Wednesday, April 30, 2025

शिकण्याची ओढ आणि एका शिक्षकाचा आदर्श

ज्ञानदानाची ज्योत (पिढी घडवणारा शिक्षक)

(माझ्या शैक्षणिक प्रवासात, एका प्रामाणिक प्राध्यापकापासून ते संशोधकापर्यंतचा अनुभव आहे. शाळेतील आवड, चांगल्या शिक्षकांचा प्रभाव आणि खरं ज्ञान समजून घेण्याचं महत्त्व यात आहे. भौतिकशास्त्र शिकवतानाचे आव्हान आणि सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न यात समाविष्ट आहे. अध्यापनासोबतच संशोधन आणि सामाजिक बांधिलकीतून एक शिक्षक मार्गदर्शक कसा असतो हे दिसते. विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी यावर भर दिला आहे. प्रामाणिकपणा आणि निष्ठा एका आदर्श शिक्षकासाठी महत्त्वाचे आहेत.)


काल एका विद्यार्थ्याचा अनपेक्षितपणे आलेला फोन भूतकाळाच्या दालनात घेऊन गेला. दहा वर्षांपूर्वी एम.एस्सी. पूर्ण केलेला तो तरुण, आज एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याच्या आवाजातील शिकवण्याची तीव्र तळमळ आणि माझ्या अध्यापन शैलीबद्दलची आदरयुक्त उत्सुकता माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण करून गेली. त्याच्या प्रश्नांमधून त्याला कदाचित माझ्या पावलावर पाऊल ठेवून तरुण पिढी घडवण्यासाठी योगदान देण्याची इच्छा स्पष्टपणे जाणवत होती. त्याला मी एका प्रामाणिक प्राध्यापक आणि समर्पित संशोधकाच्या जीवनाची, अर्थात माझी यशोगाथा सांगितली. ही केवळ एक कथा नाही, तर ज्ञान निर्मितीच्या पवित्र कार्यात आणि राष्ट्राच्या प्रगतीमध्ये निस्वार्थपणे योगदान देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक नवोदित शिक्षकाला दिशा दाखवणारी एक प्रेरणादीप आहे.

माझ्या शालेय जीवनात अभ्यासाची असलेली नैसर्गिक ओढ आणि कठोर परिश्रमाची तयारी यामुळे मी नेहमीच उत्कृष्ट यश संपादन केले. सातत्यपूर्ण चिकाटीच्या जोरावर वर्गात अव्वल स्थान टिकवून ठेवण्यात मला यश मिळाले. या शैक्षणिक प्रवासात मला अनेक ज्ञानयोगी भेटले. त्यांनी मला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर विज्ञानाची गोडी लावली. त्यांच्या सोप्या शिकवण्याच्या पद्धतीमुळेच मला हे यश प्राप्त करणे शक्य झाले, याबद्दल माझ्या मनात आजही कृतज्ञतेची भावना आहे. भविष्यात आपणही याच ज्ञानयज्ञामध्ये आपले जीवन समर्पित करावे, अशी तीव्र इच्छा तेव्हा माझ्या मनात अंकुरली होती, परंतु हे स्वप्न साकार करणे किती कठीण आहे याची मला जाणीवही होती.

अकरावी आणि बारावीमध्ये गणित आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या विषयांची चांगली तयारी असल्यामुळे इतरांच्या तुलनेने  मला भौतिकशास्त्र अधिक सोपे वाटले. याच कारणामुळे, बीएससीसाठी मी भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि गणित या ग्रुपची निवड केली. माझ्या शैक्षणिक जीवनातील हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरदृष्टीचा निर्णय ठरला, ज्याने मला भविष्यात भौतिकशास्त्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी भक्कम पाया तयार करून दिला.

