Wednesday, May 31, 2017

मायकल न्यूमन स्पेलार्ट

प्राध्यापक मायकेल न्यूमन-स्पेलार्ट: एक प्रतिभावान सज्जन शास्त्रज्ञ

माझे पिएचडी चे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक भोसले सरांच्यामुळे १९९८ साली रसायनशास्त्राचे संशोधक प्रा महेश्वर शेरॉन यांच्या आयआयटी मुंबई येथील प्रयोगशाळेत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यादरम्यान फ्रांसच्या सीएनआरएस प्रयोगशाळेतील ख्यातनाम शास्त्रज्ञ प्राध्यापक मायकेल न्यूमन-स्पेलार्ट हेही शेरॉन सरांच्या भारत-फ्रेंच सहकार्य करारांतर्गतील प्रकल्पाचे काम करण्यासाठी तिथे आले होते. माझ्या त्या पदवी सादर करण्याच्या टप्प्यात भोसले सरांनी मला माझा प्रबंध प्रा मायकेल यांचेकडून तपासून घ्यायला सुचवले होते. सुरुवातीला मी जरा भयभीत झालो होतो. नंतर त्यांना सामोरं जायचं आव्हान स्वीकारलं. पण यामुळे मला त्यांच्याबरोबर संशोधन काम करण्याची नामी संधी मिळाली होती. तेव्हा मी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यक्तिमत्वाबरोबर प्रथमच काम करत होतो. मी त्यांच्या सवयी आणि शिस्तबद्ध काम करण्याच्या पद्धतीमुळे फार प्रभावित झालो. सुरुवातीला आम्ही कमी संवाद साधत असू मग ओळख वाढल्यावर बराच वेळ बोलत असू. त्यांनी प्रबंध सादर करण्यापूर्वी मला अनेक उपयुक्त सूचना दिल्या होत्या त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी आहे.. 

ते रसायनशास्त्र विषयातील पदवीधर असून याच विषयात त्यांनी पीएचडी ही पदवी मिळवली आहे. मी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू पाहिले. त्यांच्यासारखा प्रामाणिक,परिपूर्ण आणि प्रतिभावान शास्त्रज्ञ अजून पाहीलेला नाही. त्यांच्याविषयी एकच वाक्य सांगता येईल "थोर नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ जसे व्यक्तीमत्व". इतर शास्त्रज्ञ आणि मायकेल यातील एक मुलभूत फरक म्हणजे त्यांची समांतर संशोधन काम न करण्याची वृत्ती आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता  !  संशोधनात नाविन्यता आणायची सवय आम्हास त्यांनी लावली. त्यांच्या स्वभावातील वैशिष्ट्य म्हणजे संशोधनातील अगदी नगण्य तपशीलालाही ते फार महत्व देतात. संशोधन कामातील दोष लगेच ओळखणे त्यांना का शक्य आहे हे यावरून सहज समजते. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा शास्त्रज्ञ म्हणजे त्याच्या राहणीमानाविषयीच्या आपल्या काही कल्पना असतील. पण त्यांची राहणी अगदी साधी, मर्यादित गरजा, विद्यमान गोष्टीत आनंदी राहण्याची आश्चर्यकारक वृत्ती मला फार भावली .. खरं पाहता मायकेल सरांमुळेच माझ्यात संशोधन संस्कृती विकसित झाली. शिवाजी विद्यापीठातील सध्याचा आमचा संशोधनचा स्तर निव्वळ त्यांचे योगदानामुळेच आहे असे आम्ही मानतो. संशोधनाबरोबर त्यांच्यात खोलवर रुजलेली माणुसकी मला तेव्हा सापडली. मायकल अतिशय विनयशील आणि सभ्य गृहस्थ आहेत.

त्यापुढच्या वर्षी आम्ही कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या एका परिषदेला त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. तेव्हापासून ते शिवाजी विद्यापीठातील आमच्या प्रयोगशाळेस दरवर्षी भेट देत आहेत. सुरुवातीला त्यांनी आमच्या प्रयोगशाळेतील मूलभूत सोयी वाढवण्यावर भर दिला. या भेटींचे फलस्वरूप म्हणजे आम्ही नाविन्यपूर्ण कल्पनावर आधारित नवनवीन प्रकल्प प्रस्ताव तयार केले. आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्य आणि समर्थ मार्गदर्शनाखाली संशोधन प्रशिक्षण घेता आले. अप्रत्यक्षपणे तेव्हा ते नवीन पायाभूत संशोधन सुविधा विकसित करण्यात आमच्या ग्रुपला मदत करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेले आमचे विद्यार्थी आता परदेशातील प्रख्यात प्रयोगशाळात काम करत आहेत. मी शिवाजी विद्यापीठात शिक्षक झाल्यावर मायकेल यांनी आपल्या पॅरिस येथील संस्थेत मला पोस्ट डॉक शिष्यवृत्ती देऊ केली आणि १ सप्टेंबर १९९९ ला रुजू व्हायला सांगितले होते. 

२००० सालापर्यंत पर्यंत आम्ही भौतिकशास्त्र विभागाचे विद्यार्थी एक्सआरडी चे आलेख ट्रेस पेपर वापरून काढत असू.. प्रा मायकेल यांनी एक्सआरडीच्या डेटा फाइल चे रूपांतर आमच्या सोयीच्या स्वरूपात करण्यासाठी एक संगणक प्रोग्राम लिहिला होता. त्यानंतर आम्ही हा सोफ्ट डेटा वापरूनच एक्सआरडी आलेख काढत आहोत. त्यांनी कोणत्याही संगणकीय दस्तऐवजला फाइलनेम देण्यासंदर्भातील मार्गदर्शन मला केले आहे. ते काय नाहीत हा नेहमी एक प्रश्न पडतो: ते सर्वोत्तम रसायनशास्त्रज्ञ आहेत. त्याना भौतिकशास्त्र फार चांगले माहीत आहे. ते एक संगणकतज्ज्ञ आहे. ते सध्या पदार्थविज्ञान क्षेत्रात संशोधन करतात आणि एक महान तत्त्वज्ञ देखील आहेत. मला भेटलेलं महान अष्टपैलू व्यक्तीमत्व !
त्यांनी केवळ आमच्या तरुण पिढीला प्रशिक्षणच दिले नाही तर त्यांच्या फ्रांसमधील प्रयोगशाळेत संशोधन शिष्यवृत्त्या देवून नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. डॉ नानासाहेब गायकवाड, डॉ शिवाजी सादळे, डॉ प्रवीण शिंदे, डॉ संभाजी शिंदे, डॉ सावंता माळी, डॉ रामचंद्र सपकाळ, डॉ महादेव महाडिक, श्री संतोष मोहिते हे आहेत त्यांच्या सानिध्यात घडलेले आमचे काही विद्यार्थी ! नंतर आम्ही त्यांच्या संशोधन संस्थेशी सामज्यस्य करार स्थापन केला. आम्ही काही संशोधन पेपर्स एकत्रित प्रकाशित केले आहेत. आमच्या प्रयोगशाळेत पाणी शुध्दीकरणावर जे काम सुरू आहे त्यामध्ये त्यांचे खूप मोलाचे योगदान आहे. तसं पहायला गेलं तर आमची एकत्रित काही मोजकीच संशोधन प्रकाशने आहेत त्याच मुख्य कारण म्हणजे ते स्वत: शोध निबंधांच्या संख्येपेक्षा गुणवत्तेला जास्त महत्व देतात. त्यामुळे ते क्वचितच संशोधन पेपर लिहितात .. पण ते जेव्हा लिहितात तेव्हा मात्र अगदी अंत:करणापासुन ! कोणताही पेपर लिहायला सुरुवात केल्यापासून संपादकांना सादर करण्यासाठी त्यांना फार वेळ लागतो कारण त्यागोदर ते किमान ५ ते ६ आवृत्त्या तपासतात. सर्व आवृत्त्या संचित करायची मला रुचलेली त्यांची एक महान सवय आहे. आत्तापर्यंत त्यांचे एकूण ७६ शोधनिबंध उत्कृष्ट वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये काही रिव्हिव्ह आर्टीकल चा देखील समावेश आहे. मुख्यत: त्यांचे संशोधन क्षेत्र हे थिन फिल्म्स सेमीकंडक्टर असून ते सध्या प्लानर फोटोइलेक्ट्रोकेमिकल सेल, पि टाईप सेमीकंडक्टर, थ्री डायमेनशनल प्रिंटेड कंडक्टीविटी सेल तसेच फोटोइलेक्ट्रोकटालेसीस या क्षेत्रातही संशोधन करीत आहेत. माइकल यांची आणखी एक उल्लेखनीय सवय म्हणजे ते अजूनही एक विद्यार्थीदशा जगत आहेत. अधिकारपणाची सवय त्यांना कदापी स्पर्श करणार नाही. नाहीतर आमच्या देशात अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारेच अधिक मिळतील. 
ते २५ ते ३१ जानेवारी २०१७ अखेर आमच्या सोबत निमंत्रित अतिथी शास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहेत. मायकेल मुळचे ऑस्ट्रिया देशातील ! त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्याची पत्नी ऑस्ट्रियामध्येच सर्विस करते. सर्विस च्या निम्मित्ताने फ्रांसमध्ये आणि संशोधनाच्या निम्मित्ताने भारतात ! त्यांची ही  भारतभेट नेहमी नि:स्वार्थी हेतूची असते. त्यांच्या शैक्षणिक भेटीचे आम्ही मात्र पूर्णपणे लाभार्थी आहोत. सर नेहमी आम्हाला प्रोत्साहन, समर्थन आणि लाख मोलाचे मार्गदर्शन देत आहात आम्ही आपले सदैव ऋणी आहोत. दरवर्षीच्या त्यांच्या इथल्या वास्त्याव्यातील २ आठवडे म्हणजे आमच्या ग्रुपसाठी फार मोठा कृपाशीर्वाद असतो.

