Sunday, February 23, 2020

विद्यार्थी घडवतानाचे विचार मंथन

​​पीएचडी विद्यार्थ्यांना फक्त विशेषज्ञ नव्हे तर विचारवंत होण्यासाठी प्रशिक्षण द्या

बर्‍याच डॉक्टरेट अभ्यासक्रमामध्ये गंभीर विचारवंतांपेक्षा सामान्यपणे केंद्रित संशोधक तयार करण्याचे उद्दीष्ट ठेवतात. ते बदलू शकते आणि बदलणे आवश्यक आहे, असे गंडुला बॉश या लेखामध्ये म्हणतात. 

अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा उत्पादक संशोधक घडवण्याच्या दबावामुळे संस्थांनी त्यांच्या अभ्यासक्रम एकतर कमी केलेले आहेत किंवा पिळवटून टाकलेले आहेत. बाल्टिमोर येथील हॉपकिन्स विद्यापीठात त्यांना मायक्रोबायोलॉजी संशोधनातील यंत्रणेत अचानक झालेल्या नुकसानीची जाणीव झाली. यासाठी त्यांनी आर ३ प्रकल्पाची अंमलबजावणी केली. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी मध्ये त्यांनी परत एकदा फिलॉसॉफी ठेवण्याचा प्रयत्न केला. 

या आर ३ प्रकल्पा मध्ये रीजर्वेस ट्रेनिंग विथ रिस्पॉन्सिबिलिटी फोर रिप्रोडक्टिविटी हे तत्व अवलंबले आहे. या गोष्टीचा त्यांना चांगला परिणाम बघायला मिळालेला आहे.. 

तसं बघायला गेलं तर आपण देखील संशोधक विद्यार्थ्यांमध्ये संशोधन संस्कृती रुजवण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना चुका कश्या टाळता येतील हे ओळखण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याने उत्कृष्टतेचे अनुसरण केले पाहिजे. त्यांनी योग्य साहित्य सर्वेक्षण केले पाहिजे. त्यांनी संशोधनाची समस्या अचूकपणे परिभाषित करुन समजून घ्यावी. त्याने प्रयोगशाळेच्या बैठका, सादरीकरणे, चर्चा, परिषदांमध्ये सकारात्मक सहभाग घ्यावा.

शैक्षणिक आवडी व ध्येय बाजूला सारून नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. यामुळे विद्यापीठाच्या संशोधन निर्देशांकात नक्कीच सुधारणा होईल. यामुळे समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होईल.

विज्ञानाने केवळ स्वत: ची दुरुस्ती न करता स्वत: ची सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या वाक्याने या लेखाची सांगता होते.. खूप मोठा अर्थ दडला आहे यामध्ये... Don't create copy cats, train think tanks.



Friday, February 7, 2020

दीपा महानवर सर

।। महानवर सर ।।

आज लोणंद येथील तेव्हाच्या सायन्स कॉलेज लोणंद चे प्राचार्य आदरणीय महानवर सर त्यांचा चतुर्थ पुण्यस्मरण दिन ! मी आज जो कुणी आहे त्या सगळ्याच सर्व श्रेय आदरणीय महानवर सरांना जातं असे मी मानतो. बारावीला ८२ टक्के गुण मिळवूनही इतरत्र प्रवेश न घेता मी जेव्हा लोणंद महाविद्यालयात बीएससी साठी पारंपारिक शिक्षण घेण्यास प्रवेश घ्यायला गेलो तेव्हा माझ्या परीस्थितीची सरांना बरोबर जाणीव झाली. माझ्यातील चमक व हुशारी कदाचित सरांनी हेरली असावी तेव्हा ! त्यात मी सरांच्याच, म्हणजे वाई तालुक्यातील त्यामुळे आणखीन जवळीकता वाटली असावी. प्रवेश घेण्यासाठी माझे दाजी कै सदाशिव शिर्के यांनी मला जेव्हा त्याची भेट घालून दिली त्यानंतर सरांनी खात्री दिली की हा मुलगा पुढे जाऊन आपल्या सर्वांसाठी काहीतरी नक्की करेल. तो ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत उदाहरण ठरेल. त्यामुळे केशवची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर दाजी तुम्ही पुढाकार घेऊन त्याला आर्थिक पाठबळ पुरवाव, तो या गोष्टीच पांग नक्कीच फेडेल. ती गोष्ट दाजींना तेव्हा पटली आणि त्यांनी सरांना शब्द दिला की इथून पुढं मी माझ्या म्हेवण्याच दातृत्व स्वीकारलं आणि आपण जसं म्हणताय तसं त्याच्यातल्या गुणवत्तेला आपण वाव देऊया. तुम्ही त्याला मार्गदर्शन आणि व्यासपीठ उपलब्ध करून द्या मी त्याच आर्थिक दृष्ट्या समर्थन करतो. अशाप्रकारे माझा लोणंद महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झाला आणि मी नव्या उमेदीने पदवीचे शिक्षण घ्यायला लागलो.

१९८९ ते १९९२ या लोणंद येथील माझ्या महाविद्यालयीन जीवनात सरांचे योगदान खूप मोठे आहे. स्वतः प्राचार्य असून देखील सर नेहमी माझी जातीनिशी चौकशी करत. मला लागणारे प्रश्नसंच, पुस्तक, नोट्स हे मी मागण्या अगोदर सर देण्याची व्यवस्था करत. एक पालक ज्या पद्धतीने आपल्या पाल्याची सर्वांगीण जबाबदारी घेतो तशी जबाबदारी सरांनी घेतली होती. माझ्या अभ्यासाविषयी वारंवार चौकशी ठरलेली. शिक्षकांच्या अध्यापनाच्या पद्धतींबद्दल अभिप्राय घ्यायचे. सुदैवाने तेव्हा आम्हाला लाभलेले सर्वच शिक्षक अतिशय तन्मयतेने आणि प्रामाणिकपणे सेवा बजावत त्यामुळे कुणाविषयीच तक्रार करण्याची वेळ आली नव्हती. माझ्या सर्व शिक्षकांना विद्यापीठाच्या मागील प्रश्नपत्रिका माझ्याकडून सोडवून घ्यायच्या सूचना असायच्या. तसं बघायला गेलं तर मी इतर विद्यार्थ्याप्रमाणे सामान्य विद्यार्थी ! पण सरांनी मला विशेष महत्वाच्या व्यक्तीसारखी वागणूक दिली. त्यामुळे शिकत असंताना माझ्यासारख्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्याला संकोचित वाटायचं.. या सर्व कठोर परीश्रमाचे फलस्वरून म्हणून मी बीएससी च्या तिन्ही वर्षात विद्यापीठाच्या परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवू शकलो. मी विद्यापीठात कितवा क्रमांक मिळवला हे जाणण्यासाठी ते नेहमी उत्सुक असायचे. मी नेहमीच गुणवत्ता यादीच्या शीर्षस्ठानी असावं ही त्यांची अपेक्षा !  

