Monday, March 21, 2016

बावधन ची परंपरागत बगाड यात्रा



छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील वाईच्या दक्षिणेला वसलेले बावधन गाव, 'दक्षिणकाशी' म्हणून प्रसिद्ध आहे. या गावाला एक आगळं-वेगळं पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे, ते म्हणजे इथल्या बगाड यात्रेमुळे! बावधनकरांना या बगाड यात्रेचा प्रचंड अभिमान आहे. या यात्रेची माहिती देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

पेशवेकाळापासून पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली बावधनची 'बगाड' यात्रा, यावर्षी (२०२५) १८-१९-२० मार्च दरम्यान साजरी होत आहे. या यात्रेची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:

‘काशिनाथाचं चांगभलं’च्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या सुमधुर गजरात भैरवनाथाची बगाड यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पार पडेल. फाल्गुन वद्य पंचमीला (रंगपंचमी) होणाऱ्या या यात्रेच्या निमित्ताने विविध समाजातील, जाती-जमातींतील लोक आणि आप्तेष्ट एकत्र येतात. बगाडासारख्या उत्सवात गावकरी मतभेद विसरून आनंदाच्या रंगात रंगून जातात. म्हणूनच, नाथांच्या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत या यात्रेने मानाचा तुरा रोवला आहे.

या उत्सवादरम्यान गावकरी आणि भाविकांमध्ये उत्साहाचं चैतन्य संचारलेलं असतं. सुमारे एक लाखाहून अधिक भाविक बगाड यात्रेला हजेरी लावतात. ज्यांची नवसपूर्ती झाली आहे, अशा पंचक्रोशीतील 'बगाड्या'ची निवड होळी पौर्णिमेच्या दिवशी केली जाते. फाल्गुन वद्य चतुर्थी, पंचमी आणि षष्ठीला यात्रेला सुरुवात होत असली, तरी खरी रंगत होळी पौर्णिमेपासूनच चढते. 'बगाड्या'ची निवड करण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक होळी पौर्णिमेला भैरवनाथाच्या मंदिरात एकत्र येतात. रात्री बारा वाजता विधिवत पूजा करून, नवस केलेल्या व्यक्तींच्या नावे देवापुढे पुजारी कौल लावतात. ज्या व्यक्तीला उजवा कौल मिळतो, त्याला 'बगाड्या'चा मान मिळाला, असं जाहीर केलं जातं. बगाड्याला उजवा कौल मिळाल्यावर, 'काशिनाथाचं चांगभलं'च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून जातो. या गजरातील ऊर्जा बावधनकरांना चांगलीच ठाऊक आहे. ताणमुक्त होण्यासाठी आणि मानसिक बळ मिळवण्यासाठी बगाड्या आपल्या भाऊबंद आणि मित्रपरिवारासोबत नाथसाहेबांच्या गजरात मंदिराला पाच प्रदक्षिणा घालतो. भाऊबंद, गावकरी आणि मित्रमंडळी एकजुटीने गजर करत बगाड्याला आधार आणि पाठबळ देतात.

होळी पौर्णिमेपासून बगाडापर्यंत, बगाड्याला मंदिरातच मुक्काम करावा लागतो. या काळात त्याला केवळ फलाहार करण्याची परवानगी असते. यामागे शास्त्रीय कारण आहे. बगाड्याची पचनशक्ती वाढावी आणि काही बिघाड होऊ नये, म्हणून हलका आहार देऊन काळजी घेतली जाते. बगाड्याने होळी पौर्णिमेपासून काही धार्मिक संकेत काटेकोरपणे पाळणे आवश्यक असते. मंदिराचे आणि देवाचे पावित्र्य, तसेच बगाड्याचा शुचिर्भूतपणा यांना विशेष महत्त्व असते. हे संकेत अत्यंत निष्ठेने पाळले जातात. "काशीनाथाचे चांगभले!" हा 'नाथासाहेबांच्या कृपेने भक्तांचे भले होवो' या अर्थाचा गजर आहे. काशीहून आलेले नाथ म्हणजे काशिनाथ (भैरवनाथ)! आता हा गजर बावधन पंचक्रोशीचाच पारंपरिक गजर बनला आहे. हा गजर ऐकताच कोणत्याही बावधनकराच्या अंगावर रोमांच उभे राहतात. हा गजर आक्रमकता आणि एकतेचे प्रतीक मानला जातो. बावधनकर याचा वापर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, सामूहिक कामे करताना, स्वतःला प्रेरित करण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी आणि सण-उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात करतात.

पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंतच्या रात्री बगाड्यासाठी खास असतात. या काळात देवपूजा आणि आरोग्यदायी व्यायामासाठी वेळ काढला जातो. जवळपास ५०० भाविक एकत्र येऊन, रात्री एक वाजता अनवाणी पायांनी या परंपरेत सहभागी होतात. हे सर्वजण बगाड्याला सोबत घेऊन गावाच्या ईशान्य दिशेला तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णा नदीच्या वाकेश्वर घाटावर दररोज जातात. तिथे कृष्णा नदीत स्नान करून वाकेश्वराचे दर्शन घेतात आणि पाणी अर्पण करतात. परत येताना बगाड्या खांद्यावर कृष्णा नदीच्या पाण्याची कळशी घेऊन येतो. मग गावातील नंदी, पाचीदेवळ येथील भैरवनाथाचे मूळ स्थान, सुंदराबाई, दत्त, लक्ष्मीआई, भैरवनाथ, भवानी माता, मारुती, जोतिबा, मोरोबा, श्रीराम आणि जननी आई यांसारख्या विविध मंदिरांना भेट देऊन देवांना पाणी अर्पण केले जाते. जननी आईची आरती झाल्यावर, सर्वजण बगाड्याच्या घरी जातात, जिथे देव्हाऱ्यातील देवतांची पूजा होते. पहाटे पाचच्या आत बगाड्या भैरवनाथाच्या मंदिरात परत येतो, आणि सर्व विधी पूर्ण होतात.

अनवाणी चालण्याच्या प्रथेला शास्त्रीय आधार आहे. यामुळे पायांना अॅक्यूपंक्चरचा विशेष व्यायाम मिळतो, आणि बगाडाच्या दिवशी त्रास होत नाही. पाणी भरलेली कळशी खांद्यावर घेऊन चालल्याने भाविकांचा खास व्यायाम होतो, जो बगाडाच्या दिवशी शिड घट्ट धरण्यासाठी आवश्यक असतो. 'देवाचं बगाड घेणं' ही पूर्णपणे स्व-इच्छेने केली जाणारी गोष्ट आहे, ज्यात कोणावरही जबरदस्ती नसते. परंतु एकदा बगाड घ्यायचं ठरवलं, की घालून दिलेले आणि पूर्वापार चालत आलेले नियम आणि परंपरा पाळाव्याच लागतात.

बगाड म्हणजे दगडी चाके असणारा एक खास लाकडी रथ. या रथाची रचना विशिष्ट पद्धतीची असते, ज्यामुळे तो एक आकर्षक कलाकृती बनतो. या रथासाठी वापरले जाणारे साहित्य म्हणजे लाकडी कणा, कुण्या, दोन घडीव दगडी चाके, दांड्या, बैलांना जुंपण्यासाठी जोते किंवा जू, जुंपण्या, मध्यभागी आडवे खाच असलेले चौकोनी लाकूड (वाघला), मध्यभागी उभा खांब (खांबला), बाहुली, शीड, पिळकावण्या, वाकापासून तयार केलेली चऱ्हाटे (जाड दोरखंड), आणि बैलांना जुंपण्यासाठी शिवळा इत्यादी. या संपूर्ण बगाडाच्या रचनेत लोखंडाचा अजिबात वापर केलेला नसतो, हे या रथाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हा रथ पूर्णपणे नैसर्गिक साहित्यापासून बनवलेला असतो, जो त्याच्या पारंपरिक महत्त्वाला अधिक उठाव देतो.



गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या 'थोरल्या विहिरी'जवळ बगाडाचे कणा, खांबला, दांड्या आणि बुटे यांसारखे साहित्य ठेवलेले असते. हे सर्व साहित्य वाजतगाजत भैरवनाथाच्या मंदिरात आणले जाते. मागील वर्षीच्या बगाडातील वापरण्यायोग्य साहित्यच यावर्षी वापरले जाते, अन्यथा नवे लाकडी साहित्य तयार केले जाते. बगाडाचा रथ बनवणे हा या उत्सवातील महत्त्वाचा भाग मानला जातो.

