Monday, March 19, 2018

​शहीद जवान अनंत जानबा धुरी

शहीद जवान अनंत जानबा धुरी

गेल्या रविवारी म्हणजे गुढीपाडव्यादिवशी (१८/०३/२०१८) मी शहीद जवान अनंत जानबा धुरी यांच्या बेळेभाट (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) या गावी जयहिंद फौंडेशनने सोपवलेल्या जबाबदारीपूर्तीसाठी जाऊन आलो. १२० किमी अंतर आणि एकेरी रस्ता म्हणून कोल्हापूरहून सकाळी लवकरच निघालो. सकाळी ११ च्या दरम्यान बेळेघाट या त्यांच्या गावी पोहोचलो. त्यांचे बंधू परशुराम धुरी यांच्या घरी गेलो. तिथे वडील जानबा धुरी आणि कुटुंबीय यांची भेट झाली. कौटुंबिक माहिती घेतली आणि ३० एप्रिलच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. बेळेभाट हे चंदगड तालुक्यातील पाचशे लो​​कसंख्येचे छोटेसे गाव आहे. या गावातील बाराहून अधिकजण सैन्यात देशाची सेवा करत आहेत.

मला तिथं गेल्यावर १८ जानेवारी २०१८ रोजी त्यांना वीरगती प्राप्त झाल्याचं समजलं. हे समजल्यावर मात्र या भेटीस जडलेल्या भावनिकतेची तीव्रता वाढली. तशातच मी 'जयहिंद' ची उदिष्टे, त्यांचे सांत्वन आणि माझा भेट-प्रपंच याची माहिती दिली. माझ्या प्रश्नाची त्यांचेकडून त्रोटक उत्तरं मिळायला लागली तशी तशी माझी अस्वस्थता वाढायला लागली. कारण फक्त दोनच महिने झाले या दुर्दैवी घटनेस आणि आपण इथं पत्रकारिता करतोय की काय असा भास ! त्यांचे वडील रडवेल्या सुरात बोलत होते. मुलाबद्दलची माया, सतावणारी आंतरिक ओढ तसेच चालता बोलता पोटचा गोळा गेल्याचं दु:ख - सारं सारं दिसत होतं !

जवान अनंत धुरी यांचे प्राथमिक शिक्षण बेळेभाट आणि दाटे येथे तर माध्यमिक शिक्षण संजय गांधी विद्यालय नागनवाडी येथे झाले होते. हलकर्णीच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात त्यांनी एसवाय बी.ए. पर्यंत शिक्षण घेतले होते. धुरी बेळगाव येथील ८ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनमध्ये १९९८ मध्ये भरती झाले होते.
त्यांनी  बेळगाव, पुणे, राजस्थान, आसाम, दिल्ली येथे एकूण १९ वर्षे सैन्यात सेवा बजावली होती. त्यांचे वडील जानबा आणि आई अनुसया हे शेतकरी आहेत. तर बंधू अंकुश हेही शेती करीत आहेत. तर थोरले बंधू परशुराम हे माध्यमिक शिक्षक म्हणून गावाजवळील एका हायसकूल मध्ये कार्यरत आहेत. अनंत यांचा विवाह २००५ साली नांदवडे येथील तुकाराम गावडे यांची मुलगी मनीषा यांच्याशी झाला होता. येत्या काही दिवसात त्यांना स्टार गोल्ड मेडल देवून बढती मिळणार होती.

सध्या ते श्रीनगर येथील गुलमर्ग येथे होते. तिथे जानेवारीमध्ये तापमान उने २० डिग्री सेल्सियस पर्यंत गेले होते. त्यामुळे थंडीची लाट होती यातच  हिमवर्षाव होत राहिला. दिनांक १८ जानेवारी २०१८ रोजी पहाटे पाच वाजता त्यांना बर्फात गुदमरून वीरमरण आले. त्यांची आठ वर्षांची मुलगी ॠतुजा आणि वडील जानबा यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला होता.

