Monday, May 3, 2021

#संशोधनारंभ

#वैज्ञानिक_शेतकरी

मी एम. एस्सी. ला विद्यापीठात असताना माझ्या वाई तालुक्यातून आणि विशेषता बावधन परिसरातून एम. एस्सी. चे शिक्षण घेणारं कुणीच नव्हतं अशी माझी धारणा होती. पण एक दिवस अचानक माझा वर्गमित्र राजेंद्र यादव साधारण साडे पाच फूट उंचीच्या एका मध्यम बांध्याच्या अतिशय साध्या व्यक्तिमत्वास माझ्या विद्यापीठातील वसतीगृह क्रमांक दोन मधील रूम नंबर ८७ वर घेऊन आला. ओळख करून देत तो म्हणाला - हे आपल्या वाई जवळील आसले या गावातील प्रताप बाबुराव वाघ; आपल्या अधीविभागातच एम. एस्सी. भाग २ या वर्गात एनर्जी स्टडीज या स्पेशलायझेशन मध्ये शिकत आहेत. मला एक आश्चर्याचा धक्का बसला. नंतर लक्षात आलं की आम्ही जवळजवळ चौघेजण त्यावेळी वाई भागातून इथे शिकत होतो. त्यांना भेटल्यानंतर फारच बरे वाटले. कारण तेव्हा आम्हा गाववाल्यांचा एक ग्रुप असावा असे वाटत असे. मी विद्यापीठात प्रथमांक आल्याचे कळल्यामुळे विविध प्रश्न विचारून माझ्या ज्ञानाची खोली तपासून घ्यायला प्रतापरावांनी सुरुवात केली. तेही अतिशय हुशार असल्याचे समजायला मला वेळ लागला नाही. 


माझ्या एम. एस्सी. भाग एक मधील वाटचालीत प्रताप वाघ यांचे बहुमोल मार्गदर्शन, सहकार्य आणि कायम प्रोत्साहन लाभल्याचे मला आठवते. ते आम्हाला एक वर्ष सिनियर असल्यामुळे जून १९९३ ला एम. एस्सी. पूर्ण करून आपल्या मूळ गावी आसले येथे राहायला गेले. अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तक उपलब्ध नसल्यामुळे आम्हा सर्वांना तेव्हा अभ्यास करताना अगोदरच्या बॅचच्या मित्रांच्या नोट्स वरच विसंबून राहावे लागे. मग एम. एस्सी. भाग दोन सुरू व्हायच्या अगोदर एक दिवस वेळ काढून मी आणि राजू प्रताप यांच्या कृष्णेकाठी वसलेल्या आसले येथील घरी नोट्स आणण्यासाठी गेलो. त्या वेळेला नोट्स दिल्यानंतर त्यांनी एक गोष्ट सांगितली होती - ज्या पद्धतीने नोट्स न्यायला तुम्ही आला आहात त्याच पद्धतीने परत एकदा पुढच्या वर्षी नोट्स परत करायला कृपया घरी यावे. तो प्रसंग आला नाही कारण पुढे ते कोल्हापुरातच संशोधनास रुजू झाले होते.  

प्रताप ने अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातून एम. एस्सी. पर्यंत चे शिक्षण घेतले होते. सुरुवातीला वाईतील सेंट थॉमस इंग्लिश स्कुल मध्ये इंग्रजी माध्यमातून शिकलेला हा विद्यार्थी पुढे विज्ञान विषयातून परंपरागत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन थांबला होता. आईचे आजारपण आणि वडिलांचे पुढारपण यामुळे त्या वेळेला त्यांची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती. भरपूर सुपीक जमीन असून देखील निव्वळ राबण्याच्या वाणवेमुळे घर मागे आले होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. आई-वडील, दोन विवाहित बहिणी आणि एक अविवाहित भाऊ असे त्यांचे कुटुंब होते. त्याने आपल्या बंधूसोबत आईची दीर्घ आजारपणात शेवटपर्यंत सेवा केली होती.
 
आम्ही घरी गेलो तर हा गडी लुंगी लावून बनियानवर शेतात खोरं घेऊन काम करत होता. सुरुवातीला आम्हाला विश्वासच बसला नाही. पण त्याच्यातील कर्तेपणाची मला तेव्हा जाणीव झाली होती. शिक्षित असूनसुद्धा शेती करण्याची ऊर्मी आणि शेती कसायची मानसिकता त्यांनी जपली होती. मला वाटलं हा मुलगा आता शेतीच करणार ! पण झालं वेगळंच ! पुढील एक दोन महिन्यात त्यानं शिवाजी विद्यापीठातच एका संशोधन प्रकल्पामध्ये रुजू होऊन पूर्णवेळ पीएचडीसाठी प्रवेश मिळवला होता. एम. एस्सी. भाग दोन मध्ये असताना वेळोवेळी त्याची भेट व्हायची. माझी घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे भविष्यात त्याच्यासारखा मी पीएचडी करेन असं मला केव्हाही वाटलं नव्हतं. पण तो नेहमी आम्हाला एम. एस्सी. नंतर पीएचडी करण्यासाठी प्रेरित करायचा. कारण भौतिकशास्त्र विषयात फक्त एम. एस्सी. होऊन नोकरीसंधी तेव्हाही उपलब्ध नसायच्या. एम. एस्सी. नंतर लगेच नोकरी करायची किंवा नाही मिळाली तर बी.एड. करायचं हा माझा निर्धार होता. तो म्हणे - बी.एड. पेक्षा पी.एच.डी. काय वाईट ?

