Wednesday, April 15, 2020

भास्कर तानाजी अनपट




डायनॅमिक पोलीस उपनिरीक्षक भास्कर ताना​​जी अनपट

समाधानी, निर्मळ मनाचे, परिश्रमी, परोपकारी, स्वावलंबी, मृदू आणि विवेकशील हे सर्व सद्गुण एकाच माणसात सापडतील असं व्यक्तिमत्त्व म्हणजे पोलीस खात्यामध्ये प्रदीर्घ निरंतर ३८ वर्षे सेवा बजावून उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले गावचे आणखी एक अजातशत्रू व्यक्तिमत्व; भास्कर तानाजी अनपट तथा आबा.

त्यांचे स्पष्ट व्यवहार, मृदू वाणी, नम्रता, कुटुंबवत्सलता आणि विवेक हे गुण त्यांच्या आई शकुंतला यांच्याकडून आलेले ! समाजात वावरतानाचं आदर्श व्यक्तीमत्वाची देन लाभलेल्या आबांना घरची सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असताना देखील शिकताना किंवा नोकरी मिळवताना खूप परीक्षेचे क्षण आले नाहीत. तसा आबांना जीवनात अस्तित्वासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला नाही. पण त्यांनी संघर्ष केला नाही असेही नाही.

आबांचा जन्म १४ जुलै १९५६ चा ! कै तान्याबा केशव अनपट हे त्यांचे वडील. त्यांच्या सर्व भावंडांत (आठ बहिनी व दोन भाऊ) आबा थोरले ! त्यांचं एकत्रित कुटुंब होतं. त्यावेळेसही गावात शाळा नसल्याने ते बावधन येथे प्राथमिक शाळेमध्ये पहिली तेे तिसरी शिकले. पुढे १९६४ मध्ये अनपटवाडी शाळा सुरू झाल्याने चौथी अनपटवाडी इथे किसन भोसले गुरुजींच्या हाताखाली पूर्ण केली. ५ वी साठी प्राथमिक शाळा बावधन येथे वारी.. त्यावेळचे शिक्षक ननावरे व कुलकर्णी गुरुजी यांच्या स्मृतीत आहेत. सातवी केंद्र परिक्षा १९६९ ला उत्तीर्ण झाल्यावर पुढील सर्व शिक्षण त्यांनी बावधन हायस्कूल, बावधन मध्ये पूर्ण केले. हा त्यांचा काळ अतिशय मौजमजेचा.. त्यावेळी त्यांना मराठीला चव्हाण मॅडम, इतिहासाला जाधव सर, विज्ञानाला डांगे सर व धेडे मॅडम तसेच गणितास कोडबुले सर असल्याचे ते सांगतात. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वीचे शिक्षक निव्वळ महान स्मृतीच्या व्यक्तिमत्वासच आठवतात. खूप आदर जपतात आबा त्यांच्या शिक्षकांच्या विषयी. मग १९७३ ला प्रावीण्यासह बावधन हायस्कूल मधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. 

मॅट्रिक पूर्ण झाल्यावर त्यांना वाटले आपण आता नोकरी मिळवण्या इतपत शिक्षण घेतलं आहे. मग त्यांनी शिक्षण थांबवलं ! दीड वर्ष वडिलांच्या सोबत शेती केली. त्यावेळी चुलते एकनाथ बापू, विनायक भाऊ, सुभा आन्ना व शिवा नाना पोलीस सेवेत कार्यरत होते त्यामुळे आपण त्यांच्यासारखीच पोलीस मध्ये सेवा करायला नको अशी त्यांची धारणा झालेली. मग पोलीस सोडून इतर काम शोधण्यासाठी उत्तम भाऊ मांढरे यांचे बरोबर ते मुंबईला गेले.

मुंबईत त्यांच्या आत्यांच्या घरी वास्तव्यास होते. परत काही दिवस पवारवाडीच्या गाळ्यावर काढले. मग त्यांनी अंग मेहनतीच्या कठोर परिश्रमासाठी स्वतःला अजमवायला सुरुवात केली. मूळजी मार्केटमध्ये शंभर रुपये पगारावर कष्टाचे काम केले. हमालीची कामे केली. पोलिसांची नोकरी न करण्याचा त्यांचा निर्णय मात्र ठाम होता. पण फाटक्या अंगाचे सडसडीत शरीरयष्टीचे आबा त्या कडक कामास न डगमगता तोंड देत होते. नंतर मात्र त्यांना शिक्षण व त्यामुळे मिळवायच्या आरामशीर नोकरीचे महत्त्व समजले. कष्टकरी नोकरीमुळे ते कंटाळले. त्यानंतर त्यांनी संभाव्य नोकरीसाठी मुंबई एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये आपले नाव नोंदवले. यामध्ये पोलिसांच्या नोकरीच्या मुलाखतीसाठी कॉल लेटर मिळण्याची शक्यता होती.

जवळजवळ २२ महिने हमालीचे काम केल्यानंतर शेवटी पोलिसात नियुक्तीसाठी त्यांना कॉल लेटर मिळाले. त्यांची शारीरिक चाचणी व मुलाखत उत्कृष्टपणे पार पडली व १९७६ मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी मालाड (पूर्व) स्थानकात ते शिपाई या पदावर पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांच्या नशीबाने मॅट्रिकच्या शिक्षणाच्या मानाने तेव्हा त्यांना तुलनेनं छान नोकरी मिळाली होती. त्यांना त्यांनी ही नोकरी स्वकर्तुत्वावर मिळवल्याचा नेहमी अभिमान वाटतो. त्यांचा अतिशय प्रामाणिक आणि संयमी स्वभाव त्यांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मन जिंकण्यास उपयोगी ठरला. कामांमध्ये उच्च अभिरुची असणारे हे कार्यप्रेमी व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी कर्तव्य कार्यात कधी हेळसांड केली नाही.

१९८१ मध्ये चाफळ येथील थोरातांच्या अलका (वहिनी) यांच्याशी त्यांचा शुभविवाह झाला. त्यांना अमित व अपर्णा ही दोन मुलं. दोघेही पदवीधारक आहेत. अमित फार्मासिटिकल मध्ये बीई करून पुढे एमबीए झाला. त्यांन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये पुणे, मुंबई तसेच हैदराबाद येथे सर्विस केली आहे. यादरम्यान कंपनीने त्यांना लंडन येथे देखील दीड वर्ष सर्विस करायची संधी दिली होती. अमित आपल्या वाडीतील पहिला मुलगा आहे ज्याने लंडन येथे सेवा केली आहे. ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे आम्हा सर्वांसाठी ! सध्या अमितने वाकड पुणे येथे भागीदारीत एक उत्पादन कंपनी युनिट सुरू केले आहे. त्याची पत्नी वृषाली देखील फार्मासिटिकल मध्ये पदवीत्तर शिक्षण घेऊन उच्चविद्याविभूषित आहे. कन्या अपर्णाने बीकॉम व बीएड पूर्ण केले असून ती हायस्कूल शिक्षिका आहे. त्यांचे जावई देखील उच्च विद्याविभूषित असून एका महाविद्यालयात प्राचार्य आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांच्या बुद्धिमत्तेच्या पात्रता पातळीपर्यंत शिकवण्यात आबांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. असं म्हटलं जातं- प्रत्येक यशस्वी पुरुषामागे कुठल्यातरी स्त्री चा महत्त्वपूर्ण हात असतो. अलका वहिनींनी घर व नोकरी या दोन्ही आघाड्यांवर आबांना संपूर्ण पाठिंबा दिल्यामुळेच मुलं साक्षर आणि कमावती झाली आहेत व आबा आपल्या नोकरी व्यवसायात यशस्वी झाले आहेत.

२००६ साली त्यांनी पोलीस खात्यांतर्गत विभागीय पातळीवर लेखी परीक्षा दिली. या परीक्षेची त्यांनी परिश्रमपूर्वक तयार केली व ते सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर निवडले गेले. खरं बघायला गेलं तर आबा ही परीक्षा दयायला तयार नव्हते कारण या वयात परीक्षा देवून जर मी पास नाही झालो तर.. तसेच मी सगळ्यांना अभ्यास करायला सांगतो आणि मीच पास नाही झालो तर.. ही मनात शंका ! मग कुटुंबाने त्यांना खूप मानसिक आधार देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला आणि मग त्यांनी मन:पूर्वक अभ्यास करून यश संपादन केले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी आपले कर्तव्य अत्यंत कुशलतेने व प्रामाणिकपणे पार पाडले. पोलीस दलातील त्यांच्या प्रामाणिक सेवेसाठी त्यांना मेडल्स, प्रशस्तीपत्र व रोख बक्षिसे मिळून वेगवेगळे १९३ पुरस्कार मिळालेले आहेत. राष्ट्रासाठी सेवा करताना त्यांनी केलेल्या प्रामाणिक आणि कष्टपूर्वक प्रयत्नांची ही पोचपावती होती. गावाला त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीचा अभिमान आहे. या पुरस्कारामुळे प्रेरित होऊन आबांनी अधिक उत्साहाने आपले उर्वरित कर्तव्य बजावले. 

पोलीस विभागातील आपल्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवा कार्यकालात त्यांनी मालाड, येलो गेट, कांदिवली, बोरीवली, वरळी, खेरवाडी या स्टेशन्समध्ये सेवा बजावली आहे. यादरम्यान कधी भ्रष्टाचार विरोधी पथकात तर कधी सीआयडीत तर कधी दक्षिण नियंत्रण विभागात कार्यकाळ घालवला आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राममूर्ती यांच्या हस्ते अत्यंत धोकादायक आरोपीस अटक केल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलं होतं. आबांच्या आयुष्यातील हा सर्वोच्च पुरस्कार होता. हा पुरस्कार त्यांच्या हृदयास खूप जवळ आहे. विभागातील आबांच्या निरंतर सकारात्मक सेवेबद्दल त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली. या त्यांच्यासाठीच्या सर्वोच्च पदावर देखील त्यांनी अगदी प्रामाणिकपणे सेवा बजावली. पोलीस सेवेतील प्रदीर्घ ३८ वर्षांच्या सेवेनंतर २०१४ मध्ये ते पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले. तेव्हा ते समाधानीपणे निवृत्त झाले कारण त्यांनी कायद्याच्या संरक्षणाचे व अंमलबजावणीचे देशभक्तीचे पवित्र कार्य केले होते. भास्कर आबांसारखी व्यक्तिमत्व समाजाच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी स्वतःच्या मार्गाने जगतात.

त्यांच्या दोन काकू व मातोश्री यांच्या लवकर झालेल्या निधनामुळे इतर भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांचे चुलते कै सर्जेराव तात्या यांच्यावर पडली होती. तसेच त्यांच्या वडिलांचे २०११ मध्ये निधन झाले होते. तात्या त्यांची नैतिक जबाबदारी पेलत असताना आबा त्यांच्यापरीने आर्थिक बाजू सांभाळत होते. सर्व भावंडांच्या शिक्षणात तसेच शुभकार्यात समभाग नोंदवून आपली कौटुंबिक जबाबदारी अतिशय योग्यरीतीने बजावत होते.

घरातील जेष्ठ, स्वभावाने आदर्शवत व मुंबई येथे शिस्तीची पोलीस दलातील सेवा बजावणारे त्यांचे वडील बंधू आबा हे सर्व भावंडांसाठी आदर्श व्यक्ती आहेत. मुंबईत सर्वकाळ असल्याने त्यांची वाडीच्या कुटुंबातील आभासी उपस्थिती त्या सर्वांसाठी खूप काही होती. बंधू पृथ्वीराज नोकरी व्यवसायानिमित्त सातारा येथे कुटुंबासह स्थायिक होते. धाकले बंधू रवींद्र पदवीत्तर (इंग्लिश) शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात होते. त्यांचे स्थिरस्थावर होईपर्यंत आबांनी मुंबई येथे त्यांना आधार दिला. रवीच्या पडत्या काळात वडीलकीचा खूप महत्त्वाचा नैतिक पाठिंबा दिला. आपल्या बहिणीच्या लग्नात सुयोग्य स्थळ निवडण्यात त्यांचे योगदान होतेच. 

कर्तव्यकर्म करताना भगवंताचे विस्मरण होऊ नये म्हणून सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सत्संगाद्वारे ध्यान धारणेची पद्धत निवडली आहे. गेले पाच वर्ष सतत वारकरी दिंडी सोहळ्यात सहभागी होत आहेत. त्यांचे सालपे येथील एक स्नेही एकदा बगाड यात्रेला आले असताना आबांना त्यांच्या दिंडीत सामील होऊन आळंदी ते पंढरपूर पायवारी करण्यासाठी सुचित केले होते. पांडुरंगाचे दर्शन घेऊन पुण्य पदरी पडावे म्हणून अभंग, भजन आणि नामस्मरण करीत दिंडित पायी चालण्याचा अत्यंत विलक्षण अनुभव त्यांना येत आहे. ज्येष्ठ वद्य अष्टमी ते आषाढी एकादशी पर्यंत तीन आठवड्यांचा दिंडी प्रवासाचा आनंद ते उपभोगत आहेत. या सोहळ्यात इतरांप्रमाणे तेही कधी थकत नाहीत. आपल्या गावातील हे एकमेव व्यक्तिमत्त्व असावे की जे पूर्ण पालखी सोहळ्यात सातत्यपूर्ण पाच वर्षे भाग घेत आहे. जीवनातील बंधनातून व मोहातून हळू हळू बाजूला जाऊन भगवंताशी एकरूप व्हावे व परमार्थ साधावा ही त्यांची धारणा ! त्यांच्या या गोष्टीची दखल घेऊन २०१९ मध्ये श्री ग्राम विकास मंडळातर्फे आबांचा ज्ञानेश्वरांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

निवृत्तीनंतर त्यांनी विविध सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे. त्यांचे नातू तनिष चा पहिला वाढदिवस अनपटवाडी च्या प्राथमिक शाळेत साजरा करुन त्यांनी आगळ्यावेगळ्या उपक्रमास सुरुवात करून दिली आहे. मोरे गुरुजींनी त्यांच्या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देऊन शाळेतील सर्व मुलांचे वाढदिवस शाळेत साजरा करण्याची प्रथा पाडली आहे ती अजून चालू आहे. अनपटवाडी प्राथमिक शाळेला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या भेटी देऊन मुलांच्या शैक्षणिक साहित्यात भर घातली आहे, त्यामध्ये पूर्ण संगणक सेट, स्टीलची ताटे आणि माईक सिस्टीम यांचा समावेश आहे.

