Wednesday, December 28, 2022

संशोधन

संशोधन कसे असावे 
सध्या विविध क्षेत्रात प्रचंड वेगाने संशोधन सुरू आहे. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल होत आहेत. तसेच उद्योग, शेती, वाहतूक, दळणवळण, वैद्यकीय, शिक्षण आणि इतर सर्वच क्षेत्रात जग प्रगती करत आहे. जरी आपण संशोधनाचा उद्देश शैक्षणिक ध्येय पूर्ण करणे आणि जीवनशैली अधिक सुखकर करण्यासाठी होतो असा विचार करत असलो तरी, माझ्या मते खऱ्या अर्थाने संशोधन हे ज्ञान निर्मितीचे एक महत्त्वाचे साधन आहे. 

संशोधन म्हणजे नेहमीच नवीन शोध लावणे असा अर्थ होत नाही ! ज्ञाननिर्मिती हे संशोधनाचे उद्दिष्ट असावे असे मला वाटते. संशोधन प्रक्रियेत शोध लागत राहतात. नेहमीच संशोधनात नवनवीन शोधांचा वेध घेण्यापेक्षा याद्वारे स्वतःचा आणि समाजाचा वैज्ञानिकदृष्ट्या विकास करण्यावर विशेष भर दिला गेला पाहिजे. या अनुषंगाने नवनवीन तंत्रज्ञानाची तोंडओळख होवून त्यावर आपले प्रभुत्व प्रस्थापित होणे अपेक्षित असते. अर्थातच तुम्हाला संशोधन-कल आणि संशोधनातील नवीन घडामोडींविषयी अद्यावत माहिती अवगत करायला मदत करते. 

तरुणांना त्यांच्या शालेय जीवनापासूनच ज्ञाननिर्मितीचे प्रशिक्षण दिले पाहिजे. पण ते खूप आव्हानात्मक आहे. आपण त्यांना माहिती आणि ज्ञानाची तोंडओळख करून देणे गरजेचे असते. तसेच प्रश्न विचारून शिक्षण घेत, स्वत:च आपले तार्किक आणि विश्लेषणात्मक परिमाण विकसित करणे गरजेचे असते. तरुणांमध्ये वैज्ञानिक वृत्ती रुजवली तर हे सर्व शक्य आहे. त्यामुळे संशोधनाकडे शैक्षणिक प्रणालीचा एक टप्पा न पाहता ज्ञाननिर्मितीचे साधन म्हणून पाहिले पाहिजे.

तुम्हाला इंटरनेटवर किंवा अगदी पुस्तकांमध्येही जे काही सापडते ती संकल्पना, सिद्धांत किंवा एखाद्या विषयाची माहिती असते. त्याला आपण ज्ञान म्हणू शकत नाही. ज्ञान म्हणजे कृतीत उतरवलेली माहिती ! एखादी गोष्ट कशी करायची याची माहिती इंटरनेटवर मिळू शकते. वास्तविक इंटरनेटवर त्यासाठीचे भरपूर व्हिडीओ उपलब्ध आहेत. परंतु जेव्हा तुम्ही ती गोष्ट स्वतः करायला जाता तेव्हा मात्र सर्व पद्धतीने मिळालेल्या  माहितीचे आपल्या कृतीत केलेलं रूपांतर म्हणजे त्याविषयीचे आपले ज्ञान ! माहितीवर आधारित नाविन्यपूर्ण विचारांद्वारे संकल्पना मांडणे म्हणजे ज्ञाननिर्मिती. 

तरुण पिढीस याविषयी सक्षम करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची राहते. असे म्हणतात की "शिक्षक ही  ज्ञान आणि संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचवणारी एक मशाल असते". विद्यार्थ्यांना कॉपी-कॅट बनवण्यापेक्षा त्यांचा थिंक टँक तयार करण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. महितीतून ज्ञान आणि ज्ञानातून माहिती हे कधीच न थांबणारे चक्र आहे. या चक्रातील अविभाज्य घटक म्हणजे शिक्षक. ज्ञानाच्या स्रोतातील माहिती विद्यार्थ्यांसमोर ठेऊन त्याला त्या अनुषंगाने मनात कुतूहल निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम शिक्षकाने करणे अपेक्षित असते. शिक्षकांनी ज्ञानासाठी भुकेलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या भांडाराजवळ नेले पाहिजे, परंतु ते स्वतः न भरवता ते त्यांनी कसे ग्रहण करायचे ते शिकवावे. ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेत विद्यार्थी नेहमी सक्रिय असावेत ही काळजी फक्त शिक्षकच घेऊ शकतो. तरच ज्ञाननिष्ठ समाज तयार होईल आणि सकळ मानवजातीचा उत्कर्ष होईल.

संशोधन करत असताना अचूक मार्गदर्शनाची अत्यावश्यकता असते त्यामुळे एक सुयोग्य मार्गदर्शक शिक्षक मिळणं हे महत्त्वाचं असतं. एकाग्रता, चिकाटी आणि संयम यांची संशोधनात गरज असते हे सुरुवातीला विद्यार्थ्यांना अवगत करून देणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे. संशोधनाबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे. शिक्षकांचे व्यक्तीमत्व जेवढे प्रभावी, परिणामकारक, आणि ज्ञान समृद्ध असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. विनोबांनी शिक्षणावर भाष्य करताना फार मार्मिक सूत्र सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘शिक्षक विद्यार्थीनिष्ठ असावा, विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा, ज्ञान समाजनिष्ठ असावे आणि समाज समतानिष्ठ असावा.’’ शिक्षक जर विद्यार्थीनिष्ठ असेल तर कळ्यांचे फुलांत रूपांतर करू शकतो. 

नैतिक मूल्यांशिवाय केलेल्या संशोधनामुळे तुम्हाला पदवी मिळू शकते किंवा तुमच्या पगारात थोडीशी वाढ होऊ शकते पण त्यामुळे तुम्हाला आंतरिक समाधान मिळणार नाही. त्यामुळे मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची नैतिकता रुजवली पाहिजे. विद्यार्थ्याने जलद संशोधन करून पदवी मिळवावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यामुळे संशोधन करताना त्यांचे बोट धरून त्यांना चालायला शिकवणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. तुम्ही त्यांच्यासोबत चार पावले चाललात तर ते आपोआप धावू लागतील. परंतु यासाठी मार्गदर्शक समर्पित असणे आवश्यक आहे. संशोधन विद्यार्थ्यासाठी अधिक उपयुक्त आहे त्यामुळे शिक्षक तितका सक्षम नसला तरी विद्यार्थ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.

विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते हे पालक आणि मुलासारखे असते असे मला व्यक्तिशः वाटते. पालकांसाठी, मुले शेवटपर्यंत त्यांची मुले असतात. तसेच, विद्यार्थी नेहमीच शिक्षकांचे विद्यार्थी असतात. शिक्षकांनी आपल्या जागेवर राहून आपले करिअर रंगवले आहे, हे वास्तव विद्यार्थ्यांनी कधीही विसरू नये. जेव्हा विद्यार्थी पुढे जातात, प्रगती करतात तेव्हा शिक्षक खऱ्या अर्थाने विकसित होतो. प्रत्येक शिक्षकाने त्यांची प्रगती व्हावी या दृष्टीकोनातून त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. पण विद्यार्थ्यांनीही एक गोष्ट लक्षात ठेवावी, 'विद्या विनयेन शोभते'. नम्रतेशिवाय तुमचे ज्ञान व्यर्थ आहे, ते ज्ञान नसून ओझे आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या, भौतिकशास्त्रातील संशोधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विश्वाची उत्पत्ती तसेच विश्वाची कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी भौतिकशास्त्र हे एकमेव साधन आहे. भविष्यात मानवाच्या तसेच इतर प्रजातींच्या अस्तित्वात भौतिकशास्त्रातील संशोधन महत्त्वाची भूमिका बजावेल. पुंज यामिकी अर्थात क्वांटम मेकॅनिक्स ही भौतिकशास्त्राची बहुचर्चित शाखा आहे ज्याद्वारे चेतना याबाबत देखील भाष्य करता येण्याजोगे आहे. हे विकसित होत असलेले क्लस्टर भविष्यात तंत्रज्ञानात क्रांती घडवून आणेल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. परंतु हल्ली मूलभूत भौतिकशास्त्रापेक्षा पदार्थविज्ञानातील संशोधनाला अधिक प्राधान्य मिळत आहे. मला वाटतं दोन्ही प्रकारची संशोधन पुढे नेली पाहिजेत. आपण मूलभूत आणि उपयोजित अशा दोन्ही पातळ्यांवर संशोधन कार्य केले पाहिजे परंतु हे करताना मूलभूत संशोधनाला अधिक महत्त्व दिले पाहिजे.

संशोधनातून सृजन होत नसेल तर त्याला संशोधन का म्हणायचे ? हा मोठा प्रश्न आहे. कारण आजकाल संशोधनाद्वारे नाविन्यता ही गोष्टच बाजूला जात आहे आणि शैक्षणिक निर्देशांक डोळ्यासमोर ठेवून संशोधन होत आहे. सध्या, जगभरातील काही संस्थांद्वारे त्यांच्या संयुक्त निर्देशांकांवर आधारित संशोधकांची जागतिक क्रमवारी प्रकाशित केली जाते. त्या यादीतील कितीजण नोबेल दर्जाचे काम करत आहेत हा संशोधनाचा विषय आहे. विशेष म्हणजे या यादीत फक्त १% भारतीय आहेत. ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.  

संशोधन परिषदा किंवा सेमिनार यांच्या निमित्ताने यावर चिंतन केले तर नक्कीच तोडगा निघू शकेल. उपाय आहेत, पण त्यासाठी आपली मानसिकता बदलावी लागेल. जर आपण आकड्यांच्या मागे लागलो तर काहीही शक्य नाही. केवळ निर्देशांक वाढण्यासाठी पेपर प्रकाशित करणे थांबवले तरच उत्तम संशोधन होऊ शकेल. शोधनिबंध प्रकाशित करणे हे नेहमीच अवघड काम असते. ऑनलाइन मोडमुळे तसेच संदर्भ डेटाबेसची सहज उपलब्धता यामुळे शोधनिबंधांची आवक वाढल्याने हे अधिकच कठीण होत आहे. तथापि, जर आपण आपले वैज्ञानिक योगदान योग्यरित्या समाविष्ट केले तर शोधनिबंध प्रकाशित करणे कठीण नाही. तुम्ही जाणकार झाल्याशिवाय वैज्ञानिक लेखासाठी योग्य योगदान देऊ शकत नाही.