____________________________________________

Professor Michael Neumann-Spallart: a talented gentleman scientist

Due to my esteemed professor CH Bhosale, I had an opportunity to work in the Prof. Maheshwar Sharon's laboratory in chemistry department at IIT Mumbai in 1998. Professor Michael Neumann-Spallart, from CNRS France, was there in Sharon's laboratory to work on the Indo-French project. As I was in the PhD submission phase then, Prof Bhosale suggested me to get checked my thesis from Prof. Michael. In the beginning I was a bit afraid. Then I accepted the challenge to go and face this towering personality. But I had this opportunity to work with such a renowned researcher then. It was first time for me to work with the internationally known personality. I was very much impressed with his work habits and sincerity. Initially, we talked a little and then for a long after increased recognition. He had many helpful suggestions about what I presented in thesis and I am very much indebted to him forever ..

He is a graduate in chemistry and has gained the title of PhD in the same subject. I saw various aspects of his personality. I have not yet seen honest, perfect and talented scientist like him. In one sentence, "He is been the great personality like laureate". A fundamental difference between other scientists and Michael is the ability to think and his innovative attitude! He created a habit in us to bring innovation in research. He never neglects even minute details in research, which helps him detect the errors immediately. You may mistake him for his international scientist’s class. He prefers simple life, his modest needs and his happiness in existing things is most appreciable. In fact, I had developed a culture of research from Michael. We believe that our current research level at the Shivaji University is his net contributions. In addition to his research approach, I found deeply rooted humanity in him. Michael is very polite and gentleman.

In 1999 we invited him as the chief guest at a conference held at Shivaji University Kolhapur. Since then, every year he is visiting our laboratory without a break. Initially, he stressed on increasing the basic facilities in our lab. His encouragement and support helped us to write the research project proposals on innovative ideas. Our students are able to get appropriate training and intelligent guidance from him. Then he was indirectly helping our group to develop new research infrastructure facilities. Our students trained under him are now working in the renowned overseas laboratories. After becoming teacher at Shivaji University, I was offered post doc scholarship to work at his institute in Paris by Michael and the date of joining was 1 September 1999. Due to some technical reasons I could not en-cash the opportunity. So my fellow researchers recommended by Prof Bhosale took this scholarship. Now I am waiting for such new offer.

Until 2000, the research students of physics department were using tracing technique to draw XRD graphs. Prof. Michael had written a computer program to convert the XRD data file into the convenient format. Since then everybody using the soft data for graphing the XRD plots. He suggested us to use standard graph plotting software for graphs based on research work. I remember he has guided me in regards with any computer document filename. This is always a question what he is: he is the best Chemist. He knows Physics very well. He is a Computer expert. He is been a great philosopher and his current research is in the field of Materials Science. Great all-round personality, I ever met !

He not only trained our students for doing good quality research but created platform for them to work at his laboratory also in France under research scholarships. Dr. Nanasaheb Gaikwad, Dr Shivaji Sadale, Dr. Pravin Shinde, Dr. Sambhaji Shinde, Dr. Sawant Mail, Dr. Ramchandra Sapkal, Dr. Mahadev Mahadik, Shri Santosh Mohite are some fellow students who got benefited from him. Further tie up between Shivaji university and his research organizations was established. We have published few collaborative research papers. The work on water purification being carried out in our laboratory is mostly due to his valuable contribution. As he gives more importance to quality than the quantity, there are modest number of publications to his credit. He rarely writes research paper.. But when he writes, he writes honestly and painstakingly! It takes him a long time to submit any paper to editors since before that he checks at least 5 to 6 versions. He has a great habit of storing each a every version of the research paper. So far a total of 76 excellent papers were published in prominent international journals. It also includes few review articles. He works in the research area of semiconductor thin films. But presently in addition, he has created an interest in planner photoelectrochemical cells, p type semiconductors, 3D printed conductivity cells and photoelectrocatalysis research fields. And a remarkable habit of Michael is that still he lives student’s life. Authority habit will not touch him at all. 

He is working as an invited scientist with us during 25 to 31 January 2017. Michael originally belongs to Austria country! He has a son and a daughter. His wife serves in Austria. He is in France for the sake of service and he comes India for doing research ! His visit to our laboratory is always free of selfish motives. However, we are his full academic beneficiary. He always provides valuable guidance to encourage us and we are grateful for his support a million times. We are always blessed to have his yearly 2 weeks of stay here.

Saturday, May 6, 2017

सुखाची व्याख्या

हे माझे प्रवास वर्णन आणि त्या अनुषंगाने आलेले मनातील विचार दिनांक १५.०५.२०१७ रोजी माझ्या मूळगावाहून येतानाचे आहेत.

अलिकडेच माझ्या मुळगावी बावधनला गेलो होतो. एका दिवसाची धावती भेट होती. संध्याकाळी कोल्हापूरला परत येत असताना पाचवड मध्ये एका आराम बस मध्ये बसलो. माझ्या बरोबर १५ ते २० वयोगटातील आठ ते दहा तरुणही चढले. योगायोगाने त्यांनाही कोल्हापुरलाच यायचे होते. अंगात टी शर्ट, स्पोर्ट ची विजार, स्पोर्ट शूज व पाठीवर पिशवी ! त्यांच्या पेहराव्यावरून व चर्चेवरून कदाचित ते लष्करातील मुलाखती साठी जात असावेत हे लक्षात आले. या मुलाखाती विद्यापीठाच्या आवारातच असल्याने माझ्या लक्षात आले कि आम्हाला एकाच परिसरात जायचे आहे. कारण गेले २ आठवडे झाले सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्यातील उमेदवारांच्या तालुकावार मुलाखती होत आहेत हे मी पहात होतो. माझ्या हेही लक्षात आले की कदाचित आज सातारा जिल्यातील वाई किंवा जावली तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखतीची तारीख असावी.

बस वाहक त्याना गाडीच्या पाठीमागच्या सिट वर बसवून पुढे केबीन मध्ये गेला. थोड्या वेळाने जरा अंदाज आल्यावर या घोळक्याने आपापसात गमंत करायला सुरुवात केली. त्यामध्ये अगदी टारगट भाषेत टीप्पणी हे तर आलेच. तरी बरं हे सगळे एका गावाची नव्हती ! एकूणच, त्यांचे हे प्रकार एक प्राध्यापक म्हणून मला अजिबात रुचले नाहीत. थोडा अस्वस्थ झालोही. पण काय करणार ? या पिढीला जरा बोललं तर ते आऊ चा बाऊ करून गोंधळ घालतील हि भीती. तसेच हा प्रकार सार्वजनिक ठिकाणी चालू होता, माझ्या नोकरीच्या ठिकाणी नव्हता. बरं हा प्रकार एव्हढ्या मोठ्याने चालला होता कि कुणीही सुजाण अस्वस्थ होईलच. टारगट मुलांच्या धिंगाण्यामुळे इतर प्रवासीही वैतागले. काही तरुणी व महिलाही आमच्याबरोबर प्रवास करत होत्या. विशेष म्हणजे त्याना कुणाचेच भय वाटत नव्हते. त्यात आराम बस राजस्थान परवान्याची त्यामुळे महाराष्ट्रात ते कशाला पंगा घेतील. ते अगदी गप गुमान !  वाटलं, हि पुढं लष्करात जावून काय देशसेवा करणार ? मनाशी म्हंटलं असू देत कि २ तासांचा तर प्रश्न आहे.

या वेळी थोडा शांत विचार केला व म्हंटलं आपणही या मुलांच्या वयाच्या टप्प्यातून कधीतरी गेलो आहेच की ! मला यांचं हे वागणं का पटत नाही ? हे वागतायत ते बरोबर की चूक. आठवलं तो माझ्या कॉलेज जीवनातील असाच एक प्रसंग !

मी तेव्हा लोणंद महाविद्यालयात द्वितीय (१९९०) वर्षात असावा. तेव्हा मी खंडाळ्याहून महाविद्यालयात ये जा करी. सकाळची खंडाळा ते लोणंद ही बस आम्हा कॉलेज तरुणांनी भरायची.  बस मध्ये आमच्या संचातील ८ ते १० मित्र मंडळी जवळजवळच्या ३ -४ बाकड्यावर बसलो होतो. सर्वजण विनोद, चुटकुले सांगण्यात रममाण झालो होतो. आम्हाला आमच्या आसपास कोण बसले आहे याचेही भान नव्हते. अगदी दिलखुलास गप्पा व विनोद सांगणं चालू होतं. टाळया, हश्या, दाद, हे इकत्र चालू होतं. अगदी हुबेहूब वर सांगितलेल्या मुलाखाती द्यायला निघालेल्या तरुणाप्रमाण ! अगदी देहभान विसरून हा प्रकार चालला होता.  आमच्याबरोबर प्रवास करणाऱ्या इतर प्रवाश्यांची पर्वा ती का करावी अशी अवस्था ! आम्ही काहीच चूक करतं नाही ही भावना ! जीवनाच्या प्रत्येक अमूल्य क्षणांचा मनसोक्त उपभोग घेणं चालू होतं ! आता जरी ते प्रसंग आठवले तर अंगावर शहारे येतात. तेवढ्यात एक वयोवृध्द गृहस्थ आमच्याजवळ आले व आम्हाला म्हंटले- पोरांनू जरा हळू ... .... .... मला विचारले - मला ओळखलं का ? माझ्या परिचयाचे हे आजोबा मला का आठवत नव्हते हे समजेना... ..... .... ते म्हणाले - बरं असू देत, काय म्हणतय तुझं शिक्षण ? दहावीला पहिला आल्यावर आम्ही बैलगाडीत मिरवणूक काढून तुझा सत्कार केला हुता तवापास्न आत्ताच तुला बघतुया... दादाच बरं चाललयं ना ? - मग मात्र मी खजील झालो, चेहरा रडवेला झाला ... आपण त्याना त्रास होईल एव्हढा दंगा करायला नको होता, किंवा मौज करायची ती जागा योग्य नव्हती....  गप्प झालो, त्यांच्या पाया पडलो ...... ..... .... सगळे मित्र माझी टर उडवायला लागली ... ...  अरे काय मनावर घेतो आहेस.... सोडून दे.... मी मात्र सोडून द्यायला तयार नव्हतो... आनद लुटायला पाहिजे पण आपण कुठे काय करतोय याच भान नक्कीच पाहिजे...

