Saturday, January 29, 2022
जॉन बार्डीन
Sunday, January 16, 2022
पालकांची जबाबदारी; समाजाचा आरसा
Thursday, January 13, 2022
आनंदाचा डोह
माणूस गप्प गप्प आणि अलिप्त का होतोय ?
आयुष्यामध्ये प्रत्येकाला शांती समाधान हवे असते कारण त्यांच्या जीवनात त्याची वानवा असते. आयुष्यामध्ये भय, क्रोध, ईर्षा, द्वेष आणि इतर बऱ्याच गोष्टींमुळे मनाची विकृतावस्था येते आणि आपण दुःखी होतो. हे दुःख स्वतः पुरते मर्यादित न राहता इतरांमध्ये पसरवले जाते आणि सर्व वातावरण अशांत होत असते.
तसं बघितलं तर मनाच्या ओझ्याखाली दबला नसल्यास प्रत्येकजण नैसर्गिकरीत्या व्यक्त होतो, नातेसंबंध जपतो आणि प्रेमभाव सुदृढ करतो. पण हल्ली असे दिसून येते की माणूस समाजापासून अलिप्त, संपर्क वलयापासून दूर आणि काहीसा गप्प झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आपणाला आजूबाजूला सहचार, बंधुभाव, एकता यांचा अभाव दिसत आहे.
हि पिढी जुन्या आणि नव्या पिढीच्या काळाच्या उंबरठ्यावर असल्याने तिने दोन्ही पिढ्या जवळून अनुभवलेल्या आहेत. जुने दिवस आठवून, 'हे असे का होते?' असा प्रश्न केल्यानंतर, परिस्थितीचे खालील विश्लेषण निदर्शनास येते. हे माझे निरीक्षण आणि अनुभव आहेत. आपली मते भिन्न असू शकतात. कारण समज ही व्यक्तीसापेक्ष असते.
जुन्या काळी जेव्हा ऐशोरामाच्या गोष्टी दुर्मिळ होत्या तेव्हा माणूस कमीत कमी गरजासह आनंदी जीवन जगत असे. तसेच दळणवळण व संपर्क साधणे इतकी विकसत नसल्याने माणसाच्या जगाविषयीच्या माहितीच्या कक्षा लहान होत्या. तेव्हा बऱ्याच गोष्टी मला माहीत नाहीत तसेच बऱ्याच गोष्टींचा आनंद घेणे बाकी आहे या समजापाई तो स्वतःला अपूर्ण समजत असे. म्हणतात ना अज्ञानात सुख असते. अशा परिस्थितीत तो आतून अशांत, अहंकारी किंवा गर्विष्ट कसा बरं असेल ?
या परिस्थितीत त्याचा व्यवहार आपल्या स्वतःच्या मर्यादा ओळखून होत असे. एकूणच त्यांचा स्वभाव काळजीवाहू, मानवतेचा, सामाजिक आणि प्रेमळ होता. त्यामुळे तो प्रतिक्रिया देण्यास आणि व्यक्त होण्यास आणि नातेसंबंध जपण्यास कचरत नव्हता. इतरांशी भाईचाराने राहत आणि स्नेह वृद्धिंगत करत आनंदीपणे जगत असे. शुद्ध चित्त ठेवून प्रेमाचे अदान-प्रदान होईल अशा परिस्थितीत तो दुसऱ्यांच्या दुखाप्रती अधिक संवेदनशील रहात स्वतः एक संतुलित आयुष्य जगत असे.
यथावकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रचंड विकासामुळे त्याच्या विश्वाच्या आकलनाच्या कक्षा रुंदावल्या. वैज्ञानिक प्रगतीमुळे विलासी वस्तू सर्वसामान्यांना परवडणार्या बनल्या. कालांतराने आधुनिकीकरण व जागतिकीकरणाच्या नावाखाली रोजगाऱ्यांचे पगार भरमसाठ वाढले आणि बहुतेकाकडे आवश्यकतेपेक्षा जास्त पैसा आला. चलन, ज्यावर हे जग चालते, ही अशी गोष्ट आहे की ती जर गरजेपेक्षा जास्त प्रमाणात आली तर माणूस भांबावून जातो. माणसं चलन वृद्धिंगत करणाऱ्या व्यवसाया ऐवजी स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करू लागले.
संपत्तीच्या प्रतिष्ठेचा माणसास अहंकार कधी जडतो हे त्याचे त्याला देखील समजत नाही. लहानपणी न मिळालेल्या गोष्टी उत्तरार्धात मिळाल्या तर माणसास त्याचे फार महत्व असते. या सर्व प्रकारात तो स्वतःला श्रीमंत समजू लागतो आणि इतरांशी तुलना करू लागतो. आपल्याकडे दुर्लक्ष तसेच आपली स्तुती होत नाही हे लक्षात आल्यानंतर मग माणूस अहंकारी होऊन अस्वस्थ होऊ लागतो. हाच अहंकार पुढे जाऊन द्वेष, ईर्षा तसेच क्रोध निर्माण करतो. हेच ते कारण आहे ज्याने माणूस आयुष्यात सुख शांती हरवून दुःखी होतो. आणि हे जर बराच काळ होत राहिले तर त्याचा परिणाम म्हणून माणूस मनाच्या विकृत अवस्थेत पोचायला वेळ लागत नाही.
