Thursday, January 13, 2022

आनंदाचा डोह



माणूस गप्प गप्प आणि अलिप्त का होतोय ?

आयुष्यामध्ये प्रत्येकाला शांती समाधान हवे असते कारण त्यांच्या जीवनात त्याची वानवा असते. आयुष्यामध्ये भय, क्रोध, ईर्षा, द्वेष आणि इतर बऱ्याच गोष्टींमुळे मनाची विकृतावस्था येते आणि आपण दुःखी होतो. हे दुःख स्वतः पुरते मर्यादित न राहता इतरांमध्ये पसरवले जाते आणि सर्व वातावरण अशांत होत असते.

तसं बघितलं तर मनाच्या ओझ्याखाली दबला नसल्यास प्रत्येकजण नैसर्गिकरीत्या व्यक्त होतो, नातेसंबंध जपतो आणि प्रेमभाव सुदृढ करतो. पण हल्ली असे दिसून येते की माणूस समाजापासून अलिप्त, संपर्क वलयापासून दूर आणि काहीसा गप्प झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आपणाला आजूबाजूला सहचार, बंधुभाव, एकता यांचा अभाव दिसत आहे.

हि पिढी जुन्या आणि नव्या पिढीच्या काळाच्या उंबरठ्यावर असल्याने तिने दोन्ही पिढ्या जवळून अनुभवलेल्या आहेत. जुने दिवस आठवून, 'हे असे का होते?' असा प्रश्न केल्यानंतर, परिस्थितीचे खालील विश्लेषण निदर्शनास येते. हे माझे निरीक्षण आणि अनुभव आहेत. आपली मते भिन्न असू शकतात. कारण समज ही व्यक्तीसापेक्ष असते.

जुन्या काळी जेव्हा ऐशोरामाच्या गोष्टी दुर्मिळ होत्या तेव्हा माणूस कमीत कमी गरजासह आनंदी जीवन जगत असे. तसेच दळणवळण व संपर्क साधणे इतकी विकसत नसल्याने माणसाच्या जगाविषयीच्या माहितीच्या कक्षा लहान होत्या. तेव्हा बऱ्याच गोष्टी मला माहीत नाहीत तसेच बऱ्याच गोष्टींचा आनंद घेणे बाकी आहे या समजापाई तो स्वतःला अपूर्ण समजत असे. म्हणतात ना अज्ञानात सुख असते. अशा परिस्थितीत तो आतून अशांत, अहंकारी किंवा गर्विष्ट कसा बरं असेल ?

या परिस्थितीत त्याचा व्यवहार आपल्या स्वतःच्या मर्यादा ओळखून होत असे. एकूणच त्यांचा स्वभाव काळजीवाहू, मानवतेचा, सामाजिक आणि प्रेमळ होता. त्यामुळे तो प्रतिक्रिया देण्यास आणि व्यक्त होण्यास आणि नातेसंबंध जपण्यास कचरत नव्हता. इतरांशी भाईचाराने राहत आणि स्नेह वृद्धिंगत करत आनंदीपणे जगत असे. शुद्ध चित्त ठेवून प्रेमाचे अदान-प्रदान होईल अशा परिस्थितीत तो दुसऱ्यांच्या दुखाप्रती अधिक संवेदनशील रहात स्वतः एक संतुलित आयुष्य जगत असे.

यथावकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रचंड विकासामुळे त्याच्या विश्वाच्या आकलनाच्या कक्षा रुंदावल्या. वैज्ञानिक प्रगतीमुळे विलासी वस्तू सर्वसामान्यांना परवडणार्‍या बनल्या. कालांतराने आधुनिकीकरण व जागतिकीकरणाच्या नावाखाली रोजगाऱ्यांचे पगार भरमसाठ वाढले आणि बहुतेकाकडे आवश्यकतेपेक्षा जास्त पैसा आला. चलन, ज्यावर हे जग चालते, ही अशी गोष्ट आहे की ती जर गरजेपेक्षा जास्त प्रमाणात आली तर माणूस भांबावून जातो.  माणसं चलन वृद्धिंगत करणाऱ्या व्यवसाया ऐवजी स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करू लागले.

संपत्तीच्या प्रतिष्ठेचा माणसास अहंकार कधी जडतो हे त्याचे त्याला देखील समजत नाही. लहानपणी न मिळालेल्या गोष्टी उत्तरार्धात मिळाल्या तर माणसास त्याचे फार महत्व असते. या सर्व प्रकारात तो स्वतःला श्रीमंत समजू लागतो आणि इतरांशी तुलना करू लागतो. आपल्याकडे दुर्लक्ष तसेच आपली स्तुती होत नाही हे लक्षात आल्यानंतर मग माणूस अहंकारी होऊन अस्वस्थ होऊ लागतो. हाच अहंकार पुढे जाऊन द्वेष, ईर्षा तसेच क्रोध निर्माण करतो. हेच ते कारण आहे ज्याने माणूस आयुष्यात सुख शांती हरवून दुःखी होतो. आणि हे जर बराच काळ होत राहिले तर त्याचा परिणाम म्हणून माणूस मनाच्या विकृत अवस्थेत पोचायला वेळ लागत नाही.

