Sunday, October 16, 2022
शिवाजी विद्यापीठाचे दहा प्राध्यापक जागतिक दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत
Tuesday, July 26, 2022
सामाजिक परिवर्तनात ज्ञानी प्रतिभेचे योगदान
शून्य सावली दिवस विषयावर दोन दिवसांची कार्यशाळा (२१, २२ जुलै २०२२)
___________________________________
सर्वांना सुप्रभात ! सर्वप्रथम, मी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ उमादेवी नेर्ले मॅडम आणि आयोजन समितीचे आभार मानतो की त्यांनी मला येथे निमंत्रित केले आणि शून्य सावली दिनानिमित्त या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित केले. विज्ञान बंधुत्वासाठीच्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमादरम्यान तुम्हां सर्वांमध्ये असल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे.
या कार्यशाळेत तुम्ही शून्य सावली दिवस या विषयावर ऐकणार आहातच तसेच तज्ञांची तांत्रिक सत्रे असतील. तरी मी या दिवसाचे महत्त्व सांगू इच्छितो. 'शून्य सावली दिवस' ही एक खगोलशास्त्रीय घटनांपैकी एक आहे. पृथ्वीच्या अक्षीय झुकावामुळे, सूर्य वर्षभर वेगवेगळ्या अक्षांशावर वेगवेगळ्या कोनातून चमकतो. यामुळे ऋतू येतात. जेव्हा सूर्य डोक्यावर (झेनिथवर) असतो तेव्हा शून्य सावली दिवस कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यान दिसून येतो. ही द्विवार्षिक घटना अनुक्रमे दक्षिणायन आणि उत्तरायण दरम्यान जेव्हा सूर्य खर्या पूर्वेकडे उगवतो आणि खर्या पश्चिमेला मावळतो तेव्हा दिसून येते. आपल्या देशात ही घटना उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या मध्यात दिसते. हुब्बालीमध्ये, दरवर्षी १ मे आणि ११ ऑगस्टच्या आसपास दिसून येतो. या दिवसाचे महत्त्व लगेच तपासता येईल. या निरीक्षणांच्या सहाय्याने पृथ्वीच्या परिभ्रमणाचा परिघ आणि वेग मोजता येतो. ही निरीक्षणे २००० वर्षांपूर्वी आपल्या भारतीय शास्त्रज्ञानी केली होती. या खगोलीय घटनांवरील परिसंवाद आणि कार्यशाळा तरुण प्रतिभा जागृत ठेवण्यास उपयुक्त आहेत.
तरुणांमध्ये वैज्ञानिक वृत्ती बळकट करून त्यांना ज्ञाननिर्मिती प्रक्रियेचा भाग होण्यासाठी प्रेरित करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे, जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अशा महत्त्वाच्या विषयावर शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मी महाविद्यालयाचे अभिनंदन करतो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती वृद्धीस आवश्यक शिक्षकांची मने नक्की प्रज्वलित होतील. आपल्या देशातील संशोधन प्रतिभांना सक्षम करण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वाच्या आहेत. विज्ञान हे पुस्तकात न ठेवता आपल्या जगण्याचा भाग बनवण्यात अशा कार्यशाळा महत्त्वाची भूमिका बजावतील.
मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी तत्वज्ञानी नाही किंवा मी महान वैज्ञानिकही नाही, पण प्रामाणिकपणे सांगायचे तर मी एक प्रामाणिक शिक्षक आहे. सामाजिक सुधारणांमध्ये शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. राष्ट्र किंवा समाज घडवणारा तो कलाकार आहे असे कोणी म्हणू शकतो. मला पहिल्यापासूनच शिक्षक व्हायचे होते. त्यामुळे कदाचित मी इंजिनीअरिंगला घेतलेला प्रवेश रद्द केला असेल. मला वाटत असे की शिक्षक हा असा एक घटक आहे जो आपल्याला अशक्य गोष्टी करण्यास मदत करतो. उत्कृष्ट शिक्षक हे एक रत्न असते. आणि ती काळाची गरज आहे. एक चांगला शिक्षक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती आणि ज्ञानाची मशाल घेऊन जातो. मी गेल्या ३० वर्षांपासून या प्रणालीस जवळून अनुभवले आहे म्हणून याप्रसंगी माझे अनुभव आणि समज तुमच्याशी मुक्तपणे शेअर करण्याचा माझा मानस आहे.