जून १९९४ ला एम. एस्सी. झाल्यानंतर वसतीगृहाचा निरोप घेऊन मी माझ्या गावी गेलो. हातात डिग्री होती.. विद्यापीठाचं बी. एस्सी. आणि एम. एस्सी. ची गोल्डमेडल होती.. मात्र नोकरी नव्हती... या परिस्थितीत काय करायचं ? म्हणून खंडाळ्याला दाजींच्या व्यवसायात हातभार लागावा म्हणून त्यांच्या घरी राहिलो. पण मी पी.एच.डी ला प्रवेश घ्यावा हि प्रतापची कायम इच्छा असायची. तो मला म्हणत असे - तूला नोकरी मिळत असेल तर निर्धास्त रहा पण आता जर काहीच करत नसशील तर संशोधन कामात झोकून दे. यासाठी तो आपले संशोधन मार्गदर्शक राव सर यांच्यामार्फत गावी पत्र पाठवत असे आणि मी संशोधन करावे यासाठी प्रेरित करत असे. पत्रामध्ये - आम्ही तुझ्या राहण्याचा तसेच शिष्यवृत्तीचा बंदोबस्त  करू पण कसल्याही परिस्थितीत इथे ये आणि संशोधनास रुजू हो - असा सल्ला असायचा. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत शिक्षण घेणं हीच माझ्या दृष्टीने जिकिरीची गोष्ट होती. पुन्हा त्याच्या पुढे किमान चार वर्ष पीएचडी साठी व्यतीत करणे माझ्यासाठी खर्चिक ठरणार होते. उच्च शिक्षण घेणे मनात होते मात्र घरची परिस्थिती त्यास अनुकूल नव्हती. म्हणून मी द्विधा मनःस्थितीत होतो.

एके दिवशी सणाच्या निमित्ताने मी जेव्हा माझे मुळगाव बावधन-अनपटवाडी येथे गेलो होतो तेव्हा माझे बंधू; दादा यांनी विद्यापीठात जाऊन डॉ. राव आणि प्रताप यांची भेट घेण्याची व त्यांचे पुढील शिक्षणाच्यादृष्टीने मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला तसेच शिष्यवृत्तीवर पीएचडी करता येत असेल तर प्रवेश घ्यावा असे सुचवले. मग मात्र मला थोडा धीर वाटला. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर शेवटी ठरवले शिवाजी विद्यापीठातच फेलोशिपवर फिजिक्समध्ये पीएचडी करायची. ऑक्टोबर १९९४ दरम्यान मी राव सरांच्याकडे यूजीसीच्या प्रकल्‍पात प्रतापच्या प्रयत्नातून मुलाखतीद्वारे प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून रुजू झालो. तेव्हा खूपच चर्चेत असलेला अत्यंत उपयोगी असा एरोजेएल पदार्थ तयार करण्यावर हा प्रकल्प होता. अगोदरचे संशोधन अजैविक पदार्थांच्या पासून एरोजेएल तयार करण्यावर आधारित होते. माझा प्रकल्प मात्र सेंद्रिय एरोजेएल निर्मितीचा अर्थात आव्हानात्मक होता. प्रतापच्या प्रयत्नातून महिना ८०० रुपये विद्यावेतन मिळू लागले; त्यातील चारशे रुपये माझा खर्च आणि चारशे रुपये गावी अशी आर्थिक व्यवस्था झाली होती. मग आम्ही आंबाई नाक्यावरील अशोक भोसले यांच्या घरी भाडे तत्वावर रूम-पार्टनर म्हणून राहू लागलो. विवेक, अरविंद नंतर प्रताप हा माझा तिसरा रूम-पार्टनर ! माझ्या रूपाने त्याच्या पुढील पीएचडी प्रवासात गावाकडची हक्काची सोबत मिळाली होती. तर मला त्याच्या रूपात अजून एक वडील बंधू, मार्गदर्शक मित्र, व नवीन रूम-पार्टनर लाभला होता.

