Saturday, November 7, 2020

प्रा. (डॉ.) केशव राजपूरे सरांनी गाठले जगातील अव्वल संशोधकांच्या यादीत शिखर

जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान 

अलीकडेच अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने विविध विषयात संशोधन करणाऱ्या शीर्ष २% वैज्ञानिकांची जागतिक यादी जाहीर केली. त्यात शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विषयाचे प्राध्यापक डॉ. केशव राजपुरे सर यांचे नाव पदार्थ संशोधन (मटेरियल्स) या विषयाच्या यादीत समाविष्ट झाले आहे. पदार्थ संशोधकांच्या जागतिक क्रमवारीत सर १४१० वे व भारतीय क्रमवारीत ३७ वे आहेत. जगाच्या ज्ञानात अधिकची भर पडावी म्हणून कोट्यावधी संशोधक अहोरात्र संशोधन करीत असतात. त्या समर्पित संशोधकांच्या गर्दीतून प्रभावी संशोधन जगासमोर मांडून शीर्ष २% च्या यादीत येणं ही काही सामान्य गोष्ट नाही. ही सरांची जन्मभूमी असलेल्या बावधन पंचक्रोशीस, कर्मभूमी असलेल्या शिवाजी विद्यापीठास तसेच अख्ख्या महाराष्ट्राला आणि पर्यायाने देशासाठी भूषणावह गोष्ट आहे. या गोष्टीमुळे सरांनी सर्वांचेच नाव मोठे केले आहे. ज्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने ही यादी जाहीर केली त्यांनी प्रत्येक संशोधकाचे कार्य, प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखांची संख्या, त्यांना मिळालेले सायटेशन्स, एच-इंडेक्स, संशोधनाची उपयोजकता यांसारख्या विविध निकषांवर संशोधक निर्देशांक तपासून यादीतील क्रमवारी ठरवली आहे. 

सरांचे संशोधन क्षेत्र मटेरियल्स म्हणजे पदार्थ हे सर्वसामान्यांच्या ओळखीचं जरी नसलं तरी सर्वात जवळचं आहे हे मात्र नक्की. कारण आपल्या सभोवताली जे काही दिसतं आपण ज्याला स्पर्श करू शकतो त्या सर्व गोष्टी ‘पदार्थ’ या एकाच छत्राखाली येतात. दिसणाऱ्या पदार्थांचे न दिसणारे गुणधर्म शोधून त्याला सर्व प्राणिमात्रांच्या सुखसोयीसाठी वापरात आणण्याचं कार्य पदार्थ संशोधक करीत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर, लिथियम हे एक निसर्गात अस्तित्वात असलेलं मूलद्रव्य आहे, पण त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास करून त्याच्यापासून बॅटरी बनवण्याचं श्रेय पदार्थ संशोधकांचं आहे. लिथियम निसर्गात कुठे सापडतं किंवा असे कुठले मूलद्रव्य असते हेही माहीत नसणाऱ्या व्यक्तीच्या खिशातील मोबाइलमध्ये लिथियम बॅटरी असते; यावरून आपल्याला पदार्थ संशोधनाचे व त्या विषयात संशोधन करणाऱ्या संशोधकांचे महत्त्व लक्षात येईल. हे फक्त एक उदाहरण झालं, अशी शेकडो (नाही लाखो) उदाहरणे देता येतील. पूर्वी सहज मोडणाऱ्या प्लास्टिकच्या खुर्च्या आता आदळल्या तरी मोडत नाहीत किंवा घराच्या रंग दिलेल्या भिंतीवर आता धूळ बसत नाही, यामागेही पदार्थ संशोधकांचे हात आहेत. शिवाजी विद्यापीठाला उच्च संशोधन मान्यता मिळवून देणारे प्रमुख संशोधन क्षेत्र म्हणजे मटेरियल सायन्स. आणि याच क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत सरांचा समावेश झाला आहे.

विविधांगी पदार्थांचा अभ्यास करून त्यांना विविध तंत्रज्ञानात वापरण्यायोग्य बनवण्यात प्रा. राजपुरे यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी विद्यार्थीदशेपासूनच नाविन्य आणि उत्कृष्टता यांची कास धरली होती. एम. एस्सी. प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाल्यानंतर चालून आलेल्या अनेक संधी सोडून त्यांनी पूर्णवेळ संशोधनाची ‘न्यारी वाट’ निवडली. स्टोरेज सेल अर्थात ऊर्जा विद्युत घट पासून झालेली सुरवात वेगवेगळे विषय हाताळत आता मेमरीस्टर (मेमरी रेजीस्टर) पर्यंत आली आहे. वातावरणातील घातक वायु तपासणाऱ्या पदार्थांवर (गॅस सेन्सर) त्यांनी काम केलं आहे. शरीरास घातक असणारी असणारी अतिनील किरणांचे (अल्ट्रा व्हायलेट) अस्तित्व दाखवणाऱ्या पदार्थांवर संशोधन शिवाजी विद्यापीठात त्यांनीच सर्वप्रथम सुरू केले. फोटोकॅटालायसिस म्हणजे सूर्यप्रकाश व सेमीकंडक्टर वापरुन पाणी शुद्धिकरणावर त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण संशोधन केले आहे, त्यावर त्यांचे दोन पेटंट देखील आहेत. 

फोटोकॅटालायसिस या विषयातील मोठे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे, याविषयावरील त्यांची व्याख्याने खूप गाजली आहेत. त्यांच्या नावे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले २०० संशोधन लेख (शोध निबंध) आहेत, त्या लेखांचा आजअखेर ७६२५ वेळा संशोधनात्मक उपयोग (सायटेशन) झाला आहे. संशोधन लेखांची संख्या व त्यांचा इतरांच्या संशोधनासाठी झालेल्या उपयोगावरून एच-इंडेक्स काढला जातो; त्यावरून संशोधकाचा संशोधनात्मक दर्जा ठरतो. सैद्धांतिकदृष्ट्या महत्तम एच-इंडेक्स संशोधन लेखांच्या संख्येइतका असू शकतो, पण सामान्यपणे तो १५ ते २० टक्क्यांपर्यंत आढळतो. पण सरांच्या बाबतीत तो (एच-इंडेक्स- ५३) एकूण शोध निबंध संख्येच्या जवळपास ३०% इतका आहे. याचा अर्थ सर करत असलेले पदार्थ विषयक संशोधन हे खरंच नावीन्यपूर्ण आणि समाजोभिमुख आहे. त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन कार्य विचारार्थ घेऊन २०१५ साली ‘महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स’ ने त्यांना कायमचे सदस्यत्व देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. संशोधनातील ही प्रगती व त्याबद्दलची तळमळ पाहून विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्याकडे संशोधन सुविधा केंद्र असणाऱ्या युसिक, सीएफसी विभागाच्या विभागप्रमुख पदाची आणि केंद्र सरकारच्या डीएसटी-सैफ केंद्राच्या समन्वयक पदाची जबाबदारी चार वर्षापूर्वी सोपवली आहे. त्यांच्याच विशेष प्रयत्नांमुळे त्या विभागात टीईएम, एक्सपीएस, एएफएम, स्मॉल अंगल एक्सआरडी, मायक्रो रमन यांसारखी पदार्थ संशोधनात उपयोगी असणारी अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणे आली आहेत. या सुविधेमुळे विद्यापीठातील संशोधनाची गुणवत्ता आणखीण वाढणेस मदत होईल.

