Saturday, January 29, 2022

जॉन बार्डीन



जॉन बार्डीन : "पुन्हा येईन" म्हणालेला शास्त्रज्ञ
(भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोनदा मिळालेले ते एकमेव शास्त्रज्ञ: प्रथम १९५६ मध्ये ट्रान्झिस्टरच्या शोधासाठी; आणि पुन्हा १९७२ मध्ये बीसीएस या सुपरकंडक्टिव्हिटीच्या मूलभूत सिद्धांतासाठी. ३० जानेवारीला त्यांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने त्यांच्याबद्दल...)

जॉन बार्डीन हे नाव खूप कमी लोकांनी ऐकलं असेल, पण आज जगात जी तंत्रज्ञानाची क्रांती घडली आहे त्यात या शास्त्रज्ञाचं खूप मोठं योगदान आहे. विज्ञानातील सर्वोच्च समजला जाणारा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्यांच्या यादीत विज्ञानाला नवं वळण देणाऱ्या अनेक महान शास्त्रज्ञांची नावे आहेत. आयुष्यात एकदा नोबेल मिळवणं तर सोडाच पण ते मिळवण्याचं स्वप्न पाहण्यासाठी देखील मोठं धाडस लागतं. असा हा पुरस्कार जॉन बार्डीन यांनी एकाच विषयात दोनदा मिळवला होता. हा चमत्कार केवळ प्रतिभावंतांसाठीच शक्य आहे.

शिक्षकी परंपरा लाभलेल्या बार्डीन कुटुंबात २३ मे १९०८ ला अमेरिकेतील मॅडीसन येथे जॉन यांचा जन्म झाला. १९२८ मध्ये इलेक्ट्रिकल अभियंत्रिकीत मास्टर ऑफ सायन्स पदवी मिळवून ते गल्फ ऑइल कार्पोरेशनमध्ये नोकरीस लागले. पण भौतिकशास्त्राच्या आवडीपायी चार वर्षांनी त्यांची पाऊले पुन्हा कॉलेजकडे वळली. १९३३ मध्ये प्रिन्सटन विद्यापीठात त्यांनी भौतिकशास्त्र व गणित या विषयांसाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांनी प्रा. विग्नर यांच्या मार्गदर्शनाखाली सॉलिड स्टेट फिजिक्स अर्थात घनभौतिकशास्त्र विषयात संशोधन सुरू केले. त्यांचा संशोधन प्रबंध पूर्ण होण्याअगोदरच १९३५ मध्ये त्यांना हार्वर्ड विद्यापीठाची फेलोशिप मिळाली. तेथे त्यांनी तीन वर्षे धातुतील विद्युतप्रवाहावर संशोधन केले, हे कार्य चालू असतानाच संशोधन प्रबंध पूर्ण करून १९३६ मध्ये प्रिन्सटन विद्यापीठाकडून भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. दुसऱ्या महायुद्ध काळात त्यांनी शस्त्रनिर्मितीत संशोधन केले, या काळात त्यांच्या वैयक्तिक संशोधनास वाव मिळाला नाही, पण पुढे १९४५ मध्ये त्यांनी बेल लॅबोरेटरीज या जगप्रसिद्ध प्रयोगशाळेत काम चालू केले. तेथे त्यांनी १९४५ मध्ये विलियम शॉकले व वाल्टर ब्राटीन यांच्यासोबत ट्रांजिस्टरचा शोध लावला.

 
(Courtesy: wikimedia.org)

विज्ञानाला श्रेयवादाचा काळा इतिहास आहे, तो तिथेही उफाळून आला. त्यांचे सहकारी शॉकले ट्रांजिस्टरच्या शोधाचे श्रेय सार्वजनिकरित्या घेऊ लागले. त्यामुळे त्यांच्यात कटुता आली. याच कारणास्तव त्यांनी बेल लॅबला रामराम ठोकला आणि इलिनोएस विद्यापीठात इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी व भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी सुपरकंडक्टर म्हणजे शून्य रोध असलेल्या विद्युत सुवाहकांवर संशोधन केले.

१९५६ साली नोबेल समितीने ट्रांजिस्टरसंबंधित संशोधनाला पुरस्कृत करण्याचे निश्चित केले. पुरस्कारासाठी जुन्या सहकाऱ्यांसोबत त्यांचे नाव जाहीर झाले. नोबेलमुळे ते कटुता विसरून पुन्हा एका मंचावर आले. विज्ञान वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, हेवेदावे व कटूतेच्या पलीकडे असते हे तेव्हा पुन्हा सिद्ध झाले. विशेष म्हणजे त्यांना हा पुरस्कार त्यांचे पीएचडीचे मार्गदर्शक प्रा. विग्नर यांच्या आधी मिळाला. 