मनाच्या विकृतावस्थेची इतरही कारण आहेत. उदाहरणार्थ शिक्षित असूनही पद आणि नोकरीवर संतुष्ट नसल्याने दुःख, विवंचना आणि काळजीने माणूस त्रस्त होतो. उदरनिर्वाह, कुटुंब चालवण्याचं ओझ व अस्तित्वासाठीची लढाई कायम नशिबी आली तर माणूस निराश आणि पर्यायाने कमजोर बनतो. बदललेली जीवनशैली, तुटपुंजी मिळकत आणि कौटुंबिक गरजा भागवत असताना करावी लागणारी कसरत या सगळ्याला वैतागून मग माणूस परिस्थितीस अंध प्रतिक्रिया द्यायला लागतो आणि मनाच्या प्रचंड ओझ्याखाली स्वतःस ढकलून देतो.

गैरसमज ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होते आणि अपेक्षांभंगामुळे नैसर्गिकरित्या मनाची अस्वस्थता निर्माण होते. प्रत्येक नात्यात वेळोवेळी गैरसमज निर्माण होत असले तरी काही नाती अशी असतात की त्यांची दुरवस्था होते. गैरसमज होतो जेव्हा लोकांच्या धारणा एकमेकांना  भिडतात. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बरोबर असतो या अध्यात्माच्या मूल तत्त्वावर तो विश्वास ठेवत नाही आणि स्वतःला ताणतणावाच्या खाईत लोटून देतो. नाती अत्यंत नाजुक असतात. नाती सांभाळून ठेवण्याची गरज असते कारण लहान-लहान चुकांमुळे दुरावा निर्माण होतो. अधिकाराने रागावले तरी नाती तुटतात. याचा परिणाम स्वरूप माणूस आपले स्वास्थ हरवून बसतो. कारण तो पूर्वग्रहदूषितपणे अर्थ काढत नेहमी या गढूळ झालेल्या नात्याविषयी विचार करत असतो.

पद, प्रतिष्ठा, आदर माणसास कल्पनाशक्तीच्या तुलनेने वरच्या आभासी पातळीवर घेऊन जातो. स्तुती केल्यामुळे लोक आभासी आनंदात जातात. जिथे ते नेहमीच प्रत्येकाकडून कौतुक आणि सन्मानाची अपेक्षा करू लागतात. पण असे न झाल्यास अहंकार दुखावातो मग ईर्षा, अबोला, वाद आणि नात्यात तणाव वाढू लागतो.

सततच्या कामाच्या अधिक तणावाने निर्माण झालेल्या विचलिततेमुळे, ई-मेल्स, न्यूज, सोशल मीडिया आणि चॅटसच्या ट्रिगर मुळे तसेच कोरोना सारखे आजार माणसांमध्ये निद्रानाश तसेच चिंता विकार सामान्यपणे आढळून येतो. निद्रानाशामुळे आरोग्याच्या अनेक भयावह समस्या उद्भवतात की ज्यायोगे मनात तीव्र ताण निर्माण होतो. पुढे जाऊन हा ताण मनाच्या विकृत अवस्थेकडे जातो आणि माणूस अस्थिर होतो.

माणसाला आयुष्यात मार्गक्रमण करताना थोरामोठ्यांचे मार्गदर्शन, साथ आणि आशीर्वाद लाखमोलाचे असतात. जुन्या पिढीला याचे महत्त्व माहीत आहे. हे आशीर्वाद आपणा सभोवती नेहमीच उत्साही आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि हे यशस्वीतेसाठी उपयोगी असतात. अलीकडे ही परंपरा औपचारिक झाल्याचे दिसते कारण नवीन पिढी हे करणे म्हणजे कमीपणाचे समजते. पण हल्ली या गरजेच्या ऊर्जा तसेच आशीर्वादाच्या कमतरतेमुळे यश माणसांच्या पासून दूर जात आहे असे दिसते. सततच्या अपयशामुळे माणूस निरुत्साही होतो आणि त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होतो.

