श्री. बाळासाहेब यशवंत साळुंखे/राजपुरे
"त्याग आणि कष्टांतून गरुडझेप...!"
आप्तांचे आयुष्य सुगंधित आणि बहारदार बनवण्यासाठी चंदनरूपी वृक्ष जसा स्वतःला उगाळून घेत असतो आणि चैतन्य पसरवत असतो त्याचप्रमाणे अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या काळात आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, रात्रंदिवस अपार कष्ट करून केवळ आणि केवळ त्यांना सुखाचे दिवस दाखवण्यासाठी, उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि आयुष्यात स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या आयुष्याचे अनमोल दान केले, जे अहोरात्र झिजले ते चंदनरुपी वृक्ष म्हणजे श्री. बाळासाहेब यशवंत साळुंखे/ राजपुरे (दादा). दादांच्या जीवनाचा थोडक्यात उहापोह..
शिक्षणाचा उपयोग केवळ पैसे मिळवण्याचे साधन म्हणून नसावा. पदवीत्तर शिक्षण घेऊन सुद्धा जर माणूस शेती करत असेल तर सहाजिकच _शिकून काय उपयोग_ असं मत बनते. मग माणसं आपल्या मुलांना ज्यादा शिकवण्याच्या फंदात पडत नाहीत. _त्यानं शिकून काय धन लावलिया_ ही भावना.. खरंच नोकरी मिळत नाही म्हणून शिकूच नये का ? या प्रश्नाचे उत्तर उच्चविद्याविभूषित दादा यांनी त्यांच्या कृतीतून दिल आहे.
दादांचा जन्म दि. ०१ जून १९५९ साली झाला. घरामध्ये दादांसहित सात भावंडे ! त्यांच्यात दादा आणि केशव हे दोघे भाऊ आणि फुलाबाई, कलावती, शारदा, मीरा आणि सुनंदा या बहिणी. त्यावेळी घराचे उत्पन्नाचे साधन फक्त शेती हेच होते. शेतीवरच कुटुंब चालत होते. आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. वडील श्री. यशवंत केसू राजपुरे हे शेतकरी मजूर मातोश्री अंजुबाई त्यांची खंबीर साथ ! त्यांच्या आई कडक शिस्तीच्या असल्यामुळे सर्व मुलांचे संगोपन योग्य रीतीने झाले. वडिलांना आपल्या मुलांनी शिकून खूप मोठं व्हावं असं वाटतं होतं. मुलांना लागणारी शालेय फी भरण्यासाठी कित्येक वेळी त्यांनी दिवसभर कष्ट करून मिळालेली मजुरी फक्त शिक्षणासाठी दिली. त्यामुळे या बिकट परिस्थितीत सुद्धा अपार कष्ट सोसून त्यांनी सर्व मुलांच्या शिक्षणास प्राधान्य दिल. दादांचे प्राथमिक शिक्षण पहिली १९६६ साली तर पाचवी १९७१ साली दरेवाडी येथे झाले. तिसरीतली एक वर्ष परीक्षा न दिल्यामुळे वाया गेले त्याच. त्यानंतरचे सातवी चे शिक्षण १९७३ साली कणुर या गावी तर हायस्कूल चे आठवी ते दहावी पर्यंत चे शिक्षण १९७६ साली बावधन हायस्कूल, बावधन या ठिकाणी झाले. १९७० दरम्यान राजपुरे कुटुंब अनपटवाडी येथे शेतात छप्परावर वास्तव्यास आले.
दादा लहानपणापासूनच शाळेत अत्यंत हुशार होते. त्यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर होते. दादांचा मूळचा स्वभाव खूप रागीट .. ही देणगी त्यांना उपजतच त्यांच्या आई कडून मिळालेली होती. त्यानंतर दादा जसजसे मोठे होत गेले तसा हा रागीट स्वभाव अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्यामुळे अतिशय शांत होत गेला. दादांनी सन १९७८ साली त्यांचे बारावी चे महाविद्यालयीन शिक्षण शिंदे हायस्कूल, वाई येथून घेतले. सन १९८१ साली बी. कॉम. ची पदवी आणि सन १९८३ साली एम.कॉम. ची पदवी वाई येथील किसनवीर महाविद्यालय मधून प्राप्त केली.