त्यावर्षीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यातील एक मजेशीर किस्सा सांगितला जातो. बर्डीन यांनी १९३८ मध्ये जेन मॅक्सवेलशी लग्न केले. त्यांना जेम्स मॅक्सवेल, विल्यम ऍलन आणि एलिझाबेथ ऍन अशी तीन मुले होती. पुरस्कार स्वीकारण्यासाठी बार्डीन त्यांच्या एकाच मुलाला सोबत घेऊन गेले होते. याबाबत स्वीडनच्या राजाने त्यांची थोडी चेष्टा केली. त्यावर 'पुढच्यावेळी पुरस्कार घेण्यासाठी तिघांनाही सोबत आणतो' असं म्हणून राजाची फिरकी घेतली. बार्डीन यांनी तेव्हा विनोदाने टोमण्यास उत्तर दिले असले तरी ते दुसऱ्यांदा नोबेल पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंचावर येतील असा विचार कोणीही केला नसेल.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बार्डीन यांना ट्रान्झिस्टर चा शोध नोबेल पुरस्कारास पात्र ठरेल याची खात्री नव्हती. त्यांच्या मते ट्रान्झिस्टर चे तांत्रिक महत्त्व खूप होते आणि त्याच्या मागील विज्ञान मनोरंजक होते. विशेष म्हणजे त्यांनी ट्रान्झिस्टर चा एक मोठी वैज्ञानिक झेप म्हणून नाही तर एक उपयुक्त गॅझेट म्हणून विचार केला.

आज आपण ट्रान्झिस्टरशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही. या उपकरणाने विसाव्या शतकाच्या अखेरीस समाजाचा कायापालट केला. मायक्रोचिपचा मूलभूत घटक म्हणून, तो आधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा "मज्जातंतू" बनला आहे. पर्सनल कॉम्प्युटर, सेल्युलर टेलिफोन, ऑटोमॅटिक टेलर मशीन्स, मायक्रोवेव्ह ओव्हन ते फॅसिमाईल मशीन्स आणि सॅटेलाइट्स यांसारख्या असंख्य उपकरणांना आम्ही गृहीत धरतो जे शतकापूर्वी विज्ञानकथांमध्ये काल्पनिक गोष्टी असत. दररोज, कोट्यवधी ट्रान्झिस्टर औद्योगिक जगात जवळजवळ प्रत्येकाच्या जीवनात कार्यरत असतात.

नोबेल मिळवला म्हणजे खूप काही मिळवलं म्हणून ते गप्प बसले नाहीत. राजाला दिलेलं उत्तर कदाचित त्यांनी खूपच मनावर घेतलं होतं. पुढच्याच वर्षी त्यांनी कूपर व श्रीफर या सहकाऱ्यांसोबत सुपरकंडक्टीविटीचा सिद्धांत मांडला. त्यांच्या संशोधनामुळे नवतंत्रज्ञानाची अनेक कवाडं उघडली गेली. त्यामुळं राजाला दिलेला "पुन्हा येईन"चा शब्द सत्यात उतरण्याची चाहूल लागली होती. १५ वर्षानंतर १९७२ साली त्यांना पुन्हा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी त्यांची तिन्ही मुले आवर्जून उपस्थित होती.

ट्रांजिस्टरच्या वेळी त्यांना श्रेयवादाची झळ लागली होती. पण सुपरकंडक्टीविटीवेळी त्यांनी तशी परिस्थिति येऊ दिली नाही. त्यांना स्वतःचं नाव पुढं रेटायची संधी होती पण त्यांनी नैतिकता पाळली. त्यांचा सुपरकंडक्टीविटीचा सिद्धांत तिन्ही संशोधकांच्या नावे बीसीएस थिअरी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी १९७२ चा सुपरकंडक्टीविटीसाठीचा पुरस्कारही दोन्ही सहकाऱ्यांसोबत संयुक्तपणे स्वीकारला.

(From https://i.ytimg.com/vi/zVktdonZvoU/hqdefault.jpg)

सुपरकंडक्टिव्हिटीचा बार्डीन-कूपर-श्रीफर (बीसीएस) सिद्धांत अनेक दृष्टीने  महत्त्वपूर्ण होता. अनेक प्रणाली, द्रव आणि घन पदार्थांचे सध्याचे पुंजभौतिकी चित्र तयार करण्यासाठी हा सिद्धांत एक अग्रगण्य पाऊल होते ज्यांचे वर्तन त्यांच्या इलेक्ट्रॉन आणि इतर सूक्ष्म घटकांमधील परस्परसंवादाद्वारे निर्धारित केले जाते. सिद्धांतामुळे आण्विक भौतिकशास्त्र, प्राथमिक-कण भौतिकशास्त्र आणि खगोलभौतिकी यांबद्दलची आमची समज देखील वाढली आहे.

