Monday, February 24, 2025

नॅनोमटेरियल्स भविष्यवेध

 

नॅनोमटेरियल्स: वर्तमान संशोधन स्थिती आणि भविष्यवेध

न्यू कॉलेज कोल्हापूर येथे नॅनोमटेरियल्स या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य, आयोजक, संयोजक आणि महाविद्यालयाला मी धन्यवाद देतो. आजच्या या चर्चासत्रात 'सध्याची संशोधन स्थिती आणि भविष्याचा वेध' या अनुषंगाने नॅनोमटेरियल्समधील संशोधनावर मार्गदर्शन करणे, ही माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे.

बंधु आणि भगिनींनो,

आजकाल शिवाजी विद्यापीठात आणि महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक विद्यापीठांमध्ये मटेरियल सायन्समध्ये संशोधन चालते. हे संशोधन जरी भौतिकशास्त्राशी संबंधित असले, तरी ते बहुविद्याशाखीय आहे. मला असे वाटते की, भौतिकशास्त्र हा मूलभूत विज्ञानाचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यात संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे.

शिवाजी विद्यापीठातील संशोधनाचा इतिहास पाहिल्यास, तीस वर्षांपूर्वी फेराईट, लुमिनिसंट पदार्थ, सुपरकंडक्टर, सोलर सेल आणि त्यानंतर गॅस सेन्सर, इलेक्ट्रॉनिक मटेरियल, एमई कंपोझिट, मेमरीस्टर, फोटो कॅटेलासीस आणि आता सुपर कॅपॅसिटर असे विषय संशोधनासाठी निवडले गेले. प्रत्येक कालखंडात जो विषय 'हॉट टॉपिक' म्हणून चर्चेत असे, तोच संशोधनाचा विषय निवडण्याची पद्धत रूढ झाली. विद्यार्थ्यांनाही त्याच विषयात रस वाटे आणि शिक्षकही संशोधनासाठी तेच विषय देत असत. माझ्या मते, संशोधनाचा विषय हा कालसुसंगत बदलणे आवश्यक नाही. एकाच विषयात अतिशय सखोल संशोधन केल्यास चांगली प्रकाशने होऊ शकतात आणि ज्ञाननिर्मितीही होते.

आजकाल आपण नॅनो-नॅनो हा शब्द प्रत्येकाच्या तोंडून ऐकतो. नॅनो फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याचे गुणधर्म उत्कृष्ट असतात हे खरे आहे, पण ते तसेच का असतात? त्यामागील भौतिकशास्त्र काय? त्याचे क्वांटम मेकॅनिकल स्पष्टीकरण काय? याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

नॅनो मटेरियल तयार करणे हा संशोधनाचा विषय निवडल्यावर, सध्याच्या काळात या नॅनो मटेरियलमध्ये काय संशोधन होत आहे आणि कोणत्या ऍप्लिकेशन्ससाठी नॅनो मटेरियल तयार केले जात आहेत, याचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे. आजकाल कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, इको-फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल नॅनो मटेरियल, औषधांमध्ये विशेषतः टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी, स्पेस ऍप्लिकेशन्ससाठी नॅनो मटेरियल अशा क्षेत्रांमध्ये संशोधन करणे गरजेचे आहे.

नॅनो मटेरियल तयार करण्यासाठी बरीच रसायने वापरावी लागतात आणि या प्रक्रियेत आपण पर्यावरणाचा समतोल बिघडवतो. त्यामुळे नॅनो पार्टिकल मटेरियल तयार करण्याचे 'ग्रीन सिंथेसिस रूट' अवलंबणे आवश्यक आहे, जे कॉस्ट इफेक्टिव्ह आणि पर्यावरणास अनुकूल असेल.

आजकाल अनेक विद्यार्थी नोकरी नसल्यामुळे किंवा परदेशात चांगली फेलोशिप मिळते म्हणून पीएचडीकडे वळतात. पैसा मिळवणे हा उद्देश असला तरी, संशोधनात आपले शंभर टक्के योगदान देणे अपेक्षित आहे. नॅनो मटेरियल क्षेत्रात संशोधन करताना आपण ते तयार करतो, त्याचे गुणधर्म तपासतो आणि त्याचे ऍप्लिकेशन्स पाहतो. पण 'ते तसेच का मिळाले' याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देणे महत्त्वाचे आहे, जे आपण विसरतो.

संशोधन मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे वेळोवेळी अपडेट घेणे गरजेचे आहे. त्यांनी केलेल्या संशोधनावर लक्ष ठेवून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यांनी लिहिलेले पेपर किंवा थीसिस वाचून त्यात सुधारणा सुचवणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 'कॉपी कॅट्स' बनवण्याऐवजी 'थिंक टॅंक' बनवण्यावर भर द्यावा. जेणेकरून एकदा का विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी झाला, तर तो स्वतंत्रपणे संशोधनाचा विषय निवडू शकेल, संशोधन प्रकल्प लिहू शकेल, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकेल आणि स्वतंत्रपणे पब्लिकेशन करू शकेल.

आजकाल प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांनी याचा उपयोग संज्ञा समजून घेण्यासाठी, टेक्निकचे मूलभूत नियम समजून घेण्यासाठी किंवा थेअरी समजून घेण्यासाठी करावा. तसेच पेपरच्या पॅराग्राफचा ड्राफ्ट किंवा व्याकरण दुरुस्त करण्यासाठी करावा. परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पेपर किंवा थीसिस लिहिण्यासाठी किंवा प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी करू नये.

विद्यार्थ्यांनी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर भर द्यावा. जास्त पब्लिकेशन करण्याऐवजी थोडे पण चांगले पब्लिकेशन कसे होतील यावर लक्ष केंद्रित करावे. आणि हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही वापरलेली पद्धत, त्यातील सूक्ष्म निरीक्षणे, तुमचे मत आणि पदार्थाचे गुणधर्म तपासण्यासाठी वापरलेले टूल्स; जसे की एक्सआरडी, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप्स, रमन, इन्फ्रारेड, एक्स-रे फोटोइलेक्ट्रॉनिक्स स्पेक्ट्रोस्कोपी यांसारख्या टेक्निक्सची थेअरी आणि त्याचे बारकावे तुम्हाला माहीत असतील. हे तुम्हाला माहीत असेल, तर नक्कीच तुमच्याकडून चांगले पब्लिकेशन मिळतील, चांगले संशोधन होईल आणि तुम्ही ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हातभार लावाल. आणि विशेष म्हणजे, या संशोधन प्रक्रियेमध्ये तुम्हाला चांगले संशोधन संस्कार होतील.

धन्यवाद !









अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...