कदाचित बस मध्ये आम्ही व मुलाखाती द्यायला चाललेले हे तरुण सुखाचा पूर्ण आस्वाद घेत होतो. हे व असे अनेक प्रसंग असतात कि ज्यातून आपण अगदी देहभान विसरून मनमुराद आनंद लुटत असतो. काय ते जीवन होते. आता आठवलं तरी हेवा वाटतो त्या क्षणांचा ! ताण तणाव विरहीत आयुष्य म्हणजे तरी वेगळं काय असू शकतं. त्यांच्या चेहऱ्यावर दडपण वा इतरांची भीती या कशाचाही लवलेश दिसत नव्हता. मौज मजा म्हणजेच जीवन हे जणू त्यांचा वर्तमान वाटत होता ! हळूहळू मला त्यांच्या सर्व हालचाली हव्याहव्याश्या वाटू लागल्या. क्षणभर असही वाटलं कि आपणही त्यांच्यासोबत दंगा मस्ती करावी. किंचाळाव, मजा करावी !  पण लगेच भानावर आलो, मी शिक्षक, मी हे करू शकत नाही किंबहुना करू नये. का करू नये हा प्रश्न वेगळा आहे. काही वेळापुर्वी ज्यांचा राग आला होता, हेवा वाटायला लागला त्यांचा ! का कुणास ठाऊक मनात कुठतरी आपणही थोड्या वेळासाठी लहान व्हावं वाटलं. क्षणभर आपला संसार, जबाबदाऱ्या, पद, प्रतिष्ठा या सर्व गोष्ठी बाजूला ठेवून मुक्तपणे स्वताला व्यक्त करावं असं वाटलं. पंचेचाळीशीत हे करूशी वाटणं म्हणजेच आपल्याला काही गोष्ठीतून दररोज थोडा वेळ तरी मुक्तता हवी. पण १९९० चा बस मधील प्रकार आठवला व गप्प बसलो ... राहिलं ....

आजकाल -सुख म्हणजे नक्की काय? - हा प्रश्न मला सारखा पडतोय. प्रत्येकाची सुखाची व्याख्या निराळी असते. पण कधी कधी मनाला होणारा मनमुराद आनंद म्हणजेच सुख का? माझ्या मते आपल्याला जे करण्याची अगदी आतून ओढ असते ते करण्याची इच्छा निर्माण होणं म्हणजे सुख !  मनाला समाधान मिळण्याला सुख म्हणत असावेत. एखादं आवडीचं गाणं ऐकलं की मन प्रफुल्लित होतं, मनाला बरं वाटतं. एखादा छान चित्रपट पाहिला की समाधान वाटतं. एखादं चांगलं पुस्तक वाचलं की समृद्ध वाटतं. एखादी परीक्षा उत्तीर्ण झालो की मनाला उभारी येते. कुणाशी छान गप्पा मारल्या की एक नवी ऊर्जा मिळते. आणि अशाच घटनांच्या शृंखलेतून आनंद मिळत जातो. ज्या क्षणाला असा आनंद मिळतो, तो क्षण खरा सुखाचा धनी! तो क्षण आपला. अशा क्षणांची मालिका तयार करण्याची क्षमता मिळवणं म्हणजे सुखाची तयारी करणं असं मला वाटतं. आणि अशा ऊर्जाक्षणांमध्ये चिंब भिजणं म्हणजे सुख असावं.

शेवटी न रहावून एका उमेदवाराला बोलावले व विचारले - तुम्ही कोल्हापूरला सैनिक मुलाखती साठी तर जात नाही ना ? तो हो म्हणाला... त्याने मला विचारले आम्हाला सांगाल का कसे विद्यापीठापर्यंत जायचे.  मग त्याला मुलाखत तळापर्यंत कसे जायचे हे मी शांतपणे सांगितले. त्याने माझे आभार मानले.. मला म्हणाला तुम्ही सातारा जिल्यातील अन इकडे नोकरी कशी ? त्याला काय सांगणार ही मिळवण्यासाठी काय करावे लागले ते, अन आता बदली... शक्य नाही.. तेवढ्यात दुसरा उमेदवार म्हणाला - काका आमची बडबड जरा जास्त च झाली का ? आम्ही दंगा करायला नको होता का ? मी त्याला एव्हढच म्हणालो - अरे, आजपासून ४-५ वर्षानंतर तुम्ही जर एकत्र आला तर अशी मोज मजा कराल का? तो "नाही" - म्हणाला.

या प्रसंगातून घडणाऱ्या घटना तितक्या महत्वाच्या नसून तुम्ही त्या घटनांकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघता, कोणत्या नजरेतून पाहता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. यातून आपल्याला हि शिकवण मिळते, की आपणदेखील आपल्याबाबतीत घडणारी प्रत्येक लहान मोठी घटना ज्ञानाच्या प्रकाशात पहावी, महादृष्टीने पाहावी.

- केशव यशवंत राजपुरे
९६०४२५०००६

Friday, April 14, 2017

कमी लेखू नका

कुणालाही कमी लेखू नका .. मोठे व्हाल ..
(प्रा. केशव राजपुरे)

आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारची माणसे आपण पहातो. त्यात काही सुस्वभावी, तत्पर, समयसूचक, वक्तशीर, प्रामाणिक, मनमिळावू, मितभाषी, सत्यवचनी, स्पष्टोक्ती, विश्वासू, इमानी तसेच मोकळ्या मनाची मंडळी बघतो. काही माणसे उपजतच कद्रू असतात. त्यांना मोकळ्या आणि 'मोठ्या' मनाने जगता येत​​ नाही की मनमोकळे वागता येत नाही. या भाऊगर्दीत थोडेशे ताठ, चंचल आणि गंभीर स्वभाव असलेले काहीजण अनुभवायला मिळतात. याबाबतीत कदाचित मी चूकत असेन पण माझं निरीक्षण मात्र नक्कीच चुकीचं नसावं ......

आम्ही लहान असताना अभिनेते मिथून दा आमचे सर्वाचे आदर्श नायक असावेत.. बऱ्याचदा आम्ही कुणालातरी  वार्षिक स्नेहसंमेलनावेळी 'दोन हाणा पण मिथून म्हणा' असे शेले पागोटे टाकत असू.... माझ्या जिज्ञासू मनाने अगदी  तेव्हापासून अशा 'क्षमतेने कमी पण क्षमतावान दाखवणारे' खास आणि वेगळया प्रकारच्या व्यक्तींना पारखायला सुरुवात केली असावी. यांना फुकटचा 'मोठेपणा' हवा असतो. समोरच्याने महत्व दिले नाही की यांना अपमानीत व्हायला होतं. फारच गर्विष्ठ असतात हे म्हणे. समोरच्याच्या बोलण्या वागण्याचा सोयीस्कर अर्थ लावण्यात आणि त्यामुळे त्रागा करण्यात अगदी तरबेज. आपण नेहमी अशा दुराचारीना टाळू इच्छित असतो पण दुर्दैवाने अशांचा संपर्क आलाच तर अस्वस्थ व्हायला होत. येथे मी अशा व्यक्तीबद्दल माझी काही निरिक्षणे देत आहे. यामुळे आपणास त्यांच्यापासून दूर राहायला मदत होईल.

त्यांच्या मते समृद्धता ही राहणीमान, मालकीचे वाहन, कपडे, शूज, जेवत असलेले हॉटेल, वापरत असलेल्या गोष्टीच्या मानकाच्या दृष्टीने करावी.  इतर लोकांची गुणवत्ता ठरवण्याची त्यांची स्वत:ची काही मानके आहेत. त्यांच्या दृष्टीने दुसरे म्हणजे कवडीमोल ! कदाचित त्यांच्या हातात असते तर त्यांनी जगातील सर्व माणसांचे मुल्यांकन करण्याची एखादी एजन्सीच काढली असती. त्यांच्या मते एखादा अधिकारी त्यांना मिळालेल्या अधिकारांच्या योग्यतेचा नसतो.  समोरच्याच्या जागेवर त्याच्यापेक्षा आपण कसे योग्य आहोत हे मानण्यात धन्यता आणि मनाची समजूत काढून मोकळे.. जसं म्हंटलं जातं की 'ज्यांनी आपला संघर्ष पाहिला आहे त्यांनाच तुमच्या यशाची किंमत कळते, बाकीच्यांच्यासाठी तुम्ही एक भाग्यवान व्यक्ती असता'. तसं अशा स्वप्न कोंबड्यांना तुमच्या यशाची किंमत का असावी ?