दोन नोबेल मिळवूनही त्यांच्यातला संशोधक थांबला नव्हता. पुढे त्यांनी विद्युतधारेवर संशोधन केंद्रित केलं. सोनी या नामांकित इलेक्ट्रोनिक कंपनीला ट्रांजिस्टरच्या शोधामुळे मोठं व्यावसायिक यश मिळलं होतं त्यामुळे बार्डीन यांच्या निवृत्तीनंतर कंपनीने इलिनोइस विद्यापीठाला मोठी रक्कम दान देऊन जॉन बार्डीन प्रोफेसर चेअरची निर्मिती केली.

बार्डीन हे अत्यंत निगर्वी व्यक्तिमत्त्व होते. इलिनॉय युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास ४० वर्षे प्रोफेसर म्हणून काम करत असताना ते त्यांच्या मित्रांसाठी जेवण बनवत असत, ज्यापैकी अनेकांना विद्यापीठातील त्यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती नसायची. बार्डीनचा नैतिक मूल्ये आणि वर्तनाच्या संहितेवर विश्वास होता. ते धार्मिक नव्हते तथापि ते म्हणत "मला असे वाटते की जीवनाचा अर्थ आणि हेतू याविषयीच्या अंतिम प्रश्नांची उत्तरे विज्ञान देऊ शकत नाही."

बार्डीन यांना अलौकिक प्रतिभेची देण लाभलं होतं असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. ते इतर प्रतिभांपेक्षा कैक मार्गांनी वेगळे होते. ते स्वयं-प्रशिक्षित नव्हते. त्यांनी बराच काळ व्यावसायिक अभ्यासात व्यतीत केल्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्राच्या ज्ञानकोषात भर घातली. बार्डीन एकांतात काम करत नसत. त्यांच्या प्रश्नाची उत्तरे अचानक फ्लॅशमध्ये मिळाली नव्हती. आधुनिक भौतिकशास्त्रातील व्हॅन व्लेक, विग्नर, डिरॅक, ब्रिजमन आणि डिबाय सारख्या मोठ्या शास्त्रज्ञांकडून त्यांनी बरेच काही शिकले की जे पुढे नोबेल पारितोषिक विजेते बनले.

जॉन बार्डीन यांचे व्यक्तिचित्र सर्जनशील प्रतिभेच्या लोकप्रिय प्रतिमेपेक्षा बरेच वेगळे आहे, परंतु त्यांची वैशिष्ट्ये अलौकिक बुद्धिमत्तेच्या प्रतिभेसारखीच आहेत. त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये चिकाटी, प्रेरणा, उत्कटता, प्रतिभा, आत्मविश्वास, एकाग्रता आणि निर्णय क्षमता यांचा समावेश आहे. या सर्व वैशिष्ट्यांची लागवड केली जाऊ शकते - हे  बार्डीन यांची जीवनकथा स्पष्ट करते.

त्यांनी ३० जानेवारी १९९१ ला शेवटचा श्वास घेतला. पण त्यांचे संशोधन आपल्यासोबत नेहमीच राहील. कारण विजेवर चालणारी जवळजवळ सगळी उपकरणं ट्रांजिस्टरशिवाय अपूर्ण आहेत आणि आपण ह्या उपकरणांशिवाय अपूर्ण आहोत.

- डॉ. सूरज मडके व प्रा. डॉ. केशव राजपुरे

References
[1] True genius : the life and science of John Bardeen by Lillian Hoddeson and Vicki Daitch (Joseph Henry Press)

Sunday, January 16, 2022

पालकांची जबाबदारी; समाजाचा आरसा



पालकांची जबाबदारी

आजची तरुण पिढी खरोखर बिघडत आहे का ?  ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागत नसल्यास दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर 'हो' असेच असते. अख्खी पिढीच बिघडली नसली तरी याचा टक्कादेखील कमी नाही. प्रत्येकाला आपले अपत्य हुशार, कर्तबगार, उद्योगी, सदाचारी असावं असंच वाटतं.  किंबहुना प्रत्येक पालकाची तशी अपेक्षा असते ! परंतु ही अपेक्षा आपोआप पूर्ण होणार आहे का ? आपण त्याच्यात मानवी मूल्ये रुजवली पाहिजेत आणि त्यानुसार त्यास प्रशिक्षित केले पाहिजे. ते ज्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीमध्ये वाढत असते त्यावर जरी त्याचं वर्तन अवलंबून असलं तरी पालकांना यासाठी मुलांमध्ये संस्काराची गुंतवणूक करावी लागते.