आबा संपर्क वलयात सक्रिय संवाद ठेवून आनंदी आयुष्य जगत आहेत. ग्राम विकास मंडळ मुंबई चे ते हितचिंतक व मार्गदर्शक आहेत. ग्रामदेवता श्री वाकडेश्वर मंदिर पुनर्बांधणी केली तेव्हा सक्रिय सहभाग घेऊन योगदान दिले आहेच. मूल्यवर्धित शिक्षणाच्या तरुण पिढीतील रोपणासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे. अशा पद्धतीचं अतिशय मुलायम व आदर्शवत व्यक्तिमत्व व त्यांच्या अनुभवाचा गावाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. या व्यक्तिमत्त्वा च्या ओळखीने तरुण पिढी नक्कीच प्रेरित होईल अशी खात्री आहे. आम्ही आबांसाठी निरोगी आणि समृद्ध दीर्घायुष्य तसेच भविष्यासाठी सुयश चिंतितो.

✍️ डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल: ९६०४२५०००६



Tuesday, April 14, 2020

बाळासाहेब वामन सुतार

श्री. बाळासाहेब वामन सुतार; नशीबवान सरपंच

आपला समाज जाती, धर्म, पंथ आणि संप्रदाय यांनी बनलेला आहे. समाजात अठरा पगड जातींचा समावेश आहे. ज्या घरामध्ये मनुष्याचा जन्म होतो त्या घराची जात जन्माबरोबर त्या माणसाला चिकटते. खरं तर जात आणि​​ धर्म हे समाजाला लागलेले कलंक आहेत. परंतु विविध जाती आणि धर्म आपल्या समाजाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावत आहेत हे देखील वास्तव. याचेच उदाहरण द्यायचे झाले तर आमचे गाव अनपटवाडी. आमच्या या गावामध्ये बारा बलुतेदारांपैकी एक सुतार कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये कै वामन सुतार आणि कै दिनकर सुतार हे दोघे बंधू. दोघेही त्यांच्या सुतारकामामध्ये कुशल आणि प्रवीण होते. त्यांपैकी वामन सुतार हे नावाप्रमाणेच छोटी मूर्ती होते. शेतकऱ्यांची लाकडी अवजारे, लाकडी वस्तू तसेच बगाडाचे काम असो ते अत्यंत परिश्रमाने आणि कुशलतेने करत. 

वामन सुतार यांना तीन चिरंजीव बाळासाहेब, किरण, अरुण आणि चार कन्या सुशीला, कुसुम, रेखा आणि प्रमिला. मुलांमध्ये बाळासाहेब हे थोरले. सात मुलं असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह गावातून मिळणारे धान्य (गावकीच बयतं) आणि केलेल्या मजुरीच्या मोबदल्यात मिळालेले धान्य व पैसे यांच्या आधारावर. त्यांची पत्नी शांताबाई यांनी त्यांना या काळात आधार देऊन संसार केला.  श्री. वामन सुतार यांच्या मृत्युनंतर घराची सगळी जबाबदारी थोरला मुलगा बाळासाहेब यांच्यावर आली. बाळासाहेबांचे शिक्षण जेमतेम चौथी पर्यंत झालेले होते. त्यामुळे वाचन आणि लिखाणाचा अभाव होता. परंतु पुस्तकी ज्ञान नसले तरी व्यवहारज्ञान खूप होत. त्यावेळचे त्यांचे वर्गमित्र जनार्दन गोळे, अनिल भाऊ त्यांना आठवतात. शाळेत असताना बाळासाहेब यशवंत राजपुरे यांच्या जवळ अभ्यासाला असंत. शिक्षण आणि नोकरी करायची आवड नसल्याने त्यांनी सुतारकाम हा आपला पारंपरिक व्यवसाय चालू ठेवला. शेजारच्या गावात शेतीची अवजारे बनवणे आणि दुरुस्त करणे या कामांवर त्यांचा उदरनिर्वाह चालला होता. ते लाकुडकाम करण्यात अतिशय तरबेज होते. जुनी घरे आणि फर्निचर बनवणे ही कला त्यांनी त्यांच्या मोरगावच्या मेहुण्याकडून शिकली होती. घरबांधणी ची कामे सुध्दा ते घेत असत. या कालावधीत कुटुंब सांभाळत असताना लहान भावांची लग्ने केली.

बाळासाहेब उत्कृष्ट ढोल वादक आहे. त्याच्याकडे स्वतःची कडी आहेत. पंचक्रोशीत कुठेही छबिना असेल तर बाळू हमखास तिथे जातो. गावात कुठलेही कार्य असेल, ढोल वाजवायचा असेल तर बाळूचा ढोल ठरलेला.. तसेच बगाडासाठी चांगले बैल पाळण हा त्याचा छंद आहे. त्यांन आत्तापर्यंत चांगले चांगले बैल पाळलेले आहेत आणि जपलेले देखील आहेत. बावधन बगाडाचा गाडा करण्याचा मान बाळूच्या सुतार भावकीकड आहे. आता त्यामध्ये बाळूच वरिष्ठ आहे. त्याला गाडयाच्या सगळ्या खाणाखुणा माहीत आहेत. बगाड यात्रेदिवशी दिवसभर बाळू आणि मंडळी गाड्यासोबत डागडूजीसाठी सुतारकामाची हत्यारे घेवून असतात. सलग चार ते पाच दिवस गाडा करण्यात ही मंडळी सतत व्यस्त असतात. गाडा तयार करत असताना आपल्या गावच्या सुतारांचा एक वेगळा मान असतो. हा मान अनपटवाडी गावातील सुतारास आहे ही फार मोठी गोष्ट आहे गावासाठी. मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे पूर्वी मंदिर न उघडता सर्व तुळाया आणि खांब व्यवस्थित बदलून डागडुजी अतिशय कौशल्याने त्यांनी केल्याचे आम्हाला माहिती आहे.

१९८६ साली त्यांचा विवाह सोमेश्वर येथील हेमलता यांच्याशी झाला. पण दुर्देवाने जवळजवळ २० वर्षे त्यांना अपत्यप्राप्ती झाली नाही. मग हेमलता यांच्या पुढाकाराने २००६ मध्ये बाळासाहेब यांचा दुसरा विवाह सुवर्णा यांच्याशी झाला. त्यांना मुलगा अभिजीत व कन्या वैष्णवी ही दोन अपत्य. यांचे बंधू किरण यांची अभिषेक व ऋषिकेश अपत्य बारावी नंतर नोकरी व्यवसाय करत आहेत. धाकले बंधू अरुण यांच्या प्रिया (बीकॉम ३), अबोली (बारावी) व इंद्रायणी (दहावी) या तिन्ही मुली अतिशय हुशार आहेत व शिक्षण घेत आहेत. या सगळ्यांच्या पालकत्वाची जोखमीची जबाबदारी बाळासाहेब अजूनही पेलत आहेत.

सन २००५ साली अनपटवाडी गावाच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सरपंच पद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव होते. योगायोग म्हणजे गावामध्ये इतर मागासवर्गाची ची फक्त सुतारांची घरे होती. त्यामुळे सरपंचपद सुतारांकडे द्यावे लागणार होते. यावेळी गावाने एकमताने बाळासाहेबांना सरपंच केले. सन २००५ ते २०१० या कालावधीत गावाचा प्रथम नागरिक होण्याचा बहुमान बाळासाहेबांना मिळाला. अशाप्रकारे ते नशिबाने गावाचे सरपंच झाले. पाच वर्षांच्या काळात नितीन शिवराम मांढरे, संतोष नानासाहेब अनपट व इतर पंच मंडळींनी त्यांना फार मदत केली आणि कारकीर्द सहज सुलभ होण्यास हातभार लावला. चौथी पर्यंत शिक्षण असल्यामुळे बाळासाहेबांना लिहिताना आणि वाचताना समस्या येत होत्या. त्यामुळे गावासाठी आलेल्या योजना आणि इतर गोष्टी समजावून घेण्यासाठी ते गावातील शिकलेल्या माणसांवर अवलंबून असत. केशव राजपुरे यांनीदेखील त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि सल्ला दिल्याचे त्यांना आठवते. पाच वर्षांच्या काळामध्ये त्यांना माइक वर बोलन कधी जमलं नसेल पण ते त्यांच्या कृतीतून त्यांनी पूर्ण केल. मुळात त्यांचा स्वभाव अतिशय शांत, मृदू, संयमी, निर्मळ आणि परिश्रमी असल्यामुळे या पाच वर्षांमध्ये जास्त हेवेदावे न होता गावाच्या विकासाला चालना मिळाली. यादरम्यान त्यांनी कुणालाही दुखावलं नाही. 

२००० सालापासून गावाने गावात संत गाडगे महाराज ग्राम स्वछता अभियान आणि इतर उपक्रम यशस्वीपणे राबविले होते. या ग्रामस्वच्छता अभियानामधे संपूर्ण गावाने एकत्र येऊन गाव स्वच्छ केले आणि तालुका व जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याचे फलित म्हणून २००७ मध्ये सरपंच बाळासाहेब सुतार, नितीन मांढरे, ग्रामसेवक गाढवे आणि गावकरी यांच्या परिश्रमातून अनपटवाडी गावाला ग्रामस्वच्छता अभियानातील तालुका स्तरावरील सर्वोत्कृष्ट पुरस्कार (निर्मल ग्राम पुरस्कार) मिळाला होता. गावासाठी आत्तापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांमधील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. बाळासाहेब सरपंच असताना गावाची झालेली ही सर्वोच्च कामगिरी होती. विशेष म्हणजे  हा पुरस्कार भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आणि प्रथम नागरिक, ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शुभहस्ते अनपटवाडी ग्रामपंचायतीस मिळाला. हा पुरस्कार घेण्यासाठी सरपंच बाळासाहेब सुतार यांना दिल्ली दरबारी जावे लागले त्यामुळे ग्रामस्थ ही एक ऐतिहासिक घटना आहे असे समजतात. त्यावेळेला गाढवेवाडीचे सरपंच सुरज गाढवे व बाळासाहेब हे दोघंच दिल्लीला गेल्याचे ते सांगतात. या पुरस्कारामुळे गावाचे नाव संपूर्ण जिल्ह्यात झाले. स्वच्छता हाच परमेश्वर आहे असे इथल्या ग्रामस्थांचे मत आहे. ' स्वच्छतेकडून - समृद्धीकडे' हा मंत्र याच सरपंचांच्या कार्यकाळात नावारूपाला आला आणि गावाचा कायापालट झाला असे गावकरी आनंदाने सांगतात. 

'न भूतो न भविष्यति' या उक्तीनुसार स्वप्नातही ज्यांना आपण सरपंच होऊन गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवू असे वाटत नव्हते त्यांनी परिश्रमाने, गावकऱ्यांच्या साहाय्याने, कुशलतेने आणि आपल्यावर आलेल्या जबाबदारीचे मोल समजून अनमोल कार्य केले आणि गावाला जिल्ह्यात एका उंचींवर नेवून ठेवले ते बाळासाहेब अतिशय शांत आणि मृदू स्वभावाचे आहेत. परिश्रम हा गुण त्यांच्या वाडवडीलांकडून त्यांना मिळालेला आहे. अचानक आलेल्या जबाबदारीने घाबरून न जाता इतर लोकांची मदत घेऊन आणि आत्मविश्वासाने सामोरे जावून कार्य कसे यशस्वी करावे याचा प्रत्यय आपणास बाळासाहेबांकडे पाहून येतो. अल्पशिक्षित, स्वभावाने साधा भोळा असणारा, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सरपंच गावाला मिळाला याचा गावकऱ्यांना अभिमान आहे. त्यांच्या हातून अनेक समाजोपयोगी कामे व्हावीत हीच आशा. श्री. बाळासाहेबांना भावी आयुष्य सुख समृद्धीचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा !

माहिती संकलन व शब्दांकन
श्री.जनार्दन गोळे, केशव राजपुरे, नितीन मांढरे व अनिकेत भोसले



Sunday, April 12, 2020

लालसिंग विष्णू मांढरे


लालसिंग विष्णू मांढरे
(शिक्षणाचे वेड असणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व)

पन्नास पासून ऐंशीच्या दशकापर्यंत ज्या ज्या गावकरी बंधूंनी शिक्षण प्रवास केला तो अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ! पायात चपला नसा​​यच्या आणि घालायला एकच ड्रेस ! पण शिकून साक्षर व्हायची जिद्द मोठी ! अत्यल्प शैक्षणिक सुविधांचा वापर करून इतर श्रीमंत मुलांबरोबर तुल्यबळ ज्ञानार्जन करायचं. पुढे साक्षर होऊन आपल्याला ज्यांनी हे दिवस दाखवले त्यांना शिक्षित करून स्थैर्य मिळवून देण्याच खूप मोठं कार्य करणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणजे लालसिंग विष्णू मांढरे (भाऊ) ! पदवीसाठी इंग्रजी हा विषय निवडणाऱ गावातील बुवा दादा नंतरच दुसरं व्यक्तिमत्व !

