असावे. बालपणी एक विद्यार्थी म्हणून सरांचे स्वतःचे एक भावविश्व होते. सरांना नेहमी प्रत्येक गोष्टीचे कुतूहल वाटे. शिकताना ते सतत विचार करत की, हे असे का ? तसे का ? असे का नाही ? तसे का नाही ? या जिज्ञासेपोटी त्यांना प्रश्न पडायची सवय आपोआपच लागत गेली आणि उत्तरे मिळवण्याची सुध्दा. स्वत:ला प्रश्न विचारून शिकायचं हे तेव्हाच त्यांना ठावूक होतं.
(बावधन हायस्कुल)
सन १९८० साली इयत्ता चौथी साठी सरांचा प्राथमिक शाळा बावधन येथे प्रवेश झाला. नवीन शाळा, शिक्षक आणि वातावरणाचा त्यांच्या गुणांवर परिणाम झाला. चौथीच्या केंद्र परीक्षेमध्ये सरांना ७४.२५ टक्के गुण मिळाले. हे गुण सरांच्या अपेक्षेस उतरले नाहीत त्यामुळे त्यांनी निराश न होता अधिकाधिक मेहनत घ्यायचे ठरवले. सन १९८१ ते १९८७ दरम्यान सरांचे इयत्ता पाचवी ते दहावी चे शिक्षण बावधन हायस्कूल, बावधन येथे पूर्ण झाले. हा कालखंड खऱ्या अर्थाने त्यांच्या जडणघडणीचा होता. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक प्रसंग त्याला काहीतरी प्रेरणा देऊन जात असतो. त्यांचे जीवन यशस्वी करण्यामागे या कालखंडातील काही प्रसंगांचे अनमोल योगदान आहे. त्यापैकीच एक प्रसंग म्हणजे इयत्ता पाचवीत असताना सरांना इंग्रजीच्या पेपरमध्ये १०० पैकी ९८ गुण मिळाले होते. सरांचा पेपर अतिशय अव्वल होता. त्यामुळे इंग्रजीच्या पाटील बाईंनी तो पेपर इतर मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून संपूर्ण हायस्कुल मधील मुलांना दाखवला होता. हा प्रसंग सरांना त्यांच्यामध्ये काहीतरी विशेष आणि चैतन्यदायी आहे याची जाणीव निर्माण करून गेला. आपण जरी वाडीमधून आलो असलो तरी बावधन मधील हुशार मुलांच्या पुढे जाऊ शकतो हा आत्मविश्वास सरांच्यात निर्माण झाला. सर आजही पाटील बाईंचे ऋणी आहेत. हायस्कूल मधील गणित विषयाचे कै मारुती सखाराम (एमएस) पवार सर यांच्या शिकवण्याच्या पध्दतीचा सरांवर चांगला प्रभाव पडला होता. पवार सरांची एक सवय होती; ते वर्गावर येतानाच गणित सांगत येत असत. एके दिवशी पवार सर एक गणित सांगत वर्गात आले आणि गणित सांगून संपल्याक्षणी पुढील बाकावर बसलेल्या केशवनी बरोबर उत्तर दिले. सरांनी विचारले - कसे आले ते सांग. पण केशवना अचानक पद्धत सांगता आली नाही, ते घाबरले म्हणून पवार सरांनी त्यांना एक तास बाकावर उभे राहायची शिक्षा केली. या प्रसंगातून सरांना आपल्या आयुष्यात आत्मविश्वास किती गरजेचा आहे याचे महत्व समजले. पवार सरांचा कडक आणि शिस्तप्रिय स्वभाव सरांना शिस्त आणि आत्मविश्वास देऊन गेला.
त्यानंतर सरांनी अभ्यासात कधीही मागे वळून पाहिले नाही. इयत्ता दहावी पर्यंत बावधन पंचक्रोशीत असलेल्या साऱ्या शाळांमधून सर प्रथमच यायचे, त्यांचे गुण ८० टक्के गुणांच्या खाली कधीही आले नाहीत. ही विशेष बाब येथे अधोरेखित करावीशी वाटते. हायस्कूलच्या वातावरणात विविध स्पर्धा खेळून चुरस, चढाओढ आणि अव्वल राहण्याचे गुण सरांमध्ये वाढत गेले की जे अजूनही त्यांच्यात आहेत. खो - खो सारख्या मैदानी खेळांमध्ये सरांना विशेष आवड जडली. या खेळामध्ये सरांनी विशेष नैपुण्य प्राप्त केले होते आणि अनेक सामने जिंकले होते. सरांचे आवडते दुसरे सर म्हणजे- पीएन पवार सर. सरांच्या मार्गदर्शनाखाली केशव सर संघात असलेल्या बावधन खो - खो संघाने तेव्हा वाई, बोरगाव, ओझर्डे तसेच खंडाळा संघांना धूळ चारली ती निव्वळ पवार सरांनी पेरलेल्या जिद्दी खेळाने. सर इयत्ता सातवी ते दहावीच्या हायस्कूलच्या खो - खो संघाचे कप्तान होते. स्काऊट गाईड चे कॅम्प असो किंवा क्रीडा स्पर्धा असो, सरांनी आघाडी कधीच सोडली नाही. 'विद्यार्थी हा विद्येचा भुकेला असला पाहिजे, तो परीक्षार्थी असता कामा नये' - ही सरांची कायम धारणा !
(पी. एन. पवार सरांसह)
आयुष्यात सारं जिथल्या तिथं आणि सहजरित्या मिळालं तर त्या गोष्टींचे महत्व राहत नाही. प्रतिकुलतेवर मात करून मिळवलेलं यशच जगण्याला आनंद देत असतं. सरांच्या बाबतीत सुध्दा असेच झाले. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये सरांनी शिक्षण प्रवास चालू ठेवला. दिवा आणि कंदिलाच्या मंद प्रकाशात अभ्यास केला. मित्रांची जुनी पुस्तकं तसेच बायडींग केलेल्या वह्या वापराव्या लागल्या. वर्षाकाठी केवळ एकच गणवेष सरांना मिळत असे. हे सर्व कष्ट सरांच्या वाट्याला आलेलं होत. काही प्रसंग डोळ्यांत पाणी आणणारे होते तर काही प्रसंग मन पिळवटून टाकणारे ! असाच एक प्रसंग: अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध असणाऱ्या बी.टी. पिसाळ या पी. टी. च्या सरांकडून त्यांना शिक्षा मिळाली. एके दिवशी बी. टी. पिसाळ सर मैदानावर सामुहिक कावायतचा सराव घेत होते. त्यावेळी सर्वात पुढे टेबलवर मार्गदर्शनासाठी उभ्या असलेल्या केशव सरांनी पाठीमागे पँट फाटल्यामुळे इन शर्ट केला नव्हता. इन शर्ट चा नियम मोडल्यामुळे पिसाळ सरांनी त्यांना शिक्षा केली होती. नंतर जेव्हा त्यांना कारण समजले तेव्हापासून कधीही त्यांनी सरांना - इन शर्ट का केला नाहीस - असे विचारले नाही. स्वभावाने शांत आणि लाजाळू असणाऱ्या सरांना परिस्थितीचे चटके जाणवत होते पण पर्याय नव्हता. जे होतं त्यातच समाधान मानावं लागत होतं. सगळ्या गोष्टींवर मात करत सर प्रत्येक गोष्टीत अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करत होते.