मनाच्या विकृतावस्थेची इतरही कारण आहेत. उदाहरणार्थ शिक्षित असूनही पद आणि नोकरीवर संतुष्ट नसल्याने दुःख, विवंचना आणि काळजीने माणूस त्रस्त होतो. उदरनिर्वाह, कुटुंब चालवण्याचं ओझ व अस्तित्वासाठीची लढाई कायम नशिबी आली तर माणूस निराश आणि पर्यायाने कमजोर बनतो. बदललेली जीवनशैली, तुटपुंजी मिळकत आणि कौटुंबिक गरजा भागवत असताना करावी लागणारी कसरत या सगळ्याला वैतागून मग माणूस परिस्थितीस अंध प्रतिक्रिया द्यायला लागतो आणि मनाच्या प्रचंड ओझ्याखाली स्वतःस ढकलून देतो.
गैरसमज ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होते आणि अपेक्षांभंगामुळे नैसर्गिकरित्या मनाची अस्वस्थता निर्माण होते. प्रत्येक नात्यात वेळोवेळी गैरसमज निर्माण होत असले तरी काही नाती अशी असतात की त्यांची दुरवस्था होते. गैरसमज होतो जेव्हा लोकांच्या धारणा एकमेकांना भिडतात. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बरोबर असतो या अध्यात्माच्या मूल तत्त्वावर तो विश्वास ठेवत नाही आणि स्वतःला ताणतणावाच्या खाईत लोटून देतो. नाती अत्यंत नाजुक असतात. नाती सांभाळून ठेवण्याची गरज असते कारण लहान-लहान चुकांमुळे दुरावा निर्माण होतो. अधिकाराने रागावले तरी नाती तुटतात. याचा परिणाम स्वरूप माणूस आपले स्वास्थ हरवून बसतो. कारण तो पूर्वग्रहदूषितपणे अर्थ काढत नेहमी या गढूळ झालेल्या नात्याविषयी विचार करत असतो.
पद, प्रतिष्ठा, आदर माणसास कल्पनाशक्तीच्या तुलनेने वरच्या आभासी पातळीवर घेऊन जातो. स्तुती केल्यामुळे लोक आभासी आनंदात जातात. जिथे ते नेहमीच प्रत्येकाकडून कौतुक आणि सन्मानाची अपेक्षा करू लागतात. पण असे न झाल्यास अहंकार दुखावातो मग ईर्षा, अबोला, वाद आणि नात्यात तणाव वाढू लागतो.
सततच्या कामाच्या अधिक तणावाने निर्माण झालेल्या विचलिततेमुळे, ई-मेल्स, न्यूज, सोशल मीडिया आणि चॅटसच्या ट्रिगर मुळे तसेच कोरोना सारखे आजार माणसांमध्ये निद्रानाश तसेच चिंता विकार सामान्यपणे आढळून येतो. निद्रानाशामुळे आरोग्याच्या अनेक भयावह समस्या उद्भवतात की ज्यायोगे मनात तीव्र ताण निर्माण होतो. पुढे जाऊन हा ताण मनाच्या विकृत अवस्थेकडे जातो आणि माणूस अस्थिर होतो.
माणसाला आयुष्यात मार्गक्रमण करताना थोरामोठ्यांचे मार्गदर्शन, साथ आणि आशीर्वाद लाखमोलाचे असतात. जुन्या पिढीला याचे महत्त्व माहीत आहे. हे आशीर्वाद आपणा सभोवती नेहमीच उत्साही आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि हे यशस्वीतेसाठी उपयोगी असतात. अलीकडे ही परंपरा औपचारिक झाल्याचे दिसते कारण नवीन पिढी हे करणे म्हणजे कमीपणाचे समजते. पण हल्ली या गरजेच्या ऊर्जा तसेच आशीर्वादाच्या कमतरतेमुळे यश माणसांच्या पासून दूर जात आहे असे दिसते. सततच्या अपयशामुळे माणूस निरुत्साही होतो आणि त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होतो.
अशा पार्श्वभूमीवर माणूस नैसर्गिकरीत्या व्यक्त होणार नाही. हेच कारण असावं कदाचित माणूस सामाजिकदृष्ट्या अलिप्त आणि गप्प गप्प झालेला दिसतो. पण ही त्याची शांतता एखाद्या सुप्त ज्वालामुखी सारखी असू शकते. त्याचा कधी उद्रेक होईल ते सांगणे अवघड.. पण आजाराचे योग्य निदान झाले तरच इलाज योग्य करता येईल.
आज कोरोनाने माणसाच्या प्रगतीच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. अनिश्चिततेच्या जीवन गंगेत जगायचं कसं हे शिकवलं असताना अध्यात्माची कास धरून मानव जन्माचा अर्थ समजून घेतला पाहिजे. मुळात मानव जन्म हाच संचित कर्माचे प्रतीक असताना या जन्मात विनय, आदर तसेच मानवतेने वागायचे सोडून वास्तवतेशी फाटा घालत माणूस आभासी दुनियेत का जगत आहे हे आकलनाच्या पलीकडे आहे.
विकारात मन विवेकबुद्धी घालवून बसते. श्वास लय सोडून देतो. शरीरात जैवरासायनिक क्रिया संवेदना उत्पन्न करतात. हे झालेले बदल आपल्या लक्षात येत नाहीत. मग काय करावं ? अशा वेळी आत्मनिरीक्षण करत शरीराच्या सत्यत्तेचा आंतरिक अनुभव घ्यायला शिकायला पाहिजे. याने चित्त शुद्ध होईल आणि मग बघा हा गप्प गप्प झालेला माणूस पुन्हा कसा माणसात जाऊन माणसाशी माणसा सम वागेल. मनावरील सर्व ओझे झुगारून मनसोक्तपणे व्यक्त होईल आणि आनंदाच्या डोहात डुंबून जाईल.
