Thursday, April 9, 2020

राजेंद्र लक्ष्मण अनपट


राजेंद्र लक्ष्‍मण अनपट; संघर्षातून सुसंस्कृतता
​​
प्रतिकूल आर्थिक परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर पदवीधर होऊन, विश्वकोश मध्ये संपादकाची जबाबदारी समर्थपणे पेलून, जीवनाच्या पडत्या काळात न डगमगता सहचारिणी च्या साथीने व्यवस्थित परिस्थिती हाताळल्याने घरात उत्कृष्ट पदवीधर व्यक्तिमत्वे ज्यांनी तयार केली ते सर्वांचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक, ज्यांनी आपले आयुष्य भाषा व साहित्य संपादन क्षेत्रात व्यतीत केले ते संपादक श्री राजेंद्र लक्ष्मण अनपट अर्थात राजूभाऊ (मामा) यांचा थोडक्यात जीवन परिचय.

राजूभाऊ यांची जन्मतारीख २ जुन १९५४. तीन बंधूूू व एक बहीण असलेल्या कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये शिक्षण समर्थक वातावरण नव्हते. वडील लक्ष्मण बजाबा अनपट (आप्पा) मुंंबई येथे श्रीनिवास मिल मध्ये गिरणी कामगार तर मातोश्री अनुसया गृहिणी !  त्यांच्या आईंनी या सर्व मुलांना अतिशय जिकीरिने हायस्कूल पर्यंत शिकवले. अनपटवाडीत शाळा नसलेने १९६० ला त्यांनी बावधन येथील प्राथमिक शाळेत प्रवेश घेऊन ज्ञानार्जन केले. तेव्हा त्यांना माने व मुळीक गुरुजी शिकवायला असल्याचे ते सांगतात. १९६७ ला सातवीची केंद्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९६८ ला आठवीसाठी बावधन हायस्कूल येथे प्रवेश घेतला ! १९७१ ला मॅट्रिक (अकरावी) पास झाले. 

मॅट्रिकचे परीक्षा केंद्र शिंदे हायस्कूल वाई हे होते. त्यामुळे परीक्षेदरम्यान त्यांनी वाईतच मुक्काम करून  अभ्यास करायचे ठरवले. पण तेव्हा जेवणाची सोय नसल्याने व आप्पाही मुंबई येथे असल्याने जेवणाची आबाळ होणार होती. या परीक्षेच्या काळात त्यांच्या मातोश्रींनी वाई पर्यंत चालत जाऊन त्यांचा डबा पोहोच केल्याचे ते आवर्जून सांगतात. मुलांना शिक्षित करण्याचा किती मोठा अट्टाहास, निर्धार व कष्ट सोसण्याची तयारी यांच्या मातोश्रींची ! आपल्या गावातील सुशिक्षित पिढी अशा समर्पित पालकांच्या पोटी जन्मल्यामुळेच जीवनात यशस्वी होऊन भाग्यवंत ठरली आहे. 

कोल्हापूरस्थित मामांच्या आग्रहाखातर, १९७२ ला काहीकाळ कोल्हापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या शाहू महाविद्यालय येथे बीए भाग १ मध्ये होस्टेलवर राहून शिक्षण घेतल्याचे त्यांना आठवते. प्री डिग्री (बारावी) व बीए पदवीच्या शिक्षणासाठी आपल्या आईच्या समर्थनावर किसन वीर महाविद्यालय वाई येथे शिक्षण संचलन सुरू ठेवले. १९७५ ला बीए भाग दोन वर्गात असताना ते वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडूनही आले होते. ते अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रमांत सक्रियपणे व्यस्त होते या वस्तुस्थितीची ही स्वाक्षरी आहे. १९७६ ला भूगोल विषय घेऊन शिवाजी विद्यापीठाची बीए पदवी प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. पदवीधर झाल्यावर इतरांप्रमाणे नोकरी शोध सुरू केला. 

मग ते मुंबईत तेव्हा माथाडी कामगार असलेले त्यांचे वडील बंधू वसंत अनपट यांच्याकडे गेले. पण भाऊंकडे कठोर परिश्रम करण्यास सुयोग्य शरीरसंपदा व कौशल्य नव्हती त्यामुळे वसंत काका त्यांच्या योग्यतेच काम मिळवून देऊ शकले नाहीत. मग आणखी थोडे शिकून कायद्यातील पदवी घेऊन वकिलीचा व्यवसाय पत्करावा म्हणून मुंबई येथे सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये एलएलबी साठी प्रवेश घेतला. त्यावेळी बावधनचे नानासाहेब व काशिनाथ कांबळे त्यांचे सहकारी ! पुढे काशिनाथ यांना देना बँकेत नोकरी लागल्याने शिक्षण सोडून दिले. त्यामुळे भाऊंनी देखील उचल खाल्ली व सहा महिन्यातच लॉ ला रामराम ठोकला. मग तिथेच रोजगार ब्युरो मध्ये नाव नोंदणी केली. त्यांचे मार्फत नामवंत कंपन्यांच्या मुलाखती सुद्धा दिल्या. पण इंग्रजीतील कमकुवतता आड आली व तिथे ही नोकरी मिळाली नाही. नाइलाजाने नोकरी न करताच एका वर्षातच त्यांना गावी परतावं लागलं.

तेव्हा मराठी भाषा व साहित्य अभिवृद्धीसाठी शासनाने वाई येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ (१९६०) स्थापून एका प्रकल्पांतर्गत मराठीचा ज्ञानकोश म्हणजेच विश्वकोश तयार करायचं काम चालू केलं होतं. १९७७ पर्यंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाने सरासरी १००० पानी चार खंड प्रकाशित केले होते. सुदैवानं राजूभाऊ यांना या मंडळात भूगोलातील अभ्यागत संपादक म्हणून संधी मिळाली त्यामुळे कुठेतरी त्यांना नोकरीत स्थैर्य प्राप्त झाल. तशी ती कायमस्वरूपी नोकरी नव्हतीच, प्रकल्पासोबतच संपणार होती. त्यामुळे आहे तोपर्यंत काम हीच अवस्था ! यादरम्यान आपल्या ज्ञानसंपदे बरोबरच मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांची एक उत्कृष्ट भाषा चिकित्सक म्हणून जडणघडण झाली. वाक्यरचना, व्याकरण, सुयोग्य व चपखल शब्दवापर यामध्ये ते पारंगत झाले. त्यांच्या कार्यकालात भूगोल विषयक माहिती, नकाशे व इतर माहितीचे संकलन व लेखन या बरोबरच सरकारी छापखान्यात मसुदे तपासणी त्यांनी केली.

दरम्यान ८ मे १९८० ला गुळूंचे (नीरा) येथील मॅट्रिक पास रंजनावहिनी (मामी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तशा मामी तुलनेन श्रीमंत व सुखवस्तू कुटुंबातील ! जरी गाव वाईदेशात व जास्त काम पडणार होत तरी मुलगा सुशिक्षित असल्यामुळे त्यांनी या लग्नाला होकार दिला. मुलांच्या उन्नतीसाठी, त्यांच्यात सामाजिक मूल्यांचे रोपण तसेच त्यांचा सर्वांगीण विकास योग्य पार्श्वभूमीवर करण्यासाठी १९८३ ला ते वाई येथे स्थलांतरित झाले. त्यांना सचिन व सुहास ही दोन मुलं ! सचिन म्हणजे समाजप्रिय अष्टपैलू व्यक्तिमत्व तर सूहास अतिशय नम्र व व्यावसायिक ! दोघांनीही त्यांच्या आयुष्यात यशस्वितेची पातळी गाठली आहे. त्यांच्या दोन्ही स्नुषा उच्चविद्याविभूषित व सुसंस्कृत आहेत. श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी या आपल्या संस्थेने याचवर्षी या कुटुंबाचा सुसंस्कृत कुटुंब म्हणून सन्मानही केला आहे. सुरुवतीपासूनच भाड्याच्या घरात कुटुंब प्रवास करत करत ते आता आपल्या वाई व सातारा येथील स्वतःच्या घरात वास्तव्यास आहेत. अर्जुन दादांच्या नोकरीसाठी विनायक भाऊंना राजू भाऊंनी टाकलेला शब्द विनायक भाऊंनी पाळण्याचेे त्यांना आठवतं.

त्यांच्या विश्वकोश मधील कार्यकालात त्यांनी खंड क्रमांक पाच ते चौदा याच्या निर्मितीत प्रामाणिकपणे सर्वोच्च योगदान दिलं. त्यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सनिध्याचा आणि रा ग जाधव यांच्या सारख्या विद्वानांच्या मार्गदर्शनाचा त्यांना खूप फायदा झाला. खरंतर उरलेल्या २० व्या पर्यंतच्या सर्व खंडांच्या निर्मितीत योगदानाची उर्मी बाळगलेल्या भाऊंना तेव्हा नशिबाने साथ दिली नाही.  तत्कालीन प्रशासनाबरोबरच्या हक्काच्या लढतीच्या तांत्रिक संघर्षामुळे इतर सतरा सहकाऱ्यांबरोबर त्यांना विश्वकोश मधील सेवेला मुकावे लागले. ही त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची सुरुवात होती.

हा त्यांच्या सत्वपरीक्षेचा काळ होता. दोन्ही मुलं हायस्कूलमध्ये शिकत होती. आर्थिक अडचणीमुळे त्यांना खाजगी शिकवणी लावू शकत नव्हते. १९९२ ते १९९६ दरम्यान त्यांनी नोकरी शोधण्याचे खूप प्रयत्न केले. त्यांच्या अनुभवाचा उपयोग पडणार क्षेत्र त्यांना सापडत नव्हतं. वनवन हिंडले पण काही उपयोग झाला नाही. भुईंज येथील किसन वीर कारखाना व  एमआयडीसी त देखील प्रयत्न केल्याचे ते सांगतात. घरचा सर्व खर्च रंजना मामी शिवणकाम व इतर घरगुती उद्योग करून भागवत होत्या. तेव्हा मुलांनीही अतिशय सामंजस्याची भूमिका निभावून पालकांच्या लढ्यात साथ दिली. राजू भाऊंना धर्म पत्नीचा अवश्य पाठिंबा व आधार त्यांच्या यशस्वीतेतील अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. 

त्यानंतर १९९६ ला मित्र दत्ता मर्ढेकरच्या मदतीने सातारा येथे दैनिक ऐक्य या वर्तमानपत्रासाठी काम करण्याची संधी मिळाली. हे त्यांच्या कौशल्याशी संबंधित काम होते. तेव्हा त्यांना सहसंपादक पदाची जबाबदारी मिळाली होती. तिथे त्यांनी वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये आपल्या भूमिकेचे अवचित्यच सिद्ध केले नाही तर आपल्या लेखनातून आणि योगदानाद्वारे समाजाची चांगली सेवा देखील केली. सातारा येथील आपल्या सोळा वर्षांच्या सेवेदरम्यान ते दररोज प्रेसच्या वाहनातून वाई-सातारा-वाई प्रवास करत असत. कधीकधी विषम दिनचर्येमूळ आठवड्यातील सहा दिवस त्यांची मुलांची भेट होत नसे. ते फक्त रविवारीच मुलाना भेटू शकत असत. महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांच्या मुलांनीही कुटुंबाच्या उन्नतीसाठी वडिलांची घरातील अनुपस्थिती सहन केली.

यादरम्यान रंजना मामी यांनी मुलांच्या मनात मानवी मूल्यांचे योग्य प्रकारे रोपण केले व मुलांमध्ये पुढील आव्हान झेलण्यासाठी व आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गरजेचा किमान आत्मविश्वास निर्माण केला. सचिन मधील उत्कृष्ट वक्ता, सूत्रसंचालक, गायक व सिनेकलाकार हे बहुआयामी गुण या उभयतांच्या संघटित कष्टाचे फलित मी मानतो. याच संस्कार पेढीत तयार होऊन अतिशय कष्टाने सुहासने देखील एका नामवंत कंपनीत चांगले स्थान कायम केले आहे. त्यांच्यातील वक्तृत्वाचा वारसा चिरंजीव सचिन याचे बरोबरच नातू वेदराज (लागीर झालं फेम सिंबा) ने चालू ठेवला आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात जरी सर्वोच्च पद त्यांना मिळालं नसलं तरी त्याच्या दोन्ही मुलांना त्यांनी असे पद मिळवणे लायक बनवलं व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केली ही फार मोठी गोष्ट आहे. २०१२ साली वयाच्या ५८ व्या वर्षी ते आपल्या ३५ वर्षांच्या सेवेतून निवृत्त झाले. या काळात जीवनातील बरेच चढ-उतार त्यांनी बघितले होते. पण सेवानिवृत्तीनंतर कार्यमग्न मनास आवडीचे काम करायला मिळत नसल्याने चैन पडत नव्हता. दरम्यान व्याजवाडी गावचे व सकाळ दैनिकाचे व्यवस्थापक श्री राजेश निंबाळकर भेटले व त्यांच्या अनुभवाचा उपयोग सकाळ मीडियाला व्हावा म्हणून अर्ज करायला सांगितले. मुलाखत न घेताच त्यांनी राजूभाऊंना सकाळमध्ये संधी दिली. तेव्हापासून आजतागायात ते हे काम अतिशय उल्हासाने व आनंदाने करत आहेत.