सरांनी मिळवलेलं हे यश त्यांना एका रात्रीत मिळालं नाही, त्यामागे कित्येक वर्षांची तपश्चर्या व संयम आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक धडपडी मुलगा महत्त्वाकांक्षेच्या बळावर गरुड भरारी घेऊ शकतो याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. सरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात बावधन गावाच्या अनपटवाडी या छोट्याश्या वाडीत झाला. जन्मजात हुशारी लाभलेल्या सरांनी अगदी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सर्वोच्च गुणवत्ताधारी शिक्षण प्राप्त केले. १९९२ साली बी. एससी. त ९१ टक्के गुण प्राप्त करून त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले होते. पुढे एम.एससी. ला तीच गुणवत्ता टिकवून पुन्हा अव्वल स्थान कायम ठेवले होते. २००० ला त्यांनी फिजिक्समध्ये डॉक्टरेट मिळवली. संशोधनाचा विषय होता; सेमीकंडक्टर सेप्टम संचय घट वापरुन विद्युत उर्जेचा साठा. याठिकाणी संशोधनातले बाळकडू त्यांना मिळाले. १९९५ पासून सुरू केलेला हा संशोधन प्रवास २५ वर्षानंतरही जगातील नामवंत शास्त्रज्ञांच्या पंगतीत बसून अविरत सुरू आहे यातच त्यांच्या कौशल्यपूर्ण, गुणवत्ताधारी आणि अभिनव शास्त्रज्ञाची ओळख करून देते.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत १४ पी. एचडी., दोन एम. फील. झाले आहेत, सद्या त्यांच्या प्रयोगशाळेत पाच विद्यार्थी पी. एचडी. साठी संशोधन करीत आहेत. संशोधनासोबतच अध्यापणाचे कार्य देखील सर चोख बजावतात. एक मुरलेला संशोधक आणि, विद्यार्थीहितदक्ष व समर्पित शिक्षक अशीच त्यांची शैक्षणिक वर्तुळात ओळख आहे. सामान्यापासून असामान्य होण्यापर्यंत त्यांनी तुडवलेली वाट नक्कीच सोपी नव्हती. खूप कष्ट घेतलेत त्यांनी त्यासाठी! त्यांचा हा प्रवास कविवर्य बा. भ. बोरकरांच्या कवितेतील दोन ओळींद्वारे मांडता येईल.

“देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती 
वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती....”

सरांना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचे समजोभिमुख संशोधन सशक्त मानव जातीच्या उत्क्रांतीच्या कामी येवो हीच सदिच्छा.

शब्दांकन: सुरज मडके (8208283069)

संबंधित बातम्या:

Ranking link: http://shorturl.at/bdix8

https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/city/kolhapur/the-list-of-world-scientists-includes-five-from-shivaji-university/mh20201107170403301





Saturday, October 17, 2020

कृष्णविवर नोबेल प्रवास

 कृष्णविवरांच्या शोधाचा भारतामार्गे नोबेल प्रवास 

“अरे तुला यावर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय”. हे वाक्य जर कोणत्याही संशोधकासमोर म्हटलं गेलं तर, त्याच्याकडून “हे जर खरं असेल तर माझ्या आयुष्याचं सार्थक झालं” असंच उत्तर येईल. कारण संशोधकांसाठी नोबेल हा सर्वोच्च पुरस्कार आहे. अर्थात कोणताही समर्पित संशोधक कोणताही पुरस्कार डोळ्यासमोर ठेवून  संशोधन करत नसतो. विश्वाच्या कणाकणाचं कोडं सोडवून जगासमोर मांडण्यात जो आनंद असतो त्याचं मूल्य कोणत्याही पुरस्काराद्वारे मोजता येत नाही. पण येणकेनप्रकारे सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी अखंड आयुष्य एकांतात खपवणाऱ्या संशोधकांच्या कार्याचा गौरव व्हावा हाच विज्ञानाच्या नोबेल पुरस्कारामागचा हेतु आहे. 

यावर्षी रॉयल स्वीडिश अकॅडेमी ऑफ सायन्सेसने भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार रॉजर पेनरोझ (ब्रिटिश गणितीय-भौतिकशास्त्रज्ञ) तसेच संयुक्तपणे रेनहार्ड गेन्झेल (जर्मन खगोलशास्त्रज्ञ) आणि आंद्रे घेझ (अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ) यांना कृष्णविवरांचा सैद्धांतिक अभ्यास आणि निरीक्षणाशी संबंधित मूलभूत संशोधनास दिला. 

रॉकर पेनरोस यांना त्यांच्या "कृष्णविवरांची निर्मिती ही सापेक्षतेच्या सिद्धांताची एक मजबूत भविष्यवाणी आहे" या शोधासाठी तर "आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी सूर्यापेक्षा शेकडोपट वजनाच्या अतिघन पदार्थाच्या (सुपरमॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्ट) शोधासाठी" रेनहार्ड गेन्झेल आणि अँड्रिया गेझ यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. (आणि हो! भौतिकशास्त्रातील कृष्णविवर आणि भारतीय दर्शनशास्त्रातील कृष्ण यांच्यात कोणताही थेट संबंध नाही, बरं का! पण दोन्हीही आकर्षित करतात हेही खरंय.... एक त्याच्याकडच्या गुरुत्वीय बलामुळे आजूबाजूच्या पदार्थांना आकर्षित करतो तर दुसरा त्याच्या अलौकिक तत्त्वज्ञानामुळे चालत्याबोलत्या माणसांना आकर्षित करतो; आणि दोन्हीही सामान्य माणसांच्या आकलनापलीकडचे! एवढंच काय ते साम्य....) 

 

यावर्षीच्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराच्या निमित्ताने कृष्णविवर म्हणजे नेमकं काय ते बघू.... कालमानपरत्वे प्रत्येक तारा त्याच्याजवळील ऊर्जा बाहेर फेकत असतो आणि हळूहळू लयास जात असतो. शेवटी प्रचंड स्फोट होऊन तारा कोसळतो व सुपरनोव्हा बनतो. तार्‍याचे सर्व द्रव्य केंद्राकडे कोसळते व आकारमान खूपच कमी होते. त्यामुळे तार्‍याचे गुरुत्वाकर्षण वाढून तो खुजा तारा, न्यूट्रॉन तारा आणि शेवटी कृष्ण विवर अशा अवस्थेकडे जातो. 

(Source: https://www.schoolsobservatory.org/learn/astro/stars/cycle)

कृष्णविवर ही तार्‍यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्णविवरात रुपांतरित होतात. अशा कृष्णविवरांजवळचे गुरुत्वाकर्षण इतके जास्त असते की प्रकाशदेखील त्यांपासुन सुटू शकत नाही आणि यामुळेच अशा तार्‍यांना कृष्णविवर म्हणतात. अवकाशातील अश्या बिंदुंना कृष्णविवर हे नाव का दिलं गेलं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मराठीतील कृष्णविवर हे इंग्रजीतील ब्लॅकहोल या शब्दाचे केलेले शब्दशः भाषांतर आहे. भौतिकशास्त्रात ब्लॅक/काळा हा शब्द शोषून घेणारा या अर्थाने घेतला जातो. ज्यांनी बारावी पर्यंत विज्ञान शिकलंय त्यांना ब्लॅक-बॉडी या संकल्पनेबद्दल माहीत आहे. ब्लॅक-बॉडी त्याच्यावर पडणारी सर्व प्रकारची विकिरणे शोषून घेते. म्हणजे एका अर्थाने कृष्णविवरे देखील ब्लॅक-बॉडी आहेत. ब्लॅक-बॉडी सगळं शोषून घेते याचा अर्थ ती खादाड आहे अश्यातला भाग नाही. कारण “भरपूर कमाना और दोनों हातोसें लुटाना” असा त्यांचा स्वभाव असतो. अर्थात त्यांनी जी विकिरणे शोषलेली असतात ती वेगळ्या स्वरूपात उत्सर्जित देखील केली जातात. कृष्णविवरेदेखील अश्याप्रकारे उत्सर्जन करतात असे स्टीफन हॉकिंग यांनी क्वांटम फील्ड थेरीच्या माध्यमातून दाखवून दिले, म्हणूनच त्या उत्सर्जनाला हॉकिंग रेडिएशन असे म्हणतात.  