तेव्हा एरोजेल प्रयोगशाळेत युजीसी, डीएसटी आणि सीएसआयआर असे एकूण तीन प्रकल्प सुरु होते. या तिन्ही प्रकल्पाच्या जमाखर्चाचा आणि कार्यालयीन कामकाजाचा बोजा मी आणि प्रताप दोघांवरच असे. त्यामुळे मैत्र वाढलं. त्याच्यामुळे कार्यालयीन कामकाज शिकायला मिळाले. पत्र मसुदे, प्रशासकीय मान्यता, खरेदी ऑर्डर, तसलमातील रक्कम, देयके, जमाखर्च, लेखापरीक्षण, अहवाल इत्यादीमध्ये तरबेज झालो. मुख्य म्हणजे बऱ्याच प्रशासकीय विभागातील सहकाऱ्यांशी ओळख झाली. प्रयोगशाळेतील प्रयोगांपेक्षा कार्यालयीन कसरती बऱ्याच असायच्या. पण यामुळे प्रशासनातील बारकावे जवळून बघण्याचा योग आला. त्यावेळेला प्रयोगशाळेमध्ये बरीचशी उपकरणं आयात केल्याचे आठवते. कस्टम मधून ही उपकरणं सोडवून घेण्याची जोखमीची जबाबदारी आमच्यावर असायची. मराठी बाणा जपत आणि कसब पणाला लावत आम्ही विमानतळावरून उपकरण कोणत्याही परिस्थितीत सोडवून आणत असू. त्याने कागदावर कस्टम क्लिअरन्स प्रक्रियेचा तपशील आणि फ्लोचार्ट लिहिलेला असे. हा माझ्यासाठी खूपच उपयोगी अनुभव होता. त्यामुळे अधूनमधून ग्रुपमध्ये कौतुकाचे धनी होत असू.

असंच एक उपकरण आणण्यास आम्ही मुंबईला जाणार होतो. त्याच्या आदल्या दिवशी, ३१ डिसेंबर १९९५ रोजी माझ्या वडिलांचं गावाकडे देहावसान झालं. मोठा आधार गेला होता. माझं पीएचडी पूर्ण करण्याचे स्वप्न अधूरच राहणार असं वाटू लागलं होतं. सेंद्रिय एरोजेएल तयार करत असताना मला आठवते प्रयोगशाळेत एक लहानसा अपघातदेखील झाला होता त्यामुळेे एरोजेल पासून काही काळ दूरच होतो. त्यातच राव सर दोन वर्षासाठी संशोधनानिमित्त परदेशी गेल्यामुळे माझे पी.एच.डी साठी नावनोंदणी देखील झाली नव्हती. एअरजेल प्रयोगशाळेत पीएचडी पूर्ण करणे माझ्यासाठी तेव्हा कठीण काम वाटले. तसेच फेलोशिपदेखील संपणार होती. मग मात्र मी संशोधन थांबवून घरी परतण्याचा निर्णय घेतला. आयुष्यातील निर्णायक दोन वर्ष होती ती - फारच महत्वाचा कालावधी होता तो !
 
माझ्या वडिलांच्या निधनाची बातमी विभागात कळाली होतीच. तसेच मला तेव्हा त्वरितचा आधार आणि समर्थन आवश्यक असल्याचे प्राध्यापकांच्या लक्षात आले. कसल्याही परिस्थितीत माझे शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी त्यांची धारणा होती. आदरणीय पाटील सर आणि लोखंडे सरांनी मला भोसले सरांकडे पीएचडी तसेच डीएसटी प्रकल्पात एक जागा रिक्त असल्याचे सांगितले. भोसले सर माझे शिक्षक.. त्यामुळे तेही माझ्यासारख्या विद्यार्थ्यांच्या शोधात होतेच. यावेेळी प्रतापने मला बंधुतुल्य आधार आणि पाठिंबा दिला. माझ्यातील आत्मविश्वास पुन्हा नव्याने शोधून भोसले सरांच्या मदतीतून माझा पीएचडी चा संकल्प पुन्हा एकदा शून्यातून सुरू करण्यास निव्वळ प्रताप कारणीभूत होता.

दोघांच्या प्रयोगशाळेतील योगदानाविषयीच्या अनेक आठवणी आहेत; प्रयोगशाळेत स्थापित सर्व फ्यूमहूड आम्ही दोघांनीं स्थानिक सुतारांकडून बनवून घेतलेली आहेत. त्याकाळी रिंगरोड नसताना टिंबर मार्केट ते विद्यापीठ आयसोलेशन हॉस्पिटल मार्गे कच्च्या रस्त्याने भर उन्हात छकड्यासोबत चालत आलेलो आहे. हातोड्याच्या सहाय्याने फरशी तोडून प्रयोगशाळा विकसित करण्यात योगदान दिले आहे. अधिकाऱ्यांकडून कित्येक कार्योत्तर मान्यता तसेच देयके मंजुर करून घेतल्याचे आठवते. अधिविभागाच्या मेकेनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वर्कशॉपच्या मदतीने बरीच आयातित उपकरणे कार्यान्वित करून घेतली आहेत. प्रामाणिकपणे, आम्ही दोघांनी प्रयोगशाळा विकसित करण्यात हातभार लावला आहे याचा सार्थ अभिमान वाटतो.