मी ज्यावेळेस महाविद्यालयात प्रवेश घेतला होता त्यावेळेला महाविद्यालय विनाअनुदानीत होते. महाविद्यालय पूर्णपणे अनुदानित करण्यासाठी महाविद्यालयाचा गुणांक कसल्याही परिस्थितीत वाढवला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. हे करत असताना विद्यापीठ पातळीवर जर महाविद्यालयातील विद्यार्थी चमकले तर ही गोष्ट महाविद्यालयाच्या दृष्टीने फायद्याची होती. सरांनी स्वतःचे स्वप्न मी किंवा नौकुडकर मॅडम सारख्या विद्यार्थ्यांच्या मार्फत पूर्ण करून घेतलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सरांच्या मधील जिद्द, चिकाटी, येनकेन प्रकारे कुठलेही कार्य पूर्ण करून घेण्याची तळमळ यातून व्यक्तिमत्व घडवणार एक महान व्यक्तिमत्त्व मी सरांच्यामध्ये अनुभवलं. त्यावेळेला महाविद्यालयाला टप्प्याटप्प्याने अनुदान मिळायच.  सुरुवातीला २५ टक्के नंतर ५० टक्के आणि मग शेवटी पूर्ण अनुदान.. मी जेव्हा १९९२ साली बीएससी च्या परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला त्याचा परिणामस्वरूप म्हणा त्यावर्षी महाविद्यालयाला शंभर टक्के अनुदान प्राप्त झाले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की हे अनुदान मिळणाऱ्या घटकांचा मि सुद्धा एक भाग होतो.

बीएससी झाल्यानंतर पुढे शिक्षण घेण्याची परिस्थिती नव्हती. किंबहुना मी कुठेतरी नोकरी शोधून घर खर्चाचा बोजा उचलावा अशी गरज होती. पण सरांनी माझ्यातलया गुणवत्तेला वाव देऊन माझ्याकडून जास्तीत जास्त अर्कित करण्याचा ध्यास मात्र सोडला नव्हता. त्यांच्या सांगण्यावरूनच मी पुढे एम एस सी प्रवेशासाठी विद्यापीठात अर्ज केला. विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम आल्यामुळे माझा प्रवेश पहिल्या क्रमांकाला झाला. विद्यापीठात आलो तरी सरांचं माझ्यावरच लक्ष कमी झालं नव्हत. काय मार्गदर्शन ठरलेल, कायम चौकशी ठेवलेली, नेहमी पत्र लिहून माझ्यातील आत्मविश्वास व जिद्द टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचे सर.. विद्यापीठात आले की विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक तसेच विद्यापीठ अधिकार मंडळातील सदस्य यांच्या ओळखी करून द्यायचे. नेहमी मला माझ्या ध्येयाचे स्मरण करून द्यायचे. केशव आपल्याला पीएचडी व्हायचय - कितीतरी वेळा सर बोलले असतील. 
बीएससी ला लोणंद येथे असताना मी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला होता. सरांची इच्छा होती यासाठी माझा उचित सन्मान आणि गौरव व्हायलाच पाहिजे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते सत्कार करावा हे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले कारण मध्यंतरीच्या काळात पवार साहेबांची तारीख मिळाली नाही व सरांची रामानंदनगर येथे बदली झाली. मग सरांनी त्यांच्या या मानसाविषयी रामानंदनगर येथील महाविद्यालय निवडले. आणि तत्कालीन सहकार मंत्री आदरणीय आमदार पतंगराव कदम यांच्या हस्ते त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात माझा सत्कार घडवून आणलाच. 
सरांच्या मधील पद्धतशीरपणे, टापटीप, वक्तशीरपणा, तत्परता आणि प्रामाणिकपणा हे सर्व गुण माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी हवेहवेसे.. अभ्यासाव्यतिरिक्त जीवनावश्यक मानवी मूल्यांचे रोपनही सरांनी माझ्यामध्ये केले. विशेषता माझ्यातील खेळाच्या वेडाचे सरांनी नेहमी समर्थन केले. केशवने एक अष्टपैलू व्यक्तिमत्व घडावे यासाठी सर नेहमी प्रामाणिक प्रयत्न करत असत. सरांच्या या क्रियाकलापाचा मला मात्र खूप फायदा झाला. त्यामुळे माझ्यातील गुणवत्तेला वाव मिळाला व मी माझ्यातील आत्मविश्वास पुन्हा एकदा शोधून काढला. आज सर आपल्यात नाहीत पण सरांनी घडवलेलं अनेक केशव आजूबाजूला आहेत. सरांचे विचार आणि कार्य अजूनही या सर्वांच्या माध्यमातून करून घेणं चालू आहेच. मला माहित नाही की समाज सुधारणेविषयीची त्यांची पातळी आम्ही गाठू शकतो की नाही, परंतु सर आपण सोपवलेली शिक्षक रुपी मशाल पुढे नेण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.

याप्रसंगी सरांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली !!

- केशव राजपुरे 
(६ फेब्रुवारी २०२०)

Thursday, January 16, 2020

साधेपणातील विलक्षण मोठेपण

प्रा के सुरेश : साधेपणातील विलक्षण मोठेपण

डीएसटी च्या मीटिंग दरम्यान एक चैतन्यमय व्यक्तिमत्व प्राध्यापक के ए सुरेश यांना जवळून पहाण्याचा योग आला. सुरेश सर बंगलुरू येथील सेंटर फॉर न्यानो अँड सॉफ्ट मॅटर सायन्स या संस्थेचे संचालक होते आता ते तेथेच मानद प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. डीएसटी च्या वेगवेगळ्या समित्यांवर ते अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. तसं पाहायला गेलं तर सुरेश सर म्हणजे खूप मोठे व्य​​क्तिमत्व !

आरआरआय बंगलोर येथून सरांनी पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर काही वेळ इथेच सेवा केल्यानंतर त्यांना अमेरिका तसेच फ्रान्स येथे मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये बरेच नोबेल परस्कारप्राप्त शास्त्रज्ञ होते. ते सांगतात या लोबेल लॉरेट चे जीवन म्हणजे अतिशय सहज सुंदर असते. याचा प्रभाव त्यांच्या विचारांवर झाला असे ते मानतात. त्याचबरोबर फ्रान्समध्ये एका खाजगी तेल कंपनीत त्यांनी नोकरी देखील केली आहे. परदेशात बराच वेळ काढल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये विलक्षण बदल झाला होता.

त्यांच्या जीवनात ऐश्वर्याच्या गोष्टींना नगण्य स्थान आहे. इमारतीतील लिफ्ट ऐवजी जिन्याचा ते वापर करण्यावर भर देतात. महागड्या हॉटेलमधल्या जेवणापेक्षा कँटीनचे जेवण त्यांना अधिक रुचकर लागते. रिक्षा तसेच चारचाकी गाडीपेक्षा ते दुचाकी किंवा पायी जाण्यास प्राधान्य देतात.