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणामध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत मानाचे स्थान मिळवले असले तरी, आज मागे वळून पाहताना मला स्पष्टपणे जाणवते की त्यावेळी मी केवळ एक निष्ठावान परीक्षार्थी होतो. अभ्यासक्रमातील गोष्टी कंठस्थ करून परीक्षेत चांगले गुण मिळवणे हेच माझे प्राथमिक ध्येय होते. विषय नेमके का शिकायचे आहेत आणि त्यांचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर कसा आणि किती प्रभाव पडणार आहे, याचा सखोल विचार त्यावेळी माझ्या तरुण मनात डोकावलाही नव्हता. त्यामुळे मी एका पारंपरिक पद्धतीने, पाठांतरावर अधिक भर देऊन माझा शैक्षणिक प्रवास सुरू ठेवला. असे नाही की मला विषयातील संकल्पना किंवा अभ्यासक्रम समजत नसे. मला तो समजत असे, पण तो कसा समजायला हवा होता आणि त्यावर विचार करून आपले मत कसे तयार करायचे, हे त्यावेळी समजत नव्हते, असे मला म्हणायचे आहे.

पदव्युत्तर शिक्षण घेत असताना माझ्या ज्ञानात भर पडली आणि मला एक महत्त्वपूर्ण सत्य उमगले की काही विषयांचा अभ्यास केवळ अभ्यासक्रमाच्या चौकटीत मर्यादित न ठेवता, त्यांची मुळे खोलवर रुजवून सखोलपणे अभ्यासणे अत्यावश्यक आहे. किंबहुना, त्या विषयांमध्ये खरी रुची निर्माण करून स्वतःहून अधिक ज्ञान मिळवणे हे यशाचे गमक आहे. जेव्हा मला हे स्पष्टपणे जाणवले की विषय स्वतः समजून घेतल्यास आणि त्यावर मनन केल्यासच आपण सेट किंवा नेटसारख्या प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षांमध्ये सहज यश मिळवू शकतो, तेव्हा माझ्या अभ्यासाची दिशा पूर्णपणे बदलली.

जेव्हा मी खऱ्या अर्थाने संकल्पना आणि सिद्धांतांचा अर्थ लावत, विचारपूर्वक वाटचाल करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या लक्षात आले की मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे किती महत्त्वाचे आहे, ज्यावर मी पूर्वी कधी गंभीरपणे विचारच केला नव्हता. माझ्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला, कारण याच काळात मला जिथे शिकलो त्याच विद्यापीठात शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा माझ्यावर तुलनेने महत्वाचे आणि क्लिष्ट विषय शिकवण्याची मोठी जबाबदारी विभागाने सोपवली—विशेषतः क्लासिकल मेकॅनिक्स, ॲटॉमिक फिजिक्स, क्वांटम मेकॅनिक्स, इलेक्ट्रोडायनामिक्स आणि स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स यांसारख्या पूर्णपणे सैद्धांतिक विषयांतील अध्यापनाची, ज्यामध्ये वस्तूंच्या हालचाली, अणूंची संरचना, कणांचे जग, विद्युत-चुंबकीय क्षेत्र आणि मोठ्या प्रणालींच्या गुणधर्मांचा अभ्यास समाविष्ट होता, ज्या भौतिकशास्त्राच्या पुढील अभ्यासासाठी आणि उपयोजनांसाठी आवश्यक असतात.


माझे स्पेशलायझेशन सॉलिड स्टेट फिजिक्समध्ये असल्याने, हे पूर्णपणे सैद्धांतिक विषय, जरी मी ते एमएससीमध्ये शिकलो होतो तरी तेव्हा शिकवणे माझ्यासाठी एक मोठे आव्हान होते. अशा स्थितीत तत्कालीन ज्येष्ठ प्राध्यापकांच्या सततच्या प्रोत्साहनाने, मौल्यवान मार्गदर्शनामुळे आणि मदतीने मी विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला अभ्यासक्रम काळजीपूर्वक समजून पाठांतर करून तसेच नोट्स लिहून देऊन संथ सुरुवात केली. यथावकाश मला जाणवले की विद्यार्थ्यांना माझी शिकवण्याची पद्धत आवडत आहे. विद्यार्थ्यांमधील काही जण माझ्याकडे येऊन त्यांच्या अडचणी आणि अनुभव सांगायचे, ज्यामुळे माझा आत्मविश्वास आणखी उंचावला. 