त्यांना उत्तम स्वरज्ञान आहे. ते सांगतात त्यांच्या काळी गावात सदाशिव आण्णा, रामभाऊ, घाडगे मामा व आत्माराम सुतार यांच्यासारख्या हौशी मंडळींनी एक भजनी मंडळ चालवले होते. तेव्हा त्यांनी या मंडळाच्या माध्यमातून शेजारील गावांमध्ये भजनाचे सादरीकरण केल्याचे त्यांना आठवते. अजूनही ते चांगलं गातात. हा त्यांचा गुण सचिनने अवलोकला आहे. 

आयुष्यातील खूप आव्हानात्मक काळानंतर ते आता आपल्या आवडीचे काम करत ऐश्वर्याच जीवन जगत आहेत. दोन्ही मुले स्थिरस्थावर आहेत. श्रमसाध्य प्रयत्न करून आपल्या मुलांना शिक्षित व उत्तम प्रकारे घडवणे हे देखील समाजाच्या विकासातील उत्कृष्ट योगदान आहे. त्यांच्या संघर्षाची ही कहाणी तरुण पिढीला नक्कीच प्रेरणा देईल. भाऊंच्या जीवनातील पत्नीचे आवश्यक समर्थन, कठोर परिश्रम आणि समर्पण निश्चितपणे नवीन पिढीच्या स्त्रियांना शाश्वत पिढी घडविण्यास उत्तेजन देईल.

राजू भाऊंच्या उर्वरित आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

✍️ डॉ केशव यशवंत राजपुरे


Wednesday, April 8, 2020

अनिल मारुती अनपट




आदर्शवत यशस्वी उद्योजक अनिल अनपट
(एक उद्योजक घडताना)
८ एप्रिल २०२०

शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन, अस्तित्वासाठी मुंबई येथे कमी शैक्षणिक अहर्तेमुळे सोसलेली ससेहेलपाट, अशा प्रसंगी प्रस्थापितांनी झि​​डकारले ने त्वेषाने पेटून उठून केलेला संघर्ष, अनपटवाडी गावचे युवकांचे प्रेरणास्थान श्री अनिल अनपट (भाऊ) यांच्या वाट्याला आल्यानेच ते आज यशस्वीतेच्या शिखरावर आहेत.

पार्वती काकू आणि मारुती अनपट (बाळू आप्पा) यांच्या आठ अपत्यांपैकी अनिल एक व उरलेल्या बहिनी ! अनिल भाऊंचा जन्म ५ ऑक्टोबर १९६५ चा. घरात आठ-दहा म्हशी, केळी बागायत, बाहेरची दमडीची मिळकत नाही, हालाकीचे दिवस यामुळे अनिल भाऊंसाठी शेती आणि इतर काम अनिवार्यच ! १९७१ ते १९७५ दरम्यान वाडीतील प्राथमिक शाळेत कोदे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ज्ञानार्जन केलं. अभ्यासात एवढे पारंगत नसलेले भाऊ गणितात मात्र पैकीच्या पैकी गुण मिळवायचे तेव्हा ! त्यांचे हे गणित कौशल्य पुढे आयुष्याचे गणित तर्किक विश्लेषण करून सोडण्यास मदतीला आले. त्यामुळे हे गणित त्यांनी बरोबरच सोडवून मार्गक्रमण केले. हे शाळेत असताना गावचे तत्कालीन कारभारी व त्यांचे वडील बाळाप्पा यांच्या दूरदृष्टीतून शाळेमध्ये शहाबादी फरशी घातल्याचे त्यांना आठवते. 

१९७५ ला चौथीतुन ते बावधन हायस्कूलला प्रवेश नाकारल्याने, बावधन च्या प्राथमिक शाळेत पाचवीसाठी गेले. सुरुवातीला गाडेबाग मधील प्राथमिक शाळा क्रमांक २ मध्ये व नंतर बावधन बस स्थानकाच्या समोरील शाळेत त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. १९७८ ला आठवीसाठी मग हायस्कूल शाळेत त्यांना नाविलाजाने प्रवेश द्यावा लागला. आठवीला चार तुकड्यांपैकी क तुकडीत ते शिकले. अभ्यासात सर्वसाधारण पण इतर उपक्रमात पुढे असणारे भाऊ तेव्हा त्यांच्यातील उनाडपणात चमकले. मुलांची भांडण तसेच वर्गात दंगा करण्यात अग्रक्रम पण बसायला शेवटच्या बाकावर. पण आयुष्याच्या शाळेत पुढील चाळीस वर्ष मात्र ते यशस्वीत्यांच्या पुढच्या रांगेत आहेत. 

मार्च १९८० च्या एसएससी च्या परीक्षेत त्यांना कमी गुण मिळाले आणि यात्रेच्या मुख्य दिवशी आलेला तुलनेत सोपा मराठी विषय घालवून बसले. त्यावेळी या प्रकाराबद्दल मराठीच्या तत्कालीन शिक्षकांनी उपरोधात्मक त्यांचा सत्कार केल्याचे त्यांना आठवते. अर्थात ऑक्टोबर वारीत तो विषय सोडवला पण आयुष्याच्या एका वर्षाच्या मोबदल्यात ! 

पार्वती काकूंच्या जिकिरीच्या पाठिंब्यावर भाऊंचा पुढील खडतर शिक्षण प्रवास सुरू झाला. १९८१ ते १९८३ किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयात तर त्यानंतर पुढं १९८५ पर्यंत वरिष्ठ महाविद्यालयात कला शाखेत त्यांनी शिक्षण घेतलं. आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी त्यांनी अभ्यासोत्तर उपक्रमात सक्रियपणे भाग घेतला. क्रीडा स्पर्धा, विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका, विद्यार्थी संघटना, मोर्चे, एनएसएस, एनसीसी - सगळीकडे यांचा सहभाग! राजू नाना मांढरे यांच्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थन केलं. निवडणुका दरम्यान संपर्कवलय वाढवण्यावर भर दिला तसेच समाज मानसिकता व राजकारण जवळून पाहिले. पुढच्या पिढीतील सहकारी मित्रांना उपदेशपर सल्ला, मार्गदर्शन, सहकार्य, तसेच प्रशिक्षण देण्यावर भर दिला. तसं बघितलं तर शैक्षणिक विद्वत्तेच्या कमतरतेमुळे त्यांचं महाविद्यालयीन जीवन आव्हानात्मक होतं. त्यामुळे पुन्हा एचएससी च्या परीक्षेत इंग्रजीत गटांगळी!

यादरम्यान बावधन मधील रवी, संजय, गौतम कांबळे, राजेंद्र भोसले, अनिल भोसले तसेच शरद कदम यांच्याशी सलगी वाढली. वाई पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष श्री विजय नायकवडी हे त्यांचे बेंचमेट ! एस टी वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर गायकवाड व अनिल भाऊ यांची एनसीसी मार्फत नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचालन (२६ जानेवारी १९८५ ची आरडी परेड) मध्ये निवड झाली होती. तेव्हाच नेमकी भोपाळ वायू दुर्घटना २ डिसेंबर १९८४ ला झाली आणि हे संचालन रद्द झाले आणि त्यामुळे भाऊंची यात सहभाग घ्यायची सुवर्णसंधी निघून गेली. पण तरीसुद्धा तेव्हा गावासाठी ही फार मोठी उपलब्धी होती. 

काहीकाळ महाविद्यालयात वस्तू भांडाराचे प्रभारी देखील होते. किसनवीर महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात झालेली निवडक सादरीकरणे त्यांच्याच प्रयत्नाने अनपटवाडी यात्रेनिमित्त दाखवल्याचे मलाही आठवते. आम्हा मुलांसाठी तो एक अल्हादायक अनुभव होता. वडिलांच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे घर, शेती व इतर जबाबदाऱ्या त्यांच्यावर येऊन पडल्या. त्यामुळे शिक्षण अपूर्ण राहिले. तेव्हा दूध वाटपा बरोबरच भाजी व्यवसायही त्यांनी केला. दोन वर्षे शेतीदेखील केली. त्यावेळेस अतिशय कष्टाने आपल्या शेतीत राबून त्यांनी वांगी पिकाचे चांगले उत्पादनही घेतले. वांगी उत्पादनाच्या एका हंगामात जवळ जवळ पंधरा हजार रुपये कमावल्याचे ते अभिमानाने सांगतात. यावेळी घरगुती वाद-विवाद असूनही नूतन सरपंच श्री मोहन विनायक अनपट यांनी त्यांच्या विहिरीचं पाणी अनिल भाऊंना दिल्याचं ते विसरले नाहीत.

आयुष्यातील सुखाचा पाठलाग करताना कमवता होण्यासाठी मुंबईत जाऊन बाहेरच्या जगाची चव चाखायची असं वैतागून १९८७ ला ठरवलं. त्यावेळी अजून तीन बहिणींची लग्न बाकी होती. सुरुवातीला मुंबई येथील चिंचपोकळी येथील गावच्या गाळ्यावर दोन दिवस, लालबाग येथे विठ्ठल अनपट च्या रूमवर आठवडा व शेवटी धारावीतील संजय अनपट यांच्या रूमवर ते स्थिरावले. मित्रांसोबत मिळेल ते काम शोध सुरू केला. बांद्र्याला दिवसा पंधरा रुपये हजेरीवर रंगकाम देखील केले. मार्केटमध्ये कापडाच्या चार-चार लम्स वरच्या माळ्यावर पोचवण्याचं खडतर काम केलं. दिवसभरातील चार ट्रीपचे सहा रुपये मिळायचे तेव्हा.

वसंत काकांचे नांदवळचे मेव्हणे विलास पवार यांच्या ओळखीने अमरज्योती रोडलाईन्स या ट्रांसपोर्ट च्या ऑफिस मध्ये रोजंदारीवर गाड्या भरण्याचे मिळालेले काम तीन महिने केले. तसेच हमाली करण्यासाठी माथाडी सेवेत दाखल व्हावं असाही विचार आला. पण माथाडी युनियन मध्ये रजिस्ट्रेशन साठी तेव्हा चाळीस हजार रूपये देण्याची भाऊंची परिस्थिती नव्हती. जवळजवळ पाच महिने हे अंगमेहनतीच खडतर काम केल्यानंतर त्यांच्या नशिबात तुलनेनं सुलभ, पंख्याखाली बसून कार्यालय सांभाळण्याचे, काम आलं. 

सुदैवाने १९८९ साली पलटण रोड वरील एफ के रोडलाईन्स या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये तीनशे रुपये प्रति महिना पगाराची नोकरी मिळाली. धारावीतील रूम नाना आबांनी विकल्याने त्यांचा राहण्याचा आधार गेला. पुन्हा निवाऱ्याचा प्रश्न आ वासून पुढे ! काही दिवस गावच्या गाळ्यावर आश्रय शोधण्यासाठी केलेला प्रयत्न तेव्हा त्यांच्या दुर्देवाने असफल झाला. महिना तीस रुपये भाडे देऊन सुद्धा गाळ्यातून बाहेर जावं लागलं. आकाश फाटलेले स्थितीत मायचं आणि मनोधैर्य वाढविणारे नैतिक समर्थन अशोक अनपट यांच्या मामी यांनी देिले. त्यानंतर अगदी फॅमिली मुंबईत येईपर्यंत त्यांनीच डब्बा दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर भाऊंच्या आयुष्याने यशस्वीतेकडील एक महत्त्वपूर्ण वळण घेतलं.

अशा परिस्थितीत हाताश मनस्थितीत एफ के रोडलाईन्स चे मालक राजूभाई यांच्याकडे गावी परतत असल्याचे सांगून प्रलंबित पगाराची रक्कम मागायला गेले आणि काय आश्चर्य.. त्यांचे दैव पालटले. त्यांनी भाऊंच्या राहण्याची (ऑफिस मध्ये) फक्त सोयच केली नाही तर पगारामध्ये ५० रुपयांची वाढ केली. खानावळ, खोली भाडे व ट्रेन पास या खर्चाचे रुपये ११५ वाचणार होते. म्हणजेच पगारात तशी १६५ रुपये वाढ !

