Friday, December 2, 2022

शिदोरी

आईची चारित्र्यासाठीची शिदोरी


स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृती प्रतिष्ठान मार्फत दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी "प्रतिकूल परिस्थितीत मुलांना कर्तृत्ववान बनवणाऱ्या पालकांचा" सन्मान करण्यात येणार आहे. नुकतीच या "आदर्श पालक-विद्यार्थी पुरस्कार" सन्मानासाठी माझ्या आईची निवड झाली आहे. प्रतिष्ठान च्या वतीने घेण्यात येणाऱ्या सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून करिअरच्या विविध पातळ्यांवर आपल्या पाल्याला पाठबळ देत पंचक्रोशीचा बहुमान वाढवल्याबद्दल हा सन्मान सोहळा आयोजित केला जातो. समितीने या सन्मानासाठी आईच्या नावाची एकमताने शिफारस केली आहे. निवड समितीने योग्य निवड केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

 

ही बातमी ऐकून माझे मन आनंदाने उचंबळून आलं. सर्व मेहनत फळाला आल्याची भावना. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने आयुष्यात यशस्वी व्हावे असे वाटते. अपत्याने मिळवलेल्या यशाने त्यांचा उर अभिमानाने भरून येतोच. त्याचे कौतुक चारचौघात व्हावे ही त्यांची अपेक्षा असतेच. आपण विद्यार्थ्यांचा सन्मान, गुणवंतांचा सन्मान, सेवकांचा सन्मान, शिक्षकांचा सन्मान हे ऐकतो परंतु कार्यकुशल पिढी घडवणाऱ्या पालकांचा सन्मान ही गोष्टच नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद आहे. माझ्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये बऱ्याच वेळेस सन्मानित होण्याचा मला योग आला आहे परंतु हे सन्मान जिच्यामुळे मिळाले त्या माऊलीचा माझ्या यशस्वीतेमुळे सन्मान होतोय हे ऐकून मन सुखावलं.

रणांगणावर जे सैनिक लढायला जातात त्या सर्वांना लढायची समान संधी मिळते पण त्यातील सरदार तोच होतो जो विशेष प्रयत्न करत शर्थीने लढतो. स्पर्धा मग ती शैक्षणिक किंवा वास्तविक जीवनातील असो, प्रत्येक जण आपापल्या परीने त्यास सामोरे जात असतो, यामध्ये त्याचाच प्रवास यशस्वी होतो जो अतिशय संयमानं, जिद्दीने आणि नेटाने प्रयत्न करतो. माझ्या बाबतीतही असंच झालं आहे. मला नशीबाने यश मिळालेले नाही, तर गेल्या चाळीस वर्षांतील अविरत केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा हा परिपाक आहे. मी नेहमी परीक्षेमध्ये प्रथमांक असायचो तसेच आयुष्याच्या परीक्षेला मी खूप धैर्याने सामोरे जाऊ शकलो ते प्रामुख्याने आईकडून माझ्या मोठ्या भावंडांकडे आलेल्या आणि मी घेतलेल्या प्रतिभेच्या वारस्यामुळेच..

तसं बघितलं तर माझी सर्वच भावंड अतिशय हुशार ! माझ्या बहिणी काही अपरिहार्य परिस्थितीमुळे जादा शिक्षित नाहीत परंतु माझे बंधू आणि मी पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकलो. आमच्या कुटुंबातील ही पहिली साक्षर पिढी... आम्हाला लाभलेली प्रतिभा ही जनूकीय देण आहे. माझी आई नक्कीच हुशार असल्यामुळे आम्ही हुशार आहोत. माझी आई साक्षर आहे हे सर्वांना माहीत नाही.