मी एक साधा पण प्रभावी मार्ग अवलंबला होता – कठीण आणि क्लिष्ट संकल्पनांना थेट न भिडता, मी विद्यार्थ्यांना हळूवारपणे त्या संकल्पनेच्या जवळ घेऊन जायचो आणि अधिक सखोल अभ्यासासाठी त्यांची मानसिकता तयार करायचो. संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगत आणि त्या आपल्या दैनंदिन जीवनात कशा महत्त्वाच्या आहेत हे पटवून द्यायचा प्रयत्न करायचो. एकदा का विषय समजायला लागला की मग शिकण्यातही खूप मजा येते आणि सगळं लवकर लक्षात राहतं. इतक्या वर्षात पडलेल्या प्रश्नांची उत्तरे कोसळणाऱ्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे एकापाठोपाठ एक समजू लागतात. या दृष्टिकोनामुळेच विषय सोपा आणि आवडीचा बनतो !

माझ्यासारख्या नवख्या शिक्षकांसाठी ही एक अत्यंत प्रभावी युक्ती ठरली. या अध्यापन काळात अनेक मूलभूत आणि क्लिष्ट संकल्पना माझ्याही अधिक स्पष्ट झाल्या. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान माझ्या मनात असलेल्या अनेक शंका या दोन वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवातून आपोआप दूर झाल्या. याचा सर्वात आश्चर्यकारक आणि सकारात्मक परिणाम असा झाला की मी व्याख्यातापदासाठीची अत्यंत महत्त्वाची SET परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालो. माझ्या कायमस्वरूपी नोकरीसाठी ही परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा होती. अध्यापनातूनच माझ्या ज्ञानात भर पडली. 

आजतागायत माझ्या कारकिर्दीत मी कधीही ज्ञानदानाच्या कामात निष्काळजीपणा दाखवला नाही. शिकवताना मी कधीही तयार केलेल्या लेक्चर नोट्स किंवा पाठ्यपुस्तक सोबत ठेवलेले आठवत नाही आणि बहुतेक वेळा मी प्रत्येक तासाच्या तयारीसाठी दोन ते तीन तास समर्पित करत असतो. विषयाची उत्तम तयारी, विद्यार्थ्यांप्रती प्रामाणिकपणा आणि वक्तशीरपणा ही त्रिसूत्री माझ्यासाठी भौतिकशास्त्राचा एक प्रामाणिक आणि निष्ठावान शिक्षक बनण्यास निश्चितच मदतगार ठरली. ज्ञानदानातील निष्ठा, तयारी आणि प्रामाणिकपणामुळे आदर व विश्वास मिळाला.

मी हळूहळू कठीण आणि गुंतागुंतीचे विषय सोप्या आणि सहज समजेल अशा पद्धतीने शिकवण्याचे खास कौशल्य आत्मसात केले आणि विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञानावर आधारित नव्हे, तर न्यूमरिकल आणि प्रॉब्लेम वर आधारित प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, वर्गात प्रत्येक विषयाचे १०० पेक्षा जास्त गणिते सोडवली ज्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थी SET आणि NET सारख्या प्रतिष्ठित परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवू शकले. याचमुळे माझ्यात अध्यापनाच्या प्रभावी आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनाची निर्मिती झाली. 

आजही बरेच विद्यार्थी भौतिकशास्त्र विषयाला खूप कठीण समजतात. जे डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्यासाठी तयारी करत आहेत, त्यांना तर हा विषय नकोसा वाटतो. कारण अनेकदा त्यांना चांगले शिक्षक मिळत नाहीत. एका चांगल्या शिक्षकाचे काम फक्त अभ्यासक्रम संपवणे नसते, तर विद्यार्थ्यांना या विषयात आवड निर्माण करणे, अवघड गोष्टी सोप्या पद्धतीने शिकवणे आणि त्यांच्या मनात आत्मविश्वास भरणे हे असते. म्हणूनच, गरज आहे अशा शिक्षकांची जी केवळ माहिती न देता, विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्राच्या अभ्यासात रमवून टाकतील आणि त्यांच्या यशाचा मार्ग सुकर करतील.