त्यांच्या इथल्या तीन दिवसांच्या वास्तव्यात त्यांच्याकडून मला बरंच काही शिकता आले. त्यांच्या बोलण्यात किती मृदूता, किती नम्रता ! मी तर अचंबित झालो. त्यांनी मला सांगितले - बिइंग सिम्पल कॉस्टस नथिंग. देन व्हाय टू इन्वेस्ट इन थिंग्ज ऑफ नो युज. म्हणतात ना साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. मला भावली ती त्यांची समजावून देण्याची आणि समजून घेण्याची कला ! ते ज्या पद्धतीने मार्गदर्शन आणि प्रेरणा देतात ते अतिशय वाखाणण्याजोगे.  त्यांच्या मते देवाच्या मंदिरापेक्षा ज्ञानाचे मंदिर फारच महत्वाच. त्या ज्ञानाच्या मंदिरातील देवांची नेहमीच पूजा करावीशी वाटते त्यांना. नव्या पिढीला मार्गदर्शन करताना ते त्यांचे जुने अनुभव सांगतात.

परमेश्वराने त्यांना अगाध ज्ञान दिले आहेच. याबरोबरच त्यांच्याजवळ सर्जनशील आणि तर्किक विचारांची ज्ञानसंपदा आहे. त्यांच्यामध्ये क्षणोक्षणी समोरच्याच्या जागेवर जाऊन विचार करण्याची वृत्ती जाणवते. सहज बोलत असताना समोरच्याच्या मतांचा आणि विचारांचा सतत आदर करतात सर. त्यांचे साधे आणि सुस्पष्ट संवाद हवेहवेसे. त्यांच्या नावीन्यपूर्ण विचारांत नकारात्मकतेत सकारात्मकता आणण्याची ताकद आहे. 'काय करावे' हे ते फक्त सुचवतच नाहीत तर 'ते कसे कार्यान्वित करावे' याचे मार्गदर्शन देखील करतात.
कुणीही प्रेमात पडावं असंच त्यांचं व्यक्तिमत्व. त्याची भेट झाली हे मी माझे फार मोठं भाग्य समजतो. तुम्हाला कधी सरांना भेटण्याचा योग आला तर संधी दवडू नका कारण सर साधेपणा बद्दल फक्त सांगतच नाहीत तर क्षणोक्षणी साधेपणा जगतात.. नाहीतरी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली रग्गड माणसे सभोवताली असतातच की !

मग आपण का राहू नये साधेपणाने .. ?


- प्रा. केशव राजपुरे
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.

Sunday, January 12, 2020

राजर्षी शाहू महाविद्यालय कोल्हापूर येथे मार्गदर्शन

राजर्षी शाहू महाविद्यालय कोल्हापूर येथे बीएस्सी फिजिक्स माजी विद्यार्थी मेळाव्यादरम्यान केलेले मार्गदर्शन, १२ जानेवारी २०२०.


Sunday, June 10, 2018

मार्कच्या खिरापती

दहावीच्या परीक्षेत 'मार्कच्या खिरापती' विषयी केलेलं संख्यात्मक विवरण आणि याविषयीचं परखड मत वाचलं .. आपल्या शैक्षणिक पद्धतीत गुण हे विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता मोजमापाच एक मापदंड आहे. त्यामुळे ज्याला जादा गुण तो तुलनात्मकदृष्ट्या अधिक हुशार हे जरी खरं असलं तरी बहुतांशी बाबतीत वास्तव वेगळं असतं म्हणून त्यांनी मांडलेलया मताशी मीही सहमत झालो ! आपल्या इथं वैद्यकीय विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळवण्यासाठी या परीक्षांमध्ये मिळवलेलया गुणांचा निकष असतो. त्यामुळे सर्वचजण हरतर्हेने कठोर परिश्रम करतात आणि या टप्प्यावर अधिक संख्येने गुण मिळविण्याचा प्रयत्न करतात. हे निकष बदलण्याची ​​वेळ आलीय असे वाटते. विचारी मनं तयार करणारी पिढी घडवण्याऐवजी प्रशिक्षित रोबोट्स घडवणारी आपली शैक्षणिक प्रणाली बदलायला हवी.

आजकाल विद्यार्थ्याला परीक्षेत ९०% किंवा त्याहून अधिक गुण मिळाले की त्याचे शिक्षक आणि पालक स्वतःच्या समकालीन मार्कशी तुलना करतात आणि त्याचा गुणांक बोर्डात आलेल्या मुलाएव्हढा आहे अस ठरवून मोकळे होतात. पण वस्तुस्थिती वेगळी आहे अस मला तरी वाटतंय ! मला इथे तुलना अजिबात करायची नाही .. पण माझ्या विचारावर आपण नक्कीच विचार कराल आणि मताशी सहमत व्हाल. अलीकडे विद्यार्थी त्यांचे मागील परीक्षेत मिळालेलया गुणांच प्रतिनिधित्व करताना दिसत नाहीत. मला सांगायचंय की त्यांना त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त गुण मिळाल्याचा भास होतो. कधी कधी अस वाटतं की हे विद्यार्थी परीक्षेसाठी केलेला अभ्यास नंतर विसरतात ! भौतिकशास्त्राचाच विचार करायचं म्हंटलं तर - ते फॅरॅडेचा नियम बरोबर सांगतील पण पंखा कोणत्या तत्वावर फिरतो असं विचारलं तर गडबडतील. विद्यार्थी खूपच 'व्यावहारिक' झाल्याचं जाणवतंय ! ते विद्यार्थ्यापेक्षा परीक्षार्थीच अधिक बनलेत, किंबहुना परिस्थितीने बनवलेत असं म्हणणं वावगं ठरू नये. घेतलेल्या ज्ञानाचा सुयोग्य वापर कराय लावणारी परीक्षा पद्धती अस्तीत्वात यायला हवी असे वाटते. अशा रीतीने केलेलं विद्यार्थ्याचं रास्त मूल्यांकन होईल आणि त्यांनी मिळवलेली श्रेणी योग्य असेल. 

इथे लोक परीक्षेत उत्तीर्ण होतात आणि इतरांना परीक्षा उत्तीर्ण होण्यास शिकवितात आणि कुणालाच काही कळत नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यात व्यावहारिक दृष्टीकोण वाढीस लागलाय ! शिकणं म्हणजे पाठ करणं आणि विसरणं नव्हे तर मिळवलेल्या ज्ञानाच्या जोरावर अद्भुत आणि स्वतंत्र विचार करणारं मन विकसित करणं आहे - हे सारे विसरलेतच जणू ! तरी बोर्डानं गुणवत्ता यादी प्रसिद्ध करायची बंद केली आहे म्हणून बरं ! नाहीतर या परीक्षा म्हणजे एक जीवघेणी स्पर्धाच जणू ! काही पालकांना त्यांच्या पाल्याचे मार्क्स हे प्रतिष्ठतेचा प्रश्न वाटतो.. खाजगी शिकवण्या इतक्या वेगाने विकसित झाल्या आहेत की शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित वर्गांसाठी वेळ देणं कठीण झालंय ! त्यांचा श्वास गुदमरतो या बोर्डाच्या इयत्ता दरम्यान ! जर आम्ही परदेशी शिक्षण व्यवस्थेचा संदर्भ घेतला तर व्याख्यानाच्या तासांच्या ६० मिनिटांमधील, शिक्षक फक्त २० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी बोलतो. बाकीच्या वेळी विद्यार्थी चर्चा करतात. नाविन्यपूर्णता, अद्भुतता, सध्याच्या गरजा, समस्या आणि उपाय यावर त्यांचे अभ्यासक्रम आधारीत असतात. मग कसे तयार होणार अद्भुत आणि स्वतंत्र विचार करणारी मनं ?

