आपल्याकडे चिमुकल्यांवर तीन भाषांचे ओझे लादण्याचा प्रकार चालू असताना दक्षिण कोरिया सारखा देश मातृभाषेत शिक्षण घेऊन स्वयंपूर्ण का झाला याचा आपण कधीच विचार केला नाही. मातृभाषेतील ज्ञान खोलवर रुजतं याचं जीवंत उदाहरण म्हणून आपण दक्षिण कोरियाकडे पाहू शकतो. भारतात शेपाचशे वर्षापूर्वी तयार झालेली हिंदी अनेक भाषांसाठी मारक ठरली आहे. पण तरीही आपल्याकडे हिंदी लादण्याचा प्रयत्न होत आहे. बहुभाषांचे ओझे न देताही आपण प्रगतीकडे वाटचाल करू शकतो याच्यासाठी हा लेखप्रपंच..
मायमराठी: आपली मातृभाषा, आपली ताकद
सध्या महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीचा विषय चांगलाच गाजतोय. विविध सामाजिक स्तरांतून विरोध होऊ लागल्यावर सरकारला यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. निर्णय, आंदोलनं, स्पष्टीकरणं, अंमलबजावणी या साऱ्या राजकारणापलीकडे जाऊन विचार केला, तर मुळात हिंदीची गरज काय, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. मातृभाषा, ज्ञानभाषा आणि रोजगारभाषा या तिन्हीपैकी हिंदी आपल्यासाठी काहीच नाही. मी सध्या ज्या देशात राहतो, त्या दक्षिण कोरियाने कोरियन भाषेला ज्ञानभाषा व रोजगारभाषा करून, मातृभाषेतूनही प्रगती साधता येते हे दाखवून दिलं आहे. सॅमसंग, ह्युंदाई, पोस्को, किया, एलजी यांसारख्या जगावर राज्य करणाऱ्या कंपन्या याची उत्तम उदाहरणं आहेत.
महाराष्ट्राच्या एक तृतीयांश क्षेत्रफळाचा आणि अवघ्या पाच कोटी लोकसंख्येचा, जगाच्या नकाशावर भिंग लावून शोधावा लागणारा हा चिमुकला देश, अवघ्या पंधरा-वीस वर्षांत जागतिक प्रगत देशांच्या यादीत स्थान मिळवतो. १९९५ पर्यंत गरीब असलेला हा देश २०१० पर्यंत यशाची अनेक शिखरं सर करतो. याची कारणमीमांसा करण्यासाठी त्यांच्या शिक्षणव्यवस्थेच्या मुळाशी जावं लागतं. प्रगत होण्यासाठी जेव्हा त्यांनी पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा त्यांनी सर्वात आधी काय केलं असेल तर सर्व ज्ञानस्रोत मातृभाषेत उपलब्ध केले. माणूस मातृभाषेत जितकं ग्रहण करू शकतो, तितकं अन्य कोणत्याच भाषेत करू शकत नाही. इथल्या विद्यार्थ्यांना कदाचित इंग्रजीत व्यक्त होता येत नसेल, पण त्यांचं विषयज्ञान आपल्यापेक्षा कितीतरी खोल आहे, हे पावलोपावली दिसून येतं. मुळात, कोरियन लोकांना त्यांच्या मातृभाषेवर पराकोटीचं प्रेम आहे आणि त्यातच त्यांना हवं ते शिक्षण मिळाल्याने त्यांचं ज्ञान अत्यंत दृढ झालं आहे. मागच्या आठवड्यात आमच्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक चॉई यांचं आम्हा भारतीय संशोधकांसाठी व्याख्यान आयोजित केलं होतं. भारत-कोरियाच्या दोन हजार वर्षांच्या प्राचीन ऐतिहासिक संबंधांपासून ते येणाऱ्या भविष्यातील वाटचालीपर्यंत त्यांनी आमच्याशी मनमोकळा संवाद साधला. ते पूर्णपणे कोरियन भाषेत सुंदर सादरीकरण करत होते आणि समाजशास्त्र विषयाच्या एक प्राध्यापिका त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करून आम्हाला सांगत होत्या. पण सरांची विषय मांडणी इतकी प्रभावी होती की, आम्हाला भाषांतराची गरजच वाटली नाही. आता एक क्षणासाठी हीच घटना भारतात गृहीत धरा. जर कोणत्या कुलगुरूंनी आंतरराष्ट्रीय समूहासमोर मराठीत सादरीकरण केलं तर? आपले विचार काय असतील? एका शब्दात सांगायचं तर 'कमीपणा'. का बरं? मातृभाषा कमी असते का?
