Saturday, April 4, 2020

दत्तात्रय सदाशिव मांढरे


दत्तात्रय सदाशिव मांढरे; उच्चविद्याविभूषित प्राध्यापक

​अनपटवाडी सारख्या खेडेगावात राहून, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, विज्ञानातील भौतिकशास्त्र विषयात एम एस सी एवढी पदवी मिळवण ही सोपी गोष्ट नव्हती त्या १९७० च्या काळात.. होय मी बोलतोय ते आपल्या गावचे सुपुत्र उच्चविद्या विभूषित श्री दत्तात्रय सदाशिव मांढरे यांच्या विषयी..

श्री दत्तात्रय सदाशिव मांढरे यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४४ चा. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन, सोबत पाच सहा भांवंड, रोजीरोटी शेतीवर अशा परिस्थितीत त्यांचा शिक्षण प्रवास सुरू झाला. त्यांचे वडील, सदाशिव आण्णा त्यावेळेचे अतिशय नावाजलेले पैलवान होते. पण जसजशी मुलं मोठी होऊ लागली तसतशी अण्णांच्या लक्षात आलं की आपल्या पैलवानकी पेक्षा या मुलांच शिक्षण फार महत्वाच आहे. मग त्यांनी त्यांच्या आवडीचा छंद बाजूला ठेवून मुलांच्या शिक्षणावर जातीनं लक्ष दिल. मित्रहो शिक्षणाचा महत्व, त्यावेळी होतं, आजही आहे आणि भविष्यात राहणार आहे. हा विचार त्यावेळेला अण्णांच्या मनात आला ही फार मोठी गोष्ट होती.

१९५० साली अनपटवाडी मध्ये शाळा नसल्यामुळे बापूंनी बावधनच्या प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेतला. पहिल्यापासूनच अभ्यासात चुणचुणीत असलेले दत्तात्रय बापू सातवीच्या केंद्र परीक्षेत बावधन केंद्रामधून ८५ टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आले. फारच मोठी उपलब्धी होती ही मांढरे कुटुंबीयांसाठी ! मुलाच्या या यशामुळे आण्णांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याचवेळी त्यानी निश्चय केला की बापूंना शिकेल तिथपर्यंत शिकवायचं.. 

त्यावेळची आठवण सांगताना बापू सांगतात की या केंद्र परीक्षेत बसण्यासाठी ठराविक हजेरी भरावी लागत असायची. पण शेतीतील कामे भरपूर असल्यामुळे बापू नेहमी गैरहजर असायचे, त्यामुळे आवश्यक हजेरी भरली नाही. केंद्रप्रमुखांनी त्यांना परीक्षेला बसायला नकार दिला. तेव्हा त्यांचे नातेवाईक आणि इतर शिक्षकांनी विनंती केल्यामुळे यांना परीक्षेस बसायला मिळाले. मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं एवढेच नाही तर नियमित विद्यार्थ्यांच्या पेक्षा जास्त गुण मिळवून ते केंद्रात पहिले देखील आले. शिकण्याचा ध्यास मनात जर असेल तर कुठलाही अडथळा तुमचे शिक्षण थांबवू शकत नाही हे याचे उत्तम उदाहरण..

सातवीनंतर हायस्कूल शिक्षणासाठी त्यांनी द्रविड हायस्कूल वाई येथे १९५८ ला प्रवेश घेतला. त्या वेळेला तालुक्यामध्ये या हायस्कूलचे खूप नाव होते. हायस्कूलमध्ये वाई आणि परिसरातील उच्चभ्रू कुटुंबातील मुलं शिकायला असायची. बापूंची शिकायची जिद्द मोठी ! एसटी पास साठी पैसे नसायचे त्यामुळे दररोज अनपटवाडी ते वाई हा आठ किलोमीटरचा प्रवास चार वर्षांसाठी बापूनी पायी केला. त्यांनी किती कष्टाने शिक्षण घेतलं याची प्रचिती यातून येते. द्रविड हायस्कूल मधील सरांचे वर्गमित्र म्हणजे डॉक्टर अभय कानडे, आप्पांचे बंधू बाळ काका, ओझर्डे चे फरांदे हे होत.

१९६५ ला अकरावीच्या म्हणजे मॅट्रिकच्या परीक्षेत बापू ६७ टक्के गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ओझर्डे येथील मित्र फरांदे यांचा प्रथम क्रमांक आल्याचे ते सांगतात. या गुणांची आत्ताच्या गुणांशी तुलना होऊ शकत नाही. कारण एवढे गुण मिळवलेला विद्यार्थी पुढे जाऊन सातारला प्रवेश घ्यायला जातो तेव्हा तिथले प्राचार्य म्हणतात *तुम्ही आमच्या कॉलेजला हा विद्यार्थी म्हणजे गिफ्ट दिले*, यावरून या मार्कांची महानता लक्षात येते. हे त्यांनी अविरत आणि प्रामाणिकपणे केलेल्या कष्टांचे फळ होतं. अण्णांनी मग यांच्या शिक्षणाबाबत मागं पाऊल टाकायचं नाही असा ध्यास घेतला. 

पुढे प्रि डिग्री आणि बीएससी सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी करायची असा ध्यास त्यांनी घेतला होता. आता साताऱ्यात राहायचं कुठं हा प्रश्न होता तसेच शिक्षण खर्चात वाढ होणार होती. त्यावेळेला त्यांचे आवडते शिक्षक प्राचार्य बी एस पाटील यांनी समय सूचक मार्गदर्शन आणि मदत केली. त्यांना रयत शिक्षण संस्थेच्या बरॅक्स हॉस्टेलला प्रवेश मिळवून दिला. महिना ३० ते ४० रुपये खर्च व्हायचा तेव्हा. घरून एवढ्या खर्चाचाही बंदोबस्त व्हायचा नाही कधीकधी ! अशावेळी वस्तीगृहातील मित्र मुरलीधर डोंगरे, यादव, रणखांबे, महाडीक, सावंत व त्यांचे बंधू उत्तम भाऊ यांच्याकडून खूपच पाठबळ मिळाल. यामध्ये राम पवार, मानसिंग जगताप आणि डोंगरे हे त्यांचे खास..

अशावेळी त्यावेळेला मुंबईला असणारे अनपटवाडी चे नागरिक ज्यामध्ये जगदेव विठोबा अनपट, मारुती हरी अनपट, शिवराम साहेबराव मांढरे, रामचंद्र बजाबा अनपट, सर्जेराव केशव अनपट, कृष्णात तुकाराम मांढरे, रामचंद्र तात्याबा मांढरे, लक्ष्मण बजाबा अनपट, बळवंत बयाजी अनपट, विष्णू राजाराम मांढरे व हभप दत्तात्रेय बुवा कळंबेकर (जावळी) या मंडळींनी महिना पाच रुपये वर्गणी काढून त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली हे बापू कधीही विसरत नाहीत. गावकऱ्यांनी केलेली मदत सर्विस लागल्यानंतर त्यांनी गावातील इतर गरजू मुलांना (किसन लक्ष्मण अनपट) दिली तो भाग वेगळा. पुढे किसन अनपट यांनी स्वतः सर्विस लागल्यानंतर ही मदत भीकू आनंदराव अनपट यांना केल्याचे सांगितले जाते. भिकू नानांनी परत त्यांना केलेली मदत पुढच्या पिढीच्या उपयोगासाठी पोपट मास्तर यांच्याकडे जमा केली होती.. याचा अर्थ असा की प्रत्येकाला केलेली मदत त्यांन पुढच्या पिढी तील गरजू ला हस्तांतरित केली होती ..

पण समयसूचक मदत करण्याची भावना या गावच्या लोकांमध्ये सुरुवातीपासूनच होती ती अद्याप टिकून आहे. नोकरीनिमित्त परगावी असलेल्या प्रत्येक गावकऱ्यांच्या मनात गावाविषयी तळमळ तसेच ओढ असतेच. गावच्या विकासासाठी  आपण कमावलेल्या पैशातील काही पैसे खर्च करायचे हा इतिहास आहे. तसं बघायला गेलं तर हा ऐच्छिक विषय असतो.. पण या गावासाठी तो ऐच्छिक राहिलेला नाही.

