इलेक्शन ड्युटी मधील विलक्षण अनुभव
लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी नेहमी मत देण्याच्या स्वरूपातच येते असे नाही. काहीवेळा स्वतःच मतदान प्रणालीचा भाग होऊन प्रक्रियेत समाविष्ट होता येते. या मतदानात मला मतदान केंद्राध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागली. इथे प्रस्तुत अनुभव जरी अपेक्षित असला तरी फायद्याचा आणि अंतर्दृष्टी देणारा ठरला.
निवडणूक ड्युटी मिळाल्यानंतर, संकलन केंद्रावरून सर्व निवडणूक साहित्य ताब्यात घ्यावे लागते. आदल्या दिवशी दिलेल्या मतदानाच्या केंद्रावर मुक्काम करून, साहित्याची काळजीपूर्वक देखभाल करणे आणि निवडणूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे साऱ्या टीमचे मुख्य कर्तव्य असते. निवडणूक संपल्यानंतर हे सर्व साहित्य योग्य रीतीने परत करणेही टीमच्या जबाबदाऱ्यांचा भाग असतो. मी यापूर्वी कधीही निवडणूक कर्त्यव्यामध्ये सहभागी झालो नव्हतो, परंतु या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या अनेकांकडून मी याबाबत ऐकले होते. गेल्या दोन दिवसांत मला प्रत्यक्षात या कामाचा अनुभव घेता आला आणि "याची देही याची डोळा" या म्हणीचा खरा अर्थ मला समजला.
आव्हानात्मक परिस्थिती आणि मशीन बिघडण्याची किंवा अनपेक्षित घटनांची शक्यता असूनही, लोकशाही कर्तव्याचे हे दोन दिवस तितकेसे कठीण नसतात. कायदेशीर परिणाम ही चिंतेची बाब असली तरी हि आपली नैतिक जबाबदारी असते. तथापि, मला विश्वास वाटतो कि तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न करूनही काही अनपेक्षित अडचणी आल्याच तर त्यात तुमचा मुळीच दोष नसतो. तुमची कृती माहितीवर आधारित आणि रास्त हेतूने प्रेरित असल्यामुळे, अनपेक्षित समस्यांसाठी तुम्हाला जबाबदार धरले जाणार नाही हे जाणून आत्मविश्वासाने सहभागी होण्यात अर्थ आहे.
त्यानुसार मी जिल्हा तसेच तालुका ठिकाणी आयोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो. प्रशिक्षणाच्या काळात, मला अनेक गोष्टींची उत्सुकता होती. मला हे काम जमेल का? मला चांगली टीम मिळेल का? काही चुका तर होणार नाहीत ना? अशा अनेक प्रश्नांनी माझं मन व्यापून टाकलं होतं. प्रशिक्षणादरम्यान प्रशासनाने अथक परिश्रम करून नियोजन अतिशय सुरळीत केले. प्रशासनाची मेहनत आणि योजनेची यशस्वी अंमलबजावणी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.
दोन्ही प्रशिक्षण केंद्रांमध्ये उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आणि प्रशासनाने व्हिडिओ, स्लाइड्स आणि प्रत्यक्ष डेमोंद्वारे नवख्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता. सर्व व्हिडिओ व्हॉट्सॲपद्वारे सदस्यांना शेअर करण्यात आले होते. मॉक टेस्टने सर्वांचा आत्मविश्वास उंचावला होता. यामुळे निवडणूक मतदान प्रक्रिया तितकी क्लिष्ट नाही हे पटवून देण्यात त्यांना यश मिळाले होते. पण एखाद्याने समजावून आपण ध्यानात ठेवणे आणि स्वतः करणे यामध्ये फरक आहे कारण थेरी आणि प्रॅक्टिकल याच्यामध्ये खूप तफावत असते. प्रत्यक्ष मतदानावेळी सर्व गोष्टी व्यवस्थित करता आल्या तर ठीक नाहीतर अवघड !
बऱ्याच जणांनी अधिकाऱ्यांपुढे आपल्या जबाबदाऱ्या आणि अडचणी मांडून मुभा मिळवली होती. मात्र, कर्तव्यातील हलगर्जीपणा हा त्रास टाळण्यासाठी की वास्तव होता हे सांगणे कठीण आहे. पण मी हे कर्तव्य बजावण्याचे ठरवले कारण इतर सहकारी हे कर्तव्य पार पाडत असतात आणि त्यांनाही त्रास होत असणार. मग, आपण असाच त्रास का घेऊ नये? खरे तर ते राष्ट्रसेवेचे उदात्त कार्य आहे आणि तो माझ्या कर्तव्याचा भागही होता. जर तुम्हाला या कामाचा त्रास वाटत असेल तर त्यापासून दूर पळून कधीच समाधान मिळत नाही, पण त्यातून काही शिकायचे, देशाला मदत करायची आणि ते योग्य भावनेने करायचे ठरवले तर या जोखमीच्या कामातूनही तुम्हाला आनंद मिळू शकतो. या पार्श्वभूमीवर, मी हे निवडणूक कर्तव्य पार पाडण्याचे ठरवले आणि मतदानाच्या आदल्या दिवशी सकाळी सात वाजता बॅग घेऊन घरून निघालो.