- डॉ केशव राजपुरे
Thursday, January 6, 2022
सिंधुताई (माई) सपकाळ
Thursday, October 14, 2021
भौतिकशास्त्रातील २०२१ चा नोबेल पुरस्कार
Sunday, June 13, 2021
डॉ. आर. व्ही. भोंसले; प्रथम पुण्यस्मरण
कोल्हापुरातील अंतराळ संशोधनाचे जनक: डॉ. आर. व्ही. भोंसले
थोर विचारवंत, कुशल संशोधक आणि जेष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. राजाराम विष्णू भोंसले यांनी दिनांक १४ जून, २०२० रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. १९८९ मध्ये इस्रोची जननी समजल्या जाणाऱ्या अहमदाबाद येथील पीआरएल तथा भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा या संशोधन संस्थेमधून भौतिकशास्त्र विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले होते. भारतातील पहिला रेडिओ टेलिस्कोप बनवणारे डॉ. आर.व्ही. भोंसले हे तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा !कोल्हापूर जिल्यातील कागल तालुक्यातील बस्तवडे या छोट्याश्या खेड्यात दिनांक १२ नोव्हेंबर, १९२८ रोजी डॉ. आर.व्ही. भोंसले सरांचा जन्म झाला. १९५० साली कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून त्यांनी पदार्थविज्ञान या विषयातून बी.एस्सी. हि पदवी पूर्ण केली. जन्मजात प्रतिभासंपन्न असल्यामुळे शिक्षणादरम्यान त्यांना प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगची फ्रीशिप व वसतिगृह प्रवेशही मिळाला. वसतिगृहात असताना त्यांना एक रेडिओ मिळाला आणि त्यांच्या कारकीर्दीस वेगळी दिशा मिळाली. एम.एस्सी. साठी त्यांनी पुणे येथील सर परशुरामभाऊ (एस.पी.) महाविद्यालयात प्रवेश घेतला. तत्पूर्वी त्यांनी रेडिओ कम्युनिकेशनचा डिप्लोमा पूर्ण केला होता. यामुळे त्यांना अवकाश विज्ञान, वायरलेस नेटवर्किंग तसेच उपग्रह संपर्क प्रणाली याबाबत कुतूहल निर्माण झाले होते. १९५४ मध्ये त्यांनी पदार्थविज्ञान विषयात प्राविण्यासह एम.एस्सी. पूर्ण केली. त्यानंतर ते गुजरातमध्ये रेडिओ अभियांत्रिकी विषय शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून रुजू झाले.
नोकरी करत असताना त्यांनी संचालक डॉ. के.आर. रामनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांतून उभारलेल्या अहमदाबाद येथील पीआरएल येथे संशोधन सुरू केले. अवकाश विज्ञान विषयातील रेडिओ लहरींवर आधारित आयनांबरचा अभ्यास त्यांनी पी.एच.डी. दरम्यान केला. त्यावेळी डॉ. के.आर. रामनाथन हे पीआरएल चे संचालक म्हणून काम पाहत होते. पी.एच.डी. दरम्यान डॉ. भोसले यांनी एकूण सात शोधनिबंध आंतरराष्ट्रीय मासिकांत प्रसिद्ध केले त्यापैकी तीन शोधनिबंध (१९७५, १९८६, १९८९) नेचर या जगप्रसिद्ध मासिकांत होते. या संशोधनावर आधारित १९६० मध्ये त्यांना गुजरात विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त झाली. या संशोधनासाठी त्यांनी रेडिओ टेलिस्कोप बनवला होता व त्याच्या निरीक्षणांच्या नोंदीवर त्यांनी संशोधन केले. हा भारतातील पहिला रेडिओ टेलिस्कोप ठरला व तो बनवणारे डॉ. भोंसले हे भारतातील पहिले रेडिओलॉजिस्ट होते.
हवामान शास्त्रज्ञ डॉ. के.आर. रामनाथन हे नोबेल विजेते सर डॉ. सी.व्ही.रमण यांचे शिष्य होते म्हणजे डॉ. भोंसले हे अप्रत्यक्षपणे रमण यांचे शिष्य होते. पी.एच.डी. मिळाल्यानंतर पोस्ट डॉक्टरेटसाठी ते दोन वर्षांसाठी कॅनडा येथे गेले. कॅनडा व पीआरएल मधील त्यांच्या संशोधनाची दखल घेऊन स्टॅनफोर्ड विद्यापीठात नासा मार्फत संशोधक म्हणून त्यांची तीन वर्षांसाठी निवड झाली. ते आपल्या कुटुंबासोबत माउंटन व्ह्यू या शहरात राहत होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्यांनी उपग्रहांच्या सहाय्याने पृथ्वीच्या आयनांबर (आयनोस्फीअर) या थराचा तसेच सूर्याप्रमाणे गुरु या ग्रहाकडून येणाऱ्या लहरींचा अभ्यास केला. त्यांच्या कामाची दखल म्हणून डॉ. साराभाई यांनी त्यांना तिथले संशोधन संपल्यावर पीआरएल ला रुजू होण्याचे निमंत्रण दिले. १९७३ ला डॉ. भोंसले हे पीआरएल मध्ये वैज्ञानिक म्हणून रुजू झाले. कॅनडा व अमेरिकेत उच्च दर्जाचे संशोधन केल्यावर पीआरएल मध्ये नेमणूक होणे हा त्यांच्यासाठी मोठा सन्मान होता.