मला वाटते कोणत्याही शिक्षण प्रणालीचा उद्देशच मुळी ज्ञाननिर्मिती करणे असावा. पण ज्ञान निर्मती तेव्हाच होईल जेव्हा अस्तित्वात असणारे ज्ञान आपणास माहिती असेल. तसेच आपल्या विचारांना चालना देत तार्किक आणि विश्लेषणात्मक पद्धतीने अस्तित्वातील माहितीवर मत मांडून नाविन्यपूर्ण विचार करणे म्हणजेच ज्ञाननिर्मिती होय. माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. गुगल किंवा पुस्तकात मिळते ती माहिती. माहितीच्या आधारे जर एखाद्याने भौतिक घटना समजून घेण्यासाठी स्वतः नाविन्यपूर्णपणे कृती केली तर त्याला ज्ञान म्हणता येईल. म्हणजेच कृतीतील माहिती म्हणजे ज्ञान. उदाहरणार्थ कदाचित आपण गुगलवर पोहण्याचा व्हिडिओ बघू शकतो, पण प्रत्यक्षात पोहण्याचा सराव करण्यासाठी आपणास पाण्यात उडी मारावी लागते. तसं बघितलं तर प्रत्यकजण नाविन्यपूर्ण विचार सक्षम असतो. पण हे करण्यासाठी आपण त्यांच्या मनाला प्रशिक्षित केले पाहिजे.
जर त्यांना मनातील प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर त्यांनी घाबरून न जाता ते सर्व प्रश्न गोळा करावेत. प्रश्नांचा ढीग हा एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखा असतो. त्या बंगल्याचे एक पान जरी आपण काढले तरी संपूर्ण इमारत आपोआप कोसळते. त्याचप्रकारे, जर ढिगाऱ्यातील एका प्रश्नाचे उत्तर मिळू शकले तर उर्वरित सर्व उत्तरे आपोआप मिळतील. आठवा, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवून आपण कसे शिकत होतो. त्यामुळे ज्ञान निर्माण करण्यासाठी आपली प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती सोडू नये.
असं झालं तर नाविन्यपूर्णता सापडणे दूर नाही आणि ज्ञानी पिढी घडवण्यास आपोआप मदत होईल. निसर्ग आणि भौतिक घटनांबद्दल अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. हि गोष्ट मानवजातीच्या पुढील विकासास नक्कीच उपयुक्त ठरेल. विद्यमान व्यवस्थेतील दोष दाखवून त्यावर दोषारोप करण्याऐवजी, सतत सकारात्मकतेने शहाणे कसे व्हायचे हे आपण नवीन पिढीला शिकवले पाहिजे. मला व्यक्तिशः असे वाटते की विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवण्याऐवजी आपण त्यांना शिकायचं कसं हे शिकवलं पाहिजे. ज्ञानास मूर्त स्वरूप देण्याचे शिकवले पाहिजे. युवकांमध्ये अफाट ताकद असते. या ताकदीचा त्यांच्यातील कौशल्य आणि सामर्थ्य हेरून योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे.
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी पदवी शिक्षणामध्ये संशोधनाचा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच, या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थी बहुकुशल, स्वयंपूर्ण असावा, अशी अपेक्षा आहे. आपण आपल्या युवकांना संशोधनासाठी प्रवृत्त केले पाहिजे. संशोधन करून स्वतःचे तार्किक आणि विश्लेषणात्मक मन विकसित होते. आपली वैज्ञानिक वृत्ती आणि समज सुधारते. संशोधनाचे मूलभूत आणि उपयोजित असे दोन प्रकार आहेत. विद्यापीठांमध्ये साधारणपणे मूलभूत संशोधन केले जाते. आयआयटी आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये मूलभूत तसेच उपयोजित असे दोन्ही प्रकारचे संशोधन चालते. पण सामान्यपणे मूलभूत संशोधनामुळे ज्ञान निर्मिती होते हे मात्र नक्की.