धारणा व्यक्तीसापेक्ष असते त्यामुळे हे वर्तन काहींना योग्य तर काहींना अयोग्य का वाटू नये ? तरुण पिढीला याबाबत विचारलं तर त्यांचे उत्तर नकारार्थी असते.  उलट ते म्हणतात आम्ही बिघडलो नाही तर अधिक स्मार्ट झालो आहोत आणि याला जर तुम्ही बिघडणं म्हणत असाल तर खुशाल म्हणा. पुढे ते सांगतात की त्यांची पिढी प्रत्येक गोष्टीमध्ये अधिक सक्रिय असते, स्वावलंबी तसेच सक्षम आहे, करिअरला महत्त्व देते, आपल्या अस्तित्वासाठी स्पर्धा करत जाणीवेने नाव कमावण्याचा प्रयत्न करत असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या आपल्याला वाटत असलेल्या असभ्यतेचे कारण शोधले पाहिजे.

तसं बघितलं तर प्रत्येक जुनी पिढी येणाऱ्या नवीन पिढीवर हाच आरोप करत आलेली आहे की "तुमची पिढी बिघडत चालली आहे".  म्हणजे बिघडणं सापेक्ष आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे कि कालानुरूप जग बदलत आहे, विश्वाविषयीच्या आपल्या कल्पना बदलत आहेत, नवनवीन आव्हानांना सर्वांना तोंड द्यावे लागत आहे. जगण्यासाठी आपल्याला कालसुसंगत जीवन निवडावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक ठोकताळे तसेच नियम पाळायला पाहिजेत असं म्हणणं म्हणजे कालानुरूप स्वतःला न बदलून घेण्यासारखं आहे. या पिढीची जीवनशैली तुमच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. म्हणूनच ते वेगळं जीवन जगत आहेत असं आम्हाला वाटतं. याबद्दल कोणतीही तक्रार नसली तरी जर ते उपद्रवी, असंस्कृत होत त्यांचे आयुष्य बरबाद करत असतील तर समाजात त्यांचं जगणं खूप कठीण होईल.

काहींच्या मते - या सर्व गोष्टीस आपली सदोष शिक्षणपद्धती तसेच देशाची आर्थिक धोरणं कारणीभूत आहे. शिक्षण पद्धतीतील त्रुटी काढायच्या सोडून आपण याचा मुलांच्या असंस्कृतपणावर ठपका ठेवून देतो. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि गुगल हे या पिढीसाठी शिकण्याची संसाधने आहेत. मोबाईल इंटरनेट सारखी गॅजेट्स त्यांच्या हाती देऊन आम्ही त्यांच्यावरचे नियंत्रण आधीच सोडले आहे. हल्ली कम्प्युटर तसेच मोबाईलवर खेळले जाणारे आभासी खेळ-गेम्स पूर्वी मुलं मैदानावर खेळायची. त्यामुळे व्यायाम तर होतच असे परंतु बुद्धी तल्लख होत असे. खेळातील नियम काटेकोरपणे पालन तसेच बंधनं आयुष्यात कशी वापरायची, यश अपयश कसे पचवायचे याचे अप्रत्यक्षपणे धडे मिळत असत. पूर्वी दररोज मुलांकडून शुभंकरोती, रामरक्षा, मनाचे श्लोक म्हणून घेतली जायचे. आजी-आजोबा संध्याकाळी रामायण महाभारतातील संस्कारक्षम गोष्टी सांगायचे. पूर्वीच्या परीक्षा पाठांतर क्षमतेवर नव्हे तर सुसंस्कृतपणा, नेतृत्वगुण, निर्णय क्षमता, वैचारिक प्रगल्भता तसेच नाविन्यपूर्णता या गोष्टींवर आधारलेली असत. हे सारं केव्हाच इतिहासजमा झालंय. असं असेल तर या पिढीस हा प्रश्न विचारायचा आपल्याला हक्क आहे का ?

हल्ली बहुतांश पालक भौतिक सुखासाठी आसुसलेले दिसत असतात. त्यामुळे संपत्ती तसेच ऐषोरामाची साधन जमवण्यात त्यांना आयुष्य पुरत नाही.  आपोआप यामुळे नातेसंबंधांना तिलांजली वाहिली जाते. यांत्रिक आयुष्य जगत असताना माणसाकडून माणुसकी कधी हरवली हेच कळत नाही. या पार्श्वभूमीवर त्याच्यातून संस्कारक्षम पिढी घडत नाही किंबहुना यासाठी त्याच्याकडे वेळच नसतो मुळी ! पण त्यांची अपेक्षा अशी असते की त्यांनी स्वतःहुन सुसंस्कृत व्हावे. त्याचप्रमाणे आपल्या मुलाने आयुष्यात काय व्हावे ? काय शिकावे ? कसे वागावे ? कोणाशी लग्न करावे ? हे सगळं पालक ठरवतात. मुलाचा कल तसेच कौशल्य कशाकडे आहे याचा थोडा तरी विचार झाला तरी भरकटत चाललेली पिढी काही अंशी जागेवर येईल.