पीआरएल मध्ये त्यांनी ग्रह व तारे यांचा अभ्यास करणारे संशोधक यांना एकत्र करून अवकाश संशोधकांचा एक चमू तयार केला. पीआरएल ने गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर माउंट अबू या थंड हवेच्या ठिकाणी प्रस्तावित अवकाश वेधशाळेसाठी ३० एकर जागा घेतली होती. डॉ. भोंसले यांनी तिथे अवकाश संशोधन प्रयोगशाळा उभारली आणि देशातील पहिलीवहिली रेडिओ दुर्बीण प्रस्थापित केली. या माध्यमातून सूर्याची नियमित निरीक्षणे, सूर्यावरील डाग, सौर वादळे यांची निरीक्षणे नोंदवणे शक्य झाले. याशिवाय आकाशगंगेतील अनेक ताऱ्यांचा व सूर्यमालेतील ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी या दुर्बिणीचा वापर झाला. या रेडिओ दुर्बिणी साठी डॉ. भोंसले यांना इंडो-यूएस प्रकल्पातून निधी मिळाला होता. डॉ. भोंसले यांनी १५ वर्षे या प्रकल्पावर काम केले आणि देशाच्या अंतराळ कार्यक्रमात महत्वपुर्ण योगदान दिले. त्यांनी रेडिओ खगोलशास्त्र संशोधनाचे बीज भारतात रोवले व १९८९ मध्ये ते पीआरएल मधून निवृत्त झाले.
पीआरएल मधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपली जन्मभूमी कोल्हापूर येथे स्थायिक होण्याचे ठरवले. खरंतर त्यांच्या सहकारी मित्रांनी त्यांना पुण्यात स्थायिक होण्याचा आग्रह धरला होता परंतु डॉ. भोंसले यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामार्फत पन्हाळा येथे माउंट अबू प्रमाणे अवकाश वेधशाळा स्थापन करायची होती. तत्कालीन कुलगुरू डॉ. के.बी. पवार यांनी डॉ. भोंसले यांची विद्यापीठात अवकाश संशोधन सुरु करण्याच्या हेतूने पदार्थविज्ञान अधीविभागात मानद प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. सरांच्या दूरदृष्टीतून १९९० पासून अधीविभागात अवकाश विज्ञान हे नवे विशेषीकरण सुरु झाले व अविरतपणे सुरु आहे. आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी अवकाश विज्ञान विषयात पदव्युत्तर व ११ हुन अधिक विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. पदवी संपादन केलेली असून आजही बरेच विद्यार्थी अवकाश संशोधनाचे काम करीत आहेत.
डॉ. भोंसले यांनी विद्यापीठाला पन्हाळा येथे संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी विनवणी केली होती कारण कोल्हापुरातून दिसणारे ग्रह किंवा तारे पन्हाळ्यावरून सहापटीने अधिक चांगले दिसतात. तब्बल २० वर्षांनंतर शासनाने पन्हाळगडावर शिवाजी विद्यापीठाला अवकाश संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी एक एकर जमीन दिली. हि जागा मिळवण्यासाठी डॉ. भोंसले यांनी शासन दरबारी खूप प्रयन्त केले आहेत. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच ही जागा मिळाली आहे हे सर्वश्रुत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) ने भारतीय क्षेत्रीय नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (आयआरएनएसएस) रिसीव्हर पन्हाळा येथील विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये प्रस्थापित केला आहे. आयनोस्फीअर आणि तिची गतिशीलता परीक्षण करून त्याचा अभ्यास करणे हा उद्देश आहे. राष्ट्रीय अभियानात भाग घेत देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मिशनमध्ये विद्यापीठ योगदान देत आहे.
अवकाशविज्ञानाविषयी माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी कोल्हापूर विभागातील अनेक खगोलप्रेमींना एकत्र केले व शाळा, महाविद्यालये व विविध संस्था येथे जाऊन ग्रह, तारे, सूर्य, आकाशगंगा, उल्का वर्षाव यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच रात्रीचे अवकाश निरीक्षणाचे अनेक प्रयोग केले आहेत. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे हे अवकाश संशोधनाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे कारण येथे आययूसीएए व टीआयएफआर च्या माध्यमातून अधिक सक्षम रेडिओ दुर्बिणी बसवण्यात आल्या आहेत तसेच ही केंद्रे सध्या इस्रोच्या सहकार्यातून अवकाश संशोधनात अग्रेसर आहेत. कोल्हापूरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अवकाश संशोधनाचे वेड आहे परंतु त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा तसेच व्यासपीठ येथे नाही हे तेव्हा डॉ. भोंसले यांनी ओळखले होते.
अवकाश संशोधनाची फक्त प्रेरणा देऊन काम चालणार नाही त्यासाठी आवश्यक उपकरणेही कोल्हापूरमध्ये उपलब्ध व्हायला हवीत म्हणून त्यांनी मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (आयआयजी) या संस्थेशी शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार घडवून आणून विद्यापीठ परिसरात राजाराम तलावाजवळ वातावरणातील वेगवेगळ्या थरांचा अभ्यास करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानानेयुक्त रडार बसवण्यात आले आहे. अशाप्रकारचे रडार देशात कोल्हापूर आणि दक्षिण तामिळनाडूतील तिरुनेलवेली या दोनच ठिकाणी आहेत. रडार सोबत आणखीन चार उपकरणे या केंद्रामध्ये बसवण्यात आलेली आहेत. याचा सर्वात जास्त फायदा पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना होत असतो. याशिवाय डॉ. भोंसले यांनी पीआरएल मधून आणलेल्या काही रेडिओ दुर्बिणी (मोठे डिश अँटेना) भौतिकशात्र विभागाच्या टेरसवर लावल्या होत्या. यावरील निरीक्षणावरून काही प्रयोग आयोजित केले गेले होते. निवृत्तीनंतर डॉ. भोंसले यांनी कोल्हापूरच्या अवकाश संशोधनाच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. यासाठी पन्हाळ्यावरील अवकाश संशोधन केंद्राच्या भविष्यातील योजना आराखडा त्यांनी दिला असून त्यामुळे अवकाश संशोधन योगदानासाठी शिवाजी विद्यापीठाला जगाभरात मान्यता मिळणार आहे. याशिवाय शिवाजी विद्यापीठाचे नाव इस्रो व नासा यांच्याबरोबर जोडले गेले आहे.