सद्धाच्या शैक्षणिक व्यवस्थेतील पोकळी लक्षात घेऊन प्रत्यकाने आपली शैक्षणिक वाटचाल चालू ठेवायला हवी. कमावता करणारं शिक्षण घेतानाच आपल्या मनाला विचारी बनवणारं प्रशिक्षणही देता येतं का ते पाहावं ! जन्माने प्रत्येकजण जसा वेगवेगळा असतो तसाच विचारानेही ! मग वैचारिक नाविन्यता आणायची असेल तर प्रत्यकाने आपले जीवन वेगळ्या प्रकारे म्हणजे नावीन्यरितीने जगले पाहिजे. विचारी मन विकसित करायचं असेल तर जीवनात अद्भुतता आणि उत्कृष्टता अंगिकारली पाहिजे. जर अशी प्रणाली देशात अस्तित्वात असेल तर कोणत्याही परीक्षेत किती गुणा मिळाले हे दुय्यम होईल.

- केशव राजपुरे 

Monday, March 19, 2018

​शहीद जवान अनंत जानबा धुरी

शहीद जवान अनंत जानबा धुरी

गेल्या रविवारी म्हणजे गुढीपाडव्यादिवशी (१८/०३/२०१८) मी शहीद जवान अनंत जानबा धुरी यांच्या बेळेभाट (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) या गावी जयहिंद फौंडेशनने सोपवलेल्या जबाबदारीपूर्तीसाठी जाऊन आलो. १२० किमी अंतर आणि एकेरी रस्ता म्हणून कोल्हापूरहून सकाळी लवकरच निघालो. सकाळी ११ च्या दरम्यान बेळेघाट या त्यांच्या गावी पोहोचलो. त्यांचे बंधू परशुराम धुरी यांच्या घरी गेलो. तिथे वडील जानबा धुरी आणि कुटुंबीय यांची भेट झाली. कौटुंबिक माहिती घेतली आणि ३० एप्रिलच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. बेळेभाट हे चंदगड तालुक्यातील पाचशे लो​​कसंख्येचे छोटेसे गाव आहे. या गावातील बाराहून अधिकजण सैन्यात देशाची सेवा करत आहेत.

मला तिथं गेल्यावर १८ जानेवारी २०१८ रोजी त्यांना वीरगती प्राप्त झाल्याचं समजलं. हे समजल्यावर मात्र या भेटीस जडलेल्या भावनिकतेची तीव्रता वाढली. तशातच मी 'जयहिंद' ची उदिष्टे, त्यांचे सांत्वन आणि माझा भेट-प्रपंच याची माहिती दिली. माझ्या प्रश्नाची त्यांचेकडून त्रोटक उत्तरं मिळायला लागली तशी तशी माझी अस्वस्थता वाढायला लागली. कारण फक्त दोनच महिने झाले या दुर्दैवी घटनेस आणि आपण इथं पत्रकारिता करतोय की काय असा भास ! त्यांचे वडील रडवेल्या सुरात बोलत होते. मुलाबद्दलची माया, सतावणारी आंतरिक ओढ तसेच चालता बोलता पोटचा गोळा गेल्याचं दु:ख - सारं सारं दिसत होतं !

जवान अनंत धुरी यांचे प्राथमिक शिक्षण बेळेभाट आणि दाटे येथे तर माध्यमिक शिक्षण संजय गांधी विद्यालय नागनवाडी येथे झाले होते. हलकर्णीच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात त्यांनी एसवाय बी.ए. पर्यंत शिक्षण घेतले होते. धुरी बेळगाव येथील ८ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनमध्ये १९९८ मध्ये भरती झाले होते.
त्यांनी  बेळगाव, पुणे, राजस्थान, आसाम, दिल्ली येथे एकूण १९ वर्षे सैन्यात सेवा बजावली होती. त्यांचे वडील जानबा आणि आई अनुसया हे शेतकरी आहेत. तर बंधू अंकुश हेही शेती करीत आहेत. तर थोरले बंधू परशुराम हे माध्यमिक शिक्षक म्हणून गावाजवळील एका हायसकूल मध्ये कार्यरत आहेत. अनंत यांचा विवाह २००५ साली नांदवडे येथील तुकाराम गावडे यांची मुलगी मनीषा यांच्याशी झाला होता. येत्या काही दिवसात त्यांना स्टार गोल्ड मेडल देवून बढती मिळणार होती.

सध्या ते श्रीनगर येथील गुलमर्ग येथे होते. तिथे जानेवारीमध्ये तापमान उने २० डिग्री सेल्सियस पर्यंत गेले होते. त्यामुळे थंडीची लाट होती यातच  हिमवर्षाव होत राहिला. दिनांक १८ जानेवारी २०१८ रोजी पहाटे पाच वाजता त्यांना बर्फात गुदमरून वीरमरण आले. त्यांची आठ वर्षांची मुलगी ॠतुजा आणि वडील जानबा यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला होता.

मी बेळेभाट ला जाण्याअगोदरच अनंत धुरी हे विवाहित आहेत आणि त्यांच्या पत्नी श्रीमती मनीषा उर्फ अस्मिता ह्या गृहिणी आहेत आणि आपल्या मुली ऋतुजा आणि श्वेता यांचे पालनपोषण करीत आहेत याची कल्पना होती. पण तोपर्यंत तरी घरात वीरपत्नी किंवा मुलींची हालचाल जाणवत नव्हती म्हणून माझं आपलं - त्यांची पत्नी पतीवियोगाने बाहेर येत नसावी, कदाचित या प्रसंगातून सावरण्यासाठी माहेरी गेली असावी असा तर्क लावणं चालू होतं. त्यात त्यांची भावजय, भावाची मुलं घरात वावरताना दिसत होती मी मात्र अनंत यांच्या कन्यांचा शोध घेणं चालू केलं होतं.

मी माहिती लिहून घेतली तर काही माहिती मोबाईल मध्ये घेतली. ना राहून परशुराम यांना विचारलं असता समजलं की ही वीर-पत्नी गेली बरीच वर्षे म्हणजे या प्रसंगापूर्वीपासूनच बेळगाव येथे आपल्या निवृत्त सैनिक वडिलांच्या घरानजीक विभक्त रहात आहेत. यामुळं दु:ख, उत्सुकता, कीव आणि तत्सम विचारांनी मनात गर्दी केली. का असावं असं ? बरं या वीर जवानाच्या जाण्यानंतर तरी ही वीरपत्नी धुरी कुटुंबासोबत का रहात नसावी इ.. 

आईची आईंची चौकशी केली असता समजले की त्या वयस्कर आहेत आणि पुत्र वियोगाने त्यांनी आपणास शेतातील गोठ्यावर वेगळं ठेवलं आहे. कुटुंबियांना जयहिंद आर्थिक मदत करणार आहे हे सांगितलं आणि ही मदत सर्व गरजूना दिली गेली पाहिजे या तत्वावर वीरपत्नी चा बेळगाव येथील पत्ता आणि मोबाईल क्रमांक मागितला. सुरुवातीला 'आम्ही एकमेकांच्या संपर्कात नसतो' हे कारण पुढं करून टाळलं दिराने ! पण तिथं उपस्थित असलेल्या अनंत धुरी यांच्या चुलत्याने नंबर दिला. जड अंत:करणाने सर्वांचा निरोप घेतला आणि बेळेभाट सोडले.