सुरुवातीपासूनच गणित आणि विज्ञान हे सरांचे आवडते विषय ! त्यातल्या त्यात भौतिकशास्त्र शिकण्यासाठी आवश्यक अशा गणितावर विशेष कल ! त्यामुळे बीएससी साठी त्यांनी तुलनेन अवघड अशा भौतिकशास्त्र विषयाची निवड केली. १९६६ मध्ये बीएससी पदवी प्रावीण्य घेऊन त्यांनी फर्स्ट क्लासमध्ये मिळवली. तीसुद्धा त्यावेळची अतिशय मोठी उपलब्धी होती .. गावाच्या दृष्टीने, पंचक्रोशीच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची गोष्ट होती. मुलाच्या प्रत्येक यशानं हुरळून जाणारा बाप म्हणजेच आण्णा खूपच आशादायी होऊ लागले होते. मुलांन अजून शिकावं हा त्यांचा ध्यास मात्र संपत नव्हता. पण इतर भावंडांच्या शिक्षणाचा खर्च तसेच घरखर्च यामुळे ते त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च तेव्हा राखून ठेवू शकत नव्हते.. ह्या दरम्यान त्यांचे बंधू भाऊ हे मुंबईला गोदी मध्ये रुजू झाले. 'मी शिकलो नाही म्हणून काय झालं माझा भाऊ तर शिकतोय' या भावनेतून लहान असूनही मोठ्या भावाच्या शिक्षणास हातभार भाऊंनी लावला.

त्यामुळे पदवी मिळविल्यानंतर त्यांना सर्विस ची नितांत गरज भासू लागली. त्यावेळी भौतिकशास्त्र विषय घेऊन फर्स्टक्लास मिळवलेले विद्यार्थी दुर्मिळ ! त्यामुळे गुणवत्तेच्या जोरावर त्यांना वाघोली हायस्कूल मध्ये विज्ञान शिक्षकाची सर्विस ताबडतोब मिळाली. त्यांनी जरी तेव्हा तात्पुरती सोय म्हणून सर्विस पत्करली होती तरीही भौतिकशास्त्र विषय घेऊन एम एस सी पूर्ण करण्याची जिद्द त्यांनी कायम सोडली नव्हती. १९६६ ते १९६८ पर्यंत ते वाघोली हायस्कूल येथे कार्यरत होते. त्यांनी ठरवलं असतं तर बी.एड ही करू शकले असते परंतु त्यांना ते करायचं नव्हतं किंबहुना हायस्कूलचे शिक्षक व्हायचं नव्हतं. कायम एम एस सी चा ध्यास समोर होता. 

सायन्स कॉलेज सातारा येथून १९६८ ते ७० या दरम्यान स्पेक्ट्रोस्कॉपी ह्या स्पेशलायझेशन मधून एमएससी भौतिकशास्त्र प्रथम वर्गात मिळवून पूर्ण केली. या ठिकाणी सुद्धा अतिशय जिद्दीने अभ्यास करून त्यांच्या आवडीची पदवी त्यांनी मिळवली होती. एमएस्सी झाल्यामुळे आता वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्यास ते योग्य झाले होते. त्यामुळे एमएस्सी झाल्या झाल्या त्यांना सायन्स कॉलेज सातारा इथेच प्राध्यापक पदाची नोकरी मिळाली. एक शिक्षक म्हणून त्यांना भौतिकशास्त्र विषयातील क्लासिकल मेकॅनिक सारखा अतिशय अवघड विषय शिकवायला आवडायचा. आणि तो विषय त्यांनी कित्येक वर्ष महाविद्यालयात शिकवला. त्यांच्या शिकवण्या मध्ये फार हातखंडा होता. कोणत्याही लेक्चर ते पूर्ण अभ्यास करूनच घेत असत. ते विद्यार्थीप्रिय असे शिक्षक होते.

रयत शिक्षण संस्थेतील त्यांच्या सेवेमध्ये त्यांनी सायन्स कॉलेज सातारा, रामानंदनगर येथील महाविद्यालय, सद्गुरू संत गाडगे महाराज महाविद्यालय कराड, व पनवेल या ठिकाणी अविरत ३४ वर्ष सेवा केली. यातील जवळजवळ २२ वर्षे सेवा ही सातारा येथे केली. सरांच्या स्वभाव वैशिष्ट्या विषयी म्हणाल तर ते अतिशय शांत, मनमिळावू, अभ्यासू, जिद्दी, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या विषयी तळमळीचे तसेच सडेतोड स्वभावाचे होते. शिक्षण किंवा सेवे दरम्यान त्यांनी त्यांच्या अनपटवाडी येथील घराकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. सर्व बहिणींची लग्न, बंधूचा संसार व इतर गोष्टी जातीनिशी बघितल्या. 

त्यांचे समकक्ष मित्र म्हणजे बावधन मधील नारायण विठ्ठल भोसले, आनंदराव पिसाळ, कन्नूर येथील गोपाळ जठार तसेच एम एस सी दरम्यान चे पवार व डोंगरे यांची ते आठवण काढतात. त्यांच्या आवडत्या शिक्षकांमध्ये त्यांचे प्राथमिक शाळेतील रासकर गुरुजी, हायस्कूलमधील नातू, पटवर्धन, यार्डी, व विनायक कुलकर्णी सर या सर्वांच्या शिकवण्याचा आणि आचरणाचा प्रभाव पुढे एक शिक्षक म्हणून व्यक्तिमत्त्व घडत असताना त्यांच्यावर प्रभाव पडला असे ते मानतात. द्रविड हायस्कूल मधील विनायक कुलकर्णी त्यांचे गणित शिक्षक. त्यांच्या क्लासला सर पहिल्या बाकावर बसायचे. उत्तम शिक्षक होते. परंतु बापूंचा खोडकर स्वभाव असा कि ते पहिल्या बाकड्यावर बसूनसुद्धा त्यांच्या वहीमध्ये 'काय रे विन्या गणित शिकवतो वाटतं' अशा पद्धतीची वाक्य लिहायचे. यासाठी त्यांनी शिक्षाही भोगलेलली आहे. सरांमध्ये विनोदी वृत्ती सुद्धा होती याचा हा दाखला. 

त्यांचा स्वभाव अतिशय मितभाषी, निगर्वी व मनमिळवू.. त्यांचं आरोग्यही सुरुवातीपासून अतिशय ठणठणीत त्यांनी राखलेल आहे. 'साऊंड माइंड इन साउंड बॉडी' या उक्तीप्रमाणे.. ते म्हणतात की विद्यार्थिदशेपासून शिक्षकी पेशा पर्यंत आपल्या कार्यकालात एकाही व्यक्तीशी त्यांच भांडण झाल्याचे त्यांना आठवत नाही. किती तो सोशिकपणा, किती तो संयम. त्यामुळे आयुष्यामध्ये शत्रू कोणी नाहीच. किती सांभाळून, समजावून, समोरच्या कलांन वागण्याचे तंत्र त्यांनी अवलंबलं आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये ताण तणाव नाही. अतिशय आनंदात ते अद्यापही जगत आहेत.

ज्या समाजातून आपण आलो, ज्यान आपल्याला मोठं केलं तो समाज अजूनही तिथेच आहे. त्या समाजाला  ज्ञानी आणि प्रगत करायचा असेल तर आपल्या अनुभवाचा, आपल्या ज्ञानाचा व सुयोग्य मार्गदर्शनाचा लाभ व्हायलाच पाहिजे ही त्यांची भावना ! याच कर्तव्य भावनेतून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर, २००९ साली त्यांनी एक्स वायसियंस (सायन्स कॉलेज सातारा, माजी विद्यार्थ्यांची संघटना) या संस्थेची उभारणी केली. सभासदांच्या ठेव रकमेच्या व्याजातून ही संघटना गरजू, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचे काम करते. वेळोवेळी या विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन ठरलेलच.

गावानं जेव्हा-जेव्हा बापूंना मदतीसाठी साद दिली त्यावेळेस सुयोग्य मदत करून बापूंनी त्या संधीचं सोनं केलं, आपल्यातील दातृत्व सिद्ध करून समाजभानास जागले असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामध्ये गावच्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एक लाखापेक्षा जास्त मदत बापूंनी केल्याचे आठवते. अजूनही गावातील तरुण होतकरू मुलांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेता येत नसेल तर त्यांच्यासाठी चाकरमान्या मंडळींच्या मार्फत एखादा फंड उभा करण्याची इच्छा बापूंची आहे. 

सरांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा व मार्गदर्शनाचा अप्रत्यक्षपणे आपल्याही गावाला भरपूर उपयोग झाला. इथले विद्यार्थी प्रेरित झाले. या गावातील माणसं उच्चविद्याविभूषित होऊ शकतात हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. त्यांच्याकडे बघून लालभाऊ, राजूभाऊ, बापूंच्या बहिणी, माझे बंधू दादा पोस्टग्रेज्वेट होऊ शकले. माझ्यासारखा मजूर शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या केशव ने पीएचडी पूर्ण केली ही बापूंच्या प्रेरणेतून ! अजूनही बापूंनी आपल्या गावाशी टिकलेली नाळ कायम ठेवावी आणि इथल्या तरुण पिढीला प्रेरित करावं ही माफक अपेक्षा.. 