मला क्रिकेट खेळायला खूप आवडते. मी विद्यार्थ्यांमध्ये लहान होऊन क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे मैदानावर विद्यार्थ्यांशी माझी मैत्री व्हायची. वर्गात मी थोडा शिस्तप्रिय असलो तरी मैदानावर विद्यार्थी माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत. खेळामुळे आमच्यात विश्वास आणि आपुलकीचे नाते तयार झाले. त्यामुळे ते माझे व्याख्यान कधी चुकवत नसत आणि त्यांना फिजिक्स मध्ये पुन्हा रुची निर्माण व्हायला मदत व्हायची. तसेच, विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करणे, सहली काढणे आणि त्यांना वसतिगृहात भेटणे यामुळे आमची जवळीक आणखी वाढली. एका चांगल्या शिक्षकासाठी विद्यार्थ्यांशी असे मैत्रीपूर्ण आणि विश्वासाचे नाते असणे खूप महत्त्वाचे आहे.

आताच्या काळात मी शिकवण्याच्या पद्धतीत नवीन तंत्रज्ञान वापरणे सुरू केले. आधी ट्रान्स्परन्सी प्रोजेक्टर, मग एलसीडी प्रोजेक्टर आणि आता पॉवरपॉइंट वापरतो. त्यामुळे शिकवणे अधिक सोपे आणि प्रभावी झाले आहे. भौतिकशास्त्रातील अवघड समीकरणे आणि आकृत्या दाखवण्यासाठी मला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि विद्यार्थ्यांनाही विषय समजायला सोपे जाते, त्यांची भीती कमी होते. म्हणूनच, एक चांगला शिक्षक वेळेनुसार बदल स्वीकारतो आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून सांगतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा विषयातील रस वाढतो.

मी माझ्या पीएचडीपासूनच संशोधनात पूर्णपणे गुंतलो होतो. शिक्षक झाल्यावरही अनेक विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी माझ्यासोबत संशोधन केले आणि अजूनही माझे पीएचडी विद्यार्थी संशोधन करीत आहेत. आत्तापर्यंत आमचे दोनशेहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आणि त्यांना जगात खूप लोकांनी मान्यता दिली, ज्यामुळे मी जगातील टॉपच्या दोन टक्के संशोधकांच्या यादीत आलो. गेले ५ पाच वर्षे झाले या यादीत माझे नाव टिकून आहे. यामुळे मला फक्त चांगला शिक्षक नाही, तर एक चांगला संशोधक-शिक्षक म्हणून ओळख मिळाली. त्यामुळे शिकवण्यासोबतच माझ्या संशोधनाच्या कामाचाही माझ्या विद्यार्थ्यांवर चांगला आणि दूरगामी परिणाम झाला. म्हणूनच, एक आदर्श शिक्षक केवळ शिकवत नाही, तर तो स्वतःच्या कामातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीस दिशा दाखवतो.

मी 'जयहिंद फौंडेशन'च्या माध्यमातून शहीद सैनिकांच्या कुटुंबांसाठी काम करतो. यातून मी माझ्या विद्यार्थ्यांना समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो. त्यांना सामाजिक बांधिलकी आणि देशसेवेचे महत्त्व पटवून देतो, जेणेकरून ते मोठे झाल्यावर चांगले नागरिक बनून देशाच्या कामात मदत करतील. म्हणूनच, एक शिक्षक म्हणून मी केवळ शिकवण्यावर लक्ष केंद्रित करत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार आणि सामाजिक जाणीव रुजवण्यासाठीही प्रयत्नशील असतो. यामुळे ते केवळ चांगले विद्यार्थी नव्हे, तर चांगले माणूसही बनतात.

शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या मनात कायम आदर आणि प्रेम मिळवायचे असेल, तर त्याला नेहमी नवीन गोष्टी शिकत राहावे लागते. आजकाल जग खूप बदलत आहे, त्यामुळे शिकवण्याच्या पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या गरजाही बदलतात. शिक्षकाने नवीन ज्ञान आणि तंत्रज्ञान शिकले, तर तो विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवू शकतो. त्यासाठी कार्यशाळांमध्ये भाग घेणे, नवीन पुस्तके वाचणे किंवा ऑनलाइन अभ्यासक्रम करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच, सतत शिकत राहणे आणि बदलत्या जगासोबत जुळवून घेणे हे एका आदर्श शिक्षकाचे महत्त्वाचे लक्षण आहे.

शिक्षकाच्या जीवनातही चढ-उतार आणि अपयश येतात. एका चांगल्या शिक्षकाची ओळख म्हणजे तो आपल्या अपयशातून काय शिकतो. शिक्षकाने विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगून अपयशावर मात कशी करायची हे शिकवावे. आपल्या उदाहरणातून, शिक्षक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करण्यासाठी धैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास प्रवृत्त करू शकतो.