उत्सव जवळ येताच गावातील लोक कामाला लागतात. बगाडाच्या रथाला साधारण तीन फूट उंचीची दोन मोठी घडीव दगडी चाके असतात. दहा फूट लांबीच्या लाकडी कण्याला ही दोन्ही चाके जोडली जातात. चाके निसटू नयेत म्हणून कण्याला चाकाच्या बाहेर लाकडी कुण्या बसवल्या जातात. कण्यावर लाकडी बुटे बसवतात. या घनाकृती लाकडाला दांड्या बसवण्यासाठी दहा इंच व्यासाची दोन भोके पाडलेली असतात. यामध्ये बारा फूट लांबीच्या दोन दांड्या बसवल्या जातात. दांड्यांना बैल जुंपण्यासाठी दहा फूट लांबीचे आडवे जू बांधले जाते. बैलगाडीच्या साठीप्रमाणे एक लाकडी साठी तयार करून दांड्यावर बसवली जाते. ही साठी वाघाच्या तोंडाचा आकार असलेल्या वाघळ्याला बसवण्यासाठी असते. वाघाल्याच्या मध्यभागी दीड फूट रुंद भोक ठेवलेले असते. यामध्ये अठरा फूट उंचीचा लाकडी खांब (खांबला) रोवला जातो. खांबावर बाहुली बांधली जाते. ही बाहुली कळकापासून बनवलेल्या आणि खांबावर आडव्या ठेवलेल्या जवळजवळ पंचेचाळीस फूट लांबीच्या शिडाला गोल फिरवण्यासाठी तसेच वर-खाली करण्यासाठी मदत करते. हे शीड दोरखंडात विशिष्ट पद्धतीने विणलेले असते. अशाप्रकारे बगाड रथ पूर्ण केला जातो.

बगाडाच्या मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी खांबाच्या मध्यभागी केलेल्या जागेवर दोन लोक उभे असतात. याला पिळकावणी म्हणतात. पिळकावणी म्हणजे दोन दोरखंडावर लाकडी दांडके पिळ देऊन खांबाला बिलगून ठेवलेले असते, ज्यावर माणूस सहज उभा राहू शकतो. खांबाच्या मध्यापासून दोन लांब दोरखंड सोडलेले असतात, ज्यांना तोरण्या म्हणतात. तोरण्यांच्या मदतीने बगाडाचा तोल सांभाळला जातो. तोरण्या धरून पंचवीस ते तीस तरुण कायम सतर्क असतात. बगाडाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मंदिरासमोर बगाड रथ तयार केला जातो.

फाल्गुन वद्य चतुर्थीला यात्रेचा पहिला दिवस उजाडतो. दुपारपासून भाविकांची पावले मंदिराकडे वळू लागतात. हार, नैवेद्य आणि इच्छेनुसार काचेच्या हंड्या, आरसे, झुंबरे यांसारख्या भेटवस्तू वाजत गाजत भैरवनाथाच्या चरणी अर्पण केल्या जातात. याच दिवशी, शुभमुहूर्तावर भैरवनाथांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होतो. दुपारी, योग्य मुहूर्त पाहून देवाला सुंदर पोशाख चढवला जातो, बाशिंग बांधले जाते. डवर गोंधळी समाज विधीवत पूजा करून, बगाड्याच्या घरी बनवलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य देवाला अर्पण करतात.

दिवसभर मंदिरामध्ये भाविकांची रीघ लागलेली असते. संध्याकाळी, देव आणि बगाड्याच्या मिरवणुकीचा, म्हणजेच छबिन्याचा नेत्रदीपक सोहळा पार पडतो. चंद्रोदयानंतर, बगाड्यासह सर्वजण नाथसाहेबांच्या पाचीदेवळ येथील मूळस्थानी दर्शनासाठी जातात. तिथे, देव पंचक्रोशीसाठी वर्षभराची भाकणूक करतात. वडीलधारी मंडळी बगाड उत्सव साजरा करताना घ्यावयाच्या काळजीबद्दल सूचना देतात. त्यानंतर, छबिना पुन्हा गावात प्रवेश करतो. पंचक्रोशीतील ढोल शौकीन, लेझीम पथके, दांडपट्टा आणि गजे खेळणारे भाविक या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहतात. देवाची पायधूळ गावात पडते, आणि सनई, डफडी, ढोल, लेझीम आणि दंडपट्टा यांचा खेळ पालखीपुढे रंगतो. फुलांच्या छत्र्यांनी वातावरण अधिकच प्रसन्न होते.

छबिन्याच्या रात्री, रंगपंचमीचा उत्साह असतो. बावधनकरांना वेगळी रंगपंचमी खेळण्याची गरज नसते, कारण छबिन्यादरम्यान देवावर उधळलेला गुलाल एकमेकांना लावून आनंद साजरा करण्याची प्रथा आहे. छबिना संपेपर्यंत, सर्वजण गुलालात रंगून जातात, आणि आपापसातील हेवेदावे विसरून एकमेकांना आलिंगन देतात. अशा प्रकारे, नाथांचा हा उत्सव सामाजिक शांततेचा प्रतीक बनतो. रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेला छबिना पहाटे चार वाजेपर्यंत चालतो.