आज आपल्याला कुणीही कोरियन माणूस परदेशात जाऊन नोकरी मागताना दिसत नाही, कारण मातृभाषेतील शिक्षणामुळे त्यांना इथेच अनंत संधी निर्माण झाल्या आहेत. मातृभाषेतील शिक्षणामुळे इथली प्रतिभा व कौशल्य स्वतःच्या प्रगतीसाठी उपयोगी पडत आहे.
इतर भाषा येत नाहीत किंवा आपल्या सरकारच्या ओझं लादणाऱ्या धोरणाप्रमाणे तीन भाषा येत नाहीत म्हणून एखाद्या कोरियन माणसाचं कुठे काही अडलंय असं कुठेच दिसत नाही. जर त्यांना परदेशात जाण्याची इच्छा झाली, तर ते शिक्षण घेत असताना एखाद्या वर्षाची इंग्रजी शिकवणी घेतात आणि मन लावून, तेही आनंदाने शिकतात, पण मातृभाषेला कधीच दुय्यम लेखत नाहीत.
कोरियन माणसांच्या उदाहरणातून काही शिकावं की नाही, हा आपला प्रश्न आहे. पहिलीपासून हिंदी शिकवून मराठी पोरांना कोणता 'तीर' मारायचा आहे, हेच कळत नाही. कारण हिंदी आपली मातृभाषा नाही, ज्ञानभाषा देखील नाही आणि रोजगारभाषा तर मुळीच नाही. आणि हो, एखादा राजकारणी येऊन अक्कल पाजळू लागला की मुलांनी अनेक भाषा शिकाव्यात, त्यांना संधी निर्माण होतील वगैरे वगैरे, तर आपण त्याला मुळीच बळी पडू नये, कारण आपल्याकडे पाचवीपासून हिंदी पूर्वीपासूनच आहे.
व्यापक विरोध पाहून सरकारने हिंदी सक्ती नसून, अन्य कोणतीही आवडीची भाषा शिकण्याचा पर्याय आपल्यापुढे ठेवला आहे. मुळात, सध्या शिक्षक भरती होत नाहीये. त्यात जर कोल्हापूर सीमाभागात मुलांना कानडी शिकण्याची इच्छा झाली किंवा नांदेड सीमाभागात तेलुगू शिकण्याची इच्छा झाली, तर त्यासाठी सरकार कोणता शिक्षक देणार आहे? की अशा भाषांच्या पर्यायांआडून हिंदी लादण्याचाच डाव आहे, हेच संदिग्ध आहे.
आज महाराष्ट्रात हिंदीला प्रत्येक स्तरावरून विरोध होत आहे. खेळण्याबागडण्याच्या वयात हिंदीचं ओझं लहान मुलांवर देऊ नये, असं अनेकांना प्रामाणिकपणे वाटत आहे. हिंदी सक्तीमुळे मराठी आणखी तळाला जाईल, अशीही भीती अनेक प्रज्ञावंतांनी बोलून दाखवली आहे. ही भीती खोटी नाही. परवा कुठेतरी एक पोस्ट वाचली, ज्यात लिहिलं होतं की, हिंदीच्या तोंडाला रक्त लागलं आहे. तिने अनेक भाषांचा घोट घेतला आहे. हे विधान कुणी केलं, आठवत नाही, पण ते अगदी बरोबर आहे. हिंदी तशी अलीकडची भाषा आहे; मध्ययुगीन परकीय आक्रमणकर्त्यांनी तिला आकार दिला. ज्यांना हे पटत नाही, त्यांनी हिंदीचा इतिहास सविस्तर वाचावा. हिंदीने उत्तर भारतातील अनेक भाषा संपवल्या आहेत, ज्यात ब्रज, अवधी, बघेली, बुंदेली, हरियाणवी, राजस्थानी अशा अनेक भाषांचा समावेश आहे. आज मराठीवरही तिचं अतिक्रमण आपण पाहत आहोत. जर पहिलीपासून ती मुलांवर बिंबवली, तर मराठी आणखी तळाला जाईल.
