हल्ली मुलांचं विचित्र वागणं तसेच त्यांच्या वाईट सवयी यामुळे त्यांच्या एकूण व्यक्तीमत्व तसेच जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे घरात तणावाची परिस्थिती निर्माण होते, पालकांना काय करावे सुचत नाही आणि सर्वजण बिथरून जातात. बऱ्याचदा कुटुंबामध्ये वादावादीचे प्रसंग येतात.
या पिढीला मिळालेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट आणि स्मार्ट फोन गॅझेट्स. त्यांना इंटरनेटवरील संपूर्ण माहिती उपलब्ध आहे ज्यामध्ये ८०% पेक्षा जास्त भाग प्रौढत्वाविषयी व्हिडीओ, फोटो आणि लेख आहेत, त्यामुळे नवोदित वयात त्यांच्या दृष्टीने असुरक्षित माहितीच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या नैसर्गिक भावनांवर नियंत्रण ठेवणे त्यांच्यासाठी खूप कठीण जाते. त्यात चॅटिंग, मैत्री आणि संवाद सुलभ करण्यासाठी बोटाच्या टोकावर व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम सारखी सोशल मीडिया उपलब्ध आहेतच. स्मार्टफोन सारख्या गॅजेटचा अतिवापर, तसेच पाश्चिमात्य संस्कृतीचं अवलंबन, त्याच्यातून निर्माण झालेल्या संपर्कवलयात रिलॅक्स होण्यासाठी तसेच गमती करण्यासाठीच्या अतिउल्लासाच्या सवयींमुळे मुलांचे ना धड अभ्यासात लक्ष लागते ना ते घर कामात मदत करतात, ती एकूणच विचित्र वागू लागतात आणि त्यांचे स्वास्थ्य देखील बिघडतं. यामुळे पालक ही हैराण होऊन जातात आणि मुलांना याच्यातून बाहेर कसे काढावे याबाबत त्यांना काही सुचत नाही.
बऱ्याच वेळा मुलांना देखील माहित असते की त्यांना वाईट सवयी आहेत आणि ते चुकीचे वागत आहेत परंतु हे समजून देखील ते या सवयीच्या आधीन झालेले असतात आणि इच्छा असूनही अशा विचित्र परिस्थितीतून त्यांना बाहेर पडणे अशक्य होते. पालकांच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात येते तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो.
मला वाटतं, पालक आणि मुलांच्यातील दुर्मिळ झालेला किंवा लोक पावत चाललेला संवाद, मुलांच्यावर प्रमाणापेक्षा जास्त ठेवलेला विश्वास, पुरवलेले लाड, अनावश्यक व्यस्तता आणि मुलांचं पालकांना गृहीत धरणं या आणि अशा अनेक गोष्टी यांस जबाबदार आहेत.
अशाप्रसंगी संवादावर भर ठेवणं महत्त्वाचं आहे, पालकांनी मुलांच्या अडीअडचणी, त्यांच्या सवयी तसेच संगती बद्दल त्यांच्याशी बोलणं आवश्यक आहे. त्यांना जीवनमूल्यांविषयी महत्त्वाच्या गोष्टी सांगणं आवश्यक आहे. हे सांगत असताना मुलांना काही विशिष्ट मर्यादा घालून देणे पालकांचे कर्तव्य आहे; त्यामध्ये त्यांचा दिनक्रम असेल, त्यांच्या खाण्याच्या पद्धती असतील, त्यांच्या संगती असतील, अनाठाई खर्च असेल, वाईट सवयींना आळा असेल. संतुलित जीवन जगत असताना वाईट सवयींना कसा फाटा द्यायचा, त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे मुलांना सविस्तर समजावून सांगणं गरजेचे आहे. हल्ली माणसं गप्प गप्प झाली आहेत ते इतरांशी सोडा घरातल्यांशीही अल्पसंवाद साधतात. हीच गोष्ट मुलांच्या या सवयी आणि भवितव्याच्या विषयी मारक ठरतात याची कल्पनाही पालकांना नसते.
मुलांशी मुक्त संवाद साधण्याबरोबरच त्यांना काही कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील देणं आवश्यक आहे. जेणेकरून त्यांच्याकडे असणारा फावला वेळ घरातील कामं करण्यासाठी उपयोगी पडेल. त्यामुळे पालकांचा कामाचा बोजा तर कमी होईलच पण मुलांना जबाबदारी तसेच कुटुंबात घट्ट बंध निर्माण करण्यासाठी हा वेळ उपयोगी होईल. त्याच्यामुळे चांगल्या सवयी लागतील आणि त्यांच्या वाईट सवयींमधून त्यांना बाहेर यायला मदत होईल.
मुलांच्या चुकांबद्दल आणि सवयींबद्दल त्यांच्यावर ओरडणं किंवा त्यांना शिक्षा देण्यावर भर देण्यापेक्षा शांतपणे त्यांच्या चुका दाखवून त्याची कारणमीमांसा करावी. त्यांना मोठ्या मनाने माफ करावे आणि कधीच चुकांची आठवण करून देऊ नये. उलट, ते ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतात त्याविषयी त्यांचं कौतुक करणं, त्यांना प्रेरित करणं, त्यांना पाठिंबा देत जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर त्यांचे कौतुक करणं आवश्यक आहे. हळूहळू, त्यांना त्यांच्या चुका लक्षात येतील आणि तुमच्या पालकांनी त्यांना मनापासून क्षमा केली आहे हे त्यांना समजेल. त्यांना स्वतःबद्दल अपराधी वाटू लागेल. त्यामुळे त्यांच्यात नक्कीच बदल होऊन त्यांच्याभोवती सकारात्मक वातावरण निर्मिती होईल. वेळोवेळी त्यांच्या दिनचर्येबाबत चौकशी करून विचारणा करणं आणि माहिती घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे मुलांच्या लक्षात येईल की आपले पालक आपल्यावर लक्ष ठेवून आहेत मग ते आपोआप मर्यादेत वागतील.
तसं बघितलं तर पालकत्व निभावण तेवढं सोपं काम नाही. बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी करून देखील मुलांच्या सवयीत तितका फरक पडत नाही. अशा वेळी तज्ञांच्या मार्गदर्शनाने मुलांच समुपदेशन करायला लागलं तरी काही हरकत नाही ज्यामुळे मुलांना काय करायला पाहिजे आणि काही करू नये याविषयी समज निर्माण होईल. आणि गरज भासल्यास सुचवलेला डॉक्टरी इलाज करायला हवा.
वेळ देत, मुक्त संवाद राखत, मर्यादेत ठेवून आणि त्यांच्या भोवती आश्वासक वातावरण निर्माण करून पालक आपल्या मुलांना या आव्हानांवर मात करण्यास मदत करू शकतात. एकत्र वेळ घालवत, सलोखा जपत आणि वाईट सवयींना सकारात्मकतेने बदलून, पालक कुटुंबात शांती आणि मजबूत नातेसंबंध निर्माण करू शकतात.
- प्रा केशव राजपुरे
No comments:
Post a Comment