इस्रो मध्ये नोकरी करत असल्यामुळे डॉ. भोंसले यांना डॉ. विक्रम साराभाई, डॉ. रामनाथन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. यू. आर. राव, डॉ. कस्तुरीरंजन, डॉ. गोवारीकर, डॉ. चिटणीस, डॉ. प्रमोद काळे अशा अनेक प्रख्यात खगोल शास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. निवृत्तीनंतरही त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या हेतूने त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस.सी.) ही मानाची पदवी २०१५ मध्ये बहाल केली होती. कोल्हापूर महानगरपालिकेने डॉ. भोंसलेना २००३ चा कोल्हापूर भूषण हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. ते महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्स व इंडियन अकादमी ऑफ सायन्स चे फेलो होते. फेब्रुवारी २०२० मध्ये संजय घोडावत विद्यापीठाने डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्नेह धाम आश्रमामध्ये डॉ. भोंसले यांचा सन्मान शिवाजी विद्यापीठाचे विद्यमान प्रकुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थतीत केला होता. डॉ. भोंसले यांच्या जीवन प्रवासातील हा अखेरचा सत्कार ठरला.
उत्तम व्यक्तिमत्त्व लाभलेले डॉ भोसले शेवटपर्यंत तंदुरुस्त होते. हसतमुख आणि विनोदबुद्धी जपलेल्या या कोल्हापूरच्या सुपुत्राने नेहमी विज्ञान प्रसार व प्रचाराच्या माध्यमातून तरुण पिढी घडवण्याचा ध्यास जपला होता. सर्वांसाठी ते एक प्रेमळ मित्र, प्रज्ञावंत मार्गदर्शक आणि सज्जन तत्वज्ञ होते. दर्जेदार शिक्षण तळागाळापर्यंत पोचले पाहिजे हीच त्यांची कायम धारणा होती. आज डॉ. आर. व्ही. भोंसले आपल्यात नाहीत परंतु त्यांनी लावलेल्या अवकाश संशोधनाचे रोपटे लवकरच वटवृक्षात रुपांतरीत होईल यात तिळमात्र शंका नाही. आज प्रथम पुण्यस्मरण दिनी त्यांच्या जीवन प्रवासाचा घेतलेला आढावा हीच त्यांच्यासाठी आदरांजली.
शब्दांकन:- डॉ. दादा नाडे, प्राध्यापक डॉ केशव राजपुरे
Saturday, June 12, 2021
स्थळ‒काळ आणि पुंजवाद
आइनस्टाइनच्या स्थळ‒काळ सिद्धांताचा विवाद
अल्बर्ट आइनस्टाईनने विसाव्या शतकात विविध सिद्धांत मांडून भौतिकशास्त्राची व्याख्याच जणू बदलून टाकली होती. सापेक्षतेच्या दोन सिद्धांताव्यतिरिक्त, आइनस्टाईनचे पुंजभौतिकी सिद्धांत, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आणि स्पेसिफिक हीटचा क्वांटम सिद्धांत इत्यादीच्या विकासातदेखील योगदान आहे. त्याने मांडलेल्या विविध सिद्धांतापैकी स्थळ-काळ सिद्धांत हा अजून देखील वैज्ञानिकांसाठी विवादाचा विषय ठरत आहे. व्यापक सापेक्षतेच्या सिद्धांतानुसार स्थळ-काळ सपाट नसून जड वस्तुमानाच्या वस्तूंमुळे वक्र आहे आणि ही वक्रता त्यातील वस्तूंच्या हालचालीस जबाबदार असते. काही निरीक्षणामुळे अलीकडेच असे सिद्ध झाले आहे की या सिद्धांताचे उल्लंघन झाले आहे. विश्वरूप नव्याने उलघडताना कदाचित विज्ञानातील या महत्त्वपूर्ण सिद्धांताचे पुनरावलोकन करावे लागेल असे दिसते.
विज्ञानाची क्रांती ही मानवी इतिहासाची जीवनवाहिनी आहे. भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राच्या इतिहासामध्ये खूप साऱ्या गोष्टी बदलल्या गेल्या. पृथ्वी सौरमंडळाच्या केंद्रस्थानी आहे ही कल्पना जवळजवळ एक हजार वर्षांहून अधिक काळ राहिली. त्यानंतर पृथ्वी सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर ग्रहांपैकी एखादा ग्रह मानला तर सौरमंडळ समजणे अधिक सोयीस्कर होईल असे कोपर्निकसने सांगितले. सुरुवातीस यास प्रचंड विरोध झाला पण अखेरीस नव्याने शोधलेल्या दुर्बिणीतून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे जुने भू-केंद्रीक चित्र लोप पावून कोपर्निकसनचे सूर्य-केंद्रीत चित्र जगासमोर आले. तर गुरुत्वाकर्षण बलामुळे पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि गुरुत्वाकर्षणशक्ती सर्व वस्तूंमध्ये अस्तित्त्वात असते हा महत्वाचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने मांडला. वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. त्याच्या कल्पनेनुसार आपण सूर्याभोवती त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे फिरत असतो. या सिद्धांताने विज्ञान विश्वात सुमारे अडीच शतके राज्य केले.