बावधन जनता सहाय्यक मंडळ दरवर्षी संपूर्ण बावधनमधून इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये गुणवत्तेत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बगाडाच्या वेळी बक्षीसे देत असे. सरांनी पाचवी ते दहावी दरम्यान सलग सहाही वर्षी मंडळाची प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवली आहेत. त्याकाळी हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सरांना 'पेड की गवाही' या नाटकामध्ये एका वकिलाची भूमिका करण्याची संधी मिळाली होती. ती त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर यशस्वी करून दाखवली होती. हे असतं लढत राहणं. हे असतं जीवनाचा खरा आनंद घेणं. इयत्ता दहावीच्या वर्गात असताना सरांची खरी प्रतिभा प्रकटली. ते त्यांचा सर्व अभ्यास दिवसाच करत असत कारण रात्री घरात वीज घेतली नसलेने लाईट नसायची. दिवसभर शेतात काम करत त्यांनी दहावीचा अभ्यास खूप मेहनतीने पूर्ण केला. परिणामतः जिद्द व चिकाटीच्या जोरावर सर १९८७ साली दहावीच्या शालांत परीक्षेत ८० टक्के गुण मिळवून बावधन केंद्रात प्रथम आले. त्यावेळी ते सर्वोत्तम गुण होते. या गुणांची आज मिळवलेल्या इतरांच्या गुणांशी तुलना होऊ शकत नाही कारण परिस्थितीमध्ये फरक आहे. मूळगावी दरेवाडी येथील ग्रामस्थांनी याप्रसंगी त्यांची ढोल वाजवत आणि गुलाल उधळत बैलगाडीतून मिरवणूक काढली होती. एका गरीब मजुराच्या मुलाने मिळवलेल्या या यशाचे ग्रामस्थांना खूपच कौतुक होतं. पुढील शिक्षणास मदत म्हणून त्यांनी बक्षिसरुपी आर्थीक मदत सरांना केली होती. ही शाबासकीची लाखमोलाची थाप सर कधीही विसरू शकत नाहीत. साधारण दिसणाऱ्या असाधारण विद्यार्थ्याचे यश होते ते ! कष्टकरी कुटुंबातून सुध्दा असे बुद्धिवंत समाजास मिळतात याचीच ही प्रचिती नव्हे का ?
(निरोप समारंभ, बावधन हायस्कूल, जानेवारी १९८७)
दहावीच्या निरोप समारंभामध्ये सगळे मित्र रंगीत ड्रेस घालून आले होते. इच्छा असताना सरांना रंगीत ड्रेस घालायला मिळाला नाही. सरांकडे वर्षाकाठी मिळणारा एकच पांढरा शर्ट आणि खाकी पँट असणारा ड्रेस होता. सर हाच गणवेष घालून समारंभात आले होते. कठीण परिस्थितीत तोच त्यांचा सोबती होता. आजही जेव्हा आपण सरांचे विद्यार्थीदशेतील फोटो पाहतो तेव्हा मनामध्ये माणसाची परिस्थिती आणि त्याची बुद्धिमत्ता यांचे चाललेले द्वंद्व थैमान घालते. सर आणि भावंडांना वर्षातून एकदाच त्यांच्या म्हसवे या आजोळी यात्रेनिमित्त जायला मिळत असे. परंतु पैशांअभावी ही सारी मंडळी बसने न जाता पहाटेच घरातून निघून मजल दर मजल करत डोंगरातून आणि खिंडीतून तब्बल १५ कि.मी. चालत जात असत. सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी सर आणि त्यांचे वडील वाईला साहित्य आणण्यासाठी ८ कि.मी. चालत जात असत. त्यांची चालायची ही सवय लहानपणापासुनचीच, त्यामुळे आजही ते दररोज पाच किलोमिटरपेक्षा जास्त अंतर न थकता चालतात.
माणसाला आयुष्यात दोन गोष्टी महान बनवत असतात; एक म्हणजे त्याने सोसलेले कष्ट आणि त्याने घेतलेले परिश्रम. मोठ्या कष्टांनी दहावीला चांगले गुण मिळवलेले होते. आता कॉलेजला प्रवेश घ्यायचा तर त्यासाठी पैसे आणि रंगीत गणवेष पाहिजे. कॉलेजला जाताना जुना गणवेष घालून जावूशी वाटत नसे. म्हणून एकदा सरांनी आईला नवीन रंगीत ड्रेस घेण्यासाठी विचारले असता पाच भावंडांच्या देखभालीमध्ये दबलेल्या आणि संसाराचा गाडा ओढणाऱ्या आईने असमर्थता दाखवली. ही असमर्थता सरांना कित्येक वेळा कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्याचे बळ देऊन गेली. त्याचक्षणी सरांनी ठरवले की आपणही वडिलांबरोबर मजुरी करायची व कॉलेजसाठी आपला ड्रेस आपण घ्यायचा. भर उन्हात, अनवाणी पायांनी सरांनी विहिरीतून दगडाच्या पाट्या बाहेर काढण्याचे काम स्विकारले. सरांनी त्या वयात पोटात गोळा येईल असले काम केले. त्याच विहिरीच्या तळामध्ये काम करणारे वडील आपल्या मुलाचं काम पाहायला आले आणि त्यांना पाहून सरांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. वडिलांनी त्यांना कवटाळले आणि त्याक्षणी सरांना वडील आणि कष्ट या जोडीचे दाहक सत्य उमगले. सरांनी त्यावेळी तीस रुपये हजेरीने सहा दिवस काम केले. त्यातून त्यांनी एकशे ऐंशी रुपये कमावले. आपल्या आयुष्यातील पहिला रंगीत ड्रेस सरांनी स्वकमाईतून घेतला. गरीबीचे चटके सोसताना ज्या यातना भोगाव्या लागतात त्या ज्याच्या त्यालाच माहीत. पण टाकीचे घाव सोसल्याशिवायही देवपण येत नाही हेही तितकंच खर आहे. सरांच्या जीवनप्रवासात आलेले असे परीक्षेचे प्रसंग मनोबल वाढवून गेले.
उच्च माध्यमिक शिक्षण घ्यायचे की कुटुंबासाठी कमाई करायची या व्दिधा मनःस्थितीत सर अडकले होते. खंडाळा येथील सरांचे दाजी, कापड व्यावसायिक स्व. सदाशिव कृष्णा शिर्के यांनी सरांना या काळात गरजेचा आधार दिला. सुट्टीच्या कालावधीमध्ये सर कापड दुकानावर काम करू लागले. शिक्षण चालू राहावे म्हणून खंडाळ्याच्या राजेंद्र विद्यालयामध्ये अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. परंतु दाजींच्या ओळखीच्या शिक्षकांनी सांगितले की एवढे उत्तम गुण मिळून सुध्दा कॉलेजला प्रवेश का घेतला आहे, तुम्ही डिप्लोमा साठी प्रयत्न करावा. त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे सिव्हील डिप्लोमा साठी सरांना प्रवेश मिळाला. दहावीचे गुण आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे डिप्लोमा करण्यासाठी मानसिक तयारी केली. ‘आपल्या शिक्षणाचा बोजा नातेवाईकांवर कशाला– तसेच दाजींचीही चार अपत्ये होती– भाच्यांच्या खर्चात आपण भागीदार नको’ अशी सरांच्या मनात अस्वस्थता ! त्यानंतर कराड येथे वसतिगृहात सरांची प्रकृती बिघडली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे व मनातील खजील भावनेपायी सरांना नाईलाजाने कराड येथील डिप्लोमाचा प्रवेश रद्द करावा लागला. कदाचित तेव्हा ते अभियंता झाले असते पण विद्यापीठाचे प्राध्यापक नाही. नियतीच्या मनात नक्की काय असते हे कुणाला कधी समजले आहे का ?