 

प्रत्येक कृष्णविवर सुरवातीला तारा असतो हे आपण पहिलं पण प्रत्येक तारा शेवटी कृष्णविवर बनतोच का? नाही! कृष्णविवर बनण्यासाठी विशिष्ट परिस्थिति कारणीभूत असते. मोठ्या स्फोटानंतर ताऱ्याचं गुरुत्वाकर्षण वाढतं व आकारमान कमी झाल्याने तो खुजा तारा (व्हाईट द्वार्फ) बनतो हे आपण पाहीलं. ह्या खुजा ताऱ्यातील इलेक्ट्रॉन डीजेनेरसी प्रेशर नावाचा दाब त्याच्या वाढलेल्या गुरुत्वाकर्षणाला संतुलित करून त्याचे अस्तित्व अबाधित राखतो. पण जेव्हा त्याचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या १.४ पट ओलंडते तेव्हा त्याचे वर सांगितलेले संतुलन बिघडते आणि तो कृष्णविवरात रूपांतरित होण्यास वाटचाल करतो. सूर्याच्या १.४ पट हे वजन किलोत सांगायचं म्हणजे जवळपास २८ च्या पुढे २९ शून्या देऊन जेवढा आकडा तयार होतो तेवढं किलोग्रॅम! या वस्तुमानाला ‘चंद्रशेखर लिमिट’ असे म्हणतात. वस्तुमानाच्या ह्या मर्यादेला भारतीय-अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर यांनी शोधल्यामुळे त्यांचे नाव देण्यात आले. 

 

बरं ह्या कृष्णविवरात असतं तरी काय? साध्या शब्दात उत्तर द्यायचं झालं तर त्यात प्रचंड गुरुत्वाकर्षण असतं. हे गुरुत्वाकर्षण त्याच्या टप्प्यातल्या कणांना सहज ओढून घेते. हे ओढून घ्यायचं कार्य समजून घेण्यासाठी स्पेस-टाइम सारख्या क्लिष्ट विषयात जावं लागतं. कृष्णविवरांचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे तर त्याचा रस्ता म्हणजे भुकेल्या सिंहाची गुहा अर्थात फक्त वन वे एंट्री! एकदा आत गेला की बाहेर यायचा रस्ता बंद. अगदी त्याच्या विळख्यातुन प्रकाशकण देखील सुटत नाहीत मग त्याला दुर्बिणीतून पाहणं किंवा त्याचा खरा (छानसा) फोटो टिपणं कसं शक्य होईल? त्याचं अस्तित्व शोधण्यासाठी एकतर गणित मांडावं लागेल नाहीतर त्याच्या आजूबाजूच्या वस्तूंच्या हालचालीवरुण त्याचा अंदाज घ्यावा लागेल. हेच केलंय यावर्षीच्या नोबेल विजेत्यांनी!

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक सर रॉजर यांनी अचूक गणिताच्या पद्धतीने कृष्णविवर हे अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या व्यापक सापेक्षतेच्या सिद्धांताचा थेट परिणाम असल्याचे दाखवून दिले. आईन्स्टाईन स्वतः कृष्णविवर अस्तित्त्वात असल्याचे मानत नव्हते. आइंस्टीनच्या मृत्यूच्या दहा वर्षानंतर जानेवारी १९६५ मध्ये सर रॉजरने खरोखरच ब्लॅक होल तयार होऊ शकतात असे सिद्ध केले आणि त्यांचे तपशीलवार वर्णन केले आहे. त्यांचे आधारभूत लेख आइन्स्टाईन पासूनच्या सापेक्षतेच्या सामान्य सिद्धांतात सर्वात महत्त्वाचे योगदान मानले जाते.


इन्फ्रारेड तरंगलांबींवर आकाशगंगेच्या मध्याची कल्पना करून, गेझ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपयुक्त प्रकाश रोखणाऱ्या वायू व धुलीकण यांचा अडथळा दूर करून आकाशगंगाच्या मध्यभागाची (कृष्ण विवर - एसजीआर ए*) प्रतिमा मिळवण्यात यश मिळवले होते. दहा मीटर छिद्राच्या डब्ल्यूएम केक दुर्बिणीच्या सहाय्याने या अवकाशीय रेझोल्यूशनवरील फारच महत्वपूर्ण प्रतिमा त्यांनी घेतल्या होत्या. यामुळे कृष्ण विवराच्या सभोवतील तार्‍यांच्या कक्षा अभ्यासणे शक्य झाले आहे.


यंदाच्या ह्या पुरस्काराचे तीन मानकरी जरी असले तरी डॉ. पेनरोज हे पुरस्काराचे मोठे वाटेकरी आहेत, त्यांना पुरस्काराचा अर्धा हिस्सा दिला गेलाय व उरलेल्या अर्ध्या हिश्यात इतर दोघे आहेत. डॉ. गेंझेल व डॉ. घेज मॅडमांनी प्रयोगांती कृष्णविवरांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केलं आहे. डॉ. पेनरोज यांनी तेच अस्तित्व आइनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा आधार घेऊन सिद्ध केलं. अर्थात त्यांच्या आधी यावर कुणीच संशोधन केलं नव्हतं असं नाही. 

(Source: https://manyworldstheory.com/tag/black-holes/)

डॉ. सी. व्ही. विश्वेश्वरा व डॉ. ए. के. रायचौधरी यांचं संशोधन महत्त्वपूर्ण मानलं जातं. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग व आताचे नोबेल विजेते रॉजर पेनरोझ यांच्या अगोदर आपल्या ह्या दोन भारतीय शास्त्रज्ञांनी कृष्णविवरांचं अस्तित्व सिद्ध करण्याचं शिवधनुष्य पेललं होतं. विश्वेश्वरा यांनी मेरीलँड विद्यापीठात संशोधन करीत असताना तीन रिसर्च पेपर प्रसिद्ध केले व त्यातून कृष्णविवरांसंबंधी अनेक गोष्टी जगासमोर आणल्या. काही वर्षांपासून आपण 'कृष्णविवरांपासून निघणाऱ्या गुरुत्व लहरी' व 'लिगो प्रकल्प' हे शब्द ऐकत आहोत, दोन कृष्णविवरांच्या एकत्र येण्यामुळे गुरुत्व लहरी बाहेर पडतात; त्या लहरी लिगोद्वारे मोजल्या जातात. लिगोने कागदावर असणारं गुरुत्व लहरींचं अस्तित्व २०१५ साली सप्रमाण सिद्ध करून दाखवलं. हे करत असताना विश्वेश्वरा यांनी मांडलेल्या गणितिय गणना वापरल्या होत्या. हे तर काहीच नाही, रायचौधरी यांनी मांडलेल्या "रायचौधरी समिकरणा"चा उपयोग "पेनरोझ-हॉकिंग एकलता प्रमेयां"मध्ये (पेनरोज-हॉकिंग सिंग्युलॅरिटी थेरम) केला गेला होता. सदरच्या समिकरणाचा शोध रायचौधरी यांनी १९५० साली लावला होता (आणि विशेष म्हणजे भारतात राहून!). त्यांचं संशोधन हे लगत असणाऱ्या वस्तूंच्या (अवकाशीय वस्तु) गतीसंदर्भात होतं, त्यातून त्यांनी गुरुत्वीय बल हे फक्त आकर्षित करणारं असतं हे सिद्ध केलं होतं.

 

दुर्दैवानं डॉ. सी. व्ही. विश्वेश्वरा व डॉ. ए. के. रायचौधरी हे दोघेही आज जीवंत नाहीत. जर का ते जीवंत असते तर कदाचित पुरस्कारासाठी त्यांच्याही नावाचा विचार झाला असता. पण असो, यावर्षी ज्यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला ते संशोधन दोन भारतीय संशोधकांनी घातलेल्या भक्कम पायावर उभं आहे हेही आपल्यासाठी कमी नाही.

