Monday, February 24, 2025

नॅनोमटेरियल्स भविष्यवेध

 

नॅनोमटेरियल्स: वर्तमान संशोधन स्थिती आणि भविष्यवेध

न्यू कॉलेज कोल्हापूर येथे नॅनोमटेरियल्स या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य, आयोजक, संयोजक आणि महाविद्यालयाला मी धन्यवाद देतो. आजच्या या चर्चासत्रात 'सध्याची संशोधन स्थिती आणि भविष्याचा वेध' या अनुषंगाने नॅनोमटेरियल्समधील संशोधनावर मार्गदर्शन करणे, ही माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे.

बंधु आणि भगिनींनो,

आजकाल शिवाजी विद्यापीठात आणि महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक विद्यापीठांमध्ये मटेरियल सायन्समध्ये संशोधन चालते. हे संशोधन जरी भौतिकशास्त्राशी संबंधित असले, तरी ते बहुविद्याशाखीय आहे. मला असे वाटते की, भौतिकशास्त्र हा मूलभूत विज्ञानाचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यात संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे.

शिवाजी विद्यापीठातील संशोधनाचा इतिहास पाहिल्यास, तीस वर्षांपूर्वी फेराईट, लुमिनिसंट पदार्थ, सुपरकंडक्टर, सोलर सेल आणि त्यानंतर गॅस सेन्सर, इलेक्ट्रॉनिक मटेरियल, एमई कंपोझिट, मेमरीस्टर, फोटो कॅटेलासीस आणि आता सुपर कॅपॅसिटर असे विषय संशोधनासाठी निवडले गेले. प्रत्येक कालखंडात जो विषय 'हॉट टॉपिक' म्हणून चर्चेत असे, तोच संशोधनाचा विषय निवडण्याची पद्धत रूढ झाली. विद्यार्थ्यांनाही त्याच विषयात रस वाटे आणि शिक्षकही संशोधनासाठी तेच विषय देत असत. माझ्या मते, संशोधनाचा विषय हा कालसुसंगत बदलणे आवश्यक नाही. एकाच विषयात अतिशय सखोल संशोधन केल्यास चांगली प्रकाशने होऊ शकतात आणि ज्ञाननिर्मितीही होते.

आजकाल आपण नॅनो-नॅनो हा शब्द प्रत्येकाच्या तोंडून ऐकतो. नॅनो फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याचे गुणधर्म उत्कृष्ट असतात हे खरे आहे, पण ते तसेच का असतात? त्यामागील भौतिकशास्त्र काय? त्याचे क्वांटम मेकॅनिकल स्पष्टीकरण काय? याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

नॅनो मटेरियल तयार करणे हा संशोधनाचा विषय निवडल्यावर, सध्याच्या काळात या नॅनो मटेरियलमध्ये काय संशोधन होत आहे आणि कोणत्या ऍप्लिकेशन्ससाठी नॅनो मटेरियल तयार केले जात आहेत, याचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे. आजकाल कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, इको-फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल नॅनो मटेरियल, औषधांमध्ये विशेषतः टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी, स्पेस ऍप्लिकेशन्ससाठी नॅनो मटेरियल अशा क्षेत्रांमध्ये संशोधन करणे गरजेचे आहे.

नॅनो मटेरियल तयार करण्यासाठी बरीच रसायने वापरावी लागतात आणि या प्रक्रियेत आपण पर्यावरणाचा समतोल बिघडवतो. त्यामुळे नॅनो पार्टिकल मटेरियल तयार करण्याचे 'ग्रीन सिंथेसिस रूट' अवलंबणे आवश्यक आहे, जे कॉस्ट इफेक्टिव्ह आणि पर्यावरणास अनुकूल असेल.

आजकाल अनेक विद्यार्थी नोकरी नसल्यामुळे किंवा परदेशात चांगली फेलोशिप मिळते म्हणून पीएचडीकडे वळतात. पैसा मिळवणे हा उद्देश असला तरी, संशोधनात आपले शंभर टक्के योगदान देणे अपेक्षित आहे. नॅनो मटेरियल क्षेत्रात संशोधन करताना आपण ते तयार करतो, त्याचे गुणधर्म तपासतो आणि त्याचे ऍप्लिकेशन्स पाहतो. पण 'ते तसेच का मिळाले' याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देणे महत्त्वाचे आहे, जे आपण विसरतो.

संशोधन मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे वेळोवेळी अपडेट घेणे गरजेचे आहे. त्यांनी केलेल्या संशोधनावर लक्ष ठेवून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यांनी लिहिलेले पेपर किंवा थीसिस वाचून त्यात सुधारणा सुचवणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 'कॉपी कॅट्स' बनवण्याऐवजी 'थिंक टॅंक' बनवण्यावर भर द्यावा. जेणेकरून एकदा का विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी झाला, तर तो स्वतंत्रपणे संशोधनाचा विषय निवडू शकेल, संशोधन प्रकल्प लिहू शकेल, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकेल आणि स्वतंत्रपणे पब्लिकेशन करू शकेल.

