Sunday, January 16, 2022

पालकांची जबाबदारी; समाजाचा आरसा



पालकांची जबाबदारी

आजची तरुण पिढी खरोखर बिघडत आहे का ?  ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागत नसल्यास दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर 'हो' असेच असते. अख्खी पिढीच बिघडली नसली तरी याचा टक्कादेखील कमी नाही. प्रत्येकाला आपले अपत्य हुशार, कर्तबगार, उद्योगी, सदाचारी असावं असंच वाटतं.  किंबहुना प्रत्येक पालकाची तशी अपेक्षा असते ! परंतु ही अपेक्षा आपोआप पूर्ण होणार आहे का ? आपण त्याच्यात मानवी मूल्ये रुजवली पाहिजेत आणि त्यानुसार त्यास प्रशिक्षित केले पाहिजे. ते ज्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीमध्ये वाढत असते त्यावर जरी त्याचं वर्तन अवलंबून असलं तरी पालकांना यासाठी मुलांमध्ये संस्काराची गुंतवणूक करावी लागते.

धारणा व्यक्तीसापेक्ष असते त्यामुळे हे वर्तन काहींना योग्य तर काहींना अयोग्य का वाटू नये ? तरुण पिढीला याबाबत विचारलं तर त्यांचे उत्तर नकारार्थी असते.  उलट ते म्हणतात आम्ही बिघडलो नाही तर अधिक स्मार्ट झालो आहोत आणि याला जर तुम्ही बिघडणं म्हणत असाल तर खुशाल म्हणा. पुढे ते सांगतात की त्यांची पिढी प्रत्येक गोष्टीमध्ये अधिक सक्रिय असते, स्वावलंबी तसेच सक्षम आहे, करिअरला महत्त्व देते, आपल्या अस्तित्वासाठी स्पर्धा करत जाणीवेने नाव कमावण्याचा प्रयत्न करत असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या आपल्याला वाटत असलेल्या असभ्यतेचे कारण शोधले पाहिजे.

तसं बघितलं तर प्रत्येक जुनी पिढी येणाऱ्या नवीन पिढीवर हाच आरोप करत आलेली आहे की "तुमची पिढी बिघडत चालली आहे".  म्हणजे बिघडणं सापेक्ष आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे कि कालानुरूप जग बदलत आहे, विश्वाविषयीच्या आपल्या कल्पना बदलत आहेत, नवनवीन आव्हानांना सर्वांना तोंड द्यावे लागत आहे. जगण्यासाठी आपल्याला कालसुसंगत जीवन निवडावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक ठोकताळे तसेच नियम पाळायला पाहिजेत असं म्हणणं म्हणजे कालानुरूप स्वतःला न बदलून घेण्यासारखं आहे. या पिढीची जीवनशैली तुमच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. म्हणूनच ते वेगळं जीवन जगत आहेत असं आम्हाला वाटतं. याबद्दल कोणतीही तक्रार नसली तरी जर ते उपद्रवी, असंस्कृत होत त्यांचे आयुष्य बरबाद करत असतील तर समाजात त्यांचं जगणं खूप कठीण होईल.

काहींच्या मते - या सर्व गोष्टीस आपली सदोष शिक्षणपद्धती तसेच देशाची आर्थिक धोरणं कारणीभूत आहे. शिक्षण पद्धतीतील त्रुटी काढायच्या सोडून आपण याचा मुलांच्या असंस्कृतपणावर ठपका ठेवून देतो. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि गुगल हे या पिढीसाठी शिकण्याची संसाधने आहेत. मोबाईल इंटरनेट सारखी गॅजेट्स त्यांच्या हाती देऊन आम्ही त्यांच्यावरचे नियंत्रण आधीच सोडले आहे. हल्ली कम्प्युटर तसेच मोबाईलवर खेळले जाणारे आभासी खेळ-गेम्स पूर्वी मुलं मैदानावर खेळायची. त्यामुळे व्यायाम तर होतच असे परंतु बुद्धी तल्लख होत असे. खेळातील नियम काटेकोरपणे पालन तसेच बंधनं आयुष्यात कशी वापरायची, यश अपयश कसे पचवायचे याचे अप्रत्यक्षपणे धडे मिळत असत. पूर्वी दररोज मुलांकडून शुभंकरोती, रामरक्षा, मनाचे श्लोक म्हणून घेतली जायचे. आजी-आजोबा संध्याकाळी रामायण महाभारतातील संस्कारक्षम गोष्टी सांगायचे. पूर्वीच्या परीक्षा पाठांतर क्षमतेवर नव्हे तर सुसंस्कृतपणा, नेतृत्वगुण, निर्णय क्षमता, वैचारिक प्रगल्भता तसेच नाविन्यपूर्णता या गोष्टींवर आधारलेली असत. हे सारं केव्हाच इतिहासजमा झालंय. असं असेल तर या पिढीस हा प्रश्न विचारायचा आपल्याला हक्क आहे का ?