चैतन्याविषयी पेनरोझची धारणा:

स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याची मानवी प्रवृत्ती सृष्टीची मुलतत्वे शोधण्यासाठी उपयुक्त ठरली आहे. विश्व हे चैतन्याचा चमत्कार मानले जाते. चैतन्य म्हणजे देहभान म्हणजेच आत्मा. त्याचे स्वरूप आणि अस्तित्वाचे कारण काय आहे ? या प्रश्नांची उत्तरे बरेचजण शोधत आहेत. प्रत्येकाची याबाबत वेगवेगळी धारणा आहे. विश्वनिर्मितीच कोड सोडवू पाहणाऱ्या पेनरोझ यांच्या अभ्यासाची व्याप्ती मानवी विश्वातील देहभानाचे गूढ सोडवण्यात देखील आहे. चैतन्य आणि मेंदूचा जवळचा संबंध असावा आणि मेंदूचं कार्य इतर भौतिकीय क्रियांप्रमाणे गणिती भाषेत मांडता येत नाही अस ते मानत. 


पेनरोसच्या चैतन्यच्या कल्पनांचा तसा धर्माशी काही संबंध नाही. मेंदू म्हणजे गणित करणारे यंत्र नव्हे असे त्याचे मत. मेंदूचे अनुकरण करू शकेल असे कोणतेही अल्गोरिदम (टप्पेवजा पद्दत) अस्तित्वात नाही. त्यामुळे मेंदूची समज, ज्याचे मूळ क्वांटम आहे, गणिताच्या औपचारिक प्रणालीत सिद्ध केली जाऊ शकत नाही. 

अतिसुक्ष्म पदार्थाच्या हालचालीमध्ये वेव्ह फंक्शनची उत्क्रांती कशी होते हे क्वांटम मेकॅनिक्स मधील स्क्रोडिंगर समीकरण सांगते. जोपर्यंत वेव्ह फंक्शन अस्तित्वात आहे तोपर्यंत क्वांटम मेकॅनिक्स भविष्यवाणी करू शकते (संभाव्यता) त्याच्यापुढे नाही. पेनरोझ च्या मते गणितबद्ध नसलेले वेव्ह फंक्शन मानवी चेतनेस जबाबदार असावे. आपला मेंदू मोठा असतो आणि त्यातील मायक्रोट्यूब्युलस मुळे क्वांटम सुसंगतता टिकवून राहते आणि पर्यायाने मेंदूची क्वांटम उत्पत्ती. त्यामुळे याबाबतीत तरी क्वांटम मेकॅनिक्स अपूर्ण आहे.

आपल्या मेंदूला कळणाऱ्या विधानांचे गणित किंवा क्वांटम मेकॅनिक्सला विश्लेषण करता येत नसेल तर आपली चेतना विज्ञानाला आजच्या ज्ञानावर तरी सिद्ध करता येत नाही हे स्पष्ट होते. चेतना समजावून घ्यायची असेल तर आपणास मग आध्यात्मकतेकडे वळावे लागते. शास्त्रज्ञ एडिसनच्या मते यामागे कोणतीतरी अज्ञात अव्यक्त शक्ती कारणरूपाने कार्य करत आहे. आपण याबाबत आतातरी अनभिज्ञ आहोत. ही शक्ती अमर्याद अनंत असल्यामुळे सृष्टीचा पूर्ण पसारा उभारूनही शेष म्हणजे शिल्लक राहते. आपल्या शास्त्रीय उपकरणांच्या असमर्थतेमुळे तसेच निरीक्षणांचे सुयोग्य विश्लेषण करता येत नसल्यामुळे, भौतिक जगाच्या पलीकडे काही अज्ञात अव्यक्त तत्वाशी सामना करावा लागतो हेही सत्य शास्त्रज्ञांनी आता कबुल केलं आहे. प्रत्येक क्षणाला ज्याच अस्तित्व आपण मान्य करतो ते मन आजतरी विज्ञानाला दाखवता येत नाही त्यामुळे मनाला चेतना देणारी शक्तीसुद्धा विज्ञानाच्या मर्यादित उपकरणांनी या परिस्थितीत दाखवता येणार नाही. 


शब्दांकन:- श्री सुरज मडके, प्रा डॉ केशव राजपुरे 

आपण खाली दिलेल्या लिंकवर लोकसत्ता वर्तमानपत्रात या विषयाबद्दल अधिक माहिती वाचू शकता. 

‘कृष्णविवर’ ..आणि भारतीय शास्त्रज्ञ (कृष्णविवर या शब्दाशी भारतीय इतिहासाचं नातं एक कुप्रसिद्ध घटनेशी संबंधित आहे)

Friday, August 28, 2020

हुतात्मा अनिकेत मोळे

 


हुतात्मा अनिकेत मोळे यांस प्रथम पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन !!
(२८ ऑगस्ट २०२०)

सैनिक ... भारतमातेचे शूर सुपुत्र!! ...देशाच्या रक्षणासाठी सातत्याने तेजत असणारा दिवा म्हणजे सैनिक!! आपल्या जीवाची बाजी लावून देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारी आपल्या देशाची शान म्हणजे सैनिक!! आपल्या समाजात सैनिकांप्रती सदैव आस्था असली पाहिजे, कारण सैनिक हे कोणत्याही नात्यात न गुरफटता आपल्या आई -वडिलांना ,पत्नी व मुलांना सोडून मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर लढत असतात. आपल्या देशावर आलेल्या कोणत्याही परकीय आक्रमणाची किंवा त्याच्या भीतीची झळ सर्वसामान्य माणसाला न लागू देता आपले सैनिक दिवस -रात्र भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर खंबीरपणे पहारा देत असतात आणि वेळ पडली तर स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन शाहिद होतात व आपला प्राण आपल्या मातृभूमीला अर्पण करतात. तर अशा सर्व सैनिकांना व शाहिद जवानांना जयहिंद फाऊंडेशनकडुनत विनम्र अभिवादन!!

आज २८ ऑगस्ट २०२०, शहीद कु.अनिकेत सुभाष मोळे यांचे आज प्रथम पुण्यस्मरण. १२ मे १९९७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घरपण ता. पन्हाळा या छोट्याश्या खेड्यात एका शेतकरी कुटुंबामध्ये शहीद कु.अनिकेत सुभाष मोळे यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण रामचंद्र पवार हायस्कुल,परखंदळे व महाविद्यालयीन शिक्षण विठ्ठल पाटील महाविद्यालय, कळे ता. पन्हाळा येथून पूर्ण केले. शालेय जीवनामध्ये ते कुस्ती मध्ये निपुण होते व आपल्या देशाच्या सेवेसाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ठेऊन त्यांनी त्यांचे मोठे बंधू (फौजी पवन सुभाष मोळे) यांच्या पावलावर पाऊल टाकले.

महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच बी. एस्सी. भाग -१ ला असताना सन मार्च २०१६ ला त्यांची सैन्यामध्ये निवड झाली आणि ते युनिट २५ मराठा मध्ये शिपाई या पदावर बेळगाव येथे रुजू झाले. तेथून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याननंतर ते पंजाब येथे ६ महिने देशसेवेचे कार्य केले. त्यांनतर त्यांनी टेंगा (अरुणाचल प्रदेश) येथे एक वर्ष सेवेचा कार्यकाळ पूर्ण केला. कमी कालावधीत ट्रेनर या पदापर्यंत पोहोचल्याबद्दल १५ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना पुरस्कार सुद्धा मिळाला होता . दरम्यान ते सेवाबढतीच्या शारीरिक परीक्षेसाठी मराठा लाईट इन्फन्ट्री, बेळगाव येथे आले व तेथे २ महिने सर्व आणि प्रशिक्षण पूर्ण केले. दोरीवरून चढणे व उतरने हा एक प्रशिक्षणाचा भाग होता व त्याचाच सराव करत असताना ते एकदम बेशुद्ध पडले. त्यांनतर त्यांना बेळगाव येथील मिलिटरी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले पण दुर्दैवाने त्यांना २८ ऑगस्ट २०१९ रोजी वीरमरण आले.