आम्ही मित्रगण सकाळी आठ वाजताच आमच्या एका मित्राच्या गाडीने तालुका वितरण केंद्रावर पोहोचलो. अनेक लोक मतदान साहित्य ताब्यात घेण्यासाठी रांगेत उभे होते. खूपच गर्दी होती आणि सर्वांनाच उत्सुकता होती की त्यांना सोयीचे मतदान केंद्र मिळाले आहे किंवा कसे ? निवडणूक कार्यकर्त्यांची मोठी संख्या, दुचाकी, चारचाकी, शासनाने पुरवलेल्या बस, टेम्पो ट्रॅक आणि इतर वाहनांमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मतदान केंद्राजवळ एक मोठा मंडप उभारण्यात आला होता आणि लाउडस्पीकरवर सूचना दिल्या जात होत्या. चहा-नाश्त्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. चहा झाल्यावर, आम्ही आमच्या झोनल ऑफिसर तथा क्षेत्रीय अधिकारी यांच्या दालनात बसलो.
शेकडो टीम आणि हजारो कर्मचारी साहित्य वाटपासाठी बूथवर जमा झाले होते. टीम्सचे सदस्य वेळेवर न येणे आणि त्यामुळे वितरणाचे वेळापत्रक व्यवस्थापित करणे प्रशासकांसाठी कठीण होणे हे निश्चितच एक आव्हान आहे. प्रशासकांनी सदस्यांना वेळेवर येण्यासाठी प्रेरित करण्यासाठी रचनात्मक मार्ग शोधले पाहिजेत. टीमचे सर्व सदस्य उपस्थित असल्याची खात्री झाल्यानंतर, प्रत्येक टीममध्ये एक कॉन्स्टेबल आणि एक शिपाई जोडून, आम्हाला आदेशानुसार आमच्या मार्गावरील साहित्य वितरण केंद्राच्या बूथवर साहित्य मिळाले. साहित्य मिळाल्यानंतर, आम्ही पार्किंगमध्ये उभा असलेल्या आमच्या मार्गावरील बसमध्ये बसलो. त्या मार्गावरील सर्व टीम उपस्थित झाल्याखेरीज बस सुरू होणार नव्हती. कडक उन्हाळ्याच्या दिवशी थांबलेल्या बसमध्ये बसणे भयंकर आहे कारण वारा हलत नाही आणि छप्पर गरम होते ज्यामुळे तुम्हाला खूप घाम येतो आणि अस्वस्थ वाटते. बस मध्ये एका मार्गावरील कमाल पाच केंद्रांच्या टीम बसवलेल्या असतात. इतर टीमचे काही सभासद वेळेवर न आल्यामुळे, आमची बस थोडी उशिराने निघाली. दुपारी १२ च्या सुमारास, आम्ही आमचे संकलन केंद्र सोडले आणि इतर बूथ कर्मचाऱ्यांना विविध गावात सोडून दुपारी ३:३० पर्यंत आमच्या केंद्रावर पोहोचलो. माझ्या आठवणी थोड्या धुंद असल्या तरी, मला आठवतं की मी दोन-तीन वर्षांपूर्वी महामंडळाच्या बसमध्ये बसलो होतो. या कामासाठी, मी सहजपणे नवीन लोकांमध्ये मिसळून गेलो आणि प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेतला. मला टीमचा उत्साह आणि सहकार्य खूप प्रेरणादायी वाटलं.
या बस प्रवासातील एक विनोदी क्षण म्हणजे; जेव्हा आम्हाला अगोदरच्या केंद्राची टीम सोडण्यासाठी एका लहानशा गावाला जाण्यासाठी एका अरुंद रस्त्यावरून जावे लागणार होते, तिथे बसला वळायला पुरेशी जागा नव्हती. तरीही, बस ड्रायव्हर सांगत होता की "फाट्यावरच उतरा, नाहीतर बस अडकली तर पुढे जायला उशीर होईल." पण त्याच गावातील शिपायाने आग्रह केला, "बस वळते, जाऊ दे". मग ड्रायव्हरने यंदा परिस्थिती बदललेली असेल या आशेने पण मनाविरुद्ध, बस घातली आणि अपेक्षेप्रमाणे त्याला बस वळवणे जमले नाही. त्याला जवळपास एक किलोमीटर अंतर रिव्हर्स गिअर मध्ये गाडी चालवावी लागली. यात जवळजवळ एक तास तरी गेला असेल. एकतर केंद्रावर पोहोचून तयारी करणं याची आम्हाला घाई झाली असताना मध्येच हा वेळखाऊ प्रसंग उद्भवल्यामुळे थोडी नाराजी झाली. त्यामुळे काम करत असताना अनपेक्षित प्रसंग घडण्याची शक्यता आपण गृहीत धरली पाहिजे. पण हे कंटाळवाणे आणि वेळखाऊ प्रकरण आम्हांस शिकवणीतून एक विनोदी अनुभव देऊन गेले.