हल्ली बहुतांश पालक भौतिक सुखासाठी आसुसलेले दिसत असतात. त्यामुळे संपत्ती तसेच ऐषोरामाची साधन जमवण्यात त्यांना आयुष्य पुरत नाही.  आपोआप यामुळे नातेसंबंधांना तिलांजली वाहिली जाते. यांत्रिक आयुष्य जगत असताना माणसाकडून माणुसकी कधी हरवली हेच कळत नाही. या पार्श्वभूमीवर त्याच्यातून संस्कारक्षम पिढी घडत नाही किंबहुना यासाठी त्याच्याकडे वेळच नसतो मुळी ! पण त्यांची अपेक्षा अशी असते की त्यांनी स्वतःहुन सुसंस्कृत व्हावे. त्याचप्रमाणे आपल्या मुलाने आयुष्यात काय व्हावे ? काय शिकावे ? कसे वागावे ? कोणाशी लग्न करावे ? हे सगळं पालक ठरवतात. मुलाचा कल तसेच कौशल्य कशाकडे आहे याचा थोडा तरी विचार झाला तरी भरकटत चाललेली पिढी काही अंशी जागेवर येईल.

आपली समाजव्यवस्था देखील मुलांच्या या अवस्थेस काहीअंशी जबाबदार आहे असे मला वाटते. आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे ? कुठे जातो यावर बारकाईने लक्ष ठेवणं ही पालकांची जबाबदारी आहे. पालक त्यांच्या दिनचर्येत इतके व्यस्त असतात की त्यांच्याकडे श्वास घेण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. काहीठिकाणी आपल्या स्वभाव तसेच चारित्र्यामुळे पालकांनी मुलांवरील धाक गमावलेला असतो. यामुळे मुलं दुर्जनांच्या संगतीत संस्कार धाब्यावर ठेवत व्यसनाच्या आहारी जाऊन जंक फूड खात आरोग्य बिघडवत आहेत. त्यांना कशाची फिकीर राहत नाही. 'बेटा तू जी ले अपनी जिंदगी' असं म्हणतं हेचं आनंदी जीवन आहे अशा भ्रमात रहात आयुष्य जगत असतात. हल्ली सिनेमाचं प्रारूप पूर्ण बदललं असलं तरी त्यामध्ये स्त्रीदेहाचे बीभत्स, अश्लील तसेच विकृत चित्रण दाखवण्यावर निर्मात्यांचा घाट असतो. व्यावसायिकता नैतिक मूल्ये ढासळवते. यामुळे मुलांच्या लैंगिक भावना चाळवल्या जातात. मुलं त्या क्षणिक सुखाच्या आकर्षणामुळे वाईट वळणाला लागतात. टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या मालिका तरी कुठे समाजप्रबोधन तसेच शिक्षणाचे माध्यम बनत आहेत ? बहुतांशी मालिका घरगुती कलह यावर आधारित असतात. हे तरुणांना भांडणाचे वेगवेगळे मार्ग शोधण्यास प्रवृत्त करते. हल्ली मुलांमध्ये बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड नसणं म्हणजे कमीपणाचं मानलं जातं. हे नात खऱ्या मैत्रीचं नसतंच मुळी. यामध्ये लैंगिक आकर्षण आणि तरुणाईचा बेधुंदपणा हेच केंद्रभूत असतं. त्या समाधानी क्षणांचा आनंद घेण्यासाठी लग्न वेळ हा खूप उशीर होईल असे त्यांना वाटते. यामध्ये मुलं बंधनात राहात नाहीत, आळशी बनतात आणि त्यांना विलासी स्वप्न पडायला लागतात. या स्वप्नपूर्तीसाठी ते वाममार्गाकडे वळायला लागतात.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मध्ये थोरामोठ्यांच्या कडून संस्कार आणि धाकामुळे एकूणच कुटुंबाची चाकोरीबद्ध पद्धतीने वाटचाल असायची. दुर्वर्तन करायला धाडस होत नसे आणि झालेच तर शिक्षा मोठीच मिळे. आता विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये पालकांनी संपत्ती कमावत असताना आपला वेळ विकला आहे. त्यामुळे मुलांसाठी वारेमाप पैसा खर्च करून त्यांना खुश करण्यासाठी त्यांना मागेल ती वस्तू पुरविण्यावर त्यांचा भर असतो. पण या वेळेस ते हे विसरतात की पैसे देऊन कर्तव्य संपत नाही. मग प्रश्न उरतो मुलांवर संस्कार कोणी करायचे ?