आपला जीवनातील सन्मान जसा पालकांमुळे असतो तसं आपल्यामुळे पालक सन्मानित होत असतील तर तो क्षण मोठ्या भाग्याचा असतो असे मी मानतो. फाउंडेशन मार्फत होणारा माझ्या आईचा सन्मान हा लाख मोलाचा आहे. तिनं आत्तापर्यंत सोसलेल्या कष्टाची, केलेल्या परिश्रमाची आणि त्यामुळे मिळालेल्या यशाची ही पोहोच पावती आहे असे मी मानतो. तिने केलेले काबाडकष्ट हे जरी आमचे आत्ताचे यश लक्ष्य ठेवून केलेले नसले तरी तेव्हा तो आमच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. प्रथम आजच्या रोजीरोटीचा प्रश्न ! नंतर आरामाच्या गोष्टीचा विचार होत असे. पण तिने तेव्हा केलेल्या कष्टाचे फलित म्हणजे आमच्यात केलेले 'प्रयत्नवादी कष्ट संस्कृतीचे रोपण' होय !

हे करत असताना आईने आम्हाला कधी परावलंबी होऊ दिलेलं नाही. फुकटचे लाड केले नाहीत. नेहमी आम्हाला स्वावलंबी आणि स्वयम् अध्यापनासाठी तयार केलं. आईने आम्हाला तयार भाकरी न देता भाकरी कशी मिळवायची हे शिकवले. आमच्या गरजेच्या गोष्टी मिळवणे किती अवघड असते याची जाणीव करून दिली. हीच आम्हासाठी मोठी शिदोरी होती. हेच कारण असावं आम्ही आमच्या जीवनातील सर्व कसोटीच्या क्षणी अतिशय धीराने स्वतःला सावरू शकलो.

माझं सध्याचे पद काय आहे ? जागतिक २% शास्त्रज्ञांच्या यादीत नाव येणे म्हणजे काय ? विद्यापीठातील विभाग प्रमुख म्हणजे काय ? भविष्यात मी काय होऊ शकतो ? या सगळ्या गोष्टींच्या तांत्रिक बाजू तिला कदाचित माहीत नसतीलही पण तिला एवढे नक्की माहित आहे की माझा मुलगा मोठा साहेब झाला आहे. यामुळे कायम ती समाधानी होत असेल कारण कोणत्या परिस्थितीत आपण मुलांना वाढवलं आणि त्यांनी वाममार्गाने नव्हे तर जिद्द, प्रामाणिकता आणि परिश्रमातून निव्वळ प्रतिभेच्या जोरावर सुखाचे दिवस बघण्याची संधी प्राप्त केली आहे.

आठ वर्षांपूर्वी माझ्यावर गुदरलेल्या कटू प्रसंगावेळी माझी आई माझ्या मुलींची देखील आई झाली ही माझ्या दृष्टीने महत् भाग्याची गोष्ट आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी या आईच्या पोटी जन्म घेतला. माझ्या आयुष्यातील ही फार थोर व्यक्ती आहे. वरून कितीही कडक भाषिक वाटली तरी आतून मात्र खूपच मृदू मुलायम आहे ती. तिच्या ऋणातून उतराई होणं दूरच पण तिच्यासारखं पालक होण आम्हाला तरी शक्य होणार नाही.

 


अशी माझ्या आईने कष्ट, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणाची शिदोरी दिली ज्याचा उपयोग या व्यवहारी जगात वावरताना, जीवनातील अनेक संकटांशी दोन हात करताना, शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट शिखर गाठताना झाला. ज्यामुळे आज मी सर्वोत्तम ज्ञानाची संपत्ती मिळवू शकलो आहे जी माझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. खरंच कविवर्य फ. मु. शिंदे यांच्या कवितेतील पंक्ती किती समर्पक आहे ना - आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही.

माता आणि माती या शब्दांमध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. ही वेलांटी म्हणजेच आपले जीवन असे मला वाटते. डॉक्टर महेश दत्तात्रय मेणबुदले हे मूळचे बावधनचे, माझा वर्गमित्र किरणचे पुतणे. माझ्या मातेचा माझ्या मातीतील माणसांनी केलेला हा सन्मान आमच्यासाठी खरोखरच खूप गौरवास्पद आणि अत्युच्च आनंददायी आहे ! म्हणूनच माझी माता आणि माझी माती यांचा मी सदैव ऋणी राहीन. 