तीन भाऊ आणि दोन बहिणी असणाऱ्या मोठ्या कुटुंबात भाऊंचा जन्म २/४/१९५४ चा. तेव्हा स्वातंत्र्य मिळून सातच वर्षे झालेली. देश तेव्हा मोठ्या सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनातून जात होता. आर्थिक अस्थिरता व अल्प सुविधांच्या जमान्यातला त्यांचा जन्म.. त्यांचे वडील विष्णू राजाराम मांढरे त्याकाळी सहावी उत्तीर्ण होते. अजून एक वर्षे शिकले असते तर त्यावेळी कदाचित शिक्षक झाले असते. त्यामुळे शिक्षणाचे बाळकडू त्यांना घरातूनच ! इयत्ता पहिली ते तिसरी शिक्षण बावधन येथे प्राथमिक शाळेत घेतले. १९६३ दरम्यान अनपटवाडीत प्रथमच प्राथमिक शाळा सुरू झाली. मग चौथ्या इयत्तेसाठी साठी पुन्हा दाखला वाडीच्या शाळेत ! चौथीची केंद्र परीक्षा झाल्यावर पाचवी ते सातवी पुन्हा बावधनच्या प्राथमिक शाळेत.. शिवा नाना, भास्कर आबा, सुधा दादा, रंजा भाऊ त्यांचे तेव्हाचे सहचारी ! तसे ते अभ्यासात सर्वसाधारणच, पण सुरुवातीपासूनच इंग्रजी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय.. अगदी उत्सुकतेने आणि आवडीने अभ्यासाला होता त्यांनी हा विषय ! १९६८ ला त्यांनी बावधन हायस्कूल मध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. अकरावी (मॅट्रीक) पर्यंत ते हायस्कूलमध्ये शिकले. तेव्हा भाऊ इंग्रजी विषय प्रविण्याने सोडवून महाविद्यालयातील प्रवेशासाठी पात्र ठरल्याचे आवर्जून नमूद करतात. मग पूर्वपदवी (प्रीडिग्री) व बीए पदवी साठी किसन विर महाविद्यालयात प्रवेश घेतला. इंग्रजी विषयातील प्राविण्यामुळे अतिशय आत्मविश्वास व धाडसाने त्यांनी पदवीसाठी इंग्रजी हा विषय निवडला. कदाचित सर्वात कठीण विषयात तज्ञ होण्यासाठी आणि उत्कृष्टता मिळवण्यासाठी त्यांनी हे आव्हान स्विकारले असेल. या धाडसाला हिम्मत लागते. 

इंग्रजीची उच्च काठिण्यपातळी आणि अपुर्‍या स्त्रोतामुळे ते अंतिम परीक्षेचा अडथळा पार करू शकले नाहीत (१९७६). पण आम्हा सर्वांसाठी ते इंग्रजीतील गावातील पहिले ग्रॅज्युएट आहेत. पुढे नोकरीच्या शोधात इतरांप्रमाणे मुंबई ! एवढे शिकून मुंबईत अंगमेहनतीचं काम करायचं म्हणजे घेतलेल्या शिक्षणाचा अवमान वाटत असावा त्यांना. एव्हाना गावातील इतर सहकारी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत होते. त्यांचे मित्र भास्करआबा व शिवानाना पोलीस मध्ये होते. शिवा नानांनी त्यांना मुंबईला नेलं. नोकरी मिळेपर्यंत फणसवाडीतील पाहुण्यांच्या कपड्याच्या गोडाऊनमध्ये झोपायचे. त्यावेळी महिना दोनशे पन्नास रुपयांच्या नोकरीत गोदामपाल म्हणून खाजगीत नोकरी केली. नंतर भास्कर आबांच्या व केंजळ येथील मित्र शेखर चव्हाण यांच्या मदतीने मालाड (पूर्व) येथे पटेल एक्सटेंशन ग्रुप कंपनीत हजार रुपये महिना पगारावर तात्पुरती नोकरी मिळाली. तेव्हा मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बीईएसटी) मध्ये परिवहन वाहक पदांच्या जागा निघणार होत्या. त्यासाठी भास्कर आबांच्या बरोबरीने वरळी येथील मुंबई एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये नाव नोंदणी केली. यासाठीच्या मुलाखत पत्रासाठी (कॉल) पाठपुरावा केला. तीन महिन्यानंतर कॉल येणार होता मग तोपर्यंत पुन्हा गोदामपाल म्हणून पटेल रोडवेज मध्ये नोकरी केली. 

त्यांच्या सकारात्मक प्रयत्नांची व परिश्रमाची फलश्रुती म्हणून त्यांना बीईएसटी चा कॉल आला. यासाठी लेखी परीक्षा द्यावी लागली. लेखी परीक्षेमध्ये भाऊंनी प्राविण्य मिळवून बस वाहक हे पद मिळवले. यासाठी सुद्धा भास्कर आबांचे सहकार्य लाभलं ही गोष्ट भाऊ विसरले नाहीत. तेव्हा ते समाधानी होते कारण त्यांना त्यांच्या शिक्षणायोग्य कायमची नोकरी मिळाली होती. सुदैवानं माथाडी सारखं हे कष्टाचं काम नव्हतं. पण यासाठी पदवीनंतर सात वर्ष वाट पहावी लागली होती त्यांना. या काळात सुरुवातीला मुंबईमध्ये स्वतःचे घर नसल्याने ते रात्री बस डेपोमध्येच झोपायचे. पुढे काही दिवस बाळासाहेब साळुंखे यांच्या भांडुप येथील खोलीवर त्यांचे बंधू विठ्ठल यांचे सोबत मुक्काम केला. नंतर मात्र त्यांची बहिण लक्ष्मी पिसाळ (माई) यांच्या कल्याण येथील खोलीवर स्वतःचे घर मिळेपर्यंत (१९९४) वास्तव्य केले. वडाळा येथील गुजरात खादी ग्रामोद्योग मंडळाचं गेस्ट हाऊस म्हणजे त्यांच्यासाठी दुसरं घर. भाऊंचे मित्र व आपले गावकरी सुरेश आण्णा गुजरात सरकारच्या या मंडळांमध्ये सेवेत होते, हीसुद्धा गावासाठी वैशिष्ट्यपूर्ण बाब होती. 

दरम्यान १९८५ मध्ये कांबळेश्वर (फलटण) येथील रत्नमाला वहिनींशी वयाच्या एकतिसाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यांना प्रवीण, सुप्रिया व अक्षय ही तीन मुलं ! तिघेही पदवीधारक असून नोकरी व्यवसाय करत आहेत. प्रवीणने _ध्वनिमुद्रण व अभियांत्रिकी_ तसेच _कार्यक्रम व्यवस्थापन_ हे दोन डिप्लोमा केले आहेत. तो स्टुडिओ मधील ध्वनिमुद्रण कामात अतिशय तरबेज झाला आहे. व्यवसाय कार्यानिमित्त तो दुबई, मलेशिया, ओमान तसेच श्रीलंका या देशांत जाऊन आलाय. कन्या सुप्रियाने वाणिज्य विषयात पदवी (बीकॉम) प्राप्त केली आहे तसेच फायनान्स मध्ये एमबीए पूर्ण केलय. सध्या ती कोटक महिंद्रा बँकेत क्रेडिट कार्ड विभागात कार्यरत आहे. त्यांचा दुसरा चिरंजीव अक्षय हा जन्मताच मूकबधिर आहे. परंतु पालकांच्या प्रचंड पाठिंब्यावर त्याने आपल्या या अपंगत्वावर मात करून बीकॉम पूर्ण केले आहे व एका खासगी कंपनीत कामाला असून स्वतःच्या पायावर उभा आहे. अक्षयला इथपर्यंत आणण्यासाठी भाऊ व वहिनी यांनी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. जीवनातील शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले आहे. म्हणूनच आपल्या व जवळच्या नातलगांच्या मुलांना फक्त साक्षर केले नाही तर त्यांना सुस्थितीत आणण्यास सर्वतोपरी मदत त्यांनी केली. त्यांच्या भावाची व बहिनींची सर्व मुलं साक्षर करून त्यांना सुयोग्य जोडीदार मिळवून देईपर्यंत लक्षपूर्वक प्रयत्न भाऊंनी केलेत. 

१९८७ मध्ये ते बीईएसटी अंतर्गत परीक्षा देऊन विद्युत पुरवठा विभागात मीटर वाचक या पदावर पदोन्नत झाले. तेव्हा पाचशे चाळीस जण या परीक्षेस बसले होते त्यात पहिल्या चाळीस जणांत ते होते. घरोघरी जाऊन विद्युतपुरवठा मीटर चे निरीक्षण करून रीडिंग नोंदी घेण्याचे फिल्डवर्क चे काम होते. २००७ पर्यंत त्यांनी हे काम अतिशय व्यवस्थित व प्रामाणिकपणे केले. त्यामुळे २००८ मध्ये बीईएसटी विद्युत पुरवठा विभागातच चौकशी निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. २०१२ पर्यंत ते याच पदावर काम करत होते. ग्राहकांच्या तक्रारींवर लक्ष ठेवून त्यांचे निराकरण करणे हे कामाचे स्वरूप होते. यासाठी जागेवर जाऊन, सर्वेक्षण करून, वस्तुस्थिती पाहून, ग्राहकांच्या समाधानासाठी सर्वोत्तम उपाय शोधत असत. अशाप्रकारे बीईएसटी मध्ये तीस वर्ष उत्कृष्ट सेवा बजावल्यानंतर १ मे २०१२ रोजी ते सेवानिवृत्त झाले आहेत.

मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने शहर चांगल तसेच १९९४ ला त्यांना गोरेगाव (पूर्व) येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा चे घर मिळाले होते. तिथे बराच काळ हे कुटुंब वास्तव्यास होते. पुढे ते सह्याद्री नगर येथील विशाल हाउसिंग सोसायटी मध्ये स्थलांतरित झाले. अलीकडेच बावधन येथे त्यांनी सुंदर घर बांधलेले आहे. मुंबईतील पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी गावाची नाळ टिकवली होती. ग्रामसभा, ग्रामयात्रा, कार्यक्रम, लग्न समारंभ, महत्त्वाच्या बैठका, गावी येऊन नेहमी गाठल्या आहेत. त्यांचे शेतीवर फार लक्ष. त्यांच्या मातोश्री पार्वती यांच्यावर त्यांचे फार प्रेम होते. सुरुवातीपासून शेवट पर्यंत त्यांचा खूप स्नेहाने त्यांचा सांभाळ केला. सर्वात लाला भाऊ आईंचे लाडाचे. थोरले बंधू पोलिसी नोकरीनिमित्त बाहेरगावी ! तर लहान बंधू मधुकर यांच्याकडे शेती ! १९८७ साली बेंद च्या शेतात विहीर खणून माळापर्यंत मोटरची पाईपलाईन नेल्याचे आठवते. अडीच पुरुष माती असल्याने पुढच्या वर्षीच्या पावसात आजूबाजूची माती विहिरीत आल्याने विहीर पूर्ण मुजली. मग दुसऱ्या वर्षी परत खर्च करून गाळ काढला व तोडीत ती विहीर बांधली व त्यावर मोटर बसवली. त्यानंतर त्यांच्या शेतात बागाईत सुरू झाल्याचे मी पाहिले आहे.

१९८७ ते २००५, जवळजवळ अठरा वर्ष, आमचे घर या विहिरीचे पाणी हक्काने वापरत असे. या मोटरची चावी आमच्याच घरी असे. आमच्यासाठी भाऊंनी खोदलेली विहीर म्हणजे जीवन वाहिनी ! यादरम्यान भाऊ किंवा त्यांच्या घरातील कुणीही एकदा देखील कुठल्याही कारणास्तव आम्हाला पाणी घेण्यास अडथळा आणला नाही. जलदान, तेही इतके दिवस ! फारच दुर्मिळ..

उत्पन्नाच्या साधनात वाढ व लहान बंधू ड्रायव्हर राजेश त्यांच्याकरता एक ट्रॅक्स जीप सुद्धा मध्यंतरीच्या काळात घेतल्याचे आठवते. पुढे दुर्दैवी अपघातात मनुष्य हानी न होता या जीपचा चक्काचूर झाला होता. भाऊंचा हा एक अयशस्वी प्रयोग होता. पण भाऊ नाउमेद झाले नाहीत व बंधूंना पुढे एका कंपनीत चालकाची नोकरी मिळवून दिली. २००३ मध्ये मांढरदेवी रोडवर दुर्दैवानं त्यांची दुचाकी दुर्घटनाग्रस्त झाली. राजू गाडी चालवत होता व हे पाठीमागे बसले होते. चार चाकी टेम्पोचा धक्का भाऊंच्या उजव्या हाताला जबरदस्त बसला. त्यावेळी त्यांच्या हातावर चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाली व त्यांचा उजवा हात निकामा आहे. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर घरातील एक कर्ता पुरुष म्हणून त्यांनी भूमिका निभावली आहे व अजून निभावत आहेत. 

