Thursday, December 1, 2022

कणखर कार्यमग्न माऊली

 माऊलीच्या कष्टमय जीवनाचे फलित


(कृपया माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये तिच्याबद्दल अधिक वाचा)

वैराटगडाच्या दक्षिण पायथ्याशी वसलेल्या जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे येथे इ. सन १९३५ दरम्यान माझी आई अंजिरा हीचा जन्म झाला. तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम दोन भाऊ व तीन बहिणी.  तिने तिसरीपर्यंत शिक्षण घेतल्याने साक्षर आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेली माझी आई लहानपणापासूनच सर्व कामात निपुण आणि तरबेज ! वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तिचा शेतमजूर असलेले माझे वडील कै यशवंत राजपुरे यांच्याशी विवाह झाला. त्या चिमुरडीस तुलनेने गरीब शेतकरी कुटुंबात जुळवून घेण्यासाठी जास्त वेळ लागला नाही.

सासरी आल्यापासूनच तिचं घर आणि शेतातील काबाडकष्टाशी घट्ट नातं जुळलं. आईने वडिलांच्या खांद्याला खांदा लावून पहिल्यापासूनच अतिशय मन लावून संसार केला. गरीब व भोळ्याभाबड्या नवऱ्याबरोबर संसार कसा करावा याचे मूर्तीमंत उदाहरण ती आहे. मोठं कुटुंब आणि जबाबदारीचा डोलारा तिने अगदी लीलया पेलला आहे.

आम्ही पाच भाऊ आणि पाच बहिणी अशी तिला एकूण दहा अपत्य ! गरिबीत सुद्धा आपल्या मर्यादा ओळखून आईने आम्हाला शिकवलं. सर्वांची लग्ने सुसंस्कृत घरांमध्ये कर्जबाजारी न होता पार पाडली. वडिलोपार्जित डोंगर उतारावरील ३ एकर जमीन कसत तिने कुळकायद्यात मिळालेली ६ एकर जमीन टिकवण्यात वडिलांना सखोल पाठिंबा दिला.

‘फाटक्यात पण नेटके रहा’ ही तिची आम्हास कायमची शिकवण. पैसे नाहीत म्हणून तिने कधीही घरांमध्ये तक्रार केल्याचे आठवत नाही. घरात अठरा विश्व दारिद्र्य असूनही प्राप्त परिस्थितीत अगदी कसरतीत संसार गाढा आयुष्यभर ओढला. अशात आम्हा भावंडांना हौसमौजेसाठी तर सोडाच पण शिक्षणासाठी पैसे ती आणणार कुठून होती? पेहरावाची साडी तिच्यासाठी हौसेची गोष्ट असायची. तरीसुद्धा जोडीदाराच्या मजुरीच्या मदतीने तिने मुलांना उच्चशिक्षित केलं ही गोष्ट लाखमोलाची आहे.

मी शाळेत नेहमी पहिला यायचो. दहावीत पहिला येऊनही व पुढे शिकायचं असूनही निव्वळ क्षुदाशांतीसाठी मला लगेचच शिक्षण थांबवावं लागणार होतं. पण माझी महत्वाकांक्षा आणि आईचा पाठींबा यामुळेच पुढे शिकू शकलो. तिच्याच संस्कारांच्या आणि स्वाभिमानाच्या वर्तुळात राहून मी माझं पीएचडी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पीएचडी करत असताना माझे वडील निर्वतले त्यावेळी माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होतीच पण आईने मला परिस्थितीचा चटका लागू दिला नाही. शिक्षण घेताना व पुढे आयुष्यात मला वेळोवेळी आर्थिक व इतर संकटांना सामोरं जावं लागलं. पण आईच्या ‘तक्रार करायची नाही, आहे त्या परिस्थितीवर मात करून पुढे जायचं’ अर्थात 'जीवन जसे आहे तसे स्वीकारा' या मंत्रामुळे मी तग धरू शकलो. 

शिवाजी विद्यापीठासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेत पीएचडी पूर्ण करून मी तिथेच भौतिकशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो, सध्या तिथे अधिविभाग प्रमुख म्हणून काम करतोय ही तिचीच प्रेरणा आणि पुण्याई म्हणावी लागेल. मी नेमका काय शिकलो हे तिला अजूनही माहीत नसेल, तसेच माझे पद, पदाचे महत्त्व यास अनभिज्ञ असली तरी आपल्या मुलाने जीवनात उत्कृष्टता मिळवली आहे इतकंच तिला कळतं. तिने दिलेल्या बळामुळे मी अनेक शिखरे गाठली. जागतिक शीर्ष शास्त्रज्ञांच्या यादीत मानाचे स्थान मिळवले. रोजचा दिवस काहीतरी नवीन देऊन जातो. अशावेळी पदाचा-प्रतिष्ठेचा गर्व होऊ लागला तर आईची नुसती आठवण मला अस्तित्वाची जाणीव करून देते आणि उद्याच्या नव्या कामगिरीसाठी दिशा देते. आईच्या मायेची शिदोरी अशीच असते, ती कधीच कमी पडत नाही.