त्यांच्या पश्चात त्यांचे वडील श्री. सुभाष गणपती मोळे, आई सौ. आनंदी सुभाष मोळे आणि मोठे बंधू श्री. पवन सुभाष मोळे असा परिवार आहे . त्यांचे बंधू सुद्धा भारतीय सैन्यामध्ये सेवा बजावत आहेत. धन्य ते माय -बाप ज्यांनी आपली दोन्ही लेकरं भारतमातेच्या रक्षणासाठी सैन्यामध्ये पाठवली व त्यातील एक मुलगा भारमातेच्या चरणी अर्पण केला.

शहीद अनिकेत यांनी आपल्या मातृभूमी साठीचे कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले. याची दखल जयहिंद फाउंडेशनने घेतली असून मे २०२० मध्ये आयोजित केलेल्या पण कोरोना संकटामुळे होऊ न शकलेल्या पुणे येथील कार्यक्रमात या कुटुंबाचे सांत्वनपर आदरसन्मान करणार होतोच. आता ही गोष्ट आपण पुढे होणाऱ्या कार्यक्रमात करणार आहोत. दरम्यान, अनिकेतचे वडील वीरपिता सुभाष मोळे आणि बंधू फौजी पवन मोळे यांच्याशी वार्तालापात काही गोष्टी समजल्या. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी कडून येऊ घातलेली विम्याची रक्कम दुर्दैवाने कंपनीने नाकारली आहे. त्याविरोधात त्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे आणि फाउंडेशन त्यांना या कामी संपूर्ण मदत आणि मार्गदर्शन करत आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे; ग्रामपंचायत घरपण यांनी शहीद अनिकेत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावच्या प्रवेशद्वारावर अनिकेतच्या नावची स्वागत कमान करायचे ठरवले होते. याबाबतचा योग्य ठराव ग्रामपंचायतीमध्ये करून प्रत्यक्ष कामास सुरुवात केल्यानंतर कमान बांधकामा जवळच राहणाऱ्या मालकाने यास हरकत घेतली होती. या संबंधितची आवश्यक मान्यता जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे प्रलंबित आहे. याही गोष्टीचा पाठपुरावा फाऊंडेशन शहीद कुटुंबांच्यासह करत आहे. ज्या जवानाने देशासाठी आपला प्राण दिला त्या जवानाच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात येणाऱ्या स्वागत कमानीस विरोध व्हावा ही गोष्ट फार दुर्दैवी आहे. शेवटी या गोष्टीमुळे नाराज होऊन आपल्या राहत्या घराच्या बाजूसच वीर पिता सुभाष मोळे यांनी शहीद अनिकेत चे शहीद स्मारक उभारण्याचा निश्चय केला आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. जयहिंद फाउंडेशन वारंवार वीरपिता सुभाष मोळे यांच्या संपर्कात राहून त्यांना आवश्यक मार्गदर्शन आणि वरील गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी मदत करत आहे.

तरी या प्रथम पुण्यस्मरण दिनी शहीद कु. अनिकेत सुभाष मोळे यांना जयहिंद फाऊंडेशनशनकडुन विनम्र अभिवादन!!🙏

जयहिंद फाऊंडेशन (सैनिक हो तुमच्यासाठी)

Read at FB

Tuesday, August 18, 2020

भैरवनाथ देवस्थान बावधन

भैरवनाथ मंदिर बावधन
भारत हा संस्कृतीप्रधान देश असून वैदिक काळापासून अध्यात्माबद्दल श्रद्धा बाळगून आहे. पाशिमात्य लोक भौतिकवादाला प्राधान्य देतात. जगाची निर्मिती करणारी परमेश्वर ही प्रचंड शक्ती असून या दिव्य शक्तीची पूजा केली पाहिजे अशी बहूतांची धारणा आहे. देव-दानव, सत्य-असत्य, पाप-पुण्य, खरे-खोटे या कल्पना आध्यात्मवादाच्या मूळ आहेत. वैदिक काळात लोकांनी पंचमहाभूतांसारखी दैवते निर्माण केली व त्यांना संतुष्ट करण्याच्या पध्दती ठरवून घेतल्या. तेव्हा लोक सूर्य, नाग, वरुण, नदी, इंद्र, अग्नी, वायू इत्यादी देवतांची उपासना करत. कालांतराने मानवाचे कल्याण करणारे ब्रम्हा, विष्णू, महेश अर्थात शिव, राम, कृष्ण इत्यादी अवतारी पुरुष ही दैवते म्हणून मानली जावू लागली. अद्यापही भाविक जीवन कल्याणासाठी या देवतांची मनोभावे  उपासना करताना दिसत आहेत.

भारतीय संस्कृतीत हिंदू लोक एकच देव आहे असे मानतात. गॉड इज वन या कल्पनेप्रमाणे हिंदू धर्मीयांचा महादेव किंवा शंकर हा आदी देव आहे. सृष्टीतील निर्मिती आणि लय यामधील ताळमेळ साधण्याचे काम महादेव या संकल्पनेचे मूळ आहे. त्याचे वस्तीस्थान हिमालयात बद्रीनाथ या ठिकाणी आहे अशी धारणा आहे. मानवी जीवनातील दुःखे नाहीशी करून मनुष्याला स्वर्गप्राप्ती करून देणारा देव म्हणजेच श्री शंकर. म्हणूनच शंकराची आराधना पूर्वांपार चालत आहे.

शंकर ही देवता कलियुगातील असून तीचा काळ सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचा मानतात. याबाबत एक पुराणकथा आजही सांगतात आणि अनेकांचा त्यावर विश्वास आहे. काळाच्या ओघात दक्षिणेकडे समाजात दुःख दारिद्र्य निर्माण झाले. समाजात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, दंभ या षडरीपुंनी स्वैराचार माजवून समाजाची पिळवणूक सुरू केली. अनेक राक्षशी प्रवृत्तींनी धुमाकूळ घातला आणि जनमाणसांना हैराण करून सोडले होते. म्हणून श्री शंकराला अनेक मानव रूपे धारण करावी लागली होती अशी श्रद्धा आहे. केदारेश्वर, ज्योतिबा, खळेश्वर अशी नावे धारण करून त्यांनी अनेक राक्षसांशी युद्ध केली. या युद्धात जम्मूकासुर, कोल्हासुर, रत्नासुर, करवीरसुर, महिषासुर इत्यादी राक्षसांचा नाश करविला. ही युद्धे चालू असतानाच "भैरवनाथाने" श्री शंकर उर्फ जोतीबास अत्यंत मोलाचे सहाय्य केले असे मानले जाते. श्री शंकराचे जे बत्तीस कोटी सैन्य होते त्या सैन्याचे सरसेनापतीपद भैरवनाथाकडे होते. भैरवनाथ तथा भैरोबाला शकटभैरी, काळभैरव, बालभैरव, गंडभैरव, कमलभैरव अशा अनेक नावाने ओळखतात.