त्यांचा स्वभाव स्वाभिमानी, तापट तसेच शीघ्रकोपी असला तरी आतून ते फारच मृदू व मायाळू आहेत. त्यांचा सुप्रिया लेकीवर फार जीव आहे. आपल्या मातीची फार ओढ आहे. त्यांच्या पिढीपासूनची गावची बर्‍यापैकी माहिती त्यांना आहे. आपल्या समाजातील मुला मुलींचे विवाह जमवण्याचा त्यांना फार मोठा छंद ! योग्य वधू आणि वर बघून दिल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. वडीलधाऱ्यांनी विषयी आदर त्यांच्याकडूनच शिकावा ! आम्ही त्यांचे शेजारी त्यामुळे त्यांची स्वभाववैशिष्ट्य जवळून माहीत.. त्यांच्या सानिध्यात इतके दिवस आहे पण त्यांचं कुणाशीही हाडवैर मी पाहिलेल नाही. त्यामुळे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व ! त्यांनी कुणाचा द्वेष केलेला नाही तर कुणाचा हेवा त्यांना माहीत नाही. हुशार विद्यार्थ्यांचे कायम कौतुक त्यांच्या तोंडून ! गावावरून मुंबईला कुणीजरी आलं तरी जातीने चौकशी आणि आधार ठरलेला.. 

त्यांची श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी च्या माध्यमातून ग्राम सेवा सुरू आहेच. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा मंडळाला फारच उपयोग होत असतो. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आता पूर्वीएवढा वेळ देऊ शकत नाहीत. 

असं हे स्वाभिमानी, समाज संवेदनशील, सोशिक, दानशूर, सुसंस्कृत, धाडसी, विद्वान, दातृत्वशिल व्यक्तिमत्व आता आरामदायी जीवन जगत आहे. अशा महान व्यक्तिमत्वाची, त्याच्या सानिद्ध्याची व मार्गदर्शनाची आम्हा सर्वांना फारच गरज आहे. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचे, निरोगी आणि यशस्वीतेकडं जाणार जाओ हीच वाकडेश्वर चरणी प्रार्थना ! त्यांच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा..

✍️ डॉ. केशव यशवंत राजपुरे



Friday, April 10, 2020

बाळासाहेब यशवंत राजपुरे

श्री. बाळासाहेब यशवंत साळुंखे/राजपुरे
"त्याग आणि कष्टांतून ​​गरुडझेप...!"

आप्तांचे आयुष्य सुगंधित आणि बहारदार बनवण्यासाठी चंदनरूपी वृक्ष जसा स्वतःला उगाळून घेत असतो आणि चैतन्य पसरवत असतो त्याचप्रमाणे अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या काळात आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, रात्रंदिवस अपार कष्ट करून केवळ आणि केवळ त्यांना सुखाचे दिवस दाखवण्यासाठी, उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि आयुष्यात स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या आयुष्याचे अनमोल दान केले, जे अहोरात्र झिजले ते चंदनरुपी वृक्ष म्हणजे श्री. बाळासाहेब यशवंत साळुंखे/ राजपुरे (दादा). दादांच्या जीवनाचा थोडक्यात उहापोह..

शिक्षणाचा उपयोग केवळ पैसे मिळवण्याचे साधन म्हणून नसावा. पदवीत्तर शिक्षण घेऊन सुद्धा जर माणूस शेती करत असेल तर सहाजिकच _शिकून काय उपयोग_ असं मत बनते. मग माणसं आपल्या मुलांना ज्यादा शिकवण्याच्या फंदात पडत नाहीत. _त्यानं शिकून काय धन लावलिया_ ही भावना.. खरंच नोकरी मिळत नाही म्हणून शिकूच नये का ? या प्रश्नाचे उत्तर उच्चविद्याविभूषित दादा यांनी त्यांच्या कृतीतून दिल आहे.

दादांचा जन्म दि. ०१ जून १९५९ साली झाला. घरामध्ये दादांसहित सात भावंडे ! त्यांच्यात दादा आणि केशव हे दोघे भाऊ आणि फुलाबाई, कलावती,  शारदा, मीरा आणि सुनंदा या बहिणी. त्यावेळी घराचे उत्पन्नाचे साधन फक्त शेती हेच होते. शेतीवरच कुटुंब चालत होते. आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. वडील श्री. यशवंत केसू राजपुरे हे शेतकरी मजूर मातोश्री अंजुबाई त्यांची खंबीर साथ ! त्यांच्या आई कडक शिस्तीच्या असल्यामुळे सर्व मुलांचे संगोपन योग्य रीतीने झाले. वडिलांना आपल्या मुलांनी शिकून खूप मोठं व्हावं असं वाटतं होतं. मुलांना लागणारी शालेय फी भरण्यासाठी कित्येक वेळी त्यांनी दिवसभर कष्ट करून मिळालेली मजुरी फक्त शिक्षणासाठी दिली. त्यामुळे या बिकट परिस्थितीत सुद्धा अपार कष्ट सोसून त्यांनी सर्व मुलांच्या शिक्षणास प्राधान्य दिल. दादांचे प्राथमिक शिक्षण पहिली १९६६ साली तर पाचवी १९७१ साली दरेवाडी येथे झाले. तिसरीतली एक वर्ष परीक्षा न दिल्यामुळे वाया गेले त्याच. त्यानंतरचे सातवी चे शिक्षण १९७३ साली कणुर या गावी तर हायस्कूल चे आठवी ते दहावी पर्यंत चे शिक्षण १९७६ साली बावधन हायस्कूल, बावधन या ठिकाणी झाले. १९७० दरम्यान राजपुरे कुटुंब अनपटवाडी येथे शेतात छप्परावर वास्तव्यास आले. 

दादा लहानपणापासूनच शाळेत अत्यंत हुशार होते. त्यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर होते. दादांचा मूळचा स्वभाव खूप रागीट .. ही देणगी त्यांना उपजतच त्यांच्या आई कडून मिळालेली होती. त्यानंतर दादा जसजसे मोठे होत गेले तसा हा रागीट स्वभाव अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्यामुळे अतिशय शांत होत गेला. दादांनी सन १९७८ साली त्यांचे बारावी चे महाविद्यालयीन शिक्षण शिंदे हायस्कूल, वाई येथून घेतले. सन १९८१ साली बी. कॉम. ची पदवी आणि सन १९८३ साली एम.कॉम. ची पदवी वाई येथील किसनवीर महाविद्यालय मधून प्राप्त केली. 

दादांचे शिक्षण म्हणजे अपार कष्टाचा नमुना आहे. दिवसभर वडिलांबरोबर शेतीत कष्टाची कामे करून दादा रात्रीचा अभ्यास करत असत. परत दिवसा शेतीची कामे आणि रात्री अभ्यास असा त्यांचा दिनक्रम जवळजवळ पहिली ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत चालू राहिला. शेतातील नांगरट, मशागत, पाळी, पेरणी ही सगळी काम दादा सातवी पासूनच करत होता. यादरम्यान डोंगरात बैल घेऊन जाणार. गाय खोर मध्ये घेऊन जाणार. जनावरांच्या मागे गेल्यानंतर एक अभ्यासाचं पुस्तक मात्र पोत्यात कायम.

दादा प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्गात प्रथम श्रेणीचे गुण मिळवून प्रथम यायचे. यामागील त्यांचे जिद्द आणि चिकाटी हे गुण वाखाणण्याजोगे आहेत. दादांच्या शिक्षणासाठी त्यांचे दाजी सदाशिव शिर्के यांनी वेळोवेळी हवी ती मदत आणि मानसिक आधार दिला त्यामुळं दादा उच्चशिक्षित होऊ शकले. त्याकाळी गावात भीमा अण्णा, अर्जुन दादा आणि लाला भाऊ ही मंडळी ग्रॅज्युएट झाली होती. अनपटवाडी गावामध्ये शिक्षण क्षेत्रात दत्तूबापूनंतर दादांनी आपल्या हुशारीने गावातील दुसरे पोस्टग्रज्युएट होण्याचा मान मिळवला. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आणि शेतीवर अवलंबून असूनही आपल्या भावंडांच्या शालेय शिक्षणाकडे दादांनी विशेष लक्ष दिले. लहान भाऊ केशव हा शाळेत अत्यंत हुशार आणि चिकित्सक वृत्तीचा होता. त्याच्या शिक्षणावर दादांनी लक्ष केंद्रित केले. 

दादांनी स्वतःच्या नोकरीसाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी मुंबई मध्ये (१९८५) सुध्दा नोकरी शोधली पण अपयश आले. वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे तेव्हा त्यांना ताबडतोब गावी यावे लागते. दादांनी फॉरेस्ट विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला होता. ज्यावेळी ते परीक्षेला गेले तेव्हा पेपर लिहीत असताना अशक्तपनामुळे त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि त्यांना पेपर संपूर्ण लिहिता आला नाही. पदवी पर्यंतचे शिक्षण प्रथम श्रेणीमध्ये मिळवणारा विद्यार्थी कमी दिसत असल्यामुळे पेपर अर्धवट लिहून परत आला. दादांना त्या वेळी नशिबाने साथ दिली नाही परंतु परिस्थितीपुढे हतबल न होता शेती करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू ठेवला.

सन १९९५ साली वडिलांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी दादांवर आली. आता शिकत राहिले किंवा नोकरी शोधत राहिले तर भावंडांची शिक्षणे अर्धवट राहतील म्हणून दादांनी नोकरीचा शोध बंद केला कारण त्यांना सतत वाटत होते की " दादा ने नोकरी केली असती तर केशव (अप्पा) शिकला नसता!" त्यामुळे दादांनी शेतीवर लक्ष केंद्रित केले. केशवच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून दादांनी केशवला आपल्या बहिणीकडे खंडाळा येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी ठेवले. केशवने १९९२ साली लोणंद येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयातून बी. एससी. फिजिक्स ही पदवी ९१% गुण मिळवून शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान विभागात सुवर्णपदक मिळवले. केशवच्या या यशामुळे दादांच्या कष्टाचे चीज झाले.  पुढे केशवने १९९४ साली स्वतःच्या गुणवत्तेवर आणि कष्टांनी शिवाजी विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्र या विषयाची कठीण समजली जाणारी एम.एससी. पदवी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने लीलया मिळवली. तद्नंतर २००० साली अत्यंत परिश्रमाने आणि दादांच्या आशीर्वादाने भौतिकशास्त्र विषयातील पी.एचडी. ही पदवी मिळवली. या सर्व यशशिखरांमागे दादांची समर्थ साथ, आधार आणि पाठिंबा होता. वडिलांचे स्वप्न दादांनी केशवला उच्चविद्याविभूषित करून पूर्ण करून दाखवले.

दादांच्या पत्नी सुरेखा वहिनी यांनी दादांना आयुष्यातील प्रत्येक आव्हानात्मक वळणावर खंबीर साथ दिली आणि संसार यथायोग्य जोपासला. या दाम्पत्याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. ही तिन्ही मुले हुशार आणि कर्तुत्ववान आहेत. दादांचा मुलगा आकाश हा लहानपणापासूनच जिद्दी आणि हुशार! आई वडिलांच्या कष्टांकडे पाहात त्याने आज जे यश मिळवले आहे ते अनपटवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यास पात्र आहे. तो सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये उपअभियंता या पदावर कार्यरत आहे. अनपटवाडी गावातून मुंबई महानगरपालिका मध्ये प्रथम अभियंता होण्याचा मान त्याने मिळवला आहे. तसेच मुलगी वृषाली ही अतिशय हुशार असून तिने पुणे विद्यापीठामधून बी.एससी. फिजिक्स पदवी संपादन केली आहे. ति सध्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत आहे. आपल्या मुलांचे शिक्षण दादांनी पोटाला चिमटा काढून, काटकसर करून आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी करून दाखवले.

दादांच्या स्वभाव अतिशय श्यामल, मितभाषी आणि लाजाळू.. त्यांच्यातील अपुरा आत्मविश्वास कदाचित खूप शिकून सर्विस नाही ही भावना, घरची गरिबी, नवीन गावातील वास्तव्य आणि अंगावर पडलेल्या जबाबदारी या सर्वांचा एकत्रित परिणाम ! त्यामुळे तेव्हा त्यांच्या मुलाखती इतक्या प्रभावी झाल्या नाहीत. या मुद्द्यावर नेहमी त्यांचे बंधू केशव यांच्याशी नेहमी तुलना होत असे. शिकून सर्विस करत नसलेल्या माणसाला गावात एवढी किंमत नसते. सुरुवातीला सहजासहजी सामावून घेतलं नाही व हे कुटुंब लवकर गावाशी एकरुप झाले नाही. पण हा एम कॉम शेतकरी शेतात कुठलंही काम करायला कधीही लाजत नाही. हाच त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा मोठेपणा आहे.

दादांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मातोश्री व त्यांचा भाऊ केशव आणि बहिणींची साथ कायम मिळाली. दादांच्या बहिणी फुलाबाई शिर्के (म्हसवे), कलावती यादव (खंडाळा), शारदा निंबाळकर (वहागाव), मीराबाई ढमाळ (अंबारवडी), सुनंदा मतकर (विखळे) या सर्वांनी नेहमीच मानसिक आधार, प्रेम आणि जिव्हाळा दिला. हे प्रेम आणि आधार दादांना नव्याने आयुष्याशी झुंजण्याची ताकत देत होता.

केशव हा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भौतिकशास्त्र अधिविभाग मध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो. केशवचे भौतिकशास्त्र या विषयातील संशोधनामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर उपयुक्त आणि बहुमूल्य कार्य आहे. एकंदरीतच केशवच्या यशामागे त्याचे वडील बंधू दादांचे अनेक आशीर्वाद आणि खंबीर साथ आहे. दादांच्या वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनातून केशव आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.