आईबद्दलचे या आधी लिहिलेले हे दोन ब्लॉग कंसात (२०२०, २०२२) दिलेल्या लिंक वर आहेत.


- डॉ केशव राजपुरे
मोबाईल: ९६०४२५०००६
ईमेल: rajpureky@gmail.com 











___________________________________________________________________________________

स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृति प्रतिष्ठान, वाई (सातारा)

॥ सन्मानपत्र ॥ 

प्रा. डॉ. केशव यशवंत राजपुरे
विभाग प्रमुख भौतिकशास्त्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 
रा. अनपटवाडी, बावधन ता. वाई

विश्वविख्यात स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून जगातील १ कोटी संशोधकांच्या संशोधन कार्याचा अभ्यास केला जातो. त्यातील २ लाख व्यक्तींची विज्ञानातील संशोधनाबद्दल शीर्ष संशोधक यादी प्रसिद्ध केली जाते. त्यामध्ये वाई तालुक्याच्या अनपटवाडी या आडगावातील प्रा. डॉ. केशव राजपुरे यांचा समावेश होणे, हे अप्रुपच अप्रूपच आहे.

डॉ. केशव राजपुरे !
सातारा जिल्ह्यातील अनेकांनी या नावाचा कुतुहलाने शोध घ्यायला सुरुवात केली, इतके आपले व्यक्तिमत्व प्रसिद्धीच्या झोताबाहेर आहे. पण आपले संशोधनकार्य पाहिले अन् आम्ही थक्क झालो. श्रीमती अंजिरा व यशवंत राजपुरे या गरीब, कष्टाळू, अल्पशिक्षित-अडाणी मातापित्यांच्या पोटी जन्म घेऊन आपण प्राध्यापक, विभाग प्रमुख आणि शास्त्रज्ञ होणे ही नक्कीच आनंदाची बाब. 

विज्ञानाला प्रांत आणि भाषेचे बंधन नसते हे खरं. तरीही सहज म्हणून अवलोकन केले तरी भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात सध्या तरी परदेशस्थ तसेच शहरी बुद्धिमंतांची नावे चमकताना दिसतात. त्यांचाच जास्त बोलबाला असतो. त्यातही भौतिकशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयात काहीतरी भरीव योगदान देणे, ही निश्चितच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

डॉ. केशव राजपुरे जी... आपण शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहात. दारिद्रयाचे दशावतार, मोठे कुटुंब, मोलमजुरी करणारे मायबाप यांचा मुलगा बावधन हायस्कूल, शरद पवार महाविद्यालय (लोणंद) येथून शिक्षण घेऊन शिवाजी विद्यापीठात पहिला येतो, आपल्या ज्ञानमत्तेने महाविद्यालयालाही १०० टक्के अनुदान प्राप्त करून देतो, पीएचडी करतो, भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी स्वतःला झोकून देतो आणि जागतिक पातळीवर आपले नाव कोरतो यातून आपला आवाका लक्षात यावा.

कष्टाळू माता-पित्यांना ठाऊकही नसलेली अध्यापन, अध्ययन, संशोधनाची वाट आपण समर्थपणे चोखळलीत. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आपण संशोधक-शास्त्रज्ञांची एक पिढीच घडवित आहात, या वस्तुस्थितीचा आनंद व्यक्त करुन स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृति प्रतिष्ठान आपल्या मातोश्री श्रीमती अंजिरा व आपण प्रा. डॉ. केशव राजपुरे यांना आदर्श विद्यार्थी-पालक पुरस्कार व हे मानपत्र सन्मान राशीसह प्रदान करीत आहोत. हा सन्मान प्रदान करताना आम्हांस कर्तव्यपूर्तीचा आनंद लाभत आहे.

आपले, 
स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृति प्रतिष्ठान, वाई (सातारा)
(शब्दांकनः विठ्ठल माने, वाई)
___________________________________________________________________________________









2 comments: