जिद्द आणि नेतृत्व: आदरणीय डॉ. विजय फुलारी नावाचे व्यक्तिमत्व
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्रा. डॉ. विजय जनार्दन फुलारी, अर्थात 'व्ही.जे. फुलारी सर', हे नियत वयोमानानुसार ३१ ऑगस्ट २०२५ रोजी शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. या मनोगतातून त्यांच्याशी असलेल्या माझ्या सहवासाच्या आठवणींना मी उजाळा देत आहे.
सरांशी माझी पहिली भेट साधारणतः १९९५ साली झाली. त्यावेळी ते प्रा. एम. बी. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठात पीएच.डी. करत होते आणि अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. डेप्युटेशन आणि सुट्टीतून त्यांनी पीएच.डी.चे काम पूर्ण केले. त्या काळात नियमित पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असे, तर शिक्षक संशोधक अधिक होते. ते शिक्षक फेलो होते, आणि मी नियमित विद्यार्थी होतो. सरांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक, शारीरिकदृष्ट्या सुदृढ, हजरजबाबी आणि शिस्तप्रिय होते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांच्याशी कुणीही वाद घालण्याचे धाडस करत नसे.
सुट्टीतून काम करण्यासाठी ते जेव्हा जेव्हा विद्यापीठात यायचे, तेव्हा त्यांची यामाहा वायबीएक्स् गाडी आणि रेबॅनचा गॉगल यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिकच प्रभावी वाटायचे. त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते समोरच्याच्या मनातील गोष्टी अचूक ओळखणारे होते. एकच गोष्ट टाळावी लागत असे, ती म्हणजे त्यांना वाकडे बोलणे.
त्यांच्यातील नेतृत्वगुण त्यांच्या पीएच.डी.च्या काळातच आम्ही ओळखले होते. त्यांना कुणाकडून काय काम करून घ्यायचे, हे नेमके माहीत होते. ते स्वतः काम करण्यापेक्षा काम करून घेण्यात पटाईत होते, ज्यामुळे त्यांच्या संशोधनासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये आम्हा मित्रांची मदत वेळेवर उपलब्ध झाली. अर्थात, ते नेहमीच कृतज्ञ असत आणि मदतीचा हात देण्यास पुढे असत. याचमुळे त्यांची बहुप्रतिक्षित पीएच.डी. १९९९ साली पूर्ण झाली.
सर अकलूजला परत गेल्यानंतर आमचा संपर्क थोडा कमी झाला. मात्र, २००६ साली त्यांची पुन्हा विद्यापीठात शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यावर सात वर्षांनी आमचा सहवास पुन्हा सुरू झाला. पीएच.डी. आणि विद्यापीठातील ही नियुक्ती त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील सेवा इथे जोडून घेत रीडर पदावर पदोन्नती मिळवली, ज्यामुळे त्यांना ज्येष्ठता यादीत वरचे स्थान मिळाले.
मला आठवते, सर इथे आले तेव्हा प्रा. बी. के. चौगुले सर विभागप्रमुख होते. त्यांना इथे आल्या आल्या सकाळी साडेसातची प्रॅक्टिकल बॅच आणि 'मॅथेमॅटिकल मेथड्स ऑफ फिजिक्स' यांसारखे महत्त्वाचे विषय शिकवण्यासाठी मिळाले. त्यामुळे त्यांना ताण आला असावा आणि काही काळ त्यांना आमच्यावर रोष असल्यासारखे वाटत असे. मला आजही आठवते, ते नेहमी म्हणायचे, “केशव, तुझ्याएवढा चाप्टर माणूस मी कुठे बघितला नाही.”
त्यांच्या अध्यापनाच्या योगदानावर कुणीही बोट दाखवू शकत नाही. व्याख्यान, प्रात्यक्षिके, अभ्यासक्रम पूर्ण करणे किंवा पेपर तपासणी, या सर्व बाबतीत ते वेळोवेळी काम करत असत. वेळेच्या बाबतीत ते फारच काटेकोर होते. त्यामुळे त्यांच्या नादाला कोण लागत नसे. पण कालांतराने, आमचे सूत परत कधी जुळले ते मलाही आठवत नाही. कठोर दिसणारे हे व्यक्तिमत्व आतून खूप मृदू आहे, हे मला कळले. मी विभागप्रमुख झाल्यावर आमची सलगी वाढली. नेमक्या याच काळात त्यांनी कुलगुरू पदासाठी अर्ज करणे सुरू केले.