आजकाल प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांनी याचा उपयोग संज्ञा समजून घेण्यासाठी, टेक्निकचे मूलभूत नियम समजून घेण्यासाठी किंवा थेअरी समजून घेण्यासाठी करावा. तसेच पेपरच्या पॅराग्राफचा ड्राफ्ट किंवा व्याकरण दुरुस्त करण्यासाठी करावा. परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पेपर किंवा थीसिस लिहिण्यासाठी किंवा प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी करू नये.

विद्यार्थ्यांनी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर भर द्यावा. जास्त पब्लिकेशन करण्याऐवजी थोडे पण चांगले पब्लिकेशन कसे होतील यावर लक्ष केंद्रित करावे. आणि हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही वापरलेली पद्धत, त्यातील सूक्ष्म निरीक्षणे, तुमचे मत आणि पदार्थाचे गुणधर्म तपासण्यासाठी वापरलेले टूल्स; जसे की एक्सआरडी, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप्स, रमन, इन्फ्रारेड, एक्स-रे फोटोइलेक्ट्रॉनिक्स स्पेक्ट्रोस्कोपी यांसारख्या टेक्निक्सची थेअरी आणि त्याचे बारकावे तुम्हाला माहीत असतील. हे तुम्हाला माहीत असेल, तर नक्कीच तुमच्याकडून चांगले पब्लिकेशन मिळतील, चांगले संशोधन होईल आणि तुम्ही ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हातभार लावाल. आणि विशेष म्हणजे, या संशोधन प्रक्रियेमध्ये तुम्हाला चांगले संशोधन संस्कार होतील.

धन्यवाद !









Wednesday, January 29, 2025

heart-strok

 निरोगी हृदयासाठी जीवनशैली मंत्र


माझ्या वर्गमित्राच्या अकाली जाण्याने माझ्या मनाला चटका लावून गेला. त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनपेक्षितपणे ओढावलेल्या अशा प्रसंगास तोंड देण्यास कोणीही सज्ज नसते. मन हे स्वीकारायला तयार नसतं, मग भविष्याचा विचार कोण करेल? परंतु, नियती कोणालाही आपल्या भविष्याचा अंदाज बांधू देत नाही. 

आजकाल हृदयविकार, म्हणजेच हार्ट अटॅक आणि स्ट्रोक, म्हणजेच कार्डियाक अरेस्टमुळे अचानक मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, विशेषतः तरुणांमध्ये. हृदयविकारात रुग्ण वाचू शकतो, पण कार्डियाक अरेस्टमध्ये नाही. याचे मुख्य कारण म्हणजे रक्तदाबात अचानक वाढ होणे, ज्यामुळे हार्ट ब्लॉकेजेस होतात आणि रक्तातील ऑक्सिजनचा स्नायूंना होणारा पुरवठा खंडित होतो. हृदयाचे ठोके वाढणे किंवा चक्कर येणे आणि दवाखान्यात नेईपर्यंत सर्व काही संपणे हे देखील यात समाविष्ट आहे. सामान्यतः उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल, मधुमेह, आनुवंशिकता, आहारातील मिठाचे वाढीव प्रमाण, व्यसन, लठ्ठपणा, थायरॉईड, बैठी जीवनशैली, जन्मजात हृदयदोष, औषधांचा गैरवापर, 'प्रो-ॲरिथमिक' औषधे, कोविडची पार्श्वभूमी आणि व्यायामाचा अभाव अशी अनेक कारणे आहेत.

उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा. आपल्या जेवणात मुख्यत्वे भाज्या, फळे आणि धान्ये असावीत. शेंगा आणि नट्सपासून मिळणारी प्रथिने शरीरास आवश्यक असतात. आणि महत्त्वाचे म्हणजे जेवण नियंत्रित प्रमाणात ठेवावे. आहारात मीठाचे प्रमाण कमी करावे, फळे आणि भाज्या अधिक खाव्यात, नियमित व्यायाम करावा, वजन नियंत्रणात ठेवावे, ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करावी, डॉक्टरांसोबत नियमित फॉलो-अप भेटी घेणे आवश्यक आहे. तसेच धूम्रपान आणि मद्यपान टाळावे. 

हृदयविकार आणि ऍसिडीटी ची लक्षणे सारखीच असू शकतात हे विशेष आहे. ऍसिडीटी मध्ये श्वासोच्छ्वास, हृदयाचे ठोके वाढणे आणि छातीत दुखणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. हृदयविकाराच्या झटक्यामध्ये देखील छातीत दुखणे, श्वास लागणे आणि घाम येणे अशी लक्षणे दिसू शकतात. या दोन स्थितींमधील फरक ओळखणे महत्त्वाचे आहे, कारण दोन्हीसाठी वेगवेगळे उपचार आवश्यक असतात. 