आपली समाजव्यवस्था देखील मुलांच्या या अवस्थेस काहीअंशी जबाबदार आहे असे मला वाटते. आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे ? कुठे जातो यावर बारकाईने लक्ष ठेवणं ही पालकांची जबाबदारी आहे. पालक त्यांच्या दिनचर्येत इतके व्यस्त असतात की त्यांच्याकडे श्वास घेण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. काहीठिकाणी आपल्या स्वभाव तसेच चारित्र्यामुळे पालकांनी मुलांवरील धाक गमावलेला असतो. यामुळे मुलं दुर्जनांच्या संगतीत संस्कार धाब्यावर ठेवत व्यसनाच्या आहारी जाऊन जंक फूड खात आरोग्य बिघडवत आहेत. त्यांना कशाची फिकीर राहत नाही. 'बेटा तू जी ले अपनी जिंदगी' असं म्हणतं हेचं आनंदी जीवन आहे अशा भ्रमात रहात आयुष्य जगत असतात. हल्ली सिनेमाचं प्रारूप पूर्ण बदललं असलं तरी त्यामध्ये स्त्रीदेहाचे बीभत्स, अश्लील तसेच विकृत चित्रण दाखवण्यावर निर्मात्यांचा घाट असतो. व्यावसायिकता नैतिक मूल्ये ढासळवते. यामुळे मुलांच्या लैंगिक भावना चाळवल्या जातात. मुलं त्या क्षणिक सुखाच्या आकर्षणामुळे वाईट वळणाला लागतात. टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या मालिका तरी कुठे समाजप्रबोधन तसेच शिक्षणाचे माध्यम बनत आहेत ? बहुतांशी मालिका घरगुती कलह यावर आधारित असतात. हे तरुणांना भांडणाचे वेगवेगळे मार्ग शोधण्यास प्रवृत्त करते. हल्ली मुलांमध्ये बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड नसणं म्हणजे कमीपणाचं मानलं जातं. हे नात खऱ्या मैत्रीचं नसतंच मुळी. यामध्ये लैंगिक आकर्षण आणि तरुणाईचा बेधुंदपणा हेच केंद्रभूत असतं. त्या समाधानी क्षणांचा आनंद घेण्यासाठी लग्न वेळ हा खूप उशीर होईल असे त्यांना वाटते. यामध्ये मुलं बंधनात राहात नाहीत, आळशी बनतात आणि त्यांना विलासी स्वप्न पडायला लागतात. या स्वप्नपूर्तीसाठी ते वाममार्गाकडे वळायला लागतात.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मध्ये थोरामोठ्यांच्या कडून संस्कार आणि धाकामुळे एकूणच कुटुंबाची चाकोरीबद्ध पद्धतीने वाटचाल असायची. दुर्वर्तन करायला धाडस होत नसे आणि झालेच तर शिक्षा मोठीच मिळे. आता विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये पालकांनी संपत्ती कमावत असताना आपला वेळ विकला आहे. त्यामुळे मुलांसाठी वारेमाप पैसा खर्च करून त्यांना खुश करण्यासाठी त्यांना मागेल ती वस्तू पुरविण्यावर त्यांचा भर असतो. पण या वेळेस ते हे विसरतात की पैसे देऊन कर्तव्य संपत नाही. मग प्रश्न उरतो मुलांवर संस्कार कोणी करायचे ?

गरिबीत किमान आवश्यक गोष्टींची वानवा असते. हवीहवीशी गोष्ट मिळत नाही. गरजेच्या गोष्टींचा त्याग केलेला असतो. पुढे उदर निर्वाहासाठी लहानपणीच रोजंदारी करून कमावण्याची पाळी येते. मुलाची कमाई घरच्यांसाठी कौतुकाची बाब होते. कुटुंब चालवू लागल्यावर त्याच्या कमाईचा हिशोब कोण विचारणार ? आलेला पैसा कसा उडवायचा हेच तेवढे डोक्यात.. गरजेच्या गोष्टी मिळाल्यावर उरलेले पैसे हौस-मौज करण्यात घालवायची सवय त्यास व्यसनाधीनतेत लोटते. तात्पुरती झालेली पैशांची सोय कायमस्वरूपी त्याचे चरित्र मात्र कलंकित करते. पैशांची उणीव आणि उपलब्धता हाताळण्यास अपयश आल्याने काहींनी यामध्ये आपले आयुष्य गमावलेलं आहे.
 
काहीजण जीवनातील चढ-उतारास समर्थपणे तोंड देऊ शकत नाहीत आणि स्वतःला तणावाच्या खोल दरीत लोटून देतात. घरची निकड तसेच अभ्यासात कमजोर असल्याने पालकांकडून कोवळ्या वयात कष्टाची कामे करण्याची सक्ती तसेच सततचा छळ यामुळे देखील काही मुलं व्यसनाधीनतेत जगण्याचा स्वतःचा मार्ग शोधतात आणि विक्षिप्तपणे व्यवहार करतात.