१९१५ साली आइनस्टाइने सापेक्षतेचा व्यापक सिद्धांत मांडत न्यूटनच्या या सिद्धांताला आव्हान दिले. आइनस्टाइनच्या मते गुरुत्वाकर्षण म्हणजे वस्तुमान असलेल्या कोणत्याही वस्तूने तिच्याभोवतीच्या काल-अवकाशात (स्थळ-काळ) निर्माण केलेली वक्रता होय. या सिद्धांताद्वारे त्याने बुध ग्रहाच्या कक्षेत असलेली विसंगती सुबकपणे स्पष्ट केली. १९१९ मध्ये आफ्रिकेच्या किनाऱ्यावरुन सूर्यग्रहणाच्या प्रसिद्ध निरीक्षणाद्वारे त्याची पुष्टी केली गेली. आइनस्टाइनच्या मते एका वक्राकार जागेमध्ये गुरुत्वाकर्षण निर्माण होते आणि विश्वातील सर्व वस्तु अंतराळ (स्थळ-काळ) नावाच्या चार-आयामी (वेळेचा समावेश केल्यास) विणलेल्या सपाट कापडासारख्या पृष्ठभागावर वसलेल्या आहेत. प्रचंड वस्तुमान असलेल्या सूर्यासारख्या वस्तूच्या वजनामुळे या चार-आयामी कापडावरती वक्रता निर्माण होते. पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे कारण ती सूर्यामुळे अवकाशात तयार झालेल्या वक्रतेच्या क्षेत्रात सापडते. हीच संकल्पना पृथ्वी आणि तिच्या चंद्र या उपग्रहा बाबतीत लागू होते. पृथ्वीची कक्षा ही याच वक्रतेचा परिणाम आहे. आइन्स्टाइनने व्यापक सापेक्षतेसाठीची क्षेत्र समीकरणे शोधून काढली. ही समीकरणे वस्तुमानाचा काल-अवकाशातील वक्रतेशी संबंध जोडतात.
जर एखादा व्यक्ति प्रचंड गुरुत्वाकर्षण किंवा प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत असेल तर त्याच्यासाठी काळाची गती संथ होईल. त्याच्या मते या शोधावरून आपण भूत आणि भविष्यकाळातील घटनांचे अनुमान लावू शकतो. ब्रह्मांडाच्या स्थळ‒काळ आलेखावरून त्याची उत्पत्ति आणि भविष्यकाळातील स्थितीचे अनुमान लावता येईल. हे स्थळ-काळाचे चित्र गेली १०० हून अधिक वर्षे विज्ञानाजगतात अधिराज्य करीत असून या संकल्पनेच्या सर्व विरोधकांना याने नामोहरण केले आहे.
२०१५ मध्ये लागलेला गुरुत्वलहरींचा शोध हे एक निश्चयात्मक निरीक्षण होते, परंतु, त्याच्या पूर्ववर्तींप्रमाणेच, हेदेखील गळून पडणारे होते. कारण भौतिकशास्त्राच्या प्राणिसंग्रहालयातील पुंजवाद सारख्या इतर मोठ्या प्राण्यांशी ते मूलत: विसंगत होते. पुंजवाद अगदी विलक्षण आणि गुंतागुंतीचा आहे. जेंव्हा आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीला "कण" म्हणतो तेंव्हा त्या गोष्टीची ती "आपल्याला माहित झालेली अवस्था" असते. त्याचे स्थान त्याचा आकार त्याची गती वगैरे. पण आपल्याला जेंव्हा यातले काहीच माहित नसते तेंव्हा पुंजभौतिकी नुसार हीच गोष्ट पुंजस्थिती मध्ये असते. यानुसार एकच कण एकाच वेळी दोन ठिकाणी असू शकतो. निरीक्षणापूर्वी आपण त्याच्या ठिकाणाची संभाव्यता मांडू शकतो. केवळ निरीक्षणाद्वारेच आपण त्यास ठिकाणाची निवड करण्यास भाग पाडू शकतो.
एरविन श्रॉडिंजरने हि संकल्पना श्रॉडिंजरचे मांजर नावाच्या एका काल्पनिक प्रयोगाद्वारे स्पष्ट केली आहे. एका मोठ्या पेटीत मांजर बंदिस्त केलेले असते. पेटीत एक किरणोत्सारी पदार्थ आणि त्याजवळ एक सेन्सर ठेवलेला असतो. सेन्सरला हातोडा टांगलेला असतो आणि हातोड्याखाली विषारी रसायन असलेली काचेची बंद कुपी असते. काही वेळानंतर एखादा किरणोत्सर्गी अणू बाहेर पडेल किंवा पडणार नाही (दोन्हीची संभवता समान आहे). पण जर जर पडलाच तर सेन्सर कार्यान्वित होईल आणि हातोडा बाटलीवर आदळून विषाची बाटली फुटून मांजराचा तत्काळ मृत्यू होईल.
या काल्पनिक प्रयोगाद्वारे पुंजभौतिकी मधली पुंजस्थिती (क्वांटम स्टेट) ची कल्पना स्पष्ट केली आहे. जेंव्हा पेटी बंद असते तेंव्हा तासाभराने मांजर "जिवंतमृत" अवस्थेत असते. म्हणजे जिवंत सुद्धा आणि मृत सुद्धा. (हि आपल्यासाठी काल्पनिक अवस्था आहे जी आपल्याला अनुभवता येणे शक्य नाही. आपल्याला एकतर मांजर जिवंत दिसेल किंवा मृत). म्हणजे त्या तासाभरात जर किरणोत्सर्गी पदार्थातून एखादा अणू बाहेर पडला असेल तर मांजर मृत झाले असेल अन्यथा मांजर जिवंत असेल. पण जेंव्हा पेटी उघडली जाते तेंव्हाच ते आपल्याला कळेल. म्हणजे तोवर मांजराची जिवंतमृत हि सुपरपोजिशन अवस्था अस्तित्वात असते. सर्व संभव अवस्था एकाचवेळी अस्तित्वात असणे यालाच पुंजस्थिती अवस्था म्हटले आहे.