दादांचे शिक्षण म्हणजे अपार कष्टाचा नमुना आहे. दिवसभर वडिलांबरोबर शेतीत कष्टाची कामे करून दादा रात्रीचा अभ्यास करत असत. परत दिवसा शेतीची कामे आणि रात्री अभ्यास असा त्यांचा दिनक्रम जवळजवळ पहिली ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत चालू राहिला. शेतातील नांगरट, मशागत, पाळी, पेरणी ही सगळी काम दादा सातवी पासूनच करत होता. यादरम्यान डोंगरात बैल घेऊन जाणार. गाय खोर मध्ये घेऊन जाणार. जनावरांच्या मागे गेल्यानंतर एक अभ्यासाचं पुस्तक मात्र पोत्यात कायम.
दादा प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्गात प्रथम श्रेणीचे गुण मिळवून प्रथम यायचे. यामागील त्यांचे जिद्द आणि चिकाटी हे गुण वाखाणण्याजोगे आहेत. दादांच्या शिक्षणासाठी त्यांचे दाजी सदाशिव शिर्के यांनी वेळोवेळी हवी ती मदत आणि मानसिक आधार दिला त्यामुळं दादा उच्चशिक्षित होऊ शकले. त्याकाळी गावात भीमा अण्णा, अर्जुन दादा आणि लाला भाऊ ही मंडळी ग्रॅज्युएट झाली होती. अनपटवाडी गावामध्ये शिक्षण क्षेत्रात दत्तूबापूनंतर दादांनी आपल्या हुशारीने गावातील दुसरे पोस्टग्रज्युएट होण्याचा मान मिळवला. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आणि शेतीवर अवलंबून असूनही आपल्या भावंडांच्या शालेय शिक्षणाकडे दादांनी विशेष लक्ष दिले. लहान भाऊ केशव हा शाळेत अत्यंत हुशार आणि चिकित्सक वृत्तीचा होता. त्याच्या शिक्षणावर दादांनी लक्ष केंद्रित केले.
दादांनी स्वतःच्या नोकरीसाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी मुंबई मध्ये (१९८५) सुध्दा नोकरी शोधली पण अपयश आले. वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे तेव्हा त्यांना ताबडतोब गावी यावे लागते. दादांनी फॉरेस्ट विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला होता. ज्यावेळी ते परीक्षेला गेले तेव्हा पेपर लिहीत असताना अशक्तपनामुळे त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि त्यांना पेपर संपूर्ण लिहिता आला नाही. पदवी पर्यंतचे शिक्षण प्रथम श्रेणीमध्ये मिळवणारा विद्यार्थी कमी दिसत असल्यामुळे पेपर अर्धवट लिहून परत आला. दादांना त्या वेळी नशिबाने साथ दिली नाही परंतु परिस्थितीपुढे हतबल न होता शेती करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू ठेवला.