शेवटी, आमची बस मतदान केंद्र असलेल्या गावात पोहोचली. हे गाव सह्याद्रीच्या कुशीत, डोंगराच्या उतारावर तसेच पायथ्याशी वसलेले आहे. केंद्राच्या गावाचे नाव आणि भाग कळल्यावर असा अंदाज होता की अगदी दुर्गम खेड्यात जावे लागणार आहे. पण हे खरं नव्हतं. अतिशय टुमदार आणि पक्क्या रस्त्यांनी जोडलेलं हे गाव खूप विकसित दिसत होतं. त्यामुळे मतदानादरम्यान फारशा अडचणी येणार नाहीत याची खात्री झाली.
शक्यतो मतदान केंद्र प्राथमिक शाळेत असते आणि इथली शाळा गावच्या पायथ्याभागात असणार असे वाटले. परंतु, शाळाच टेकडीवर असल्याने रखरखत्या उन्हात, सर्व टीमने साहित्य आणि स्वतःच्या बॅगा घेऊन टेकडी चढण्यास सुरुवात केली. एकतर सकाळपासून उपवास, त्यात वेगवेगळ्या टीमला सोडताना झालेला उशीर आणि चैत्र महिन्याच्या दुपारच्या तीव्र उन्हामुळे असह्य उकाडा यांमुळे थकवा जाणवू लागला होता. कधी एकदा केंद्रावर पोहोचू आणि थोडा वेळ पंख्याखाली बसून थोडा आराम करू अशी इच्छा होत होती. त्यात अजून टेकडी चढायची असल्यामुळे त्रास होणं स्वाभाविक होतं. तरीही, दिलेल्या केंद्रावर पोहोचणं आवश्यक होतं. त्यामुळे मनाची अस्वस्थता बाजूला ठेवून, जिद्द आणि दृढनिश्चय दाखवून वाटचाल सुरू ठेवली.
अंगात घामाच्या धारा वाहत होत्या, जणू पाण्याचा झराच उगवला होता! सोबत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्यातील पाणी गरम झाले होते, त्यामुळे तृप्ती मिळण्याऐवजी ते आणखी तहान वाढवत होते. जड साहित्य आणि बॅग सोबत घेऊन डोंगरावर चढणे खरोखरच दमछाक करणारे होते. मे महिन्यातील तीव्र उन्हात, ही चढाई सर्वांसाठी खरंच एक शारीरिक परीक्षा होती. तरीही, आम्ही धैर्याने आणि एका दमात ठिकाणावर पोहोचलो. घामाने सर्व कपडे ओले झाले होते आणि थकवाही खूपच जाणवत होता.
शाळेत पोहोचल्यावर, शिपायाने त्वरित दरवाजा आणि खिडक्या उघडल्या, तसेच लाईट आणि फॅन चालू केले. थंड हवेचा झोत आत येताच आणि पंख्याचा मंद गारवा वाटताच, सर्वजण पंख्याखाली सरसावले आणि थोडा वेळ विश्रांती घेतली. थंड हवेचा स्पर्श आणि पंख्याचा मंद गारवा थकलेल्या शरीरात नवीन ऊर्जा संचारित करत होता. थोड्याच वेळात सर्वांना ताजेतवाने आणि उत्साहित वाटू लागलं. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर, मन पुन्हा एकदा कामाला सुरुवात करण्यासाठी तयार झालं. आता, थकवा मागे सारून, उत्साह आणि नवीन ऊर्जेने सर्वांना काम करण्याची इच्छा होती. थोड्या वेळाचा विश्रांती खरंच खूप आवश्यक होती.
शाळा आणि सभोवतालचा परिसर भव्य आणि मनमोहक होता. टेकडीच्या माथ्यावर वसलेली ही शाळा विहंगम नैसर्गिक सौंदर्याचा खजिना होती. शाळेतून डोळ्यासमोर पसरलेला विस्तृत परिसर मन मोहून टाकणारा होता. आजूबाजूला छोट्या गावांसह शेतीने व्यापलेले भूदृश्य अत्यंत शांततापूर्ण आणि रम्य वाटत होते. डोंगरावरून खाली येणारी थंडगार हवा शरीरास स्पर्शून आनंददायी अनुभव देत होती.