या संकल्पनेबरोबर अखंड कापडाच्या सपाट स्थळ‒काळाच्या चित्राचा मेळ लावणे शक्य नाही. म्हणजे पुंजवादानुसार "गुरुत्वाकर्षण एकाच वेळी दोन ठिकाणी असू शकत नाही". आइन्स्टाईनच्या म्हणण्यानुसार स्थळ‒काळ हे द्रव्य आणि उर्जेने बनलेले असते परंतु पुंज यामिकीनुसार, पदार्थ आणि ऊर्जा एकाच वेळी एकापेक्षा जास्त अवस्थेत दोन्ही ठिकाणी असू शकतात. "मग गुरुत्वाकर्षण कुठे आहे?" होसेनफेल्डरने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी कोणाकडेच नाही. जर एक ही उच्चतम संभाव्यता मानली तर कोणतातरी एक परिणाम निश्चित असतो. एका विशिष्ट उर्जेच्यावर, आपणास एकापेक्षा अधिक संभाव्यता मिळते. पण आपण निश्चिततेच्या सीमेपलीकडे जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे, भौतिकशास्त्रातील गणना कधीकधी आपल्याला अनंत (इन्फिनिटी) उत्तर देतात, ज्याला अनैसर्गिकता म्हणतात. व्यापक सापेक्षता आणि पुंजवाद एकत्र कार्य करत नाहीत म्हणून ते गणिताशी विसंगत आहेत. त्यामुळे काही भौतिकशास्त्रज्ञ आता पुंजगुरुत्वाचा (क्वांटम ग्रॅव्हिटी) सिद्धांत शोधत आहेत. विश्वरचनाशास्त्रात पुंज सिद्धांत आणि व्यापक सापेक्षता सिद्धांत यांच्या एकत्रीकरणासाठी ‘पुंज गुरुत्व’ सारख्या संकल्पनेची गरज भासेल असे नोबेल पुरस्कार विजेते रॉजर पेनरोझ यांनी सांगितले होते.
पुंजगुरुत्वामध्ये त्यांनी तर्कसंगतपणे सुप्रसिद्ध स्ट्रिंग सिद्धांताची (स्ट्रिंगथेरी) मदत घेतली आहे. हा सिद्धांत स्ट्रिंग्सचा अवकाशातून संचार तसेच परस्परसंवाद याचे वर्णन करतो. यामध्ये इलेक्ट्रॉन आणि क्वार्क्स सारखे अतिसुक्ष्म प्राथमिक कण लहान कंपन होणाऱ्या दोरा किंव्हा तारेसारखे (स्ट्रिंग) वर्तन करत असतात असे मानले जाते. वेगवेगळे संगीत नोड्स तयार करण्यासाठी वाद्यांवर ज्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या तारा छेडतो तस स्ट्रिंग सिद्धांतांचा असा तर्क आहे की तारांची वेगवेगळी कंपने वेगवेगळे प्राथमिक कण तयार करतात. हा स्ट्रिंग्सच्या अनेक कंपनांपैकी एक म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती वाहणारे क्वांटम यांत्रिक कण; ग्रॅव्हिटनशी संबंधित आहे. स्ट्रिंगथेरी किमान कागदावर तरी व्यापक सापेक्षता आणि पुंजभौतिकी मध्ये समेट घडवू शकते. या सिद्धांतामध्ये ११ (चार-आयाम + ७) काल्पनिक आयाम वापरले आहेत. अद्याप हे सात अतिरिक्त आयाम अस्तित्त्वात असल्याचा कोणताही प्रयोगात्मक पुरावा उपलब्ध नाही. कदाचित आपणास हे एक मनोरंजक गणित वाटेल परंतु आपण ज्या ठिकाणी राहतो त्या स्थळ‒काळाचे वर्णन, अर्थात प्रयोगाअंती सिद्ध झाल्यास, यामार्फत केले जाऊ शकते. म्हणून या सिद्धांतास प्रायोगिक पुराव्यांची आवश्यकता आहे.
मग स्ट्रिंग थिअरीच्या कथित अंशतः अपयशातुन प्रेरित होऊन इतर भौतिकशास्त्रज्ञ लूप क्वांटम ग्रॅव्हिटी (एलक्यूजी) च्या पर्यायाकडे वळले. एलक्यूजी सिद्धांतानुसार कण आणि स्थळ-काळामधील संघर्षाचे निराकरण करण्यासाठी स्थळ आणि काळ बिटमध्ये थोडेसे विलग करावे - एक अंतिम पृथक्करण ज्याच्या पलीकडे मोठे होऊ शकत नाही. त्यांचा असा कयास आहे की, स्थळ-काळ हे वळसा घातलेल्या कपड्याच्या (इंटरव्होव्हन लूप) गुंफणातून बनलेले आहे. हे अंशतः कापडाच्या लांबीसारखे असते. प्रथमदर्शनी जरी ते एका गुळगुळीत आणि सपाट कापडासारखे दिसत असले तरी बारकाईने पाहिल्यास जाळीप्रमाणे भासते. वैकल्पिकरित्या, हे संगणकाच्या स्क्रीनवरील छायाचित्र झूम केल्यानंतर ते वास्तविकपणे लहान लहान पिक्सेलने बनलेले दिसते. पण एलक्यूजीत भौतिकशास्त्रज्ञानी सुचवलेले स्थळ‒काळ सिद्धांतामधील दोष हे फक्त प्लँकने तयार केलेल्या मापणाच्या पद्धतीमध्येच (प्लँक स्केल) दिसून येतात. असे असले तरी स्थळ‒काळ सिद्धांत केवळ मापकपट्टीवर भिन्न असेल आणि कोणत्याही कण प्रवेगकात हे तपासणे कठीण होईल. यासाठी आपणास सीईआरएन (युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च) येथील लार्ज हॅड्रॉन कोलायडर (एलएचसी) पेक्षा एक हजार ट्रिलियन (एकावर बारा शून्ये इतकी संख्या)-पट मोठ्या अणू स्मॅशरची आवश्यकता भासेल. तरीसुद्धा स्थळ‒काळाच्या या सूक्ष्म दोषांचे निरीक्षण करणे कठीण जाईल. पर्यायी यासाठी मोठी जागा गृहीत धरणे सोयीचे ठरेल असे मत काहीनी मांडले.