मला आठवते की त्या वेळी प्रकल्पाची अनुदान यायला वेळ लागे. अनुदान आल्यानंतर एकदम विद्यावेतन देयके सादर करावी लागत. तोपर्यंत खर्चाची तजवीज करावी लागे. प्रतापच्या घरात निकड असूनही आपल्या विद्यावेतनातून माझा पगार चालू नसल्याने एक वर्षाचा सर्वच्या सर्व खर्च त्यांने उचलला होता. म्हणून मी विद्यापीठात थांबू शकलो होतो. त्याचा परोपकारी स्वभाव माझ्यासाठी फार मोठा धडा होता. माझ्याकडून परत आलेल्या रकमेतून स्वतःसाठी हौसमौजेच्या गोष्टी न घेता त्यानं गावाकडं तटलेली कामं केल्याचे आठवते. माझ्या आयुष्यात आलेल्या आर्थिक समस्या अशा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सुटत गेल्या म्हणूनच तर त्या त्या वेळेचा शैक्षणिक प्रवास थांबला नाही हे महत्त्वाचं !

आम्ही ज्या संकुलात राहायला होतो तिथं बरेच विद्यार्थी रहात. प्रताप आणि माझी रूम या सर्वांसाठी ताणतणाव दूर करण्यासाठीची हक्काची जागा असायची. ते एक असे शाही व्यक्तिमत्व आहे की त्याचे कुणाशी भांडण झाल्याचे मला आठवत नाही. कायम स्मितहास्य आणि बोलण्यावर विनोदी प्रतिक्रिया ठरलेली ! वयाने आम्हा सर्वांपेक्षा जेष्ठ असल्यामुळे प्रत्येकजण त्याच्याशी आदराने वागे. त्याची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही कायमच माझ्यासाठी प्रेरणा ठरली.

'साधी राहणी' ही त्याची स्वभावनिशाणी होती. नम्रता नसानसात भरलेली ! वडिलधार्‍यांशी बोलताना केवढी ती आदब ! त्याच्याकडे घेऊन गेलेल्या शंकाचं तो आपल समाधान होईपर्यंत निरसन करण्याचा प्रयत्न करी. संशोधनाचा पूर्ण काळ आम्ही विद्यापीठ कॅम्पस तसेच शहरातून सायकल वरूनच फिरत असू. आम्ही दोघेही दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळांत काम करत होतो तरीही रूम पार्टनर असल्याने कायमचा संवाद ठरलेला ! आमच्या दोघांच्या सायकली कायम सोबत असायच्या. सुरुवातीला माझी सायकल नव्हती. माझे विद्यावेतन येईपर्यंत सायकल घेण्यासाठी त्याने स्वतः पैसे घातले होते. इतका उदार जोडीदार मिळायला भाग्य लागतं.

तो उत्तम क्रिकेट खेळत असे ! माझ्या इतका हौशी नसला तरी खेळाची जाण होती. एम. एस्सी. दरम्यान अंतरविभागीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत भौतिकशास्त्र विभागामार्फत दोन ते तीन सामन्यादरम्यान आकर्षक फलंदाजी केल्याचे आठवते. तसेच पदवीदान समारंभाच्या मैदानावर दुपारी दोन ते अडीच या दरम्यान आयोजित केलेल्या कर्मचाऱ्यांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भेदक गोलंदाजी केल्याचे आठवते. त्याच्या योगदानामुळे याच स्पर्धेत एक वर्ष आम्ही उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. आंबाई नाक्या वरील रूम समोर हमखास आमचा क्रिकेटचा डाव पडलेला असायचाच. या ना त्या कारणाने आम्ही कायम एकत्र असूच क्रिकेट मध्ये सुद्धा..

मेरिट मध्ये थोडासा कमी होता तरी शिकताना परिश्रम मात्र कठोर घेई. मला आठवते भौतिकशास्त्र विभागात एक वर्ष हंगामी शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्याच्याकडे अध्यापनासाठी इलेक्ट्रॉनिक्स हा विषय सोपवण्यात आला होता. त्याच्यासाठी ती थोडी कष्टाची गोष्ट होती. पण शिकायची तयारी कायम. रात्री उशिरापर्यंत व्याख्यानांची तयारी करत बसलेला मी त्याला पाहिलाय. रोजच्या व्याख्यानाचा आदल्या दिवशी अभ्यास ठरलेला. पण त्या बॅचला इलेक्ट्रॉनिक्सचा पूर्ण पेपर शिकवला गेल्याची गोष्ट माझ्या ध्यानात आहे. काहीही म्हणा विद्यार्थ्यांनी त्याच्या विनोदी स्वभावाचा आणि शिकवण्याच्या विशिष्ट शैलीचा पुरेपूर आनंद लुटला होता !