आम्ही इमारत, स्वच्छतागृह आणि पाण्याची व्यवस्था पाहिली. शाळेच्या इमारतींचे छप्पर पत्र्याचे असूनही ते उत्तम स्थितीत होते. स्वच्छतागृहे असली तरी स्नानगृहे आणि पाण्याची व्यवस्था नव्हती. यंदाच्या उन्हाळ्यात मतदानादरम्यान पत्रे गरम होणार होते आणि आम्हाला दोन दिवस त्याच खोल्यांमध्ये काढावे लागणार होते. त्यावेळी, आम्हाला हे देखील माहित नव्हते की आम्हाला रात्री झोप लागणार होती किंवा नाही? आजूबाजूला मच्छर तर नसतील ना ? तरीही, आम्हाला सांगण्यात आलेल्या इतर मतदान केंद्रांपेक्षा हे केंद्र निश्चितच चांगले होते. दगडापेक्षा वीट मऊ !
आम्ही शिपायाला खोली स्वच्छ करण्यास आणि जमखाना अंथरून देण्यास सांगितले. तोपर्यंत, सर्वांना भूक लागली होती कारण नाश्त्यानंतर आम्ही काहीच खाल्ले नव्हते. निवडणुकीच्या कामांमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी पोटभर जेवण आवश्यक होते. म्हणून, भुकेच्या तडाख्यात सर्वांनी घरातून दोन दिवसांसाठी पुरेसे जेवण असलेले डबे सहभोजनात एका वेळीच संपवले.
सूर्य मावळतीला झुकत होता आणि दुपारच्या तुलनेत उष्णता कमी झाल्याने, आम्ही त्वरित मतदान केंद्र उभारण्यास सुरुवात केली. यामध्ये टेबल, मतदारांच्या येण्याची आणि जाण्याची दिशा, मतदान यंत्रांची ठिकाणे, विविध फलक नेमून दिलेल्या ठिकाणी लावण्यात आले होते. मतदान केंद्र उभारल्यानंतर, लगबग करून आम्ही महत्त्वाचे फॉर्म भरले, मतदान यंत्र आणि पाकिटे तपासली आणि इतर आवश्यक तयारी पूर्ण केली. या पूर्वतयारीमुळेच दुसऱ्या दिवशी मतदान पूर्ण झाल्यानंतर आम्हाला त्वरित आवराआवरा करण्यास मदत झाली.
शाळेत पोहोचल्यावर, शिपायाने त्वरित दरवाजा आणि खिडक्या उघडल्या, तसेच लाईट आणि फॅन चालू केले. थंड हवेचा झोत आत येताच आणि पंख्याचा मंद गारवा वाटताच, सर्वजण पंख्याखाली सरसावले आणि थोडा वेळ विश्रांती घेतली. थंड हवेचा स्पर्श आणि पंख्याचा मंद गारवा थकलेल्या शरीरात नवीन ऊर्जा संचारित करत होता. थोड्याच वेळात सर्वांना ताजेतवाने आणि उत्साहित वाटू लागलं. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर, मन पुन्हा एकदा कामाला सुरुवात करण्यासाठी तयार झालं. आता, थकवा मागे सारून, उत्साह आणि नवीन ऊर्जेने सर्वांना काम करण्याची इच्छा होती. थोड्या वेळाचा विश्रांती खरंच खूप आवश्यक होती.
शाळा आणि सभोवतालचा परिसर भव्य आणि मनमोहक होता. टेकडीच्या माथ्यावर वसलेली ही शाळा विहंगम नैसर्गिक सौंदर्याचा खजिना होती. शाळेतून डोळ्यासमोर पसरलेला विस्तृत परिसर मन मोहून टाकणारा होता. आजूबाजूला छोट्या गावांसह शेतीने व्यापलेले भूदृश्य अत्यंत शांततापूर्ण आणि रम्य वाटत होते. डोंगरावरून खाली येणारी थंडगार हवा शरीरास स्पर्शून आनंददायी अनुभव देत होती.
आम्ही इमारत, स्वच्छतागृह आणि पाण्याची व्यवस्था पाहिली. शाळेच्या इमारतींचे छप्पर पत्र्याचे असूनही ते उत्तम स्थितीत होते. स्वच्छतागृहे असली तरी स्नानगृहे आणि पाण्याची व्यवस्था नव्हती. यंदाच्या उन्हाळ्यात मतदानादरम्यान पत्रे गरम होणार होते आणि आम्हाला दोन दिवस त्याच खोल्यांमध्ये काढावे लागणार होते. त्यावेळी, आम्हाला हे देखील माहित नव्हते की आम्हाला रात्री झोप लागणार होती किंवा नाही? आजूबाजूला मच्छर तर नसतील ना ? तरीही, आम्हाला सांगण्यात आलेल्या इतर मतदान केंद्रांपेक्षा हे केंद्र निश्चितच चांगले होते. दगडापेक्षा वीट मऊ !