गरिबीत किमान आवश्यक गोष्टींची वानवा असते. हवीहवीशी गोष्ट मिळत नाही. गरजेच्या गोष्टींचा त्याग केलेला असतो. पुढे उदर निर्वाहासाठी लहानपणीच रोजंदारी करून कमावण्याची पाळी येते. मुलाची कमाई घरच्यांसाठी कौतुकाची बाब होते. कुटुंब चालवू लागल्यावर त्याच्या कमाईचा हिशोब कोण विचारणार ? आलेला पैसा कसा उडवायचा हेच तेवढे डोक्यात.. गरजेच्या गोष्टी मिळाल्यावर उरलेले पैसे हौस-मौज करण्यात घालवायची सवय त्यास व्यसनाधीनतेत लोटते. तात्पुरती झालेली पैशांची सोय कायमस्वरूपी त्याचे चरित्र मात्र कलंकित करते. पैशांची उणीव आणि उपलब्धता हाताळण्यास अपयश आल्याने काहींनी यामध्ये आपले आयुष्य गमावलेलं आहे.
 
काहीजण जीवनातील चढ-उतारास समर्थपणे तोंड देऊ शकत नाहीत आणि स्वतःला तणावाच्या खोल दरीत लोटून देतात. घरची निकड तसेच अभ्यासात कमजोर असल्याने पालकांकडून कोवळ्या वयात कष्टाची कामे करण्याची सक्ती तसेच सततचा छळ यामुळे देखील काही मुलं व्यसनाधीनतेत जगण्याचा स्वतःचा मार्ग शोधतात आणि विक्षिप्तपणे व्यवहार करतात.

बऱ्याच वेळा लहान वयात जास्त पैसे हातात आले की मुलं हुरळून जातात. सुरुवातीला चैनीच्या गोष्टी घेण्यात ते पैसे खर्च करतात. जोपर्यंत पैशाचे महत्त्व समजत नाही तोपर्यंत पैसे कमावणे पेक्षा गमावण्यात जास्त मजा येते. मग पुढे पैसा कुठे खर्च करावा ते कळत नाही आणि मार्ग सापडतो तो नशेचा.. पैसे कमावण्यासाठी किती धडपड करावी लागते हे स्वतः पैसे कमवायला लागल्याशिवाय समजत नाही. व्यसनाधीनता रावाचा रंक बनवते आणि कंगाल आयुष्य जगावे लागते. म्हणून पालकांनी मुलांना आर्थिक साक्षर बनवायला हवं.

घरातील कौटुंबिक वातावरण जर अस्थिर असेल तर ते देखील मुलांचे वर्तन बिघडायला कारणीभूत असते. मुलांना समजून घेतलं नाही, दुर्लक्ष केलं, मारहाण करून अत्याचार केल्याने मुलं घाबरून जातात.  तसेच आई-वडिलांमध्ये कायम मतभेद, भांडणं होत असतील तर मुलांना कळत नाही या परिस्थितीत काय करायचे ?  चिमुरडी बिथरतात, घाबरतात. भांडू नका आम्हाला त्रास होतो आहे हे देखील ते पालकांना सांगू शकत नाहीत. गुमान सहन करण्यापलीकडे त्यांच्या हातात काही नसतं. मग स्वतःला शांत करण्यासाठी ते व्यसनाधिनता व मैत्री चा आधार घेतात. मैत्रीमध्ये त्यांच ऐकणार, त्यांच्या हक्काचं त्यांना कोणीतरी मिळत. यांत मनाची विकृतावस्था यायला वेळ लागत नाही. आणि आम्ही म्हणतो मुले बिघडली.

डिजिटल मीडियावरील वेब सिरीज आणि कन्टेन्ट सर्वांसाठी सहज उपलब्ध आहे. तरुणांचे मन अजूनही विकसित अवस्थेत असल्याने, ती जे काही पाहतात त्यावर विश्वास ठेवतात. मुले जेव्हा हिंसा, कठोर भाषा आणि लैंगिक संबंधांशी संबंधित सिरीज पाहतात तेव्हा त्यांच्यामध्ये द्विधा मन:स्थिती उत्पन्न होते आणि त्याचा शेवट दुःस्वप्न, अनियमित झोप, डोळ्यांवर परिणाम, नैराश्य आणि एकाकीपणा मधे होताना दिसतो. बेबीसिरीज चे दुष्परिणाम लक्षात घेऊन तरुणांनी ते पाहणं योग्य नाहीच पण पालकांनी त्यांना पाहू देणं हे देखील चुकीचे आहे. हल्ली मोबाईलवर लेक्चर्स तसेच अभ्यासाच्या नावाखाली ही बुदधीमान मुलं काय काय उद्योग करतायेत हे आपणास माहीतही नसतं.