एक वर्षाचा अनुभव पाठीशी असल्यामुळे दुसऱ्या वर्षीच्या हंगामी नियुक्तीच्या वेळी त्याचाच विचार होणार हे अपेक्षित होते. पण विभागाच्या निकडी नुसार दुसऱ्या वर्षी त्याला संधी मिळाली नाही. त्यामुळे मात्र अपयशाने आयुष्यात पहिल्यांदा प्रचंड तुटलेला प्रताप मी पाहिला होता. तरी तो खचून गेला नाही. पुढे प्रावीण्यासह भौतिकशास्त्रातील पीएचडी मिळवली. एव्हाना पलूस महाविद्यालयातील शकुंतला चव्हाण या हिंदीच्या मॅडमबरोबर त्याचे लग्न झाले. तिथपर्यंत आमची चार वर्षांची रूमपार्टनरशीप होती. माझ्यासाठी ती काळजीदायी, आधार देणारी, संस्कारी आणि अविस्मरणीय सोबत होती. तेव्हा त्याला कायमची नोकरी नव्हती. सांगली येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात त्याने हंगामी नोकरी केली. भविष्यातील आपल्या नोकरीमुळे आपल्या पत्नीस कायमस्वरूपी नोकरी सोडावी लागू नये अशी खूणगाठ बांधत तडजोड करायची त्याने तयारी ठेवली होती.

(सौ. शकुंतला प्रताप वाघ)

वस्तूत: प्रतापचे एरोजेल पदार्थ तयार करण्याचे संशोधन जगप्रख्यात होते व त्याने त्यात कौशल्य प्राप्त केले होते. १९९९ साली त्याच्या या कौशल्याची राष्ट्रीय अभियानाच्या संशोधन प्रकल्पात आवश्यकता होती. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान बीएआरसी कडे सुपुर्त करावे लागणार होते. तत्कालीन द्रष्ट्या शास्त्रज्ञांनी त्याच्यातील सुप्त गुणांची पारख करत या प्रकल्पावर त्याची नियुक्ती केली. वस्तूत: या प्रकल्पामध्ये दोन सहसंशोधक भरणे आवश्यक होते. रूम पार्टनर आणि अनुभवी संशोधक म्हणून त्याने मला त्याच्यासोबत या प्रकल्पात काम करण्यासंदर्भात विचारणा केलीही होती. पण तेव्हा हातातील नोकरी सोडण्याची माझी हिंमत झाली नाही. कदाचित भविष्यात मातृसंस्थेची सेवा मी करणे अपेक्षित होते ! त्या प्रकल्पामध्ये तो प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट तर सोबत एक सिनियर रिसर्च फेलो होता. त्याचे कौशल्य आणि अथक प्रयत्नांनी त्यांना आवश्यक व समाधानकारक परिणाम मिळाले होते. या गोष्टीचा त्याला भविष्यात करिअर करण्यास फार उपयोग झाला.


एकदा मी त्याला त्याची चूक नसतानाही विनाकारण कुणीतरी छळल्याने निराश झालेला पाहिले होते. तो ज्या प्रकल्पाशी संबंधित होता त्यातील अटी व शर्तींनुसार पायाभूत सुविधा हस्तांतरित करणे क्रमप्राप्त होते. त्यावेळी निव्वळ हट्टापायी त्यास त्रास दिला गेला. म्हणतात ना 'वेळ प्रत्येकाची येते'. नंतर जेव्हा तीच व्यक्ती मोठ पद मिळण्यासाठी शिफारसीसाठी त्याची विनवणी करत होती तेव्हा त्याने समोरच्याचे सानपण सिद्ध केले होते. कधी कधी आपला आत्मसन्मान जपताना कमीपणाचे पडदे बाजूला करावे लागतात हेच खरे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानतर बीएआरसी मध्ये वैज्ञानिक अधिकाऱ्यांसाठीच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. प्रतापने या नोकरीसाठी आवश्यक कौशल्य प्रकल्पातून प्राप्त केले होतेच. तसेच त्याला मुलाखतीच्या वेगवेगळ्या कठोर टप्प्यातून जावे लागले. सुदैवाने त्यात त्याला यश आले. आणि अशा तऱ्हेने २००१ मध्ये थेट भरतीद्वारे बीएआरसी मध्ये त्याची  वैज्ञानिक अधिकारी म्हणूूून नियुक्ती झाली.