मी बेळेभाट ला जाण्याअगोदरच अनंत धुरी हे विवाहित आहेत आणि त्यांच्या पत्नी श्रीमती मनीषा उर्फ अस्मिता ह्या गृहिणी आहेत आणि आपल्या मुली ऋतुजा आणि श्वेता यांचे पालनपोषण करीत आहेत याची कल्पना होती. पण तोपर्यंत तरी घरात वीरपत्नी किंवा मुलींची हालचाल जाणवत नव्हती म्हणून माझं आपलं - त्यांची पत्नी पतीवियोगाने बाहेर येत नसावी, कदाचित या प्रसंगातून सावरण्यासाठी माहेरी गेली असावी असा तर्क लावणं चालू होतं. त्यात त्यांची भावजय, भावाची मुलं घरात वावरताना दिसत होती मी मात्र अनंत यांच्या कन्यांचा शोध घेणं चालू केलं होतं.

मी माहिती लिहून घेतली तर काही माहिती मोबाईल मध्ये घेतली. ना राहून परशुराम यांना विचारलं असता समजलं की ही वीर-पत्नी गेली बरीच वर्षे म्हणजे या प्रसंगापूर्वीपासूनच बेळगाव येथे आपल्या निवृत्त सैनिक वडिलांच्या घरानजीक विभक्त रहात आहेत. यामुळं दु:ख, उत्सुकता, कीव आणि तत्सम विचारांनी मनात गर्दी केली. का असावं असं ? बरं या वीर जवानाच्या जाण्यानंतर तरी ही वीरपत्नी धुरी कुटुंबासोबत का रहात नसावी इ.. 

आईची आईंची चौकशी केली असता समजले की त्या वयस्कर आहेत आणि पुत्र वियोगाने त्यांनी आपणास शेतातील गोठ्यावर वेगळं ठेवलं आहे. कुटुंबियांना जयहिंद आर्थिक मदत करणार आहे हे सांगितलं आणि ही मदत सर्व गरजूना दिली गेली पाहिजे या तत्वावर वीरपत्नी चा बेळगाव येथील पत्ता आणि मोबाईल क्रमांक मागितला. सुरुवातीला 'आम्ही एकमेकांच्या संपर्कात नसतो' हे कारण पुढं करून टाळलं दिराने ! पण तिथं उपस्थित असलेल्या अनंत धुरी यांच्या चुलत्याने नंबर दिला. जड अंत:करणाने सर्वांचा निरोप घेतला आणि बेळेभाट सोडले.

त्या नंबरवर दोन तासाच्या कालावधीत बऱ्याचदा प्रयत्न केला तरी संपर्क होत नव्हता आणि बेळगावात नानावाडी येथे राहतात एव्हढंच माहीत. बरं, चंदगडहून तसेच परत फिरण्यापेक्षा बेळगाव मार्गे कोल्हापूर करता येईल आणि याकामासाठी परत यायचा प्रसंग टळेल म्हणून माझा आटापिटा ! दरम्यान थांबून काय करायचे म्हणून निसर्गरम्य आणि सधन चंदगड तालुक्यातील आमच्या माजी विद्यार्थ्याच्या घरी (माणगाव-नीटूर-कोवाड-दुडगे) जाऊन आलो.. नाईलाजाने पुन्हा परशुराम धुरी सरांना फोन करून वहीनींच्या बंधूंचा किंवा वडिलांचा फोन नंबर देण्याची विनंती केली. शेवटी नंबर मिळाला आणि वीर पत्नीची बेळगाव येथे त्याच दिवशी भेट होणार याची खात्री झाली. जयहिंद च्या पाठींब्याची खरी गरज ज्या वीर पत्नीस आणि दोन पिल्ल्यांना होती त्यांची भेट घ्यायला तडक बेळगाव गाठले. 