बऱ्याच वेळा लहान वयात जास्त पैसे हातात आले की मुलं हुरळून जातात. सुरुवातीला चैनीच्या गोष्टी घेण्यात ते पैसे खर्च करतात. जोपर्यंत पैशाचे महत्त्व समजत नाही तोपर्यंत पैसे कमावणे पेक्षा गमावण्यात जास्त मजा येते. मग पुढे पैसा कुठे खर्च करावा ते कळत नाही आणि मार्ग सापडतो तो नशेचा.. पैसे कमावण्यासाठी किती धडपड करावी लागते हे स्वतः पैसे कमवायला लागल्याशिवाय समजत नाही. व्यसनाधीनता रावाचा रंक बनवते आणि कंगाल आयुष्य जगावे लागते. म्हणून पालकांनी मुलांना आर्थिक साक्षर बनवायला हवं.

घरातील कौटुंबिक वातावरण जर अस्थिर असेल तर ते देखील मुलांचे वर्तन बिघडायला कारणीभूत असते. मुलांना समजून घेतलं नाही, दुर्लक्ष केलं, मारहाण करून अत्याचार केल्याने मुलं घाबरून जातात.  तसेच आई-वडिलांमध्ये कायम मतभेद, भांडणं होत असतील तर मुलांना कळत नाही या परिस्थितीत काय करायचे ?  चिमुरडी बिथरतात, घाबरतात. भांडू नका आम्हाला त्रास होतो आहे हे देखील ते पालकांना सांगू शकत नाहीत. गुमान सहन करण्यापलीकडे त्यांच्या हातात काही नसतं. मग स्वतःला शांत करण्यासाठी ते व्यसनाधिनता व मैत्री चा आधार घेतात. मैत्रीमध्ये त्यांच ऐकणार, त्यांच्या हक्काचं त्यांना कोणीतरी मिळत. यांत मनाची विकृतावस्था यायला वेळ लागत नाही. आणि आम्ही म्हणतो मुले बिघडली.

डिजिटल मीडियावरील वेब सिरीज आणि कन्टेन्ट सर्वांसाठी सहज उपलब्ध आहे. तरुणांचे मन अजूनही विकसित अवस्थेत असल्याने, ती जे काही पाहतात त्यावर विश्वास ठेवतात. मुले जेव्हा हिंसा, कठोर भाषा आणि लैंगिक संबंधांशी संबंधित सिरीज पाहतात तेव्हा त्यांच्यामध्ये द्विधा मन:स्थिती उत्पन्न होते आणि त्याचा शेवट दुःस्वप्न, अनियमित झोप, डोळ्यांवर परिणाम, नैराश्य आणि एकाकीपणा मधे होताना दिसतो. बेबीसिरीज चे दुष्परिणाम लक्षात घेऊन तरुणांनी ते पाहणं योग्य नाहीच पण पालकांनी त्यांना पाहू देणं हे देखील चुकीचे आहे. हल्ली मोबाईलवर लेक्चर्स तसेच अभ्यासाच्या नावाखाली ही बुदधीमान मुलं काय काय उद्योग करतायेत हे आपणास माहीतही नसतं.

साहजिकच आपण सर्वजण आपल्या आयुष्यातील अशा नाजूक वळणातून गेलो आहोत. आपल्या काळात आपल्या वाटचालीवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा होती. आपणास ही यंत्रणा सुरू करून पुन्हा सक्रिय करण्याची गरज आहे. ही सर्व निष्पाप मुले आहेत. भविष्यात त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होणार आहेच, परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. ते म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असे होईल. मग त्यांच्या पालकांचा काय उपयोग? क्षणभर, त्यांच्या बिघडण्याचे कारण बनण्यापेक्षा त्यांच्या रागाचे कारण बनणे कधीही चांगले.

तरुणांमध्ये खूप ताकद असते. नाविन्यपूर्णता त्यांच्या नसानसांत भरलेली असते. मुलं ही चिखलाच्या गोळ्यासारखी असतात. त्यांना चांगल्या शिल्पात रुपांतरीत करणं हे पालक आणि समाजाच्या हातात असतं. त्यांना अधिक सजक होण्यासाठी प्रेरित केले तर त्यांच्या क्षमतांचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी होईल. प्रत्येकाने प्रथम जीवनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि या नव्या पिढीला समजावून सांगितला पाहिजे. अप्रत्यक्षपणे आपण मुलांच्या मनात अध्यात्माची मुळे रोवली पाहिजेत. आपण त्यांना सुरुवातीपासूनच संतुलित जीवन जगण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. कुणीतरी सांगितलंय - "सगळंच उलटं करून ठेवलय आपण !  आयुष्याच्या सुरुवातीला पाश्चिमात्य देशांनी दिलेले ज्ञान घेणे आणि वृद्धापकाळात आपल्याच ऋषींनी शोध लावलेल्या अध्यात्माच्या चरणी जाणे ! खरंच खूप उशीर करत आहोत आपण."