दाजींचा रोष ओढावून, वेळ न दवडता वाईच्या किसनवीर महाविद्यालयामध्ये सप्टेंबर १९८७ मध्ये सरांनी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घ्यायचे ठरवले. दहावीत ८० % गुण मिळवलेला विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात येतोय हे बघितल्यावर तत्कालीन प्रचार्यांनी उशीर होऊनही तात्काळ प्रवेश दिला होता. सर कॉलेजमध्ये दहावीच्या गुणांनुसार अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये विसावे होते. सरांना कॉलेजसाठी लागणारे साहित्य, पास आणि इतर सुविधांची पूर्तता वडिलांनी मजुरी करून केली. महाविद्यालयीन जीवनातील एक किस्सा सर सांगायला विसरत नाहीत. विज्ञान विभागाची जर्नल्स घेण्यासाठी सरांना पैशाची आवश्यकता होती. त्यांनी वडीलांना ही गोष्ट सांगितल्यावर वडिलांनी गावातील संपतराव गोळे यांचेकडून उसने पैसे घेऊन सरांना दिले. सर नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आले, त्यांनी पैसे कंपासबॉक्स मध्ये ठेवले होते. प्रॅक्टिकल वेळी त्यांचे पैसे कुठेतरी गहाळ झाले. गरीबीमध्ये प्रामाणिकतेवर नियतीने नकळत केलेले वार फार जिव्हारी लागतात. घरी आल्यावर झाला प्रसंग वडीलांना सांगितला. वडील न रागावता शांतपणे म्हणाले, “असुदे, तुला मी परत पैसे देईन”. त्यानंतर वडिलांनी आणखी काही दिवस मजुरी करून आलेले पैसे जर्नल घेण्यासाठी सरांना दिले. सरांच्या चुकीचा त्यांच्या वडिलांना नाहक त्रास.. पण मुलाच्या शिक्षणासाठी तोही सहन करायला त्यांचे वडील तयार असत- ही मोठी गोष्ट ! असा प्रत्येक प्रसंग सरांना जाणतं करत होता.
नवीनता, कष्टाळू वृत्ती, सोशिकता, प्रामाणिकपणा आणि रोज नवनवीन शिकण्याची भूक असणारा हा विद्यार्थी कॉलेजमध्ये सुध्दा चमकत होता. सरांनी सन १९८९ साली फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांच्या ग्रुप मध्ये ८६ टक्के गुण मिळवले तसेच बारावी शास्त्र शाखेत एकूण ८२ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात दुसरा येण्याचा बहुमान मिळवला. सरांची विशेषता म्हणजे त्यांनी दहावी आणि बारावीसाठी एकही शिकवणी लावली नव्हती. केवळ जिद्द, प्रतिभा आणि आंतरिक इच्छेच्या बळावर सरांनी एवढे मोठे यश मिळवले होते. बारावी झाल्यानंतर शिक्षण आणि कामधंदा यांच्यातील द्वंद्व सरांच्या डोळ्यांपुढे सुरु झालं. सरांचे मोठे बंधू एम.कॉम. होते आणि त्यावेळी नोकरीच्या शोधात होते. नोकरी सहजासहजी मिळतं नसल्याने घरखर्च वडिलांनाच भागवावा लागत होता आणि हीच गोष्ट सरांना सारखी बोचत होती. परंतु पर्याय नव्हता. या पार्श्वभूमीवर सरांनी परत खंडाळ्याच्या दाजींकडे जाण्याचा निर्णय घेतला. सरांनी डिप्लोमाचा प्रवेश रद्द केल्याचा मनातील रोष बाजूला ठेवून दाजींनी मोठ्या मनाने त्यांच्या पुढील शिक्षणाचा बोजा परत एकदा उचलण्याची तयारी दर्शवली. सरांच्या शैक्षणिक वाटचालीचा हा महत्त्वपूर्ण निर्णय माणसातील दाजीरूपी देवाने घेतल्यानेच त्यांचे पुढील शिक्षण सोपस्कर झाले.
सन १९८९ साली नातेवाईकांनी पुढील शिक्षणाची गळ घातल्यामुळे लोणंद येथील सायन्स कॉलेजमध्ये बी.एस्सी. साठी सरांनी प्रवेश घेतला. सर यावेळी त्यांच्या खंडाळ्याच्या दाजींच्या येथे राहायला होते. बारावी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवणारा विद्यार्थी इतरत्र कोठेही प्रवेश न घेता आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतो याची दखल महाविद्यालयाचे प्राचार्य कै. दिपा महानवर यांनी तेव्हा घेतली. सरांच्या ठायी असणारी चमक आणि हुशारी महानवर सरांनी हेरली होती. त्याचबरोबर सरांच्या गरीब परिस्थितीची सुध्दा माहिती त्यांना झाली होती. महानवर सरांनी प्रवेशावेळी दाजींना सांगितले होते की - "हा मुलगा पुढे जाऊन आपल्या सर्वांसाठी काहीतरी चांगलं करेल. तो ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्शवत प्रेरणा ठरेल. तुम्ही पुढाकार घेऊन त्याला आर्थिक पाठबळ पुरवा मी त्याला शैक्षणिक मार्गदर्शन करतो हे माझे आश्वासन" - .. सरांच्या गुणवत्तेला त्यामुळे वाव मिळाला. दाजींचा भक्कम आधार मिळाला. महानवर सरांना त्यांच्या महाविद्यालयाचा हिरा सापडला. त्याला पैलू पाडण्याचे काम चालू झाले.
प्रवेश निश्चित झाल्यानंतर सरांनी स्वतःचा दिनक्रम बनवला होता. ते भल्या पहाटे उठत असत व आवरून सकाळच्या पावणेसहाच्या बसने खंडाळ्याहून लोणंदला जात. तिथून एक किलोमीटर चालत महाविद्यालयात जात असत. नित्यनेमाने सर्व तास आणि प्रात्याक्षिके करत असत. बऱ्याचदा थोडयाश्या वेळेच्या फरकाने त्यांची साडेअकराची परतीची बस चुकायची. मग त्यादिवशी जेवायला दुपारचे चार वाजत. पोटाला चिमटा काढून घेतलेल्या ज्ञानाचे मोल करता येत नाही व त्याचे सर्वकाळ महत्व रहाते. महानवर सर स्वतः प्राचार्य असूनही नेहमी सरांची जातीनिशी चौकशी करत असत. सरांना लागणारे प्रश्नसंच, पुस्तके, नोट्स ते मागण्या अगोदरच मिळत असत. एक पालक आपल्या पाल्याची जशी जबाबदारी घेतो तशी जबाबदारी महानवर सरांनी घेतली होती. त्याचबरोबर दाजींनी सुद्धा सरांना आपला एक मुलगाच समजून सांभाळ केला. कॉलेज मध्ये सरांच्या अभ्यासाची चौकशी वारंवार होत असे. त्यांना नेहमी विशेष व्यक्ती प्रमाणे वागणूक मिळत असे. शेवटी म्हणतात ना हिऱ्याची ओळख रत्नपारख्यालाच असते.