साहजिकच आपण सर्वजण आपल्या आयुष्यातील अशा नाजूक वळणातून गेलो आहोत. आपल्या काळात आपल्या वाटचालीवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा होती. आपणास ही यंत्रणा सुरू करून पुन्हा सक्रिय करण्याची गरज आहे. ही सर्व निष्पाप मुले आहेत. भविष्यात त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होणार आहेच, परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. ते म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असे होईल. मग त्यांच्या पालकांचा काय उपयोग? क्षणभर, त्यांच्या बिघडण्याचे कारण बनण्यापेक्षा त्यांच्या रागाचे कारण बनणे कधीही चांगले.

तरुणांमध्ये खूप ताकद असते. नाविन्यपूर्णता त्यांच्या नसानसांत भरलेली असते. मुलं ही चिखलाच्या गोळ्यासारखी असतात. त्यांना चांगल्या शिल्पात रुपांतरीत करणं हे पालक आणि समाजाच्या हातात असतं. त्यांना अधिक सजक होण्यासाठी प्रेरित केले तर त्यांच्या क्षमतांचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी होईल. प्रत्येकाने प्रथम जीवनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि या नव्या पिढीला समजावून सांगितला पाहिजे. अप्रत्यक्षपणे आपण मुलांच्या मनात अध्यात्माची मुळे रोवली पाहिजेत. आपण त्यांना सुरुवातीपासूनच संतुलित जीवन जगण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. कुणीतरी सांगितलंय - "सगळंच उलटं करून ठेवलय आपण !  आयुष्याच्या सुरुवातीला पाश्चिमात्य देशांनी दिलेले ज्ञान घेणे आणि वृद्धापकाळात आपल्याच ऋषींनी शोध लावलेल्या अध्यात्माच्या चरणी जाणे ! खरंच खूप उशीर करत आहोत आपण."

डॉ. केशव राजपुरे

15 comments:

  1. उत्तम लेख आहे. मुलांना मोबाईल पासून लांब ठेवून मैदानी खेळ करण्यासाठी प्रयत्न केले जावेत

    ReplyDelete
  2. उत्तम मार्गदर्शन सर

    ReplyDelete
  3. खुप छान लेख सर

    ReplyDelete
  4. सर छान उपदेश पालकांसाठी

    ReplyDelete
  5. सर्वस्पर्शी व चिंतनशील विषय
    खूप छान प्रकारे आपण सर्वांसमोर मांडला आहे. खरेतर मनुष्य जीवनामध्ये पालक होणे जेवढे आनंदाचे त्याहूनही पालकत्व निभावणे फार कठिण. स्वतःच्या मुलांना संस्कारक्षम बनविणे त्यांना उत्तम नागरिक करणे खूप आव्हानात्मक गोष्ट आहे. आई वडील आणि मुलांचे मैत्रीचे नाते असणे फार गरजेचे पण त्यावेळी ही मुलांना आई वडिलांविषयी आदरयुक्त भीती असणेही गरजेचे.पालकांनी मुलांना समजून घेणे आवश्यक. आजची परिस्थिती आणि आपल्या वेळची परिस्थिती यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तेव्हा आजची परिस्थिती लक्षात घेऊन मुलांना समजून घेणे आवश्यक. पण आंधळा विश्वासही नसावा. मुलांचे मित्र,त्याची आवड,त्याची बौद्धिक, शारीरिक क्षमता जाणून घेणे गरजेचे. त्यानुसार मुलांचे मार्गदर्शक होणे, त्यांना आधार देणे गरजेचे.प्रसंगी धाक दाखवून चांगले वाईट याची जणीव ही करून दिली पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे मुलांना वेळ देणे त्यांच्या शी संवाद साधणे महत्त्वाचे. आजच्या चंगळवादी संस्कृतीमध्ये फक्त मुलांना ऐषोआराम देणे,लाड पुरविणे,वाट्टेल तेवढे पैसे देणे,पाहिजे तशी मोकळीक देणे म्हणजे उत्तम पालकत्व ठरत नाही.मुळात पालकांना समजले पाहिजे की आपण पालक आहोत ती भूमिका आपणास उत्तम प्रकारे निभावणे गरजेचे आहे. आजकाल पालकांना हेच समजेनासे झाले आहे अशी वेगवेगळी उदाहरणे पहायला मिळतात.
    आपण या लेखाद्वारे पालकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे.

    ReplyDelete
  6. खूप छान लेख आहे

    ReplyDelete
  7. लेख हा वस्तुस्थितीशी पुर्ण जुळणारा आहे ..... विचार करण्यासारखा आहे.

    ReplyDelete
  8. खूप च छान सर, मुले हि खरच पालकांचा आरसा होय, आणि पुढे जाऊन समाज मनाचा आरसा होय ,त्यामुळे पालकांनी खरच यावरती विचार करून आपली जबाबदारी पार पाडावी. त्यामुळे जसे आपण वागू तशीच आपली मुले वागणार हे ध्यानात ठेऊन आधी पालकांनी आपले वागणे ठेवावे👍👍

    ReplyDelete