अशातऱ्हेने केदारनाथ उर्फ जोतिबा दक्षिणेकडे अनेक युद्धे करीत चालले होते. सरसेनापती म्हणून भैरवनाथ त्यांना सहाय्य करत होते. याच वेळी या सुरा- असुरांच्या युद्धात लक्ष्मी, यमाई, चोपडाई, तूकाई, मोकलाई, चपटा देवी, इंद्रायणी देवी इत्यादी देवतांनी जोतिबाला युद्धांमध्ये मदत केली असा उल्लेख  आढळतो. या सर्व देवतांनी युद्धात रक्तभोज, जम्मूकासुर, कोल्हासुर, रत्नासुर, करवीरसुर, महिषासुर इत्यादी राक्षस ठार मारले. अर्थात ज्या ज्या ठिकाणी हे राक्षस ठार मारले त्यांच्या नावावरून त्या ठिकाणाला गावांची ती ती नावे पडल्याचे दिसते. उदा. कोल्हासुर-कोल्हापूर, कारवीरसुर- करवीर, रत्नासुर-रत्नागिरी, महिषासूर-म्हसवड इत्यादी.

अशा रितीने देव आणि राक्षस यांची तुंबळ युद्ध होऊन अनेक राक्षस मारले गेले. या युद्धाच्या वार्ता देवतांना वारंवार मिळत असत. त्यात सरसेनापती भैरवनाथ यांच्या पराक्रमामुळे देव-देवता हरखून जात आणि त्यांच्या तोंडून आपोआपच उद्गार निघत "छान, चांगला भला आहे". त्यानंतर विजयाच्या "चांगभल" अशा आरोळ्या दिल्या जात. "चांगभल " याचा अर्थ -चांगला भला- देव मिळाला. अशा तऱ्हेने सर्वत्र विजय संपादन करून केदारनाथ रत्नागिरीच्या डोंगरावर आले. त्या ठिकाणी केदारनाथांवर अभिषेक झाला. देवदेवतांनी केदारनाथाची पूजा केली. श्रावण शुद्ध षष्ठीला ही पूजा झाली. सर्व देवतांनी केदारनाथापुढे लोटांगणे घातली आणि केदारेश्वराचा जयघोष केला. अशारीतीने रत्नागिरीच्या डोंगरावर केदारेश्वर उर्फ जोतिबा यांचे ठाण निर्माण झाले.

वरील सर्व विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की देवदानवांच्या युद्धात भैरवाला सरसेनापती पद स्वीकारावे लागले होते. एका वीर योद्ध्यासारखी लढाई करून भैरवनाथाने दानवांचा पाडाव केला होता. युद्धात देव देवतांचा विजय झाला. भैरोबाच्या या पराक्रमावर खूश होऊन सर्वांनी त्याचा उदोउदो केला. चांगभले च्या आरोळ्या दिल्या. गावोगावी या देवतेची स्थापना करून त्याची मनोभावी पूजन आणि उपासना सुरू झाली. भैरोबाला अतीसांग, संहार, सुरू, ताम्र काळभैरव, महाभैरव अशी अनेक नावे असली तरी महाराष्ट्रातील सामान्य लोक या देवाला भैरोबा किंवा बहीरोबा असे म्हणतात. खरे पाहिले तर भैरोबाची गणना क्रूर देवतात होते. परंतु सामान्य माणसाच्या नवसाला पावणारा हा देव असल्याने सर्वांनाच तो प्रिय आहे. या देवाची मूर्ती उभी असून उजव्या हातात डमरू व डाव्या हातात त्रिशूळ आहे. कटीला सापाचे वेस्टन आहे. चेहरा उग्र असून चार हात आहेत.

सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील बावधन गावची ग्रामदेवता भैरोबा हीच असून गावचा मुख्य देव हाच आहे. सर्व जाती-जमातीतील लोक बगाड हा या देवतेचा वार्षिक उत्सव अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. हा उत्सव गेली कित्येक वर्षे परंपरेने साजरा होतोय व आजही हा उत्सव म्हणजे महाराष्ट्रातील एक आव्हानात्मक, रोमांचकारी, जोखीमभरा व कुतूहलपूर्ण उत्सव आहे.

या ग्रामदेवतेचे मंदिर ऐतिहासिक आणि पुराणकालीन असून गावच्या आग्नेयेस स्थित आहे. मंदिराला भोवताली १०० फूट बाय १५० फूट जागेत घोटीव दगडांचा तट आहे. नाथांचे मंदिर दक्षिणाभिमुखि असून मुख्य दरवाजातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला भव्य आणि दिव्य अशा दीपमाळा भक्तांचे स्वागत करतात. प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला भक्तांना तात्पुरती यात्रेच्या वेळी किंवा कायमची वस्ती करण्यासाठी धर्मशाळा वजा खोल्या असून सध्या त्यापैकी काही खोल्यात बगाडाची निकामी झालेली परंतु पवित्र असलेली लाकडी ठेवलेली आहेत. मुख्य मंदिर २० फूट बाय २० फूट जागेत तर लगतचा गाभारा तितक्याच आकाराचा आहे. दर्शन मंडप अंदाजे ४० फूट लांब आहे. देवालयाच्या आवारात गेल्यावर भैरोबा देवाच्या मंडपात आपण प्रवेश करतो. सन १९७१ मध्ये या मंदिराच्या मंडपाचा जीर्णोद्धार गावकऱ्यांनी करून मंडपाचे संपूर्ण काम सागवानी लाकडांनी केले आहे. नक्षीदार वेलबुट्टी व हंड्या झुंबर यांनी देवालयाचा मंडप सजवलेला आहे. प्रशस्त मंडपात भक्तमंडळी ध्यानधारणा करतात, विश्रांती घेतात. अशा प्रकारचा प्रशस्त मंडप सहसा कोठेच पहावयास मिळत नाही.

त्यानंतर आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो. संपूर्ण गाभाऱ्याचा भाग घोटीव दगडांनी तयार केला असून सिंहासन देखील घोटीव दगडांनी बांधलेले आहे. अलीकडे गाभाऱ्याचा जीर्णोद्धार करून मार्बल बसवले असले तरी मूळ गाभारा व सिंहासन हे कोरीव दगडी कामात बांधलेले आहे. भैरोबा आणि पत्नी जोगूबाई यांच्या मूर्ती सिंहासनावर बसवलेल्या असून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला देवाची पालखी निघते. भैरोबाचे मूळ ठाण पाची देवळात आहे. पाची देऊळ गावच्या उत्तरेस असलेल्या सोनजाईच्या डोंगरात जवळजवळ एक किलोमीटरवर आहे.

गावातील सध्याच्या नाथांचे देवळाचे काम हेमाडपंती रचनेत बांधलेले, अठराव्या शतकात कानिटकरांनी केले असून कळसाचे काम नक्षीदार व साचेबंद केले आहे. भैरोबाचे देवस्थान जागृत असून भक्तांच्या नवसाला देव पावतो अशी लोकांची श्रद्धा आहे. गावातील पुजारी देवाची परंपरेने पूजा करतात. भक्तमंडळी देवाची पूजा करून देवालयातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतात. या देवालयाला पूर्वाभिमुखी एक दरवाजा असून त्या दरवाज्यातून सूर्याला नमस्कार करून बाहेर पडावे असा एक संकेत रूढ आहे. याच दरवाजावर मेघडंबरी असून पहाटे आणि सायंकाळी आरतीच्या वेळी नगारा वाजवला जातो.

देवळातील जुन्या-पुराण्या मूर्ती वारंवार बदलल्या असल्याचे दिसते. सध्या ज्या नाथाच्या मूर्ती देवळात आहेत त्या सन १९३० च्या सुमारास बसवलेल्या असून स्थापनेच्या वेळी वैदिक पद्धतीने पूजा करून मूर्तीची स्थापना केल्याचे लोक सांगतात. मंदिर आणि मंदिराचा परिसर रम्य असून अनेक भक्त रोज नियमाने दर्शनाला येत असल्याचे दिसते. देवळातून बाहेर पडताच देवळाच्या डाव्या बाजूला सटवाई या ग्रामदेवतेचे छोटेसे देऊळ असून ते सध्या पडलेल्या स्थितीत आहे. लहान मुलांना नाथाच्या देवळात नेल्यानंतर बाहेर पडताना हेच मूल सटवाईच्या पदरात ठेवतात व बाळाला उदंड आयुष्य मिळण्याची प्रार्थना बायका सटवाईला करताना दिसतात. भैरवनाथाच्या देवळाजवळ बुवासाहेबांचेही एक छोटेसे देऊळ आहे.