दादा कॉलेजमध्ये असताना अनपटवाडी गावामध्ये प्रौढ शिक्षण वर्ग चालवले जायचे. त्यांचे सहकारी मित्र भीमराव अनपट हेदेखील त्यांच्याबरोबर कॉलेजला होते. हे दोघं अनपटवाडी मध्ये प्रशिक्षण वर्ग घेत असत. जुन्या पिढीला त्यांच्या योगदानाचा फायदा झाला. आमच्या पिढीतील इतर मुलंही त्यांच्या वर्गाला बसत असत.

दादांची मुले शिक्षित आहेत तसेच बंधू संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत आहेत. दादांनी श्रमसाध्य प्रयत्न करून आपल्या भावंडांना तसेच मुलांना उच्च शिक्षित करून त्यांना संस्कारित करून समाजाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. या जीवनप्रवासामध्ये आज दादा कष्टाचं पण सुखी आयुष्य जगत आहेत. अपार कष्टांनी मिळालेल्या या अतुलनीय यशामुळे दादांची छाती नेहमीच गर्वाने फुलते! सर्व भावंडे आणि आपल्या मुलांचा सार्थ अभिमान त्यांना वाटतो. तसेच त्यांच्या सुविद्य पत्नींची कणखर साथ, आधार, मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम यांची जोड मिळाल्याने दादांना आपले आयुष्य सार्थकी लागले याचाही अभिमान वाटतो. दादांच्या संघर्षाची कहाणी भावी पिढ्यांच्या जीवनात चैतन्याची आणि कष्टाची ठिणगी बनेल यात तिळमात्र शंका नाही!

दादांना त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा...

शब्दांकन:
दिलीप अनपट व अनिकेत भोसले

......................

​​प्रथमता मित्र दिलीप अनपट यांचे शतशः आभार. दहावी नापास झालेला हा माझा मित्र. आम्ही त्याला विनंती केली गावातील साक्षर व्यक्तीपैकी बाळासाहेब राजपुरे हेसुद्धा एक आहेत. त्यांच्याविषयी लिहीशील का ? लगेच तयार झाला. त्याच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडं. एका दिवसातच त्यांन तीन पाने मला लिहून माझ्याकडे टायपिंगसाठी पाठवली. ती वाचल्यानंतर, आवश्यक गोष्टी आल्याची खात्री केल्यानंतर, मी माझ्या शिरगाव येथील एमएससी फिजिक्स झालेल्या अनिकेत भोसले या विद्यार्थ्याला टायपिंगसाठी पाठवून दिलं. त्याने संधीचा फायदा घेतला. तो म्हटला सर याच्यामध्ये काही दुरुस्त्या करून, तुम्ही मला दादांच्या विषय सांगितलेलं होतं त्याच्या आधारे मी हा लेख पुन्हा लिहू का? मी म्हटलं काही हरकत नाही.. आणि अशा पद्धतीने हे दादांविषयी सुंदर व्यक्तिविशेष दिलीप आणि अनिकेत यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून तुमच्या समोर आलं. अर्थात माझ्या वरील प्रेमामुळे अनिकेत ने दादांच्या व्यक्तिविशेष मध्ये मला थोड झुकते माप दिले. पण त्यामुळे दादाच्या योगदानाचे श्रेय अजिबात कमी होत नाही. दिलीप आणि अनिकेत चे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप आभार..

दादा माझ्यासाठी एक हुशार, डायनॅमिक, आणि आयडियल रोल मॉडेल ! त्याच्याकडे बघूनच घडलो. त्याचा तापट स्वभाव आमच्यात पण आहे. तो जेव्हा शिकवायचा त्यावेळेला जर गणित चुकलं तर माझी काही खैर असायची नाही. बदादा मार. त्यामुळे गणित कधी चुकायचे नाहीत. दादामधील प्रामाणिकपना, पद्धतशीरपना, नीटनेटकेपणा मी कधीच आत्मसात केला होता. तो सोसत असलेले गरिबीचे चटके मी जवळून पाहिले होते आणि मला तेव्हाच कळून चुकलं होतं की मलाही दादाच्या वाटेवरून जायचं आहे. वडील मोलमजुरी करायचे. संसार खर्चातून उरले तर पैसा आमच्या शिक्षणासाठी. त्यामुळे कमीत कमी साधनांमधून आमच्या सगळ्यांचे शिक्षण झाले. 

तो पोस्ट ग्रॅज्युएट झाला त्यावेळेला मी सातवीला असेल. तेव्हा मला सांगितलं जायचं की.. मोठ्यांन शिकून कुठं धन लावली आहे.. त्यामुळे तू कशाला शकतोस ? पण दादांना माझ्यातली हुशारी बघितली, इतर मित्रांच माझ्या विषयीचे अभिप्राय ऐकले आणि माझं शिक्षण कधीच थांबवलं नाही. मी जेव्हा पहिला क्रमांक यायचो आणि बक्षीस आणायचो, त्याची छाती अभिमानाने फुलून जायची. मी मार्क पडायचो आणि त्याच्यावर मला हवाहवासा रुबाब दादा मारायचा. 

त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बरेच चढ-उतार आले.  खचून व्हायला झालं. एकदोनदा तर फार उदासीनतेत गेला होता. त्याला आवश्यक साथ दिल्याने पुन्हा पूर्ववत झाला. त्यावेळेला जर दादांनी नोकरी पत्करली असती तर आज आम्ही परस्परांच्या जागेवर असतो. शेती करण्यामध्ये त्याच्या इतका पारंगत माणूस मी दुसरा बघितला आहे. तो पोस्टग्रॅज्युएट असूनही शेती करण्यामध्ये त्याला अजिबात कमिपणा वाटत नाही. 

हो आमच्या घराला सरस्वती वरदहस्त आहे. दादा  नंतर मी, माझ्या नंतर दादा ची मुलं वर्गामध्ये प्रथम यायचो. मुलं आमच्या पेक्षा फार हुशार आहेत. मी ८५% च्या लेव्हलपर्यंत होतो तर मुलं ९० ते ९५% पर्यंत. अनुकूल परिस्थितीत कोणीही शिकतं खरा कस लागतो प्रतिकूल परिस्थितीत तुमचं कौशल्य दाखवण्याचा. आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. 

नैतिक मूल्य आणि संस्कार याचा विसर आम्हाला कधीही दादा ने पडू दिला नाही. आम्ही वाममार्गाला न जायचं कारण म्हणजे दादा. आम्हाला कोणाचं फुकटचं नको. विनाकारण कोणाशी वैर नको. कमीच्या बापाचं समजून जागायचं ही शिकवण. आज कोल्हापुरात अधिकार पदाच्या खुर्चीत असताना दादाच्या नेहमी सूचना असतात.. मातू नकोस.

दादा माझ्यासाठी काय आहे हे शब्दात लिहू शकत नाही. पण मला तो वडिलांच्या जागी आहे याच्यात सगळ आल. अजूनही घरातला कुठलाही निर्णय साहेबाला विचारल्याशिवाय होत नाही यात त्याच्या मनाचा मोठेपणा आणि थोरपण दडलेल आहे.

या प्लॅटफॉर्मचा माध्यमातून दादाच्या झाकोळलेल्या व्यक्तिमत्त्वाविषयी प्रकाश टाकण्याची संधी मिळाली. त्यामुळे मित्राच्या प्रकल्पाचं भरभरून कौतुक.. आता सर्विससाठीच शिकायला पाहिजे ही भावना पुढच्या पिढीमध्ये कुचकामी ठरेल. 

Thursday, April 9, 2020

राजेंद्र लक्ष्मण अनपट


राजेंद्र लक्ष्‍मण अनपट; संघर्षातून सुसंस्कृतता
​​
प्रतिकूल आर्थिक परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर पदवीधर होऊन, विश्वकोश मध्ये संपादकाची जबाबदारी समर्थपणे पेलून, जीवनाच्या पडत्या काळात न डगमगता सहचारिणी च्या साथीने व्यवस्थित परिस्थिती हाताळल्याने घरात उत्कृष्ट पदवीधर व्यक्तिमत्वे ज्यांनी तयार केली ते सर्वांचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक, ज्यांनी आपले आयुष्य भाषा व साहित्य संपादन क्षेत्रात व्यतीत केले ते संपादक श्री राजेंद्र लक्ष्मण अनपट अर्थात राजूभाऊ (मामा) यांचा थोडक्यात जीवन परिचय.

राजूभाऊ यांची जन्मतारीख २ जुन १९५४. तीन बंधूूू व एक बहीण असलेल्या कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये शिक्षण समर्थक वातावरण नव्हते. वडील लक्ष्मण बजाबा अनपट (आप्पा) मुंंबई येथे श्रीनिवास मिल मध्ये गिरणी कामगार तर मातोश्री अनुसया गृहिणी !  त्यांच्या आईंनी या सर्व मुलांना अतिशय जिकीरिने हायस्कूल पर्यंत शिकवले. अनपटवाडीत शाळा नसलेने १९६० ला त्यांनी बावधन येथील प्राथमिक शाळेत प्रवेश घेऊन ज्ञानार्जन केले. तेव्हा त्यांना माने व मुळीक गुरुजी शिकवायला असल्याचे ते सांगतात. १९६७ ला सातवीची केंद्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९६८ ला आठवीसाठी बावधन हायस्कूल येथे प्रवेश घेतला ! १९७१ ला मॅट्रिक (अकरावी) पास झाले. 

मॅट्रिकचे परीक्षा केंद्र शिंदे हायस्कूल वाई हे होते. त्यामुळे परीक्षेदरम्यान त्यांनी वाईतच मुक्काम करून  अभ्यास करायचे ठरवले. पण तेव्हा जेवणाची सोय नसल्याने व आप्पाही मुंबई येथे असल्याने जेवणाची आबाळ होणार होती. या परीक्षेच्या काळात त्यांच्या मातोश्रींनी वाई पर्यंत चालत जाऊन त्यांचा डबा पोहोच केल्याचे ते आवर्जून सांगतात. मुलांना शिक्षित करण्याचा किती मोठा अट्टाहास, निर्धार व कष्ट सोसण्याची तयारी यांच्या मातोश्रींची ! आपल्या गावातील सुशिक्षित पिढी अशा समर्पित पालकांच्या पोटी जन्मल्यामुळेच जीवनात यशस्वी होऊन भाग्यवंत ठरली आहे. 

कोल्हापूरस्थित मामांच्या आग्रहाखातर, १९७२ ला काहीकाळ कोल्हापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या शाहू महाविद्यालय येथे बीए भाग १ मध्ये होस्टेलवर राहून शिक्षण घेतल्याचे त्यांना आठवते. प्री डिग्री (बारावी) व बीए पदवीच्या शिक्षणासाठी आपल्या आईच्या समर्थनावर किसन वीर महाविद्यालय वाई येथे शिक्षण संचलन सुरू ठेवले. १९७५ ला बीए भाग दोन वर्गात असताना ते वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडूनही आले होते. ते अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रमांत सक्रियपणे व्यस्त होते या वस्तुस्थितीची ही स्वाक्षरी आहे. १९७६ ला भूगोल विषय घेऊन शिवाजी विद्यापीठाची बीए पदवी प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. पदवीधर झाल्यावर इतरांप्रमाणे नोकरी शोध सुरू केला. 

मग ते मुंबईत तेव्हा माथाडी कामगार असलेले त्यांचे वडील बंधू वसंत अनपट यांच्याकडे गेले. पण भाऊंकडे कठोर परिश्रम करण्यास सुयोग्य शरीरसंपदा व कौशल्य नव्हती त्यामुळे वसंत काका त्यांच्या योग्यतेच काम मिळवून देऊ शकले नाहीत. मग आणखी थोडे शिकून कायद्यातील पदवी घेऊन वकिलीचा व्यवसाय पत्करावा म्हणून मुंबई येथे सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये एलएलबी साठी प्रवेश घेतला. त्यावेळी बावधनचे नानासाहेब व काशिनाथ कांबळे त्यांचे सहकारी ! पुढे काशिनाथ यांना देना बँकेत नोकरी लागल्याने शिक्षण सोडून दिले. त्यामुळे भाऊंनी देखील उचल खाल्ली व सहा महिन्यातच लॉ ला रामराम ठोकला. मग तिथेच रोजगार ब्युरो मध्ये नाव नोंदणी केली. त्यांचे मार्फत नामवंत कंपन्यांच्या मुलाखती सुद्धा दिल्या. पण इंग्रजीतील कमकुवतता आड आली व तिथे ही नोकरी मिळाली नाही. नाइलाजाने नोकरी न करताच एका वर्षातच त्यांना गावी परतावं लागलं.

तेव्हा मराठी भाषा व साहित्य अभिवृद्धीसाठी शासनाने वाई येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ (१९६०) स्थापून एका प्रकल्पांतर्गत मराठीचा ज्ञानकोश म्हणजेच विश्वकोश तयार करायचं काम चालू केलं होतं. १९७७ पर्यंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाने सरासरी १००० पानी चार खंड प्रकाशित केले होते. सुदैवानं राजूभाऊ यांना या मंडळात भूगोलातील अभ्यागत संपादक म्हणून संधी मिळाली त्यामुळे कुठेतरी त्यांना नोकरीत स्थैर्य प्राप्त झाल. तशी ती कायमस्वरूपी नोकरी नव्हतीच, प्रकल्पासोबतच संपणार होती. त्यामुळे आहे तोपर्यंत काम हीच अवस्था ! यादरम्यान आपल्या ज्ञानसंपदे बरोबरच मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांची एक उत्कृष्ट भाषा चिकित्सक म्हणून जडणघडण झाली. वाक्यरचना, व्याकरण, सुयोग्य व चपखल शब्दवापर यामध्ये ते पारंगत झाले. त्यांच्या कार्यकालात भूगोल विषयक माहिती, नकाशे व इतर माहितीचे संकलन व लेखन या बरोबरच सरकारी छापखान्यात मसुदे तपासणी त्यांनी केली.