आम्ही शिपायाला खोली स्वच्छ करण्यास आणि जमखाना अंथरून देण्यास सांगितले. तोपर्यंत, सर्वांना भूक लागली होती कारण नाश्त्यानंतर आम्ही काहीच खाल्ले नव्हते. निवडणुकीच्या कामांमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी पोटभर जेवण आवश्यक होते. म्हणून, भुकेच्या तडाख्यात सर्वांनी घरातून दोन दिवसांसाठी पुरेसे जेवण असलेले डबे सहभोजनात एका वेळीच संपवले.
सूर्य मावळतीला झुकत होता आणि दुपारच्या तुलनेत उष्णता कमी झाल्याने, आम्ही त्वरित मतदान केंद्र उभारण्यास सुरुवात केली. यामध्ये टेबल, मतदारांच्या येण्याची आणि जाण्याची दिशा, मतदान यंत्रांची ठिकाणे, विविध फलक नेमून दिलेल्या ठिकाणी लावण्यात आले होते. मतदान केंद्र उभारल्यानंतर, लगबग करून आम्ही महत्त्वाचे फॉर्म भरले, मतदान यंत्र आणि पाकिटे तपासली आणि इतर आवश्यक तयारी पूर्ण केली. या पूर्वतयारीमुळेच दुसऱ्या दिवशी मतदान पूर्ण झाल्यानंतर आम्हाला त्वरित आवराआवरा करण्यास मदत झाली.
मतदानाच्या मुक्कामात मोफत जेवण घेऊ नये असे प्रशिक्षणादरम्यान सुचवण्यात आल्याने, आम्ही प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीच्या ठिकाणी जेवण घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आम्ही रात्रीच्या जेवणाबरोबरच दुसऱ्या दिवसाच्या चहा-नाश्ता आणि जेवणाची ऑर्डर दिली. जेवण तयार होईपर्यंत आम्ही उर्वरित तयारी पूर्ण केली. शाळेच्या समोर दगडी फरशीच्या कट्ट्यावर वर्तुळाकृती भारतीय बैठक मारून आकाशाच्या छताखाली जेवणाचे पार्सल खोलले. वा! किती अद्भुत अनुभव होता! हे नुसतेच जेवण नव्हते तर कर्तव्याने नवीन जोडलेल्या मित्रांसोबत एकत्र बसून विचारपूस आणि गप्पा मारत सजलेली मैफिलच होती ती. घरगुती पद्धतीचे उत्तम जेवण जेवल्यानंतर आम्ही थोडा वेळ पटांगणात फिरून घालवला. दुपारच्या उन्हाच्या तीव्रतेनंतर थंड वारा आणि ताजेतवाने वातावरण अनुभवणे खरंच खूप आनंददायी होते!
थकव्याने अंथरुणावर पडल्यावर कधी झोप लागली हेच मला लक्षात आले नाही. टेकडीवरून खेळती हवा येत असल्यामुळे वातावरण थंड होते. मच्छरही नसल्यामुळे रात्री आम्हाला खूप चांगली झोप लागली. शहरातील घाईघाईच्या जीवनातून थोडा वेळ बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात शांतता अनुभवणे खरंच खूप आनंददायी होते. माझे मूळ गाव खेडेगाव असल्याने आणि शालेय जीवनापर्यंत मी शेतात किंवा शेतातील घरात झोपायचो त्यामुळे हे अनुभव माझ्यासाठी नवीन नव्हते, तरीही ते क्षण खूप दिवसांनी पुन्हा अनुभवता आल्याचा आनंद झाला. निवडणूक केंद्रातील झोपेबद्दल आम्ही जे अनुभवले ते ऐकल्यापेक्षा पूर्णपणे अलग होते.
भल्या पहाटे ठीक चार वाजता जागे होणं आणि इतर सहकाऱ्यांना उठवून मॉक पोलच्या तयारीला लागणं हा एक वेगळाच अनुभव होता. दररोज गरम पाणी आणि शॉवरचा वापर करणारा मी, त्या दिवशी मात्र थंड पाण्याने मिनी आंघोळ करून दिवसाची सुरुवात करत होतो. मगामधून पाणी घेऊन हात, पाय आणि तोंड धुणे हे ग्रामीण जीवनाशी जवळून परिचित असलेल्या माझ्यासाठी नवीन नव्हते. यातूनच माझ्या मनात विचार आला की, ज्यांनी कधीही ग्रामीण भागात राहण्याचा अनुभव घेतला नाही त्यांच्यासाठी हे क्षण किती कठीण आणि मेहनतीचे असतील ? तरीही, आमच्या सुदैवाने आणि चांगल्या टीमवर्कमुळे सर्व मतदान यंत्रे यशस्वीरित्या जोडून मॉक पोल पूर्णपणे यशस्वी झाला. मतदानाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता पुढे मोठे तांत्रिक अडथळे येण्याची शक्यता कमी होती.