पन्नाशीनंतर आपल्या शरीराला गृहीत धरणे योग्य नाही. शरीरातील लहान बदलांकडेही दुर्लक्ष करू नये, कारण शरीर आपल्याला नेहमीच काहीतरी संकेत देत असते. आपण त्याची नोंद ठेवली पाहिजे. आपणच आपले डॉक्टर असतो, कारण आपल्या शरीरात होणारे बदल सर्वप्रथम आपल्यालाच जाणवतात. त्यामुळे, कोणताही बदल जाणवल्यास त्याची नोंद घेणे आणि आपल्या कुटुंबाचा, मित्रांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आजाराकडे दुर्लक्ष बिलकुल करू नये.

दिवसातून किमान एक तास स्वतःसाठी राखून ठेवावा. त्यात दोन ते पाच किलोमीटर चालणे, योगासने, व्यायाम किंवा खेळांचा समावेश असावा. खेळ खेळताना आवश्यक खबरदारी घ्यावी. खेळल्यानंतर स्ट्रेचिंग व्यायाम करावा. ध्यानधारणा करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही तणाव असतोच. जोपर्यंत आपण तरुण आहोत, तोपर्यंत आपण त्या तणावांना समर्थपणे तोंड देऊ शकतो, परंतु वृद्धापकाळात आपले शरीर त्या ताणांना तोंड देऊ शकत नाही. यामुळे शरीराच्या रासायनिक संतुलनावर अनावश्यक ताण येतो, ज्यामुळे मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे, वेळेवर सावध होऊन योग साधना करणे आवश्यक आहे.

खबरदारी म्हणून वर्षातून एकदा आपल्या सर्व वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्यात. त्रास होत असेल तरच चाचण्या करून घेईन, असा विचार करू नका.  चाचण्या केल्याने आजारांची पूर्वसूचना मिळू शकेल. वेळेवर जागे व्हा आणि आपल्या निकटवर्तीयांना याबद्दल माहिती द्या. वेळ निघून गेल्यावर आपल्या हातात काहीही उरत नाही, म्हणून वेळ जाऊ देऊ नका कारण वेळ कोणाचीही वाट पाहत नाही.

हृदयविकार हा एक गंभीर आणि वाढता धोका आहे, जो कोणालाही होऊ शकतो.  अनेकजण उत्तम जीवनशैली जगत असताना, नियमित व्यायाम करत असताना आणि संतुलित आहार घेत असताना देखील हृदयविकाराचे बळी ठरतात.  याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरात होणारे सूक्ष्म बदल, ज्यांना आपण सहजपणे ओळखू शकत नाही.  शरीरात होणारे बदल इतके हळू असतात की अनेकदा लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत आणि त्यामुळे धोका वाढतो. काहीवेळा आनुवंशिकतेमुळे देखील हृदयविकार होऊ शकतो.  ज्या कुटुंबांमध्ये हृदयविकाराचा इतिहास असतो, त्या कुटुंबातील सदस्यांना हा धोका अधिक असतो.  याव्यतिरिक्त, काही लोकांच्या मनात हृदयविकाराबद्दल चुकीच्या कल्पना असतात.  उदाहरणार्थ, 'मला कधीच छातीत दुखलं नाही, त्यामुळे मला हृदयविकार होणार नाही,' असा विचार करणे धोक्याचे ठरू शकते.  हृदयविकार कधीही कोणालाही होऊ शकतो.  आजच्या धावपळीच्या जीवनात वाढलेला ताणतणाव हे देखील हृदयविकाराचे एक प्रमुख कारण आहे.  या सगळ्या कारणांमुळे, हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी नियमित तपासणी करणे, हृदयविकाराची लक्षणे ओळखणे, जीवनशैलीत आवश्यक बदल करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.  हृदयविकार गंभीर असला तरी तो टाळता येऊ शकतो, यासाठी जागरूकता आणि नियमित काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

पण एक मात्र नक्की कितीही मोठे डॉक्टर असले तरी हृदयविकार कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. डॉ नित्यानंद मांडके हे मुंबईतील एक प्रसिद्ध आणि यशस्वी हृदयरोग शल्यचिकित्सक होते. त्यांनी १०,००० हून अधिक हृदयरोग शस्त्रक्रिया केल्या, जो एक विक्रम आहे. वीस वर्षांपूर्वी मांडके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तसेच गुजरातमधील जामनगर येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ गौरव गांधी यांचे गेल्या वर्षी वयाच्या ४१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते एक प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक होते ज्यांनी १६,००० हून अधिक हृदय शस्त्रक्रिया केल्या. अर्थात, जर एखाद्याची घटका भरली असेल, तर वरील सर्व उपाय फोल ठरतात आणि नियतीचा विजय होतो, तिथे मात्र या उपाययोजना लागू होत नाही. मृत्यू अटळ आहे, हेही खरे आहे.

- प्रा केशव राजपुरे

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...