दरम्यान ८ मे १९८० ला गुळूंचे (नीरा) येथील मॅट्रिक पास रंजनावहिनी (मामी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तशा मामी तुलनेन श्रीमंत व सुखवस्तू कुटुंबातील ! जरी गाव वाईदेशात व जास्त काम पडणार होत तरी मुलगा सुशिक्षित असल्यामुळे त्यांनी या लग्नाला होकार दिला. मुलांच्या उन्नतीसाठी, त्यांच्यात सामाजिक मूल्यांचे रोपण तसेच त्यांचा सर्वांगीण विकास योग्य पार्श्वभूमीवर करण्यासाठी १९८३ ला ते वाई येथे स्थलांतरित झाले. त्यांना सचिन व सुहास ही दोन मुलं ! सचिन म्हणजे समाजप्रिय अष्टपैलू व्यक्तिमत्व तर सूहास अतिशय नम्र व व्यावसायिक ! दोघांनीही त्यांच्या आयुष्यात यशस्वितेची पातळी गाठली आहे. त्यांच्या दोन्ही स्नुषा उच्चविद्याविभूषित व सुसंस्कृत आहेत. श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी या आपल्या संस्थेने याचवर्षी या कुटुंबाचा सुसंस्कृत कुटुंब म्हणून सन्मानही केला आहे. सुरुवतीपासूनच भाड्याच्या घरात कुटुंब प्रवास करत करत ते आता आपल्या वाई व सातारा येथील स्वतःच्या घरात वास्तव्यास आहेत. अर्जुन दादांच्या नोकरीसाठी विनायक भाऊंना राजू भाऊंनी टाकलेला शब्द विनायक भाऊंनी पाळण्याचेे त्यांना आठवतं.

त्यांच्या विश्वकोश मधील कार्यकालात त्यांनी खंड क्रमांक पाच ते चौदा याच्या निर्मितीत प्रामाणिकपणे सर्वोच्च योगदान दिलं. त्यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सनिध्याचा आणि रा ग जाधव यांच्या सारख्या विद्वानांच्या मार्गदर्शनाचा त्यांना खूप फायदा झाला. खरंतर उरलेल्या २० व्या पर्यंतच्या सर्व खंडांच्या निर्मितीत योगदानाची उर्मी बाळगलेल्या भाऊंना तेव्हा नशिबाने साथ दिली नाही.  तत्कालीन प्रशासनाबरोबरच्या हक्काच्या लढतीच्या तांत्रिक संघर्षामुळे इतर सतरा सहकाऱ्यांबरोबर त्यांना विश्वकोश मधील सेवेला मुकावे लागले. ही त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची सुरुवात होती.

हा त्यांच्या सत्वपरीक्षेचा काळ होता. दोन्ही मुलं हायस्कूलमध्ये शिकत होती. आर्थिक अडचणीमुळे त्यांना खाजगी शिकवणी लावू शकत नव्हते. १९९२ ते १९९६ दरम्यान त्यांनी नोकरी शोधण्याचे खूप प्रयत्न केले. त्यांच्या अनुभवाचा उपयोग पडणार क्षेत्र त्यांना सापडत नव्हतं. वनवन हिंडले पण काही उपयोग झाला नाही. भुईंज येथील किसन वीर कारखाना व  एमआयडीसी त देखील प्रयत्न केल्याचे ते सांगतात. घरचा सर्व खर्च रंजना मामी शिवणकाम व इतर घरगुती उद्योग करून भागवत होत्या. तेव्हा मुलांनीही अतिशय सामंजस्याची भूमिका निभावून पालकांच्या लढ्यात साथ दिली. राजू भाऊंना धर्म पत्नीचा अवश्य पाठिंबा व आधार त्यांच्या यशस्वीतेतील अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. 

त्यानंतर १९९६ ला मित्र दत्ता मर्ढेकरच्या मदतीने सातारा येथे दैनिक ऐक्य या वर्तमानपत्रासाठी काम करण्याची संधी मिळाली. हे त्यांच्या कौशल्याशी संबंधित काम होते. तेव्हा त्यांना सहसंपादक पदाची जबाबदारी मिळाली होती. तिथे त्यांनी वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये आपल्या भूमिकेचे अवचित्यच सिद्ध केले नाही तर आपल्या लेखनातून आणि योगदानाद्वारे समाजाची चांगली सेवा देखील केली. सातारा येथील आपल्या सोळा वर्षांच्या सेवेदरम्यान ते दररोज प्रेसच्या वाहनातून वाई-सातारा-वाई प्रवास करत असत. कधीकधी विषम दिनचर्येमूळ आठवड्यातील सहा दिवस त्यांची मुलांची भेट होत नसे. ते फक्त रविवारीच मुलाना भेटू शकत असत. महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांच्या मुलांनीही कुटुंबाच्या उन्नतीसाठी वडिलांची घरातील अनुपस्थिती सहन केली.

यादरम्यान रंजना मामी यांनी मुलांच्या मनात मानवी मूल्यांचे योग्य प्रकारे रोपण केले व मुलांमध्ये पुढील आव्हान झेलण्यासाठी व आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गरजेचा किमान आत्मविश्वास निर्माण केला. सचिन मधील उत्कृष्ट वक्ता, सूत्रसंचालक, गायक व सिनेकलाकार हे बहुआयामी गुण या उभयतांच्या संघटित कष्टाचे फलित मी मानतो. याच संस्कार पेढीत तयार होऊन अतिशय कष्टाने सुहासने देखील एका नामवंत कंपनीत चांगले स्थान कायम केले आहे. त्यांच्यातील वक्तृत्वाचा वारसा चिरंजीव सचिन याचे बरोबरच नातू वेदराज (लागीर झालं फेम सिंबा) ने चालू ठेवला आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात जरी सर्वोच्च पद त्यांना मिळालं नसलं तरी त्याच्या दोन्ही मुलांना त्यांनी असे पद मिळवणे लायक बनवलं व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केली ही फार मोठी गोष्ट आहे. २०१२ साली वयाच्या ५८ व्या वर्षी ते आपल्या ३५ वर्षांच्या सेवेतून निवृत्त झाले. या काळात जीवनातील बरेच चढ-उतार त्यांनी बघितले होते. पण सेवानिवृत्तीनंतर कार्यमग्न मनास आवडीचे काम करायला मिळत नसल्याने चैन पडत नव्हता. दरम्यान व्याजवाडी गावचे व सकाळ दैनिकाचे व्यवस्थापक श्री राजेश निंबाळकर भेटले व त्यांच्या अनुभवाचा उपयोग सकाळ मीडियाला व्हावा म्हणून अर्ज करायला सांगितले. मुलाखत न घेताच त्यांनी राजूभाऊंना सकाळमध्ये संधी दिली. तेव्हापासून आजतागायात ते हे काम अतिशय उल्हासाने व आनंदाने करत आहेत.

त्यांना उत्तम स्वरज्ञान आहे. ते सांगतात त्यांच्या काळी गावात सदाशिव आण्णा, रामभाऊ, घाडगे मामा व आत्माराम सुतार यांच्यासारख्या हौशी मंडळींनी एक भजनी मंडळ चालवले होते. तेव्हा त्यांनी या मंडळाच्या माध्यमातून शेजारील गावांमध्ये भजनाचे सादरीकरण केल्याचे त्यांना आठवते. अजूनही ते चांगलं गातात. हा त्यांचा गुण सचिनने अवलोकला आहे. 

आयुष्यातील खूप आव्हानात्मक काळानंतर ते आता आपल्या आवडीचे काम करत ऐश्वर्याच जीवन जगत आहेत. दोन्ही मुले स्थिरस्थावर आहेत. श्रमसाध्य प्रयत्न करून आपल्या मुलांना शिक्षित व उत्तम प्रकारे घडवणे हे देखील समाजाच्या विकासातील उत्कृष्ट योगदान आहे. त्यांच्या संघर्षाची ही कहाणी तरुण पिढीला नक्कीच प्रेरणा देईल. भाऊंच्या जीवनातील पत्नीचे आवश्यक समर्थन, कठोर परिश्रम आणि समर्पण निश्चितपणे नवीन पिढीच्या स्त्रियांना शाश्वत पिढी घडविण्यास उत्तेजन देईल.

राजू भाऊंच्या उर्वरित आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

✍️ डॉ केशव यशवंत राजपुरे


Wednesday, April 8, 2020

अनिल मारुती अनपट




आदर्शवत यशस्वी उद्योजक अनिल अनपट
(एक उद्योजक घडताना)
८ एप्रिल २०२०

शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन, अस्तित्वासाठी मुंबई येथे कमी शैक्षणिक अहर्तेमुळे सोसलेली ससेहेलपाट, अशा प्रसंगी प्रस्थापितांनी झि​​डकारले ने त्वेषाने पेटून उठून केलेला संघर्ष, अनपटवाडी गावचे युवकांचे प्रेरणास्थान श्री अनिल अनपट (भाऊ) यांच्या वाट्याला आल्यानेच ते आज यशस्वीतेच्या शिखरावर आहेत.

पार्वती काकू आणि मारुती अनपट (बाळू आप्पा) यांच्या आठ अपत्यांपैकी अनिल एक व उरलेल्या बहिनी ! अनिल भाऊंचा जन्म ५ ऑक्टोबर १९६५ चा. घरात आठ-दहा म्हशी, केळी बागायत, बाहेरची दमडीची मिळकत नाही, हालाकीचे दिवस यामुळे अनिल भाऊंसाठी शेती आणि इतर काम अनिवार्यच ! १९७१ ते १९७५ दरम्यान वाडीतील प्राथमिक शाळेत कोदे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ज्ञानार्जन केलं. अभ्यासात एवढे पारंगत नसलेले भाऊ गणितात मात्र पैकीच्या पैकी गुण मिळवायचे तेव्हा ! त्यांचे हे गणित कौशल्य पुढे आयुष्याचे गणित तर्किक विश्लेषण करून सोडण्यास मदतीला आले. त्यामुळे हे गणित त्यांनी बरोबरच सोडवून मार्गक्रमण केले. हे शाळेत असताना गावचे तत्कालीन कारभारी व त्यांचे वडील बाळाप्पा यांच्या दूरदृष्टीतून शाळेमध्ये शहाबादी फरशी घातल्याचे त्यांना आठवते. 

१९७५ ला चौथीतुन ते बावधन हायस्कूलला प्रवेश नाकारल्याने, बावधन च्या प्राथमिक शाळेत पाचवीसाठी गेले. सुरुवातीला गाडेबाग मधील प्राथमिक शाळा क्रमांक २ मध्ये व नंतर बावधन बस स्थानकाच्या समोरील शाळेत त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. १९७८ ला आठवीसाठी मग हायस्कूल शाळेत त्यांना नाविलाजाने प्रवेश द्यावा लागला. आठवीला चार तुकड्यांपैकी क तुकडीत ते शिकले. अभ्यासात सर्वसाधारण पण इतर उपक्रमात पुढे असणारे भाऊ तेव्हा त्यांच्यातील उनाडपणात चमकले. मुलांची भांडण तसेच वर्गात दंगा करण्यात अग्रक्रम पण बसायला शेवटच्या बाकावर. पण आयुष्याच्या शाळेत पुढील चाळीस वर्ष मात्र ते यशस्वीत्यांच्या पुढच्या रांगेत आहेत. 

मार्च १९८० च्या एसएससी च्या परीक्षेत त्यांना कमी गुण मिळाले आणि यात्रेच्या मुख्य दिवशी आलेला तुलनेत सोपा मराठी विषय घालवून बसले. त्यावेळी या प्रकाराबद्दल मराठीच्या तत्कालीन शिक्षकांनी उपरोधात्मक त्यांचा सत्कार केल्याचे त्यांना आठवते. अर्थात ऑक्टोबर वारीत तो विषय सोडवला पण आयुष्याच्या एका वर्षाच्या मोबदल्यात ! 

पार्वती काकूंच्या जिकिरीच्या पाठिंब्यावर भाऊंचा पुढील खडतर शिक्षण प्रवास सुरू झाला. १९८१ ते १९८३ किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयात तर त्यानंतर पुढं १९८५ पर्यंत वरिष्ठ महाविद्यालयात कला शाखेत त्यांनी शिक्षण घेतलं. आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी त्यांनी अभ्यासोत्तर उपक्रमात सक्रियपणे भाग घेतला. क्रीडा स्पर्धा, विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका, विद्यार्थी संघटना, मोर्चे, एनएसएस, एनसीसी - सगळीकडे यांचा सहभाग! राजू नाना मांढरे यांच्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थन केलं. निवडणुका दरम्यान संपर्कवलय वाढवण्यावर भर दिला तसेच समाज मानसिकता व राजकारण जवळून पाहिले. पुढच्या पिढीतील सहकारी मित्रांना उपदेशपर सल्ला, मार्गदर्शन, सहकार्य, तसेच प्रशिक्षण देण्यावर भर दिला. तसं बघितलं तर शैक्षणिक विद्वत्तेच्या कमतरतेमुळे त्यांचं महाविद्यालयीन जीवन आव्हानात्मक होतं. त्यामुळे पुन्हा एचएससी च्या परीक्षेत इंग्रजीत गटांगळी!