डॉ. केशव राजपुरे

Thursday, January 13, 2022

आनंदाचा डोह



माणूस गप्प गप्प आणि अलिप्त का होतोय ?

आयुष्यामध्ये प्रत्येकाला शांती समाधान हवे असते कारण त्यांच्या जीवनात त्याची वानवा असते. आयुष्यामध्ये भय, क्रोध, ईर्षा, द्वेष आणि इतर बऱ्याच गोष्टींमुळे मनाची विकृतावस्था येते आणि आपण दुःखी होतो. हे दुःख स्वतः पुरते मर्यादित न राहता इतरांमध्ये पसरवले जाते आणि सर्व वातावरण अशांत होत असते.

तसं बघितलं तर मनाच्या ओझ्याखाली दबला नसल्यास प्रत्येकजण नैसर्गिकरीत्या व्यक्त होतो, नातेसंबंध जपतो आणि प्रेमभाव सुदृढ करतो. पण हल्ली असे दिसून येते की माणूस समाजापासून अलिप्त, संपर्क वलयापासून दूर आणि काहीसा गप्प झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आपणाला आजूबाजूला सहचार, बंधुभाव, एकता यांचा अभाव दिसत आहे.

हि पिढी जुन्या आणि नव्या पिढीच्या काळाच्या उंबरठ्यावर असल्याने तिने दोन्ही पिढ्या जवळून अनुभवलेल्या आहेत. जुने दिवस आठवून, 'हे असे का होते?' असा प्रश्न केल्यानंतर, परिस्थितीचे खालील विश्लेषण निदर्शनास येते. हे माझे निरीक्षण आणि अनुभव आहेत. आपली मते भिन्न असू शकतात. कारण समज ही व्यक्तीसापेक्ष असते.

जुन्या काळी जेव्हा ऐशोरामाच्या गोष्टी दुर्मिळ होत्या तेव्हा माणूस कमीत कमी गरजासह आनंदी जीवन जगत असे. तसेच दळणवळण व संपर्क साधणे इतकी विकसत नसल्याने माणसाच्या जगाविषयीच्या माहितीच्या कक्षा लहान होत्या. तेव्हा बऱ्याच गोष्टी मला माहीत नाहीत तसेच बऱ्याच गोष्टींचा आनंद घेणे बाकी आहे या समजापाई तो स्वतःला अपूर्ण समजत असे. म्हणतात ना अज्ञानात सुख असते. अशा परिस्थितीत तो आतून अशांत, अहंकारी किंवा गर्विष्ट कसा बरं असेल ?

या परिस्थितीत त्याचा व्यवहार आपल्या स्वतःच्या मर्यादा ओळखून होत असे. एकूणच त्यांचा स्वभाव काळजीवाहू, मानवतेचा, सामाजिक आणि प्रेमळ होता. त्यामुळे तो प्रतिक्रिया देण्यास आणि व्यक्त होण्यास आणि नातेसंबंध जपण्यास कचरत नव्हता. इतरांशी भाईचाराने राहत आणि स्नेह वृद्धिंगत करत आनंदीपणे जगत असे. शुद्ध चित्त ठेवून प्रेमाचे अदान-प्रदान होईल अशा परिस्थितीत तो दुसऱ्यांच्या दुखाप्रती अधिक संवेदनशील रहात स्वतः एक संतुलित आयुष्य जगत असे.

यथावकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रचंड विकासामुळे त्याच्या विश्वाच्या आकलनाच्या कक्षा रुंदावल्या. वैज्ञानिक प्रगतीमुळे विलासी वस्तू सर्वसामान्यांना परवडणार्‍या बनल्या. कालांतराने आधुनिकीकरण व जागतिकीकरणाच्या नावाखाली रोजगाऱ्यांचे पगार भरमसाठ वाढले आणि बहुतेकाकडे आवश्यकतेपेक्षा जास्त पैसा आला. चलन, ज्यावर हे जग चालते, ही अशी गोष्ट आहे की ती जर गरजेपेक्षा जास्त प्रमाणात आली तर माणूस भांबावून जातो.  माणसं चलन वृद्धिंगत करणाऱ्या व्यवसाया ऐवजी स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करू लागले.