त्या नंबरवर दोन तासाच्या कालावधीत बऱ्याचदा प्रयत्न केला तरी संपर्क होत नव्हता आणि बेळगावात नानावाडी येथे राहतात एव्हढंच माहीत. बरं, चंदगडहून तसेच परत फिरण्यापेक्षा बेळगाव मार्गे कोल्हापूर करता येईल आणि याकामासाठी परत यायचा प्रसंग टळेल म्हणून माझा आटापिटा ! दरम्यान थांबून काय करायचे म्हणून निसर्गरम्य आणि सधन चंदगड तालुक्यातील आमच्या माजी विद्यार्थ्याच्या घरी (माणगाव-नीटूर-कोवाड-दुडगे) जाऊन आलो.. नाईलाजाने पुन्हा परशुराम धुरी सरांना फोन करून वहीनींच्या बंधूंचा किंवा वडिलांचा फोन नंबर देण्याची विनंती केली. शेवटी नंबर मिळाला आणि वीर पत्नीची बेळगाव येथे त्याच दिवशी भेट होणार याची खात्री झाली. जयहिंद च्या पाठींब्याची खरी गरज ज्या वीर पत्नीस आणि दोन पिल्ल्यांना होती त्यांची भेट घ्यायला तडक बेळगाव गाठले. 

अनंत धुरी यांचे म्हेव्हणे पप्पू गावडे, विसितला तरुण, आम्हास नानावाडी जवळील मिल्ट्री कॅम्प नजीक असलेल्या महादेव मंदिराजवळ घ्यायला आला. आता त्यांच्या घरी पोहोचेपर्यंत मनात विचारसत्र सुरु झालं. हा एकटाच भाऊ... तोही अविवाहित ... आई नसलेने मदतीसाठी बहिणीची गरज पडली असावी याच्या कुटुंबास ! म्हणून सासरी मन रमत नसावं त्यांचं ! हा विवाहित असता तर नणंद भावजया एकत्र राहिल्या असत्या का ? वैगेरे वैगेरे .. 

दारातच उभे असलेले दोन चिमुकले, निराधार, निष्पाप चेहरे दिसले आणि पोटातील पित्त हालावं असं झालं. त्यांना वाटलं त्यांचा मामा कुठल्यातरी पाहुण्यांना घेऊन आलाय. त्यांच्या हक्काचा आधार, चालतं -बोलतं माणूस त्यांना सोडून जाऊन देशाच्या कामी आलेल्या दिवसाला २ महिनेच झाले होते त्यावेळी ! काय असाव्यात त्यांच्या भावना ? मनातील विचार ?  स्वतःला विचारत होतो आणि काळीज चर्रर्र होत होतं. 'त्यांच्या भविष्यात काय मांडून ठेवलंय?' हा एक त्रयस्थ आणि वडीलधारी म्हणून मी विचार करत होतो. त्या बापडयांना काय 'त्या' भयानकतेची कल्पना ? मन थांबायला तयार नव्हते - 'मिळेल का निष्पापांना हक्काचा हरपलेला आधार ? ', 'का त्या विधात्यानं कोपावं यांच्याच बाबतीत ?'- सारखे विचार चालू होतेच. 

मला जे बोलायचे होते ते धुरी यांच्या म्हेव्हण्याला थोडक्यात सांगितले. भेळेभाट वरून नातेवाईकांना भेटून आलोय हेही सांगितले .. एकूण कौटुंबिक मतांतराचा प्रश्न लक्षात घेऊन 'जयहिंद' ही संस्था वीरपत्नी आणि मुलींना शक्य असलेली सर्वतोपरी मदत करेल याची ग्वाही दिली. तसेच हेही सांगितले की सातारच्या कार्यक्रमास आई-वडील-बंधू स्वतंत्ररित्या आले तरी वहिनी आणि मुली यायला हव्यातच ! आमची मदत आपल्याच हाती देऊ आणि जयहिंद आपल्या हक्काचा आधार बनेल - हा विश्वास दिला ! हे सर्व चालू असताना वहिनी आतल्या घरात होत्या. कदाचित त्यांनाही ऐकू जावे म्हणून मी जरा खडया आवाजातच बोलत होतो.. पिल्ल्यांची त्यांना विश्वासात घेऊन, आधार देत शाळेविषयी माहिती घेतली. मोठी ऋतुजा इयता पहिलीत तर दुसरी श्वेता अंगणवाडीत शिकत आहे. त्यांच्या घरानजीकच असलेल्या अंगडी इंटरनॅशनल स्कुल या खाजगी शाळेमध्ये त्या शिकतात. वर्षाकाठी दोघींची शैक्षणिक फी किमान साठ हजारांपर्यंत आहे. 'जयहिंद' या फी मध्ये सवलत मागू शकते- हा विचार आला.

शेवटी विनंती केल्यावर वहिनी बाहेर आल्या. त्या काळरात्री च्या साडेआठ वाजता अनंत यांनी पत्नीस फोन केला होता. गुलमर्ग येथे कमालीचा गारठा आहे, त्यामुळे माझा श्‍वास गुदमरतोय, मला मुलींची खूप आठवण येतेय, तुम्ही सर्वजण तब्येतीला सांभाळा, असे सांगितले होते. पत्नीनेही तुम्ही घराकडची काळजी करू नका, असे सांगतानाच फोन कट झाला होता. तोच त्यांच्या आयुष्यातील अखेरचा फोन ठरला. शत्रुला रोखण्यासाठी ते या कडाक्याच्या थंडीतही सेवा बजावत होते. त्यांचा पती-वियोग, दु:ख, यातना क्षणोक्षणी जाणवत होत्या. काही वेळानंतर मी त्यांचं सांत्वन केलं आणि विश्वासात घेऊन वस्तुस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला..  

असं जाणवलं की लग्न झाल्यापासूनच धुरी यांच्या कुटुंबाने वीरपत्नी मनीषा उर्फ अस्मिता धुरी यांना आपलंस केलं नाही किंबहुना सामावून घेतलं नाही किंवा अस्मिता यांनी स्वत:हून सामावण्याचा प्रयत्न केला नाही. गैरसमज, मतभेद व त्यातून ताण-तणाव यांना कंटाळून आपल्या निवृत्त सैनिक वडिलांच्या आधारावर त्या बेळगाव येथे रहात होत्या; केवळ एका आशेवर: घरवाले नसले म्हणून काय झाले माझा जोडीदार तर आहे ना सोबत ! त्यात त्यांना दोन्ही मुलीच ! प्रत्येक सैनिक कुटुंबाला त्यांचा मुलगा हवा, त्याचा पगार हवा, पण त्याची बायको नको, मुली तर नकोच नको - असा समज आहे अस्मिता वहिनींचा ! बायको आणि मुलांनी त्यांचं त्यांनी अस्तित्व निर्माण करून जगावं - ही कदाचित इच्छा असावी घरच्यांची ! आम्ही आमच्या जवान मुलासाठी आहोत, तुमच्यासाठी नाही - हा आहे त्यांचा समज आणि भावना ! अस्मिता वाहीनींना अजूनही असं वाटतंय की काहीतरी चमत्कार होईल आणि जानबा धुरी यांचे कुटुंबीय परत या निराधारांना सामावून घेतील आणि हक्काचा आधार देतील.