त्यांच्या मते त्यांना सर्व काही माहीत असते, किंबहुना प्रत्येक विषयाचे ते ज्ञानी असतात. जर त्याना चुकून चाहूल लागलीच की एखाद्या विषयात आपण कमजोर आहोत तर त्या विषयातील ज्ञानी लोकांशी सुरुवातीला लगट करतील आणि एकदा अंदाज आल्यावर त्या माणसाच्या कमकुवत मुद्याची माहिती घेवून त्याला काय येते यापेक्षा काय येत नाही या विषयावर मित्रांत चर्चा करून मनाची तहान भागवून घेतील.

या लोकांच्या अपेक्षा फार ! हे असंचं व्हायला हवं. फार महत्वाकांक्षी असतात हे. त्यांच्या इच्छा-आकांक्षा मध्ये जर अडसर आलाच तर लगेच क्रोधीत व्हायचं. 'असं का म्हणायचं त्यांनी', 'असं त्यांनी म्हणायला नाही पाहिजे' -ह्या यांच्या एखाद्याच्या वाक्यांवर प्रतिक्रिया. यांचं नेहमी खरं असतं - कारण त्यांच्या मते ते कधी चुकत नाहीत. मग चूक नसेल तर माफी तरी मागणार कशी ? का मागायची, जर मागितली तर त्यांचा अपमान

त्यांना डिवचलेल्या 'एखाद्याला डोक्यात ठेवायचं' एव्हढचं फक्त त्यांच्या डोक्यात. अशांचा कधी एकदा बदला घेतोय असं होतं त्यांना.. त्याला विरोधास विरोध हे ओघानं आलं.. मग त्याला खुन्नस द्यायची... कुणाकडून तरी त्याला 'सांगायची' पद्धत अवलंबायची. 'बोलल्यावर'- मग कसा गप्प बसला ? असं बोलून स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची. जर चुकून यात एखादी गोष्ट अंगलट आलीच तर कशाचीतरी कुबडी सोबत ठरलेली. कुणी 'मोठं' म्हंटलं म्हणून कुणी मोठं होतं नसतं - 'मोठेपणा हा अंगी असायला हवा', अर्थात खरा मोठेपणा अंगच्या गुणांवर व कर्तुत्वामध्ये असतो. नम्रतेतून येणारा मोठेपणा दुर्मिळ झालाय..

अशी मंडळी कायम एक-एकटी असतात, त्यांचे मित्र फार कमी, शत्रूच जास्त... लाजाळूपणा, 'लेप्ट आउट' फिलिंग, कायमची अस्वस्थता, मनात अकल्पित भीती, लयास गेलेला आत्मविश्वास, धैर्याचा अभाव, स्वयंसुरक्षेसाठी देवाचा धावा हे नेहमी त्यांच्या वाट्याला आलेलं दिसतं. या मंडळीना 'दु:खी जादा सुखी कम' असेच पाहू शकता. या दु:खीपणाचे कारण ही काय असावे, ठाऊक आहे ? 'इच्छा'! इच्छेविरूद्ध काही झालं किंवा त्यात अडसर आला की यांना क्रोधीत व्हायला होतं. इच्छा पूर्ण झाली की आनंदीत आणि अपूर्ण राहीली की दु:खी ! हे गणित झालेलं दिसतयं बिच्याऱ्यांच्या आयुष्याचं. यांच्या क्रोधाची दुसरीही कारणं असू शकतात; ज्यामध्ये जिद्द, हिंसा, अहंकार, भय, चुगली, वैर, ईर्षा, घृणा आणि उपेक्षा. असू देत ना काहीही.. पण ह्याच आपल्याला निदान झालं म्हणजे सुखी आयुष्याची वाट सापडायला मदत होईल. या सर्वावर शांततेने विजय मिळवायला हवा.. असं करणं म्हणजे स्वत:ला शिक्षा देण्यासारखं आहे. म्हणूनच सांगतो 'कुणालाही कमी लेखू नका .. मोठे व्हाल' ..

@ Keshav

Thursday, January 26, 2017

सुंदर माझं गाव

सुंदर माझं गाव

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी म्हटले होते की, खरा भारत हा खेड्यात राहतो. सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील बावधन हे राजकीय आणि सामाजिकदृष्टया प्रतिष्ठेचे गाव ! या गावच्या पोटातील अनेक वाड्या वस्त्यामुळे हे तसे विभागातील मध्यवर्ती ठिकाण ! या अशा वाड्यापैकी सह्याद्रिच्या कुशीत वसलेले एक टुमदार आणि सर्वगुण संपन्न खेडे म्हणजे अनपटवाडी ! कुणाचीही दृष्ट लागण्यायोग्य गाव ! नैसर्गिक देणगीबरोबरच अलीकडे गावाने सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीने स्वत:च्या सौदर्यात भर टाकली आहे.

समर्थ रामदास स्वामिनी सज्जनगडावर असताना समाजाला संघटित तसेच शक्तिसंपन्न बनवण्याच्या हेतूने वेगवेगळ्या गांवी जावून सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी शेकडो मारुती मंदिरांची स्थापना केली. अनपटवाडीत असलेले मारुती मंदीर हेही तेव्हा स्थापन झाले ही आख्याईका आहे. याचा अर्थ या गावची निर्मिती जवळ जवळ ३५० वर्षांपूर्वी झाली असावी असा अंदाज करता येईल. सुरुवातीला आठ ते दहा कुटुंबानी एकत्र राहून तयार केलेली वस्ती आता खूप विस्तारीत झालेली दिसते. गावची रचना ही अगदी विशिष्ट पद्धतीची आहे. मध्यभागी मारुतीचे मंदीर, खालची, वरची आणि मधली आळी ! गावात सुरुवातीला सहा वाडे- तटबंधी असलेली घरे - असावेत. वाड्याच्या आतील रचना भारतीय वास्तुशास्त्रावर आधारित आहे. वाड्याच्या मध्यभागी भरपूर सूर्यप्रकाश व शुद्ध हवा यासाठी खुला चौक, चपट्या विटा व चिरेबंद घडीव दगडातील भक्कम बांधकाम, चहुबाजूनी तटबंदी, टेहळणी बुरुज आहेत. यामुळे या वाड्यांत काही मराठी दूरदर्शन मालिकांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

सध्या गावामध्ये अनपट, मांढरे, घाडगे, गोळे, राजपुरे, व सुतार यांची जवळजवळ १०० कुटुंबे आहेत तर गावाचे लोकसंख्या अंदाजे ५०० असावी. बावधन पंचक्रोशीतील अंदाजे ४०० एकर क्षेत्र या गावाकडे वहीवाटीस आहे. अनपटवाडी हे तुलनात्मक दृष्टीने पाहता पंचक्रोशीतील सुशिक्षित तसेच सुसंकृत मंडळींचे गाव म्हणायला काहीच हरकत नसावी. घराघरातून इंजीनियर, डॉक्टर, सिए, अधिकारी, वकील, शिक्षक तसेच व्यावसाईक निर्माण झाले आहेत. नवीन पिढी देखील त्यांच्यातील उत्कृष्टता साध्य करण्यात गुंतलेली आहेत. पालकांकडून प्रेरणा घेऊन ते उत्कृष्टता राखण्यासाठी त्यांच्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत. इथल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खेळात देखील आपले नैपुण्य राज्य तसेच देश पातळीवर सिद्ध केले आहे.

गावची 'एकी' ही वैशिष्ट्यपूर्ण पण महत्वाची बाब या गावाकडून शिकण्यासारखी आहे. १९७५ सालापासून अनपटवाडी गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाली आहे. गेल्या ४० वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासात निवडणुकीवरून किंवा इतर कोणत्याही कारणास्तव गावात कधीही पराकोटीचे तंटे बघायला मिळाले नाहीत. सर्व जेष्ठ नागरिक आपली गावाविषयीची जबाबदार तसेच सक्रिय भूमिका निभावत आहेत. गेल्या चार ग्रामापंचायात निवडणुका बिनविरोध करून गावाने सर्वांसाठी एकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. याअगोदर च्या पंचवार्षिक निवडणुकीत गावाने सर्व स्त्री सदस्य निवडून देवून स्त्री-पुरुष समानतेची एक वेगळी वाट पाडली आहे. या गावातून शिक्षण घेवून बहुतांशी लोक इतर मोठ्या शहरात सेवा करत आहेत.

सामाजिक बांधीलकी आणि ग्रामविकासाची तळमळ उराशी बाळगून या 'एकी' जपणाऱ्या चाकरमान्यांनी एकत्र येवून १९९८ साली श्री ग्रामविकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) या सामाजिक संस्थेची निर्मिती केली आहे. हि संस्था समाजातील होतकरू, सामाजिकदृष्ट्या संवेदनशील, तसेच शैक्षणिक, सांकृतिक, कला, क्रीडा या क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करून आपल्या पंचक्रोशीचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणीजनांचा सन्मान करते. या 'एकी' तूनच चार वर्षांपूर्वी या संस्थेच्या मदतीच्या जोरावर गावातील श्री वाकडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार तसेच पुनर्निर्माणाचे काम यशस्वीपणे झालेले दिसते.  याबरोबरच गावातील इतर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम देखील या संस्थेच्या पुढाकारातून झाले आहे. सन २००९ साली गाव निर्मल ग्राम म्हणून घोषीत करण्यात आले आहे. हे गाव स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही आहे. तसेच गावात सरकारी योजनेमधुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्वाची पोहोच पावती म्हणजे गावच्या सरपंचांना २००५ साली राष्ट्रपतींच्या हस्ते 'आदर्श सरपंच' पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा या गावाच्या इतिहासातील सर्वात अभिमानाचा क्षण आहे.

गावाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील त्यापैकी काही: गावात मुलगी जन्मल्यास येथे प्राधान्याने तिचे जतन आणि वाढ करण्यावर भर दिला जा​​तोय. यासाठी त्या बालिकेच्या नावावर काही निश्चित पैसे ठेव रक्कम जमा केली जाते. येथे महिलांना प्रतिष्ठित तसेच सन्मानाची वागणूक दिली जाते. इथे जवळ जवळ सर्वांचे वाढदिवस साजरे केले जातात किमान शुभेच्छा दिल्या जातात. सर्वजण गावकऱ्यांच्या सुख-दुख:त मनपूर्वक सहभागी होताना दिसतात. गावात 'एक गाव एक गणपती' सारखे लक्षवेधी उपक्रम सदैव चालू आहेत. अतिशय मनोभावे नवरात्री उत्सव साजरा केला जातो. गावातील कोणत्याही कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप होवू दिला जात नाही. वारंवार घेतले जाणारे वृक्षारोपण तसेच रक्तदान शिबिरासारखे उपक्रम आता नेहमीचे झाले आहेत.

हे गाव जरी डोंगर दऱ्यात वसले असले तरी या गावचे साक्षरतेचे प्रमाण फार मोठे आहे. गावात  जिल्हा परिषदेची दर्जेदार प्राथमिक शाळा असून येथे इयत्ता ४ थी पर्यंत शिक्षण मिळते. या गावच्या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. गावची शाळा हे गावचे एक वैशिष्ट आहे. या शाळेस 'आदर्श शिक्षक' पुरस्कार विजेते शिक्षक लाभाले हे गावचे भाग्य. शाळेस अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल 'आदर्श शाळा' पुरस्कार तसेच गुणवत्ता धारणेचे 'आयएसओ' मानांकन देखील मिळाले आहे. या गावच्या मुलभूत विकासात शाळेचा मोलाचा वाटा आहे. कुणाला जर आपल्या मनातलं  निसर्गरम्य खेडेगाव शोधायचं असेल तर त्यांनी बावधनच्या नैऋत्येस अडीच किलोमीटर वर असलेल्या अनपटवाडीची निवड करावी.

डॉ केशव राजपुरे   

Monday, March 21, 2016

बावधन ची परंपरागत बगाड यात्रा



छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील वाईच्या दक्षिणेला वसलेले बावधन गाव, 'दक्षिणकाशी' म्हणून प्रसिद्ध आहे. या गावाला एक आगळं-वेगळं पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे, ते म्हणजे इथल्या बगाड यात्रेमुळे! बावधनकरांना या बगाड यात्रेचा प्रचंड अभिमान आहे. या यात्रेची माहिती देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

पेशवेकाळापासून पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली बावधनची 'बगाड' यात्रा, यावर्षी (२०२५) १८-१९-२० मार्च दरम्यान साजरी होत आहे. या यात्रेची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:

‘काशिनाथाचं चांगभलं’च्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या सुमधुर गजरात भैरवनाथाची बगाड यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पार पडेल. फाल्गुन वद्य पंचमीला (रंगपंचमी) होणाऱ्या या यात्रेच्या निमित्ताने विविध समाजातील, जाती-जमातींतील लोक आणि आप्तेष्ट एकत्र येतात. बगाडासारख्या उत्सवात गावकरी मतभेद विसरून आनंदाच्या रंगात रंगून जातात. म्हणूनच, नाथांच्या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत या यात्रेने मानाचा तुरा रोवला आहे.

या उत्सवादरम्यान गावकरी आणि भाविकांमध्ये उत्साहाचं चैतन्य संचारलेलं असतं. सुमारे एक लाखाहून अधिक भाविक बगाड यात्रेला हजेरी लावतात. ज्यांची नवसपूर्ती झाली आहे, अशा पंचक्रोशीतील 'बगाड्या'ची निवड होळी पौर्णिमेच्या दिवशी केली जाते. फाल्गुन वद्य चतुर्थी, पंचमी आणि षष्ठीला यात्रेला सुरुवात होत असली, तरी खरी रंगत होळी पौर्णिमेपासूनच चढते. 'बगाड्या'ची निवड करण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक होळी पौर्णिमेला भैरवनाथाच्या मंदिरात एकत्र येतात. रात्री बारा वाजता विधिवत पूजा करून, नवस केलेल्या व्यक्तींच्या नावे देवापुढे पुजारी कौल लावतात. ज्या व्यक्तीला उजवा कौल मिळतो, त्याला 'बगाड्या'चा मान मिळाला, असं जाहीर केलं जातं. बगाड्याला उजवा कौल मिळाल्यावर, 'काशिनाथाचं चांगभलं'च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून जातो. या गजरातील ऊर्जा बावधनकरांना चांगलीच ठाऊक आहे. ताणमुक्त होण्यासाठी आणि मानसिक बळ मिळवण्यासाठी बगाड्या आपल्या भाऊबंद आणि मित्रपरिवारासोबत नाथसाहेबांच्या गजरात मंदिराला पाच प्रदक्षिणा घालतो. भाऊबंद, गावकरी आणि मित्रमंडळी एकजुटीने गजर करत बगाड्याला आधार आणि पाठबळ देतात.

होळी पौर्णिमेपासून बगाडापर्यंत, बगाड्याला मंदिरातच मुक्काम करावा लागतो. या काळात त्याला केवळ फलाहार करण्याची परवानगी असते. यामागे शास्त्रीय कारण आहे. बगाड्याची पचनशक्ती वाढावी आणि काही बिघाड होऊ नये, म्हणून हलका आहार देऊन काळजी घेतली जाते. बगाड्याने होळी पौर्णिमेपासून काही धार्मिक संकेत काटेकोरपणे पाळणे आवश्यक असते. मंदिराचे आणि देवाचे पावित्र्य, तसेच बगाड्याचा शुचिर्भूतपणा यांना विशेष महत्त्व असते. हे संकेत अत्यंत निष्ठेने पाळले जातात. "काशीनाथाचे चांगभले!" हा 'नाथासाहेबांच्या कृपेने भक्तांचे भले होवो' या अर्थाचा गजर आहे. काशीहून आलेले नाथ म्हणजे काशिनाथ (भैरवनाथ)! आता हा गजर बावधन पंचक्रोशीचाच पारंपरिक गजर बनला आहे. हा गजर ऐकताच कोणत्याही बावधनकराच्या अंगावर रोमांच उभे राहतात. हा गजर आक्रमकता आणि एकतेचे प्रतीक मानला जातो. बावधनकर याचा वापर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, सामूहिक कामे करताना, स्वतःला प्रेरित करण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी आणि सण-उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात करतात.

पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंतच्या रात्री बगाड्यासाठी खास असतात. या काळात देवपूजा आणि आरोग्यदायी व्यायामासाठी वेळ काढला जातो. जवळपास ५०० भाविक एकत्र येऊन, रात्री एक वाजता अनवाणी पायांनी या परंपरेत सहभागी होतात. हे सर्वजण बगाड्याला सोबत घेऊन गावाच्या ईशान्य दिशेला तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णा नदीच्या वाकेश्वर घाटावर दररोज जातात. तिथे कृष्णा नदीत स्नान करून वाकेश्वराचे दर्शन घेतात आणि पाणी अर्पण करतात. परत येताना बगाड्या खांद्यावर कृष्णा नदीच्या पाण्याची कळशी घेऊन येतो. मग गावातील नंदी, पाचीदेवळ येथील भैरवनाथाचे मूळ स्थान, सुंदराबाई, दत्त, लक्ष्मीआई, भैरवनाथ, भवानी माता, मारुती, जोतिबा, मोरोबा, श्रीराम आणि जननी आई यांसारख्या विविध मंदिरांना भेट देऊन देवांना पाणी अर्पण केले जाते. जननी आईची आरती झाल्यावर, सर्वजण बगाड्याच्या घरी जातात, जिथे देव्हाऱ्यातील देवतांची पूजा होते. पहाटे पाचच्या आत बगाड्या भैरवनाथाच्या मंदिरात परत येतो, आणि सर्व विधी पूर्ण होतात.

अनवाणी चालण्याच्या प्रथेला शास्त्रीय आधार आहे. यामुळे पायांना अॅक्यूपंक्चरचा विशेष व्यायाम मिळतो, आणि बगाडाच्या दिवशी त्रास होत नाही. पाणी भरलेली कळशी खांद्यावर घेऊन चालल्याने भाविकांचा खास व्यायाम होतो, जो बगाडाच्या दिवशी शिड घट्ट धरण्यासाठी आवश्यक असतो. 'देवाचं बगाड घेणं' ही पूर्णपणे स्व-इच्छेने केली जाणारी गोष्ट आहे, ज्यात कोणावरही जबरदस्ती नसते. परंतु एकदा बगाड घ्यायचं ठरवलं, की घालून दिलेले आणि पूर्वापार चालत आलेले नियम आणि परंपरा पाळाव्याच लागतात.