संशोधनासाठी कोणता विषय निवडायचा हेही महत्त्वाचे आहे. स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी केलेले संशोधन देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त असते. संशोधनाची अनेक क्षेत्रे आहेत ज्यात युवक सहभागी होऊ शकतात आणि ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी योगदान देऊ शकतात. पर्सनल कॉम्प्युटर प्रोसेसरचा वेग वाढवण्यावर संशोधन करता येईल. मेमरी डिव्हाईसच्या सूक्ष्मीकरणाची समस्या खूप महत्त्वाची आहे. एखादी व्यक्ती ऑटोमोबाईल्सची इंधन कार्यक्षमता वाढविण्यावर काम करू शकते. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा इंधनाचा पर्याय म्हणून वापर करण्याचा विचार करणे काळाची गरज होऊन बसली आहे. कारखान्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन हे संशोधनाचे ज्वलंत विषय आहेत. मेंदूच्या न्यूरॉन्ससाठी अल्गोरिदम लिहिणे खूप कठीण आहे. मानवी मेंदूसाठी अल्गोरिदम लिहिणे आणि मानवी चेतनेचे कारण शोधणे हे मूलभूत संशोधनात मोठे योगदान असेल. हरित तंत्रज्ञानाचा वापर यास आता पर्याय नाही. प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या मोठ्या आव्हानातून जगाला घेऊन जाण्याबाबतचा अभ्यास जगभरातील समस्या बनला आहे.
सरतेशेवटी, मी असा प्रस्ताव मांडतो की, मुलांना नैतिकता शिकवली पाहिजे आणि स्वत: आचरण करून त्यांना आचरण करण्यास भाग पाडले पाहिजे. माणसाला आनंदाने जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा याबरोबरच समाधानाची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानवजातीच्या कल्याणासाठी संतुलित आयुष्य जगण्यास प्रवृत्त केले पाहिजे.
पुन्हा एकदा, मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
Monday, May 30, 2022
सप्तरंगी योग
सप्तरंगी योग (२९ मे २०२२)
कालच १९९३ च्या सीनियर मित्रांचा 'स्नेह मेळावा' कोल्हापूर परिसरात साजरा झाला. ते सर्वजण विभागाला भेट देऊन गेले होते. आमचे वर्गमित्र बाजीराव कुंभार यांनी गेल्या आठवड्यात या रविवारी म्हणजे २९ मे रोजी आमच्याही बॅचचा स्नेहमेळावा कोल्हापुरात आयोजित करण्यासंदर्भात आणि सामील होण्यासंदर्भात ग्रुपवर आवाहन केले होते. इथे वास्तव्यास असलेल्या सर्व मित्रांनी याअगोदर वेळोवेळी कोल्हापूरात स्नेहमेळावा आयोजित करण्याविषयी ग्रुप वर चर्चा तसेच आवाहन केले होते. पण कुणीही याबाबत उचल खाल्ली नव्हती त्यामुळे पहिला गेट-टुगेदर पाच वर्षापूर्वी होऊन देखील आमच्या वर्गाचा गेट-टुगेदर आज होईल का नाही याबाबत शंकाच होती. त्यामुळे कुणालाच रविवारी गेट-टुगेदर होईल याची खात्री नव्हती. तरीही काल संध्याकाळी मी बाजीराव कुंभार यांना फोन केला आणि उद्या डॉक्टर आण्णासाहेब मोहोळकर यांना घेऊन टाकळा परिसरात पांडुरंग (पीजे) गोरे यांचे ऑफिसवर येणार आहे असा निरोप दिला होता.