कौटुंबिक तणाव, मतभेद सर्वत्र आहेतच की. सासू-सासरे, दिर-जावा, नणंद-भावजया यांना तुम्ही त्यांचे किंबहुना त्यांच्यातीलच आहात हे दाखवायला कमी तर पडत नाहीत ना - याचा शोध घ्यावा लागेल. तसेच कोणत्याही विवाहित स्त्रीला तिचे सासर हेच हक्काचं 'घर' असतं हा विचार पटायला हवा. तसा विश्वास सासरच्या मंडळींनी रुजवायला हवा. हे सार करूनही तुमचा दखल-अंदाज घेतला गेला नाही तर निवडलेला 'सवता-सुबा' पर्याय योग्य असावा. वडीलधारी मंडळींना सूनेतील पोरकटपणा तसेच हट्ट ओळखून समयसूचक तोडगा काढता आला पाहिजे. हे सगळं जाणून उमजून संसारात 'अपेक्षा' ठेवल्या की काहीही पर्याय लागू पडत नाही हा गुत्ता सोडवायला - हे मात्र खरं.

मी तूर्तास तरी अस्मिता वहिनींना या सगळ्यातून बाहेर यायचं बळ 'जयहिंद'तर्फे देऊन आलोय. खरंच, हि विटलेली मनं जुळतील का ? कुणाचं चुकतंय यापेक्षा काय रास्त याचा शोध व्हावा. आर्थिक मदत, सांत्वन, कणव, दया यांहीपेक्षा यामध्ये मध्यस्ती करून मध्यावधी मार्ग शोधायची नितांत गरज वाटते. जयहिंद चे संचालक मंडळ आणि विचारगट यावर काहीतरी उपाय नक्की शोधेल आणि फौंडेशनच्या उद्धीष्ठपुर्तीच्यादृष्टीने पावले टाकेल.

जयहिंद
- केशव राजपुरे 

Monday, October 9, 2017

​विज्ञानातील नोबेल पारितोषिकांची विलक्षणता

विज्ञानातील नोबेल पारितोषिकांची विलक्षणता

३ ऑक्टोबर २०१७  रोजी यावर्षीचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक रेनर वीस, किप एस. थॉर्ने आणि बॅरी सी. बरीश या शास्त्रज्ञांना संयुक्तपणे देण्याचे जाहीर झाले आहे. लेझर इंटरफेरॉमीटर ग्रेविटेशनल-वेव ऑब्झर्वेटरी (एलआयजीओ) प्रकल्पाचे नेतृत्व करत या तिघांनी गुरुत्वलहरींचा शोध लावला होता. त्या तिघांमध्ये ९० लाख-स्वीडिश-क्रोन (अंदाजे ७ कोटी २५ लाख रुपये) च्या बक्षीसाचे विभाजन होईल. कदाचित सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे तिघेजण त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी "२०१७ चे नोबेल पुरस्कार विजेते" म्हणून ओळखले जातील. पण एलआयजीओ प्रोजेक्टमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या​​ १३३ संशोधन संस्थांमधील जवळजवळ ११०० इतर शास्त्रज्ञांच्या बाबतीत काय ? या शास्त्रज्ञांची नावे पेपरच्या सुरवातीला न देता शेवटी नमूद केलेली आहेत (संदर्भ: Physical Review Letters 116 (2016) 061102) कारण त्यांची नावे देण्यासाठी लागली होती तीन पृष्ठांची दीर्घ सूची ! प्रश्न या महत्वाच्या मुलभूत शोधात कितीजण सहभागी आहेत याचा नसेलही कदाचित पण ज्या शोधामध्ये त्यातील अनेकांनी आपली पूर्ण आयुष्ये अर्पण केली त्यांच्या नावाची दखल घेतली जात नाही हे मात्र नक्की..

खगोलशास्त्रज्ञ मार्टिन रीस यांनी बीबीसी न्यूजला सांगितले की, "एलआयजीओ चे यश शेकडो संशोधकांना जाते." आणि पुढे म्हणाले "२०१७ च्या नोबेल पुरस्कार समितीने ग्रुप पुरस्कारांना नकार दिल्याने वारंवार समस्या उद्भवल्या आहेत आणि कित्येक विज्ञानाचे कार्य प्रत्यक्षात कसे केले असावे याविषयी भ्रामक ठसा दिला आहे." हे परावर्तन परिचित आहे. प्रत्येक वर्षी, जेव्हा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि फिजिओलॉजी किंवा मेडिसिन मध्ये नोबेल पुरस्कार दिले जातात, तेव्हा समीक्षकांच्या हे लक्षात येते की यामध्ये शास्त्रज्ञांना त्यांच्या कामाबद्दल ओळखण्याची एक बेजबाबदार आणि अनैसर्गिक पद्धत आहे. विज्ञानाचा सन्मान करण्याऐवजी, ते त्याचे स्वरूप विकृत करतात, त्याचा इतिहास पुन्हा लिहितात आणि अनेक महत्वाच्या योगदानकर्त्यांना दुर्लक्षीत करतात.

बक्षिसांबद्दल बोलायचे तर या खात्रीने चांगल्या गोष्टी आहेत. वैज्ञानिक शोध हे मानवी उपक्रमांमधले महत्त्वाचे भाग म्हणून ओळखले जावे. नोबेल पारितोषिकाची वेबसाइट ही एक शैक्षणिक खजिना आहे की जिथे प्रसिद्ध ऐतिहासिक तपशील भरभरून दिलेले आहेत की जे प्रकाशित पेपर्सपासून गायब आहेत. आणि वर्षानुवर्षे, एखाद्या घटनेबद्दल विज्ञानाला अशीच प्रकर्षाने वाट पाहवी लागते की जी सामान्यत: ऑस्कर किंवा एम्मी नॉमिनेशनसाठी राखीव असते, हे सगळं अगदी उपहासात्मक आहे. पण वैज्ञानिक नोबेलनी अगदी सुरुवातीपासूनच खोल-मुळांच्या समस्यांवर इशारा दिल्यापासून वाद निर्माण झाला आहे.

अँटिटॉक्सिनच्या शोधासाठी एमिल्स वॉन बेहरिंग यांना मेडिसिनमधील १९०१ चे पहिले नोबेल देण्यात आले परंतु त्यांचे जवळचे  सहकारी शिबासाबुरो किटासाटो यांना मात्र विचारात घेतले नाही. १९५२ साली मेडिसिन आणि फिजिओलॉजी चे नोबेल स्ट्रेप्टोमायसिन या प्रतिजैविकचा शोध घेण्यासाठी सेलमन वॉक्समन यांना देण्यात आले.  यावेळी वॉक्समनचे पदवीधर विद्यार्थी अल्बर्ट शाट्स, ज्यांनी प्रत्यक्षात हे रसायन शोधले, यांना दुर्लक्षीत केले. २००८ मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक ग्रीन फ्लूरोसन्ट प्रोटीन (जीएफपी) च्या शोधाकरिता तीन संशोधकांना देण्यात आले. तेव्हा सामान्यतः जीएफपी हा परमाणु इतर शास्त्रज्ञ आपल्या पेशींमधील हालचालीचे निरीक्षण करण्यासाठी वापरत. डग्लस प्राशर, की ज्याने जीएफपीसाठी जनुकांची प्रथम क्लोन केले, याचा त्या तीनात समावेश नव्हता.