अनंत धुरी यांचे म्हेव्हणे पप्पू गावडे, विसितला तरुण, आम्हास नानावाडी जवळील मिल्ट्री कॅम्प नजीक असलेल्या महादेव मंदिराजवळ घ्यायला आला. आता त्यांच्या घरी पोहोचेपर्यंत मनात विचारसत्र सुरु झालं. हा एकटाच भाऊ... तोही अविवाहित ... आई नसलेने मदतीसाठी बहिणीची गरज पडली असावी याच्या कुटुंबास ! म्हणून सासरी मन रमत नसावं त्यांचं ! हा विवाहित असता तर नणंद भावजया एकत्र राहिल्या असत्या का ? वैगेरे वैगेरे .. 

दारातच उभे असलेले दोन चिमुकले, निराधार, निष्पाप चेहरे दिसले आणि पोटातील पित्त हालावं असं झालं. त्यांना वाटलं त्यांचा मामा कुठल्यातरी पाहुण्यांना घेऊन आलाय. त्यांच्या हक्काचा आधार, चालतं -बोलतं माणूस त्यांना सोडून जाऊन देशाच्या कामी आलेल्या दिवसाला २ महिनेच झाले होते त्यावेळी ! काय असाव्यात त्यांच्या भावना ? मनातील विचार ?  स्वतःला विचारत होतो आणि काळीज चर्रर्र होत होतं. 'त्यांच्या भविष्यात काय मांडून ठेवलंय?' हा एक त्रयस्थ आणि वडीलधारी म्हणून मी विचार करत होतो. त्या बापडयांना काय 'त्या' भयानकतेची कल्पना ? मन थांबायला तयार नव्हते - 'मिळेल का निष्पापांना हक्काचा हरपलेला आधार ? ', 'का त्या विधात्यानं कोपावं यांच्याच बाबतीत ?'- सारखे विचार चालू होतेच. 

मला जे बोलायचे होते ते धुरी यांच्या म्हेव्हण्याला थोडक्यात सांगितले. भेळेभाट वरून नातेवाईकांना भेटून आलोय हेही सांगितले .. एकूण कौटुंबिक मतांतराचा प्रश्न लक्षात घेऊन 'जयहिंद' ही संस्था वीरपत्नी आणि मुलींना शक्य असलेली सर्वतोपरी मदत करेल याची ग्वाही दिली. तसेच हेही सांगितले की सातारच्या कार्यक्रमास आई-वडील-बंधू स्वतंत्ररित्या आले तरी वहिनी आणि मुली यायला हव्यातच ! आमची मदत आपल्याच हाती देऊ आणि जयहिंद आपल्या हक्काचा आधार बनेल - हा विश्वास दिला ! हे सर्व चालू असताना वहिनी आतल्या घरात होत्या. कदाचित त्यांनाही ऐकू जावे म्हणून मी जरा खडया आवाजातच बोलत होतो.. पिल्ल्यांची त्यांना विश्वासात घेऊन, आधार देत शाळेविषयी माहिती घेतली. मोठी ऋतुजा इयता पहिलीत तर दुसरी श्वेता अंगणवाडीत शिकत आहे. त्यांच्या घरानजीकच असलेल्या अंगडी इंटरनॅशनल स्कुल या खाजगी शाळेमध्ये त्या शिकतात. वर्षाकाठी दोघींची शैक्षणिक फी किमान साठ हजारांपर्यंत आहे. 'जयहिंद' या फी मध्ये सवलत मागू शकते- हा विचार आला.

शेवटी विनंती केल्यावर वहिनी बाहेर आल्या. त्या काळरात्री च्या साडेआठ वाजता अनंत यांनी पत्नीस फोन केला होता. गुलमर्ग येथे कमालीचा गारठा आहे, त्यामुळे माझा श्‍वास गुदमरतोय, मला मुलींची खूप आठवण येतेय, तुम्ही सर्वजण तब्येतीला सांभाळा, असे सांगितले होते. पत्नीनेही तुम्ही घराकडची काळजी करू नका, असे सांगतानाच फोन कट झाला होता. तोच त्यांच्या आयुष्यातील अखेरचा फोन ठरला. शत्रुला रोखण्यासाठी ते या कडाक्याच्या थंडीतही सेवा बजावत होते. त्यांचा पती-वियोग, दु:ख, यातना क्षणोक्षणी जाणवत होत्या. काही वेळानंतर मी त्यांचं सांत्वन केलं आणि विश्वासात घेऊन वस्तुस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला..  