गेट टुगेदर ठरलाच तर जावे लागेल म्हणून आज काही कामानिमित्त मी लवकरच विद्यापीठात गेलो. ठरल्याप्रमाणे आण्णासाहेब दहा वाजता विद्यापीठात आले. मग आम्ही दोघं टाकाळा येथे पीजे गोरे यांच्या ऑफिस मध्ये पोहोचलो. तिथे एव्हाना झाडलोट सुरू होती. गेट-टुगेदर होणार का ? किती मुले येणार याबाबत तोपर्यंत आम्हाला तिघांना देखील अजिबात माहिती नव्हती. दरम्यान आमचा बाजीरावशी संपर्क झाला आणि आम्ही पोहोचलो असल्याचा मी ग्रुप वर देखील मेसेज टाकला. तेव्हा समजले की बाजीराव शुभदा आणि सुनीता यांना घेऊन तिथे येणार आहे. त्यांना यायला अजून वेळ होता. दरम्यान भुक लागल्यामुळे आम्ही काहीतरी खाण्याच्या दृष्टीने बस स्थानकाच्या दिशेने गेलो. तिथं सुनिता भेटली. मग आम्ही पुन्हा गोरे यांच्या ऑफीसमध्ये आलो. काही वेळानंतर बाजीराव आणि शुभदा देखील दाखल झाले. नीलम देखील प्रवासात असल्याने दुपारी वेळाने येणार होती. एव्हाना मला अंदाज आला होता की आज गेट टुगेदर नक्की होणार. वर्गातील ५० पैकी ३४ मित्र व्हाट्सअँप ग्रुपवर आहेत त्यातील केवळ ६ जणच एकत्र जमणार होतो.
याप्रसंगी शुभदा ने मिठाई आणि पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले. शुभदा पहिल्यांदाच आल्यामुळे तिच्यासाठी बऱ्याच गोष्टींचे कुतूहल होते. सुरुवातीला एकमेकांची विचारपूस तसेच चौकशी झाल्यानंतर इतर चर्चांस सुरुवात झाली. पुढे प्रश्न होता गेट-टुगेदरचं ठिकाण कुठचं ? गगनबावडा की पन्हाळ्यावर की एखाद्या हॉटेलमध्ये यावर चर्चा झाली. नीलम एक तासाभराने येणार असल्यामुळे गोरे सरांच्या ऑफिस मध्येच गप्पा मारून साजरा करण्याचे ठरले. बाजीरावचा न्याहारीस मांसाहारीचा बेत करण्यावर भर होता. इतरांना मात्र वाटले सर्वांसाठी एकच मेनू असावा. थोड्या वेळासाठी हा मुद्दा बाजूला पडला आणि सर्वजण सुसंवादात मढगूळ झाले. यावेळी आपले मित्र कोण कुठे याबाबत चौकशी झाली.
सुरुवातीला तणावात असूनही वर्तमान स्वीकारत आनंदी राहण्याबद्दल चर्चा झाली. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या आयुष्यात आपापल्या परीने कठोर परिश्रम केले होते. काही वर्गमित्र अजूनही त्यांच्या आयुष्यात स्थिरावले नाहीत तर काहींनी अनपेक्षित उंची गाठली होती. म्हणून मित्रांच्या सद्यस्थितीची तुलना न करता विद्यार्थीदशेत जगलेल्या आठवणी जातं करत सर्वाना संतुलित राहण्याविषयी समर्थन आणि प्रेरित करण्याचे ठरले. आम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये संतुलित कसे राहायचे याबद्दल बोललो. जर आपण सुशिक्षित असलो तर आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास आणि आपल्या जीवनातील कोणत्याही समस्येला तोंड देण्यास सक्षम आहोत, असे सांगण्यात आले.
आम्हांस तीस वर्षांपूर्वी विद्यापीठात घालवलेले दिवस आठवू लागले. एमएससी दरम्यानची त्यांची वैशिष्ट्ये सांगण्यात आली. तेव्हा कोण कुणाचे जवळचे मित्र-मैत्रिणी यावरही टोमणे मारून झाले. गमतीदार किस्से, प्रसंग, घटना, आठवून सर्वच भूतकाळात रममान झाले. दरम्यान पीजेच्या ऑफिसमध्ये छान चहा घेतला. ऑफिसमधील चर्चेचे छायाचित्र मी व्हाट्सअँप ग्रुपवर टाकताच खटावकर, शिनगारे, सूर्यवंशी तसेच जमादार यांसारख्या मोजक्या मित्रांनी फोन करून कार्यक्रमाचा आढावा घेतला. मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपकॉलवर संपर्क साधला आणि त्यांना आमच्या उल्हासात आभासीपणे सहभागी करून घेतले. त्यापैकी पांडुरंग जाधव, माधुरी पाटील व माधुरी पावले यांचेशी संपर्क होऊ शकला. एवढ्यात नीलम पुणे ते कोल्हापूर हा सहा तासाचा प्रवास करूनही अगदी लगबीगीने आमच्यात सामील झाली. त्यामुळे उत्साहात मोठी भर पडली.