छबिना संपल्यानंतर (यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, रंगपंचमीला) बगाडाचा रिकामा गाडा गावकरी स्वतःच्या हातांनी किंवा बैलांच्या सहाय्याने बावधनच्या पूर्वेला, गावापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री सोनेश्वर मंदिरापर्यंत ओढत नेतात. या रिकाम्या गाड्यासोबत बगाड्याही पायी चालत जातो.

ओझर्डे गावाच्या सीमेवरील कृष्णा नदीच्या काठावर असलेले श्री क्षेत्र सोनेश्वर हे बावधनच्या बगाडाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ कृष्णा नदीत पाण्याचे मोठे डोह आहेत. हे मंदिर अठराव्या शतकात ओझर्डे गावातील पिसाळ देशमुख घराण्याने बांधले असावे, असे सांगितले जाते. घडवलेल्या दगडात बांधलेल्या या मंदिरात शंकराची पिंड आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक दगडी नंदी असून, त्याच्या गळ्यात बगाड्याची मूर्ती कोरलेली आहे. या नंदीच्या गळ्यातील बगाड्याच्या मूर्तीवरून बगाड सुमारे ३०० वर्षांपासून सुरू झाले असावे, असा अंदाज बांधता येतो. याच सोनेश्वर मंदिरापासून बगाडाला सुरुवात होते. बगाड्या कृष्णा नदीत स्नान करतो. विधीवत पूजा आणि आरती झाल्यावर बगाड्याला पारंपरिक वेशभूषा केली जाते. ग्रामदैवतांची पूजा झाल्यावर बगाडाला बैल जुंपले जातात.


यानंतर खऱ्या अर्थाने बगाड रथाला सुरुवात होते. बगाड्याच्या पायाखाली झोपाळ्याची दोरी असते, आणि पायांना इजा होऊ नये म्हणून दोरीला पागोट्याचे कापड गुंडाळलेले असते. बगाड्याला लोखंडी गळात अडकवून, तो गळ शिडाला घट्ट बांधलेला असतो. गाड्याच्या झोक्याने जरी त्याचा तोल गेला, तरी तो आपोआप सावरला जावा, हा यामागचा उद्देश असतो. अशा प्रकारे, जागच्या जागी पाच वेढे काढून बगाड्या 'काशिनाथाचे चांगभले'चा जयघोष करतो आणि बगाडाला सुरुवात होते. 'चांगभले' म्हणताच, गाड्याला जुंपलेले मानाचे बैल धूम ठोकतात आणि गाडा भरधाव वेगाने गावाकडे मार्गक्रमण करतो. यात्रेला आलेले सर्व भाविक 'काशिनाथाचे चांगभले'चा गजर करत देवाचे दर्शन घेतात आणि रथाच्या मिरवणुकीत सहभागी होतात. अगदी लहान मुलांपासून ते अबालवृद्धांपर्यंत, हा गावचा गाडा म्हणजे कुतूहलाचा विषय असतो! सर्वजण या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात.

बगाडाच्या रथामागे वाजत गाजत ग्रामदैवतांच्या पालख्या निघतात. या बगाडाला किमान दहा ते बारा बलदंड बैल जुंपलेले असतात. हे बैल बगाड ओढत गावात आणतात. बावधन गावात बगाड येईपर्यंत वाटेत ठराविक अंतरावर बैलांच्या जोड्या बदलल्या जातात. बगाडाला बैल जुंपणे म्हणजे नाथांची सेवा, असे बावधनचे ग्रामस्थ अभिमानाने मानतात. म्हणूनच बगाडासाठी ते बैलांना विशेष खुराक देऊन, त्यांची दोन महिने निगा राखतात. या वेळी खास खिलारी बैल पाहण्यासाठी दूरदूरचे शेतकरी येतात. बैल जुंपण्याचा मान देखील ठरलेला असतो. बावधन पंचक्रोशीतील प्रत्येक घटकाला बैलांस जुंपण्याचा मान मिळतो.