बापूंना दिपक, महिंद्र व मंगेश ही तीन मुलं. यापैकी महिंद्रा व मंगेश अभियंता तर दिपकने विज्ञान विषयातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल आहे. सातारा येथील करंजे नाका या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत. मुलेही उच्च शिक्षण घेऊन स्थिरस्थावर झालेले आहेत. त्यांच्या स्नुषा देखील उच्चविद्याविभूषित आहेत. 'आयडियल लर्नड फॅमिली' म्हटलं तर वावगं ठरू नये. वयोमानपरत्वे बापूंना आता गावात प्रत्यक्ष येऊन गावच्या विकासासाठी हातभार लावण शक्य नसेल कदाचित. आशा वेळी त्यांचे तिन्ही चिरंजीव त्यांच्या वतीने हे दातृत्वाचे कार्य पुढं नेऊ शकतात. त्यात आर्थिक योगदानच असावं असं नाही. त्यांचा बहुमूल्य वेळ आणि त्यांच गावात असण हे देखील फार मोठं योगदान ठरू शकेल.

असं हे अतिशय महान आणि अभ्यासू व्यक्तिमत्व हे आपल्या अनपटवाडी गावचं एक अंग आहे. हा माणूस या ठिकाणी जन्म घेऊन या मातीत वाढून एम एस सी आणि प्राध्यापक एवढी त्या काळी जर झेप घेऊ शकत असेल तर तुम्हा सर्व तरुण मंडळींसाठी ही एक प्रेरणा ठरेल. कारण आता शिक्षण आणि आणि आर्थिक सुविधा यांची वानवा नाही. *वानवा आहे ती जिद्दीने अभ्यास करण्याची, निश्चयी स्वभावाची आणि मेहनतीची* ! मित्रहो या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मध्ये आणल्या तर तुम्ही सुद्धा बापूसारखं एक यशस्वी व्यक्तिमत्व होऊ शकता याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो.. बापूंच्या निवृत्तीनंतरच्या यशस्वी, आनंदी व निरोगी आयुष्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.

केशव राजपुरे..



Friday, April 3, 2020

चार्टर्ड अकाउंटंट विजय बाबुराव अनपट


गावातील उच्च विभूषित व्यक्तींचे यादीमध्ये एक नाव आवर्जून घ्यावं वाटतं, की जे तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करतात, ते म्हणजे गावचे भूषण सीए *चार्टर्ड अकाउंटंट विजय अनपट* ..

सीए विजय बाबुराव अनपट हे भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स (आयसीएआय) या संस्थेचे सदस्य आहेत. त्यांना प्रत्यक्ष कर सल्लागार, कंपनी व्यवहार हाताळणी तसेच विविध भागात प्रकल्प सल्लागार अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कामांचा अफाट अनुभव आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही त्यांनी ऑडिटिंग व लेखा क्षेत्रातील सर्वोच्च स्थान मिळवले आहे. एक सामान्य विद्यार्थी ते नामांकित सीए ही अशक्यप्राय उंची त्यांनी स्वकर्तुत्वावर गाठली आहे. येथे मी त्यांची यशोगाथा थोडक्यात मांडत आहे जी पुढील तरुण पिढीस नक्कीच सतत प्रेरणा देत राहील. मित्रहो, तुम्हीही कठोर परिश्रम आणि उत्कटतेने आपले ध्येय साध्य करू शकता. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जगात अशक्य असे काहीही नाही, फक्त 'ते' करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास आपणाकडे हवा.

१९७८ साली सातारा जिल्यातील अनपटवाडी-बावधन (ता. वाई) या छोट्याश्या खेडेगावात त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेला विजय पुढे सिए पर्यंत झेप घेईल असे कुणालाच वाटलं नसावं. अशा वेळी जर एकाद्याचे नशीब तसेच शैक्षणिक गुणवत्ता बलवत्तर असेल तर तो कुठपर्यंत झेपावेल हे सांगणं कठीणच ! त्यांनी शालेय शिक्षण (एसएससी, १९९४) बावधन हायस्कुल मध्ये पूर्ण केले. शाळेत असताना अभ्यासात जरी ते सर्वसाधारण विद्यार्थी असले तरी एक चुणचुणीत, प्रामाणिक, प्रयत्नशील व सक्रिय मुलगा म्हणून त्यांची ख्याती होती. एका ग्रामीण शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यावेळी त्यांची डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्यासाठी आवश्यक आर्थिक परीस्थीती नव्हती. त्यामुळे त्यानंतर त्यांना पारंपारिक पद्धतीने शिक्षण घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. पुढे १९९६ मध्ये ते द्रविड हायस्कूल, वाई येथून 'लेखा व लेखा परीक्षण' हा व्यावसायिक अभ्यासक्रम घेवून बारावी उत्तीर्ण झाले. मला वाटते याच ठिकाणी त्यांचे पूर्णपणे विकसित सीएरुपी वटवृक्षाचे प्रथम बीज रोवले गेले.  अर्थात, 'बारावी' हे चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून करिअर करण्यासाठीची योग्य पात्रता नव्हती. मग १९९९ मध्ये त्यांनी वाईच्या किसन वीर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची बी. कॉम ही पदवी पूर्ण केली. दरम्यान महाराष्ट्र शासनाचा जीडीसीए हा सहकार आणि लेखा क्षेत्रातील डिप्लोमा २००० मध्ये पूर्ण केला. पुढे २००१ मध्ये उच्च शिक्षण घेण्याचा त्यांचा ध्यास त्यांनी कर आकारणी संबधातील कायदे या विषयीतील पदविका (Diploma in Taxation Laws) अभ्यासक्रम पूर्ण करून चालू ठेवला. 

एक चार्टर्ड अकाउंटंट होणं किती कठीण आहे? या प्रश्नाचं उत्तर फक्त ज्यांनी ही परीक्षा दिली आहे तेच देवू शकतील. भारतात एकूण अर्जदारांपैकी जवळपास ५% उमेदवारच सीए परीक्षा पास होतात हे मी ऐकले आहे. यावरून या परीक्षेच्या अवघडपणाची कल्पना यावी. मग प्रामाणिक आणि कष्टाळू विजय यांनी हे 'सिए' परीक्षेच्या शिवधनुष्याचे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हे आव्हान सहज पार करणं शक्य नाही हे ते उमगून होते त्यामुळे सुरूवातीला अपयशाची अपेक्षा होती. सीए च्या अंतिम परीक्षेला जातांना ते एक गोष्ट ठाम करून जात ती म्हणजे 'अपयश नक्की आहे पण यश अशक्य नाही'. कोणालाही अपयश येवू शकत हे मात्र खरं. या दरम्यान २००१ ला सिए साठी आवश्यक नाव नोंदणी करावी लागते ती करून घेतली. या परीक्षेची तयारी करण्यासाठी कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठात काही वेळ घालवला. मला विद्यापीठाच्या अभ्यासिकेत अंतिम सीए परीक्षेची तयारी करणारा तसेच अंतर्गत प्रवासासाठी सायकल वापरणारा विजय आठवतोय. एका परीक्षेच्या वेळी ते अपेक्षित यश संपादन करू शकले नव्हते, त्यामुळे काही काळ ते नाराज होते, प्रयत्न सोडायचा विचार चालू होता. दुसऱ्या पर्यायाचा विचार चालू होता. अशा वेळी मन घट्ट करण्यासाठी, निग्रह वाढवण्यासाठी, या अडचणीतून मार्ग निघतो का म्हणून आम्ही विचार विनिमय केला. अशा परीस्थितीत स्वत:ला कसं सावरायचं आणि प्रयत्न मध्येच का सोडायचे नाहीत याबाबत त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या यशाच्या मार्गक्रमणात मला सहभागी होता आलं. पुढे यश मिळविण्यासाठी त्यांनी निकराची लढाई लढली, शेवटी केलेल्या सर्व पराकाष्टांचे फळ झाले, त्यांना यशाची गुरूकिल्ली मिळाली आणि ते २००३ साली चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) झाले.

सीए झाल्यावर करीयर घडवण्यासाठीच्या संभावनांचा समुद्र त्याच्या समोर होता. पत्त्याच्या पानातील प्रत्येक कार्ड त्यावेळी त्यांच्याजवळ होते. अनेक पर्याय होते. त्यांनी योग्य तो मार्ग निवडला आणि लेखा परीक्षण आणि कर क्षेत्रात सर्वोच्च पातळीचे यश संपादन केले. २००३ मध्ये त्यांनी डिप्लोमा इन इन्फोर्मेशन सिस्टीम ऑडीट (डीआयएसए) ही पदविका पूर्ण केली. सध्या ते अमेरिकेने प्रमाणित केलेले सर्टिफाईड इन्फोर्मेशन सिस्टीम ऑडीटर (सीआयएसए) म्हणूनही कार्यरत आहेत. 