या विषयावर मी अनेक विद्वानांच्या मुलाखती पाहिल्या. त्यांनी मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे, हे अभिनंदनीय आहे. त्यातल्या एकाने मराठी माणसाला अल्पसंतुष्टी म्हटलं होतं, कारण आपण लगेच खूश होतो. जर एखाद्या हिंदी कलाकाराने मोडकीतोडकी चार मराठी शब्द बोलले, तर आपण अभिमानाने छाती फुगवतो, पण महाराष्ट्राची भाकर खाऊनही त्यांना अजून मराठी का येत नाही, याचा विचार करत नाही, असं त्यांचं मत होतं. महानगरात दोन मराठी माणसं हिंदी का बोलतात, याचं कोडं सुटत नाही. माझा अनुभव तर खूप वेगळा आहे. देश सोडताना मुंबई विमानतळावर विमानात बसेपर्यंत मी सर्वांशी मराठी बोललो. हिंदीने सुरुवात करणारा देखील पुढच्या वाक्यात माझ्याशी मराठी बोलला.
असो, जास्त काही लिहीत नाही. मराठी माणसांची वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे, असं अनेकजण म्हणतात. जर इथपर्यंत वाचलं असेल, तर मी माझं भाग्य समजतो. अभिजात मायमराठीची सेवा करण्यासाठी, तिला समृद्ध करण्यासाठी गेल्या दोन-अडीच हजार वर्षांत अनेकांच्या लेखण्या झिजल्या. महाराष्ट्रीपासून आधुनिक मराठीचं स्वरूप घेईपर्यंत, म्हणजे लिखित स्वरूपात हालराजाच्या गाथासप्तशतीपासून, पुष्पदंत कवींच्या लोककल्याणभावनेपासून, म्हाइंभटांच्या लीळाचरित्रापासून, मुकुंदराजांच्या विवेकसिंधुपासून, ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेपासून, तुकोबांच्या गाथांपासून आज आपण शेवटचं जेव्हा केव्हा स्वतःचं नाव मराठीत लिहिलं असेल, तिथपर्यंत मराठीमाउलीने अनेक हृदय प्रफुल्लित केली आहेत. अमृताशीही पैजा जिंकल्या आहेत, पण आज मूठभर लोकांना खूश करण्यासाठी चाललेली हिंदीची सक्ती झेलत आपल्याच घरात मराठीने अजून किती हाल सोसावे?
मागच्या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना मिळाला. आपण अनेक आधुनिक मराठी लेखकांची नावं सांगतो, पण त्यांचं साहित्य आपण जगात न्यायला कमी पडलो आहोत. कोरियन लोकांनी हान कांगला डोक्यावर घेतलं. अवघ्या पाच कोटी कोरियन भाषिकांसाठी त्यांनी लिहिलेल्या 'द व्हेजिटेरियन' या अचानक शाकाहारी झालेल्या कोरियन बाईच्या कथेला कोरियन लोकांनी जगात पोहोचवलं. आपण पंधरा कोटी असूनही का पोहोचवू शकत नाही? प्रेम कमी पडतंय का कुठेतरी?
एक संक्षिप्त विचार: महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे, पण मातृभाषा, ज्ञानभाषा आणि रोजगारभाषा म्हणून मराठीचे महत्त्व अनमोल आहे. दक्षिण कोरियासारख्या देशाने मातृभाषेतून प्रगती साधून हे सिद्ध केले आहे. आपल्या मुलांवर हिंदीचे अनावश्यक ओझे लादण्याऐवजी, मराठीला अधिक बळकट करण्याची गरज आहे. शाळांमध्ये मराठीचे महत्त्व रुजवून, तिला ज्ञानभाषा व रोजगारभाषा बनवण्यासाठी प्रयत्न करावेत. विज्ञान-तंत्रज्ञान मराठीतून उपलब्ध करून, करिअरच्या संधी निर्माण कराव्यात. शासकीय आणि खाजगी क्षेत्रांत मराठीचा वापर सक्तीचा करावा. शिक्षकांची भरती करून, विद्यार्थ्यांना आवडीनुसार भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. राजकीय दबावाला बळी न पडता, मराठीच्या हितासाठी ठाम भूमिका घ्यावी. मराठी माणसांनी आपल्या भाषेत बोलण्याचा अभिमान बाळगावा. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी..
शब्दांकन- डॉ. सूरज मडके (योंगनम विद्यापीठ, दक्षिण कोरिया)
संपादन- प्रा. डॉ. केशव राजपुरे