अनिल भाऊंनी मग मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ऑफिसमध्ये रोजनिशी, हिशोब वही, खतावणी, कागदपत्रांच्या नकला, चालकां साठी चे नियोजन अगदी पद्धतशीरपणे सांभाळले व मालकांचा विश्वास संपादन केला. या मालकांनी तीन महिन्यात त्यांचा पगार रुपये पाचशे प्रतिमहिना केला. त्यांचे नशीब चांगलं म्हणून त्याच ऑफिसमध्ये १९८९ मध्ये व्यवस्थापक पदावर महिना रुपये १००० च्या पगारावर त्यांना बढती मिळाली. त्यांच्या परीक्षेचा काळ संपला होता. ऐश्वर्याचे दिवस खुणावू लागले होते. मुंबई महानगरात जिथे साध्या हमालाच्या नोकरीस महाग झालेला अनिल आरामाशिर जीवन जगत होता. 

८ जून १९९३ ला सोमर्डीच्या प्रतापराव परामणे मामांची मुलगी साधना यांच्याशी अगदी नाट्यमय रीतीने त्यांचा विवाह संपन्न झाला. मामांनी सुरुवातीला होकार देऊन परत कुठल्यातरी कारणावरून नकार कळवून खळबळ माजवून दिली होती. पण तोपर्यंत अनिल भाऊ आणि साधना वहिनी यांनी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्याची खूणगाठ बांधली होती. यादरम्यान परामणे कुटुंबांकडून असलेल्या विरोधास दहशतीने उत्तर देण्यात आले होते. अनिल भाऊनाही धमकावलं त्यांनी ! मेव्हणे रवी परामणे बरोबर "साधनाचा होकार का नकार यावर" दहा हजारांची पैजही लागली होती. अर्थात ती पैज भाऊंनी जिंकली व वहिनींच्या मर्ढे येथील काकांच्या मध्यस्थीने विवाह सोहळा संपन्न झाला. त्यांच्या संसारवेलीवर मयुर व निकिता ही दोन फुलं ! मयुर अभियंता पदवीच्या शेवटच्या वर्षाला तर निकिताने बीबीए केले. लवकरच निकिताचा विवाह संपन्न होईल.

प्रगतीपथावर त्यांनी तेव्हा उत्पन्नाच्या साधनासाठी ट्रक देखील खरेदी केला होता. १९९६ ला अनिल भाऊंनी आपले कुटुंब मुंबईला हलवलं. सुरुवातीला कुर्ल्याला राहिल्यानंतर ते कनंमवारनगर, विक्रोळी येथे वास्तव्यास होते. त्यानंतर त्यांनी मुंबईस्थित अनपटवाडीकर यांच्यात एकोपा वाढवला. मित्रांची विचारपूस, त्यांच्या अडचणीत मदत केल्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांचा एक संच तयार होऊ लागला. मुंबईत एकमेकांना ओळख न दाखवणारे व अलिप्तता राखणारे गाववाले आता सभा-समारंभात एकत्र येऊ लागले. सख्यभाववृद्धी झाली. त्यातूनच श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) या संस्थेची निर्मिती मोहन अनपट आणि इतर जेष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८ ला झाली. सुरुवातीला महिना पन्नास रुपये जमा करणारे १२ सभासद यामध्ये होते. याकामी मित्र व मंडळाचे सचिव श्री हनुमंत मांढरे यांची मोलाची साथ त्यांना मिळाली तसेच हनुमंतनी त्यावेळी पुढाकार घेतला म्हणून ते शक्य झाले असं भाऊ सांगतात. या मंडळाच्या माध्यमातून गावची यात्रा पूर्ववत भरू लागली, शाळेची गुणवत्ता सुधारली, गाव विहिरीचे खोदकाम, ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक, मारुती तसेच वाकडेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार, पेयजल योजना, गटारीकरण व इतर अनेक ग्राम विकासाची जवळजवळ चाळीस लाख रुपयांची कामे झाल्याचे ते सांगतात. 

मार्च २००५ पर्यंत ते एफ के रोडलाईन्स मध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांच्या मालकांना ते डोईजड वाटू लागले व शेवटी अनिल भाऊ यांना ट्रान्सपोर्ट व्यवसायात सवतासुभा मांडायला भाग पाडले. वाशी येथे मार्केटमध्ये जीवन ज्योती रोडलाईन्स ही स्वतःची फर्म त्यांनी सुरू केली व गेली १५ वर्ष अतिशय उत्कृष्टपणे चालवली आहे. एक वेळ १६ कर्मचारी त्यांच्या ऑफिस मध्ये होते. या फर्मला समांतर काढलेली साधना वहिनी साठी कंपनी बुकींग सेवेसाठी ची ओम साई रोडवेज ही फर्म सुद्धा व्यवस्थित चाललेली आहे. 

२०१५ दरम्यान वडील आप्पांच्या आजारादरम्यान ते बराच काळ गावी वास्तव्यास होते. तेव्हा त्यांचे बंधु सीए विजय अनपट यांचे वाईमध्ये फर्स्ट क्राय डॉट कॉम हे डिपार्टमेंटल स्टोअर सुरू झालं होतं. त्यातूनच त्यांनी स्वतःचे फर्स्ट क्राय डॉट कॉम हे स्टोअर कोपरखैराने, नवी मुंबई येथे सुरू केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी मुंबईतील त्यांच्या स्थावर मालमत्तेत वाढ केली. नवी मुंबई व पनवेल परिसरात त्यांनी स्वतःची घर व कार्यालय केली आहेत.

समाजसेवेस वाहून घेतलेल्या श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. शहीद सैनिकांच्या कुटुंबासाठी झटणाऱ्या जयहिंद फाउंडेशन या संस्थेचे देखील ते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. नवी मुंबई ट्रान्सपोर्ट असोसिएशन कमिटी चे सक्रिय सभासद म्हणूनही कार्यरत आहेत. जीवनात परोपकार, आपुलकी, स्नेह, माणुसकी या नैतिक मूल्यांचे जतन हे त्यांचं नित्याचे झाले आहे. अतिशय समाधानच आयुष्य ते सध्या जगत आहेत. त्यांचा स्वभाव अतिशय गोड, निगर्वी, प्रामाणिक, कष्टाळू, समाजप्रिय, माणुसकीचे जतन करणारा असा आहे ! सर्वसमावेशकता, नेतृत्वगुण व उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्य हे त्यांचे गुण त्यांच व्यक्तिमत्त्व अधिक सुंदर बनवतात. 

बावधनच्या मातीतील ही ठिणगी परमेश्वराजवळ नेहमी सकारात्मक ऊर्जेची आणि परोपकारी वृत्ती जोपासण्यासाठी शक्तीची मागणी करते. पद, प्रतिष्ठा, मान या गोष्टी क्षणभंगुर मानणारे अनिल भाऊ शाश्वत आनंद प्राप्तीसाठी योगा व ध्यानधारणा करतात. वयाच्या चोप्पन्नाव्या वर्षी सुद्धा त्यांच्यात एवढी ऊर्जा कुठून येते याचे उत्तर आपल्याला यातून मिळतं. घर व कार्यालयातील भावनिक अंतर सुरक्षित ठेवल्यास जीवनात दुःख वाट्याला येणार नाही असे ते मानतात. भाऊंनी जीवनातील यश स्वप्रयत्नातुन आणि कष्टपूर्वक संपादन केले आहे म्हणून त्यांच्या दृष्टीने याची किंमत अमूल्य आहे. भाऊंच्या कार्यास सलाम व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

संदेश:
प्रतिकूल परिस्तिथीवर नक्की मात करता येते, त्या त्या संकटात परमेश्वर कुणालातरी मदतीला पाठवतो. फक्त आपली नीती आणि नियत चांगली पाहिजे.

अनिलला देखील कुणीतरी मोठं होण्यासाठी मदत केली. तोच आदर्श घेऊन अनिलने देखील अनेकांना मोठं केलं आणि आज ही करत आहे. त्यासाठी मनाचा मोठेपणा हवा. गावाचा अभिमान हवा.

✍️डॉ. केशव यशवंत राजपुरे

Monday, April 6, 2020

राजेंद्र परबती मांढरे




स्वकर्तुत्ववान मुख्याध्यापक राजेंद्र मांढरे सर

शून्यातून आपलं विश्व साकारणारी काही व्यक्तिमत्व असतात व आपल्या तडफदार स्वभावाने जीवनातील अवघड आव्हान पेलून आपल एक स्वतंत्र अस्तित्व जगासमोर ठेवतात अशा अतिशय जिद्दी तरुणाची यशोगाथा म्हणजे अनपटवाडी गावचे स्वकर्तृत्वान नेतृत्वगुण संपन्न शिक्षक श्रीयुत राजेंद्र परबती मांढरे ! 

अतिशय प्रतिकूल परिस्थि​​तीतून शिक्षण प्रवास करत, स्नेही व आप्तेष्टांच्या पाठिंब्यावर मुंबईसारख्या महानगरात एका उत्कृष्ट शाळेमध्ये अधिकारीपद प्राप्त करण म्हणजे अनपटवाडी च्या कुठल्याही तरुणास स्वप्नवत उदाहरण आणि निव्वळ प्रेरणादायी ! राजेंद्र परबती मांढरे सर (राजू नाना) यांना पाहत आम्ही शिकलो व घडलो त्यामुळे गावातील इतर उच्चशिक्षित तरुणांसारखं राजू नानांच्या व्यक्तिमत्त्वाचा आमच्यावरील प्रभाव अद्याप आहे.

त्यांचा जन्म, दोन भाऊ व तीन बहिणींच्या पाठीवर शांताबाई परबती मांढरे यांच्या पोटी १२.९.१९६४ चा ! १९७० दरम्यान त्यांनी अनपटवाडी प्राथमिक शाळेत कोदे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला. पहिली ते चौथी चे शिक्षण त्यांनी या शाळेत पूर्ण केलं. त्यावेळी प्राथमिक शाळा गावच्या मारुती मंदिरात भरत असे. तेव्हा मंदिरात मातीची जमीन होती, फरशी नव्हती. तेव्हा दर शनिवारी शाळेतील मुलांच्याकडून शेणाने जमीन सारवून घेतली जायची. त्याची आठवण त्यांना येते. १९७४ ला चौथी उत्तीर्ण झाल्यावर ते पाचवी व सहावी साठी मोरगावला त्यांच्या आत्याकडे गेले. पुढे १९७६ ला गावी परतुन बावधन हायस्कूल बावधन मधे सातवी ला प्रवेश घेतला. 

पहिल्यापासूनच ते अतिशय चपळ व चलाख होते. त्यामुळे शिक्षणाशिवाय वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात त्यांची खूप आवड ! विशेषत खोखो खेळात ते विशेष निपुण होते. बावधन हायस्कूलमध्ये असताना त्यांच्यातील खेळाच्या गुणवत्तेला तेवढा न्याय मिळाला नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्याची कसर त्यांनी महाविद्यालयाच्या संघातून विभागीय पातळीपर्यंत खो-खो खेळून काढली. खो खो खेळाची मलादेखील प्रचंड आवड! मी बावधन हायस्कूल च्या खोखो संघाचं पाच वर्षे प्रतिनिधित्व आणि दोन वर्षे नेतृत्व केलेल आहे. ही आवड राजू नाना यांच्या खेळाकडे बघूनच माझ्यात निर्माण झाली हे अभिमानाने सांगावसं वाटतं. पुढ १९८० मध्ये त्यांनी एसएससी पूर्ण केली.

घरची परिस्थिती पुढील शिक्षणासाठी तेवढी पूरक नव्हती, तरी निव्वळ जिद्दीच्या जोरावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी किसनवीर महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात कला शाखेत प्रवेश घेतला. शिक्षणा दरम्यान अनपटवाडी ते वाई प्रवास सायकलने तर पैशाची सोय झालीच तर बसने केला. पण बारावीपर्यंत शिकून (१९८३) तेव्हादेखील नोकरी मिळणं कठीण होतं. 

मित्रवर्य निवास व अनिल अनपट यांच्या पाठिंब्याच्या व त्यामुळे मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर किसनवीर वरिष्ठ महाविद्यालयात बीए भाग एक वर्गात प्रवेश घेतला व भविष्याच्या अंधारातील शिक्षण प्रवास सुरू ठेवला. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वास विविध पैलू पडत गेले. अभ्यासोत्तर उपक्रमामध्ये भाग घेऊन स्वतःला आजमवायला सुरुवात केली. त्यात विशेष करून क्रीडा व नेतृत्व प्रामुख्याने ! यादरम्यान निवास अनपट यांनी त्यांना समय सूचक मदत केली आणि पूर्ण सहकार्य केलं. 

महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळाच्या निवडणुका मित्रपरिवार व बावधन गटाच्या जोरावर त्यांनी दरवर्षी लढवल्या. व त्यात यश देखील मिळवल. ते बी ए भाग १ व भाग ३ ला वर्गप्रतिनिधी म्हणून निवडून आले. वर्गप्रतिनिधीला विद्यार्थीसचिव व विद्यापीठ प्रतिनिधी निवडताना मताधिकार असतो. यामध्ये राजू नाना यांनी अतिशय निर्णायक भूमिका निभावून १९८४ साली यशवंत महागडे तर १९८६ साली रोहिदास पिसाळ यांना सचिव म्हणून निवडून आणले. १९८६ ला इतिहास विषय घेऊन ते बिए उत्तीर्ण झाले. यावेळी त्यांचे इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक वसंतराव जगताप (केंजळ) व प्राध्यापक वाघचौरे यांच्या शिकवण्याच्या पद्धतीचा, ज्ञानाचा व व्यक्तिमत्त्वाचा विशेष प्रभाव त्यांच्यावर पडला. 

महाविद्यालयीन जीवनात नेतृत्वगुण विकसित करत असतानाच त्यांनी त्यांचे उत्तम आरोग्य आणि क्रीडा कौशल्य नियमित कसरत व सराव करून टिकवल होत. विभागीय पातळीवर महाविद्यालयाच्या खो-खोच्या स्पर्धेत त्यांनी संघाचे प्रतिनिधित्व केलं असे ते सांगतात. खेळाची सर्व कौशल्य आत्मसात केली. प्रतिस्पर्ध्यांच्या चाली परतवण्याची व खेळाच्या अटीतटीच्या क्षणी योग्य निर्णय घेण्याची कला आत्मसात केली. पुढे हे गुण त्यांना वैयक्तिक जीवनात उपयोगी पडत आहेत. १९८७ ला एम ए भाग १ मध्ये असताना वाईत वर्ग प्रतिनिधीच्या निवडणुकीदरम्यान त्यांना मोठ्या दिव्यातून जावं लागलं. अर्ज माघारी घेण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवरून दबाव आणले गेले. राजू नानांनी अशावेळी न डगमगता मेणवलीच्या प्राध्यापक शिंदे सरांसारख्या मार्गदर्शकांच्या पाठिंब्यावर योग्य निर्णय घेतले व मार्गक्रमण केले. हे पारंपारिक शिक्षण त्यांना नोकरी मिळवून देणार नव्हतं की जी तेव्हा काळाची गरज होती. मग कुणीतरी क्रीडा शिक्षक होण्यासाठी बीपीएड कोर्स करण्याचा विचार सुचवला. विभागीय पातळीवर ची खो-खो स्पर्धेत मिळवलेली प्रशस्तीपत्र बीपीएडच्या प्रवेशासाठी उपयोगी पडणार होती. 

एव्हाना निवास अनपट व निवास भाऊंच्या सहकारनगर, वडाळा येथील भगिनी बेबीताई यांच्या सल्ल्याने राजू नाना यांनी वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंडळ महाविद्यालयात बीपीएड साठी जून १९८७ ला प्रवेश मिळवला. १९८८ ला बीपीएड पूर्ण करून पुढच्या वर्षी (१९८९) फिजिकल एज्युकेशन मधील मास्टर्स पदवी म्हणजेच एम पी एड देखील पूर्ण केली. त्यांनी इच्छित शिक्षण खूपच उत्साहानं पूर्ण केलं. हे शक्य झालं ते बेबीताईंच्या त्यांच्यावरील स्नेहाने ! यानंतर त्यांच्यात शिक्षकी नोकरीच्या अशा पल्लवित झाल्या. २७ ऑगस्ट १९९० रोजी वयाच्या २६ व्या वर्षी विलेपार्ले, मुंबई येथील लाइन्स जुहू हायस्कूल येथे शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून ते कायमस्वरूपी रुजू झाले.

दरम्यान १९९३ मध्ये मालगाव येथील उच्चशिक्षित पदवीधारक नंदिनी वहिनींशी यांचा शुभविवाह झाला. राजीनाना चुलते, म्हणजे त्यांच्या सौ चुलती, म्हणजे काकी म्हणजे ऑंटी. अजूनही आम्ही त्यांना ऑंटी म्हणतो. नानांचा स्वभाव तापट तर ऑंटी मृदू व मायाळू ! त्यामुळे त्यांचा संसारवेल व्यवस्थित बहरला. प्रियांका व हितेश ही त्यांची दोन मुलं. दोघानाही त्यांनी अभियंता बनवले. प्रियांका दोन वर्षे झाली सर्विस करते तर हितेश डिग्री च्या शेवटच्या वर्षाला आहे. 

नानांचे वडील परबती आप्पा इतके सुंदर ढोल वाजवायचे की पाहणाराच दंग होऊन जाईल. त्यांचे नातू हितेश राजेंद्र मांढरे यांन आजोबांची परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे. हितेश विलेपार्ले येथील पार्लेश्वर ढोल ताशा पथकाचा सक्रिय सभासद आहे. राजू नाना म्हणतात - आज्ज्यान जिल्हा गाजवला आणि नातू राज्य गाजवतो.. अभिमान वाटतो या मांढरे परिवाराचा.

आपल्या नोकरी व्यवसायामुळे राजू नानांना मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देता आले नाही. पण ऑंटी नी ही जबाबदारी पूर्ण केली. सुरुवातीच्या खडतर प्रवासात त्यांनी नानांना सर्वतोपरी साथ दिल्यानेच त्यांच्या जीवनातील आत्ताचे स्थैर्य दिसत आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अंधेरी येथे त्यांचे स्वतःचे घर आहे आणि अतिशय आनंदी व समाधानकारक आयुष्य जगत आहेत. जवळजवळ अठरा वर्ष लायन्स जुहू हायस्कूलमध्ये प्रामाणिक सेवा केल्यानंतर प्रशासनाने त्यांना ती शाखा सांभाळण्याची मुख्याध्यापक पदाची जबाबदारी २००८ मध्ये दिली. खूप मोठा गौरव होता हा राजू नानांचा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा व पर्यायाने अनपटवाडी गावाचा.. अनपटवाडी तील पहिला मुख्याध्यापक होण्याचा मान त्यांचाच ! झाले बहु होतील बहु परंतु या सम हा..

वरकरणी केलेल्या कौतुकाचा त्यांना तिटकारा वाटतो. त्यांचा विश्वास शाश्‍वत कार्यात न की डामडौल व देखाव्यात. कुणी कौतुक करो वा न करो त्यांचं ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे चालू होतच. डिसेंबर २०१४ पर्यंत त्यांनी त्यांचा लायन्स जुहू हायस्कूलमधील उत्कृष्ट कार्यकाल पूर्ण केला व उरलेली सेवा अंधेरी येथील सत्यसाई विद्यामंदिरात करण्याचे ठरवले. या नवीन हायस्कूलमध्ये पूर्वीच्याच जोशाने आपलं कार्य कर्तव्य ते पार पाडत आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीने व नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रकल्पाद्वारे बांद्रा ते दहिसर दरम्यानच्या एकूण एक शाळेत स्वतः चा वेगळा ठसा उमटवला आहे. ते एक प्रसिद्ध क्रीडा परीक्षक व्यक्तिमत्व झालेल आहे. हे त्यांनी स्वकर्तृत्वावर व अतिशय कष्टाने मिळवलं असल्याच ते स्वाभिमानाने सांगतात. हे मिळवण्यासाठी च त्यांनी आतापर्यंत पराकाष्टा केली होती. 

ऑक्टोबर २०२२ पर्यंत त्यांचा शिक्षकी सेवेचा कार्यकाल ! यानंतर आपल्या स्वगृही म्हणजेच अनपटवाडी येथे परतण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग नवीन पिढीला व्हावा हीच त्यांची भूमिका आहे. हे करण्यासाठी त्यांनी गावच्या सहकाऱ्यांच व्यासपीठ निवडल नाही. वैचारिक फरक व समाज कार्याकडे बघण्याचा भिन्न दृष्टिकोन असल्याने हे शक्य झालं नसल्याचं ते सांगतात. पण सामाजिक दायित्व व दातृत्व हे त्यांच्या परिने त्यांच्या संपर्कवलयात ते करत आहेतच.

जीवनाच्या या टप्प्यावर उभा राहून भूतकाळाचे परीक्षण करताना प्रतिकूल परिस्थितीतील आपण हे सर्व कसे साध्य करू शकलो याचं गमक त्यांच्या जिद्द, काटक, धैर्यशील व तडफदार स्वभावात आहे असे त्यांना वाटते. हा स्वभाव त्यांना त्यांच्या वडिलांकडून आल्याचं ते मानतात. निवास, अनिल तसेच उदय कोदे यासारख्या मित्रांची सर्वकाल आवश्यक साथ त्यांना ही कठीण ध्येय प्राप्ती होवू शकली असे त्यांना वाटते. खरच नाना विषयी खूप आदर आहे मनात.  तरुणांचे एक उत्कृष्ट प्रेरणास्त्रोत ! राजू नानांच्या उर्वरित कार्यकाळास हार्दिक शुभेच्छा.. 

✍️ केशव राजपुरे

Sunday, April 5, 2020

निवास दत्तात्रय अनपट


चित्रकार निवास; सर्वसमावेशक नेतृत्व

अनपटवाडी गावचे माजी सरपंच, ​​एक उत्कृष्ट चित्रकार, यांचा बावधन, वाई तसेच मुंबई येथे खूप मोठा मित्रसमुदाय आहे असे हसतमुख श्रीयुत निवास दत्तात्रय अनपट यांच्याविषयी यावेळी !

समाजकारण व राजकारणयूक्त वातावरण असलेल्या गावच्या तुलनेने मोठ्या वरच्या वाड्यात निवास भाऊ यांचा २५ जून १९६४ चा जन्म ! त्यांचे वडील दत्तात्रय बजाबा अनपट हे १९५० ते १९७५ च्या दरम्यान गावचं धडाडीचे उत्कृष्ट नेतृत्व ! त्यामुळे समाजसेवेचे बाळकडू त्यांना लहानपणीच घरातून मिळाले. वास्तव्यास वाईतच असल्याने त्यांचे सर्व शिक्षण तिथेच झाले. वाई नगरपालिकेच्या शाळा क्रमांक ४, ६ वा ११ मध्ये त्यांनी आळीपाळीने सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर हायस्कुल व अकरावी-बारावी साठी त्यांनी द्रविड हायस्कूल वाई येथे प्रवेश घेतला. एसएससी १९८० ला तर एचएससी १९८२ ला त्यांनी द्रविड हायस्कूल मधून पूर्ण केली.

पुढं आई वडिलांचे छत्र हरपल्याने मुंबई येथे नोकरी व्यवसायासाठी त्यांना जावं लागलं. पण १९७० ते ८२ या त्यांच्या सत्वपरीक्षेच्या काळात त्यांना त्यांच्या सर्व चुलत्या व भावजय सिंधु वहिनी यांची मायेची साथ लाभली. त्यांच्या शांत, निगर्वी आणि सर्वसमावेशक स्वभाव त्यांची कुणीही मैत्री स्वीकारावी असा ! यादरम्यान त्यांचे मित्र राजू नाना मांढरे व अनिल भाऊ अनपट यांचा स्नेहरूपी सहवास त्यांना लाभला असं ते सांगतात. पुढ मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी बीए पदवी सुद्धा पूर्ण केली.

शैक्षणिक सुबत्ता जरी त्यांच्याठायी नसली तरी त्यांच्याकडे जन्मजात उत्कृष्ट चित्रकलेचं अनमोल कौशल्य होतं. त्यांच अक्षर खूपच वळणदार आणि मोत्यासारखं ! चित्रकलेची प्रेरणा त्यांचे आर्टिस्ट कदम मामा व प्रीमियर मध्ये नोकरीत असणारे त्यांचे वडील बंधू अजित यांची.. चित्रकलेसाठी त्यांनी कुठलेही प्रशिक्षण घेतलं नव्हतं. ही तर त्यांना लाभलेली नैसर्गिक दैवी देणगी ! हायस्कूलमध्ये असताना चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा मात्र ते उत्कृष्ट श्रेणीत पास झाले होते. या परीक्षेदरम्यान मिळालेले मार्गदर्शन आणि प्रशिक्षण तेवढेच यांच्या पाठीशी. त्यांच्या पडत्या काळात त्यांचा हा छंद व जोपासलेली कला, पेंटिंगचा व्यवसाय करताना कामी आली. निवास भाऊ अजूनही उत्कृष्ट पेंटिंग करतात. त्यांनी काढलेले उत्कृष्ट बोर्ड अजूनही मला आठवतात. बेंदराच्या वेळी बैलांच्या अंगावर पिवडी लावून भाऊ कुंचल्याने उत्कृष्ट नक्षी व चित्र काढायचे तेव्हापासून मी त्यांचा फॅन आहे.

१९८४ ते २००२ या दरम्यान त्यांच वाडीत वास्तव्य होतं. यादरम्यान त्यांनी रिक्षा चालवली, बेकरी व्यवसाय केला, पत्रकारिता केली, केबल व्यवसाय केला, वाई येथे विश्वकोश मध्ये कामदेखील केलं. सोबत पेंटिंग व्यवसाय होताच. पण ह्या दरम्यान त्यांनी गावचा भूगोल व इतिहास जवळून पाहिला व नव्यानं अभ्यासला. तत्कालीन माजी सरपंच सदाशिव अण्णा, बापू नाना तसेच सर्जेराव तात्या यांच्या  मार्गदर्शनाखाली समाजकारणाचे धडे घेतले. ग्रामसेवक तसेच तलाठ्यांचे सानिध्यात ग्रामपंचायतीची कार्यपद्धती, वेगवेगळी दप्तर, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या गावासाठीच्या योजना यांची सखोल माहिती घेतली. याचा उपयोग म्हणजे पुढे जाऊन वयाच्या पंचविसाव्या वर्षी, म्हणजे १९८९ साली ते अनपटवाडी ग्रामपंचायतीचे युवा सरपंच झाले. १९८९ ते १९९४ या दरम्यान गावचे सरपंच तर पुढील एक वर्ष प्रशासक म्हणून त्यांनी समाजसेवेच काम केल आहे. त्यांच्यातील नेटकेपणा, वक्तशीरपणा, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती तसेच प्रत्येक गोष्टींच छान टिपण ठेवण्याच्या सवयीमुळे त्यांचा ग्रामपंचायत कार्यकाल सहज सुलभ गेला. यादरम्यान १९९१ ला नायगाव मुंबई येथे त्यांचा विवाह गरीब घरातील नम्रता वहिनी यांच्याशी संपन्न झाला. मित्र अनिल भाऊ व राजू नाना हे अजित व निवास या दोघांच्या लग्नात पालकाच्या भूमिकेत असल्याचं त्यांना वाटतं. 

सध्या पुनरप्रक्षेपित होत असलेल्या रामायण आणि महाभारत या महामालिका वीसीआर व कलर टीव्ही च्या माध्यमातून निवास भाऊ आणि मित्रपरिवार यांच्या प्रयत्नातून अनपटवाडीकरांना बघणं शक्य झालं. त्यावेळी गावामध्ये दूरदर्शन चालत नसे व कुणाकडेही कलर सोडा, ब्लॅक ॲण्ड व्हाइट टीव्ही सुद्धा नव्हता. या मालिका रविवारी प्रक्षेपित व्हायच्या. त्यांचे व्हिडीओ कॅसेट एका आठवड्यात उपलब्ध होई. अगोदरच्या रविवारी झालेला एपिसोड पुढच्या रविवारी दाखवण्याचा त्यांचा निग्रह असेे. रजनीकांत भाऊ यांच्या परड्यातील शेडमध्ये कणाद बांधून तिकीटवर या मालिक बघितल्या त्या भाऊंच्या पाठिंब्यामुळे. तेव्हा ८० पैसे फुल व ५० पैसे हाप असा तिकीट दर ठेवला होता. त्यावेळी शरद बापू यांनी निवास भाऊंना याकामी मोलाची मदत केल्याचे भाऊंना आठवते.

अनिल भाऊ आणि राजू नाना यांच्या सहकार्यातून तेव्हा गावात प्रथम स्थापन झालेल्या नवनाथ क्रीडा मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या मंडळाच्या माध्यमातून बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजनही त्यांनी केल्याचे ते सांगतात. गावच्या विकासासाठी गाव पातळीवर एखादं मंडळ असावं ही तेव्हा त्यांना सुचलेली कल्पना ! पुढे नोकरी व्यवसायातून सर्वजण विखुरले गेले आणि नवनाथ मंडळाचा कार्यकलाप संपला. अनिल भाऊ आणि राजू नाना यांच्याकडे तेव्हा पॉकेटमनी नसायचे. त्या वेळेचा प्रासंगिक सर्व खर्च निवास भाऊ स्वतःच्या खिशातून करायचे हे त्या जपलेल्या मैत्री पोटी. निवास भाऊंचे कपडे तसेच शूज म्हणजे यांचेच. अनिल भाऊंना पहिली पॅन्ट निवास भाऊंनी दिली ही आठवण अनिल भाऊंना आहे. परीक्षेत नजरचुकीने दुसऱ्या विषयाचे टाचण सोबत राहिल्यामुळे अनिल यांना तीस रुपये दंड झाला. याही प्रकरणातून निवास भाऊंनी त्यांना सहीसलामत बाहेर काढले. वाई महाविद्यालयात असताना राजू नाना वर्ग प्रतिनिधीची निवडणूक जिंकले होते. याकामी देखील भाऊंनी फारच पुढाकार घेतला होता. महाविद्यालयाच्या सरचिटणीस पदाच्या निवडणुकीत राजू नानाचे मत महत्त्वाचे होते. यादरम्यान च्या गमती जमती त्यांना आठवतात.

अनिल भाऊ आणि राजूनाना याबरोबरच गावातील अजय रमेश मांढरे या व्यक्तिमत्वाशी सुद्धा निवास भाऊंचे सख्य होतं. उंचीने जास्त आणि आवडता नट अमिताभ म्हणून भाऊनी अजयला लंब्या या नावाने प्रसिद्ध केले होते. अजय ने शोले सिनेमा कित्येक वेळा बघितलेला आहे. पण निवास भाऊंच्या टेप रेकॉर्डवर या सिनेमातले डायलॉग ऐकण्याचा अजय चा छंद न्याराच. निवास भाऊंच्या घरी अजय तासन्तास डायलॉग ऐकत बसत असे. पण भाऊंना अजयची कधीही कटकट वाटली नाही. एकदा नजरचुकीने शोलेची कॅसेट उकिरड्यावर गेली. ती कॅसेट शोधण्यासाठी संपूर्ण उकिरडा खोदल्याची गंमत आम्हाला आठवते. दूरदर्शन चा सिग्नल डोंगरावरून व्यवस्थित मिळतो असं कुणीतरी सांगितलं. मग काय निवास भाऊ, अजय आणि आम्ही सगळे चिल्ड्रन फॅक्टरी टीव्ही, अँटिना सहित टोंगेवर गेल्याचा प्रसंग खूपच मजेशीर आहे. अस हे मित्रत्वाचं नातं जपणार व्यक्तिमत्व इतरांच्या पेक्षा निराळच.

निवास भाऊ सरपंच असताना गुणीजनांच कौतुक पंचायतीतर्फे करण्याची प्रथा प्रथम पडली. त्यावेळी गावातील कौशल्यप्राप्त गुनीजनांचे सत्कार समारंभ आयोजित केले जात. गावातील होतकरू आणि ज्ञानसंपादनशील विद्यार्थ्यांच्या विषयी खूप कौतुक असायच. अशा विद्यार्थ्यांना भाऊंचे प्रोत्साहन हा ठरलेला विषय ! बावधन गावात अनपटवाडीच्या  कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गुणगान हे भाऊंनीच करू जाणे. केवढा अभिमान असायचा त्यांना ! याविषयी एक किस्सा आहे माझ्याकडे:

मी १९८७ साली बावधन केंद्रात ८० टक्के गुण मिळवून प्रथम आलो. माझ्या मूळ गावी, दरेवाडी येथे माझी बैलगाडीतून गुलालाच्या वर्षावात वाजत गाजत मिरवणूक काढली होती. दुसऱ्या दिवशी सत्कार समारंभ व पुढील शिक्षणास आर्थिक मदत असा कार्यक्रम झाला. त्यावेळेस दरेवाडी येथील आमचे बांधवांना बावधन ग्रामपंचायतीसमोर माझ्या नावाचा अभिनंदनाचा बोर्ड लावला होता असे समजले. पण तिथे माझं गाव अनपटवाडी लिहिल्याने ते नाराज झाले. ते खोडून त्यांनी दरेवाडी गावचे सुपुत्र अशी दुरुस्ती केली. अशावेळी निवास भाऊ या गोष्टीवरून दरेवाडीकरांशी भांडले, हा मुद्दा त्यांनी त्यांना पटवूून दिला व बोर्डवरील माझे गाव पूर्ववत अनपटवाडी केले. जरी मी जन्मान अनपटवाडीकर असलो तरी निवास अनपट हे पहिले व्यक्तिमत्व ज्यांनी मला बावधन पातळीवर अनपटवाडी च नागरिकत्व दिलं होतं. हे निव्वळ त्यांच्या वडिलांकडून आलेल्या त्यांच्यातील आमच्या विषयीच्या स्नेहामुळे शक्य झाल असाव असे मी मानतो.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण. योगायोगाने माझ्या वडिलांचेही नाव यशवंत. निवास भाऊ वाई येथे रहात असल्यामुळे आमच्या घराचा संपर्क तसा कमी ! त्यामुळे  त्यांना आमच्या राजपूरे या आडनाव विषयी माहिती नव्हती. माझ्या वडिलांचा स्वतः स्वभाव अतिशय गरीब ! त्यामुळे अगदी लहान मुलं सुद्धा त्याची चेष्टा करत.. चेष्टेने गावातील बरीच मंडळी त्यांना यशवंतराव चव्हाण या मोठ्या नावानं हाक मारायचे. अर्थात नाव जरी एक असलं तरी या दोन यशवंतरावांचे कर्तुत्व हे वेगळं होतं. त्यामुळे निवास भाऊ यांना सुद्धा सुरुवातीला माझं नाव केशव यशवंत चव्हाण आहे असे वाटलं होतं. पण त्यांचे चुलत बंधू  विजू काका यांनी हा त्यांचा गैरसमज दूर केल्यानंतर ते मला राजपुरे नावानं ओळखू लागले. गरीब मजूर शेतकरी कुटुंबात जन्मलेले हे पोरगं, शैक्षणिक सुविधांचा अभाव असूनसुद्धा इतक हुशार कसं ? हा त्यांना नेहमी पडलेला प्रश्न ! त्यांना नेहमी माझ्या हुशारी बद्दल कौतुक आणि आश्चर्य वाटे.
त्यांच्याच कार्यकालात बावधन पंचक्रोशीची जलवाहिनी - नस - नागेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली (२६ ऑक्टोबर १९९५). मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार व नामदार मदनआप्पा पिसाळ यांचेनंतर या कामाच्या शुभारंभाचा चार नंबर चा नारळ फोडण्याचा मान निवास भाऊंना मिळाला होता. आता हा प्रकल्प आपल्या पंचक्रोशीला नवसंजीवनी देणारा ठरला आहे. पुढे हा प्रकल्प रखडला, पूर्ण झाला तरी बऱ्याच दिव्यातून गेला व आपल्या हक्काचा पाण्याचा स्त्रोत यथावकाश आपल्याला मिळाला. पण निवास भाऊंना या ऐतिहासिक क्षणाचा गावच नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाला. ते सांगतात- १९८९ मध्ये गावची प्राथमिक शाळा बांधण्यासाठी बारुळी येथील कोळी यांची दोन गुंठे जागा गावच्या नावावर झाली होती. सुरुवातीला एक खोली बांधली होती. नंतर वसंत कदम व सुभाष माने यांचे मदतीतून आणखी दोन खोल्या बांधण्यात आल्या होत्या. 

आपल्या गावच्या शकू काकी, म्हणजे मारुती नानांच्या सौ, या कन्नूर ग्रुप ग्रामपंचायतीत तीन वेळा एकमेव व पहिल्यावहिल्या स्त्री सदस्य होत्या. ही माहिती त्यांनी ग्रामपंचायतीतून आणल्याचे त्यांना आठवतं. तसेच वाईचे तत्कालीन तहसीलदार व निवास भाऊंचे काका महादेवराव बर्गे यांच्या मदतीतून स्वतंत्र अनपटवाडी ग्रामपंचायतीची महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र म्हणजे गॅझेटमध्ये नोंद करण्यासाठी भाऊंनी विशेष प्रयत्न केल्याचे ते सांगतात. अर्थात केवळ ९३ मतदारसंख्या असताना देखील स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा त्याअगोदरच १९७४ ला आपल्याला मिळाला होता.

श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) च्या माध्यमातून गावचा खूपच विकास झाला. या मंडळाच्या स्थापनेचे गाव पातळीवरील ते साक्षीदार ! नेहमीच त्यांचा मंडळाच्या कार्याला पाठिंबा व सहकार्य राहिलं आहे. पण परत ते तेवढे जवळ राहिले नाहीत पण त्यांनी कायम बाहेरून पाठिंबा दिला. अजूनही भाऊसारख्या व्यक्तीमत्वाच्या अनुभवाची, सल्ल्याची, मार्गदर्शनाची व अनमोल सहवासाची गावास नितांत गरज आहे.

असं हे हसतमुख, चित्रकार, सर्वसमावेशक स्वभावाचं, माहितीचे भांडार, गावच्या प्रतिष्ठेचे हाव असणार, गावची माहिती जपून ठेवणार, मोठ्या मनाचं, समाजशील व्यक्तिमत्व अनपटवाडी गावच्या विकासातलं मैलाचा दगड असल्यामुळे सर्वांना त्यांच्या विषयी आदर आणि अभिमान आहे.

केशव राजपुरे

Saturday, April 4, 2020

दत्तात्रय सदाशिव मांढरे


दत्तात्रय सदाशिव मांढरे; उच्चविद्याविभूषित प्राध्यापक

​अनपटवाडी सारख्या खेडेगावात राहून, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, विज्ञानातील भौतिकशास्त्र विषयात एम एस सी एवढी पदवी मिळवण ही सोपी गोष्ट नव्हती त्या १९७० च्या काळात.. होय मी बोलतोय ते आपल्या गावचे सुपुत्र उच्चविद्या विभूषित श्री दत्तात्रय सदाशिव मांढरे यांच्या विषयी..

श्री दत्तात्रय सदाशिव मांढरे यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४४ चा. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन, सोबत पाच सहा भांवंड, रोजीरोटी शेतीवर अशा परिस्थितीत त्यांचा शिक्षण प्रवास सुरू झाला. त्यांचे वडील, सदाशिव आण्णा त्यावेळेचे अतिशय नावाजलेले पैलवान होते. पण जसजशी मुलं मोठी होऊ लागली तसतशी अण्णांच्या लक्षात आलं की आपल्या पैलवानकी पेक्षा या मुलांच शिक्षण फार महत्वाच आहे. मग त्यांनी त्यांच्या आवडीचा छंद बाजूला ठेवून मुलांच्या शिक्षणावर जातीनं लक्ष दिल. मित्रहो शिक्षणाचा महत्व, त्यावेळी होतं, आजही आहे आणि भविष्यात राहणार आहे. हा विचार त्यावेळेला अण्णांच्या मनात आला ही फार मोठी गोष्ट होती.

१९५० साली अनपटवाडी मध्ये शाळा नसल्यामुळे बापूंनी बावधनच्या प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेतला. पहिल्यापासूनच अभ्यासात चुणचुणीत असलेले दत्तात्रय बापू सातवीच्या केंद्र परीक्षेत बावधन केंद्रामधून ८५ टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आले. फारच मोठी उपलब्धी होती ही मांढरे कुटुंबीयांसाठी ! मुलाच्या या यशामुळे आण्णांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याचवेळी त्यानी निश्चय केला की बापूंना शिकेल तिथपर्यंत शिकवायचं.. 

त्यावेळची आठवण सांगताना बापू सांगतात की या केंद्र परीक्षेत बसण्यासाठी ठराविक हजेरी भरावी लागत असायची. पण शेतीतील कामे भरपूर असल्यामुळे बापू नेहमी गैरहजर असायचे, त्यामुळे आवश्यक हजेरी भरली नाही. केंद्रप्रमुखांनी त्यांना परीक्षेला बसायला नकार दिला. तेव्हा त्यांचे नातेवाईक आणि इतर शिक्षकांनी विनंती केल्यामुळे यांना परीक्षेस बसायला मिळाले. मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं एवढेच नाही तर नियमित विद्यार्थ्यांच्या पेक्षा जास्त गुण मिळवून ते केंद्रात पहिले देखील आले. शिकण्याचा ध्यास मनात जर असेल तर कुठलाही अडथळा तुमचे शिक्षण थांबवू शकत नाही हे याचे उत्तम उदाहरण..

सातवीनंतर हायस्कूल शिक्षणासाठी त्यांनी द्रविड हायस्कूल वाई येथे १९५८ ला प्रवेश घेतला. त्या वेळेला तालुक्यामध्ये या हायस्कूलचे खूप नाव होते. हायस्कूलमध्ये वाई आणि परिसरातील उच्चभ्रू कुटुंबातील मुलं शिकायला असायची. बापूंची शिकायची जिद्द मोठी ! एसटी पास साठी पैसे नसायचे त्यामुळे दररोज अनपटवाडी ते वाई हा आठ किलोमीटरचा प्रवास चार वर्षांसाठी बापूनी पायी केला. त्यांनी किती कष्टाने शिक्षण घेतलं याची प्रचिती यातून येते. द्रविड हायस्कूल मधील सरांचे वर्गमित्र म्हणजे डॉक्टर अभय कानडे, आप्पांचे बंधू बाळ काका, ओझर्डे चे फरांदे हे होत.

१९६५ ला अकरावीच्या म्हणजे मॅट्रिकच्या परीक्षेत बापू ६७ टक्के गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ओझर्डे येथील मित्र फरांदे यांचा प्रथम क्रमांक आल्याचे ते सांगतात. या गुणांची आत्ताच्या गुणांशी तुलना होऊ शकत नाही. कारण एवढे गुण मिळवलेला विद्यार्थी पुढे जाऊन सातारला प्रवेश घ्यायला जातो तेव्हा तिथले प्राचार्य म्हणतात *तुम्ही आमच्या कॉलेजला हा विद्यार्थी म्हणजे गिफ्ट दिले*, यावरून या मार्कांची महानता लक्षात येते. हे त्यांनी अविरत आणि प्रामाणिकपणे केलेल्या कष्टांचे फळ होतं. अण्णांनी मग यांच्या शिक्षणाबाबत मागं पाऊल टाकायचं नाही असा ध्यास घेतला. 

पुढे प्रि डिग्री आणि बीएससी सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी करायची असा ध्यास त्यांनी घेतला होता. आता साताऱ्यात राहायचं कुठं हा प्रश्न होता तसेच शिक्षण खर्चात वाढ होणार होती. त्यावेळेला त्यांचे आवडते शिक्षक प्राचार्य बी एस पाटील यांनी समय सूचक मार्गदर्शन आणि मदत केली. त्यांना रयत शिक्षण संस्थेच्या बरॅक्स हॉस्टेलला प्रवेश मिळवून दिला. महिना ३० ते ४० रुपये खर्च व्हायचा तेव्हा. घरून एवढ्या खर्चाचाही बंदोबस्त व्हायचा नाही कधीकधी ! अशावेळी वस्तीगृहातील मित्र मुरलीधर डोंगरे, यादव, रणखांबे, महाडीक, सावंत व त्यांचे बंधू उत्तम भाऊ यांच्याकडून खूपच पाठबळ मिळाल. यामध्ये राम पवार, मानसिंग जगताप आणि डोंगरे हे त्यांचे खास..

अशावेळी त्यावेळेला मुंबईला असणारे अनपटवाडी चे नागरिक ज्यामध्ये जगदेव विठोबा अनपट, मारुती हरी अनपट, शिवराम साहेबराव मांढरे, रामचंद्र बजाबा अनपट, सर्जेराव केशव अनपट, कृष्णात तुकाराम मांढरे, रामचंद्र तात्याबा मांढरे, लक्ष्मण बजाबा अनपट, बळवंत बयाजी अनपट, विष्णू राजाराम मांढरे व हभप दत्तात्रेय बुवा कळंबेकर (जावळी) या मंडळींनी महिना पाच रुपये वर्गणी काढून त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली हे बापू कधीही विसरत नाहीत. गावकऱ्यांनी केलेली मदत सर्विस लागल्यानंतर त्यांनी गावातील इतर गरजू मुलांना (किसन लक्ष्मण अनपट) दिली तो भाग वेगळा. पुढे किसन अनपट यांनी स्वतः सर्विस लागल्यानंतर ही मदत भीकू आनंदराव अनपट यांना केल्याचे सांगितले जाते. भिकू नानांनी परत त्यांना केलेली मदत पुढच्या पिढीच्या उपयोगासाठी पोपट मास्तर यांच्याकडे जमा केली होती.. याचा अर्थ असा की प्रत्येकाला केलेली मदत त्यांन पुढच्या पिढी तील गरजू ला हस्तांतरित केली होती ..

पण समयसूचक मदत करण्याची भावना या गावच्या लोकांमध्ये सुरुवातीपासूनच होती ती अद्याप टिकून आहे. नोकरीनिमित्त परगावी असलेल्या प्रत्येक गावकऱ्यांच्या मनात गावाविषयी तळमळ तसेच ओढ असतेच. गावच्या विकासासाठी  आपण कमावलेल्या पैशातील काही पैसे खर्च करायचे हा इतिहास आहे. तसं बघायला गेलं तर हा ऐच्छिक विषय असतो.. पण या गावासाठी तो ऐच्छिक राहिलेला नाही.

सुरुवातीपासूनच गणित आणि विज्ञान हे सरांचे आवडते विषय ! त्यातल्या त्यात भौतिकशास्त्र शिकण्यासाठी आवश्यक अशा गणितावर विशेष कल ! त्यामुळे बीएससी साठी त्यांनी तुलनेन अवघड अशा भौतिकशास्त्र विषयाची निवड केली. १९६६ मध्ये बीएससी पदवी प्रावीण्य घेऊन त्यांनी फर्स्ट क्लासमध्ये मिळवली. तीसुद्धा त्यावेळची अतिशय मोठी उपलब्धी होती .. गावाच्या दृष्टीने, पंचक्रोशीच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची गोष्ट होती. मुलाच्या प्रत्येक यशानं हुरळून जाणारा बाप म्हणजेच आण्णा खूपच आशादायी होऊ लागले होते. मुलांन अजून शिकावं हा त्यांचा ध्यास मात्र संपत नव्हता. पण इतर भावंडांच्या शिक्षणाचा खर्च तसेच घरखर्च यामुळे ते त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च तेव्हा राखून ठेवू शकत नव्हते.. ह्या दरम्यान त्यांचे बंधू भाऊ हे मुंबईला गोदी मध्ये रुजू झाले. 'मी शिकलो नाही म्हणून काय झालं माझा भाऊ तर शिकतोय' या भावनेतून लहान असूनही मोठ्या भावाच्या शिक्षणास हातभार भाऊंनी लावला.

त्यामुळे पदवी मिळविल्यानंतर त्यांना सर्विस ची नितांत गरज भासू लागली. त्यावेळी भौतिकशास्त्र विषय घेऊन फर्स्टक्लास मिळवलेले विद्यार्थी दुर्मिळ ! त्यामुळे गुणवत्तेच्या जोरावर त्यांना वाघोली हायस्कूल मध्ये विज्ञान शिक्षकाची सर्विस ताबडतोब मिळाली. त्यांनी जरी तेव्हा तात्पुरती सोय म्हणून सर्विस पत्करली होती तरीही भौतिकशास्त्र विषय घेऊन एम एस सी पूर्ण करण्याची जिद्द त्यांनी कायम सोडली नव्हती. १९६६ ते १९६८ पर्यंत ते वाघोली हायस्कूल येथे कार्यरत होते. त्यांनी ठरवलं असतं तर बी.एड ही करू शकले असते परंतु त्यांना ते करायचं नव्हतं किंबहुना हायस्कूलचे शिक्षक व्हायचं नव्हतं. कायम एम एस सी चा ध्यास समोर होता. 

सायन्स कॉलेज सातारा येथून १९६८ ते ७० या दरम्यान स्पेक्ट्रोस्कॉपी ह्या स्पेशलायझेशन मधून एमएससी भौतिकशास्त्र प्रथम वर्गात मिळवून पूर्ण केली. या ठिकाणी सुद्धा अतिशय जिद्दीने अभ्यास करून त्यांच्या आवडीची पदवी त्यांनी मिळवली होती. एमएस्सी झाल्यामुळे आता वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्यास ते योग्य झाले होते. त्यामुळे एमएस्सी झाल्या झाल्या त्यांना सायन्स कॉलेज सातारा इथेच प्राध्यापक पदाची नोकरी मिळाली. एक शिक्षक म्हणून त्यांना भौतिकशास्त्र विषयातील क्लासिकल मेकॅनिक सारखा अतिशय अवघड विषय शिकवायला आवडायचा. आणि तो विषय त्यांनी कित्येक वर्ष महाविद्यालयात शिकवला. त्यांच्या शिकवण्या मध्ये फार हातखंडा होता. कोणत्याही लेक्चर ते पूर्ण अभ्यास करूनच घेत असत. ते विद्यार्थीप्रिय असे शिक्षक होते.