सन १९९५ साली वडिलांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी दादांवर आली. आता शिकत राहिले किंवा नोकरी शोधत राहिले तर भावंडांची शिक्षणे अर्धवट राहतील म्हणून दादांनी नोकरीचा शोध बंद केला कारण त्यांना सतत वाटत होते की " दादा ने नोकरी केली असती तर केशव (अप्पा) शिकला नसता!" त्यामुळे दादांनी शेतीवर लक्ष केंद्रित केले. केशवच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून दादांनी केशवला आपल्या बहिणीकडे खंडाळा येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी ठेवले. केशवने १९९२ साली लोणंद येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयातून बी. एससी. फिजिक्स ही पदवी ९१% गुण मिळवून शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान विभागात सुवर्णपदक मिळवले. केशवच्या या यशामुळे दादांच्या कष्टाचे चीज झाले. पुढे केशवने १९९४ साली स्वतःच्या गुणवत्तेवर आणि कष्टांनी शिवाजी विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्र या विषयाची कठीण समजली जाणारी एम.एससी. पदवी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने लीलया मिळवली. तद्नंतर २००० साली अत्यंत परिश्रमाने आणि दादांच्या आशीर्वादाने भौतिकशास्त्र विषयातील पी.एचडी. ही पदवी मिळवली. या सर्व यशशिखरांमागे दादांची समर्थ साथ, आधार आणि पाठिंबा होता. वडिलांचे स्वप्न दादांनी केशवला उच्चविद्याविभूषित करून पूर्ण करून दाखवले.
दादांच्या पत्नी सुरेखा वहिनी यांनी दादांना आयुष्यातील प्रत्येक आव्हानात्मक वळणावर खंबीर साथ दिली आणि संसार यथायोग्य जोपासला. या दाम्पत्याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. ही तिन्ही मुले हुशार आणि कर्तुत्ववान आहेत. दादांचा मुलगा आकाश हा लहानपणापासूनच जिद्दी आणि हुशार! आई वडिलांच्या कष्टांकडे पाहात त्याने आज जे यश मिळवले आहे ते अनपटवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यास पात्र आहे. तो सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये उपअभियंता या पदावर कार्यरत आहे. अनपटवाडी गावातून मुंबई महानगरपालिका मध्ये प्रथम अभियंता होण्याचा मान त्याने मिळवला आहे. तसेच मुलगी वृषाली ही अतिशय हुशार असून तिने पुणे विद्यापीठामधून बी.एससी. फिजिक्स पदवी संपादन केली आहे. ति सध्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत आहे. आपल्या मुलांचे शिक्षण दादांनी पोटाला चिमटा काढून, काटकसर करून आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी करून दाखवले.
दादांच्या स्वभाव अतिशय श्यामल, मितभाषी आणि लाजाळू.. त्यांच्यातील अपुरा आत्मविश्वास कदाचित खूप शिकून सर्विस नाही ही भावना, घरची गरिबी, नवीन गावातील वास्तव्य आणि अंगावर पडलेल्या जबाबदारी या सर्वांचा एकत्रित परिणाम ! त्यामुळे तेव्हा त्यांच्या मुलाखती इतक्या प्रभावी झाल्या नाहीत. या मुद्द्यावर नेहमी त्यांचे बंधू केशव यांच्याशी नेहमी तुलना होत असे. शिकून सर्विस करत नसलेल्या माणसाला गावात एवढी किंमत नसते. सुरुवातीला सहजासहजी सामावून घेतलं नाही व हे कुटुंब लवकर गावाशी एकरुप झाले नाही. पण हा एम कॉम शेतकरी शेतात कुठलंही काम करायला कधीही लाजत नाही. हाच त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा मोठेपणा आहे.
दादांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मातोश्री व त्यांचा भाऊ केशव आणि बहिणींची साथ कायम मिळाली. दादांच्या बहिणी फुलाबाई शिर्के (म्हसवे), कलावती यादव (खंडाळा), शारदा निंबाळकर (वहागाव), मीराबाई ढमाळ (अंबारवडी), सुनंदा मतकर (विखळे) या सर्वांनी नेहमीच मानसिक आधार, प्रेम आणि जिव्हाळा दिला. हे प्रेम आणि आधार दादांना नव्याने आयुष्याशी झुंजण्याची ताकत देत होता.
केशव हा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भौतिकशास्त्र अधिविभाग मध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो. केशवचे भौतिकशास्त्र या विषयातील संशोधनामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर उपयुक्त आणि बहुमूल्य कार्य आहे. एकंदरीतच केशवच्या यशामागे त्याचे वडील बंधू दादांचे अनेक आशीर्वाद आणि खंबीर साथ आहे. दादांच्या वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनातून केशव आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.