पुढे त्यांनी स्वतंत्र लेखापरीक्षक म्हणून सराव सुरू केला. एक कर सल्लागार म्हणून आपला व्यवसाय किफायतशीर असू शकतो, पण अशावेळी आपणास पूर्णपणे जागरूक असायला हवं.. काम करत असताना आपणास एखाद्या ठिकाणी प्रविष्ट होण्यास अनेक दरवाजे असतात पण बचावास एकच दारवाजा असतो  म्हणून फार सावध आणि सक्षम असावे लागते. सर्व प्रकारची माणसे भेटतात तसेच वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. या सगळ्यातून मार्गक्रमण करत विजय यांनी आपला वेगळा ठसा या क्षेत्रात तयार केलाय. सामाजिक जबाबदारीची त्यांना जाणीव आहे. ते अबु धाबी येथे २००६ ते २००८ दरम्यान एका खाजगी कंपनीत कर सल्लागार आणि लेखापरीक्षक म्हणून कार्यरत होते. या दरम्यान त्यांच्या व्यवसायास एक नवीन परिमाण मिळाले. २०१४ पासून ते नामांकित सीए श्रीयुत जयवंत चव्हाण (www.jbcaasso.com) यांच्या गटात सामील झाले असून भागीदारीत व्यवसाय सुरू आहे. तसेच त्यांची वाई आणि पुण्यात वेगवेगळी प्रशासकीय कार्यालये आहेत. त्यांनी वाई येथे लहान मुलांची उत्पादने असलेले फर्स्ट क्राय डॉट कॉम हे आशियातील सर्वात मोठे ऑनलाइन शॉपिंग स्टोअर सुरू करून व्यवसाईक म्हणूनही कारकीर्द सुरू केली आहे. 

सीए विजय अनपट हे गरीब शेतकरी कुटुंबातील तरुण आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांना एक  प्रेरणा स्त्रोत्र आहेत. त्यांचे आई वडील तसे अशिक्षित, परंतु आपल्या तीनही मुलांनी खूप शिकावं ही त्यांची तीव्र ईच्छा ! विजय यांचे वडील उत्कृष्ट आयुर्वेदिक तज्ञ तसेच नाडीपरीक्षक आहेत,  त्यामुळे सुरवाती पासूनच त्यांच्या घरी आजारी लोकांची रीघ असायची, कदाचीत याचमुळे विजय यांना माणुसकीचे धडे हे लहानपणापासून घरातच मिळतं गेले. तसेच त्यांची आई देखील फार शिस्तप्रिय आहेत, कदाचित याचमुळे विजय यांचा शैक्षणिक प्रवास हा वेळेत यशस्वी झाला. आज विजय यांच्या यशात त्यांच्या आई वडिलांचा सिहाचा वाटा आहे. तसेच पुढं लग्न झाल्यानंतर त्यांच्या धर्मपत्नी चार्टर्ड अकाऊंटंट तृप्ती अनपट यांचीही त्यांना मोलाची साथ लाभली. असं म्हणतात कोणत्याही यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. मला वाटतं याठिकाणी त्यांच्या मातोश्री आणि पत्नी यांचा मोठा सहभाग आहे. समाजातील तरुण व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक तसेच शैक्षणिक मदत ते करत असतात. आपण समाजाचं काही देणं लागतो ही त्यांची नेहमीच भावना असते. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे ते आपल्या मातृभूमीची सेवा करत आहेतच. गावांतील मुलांना शिक्षित करण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहेत. त्यांची ही यशोगाथा पुढील पिढीस नक्कीच प्रेरणादायी ठरेल. एका यशस्वी सिए बरोबरच ते एक चांगल व्यक्तीमत्व आहे आणि अजून माणुसकी जपली आहे. गेल्या दिवसांचा त्यांना विसर पडला नाही. त्यांचं स्वच्छ व ताजेतवाने व्यक्तीमत्व, धाडसी व निस्वार्थी स्वभाव तसेच सहनशील व परोपकारी वृत्ती कुणालाही आकर्षित करणारी आहे. कामाचा एव्हढा व्याप सांभाळून ते ताण तणाव मुक्त आयुष्य जगात आहेत. आपण पहातो की आई-बाबा फार प्रेमाने आपल्या मुलाचे नाव 'विजय' ठेवतात, परंतु हे नाव सार्थकी करणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतके विजय असतात. त्यापैकीच एक आहेत श्री. विजय अनपट ! आपल्या पालकांनी ठेवलेल्या 'विजय' या नावाला शोभेल असे कर्तुत्व त्यांनी केले आहे.

असा आहे विजय अनपट यांचा सिए पर्यंतचा चा यशस्वी प्रवास, मला माहीत आहे त्यांना अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. या प्रवासात त्यांना बऱ्याच अडचणी आल्या, बऱ्याचवेळा द्वेष झाला आणि प्रवास अर्ध्यावर सोडावा का ही मन:स्थिती झाली पण त्यांनी आपला दृढनिश्चय सोडला नाही. आपल्या गावकरी मित्राचे यश पाहून नेहमी अभिमानाने छाती फुलून येते व त्याच्या कर्तुत्वाचा आमच्या अनपटवाडी गावाला व पर्यायाने बावधन पंचक्रोशीला सार्थ अभिमान वाटतो.  त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाने जे स्थान गाठले आहे त्यामुळे बावधन पंचक्रोशीचे नाव आज सर्वदूर पसरले आहे व आम्हास सर्वत्र बहुमान मिळत आहे. विजय अनपट आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि आपल्या भावी कार्यांस शुभेच्छा.

केशव राजपुरे
मोबाईल: 9604250006
rajpureky@gmail.com
rajpure.com
rajpure.blogspot.com

बुवासाहेब सिताराम मांढरे

बुवा दादा, एक बहुआयामी नेतृत्व

६० ते ७० च्या दशका दरम्यान अनपट्वाडी गावात एक प्रभावशाली व्यक्तिमत्व कै बुवासाहेब सखाराम मांढरे अर्थात बुवा दादा अर्थात मांढरे सर हे नावीन्यपूर्ण आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व उदयास आल. त्यांचा जन्म साधारण १९२० ते २५ दरम्यानचा. ब्रिटिश शिक्षणव्यवस्थेत पारतंत्र्याच्या काळात त्यांचं जुनी मॅट्रिक आणि पुढे बारावी पर्यंत शिक्षण झालं. मित्रांनो त्यावेळेची बारावी म्हणजे आत्ताची पदवी म्हणायला काहीच हरकत नाही.
​​
असं सांगितलं जातं की माजी आमदार मदनराव पिसाळ यांच्याविरोधात कम्युनिस्ट पक्षातर्फे १९७० च्या दरम्यान बुवा दादांनी लढत दिली होती. ही लढत मदनराव पिसाळ कधीच विसरले नाहीत कारण यावेळी त्यांचा सहा ते सात मतांनी निसटता विजय झाला होता. आप्पांच्या मतदारसंघात आणि विशेष म्हणजे त्यांच्याच पंचक्रोशीत त्यांच्या गावचा कुणीतरी आप्पांच्या समोर दंड थोपटून उभा होता. ही राजकीय दुश्मनी होती वैयक्तिक जीवनामध्ये ते दोघं चांगले मित्र होते.

माजी खासदार आणि आपल्या तालुक्याचे भूषण माननीय प्रतापराव भाऊ भोसले यांचाही दादांच्या घराशी खूप चांगला घरोबा होता. वाई तालुक्यातील त्यावेळचे इतर तुल्यबळ नेते, कवठ्याचे किसन (आबा) वीर तसेच केंजळ चे बुवासाहेब जगताप यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. क्रांतिसिंह नाना पाटील स्वतः अनपटवाडी गावामध्ये येवून त्यांनी बुवा दादांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांचाही दादांशी कायम पत्रव्यवहार असे. अर्थात गावचे दुसरे सुपुत्र दादांचे समकालीन माननीय दत्तात्रय बजाबा अनपट यांचे समाजकार्य आणि राजकीय नेतृत्व देखील दादा एवढंच तुल्यबळ होतं.. परंतु या दोन नेत्यांची कार्य करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांच्या वाटा शेवटी समांतर रेषा राहिल्या. 

दादा अतिशय उत्कृष्ट इंग्लिश बोलायचे हे आम्ही अनुभवले होते. २००० च्या दरम्यान उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी जेव्हा आपल्या गावी यायचो त्यावेळेला हनुमंत व मी दररोज संध्याकाळी दोन तास इंग्रजी भाषा, वाक्यरचना, व्याकरण याबाबत दादांशी बोलत असू. थोड्याच वेळात त्यांनी आम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन केलेल आहे. त्यांचीही स्पष्ट उच्चार, मराठी शब्दांसाठी असलेले कठीण इंग्रजी प्रतिशब्द हे ऐकुन हा माणूस अनपटवाडी गावातला आहे या गोष्टीवर आमचा विश्वास बसायचा नाही.

तसं बघायला गेलं तर दादांच्या या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा गावच्या विकासासाठी प्रत्यक्ष उपयोग किती झाला या मूल्यांकनात मी पडणार नाही. एवढं मात्र नक्की सांगेन त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या बाजूचा समाज म्हणजे आमचे गावकरी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन काही अंशी त्यांचे अनुकरण करून चांगले व्यक्तिमत्व घडवण्याच्या तयारीला लागले हेही नसे थोडके !