नोकरीवर रुजू होण्यासाठी त्याला मुंबईत शिफ्ट व्हावे लागले. परंतु त्याने पत्नीला पलूस येथेच आपली नोकरी सुरु ठेवण्याची मुभा दिली. गेली २३ वर्षांपासून दिलेला शब्द पाळत तो जीवनातील तडजोडीशी बांधील आहे. त्यांचा मुलगा शंतनू अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. भौतिकशास्त्रातील बी.एस्सी. असलेला प्रतापचा भाऊ; धनंजय आपला कबड्डीचा छंद बाजूला ठेवत शेतीचे संगोपन करत आहे. संसार आणि कर्तव्य यात आवश्यक सामंज्यस्य ठेवत केलेला केवढा मोठा यज्ञ ! 'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' हे वचन त्याच्या जीवनाला पुरेपूर लागू पडते.

(चि. शंतनु प्रताप वाघ)

२००१ पासून, त्याने प्रामाणिक कर्तृत्वातून स्वत: ला वैज्ञानिक "डी" पासून "जी" पातळीपर्यंत उंचावले आहे. बीएआरसीच्या कल्याण केंद्रामध्ये ईएचपीपीएल प्रयोगशाळेच्या विकासातील महत्वपूर्ण योगदानासाठी त्यास तीन ग्रुप पुरस्कार आणि दोन विशेष योगदान पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ही नवीन प्रयोग शाळा उभारताना भूसंपादनापासून ते पूर्ण बांधकाम व पायाभूत सुविधांच्या विकासापर्यंत त्याने आपल्या पातळीवर कसून योगदान दिले. राष्ट्रीय प्रयोगशाळेत अशा स्तरावर आपला मित्र वैज्ञानिक असणे हा आम्हा सर्वांचा सन्मान आहे. तो संस्थेच्या विविध मोहिमेद्वारे देशसेवा करीत आहेच. महत्त्वाचं म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध जपलेल्या आपल्या सहकाऱ्यांकडून काम पूर्ण करून घेण्याची त्याच्याकडे हातोटी आहे. निगर्वी, मितभाषी प्रतापने ज्ञान आणि पदाच्या अहंकाराचा दर्प कुशलतेने दूर ठेवलाय. अजून तो आपल्या क्षेत्रात उच्च स्थान मिळवणे बाकी आहे. पण यथावकाश तेही शक्य होईल . आम्ही दोघेही आपापल्या कर्तृत्वाने यशस्वितेत आहोत. पण इथवर येण्यासाठी आम्ही केलेले प्रयास आणि आर्थिक तसेच बौद्धिक पातळीवर केलेला संघर्ष सारखाच आहे हे तथ्य मिळवलेल्या यशास आणखीन सुवर्णमय करत आहे.


त्याला शेतीचा विकास करण्याचा मोठा छंद ! ती त्याची लहानपासूनची आवड ! जमीन समतल करणे, विहीर खोदणे, पाईपलाईन, ऊस बागाईत ही त्यांची शेतीतील प्राथमिकता असे. आईवडील गेल्यानंतरही तो लहान भावाच्या मदतीने आधुनिक शेती करत आहे. नगदी पिकांची शेती करून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल म्हणून मला तो कायम अनपटवाडी येथे बंधूंना एखादे डबर खोदून देण्याचा सल्ला देई. नोकरीतील अनिश्चिततेमुळे बराच काळ मला ते शक्य झाले नाही. गावी सिमेंटमधील पक्के घर बांधण्याऐवजी मी विहिरीचे काम प्राधान्याने पूर्ण केले. अलीकडेच त्याने अनपटवाडी येथे ते फुललेले नंदनवन पाहिले; कांक्रीट रिंग युक्त चाळीस फूट खोल विहीर, जमीन सपाटीकरण, प्रत्येक शेतात केलेली पाईपलाईन आणि ऊस बागाईत पाहून त्याला आभाळ ठेंगणे झाले. गेल्याच वर्षी आवर्जून मला त्यानेही आसले येथे शेतीत केलेली कामे, विहीर, आणि प्राप्त केलेली प्रगती अभिमानाने दाखवली. त्याचे म्हणणे असे की एकवेळ नवीन जमीन खरेदी करता आली नाही तरी चालेल पण वडिलोपार्जित असलेली ही काळी माता टिकवता आणि जपता आली पाहिजे.

देव कुणाच्या आयुष्यात कुणाला जागा देईल हे सांगता येत नाही मात्र ही सारी किमया प्रायोजीत असते हे मात्र खरं आहे. आम्हाला वेळेवर याची जाणीव होणे गरजेचे आहे आणि समोरच्याच्या ह्रदयात आपले स्थान टिकवणं महत्वाचं आहे. संशोधन करत असताना लाभलेला लाखमोलाचा जोडीदार मला भाग्यानेच मिळाला आहे. अन्यथा आम्ही एकत्र संशोधन करीत रूम-पार्टनर बनणे हा निव्वळ योगायोग होता. त्याने तो प्रयासाने घडवून आणला होता. केवळ त्याच्यामुळेच मी संशोधनात प्रवेश करून माझी मध्यंतरी हरपलेली लय परत मिळवू शकलो होतो. आपल्या सदाचरणातून त्याने माझ्यात मानवी मूल्ये रुजविली आहेतच. खऱ्या अर्थाने प्रताप माझ्या आयुष्यातील सुवर्ण व्यक्तिमत्व बनले आहे !