संशोधनातील नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे आंतरराष्ट्रीय समुदाय भारतीय प्रतिभेचा पुरेपूर वापर करत आहे. ही प्रतिभा आपल्या देशात राहिली तर इथे संशोधन नक्कीच बहरेल. संस्थांना मिळणारा अपुरा निधी हा देशातील संशोधनाच्या प्रगतीत मोठा अडथळा आहे.

आज, अमेरिका तिच्या लवचिक शिक्षण प्रणालीसाठी ओळखली जाते, ज्यामुळे ते जगातील सर्वात प्रतिष्ठित अभ्यास केंद्र बनले आहे. तेथे विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील पर्यायांव्यतिरिक्त करिअरच्या विविध संधी मिळविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आमच्याकडे सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारी पूरक आर्थिक व्यवस्था नाही. त्यामुळे नावीन्य हे आपल्या संशोधनापासून दूर आहे. एकेकाळी जागतिक गुरू म्हणून ओळखला जाणारा देश आता जागतिक क्रमवारीत स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. भारतात १० लाख लोकसंख्येमागे फक्त १६४ लोक संशोधन करतात. संशोधनाला येथे योग्य वाव दिला जात नाही, हे या आकडेवारीवरून सिद्ध होते. आणि त्यामुळेच आज आपण ज्ञाननिर्मितीत मागे पडत आहोत.

नवीन शैक्षणिक धोरण हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. नवीन शैक्षणिक धोरण अतिशय आश्वासक तसेच लवचीक आहे. पूर्वीच्या धोरणातील अनेक त्रुटी लक्षात घेऊन त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न या धोरणात केलेला आहे. तरुणांमध्ये संशोधकता रुजली की त्यांच्यासाठी ज्ञानाची कवाडे नेहमी खुली राहतील. संशोधनातून शिक्षण म्हणजे परंपरागत पाठांतरावर आधारित शिक्षणास छेद देऊन बुद्धीला चालना देणारा उपक्रम अंगीकारणे आहे. यामुळे चौकस बुद्धी विकसित होऊन अकल्पित व नाविन्यपूर्ण विचार उदयास यायला मदत होईल. आशा आहे या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारत आपली जागतिक प्रतिभा पुन्हा एकदा उंचावून विश्वगुरू ही बिरुदावली मिरवेल.

- सुरज मडके, रुपेश पेडणेकर, केशव राजपुरे














Friday, December 23, 2022

सीएस मुंगरवाडी हायस्कुल, कळविकट्टे

 मोठा आनंद 

डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात माझे सहकारी टाकळे सर यांनी विचारले मला की आपण गडहिंग्लजच्या मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल काय ? हा माझ्यासाठी सुखद धक्का होता कारण मला अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची आवड आहे. मी तात्काळ 'हो' म्हणालो कारण मला ग्रामीण भागातील मुलांना पुढील शिक्षणाची दिशा ठरवण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याची आणि प्रेरित करण्याची संधी मिळणार होती. गडहिंग्लज तालुक्याच्या दक्षिणेकडे वसलेल्या जेमतेम पाचशे च्या घरात लोकवस्ती असलेल्या कळविकट्टे येथे आयोजित बाल वैज्ञानिक संमेलनाच्या उद्घाटनासाठी परिषदेचे कार्यवाह शिव पद्मनवर सरांनी मला लगेच संपर्क करून प्रमुखपाहुणे म्हणून निमंत्रित केले. कळविकट्टे गावातील सीएस मुंगरवाडी हायस्कुल हे राष्ट्रीय महामार्गाच्या पाश्चिमेस दहा किमी अंतरावर वसलेले आहे (बेळगावला जाताना हत्तरगी टोल प्लाझा नंतर एक कि.मी वर उजवे वळण). 

कार्यक्रमाचे स्वरूप मला सुरुवातीला अवगत नव्हते. तारीख ठरल्यानंतर परिषदेच्या सदस्यांनी मला कोल्हापुरात भेटून सर्व काही समजावून सांगितल्यावर मला कल्पना आली. भारतीय राष्ट्रीय युवा विज्ञान अकादमी, मुंबई प्रभाग, मराठी विज्ञान परिषद मध्यवर्ती मुंबई आणि मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लज, यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन केले होते. लहान सान प्रयोग आणि व्याख्यानांच्या माध्यमातून शाळांतील मुलांना प्रेरीत करण्यासाठी हे संमेलन आयोजित केलेले होते. मी प्रोजेक्टरवर देखील व्याख्यान घेऊ शकतो हे समजल्यानंतर मला खूपच आनंद झाला, कारण व्याख्यान अधिक माहितीपूर्ण आणि परिमाणकारक बनवण्यासाठी फोटो आणि क्लिप्स वापरता येणार होत्या. 

मराठीतील मजकूर आणि अर्थबोध होणारे फोटो वापरून सुयोग्य स्लाइड्स तयार केल्या. यामागील संकल्पना केवळ त्यांच्या वैज्ञानिक धारणेला प्रज्वलित करणे एव्हढेच नव्हे तर सर्वसाधारणपणे नाविन्यपूर्ण विचारांसाठी प्रेरित करणे हेही होती. सकाळी ११ वाजता कार्यक्रमस्थळी अर्थात हायस्कुलमध्ये पोहोचायचे ठरले. कार्यक्रमादिवशी सर्वजण आमची वाट पाहत असतानाच मी त्याच भागातील माझ्या विद्यार्थ्यासह हायस्कुलमध्ये वेळेत पोहोचलो.

हायस्कूल शाळेमध्ये एखाद्या कार्यक्रमाला हजर राहण्याचा बऱ्याच दिवसातून योग असल्याने राष्ट्रगीत, प्रार्थना, विज्ञान गीत ताल आणि सुरपेटीच्या लयबद्ध स्वरात ऐकताना अंगावर शहारे आले. मन ४० वर्षे मागे गेले आणि शाळेतील दिवस आठवले. शाळेत असताना कधीकाळी एखाद्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा योग येईल हे स्वप्नातही वाटले नव्हते. यासाठी तुम्हाला स्थावर संपत्तीपेक्षा ज्ञानसंपदेची आवश्यकता असेल हे तेव्हा समज नव्हती. भारताचे मिसाईल मन आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व रोपट्यास पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. औपचारिक उद्घाटन आणि मनोगतनंतर माझे पीपीटी वर व्याख्यान होते. 

एका गोष्टीने मला आकर्षित केले ते म्हणजे तिथल्या कलाशिक्षकाचे मनमोहक बोर्ड-हस्ताक्षर. सुंदर अक्षर हा एक अलंकार मानला जातो. स्वच्छ हस्ताक्षर संतुलित जीवन जगण्यास तसेच जीवनशैली पद्धतशीर ठेवण्यास मदत करते. असे गुणी कलाकार शिक्षक या शाळेत भेटले. कार्यक्रम फलक, कार्यक्रम पत्रिका, अभिनंदन पर संदेश, सूचना, जागृतीपर फलक तसेच इतर फलक अगदी आकर्षकरित्या कोरीव हस्ताक्षरात काढलेले पाहून मी भारावून गेलो आणि मोहित झालो. ही दुर्मिळ प्रतीभा खेडेगावात देखील पाहायला मिळते. हस्तलेखनाबाबत विद्यार्थी नक्कीच सरांचे अनुसरण करत असणार. 

एका वर्गखोलीमध्ये दाटीवाटीने मुलं-मुली बसली होती. पोर्टेबल प्रोजेक्टर च्या साह्याने पीपीटी शोची तयारी केली होती. खरंतर मुलांना प्रोजेक्टर वर फिल्म किंवा स्लाईड शो बघण्याची सवय.. पण प्रोजेक्टरवर लेक्चर हा त्यांच्यासाठी पहिलाच अनुभव होता. प्रत्येक पुढील स्लाईड बद्दल उत्सुकता निर्माण व्हावी या दृष्टीने खूप विचारपूर्वक स्लाईड तयार केल्या होत्या. मुंगुरवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक तसेच त्यांचे सर्व सहकारी खूपच सक्रिय आणि प्रयोगशील असल्याने व्याख्यानाची व्यवस्था सुयोग्य तर होतीच पण कार्यक्रमाची मांडणी देखील छान केली होती. ज्यांना सभागृहात बसणे शक्य नव्हते त्यांच्यासाठी त्यांनी बाहेर लाऊड स्पीकरची व्यवस्था केली होती. माझी एक शास्त्रज्ञ म्हणून ओळख करून दिली आणि सांगितले की माझे नाव जगातील सर्वोच्च शास्त्रज्ञांच्या यादीत आहे. 'मी शास्त्रज्ञ नाही तर एक प्रामाणिक शिक्षक आणि नंतर संशोधक आहे' हे मी स्पष्ट केले.

सुरुवातीला बाल वैज्ञानिक संमेलनाचे उद्दिष्ट मी मुलांना सांगितलं कारण ते ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सप्तगुणांना दिशा देणारे व्यासपीठ होते. अगदी आर्यभट्ट चाणक्यांपासून अलीकडील एपीजे अब्दुल कलाम यांच्यापर्यंत आपल्याला अलौकिक बुद्धीचा वारसा आहे हे त्यांना सोदाहरण पटवून दिले. मुलांनी यांची चरित्र वाचून प्रेवित व्हावे असे नमूद करत विज्ञानवादी विचारांमार्फत नाविन्यतेचा पाठपुरावा कसा करावा आणि ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कसे सहभागी व्हावे हे यावेळी ठळकपणे मांडले. विज्ञान, शोध आणि चमत्कार हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने व्यापलेल्या सर्वच क्षेत्रातील विलक्षण वापराच्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. 

मुलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करत असताना विद्यार्थी कसा असावा, धारणेचा सापेक्षतावाद, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रेरणा जतन करत, ध्यास हाच श्वास हेच यशाचे गमक दृष्टीपुढे ठेवत उत्कृष्टतेचा पाठलाग का करावा या सर्व गोष्टी एक एक उदाहरण देऊन त्यांच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. यासाठी सुसंगत किती महत्त्वाची आहे हे आईन्स्टाईनच्या ड्रायव्हरचे उदाहरण देऊन सांगितले. फक्त माहिती म्हणजे ज्ञान नव्हे तर कृतीतील माहिती म्हणजे ज्ञान हे एका आदर्श शिक्षकाने विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे हे ही स्पष्ट केले कारण ज्ञान आणि संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणारी शिक्षक ही पेटती मशाल असते. सर्व विद्यार्थी स्तब्ध होऊन डोळे विस्फारून शब्द न शब्द ऐकत होते कारण त्यांना प्रत्येक गोष्ट पटत होती आणि प्रभावित करत होती. विशेष म्हणजे सहभागी शिक्षकही खरोखरच प्रभावित झालेले दिसले. 

ऑनलाइन आणि डिजिटल शिक्षणाच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कसे जुळवून घेणे आवश्यक आहे यावरही प्रकाश टाकला. करिअर निवडत असताना विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे नाही वळले तरी चालेल परंतु शिक्षण घेत असताना संशोधन वृत्ती जपायला पाहिजे कारण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संशोधनावर आधारित शिक्षण व नाविन्यतेवर भर दिला आहे हे नमूद करत विद्यार्थ्यांनी त्यांची विविध कौशल्य नेहमी अद्यावत करायला पाहिजेत आणि आरोग्य संपन्न जीवन जगायला पाहिजे याचे महत्त्व पटवून दिले. खरंतर व्याख्यानाचा हा शेवटचा भाग त्यांच्यासाठी भारी डोस होता, पण महत्त्वाचा होता. पण मी त्यांना काही मुद्दे सोडून फक्त सोप्या गोष्टी सांगितल्या.

४५ मिनिटाच्या व्याख्यानानंतर सर्वच विद्यार्थी खरोखर प्रभावी झाले आणि या मेळाव्यातील नवीन उपक्रम आणि उत्साह पाहून सर्व विद्यार्थी समाधानी असल्याचे दिसून येत होते. व्याखानानंतर अनेकांनी मनातील शंका आणि प्रश्न विचारले. माझ्या धारणेनुसार मी त्यांना समाधानकारक उत्तरे देऊ शकलो. आमच्या एमएससी विद्यार्थ्यांपेक्षा त्यांचे प्रश्न अधिक मूलभूत स्वरूपाचे होते. म्हणजे ते नाविन्यपूर्ण विचार करत होते. प्रश्नांद्वारे शिकणे हे मूळ सत्य आहे. शिक्षकांनी त्यांना निष्क्रिय बनवणाऱ्या प्रणालीतीळ पद्धतीऐवजी 'शिकायचे कसे' हे शिकवणे आवश्यक वाटते. शोध लावण्यासाठी तुम्ही प्रथम प्रामाणिक संशोधक असणे आवश्यक आहे. 

नवमनांशी संवाद साधताना वेगळ्याच आनंदाची प्रचिती आली. व्याख्यानानंतर ते ऊर्जावान वाटत होते. हे बघून मी सर्वस्वी समाधानी होतो कारण तेथे जाण्याचा माझा हेतू पूर्ण झाला होता. मी ग्रामीण भागातील असल्याने अशा भागाविषयी आपुलकीची आंतरिक ओढ नक्कीच असते. या ग्रामीण प्रतिभांना करिअर चा मार्ग निवडण्यासाठी प्रज्वलन आणि मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. याद्वारे मराठी विज्ञान परिषदेचा उद्देश्य सफल झाल्याचे जाणवले. संमेलनाच्या दिव्य कार्यक्रमात हातभार लावण्याची संधी मिळाल्याचा मला सन्मान वाटतो.

माझ्या व्याख्यानानंतर हॅम रेडिओचे प्रात्यक्षिक आणि संध्याकाळी अवकाश निरीक्षण कार्यक्रम असल्याने घाई गडबडीत शाळेतून चक्कर मारली. त्यांच्या मुख्याध्यापकांनी आम्हाला त्यांची छोटी प्रयोगशाळा दाखवली. शाळेतील मुलांनी तयार केलेली, अभ्यासक्रमातून निवडलेली पोर्टेबल प्रात्यक्षिके पाहून आम्ही प्रभावित झालो. खरंच मला खेद वाटला की विज्ञानाची तत्वे पटवून देण्यासाठी घरगुती गोष्टींमधून केलेले हे प्रयोग याआधी माझ्या मनात का बरे आले नाहीत. अशा प्रकल्पांसाठी शाळेस जिल्हा स्तरावर अनेक पारितोषिके मिळाली आहेत. त्यांचे शिक्षक या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिकता जोपासत आहेत हेच यातून दिसून येते. 

त्यानंतर ग्रामीण पद्धतीचे स्वादिष्ट सहभोजन झाले. सर्वजणांच्या आग्रहाने भारावलो. या दरम्यान सहभागी आणि शाळेतील शिक्षकांशी फलदायी संवाद झाला. त्यांच्यापैकी बहुतेकांनी मला त्यांच्या शाळांमध्ये अशाच प्रकारचे व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले. उपक्रमाचा हा सर्वात मोठा फायदा झाला. विद्यार्थ्यांना काय व कसे द्यायला हवे हे त्यांना उमगले. मी मोठ्या सभागृहांमध्ये परिषदा आणि सेमिनारमध्ये अनेक व्याख्याने दिली आहेत परंतु हे व्याख्यान सर्वार्थाने आनंद तसेच फलदायी होते. परिषदा आणि सेमिनारमधील श्रोते आधीच प्रेरित असतात, त्यांना नवीन संशोधनकल आणि सद्यस्थितीविषयी मार्गदर्शन आवश्यक असते. पण इथे गरज असते विद्यार्थ्यांना आकर्षित आणि प्रेरित करण्याची. माझ्यासाठी पहिली गोष्ट करणे तुलनेने सोपी असते. दुसरी गोष्ट करणे थोडेसे आव्हानात्मक होते. पण तेदेखील मी प्रभावीपणे करू शकलो आणि त्याचा आनंद उपभोगला.

विज्ञान शिक्षणाच्या बाबतीत इतरांनी या शाळेचे अनुसरण करणे आवश्यक आहे. या शाळेने हा उपक्रम स्वत: सुरू ठेवण्याची गरज आहे. सक्षम आणि अनुभवी शिक्षकांनी ग्रामीण तरुणांना प्रेरित करण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची गरज आहे. शेवटी ग्रुप फोटो झाले आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी नवीन विषय घेऊन शाळेला पुन्हा भेट देण्याचे वचन देऊन त्यांचा निरोप घेतला.

@ केशव यशवंत राजपुरे














Monday, December 19, 2022

passport

 आला एकदाचा पासपोर्ट
(पासपोर्ट काढताना काय काय डचणी येऊ शकतात हे इतरांना अवगत व्हावे तसेच त्यातून त्यांना मार्गदर्शव व्हावे म्हणून हा ब्लॉग प्रपंच ! इथे कोणालाही दोष देण्याचा अजिबात हेतू नाही. शहाण्या माणसाच्या आळशीपणाचा हा स्वानुभव शालेय पाठ्यपुस्तकातला धडा असू शकतो.)

तसं बघितलं तर पासपोर्ट म्हणजे एक सरकारी अधिकृत प्रवास दस्तऐवज. परदेश प्रवास करत असताना पासपोर्ट सोबत असणे आवश्यक असते आणि हे महत्वाचे ओळखपत्र असते की ज्याच्यामुळे आपले राष्ट्रीयत्व प्रमाणित होते. गरीब ग्रामीण शेतकरी कुटुंबात वाढल्यामुळे अगदी विद्यार्थी दशेपासूनच या दस्तऐवजाची कधी गरज भासेल असे वाटले नव्हते.

परदेश प्रवासासाठीच पासपोर्ट आवश्यक असतो, असा सर्वसाधारण समज आहे. पण त्याबरोबरच, एक ओळखीचा सर्वमान्य पुरावा म्हणून प्रत्येकाकडे स्वतःचा पासपोर्ट असणे आवश्यक आहे. अलीकडे ऑनलाइन स्वरूपामुळे ही पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत अधिक सोपी झाली आहे. पासपोर्टसाठी अर्ज करण्यापूर्वी योग्य कागदपत्रे पूर्तता करणे खूप महत्त्वाचे असते. तुमच्याकडे फक्त सर्वत्र अचूकपणे नाव लिहिलेले आधारकार्ड, पॅनकार्ड आणि एसएससी प्रमाणपत्र असले पाहिजे. हा माझा स्व-शिक्षित-अनुभव या ठिकाणी शेअर करत आहे.

पासपोर्टसाठी अर्ज करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे; ती म्हणजे तुम्ही परदेशात जाण्यास सक्षम असाल, तर तुम्ही ऑनलाइन पासपोर्ट कागदपत्र पडताळणी प्रक्रिया देखील सक्षमपणे हाताळू शकता. काहीही गरज नसताना याकामी आपण कुठलीही भूमिका नसलेल्या एजंटकडे जातो. फक्त त्याला अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती असते. यासंदर्भात आपल्यालाच प्रत्येक ठिकाणी सामोरे जावे लागते. अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर एजंट आपोआप बाजूला पडतो. विनाकारण आपण प्रक्रियेची भीती बाळगतो आणि स्वतःला कमी लेखतो. जेव्हा आपण एजंटच्या प्रोफाइलद्वारे अर्ज करतो तेव्हा आणखी एक अडचण उद्भवते: पासपोर्ट ऑफिसद्वारे दिलेल्या सर्व सूचना, आक्षेप आणि अर्जाच्या सध्यस्थितीबाबत पत्रव्यवहार एजंटच्या ईमेल पत्त्यावर येतात, ज्या क्वचितच कळतात. यामुळे आपले दुहेरी नुकसान होते कारण निष्कारण पैश्याचा अपव्यय आणि वर त्रास.

पीएचडी करत असताना माझे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक चंद्रकांत भोसले सर आयआयटी मुंबई येथे दोन महिन्याच्या अभ्यास रजेवर गेले असता तिथे मूळचे ऑस्ट्रियाचे पण फ्रान्समध्ये शास्त्रज्ञ असलेले प्राध्यापक मायकल न्यूमन स्पेलार्ट यांच्यासोबत ओळख झाली. काही दिवस मीही सरांसोबत आयआयटीत होतो त्यामुळे माझीही त्यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर मायकल सर त्यांच्या भारत भेटीदरम्यान काही कालावधीसाठी शिवाजी विद्यापीठात येऊ लागले. एव्हाना माझं पीएचडीच काम संपून मी शिवाजी विद्यापीठात शिक्षक म्हणून रुजू झालो होतो. त्यांच्या मार्च २००० मधील शिवाजी विद्यापीठ भेटीदरम्यान सहज बोलता-बोलता मी मायकल सरांना फ्रान्समध्ये पोस्ट डॉक करण्याच्या शक्यतेविषयी चौकशी केली आणि त्यांना विनंती केली की त्यांच्याकडे जर एखादी शिष्यवृत्ती असेल तर मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट डॉक करायला उत्सुक आहे. ते म्हणाले फ्रान्स ला परत गेल्यानंतर शक्यता तपासतो आणि साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात मला कळवतो. माझ्या बाबतीत पासपोर्ट प्रक्रिया कशी प्रज्वलित झाली हे सर्वांना समजण्यासाठी हा अनुभव सुरुवातीला शेअर केलाय. मायकेल सर मला भेटले नसते तर कदाचित तेव्हासुद्धा मी पासपोर्टसाठी अर्ज केला नसता.

त्यांच्याशी सहज बोललो होतो खरं वस्तुतः मी इथे कायमस्वरूपी सेवेत नव्हतो त्यामुळे पोस्ट-डॉकला जायचं म्हटलं तर राजीनामा देऊनच जावे लागणार होते. तसेच घरात देखील चर्चा केली नव्हती आणि महत्वाचे म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींची पूर्तता देखील केली नव्हती. मला वाटलं नक्की त्यांच्याकडे पोस्ट डॉक जागा नसणार आणि त्यांचा नकारात्मक निरोप येणार.. पण झालं मात्र नेमकं उल्टं.. जून २००० च्या पहिल्या आठवड्यादरम्यान त्यांचा ईमेल आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी माझ्यासाठी शिष्यवृत्तीची एक जागा तयार केली होती आणि मला एक सप्टेंबरला फ्रान्सच्या प्रयोगशाळेत जाऊन रुजू व्हायचे होते. आता आली का पंचाईत ! परदेशगमनाचे बहुप्रतिक्षित स्वप्न साकार होणार होते पण माझ्याकडे पासपोर्ट नव्हता. मार्च मध्ये चर्चा करूनही मी वेळेत प्रक्रिया सुरू न केल्याने पासपोर्ट हातात नव्हता. कदाचित ते घडणार नव्हते म्हणून मी गाफील होतो. मग मात्र मला या हलकेच घेतलेल्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात आले. महत्वाचे म्हणजे त्या वेळेला मॅन्युअल प्रक्रियेत, सर्व कागदपत्रे असतील तरी नवीन पासपोर्ट मिळण्यासाठी किमान तीन महिने आणि जास्तीत जास्त पाच महिने लागत असत आणि तेव्हा माझ्या हातात फक्त तीन महिने बाकी होते.

दरम्यान, आपला लेक दोन वर्षांसाठी सातासमुद्रापार जात असल्याचे माझ्या आईच्या कानावर आले. तिचा मुलगा गरीब शेतमजूर कुटुंबातून आलेला असल्याने 'तो कधीतरी परदेशात जाईल' असा विचार तिने आयुष्यात कधीच केला नव्हता. तिला माझ्याबद्दल अभिमान होताच पण तिला माझी पुढील दोन वर्षे भेट होणार नाही म्हणून ओढीने हुरहूर आणि मायेपोटी काळजी वाटत होती. मी परदेशात जाण्यापूर्वीच तिने खूप विचार केला. ती भेटेल त्यांना सांगायची आणि भावूक व्हायची. दुर्दैवाने मी तिचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही.

पासपोर्ट काढताना रेशनकार्ड हा ओळखीचा महत्त्वाचा पुरावा असल्याचे समजले (आता आधार व पॅन कार्ड लागते). म्हणून मग गावी जाऊन राशन कार्ड घेतले. पाहतो, तर काय ? रेशनवर माझे नाव केसु नसून आप्पासाहेब होते. यातील 'आप्पासाहेब' हे तलाठ्याची तर 'केसू यशवंत' ही कोदे गुरुजींची देण ! खरं तर पहिलीच्या प्रवेशावेळी माझ्या वडिलांनी कोदे गुरुजींना माझे नाव - केसू येसू राजपुरे- असे  ठेवण्यास सांगितले होते ! पण गुरूजींनी स्वतः माझ्या पूर्ण नावात उच्चारायला थोडे कमी खेडवळ वाटावे म्हणून - केसू यशवंत राजपुरे - असा बदल केला होता. माझे आजोबा माझ्या पोटाला आले होते म्हणून घरी सर्वचजण आप्पा म्हणत.. अद्याप गावी माझे हेच नाव प्रचलित आहे. जन्मतारखेचा पुरावा, अर्थात दहावीच्या सर्टिफिकेटवर केसू हेच नाव असल्याने मला तेव्हा खात्री झाली होती की रेशन वरील नाव बदलणे आवश्यक होते. त्यासाठी तहसीलदार कार्यालयात एफिडीवेट करावे लागणार होते, ते घेऊन तलाठी ऑफिस मध्ये जावे लागणार होते आणि मग मला नवीन रेशन कार्ड मिळणार होते. त्यानंतर मी पासपोर्ट ला अर्ज करणार होतो तेव्हा त्याच्यापुढे तीन महिन्यानंतर पासपोर्ट येणार होता. सर्व गोष्टी वेळेत होतील याची खात्री वाटत नव्हती पण मी आशावादी, प्रयत्न करायला तयार होतो.

एफिडेविट चे काम एका दिवसात झाले. मग मी ते तलाठी कार्यालयात नेऊन दिले. त्यांनी सांगितले या गोष्टीस आठ दिवस लागतील. मग मी पुन्हा आठ दिवसानंतर वाईला जाऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की नवीन रेशनकार्ड अजून आठ दिवसांनी उपलब्ध होतील तेव्हा नक्की काम होईल. या सर्व प्रकारात माझ्या दोन-चार फेऱ्या झाल्या आणि एक महिना कधी उलटला ते समजले नाही. एव्हाना माझ्या लक्षात आले होते की मला वेळेत पासपोर्ट मिळणे शक्य नाही. त्यामुळे दुर्दैवाने फ्रान्सला जाण्याचा माझा मनसुबा मी बदलला आणि मायकल सरांना ईमेल पाठवला की - पासपोर्ट नसल्यामुळे येणे शक्य नाही. मला क्षमा करावी आणि इतर गरजू विद्यार्थ्याला ती शिष्यवृत्ती द्यावी. माझ्याकडे पासपोर्ट नाही हे समजल्यावर मायकेल सरांना आश्चर्य वाटले. हातात पासपोर्ट नसताना मी त्यांना शिष्यवृत्तीबद्दल कसे विचारले, असा विचार त्यांनी मनोमन केला असावा.

खरे सांगायचे तर, आज मागे वळून पाहताना असे निदर्शनास येतेय की, तेव्हा मी पासपोर्ट मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नव्हते. मी लवकर पासपोर्ट मिळवण्याचे महत्त्व जवळच्या कोणालाही सांगितले नव्हते. ना आप्तेष्ट, मित्र किंवा शिक्षकांना याबाबत मारदर्शन वा आवश्यक मदतीची विनंती केली होती. जर तेव्हा मला वेळेत पासपोर्ट मिळाला असता, तर भौतिकशास्त्र विभागातील परदेश वारी केलेला पहिला पोस्ट-डॉक फेलो असतो आणि माझ्या करिअरचा मार्ग सध्यापेक्षा नक्कीच वेगळा असता. याचा अर्थ असा नाही की मी माझ्या सध्याच्या पदावर आणि शिक्षकी पेशावर असमाधानी आहे. मी पूर्णपणे समाधानी आहेच परंतु खंत उरते ती परदेश वारीची चालून आलेली नामी संधी न पटकावल्याबद्दल. 

तसा मी निराश झालो होतोच पण त्याहीपेक्षा मला शरम या गोष्टीची वाटते की प्रविण्यासह पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करूनही सर्व रेकॉर्डवरील नावाच्या समानतेबद्दल मी गहाळ होतो. एकतर मी या गोष्टी महत्त्वाच्या न वाटल्याने गंभीर नव्हतो किंवा माझी समज तेवढी सक्षम नव्हती. मनाशी खूणगाठ बांधली की मला परदेशात जाण्याची संधी मिळणार नसली तरी माझ्याकडे महत्त्वाचे ओळखपत्र असायला हवेच. म्हणून अगदी जिद्दीने ठरवले की काहीही झाले तरी मी पासपोर्ट मिळवणारच. मी ते एक आव्हान म्हणून स्वीकारले.

नावात सुधारणा करून नवीन रेशन कार्ड मिळण्यास विनाकारण विलंब होत असल्याचे माझ्या लक्षात आल्यावर काहीही करून रेशन कार्ड मिळवायचेच हा निर्धार केला. पुढे सप्टेंबर महिन्यात मी तलाठी कार्यालयात चौकशीसाठी गेलो आणि साम दाम दण्ड भेद वापरून एका तासाच्या आत केसू नावासह नवीन रेशनकार्ड मिळवले. हा शासन दरबाराचा अनुभव पाठीशी ठेवत ठरवले की मी एजंटविना स्वतःच्या प्रयत्नाने पासपोर्ट मिळवणार. सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सादर करण्यासाठी मी पुण्याला गेलो. मला आठवतं, तेव्हा मी भर उन्हात चार तास रांगेत उभा होतो तरीही अर्ज स्वीकृती खिडकीपर्यंत माझा नंबर आला नव्हता. मला त्या दिवशी पुण्यात रहावे लागले आणि दुसऱ्या दिवशी लवकर रांगेत उभा राहून मी अर्ज जमा केला होता. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होते. तसेच तुम्हाला अगोदरच सोयीची अपॉइंटमेंट तारीख व वेळ मिळते. अपॉइंटमेंट मर्यादित व्यक्तींना दिलेली असते त्यामुळे वेळ वाया जात नाही आणि ताटकळत बसावे लागत नाही. 