लग्नानंतरचा काही काळ इथे काढल्यानंतर आयुष्यातली जवळजवळ पस्तीस वर्ष ते पुण्यात वास्तव्यास होते. ते इंग्रजी आणि गणित विषया च्या खाजगी शिकवण्या घेत असत. सुरुवातीला त्यांचे शिकवणी वर्ग धनकवडी भागात होते. पुढे शनिवार वाडा जवळ त्यांनी काहीवेळ शिकवणी वर्ग घेतले. आणि नंतर जिजामाता उद्यानासमोर आपल्या नातेवाईकांच्या घरी बराच काळ, शिकवणी थांबेपर्यंत, त्यांनी शिकवणी घेतले. त्यांच्या हातून मार्गदर्शन घेऊन घडलेले विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर्स, अधिकारी अशा उच्च पदावर आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या विषयी आठवण सांगत असताना नेहमी दादांना गहिवरून यायचं. त्यांना त्यांच्याबाबत खूप आदर आणि अभिमान असायचा.

साधारतः २००० ते २०१२ हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा काळ त्यांनी वाडीत आपल्या कुटुंबासोबत घालवला. दादांचे इतकं उच्चविद्याविभूषित, हुशार, तत्वज्ञानी, समाजकारण आणि राजकारण याची जाण असणारे व नेतृत्वगुण ठासून भरलेल व्यक्तिमत्व आपल्या गावातल होतं या सगळ्याचा आपल्याला सार्थ अभिमान हवा. अशा तऱ्हेनं आपल्या गावातील अतिशय चांगलं राजकीय नेतृत्व आता आपल्यात नाही याचं दुःख होतं. 

ही आठवणी भेट दादांचे सुपुत्र पोपट मांढरे तसेच लालाभाऊ आणि भास्कर आबा यांच्या स्मृतीपटलावरून साभार..



केशव राजपुरे

Thursday, March 26, 2020

माती, पंख आणि आकाश माझा अनुभव..

माती, पंख आणि आकाश माझा अनुभव..


माती, पंख आणि आकाश हे भारताचे माजी कौन्सिल जनरल ऑफ न्यूयॉर्क श्रीयुत ज्ञानेश्वर मुळे यांचे जीवन प्रवास वर्णन आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी जवळील अब्दुल लाट च्या *माती*त ते घडले. घडलेल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास (*पंख* लाभले) कोल्हापुरात झाला व त्यानंतर त्यांनी भारतीय विदेश सेवेतील उच्चायुक्तपदी घेतलेली *आकाश* झेप या सर्वांचे यथार्थ वर्णन म्हणजे त्यांचे २२२ पानी आत्मचरित्र. यात वर्णन केलेल्या लेखकाच्या जिप्सी चा प्रवास लाट गावात सुरू होऊन जपानमध्ये संपतो. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन दिपस्तंभा एवढे व्यक्तिमत्व विकसित कसं होतं याचा बोध हे पुस्तक वाचल्यानंतर होतो. ही म्हणजे ग्रामीण भागातील होतकरू आणि हरहुन्नरी विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर यशोगाथा म्हटल्यास वावगे ठरू नये.

हे पुस्तक वाचायला घेतल्यानंतर तीन-चार दिवस लागले पूर्ण करायला. लेखकाचे बालपण, शाळा-महाविद्यालयीन काळ हा अतिशय उत्कंठावर्धक व आपलाच असल्याचा भास असल्यामुळे एका बसनीतच चाळीस ते पन्नास पानं वाचून व्हायची पण नंतर जपानी संस्कृती, तिथली माणसं याविषयी वाचण एवढे जलद व्हायचं नाही. लेखकाचे विचार ऐकून  जमिनीवर पाय ठेवून आकाशाकडे पाहणार एवढे महान व्यक्तिमत्व आपल्यातलच असल्याचा भास होतो. लेखकाने आपल्या पुस्तकातून आलेले अनुभव, आपलं जीवन इतक्या सहजसुंदर भाषेत व्यक्त केलेल आहे ते वाचून वाचकाला त्याहीपेक्षा जास्त व्यक्त होऊ वाटणं हीच लेखकाच्या लिखणातली जादू आहे.

लेखकाने ७० च्या दशकात सांगली जिल्ह्यातील मिरज जवळ असलेल्या आपल्या आजोळापासून, १९८८ पर्यंत जपानमधील तोक्यो येथील भारतीय दूतावासातील त्यांच्या सचिवपदाच्या कार्यकालातील अनुभव सर्वांग सुंदर भाषेत मांडलेला आहे. बालपणीचे अनुभव, खेड्यातले जीवन, गरीबी, आजोळच्या आठवणी, घरातील वातावरण, कुटुंबातील सर्व व्यक्ती, प्राथमिक शाळा, त्यांचे तेव्हाचे सर्व शिक्षक, गावातील पाण्याचा तलाव, विहिरीतलं मनसोक्त पोहण या सर्वांच आठवणरुपी चिंतन लेखकानं सुरुवातीला केलेल आहे. खेड्यात  जन्मलेल्या सर्वसामान्य मुलाची कथा जणू.. सर्व गोष्टींचे इत्थंभूत वर्णन ! आणि त्याच कारणामुळे वाचकाला हे आपल्याच बालजीवनाचं वर्णन असल्याचा भास होतो. पुस्तक वाचकाच्या इतक्या जवळ जातं की ते संपल्याशिवाय सोडण्याची इच्छा होत नाही..

लेखक दहा वर्षाचे असतानाच त्यांनी कोल्हापुरातील विद्यानिकेतन या त्यावेळी नव्याने सुरु झालेल्या निवासी शाळेत प्रवेश मिळवला. सर्वांसाठी लेखकांन शहराच्या ठिकाणी जाऊन परिश्रमपूर्वक चांगले व्यक्तिमत्व घडवावे हा कयास ! पण लेखकासाठी माहेरवासनीने सासरी जाताना घेतलेल्या निरोपाच्या वर परिस्थिती.. शिक्षणानिमित्त बाहेरगावी जाताना खेड्यातील मुलाच्या मनातील गावची ओढ तसेच शिक्षणासाठी मनावर ठेवा लागणारा धोंडा आणि त्याचा कासावीस झालेला जीव हे बारकाईने टिपले आहे. शाळेची प्रवेश परीक्षा, मुलाखत तसेच निकालाचे वर्णन संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभा करते. हे वाचत असताना मला तरी माझ्या कोल्हापुरातल्या पहिल्या दिवसांची आठवण झाली.

विद्यानिकेतन मध्ये असताना त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची चांगली सवय जडली. वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणे त्यांच्या जीवनावर कसा परिणाम करून गेली हे लेखक सांगायला विसरत नाही. त्यांच्या शाळेतील शिक्षक; त्यामध्ये सावंत सर व संस्कृत विषयाच्या शैला अग्निहोत्री मॅडम, प्राचार्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर झालेला परिणाम आणि संस्कृत विषयातील मानाची 'शंकर शेठ शिष्यवृत्ती' पटकावल्याचे तपशीलवार वर्णन लेखक या खंडामध्ये करतो. तसं निवासी शाळेत राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आलेले अनुभव लेखक यामध्ये कथन करतो. लेखिकाच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा परिवर्तनाचा काळ कुठला असेल तर तो विद्यानिकेतन मधील काळ असे मला वाटते. हाच तो काळ ज्यावेळी लेखकांमध्ये प्रामाणिकता, शिस्तप्रियता, अभ्यासूपणा तसेच जीवनात काहीतरी करण्याची जिद्द या सर्वांचे नव्याने घट्ट रोपण झाले.. मॅट्रिक परीक्षेपेक्षा संस्कृत विषयातील शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळवल्याचा आनंद हा श्रेष्ठ होता याचा उल्लेख केला आहे. यातून त्यांची अभ्यासातील प्रतिभा, घेतलेले कष्ट आणि परिश्रमावरील भक्ती हे गुण प्रतीत होतात.