आजच्या भेटीची एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे आमच्या एमएससी फिजिक्स कोर्सच्या प्रत्येक स्पेशलायझेशनमधून किमान एक प्रतिनिधी उपस्थित होता: 'मटेरिअल्स सायन्स'- सुनीता, 'स्पेस सायन्स'- बाजीराव, 'सॉलिड स्टेट फिजिक्स'- केशव, शुभदा, 'थीरीटिकल फिजिक्स'- अण्णासाहेब, 'स्पेक्ट्रोस्कोपी'- पांडुरंग, 'एनर्जी स्टडीज'- नीलम. आम्ही सात मित्रांनी स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून रंगंत आणली म्हणून या लेखास 'सप्तरंगी योग' हे शीर्षक समर्पक वाटते.
व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बरेच मित्र असूनही दुर्दैवाने फक्त सात जणांना सेलिब्रेशनचा भाग व्हावेसे वाटणे इतके उत्साहवर्धक नव्हते. सर्व मित्रांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांना आमंत्रित केले असते तर बरे झाले असते असे देखील वाटले. पण शेवटी व्हॉट्सअप ग्रुपवर तारीख, ठिकाण आणि वेळ जाहीर करणे पुरेसे होते असे आम्हाला वाटले. हेही आमच्या लक्षात आले की बहुतेक मित्र कोल्हापुरपासून दूर राहतात त्यामुळे सुमारे २०० किमी पर्यंतचा प्रवास करणे कंटाळवाणे असेलही पण मित्रांना भेटण्याची इच्छा उत्कट असेल तर कोणतेही अंतर हे कमीच असते हेही तितकेच खरे आहे.
या वेगवान युगात, संपर्कात राहणे आणि भेटण्याची अनुभूती ही एक महत्त्वाची भावना आहे. आजकाल हे फार दुर्मिळ झाले आहे. या भेटींमध्ये कोणताही निहित स्वार्थ नसतो. निखळ आनंद मिळवणे आणि आनंद वाटणे हेच काय ते स्वारस्य. पण या स्मार्टफोनवरील व्हॉट्सअपच्या जगात मी जे पाहिलं आहे ते असे: सुरुवातीस व्हॉट्सअप ग्रुप तयार झाल्यावर लोक आपल्या मित्रांना भेटण्यास तसेच त्यांच्याविषयी जाणून घेण्यास खूप उत्सुक असतात. पहिल्या गेट टुगेदरनंतर मित्रांना भेटण्याची उत्सुकता आणि आपुलकी हळू हळू कमी होऊ लागते जणू ! नाती कृत्रिमरित्या जपली जातात कि काय अशी परिस्थिती ! ही वस्तुस्थितीची अत्यंत दुःखद बाजू आहे. वास्तविकपणे व्हॉट्सअप ग्रुप्स आणि स्नेह मेळावे हे समकालीन लोकांशी जोडून राहण्यासाठी आणि आपल्या तणावपूर्ण जबाबदाऱ्यांपासून मुक्त होण्यासाठी उत्तम औषध असतात असे माझे मत आहे. पण कुठे माशी शिंकते कोणास ठाऊक आणि माणूस पुन्हा आपल्या अलिप्त जगात वावरू लागतो. मी अशा मित्रांची अनेक उदाहरणे अनुभवली आणि ऐकली आहेत की जे जाणूनबुजून घराजवळ आलेल्या मित्रांना भेटणे जाणीवपूर्वक टाळतात. तसं बघितलं तर याचं कारण काहीच नसते. इतक्या दिवसांच्या दुराव्यानंतर परत एकत्र राहताना या नात्याविषयी विचित्र धारणेसह ते जरुरीपेक्षा अधिक विचार करतात. मित्र भेट त्यांच्या मनाला बोजा वाटू लागते. मित्राच्या वागणुकीविषयीच्या स्वतःच्या मनातील प्रश्नांची ते स्वतः:च पूर्वग्रहदूषित उत्तरे शोधतात. अपुऱ्या स्नेहापायी नाती अपयशी ठरतात. पण एक जवळचा मित्र आपल्या तीक्ष्ण निरीक्षणातून अशा मित्राचा मनसुबा हेरल्याखेरीज राहत नाही.