माझा स्वभाव आईवर गेल्याचं माणसं मानतात. खरंच आहे ते, कारण शिस्तप्रियता, कष्टाळूपणा, कणखरपणा, सहनशीलता इत्यादी गोष्टी मला तिच्यामुळेच जन्मजात मिळाल्या आहेत. ती तिच्या कर्तव्याबाबत प्रामाणिक राहिली, तिनं जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलं, तिचा हाच स्वभाव माझ्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबिंबित झाला आहे. आम्ही मुलांनी आळशी न बनता नेहमी कार्यमग्न राहावं अशी तिची शिकवण होती. कष्ट करायला लाज बाळगू नये असं ती म्हणायची. लहानपणी मी विहिरीवर आठवडाभर कामाला गेलो होतो. त्याचे जे पैसे आले त्यातून मी माझ्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा रंगीत शर्ट-पॅंट घेतले. त्यावेळी जर तिने माझ्या हट्टापायी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून कपडे घेऊन दिले असते तर मला त्या कपड्याचं महत्व राहिलं नसतं आणि श्रमप्रतिष्ठा स्पर्धात्मक जगाच्या उंबरठ्यावर उमजली नसती. तिने दिलेल्या अशा अनेक धड्यांमुळे माझ्या आयुष्याचा अभ्यास लवकर पक्का झाला.

माझ्या मार्गदर्शनाखाली २० विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे. आपण संशोधन नावीन्यपूर्ण असावं असा माझा कायम आग्रह असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना कधीकधी ते अवघड वाटतं. आजकाल संशोधन क्षेत्रात गुणवत्ता राखणं जिकिरीचं होत असल्याने मला त्याबाबतीत कठोर व्हावं लागतं. संशोधन कार्य निर्देश आणि इच्छेनुसारच असाव असं विद्यार्थ्यांना मी सांगत असताना मी स्वतःला माझ्या आईच्या भूमिकेत व समोरच्या विद्यार्थ्यांना माझ्या भूमिकेत पाहत असतो. माझ्या आईने जशी मला सर्वोत्कृष्टतेची सवय लावली, त्यासाठी पडेल ते कष्ट करायला लावले ते माझ्या विद्यार्थ्यांकडूनही घडावं इतकीच माझी माफक व रास्त भावना असते. विद्यार्थ्याला काय वाटेल याची मी कधीही तमा बाळगत नाही. पण कालांतराने हे विद्यार्थी याचसाठी आभार व्यक्त करतात तेव्हा ते एकार्थी माझ्या आईचे आभार मानत असतात कारण ती तिचीच देण आहे. 

ती जे जगली, जे तिच्या नशिबी आलं त्याचा तिने खुशीने स्वीकार केला. तिने तिचा चंदन देह आमच्यासाठी झिजवला. शेती हीच आपली जीवनदायी ठेवा आहे आणि तीत राबल्याशिवाय गत्यंतर नाही ही खूणगाठ तिने कायम मनाशी बांधली होती. तिच्या चार मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या, शेतात काम करत असताना दोनदा विहिरीत पडली, एकदा सर्पदंशही झाला. ते तिच्यातलं आमच्यासाठीचं वात्सल्यच म्हणावं लागेल ज्यामुळे ती त्यातून पुन्हा पुन्हा जन्मली.


आयुष्यभर स्वाभिमान जपलेली आई अजूनही तशीच जगत आहे. सुरुवातीला कष्टाचे व नंतर आजारपणाचे सर्व त्रास तिने सोसले. कोणत्याही गोष्टीसाठी ती कुणावरही अवलंबून राहिल्याचे मला आठवत नाही. तिला अन्याय आणि कपटाची नेहमीच चीड वाटते. प्रत्येकाने आपल्या वाट्याचे काम न थकता आणि कारणे न देता प्रामाणिकपणे करावे असे तिला वाटते. स्वतःच्या मुलींच्या बाबतीतही ती अशीच तत्वनिष्ठ राहिली. त्यांच्या कुटुंबात तिने कधीही ढवळाढवळ केली नाही किंवा त्यांना माहेरावर अवलंबून राहू दिले नाही. त्या त्यांच्या कुटुंबात स्वावलंबी व्हाव्यात यासाठी ती त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत राहिली. 

वयाच्या ऐंशी पर्यंत ती अजिबात थकली नव्हती. पण पाच वर्षापूर्वी उद्भवलेल्या हृदयविकाराच्या आजारानंतर मात्र ती थोडी खचल्यासारखी वाटते. आजकाल तिला दिसायला व ऐकायला कमी येते. पण तिच्यात तो जून स्वाभिमान व कणखरपणा अजून तसाच अढळ आहे. तिचं असणं आमच्यासाठी मोठा आधार आहे. माझ्या कुटुंबाने आजपर्यंत अनेक चढउतार पहिले, पराकोटीचा संघर्ष करून सुखाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा त्या प्रयत्नांना अपयश आले, सुखाने अनेकदा हुलकावणी दिली. तरीही आम्ही थांबलो नाही. आईच्या मार्गदर्शनाखाली धावत राहिलो. माझे आताचे यश सर्वांना माझ्या अविश्रांत प्रयत्न आणि मेहनतीचे संचित वाटत असले तरी ते माझ्या माऊलीच्या कष्टमय जीवनाचे फलित आहे, हे नक्की.

मी जागतिक स्तरावर संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात थोडेफार नाव कमावले आहे, त्याचे सगळे श्रेय तिलाच असले तरी ती त्या मोठपणापासून अलिप्त राहते. कारण तिनं जे काही कष्ट सोसले ते मुलांच्या मोठेपणासाठी होते, स्वतःसाठी नव्हतेच मुळी. वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर तिला आरोग्यदायी आयुष्य लाभवे व तिची शतकोत्तर साथ आम्हास लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.







- प्राध्यापक डॉ. केशव यशवंत राजपुरे

मोबाईल ९६०४२५०००६

rajpureky@gmail.com

1 comment:

  1. आई म्हणजे आपली ऊनसावली असते.आपल्या आयुष्याचा खरा आधार आपली माय असते.आपण ही मातोश्रीचा जीवनपट वास्तव आणि समर्पक शब्दात व्यक्त केला आहे.सुंदर शब्दांकन.

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...