(दाजींचे कपड्यांचे दुकान)
हे करत असतानाच सर्व शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे, महानवर सरांच्या जिद्द, चिकाटी आणि कोणत्याही प्रकारे हाती घेतलेले कार्य पूर्ण करून घेण्याच्या तळमळीतून आणि गुरूजनांना त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवणाऱ्या सरांच्या बेजोड कष्टांमधून 'न भूतो, ना भविष्यती' असे यश महाविद्यालयाने मिळवले होते. सन १९९२ साली बी. एस्सी. मध्ये शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रामधून (सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर) प्रथम येण्याचा बहुमान सरांनी मिळवला होता. बी. एससी. च्या तिन्ही वर्षांत ९१ टक्के गुण मिळवून सरांनी सुवर्णपदक मिळवले होते. लोणंदच्या विनाअनुदानित महाविद्यालयाचा विद्यार्थी उत्कृष्ट गुण मिळवून विद्यापीठात प्रथम येतो याचे किती तरी जणांना नवल वाटले. योगायोगाची गोष्ट म्हणजे सर बी. एस्सी. मध्ये विद्यापीठात प्रथम आले आणि त्याच वर्षी महाविद्यालयास पूर्ण अनुदान मिळाले. महानवर सरांच्या कष्टाचे चीज झाले होते. हाडाचे शिक्षक कसे असतात याचे उदाहरण म्हणजे महानवर सर. महानवर सरांच्या ठाई असलेले पद्धतशीरपणा, टापटीप, वक्तशीरपणा, तत्परता आणि प्रामाणिकपणा हे सर्व गुण सरांनी अवलोकले. त्यांच्या आत्मविश्वास वाढीस चालना मिळाली. सरांच्या पंखांना बळ देण्याचे काम येथेच झाले. "केशव तूला एम.एस्सी. करायची आहे", हे महानवर सरांचे बोल अजूनही सरांना आठवतात. परीस ज्याला स्पर्श करेल त्याला सुवर्णमय करतो. सरांच्या आयुष्यात आलेले महानवर सर हे त्यांच्यासाठी आदर्श परीसच होते. एक हक्काचे आधारवड होते.
(खंडाळा येथील महानवर सरांच्या हस्ते सत्कार, दाजी सदाशिव शिर्के)
(महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते सत्कार)
(तत्कालीन सहकार मंत्री श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार- रयत शिक्षण संस्था, सातारा, ९ मे १९९३)
प्राचार्य भोर यांच्या हस्ते सत्कार (तत्कालीन सहसचिव, रयत शिक्षण संस्था, सातारा)
खेड्यातील गरीब कुटुंबातून शिक्षण घेतलेल्या एका मुलाने आपल्या कुशलतेने मिळवलेल्या यशाचा यथोचित गौरव व्हावा असे महानवर सरांना नेहमी वाटे; विशेषतः हा गौरव तत्कालीन मुख्यमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते झाला पाहिजे ही त्यांची उत्कट इच्छा होती. पण त्यावेळी हे नियोजन जुळून आले नाही. त्यातच त्यांची बदली रामानंदनगर येथे झाली असतानाही त्यांनी तत्कालीन सहकारमंत्री आणि आमदार कै. पतंगराव कदम यांच्या हस्ते सरांचा सत्कार घडवून आणला होता. उद्देश एकच, केशवच्या पाठीवर शाब्बासकीची थाप व ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना याद्वारे प्रेरणा मिळावी. महानवर सरांनी एवढ्यावरच न थांबता अनपटवाडी गावच्या सरपंचांना कॉलेजचे पत्र पाठवून केशव सरांचा आमदार कै मदनराव पिसाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यास सुचवले होते. त्यांनी स्वतः येण्याची तयारी दाखवली होती. ते पत्र अजूनही सरांच्या संग्रही आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये तयार झालेले हे मैत्रीचे आणि स्नेहाचे नाते आजीवन टिकले आहे. खरच अशा शिक्षकांची आज समाजाला नितांत गरज आहे.
(तत्कालीन सहकारमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते सत्कार)
सन १९९२ साली बी. एस्सी. त ९१ टक्के गुण प्राप्त केल्यानंतर महानवर सरांचे मार्गदर्शन घेऊन सरांनी एम. एस्सी. करायचे ठरवले. तेव्हा गावातले सरांचे प्रेरणास्थान प्राध्यापक दत्तात्रय सदाशिव मांढरे हे भौतिकशास्त्रासारखा आव्हानात्मक विषय घेऊन एम. एस्सी. झालेले एकमेव व्यक्तिमत्व होते. सरांचे पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सुरू झाले. सर विद्यापीठात आल्यावरही महानवर सरांचे त्यांच्यावरील लक्ष कमी झाले नव्हते. पत्राद्वारे कायम मार्गदर्शन आणि चौकशी ठरलेली असायची. दाजीही खर्चासाठी किमान आवश्यक पाचशे रुपये दरमहा पाठवत असत. या शिक्षण कालखंडात सरांच्या जीवनात अत्यंत गरजेची स्थित्यंतरे आली. एम.एस्सी. दरम्यान सर विद्यापीठ वसतिगृहात राहत असत. प्रथम वर्षी त्यांना इंग्रजीचे डॉ. विवेकानंद रणखांबे हे रूमपार्टनर लाभले. विवेकानंद रणखांबे यांचा स्वभाव अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध होता. वडीलधाऱ्या माणसांविषयी असणारा आदर, नम्रता, सुशील स्वभाव आणि शांत वृत्ती हे गुण केशव सरांनी त्यांच्याकडून आत्मसात केले. नातेसंबंध जपण्याची कला सरांना याच मित्राकडून शिकायला मिळाली. द्वितीय वर्षात असताना त्यांचे लोणंद येथील गणिताचे जुनिअर मित्र श्री. अरविंद तावरे हे रूम पार्टनर म्हणून लाभले. त्यांची अभ्यास करण्याची पद्धत, परिपूर्णता तसेच सभ्य वर्तन या सर्वांचा प्रभाव सरांवर होत होता. आयुष्यात भेटलेली माणसेच माणसाला घडवत असतात व त्यांच्या जीवनावर खोल परिणाम करत असतात हेच खरं.