योगायोग असा की, ते युसिक सीएफसीचे विभागप्रमुख झाले, नंतर मी झालो. ते भौतिकशास्त्र विभागात प्रमुख झाले, नंतर मी झालो. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा आणि सहकार्याचा मला खूप उपयोग झाला. मला हळूहळू कळायला लागले की, त्यांना नाराज केले नाही तर ते आपल्यासाठी काहीही करायला मागेपुढे पाहणार नाहीत.
दुपारी डबा खाल्ल्यानंतर ते कॅम्पसवर 'फेरी' मारण्यासाठी माझ्याकडे येत असत. आम्ही केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागांना वळसा घालून विभागात परत येत असू. या फेरीत आम्ही अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारत असू, विशेषतः कौटुंबिक विषयांवर. सर मला मोलाचे सल्ले देत असत. याच काळात आम्ही खूप विनोद आणि मस्ती करत असू. काही शब्दांसाठी आम्ही केलेले शॉर्ट फॉर्म वापरून आम्ही मनमुराद हसत असू. उदाहरणार्थ: केके, एमएम, वाळू, हाज्जू भैय्या, वायझेड, शाळा मास्तर, इत्यादी.
माझ्या चारचाकी घेण्याच्या निर्णयावेळी सरांनी मला खूप मदत केली. मला परवाना नसतानाही स्वतःची गाडी चालवायला दिली आणि त्यांच्या प्रेरणेमुळेच मी ही एसयूव्ही कार घेतली. जर मी त्यांना भेटायला गेलो नाही, तर ते केबिनमध्ये येऊन म्हणायचे, “केशव, आज माया पातळ झाली.” हे ऐकल्यावर मी समजून जायचो की आज राऊंड मारायला जायला पाहिजे. ते माझ्या वजनाकडे आणि खाण्याच्या सवयीकडेही लक्ष देत असत. जेव्हा मी तणावग्रस्त असे, तेव्हा ते मला फिरायला घेऊन जात आणि गप्पांमध्ये ताण कधी निघून गेला हे कळत नसे.
सरांचे सर्व शिक्षण शिवाजी विद्यापीठातूनच झाले आहे. त्यांना १९८७ पासून अध्यापनाचा अनुभव आहे. 'थिन फिल्म फिजिक्स' आणि 'नॅनोटेक्नॉलॉजी' या संशोधन क्षेत्रांमध्ये त्यांनी २०० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत, ज्यांना १०,००० पेक्षा जास्त सायटेशन्स आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २८ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्यांच्या नावे अनेक पेटंट्स आणि प्रकल्प आहेत. महाविद्यालयात सेवा करणारा एक शिक्षक मनात आणले तर काय करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे फुलारी सर.
योगायोग असा की, सर इतके ज्येष्ठ असूनही त्यांच्या कुलगुरू पदाच्या अर्जावर फॉरवर्डिंग करण्याचे भाग्य मला लाभले. मी त्यांची बरीच ॲप्लिकेशन्स फॉरवर्ड केली. सर म्हणाले, "केशव, आता हे शेवटचे." पण त्यांनी त्यानंतरही दोन ॲप्लिकेशन्स केलीच, आणि शेवटी त्यांना ते पद मिळालेच. शिक्षक म्हणून काम करत असताना शैक्षणिक प्रणालीतील सर्वोच्च पद मिळवणे, हे खरोखरच भूषणावह आहे.
सर जरी छत्रपती संभाजीनगर येथे असले तरी, शिवाजी विद्यापीठाशी त्यांची नाळ घट्ट आहे. ते इथल्या स्नेहीजनांना स्वतःहून फोन करून विचारपूस करतात. त्यांना नक्कीच इथली आठवण येते. आम्हालाही सरांची आठवण येते. भेटीगाठी कमी झाल्या आहेत आणि आता तर ते विद्यापीठाच्या सेवेतून मुक्त होत असल्यामुळे भेटीचा योग आणखी दुर्मिळ होईल.
असे हे भौतिकशास्त्र विषयातील अत्यंत अनुभवी आणि निष्णात प्राध्यापक, संशोधक आणि उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी आम्हाला लाभले, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आरोग्य आणि आनंद मिळो, हीच प्रार्थना. त्यांचा उर्वरित कार्यकाल देखील विद्यार्थी, शिक्षक आणि समाजाच्या प्रगतीसाठी समर्पित राहो.
सरांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
आपला नम्र विद्यार्थी,
केशव राजपुरे