मतदान सकाळी सात वाजता सुरू झाले होते. पण आम्ही लवकर जागे झाल्यामुळे आणि सकाळी उठल्यावर ताबडतोब ब्रश करून चहा आणि नाश्ता करण्याची सवय असल्यामुळे, मतदानाच्या वेळेपर्यंत आमच्या पोटात कावळे ओरडत होते आणि ओठ तहानेने सुकले होते. सर्वजण व्यस्त असल्यामुळे कोणीही याकडे लक्ष देत नव्हते. शेवटी मलाच पोलिंग एजंटला सांगावे लागले, "अरे, पाणी तरी द्या!" तेव्हा मग त्यांनी थंड पाण्याचा जार आणून दिला. त्यामुळे दिवसभर थंड पाण्याची व्यवस्था झाली. मग त्यानंतर ओठ कोरडे पडले नाहीत.
पोटात भुकेने आगीची ज्वाला पेटली होती. मतदानाची रांग संपत नव्हती. माझे सहकारी त्यांच्या त्यांच्या कामात गुंतलेले होते. मी देखील विविध फॉर्म भरणे, मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवणे आणि इतर कामात व्यस्त असल्यामुळे नाश्ता मागवायला विसरलो होतो. शेवटी आठ वाजता एकदाचा नाश्ता आला आणि आम्ही सर्वजण काम करतच नाश्ता केला. थंड पाणी प्यायल्यानंतर आम्ही पुन्हा मतदान सुरू ठेवले.
मतदान अविरतपणे चालू होते. विशेषतः, मोठ्या संख्येने वयोवृद्ध महिला आणि पुरुष मतदानासाठी उपस्थित होते. त्यापैकी बरेच निरक्षर होते. काही लोकांच्या ओळखपत्रात नावे बदलली होती किंवा झेरॉक्स कॉपी दाखवल्या जात होत्या. अशा परिस्थितीत, पोलिंग एजंटच्या मदतीने आणि नियमांचे पालन करून, मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र असलेल्या प्रत्येकाला मतदान करण्याची संधी देण्यात आली.
नाश्त्याच्या काही तासांतच दुपारचे जेवण आले! सतत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेमुळे आम्हाला एकत्र जेवता आले नाही त्यामुळे आम्ही आळीपाळीने जेवण घेतले पण मतदानात व्यत्यय येऊ दिला नाही. मतदान केंद्राबाहेर काही लोकांनी वयोवृद्ध, निरक्षर आणि कमकुवत दृष्टी असलेल्या मतदारांना मदत करण्यासाठी त्यांच्यापैकी कुणाला तरी मतदान कक्षात प्रवेश द्यावा या गोष्टीवरून थोडा वाद घातल्याने थोडा गोंधळ निर्माण झाला होता. तथापि, हे मतदान केंद्र सीसीटीव्हीच्या लाईव्ह कव्हरेजखाली असल्याने परिस्थिती योग्यरित्या हाताळली गेली आणि निवडणूक प्रक्रिया सुरू राहिली. ही घटना वगळता, दिवसभर मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडले.
वेळोवेळी आमच्या विभागातील आणि मार्गावरील दहा केंद्रांचा झोनल तथा सेक्टर ऑफिसर केंद्रांना भेटी देत असे. फोन तसेच व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधत मतदान आकडेवारीचे अपडेट घेत असे. हा अधिकारी निवडणूक व्यवस्थापनात केंद्राध्यक्ष आणि प्रशासन यांच्यातील मुख्य दुवा असतो. मतदान केंद्राला आवश्यक सर्व प्रकारची मदत हाच अधिकारी करत असतो. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व्यवस्थापनाची जबाबदारी यांच्यावर असते. त्यामुळे तो खूप सहकार्य करत होता. यावेळी, त्यांनी मतदानाची आकडेवारी ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती, ज्यामुळे डेटा लवकर एकत्रित करणे शक्य झाले.
सकाळी सात ते दुपारी साडेतीन पर्यंत, जवळपास सर्व इच्छुक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. विशेषतः, शेवटच्या तासाभरात तुलनेने कमी मतदान झाले आणि बरोबर सहा वाजता मतदान प्रक्रिया अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पार पडली. प्रत्यक्ष मतदानादरम्यान विविध अडचणी निर्माण झाल्या, मग ते ओळखपत्र असो वा मतदान. अगदी पोलिंग एजंट आणि माझ्या मतदान अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याचा बंदोबस्त झाला पण त्यामुळे मतदान प्रक्रिया मंदावली.
मतदान संपल्यानंतर, सर्व मशीन शिलबंद करण्यात आल्या. वितरण केंद्रावरून मिळालेलं सर्व साहित्य परत करणं आवश्यक होतं. त्यासोबतच महत्त्वाचे अर्ज, लिफाफे, शिक्के, इतर साहित्य आणि केंद्राध्यक्षांचा अहवाल दिलेल्या आवश्यक नमुन्यात भरून, सर्व सहकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह पूर्ण करणं गरजेचं होतं. या कामांमध्ये थोडी गडबड उडाली, कारण पुढच्या केंद्राकडून फोन येत होते आणि बस ड्रायव्हर फोन करत होता. त्यामुळे ताण वाढत होता. पण, आमच्या शेजारील केंद्र क्रमांक दोन मधील सहकारी मदतीसाठी आले आणि त्यांच्या सहकार्याने ते काम अर्ध्या तासात पूर्ण झालं.