पुढे लेखक कोल्हापुरातील एका महाविद्यालयात इंग्रजी विषय घेऊन पदवी परीक्षा विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतो. प्रतिभा आणि जिद्दीला कुठेही कमतरता नव्हती.. जिथे जाईल तिथे उत्कृष्टता मिळवायचीच हाच लेखकाचा ध्यास.. आपल्यातील ज्ञानरूपी प्रतिभेचा आपण ज्या समाजातून आलो त्या समाजासाठी उपयोग व्हायचा असेल तर शासनाच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन नागरी सेवेमध्ये सेवा करणे हे एक नजीकचे ध्येय त्यांनी त्या वेळेला ठेवल होत. त्यासाठी कोल्हापुरात राहून प्रयत्न अपुरे पडणार होते याची त्यांना नंतर जाणीव झाली.. म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी ते मुंबईला गेले. तिथे अभ्यास करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना झालेली मदत, तिथले अनुभव, मार्गदर्शक, मित्र या सर्वांचा लेखाजोखा लेखक पुस्तकामध्ये मांडतो.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन नागरी सेवांमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक नवख्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक अनुभव म्हणून याच्याकडे बघायला काही हरकत नाही. पूर्व परीक्षा, त्यानंतरची मुख्यपरीक्षा, त्यातील मुलाखत या सगळ्यांचं सूक्ष्म वर्णन लेखक करतो तेव्हा आपण खरोखर त्या कक्षात उपस्थित राहून लेखकाची मुलाखत बघतोय की काय असा भास होतो.. हे वर्णन म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अनुभवाची कुपी म्हणायला हवी. लेखक स्वतः पुण्यामध्ये उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी भारतीय विदेश सेवेतील अधिकारी पद प्राप्त केले या सगळ्यांचे वर्णन रोमांचकारी..

पहिली पोस्टिंग जपानमध्ये होते. तिथे सोबतीला घरकाम मदतीसाठी आपला मारुती नावाचा गावातील मित्र त्यांनी निवडला. आपल्याबरोबर आपल्याच भागातील इथपर्यंत येऊ न शकलेल्या आपल्या मित्राला जगाच्या त्या कोपऱ्यातील संस्कृतीची, प्रदेशाची माहिती व्हावी हा लेखकाचा रास्त हेतू दिसतो. मारुतीला जपानला नेतनाच्या सर्व प्रसंगांचे तपशीलवार वर्णन यात केलेले आहे. यामध्ये भारतीय माणूस आपल्या स्ववलयातून बाहेर पडायला सहजासहजी तयार होत नसतो हे यात पटवून दिलेले आहे. प्रगती करायची असेल तर समोरची संधी नाकारून मी आहे त्या ठिकाणीच बरा ही मानसिकता सर्व भारतीयांनी सोडायला पाहिजे हा संदेश यातून लेखक देतो. जपान मधली माणसं, त्यांची संस्कृती, समाजव्यवस्था, सणवार, इतिहास, त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली प्रगती, ते आर्थिक महासत्ता का आहेत या सगळ्याचे बारकाईने वर्णन केले आहे. रवींद्रनाथ टागोरांची जपान भेट, त्यांची कविता रुपी आठवणी आणि इतर गोष्टी हे एक जपानी वयोवृद्ध आपल्या पोटच्या लेकरा सारखी सांभाळल्याचा उल्लेख जेव्हा लेखक करतो तेव्हा पापण्यांच्या कडा ओलावल्या शिवाय रहात नाहीत. मैत्रीसंबंध, भावनांची कदर आणि नाती जपणं हे जपानी माणसाच्या कडून च शिकावं !

जपान मधील वेगवेगळ्या भूकंपांचे वर्णन तपशीलवारपणे लेखकाने दिलेले आहेत. प्रत्येक भूकंप महाभयंकर असला तरी तेथील नागरिक या भूकंपाना सरावलेले आहेत कारण त्यांना त्यांच्या वास्तु रचनेवर पूर्ण विश्वास आहे.. जपानमधील भूकंप आणि भारतातील भूकंप याची तुलना लेखन करायला विसरत नाही. नैसर्गिक संकटांना तोंड देण्याच्या दृष्टीने आपणाकडे का नाही होत अशी प्रगती? जपान मधील दिवस भारतात यायचे असतील तर काय व्हायला पाहिजे हे त्यांच्या निरीक्षणांवरून समजते.

जपानमध्ये लेखकाचे पुस्तक एकदा एका बस मध्ये विसरलेले होते. ते विसरलेले पुस्तक, त्या पुस्तकात बुकमार्क केलेल्या एका विजिटिंग कार्ड च्या पत्त्यावरून लेखकापर्यंत तिसऱ्या दिवशी पोहोचवल गेलं यातून जपानमध्ये अस्तित्वात असलेल्या शिस्तबद्धतेचा एक वेगळा नमुना वाचायचा मिळतो.
जपान मधला माणूस आपल्या ज्ञानाचा उपयोग अभिनव आणि नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी कसा करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी वर्णन केलेल्या पोलिसांना सापडलेल्या एका जपानी जंगली माणसाचं होय. हा मनुष्य कित्येक वर्षे पान्याखाली राहतो, तिथे स्वतःचं अस्तित्व विश्व तयार करतो, स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी तंत्रशुद्ध पद्धतीने तयार करून पाण्याखाली कित्येक वर्षे जिवंत राहतो, हे काय सांगते ? प्रगत जपानी बुद्धीमत्तेच गुणवैशिष्ट !

जपानमध्ये वाहन चालकाच्या परवाना मिळवणे किती अवघड गोष्ट आहे हे त्यांनी अतिशय विस्तृतपणे सांगितले आहे. बहुदा भारतामध्ये वाममार्गाने हे परवाने मिळवले जातात आणि त्याचा परिणाम आपण रस्त्यांवर घडणाऱ्या सर्व प्रकारच्या अपघातांमध्ये बघतो. जपानमधील परवाना पद्धत भारतामध्ये का सुरू होत नसावी ? हा मलाही पडलेला प्रश्न आहे. जपानमधील फुजियामा पर्वत, त्यांचे साहित्य व कला या सर्वांची तोंडओळख लेखक विस्तृतपणे करून देतो आणि एक प्रकारे वाचकाला जपानची सहल घडवून आणतो.

मला वाटते लेखकाच्या जपानमधील तीन वर्षांच्या सेवेनंतर त्यांच्या आई-वडिलांची तोक्यो भेट, त्यांचे विमानतळावरील आगमन आणि तिथे घालवलेला वेळ याचे वर्णन म्हणजे या पुस्तकाचा आत्मा ! पृथ्वीतलावरील नवनवीन प्रदेश, विज्ञानाने केलेली प्रगती, गगनचुंबी इमारती, महाकाय प्रकल्प आपण अभ्यासात शिकतो व योग आला तर बघतो देखील. पण हे सर्व आपल्या आई-वडिलांना दाखवण्याचा योग ज्याला येतो त्याच्यापेक्षा भाग्यवंत दुसरा कोणी असू शकत नाही. लेखक खूप भाग्यवान आहेत. यावेळी  त्यांच्या आई - वडिलांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे केलेले वर्णन वाचताना वाचक त्यांच्यामध्ये आपल्या आई-वडिलांना पाहिल्याशिवाय राहत नाही.

भारतीय विदेश सेवेत रुजू होण्याअगोदर भारताचे ग्रामीणदर्शन व खेड्यातील समस्यांची जाण या अधिकाऱ्यांना व्हावी म्हणून त्यांची उत्तर प्रदेशमधील मसूरी या थंड हवेच्या ठिकाणी काही काळासाठी प्रशिक्षण पोस्टिंग असते. या काळात लेखकाला देशाच्या दुसऱ्या भागातील ग्रामीण जीवनाची व तेथिल समस्यांची नव्याने ओळख झाली. समाजव्यवस्था आणि समस्यांमध्ये लेखकाचे मुळगाव आणि हा प्रदेश यामध्ये फारसा फरक नव्हता. लेखकाच्या मते खेडेगावात घडलेल्या त्याच्यासारख्या व्यक्तिमत्वाला ग्रामीण दर्शन कशासाठी ? इथली समाजव्यवस्था व समस्या अवगत करूनच लेखक तिथपर्यंत आलेला असतो. यावेळी गावातील एका मनोरुग्ण तरुणाची कथा अतिशय विस्तृतपणे सांगून आपल्या समाजव्यवस्थेवर सरंजामशाही तसेच बरबटलेल्या मानशिकते बरोबर जातिव्यवस्थेचा अजूनही पगडा कायम असल्याचे निदर्शनात आणतो.

हे सर्व करत असताना लेखक भारतातील आणि प्रगत देशातील शासन व्यवस्था यांची तुलना करतो. आपल्याला प्रगत देशाच्या यादीत जायचे असेल तर काय व्हायला पाहिजे ही नकळतपणे वेळोवेळी सांगून जातो. भारतासाठी परिवर्तन ही काळाची गरज आहे. पण फक्त शासन व्यवस्था बदलून हे परिवर्तन होणे अशक्य आहे हेही नकळतपणे जाणवते. बदलायला पाहिजे तो समाज आणि त्यांचे विचार.. आणि हा मूलभूत बदल व्हायचा असेल तर भारतातील शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे असे लेखकाला वाटते. आपल्या देशात सामाजिक विषमता दूर करण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत. भारतातील खेड्यांमधील जातीयता, जातीयतेच्या नावावर केली जाणारी छळवणूक पूर्णपणे थांबायचे असेल तर समाजात मानवी मूल्यांचे रोपण करणे आवश्यक आहे.