बगाडाला जुंपलेल्या बैलांच्या विविध स्थानांना विशिष्ट सांकेतिक शब्द आहेत, जसे की धुरवी, चावरी, सहा बैली, आठ बैली इत्यादी. धुरवी म्हणजे मुख्य गाड्याच्या जूटाची अत्यंत महत्त्वाची आणि अवघड जागा. इथे ताकदवान आणि पल्लेदार बैल असावे लागतात. बगाडाचं पूर्ण ओझं पेलून गाडा ओढण्याची जबाबदारी या बैलांवर असते. गाडा ओढताना ठेच लागणे, हेलकावा बसणे किंवा ओझं न पेलल्यामुळे मानेवर गाडा पडणे यांसारखे अपघात टाळण्यासाठी बैलांचे मालक अतिशय दक्ष आणि तत्पर असतात. धुरवीच्या बैलाच्या बाजूची जुंपणी हातात धरून गाडा नियंत्रित ठेवणे म्हणजे 'खणसा' धरणे. हे काम करण्यासाठी उमदा आणि शक्तिशाली माणूस हवा, म्हणूनच म्हणतात, 'येथे पाहिजे जातीचे, येऱ्यागबाळ्याचे काम नोहे!'

शिवळेत जुंपलेली बैलजोडी 'वांडे' म्हणून ओळखली जाते. बगाडाला कमीत कमी चार वांडी जोडलेली असतात. धुरवीच्या पुढची जोडी म्हणजे चावरी. हे गाडा ओढण्यासाठी महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक गावकऱ्याची आपला बैल चावरीला जुंपावा अशी इच्छा असते. चावरीला बैल जुंपून देवाचा रथ ओढून नाथसेवा केल्याची भावना असते. चावरीला ताकदवान आणि अनुभवी बैल लागतात. चावरीच्या पुढे सहा बैली आणि आठ बैली अशा वांडी असतात. गाडा शेतातून जात असताना सुरुवातीला चार वांडी लागतात, पण 'आळ वाट' संपल्यावर तीन वांडी पुरेशी होतात. गाडा गावाजवळ आल्यावर सर्व बैल सोडून हाताने ओढला जातो.

बगाडाच्या मार्गात ठराविक ठिकाणी फेऱ्या काढण्याचा संकेत आहे. काही ठिकाणी एक, तर काही ठिकाणी पाच फेऱ्या मारल्या जातात. या फेऱ्यांच्या वेळी बगाड्या चारी दिशांना नमस्कार करून बोंब ठोकतो. त्याच्या हातात कडुलिंबाचा पाला असतो, जो तो अधूनमधून खातो. कडुलिंब औषधी गुणधर्मांमुळे ओळखले जाते. ते शरीराला त्रास देणारे संसर्ग कमी करते, तहान आणि उष्णता कमी करते. दिवसभर टांगलेल्या अवस्थेत हा पाला बगाड्यासाठी उपयुक्त ठरतो.

हा उत्सव साधारणपणे मार्च महिन्यात, कडक उन्हाळ्याच्या सुरुवातीला साजरा केला जातो. बगाडात सहभागी होणारे लोक प्रामुख्याने पांढऱ्या रंगाचे, हवेशीर सुती वस्त्र परिधान करतात. यामागे शास्त्रीय कारण आहे. पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही, ज्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. डोक्यावर पांढरी टोपी घातल्याने तीव्र सूर्यकिरणांपासून मस्तकाचे संरक्षण होते. सुती कपडे उष्णता रोखून शरीराला आराम देतात. बगाडात काळ्या रंगाचे कपडे, चामड्याच्या चपला किंवा पट्टे आणि काळा दोरा वापरण्यास सक्त मनाई आहे. शिवाय, या उत्सवात कोणत्याही प्रकारच्या व्यसनांना थारा नसतो. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली असून, गावातील प्रत्येक जण याचे काटेकोरपणे पालन करतो.