नाथांच्या मंदिराच्या दारात एक पिंपळ असून तो जटाधारी आहे. जटाधारी सोन्याचा पिंपळ काशीला जसा आहे तसाच रत्नागिरीला सुद्धा आहे. म्हणूनच बावधनच्या या पिंपळाला पर्यायाने  बावधन या पांढरी ला काशी इतकेच पावित्र्य प्राप्त झाले आहे. गुन्हेगार किंवा पापी माणसाने या पारावर पिंपळा खाली बसून पश्चाताप व्यक्त केला तर तो शुचिर्भूत होतो, पापापासून मुक्त होतो, अशी अनेक भक्तांची धारणा आहे. पर्यायाने बावधन चा हा पिंपळ म्हणजे बोधिवृक्ष असून प्रत्यक्ष परमेश्वराचे वास्तव्य त्यावर असल्याचे लोक अनुभवाने सांगतात. भैरोबाच्या बगाडाचा गाडा याच पिंपळाखाली दर साल तयार केला जातो.

नाथांचे मूळ स्थान हे पाचीदेवळावर आहे. सोनजाईच्या डोंगरात असलेल्या गुहेमध्ये नाथांचे वास्तव्य दिसून येते. नाथ एका धनगर भक्ताला प्रसन्न होऊन पाचीदेवळवरील गुहेत प्रकट झाले. मग तो धनगर मजल दरमजल करीत डोंगर चढून येत असे. पुढे पुढे त्याचे वय झाले आणि त्याने नाथांना आपण वर चढून नाथांचे दर्शन घेणे रोज शक्य नसल्याचे सांगितले व गावातच पायथ्याला आपले मंदिर असावे अशी इच्छा नाथांकडे बोलून दाखवली असता, नाथांनी सांगितले की एक लिंबू घे आणि गावच्या दक्षिण दिशेला फेक. जिथे लिंबू पडेल, तिथे मी आनंदाने वास्तव्य करेन, व तुला रोज माझी पूजा करण्याची इच्छा देखील पूर्ण करता येईल. भक्तांच्या भक्तीपोटी हे मंदिर गावातील वेशीच्या बाहेर आत्ता आहे त्या ठिकाणी दिसून येते. सभामंडपचा जीर्णोद्धार कानिटकर यांनी केला आहे, परंतु मूळ मंदिर किती वर्षापूर्वीचे आहे याचा नेमका उल्लेख कशातही आढळून येत नाही. भैरवनाथ आणि अगस्ती दोन्ही मंदिरांचा दर्शनमंडप एकसारखाच आहे. त्यावरून दोन्ही मंदिरांचे बांधकाम एकाच वेळी पाच शतकांपूर्वी झाले असावे असे वाटते.

सभामंडपात बसवलेली फरशी, मंदिराच्या गाभाऱ्यातील व बाहेरील फरशी बसवणे व संरक्षण भिंत बांधणे असे काम हे साधारण १९७१ साली झाले आहे. जिर्णोद्धाराचे काम, लाकडी खांब, सभामंडप यांवरील नक्षीकाम मुगुटराव अण्णा शिंदे यांच्या कर्तबगारीत झाले आहे. यामध्ये अनपटवाडी व बावधन गावातील सुतार कारागीर यांचे योगदान लाभले आहे. मंदिराचा गाभारा, सभामंडप, संरक्षण भिंत यांचा जीर्णोद्धार अलीकडील काळात जरी झाला असला तरी पूर्वीच्या लोकांच्या बोलण्यावरून मूळ मंदिरास ४ ते ५ शतके झाली असावीत असे दिसून येते. 

भैरोबाची यात्रा फाल्गुन वद्य चतुर्थी, पंचमी, षष्ठी ला भरते. महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत बावधनचे जे बगाड प्रसिद्ध आहे, ते याच यात्रेचा अविभाज्य भाग आहे. बगाडाच्या या उत्सवाच्या निमित्ताने विविध समाजातील तसेच जाती जमातीतील लोक एकत्र येतात, नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतात. बगाडा सारख्या उत्सवात जातीभेद पंथ विसरून भावनेने लोक उत्सवाचा आनंद लुटतात. म्हणूनच या बगाडाच्या उत्सवाला पर्यायाने नाथाच्या यात्रेला महत्व आहे. बावधकरांसाठी भैरवनाथ हा नवसाला पावणारा देव ही संकल्पना आहे. नाथांच बगाड  घेण ही आयुष्यातली फार मोठी गोष्ट, असे बावधनकर समजतात. 

केदारविजय या ग्रंथामध्ये बगाडाचा उल्लेख आहे. पूर्वजांच्या सांगण्यावरून मंदिरातील मूर्ती आत्तापर्यंत दोनदा बदलल्या आहेत. एका मूर्तीचे वयोमान १२५ ते १५० वर्ष पकडले तरी दोन मूर्तींचे वयोमान अंदाजे ३०० वर्षे होते. या मूर्ती संरक्षण भिंतीच्या आत जी लहान मंदिरे होती त्यामध्ये पहिल्या असतील. तसेच सध्या असलेल्या मूर्तीच्या पूर्वी ज्या पितळीच्या मूर्ती होत्या त्यांचे वयमानदेखील जरी १५० वर्षे मानले तरी मंदिर निर्माणास अंदाजे ४०० ते ४५० वर्षे होतात. सध्याच्या पाषाणातील मूर्ती व जुन्या मूर्ती पाहिल्या तर कालभैरवनाथाचे मंदिर हे अंदाजे चार ते पाच शतकापूर्वीचे असावे असा अंदाज बांधता येईल. त्याचप्रमाणे बगाड उत्सव सुद्धा फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. दरवर्षी बगाड झाल्यावर एक नाल मंदिरातील खांबावर मारण्याची प्रथा आहे. मंदिरात खांबावर मारलेल्या नालाच्या संख्या ३१३ दिसते. यावरून बगाडास ३१३ वर्षे झाली असे आपण मानले तरी मंदिर जर चार ते पाच शतकांपूर्वी बांधले असेल तर मग बगाड उत्सव कधी सुरू झाला असा प्रश्न उभा राहतो. कारण असाही सांगण्यात येते की अशा प्रकाराचे नाल मारलेले आणखी दोन खांब पूर्वी होते, त्यावरून आताचे ३१३ वर्षे व पहिले अंदाजे २०० वर्षे अशी ५१३ वर्षे झाली असावीत असे दिसून येते. यावरून मंदिराचा व बगाडाचा कार्यकाल पाच शतकांपूर्वीचा असावा असा अंदाज बांधता येतो. 