माझ्या टीममधील सर्व सहकाऱ्यांनी उत्तम टीम भावनेने काम करून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी शतप्रतिशत योगदान दिलं. मी केंद्राध्यक्ष असलो तरी, पद प्रतिष्ठा बाजूला ठेवून, खेळीमेळीने आणि जबाबदारीने बहुतांश काम त्यांनीच केलं; विशेषतः मतदान अधिकारी क्रमांक एक ! ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे.
बरोबर साडेसात वाजता मतदान केंद्र बंद करून आम्ही साहित्यानिशी गावाबाहेर बस थांबलेल्या ठिकाणी पोहोचलो. परतताना घराची ओढ असल्याने चालण्याचा त्रास झाला नाही. बस मध्ये बसलो तेव्हा समजले की पुढच्या केंद्रावरील टीम अजून फाट्यावर येणार होती. ड्रायव्हरला वळवायची अडचण असल्याने त्या गावात परत बस नेणार नव्हता, त्यामुळे त्यांना फाट्यावरून घेऊन जाण्याचे ठरले. पंधरा मिनिटांनंतर टीम फाट्यावर पोहोचली आणि आम्ही त्यांना घेऊन पुढे निघालो. परतताना मनात मिश्र भावना होत्या- मन प्रसन्न पण शरीर थकलेलं ! जबाबदारी पूर्ण केल्याचे आंतरिक समाधान जास्त होते, पण कठोर परिश्रम आणि थकव्यामुळे अंग दुखत होते. विश्रांतीची नितांत गरज होती. त्यामुळे बसमध्ये डुलकी कधी लागली हे समजले नाही. पुढची टीम त्याच्या पंधरा मिनिटांनंतर आली आणि मजल दरमजल करत आम्ही साडेआठ वाजता संकलन केंद्रावर पोहोचलो.
एकामागून एक, सर्व मार्गावरील बस, त्यांच्या टीमसह, संकलन केंद्राकडे परतत होत्या. मंडपात फारशी गर्दी नसल्याचे लक्षात घेऊन, आम्ही साहित्य घेऊन मंडपाकडे निघालो. जास्तीत जास्त वीस संघ पोहोचले असतील. लाऊडस्पीकर वर जेवण व्यवस्थेची घोषणा चालू होती. त्यामुळे वेळ होऊन सुद्धा कुणीही जेवणाच्या मनस्थितीत नव्हते. सर्वांना वाटत होते एकदाचे साहित्य परत करू आणि मग जेवणाचं बघू. अर्ध्या तासात साहित्य जमा करून लवकरात लवकर घरी पोहोचू असे आम्हाला वाटले. पण अपेक्षित घडले नाही.
सुरुवातीला, झोनल ऑफिसर दालनात साहित्य घेऊन आम्ही दाटीवाटीत उभे राहून वाट बघत बसलो. आमचा झोनल ऑफिसर नवीन असल्याने, साहित्य जमा करण्यासाठी आवश्यक क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी कोणते फॉर्म जमा करायचे याबद्दल तो गोंधळात होता. तो सिनियरची मदत घेत, पुन्हा माहिती भरत आणि अहवाल पुन्हा पुन्हा तपासत होता. यामुळे बराच वेळ वाया गेला. त्यामुळे, आम्ही प्रथम जेवण उरकून मग साहित्य जमा करण्याचा निर्णय घेतला. एका एकाने आम्ही अर्ध्या तासात जेवण उरकले. त्यांनी शिरा, भात आणि आमटी यांचा समावेश असलेले जेवण पुरवले होते. जेवण झाल्यावर, आम्ही पुन्हा साहित्याकडे वळलो.
एव्हाना रात्रीचे साडेअकरा वाजले होते आणि मंडप खचाखच भरलेला होता. वेळेवर जेवण मिळाल्याने आम्ही निर्धास्त झालो होतो. परतायला उशीर झाला तरीही आता घरी जेवणाची चिंता नव्हती कारण आम्ही आधीच जेवून घेतले होते. आता साहित्य जमा करण्यास उशीर होणार हे निश्चित झाल्यावर, आम्ही त्यासाठी मानसिक तयारी करू लागलो. तेव्हाच सुदैवाने आमचा ऑफिसर डेस्कजवळ पोहोचला आणि आम्हाला आवश्यक नमुना भरून दिला. मला अंदाज होता की कदाचित पुढील काही मिनिटांत साहित्य जमा होईल आणि आम्ही घरी जाण्यासाठी मुक्त होऊ. साहित्य जमा करायच्या काउंटरला गेलो तर आमच्यापुढे एक टीम अगोदरच रांगेत उभी होती.