जर त्यांनी आधीपासूनच मूळ नियमांना झुकवले असेल, तर आणखी पुढे का जाऊ नये?

काही प्रकरणांमध्ये स्वतःचे नाव वगळल्याबद्दल लोकांनी विरोध केला होता. २००३ मध्ये मॅग्नेटीक रेसॉनन्स इमॅजींगच्या शोधातील रे दामियायन यांना कमिटीने चुकीच्या पद्धतीने मेडिसिनमधील नोबेल पुरस्कारातून वगळले होते. मग त्यास विरोध करण्यासाठी रे दामियायन यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांत पूर्णपान भरून जाहिरातींची मालिका काढली होती. त्यावेळेस नोबेल समितीने फक्त पॉल लॅटरबर आणि पीटर मॅन्सफिल्ड यांचीच निवड केली होती. तेव्हा दामादियन यांना वगळणे ही  "लज्जास्पद चुक आहे आणि ती दुरुस्त व्हायलाच हवी" असा सूर निघाला होता. "सोमवारी सकाळी मी जागा झालो आणि माझ्या लक्षात आले की माझे नाव  इतिहासातून पुसून टाकले आहे याचे मला अतीव दु:ख होत आहे आणि ते घेवून मी जगूच शकत नाही" असे नंतर त्यांनी लॉस एंजेलिस टाइम्सला सांगितले.

प्रत्येक वर्षी वैज्ञानिक नोबेलच्या बक्षिसासाठी जास्तीत जास्त तीन पुरस्कार विजेते ठरवतात. त्यामुळे पारितोषिकासाठी कोणत्या तिघांना निवडावे ही एक विचित्र समस्या बनली आहे. इव्हान ऑरानस्की आणि अॅडम मार्कस यांनी स्टॅटमध्ये लिहिलेले आहे की आधुनिक विज्ञान हे "टीम स्पोर्ट्सचा टीमियेस्ट" आहे. होय, काहीवेळा संशोधक एकटाच शोध लावतो, परंतु हे दुर्मिळ आहे. अशामुळे जरी एका संशोधन गटामध्ये पोस्टडॉक्स्, विद्यार्थी आणि तंत्रज्ञांची एक तुकडी नाविन्यपूर्ण शोधामध्ये सहभागी असली तरी संपूर्ण शोधाचे श्रेय फक्त एका संशोधकास मिळते आणि बहुतेक वेळा अनेक ग्रुप एकाच प्रकल्पावर काम करतात. आणि फिजीकल रिव्हिव लेटर्स मधील ज्या शोधनिबंधाने एलआयजीओ टीमने आपला शोध जाहीर केला तीत तीन पानांची लेखक सूची आहे. आणखी एक अलीकडील शोधनिबंध, ज्याद्वारे हिग्ज बोसॉनच्या वस्तुमानाचा अचूक अंदाज वर्तवला होता, त्यामध्ये ५१५४ लेखक आहेत.

नोबेल पुरस्काराचे पाठीराखे -नोबेल कमिटी अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छापत्रात घालून दिलेल्या नियमांनुसार पुरस्कार प्रदान करते- असा सूर धरतात. तसं असल्यास नोबेल यांच्या इच्छापत्रानुसार हा पुरस्कार एक "व्यक्ती" -एकटा- ओळख पुरस्कार म्हणून ज्याने "मागील वर्षभरात" आपल्या संशोधन क्षेत्रात महत्वपूर्ण शोध लावला आहे त्यालाच दिला जावा असे म्हंटले आहे. याउलट नोबेल कमिटी या पुरस्काराची शिफारस जास्तीत जास्त तीन व्यक्तींपर्यंत दहा वर्षांपूर्वी लावलेल्या शोधासाठी करते. जर ते आधीपासूनच मूळ नियमांना झुकवत असतील, तर आणखी थोडं पुढ का जाऊ नये? २०१२ मध्ये सायंटिफिक अमेरिकनच्या संपादकांनी सुचविल्याप्रमाणे, शांततेच्या नोबेल पुरस्कारासारखेच वैज्ञानिक नोबेल पुरस्कार देखील टिम आणि संस्थांना का दिले जाऊ नये?

यामध्ये सुधारणा करायला कदाचित कमी किंमत चुकवावी लागेल पण हे टाळल्यामुळे नक्कीच जादा किंमत मोजावी लागत आहे. २०१३ साली आर्टूरो कॉसाडेव्हल आणि फेरिक फॅंग हे जीवशास्त्रज्ञ लिहितात की नोबेलने जरी एकमेव अलौकिक बुद्धिमत्तेची कल्पना मांडली असली तरी तत्त्ववेत्ते थॉमस कार्लाईल यांनी "जगाचा इतिहास म्हणजे महान पुरुषांचे चरित्र आहे" - असे याचे स्पष्टीकरण दिले होते.. नोबेल यांनी या अविज्ञाननिष्ठ आणि अपायकारक पुराण कथेस भरीस घालले आहे. असं केल्यामुळे कॅसॅदवेल आणि फॅंग म्हणतात, ते "विज्ञानातील एक सदोष बक्षीसप्रणाली मजबूत करतात ज्यात विजेता सर्वकाही घेतो आणि बऱ्याच लोकांच्या योगदानांकडे दुर्लक्ष करून त्यांना दुर्लक्षीत केले जाते." तसं बघीतलं तर, बक्षिसे शोधामध्ये कोणी महत्वाचे योगदान दिले याबद्दल नाहीतच मुळी, परंतु शैक्षणिक संस्थांच्या घातक घोटाळय़ांमधून सुखरूपपणे जो वाचला आहे त्याच्यासाठी आहेत असे वाटते.

आणि काही वेळेस नोबेल पुरस्काराविना हे जग सोडलेले सुद्धा अनेकजण आहेत कारण नोबेल फक्त हयात असणाऱ्यांनाच दिले जाते. नोबेल मरणोत्तर प्रदान करता येत नाही. म्हणून रॉसलीन फ्रॅंकलीन यांनी डीएनएची डबल हेलिकल रचना शोधूनही त्यांना नोबेल मिळाले नाही कारण त्या शोधास जेम्स वॉटसन, फ्रान्सिस क्रिक आणि मॉरिस विल्किन्स यांना नोबेल मिळण्यापूर्वी चार वर्षे त्या मरण पावल्या होत्या. खगोलशास्त्रज्ञ वेरा रुबिन यांनी आकाशगंगा कशा प्रकारे फिरतात याविषयी अभ्यास करून कृष्णविवरेंच्या अस्तित्वाचा पुरावा दिला होता की ज्या शोधामुळे विश्वाची संकल्पना समजण्याच्या कल्पनेत अमुलाग्र बदल झाला होता. ऑक्टोबर २०१६ मध्ये विज्ञान लेखक राचेल फेल्टमन म्हणाले होते की, "वेरा रुबिन नोबेलच्या हक्कदार आहेत, पण कदाचित ते त्यांना वेळेत मिळणार नाही". दोन महिन्यांनंतरच रूबिन यांचा मृत्यू झाला.