विश्वाच्या दूरदूरच्या ठिकाणाहून येणारा प्रकाश कोट्यवधी प्रकाश-वर्षांच्या अंतराचा प्रवास करत असतो. त्याने बरेच स्थळ-काळ पृष्ठभाग कापलेले असतात. प्रत्येक स्थळ‒काळ दोषाचा प्रभाव अल्प असेल, परंतु प्रचंड अंतरामुळे असे बहुविध अल्प दोष एकत्र येऊन संभाव्यरित्या निरीक्षण करण्यायोग्य स्थिति बनू शकते. गेल्या दशकापासून, एलक्यूजीच्या समर्थनार्थ पुरावे शोधण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ दुरवरच्या ताऱ्यांचे आयुष्य संपल्यानंतर त्यांच्या स्फोटातून निर्माण होणाऱ्या गॅमा किरणांचा अभ्यास करत आहेत. गॅमा किरणांचे गुणधर्म हे दूरस्थ विस्फोट कि स्थळ‒काळ सिद्धांतामधील दोष यामुळे आहेत याबद्दलचे गमक खगोलशास्त्रज्ञ अजूनदेखील समजू शकले नाहीत.
आइनस्टाइनच्या म्हणण्यानुसार, स्थळ‒काळ पृष्ठभाग त्यावरील ग्रह, तारे इत्यादी घटकांवर अवलंबून नसून स्वतंत्रपणे अस्तित्वात असतो. तथापि, लॉरेन्ट फ्रीडेल, रॉबर्ट लेह आणि जोर्डजे मिनीक या शास्रज्ञाच्यामते स्थळ‒काळ पृष्ठभाग त्यातील घटकांपासून स्वतंत्रपणे अस्तित्वात नसतो. त्याच्यातील घटकांच्या परस्परसंवाद करण्याच्या पद्धतीने स्थळ‒काळ परिभाषित केला जातो. ही कल्पना आइन्स्टाईनच्या स्थळ‒काळ आणि पुंजवादामधील एक दुवा म्हणून काम करू शकते. मिनीक मानतात की ही धारणा विलक्षण असली तरी समस्या निराकरणाचा हा अगदी तंतोतंत मार्ग आहे. या सिद्धांताचे आकर्षण पाहता याला परिवर्तनसुलभ अर्थात मॉड्यूलर स्थळ‒काळ असे म्हटले गेले.
मॉड्यूलर स्थळ‒काळाचा वापर करून आपण सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील स्थानबद्धता आणि पुंजवादी गुंतागुंत (क्वांटम एंटॅग्लिमेंट) सारखी दीर्घकालीन समस्या सोडवू शकतो. क्वांटम एंटॅग्लिमेंटनुसार दोन कण एकत्र आणून त्यांच्या क्वांटम गुणधर्मांना जोडण्याची स्थिती निश्चित करता येऊ शकते. त्यानंतर त्यांना मोठ्या अंतरावर विभक्त करूनसुद्धा त्यांनी दुवा साधलेले दिसते. एखाद्याचा गुणधर्म बदलला की त्वरित दुसर्या्चे गुणधर्म बदलतात कारण येथे माहिती ही प्रकाशाच्या गतीपेक्षा अधिक गतीने एकापासून दुसऱ्याकडे जाते. म्हणजेच ही घटना आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे उल्लंघन करते. याला मॉड्यूलर स्थळ‒काळ सिद्धांत पूर्णपणे समर्थन देतो. सध्या शास्त्रज्ञानी यावर लक्ष केंद्रित केले असून ते हळूहळू प्रगती करत आहेत. त्यांच्या मते हे विलक्षण आणि रोमांचकारी आहे. आपली आत्ताची सर्व उपकरणे केवळ पुंज यामिकी सिद्धांतामुळेच कार्य करतात. जर आपणास स्थळ‒काळ आणि पुंजवाद संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजलया तर त्याचा उपयोग भविष्यातील तंत्रज्ञानवृद्धीवर होईल.
- श्री रुपेश पेडणेकर आणि प्राध्यापक डॉ केशव राजपुरे
अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर
यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...

-
कृत्रिम बुद्धिमत्ता: आपल्या दैनंदिन जीवनात बदल घडवणारी क्रांती आणि २०२४ चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक दररोज जाणतेअजाणतेपणे आपण आर्टिफिश...
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (संशोधनावर आधारित उच्च शिक्षण) दोन महिन्यापूर्वी भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने नवीन ...
-
ज्ञानदानाची ज्योत (पिढी घडवणारा शिक्षक) ( माझ्या शैक्षणिक प्रवासात, एका प्रामाणिक प्राध्यापकापासून ते संशोधकापर्यंतचा अनुभव आहे. शाळेतील आवड...