आजच्या शिक्षण पद्धतीत अनेक महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. केवळ पुस्तकातील कोरडे ज्ञान न देता, विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करायला शिकवणे आणि त्यांच्यातील जन्मजात कौशल्यांचा विकास करणे ही काळाची गरज आहे. शिक्षकांनी केवळ ज्ञान देणारे मार्गदर्शक न राहता, एक मित्र आणि विश्वासू सल्लागार म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली पाहिजे.

जेव्हा यशस्वी विद्यार्थी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात, तेव्हा ते इतरांना प्रेरणा देतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी चांगले संबंध ठेवावेत. शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचे यश-अपयश एकमेकांशी जोडलेले असते. त्यामुळे, विद्यार्थी नापास झाल्यास शिक्षकांवरही प्रश्न येतो. अर्थात, विद्यार्थ्यांची निष्काळजीपणा हे एक कारण असू शकते, पण शिक्षकाचे काम केवळ शिकवणे नसून मार्गदर्शन करणे देखील आहे.

शिकवताना विनोदी दृष्टिकोन ठेवल्यास, कठीण विषयही सोपे वाटतात. आनंदी वातावरणात विद्यार्थी उत्साहाने शिकतात आणि शिक्षकालाही आनंद मिळतो. सतत नवीन ज्ञान मिळवणे, अपयशातून शिकणे, शिक्षण पद्धतीवर विचार करणे, विद्यार्थ्यांच्या मतांचा आदर करणे आणि विनोदी स्वभाव यांसारख्या गुणांमुळे शिक्षक विद्यार्थ्यांचे आवडते बनतात.

आजकाल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे झटपट उत्तर देते. जरी प्रत्येक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट झाली नाही, तरी AI आपल्याला आवश्यक माहिती नक्कीच देते, ज्यामुळे आपण अंदाज लावू शकतो. असं वाटतं की AI शिक्षणाचं काम करतं, पण ते शिक्षकांची जागा कधीच घेऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःला अपडेटेड ठेवणं आणि AI च्या तुलनेत आपलं महत्त्व टिकवणं आवश्यक आहे. असं झाल्यास, विद्यार्थी शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच आदर देतील.


जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फेनमन हे एक महान शास्त्रज्ञ तसेच शिक्षक होते. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप प्रभावी आणि आकर्षक होती. ते कठीण संकल्पना सोप्या उदाहरणांच्या मदतीने विद्यार्थ्यांना सहज समजावून सांगायचे. त्यांच्या वर्गात विद्यार्थ्यांना कधीही कंटाळा येत नसे, कारण ते त्यांच्या विनोदी आणि उत्साही शैलीने त्यांना बांधून ठेवायचे. त्यांनी विद्यार्थ्यांना फक्त ज्ञान दिले नाही, तर त्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि प्रश्न विचारण्याची प्रेरणाही दिली. त्यांच्या मते, शिक्षकाला विषयाचे सखोल ज्ञान आणि शिकवण्याची तीव्र इच्छा असणे आवश्यक आहे. जरी मी स्वतःला फेनमन यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत ठेवण्याचा विचारही करणार नाही, तरी त्यांच्या असामान्य क्षमतांवर विचार केल्यास जगातील महान भौतिकशास्त्राच्या शिक्षकांमध्ये सातत्याने दिसणाऱ्या गुणांवर प्रकाश पडतो.



म्हणूनच, माझ्या एका विद्यार्थ्याचा आलेला फोन आणि त्याला सांगितलेली माझी गोष्ट हेच दर्शवतात की शिक्षक फक्त ज्ञान देणारे नसतात, तर ते विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवणारे मार्गदर्शक असतात. एक चांगला शिक्षक होण्यासाठी खूप प्रयत्न, विषयाची चांगली तयारी आणि विद्यार्थ्यांप्रती निष्ठा आवश्यक आहे. अशा शिक्षकांकडूनच प्रेरणा घेऊन अनेक तरुण विद्यार्थी यशस्वी होतात आणि आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये मदत करतात.

__\*|*/__

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...