परंपरेने बगाड यात्रेमध्ये प्रत्येक समाजाला (बारा बलुतेदारांना) विशिष्ट जबाबदारी दिली जाते, ज्यामुळे या उत्सवाला एक अनोखे महत्त्व प्राप्त होते. या मानकऱ्यांना बगाडात मानाचे स्थान असते. गाडा तयार करण्याचे काम सुतार घराण्याकडे असते, तर गाड्याच्या यठनाची महत्त्वाची गाठ देण्याचा मान पिसाळ भावकीला मिळतो. छबिन्याच्या दिवशी बगाड्यासोबत असणाऱ्या मशालीला तेल पुरवण्याचा मान तेली समाजाकडे, तर वर्षभर देवाला फुले पुरवण्याचा मान माळी समाजाकडे असतो. देवाची सेवा करण्याचा मान गावातील गुरव समाजाकडे असतो. सोनेश्वरापासून मंदिरापर्यंत बगाड नेताना व परतताना कण्यामधील चाकाला तेल देण्याचा मान तेली समाजाकडे असतो. बगाड्याला गळ देण्याचा मान मुसळे आणि नाभिक समाजाकडे, शिडावर बसण्याचा मान दाभाडे यांच्याकडे, तर पिळकावणीवर उभे राहण्याचा मान भोसले व पिसाळ तरफेकडे असतो. बगाडाच्या गाड्यावर बसण्याचा मानही तरफेवर ठरवून दिला जातो. देवाला कपडे देण्याचा मान परीट समाजाकडे, डवर पूजन, देवाला वाजतगाजत नेणे, देवाच्या लग्नाची गोष्ट - आख्यायिका सांगून देवाचे सेवेकरी राहण्याचा मान डवरी-गोंधळी समाजाकडे, चर्मकार समाजाला मशाल धरण्याचा तसेच देवाला चामड्याचा जोडा देण्याचा मान असतो. भुई समाजाला धुळवडी दिवशी पाण्यात टाकलेली (थोरली विहीर) बगाडाची लाकडे काढण्याचा मान तसेच छबिना व बगाडा दिवशी देवाच्या पालखीला खांदा देण्याचा मान आहे. धनगर समाज माघ अमावस्येला देवाला घोंगडी भेट देतात. खाटिक तसेच रामोशी समाजाला देवाची देणी देण्याचा मान, तर मातंग समाज बगाडाच्या वेळी वाजंत्री (सनई व डफड) असतात. बगाडात देवाचा जो घोडा असतो, त्याच्या नावाने भैरवनाथाच्या मंदिरात घोड्याचा नाल ठोकण्याचा मान लोहार समाजाला आहे. होळीच्या आदल्या दिवशी बगाड्याचा गळ आणण्याचा मान नाभिक समाजाला आहे. बगाडाचे शीड मागच्या बाजूने धरण्याचा मानही गावातील मानकऱ्यांचा असतो. यामध्ये माळी समाजाला प्राधान्याने मान देतात. तसेच गावातील माहितगार आणि ताकदवान माणसेच हे काम करू शकतात, कारण बगाड गाड्याचे पूर्ण नियंत्रण या शिडाच्या मागच्या बाजूवर अवलंबून असते. मुस्लीम समाज देखील या देवगाड्याच्या कामात सहकार्य करून आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवतात. म्हणजे बगाड यात्रेदरम्यान गावात हिंदू-मुस्लीम ऐक्याची भावना पाहायला मिळते.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बगाड जननी आईच्या भेटीसाठी निघते, तेव्हाही 'मानाचा बगाड्या' म्हणून विशेष सन्मान दिला जातो. बगाडात समाजातील सर्व स्तरांतील आणि वाड्या-वस्त्यांतील लोकांना मान दिला जातो, ज्यामुळे सामाजिक एकोपा टिकून राहण्यास मदत होते. बगाडात सेवा करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या निस्वार्थ सेवेच्या बदल्यात इनामी जमिनीही देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यात्रेदरम्यान गावकरी स्वतः किंवा इतरांना व्यसन करण्यास सक्त मनाई करतात. व्यसनमुक्त भारत ही काळाची गरज ओळखून, तंबाखू, सिगारेट किंवा दारूसारख्या व्यसनांना या उत्सवात अजिबात थारा नसतो. व्यसन करणाऱ्या व्यक्तीला बगाड्याच्या जवळपासही फिरकू दिले जात नाही.

सूर्यास्ताच्या सोनेरी छटांमध्ये सोनेश्वरावरून निघालेले बगाड, भक्तांच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात भैरवनाथाच्या मंदिरासमोर पोहोचते. बगाड सुरक्षितपणे पोहोचल्याचा श्वास रोखून धरलेल्या जनसमुदायाला दिलासा मिळतो. मग बगाड्याला आदरपूर्वक खाली उतरवून, मंदिराच्या गर्भगृहात नेले जाते, जिथे त्याला एक ग्लासभर दूध देऊन त्याची सेवा केली जाते. या धार्मिक विधीनंतर, बगाड उत्सवाची आनंदमयी सांगता होते.

उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (फाल्गुन वद्य षष्ठी), लोककलेचे विविध रंग भरलेले तमाशा, लाल मातीतील मर्दानी कुस्त्या आणि संगीताची मनमोहक मैफल यांसारख्या मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल असते. तमाशाच्या रसिकतेत पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने रंगून जातात. दुपारी, मातीतील मर्दानी खेळाचा थरार अनुभवायला मिळतो, ज्यात गावकरी आणि पंचक्रोशीतील मल्ल सहभागी होतात. लहानग्यांपासून ते प्रौढांपर्यंत सगळेच कुस्तीच्या आखाड्यात आपले कौशल्य दाखवतात. जिंकणाऱ्या मल्लांना रोख बक्षीसांबरोबरच आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवले जाते. या दिवशी, गावातील रस्ते गर्दीने फुलून जातात. गावकरी, पंचक्रोशीतील पाहुणे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले रसिक या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी एकत्र येतात.