बगाड म्हणजे दगडी चाके असणारा एक खास लाकडी रथ. या रथाची रचना विशिष्ट पद्धतीची असते, ज्यामुळे तो एक आकर्षक कलाकृती बनतो. या रथासाठी वापरले जाणारे साहित्य म्हणजे लाकडी कणा, कुण्या, दोन घडीव दगडी चाके, दांड्या, बैलांना जुंपण्यासाठी जोते किंवा जू, जुंपण्या, मध्यभागी आडवे खाच असलेले चौकोनी लाकूड (वाघला), मध्यभागी उभा खांब (खांबला), बाहुली, शीड, पिळकावण्या, वाकापासून तयार केलेली चऱ्हाटे (जाड दोरखंड), आणि बैलांना जुंपण्यासाठी शिवळा इत्यादी. या संपूर्ण बगाडाच्या रचनेत लोखंडाचा अजिबात वापर केलेला नसतो, हे या रथाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हा रथ पूर्णपणे नैसर्गिक साहित्यापासून बनवलेला असतो, जो त्याच्या पारंपरिक महत्त्वाला अधिक उठाव देतो.



गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या 'थोरल्या विहिरी'जवळ बगाडाचे कणा, खांबला, दांड्या आणि बुटे यांसारखे साहित्य ठेवलेले असते. हे सर्व साहित्य वाजतगाजत भैरवनाथाच्या मंदिरात आणले जाते. मागील वर्षीच्या बगाडातील वापरण्यायोग्य साहित्यच यावर्षी वापरले जाते, अन्यथा नवे लाकडी साहित्य तयार केले जाते. बगाडाचा रथ बनवणे हा या उत्सवातील महत्त्वाचा भाग मानला जातो.

उत्सव जवळ येताच गावातील लोक कामाला लागतात. बगाडाच्या रथाला साधारण तीन फूट उंचीची दोन मोठी घडीव दगडी चाके असतात. दहा फूट लांबीच्या लाकडी कण्याला ही दोन्ही चाके जोडली जातात. चाके निसटू नयेत म्हणून कण्याला चाकाच्या बाहेर लाकडी कुण्या बसवल्या जातात. कण्यावर लाकडी बुटे बसवतात. या घनाकृती लाकडाला दांड्या बसवण्यासाठी दहा इंच व्यासाची दोन भोके पाडलेली असतात. यामध्ये बारा फूट लांबीच्या दोन दांड्या बसवल्या जातात. दांड्यांना बैल जुंपण्यासाठी दहा फूट लांबीचे आडवे जू बांधले जाते. बैलगाडीच्या साठीप्रमाणे एक लाकडी साठी तयार करून दांड्यावर बसवली जाते. ही साठी वाघाच्या तोंडाचा आकार असलेल्या वाघळ्याला बसवण्यासाठी असते. वाघाल्याच्या मध्यभागी दीड फूट रुंद भोक ठेवलेले असते. यामध्ये अठरा फूट उंचीचा लाकडी खांब (खांबला) रोवला जातो. खांबावर बाहुली बांधली जाते. ही बाहुली कळकापासून बनवलेल्या आणि खांबावर आडव्या ठेवलेल्या जवळजवळ पंचेचाळीस फूट लांबीच्या शिडाला गोल फिरवण्यासाठी तसेच वर-खाली करण्यासाठी मदत करते. हे शीड दोरखंडात विशिष्ट पद्धतीने विणलेले असते. अशाप्रकारे बगाड रथ पूर्ण केला जातो.

बगाडाच्या मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी खांबाच्या मध्यभागी केलेल्या जागेवर दोन लोक उभे असतात. याला पिळकावणी म्हणतात. पिळकावणी म्हणजे दोन दोरखंडावर लाकडी दांडके पिळ देऊन खांबाला बिलगून ठेवलेले असते, ज्यावर माणूस सहज उभा राहू शकतो. खांबाच्या मध्यापासून दोन लांब दोरखंड सोडलेले असतात, ज्यांना तोरण्या म्हणतात. तोरण्यांच्या मदतीने बगाडाचा तोल सांभाळला जातो. तोरण्या धरून पंचवीस ते तीस तरुण कायम सतर्क असतात. बगाडाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मंदिरासमोर बगाड रथ तयार केला जातो.

फाल्गुन वद्य चतुर्थीला यात्रेचा पहिला दिवस उजाडतो. दुपारपासून भाविकांची पावले मंदिराकडे वळू लागतात. हार, नैवेद्य आणि इच्छेनुसार काचेच्या हंड्या, आरसे, झुंबरे यांसारख्या भेटवस्तू वाजत गाजत भैरवनाथाच्या चरणी अर्पण केल्या जातात. याच दिवशी, शुभमुहूर्तावर भैरवनाथांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होतो. दुपारी, योग्य मुहूर्त पाहून देवाला सुंदर पोशाख चढवला जातो, बाशिंग बांधले जाते. डवर गोंधळी समाज विधीवत पूजा करून, बगाड्याच्या घरी बनवलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य देवाला अर्पण करतात.

दिवसभर मंदिरामध्ये भाविकांची रीघ लागलेली असते. संध्याकाळी, देव आणि बगाड्याच्या मिरवणुकीचा, म्हणजेच छबिन्याचा नेत्रदीपक सोहळा पार पडतो. चंद्रोदयानंतर, बगाड्यासह सर्वजण नाथसाहेबांच्या पाचीदेवळ येथील मूळस्थानी दर्शनासाठी जातात. तिथे, देव पंचक्रोशीसाठी वर्षभराची भाकणूक करतात. वडीलधारी मंडळी बगाड उत्सव साजरा करताना घ्यावयाच्या काळजीबद्दल सूचना देतात. त्यानंतर, छबिना पुन्हा गावात प्रवेश करतो. पंचक्रोशीतील ढोल शौकीन, लेझीम पथके, दांडपट्टा आणि गजे खेळणारे भाविक या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहतात. देवाची पायधूळ गावात पडते, आणि सनई, डफडी, ढोल, लेझीम आणि दंडपट्टा यांचा खेळ पालखीपुढे रंगतो. फुलांच्या छत्र्यांनी वातावरण अधिकच प्रसन्न होते.

छबिन्याच्या रात्री, रंगपंचमीचा उत्साह असतो. बावधनकरांना वेगळी रंगपंचमी खेळण्याची गरज नसते, कारण छबिन्यादरम्यान देवावर उधळलेला गुलाल एकमेकांना लावून आनंद साजरा करण्याची प्रथा आहे. छबिना संपेपर्यंत, सर्वजण गुलालात रंगून जातात, आणि आपापसातील हेवेदावे विसरून एकमेकांना आलिंगन देतात. अशा प्रकारे, नाथांचा हा उत्सव सामाजिक शांततेचा प्रतीक बनतो. रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेला छबिना पहाटे चार वाजेपर्यंत चालतो.

छबिना संपल्यानंतर (यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, रंगपंचमीला) बगाडाचा रिकामा गाडा गावकरी स्वतःच्या हातांनी किंवा बैलांच्या सहाय्याने बावधनच्या पूर्वेला, गावापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री सोनेश्वर मंदिरापर्यंत ओढत नेतात. या रिकाम्या गाड्यासोबत बगाड्याही पायी चालत जातो.

ओझर्डे गावाच्या सीमेवरील कृष्णा नदीच्या काठावर असलेले श्री क्षेत्र सोनेश्वर हे बावधनच्या बगाडाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ कृष्णा नदीत पाण्याचे मोठे डोह आहेत. हे मंदिर अठराव्या शतकात ओझर्डे गावातील पिसाळ देशमुख घराण्याने बांधले असावे, असे सांगितले जाते. घडवलेल्या दगडात बांधलेल्या या मंदिरात शंकराची पिंड आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक दगडी नंदी असून, त्याच्या गळ्यात बगाड्याची मूर्ती कोरलेली आहे. या नंदीच्या गळ्यातील बगाड्याच्या मूर्तीवरून बगाड सुमारे ३०० वर्षांपासून सुरू झाले असावे, असा अंदाज बांधता येतो. याच सोनेश्वर मंदिरापासून बगाडाला सुरुवात होते. बगाड्या कृष्णा नदीत स्नान करतो. विधीवत पूजा आणि आरती झाल्यावर बगाड्याला पारंपरिक वेशभूषा केली जाते. ग्रामदैवतांची पूजा झाल्यावर बगाडाला बैल जुंपले जातात.


यानंतर खऱ्या अर्थाने बगाड रथाला सुरुवात होते. बगाड्याच्या पायाखाली झोपाळ्याची दोरी असते, आणि पायांना इजा होऊ नये म्हणून दोरीला पागोट्याचे कापड गुंडाळलेले असते. बगाड्याला लोखंडी गळात अडकवून, तो गळ शिडाला घट्ट बांधलेला असतो. गाड्याच्या झोक्याने जरी त्याचा तोल गेला, तरी तो आपोआप सावरला जावा, हा यामागचा उद्देश असतो. अशा प्रकारे, जागच्या जागी पाच वेढे काढून बगाड्या 'काशिनाथाचे चांगभले'चा जयघोष करतो आणि बगाडाला सुरुवात होते. 'चांगभले' म्हणताच, गाड्याला जुंपलेले मानाचे बैल धूम ठोकतात आणि गाडा भरधाव वेगाने गावाकडे मार्गक्रमण करतो. यात्रेला आलेले सर्व भाविक 'काशिनाथाचे चांगभले'चा गजर करत देवाचे दर्शन घेतात आणि रथाच्या मिरवणुकीत सहभागी होतात. अगदी लहान मुलांपासून ते अबालवृद्धांपर्यंत, हा गावचा गाडा म्हणजे कुतूहलाचा विषय असतो! सर्वजण या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात.