(एमएससी मध्ये)
शिवाजी विद्यापीठात एम.एस्सी. करीत असताना सरांना आर्थिक सहाय्य नेहमीच अपेक्षित असायचे. सरांची आर्थिक अडचण समजल्यावर त्यांचे अनपटवाडी गावातील मित्र हनुमंत मांढरे, अनिल अनपट, दिलीप अनपट, लालसिंग मांढरे आणि इतरांनी एकत्र येऊन सरांसाठी मदत करण्याचा विचार केला. याकरता गावातील मारुती मंदिरात मित्रपरिवारानी बैठक घेतली. सर्वांनाच सरांच्या शैक्षणिक क्षमतेवर मोठा भरवसा होता. 'केशव शिकून मोठा झाला तर आपल्या गावाचे नाव नक्कीच मोठ होईल'- हा त्यांना विश्वास होता. मग सर्वांनी आपआपल्या ऐपतीप्रमाणे मदत करून त्यावेळी रुपये ५०० चे आर्थिक सहाय्य सरांना केले होते. त्याकाळी ती मदत सरांसाठी आभाळाएवढी होती. मित्रांच्या विश्वासाचा आणि आधाराचा सरांना फार अभिमान आहे आणि सरांनी तो कृतीतून सार्थ ठरवला आहे.
(एम.एस्सी. मित्रांसोबत)
एम.एस्सी. च्या परीक्षेत सन १९९४ साली सरांनी भौतिकशास्त्र विषयांत ६६ टक्के गुण मिळवून 'श्रीमती गंगुबाई दत्तात्रय कुलकर्णी (जांभळीकर), इचलकरंजी पुरस्कार' मिळवला. जिद्द, चिकाटी आणि चौकस बुध्दीने ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. एम.एस्सी. झाल्यानंतर काही काळ सर गावी राहिले. तेव्हा सरांना नोकरीचा प्रश्न भेडसावत होता. विद्यापीठामधील त्यांचे शिक्षक प्रा. ए.व्ही. राव सर वारंवार पत्र पाठवून सरांना संशोधनासाठी येण्यास आग्रह करत असत. त्यानुसार संशोधनाची आवड निर्माण झाल्यामुळे सरांनी नोकरीशोध थांबवून प्रा. ए.व्ही. राव सरांकडे ऑक्टोबर १९९४ साली युजिसी संशोधन प्रकल्पामध्ये प्रोजेक्ट फेलो म्हणून काम सुरू केले. त्यांना दरमहा १८०० रुपये शिष्यवृत्ती मिळत असे. तब्बल एक वर्ष आणि आठ महिने या ठिकाणी काम केल्यानंतर सुध्दा काही तांत्रिक अडचणींमुळे ते राव सरांकडे पी.एच.डी. करू शकले नाहीत.
(पी.एच.डी. चे सहकारी: (सर्व डॉ. कोळेकर, बेलाड, हरनाथ, वटवे, वाघ, चौधरी )
दरम्यान ३१ डिसेंबर १९९५ रोजी सरांच्या वडिलांचे देहावसान झाले. सर त्यांच्या सेवेत कायम व्हावेत आणि लवकर स्थावर व्हावेत अशी वडिलांची नेहमी इच्छा होती. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला पायी चालत जाण्याची इच्छा वडिलांनी सरांकडे बोलून दाखविली होती, ती सुद्धा अपुरी राहिली. आपल्या वडिलांचे अंत्यदर्शन सुध्दा सरांना करता आले नाही. घरातील सर्व आर्थिक जबाबदारी असताना वडिलांचा मोठा आधार संपला होता. सरांना मानसिक आणि भावनिक आधाराची गरज होती. अशा वेळी त्यांचे मित्र व मुंबईच्या बीएआरसी येथील शास्त्रज्ञ डॉ. प्रताप वाघ यांनी आलेल्या परिस्थीतीला सामोरे जाण्यासाठी सरांना धीर दिला. वर्षभर त्याकाळी संशोधन शिष्यवृत्त्या उशीरा येत त्यामुळे थकबाकी वाढत जाई. त्यामुळे सरांकडे रोजच्या खर्चासाठी देखील पैसे नसत. तेव्हा वाघ सरांनी वर्षभर सरांचा सर्व खर्च मोठ्या भावाप्रमाणे उचलला. मनमिळावूपणा, पडेल ते कष्ट करण्याची तयारी, सुस्वभाव हे वाघ सरांचे गुण त्यांनी आचरणात आणले. आयुष्य नेहमी माणसासाठी ज्ञानदानाचं कार्य करत असतं, माणसानं मात्र विद्यार्थी होऊन ते अवगत केलं पाहिजे.
(प्रा. मायकेल न्युमन स्पॅलर्ट, प्रा. सी. एच. भोसले)
सरांना आता नोकरीची नितांत गरज भासू लागली होती. पण वस्तुस्थितीच अशी होती की नाईलाजास्तव सर्व काही बघत राहावं लागत होतं. पुढे जून १९९६ साली सर डॉ. सी.एच. भोसले सरांच्याकडील डी.एस.टी. संशोधन प्रकल्पामध्ये पुन्हा नव्या जोमाने आणि उमेदीने रुजू झाले. ती होती त्यांची नवीन संशोधन क्षेत्रातील मुळापासून सुरुवात ! संशोधनाचा विषय होता; सेमीकंडक्टर सेप्टम संचय घट वापरुन विद्युत उर्जेचा साठा. संशोधन करत असताना भोसले सरांच्या व्यक्तिमत्वाचा सखोल परिणाम सरांवर झाला. त्यांचे अनेक गुरुमंत्र सरांना शिकायला मिळाले. ज्ञानाबरोबरच तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जीवनात पाहिजे ते ध्येय साकार करू शकता आणि कठीण पेचप्रसंगामध्ये मार्ग काढू शकता अशी शिकवण भोसले सरांकडून मिळाली. एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे धडे सरांकडून मिळाले. भोसले सर स्वतःच एक आदर्श शिक्षक असल्याने त्यांची शिकवण्याची हातोटी आत्मसात करता आली. हे करत असतानाच ज्युनिअर रिसर्च फेलो म्हणून १९५० रुपये शिष्यवृत्तीवर दोन वर्ष आणि सिनियर रिसर्च फेलो म्हणून ३२५० रुपये शिष्यवृत्तीवर एक वर्ष संशोधन कार्य केले आणि त्यानंतर त्यांचा उज्वल भविष्यकाळ त्यांना समोर दिसू लागला. जून १९९९ मध्ये त्यांनी आपला पी.एच.डी.चा शोधप्रबंध विद्यापीठास सदर केला आणि सर्व पराकाष्टांचे फळ मिळाले. प्रचंड कष्ट आणि जीव ओतून केलेल्या संशोधनामुळे जुलै १९९९ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये अधिव्याख्याता पदावर सरांची निवड झाली. त्यांच्यासाठी हि - आपण ज्याठिकाणी शिकलो त्याच मातृसंस्थेची सेवा करण्याची संधी होती. सर या पदावर राहून अध्यापनाचे कार्य अत्यंत तळमळीने आणि मन लावून करत असत. कितीही संकटे आली तरी, त्रास झाला तरीही प्रयत्न न सोडता त्या गोष्टीचा पाठपुरावा केला तरच यशप्राप्ती होते अशी सरांची कार्यशैली होती.