डॉ केशव यशवंत राजपुरे (९६०४२५०००६)

25 comments:

  1. Cछान लिहिलंय अणि अगदी खरे आहे.

    ReplyDelete
  2. अतिशय समर्पक व मार्गदर्शक
    👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. एक आदरणीय मार्गदर्शक म्हणजे डॉ. प्रताप वाघ.

    ReplyDelete
  4. Friend in need is a friend indeed🙏

    ReplyDelete
  5. विद्वत्ता व आर्थिक सुबद्दता याचा कसलाही गर्व नसलेला व आपले ज्ञानाचा दुसऱ्यासाठी स्वतःहून उपयोग करून देणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर प्रतापराव वाघ, Asale गावाचे आदर्श आयडॉल .

    ReplyDelete
  6. आपल्या भागातील आपल्याच माणसांना आधार, मोलाची साथ आणि प्रेम देऊन यशाची शिखरे पादाक्रांत करण्याचे प्रोत्साहन देणारे डॉ.पी.बी.वाघ सर एका वेगळ्या आयामामधून आम्हाला समझून सांगितल्याबद्दल डॉ. राजपुरे सर आपले खूप धन्यवाद. अत्यंत ओघवत्या शब्दांत तुम्हास लाभलेल्या सन्मित्राची ओळख करून दिली.
    डॉ.वाघ सर यांचा मनमोकळेपणा आणि प्रोत्साहन देण्याची वृत्ती आम्हालाही अनुभवण्यास मिळाली हे आमचे परमभाग्यच. खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

    ReplyDelete
  7. Nicely written. My MSc project was also in aerogel. Rao sir and Manish sir was out of station at the time of final presentation. I remember discussing my doubts with Dr Wagh sir and found him very humble. Best wishes to both of you.
    Regards,
    Dr Prashant Patil

    ReplyDelete
  8. खूप छान सर.तुमचे blog आवर्जून वाचत असतो.. Simply gr8..

    ReplyDelete
  9. Sir, you have written it in very nice and lucid language. It shows one dimension of your personality of of multi.

    ReplyDelete
  10. Initially I cannot understand who is Pratap Wagh, but afterwords his image come in front of me. Congrates Keshav very nice narration of different personalities on your blog. Thanks a lot.

    ReplyDelete
  11. डॉ .केशवराव राजपुरे प्रत्येकाच्या जिवनातील अंधःकार नाहीसा करण्यासाठी प्रतापरूपी प्रकाश येत असतो त्याच सोनं करण्यासाठी झळाळी देण्यासाठी आपणाला बऱ्याच काटया कुटयातून मार्ग काढावे लागले आहेत यातील काही गोष्टी मला ज्ञान आहेत .आज या आपल्या समित्र डॉ . प्रताप यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात दिलेले योगदान अतुलनीय आहे . आपण सुध्दा प्रतापरावांनी दिलेला वसा जोपासत आहात . याचा मला सार्थ अभिमान आहे . आपण लिहलेले मित्रदर्शन इतरांना प्रेरणादायी ठरावे हीच एक सदिच्छा .डॉ . प्रताप सर यांना माझे शतशः दंडवत . धन्यवाद ! उमेश मोरे

    ReplyDelete
  12. वाह! राजपुरे सर. आनंद वाटला. तुम्ही लिहिता छानच त्यात काही शंकाच नाही आणि ते लिखाण प्रताप सराबद्दल असेल तर मग काय सांगावे. आनंद द्विगुणित.
    सर्वांशी प्रेमाने राहणे, सतत अभ्यासात राहणे, मित्रांना मदत करणे, अवघड विषय स्वतः कष्ट घेऊन सोपा करून मित्रांना न थकता सांगणे, सुट्टीत गावी जाऊन शिक्षणाचा कोणताही गर्व न बाळगता आपलं कसब शेतीत दाखवणे, आपल्या अंगभूत गुणांचं कोणतंही प्रदर्शन न करता शांत, संयमी आणि हसतमुख राहणारा असा हा मित्र.
    आज आठवण करून दिलीत. वाघ सरांना फोन करावाच लागेल

    ReplyDelete
  13. खुप छान लेखन शैली. सुदंर लिखाण

    ReplyDelete
  14. खुप छान लिहिले आहे सर🙏

    ReplyDelete
  15. Old memories शब्द रूपात मांडून भावी पिडीला प्रोत्साहन दिले आहे. खुप छान.