लेखक जगाच्या कुठल्याही कोण्यात असला तरी त्याची गावची नाळ तुटलेली नाही. ग्रामीण जीवन त्यांच्या नसानसात भरलेल आहे. कोल्हापूर आणि कोल्हापूर मधील ठिकाणांचे यथार्थ वर्णन लेखकाने यांमध्ये केलेल आहे. यामध्ये पंचगंगेचा पूर असेल, त्यांनी रंकाळयामधील पैलतीरावर पोहून जाऊन पैज जिंकल्याचा प्रसंग असेल, त्यांच्या शिक्षकांच्या सोबत पुरातून पुलावरून पैलतीर गाठल्याचा बाका प्रसंग असो, त्यांच्या जीवनातील नीलंबरी असो या सर्वांचे वर्णन म्हणजे प्रत्येक कोल्हापूरकरांसाठी आपल्या मातीच्या गौरवाप्रमाणे..

लेखक आपल्या आत्मचरित्राचा शेवट जपानमधील सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जतन करून ठेवलेल्या मंदिराला दिलेल्या भेटीने करतो. सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यू बाबतच्या काही गोष्टींचा खुलासा हे वाचल्यानंतर होतो. सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा जपान मधील माणसांना एवढा अभिमान वाटत असेल तर तो भारतीयांना तितका का वाटत नसावा या विचाराने मन कासावीस होते..

प्रत्येक प्रसंगातील सूक्ष्म निरीक्षण, सामाजिक समस्यांवर केलेले परखड भाष्य, भावनावश करायला लावणार लिखाण आणि त्यावर मांडलेले लेखकाचे स्वतःचे विचार, पुस्तक आणखीन एकदा वाचायला प्रेरित करत. हे आत्मचरित्रात्मक म्हणजे लेखकाच्या अनेक ललित लेखांचा सुसूत्र पद्धतीने मांडलेला समूह आहे. प्रत्येक वेळी लेखक वाचकांना सिनेमाच्या कथेप्रमाणे लिखाणातील सातत्याला धक्का न पोहोचवता फ्लॅश बॅक मध्ये घेऊन जातो. एक सहज सुंदर अनुभव..

लेखकाने जपान बरोबरच रशिया, मॉरिशस, दमास्कस, सीरिया, मालदीव तसेच अमेरिका येथेदेखील उच्चायुक्त पदी काम केलेले आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागातील संस्कृती, तिथे त्यांना आलेले अनुभव व त्यानिमित्ताने त्यांचे बहुमोल विचार त्यांच्या पुढील लेखनातून वाचायला नक्कीच आवडेल. आमच्यातील माणसाने आमच्यासाठी तयार केलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे लेखकाच्या माती, पंख आणि आकाश मधील मुक्त लिखाण असे वाटते. यासाठी लेखक ज्ञानेश्वर मुळे यांचे मनःपूर्वक आभार आणि त्यांच्या पुढील सर्व लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा..

डॉ. केशव राजपुरे
कोल्हापूर
२६.०३.२०२०
मोबाईल: ९६०४२५०००६

Tuesday, March 3, 2020

उत्कृष्टता

उत्कृष्टता

माणसांन स्वसमाधानासाठी नेहमी उत्कृष्टतेचा पाठलाग करावा असं म्हटलं जातं.. कुठलीही गोष्ट करत असताना मीही या तत्वाचा अवलंब करत असतो. उत्कृष्टता म्हणजे काय आणि ती कशी ठरवायची तसेच तिचा कसा पाठपुरावा करायचा याबाबत एक किस्सा सांगितला जातो.

एका मंदिराच्या बाहेर एक मूर्तिकार दगडाची एक मूर्ती घडवत होता. आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच्या जवळ हुबेहूब तशीच एक मूर्ती बाजूला होती. तेथून जाणाऱ्या एका खोडकर व मजेदार प्रवाशाने त्याला विचारले की तुम्हाला अशाच दोन मूर्ती बनविण्याची ऑर्डर मिळाली आहे का ?

त्यावर तो मूर्तिकार उत्तरतो - नाही, मला एकच मूर्ती घडवायची आहे. काय झालंय की ही साधारण साडेतीन फुटाची मूर्ती आहे. पलीकडच्या चौकात वीस फुटाच्या खांबावर ही मूर्ती बसवायची आहे. ही पहिली मुर्ती तुम्ही बघत आहात त्या मूर्तीच्या नाकावर एक छोटासा ओरखडा आहे. तो ओरखडा मला सतावत आहे तसेच तो काढायचा कसा यावर मी विचार करत होतो. बराच वेळ झालं ही गोष्ट मला मनातल्यामनात खात होती. म्हणून मी ही मूर्ती नव्यानं घडवायचा निर्णय घेतला.

मित्रहो, जवळजवळ तेवीस फूट उंचीवर असणाऱ्या दोन इंचाच्या नाकावरील ओरखडा राहिला असता तरी काही फरक पडला नसता. तसेच लांबून तो दिसलाही नसता. जातिवंत मूर्तिकारांच्या नजरेला ही गोष्ट स्पष्ट दिसत होती व त्याच्या मनाला पटणार नव्हती. ही छोटीशी चूकसुद्धा दुर्लक्षित करायला त्याचं मन धजावत नव्हतं. मूर्ती घडवण्याच्या कार्यातून त्याला मिळणारा आनंद ओरखडा जाईपर्यंत मिळणार नव्हता. 

म्हणून तो आपल्या कामातील उत्कृष्टतेचा शोध घेत होता. त्याला माहित होते की जोपर्यंत त्या कामात उत्कृष्ठता गाठत नाही तोपर्यंत त्याला स्वत: ला समाधान मिळणार नाही.

तुमच्या आयुष्यात तुम्ही करत असलेलं कोणतेही काम हे मूर्ती घडवण्या सारखेच आहे. कामातून स्वानन्द मिळवायचा असेल तर नाकावर लहान ओरखडाही नाही याची खात्री करा. आपल्याला खरोखरच यातून अनमोल आनंदप्राप्ती होईल.

© केशव राजपुरे

Sunday, February 23, 2020

विद्यार्थी घडवतानाचे विचार मंथन

​​पीएचडी विद्यार्थ्यांना फक्त विशेषज्ञ नव्हे तर विचारवंत होण्यासाठी प्रशिक्षण द्या

बर्‍याच डॉक्टरेट अभ्यासक्रमामध्ये गंभीर विचारवंतांपेक्षा सामान्यपणे केंद्रित संशोधक तयार करण्याचे उद्दीष्ट ठेवतात. ते बदलू शकते आणि बदलणे आवश्यक आहे, असे गंडुला बॉश या लेखामध्ये म्हणतात. 

अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा उत्पादक संशोधक घडवण्याच्या दबावामुळे संस्थांनी त्यांच्या अभ्यासक्रम एकतर कमी केलेले आहेत किंवा पिळवटून टाकलेले आहेत. बाल्टिमोर येथील हॉपकिन्स विद्यापीठात त्यांना मायक्रोबायोलॉजी संशोधनातील यंत्रणेत अचानक झालेल्या नुकसानीची जाणीव झाली. यासाठी त्यांनी आर ३ प्रकल्पाची अंमलबजावणी केली. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी मध्ये त्यांनी परत एकदा फिलॉसॉफी ठेवण्याचा प्रयत्न केला. 

या आर ३ प्रकल्पा मध्ये रीजर्वेस ट्रेनिंग विथ रिस्पॉन्सिबिलिटी फोर रिप्रोडक्टिविटी हे तत्व अवलंबले आहे. या गोष्टीचा त्यांना चांगला परिणाम बघायला मिळालेला आहे.. 

तसं बघायला गेलं तर आपण देखील संशोधक विद्यार्थ्यांमध्ये संशोधन संस्कृती रुजवण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना चुका कश्या टाळता येतील हे ओळखण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याने उत्कृष्टतेचे अनुसरण केले पाहिजे. त्यांनी योग्य साहित्य सर्वेक्षण केले पाहिजे. त्यांनी संशोधनाची समस्या अचूकपणे परिभाषित करुन समजून घ्यावी. त्याने प्रयोगशाळेच्या बैठका, सादरीकरणे, चर्चा, परिषदांमध्ये सकारात्मक सहभाग घ्यावा.

शैक्षणिक आवडी व ध्येय बाजूला सारून नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. यामुळे विद्यापीठाच्या संशोधन निर्देशांकात नक्कीच सुधारणा होईल. यामुळे समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होईल.

विज्ञानाने केवळ स्वत: ची दुरुस्ती न करता स्वत: ची सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या वाक्याने या लेखाची सांगता होते.. खूप मोठा अर्थ दडला आहे यामध्ये... Don't create copy cats, train think tanks.