मी अर्ज केला आणि विसरून गेलो कारण मला तेव्हा पासपोर्टची निकड नव्हती. म्हणूनच पासपोर्ट लवकरात लवकर मिळण्यासाठी मी इतर प्रयत्न केले नाहीत. तसेच वाई पोलिसांच्या चौकशी अहवालाचीही मला चिंता नव्हती. एके दिवशी मला घरून निरोप आला की - पासपोर्ट बद्दल पोलिस स्टेशनमधून फोन आला होता आणि मला तिथे बोलावले होते. मग धावपळ न करता माझ्या सवडीने मी पोलीस स्टेशनला गेलो आणि औपचारिकता पूर्ण केली. तेथील चौकशी अधिकारी माझ्या विद्यार्थ्याचे वडील असल्याने त्यांनी माझ्या कोल्हापूर येथील वास्तव्यामुळे काही अडचण येणार नाही अशा पद्धतीने अहवाल दिला. आश्चर्य म्हणजे त्यानंतर एका महिन्याच्या आत मला माझ्या अनपटवाडी गावच्या पत्त्यावर पासपोर्ट मिळाला. मी निवडले नसलेल्या नावाला सिद्ध करण्यासाठी मात्र तोपर्यंत माझी दमछाक झाली होती. त्यावेळी माझ्याकडे पासपोर्ट होता मात्र परदेशात जाण्यासाठी आवश्यक संधी आणि इच्छा नव्हती.

वर्षभरानंतर माझा परदेश दौरा रद्द झाल्याची बातमी सगळीकडे पसरली. या परदेश दौऱ्याच्या अनावश्यक प्रसिद्धीबद्दल लोक कुजबुजू लागले. तेव्हढ्यात माझ्यापेक्षा लहान इंजिनीयर मित्राला परदेशी जाण्याची संधी आली. 'बघा हे तुमच्या मागून निघाले, तुम्ही कधी जाणार?'- लोकांच्या तोंडावर कोण हात ठेवणार होते. पण हे बोलणं मात्र माझ्यासाठी खूपच निराशाजनक होते. तेव्हापासून आजतागायत मी माझी कोणतीही गोष्ट इतरांनी जाहीर केल्याखेरीज अनावश्यकपणे प्रसिद्ध केली नाही.

विद्यापीठातील शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती झाल्यास त्यांना अभ्यास रजा मिळण्याची तरतूद आहे. हंगामी नोकरीमुळे माझ्या बाबतीत ते शक्य नव्हते आणि मला अभ्यास रजा मिळण्याचा अधिकार नव्हता. कालांतराने कुटुंबविस्तार झालाच आणि अनुषंगाने जबाबदाऱ्या वाढल्या. त्यामुळे माझ्या मनात नोकरीत कायम झाल्यानंतरच वर्षभराच्या वा तत्सम परदेशी भेटींचे नियोजन करण्याचा विचार आला. वेळ कुणासाठी थांबत नाही. तोपर्यंत आमच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी पोस्ट डॉक संशोधनासाठी युरोप आणि पूर्व आशियातील देशांना भेटी दिल्या. किंबहुना कॉन्फरेन्सलाही परदेशात जाण्याचा विचार माझ्या मनात येत नसे. मी किमान दक्षिण कोरियाला भेट द्यायला हवी होती - असे काहीजण मला टोमणे मारत. 

साधारणपणे, प्रौढांसाठी पासपोर्ट जारी केल्याच्या तारखेपासून १० वर्षांसाठी वैध असतो आणि त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते. त्यामुळे दहा वर्षांनी २०११ मध्ये माझ्या पासपोर्टचे नूतनीकरण आले. तोपर्यंत परदेश प्रवास माझ्या नशिबातच नसेल असे समजून बऱ्याच संधी नाकारल्या. तरीही मी आशावादी होतो. त्यामुळे भविष्यातील अज्ञात संधींची वाट पाहत पासपोर्टचे नूतनीकरण करण्याचा विचार केला. एव्हाना लग्नानंतर सहकुटुंब कोल्हापुरात रहात होतो. रेशनकार्ड माझ्या मूळ गावाहून कोल्हापुरात भाड्याच्या घराच्या पत्त्यावर हस्तांतरितही केले होते. मला घर मालकांच्या पत्त्यावरून अर्ज करावा लागला. आत्ता पासपोर्ट मध्ये नवीन पत्ता, कामाचे ठिकाण आणि इतर आवश्यक बाबी येणार होत्या. तो पत्ता मिळवतानाचा देखील एक मजेदार अनुभव आहे. माझ्या घरमालकांनी मी त्यांच्या घरात भाड्याने राहात असल्याचे प्रमाणपत्र आणि 'ना हरकत प्रमाणपत्र' देण्यास सुरुवातीस टाळाटाळ केली कारण त्यांना भीती होती की अशा प्रमाणपत्रांद्वारे मी त्यांच्या खोल्यांचा ताबा घेऊ शकलो असतो. त्यानंतर मी त्यांच्या चिरंजीवांसह त्यांना 'असे काहीही होणार नसल्याचा' विश्वास दिल्यानंतरच मला 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळाले.

यासाठी आवश्यक नोकरीच्या ठिकाणचे 'ना हरकत प्रमाणपत्र' मला विद्यापीठाकडून लगेच मिळाले कारण दरम्यानच्या काळात माझी नियमित नियुक्ती झाली होती. मला वाटले की नवीन घडामोडींनंतर पासपोर्ट मिळणे अडचणीचे असेल, पण ते विनाविघ्न पार पडले आणि मला फक्त माझा फोटो बदलण्यासाठी दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट घ्यावी लागली. यावेळी पोलीस चौकशी देखील झाली नाही. मला पटकन पासपोर्ट मिळाला. तेव्हा मला समजले की पहिल्याचवेळी अडथळ्यांनी परीक्षा घेऊन मला धडा शिकवला होता.

२०१४ साली थेट भरतीद्वारे मी विद्यापीठात नियुक्त प्राध्यापक झालो. आता मला आंतरराष्ट्रीय संवादाची संधी मिळेल असे वाटले. पण नंतर.. दुर्दैवाने माझ्या पूर्व पत्नीचे आकस्मात निधन झाले. मुलींच्या अदृश्य जबाबदारीने मला त्यांना एक मिनिटही सोडून जाण्याचा निर्णय घेता आला नाही. दरम्यान, मला अपरिहार्य परिस्थितीमुळे जपान, सिंगापूर, दक्षिण कोरियाच्या नियोजित छोट्या भेटी रद्द कराव्या लागल्या. २०१९ ते आत्तापर्यंत संपूर्ण जग कोरोना विषाणूने भयभीत झाले होते. पण वेळ स्वतःच्या गतीचे पुढे सरकत असते. माझ्यासाठी त्याने मग का थांबावे ? काळाने माझ्यासाठीचा आणखी १० वर्षांचा पासपोर्टचा वैध कालावधी गिळंकृत केला. बघता बघता दुसऱ्या नूतनीकरणाची वेळ आली देखील ! 

माझ्या पासपोर्टच्या दुसऱ्या नूतनीकरणाची तारीख जानेवारी २०२२ होती. पण अर्ज करायला मीच उशीर केला कारण आम्ही ओळखीच्या पुराव्यात नवीन तपशीलांसह अपडेट केलेले आधार कार्ड मिळण्याची वाट पाहत होतो की जे जुलै २०२२ मध्ये मिळाले. कुटुंबाचा नियोजित परदेशी दौरा नजरेसमोर ठेऊन, कुटुंबातील सर्व सदस्यांची पासपोर्ट निकड वाटू लागली. तात्काळ सर्व सदस्यांच्या अर्जाची एकाच वेळी तयारी सुरू केली. यावेळी केसू ते केशव नावात मोठा बदल झाला होता. हा नाव बदल करण्याचे मुख्य कारण म्हणजे रेकॉर्डवरील आणि माझ्या संभोधनाचे नाव यात एकसमानता यावी. अगोदरच्या परिसरालगतच नवीन पत्त्यावर तीस वर्षांनंतर प्रमथच कोल्हापुरात स्वतःच्या मालकीचे घर झाले होते. पुनर्विवाहामुळे सहचारिणीचे तपशील बदलणे आवश्यक होते. नावातील बदल आणि अपुरी कागदपत्रे यावर आक्षेप घेतला जाईल की काय याची मला काळजी वाटत होती. अर्थात माझ्या पाठीशी दोनदा पासपोर्ट अर्ज करण्याचा तसेच संबंधित अडचणींचा सामोरे जाण्याचा अनुभव होताच. विचार केला की अर्ज तर करूया आणि त्रुटी निघाल्या तरच दुरुस्त्या करू. जुलै मध्ये नूतनीकरणासाठी एजंट मार्फत ऑनलाईन अर्ज भरला आणि कोल्हापुरातील ऑगस्ट ची अपॉइंटमेंट मिळाली.

म्हणतात ना - मन चिंती ते वैरी न चिंती.. मनात नकारात्मक विचार येऊ लागले. या अडचणी येतच राहाणार.. आणि पासपोर्ट मिळणार नाही किंवा नूतनीकरणास उशीर केल्यामुळे काहीतरी दंड होणार. तेव्हा माझ्याकडे आधार, पॅन आणि गॅझेटमध्ये "केशव यशवंत राजपुरे" नावाचे अचूक स्पेलिंग होते. एकदा तर वाटले कि पासपोर्ट नूतनीकरण करण्याऐवजी हे जुने एप्लिकेशन रद्द करून नव्या आधार तसेच पॅन कार्डसह आणि नावातील बदलाच्या गॅजेटसह नव्याने अर्ज करून या कागदपत्रांतील त्रुटींची कटकट दूर करावी. चौकशी केली असता तेही शक्य नसल्याचे समजले कारण नव्याने नोंदणी होत नाही. म्हणजे अडचणी या अटळ होत्या.. 

दस्तऐवज पडताळणी भेटीच्या दिवशी अनेक त्रुटी आढळल्या. मयत पत्नीचे 'मूळ मृत्यू प्रमाणपत्र', नवीन विवाह 'मूळ प्रमाणपत्र', दुसऱ्या पत्नीचे 'नाव बदललाचे गॅझेट (राजपत्र)' या सर्वाची दुपारपर्यंत पूर्तता करण्यास सांगितले की जे शक्य नव्हते. जुना पासपोर्ट आणि आधार कार्डमध्ये माझ्या वडिलांच्या नावातील 'a' अक्षराचा फरक होता. कागदपत्रे तपासणाऱ्या संबधीत व्यक्तीने हे तेव्हाच ओळखले असते आणि मला दुरुस्त करण्यासाठी सूचित केले असते, तर मी या सर्व दुरुस्ती एकाच झटक्यामध्ये केल्या असत्या. पण नाही, मला त्रास झाल्याशिवाय ते होणार नव्हते. त्यांनी पुढच्या तारखेची अपॉइंटमेंट घेण्यास सांगितले.

मग मला ऑक्टोबरमध्ये (२ महिन्यांनंतर) पुन्हा अपॉइंटमेंट मिळाली. तशी कागदपत्रांच्या अडथळ्याविना पडताळणी बद्दल खात्री नव्हती. निदान एक तरी चूक निघणारच असे वाटत होते. आणि झालेही तसेच. त्यांनी वडिलांच्या नावातील 'a' अक्षराचा प्रश्न उपस्थित केला. मी दोन संबंधित पुरावे सादर केले तरीपण त्याचे समाधान झाले नाही. संबंधित अधिकारी म्हणाला की - कागदपत्रे तूर्तास पुण्याच्या कार्यालयात पाठवतो आहे पण तिथे काही स्पष्टीकरण द्यावे लागले तर तुमचं तुम्ही बघून घ्या. खरं तर, प्रक्रियेत इतका विलंब झाल्यामुळे मी निराश झालो होतो. मी म्हणालो, जर काही अडचण असेल तर माझा मी हाताळेल. ऑनलाइन पद्धतीने गेलं एकदा प्रकरण पुण्यात.. या पासपोर्टवाल्या अधिकाऱ्यांची नजर इतकी तीक्ष्ण असते की पुण्यात नेमकी 'a' अक्षराची शंका उपस्थित झाली. 

या ऑनलाइन प्रणालीत एक गोष्ट चांगली आहे की आपण आपल्या पासपोर्टचे स्टेटस ऑनलाइन पद्धतीने तपासू शकतो. त्रुटींचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याकडे स्पीड पोस्टद्वारे प्रमाणित कागदपत्रे स्वीकारण्याची सुविधा आहे म्हणून बरे ! पुणे येथील ऑफीसला देखील मला दोनदा कागदपत्रे पाठवावी लागली, तरीही पासपोर्ट क्लियर झाला नाही. म्हणून यासाठी मी इतर मार्गांनी प्रयत्न केला. मी पोस्टल एक्झिक्युट्युव्ह तसेच कोल्हापूर दस्तऐवज पडताळणी केंद्रातून पुण्याला फोन केला आणि त्रुटी नेमकी काय आहे याची खात्री केली. तोपर्यंत मी अपेक्षेप्रमाणे आधारकार्ड वरील वडिलांचे नाव दुरुस्त केले होते. यास केवळ तीन दिवस लागले. इतर आवश्यक कागदपत्रांसोबत ऑनलाइन काढलेली नवीन आधार कार्डची रंगीत मुद्रित आवृत्ती प्रमाणित करून पुण्याला पाठवून दिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर अगदी वैतागून -आता हा शेवटचाच प्रयत्न समजून - मी कोणत्याही परिस्थितीत पुणे कार्यालयात जाणार नाही, असे ठरवले.

तोपर्यंत माझा पासपोर्ट सहकारी आणि मित्रांमध्ये गंमतीचा विषय झाला होता. प्रत्येक वेळी मी त्यांच्याशी त्रुटी आणि माझ्या त्यावरील अंमलबजावणीवर चर्चा करी. दुष्काळात पाऊस पडेल पण माझा पासपोर्ट येणार नाही - अशा त्यांच्या मजेशीर कमेंट होत्या. बहुप्रतीक्षित पासपोर्ट लवकर न आल्याच्या अशाच केसेस मी ऐकायचो मग माझ्या अस्वस्थतेत भर पडे. 'भीक नको पण कुत्रा आवर' अशी मनस्थिती.. एके दिवशी रागाच्या भरात मी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला कारण दोन महिने झाले तरी माझ्या पासपोर्टची 'ऑब्जेक्शन' स्थिती बदलत नव्हती. तरीही मी शांत राहिलो आणि नियतीवर विश्वास ठेवला. 

८ डिसेंबर रोजी मी ऑनलाइन स्टेटस तपासले तर आश्चर्य ! माझा पासपोर्ट क्लियर.. कागदपत्रे पुढील चौकशी अहवालासाठी राजारामपुरी पोलिस स्टेशनला पाठवली आहेत. बाकीची प्रक्रिया अवघड नसल्यामुळे मला खूप आनंद झाला. पासपोर्ट मिळणार याचा आनंद ! एक वेळ अशी होती की मी पासपोर्ट चा नाद सोडला होता. मग राजारामपुरी शाखेतील संबंधित पोलीस अधिकाऱ्यास विनंती केली. त्यांनी त्यांचा अहवाल १२ डिसेंबर रोजी जिल्हा कार्यालयात पाठविला, त्यांनी तो तात्काळ पुणे कार्यालयात पाठविला. पासपोर्टची १४ डिसेंबर रोजी छपाई झाली आणि आज १८ डिसेंबर २०२२ रोजी (अर्ज केल्यानंतर ६ महिन्यांनंतर) मला तो मिळाला. खूप आनंद झाला. हा आनंद पासपोर्ट मिळाल्याचा नव्हे तर कटकटीतून मुक्त झाल्याचा होता.

माझा पासपोर्ट प्रलंबित असल्याने मी माझ्या दुसऱ्या मुलीच्या पासपोर्टसाठी अर्ज करू शकलो नाही. आता मी माझ्या अल्पवयीन कन्येचा पासपोर्ट अर्ज ईसीआर (इमिग्रेशन चेक आवश्यक आहे) श्रेणीमध्ये करू शकतो. अल्पवयीन अर्जदार १८ वर्षे वयाची झाल्यानंतर नॉन-ईसीआरसाठी पात्र असतात. सर्वसाधारणपणे, जर तुम्ही १० वी (मॅट्रिक किंवा उच्च शैक्षणिक उत्तीर्ण प्रमाणपत्र) उत्तीर्ण केली असेल किंवा उच्च पदवी असेल तर तुमचा पासपोर्ट नॉन-ईसीआर श्रेणीमध्ये येतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कागदपत्र पडताळणीनंतर माझ्या सौभाग्यवती आणि मोठ्या मुलीचे पासपोर्ट ऑक्टोबरमध्ये अवघ्या आठवडाभरात मिळाले होते. कुटुंबातील चारपैकी तीन पासपोर्ट आता मिळाले आहेत, उरलेल्या एकासाठी आता प्रयत्न बाकी आहेत.

नावात बदल, पत्त्यात बदल आणि जोडीदाराच्या नावाचा समावेश ही महत्त्वाची प्रक्रिया आहे म्हणून ते त्याबाबत खूप सतर्क असतात. कागदपत्रात कुठेही नावात एका अक्षराची चूक नसावी. सर्वत्र नावाचे स्पेलिंग सारखेच असावे. पण जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला फक्त तीन योग्य कागदपत्रांची गरज आहे १) आधार कार्ड, २) पॅन कार्ड, ३) एसएससी प्रमाणपत्र. 

शेवटी अनेक चढउतार पार करत आणि मनाच्या वेगवेगळ्या अवस्थेतून प्रवास करून मला पासपोर्ट मिळू शकला व आप्पासाहेब-केसू-केशव यांच्या पासपोर्ट कथेचा शेवट गोड झाला.

© केशव यशवंत राजपुरे

(आपल्या प्रतिक्रिया माझ्या लिखाणात सुधारणा करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. आपल्या नावासह खालील बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्याव्या ही विनंती)

Friday, December 2, 2022

शिदोरी

आईची चारित्र्यासाठीची शिदोरी


स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृती प्रतिष्ठान मार्फत दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी "प्रतिकूल परिस्थितीत मुलांना कर्तृत्ववान बनवणाऱ्या पालकांचा" सन्मान करण्यात येणार आहे. नुकतीच या "आदर्श पालक-विद्यार्थी पुरस्कार" सन्मानासाठी माझ्या आईची निवड झाली आहे. प्रतिष्ठान च्या वतीने घेण्यात येणाऱ्या सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून करिअरच्या विविध पातळ्यांवर आपल्या पाल्याला पाठबळ देत पंचक्रोशीचा बहुमान वाढवल्याबद्दल हा सन्मान सोहळा आयोजित केला जातो. समितीने या सन्मानासाठी आईच्या नावाची एकमताने शिफारस केली आहे. निवड समितीने योग्य निवड केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

 

ही बातमी ऐकून माझे मन आनंदाने उचंबळून आलं. सर्व मेहनत फळाला आल्याची भावना. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने आयुष्यात यशस्वी व्हावे असे वाटते. अपत्याने मिळवलेल्या यशाने त्यांचा उर अभिमानाने भरून येतोच. त्याचे कौतुक चारचौघात व्हावे ही त्यांची अपेक्षा असतेच. आपण विद्यार्थ्यांचा सन्मान, गुणवंतांचा सन्मान, सेवकांचा सन्मान, शिक्षकांचा सन्मान हे ऐकतो परंतु कार्यकुशल पिढी घडवणाऱ्या पालकांचा सन्मान ही गोष्टच नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद आहे. माझ्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये बऱ्याच वेळेस सन्मानित होण्याचा मला योग आला आहे परंतु हे सन्मान जिच्यामुळे मिळाले त्या माऊलीचा माझ्या यशस्वीतेमुळे सन्मान होतोय हे ऐकून मन सुखावलं.

रणांगणावर जे सैनिक लढायला जातात त्या सर्वांना लढायची समान संधी मिळते पण त्यातील सरदार तोच होतो जो विशेष प्रयत्न करत शर्थीने लढतो. स्पर्धा मग ती शैक्षणिक किंवा वास्तविक जीवनातील असो, प्रत्येक जण आपापल्या परीने त्यास सामोरे जात असतो, यामध्ये त्याचाच प्रवास यशस्वी होतो जो अतिशय संयमानं, जिद्दीने आणि नेटाने प्रयत्न करतो. माझ्या बाबतीतही असंच झालं आहे. मला नशीबाने यश मिळालेले नाही, तर गेल्या चाळीस वर्षांतील अविरत केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा हा परिपाक आहे. मी नेहमी परीक्षेमध्ये प्रथमांक असायचो तसेच आयुष्याच्या परीक्षेला मी खूप धैर्याने सामोरे जाऊ शकलो ते प्रामुख्याने आईकडून माझ्या मोठ्या भावंडांकडे आलेल्या आणि मी घेतलेल्या प्रतिभेच्या वारस्यामुळेच..

तसं बघितलं तर माझी सर्वच भावंड अतिशय हुशार ! माझ्या बहिणी काही अपरिहार्य परिस्थितीमुळे जादा शिक्षित नाहीत परंतु माझे बंधू आणि मी पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकलो. आमच्या कुटुंबातील ही पहिली साक्षर पिढी... आम्हाला लाभलेली प्रतिभा ही जनूकीय देण आहे. माझी आई नक्कीच हुशार असल्यामुळे आम्ही हुशार आहोत. माझी आई साक्षर आहे हे सर्वांना माहीत नाही.

आपला जीवनातील सन्मान जसा पालकांमुळे असतो तसं आपल्यामुळे पालक सन्मानित होत असतील तर तो क्षण मोठ्या भाग्याचा असतो असे मी मानतो. फाउंडेशन मार्फत होणारा माझ्या आईचा सन्मान हा लाख मोलाचा आहे. तिनं आत्तापर्यंत सोसलेल्या कष्टाची, केलेल्या परिश्रमाची आणि त्यामुळे मिळालेल्या यशाची ही पोहोच पावती आहे असे मी मानतो. तिने केलेले काबाडकष्ट हे जरी आमचे आत्ताचे यश लक्ष्य ठेवून केलेले नसले तरी तेव्हा तो आमच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. प्रथम आजच्या रोजीरोटीचा प्रश्न ! नंतर आरामाच्या गोष्टीचा विचार होत असे. पण तिने तेव्हा केलेल्या कष्टाचे फलित म्हणजे आमच्यात केलेले 'प्रयत्नवादी कष्ट संस्कृतीचे रोपण' होय !

हे करत असताना आईने आम्हाला कधी परावलंबी होऊ दिलेलं नाही. फुकटचे लाड केले नाहीत. नेहमी आम्हाला स्वावलंबी आणि स्वयम् अध्यापनासाठी तयार केलं. आईने आम्हाला तयार भाकरी न देता भाकरी कशी मिळवायची हे शिकवले. आमच्या गरजेच्या गोष्टी मिळवणे किती अवघड असते याची जाणीव करून दिली. हीच आम्हासाठी मोठी शिदोरी होती. हेच कारण असावं आम्ही आमच्या जीवनातील सर्व कसोटीच्या क्षणी अतिशय धीराने स्वतःला सावरू शकलो.

माझं सध्याचे पद काय आहे ? जागतिक २% शास्त्रज्ञांच्या यादीत नाव येणे म्हणजे काय ? विद्यापीठातील विभाग प्रमुख म्हणजे काय ? भविष्यात मी काय होऊ शकतो ? या सगळ्या गोष्टींच्या तांत्रिक बाजू तिला कदाचित माहीत नसतीलही पण तिला एवढे नक्की माहित आहे की माझा मुलगा मोठा साहेब झाला आहे. यामुळे कायम ती समाधानी होत असेल कारण कोणत्या परिस्थितीत आपण मुलांना वाढवलं आणि त्यांनी वाममार्गाने नव्हे तर जिद्द, प्रामाणिकता आणि परिश्रमातून निव्वळ प्रतिभेच्या जोरावर सुखाचे दिवस बघण्याची संधी प्राप्त केली आहे.

आठ वर्षांपूर्वी माझ्यावर गुदरलेल्या कटू प्रसंगावेळी माझी आई माझ्या मुलींची देखील आई झाली ही माझ्या दृष्टीने महत् भाग्याची गोष्ट आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी या आईच्या पोटी जन्म घेतला. माझ्या आयुष्यातील ही फार थोर व्यक्ती आहे. वरून कितीही कडक भाषिक वाटली तरी आतून मात्र खूपच मृदू मुलायम आहे ती. तिच्या ऋणातून उतराई होणं दूरच पण तिच्यासारखं पालक होण आम्हाला तरी शक्य होणार नाही.

 


अशी माझ्या आईने कष्ट, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणाची शिदोरी दिली ज्याचा उपयोग या व्यवहारी जगात वावरताना, जीवनातील अनेक संकटांशी दोन हात करताना, शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट शिखर गाठताना झाला. ज्यामुळे आज मी सर्वोत्तम ज्ञानाची संपत्ती मिळवू शकलो आहे जी माझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. खरंच कविवर्य फ. मु. शिंदे यांच्या कवितेतील पंक्ती किती समर्पक आहे ना - आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही.

माता आणि माती या शब्दांमध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. ही वेलांटी म्हणजेच आपले जीवन असे मला वाटते. डॉक्टर महेश दत्तात्रय मेणबुदले हे मूळचे बावधनचे, माझा वर्गमित्र किरणचे पुतणे. माझ्या मातेचा माझ्या मातीतील माणसांनी केलेला हा सन्मान आमच्यासाठी खरोखरच खूप गौरवास्पद आणि अत्युच्च आनंददायी आहे ! म्हणूनच माझी माता आणि माझी माती यांचा मी सदैव ऋणी राहीन. 

आईबद्दलचे या आधी लिहिलेले हे दोन ब्लॉग कंसात (२०२०, २०२२) दिलेल्या लिंक वर आहेत.


- डॉ केशव राजपुरे
मोबाईल: ९६०४२५०००६
ईमेल: rajpureky@gmail.com 











___________________________________________________________________________________

स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृति प्रतिष्ठान, वाई (सातारा)

॥ सन्मानपत्र ॥ 

प्रा. डॉ. केशव यशवंत राजपुरे
विभाग प्रमुख भौतिकशास्त्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 
रा. अनपटवाडी, बावधन ता. वाई

विश्वविख्यात स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून जगातील १ कोटी संशोधकांच्या संशोधन कार्याचा अभ्यास केला जातो. त्यातील २ लाख व्यक्तींची विज्ञानातील संशोधनाबद्दल शीर्ष संशोधक यादी प्रसिद्ध केली जाते. त्यामध्ये वाई तालुक्याच्या अनपटवाडी या आडगावातील प्रा. डॉ. केशव राजपुरे यांचा समावेश होणे, हे अप्रुपच अप्रूपच आहे.

डॉ. केशव राजपुरे !
सातारा जिल्ह्यातील अनेकांनी या नावाचा कुतुहलाने शोध घ्यायला सुरुवात केली, इतके आपले व्यक्तिमत्व प्रसिद्धीच्या झोताबाहेर आहे. पण आपले संशोधनकार्य पाहिले अन् आम्ही थक्क झालो. श्रीमती अंजिरा व यशवंत राजपुरे या गरीब, कष्टाळू, अल्पशिक्षित-अडाणी मातापित्यांच्या पोटी जन्म घेऊन आपण प्राध्यापक, विभाग प्रमुख आणि शास्त्रज्ञ होणे ही नक्कीच आनंदाची बाब. 

विज्ञानाला प्रांत आणि भाषेचे बंधन नसते हे खरं. तरीही सहज म्हणून अवलोकन केले तरी भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात सध्या तरी परदेशस्थ तसेच शहरी बुद्धिमंतांची नावे चमकताना दिसतात. त्यांचाच जास्त बोलबाला असतो. त्यातही भौतिकशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयात काहीतरी भरीव योगदान देणे, ही निश्चितच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

डॉ. केशव राजपुरे जी... आपण शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहात. दारिद्रयाचे दशावतार, मोठे कुटुंब, मोलमजुरी करणारे मायबाप यांचा मुलगा बावधन हायस्कूल, शरद पवार महाविद्यालय (लोणंद) येथून शिक्षण घेऊन शिवाजी विद्यापीठात पहिला येतो, आपल्या ज्ञानमत्तेने महाविद्यालयालाही १०० टक्के अनुदान प्राप्त करून देतो, पीएचडी करतो, भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी स्वतःला झोकून देतो आणि जागतिक पातळीवर आपले नाव कोरतो यातून आपला आवाका लक्षात यावा.

कष्टाळू माता-पित्यांना ठाऊकही नसलेली अध्यापन, अध्ययन, संशोधनाची वाट आपण समर्थपणे चोखळलीत. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आपण संशोधक-शास्त्रज्ञांची एक पिढीच घडवित आहात, या वस्तुस्थितीचा आनंद व्यक्त करुन स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृति प्रतिष्ठान आपल्या मातोश्री श्रीमती अंजिरा व आपण प्रा. डॉ. केशव राजपुरे यांना आदर्श विद्यार्थी-पालक पुरस्कार व हे मानपत्र सन्मान राशीसह प्रदान करीत आहोत. हा सन्मान प्रदान करताना आम्हांस कर्तव्यपूर्तीचा आनंद लाभत आहे.

आपले, 
स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृति प्रतिष्ठान, वाई (सातारा)
(शब्दांकनः विठ्ठल माने, वाई)
___________________________________________________________________________________









Thursday, December 1, 2022

कणखर कार्यमग्न माऊली

 माऊलीच्या कष्टमय जीवनाचे फलित


(कृपया माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये तिच्याबद्दल अधिक वाचा)

वैराटगडाच्या दक्षिण पायथ्याशी वसलेल्या जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे येथे इ. सन १९३५ दरम्यान माझी आई अंजिरा हीचा जन्म झाला. तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम दोन भाऊ व तीन बहिणी.  तिने तिसरीपर्यंत शिक्षण घेतल्याने साक्षर आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेली माझी आई लहानपणापासूनच सर्व कामात निपुण आणि तरबेज ! वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तिचा शेतमजूर असलेले माझे वडील कै यशवंत राजपुरे यांच्याशी विवाह झाला. त्या चिमुरडीस तुलनेने गरीब शेतकरी कुटुंबात जुळवून घेण्यासाठी जास्त वेळ लागला नाही.

सासरी आल्यापासूनच तिचं घर आणि शेतातील काबाडकष्टाशी घट्ट नातं जुळलं. आईने वडिलांच्या खांद्याला खांदा लावून पहिल्यापासूनच अतिशय मन लावून संसार केला. गरीब व भोळ्याभाबड्या नवऱ्याबरोबर संसार कसा करावा याचे मूर्तीमंत उदाहरण ती आहे. मोठं कुटुंब आणि जबाबदारीचा डोलारा तिने अगदी लीलया पेलला आहे.

आम्ही पाच भाऊ आणि पाच बहिणी अशी तिला एकूण दहा अपत्य ! गरिबीत सुद्धा आपल्या मर्यादा ओळखून आईने आम्हाला शिकवलं. सर्वांची लग्ने सुसंस्कृत घरांमध्ये कर्जबाजारी न होता पार पाडली. वडिलोपार्जित डोंगर उतारावरील ३ एकर जमीन कसत तिने कुळकायद्यात मिळालेली ६ एकर जमीन टिकवण्यात वडिलांना सखोल पाठिंबा दिला.

‘फाटक्यात पण नेटके रहा’ ही तिची आम्हास कायमची शिकवण. पैसे नाहीत म्हणून तिने कधीही घरांमध्ये तक्रार केल्याचे आठवत नाही. घरात अठरा विश्व दारिद्र्य असूनही प्राप्त परिस्थितीत अगदी कसरतीत संसार गाढा आयुष्यभर ओढला. अशात आम्हा भावंडांना हौसमौजेसाठी तर सोडाच पण शिक्षणासाठी पैसे ती आणणार कुठून होती? पेहरावाची साडी तिच्यासाठी हौसेची गोष्ट असायची. तरीसुद्धा जोडीदाराच्या मजुरीच्या मदतीने तिने मुलांना उच्चशिक्षित केलं ही गोष्ट लाखमोलाची आहे.

मी शाळेत नेहमी पहिला यायचो. दहावीत पहिला येऊनही व पुढे शिकायचं असूनही निव्वळ क्षुदाशांतीसाठी मला लगेचच शिक्षण थांबवावं लागणार होतं. पण माझी महत्वाकांक्षा आणि आईचा पाठींबा यामुळेच पुढे शिकू शकलो. तिच्याच संस्कारांच्या आणि स्वाभिमानाच्या वर्तुळात राहून मी माझं पीएचडी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पीएचडी करत असताना माझे वडील निर्वतले त्यावेळी माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होतीच पण आईने मला परिस्थितीचा चटका लागू दिला नाही. शिक्षण घेताना व पुढे आयुष्यात मला वेळोवेळी आर्थिक व इतर संकटांना सामोरं जावं लागलं. पण आईच्या ‘तक्रार करायची नाही, आहे त्या परिस्थितीवर मात करून पुढे जायचं’ अर्थात 'जीवन जसे आहे तसे स्वीकारा' या मंत्रामुळे मी तग धरू शकलो. 

शिवाजी विद्यापीठासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेत पीएचडी पूर्ण करून मी तिथेच भौतिकशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो, सध्या तिथे अधिविभाग प्रमुख म्हणून काम करतोय ही तिचीच प्रेरणा आणि पुण्याई म्हणावी लागेल. मी नेमका काय शिकलो हे तिला अजूनही माहीत नसेल, तसेच माझे पद, पदाचे महत्त्व यास अनभिज्ञ असली तरी आपल्या मुलाने जीवनात उत्कृष्टता मिळवली आहे इतकंच तिला कळतं. तिने दिलेल्या बळामुळे मी अनेक शिखरे गाठली. जागतिक शीर्ष शास्त्रज्ञांच्या यादीत मानाचे स्थान मिळवले. रोजचा दिवस काहीतरी नवीन देऊन जातो. अशावेळी पदाचा-प्रतिष्ठेचा गर्व होऊ लागला तर आईची नुसती आठवण मला अस्तित्वाची जाणीव करून देते आणि उद्याच्या नव्या कामगिरीसाठी दिशा देते. आईच्या मायेची शिदोरी अशीच असते, ती कधीच कमी पडत नाही.

माझा स्वभाव आईवर गेल्याचं माणसं मानतात. खरंच आहे ते, कारण शिस्तप्रियता, कष्टाळूपणा, कणखरपणा, सहनशीलता इत्यादी गोष्टी मला तिच्यामुळेच जन्मजात मिळाल्या आहेत. ती तिच्या कर्तव्याबाबत प्रामाणिक राहिली, तिनं जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलं, तिचा हाच स्वभाव माझ्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबिंबित झाला आहे. आम्ही मुलांनी आळशी न बनता नेहमी कार्यमग्न राहावं अशी तिची शिकवण होती. कष्ट करायला लाज बाळगू नये असं ती म्हणायची. लहानपणी मी विहिरीवर आठवडाभर कामाला गेलो होतो. त्याचे जे पैसे आले त्यातून मी माझ्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा रंगीत शर्ट-पॅंट घेतले. त्यावेळी जर तिने माझ्या हट्टापायी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून कपडे घेऊन दिले असते तर मला त्या कपड्याचं महत्व राहिलं नसतं आणि श्रमप्रतिष्ठा स्पर्धात्मक जगाच्या उंबरठ्यावर उमजली नसती. तिने दिलेल्या अशा अनेक धड्यांमुळे माझ्या आयुष्याचा अभ्यास लवकर पक्का झाला.

माझ्या मार्गदर्शनाखाली २० विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे. आपण संशोधन नावीन्यपूर्ण असावं असा माझा कायम आग्रह असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना कधीकधी ते अवघड वाटतं. आजकाल संशोधन क्षेत्रात गुणवत्ता राखणं जिकिरीचं होत असल्याने मला त्याबाबतीत कठोर व्हावं लागतं. संशोधन कार्य निर्देश आणि इच्छेनुसारच असाव असं विद्यार्थ्यांना मी सांगत असताना मी स्वतःला माझ्या आईच्या भूमिकेत व समोरच्या विद्यार्थ्यांना माझ्या भूमिकेत पाहत असतो. माझ्या आईने जशी मला सर्वोत्कृष्टतेची सवय लावली, त्यासाठी पडेल ते कष्ट करायला लावले ते माझ्या विद्यार्थ्यांकडूनही घडावं इतकीच माझी माफक व रास्त भावना असते. विद्यार्थ्याला काय वाटेल याची मी कधीही तमा बाळगत नाही. पण कालांतराने हे विद्यार्थी याचसाठी आभार व्यक्त करतात तेव्हा ते एकार्थी माझ्या आईचे आभार मानत असतात कारण ती तिचीच देण आहे. 

ती जे जगली, जे तिच्या नशिबी आलं त्याचा तिने खुशीने स्वीकार केला. तिने तिचा चंदन देह आमच्यासाठी झिजवला. शेती हीच आपली जीवनदायी ठेवा आहे आणि तीत राबल्याशिवाय गत्यंतर नाही ही खूणगाठ तिने कायम मनाशी बांधली होती. तिच्या चार मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या, शेतात काम करत असताना दोनदा विहिरीत पडली, एकदा सर्पदंशही झाला. ते तिच्यातलं आमच्यासाठीचं वात्सल्यच म्हणावं लागेल ज्यामुळे ती त्यातून पुन्हा पुन्हा जन्मली.


आयुष्यभर स्वाभिमान जपलेली आई अजूनही तशीच जगत आहे. सुरुवातीला कष्टाचे व नंतर आजारपणाचे सर्व त्रास तिने सोसले. कोणत्याही गोष्टीसाठी ती कुणावरही अवलंबून राहिल्याचे मला आठवत नाही. तिला अन्याय आणि कपटाची नेहमीच चीड वाटते. प्रत्येकाने आपल्या वाट्याचे काम न थकता आणि कारणे न देता प्रामाणिकपणे करावे असे तिला वाटते. स्वतःच्या मुलींच्या बाबतीतही ती अशीच तत्वनिष्ठ राहिली. त्यांच्या कुटुंबात तिने कधीही ढवळाढवळ केली नाही किंवा त्यांना माहेरावर अवलंबून राहू दिले नाही. त्या त्यांच्या कुटुंबात स्वावलंबी व्हाव्यात यासाठी ती त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत राहिली. 

वयाच्या ऐंशी पर्यंत ती अजिबात थकली नव्हती. पण पाच वर्षापूर्वी उद्भवलेल्या हृदयविकाराच्या आजारानंतर मात्र ती थोडी खचल्यासारखी वाटते. आजकाल तिला दिसायला व ऐकायला कमी येते. पण तिच्यात तो जून स्वाभिमान व कणखरपणा अजून तसाच अढळ आहे. तिचं असणं आमच्यासाठी मोठा आधार आहे. माझ्या कुटुंबाने आजपर्यंत अनेक चढउतार पहिले, पराकोटीचा संघर्ष करून सुखाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा त्या प्रयत्नांना अपयश आले, सुखाने अनेकदा हुलकावणी दिली. तरीही आम्ही थांबलो नाही. आईच्या मार्गदर्शनाखाली धावत राहिलो. माझे आताचे यश सर्वांना माझ्या अविश्रांत प्रयत्न आणि मेहनतीचे संचित वाटत असले तरी ते माझ्या माऊलीच्या कष्टमय जीवनाचे फलित आहे, हे नक्की.

मी जागतिक स्तरावर संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात थोडेफार नाव कमावले आहे, त्याचे सगळे श्रेय तिलाच असले तरी ती त्या मोठपणापासून अलिप्त राहते. कारण तिनं जे काही कष्ट सोसले ते मुलांच्या मोठेपणासाठी होते, स्वतःसाठी नव्हतेच मुळी. वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर तिला आरोग्यदायी आयुष्य लाभवे व तिची शतकोत्तर साथ आम्हास लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.







- प्राध्यापक डॉ. केशव यशवंत राजपुरे

मोबाईल ९६०४२५०००६

rajpureky@gmail.com