(एम.एस्सी. चा वर्ग, जुलै २००५)
सरांना दर्जेदार आणि ज्ञानात्मक अध्यापन क्षमता प्राप्त झाली आहे. सरांची क्लासिकल मेकॅनिक्स, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स आणि सॉलिड स्टेट फिजिक्स ची लेक्चर्स म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच असते. मुलांच्यात आत्मविश्वास वाढावा, विषयज्ञान वाढावे यासाठी विभागात सेमिनार चे आयोजन होत असते. सरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मुलांची त्रेधातिरपीट उडते. मुलांनी स्वतः नोट्स काढल्या पाहिजेत, त्यासाठी पुस्तके वाचली पाहिजेत, रेडिमेड नोट्स वापरण्याची सवय सरांना अमान्य आहे, सतत सराव केला पाहिजे, अव्वल राहिले पाहिजे, कितीही त्रास झाला तरी विद्यार्थ्यांनी यशाचा शॉर्टकट शोधू नये अशी परखड मते सरांची आहेत. 'कल करे सो आज कर, आज करे सो अब’ या काव्यपंक्तीनुसार विद्यार्थ्यांना काम सांगितल्यानंतर ठराविक वेळेनंतर सर कामाचा पाठपुरावा करतात, ते काम गुणवत्तापूर्वक पद्धतीने करून घेतात. वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थी त्रस्त होतात पण यामुळे विद्यार्थ्यांना त्वरीत अचूकपणे कामे करण्याची सवय लागते. ही पद्धत सरांची कार्यशैली रेखांकित करते. हा गुण म्हणजे सरांसाठी गुरु महानवर सरांचा आजन्म ठेवाच होय.
(वैज्ञानिक मायकेल न्युमन स्पॅलर्ट)
सरांच्या 'सेप्टम विद्युत घट' यावरील शोध प्रबांधासाठी शिवाजी विद्यापीठाने भौतिकशास्त्र विषयातील पी.एच.डी. (विद्यावाचस्पती) ही पदवी मे २००० मध्ये बहाल केली. या संशोधनासाठी सरांना मार्गदर्शक म्हणून डॉ. सी.एच. भोसले सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. डॉक्टरेट संपादन केल्यानंतर अनपटवाडी या छोट्याशा गावाला मोठं करणाऱ्या डॉ. केशव राजपुरे सरांचा गावाने कौतुकरूपी फार मोठा सन्मान केला होता. सप्टेंबर २००० मध्ये ऑस्ट्रियातील मायकल न्यूमन स्पेलार्ट या जागतिक किर्तीच्या शास्त्रज्ञाने सरांना पुढील संशोधनासाठी सीएनआरएस प्रयोगशाळेत फ्रान्सला निमंत्रित केले होते. पण तांत्रिक अडचणीमुळे सरांना या संधीच सोनं करता आल नाही. पुढे महाराष्ट्र राज्य शासन आयोजीत व पुणे विद्यापीठामार्फत फेब्रुवारी २००२ मध्ये घेण्यात आलेल्या भौतिकीय विज्ञान विषयातील अधिव्याख्याता पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता चाचणी (एसइटी) - सेट पात्रता परीक्षा सर उत्तीर्ण झाले. उल्लेखनीय मुद्दा म्हणजे त्यांनी या परीक्षेसाठी कधीही विशेष अभ्यास केला नाही. भौतिकशास्त्रातून सेट पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे हीच मुळी आव्हानात्मक गोष्ट आहे की जीचा निकाल तेव्हा १ टक्क्यांहून कमी लागत असे. हे ते करू शकले ते निव्वळ त्यांच्यातील अनुभवाने आलेल्या प्रतिभेमुळे व त्यांच्यात निर्माण झालेल्या जिद्द, आत्मविश्वास आणि निश्चयी स्वभावामुळे. परिस्थितीला नमवत जिद्दीने अध्यापनात आणि संशोधनात कार्य करणाऱ्या सरांच्या व्यक्तित्वाची छाप पडत होती. त्याचाच परिपाक म्हणजे केवळ गुणवत्तेच्या जोरावर २०११ साली सर भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक झाले. गत दशकापासून अध्यापन आणि संशोधनाचे कार्य अत्यंत तळमळीने केले असल्यामुळे २०१४ साली सरांची सरळसेवा भरतीद्वारे प्राध्यापकपदी नियुक्ती झाली. सध्या सर विद्यापिठातील भौतिकशास्त्र विषयात प्राध्यापक पदावर काम करत आहेत. सरांची शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी ख्याती आहे.
(कुलगुरू डॉ. एम.जी. ताकवले यांच्या हस्ते पीएचडी पदवी)
(पीएचडी मिळाल्याबद्दल गावाकडून सत्कार)
आत्तापर्यंत सरांचे एकूण २०० शोधनिबंध वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये दोन समीक्षा शोध निबंधांचा देखील समावेश आहे. त्यांच्या 'पाणी शुद्धीकरणा' संबंधित वैशिष्ठ्यपूर्ण संशोधनावरील त्यांनी दोन पेटंटस नोंदवली आहेत. सोलर सेल्स, थिन फिल्म्स, फोटोकॅटॅलेसीस ऑफ वॉटर हे सरांच्या संशोधनाचे विषय आहेत. आत्तापर्यंत त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. पदवी संपादन केलेली आहे आणि सध्या सहा विद्यार्थी त्यांच्याकडून पी.एच.डी. साठी मार्गदर्शन घेत आहेत. सदरील विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी पुढे परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. तसेच इतर विद्यापीठे आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापकपदी काम करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे सरांना त्यांच्या शिक्षकांनाही (डॉ. सर्जेराव यादव, डॉ. जयवंतराव थोरात) संशोधनादरम्यान मार्गदर्शन करण्याचे भाग्य लाभले आहे. म्हणजे त्यांनी गुरुंचेही गुरु होण्याचा मान मिळवला आहे.
(पीएचडी विद्यार्थी)
सरांनी केंद्र सरकारच्या जवळजवळ ८५ लाख रुपयांच्या निधीतील पाच संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानाचा योग्य विनियोग करून त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत अद्ययावत संशोधन सुविधांची निर्मिती करून विभागाच्या पायाभूत संशोधन सुविधेमध्ये भर घालून सुसूत्रता आणली आहे. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स ने ३० ऑक्टोबर २०१५ रोजी सरांना कायमचे सदस्यत्व बहाल करून त्यांच्या महान कार्याचा यथोचित सन्मान केला आहे. स्वतः बरोबरच इतरांचा सुध्दा विकास करण्यात असलेली सरांची आवड त्यांच्या अविरत कार्यातून प्रतीत होते. अनपटवाडी गावाला सरांच्या शिक्षणक्षेत्रातील उत्कृष्टतेचा सार्थ अभिमान आहे. यशाच्या अनेक पायऱ्या पादाक्रांत करत असताना वेळोवेळी गावाने सरांचा सन्मान केला आहे.