गेल्या काही वर्षांपासून, गावाने बगाडावरील नियंत्रणासाठी यात्रा समिती स्थापन केली आहे. बगाडापुढे ध्वनिक्षेपकांची सोय केलेली ट्रॅक्टर-ट्रॉली उभी करून, यात्रेचा आनंद दूरून घेणाऱ्या पाहुण्यांना आणि गावकऱ्यांना योग्य सूचना देण्यात येतात. यामुळे श्रेयवाद, मोठेपणा आणि गैरसमज दूर झाल्याने आपापसातील मतभेद टळले आहेत. परिणामी, बगाड यात्रा शांततेत पार पडते. या काळात जुने मित्र भेटतात, आनंदी क्षणांचा अनुभव घेतात आणि माहेरवाशिणींना गावच्या उत्सवासोबत नातेवाईकांच्या भेटीचा आनंद मिळतो. गावकऱ्यांकडून नातेवाईक आणि मित्रांना यात्रेची माहिती दिली जाते. बैलांच्या या खेळामुळे, बैलशौकीन दूरदूरहून बगाड पाहण्यासाठी येतात आणि आनंदात सहभागी होतात.

बावधनचं बगाड म्हणजे एक उत्सव आणि ‘ईर्षेचा खेळ’ असं म्हटल्यास वावगं ठरू नये. पूर्वी गावात धनधान्याची सुबत्ता आणि धनिक असणाऱ्या समूहांना (तरफ) वर्चस्व प्रस्थापित करण्याची कल्पना सुचायची. खरं तर, बगाड म्हणजे देवाच्या उत्सवासोबतच गावातील दोन मुख्य तरफांमधील उन्नतीची स्पर्धाच अधिक असायची.

बगाडाच्या हौसेपोटी, ही मंडळी धष्टपुष्ट बैल विकत घ्यायची आणि त्यांना बगाडाचं विशेष प्रशिक्षण देऊन, दुसऱ्या तरफेतील बैलांचा गाडा ओढण्याच्या स्पर्धेत हरवायची. यासाठी, गाड्याच्या शिवळीमध्ये एका बाजूला एका तरफेचे बैल आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या तरफेचे बैल जुंपण्याची प्रथा होती. दुसऱ्या तरफेला शह देऊन बैलांनी विजय मिळवल्यावर, गावात या तरफेचं वर्षभर ‘वर्चस्व’ असा छुपा संकेत असायचा.

आता यात्रा कमिटीमध्ये बैल जुंपण्यासाठी वेगवेगळे खुत्ते (गाड्याचा थांबा) ठरवून दिले जातात आणि त्या त्या खुत्त्यावर गावातील मानकरी आपापली (फक्त एका तरफेची) बैल जुंपतात. त्यामुळे, ही परंपरागत चालत आलेली छुपी स्पर्धा कमी झालेली जाणवते. पण या रांगड्या खेळातून मिळणारा आनंद पूर्वीप्रमाणेच कायम आहे. त्यामुळे, प्रत्येक माहेरवाशिणीप्रमाणेच गावाबाहेर नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या चाकरमान्यांनाही या नाथाच्या उत्सवाची ओढ लागलेली असते. या गावातील चाकरमानी मंडळी या दिवशी कुठेही असोत, तसेच त्यांना कितीही कामं असली तरी देवावर गुलाल टाकण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात.

बगाड म्हणजे केवळ एक विधी नव्हे, तर तो आहे नाथसाहेबांच्या भक्तीचा उत्सव!
वर्षानुवर्षे ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, तो सोहळा म्हणजे प्रेमळ नात्यांचा संगम!

बावधनची बगाड यात्रा म्हणजे केवळ एक धाडसी खेळ नाही, तर ती गावपातळीवरील स्पर्धा, जिद्द, सामाजिक एकोपा, रूढी, परंपरा आणि संस्कृती यांचे विलोभनीय दर्शन घडवते.

