रूम पार्टनर
अरविंद तावरे एक वर्ग पाठीमागे असल्यामुळे तशी त्याची ओळख कॉलेजमधूनच. तो वर्गात हुशार असल्यामुळे सलगी होतीच. परंतु कॉलेज मध्ये असताना तो लक्षात राहिला ते त्याच्या वडिलांच्या आकस्मित जाण्याने. तो गणितामध्ये उत्कृष्ट होता म्हणून त्यास बीएससी ला गणित विषय ठेवायचा होता, पण लोणंदमध्ये हा विषय नव्हता. मग फलटण येथून त्यांन बीएससी केली. मेरीट मध्ये आल्यामुळे एमएससी साठी ॲडमिशन मिळालं. मी तेव्हा सेकंड इयर ला होतो. ऍडमिशन घेतल्यावर माझी भेट घेण्यास आला होता. मीही रूम पार्टनर म्हणून हुशार, होतकरू आणि गाववाला कोण भिडू मिळतो काय याच्या शोधात होतोच. ह्याची केस तंतोतंत जुळली आणि मी लगेच होकार दिला. त्याला *रूम पार्टनर* बनवून घेतल. सुरुवातीला त्याच्या स्वभावाचा अंदाज घेतला असता लक्षात आलं की हा भलताच स्ट्रीक्ट आणि विचारावर ठाम असणारा गृहस्थ आहे. मला वाटलं मग आपल ह्याच्याशी काय जमणार नाही.. पण तरीही त्याच्याकडे चांगला सेन्स ऑफ ह्युमर आहे हे बघून हायसं वाटलं आणि आमची जोडी जमली.
रूम पार्टनर हा आपल्या भावंडांसारखा असतो. आपण त्याच्याबरोबर वसतिगृहाच्या छोट्या खोलीत दिवसातला बराच वेळ घालवत असतो. त्याच्याबरोबर कोणत्याही विवादात ना पडता सुसंवाद राखण्याची आवश्यकता असते. नेमकं हेच आम्ही केलं. लगेचच आम्ही चांगले मित्र झालो. वर्षभर खूप छान दिवस काढलेे आम्ही. टाय ची गाठ बांधायला अरविंदने मला शिकवली. कपड्यांची चॉईस, नीटनेटकेपणा, भाषेवरील ताळतंत्र त्याच्याकडे बघून शिकलो. अभ्यासातील काही मुद्दे त्याच्याकडून शिकलो. वेळ पडेल तेव्हा सर्व प्रकारची मदत त्याने केली. जुनियर म्हणून कधीच त्याला वागणूक दिली नाही. एमएससी भाग एक मधील माझा रूम पार्टनर इंग्रजीचा डॉ विवेकानंद रणखांबे यांनेही माझ्या स्वभावातील दोष अरविंदच्या कानावर घातले होते. त्याने त्याच्या परिने ते दोष घालवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा प्रयत्न अजून सुरूच आहे. माझा मित्रगोतावळा, क्रिकेट प्रेम, वायफळ व दीर्घ चर्चा, भांडखोर तसेच 'आल गट्टी गाल गट्टी सोन्याची गट्टी फू..' स्वभाव सर्व सहन केले गड्याने. आपल्या मित्रांशी ओळख करुन देण्यात त्याला नेहमीच अभिमान वाटत असे. माझा नेहमीच आदर केला त्याने. त्याच्या ज्ञान आणि विशिष्ट जीवनशैलीमुळे मला त्याचा खूप आदर वाटतो.
त्यानंतर त्याने बी.एड. केले आणि तरडगाव येथे हायस्कूल वर कायमस्वरूपी शिक्षक झाला. त्यानंतर त्याची भेट झाली तेव्हा तो एका मल्टिनॅशनल कंपनी मध्ये काम करत असताना. त्यांने त्याचे पहिले प्रेझेंटेशन विश्रामगृह खंडाळा येथे दिल्याचे आठवते. त्यानंतर या व्यवसायात त्यांने इतकी प्रगती केली आणि एक स्थिती अशी आली की व्यवसायासाठी त्यांन त्याच्या नोकरीचा राजीनामा दिला. असा 'आऊट ऑफ बॉक्स' निर्णय घेताना वाघाच्या काळजाची गरज असते. त्यानंतर त्यांने चांगली आर्थिक प्रगती केली. ज्या ज्या वेळेला तो कोल्हापूरला आला त्या त्या वेळेला आमची भेट होतेच. किमान फोन तरी असतो. त्याने कोल्हापुरात घेतलेल्या फोर्ड आयकॉन गाडी ची मी पूजा केली आहे.