असं जाणवलं की लग्न झाल्यापासूनच धुरी यांच्या कुटुंबाने वीरपत्नी मनीषा उर्फ अस्मिता धुरी यांना आपलंस केलं नाही किंबहुना सामावून घेतलं नाही किंवा अस्मिता यांनी स्वत:हून सामावण्याचा प्रयत्न केला नाही. गैरसमज, मतभेद व त्यातून ताण-तणाव यांना कंटाळून आपल्या निवृत्त सैनिक वडिलांच्या आधारावर त्या बेळगाव येथे रहात होत्या; केवळ एका आशेवर: घरवाले नसले म्हणून काय झाले माझा जोडीदार तर आहे ना सोबत ! त्यात त्यांना दोन्ही मुलीच ! प्रत्येक सैनिक कुटुंबाला त्यांचा मुलगा हवा, त्याचा पगार हवा, पण त्याची बायको नको, मुली तर नकोच नको - असा समज आहे अस्मिता वहिनींचा ! बायको आणि मुलांनी त्यांचं त्यांनी अस्तित्व निर्माण करून जगावं - ही कदाचित इच्छा असावी घरच्यांची ! आम्ही आमच्या जवान मुलासाठी आहोत, तुमच्यासाठी नाही - हा आहे त्यांचा समज आणि भावना ! अस्मिता वाहीनींना अजूनही असं वाटतंय की काहीतरी चमत्कार होईल आणि जानबा धुरी यांचे कुटुंबीय परत या निराधारांना सामावून घेतील आणि हक्काचा आधार देतील.

कौटुंबिक तणाव, मतभेद सर्वत्र आहेतच की. सासू-सासरे, दिर-जावा, नणंद-भावजया यांना तुम्ही त्यांचे किंबहुना त्यांच्यातीलच आहात हे दाखवायला कमी तर पडत नाहीत ना - याचा शोध घ्यावा लागेल. तसेच कोणत्याही विवाहित स्त्रीला तिचे सासर हेच हक्काचं 'घर' असतं हा विचार पटायला हवा. तसा विश्वास सासरच्या मंडळींनी रुजवायला हवा. हे सार करूनही तुमचा दखल-अंदाज घेतला गेला नाही तर निवडलेला 'सवता-सुबा' पर्याय योग्य असावा. वडीलधारी मंडळींना सूनेतील पोरकटपणा तसेच हट्ट ओळखून समयसूचक तोडगा काढता आला पाहिजे. हे सगळं जाणून उमजून संसारात 'अपेक्षा' ठेवल्या की काहीही पर्याय लागू पडत नाही हा गुत्ता सोडवायला - हे मात्र खरं.

मी तूर्तास तरी अस्मिता वहिनींना या सगळ्यातून बाहेर यायचं बळ 'जयहिंद'तर्फे देऊन आलोय. खरंच, हि विटलेली मनं जुळतील का ? कुणाचं चुकतंय यापेक्षा काय रास्त याचा शोध व्हावा. आर्थिक मदत, सांत्वन, कणव, दया यांहीपेक्षा यामध्ये मध्यस्ती करून मध्यावधी मार्ग शोधायची नितांत गरज वाटते. जयहिंद चे संचालक मंडळ आणि विचारगट यावर काहीतरी उपाय नक्की शोधेल आणि फौंडेशनच्या उद्धीष्ठपुर्तीच्यादृष्टीने पावले टाकेल.

जयहिंद
- केशव राजपुरे 

No comments:

Post a Comment

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...