पुरेशी चर्चा झाल्यानंतर टाकाळा परिसरातील एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करण्याची इच्छा झाली. पण बाजीरावच्या हट्टापाई आमच्यात शाकाहारी की मांसाहारी जेवण घेण्याच्या बाबतीत एकमत मात्र होत नव्हते. घराबाहेर पडल्यावर मांसाहारच करावा असा बाजीरावचा आग्रह होता. आम्ही जिथे दोन्ही प्रकारचे जेवण उपलब्ध होते अशा देहाती हॉटेलमध्ये गेलो पण दुर्दैवाने ते हॉटेल हाऊसफुल्ल .. मग आम्हाला फक्त शाकाहारी असलेल्या दुसऱ्या हॉटेलमध्ये जावे लागले. आम्ही गोरे यांच्या ऑफिसच्या अगदी जवळच असलेल्या रामकृष्ण या उत्तम शाकाहारी हॉटेलमध्ये गेलो. एकत्रितपणे गप्पा ठोकत, हसत, खिदळत जेवणाचा आस्वाद घेतला. सर्वांसाठी एकत्र जेवण करण्याचा हा खूप छान अनुभव होता.
जेवणानंतर पीजे च्या इनोव्हा गाडीतून कोल्हापूरच्या आजूबाजूच्या पन्हाळा किंवा जोतिबासारख्या ठिकाणी जाण्याचा विचार केला. पण शेवटी जिथे आपण शिक्षण घेतले आणि ३० वर्षांपूर्वी दोन मौल्यवान वर्षे घालवली अशा शिवाजी विद्यापीठाला भेट द्यायचे ठरले. इतक्या दिवसानंतर आम्ही मित्रगण भौतिकशास्त्र विभागात जात होतो. एमेस्सीपासून आजवर इथेच असणारा त्यांच्यात मी एकमेव देखील नवखा वाटत होतो. त्यावेळी आम्ही विभागप्रमुखांच्या कशात जायला कचरत असू पण आज मात्र मित्राच्या केबिनमध्ये बिनधास्त प्रवेश होता. विभागाचे यश आणि नुकत्याच विभागात निर्माण करण्यात आलेल्या सुविधांमुळे सर्वजण खूप प्रभावित झाले. विभागाच्या उपकरण सुविधा केंद्रामधून एक फेरी मारली. आपल्या वर्गमित्राला विभागप्रमुखाच्या खुर्चीवर बसलेले पाहून सर्वांना आनंद तर झालाच पण अभिमानाने उर भरून आला. त्यांना इथे पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याचा अनुभव आला. विभागातील सुंदर क्षणांमुळे सर्वजण उत्तेजित आणि उत्साही झाले. सर्वजण ३० वर्षापूर्वीचे क्षण जगले. स्मृती जागृत झाल्या आणि आपण एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय संस्थेचे विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटला.
शुभदा च्या आई बाबांना गांधी मैदानाजवळील त्यांच्या घरी भेटल्याच्या आनंदात या मेळाव्याची गोड सांगता झाली.
- डॉ. केशव राजपुरे
Sunday, March 13, 2022
पोलीस उपनिरीक्षक सूरज
तिरंदाज सूरज झाला पोलीस अधिकारी
Sunday, February 27, 2022
अमित, मराठी प्रतिभेची यशोगाथा
Wednesday, February 2, 2022
आयर्नमॅन चार्टर्ड अकाउंटंट विजय अनपट
यासाठी ऑडिटरना त्यांच्या मनाचे आणि शरीराचे भरपूर पोषण करावे लागते आणि सदोदित त्याला चुस्त ठेवावे लागते. नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांना नेहमी तत्पर असावे लागते. दैनंदिन व्यायाम, योग्य आहार आणि ध्यानधारणा यामुळे माणसाला संतुलित जीवनशैली लाभते. तसेच पुढील कामांसाठी ताजे राहण्यासाठी यांत्रिक जीवनशैलीतून विश्रांतीची देखील लाभते.