आम्ही एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांना चांगले ओळखत होतो. बारामती फलटण रोडवरील अंदोबावाडी (मालेगाव नजीक) येथील त्याच्या घरी गेलो आहे. वडिलांच्या पाठीमागे मावशींच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही भावंडांनी आपापल्या क्षेत्रात मोठं नाव केलेलं आहे. एक बांधकाम व्यावसायिक, एक वैज्ञानिक आणि तो एक आधुनिक शेतकरी.. माझ्या सर्व अचीवमेंट त्याला माहीत आहेत. कै सुजातास तो चांगला परिचित होता. पाच वर्षापूर्वी माझ्यावर ओढावलेल्या दुःखद प्रसंगी तो मला वाडीला भेटायला आला. मुली दवाखान्यात असल्यामुळे मी खंडाळ्यात होतो म्हणून खंडाळ्याला भेटायला आला. खूप आधार दिला. मित्रांच्या पाठिंब्यामुळेच मी त्या दुःखातून लवकर बाहेर येऊ शकलो. त्यानंतर मात्र आमच्या भेटी वाढल्या. मी बारामतीत गेल्यावर त्याची आवर्जून भेट घेतो. करावागज येथील त्याने विकत घेतलेलं पंचवीस एकर शेती आणि फार्महाउस पाहून थक्क झालो. आता तो उत्तम आधुनिक शेती करतोय. बऱ्याच देशांना तो भेटी देऊन आला आहे. एकूण शेती व्यवसायामध्ये पूर्णपणे स्थिरावला आहे. एखाद्या गोष्टीविषयी त्याला माहिती असेल तर तिथे मात्र तो चर्चेत माघार घेत नाही. कुठल्याही क्षेत्रातील अद्ययावत माहिती त्याला असते. सोशल माध्यमावर नेहमीच सक्रीय असतो. त्याचा राजकीय व्यासंग सुद्धा मोठा आहे. त्याच्याकडील कुठल्याही गोष्टीचा त्याला गर्व नाही. नंतर बरेच मित्र त्याच्या आयुष्यात आले पण आम्ही जपलेल्या स्नेहामुळे आमची मैत्री अजून घट्ट आहे.
काही दिवसांपूर्वी पंडित चा फोन आला. मला म्हणाला - अरे तुझा एक मित्र आहे समोर.. बोल त्याच्याशी.. अरविंद निरेत त्याला भेटायला गेला होता. ते शेतीव्यवसाय निमित्त एकत्र भेटले होते आणि दोघांनीही माझ्याविषयी गप्पा मारल्या होत्या. मग पंडितला खात्री झाल्यानंतर पंडित ने त्याला, ज्युनियर असून देखील, आपल्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं. आता ग्रुप वरील चर्चा आणि त्याचे विचार आपण ऐकातोच. त्यांन स्वतःची ओळख निर्माण केली आहे. परवा आपण बारामती येथील एका रेडिओ चॅनलवर त्याची मुलाखत व विचार ऐकले आहेत. त्याच्या विचारांची प्रगल्भता पाहून खूप अभिमान वाटतो मित्राचा.
अशा या सदाहरित मित्राच आज वाढदिवस.. अरविंद एम एस सी च्या वसतिगृहजीवनातील तू रूम पार्टनर अजूनही माझ्या आयुष्यरुपी खोलीमध्ये तू पार्टनर आहेस याचा अभिमान वाटतो. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.
💐⚡💫✨🚩🎉🎊🎈💖
केशव..
२५ जून २०२०
कृष्ण व अनेक सुदामा यांच्या परिवाराला माझ्या लाख लाख शुभेच्छा. तसेच अरविंद सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...!🌷🌷🌷
ReplyDeleteExcellent write up that speaks about your friendship academic as well as emotional. I remember Tavare but can't recollect exactly. However in the photograph I could recognize all faces. I am really Happy to note Arvind's achievement maintaining his politeness. Thanks.
ReplyDeleteSir you are so lucky to have a great friend
ReplyDelete