रयत शिक्षण संस्थेतील त्यांच्या सेवेमध्ये त्यांनी सायन्स कॉलेज सातारा, रामानंदनगर येथील महाविद्यालय, सद्गुरू संत गाडगे महाराज महाविद्यालय कराड, व पनवेल या ठिकाणी अविरत ३४ वर्ष सेवा केली. यातील जवळजवळ २२ वर्षे सेवा ही सातारा येथे केली. सरांच्या स्वभाव वैशिष्ट्या विषयी म्हणाल तर ते अतिशय शांत, मनमिळावू, अभ्यासू, जिद्दी, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या विषयी तळमळीचे तसेच सडेतोड स्वभावाचे होते. शिक्षण किंवा सेवे दरम्यान त्यांनी त्यांच्या अनपटवाडी येथील घराकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. सर्व बहिणींची लग्न, बंधूचा संसार व इतर गोष्टी जातीनिशी बघितल्या. 

त्यांचे समकक्ष मित्र म्हणजे बावधन मधील नारायण विठ्ठल भोसले, आनंदराव पिसाळ, कन्नूर येथील गोपाळ जठार तसेच एम एस सी दरम्यान चे पवार व डोंगरे यांची ते आठवण काढतात. त्यांच्या आवडत्या शिक्षकांमध्ये त्यांचे प्राथमिक शाळेतील रासकर गुरुजी, हायस्कूलमधील नातू, पटवर्धन, यार्डी, व विनायक कुलकर्णी सर या सर्वांच्या शिकवण्याचा आणि आचरणाचा प्रभाव पुढे एक शिक्षक म्हणून व्यक्तिमत्त्व घडत असताना त्यांच्यावर प्रभाव पडला असे ते मानतात. द्रविड हायस्कूल मधील विनायक कुलकर्णी त्यांचे गणित शिक्षक. त्यांच्या क्लासला सर पहिल्या बाकावर बसायचे. उत्तम शिक्षक होते. परंतु बापूंचा खोडकर स्वभाव असा कि ते पहिल्या बाकड्यावर बसूनसुद्धा त्यांच्या वहीमध्ये 'काय रे विन्या गणित शिकवतो वाटतं' अशा पद्धतीची वाक्य लिहायचे. यासाठी त्यांनी शिक्षाही भोगलेलली आहे. सरांमध्ये विनोदी वृत्ती सुद्धा होती याचा हा दाखला. 

त्यांचा स्वभाव अतिशय मितभाषी, निगर्वी व मनमिळवू.. त्यांचं आरोग्यही सुरुवातीपासून अतिशय ठणठणीत त्यांनी राखलेल आहे. 'साऊंड माइंड इन साउंड बॉडी' या उक्तीप्रमाणे.. ते म्हणतात की विद्यार्थिदशेपासून शिक्षकी पेशा पर्यंत आपल्या कार्यकालात एकाही व्यक्तीशी त्यांच भांडण झाल्याचे त्यांना आठवत नाही. किती तो सोशिकपणा, किती तो संयम. त्यामुळे आयुष्यामध्ये शत्रू कोणी नाहीच. किती सांभाळून, समजावून, समोरच्या कलांन वागण्याचे तंत्र त्यांनी अवलंबलं आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये ताण तणाव नाही. अतिशय आनंदात ते अद्यापही जगत आहेत.

ज्या समाजातून आपण आलो, ज्यान आपल्याला मोठं केलं तो समाज अजूनही तिथेच आहे. त्या समाजाला  ज्ञानी आणि प्रगत करायचा असेल तर आपल्या अनुभवाचा, आपल्या ज्ञानाचा व सुयोग्य मार्गदर्शनाचा लाभ व्हायलाच पाहिजे ही त्यांची भावना ! याच कर्तव्य भावनेतून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर, २००९ साली त्यांनी एक्स वायसियंस (सायन्स कॉलेज सातारा, माजी विद्यार्थ्यांची संघटना) या संस्थेची उभारणी केली. सभासदांच्या ठेव रकमेच्या व्याजातून ही संघटना गरजू, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचे काम करते. वेळोवेळी या विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन ठरलेलच.

गावानं जेव्हा-जेव्हा बापूंना मदतीसाठी साद दिली त्यावेळेस सुयोग्य मदत करून बापूंनी त्या संधीचं सोनं केलं, आपल्यातील दातृत्व सिद्ध करून समाजभानास जागले असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामध्ये गावच्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एक लाखापेक्षा जास्त मदत बापूंनी केल्याचे आठवते. अजूनही गावातील तरुण होतकरू मुलांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेता येत नसेल तर त्यांच्यासाठी चाकरमान्या मंडळींच्या मार्फत एखादा फंड उभा करण्याची इच्छा बापूंची आहे. 

सरांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा व मार्गदर्शनाचा अप्रत्यक्षपणे आपल्याही गावाला भरपूर उपयोग झाला. इथले विद्यार्थी प्रेरित झाले. या गावातील माणसं उच्चविद्याविभूषित होऊ शकतात हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. त्यांच्याकडे बघून लालभाऊ, राजूभाऊ, बापूंच्या बहिणी, माझे बंधू दादा पोस्टग्रेज्वेट होऊ शकले. माझ्यासारखा मजूर शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या केशव ने पीएचडी पूर्ण केली ही बापूंच्या प्रेरणेतून ! अजूनही बापूंनी आपल्या गावाशी टिकलेली नाळ कायम ठेवावी आणि इथल्या तरुण पिढीला प्रेरित करावं ही माफक अपेक्षा.. 

बापूंना दिपक, महिंद्र व मंगेश ही तीन मुलं. यापैकी महिंद्रा व मंगेश अभियंता तर दिपकने विज्ञान विषयातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल आहे. सातारा येथील करंजे नाका या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत. मुलेही उच्च शिक्षण घेऊन स्थिरस्थावर झालेले आहेत. त्यांच्या स्नुषा देखील उच्चविद्याविभूषित आहेत. 'आयडियल लर्नड फॅमिली' म्हटलं तर वावगं ठरू नये. वयोमानपरत्वे बापूंना आता गावात प्रत्यक्ष येऊन गावच्या विकासासाठी हातभार लावण शक्य नसेल कदाचित. आशा वेळी त्यांचे तिन्ही चिरंजीव त्यांच्या वतीने हे दातृत्वाचे कार्य पुढं नेऊ शकतात. त्यात आर्थिक योगदानच असावं असं नाही. त्यांचा बहुमूल्य वेळ आणि त्यांच गावात असण हे देखील फार मोठं योगदान ठरू शकेल.

असं हे अतिशय महान आणि अभ्यासू व्यक्तिमत्व हे आपल्या अनपटवाडी गावचं एक अंग आहे. हा माणूस या ठिकाणी जन्म घेऊन या मातीत वाढून एम एस सी आणि प्राध्यापक एवढी त्या काळी जर झेप घेऊ शकत असेल तर तुम्हा सर्व तरुण मंडळींसाठी ही एक प्रेरणा ठरेल. कारण आता शिक्षण आणि आणि आर्थिक सुविधा यांची वानवा नाही. *वानवा आहे ती जिद्दीने अभ्यास करण्याची, निश्चयी स्वभावाची आणि मेहनतीची* ! मित्रहो या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मध्ये आणल्या तर तुम्ही सुद्धा बापूसारखं एक यशस्वी व्यक्तिमत्व होऊ शकता याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो.. बापूंच्या निवृत्तीनंतरच्या यशस्वी, आनंदी व निरोगी आयुष्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.

केशव राजपुरे..



Friday, April 3, 2020

चार्टर्ड अकाउंटंट विजय बाबुराव अनपट


गावातील उच्च विभूषित व्यक्तींचे यादीमध्ये एक नाव आवर्जून घ्यावं वाटतं, की जे तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करतात, ते म्हणजे गावचे भूषण सीए *चार्टर्ड अकाउंटंट विजय अनपट* ..

सीए विजय बाबुराव अनपट हे भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स (आयसीएआय) या संस्थेचे सदस्य आहेत. त्यांना प्रत्यक्ष कर सल्लागार, कंपनी व्यवहार हाताळणी तसेच विविध भागात प्रकल्प सल्लागार अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कामांचा अफाट अनुभव आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही त्यांनी ऑडिटिंग व लेखा क्षेत्रातील सर्वोच्च स्थान मिळवले आहे. एक सामान्य विद्यार्थी ते नामांकित सीए ही अशक्यप्राय उंची त्यांनी स्वकर्तुत्वावर गाठली आहे. येथे मी त्यांची यशोगाथा थोडक्यात मांडत आहे जी पुढील तरुण पिढीस नक्कीच सतत प्रेरणा देत राहील. मित्रहो, तुम्हीही कठोर परिश्रम आणि उत्कटतेने आपले ध्येय साध्य करू शकता. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जगात अशक्य असे काहीही नाही, फक्त 'ते' करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास आपणाकडे हवा.

१९७८ साली सातारा जिल्यातील अनपटवाडी-बावधन (ता. वाई) या छोट्याश्या खेडेगावात त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेला विजय पुढे सिए पर्यंत झेप घेईल असे कुणालाच वाटलं नसावं. अशा वेळी जर एकाद्याचे नशीब तसेच शैक्षणिक गुणवत्ता बलवत्तर असेल तर तो कुठपर्यंत झेपावेल हे सांगणं कठीणच ! त्यांनी शालेय शिक्षण (एसएससी, १९९४) बावधन हायस्कुल मध्ये पूर्ण केले. शाळेत असताना अभ्यासात जरी ते सर्वसाधारण विद्यार्थी असले तरी एक चुणचुणीत, प्रामाणिक, प्रयत्नशील व सक्रिय मुलगा म्हणून त्यांची ख्याती होती. एका ग्रामीण शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यावेळी त्यांची डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्यासाठी आवश्यक आर्थिक परीस्थीती नव्हती. त्यामुळे त्यानंतर त्यांना पारंपारिक पद्धतीने शिक्षण घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. पुढे १९९६ मध्ये ते द्रविड हायस्कूल, वाई येथून 'लेखा व लेखा परीक्षण' हा व्यावसायिक अभ्यासक्रम घेवून बारावी उत्तीर्ण झाले. मला वाटते याच ठिकाणी त्यांचे पूर्णपणे विकसित सीएरुपी वटवृक्षाचे प्रथम बीज रोवले गेले.  अर्थात, 'बारावी' हे चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून करिअर करण्यासाठीची योग्य पात्रता नव्हती. मग १९९९ मध्ये त्यांनी वाईच्या किसन वीर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची बी. कॉम ही पदवी पूर्ण केली. दरम्यान महाराष्ट्र शासनाचा जीडीसीए हा सहकार आणि लेखा क्षेत्रातील डिप्लोमा २००० मध्ये पूर्ण केला. पुढे २००१ मध्ये उच्च शिक्षण घेण्याचा त्यांचा ध्यास त्यांनी कर आकारणी संबधातील कायदे या विषयीतील पदविका (Diploma in Taxation Laws) अभ्यासक्रम पूर्ण करून चालू ठेवला. 

एक चार्टर्ड अकाउंटंट होणं किती कठीण आहे? या प्रश्नाचं उत्तर फक्त ज्यांनी ही परीक्षा दिली आहे तेच देवू शकतील. भारतात एकूण अर्जदारांपैकी जवळपास ५% उमेदवारच सीए परीक्षा पास होतात हे मी ऐकले आहे. यावरून या परीक्षेच्या अवघडपणाची कल्पना यावी. मग प्रामाणिक आणि कष्टाळू विजय यांनी हे 'सिए' परीक्षेच्या शिवधनुष्याचे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हे आव्हान सहज पार करणं शक्य नाही हे ते उमगून होते त्यामुळे सुरूवातीला अपयशाची अपेक्षा होती. सीए च्या अंतिम परीक्षेला जातांना ते एक गोष्ट ठाम करून जात ती म्हणजे 'अपयश नक्की आहे पण यश अशक्य नाही'. कोणालाही अपयश येवू शकत हे मात्र खरं. या दरम्यान २००१ ला सिए साठी आवश्यक नाव नोंदणी करावी लागते ती करून घेतली. या परीक्षेची तयारी करण्यासाठी कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठात काही वेळ घालवला. मला विद्यापीठाच्या अभ्यासिकेत अंतिम सीए परीक्षेची तयारी करणारा तसेच अंतर्गत प्रवासासाठी सायकल वापरणारा विजय आठवतोय. एका परीक्षेच्या वेळी ते अपेक्षित यश संपादन करू शकले नव्हते, त्यामुळे काही काळ ते नाराज होते, प्रयत्न सोडायचा विचार चालू होता. दुसऱ्या पर्यायाचा विचार चालू होता. अशा वेळी मन घट्ट करण्यासाठी, निग्रह वाढवण्यासाठी, या अडचणीतून मार्ग निघतो का म्हणून आम्ही विचार विनिमय केला. अशा परीस्थितीत स्वत:ला कसं सावरायचं आणि प्रयत्न मध्येच का सोडायचे नाहीत याबाबत त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या यशाच्या मार्गक्रमणात मला सहभागी होता आलं. पुढे यश मिळविण्यासाठी त्यांनी निकराची लढाई लढली, शेवटी केलेल्या सर्व पराकाष्टांचे फळ झाले, त्यांना यशाची गुरूकिल्ली मिळाली आणि ते २००३ साली चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) झाले.