रुबिन आणि फ्रँकलिन यांनी नोबेलबद्दलची आणखी एक दीर्घकालीन समस्या मांडली. ते लिहितात "आम्हाला लक्षात ठेवायला हवे की विजेत्यांचे लोकसंख्याशास्त्र संरचनात्मक कल प्रतिबिंबित करतात आणि त्यांचा विस्तार करतात". जितके जास्त ते एकमेव अलौकिक बुद्धिमत्तेचा पुरावा देतात, तितकाच नेहमीच प्रतिभावान हे गोरे आणि पुरुषच असतात याचाही पुरावा देतात. फिजियोलॉजी किंवा मेडिसिनमध्ये आत्तापर्यंतच्या २१४ बक्षिसेंपैकी केवळ १२, रसायनशास्त्रातील १७५ पैकी ४ तर भौतिकशास्त्रातील २०४ पैकी फक्त २  महिलांनी नोबेल्स जिंकली आहेत. भौतिकशास्त्रातील महिला मारीया गोएपेर्ट मायर यांनी अगदी अलीकडे म्हणजे ५६ वर्षापूर्वी नोबेल पुरस्कार मिळवला आहे. हे संभाव्य सन्मानमूर्तींच्या कमतरतेमुळे नक्कीच नसावे. रब्बीन देखील एका नोबेलसाठी पात्र होते, तसेच  लुइस मायटनर ज्यांनी लौरेट ओटो हॅन यांच्यासोबत आण्विक विखंडनाचा शोध लावला होता यांचा देखील त्या नोबेलवर हक्क होता. १९३७ ते १९६५ दरम्यान मायटनर यांना वेगवेगळ्या लोकांद्वारे नोबेलसाठी ४८ वेळा नामांकन मिळाले होते परंतू दुर्दैवाने त्यांना ते कधीच मिळाले नाही.  "नोबेल पारितोषिके ह्या महान गोष्टी आहेत परंतु विजेत्यांचे लोकसंख्याशास्त्र संरचनात्मक कल प्रतिबिंबित करतात आणि त्यांचा विस्तार करतात- हे आपणास लक्षात ठेवायला हवे"- खगोलशास्त्रज्ञ केटी मॅक यांनी गेल्याचवर्षी ट्विटरवर सांगितले. 

कदाचित नोबेल इतका मोठा करार नसता तर यापैकी कशातही फारसा फरक पडला नसता. पारितोषिकांच्या आर्थिक मूल्यापलीकडे, पुरस्कार विजेत्यांना अक्षरशः किफायतशीर बोलणा-या प्रवाहांची हमी दिली जाते. त्यांच्या पेपर्सना अधिक उद्धरणे मिळतात. ते नामनिर्देशित झालेल्या लोकांपेक्षा एक दोन वर्षे जादा जगतात पण प्रत्यक्षात विजयी कधीच होत नाहीत. आणि नोबेल पुरस्कार त्यांना त्यांच्या महानतेच्या कायम छापासाठी प्रेरक म्हणून काम करतात. नोबेल पारितोषिक म्हणजे मॅकार्थरच्या प्रतिभेचे अनुदान नाही की जे "त्यांच्या कामात अपवादात्मक कृतिशीलता दर्शवितात" अशांनाच मिळते. ते एखाद्या विशिष्ट शोधाची ओळख म्हणून रहाते. आणि तरीही शोधक, स्वतःच्या अधिकारात, संशोधनातील ऐतिहासिक योगदान आणि आपले संपूर्ण कायमस्वरूपी विचार यात साधर्म्य निर्माण करणारे एक बौद्धिक शक्ती केंद्र म्हणून कायमचा ओळखला जातो.  

एखादा नोबेलवीर जेव्हा प्सूडोसायन्स किंवा हटवादाचा विजेता बनतो तेव्हा मात्र समस्या निर्माण होतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. ट्रान्सिजिस्टरचे जनक विल्यम शॉकली, ज्यांना ट्रान्सिजिस्टरच्या शोधाबद्दल १९५६ चे भौतीकशास्त्रातील नोबेल मिळाले होते, की जे पुढे युजिनिक्सचे प्रवर्तक बनले त्यांनी काय म्हणावे - "कमी बुद्धिमत्ता असलेले लोक-प्रामुख्याने आफ्रिकन अमेरिकन- यांचे निर्जंतुकीकरण करावे". दुसरे नोबेलवीर जेम्स वॉटसनचा यांचादेखील दावा आहे की आफ्रिकन लोक सरासरीपेक्षा कमी बुद्धिमान आहेत. कॅरी म्युलिस, ज्यांना डीएनएचे पिसीआर तंत्र, जे जगभरातील प्रत्येक जीवशास्त्र प्रयोगशाळेत वापरण्यात येते, विकसित केल्याबद्दल, १९९३ चे रसायनशास्त्रातील नोबेल मिळाले होते, ज्यांनी मानवनिर्मित हवामानातील बदल आणि एचआयव्ही आणि एड्स यांच्यातील दुवा नाकारला, डीसीएनच्या ज्योतिषशास्त्राचे मुखर प्रवर्तक बनले. त्यांनी एका आत्मचरित्रात लिहिले आहे की, त्यांना एकदा एक चमकदार रॅकून (उत्तर अमेरिकेत आढळणारा लांब शेपटीचा व अंगावर दाट केस असलेला मांसभक्षक प्राणी) सापडला जो कदाचित परदेशी नव्हता किंवा नसू शकेल.

निष्पक्षतेने बोलता, एखाद्या वर्षात किती शास्त्रज्ञांना नोबेलने पुरस्कृत करावे या समस्येप्रमाणे किती नोबेलवीर वाह्यात जातात हा प्रश्न कोणतीही नोबेल समिती सोडवू शकत नाही. नोबेल पारितोषिकाकडे वैज्ञानिक मूल्यांचे देव्हारेपण म्हणून पाहवे की नाही हे आपल्यावर आहे. तर ते तस् नाही, इतर बक्षीसांप्रमाणे हेदेखील दोषसहित आणि व्यक्तिपरक आहे. हे समजावून घेताना, नोबेलवीरांच्या अहंकाराचा आम्ही अतिरेक करतो आणि ज्यांना त्याने हुलकावणी दिली त्यांना आपण कमकुवत करतो. गेल्यावर्षी विज्ञान लेखक मैथ्यू फ्रान्सिस यांनी लिहिले: "शेवटी, नोबेल पारितोषिकांचा नाश करायाचा का ते सर्वस्वी आपल्यावर आहे. ते आपल्या विज्ञानाच्या समजीवर राज्य करीत आहेत आणि हे सारं आमच्या संमतीने कसे केले जाते, की ज्याविषयीची संमती आम्ही कधीच काढून घेतली आहे."

शब्दांकन: केशव राजपुरे 
The Absurdity of the Nobel Prizes in Science
- ED YONG OCT 3, 2017 

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...