यादरम्यान बावधन मधील रवी, संजय, गौतम कांबळे, राजेंद्र भोसले, अनिल भोसले तसेच शरद कदम यांच्याशी सलगी वाढली. वाई पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष श्री विजय नायकवडी हे त्यांचे बेंचमेट ! एस टी वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर गायकवाड व अनिल भाऊ यांची एनसीसी मार्फत नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचालन (२६ जानेवारी १९८५ ची आरडी परेड) मध्ये निवड झाली होती. तेव्हाच नेमकी भोपाळ वायू दुर्घटना २ डिसेंबर १९८४ ला झाली आणि हे संचालन रद्द झाले आणि त्यामुळे भाऊंची यात सहभाग घ्यायची सुवर्णसंधी निघून गेली. पण तरीसुद्धा तेव्हा गावासाठी ही फार मोठी उपलब्धी होती. 

काहीकाळ महाविद्यालयात वस्तू भांडाराचे प्रभारी देखील होते. किसनवीर महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात झालेली निवडक सादरीकरणे त्यांच्याच प्रयत्नाने अनपटवाडी यात्रेनिमित्त दाखवल्याचे मलाही आठवते. आम्हा मुलांसाठी तो एक अल्हादायक अनुभव होता. वडिलांच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे घर, शेती व इतर जबाबदाऱ्या त्यांच्यावर येऊन पडल्या. त्यामुळे शिक्षण अपूर्ण राहिले. तेव्हा दूध वाटपा बरोबरच भाजी व्यवसायही त्यांनी केला. दोन वर्षे शेतीदेखील केली. त्यावेळेस अतिशय कष्टाने आपल्या शेतीत राबून त्यांनी वांगी पिकाचे चांगले उत्पादनही घेतले. वांगी उत्पादनाच्या एका हंगामात जवळ जवळ पंधरा हजार रुपये कमावल्याचे ते अभिमानाने सांगतात. यावेळी घरगुती वाद-विवाद असूनही नूतन सरपंच श्री मोहन विनायक अनपट यांनी त्यांच्या विहिरीचं पाणी अनिल भाऊंना दिल्याचं ते विसरले नाहीत.

आयुष्यातील सुखाचा पाठलाग करताना कमवता होण्यासाठी मुंबईत जाऊन बाहेरच्या जगाची चव चाखायची असं वैतागून १९८७ ला ठरवलं. त्यावेळी अजून तीन बहिणींची लग्न बाकी होती. सुरुवातीला मुंबई येथील चिंचपोकळी येथील गावच्या गाळ्यावर दोन दिवस, लालबाग येथे विठ्ठल अनपट च्या रूमवर आठवडा व शेवटी धारावीतील संजय अनपट यांच्या रूमवर ते स्थिरावले. मित्रांसोबत मिळेल ते काम शोध सुरू केला. बांद्र्याला दिवसा पंधरा रुपये हजेरीवर रंगकाम देखील केले. मार्केटमध्ये कापडाच्या चार-चार लम्स वरच्या माळ्यावर पोचवण्याचं खडतर काम केलं. दिवसभरातील चार ट्रीपचे सहा रुपये मिळायचे तेव्हा.

वसंत काकांचे नांदवळचे मेव्हणे विलास पवार यांच्या ओळखीने अमरज्योती रोडलाईन्स या ट्रांसपोर्ट च्या ऑफिस मध्ये रोजंदारीवर गाड्या भरण्याचे मिळालेले काम तीन महिने केले. तसेच हमाली करण्यासाठी माथाडी सेवेत दाखल व्हावं असाही विचार आला. पण माथाडी युनियन मध्ये रजिस्ट्रेशन साठी तेव्हा चाळीस हजार रूपये देण्याची भाऊंची परिस्थिती नव्हती. जवळजवळ पाच महिने हे अंगमेहनतीच खडतर काम केल्यानंतर त्यांच्या नशिबात तुलनेनं सुलभ, पंख्याखाली बसून कार्यालय सांभाळण्याचे, काम आलं. 

सुदैवाने १९८९ साली पलटण रोड वरील एफ के रोडलाईन्स या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये तीनशे रुपये प्रति महिना पगाराची नोकरी मिळाली. धारावीतील रूम नाना आबांनी विकल्याने त्यांचा राहण्याचा आधार गेला. पुन्हा निवाऱ्याचा प्रश्न आ वासून पुढे ! काही दिवस गावच्या गाळ्यावर आश्रय शोधण्यासाठी केलेला प्रयत्न तेव्हा त्यांच्या दुर्देवाने असफल झाला. महिना तीस रुपये भाडे देऊन सुद्धा गाळ्यातून बाहेर जावं लागलं. आकाश फाटलेले स्थितीत मायचं आणि मनोधैर्य वाढविणारे नैतिक समर्थन अशोक अनपट यांच्या मामी यांनी देिले. त्यानंतर अगदी फॅमिली मुंबईत येईपर्यंत त्यांनीच डब्बा दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर भाऊंच्या आयुष्याने यशस्वीतेकडील एक महत्त्वपूर्ण वळण घेतलं.

अशा परिस्थितीत हाताश मनस्थितीत एफ के रोडलाईन्स चे मालक राजूभाई यांच्याकडे गावी परतत असल्याचे सांगून प्रलंबित पगाराची रक्कम मागायला गेले आणि काय आश्चर्य.. त्यांचे दैव पालटले. त्यांनी भाऊंच्या राहण्याची (ऑफिस मध्ये) फक्त सोयच केली नाही तर पगारामध्ये ५० रुपयांची वाढ केली. खानावळ, खोली भाडे व ट्रेन पास या खर्चाचे रुपये ११५ वाचणार होते. म्हणजेच पगारात तशी १६५ रुपये वाढ !

अनिल भाऊंनी मग मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ऑफिसमध्ये रोजनिशी, हिशोब वही, खतावणी, कागदपत्रांच्या नकला, चालकां साठी चे नियोजन अगदी पद्धतशीरपणे सांभाळले व मालकांचा विश्वास संपादन केला. या मालकांनी तीन महिन्यात त्यांचा पगार रुपये पाचशे प्रतिमहिना केला. त्यांचे नशीब चांगलं म्हणून त्याच ऑफिसमध्ये १९८९ मध्ये व्यवस्थापक पदावर महिना रुपये १००० च्या पगारावर त्यांना बढती मिळाली. त्यांच्या परीक्षेचा काळ संपला होता. ऐश्वर्याचे दिवस खुणावू लागले होते. मुंबई महानगरात जिथे साध्या हमालाच्या नोकरीस महाग झालेला अनिल आरामाशिर जीवन जगत होता. 

८ जून १९९३ ला सोमर्डीच्या प्रतापराव परामणे मामांची मुलगी साधना यांच्याशी अगदी नाट्यमय रीतीने त्यांचा विवाह संपन्न झाला. मामांनी सुरुवातीला होकार देऊन परत कुठल्यातरी कारणावरून नकार कळवून खळबळ माजवून दिली होती. पण तोपर्यंत अनिल भाऊ आणि साधना वहिनी यांनी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्याची खूणगाठ बांधली होती. यादरम्यान परामणे कुटुंबांकडून असलेल्या विरोधास दहशतीने उत्तर देण्यात आले होते. अनिल भाऊनाही धमकावलं त्यांनी ! मेव्हणे रवी परामणे बरोबर "साधनाचा होकार का नकार यावर" दहा हजारांची पैजही लागली होती. अर्थात ती पैज भाऊंनी जिंकली व वहिनींच्या मर्ढे येथील काकांच्या मध्यस्थीने विवाह सोहळा संपन्न झाला. त्यांच्या संसारवेलीवर मयुर व निकिता ही दोन फुलं ! मयुर अभियंता पदवीच्या शेवटच्या वर्षाला तर निकिताने बीबीए केले. लवकरच निकिताचा विवाह संपन्न होईल.

प्रगतीपथावर त्यांनी तेव्हा उत्पन्नाच्या साधनासाठी ट्रक देखील खरेदी केला होता. १९९६ ला अनिल भाऊंनी आपले कुटुंब मुंबईला हलवलं. सुरुवातीला कुर्ल्याला राहिल्यानंतर ते कनंमवारनगर, विक्रोळी येथे वास्तव्यास होते. त्यानंतर त्यांनी मुंबईस्थित अनपटवाडीकर यांच्यात एकोपा वाढवला. मित्रांची विचारपूस, त्यांच्या अडचणीत मदत केल्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांचा एक संच तयार होऊ लागला. मुंबईत एकमेकांना ओळख न दाखवणारे व अलिप्तता राखणारे गाववाले आता सभा-समारंभात एकत्र येऊ लागले. सख्यभाववृद्धी झाली. त्यातूनच श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) या संस्थेची निर्मिती मोहन अनपट आणि इतर जेष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८ ला झाली. सुरुवातीला महिना पन्नास रुपये जमा करणारे १२ सभासद यामध्ये होते. याकामी मित्र व मंडळाचे सचिव श्री हनुमंत मांढरे यांची मोलाची साथ त्यांना मिळाली तसेच हनुमंतनी त्यावेळी पुढाकार घेतला म्हणून ते शक्य झाले असं भाऊ सांगतात. या मंडळाच्या माध्यमातून गावची यात्रा पूर्ववत भरू लागली, शाळेची गुणवत्ता सुधारली, गाव विहिरीचे खोदकाम, ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक, मारुती तसेच वाकडेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार, पेयजल योजना, गटारीकरण व इतर अनेक ग्राम विकासाची जवळजवळ चाळीस लाख रुपयांची कामे झाल्याचे ते सांगतात. 

मार्च २००५ पर्यंत ते एफ के रोडलाईन्स मध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांच्या मालकांना ते डोईजड वाटू लागले व शेवटी अनिल भाऊ यांना ट्रान्सपोर्ट व्यवसायात सवतासुभा मांडायला भाग पाडले. वाशी येथे मार्केटमध्ये जीवन ज्योती रोडलाईन्स ही स्वतःची फर्म त्यांनी सुरू केली व गेली १५ वर्ष अतिशय उत्कृष्टपणे चालवली आहे. एक वेळ १६ कर्मचारी त्यांच्या ऑफिस मध्ये होते. या फर्मला समांतर काढलेली साधना वहिनी साठी कंपनी बुकींग सेवेसाठी ची ओम साई रोडवेज ही फर्म सुद्धा व्यवस्थित चाललेली आहे. 

२०१५ दरम्यान वडील आप्पांच्या आजारादरम्यान ते बराच काळ गावी वास्तव्यास होते. तेव्हा त्यांचे बंधु सीए विजय अनपट यांचे वाईमध्ये फर्स्ट क्राय डॉट कॉम हे डिपार्टमेंटल स्टोअर सुरू झालं होतं. त्यातूनच त्यांनी स्वतःचे फर्स्ट क्राय डॉट कॉम हे स्टोअर कोपरखैराने, नवी मुंबई येथे सुरू केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी मुंबईतील त्यांच्या स्थावर मालमत्तेत वाढ केली. नवी मुंबई व पनवेल परिसरात त्यांनी स्वतःची घर व कार्यालय केली आहेत.

समाजसेवेस वाहून घेतलेल्या श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. शहीद सैनिकांच्या कुटुंबासाठी झटणाऱ्या जयहिंद फाउंडेशन या संस्थेचे देखील ते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. नवी मुंबई ट्रान्सपोर्ट असोसिएशन कमिटी चे सक्रिय सभासद म्हणूनही कार्यरत आहेत. जीवनात परोपकार, आपुलकी, स्नेह, माणुसकी या नैतिक मूल्यांचे जतन हे त्यांचं नित्याचे झाले आहे. अतिशय समाधानच आयुष्य ते सध्या जगत आहेत. त्यांचा स्वभाव अतिशय गोड, निगर्वी, प्रामाणिक, कष्टाळू, समाजप्रिय, माणुसकीचे जतन करणारा असा आहे ! सर्वसमावेशकता, नेतृत्वगुण व उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्य हे त्यांचे गुण त्यांच व्यक्तिमत्त्व अधिक सुंदर बनवतात. 

बावधनच्या मातीतील ही ठिणगी परमेश्वराजवळ नेहमी सकारात्मक ऊर्जेची आणि परोपकारी वृत्ती जोपासण्यासाठी शक्तीची मागणी करते. पद, प्रतिष्ठा, मान या गोष्टी क्षणभंगुर मानणारे अनिल भाऊ शाश्वत आनंद प्राप्तीसाठी योगा व ध्यानधारणा करतात. वयाच्या चोप्पन्नाव्या वर्षी सुद्धा त्यांच्यात एवढी ऊर्जा कुठून येते याचे उत्तर आपल्याला यातून मिळतं. घर व कार्यालयातील भावनिक अंतर सुरक्षित ठेवल्यास जीवनात दुःख वाट्याला येणार नाही असे ते मानतात. भाऊंनी जीवनातील यश स्वप्रयत्नातुन आणि कष्टपूर्वक संपादन केले आहे म्हणून त्यांच्या दृष्टीने याची किंमत अमूल्य आहे. भाऊंच्या कार्यास सलाम व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

संदेश:
प्रतिकूल परिस्तिथीवर नक्की मात करता येते, त्या त्या संकटात परमेश्वर कुणालातरी मदतीला पाठवतो. फक्त आपली नीती आणि नियत चांगली पाहिजे.

अनिलला देखील कुणीतरी मोठं होण्यासाठी मदत केली. तोच आदर्श घेऊन अनिलने देखील अनेकांना मोठं केलं आणि आज ही करत आहे. त्यासाठी मनाचा मोठेपणा हवा. गावाचा अभिमान हवा.