सीए झाल्यावर करीयर घडवण्यासाठीच्या संभावनांचा समुद्र त्याच्या समोर होता. पत्त्याच्या पानातील प्रत्येक कार्ड त्यावेळी त्यांच्याजवळ होते. अनेक पर्याय होते. त्यांनी योग्य तो मार्ग निवडला आणि लेखा परीक्षण आणि कर क्षेत्रात सर्वोच्च पातळीचे यश संपादन केले. २००३ मध्ये त्यांनी डिप्लोमा इन इन्फोर्मेशन सिस्टीम ऑडीट (डीआयएसए) ही पदविका पूर्ण केली. सध्या ते अमेरिकेने प्रमाणित केलेले सर्टिफाईड इन्फोर्मेशन सिस्टीम ऑडीटर (सीआयएसए) म्हणूनही कार्यरत आहेत. 

पुढे त्यांनी स्वतंत्र लेखापरीक्षक म्हणून सराव सुरू केला. एक कर सल्लागार म्हणून आपला व्यवसाय किफायतशीर असू शकतो, पण अशावेळी आपणास पूर्णपणे जागरूक असायला हवं.. काम करत असताना आपणास एखाद्या ठिकाणी प्रविष्ट होण्यास अनेक दरवाजे असतात पण बचावास एकच दारवाजा असतो  म्हणून फार सावध आणि सक्षम असावे लागते. सर्व प्रकारची माणसे भेटतात तसेच वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. या सगळ्यातून मार्गक्रमण करत विजय यांनी आपला वेगळा ठसा या क्षेत्रात तयार केलाय. सामाजिक जबाबदारीची त्यांना जाणीव आहे. ते अबु धाबी येथे २००६ ते २००८ दरम्यान एका खाजगी कंपनीत कर सल्लागार आणि लेखापरीक्षक म्हणून कार्यरत होते. या दरम्यान त्यांच्या व्यवसायास एक नवीन परिमाण मिळाले. २०१४ पासून ते नामांकित सीए श्रीयुत जयवंत चव्हाण (www.jbcaasso.com) यांच्या गटात सामील झाले असून भागीदारीत व्यवसाय सुरू आहे. तसेच त्यांची वाई आणि पुण्यात वेगवेगळी प्रशासकीय कार्यालये आहेत. त्यांनी वाई येथे लहान मुलांची उत्पादने असलेले फर्स्ट क्राय डॉट कॉम हे आशियातील सर्वात मोठे ऑनलाइन शॉपिंग स्टोअर सुरू करून व्यवसाईक म्हणूनही कारकीर्द सुरू केली आहे. 

सीए विजय अनपट हे गरीब शेतकरी कुटुंबातील तरुण आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांना एक  प्रेरणा स्त्रोत्र आहेत. त्यांचे आई वडील तसे अशिक्षित, परंतु आपल्या तीनही मुलांनी खूप शिकावं ही त्यांची तीव्र ईच्छा ! विजय यांचे वडील उत्कृष्ट आयुर्वेदिक तज्ञ तसेच नाडीपरीक्षक आहेत,  त्यामुळे सुरवाती पासूनच त्यांच्या घरी आजारी लोकांची रीघ असायची, कदाचीत याचमुळे विजय यांना माणुसकीचे धडे हे लहानपणापासून घरातच मिळतं गेले. तसेच त्यांची आई देखील फार शिस्तप्रिय आहेत, कदाचित याचमुळे विजय यांचा शैक्षणिक प्रवास हा वेळेत यशस्वी झाला. आज विजय यांच्या यशात त्यांच्या आई वडिलांचा सिहाचा वाटा आहे. तसेच पुढं लग्न झाल्यानंतर त्यांच्या धर्मपत्नी चार्टर्ड अकाऊंटंट तृप्ती अनपट यांचीही त्यांना मोलाची साथ लाभली. असं म्हणतात कोणत्याही यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. मला वाटतं याठिकाणी त्यांच्या मातोश्री आणि पत्नी यांचा मोठा सहभाग आहे. समाजातील तरुण व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक तसेच शैक्षणिक मदत ते करत असतात. आपण समाजाचं काही देणं लागतो ही त्यांची नेहमीच भावना असते. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे ते आपल्या मातृभूमीची सेवा करत आहेतच. गावांतील मुलांना शिक्षित करण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहेत. त्यांची ही यशोगाथा पुढील पिढीस नक्कीच प्रेरणादायी ठरेल. एका यशस्वी सिए बरोबरच ते एक चांगल व्यक्तीमत्व आहे आणि अजून माणुसकी जपली आहे. गेल्या दिवसांचा त्यांना विसर पडला नाही. त्यांचं स्वच्छ व ताजेतवाने व्यक्तीमत्व, धाडसी व निस्वार्थी स्वभाव तसेच सहनशील व परोपकारी वृत्ती कुणालाही आकर्षित करणारी आहे. कामाचा एव्हढा व्याप सांभाळून ते ताण तणाव मुक्त आयुष्य जगात आहेत. आपण पहातो की आई-बाबा फार प्रेमाने आपल्या मुलाचे नाव 'विजय' ठेवतात, परंतु हे नाव सार्थकी करणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतके विजय असतात. त्यापैकीच एक आहेत श्री. विजय अनपट ! आपल्या पालकांनी ठेवलेल्या 'विजय' या नावाला शोभेल असे कर्तुत्व त्यांनी केले आहे.

असा आहे विजय अनपट यांचा सिए पर्यंतचा चा यशस्वी प्रवास, मला माहीत आहे त्यांना अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. या प्रवासात त्यांना बऱ्याच अडचणी आल्या, बऱ्याचवेळा द्वेष झाला आणि प्रवास अर्ध्यावर सोडावा का ही मन:स्थिती झाली पण त्यांनी आपला दृढनिश्चय सोडला नाही. आपल्या गावकरी मित्राचे यश पाहून नेहमी अभिमानाने छाती फुलून येते व त्याच्या कर्तुत्वाचा आमच्या अनपटवाडी गावाला व पर्यायाने बावधन पंचक्रोशीला सार्थ अभिमान वाटतो.  त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाने जे स्थान गाठले आहे त्यामुळे बावधन पंचक्रोशीचे नाव आज सर्वदूर पसरले आहे व आम्हास सर्वत्र बहुमान मिळत आहे. विजय अनपट आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि आपल्या भावी कार्यांस शुभेच्छा.

केशव राजपुरे
मोबाईल: 9604250006
rajpureky@gmail.com
rajpure.com
rajpure.blogspot.com

बुवासाहेब सिताराम मांढरे

बुवा दादा, एक बहुआयामी नेतृत्व

६० ते ७० च्या दशका दरम्यान अनपट्वाडी गावात एक प्रभावशाली व्यक्तिमत्व कै बुवासाहेब सखाराम मांढरे अर्थात बुवा दादा अर्थात मांढरे सर हे नावीन्यपूर्ण आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व उदयास आल. त्यांचा जन्म साधारण १९२० ते २५ दरम्यानचा. ब्रिटिश शिक्षणव्यवस्थेत पारतंत्र्याच्या काळात त्यांचं जुनी मॅट्रिक आणि पुढे बारावी पर्यंत शिक्षण झालं. मित्रांनो त्यावेळेची बारावी म्हणजे आत्ताची पदवी म्हणायला काहीच हरकत नाही.
​​
असं सांगितलं जातं की माजी आमदार मदनराव पिसाळ यांच्याविरोधात कम्युनिस्ट पक्षातर्फे १९७० च्या दरम्यान बुवा दादांनी लढत दिली होती. ही लढत मदनराव पिसाळ कधीच विसरले नाहीत कारण यावेळी त्यांचा सहा ते सात मतांनी निसटता विजय झाला होता. आप्पांच्या मतदारसंघात आणि विशेष म्हणजे त्यांच्याच पंचक्रोशीत त्यांच्या गावचा कुणीतरी आप्पांच्या समोर दंड थोपटून उभा होता. ही राजकीय दुश्मनी होती वैयक्तिक जीवनामध्ये ते दोघं चांगले मित्र होते.

माजी खासदार आणि आपल्या तालुक्याचे भूषण माननीय प्रतापराव भाऊ भोसले यांचाही दादांच्या घराशी खूप चांगला घरोबा होता. वाई तालुक्यातील त्यावेळचे इतर तुल्यबळ नेते, कवठ्याचे किसन (आबा) वीर तसेच केंजळ चे बुवासाहेब जगताप यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. क्रांतिसिंह नाना पाटील स्वतः अनपटवाडी गावामध्ये येवून त्यांनी बुवा दादांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांचाही दादांशी कायम पत्रव्यवहार असे. अर्थात गावचे दुसरे सुपुत्र दादांचे समकालीन माननीय दत्तात्रय बजाबा अनपट यांचे समाजकार्य आणि राजकीय नेतृत्व देखील दादा एवढंच तुल्यबळ होतं.. परंतु या दोन नेत्यांची कार्य करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांच्या वाटा शेवटी समांतर रेषा राहिल्या. 

दादा अतिशय उत्कृष्ट इंग्लिश बोलायचे हे आम्ही अनुभवले होते. २००० च्या दरम्यान उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी जेव्हा आपल्या गावी यायचो त्यावेळेला हनुमंत व मी दररोज संध्याकाळी दोन तास इंग्रजी भाषा, वाक्यरचना, व्याकरण याबाबत दादांशी बोलत असू. थोड्याच वेळात त्यांनी आम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन केलेल आहे. त्यांचीही स्पष्ट उच्चार, मराठी शब्दांसाठी असलेले कठीण इंग्रजी प्रतिशब्द हे ऐकुन हा माणूस अनपटवाडी गावातला आहे या गोष्टीवर आमचा विश्वास बसायचा नाही.

तसं बघायला गेलं तर दादांच्या या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा गावच्या विकासासाठी प्रत्यक्ष उपयोग किती झाला या मूल्यांकनात मी पडणार नाही. एवढं मात्र नक्की सांगेन त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या बाजूचा समाज म्हणजे आमचे गावकरी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन काही अंशी त्यांचे अनुकरण करून चांगले व्यक्तिमत्व घडवण्याच्या तयारीला लागले हेही नसे थोडके !

लग्नानंतरचा काही काळ इथे काढल्यानंतर आयुष्यातली जवळजवळ पस्तीस वर्ष ते पुण्यात वास्तव्यास होते. ते इंग्रजी आणि गणित विषया च्या खाजगी शिकवण्या घेत असत. सुरुवातीला त्यांचे शिकवणी वर्ग धनकवडी भागात होते. पुढे शनिवार वाडा जवळ त्यांनी काहीवेळ शिकवणी वर्ग घेतले. आणि नंतर जिजामाता उद्यानासमोर आपल्या नातेवाईकांच्या घरी बराच काळ, शिकवणी थांबेपर्यंत, त्यांनी शिकवणी घेतले. त्यांच्या हातून मार्गदर्शन घेऊन घडलेले विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर्स, अधिकारी अशा उच्च पदावर आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या विषयी आठवण सांगत असताना नेहमी दादांना गहिवरून यायचं. त्यांना त्यांच्याबाबत खूप आदर आणि अभिमान असायचा.

साधारतः २००० ते २०१२ हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा काळ त्यांनी वाडीत आपल्या कुटुंबासोबत घालवला. दादांचे इतकं उच्चविद्याविभूषित, हुशार, तत्वज्ञानी, समाजकारण आणि राजकारण याची जाण असणारे व नेतृत्वगुण ठासून भरलेल व्यक्तिमत्व आपल्या गावातल होतं या सगळ्याचा आपल्याला सार्थ अभिमान हवा. अशा तऱ्हेनं आपल्या गावातील अतिशय चांगलं राजकीय नेतृत्व आता आपल्यात नाही याचं दुःख होतं. 

ही आठवणी भेट दादांचे सुपुत्र पोपट मांढरे तसेच लालाभाऊ आणि भास्कर आबा यांच्या स्मृतीपटलावरून साभार..



केशव राजपुरे

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...