    ReplyDelete
  16. Very well written Sir. I came to know lot many things about Wagh Sir. He was always an ideal for us but after this respect for him is really doubled
    This is really a great practice Sir. To think about the best of each and every person and note it down... Aaple aadarsh aaplyach aajubajula shodhle tar miltat... Tasach aahe.. Thank you for sharing... Please keep motivating... Keep inspiring 👍

    Yours sincerely,
    Ulka

    ReplyDelete
  17. धन्यवाद राजपुरे सर !
    डॉ वाघ सरांचा मला सुध्दा सहवास लाभला आहे.
    अतिशय निगर्वी आणि परोपकारी सहकारी म्हणून वाघ सरांची ओळख आहे.
    माझी एक विद्यार्थिनी BARC मध्ये internship करत असताना वाघ सरांनी तीला खूप मदत केली होती.
    वाघ सरांचे मला माहीत नसलेले अनेक पैलू तुमच्या लेखातून जाणून घेता आले.
    केशवराव तुमच्यात एक सिद्धहस्त लेखक दडलेला आहे हे मात्र नक्की.
    असेच छान लेखन करत रहा

    ReplyDelete
  18. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  19. शर्मिला शिंदे
    👍🏻👌💐
    मी पाहिलेले राजपुरे सर म्हणजे कडक आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व पण या लेखातून तुमचा भावनिक आणि प्रेमळ स्वभाव पण ज्ञात झाला..खूप आनंद वाटला..खूप खूप शुभेच्छा सर तुम्हा मित्रांना..खूप संघर्षातून आज शिखर गाटले आहे तुम्ही..
    आणि स्वतः बद्दल दुःख पण झाले थोडे..आम्हाला कोणीच असे push करणारे भेटले नाही phd करताना..

    ReplyDelete
  20. Thought-provoking, inspiring, and inclusive, this is a wonderful article on Dr Wagh sir. This highlights true bond of friendship with roller coaster of emotions and success. Thank you very much sir for sharing your experience with us🙏
    Dr. Shahin Shaikh

    ReplyDelete
  21. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
    खूपच छान आणि प्रेरणादायी....
    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी होणारी कसरत व त्याचे वास्तव खरच प्रेरणादायी आहे. अशा बिकट परिस्थितीत आपल्या जिद्द आणि चिकाटीने, स्वतःच्या बळावर व इच्छाशक्तीने यशाचे शिखर कसे गाठता येऊ शकते हे वरील जीवनप्रवासातुन समजते.
    आपल्या मित्रांनी व शिक्षकांनी केलेले योग्य वेळी योग्य मार्गदर्शन किती अनमोल असते हे सुद्धा स्पष्टपणे जाणवते...Thanks a lot sir...

    ReplyDelete
  22. मस्तच लिखाण आहे राजपूरें सरांचे. अतिशय समतोल आणि ओघवती लेखणी आहे. प्रताप हा अतिशय आदर्श व प्रेमळ मित्र, तेव्हा त्याच्याविषयी असा लेख केवळ नावानेच आवडणार होता. पण आशय आणि सरांच्या अनुभवामुळे त्यांनी प्रताप वाघ यांचा जीवनपट उलगडून आपल्यासमोर ठेवला. रामदास सणस, महेश भोसले, गुलाब धनावडे किंवा राजपुरे या मित्रांपैकी कोणालाही भेटलो तरी प्रतापचा विषय होतोच. प्रतापच्या शेतीची आवड हा विषयच असतोच. ग्रामीण भागामध्ये बी. एस्सी. पदवी घेण्यात फारशी आर्थिक अडचण येत नसे, मात्र एम. एस्सी. करण्यात मात्र फार आर्थिक अडचण येत असे. कारण घरापासून लांब असणारे विद्यापीठ. आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी एका स्पेअर पार्ट कंपनीमध्ये सेल्समनशिप देखील त्याने केली. अशा प्रकारे प्रतापाने मात्र स्वतःचे आर्थिक प्रश्न स्वतः सोडवले. नुसतेच पैसे जमवले नाहीत तर त्याचे योग्य नियोजन सुध्दा केले. व एम. एस्सी. पूर्ण केली. तितक्याच जिद्दीने पी. एच. डी. पण केली.ही सर्व शैक्षणिक घोडदौड सुरु असताना घरच्यांना विशेषतः धाकटा भाऊ अजितला पण मोठे मार्गदर्शन व मदतीला कधीही त्याने खंड पडू दिला नाही, To be a simple is very difficult या उक्तीप्रमाणे असणाऱ्या माझ्या या साध्या, प्रतिभावंत व कर्तृत्ववान मित्राला सलाम. व प्रतापचे यथार्थ वर्णन केल्याबद्दल राजपुरे सरांचे देखील आभार.

    ReplyDelete