बगाडाच्या रथामागे वाजत गाजत ग्रामदैवतांच्या पालख्या निघतात. या बगाडाला किमान दहा ते बारा बलदंड बैल जुंपलेले असतात. हे बैल बगाड ओढत गावात आणतात. बावधन गावात बगाड येईपर्यंत वाटेत ठराविक अंतरावर बैलांच्या जोड्या बदलल्या जातात. बगाडाला बैल जुंपणे म्हणजे नाथांची सेवा, असे बावधनचे ग्रामस्थ अभिमानाने मानतात. म्हणूनच बगाडासाठी ते बैलांना विशेष खुराक देऊन, त्यांची दोन महिने निगा राखतात. या वेळी खास खिलारी बैल पाहण्यासाठी दूरदूरचे शेतकरी येतात. बैल जुंपण्याचा मान देखील ठरलेला असतो. बावधन पंचक्रोशीतील प्रत्येक घटकाला बैलांस जुंपण्याचा मान मिळतो.

बगाडाला जुंपलेल्या बैलांच्या विविध स्थानांना विशिष्ट सांकेतिक शब्द आहेत, जसे की धुरवी, चावरी, सहा बैली, आठ बैली इत्यादी. धुरवी म्हणजे मुख्य गाड्याच्या जूटाची अत्यंत महत्त्वाची आणि अवघड जागा. इथे ताकदवान आणि पल्लेदार बैल असावे लागतात. बगाडाचं पूर्ण ओझं पेलून गाडा ओढण्याची जबाबदारी या बैलांवर असते. गाडा ओढताना ठेच लागणे, हेलकावा बसणे किंवा ओझं न पेलल्यामुळे मानेवर गाडा पडणे यांसारखे अपघात टाळण्यासाठी बैलांचे मालक अतिशय दक्ष आणि तत्पर असतात. धुरवीच्या बैलाच्या बाजूची जुंपणी हातात धरून गाडा नियंत्रित ठेवणे म्हणजे 'खणसा' धरणे. हे काम करण्यासाठी उमदा आणि शक्तिशाली माणूस हवा, म्हणूनच म्हणतात, 'येथे पाहिजे जातीचे, येऱ्यागबाळ्याचे काम नोहे!'

शिवळेत जुंपलेली बैलजोडी 'वांडे' म्हणून ओळखली जाते. बगाडाला कमीत कमी चार वांडी जोडलेली असतात. धुरवीच्या पुढची जोडी म्हणजे चावरी. हे गाडा ओढण्यासाठी महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक गावकऱ्याची आपला बैल चावरीला जुंपावा अशी इच्छा असते. चावरीला बैल जुंपून देवाचा रथ ओढून नाथसेवा केल्याची भावना असते. चावरीला ताकदवान आणि अनुभवी बैल लागतात. चावरीच्या पुढे सहा बैली आणि आठ बैली अशा वांडी असतात. गाडा शेतातून जात असताना सुरुवातीला चार वांडी लागतात, पण 'आळ वाट' संपल्यावर तीन वांडी पुरेशी होतात. गाडा गावाजवळ आल्यावर सर्व बैल सोडून हाताने ओढला जातो.

बगाडाच्या मार्गात ठराविक ठिकाणी फेऱ्या काढण्याचा संकेत आहे. काही ठिकाणी एक, तर काही ठिकाणी पाच फेऱ्या मारल्या जातात. या फेऱ्यांच्या वेळी बगाड्या चारी दिशांना नमस्कार करून बोंब ठोकतो. त्याच्या हातात कडुलिंबाचा पाला असतो, जो तो अधूनमधून खातो. कडुलिंब औषधी गुणधर्मांमुळे ओळखले जाते. ते शरीराला त्रास देणारे संसर्ग कमी करते, तहान आणि उष्णता कमी करते. दिवसभर टांगलेल्या अवस्थेत हा पाला बगाड्यासाठी उपयुक्त ठरतो.

हा उत्सव साधारणपणे मार्च महिन्यात, कडक उन्हाळ्याच्या सुरुवातीला साजरा केला जातो. बगाडात सहभागी होणारे लोक प्रामुख्याने पांढऱ्या रंगाचे, हवेशीर सुती वस्त्र परिधान करतात. यामागे शास्त्रीय कारण आहे. पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही, ज्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. डोक्यावर पांढरी टोपी घातल्याने तीव्र सूर्यकिरणांपासून मस्तकाचे संरक्षण होते. सुती कपडे उष्णता रोखून शरीराला आराम देतात. बगाडात काळ्या रंगाचे कपडे, चामड्याच्या चपला किंवा पट्टे आणि काळा दोरा वापरण्यास सक्त मनाई आहे. शिवाय, या उत्सवात कोणत्याही प्रकारच्या व्यसनांना थारा नसतो. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली असून, गावातील प्रत्येक जण याचे काटेकोरपणे पालन करतो.

परंपरेने बगाड यात्रेमध्ये प्रत्येक समाजाला (बारा बलुतेदारांना) विशिष्ट जबाबदारी दिली जाते, ज्यामुळे या उत्सवाला एक अनोखे महत्त्व प्राप्त होते. या मानकऱ्यांना बगाडात मानाचे स्थान असते. गाडा तयार करण्याचे काम सुतार घराण्याकडे असते, तर गाड्याच्या यठनाची महत्त्वाची गाठ देण्याचा मान पिसाळ भावकीला मिळतो. छबिन्याच्या दिवशी बगाड्यासोबत असणाऱ्या मशालीला तेल पुरवण्याचा मान तेली समाजाकडे, तर वर्षभर देवाला फुले पुरवण्याचा मान माळी समाजाकडे असतो. देवाची सेवा करण्याचा मान गावातील गुरव समाजाकडे असतो. सोनेश्वरापासून मंदिरापर्यंत बगाड नेताना व परतताना कण्यामधील चाकाला तेल देण्याचा मान तेली समाजाकडे असतो. बगाड्याला गळ देण्याचा मान मुसळे आणि नाभिक समाजाकडे, शिडावर बसण्याचा मान दाभाडे यांच्याकडे, तर पिळकावणीवर उभे राहण्याचा मान भोसले व पिसाळ तरफेकडे असतो. बगाडाच्या गाड्यावर बसण्याचा मानही तरफेवर ठरवून दिला जातो. देवाला कपडे देण्याचा मान परीट समाजाकडे, डवर पूजन, देवाला वाजतगाजत नेणे, देवाच्या लग्नाची गोष्ट - आख्यायिका सांगून देवाचे सेवेकरी राहण्याचा मान डवरी-गोंधळी समाजाकडे, चर्मकार समाजाला मशाल धरण्याचा तसेच देवाला चामड्याचा जोडा देण्याचा मान असतो. भुई समाजाला धुळवडी दिवशी पाण्यात टाकलेली (थोरली विहीर) बगाडाची लाकडे काढण्याचा मान तसेच छबिना व बगाडा दिवशी देवाच्या पालखीला खांदा देण्याचा मान आहे. धनगर समाज माघ अमावस्येला देवाला घोंगडी भेट देतात. खाटिक तसेच रामोशी समाजाला देवाची देणी देण्याचा मान, तर मातंग समाज बगाडाच्या वेळी वाजंत्री (सनई व डफड) असतात. बगाडात देवाचा जो घोडा असतो, त्याच्या नावाने भैरवनाथाच्या मंदिरात घोड्याचा नाल ठोकण्याचा मान लोहार समाजाला आहे. होळीच्या आदल्या दिवशी बगाड्याचा गळ आणण्याचा मान नाभिक समाजाला आहे. बगाडाचे शीड मागच्या बाजूने धरण्याचा मानही गावातील मानकऱ्यांचा असतो. यामध्ये माळी समाजाला प्राधान्याने मान देतात. तसेच गावातील माहितगार आणि ताकदवान माणसेच हे काम करू शकतात, कारण बगाड गाड्याचे पूर्ण नियंत्रण या शिडाच्या मागच्या बाजूवर अवलंबून असते. मुस्लीम समाज देखील या देवगाड्याच्या कामात सहकार्य करून आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवतात. म्हणजे बगाड यात्रेदरम्यान गावात हिंदू-मुस्लीम ऐक्याची भावना पाहायला मिळते.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बगाड जननी आईच्या भेटीसाठी निघते, तेव्हाही 'मानाचा बगाड्या' म्हणून विशेष सन्मान दिला जातो. बगाडात समाजातील सर्व स्तरांतील आणि वाड्या-वस्त्यांतील लोकांना मान दिला जातो, ज्यामुळे सामाजिक एकोपा टिकून राहण्यास मदत होते. बगाडात सेवा करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या निस्वार्थ सेवेच्या बदल्यात इनामी जमिनीही देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यात्रेदरम्यान गावकरी स्वतः किंवा इतरांना व्यसन करण्यास सक्त मनाई करतात. व्यसनमुक्त भारत ही काळाची गरज ओळखून, तंबाखू, सिगारेट किंवा दारूसारख्या व्यसनांना या उत्सवात अजिबात थारा नसतो. व्यसन करणाऱ्या व्यक्तीला बगाड्याच्या जवळपासही फिरकू दिले जात नाही.

सूर्यास्ताच्या सोनेरी छटांमध्ये सोनेश्वरावरून निघालेले बगाड, भक्तांच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात भैरवनाथाच्या मंदिरासमोर पोहोचते. बगाड सुरक्षितपणे पोहोचल्याचा श्वास रोखून धरलेल्या जनसमुदायाला दिलासा मिळतो. मग बगाड्याला आदरपूर्वक खाली उतरवून, मंदिराच्या गर्भगृहात नेले जाते, जिथे त्याला एक ग्लासभर दूध देऊन त्याची सेवा केली जाते. या धार्मिक विधीनंतर, बगाड उत्सवाची आनंदमयी सांगता होते.

उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (फाल्गुन वद्य षष्ठी), लोककलेचे विविध रंग भरलेले तमाशा, लाल मातीतील मर्दानी कुस्त्या आणि संगीताची मनमोहक मैफल यांसारख्या मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल असते. तमाशाच्या रसिकतेत पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने रंगून जातात. दुपारी, मातीतील मर्दानी खेळाचा थरार अनुभवायला मिळतो, ज्यात गावकरी आणि पंचक्रोशीतील मल्ल सहभागी होतात. लहानग्यांपासून ते प्रौढांपर्यंत सगळेच कुस्तीच्या आखाड्यात आपले कौशल्य दाखवतात. जिंकणाऱ्या मल्लांना रोख बक्षीसांबरोबरच आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवले जाते. या दिवशी, गावातील रस्ते गर्दीने फुलून जातात. गावकरी, पंचक्रोशीतील पाहुणे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले रसिक या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी एकत्र येतात.

गेल्या काही वर्षांपासून, गावाने बगाडावरील नियंत्रणासाठी यात्रा समिती स्थापन केली आहे. बगाडापुढे ध्वनिक्षेपकांची सोय केलेली ट्रॅक्टर-ट्रॉली उभी करून, यात्रेचा आनंद दूरून घेणाऱ्या पाहुण्यांना आणि गावकऱ्यांना योग्य सूचना देण्यात येतात. यामुळे श्रेयवाद, मोठेपणा आणि गैरसमज दूर झाल्याने आपापसातील मतभेद टळले आहेत. परिणामी, बगाड यात्रा शांततेत पार पडते. या काळात जुने मित्र भेटतात, आनंदी क्षणांचा अनुभव घेतात आणि माहेरवाशिणींना गावच्या उत्सवासोबत नातेवाईकांच्या भेटीचा आनंद मिळतो. गावकऱ्यांकडून नातेवाईक आणि मित्रांना यात्रेची माहिती दिली जाते. बैलांच्या या खेळामुळे, बैलशौकीन दूरदूरहून बगाड पाहण्यासाठी येतात आणि आनंदात सहभागी होतात.

बावधनचं बगाड म्हणजे एक उत्सव आणि ‘ईर्षेचा खेळ’ असं म्हटल्यास वावगं ठरू नये. पूर्वी गावात धनधान्याची सुबत्ता आणि धनिक असणाऱ्या समूहांना (तरफ) वर्चस्व प्रस्थापित करण्याची कल्पना सुचायची. खरं तर, बगाड म्हणजे देवाच्या उत्सवासोबतच गावातील दोन मुख्य तरफांमधील उन्नतीची स्पर्धाच अधिक असायची.

बगाडाच्या हौसेपोटी, ही मंडळी धष्टपुष्ट बैल विकत घ्यायची आणि त्यांना बगाडाचं विशेष प्रशिक्षण देऊन, दुसऱ्या तरफेतील बैलांचा गाडा ओढण्याच्या स्पर्धेत हरवायची. यासाठी, गाड्याच्या शिवळीमध्ये एका बाजूला एका तरफेचे बैल आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या तरफेचे बैल जुंपण्याची प्रथा होती. दुसऱ्या तरफेला शह देऊन बैलांनी विजय मिळवल्यावर, गावात या तरफेचं वर्षभर ‘वर्चस्व’ असा छुपा संकेत असायचा.

आता यात्रा कमिटीमध्ये बैल जुंपण्यासाठी वेगवेगळे खुत्ते (गाड्याचा थांबा) ठरवून दिले जातात आणि त्या त्या खुत्त्यावर गावातील मानकरी आपापली (फक्त एका तरफेची) बैल जुंपतात. त्यामुळे, ही परंपरागत चालत आलेली छुपी स्पर्धा कमी झालेली जाणवते. पण या रांगड्या खेळातून मिळणारा आनंद पूर्वीप्रमाणेच कायम आहे. त्यामुळे, प्रत्येक माहेरवाशिणीप्रमाणेच गावाबाहेर नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या चाकरमान्यांनाही या नाथाच्या उत्सवाची ओढ लागलेली असते. या गावातील चाकरमानी मंडळी या दिवशी कुठेही असोत, तसेच त्यांना कितीही कामं असली तरी देवावर गुलाल टाकण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात.

बगाड म्हणजे केवळ एक विधी नव्हे, तर तो आहे नाथसाहेबांच्या भक्तीचा उत्सव!
वर्षानुवर्षे ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, तो सोहळा म्हणजे प्रेमळ नात्यांचा संगम!

बावधनची बगाड यात्रा म्हणजे केवळ एक धाडसी खेळ नाही, तर ती गावपातळीवरील स्पर्धा, जिद्द, सामाजिक एकोपा, रूढी, परंपरा आणि संस्कृती यांचे विलोभनीय दर्शन घडवते.

- प्रा (डॉ) केशव यशवंत राजपुरे
website




_______________________________________________

Wednesday, March 2, 2016

प्राधान्यक्रम

अग्रक्रम

​​दुपारी जेवण झाल्यावर द्राक्षे खात होतो. खाताना एक साधी गोष्ट लक्षात आली; ती म्हणजे आपण दिलेल्या द्राक्ष्यातून अगदी निवडून अधिक पिवळी झालेली (तुलनेने गोड) द्राक्षे अगोदर खात होतो, मग क्रमाक्रमानं थोडीशी हिरवी, मग शेवटी जास्त हिरवी म्हणजे कमी गोड. मनात विचार आला: खाताना तर मी सर्व द्राक्षे खाल्ली मग गोड द्राक्ष्याना हे प्राधान्य कशासाठी ? मी हि द्राक्षे सरसकट का खाल्ली नाहीत ? कधीतरी हि सर्व द्राक्षे एकाच पोटात जाणार होती ना ?

नंतर मला दैनंदिन जीवनात माझ्या प्राधान्यक्रमांची आठवण झाली. इस्त्री करून ठेवलेल्या ड्रेस पैकी मी सोमवार साठी सर्वात उत्तम दिसणारा ड्रेस निवडतो मग मंगळवारी पुढच्या क्रमाचा अन पुढे तसेच चालू .. .. .. , किंवा त्या आठवड्यात एखादा महत्वाचा कार्यक्रम असेल तर निवडक ड्रेस आपण त्यासाठी राखून ठेवतो. असे का ? तसेच भुईमुगाच्या शेंगा खाताना ज्या आकाराने (ठपकळ) मोठ्या आहेत त्यांचा मान पहिला ! शेंगदाणे खातानाही प्राधान्यक्रम ठरलेलाच ! सुरुवातीला आपण जर बस मध्ये चढलो तर जागेची निवड करताना विंडो-शीट पसंत करतो. अन शेवटी चढलो तर मिळेल ती शीट चालते, नसल्यास बसमध्ये उभं राहणंही चालतं, मग सुरुवातीलाच प्राधान्यक्रम कशाला ?

समजा, तुमच्यासमोर एखादा केक ठेवला असून त्यावर क्रीम आणि चेरीही आहे. आता तुम्ही आधी काय खाणार ? क्रीम, चेरी कि केक ? प्रत्येक माणूस या प्रश्नाचं वेगवेगळ उत्तर देईल. कोणी म्हणेल, मी आधी केक चा तुकडा खाईन आणि सर्वात शेवटी चेरी खाईन. जेणेकरून चेरीचा स्वाद जास्त वेळ तोंडात राहील. तर कोणी म्हणेल, आधी मी चेरी खाईन. कारण त्यावर जे आईसक्रीम आहे त्याच्या स्वादिष्ट चवीचा मला लवकरात लवकर आस्वाद घेता येईल. जेवतानीही बरेच लोक असं करतात. स्वीट डिश अगदी शेवटी किंवा सुरुवातीला किंवा मध्ये खात रहातात. प्रत्येकाची आपापली निवड असते. 'व्यक्ती तितक्या प्रकृती', त्यामुळे प्रत्येकाचे प्राधान्यक्रम निरनिराळे असतात.

आयुष्याच्या गणिताबाबतीतही असेच आहे. अगदी सोपे प्रश्न सुरुवातीला मग जरा अवघड, जादा अवघड .. .. .. .. जीवन जगत असताना सुख-दुख:चे प्राधान्यक्रम ठरवायची किल्ली जर माणसाच्या हातात असती तर त्याने कधी दु:ख निवडलेच नसते. पण वस्तुस्थिती तशी नाहीय त्याठिकाणचे प्राधान्यक्रम आपल्या हातात नाहीत.

आपल्या जीवनासाठी अत्यावश्यक असणार्‍ या बाबी म्हणजे लक्ष. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक लक्ष्ये असतात. मनातील इच्छा व डोळ्यांसमोरील ‘लक्ष्य’ जर पूर्ण झाले तरच आयुष्य सफल झाल्याचे बरेचजण मानतात. आपल्या इच्छा अनेक असतात. उदाहरणार्थ, मोठे घर, कार, चांगल्या ठिकाणी फिरायला जाणे, मुलांचे उज्जवल भवितव्य, आरोग्यदायी आणि आरामदायी निवृत्ती आदी. मर्यादित साधनांसह आपली सर्व महत्त्वाची लक्ष्ये साध्य करण्यासाठी लक्ष्यांना प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे. लक्ष्य साध्य करत असताना शक्य झाल्यास इच्छाही पूर्ण करता येतात का ते पहावे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्या लक्ष्यांसाठी प्राधान्यक्रम निश्चित करावा.

- केशव राजपुरे
९६०४२५०००६ 

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...