अशा पार्श्वभूमीवर माणूस नैसर्गिकरीत्या व्यक्त होणार नाही. हेच कारण असावं कदाचित माणूस सामाजिकदृष्ट्या अलिप्त आणि गप्प गप्प झालेला दिसतो. पण ही त्याची शांतता एखाद्या सुप्त ज्वालामुखी सारखी असू शकते. त्याचा कधी उद्रेक होईल ते सांगणे अवघड.. पण आजाराचे योग्य निदान झाले तरच इलाज योग्य करता येईल.

आज कोरोनाने माणसाच्या प्रगतीच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. अनिश्चिततेच्या जीवन गंगेत जगायचं कसं हे शिकवलं असताना अध्यात्माची कास धरून मानव जन्माचा अर्थ समजून घेतला पाहिजे. मुळात मानव जन्म हाच संचित कर्माचे प्रतीक असताना या जन्मात विनय, आदर तसेच मानवतेने वागायचे सोडून वास्तवतेशी फाटा घालत माणूस आभासी दुनियेत का जगत आहे हे आकलनाच्या पलीकडे आहे.

विकारात मन विवेकबुद्धी घालवून बसते. श्वास लय सोडून देतो. शरीरात जैवरासायनिक क्रिया संवेदना उत्पन्न करतात. हे झालेले बदल आपल्या लक्षात येत नाहीत. मग काय करावं ? अशा वेळी आत्मनिरीक्षण करत शरीराच्या सत्यत्तेचा आंतरिक अनुभव घ्यायला शिकायला पाहिजे. याने चित्त शुद्ध होईल आणि मग बघा हा गप्प गप्प झालेला माणूस पुन्हा कसा माणसात जाऊन माणसाशी माणसा सम वागेल. मनावरील सर्व ओझे झुगारून मनसोक्तपणे व्यक्त होईल आणि आनंदाच्या डोहात डुंबून जाईल.

- डॉ केशव राजपुरे


16 comments:

  1. मर्मभेदी निरीक्षण सर. मनुष्यास आयुष्य अगदी थोड्या वेळेसाठी मिळाले आहे आणि या वेळेत आयुष्य नक्की कशासाठी आहे तसेच आयुष्याची महत्तम गरज काय, अश्या अनेक प्रश्नांवर मनुष्याने चिंतन करणे गरजेचे आहे. यातूनच मनुष्य दुःख आणि तणावातून मुक्त होईल आणि आनंदमय आयुष्य जगेल असे वाटते.

    ReplyDelete
  2. आनंदाचा डोह
    मनुष्य जीवनाचा सार
    खूपच अर्थपूर्ण लेखन

    ReplyDelete
  3. खुपच छान विवेचन केलंय सद्यपरिस्थितीत जीवन कंठत असणा-या मानवी मनाचं.खरोखरच करोना म्हणजे उन्मत्त झालेल्या मानवी मनाला निसर्गाची संसणीत चपराक आहे.
    खरोखरच छान लिहिले आहे.शैवटचा प्यराग्राफ लय भारी...

    ReplyDelete
  4. हॅल्लो सर, सध्य परिस्थिती त अत्यंत गरजेचं असा लेख , कोव्हिड च्या काळात खरं तर सगळ्यांचीच मति गुंग होऊन गेली आहे, आणि त्यामुळे नेमके काय आणि कसे वागावे, करावे हे समजेनासे झालेय,हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे . त्यामुळे हा लेख म्हणजे त्यावरच्या अभ्यासातून काढलेले उत्तर आहे👍👍👍👍

    ReplyDelete
  5. अगदी सहज रित्या तुम्ही दोन्ही पिढ्या मधील तुमचे निरीक्षण आणि त्यात विचारांची सांगड घालत परिस्थिती स्पष्ट केली आहे.... ही सत्य स्थिती आहे की विज्ञानाने जग जरी जवळ आल्याचे भासत असले तरी या सगळ्यात तो जीवाला जीव देणारा माणूस कुठेतरी हरवत चालला आहे...
    👌🙏...

    ReplyDelete
  6. खुप छान लेख अध्यात्माची जाणिव करुन देणारा

    ReplyDelete
  7. आपण ज्या पद्धतीने विचार मांडलेले आहेत ते खरोखर विचार करण्यासारखे आहे🙏🙏

    आणि प्रत्येकाने बिन्धास जगले पाहिजे❤️

    ReplyDelete
  8. लेख वाचला. खूप आवडला. मानवी स्वभावाचे एवढे बारीक निरीक्षण मी तरी पाहिलेले नाही. आपल्या प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीतच आम्हाला आनंद आहे.-
    प्रा. चंद्रकांत भोसले.

    ReplyDelete
  9. डॉ. मानसिंग टाकळेNovember 30, 2023 at 2:35 PM

    मानवी अंतःकरणाचे अंतरंग उलघडणारे सुंदर विवेचन.

    ReplyDelete