अलीकडेच ३० जानेवारी २०२२ रोजी त्याने डेक्कन स्पोर्ट्स क्लबने कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या 'बर्गमन ११३' या ट्रायथलॉनमध्ये भाग घेतला आणि यशस्वी देखील झाला. या स्पर्धेमध्ये सहनशीलता, संयम तसेच सामर्थ्याचा कस लागतो. निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण केल्यास आयर्नमॅन म्हणून शिक्कामोर्तब केला जातो. विजयने २ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २२ किमी धावणे अशी एकूण ११३ किमीची स्पर्धा ६ तास २५ मिनिटे आणि ३८ सेकंदात पूर्ण केली. याद्वारे त्याने आपण कणखर, तंदुरुस्त आणि फिट असल्याचे प्रमाण मिळवले.
विजय चे बालपण खेड्यात गेले. अगदी लहानपणापासूनच त्याला काबाडकष्ट करणं, शेतातील कष्टाची कामं करणं तसेच डोंगर माथ्यावर जाणं याची सवय होतीच. त्यामुळे शारीरिक कष्ट आणि वेदना यांना न जुमानता मार्गक्रमण करण्याची कला त्याच्याजवळ लहानपणापासूनच आहे. वयोमानानुसार हा स्टॅमिना, संयम तसेच निग्रह टिकत नाही. पण विजयने कायम व्यायाम आणि कसरतीत राहून तो अजून टिकवलेला आहे. बावधन पंचक्रोशीतील प्रत्येकजण चिवट आणि धाडसी स्वभावाचा असतो. कदाचित पंचक्रोशीतील मातीचे हे गुण विजयने चिरंतन सरावाने अजून संवर्धित केलेले आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.
- केशव राजपुरे
Tuesday, February 1, 2022
स्मृती
स्मृती चांगली की वाईट ?
वेळ झपाट्याने किंवा हळूहळू धावते ही प्रत्येकाची धारणा असते. वास्तवत: शास्त्रीयदृष्ट्या वेळ हा एकाच वेगाने पुढे सरकत असतो. वेळेबाबतची हि समज तुमची स्मरणशक्ती कशी कार्य करते यावर अवलंबून असते. आपणास जर स्मृतीभंश होत असेल तर तुमच्या आयुष्यात वेळ झपाट्याने निघून जाते असे भासते. पण जर स्मरणशक्ती मजबूत असेल तर आपल्या आयुष्यातील आणि सभोवतालच्या गोष्टी आणि घटना अगदी क्रमाने तपशीलवार आठवतील. या घटना आपल्या स्मृतिपटलावरील भरपूर जागा व्यापतील, आपणास दोन घटनांमध्ये बराच काळ लोटला आहे असा भास होईल आणि वेळ हळू हळू जात असल्याची जाणीव होईल.
प्रथमदर्शनी उत्तम स्मरणशक्ती आपणासाठीची जमेची बाब वाटत असली तरी बऱ्याचदा हीच स्मृती जीवनावर प्रतिकूल परिणाम करत असेल तर ती नसली तरी बरी अशी गत होऊन बसते.
माणसाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. बहुतेकांनी जीवनात अनेक कठीण प्रसंगांचा आणि दुःखाचा सामना केलेला असतो तसेच अस्तित्वासाठी संघर्ष देखील केलेला असतो. दुर्दैवाने कालांतराने आपण आपल्या आयुष्यातील सुखद प्रसंगाऐवजी फक्त दुःखद प्रसंगच स्मृतीत ठेवतो. हे प्रसंग स्मृतीपटलावर खोलवर कोरलेले असतात. त्या संघर्षाच्या काळात तुम्ही इतके सोशिक असता की तेव्हा मनमोकळेपणाने व्यक्त होता आलं नसल्याने मनाच्या प्रचंड दडपणात असता आणि हे दडपण उतारवयात आपण सहन करू शकत नाही. या वयात जर तुमची स्मरणशक्ती चांगली असेल तर या सर्व घटना तुम्हाला त्रास द्यायला वारंवार समोर येतात. वावरत असताना आपण भूतकाळ आठवत नसलो तरी ही त्रासदायक विचार प्रक्रिया पडद्याआडून मनःपटलावर अविरत चालू असते. यामुळे आपण कायम व्यस्त असता. ही व्यस्तता आपल्याला निश्चिंत जीवन जगताना अडथळा निर्माण करते. येथे शक्तिशाली स्मृती आपली शत्रु बनते. न पेलता आलेला तणाव आपणास मनाच्या विकृत अवस्थेकडे ढकलतो. पर्यायाने पुढे जाऊन आपण या सुंदर जीवनाचा तिरस्कार करू लागतो.