दादा कॉलेजमध्ये असताना अनपटवाडी गावामध्ये प्रौढ शिक्षण वर्ग चालवले जायचे. त्यांचे सहकारी मित्र भीमराव अनपट हेदेखील त्यांच्याबरोबर कॉलेजला होते. हे दोघं अनपटवाडी मध्ये प्रशिक्षण वर्ग घेत असत. जुन्या पिढीला त्यांच्या योगदानाचा फायदा झाला. आमच्या पिढीतील इतर मुलंही त्यांच्या वर्गाला बसत असत.
दादांची मुले शिक्षित आहेत तसेच बंधू संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत आहेत. दादांनी श्रमसाध्य प्रयत्न करून आपल्या भावंडांना तसेच मुलांना उच्च शिक्षित करून त्यांना संस्कारित करून समाजाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. या जीवनप्रवासामध्ये आज दादा कष्टाचं पण सुखी आयुष्य जगत आहेत. अपार कष्टांनी मिळालेल्या या अतुलनीय यशामुळे दादांची छाती नेहमीच गर्वाने फुलते! सर्व भावंडे आणि आपल्या मुलांचा सार्थ अभिमान त्यांना वाटतो. तसेच त्यांच्या सुविद्य पत्नींची कणखर साथ, आधार, मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम यांची जोड मिळाल्याने दादांना आपले आयुष्य सार्थकी लागले याचाही अभिमान वाटतो. दादांच्या संघर्षाची कहाणी भावी पिढ्यांच्या जीवनात चैतन्याची आणि कष्टाची ठिणगी बनेल यात तिळमात्र शंका नाही!
दादांना त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा...
शब्दांकन:
दिलीप अनपट व अनिकेत भोसले
......................
प्रथमता मित्र दिलीप अनपट यांचे शतशः आभार. दहावी नापास झालेला हा माझा मित्र. आम्ही त्याला विनंती केली गावातील साक्षर व्यक्तीपैकी बाळासाहेब राजपुरे हेसुद्धा एक आहेत. त्यांच्याविषयी लिहीशील का ? लगेच तयार झाला. त्याच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडं. एका दिवसातच त्यांन तीन पाने मला लिहून माझ्याकडे टायपिंगसाठी पाठवली. ती वाचल्यानंतर, आवश्यक गोष्टी आल्याची खात्री केल्यानंतर, मी माझ्या शिरगाव येथील एमएससी फिजिक्स झालेल्या अनिकेत भोसले या विद्यार्थ्याला टायपिंगसाठी पाठवून दिलं. त्याने संधीचा फायदा घेतला. तो म्हटला सर याच्यामध्ये काही दुरुस्त्या करून, तुम्ही मला दादांच्या विषय सांगितलेलं होतं त्याच्या आधारे मी हा लेख पुन्हा लिहू का? मी म्हटलं काही हरकत नाही.. आणि अशा पद्धतीने हे दादांविषयी सुंदर व्यक्तिविशेष दिलीप आणि अनिकेत यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून तुमच्या समोर आलं. अर्थात माझ्या वरील प्रेमामुळे अनिकेत ने दादांच्या व्यक्तिविशेष मध्ये मला थोड झुकते माप दिले. पण त्यामुळे दादाच्या योगदानाचे श्रेय अजिबात कमी होत नाही. दिलीप आणि अनिकेत चे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप आभार..