(महाराष्ट्र विज्ञान अकादमीच्या मान्यतेमुळे गावातून सत्कार)
विद्यापीठाचे 'गोल्ड मेडलिस्ट' राहिलेले सर आपल्या संशोधनातून विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात प्रयत्नशील आहेत. सरांचा संशोधनातील एच-इंडेक्स ५२ आहे. वैज्ञानिक प्रकाशनांची क्षमता आणि परिणाम मोजण्याचे एच-इंडेक्स हे मापक आहे. तर सरांच्या संशोधनास ७३७२ (१९ जून २०२० अखेर) सायटेशन्स अर्थात उद्धरणे मिळाली आहेत. यावरून सरांच्या संशोधन कार्याची गुणवत्ता जाणकारांच्या सहज लक्षात येईल. त्यांचे कर्तृत्व, क्षमता आणि शैक्षणिक यश या सर्वांचा विचार करून शिवाजी विद्यापीठाने जून २०१६ पासून त्यांच्यावर यूसिक, सीएफसी आणि डीएसटी-सैफ या विद्यापीठाच्या सुविधा केंद्रांच्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. अलीकडेच त्यांची विभागप्रमुख म्हणून चार वर्षांची मातृसंस्थेची सेवा पूर्ण झाली. सर बऱ्याच संशोधन मासिकांचे तसेच विद्यापीठांतील पी.एच.डी. साठी चे परिक्षक आहेत. प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षक यांच्या नेमणूका करण्यासाठी कुलगुरू नियुक्त प्रतिनिधी म्हणून ते काम पाहतात. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर सर प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. ते विविध महाविद्यालयांच्याही अभ्यासमंडळांचे सदस्य आहेत. विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समिती, तांत्रिक समिती आणि निर्लेखन समिती अश्या विविध समित्यांवर सरांच्या कार्याची छाप आहे. एवढा प्रचंड कामाचा पसारा सांभाळत असताना सरांना याचे गमक विचारले असता सर सांगतात की, ‘तुमच्याकडे प्रचंड आत्मविश्वास, शिस्तबद्धपणा आणि प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही सुद्धा मोठमोठी कामे करू शकता. कोणत्याही कामात उत्कृष्ठपणा आणता आला पाहिजे. तुम्ही केलेल्या कामाचे समाधान तुम्हाला मिळाले पाहिजे’.
(शाहू कॉलेज, कोल्हापूर येथे व्याख्यान)
(एनएसएएम -२०१० परिषद चे संयोजक)
(सर्वोत्कृष्ट विभाग बक्षीस)
अध्यापन आणि संशोधन याबरोबरच सरांनी सामाजिक कार्याचीदेखील आवड जोपासली आहे. मुंबईस्थित श्री. ग्राम विकास मंडळ, अनपटवाडी या सेवाभावी संस्थेचे ते सभासद आहेत. हि संस्था आवश्यक कौशल्य आणि आर्थिक मदत देऊन गावाच्या विकासाप्रती समर्पित आहे. शहीद परिवारासाठी कार्य करणाऱ्या 'जयहिंद फाऊंडेशन' या सामाजिक संस्थेचे ते संचालक आहेत. समाजात सैनिक आणि सैनिक परिवार यांना मान सन्मान मिळवून देण्याचं, नवीन पिढीत देशप्रेम, देशाभिमान जागृत करण्याचं काम जयहिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून केलं जात. कित्येक गरजू गरीब आणि होतकरू विदयार्थ्यांना सरांनी आर्थिक मदत केली आहे.
(जयहिंद फाउंडेशनच्या सहकार्यांसह)
(जयहिंद फाउंडेशनचा ३० एप्रिल २०१८ चा सातारा येथील कार्यक्रम)
(आय फाउंडेशन बावधन यांच्या हस्ते सत्कार)
सर पहिल्यापासूनच 'डिटरमिनिस्टिक' म्हणजे निश्चयी स्वभावाचे असून ते हाती घेतलेले काम गुणवत्तापूर्वक रितीने पूर्ण झाल्याशिवाय हातावेगळे करत नाहीत. त्यांच्या राहण्यात साधेपणा असून त्यांनी 'हाय प्रोफाईल स्कॉलर लाईफ' जगली आहे. एकवीस वर्षांच्या अध्यापनात सरांनी अनेक यशस्वी आणि परिपूर्ण विद्यार्थी घडवले. विद्यार्थ्याकडे पाहून त्याचे आर्थिक, मानसिक, भावनिक आणि शैक्षणिक विश्लेषण आणि योग्य पारख करण्याची दुर्लभ क्षमता सरांना लाभली आहे. नियमित व्यायाम आणि खेळ यामुळे सर नेहमी निरोगी असतात. एक चैतन्यदायी, उर्जादायी आणि प्रफुल्ल अध्यापक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजपुरे सर. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विद्यापीठास लाभले याबाबत विद्यार्थ्यांमधून नेहमीच प्रतिक्रिया येत असतात.
(सातारा येथील व्याख्यान)
सरांना मित्र जोडायचा छंद आहे. लहानपणी पासून ते आजतागायत सरांनी खूप मित्र मिळवले आहेत. सर मित्रांवर तेवढीच माया आणि प्रेम करतात जेव्हढे आपल्या विद्यार्थ्यांवर करतात. एस.एस.सी., एच.एस.सी., बी.एस.सी., आणि एम.एस.सी. चे सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणी आजही सरांच्या संपर्कात आहेत तसेच त्यांचे स्नेहमेळावे घेऊन हितगुजाच्या गोष्टी, सुख-दुःख यांची देवाणघेवाण केली जाते. यातही सरांचा पुढाकार असतो. हे काम तोच व्यक्ती करू शकतो ज्याची नाळ गावाशी आणि माणसांशी जोडलेली आहे. या कृतीतून सरांचे मित्रप्रेम किती अफाट आहे याची अनुभूती येते. आपले आयुष्य आपल्या तत्वांनी जगत असताना ते आनंदी होऊन सरांना जगायला आवडते.
कॉलेजमध्ये खो-खोची लोकप्रियता कमी होती. मग त्यांनी आपले लक्ष क्रिकेटकडे वळवले. सर क्रिकेटसुद्धा उत्कृष्ट खेळतात. ते खंडाळ्यातील एकता क्रिकेट क्लबचे सदस्य होते. तिथे ते कॉर्क बॉलवर क्रिकेट खेळत असत. ते सलामीला फलंदाजी करत. सातारा विभागीय स्तरावरील स्पर्धेत त्यांनी लोणंद महाविद्यालयीन क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कॉलेजमध्ये असताना त्यांनी लोणंद क्रिकेट संघामार्फत अनेक स्पर्धा खेळल्या आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त खेळात रमून विद्यार्थ्यांत खिलाडूवृत्ती वाढावी यासाठी सर विद्यापीठाच्या मैदानावर दरवर्षी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करतात. स्वतः सराव करतात आणि खेळतात. आयुष्यातील कठीण प्रसंगातही त्यांनी दाखवलेली खिलाडूवृत्तीचे हेच कारण असावे.सरांनी बऱ्याच क्रिकेट स्पर्धा खेळल्या परंतु त्यांच्या कायम स्मरणात राहिलेली स्पर्धा म्हणजे १९९७ साली विद्यापीठाच्या मैदानावर त्यांनी जिंकलेली स्पर्धा. ते फिजिक्स संघात खेळले होते आणि त्यांनी संपूर्ण लीगमध्ये सुपर बॉलिंग स्पेल टाकले होते. अंतिम मॅचमध्ये सरांनी फलंदाजीतही चमक दाखवत, ५५ आव्हान असलेल्या धावसंख्येत ५ बाद २ धावसंख्येवरुन ५ बाद ४५ पर्यंत धावफलक नेला होता व रोमहर्षक विजयला गवसणी घातली होती. त्यावेळी त्यांनी दाखवलं धैर्य आणि संयम त्यांनी स्वतःच्या आयुष्यातही कायम राखलेला आहे, हे विशेष...