✍️डॉ. केशव यशवंत राजपुरे

Monday, April 6, 2020

राजेंद्र परबती मांढरे




स्वकर्तुत्ववान मुख्याध्यापक राजेंद्र मांढरे सर

शून्यातून आपलं विश्व साकारणारी काही व्यक्तिमत्व असतात व आपल्या तडफदार स्वभावाने जीवनातील अवघड आव्हान पेलून आपल एक स्वतंत्र अस्तित्व जगासमोर ठेवतात अशा अतिशय जिद्दी तरुणाची यशोगाथा म्हणजे अनपटवाडी गावचे स्वकर्तृत्वान नेतृत्वगुण संपन्न शिक्षक श्रीयुत राजेंद्र परबती मांढरे ! 

अतिशय प्रतिकूल परिस्थि​​तीतून शिक्षण प्रवास करत, स्नेही व आप्तेष्टांच्या पाठिंब्यावर मुंबईसारख्या महानगरात एका उत्कृष्ट शाळेमध्ये अधिकारीपद प्राप्त करण म्हणजे अनपटवाडी च्या कुठल्याही तरुणास स्वप्नवत उदाहरण आणि निव्वळ प्रेरणादायी ! राजेंद्र परबती मांढरे सर (राजू नाना) यांना पाहत आम्ही शिकलो व घडलो त्यामुळे गावातील इतर उच्चशिक्षित तरुणांसारखं राजू नानांच्या व्यक्तिमत्त्वाचा आमच्यावरील प्रभाव अद्याप आहे.

त्यांचा जन्म, दोन भाऊ व तीन बहिणींच्या पाठीवर शांताबाई परबती मांढरे यांच्या पोटी १२.९.१९६४ चा ! १९७० दरम्यान त्यांनी अनपटवाडी प्राथमिक शाळेत कोदे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला. पहिली ते चौथी चे शिक्षण त्यांनी या शाळेत पूर्ण केलं. त्यावेळी प्राथमिक शाळा गावच्या मारुती मंदिरात भरत असे. तेव्हा मंदिरात मातीची जमीन होती, फरशी नव्हती. तेव्हा दर शनिवारी शाळेतील मुलांच्याकडून शेणाने जमीन सारवून घेतली जायची. त्याची आठवण त्यांना येते. १९७४ ला चौथी उत्तीर्ण झाल्यावर ते पाचवी व सहावी साठी मोरगावला त्यांच्या आत्याकडे गेले. पुढे १९७६ ला गावी परतुन बावधन हायस्कूल बावधन मधे सातवी ला प्रवेश घेतला. 

पहिल्यापासूनच ते अतिशय चपळ व चलाख होते. त्यामुळे शिक्षणाशिवाय वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात त्यांची खूप आवड ! विशेषत खोखो खेळात ते विशेष निपुण होते. बावधन हायस्कूलमध्ये असताना त्यांच्यातील खेळाच्या गुणवत्तेला तेवढा न्याय मिळाला नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्याची कसर त्यांनी महाविद्यालयाच्या संघातून विभागीय पातळीपर्यंत खो-खो खेळून काढली. खो खो खेळाची मलादेखील प्रचंड आवड! मी बावधन हायस्कूल च्या खोखो संघाचं पाच वर्षे प्रतिनिधित्व आणि दोन वर्षे नेतृत्व केलेल आहे. ही आवड राजू नाना यांच्या खेळाकडे बघूनच माझ्यात निर्माण झाली हे अभिमानाने सांगावसं वाटतं. पुढ १९८० मध्ये त्यांनी एसएससी पूर्ण केली.

घरची परिस्थिती पुढील शिक्षणासाठी तेवढी पूरक नव्हती, तरी निव्वळ जिद्दीच्या जोरावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी किसनवीर महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात कला शाखेत प्रवेश घेतला. शिक्षणा दरम्यान अनपटवाडी ते वाई प्रवास सायकलने तर पैशाची सोय झालीच तर बसने केला. पण बारावीपर्यंत शिकून (१९८३) तेव्हादेखील नोकरी मिळणं कठीण होतं. 

मित्रवर्य निवास व अनिल अनपट यांच्या पाठिंब्याच्या व त्यामुळे मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर किसनवीर वरिष्ठ महाविद्यालयात बीए भाग एक वर्गात प्रवेश घेतला व भविष्याच्या अंधारातील शिक्षण प्रवास सुरू ठेवला. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वास विविध पैलू पडत गेले. अभ्यासोत्तर उपक्रमामध्ये भाग घेऊन स्वतःला आजमवायला सुरुवात केली. त्यात विशेष करून क्रीडा व नेतृत्व प्रामुख्याने ! यादरम्यान निवास अनपट यांनी त्यांना समय सूचक मदत केली आणि पूर्ण सहकार्य केलं. 

महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळाच्या निवडणुका मित्रपरिवार व बावधन गटाच्या जोरावर त्यांनी दरवर्षी लढवल्या. व त्यात यश देखील मिळवल. ते बी ए भाग १ व भाग ३ ला वर्गप्रतिनिधी म्हणून निवडून आले. वर्गप्रतिनिधीला विद्यार्थीसचिव व विद्यापीठ प्रतिनिधी निवडताना मताधिकार असतो. यामध्ये राजू नाना यांनी अतिशय निर्णायक भूमिका निभावून १९८४ साली यशवंत महागडे तर १९८६ साली रोहिदास पिसाळ यांना सचिव म्हणून निवडून आणले. १९८६ ला इतिहास विषय घेऊन ते बिए उत्तीर्ण झाले. यावेळी त्यांचे इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक वसंतराव जगताप (केंजळ) व प्राध्यापक वाघचौरे यांच्या शिकवण्याच्या पद्धतीचा, ज्ञानाचा व व्यक्तिमत्त्वाचा विशेष प्रभाव त्यांच्यावर पडला. 

महाविद्यालयीन जीवनात नेतृत्वगुण विकसित करत असतानाच त्यांनी त्यांचे उत्तम आरोग्य आणि क्रीडा कौशल्य नियमित कसरत व सराव करून टिकवल होत. विभागीय पातळीवर महाविद्यालयाच्या खो-खोच्या स्पर्धेत त्यांनी संघाचे प्रतिनिधित्व केलं असे ते सांगतात. खेळाची सर्व कौशल्य आत्मसात केली. प्रतिस्पर्ध्यांच्या चाली परतवण्याची व खेळाच्या अटीतटीच्या क्षणी योग्य निर्णय घेण्याची कला आत्मसात केली. पुढे हे गुण त्यांना वैयक्तिक जीवनात उपयोगी पडत आहेत. १९८७ ला एम ए भाग १ मध्ये असताना वाईत वर्ग प्रतिनिधीच्या निवडणुकीदरम्यान त्यांना मोठ्या दिव्यातून जावं लागलं. अर्ज माघारी घेण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवरून दबाव आणले गेले. राजू नानांनी अशावेळी न डगमगता मेणवलीच्या प्राध्यापक शिंदे सरांसारख्या मार्गदर्शकांच्या पाठिंब्यावर योग्य निर्णय घेतले व मार्गक्रमण केले. हे पारंपारिक शिक्षण त्यांना नोकरी मिळवून देणार नव्हतं की जी तेव्हा काळाची गरज होती. मग कुणीतरी क्रीडा शिक्षक होण्यासाठी बीपीएड कोर्स करण्याचा विचार सुचवला. विभागीय पातळीवर ची खो-खो स्पर्धेत मिळवलेली प्रशस्तीपत्र बीपीएडच्या प्रवेशासाठी उपयोगी पडणार होती. 

एव्हाना निवास अनपट व निवास भाऊंच्या सहकारनगर, वडाळा येथील भगिनी बेबीताई यांच्या सल्ल्याने राजू नाना यांनी वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंडळ महाविद्यालयात बीपीएड साठी जून १९८७ ला प्रवेश मिळवला. १९८८ ला बीपीएड पूर्ण करून पुढच्या वर्षी (१९८९) फिजिकल एज्युकेशन मधील मास्टर्स पदवी म्हणजेच एम पी एड देखील पूर्ण केली. त्यांनी इच्छित शिक्षण खूपच उत्साहानं पूर्ण केलं. हे शक्य झालं ते बेबीताईंच्या त्यांच्यावरील स्नेहाने ! यानंतर त्यांच्यात शिक्षकी नोकरीच्या अशा पल्लवित झाल्या. २७ ऑगस्ट १९९० रोजी वयाच्या २६ व्या वर्षी विलेपार्ले, मुंबई येथील लाइन्स जुहू हायस्कूल येथे शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून ते कायमस्वरूपी रुजू झाले.

दरम्यान १९९३ मध्ये मालगाव येथील उच्चशिक्षित पदवीधारक नंदिनी वहिनींशी यांचा शुभविवाह झाला. राजीनाना चुलते, म्हणजे त्यांच्या सौ चुलती, म्हणजे काकी म्हणजे ऑंटी. अजूनही आम्ही त्यांना ऑंटी म्हणतो. नानांचा स्वभाव तापट तर ऑंटी मृदू व मायाळू ! त्यामुळे त्यांचा संसारवेल व्यवस्थित बहरला. प्रियांका व हितेश ही त्यांची दोन मुलं. दोघानाही त्यांनी अभियंता बनवले. प्रियांका दोन वर्षे झाली सर्विस करते तर हितेश डिग्री च्या शेवटच्या वर्षाला आहे. 

नानांचे वडील परबती आप्पा इतके सुंदर ढोल वाजवायचे की पाहणाराच दंग होऊन जाईल. त्यांचे नातू हितेश राजेंद्र मांढरे यांन आजोबांची परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे. हितेश विलेपार्ले येथील पार्लेश्वर ढोल ताशा पथकाचा सक्रिय सभासद आहे. राजू नाना म्हणतात - आज्ज्यान जिल्हा गाजवला आणि नातू राज्य गाजवतो.. अभिमान वाटतो या मांढरे परिवाराचा.

आपल्या नोकरी व्यवसायामुळे राजू नानांना मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देता आले नाही. पण ऑंटी नी ही जबाबदारी पूर्ण केली. सुरुवातीच्या खडतर प्रवासात त्यांनी नानांना सर्वतोपरी साथ दिल्यानेच त्यांच्या जीवनातील आत्ताचे स्थैर्य दिसत आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अंधेरी येथे त्यांचे स्वतःचे घर आहे आणि अतिशय आनंदी व समाधानकारक आयुष्य जगत आहेत. जवळजवळ अठरा वर्ष लायन्स जुहू हायस्कूलमध्ये प्रामाणिक सेवा केल्यानंतर प्रशासनाने त्यांना ती शाखा सांभाळण्याची मुख्याध्यापक पदाची जबाबदारी २००८ मध्ये दिली. खूप मोठा गौरव होता हा राजू नानांचा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा व पर्यायाने अनपटवाडी गावाचा.. अनपटवाडी तील पहिला मुख्याध्यापक होण्याचा मान त्यांचाच ! झाले बहु होतील बहु परंतु या सम हा..

वरकरणी केलेल्या कौतुकाचा त्यांना तिटकारा वाटतो. त्यांचा विश्वास शाश्‍वत कार्यात न की डामडौल व देखाव्यात. कुणी कौतुक करो वा न करो त्यांचं ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे चालू होतच. डिसेंबर २०१४ पर्यंत त्यांनी त्यांचा लायन्स जुहू हायस्कूलमधील उत्कृष्ट कार्यकाल पूर्ण केला व उरलेली सेवा अंधेरी येथील सत्यसाई विद्यामंदिरात करण्याचे ठरवले. या नवीन हायस्कूलमध्ये पूर्वीच्याच जोशाने आपलं कार्य कर्तव्य ते पार पाडत आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीने व नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रकल्पाद्वारे बांद्रा ते दहिसर दरम्यानच्या एकूण एक शाळेत स्वतः चा वेगळा ठसा उमटवला आहे. ते एक प्रसिद्ध क्रीडा परीक्षक व्यक्तिमत्व झालेल आहे. हे त्यांनी स्वकर्तृत्वावर व अतिशय कष्टाने मिळवलं असल्याच ते स्वाभिमानाने सांगतात. हे मिळवण्यासाठी च त्यांनी आतापर्यंत पराकाष्टा केली होती. 

ऑक्टोबर २०२२ पर्यंत त्यांचा शिक्षकी सेवेचा कार्यकाल ! यानंतर आपल्या स्वगृही म्हणजेच अनपटवाडी येथे परतण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग नवीन पिढीला व्हावा हीच त्यांची भूमिका आहे. हे करण्यासाठी त्यांनी गावच्या सहकाऱ्यांच व्यासपीठ निवडल नाही. वैचारिक फरक व समाज कार्याकडे बघण्याचा भिन्न दृष्टिकोन असल्याने हे शक्य झालं नसल्याचं ते सांगतात. पण सामाजिक दायित्व व दातृत्व हे त्यांच्या परिने त्यांच्या संपर्कवलयात ते करत आहेतच.

जीवनाच्या या टप्प्यावर उभा राहून भूतकाळाचे परीक्षण करताना प्रतिकूल परिस्थितीतील आपण हे सर्व कसे साध्य करू शकलो याचं गमक त्यांच्या जिद्द, काटक, धैर्यशील व तडफदार स्वभावात आहे असे त्यांना वाटते. हा स्वभाव त्यांना त्यांच्या वडिलांकडून आल्याचं ते मानतात. निवास, अनिल तसेच उदय कोदे यासारख्या मित्रांची सर्वकाल आवश्यक साथ त्यांना ही कठीण ध्येय प्राप्ती होवू शकली असे त्यांना वाटते. खरच नाना विषयी खूप आदर आहे मनात.  तरुणांचे एक उत्कृष्ट प्रेरणास्त्रोत ! राजू नानांच्या उर्वरित कार्यकाळास हार्दिक शुभेच्छा.. 

✍️ केशव राजपुरे

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...