दादा माझ्यासाठी एक हुशार, डायनॅमिक, आणि आयडियल रोल मॉडेल ! त्याच्याकडे बघूनच घडलो. त्याचा तापट स्वभाव आमच्यात पण आहे. तो जेव्हा शिकवायचा त्यावेळेला जर गणित चुकलं तर माझी काही खैर असायची नाही. बदादा मार. त्यामुळे गणित कधी चुकायचे नाहीत. दादामधील प्रामाणिकपना, पद्धतशीरपना, नीटनेटकेपणा मी कधीच आत्मसात केला होता. तो सोसत असलेले गरिबीचे चटके मी जवळून पाहिले होते आणि मला तेव्हाच कळून चुकलं होतं की मलाही दादाच्या वाटेवरून जायचं आहे. वडील मोलमजुरी करायचे. संसार खर्चातून उरले तर पैसा आमच्या शिक्षणासाठी. त्यामुळे कमीत कमी साधनांमधून आमच्या सगळ्यांचे शिक्षण झाले.
तो पोस्ट ग्रॅज्युएट झाला त्यावेळेला मी सातवीला असेल. तेव्हा मला सांगितलं जायचं की.. मोठ्यांन शिकून कुठं धन लावली आहे.. त्यामुळे तू कशाला शकतोस ? पण दादांना माझ्यातली हुशारी बघितली, इतर मित्रांच माझ्या विषयीचे अभिप्राय ऐकले आणि माझं शिक्षण कधीच थांबवलं नाही. मी जेव्हा पहिला क्रमांक यायचो आणि बक्षीस आणायचो, त्याची छाती अभिमानाने फुलून जायची. मी मार्क पडायचो आणि त्याच्यावर मला हवाहवासा रुबाब दादा मारायचा.
त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बरेच चढ-उतार आले. खचून व्हायला झालं. एकदोनदा तर फार उदासीनतेत गेला होता. त्याला आवश्यक साथ दिल्याने पुन्हा पूर्ववत झाला. त्यावेळेला जर दादांनी नोकरी पत्करली असती तर आज आम्ही परस्परांच्या जागेवर असतो. शेती करण्यामध्ये त्याच्या इतका पारंगत माणूस मी दुसरा बघितला आहे. तो पोस्टग्रॅज्युएट असूनही शेती करण्यामध्ये त्याला अजिबात कमिपणा वाटत नाही.
हो आमच्या घराला सरस्वती वरदहस्त आहे. दादा नंतर मी, माझ्या नंतर दादा ची मुलं वर्गामध्ये प्रथम यायचो. मुलं आमच्या पेक्षा फार हुशार आहेत. मी ८५% च्या लेव्हलपर्यंत होतो तर मुलं ९० ते ९५% पर्यंत. अनुकूल परिस्थितीत कोणीही शिकतं खरा कस लागतो प्रतिकूल परिस्थितीत तुमचं कौशल्य दाखवण्याचा. आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना अनुभव आहे.
नैतिक मूल्य आणि संस्कार याचा विसर आम्हाला कधीही दादा ने पडू दिला नाही. आम्ही वाममार्गाला न जायचं कारण म्हणजे दादा. आम्हाला कोणाचं फुकटचं नको. विनाकारण कोणाशी वैर नको. कमीच्या बापाचं समजून जागायचं ही शिकवण. आज कोल्हापुरात अधिकार पदाच्या खुर्चीत असताना दादाच्या नेहमी सूचना असतात.. मातू नकोस.
दादा माझ्यासाठी काय आहे हे शब्दात लिहू शकत नाही. पण मला तो वडिलांच्या जागी आहे याच्यात सगळ आल. अजूनही घरातला कुठलाही निर्णय साहेबाला विचारल्याशिवाय होत नाही यात त्याच्या मनाचा मोठेपणा आणि थोरपण दडलेल आहे.
या प्लॅटफॉर्मचा माध्यमातून दादाच्या झाकोळलेल्या व्यक्तिमत्त्वाविषयी प्रकाश टाकण्याची संधी मिळाली. त्यामुळे मित्राच्या प्रकल्पाचं भरभरून कौतुक.. आता सर्विससाठीच शिकायला पाहिजे ही भावना पुढच्या पिढीमध्ये कुचकामी ठरेल.