बगाड उत्सवामुळे भैरवनाथ देवस्थान आणि मंदिर यांना अनन्यसाधारण महत्व लाभले आहे व एक जागृत देवस्थान असे पद प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्यात अशी भैरवनाथ देवस्थान बरीच पाहायला मिळतात, परंतु काही ठराविक ठिकाणीच बगाड उत्सव साजरा केला जातो. बावधन जवळील सुरूर, कवठे, फुलेनगर, पसरणी या गावांमध्येही बगाड उत्सव साजरा केला जातो. परंतु त्यातील बावधन गावचे बगाड याचा पहिला क्रमांक लागतो. बावधनच्या बागडाची उंची ही इतर बगाडांपेक्षा जास्त असते, व ओढणारे बैल यांचीहीं संख्या जास्त असते, त्यामुळे पंचक्रोशीतून व दूर दूरवरून लोक खास बगाडाचा उत्सव पाहण्यासाठी येतात. भैरवनाथ आणि बगाड हा बावधन व आजूबाजूची गाव यांचा जिव्हाळ्याचा व आत्मीयतेचा विषय आहे, येथील लोकांना देवाविषयी व बगाडाविषयी विशेष ओढ आणि आवड आहे. परंपरेने चालत आलेले बगाड आणि आपला नवस पूर्ण करून बगाड घेण्याची प्रथा आजही जशीच्या तशी अविरत चालू आहे. बगाडाचे साहित्य पाण्यामध्ये ठेवणारी गावची थोरली विहीर, गावातील चावडीशेजारील हनुमान मंदिर, जननीआई माता मंदिर यांच्या बांधणीची रचना व जडणघडण पाहता भैरवनाथ मंदिर व या बाकी मंदिरांचे बांधकाम सोबतच झाले असावे असे वाटते. भैरवनाथ मंदिर गावचे मूळ देवस्थान असले तरी गावामध्ये याबरोबरच जोतिबा मंदिर, जननी आईमाता मंदिर, हनुमान मंदिर, गाडेबाग मधील गणपती मंदिर, साईबाबा मंदिर अशी जुनी  मंदिर देखील आपणांस पाहायला मिळतात. 

विशेष म्हणजे यात्रेदरम्यान गावातील सर्व जाती, बारा बलुतेदार एकत्र येऊन आपापले काम आणि सोपवलेली मानाची जबाबदारी चोखपणे पार पाडतात. मग ते विहिरीतून बगाड उत्सवाची लाकडे बाहेर काढणे हे भोई समाजाचे काम असो, की बगाड बनवणारे सुतार असो, वा गोंधळ म्हणणारे गोंधळी असो. अठरा पगड जातीचे लोक जसे की चांभार, कुंभार, तेली, भोई, गोंधळी, सुतार, वाणी असे सर्व लोक देवाच्या उत्सवासाठी एकत्र येतात आणि एकजुटीने काम करतात.  त्यामुळे याद्वारे एकता आणि समतेचा संदेश उत्सवाला येणाऱ्या लोकांस पहावयास मिळतो. मुळात यात्रा व बगाड हे बावधान गावात राहत असलेल्या या अठरा पगड जाती व त्यांच्या एकतेचे प्रतीक आहे असे मानले जाते व हे परंपरेने आजपर्यंत चालत आले आहे. भैरवनाथ यात्रा जसी बहुजन समाजातील एकीचे प्रतीक आहे तसेच तडफदार आणि रांगड्या वृत्तीचे द्योतक देखील आहे. बगाड उत्सव दरवर्षी तेवढ्याच उत्साहात व जोमात साजरा होतो. भैरवनाथ यात्रा, बगाड उत्सव याचा व्याप सांभाळण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी, तलाठी (विश्वस्त म्हणून) व अन्य गावकरी एकत्र येऊन मारुती खाशाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इ.स. १९५३ साली भैरवनाथ मंदिर ट्रस्ट ची स्थापना झाली. भैरवनाथ यात्रा व भाविक पाहता मंदिरास  'क' यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे व या तिर्थक्षेत्राला 'क' वर्ग तीर्थक्षेत्र असा दर्जा मिळालेला आहे. यात्रेच्या वेळी मिळालेली देणगी व शासनाकडून मिळालेला निधी मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिरात देवाची पूजा करण्यासाठी असलेले पुजारी व रोजची पूजा यांसाठी वापरला जातो. 

पूर्वी कानीटकर देवाची शास्त्रोक्त पद्धतीने, ओल्या कपड्याने, सोहळ जपत पूजा करीत असत. कानीटकरांनी त्यांचे वय झाल्यावर त्यांच्याकडे असलेली पूजेची जबाबदारी व रोजची देवाची सेवा करण्याचा भार गावकडे सोपवला. त्यानंतर विश्वस्त पुजारी म्हणून रोज शास्त्रोक्त पद्धतीने देवाची पूजा करण्यासाठी सुरुवातीला कोणास जबाबदारी दिली याची नेमकी माहिती मिळाली नाही, परंतु नंतरच्या काळात विठोबा गुरव, कान्हा गुरव, गजानन गुरव ते आत्तापर्यंत गुरव बंधू ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत आहेत. सकाळी पहाटे ६:०० च्या आत देवास स्नान घालून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते, देवास पुष्पहार अर्पण केले जातात. तशीच संध्याकाळी ७:०० वाजता पूजा केली जाते व नित्यनियमाने आरती म्हंटली जाते. ही आरती विशिष्ट चाल व लयबद्ध स्वरूपात असते. यावेळी आपणास पुराणकाळात गेल्याचा भास होतो. भाविक सुद्धा श्रद्धामय व भावनामय होऊन जातात व रोजच्या आरतीसाठी तेवढीच गर्दी करतात. 

मंदिरास जरी पाच शतके झाली असली तरी, भैरवनाथ व भक्त यांच्यामधील भक्तीच नात आजही तेवढंच पवित्र आणि समृद्ध आहे, आणि टिकून आहे. भैरवनाथ हा भक्तांच्या हाकेला धावून जाणारा देव आहे, आणि देवास केलेला नवस पूर्ण होतो, भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, अशी लोकांची धारणा आहे, आणि याचा प्रत्यय वेळोवेळी येतो, त्यामुळे भैरवनाथ हे एक जागृत देवस्थान आहे असे मानले जाते आणि लोक तेवढ्याच श्रद्धेने भक्तीने देवाची पूजा करतात. रविवार हा देवाचा, नाथसाहेबांंचा वार समजला जातो. रविवारची पूजा ही सात्विक पद्धतीने व पाहण्यासारखी असते. पहाटे ६:०० च्या आत पूजा होते, आरती केली जाते व त्यानंतर दिवसभर दर्शनास येणाऱ्या भक्तांस लाडुचा गोड प्रसाद देखील दिला जातो. दर रविवारी संध्याकाळी मंदिरात छबिना भरतो व चांगभले चा गजर होतो. 

रविवारी मंदिरात भक्तांची रांग लागते, देवाचे दर्शन घेऊनच आपला दिनक्रम सुरू करायचा अशी गावातील लोकांचा आजही कल असतो, त्यामुळे लोक आजही पहाटे पासून मंदिरात दर्शनास येतात. स्त्रियांना बगाड उत्सव सोडून इतर दिवशी गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नसला तरी बाहेरून दर्शन घेण्यास स्त्रियांची गर्दी दिसून येते, बगाड उत्सवाच्या वेळी मात्र एकच दिवस स्त्रियांना दर्शन खुले केल्यामुळे विशेषकरून स्त्रियांची दर्शनासाठी  मोठी  रांग दिसून येते. श्रावण महिन्यात, दसऱ्याच्या वेळी तर नऊ दिवस नऊ वाहनांवर देव बसून वेगवेळ्या रुपात पाहायला मिळतात, तेव्हा तर भक्तांच्या दर्शनास उधाण येते. 

असे भैरवनाथ आणि भक्तांमधील प्रेम हे दिवसेंदिवस वाढतच चालले असल्याचे दिसून येते. कोणाच्यात नसेल तो जोश आणि आत्मविश्वास फक्त नाथाच्या गजरात आहे. देव आणि भक्त यांमधील हा दुवा असाच राहो आणि सर्वांचं चांगलं भलं होवो , म्हणजेच 'काशीनाथाचं चांगभलं' या आरोळीने सर्वांचं चांगलं होवो अशी भैरवनाथ चरणी प्रार्थना...

संदर्भ: जयसिंगराव येवले पुस्तक लेखन.

माहिती संकलन- निलेश अनपट
संपादन- केशव राजपुरे

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...