या संकटातून बाहेर पडण्यासाठी मग माणूस विचार करू लागतो की आता करायचं काय ? प्रत्येकजण आपापल्या धारणेनुसार यावर पर्याय सुचवत असतात आणि माणूस ते सर्व पर्याय करून बघतो. यासाठी काही तात्पुरते इलाज आहेत परंतु ते कायमस्वरूपी उपाय नाहीत. मग यावर वैद्यकीय उपचारांचा देखील आधार घेतला जातो. वैद्यकीय उपचारांचा मुख्य हेतू शरीरात होणाऱ्या जैवरासायनिक प्रक्रियांना उलट करणे हा असतो. या प्रक्रिया म्हणजे आपल्या तीव्र स्मरणशक्तीचा थेट परिणाम असतो. ही उपचारपद्धती तात्काळ गुण देणारी असली तरी त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत. उत्तम स्मृती असणे आणि उतारवयात पर्यंत ती टिकणे हे चांगली बाब आहेच. पण हीच स्मृती जर आपल्या अशांततेच तसेच उदासिनतेचे कारण बनत असेल तर माणूस स्मृतीपटलावर लिहिलेल्या गोष्टी नष्ट कशा करता येतात या गोष्टीचा विचार करू लागतो.
अशा त्रासदायक परिस्थितीत आपल्या हातात एकच गोष्ट उरते ती म्हणजे या स्मृतीस दिला जाणारा योग्य प्रतिसाद ! अध्यात्मिकता किंवा संवेदना जपल्याने आपण या स्मृतीस योग्य प्रकारे हाताळू शकतो. त्यासाठी आपण 'दैवी आणि अमर्याद विश्वाचे सुक्ष्म घटक आहोत' तसेच 'माणूस असण्यापलीकडे सचेतन व काहीतरी अधिक आहोत' हे समजणे गरजेचे आहे. ही गोष्ट समजायला कठीण असली तरी जीवन आणि प्रसंगाकडे तटस्थपणे बघायला शिकलो तर काळ किंवा वेळेची सापेक्षता जाणवणार नाही हे मात्र नक्की. स्मृतीत जगणं म्हणजे भूतकाळात जगणं.. माणूस जर भूतकाळ आणि भविष्यकाळात जगत असेल तर तो त्याच्या अस्वस्थतेचं कारण बनतो. म्हणून माणसाने वर्तमानात जगावे. जगत असताना स्मृति सारख्या गोष्टी आपल्याला कायम टाळता येणार नाहीत पण त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय असेल हे मात्र आपण ठरवू शकतो.
स्मृती माणसाला दु:खी नाहीतर सूज्ञ बनवते. बदलणार्या जगातील आनंदी किंवा दुःखी घटनांची स्मृती अमर्याद स्वत्वाला दाबून ठेवते. आपण यात जखडले जातो. आपल्या स्वत्वाची स्मृती तुमची जागरूकता वाढविते आणि तिला समृद्ध करते. क्षुल्लक गोष्टींचे विस्मरण हा परमानंद आहे. घटनांचे अशाश्वत स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. भूतकाळातील घटना वर्तमानात अस्तित्वात नसतात हे ध्यानात घ्यावे. भूतकाळाचा स्वीकार करून सोडून द्यायला शिकायला हवे. नि:पक्षपाती व अंतर्मुख व्हावे तरच डोईजड वाटणारी स्मृती वरदान वाटेल.
- केशव राजपुरे
अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर
यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...

-
कृत्रिम बुद्धिमत्ता: आपल्या दैनंदिन जीवनात बदल घडवणारी क्रांती आणि २०२४ चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक दररोज जाणतेअजाणतेपणे आपण आर्टिफिश...
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (संशोधनावर आधारित उच्च शिक्षण) दोन महिन्यापूर्वी भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने नवीन ...
-
ज्ञानदानाची ज्योत (पिढी घडवणारा शिक्षक) ( माझ्या शैक्षणिक प्रवासात, एका प्रामाणिक प्राध्यापकापासून ते संशोधकापर्यंतचा अनुभव आहे. शाळेतील आवड...