पुढच्या टीमला काय काय मागणी आहे, काय काय अडचणी येत आहेत यानुसार आम्ही आमची कागदपत्रे पूर्ण करत होतो आणि एकदाचा आमचा नंबर आला. साहित्य जमा करून घेणारी टीम अतिशय काळजीपूर्वक काम करत होती. जसे आमचे सर्व साहित्य जमा होण्याची वेळ जवळ आली, तसे दोन रबरी शिक्के गहाळ झाल्याचे दिसून आले. आमच्या सहकाऱ्याच्या लगेचच हे लक्षात आले आणि त्याने दोन मिनिटांतच त्याच्या बॅगमध्ये असलेले ते दोन शिक्के शोधून काढून जमा केले आणि अशा पद्धतीने आम्ही सर्व साहित्य परत करण्यात यशस्वी झालो होतो.
आम्हाला रात्री पावणे बारा वाजता रिलीव्हिंग सर्टिफिकेट मिळाले. माझ्याकडे जमा असलेला सर्व सहकाऱ्यांचा भत्ता बैजवार वाटला आणि सर्वांचे आभार मानून निरोप घेतला. कर्तव्य मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने मनावर तीळमात्रही दबाव नव्हता. दोन दिवसांच्या कठोर परिश्रमाचा ताण विरघळून गेला होता. समाधानाने सुटकेचा निःश्वास सोडून, थंड पाणी प्यायलो आणि खुर्चीवर बसून थोडा वेळ विश्रांती घेतली. माझ्या मनाला अजूनही पटत नव्हते की आमची निवडणूक ड्युटी संपली आहे आणि आम्ही सर्व साहित्य यथासांगत परत केले आहे.
मध्यरात्री, एक दीर्घ आणि कठीण दिवस संपल्याचे संकेत देत, मी गोंधळलेल्या निवडणूक संकलन केंद्रातून बाहेर आलो. या निवडणूक ड्युटी मध्ये इतर केंद्रावर असलेले, माझ्यासोबत आलेले माझे दोन मित्र आधीच त्यांचे साहित्य जमा करून माझ्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. थकवा आणि समाधानाचा एक सामायिक उसासा टाकून, आम्ही आमच्या वाट पाहत असलेल्या वाहनाकडे निघालो. दोन दिवसांच्या खडतर मोहिमेनंतर आमच्या अंतःकरणात घरी परतण्याची ओढ होती.
लांबच्या प्रवासामुळे मला विचार करायला पुरेसा वेळ मिळाला, ज्यामुळे मला लोकशाही प्रक्रियेतील आपल्या योगदानाचे महत्त्व कळले. प्रवासात कर्तृत्वाची जाणीव तर झालीच पण निवडणूक कर्तव्ये यशस्वीरीत्या पूर्ण केल्यामुळे अभिमानाची आणि पूर्णतेची खोल भावना मनात निर्माण झाली. आम्ही लोकशाही प्रक्रिया टिकवून ठेवण्यासाठी आमचे कर्तव्य बजावले होते.
परतीचा प्रवास हा दिवे आणि लुप्त होत चाललेल्या संभाषणांचा होता, प्रत्येक मैलाचा प्रवास आम्हाला आमच्या स्वतःच्या घरांच्या सोयी आणि ओळखीच्या जवळ आणत होता. प्रदीर्घ उकाडा आणि कामाच्या तीव्र ताणामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा असूनही, सौहार्द आणि सामायिक हेतूने आम्हाला एकत्र बांधले होते. ग्रामीण भागात मतदान केंद्रावर असल्यामुळे, मला स्थानिक संस्कृती आणि लोकांच्या जीवनशैलीचा अनुभव घेता आला.
घरी पोहोचलो तर सर्वजण गाढ झोपेत होते. त्यांच्या विश्रांतीत अजिबात व्यत्यय न आणता थेट बेडरूम मध्ये गेलो. फ्रेश होऊन लगेच झोपलो.
- केशव राजपुरे
उत्तम अनुभव... साहित्य जमा करताना काय मनस्थिती होते आणि प्रशासनाच्या नियोजनाचा कसा अभाव असतो हे विस्तृतपणे मांडले असते तर अधिक बरे झाले असते...
ReplyDeleteखूप छान अनुभव
ReplyDeleteलोकशाहीचं दर्शन सोहळा
ReplyDeleteअतिशय उत्तम अनुभव तुम्ही मांडला सर...अनेकजण वेग वेगळी करणे देवून निवडणूक जबाबदारीतून माघार घेत असतात पण तुम्ही ही जबाबदारी स्वीकारली आणि खूप उत्तम रित्या पार पडली. अप्रतिम लेख.
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteखुप छान लिखाण, भारतीय लोकशाही प्रक्रिया वर शंका निर्माण करण्याराण चपराक,
ReplyDelete