आज सरांनी जी उंची गाठली आहे, तिथे पोहोचण्यात सरांची स्वतःची अखंड मेहनत तर होतीच, पण या संघर्षमय प्रवासात ज्यांनी ज्यांनी सरांना वेळोवेळी यथाशक्ती सहकार्य केले आहे त्या सर्वांना सर कधीच विसरणार नाहीत. त्यांचे वर्गमित्र हनुमंत मांढरे सर त्यांना शक्य असलेली सर्वतोपरी मदत करत. अकरावी बारावी दरम्यान सरांचा इलेक्ट्रोनिक्स हा विषय होता. मुंबईतील मांढरे सरांच्या एका मित्राने बोर्डाचे अपेक्षित प्रश्नसंच मिळावेत म्हणून एक मासिक लावले होते. त्या मित्राचा इलेक्ट्रोनिक्स विषय नव्हता म्हणजे ते इलेक्ट्रोनिक्सचे पेपर त्याला उपयोगी नसायचे. मांढरे सर हे पेपर त्या मासिकातून कापून सरांना पाठवत. 'माझा मित्र करतोय ना अभ्यास, त्याचा होतोय ना फायदा' - ही कल्पनाच मुळी मांढरे सरांची केशव सरांना मदत करायची धडपड सांगून जाते.
एम.एस्सी नंतर कुठल्यातरी स्पर्धा परीक्षेनिमित्त ते सातारला गेले होते. तेथे त्यांना त्यांचे मित्र रवींद्र अनपट भेटले. तेव्हा तेही स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होते. केशवकडे या परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक अलीकडील पुस्तक नसेल - हे वास्तव रवी सरांनी जाणले. तात्काळ रोख मदतीसह त्यांनी सरांना त्यांच्याकडील पुस्तक दिले. मित्रांच्या अशा मदतगार वृत्तीने त्यांना अधिक परिश्रम करण्यास प्रवृत्त केले होते. गरीब परिस्थिती असूनही हनुमंत मांढरे तसेच रवींद्र अनपट सरांसारखे मित्र पाठीशी उभे होते म्हणून यशाची इमारत उभी राहू शकली असे सर मानतात.
(अनिल अनपट, हनुमंत मांढरे, संदिप माने, मनीषा धेडे, प्रशांत गुजर, महेश जाधव)
आपल्या यशात बऱ्याच व्यक्तींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहे असे ते मानतात. त्यांचा मेहनती स्वभाव, प्रामाणिकता आणि नम्रता ही त्याच्या वडिलांची भेट आहे. त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या मातोश्रींच्या संस्कारांचे आणि कष्टमय आशीर्वादांचे मोठे योगदान आहे. कोणतीही गोष्ट करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास, हिय्या दाखविण्याची कला आणि हिंमत न हारण्याचा गुण सरांना आईकडूनच मिळाला. सरांना बी.एस्सी. दरम्यान आणि त्यांनतर आपल्या मुलापलीकडे माया लावणारी आणि संगोपण करणारी त्यांची बहीण फुलावती (आक्का) म्हणजे त्यांची दुसरी आईच. त्यांचे वडीलबंधू श्री. बाळासाहेब राजपुरे (दादा) हे उच्च विद्याविभूषित असूनही सुरुवातीपासूनच गावाकडील कुटुंबाची तसेच शेतीची सर्व जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत त्यामुळे सरांना हे सर्व शक्य झाले. आपल्या यशात मोठ्या बंधूंचा मोठा वाटा आहे याची त्यांना जाणीव आहे. त्यांचे भाचे राजू शिर्के यांचे त्यांच्याविषयीचे बंधुतुल्य स्नेह आणि सर्व गोष्टींत सहकार्य, पाठिंबा आणि आधार हे ते विसरत नाहीत. त्यांच्या दिवंगत पत्नी सुजाता यांचे सरांच्या सुरुवातीच्या शिक्षकी कारकीर्दीत कुटुंबासाठीचे समर्पण आणि हंगामी सेवेदरम्यानच्या पाठिंब्याचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. प्रिती यांनी यानंतर त्यांच्या कुटुंबाची भरकटलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या स्नेहा व सानवी या दोन्ही मुलींनी आईच्या मदतीने कठीण प्रसंगांत सावरून स्वत:ला पूर्वपदावर आणले आहे म्हणून त्यांचेही योगदान महत्वाचे आहे. सरांना त्यांचे मित्र हनुमंत मांढरे, अनिल अनपट, दिलीप अनपट, रवींद्र अनपट, अजित पिसाळ, शिवाजी खंडागळे, डॉ. विवेकानंद रणखांबे, अरविंद तावरे, डॉ. प्रताप वाघ या सर्वांचे अनमोल सहकार्य आणि प्रोत्साहन शिक्षणादरम्यान मिळाले. त्यांचे ते शतशः ऋणी आहेत. यशाच्या शिखरावर असताना हुरळून न जाता आपल्या मातीत पाय रोवून नाती जपण्याची कला सरांकडून शिकावी.
(आनंदी कुटुंब)
खिडकीतला बोन्साय बनून रहाणं त्यांना कधी जमलेचं नाही. उन्हातान्हात तावून सुलाखून ज्याप्रमाणे गुलमोहर बहरतो तसेच जीवनात तावून सुलाखून गुलमोहराप्रमाणे त्यांना बहरायला आवडले आणि ते सत्यात ही उतरवले. ज्याप्रमाणे- धावणाऱ्यांसाठी वाटा नसून वाटांसाठी धावणे असते, गरुडझेप घेणारांसाठी आभाळाचे ओझे नसते, तसे सरांनी ज्या वाटेवर पाऊल ठेवले ती पायवाट न रहाता तिचे हमरस्त्यामध्येच रूपांतर केले. त्यांना कधीही कोणत्याही आव्हानांचे ओझे वाटलेचं नाही आणि त्यासाठी असणारा आत्मविश्वास त्यांच्याकडे ओतप्रोत होता. जिद्द पेरली की यश उगवते तसा त्यांचा एका छोट्याशा वाडीतून केसू येसू पासून सुरु झालेला जीवनप्रवास शिवाजी विद्यापीठातील विभागप्रमुख या उच्च स्थानावर पोहोचून यशवंत डॉ. केशव पर्यंत येऊन ठेपलेला आपल्याला पहायला मिळतो.
सर आपल्या संशोधनाचा आलेख उंचावत राहो. जे जे तुम्हास हवं ते ते तुम्हास मिळो, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुम्हाकडे पाहून सर्वाना कळो. आपणास निरोगी, आनंदी, चैतन्यदायी आणि सुखकारक आयुष्य लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.