Friday, February 7, 2020

दीपा महानवर सर

।। महानवर सर ।।

आज लोणंद येथील तेव्हाच्या सायन्स कॉलेज लोणंद चे प्राचार्य आदरणीय महानवर सर त्यांचा चतुर्थ पुण्यस्मरण दिन ! मी आज जो कुणी आहे त्या सगळ्याच सर्व श्रेय आदरणीय महानवर सरांना जातं असे मी मानतो. बारावीला ८२ टक्के गुण मिळवूनही इतरत्र प्रवेश न घेता मी जेव्हा लोणंद महाविद्यालयात बीएससी साठी पारंपारिक शिक्षण घेण्यास प्रवेश घ्यायला गेलो तेव्हा माझ्या परीस्थितीची सरांना बरोबर जाणीव झाली. माझ्यातील चमक व हुशारी कदाचित सरांनी हेरली असावी तेव्हा ! त्यात मी सरांच्याच, म्हणजे वाई तालुक्यातील त्यामुळे आणखीन जवळीकता वाटली असावी. प्रवेश घेण्यासाठी माझे दाजी कै सदाशिव शिर्के यांनी मला जेव्हा त्याची भेट घालून दिली त्यानंतर सरांनी खात्री दिली की हा मुलगा पुढे जाऊन आपल्या सर्वांसाठी काहीतरी नक्की करेल. तो ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत उदाहरण ठरेल. त्यामुळे केशवची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर दाजी तुम्ही पुढाकार घेऊन त्याला आर्थिक पाठबळ पुरवाव, तो या गोष्टीच पांग नक्कीच फेडेल. ती गोष्ट दाजींना तेव्हा पटली आणि त्यांनी सरांना शब्द दिला की इथून पुढं मी माझ्या म्हेवण्याच दातृत्व स्वीकारलं आणि आपण जसं म्हणताय तसं त्याच्यातल्या गुणवत्तेला आपण वाव देऊया. तुम्ही त्याला मार्गदर्शन आणि व्यासपीठ उपलब्ध करून द्या मी त्याच आर्थिक दृष्ट्या समर्थन करतो. अशाप्रकारे माझा लोणंद महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झाला आणि मी नव्या उमेदीने पदवीचे शिक्षण घ्यायला लागलो.

१९८९ ते १९९२ या लोणंद येथील माझ्या महाविद्यालयीन जीवनात सरांचे योगदान खूप मोठे आहे. स्वतः प्राचार्य असून देखील सर नेहमी माझी जातीनिशी चौकशी करत. मला लागणारे प्रश्नसंच, पुस्तक, नोट्स हे मी मागण्या अगोदर सर देण्याची व्यवस्था करत. एक पालक ज्या पद्धतीने आपल्या पाल्याची सर्वांगीण जबाबदारी घेतो तशी जबाबदारी सरांनी घेतली होती. माझ्या अभ्यासाविषयी वारंवार चौकशी ठरलेली. शिक्षकांच्या अध्यापनाच्या पद्धतींबद्दल अभिप्राय घ्यायचे. सुदैवाने तेव्हा आम्हाला लाभलेले सर्वच शिक्षक अतिशय तन्मयतेने आणि प्रामाणिकपणे सेवा बजावत त्यामुळे कुणाविषयीच तक्रार करण्याची वेळ आली नव्हती. माझ्या सर्व शिक्षकांना विद्यापीठाच्या मागील प्रश्नपत्रिका माझ्याकडून सोडवून घ्यायच्या सूचना असायच्या. तसं बघायला गेलं तर मी इतर विद्यार्थ्याप्रमाणे सामान्य विद्यार्थी ! पण सरांनी मला विशेष महत्वाच्या व्यक्तीसारखी वागणूक दिली. त्यामुळे शिकत असंताना माझ्यासारख्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्याला संकोचित वाटायचं.. या सर्व कठोर परीश्रमाचे फलस्वरून म्हणून मी बीएससी च्या तिन्ही वर्षात विद्यापीठाच्या परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवू शकलो. मी विद्यापीठात कितवा क्रमांक मिळवला हे जाणण्यासाठी ते नेहमी उत्सुक असायचे. मी नेहमीच गुणवत्ता यादीच्या शीर्षस्ठानी असावं ही त्यांची अपेक्षा !  

मी ज्यावेळेस महाविद्यालयात प्रवेश घेतला होता त्यावेळेला महाविद्यालय विनाअनुदानीत होते. महाविद्यालय पूर्णपणे अनुदानित करण्यासाठी महाविद्यालयाचा गुणांक कसल्याही परिस्थितीत वाढवला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. हे करत असताना विद्यापीठ पातळीवर जर महाविद्यालयातील विद्यार्थी चमकले तर ही गोष्ट महाविद्यालयाच्या दृष्टीने फायद्याची होती. सरांनी स्वतःचे स्वप्न मी किंवा नौकुडकर मॅडम सारख्या विद्यार्थ्यांच्या मार्फत पूर्ण करून घेतलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सरांच्या मधील जिद्द, चिकाटी, येनकेन प्रकारे कुठलेही कार्य पूर्ण करून घेण्याची तळमळ यातून व्यक्तिमत्व घडवणार एक महान व्यक्तिमत्त्व मी सरांच्यामध्ये अनुभवलं. त्यावेळेला महाविद्यालयाला टप्प्याटप्प्याने अनुदान मिळायच.  सुरुवातीला २५ टक्के नंतर ५० टक्के आणि मग शेवटी पूर्ण अनुदान.. मी जेव्हा १९९२ साली बीएससी च्या परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला त्याचा परिणामस्वरूप म्हणा त्यावर्षी महाविद्यालयाला शंभर टक्के अनुदान प्राप्त झाले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की हे अनुदान मिळणाऱ्या घटकांचा मि सुद्धा एक भाग होतो.

बीएससी झाल्यानंतर पुढे शिक्षण घेण्याची परिस्थिती नव्हती. किंबहुना मी कुठेतरी नोकरी शोधून घर खर्चाचा बोजा उचलावा अशी गरज होती. पण सरांनी माझ्यातलया गुणवत्तेला वाव देऊन माझ्याकडून जास्तीत जास्त अर्कित करण्याचा ध्यास मात्र सोडला नव्हता. त्यांच्या सांगण्यावरूनच मी पुढे एम एस सी प्रवेशासाठी विद्यापीठात अर्ज केला. विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम आल्यामुळे माझा प्रवेश पहिल्या क्रमांकाला झाला. विद्यापीठात आलो तरी सरांचं माझ्यावरच लक्ष कमी झालं नव्हत. काय मार्गदर्शन ठरलेल, कायम चौकशी ठेवलेली, नेहमी पत्र लिहून माझ्यातील आत्मविश्वास व जिद्द टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचे सर.. विद्यापीठात आले की विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक तसेच विद्यापीठ अधिकार मंडळातील सदस्य यांच्या ओळखी करून द्यायचे. नेहमी मला माझ्या ध्येयाचे स्मरण करून द्यायचे. केशव आपल्याला पीएचडी व्हायचय - कितीतरी वेळा सर बोलले असतील. 
बीएससी ला लोणंद येथे असताना मी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला होता. सरांची इच्छा होती यासाठी माझा उचित सन्मान आणि गौरव व्हायलाच पाहिजे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते सत्कार करावा हे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले कारण मध्यंतरीच्या काळात पवार साहेबांची तारीख मिळाली नाही व सरांची रामानंदनगर येथे बदली झाली. मग सरांनी त्यांच्या या मानसाविषयी रामानंदनगर येथील महाविद्यालय निवडले. आणि तत्कालीन सहकार मंत्री आदरणीय आमदार पतंगराव कदम यांच्या हस्ते त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात माझा सत्कार घडवून आणलाच. 
सरांच्या मधील पद्धतशीरपणे, टापटीप, वक्तशीरपणा, तत्परता आणि प्रामाणिकपणा हे सर्व गुण माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी हवेहवेसे.. अभ्यासाव्यतिरिक्त जीवनावश्यक मानवी मूल्यांचे रोपनही सरांनी माझ्यामध्ये केले. विशेषता माझ्यातील खेळाच्या वेडाचे सरांनी नेहमी समर्थन केले. केशवने एक अष्टपैलू व्यक्तिमत्व घडावे यासाठी सर नेहमी प्रामाणिक प्रयत्न करत असत. सरांच्या या क्रियाकलापाचा मला मात्र खूप फायदा झाला. त्यामुळे माझ्यातील गुणवत्तेला वाव मिळाला व मी माझ्यातील आत्मविश्वास पुन्हा एकदा शोधून काढला. आज सर आपल्यात नाहीत पण सरांनी घडवलेलं अनेक केशव आजूबाजूला आहेत. सरांचे विचार आणि कार्य अजूनही या सर्वांच्या माध्यमातून करून घेणं चालू आहेच. मला माहित नाही की समाज सुधारणेविषयीची त्यांची पातळी आम्ही गाठू शकतो की नाही, परंतु सर आपण सोपवलेली शिक्षक रुपी मशाल पुढे नेण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.

याप्रसंगी सरांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली !!

- केशव राजपुरे 
(६ फेब्रुवारी २०२०)

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...