- प्रा (डॉ) केशव यशवंत राजपुरे
website




_______________________________________________

Wednesday, March 2, 2016

प्राधान्यक्रम

अग्रक्रम

​​दुपारी जेवण झाल्यावर द्राक्षे खात होतो. खाताना एक साधी गोष्ट लक्षात आली; ती म्हणजे आपण दिलेल्या द्राक्ष्यातून अगदी निवडून अधिक पिवळी झालेली (तुलनेने गोड) द्राक्षे अगोदर खात होतो, मग क्रमाक्रमानं थोडीशी हिरवी, मग शेवटी जास्त हिरवी म्हणजे कमी गोड. मनात विचार आला: खाताना तर मी सर्व द्राक्षे खाल्ली मग गोड द्राक्ष्याना हे प्राधान्य कशासाठी ? मी हि द्राक्षे सरसकट का खाल्ली नाहीत ? कधीतरी हि सर्व द्राक्षे एकाच पोटात जाणार होती ना ?

नंतर मला दैनंदिन जीवनात माझ्या प्राधान्यक्रमांची आठवण झाली. इस्त्री करून ठेवलेल्या ड्रेस पैकी मी सोमवार साठी सर्वात उत्तम दिसणारा ड्रेस निवडतो मग मंगळवारी पुढच्या क्रमाचा अन पुढे तसेच चालू .. .. .. , किंवा त्या आठवड्यात एखादा महत्वाचा कार्यक्रम असेल तर निवडक ड्रेस आपण त्यासाठी राखून ठेवतो. असे का ? तसेच भुईमुगाच्या शेंगा खाताना ज्या आकाराने (ठपकळ) मोठ्या आहेत त्यांचा मान पहिला ! शेंगदाणे खातानाही प्राधान्यक्रम ठरलेलाच ! सुरुवातीला आपण जर बस मध्ये चढलो तर जागेची निवड करताना विंडो-शीट पसंत करतो. अन शेवटी चढलो तर मिळेल ती शीट चालते, नसल्यास बसमध्ये उभं राहणंही चालतं, मग सुरुवातीलाच प्राधान्यक्रम कशाला ?

समजा, तुमच्यासमोर एखादा केक ठेवला असून त्यावर क्रीम आणि चेरीही आहे. आता तुम्ही आधी काय खाणार ? क्रीम, चेरी कि केक ? प्रत्येक माणूस या प्रश्नाचं वेगवेगळ उत्तर देईल. कोणी म्हणेल, मी आधी केक चा तुकडा खाईन आणि सर्वात शेवटी चेरी खाईन. जेणेकरून चेरीचा स्वाद जास्त वेळ तोंडात राहील. तर कोणी म्हणेल, आधी मी चेरी खाईन. कारण त्यावर जे आईसक्रीम आहे त्याच्या स्वादिष्ट चवीचा मला लवकरात लवकर आस्वाद घेता येईल. जेवतानीही बरेच लोक असं करतात. स्वीट डिश अगदी शेवटी किंवा सुरुवातीला किंवा मध्ये खात रहातात. प्रत्येकाची आपापली निवड असते. 'व्यक्ती तितक्या प्रकृती', त्यामुळे प्रत्येकाचे प्राधान्यक्रम निरनिराळे असतात.

आयुष्याच्या गणिताबाबतीतही असेच आहे. अगदी सोपे प्रश्न सुरुवातीला मग जरा अवघड, जादा अवघड .. .. .. .. जीवन जगत असताना सुख-दुख:चे प्राधान्यक्रम ठरवायची किल्ली जर माणसाच्या हातात असती तर त्याने कधी दु:ख निवडलेच नसते. पण वस्तुस्थिती तशी नाहीय त्याठिकाणचे प्राधान्यक्रम आपल्या हातात नाहीत.

आपल्या जीवनासाठी अत्यावश्यक असणार्‍ या बाबी म्हणजे लक्ष. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक लक्ष्ये असतात. मनातील इच्छा व डोळ्यांसमोरील ‘लक्ष्य’ जर पूर्ण झाले तरच आयुष्य सफल झाल्याचे बरेचजण मानतात. आपल्या इच्छा अनेक असतात. उदाहरणार्थ, मोठे घर, कार, चांगल्या ठिकाणी फिरायला जाणे, मुलांचे उज्जवल भवितव्य, आरोग्यदायी आणि आरामदायी निवृत्ती आदी. मर्यादित साधनांसह आपली सर्व महत्त्वाची लक्ष्ये साध्य करण्यासाठी लक्ष्यांना प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे. लक्ष्य साध्य करत असताना शक्य झाल्यास इच्छाही पूर्ण करता येतात का ते पहावे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्या लक्ष्यांसाठी प्राधान्यक्रम निश्चित करावा.

- केशव राजपुरे
९६०४२५०००६ 

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...