संपत्तीच्या प्रतिष्ठेचा माणसास अहंकार कधी जडतो हे त्याचे त्याला देखील समजत नाही. लहानपणी न मिळालेल्या गोष्टी उत्तरार्धात मिळाल्या तर माणसास त्याचे फार महत्व असते. या सर्व प्रकारात तो स्वतःला श्रीमंत समजू लागतो आणि इतरांशी तुलना करू लागतो. आपल्याकडे दुर्लक्ष तसेच आपली स्तुती होत नाही हे लक्षात आल्यानंतर मग माणूस अहंकारी होऊन अस्वस्थ होऊ लागतो. हाच अहंकार पुढे जाऊन द्वेष, ईर्षा तसेच क्रोध निर्माण करतो. हेच ते कारण आहे ज्याने माणूस आयुष्यात सुख शांती हरवून दुःखी होतो. आणि हे जर बराच काळ होत राहिले तर त्याचा परिणाम म्हणून माणूस मनाच्या विकृत अवस्थेत पोचायला वेळ लागत नाही.

मनाच्या विकृतावस्थेची इतरही कारण आहेत. उदाहरणार्थ शिक्षित असूनही पद आणि नोकरीवर संतुष्ट नसल्याने दुःख, विवंचना आणि काळजीने माणूस त्रस्त होतो. उदरनिर्वाह, कुटुंब चालवण्याचं ओझ व अस्तित्वासाठीची लढाई कायम नशिबी आली तर माणूस निराश आणि पर्यायाने कमजोर बनतो. बदललेली जीवनशैली, तुटपुंजी मिळकत आणि कौटुंबिक गरजा भागवत असताना करावी लागणारी कसरत या सगळ्याला वैतागून मग माणूस परिस्थितीस अंध प्रतिक्रिया द्यायला लागतो आणि मनाच्या प्रचंड ओझ्याखाली स्वतःस ढकलून देतो.

गैरसमज ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होते आणि अपेक्षांभंगामुळे नैसर्गिकरित्या मनाची अस्वस्थता निर्माण होते. प्रत्येक नात्यात वेळोवेळी गैरसमज निर्माण होत असले तरी काही नाती अशी असतात की त्यांची दुरवस्था होते. गैरसमज होतो जेव्हा लोकांच्या धारणा एकमेकांना  भिडतात. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बरोबर असतो या अध्यात्माच्या मूल तत्त्वावर तो विश्वास ठेवत नाही आणि स्वतःला ताणतणावाच्या खाईत लोटून देतो. नाती अत्यंत नाजुक असतात. नाती सांभाळून ठेवण्याची गरज असते कारण लहान-लहान चुकांमुळे दुरावा निर्माण होतो. अधिकाराने रागावले तरी नाती तुटतात. याचा परिणाम स्वरूप माणूस आपले स्वास्थ हरवून बसतो. कारण तो पूर्वग्रहदूषितपणे अर्थ काढत नेहमी या गढूळ झालेल्या नात्याविषयी विचार करत असतो.

पद, प्रतिष्ठा, आदर माणसास कल्पनाशक्तीच्या तुलनेने वरच्या आभासी पातळीवर घेऊन जातो. स्तुती केल्यामुळे लोक आभासी आनंदात जातात. जिथे ते नेहमीच प्रत्येकाकडून कौतुक आणि सन्मानाची अपेक्षा करू लागतात. पण असे न झाल्यास अहंकार दुखावातो मग ईर्षा, अबोला, वाद आणि नात्यात तणाव वाढू लागतो.

सततच्या कामाच्या अधिक तणावाने निर्माण झालेल्या विचलिततेमुळे, ई-मेल्स, न्यूज, सोशल मीडिया आणि चॅटसच्या ट्रिगर मुळे तसेच कोरोना सारखे आजार माणसांमध्ये निद्रानाश तसेच चिंता विकार सामान्यपणे आढळून येतो. निद्रानाशामुळे आरोग्याच्या अनेक भयावह समस्या उद्भवतात की ज्यायोगे मनात तीव्र ताण निर्माण होतो. पुढे जाऊन हा ताण मनाच्या विकृत अवस्थेकडे जातो आणि माणूस अस्थिर होतो.

माणसाला आयुष्यात मार्गक्रमण करताना थोरामोठ्यांचे मार्गदर्शन, साथ आणि आशीर्वाद लाखमोलाचे असतात. जुन्या पिढीला याचे महत्त्व माहीत आहे. हे आशीर्वाद आपणा सभोवती नेहमीच उत्साही आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि हे यशस्वीतेसाठी उपयोगी असतात. अलीकडे ही परंपरा औपचारिक झाल्याचे दिसते कारण नवीन पिढी हे करणे म्हणजे कमीपणाचे समजते. पण हल्ली या गरजेच्या ऊर्जा तसेच आशीर्वादाच्या कमतरतेमुळे यश माणसांच्या पासून दूर जात आहे असे दिसते. सततच्या अपयशामुळे माणूस निरुत्साही होतो आणि त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होतो.

अशा पार्श्वभूमीवर माणूस नैसर्गिकरीत्या व्यक्त होणार नाही. हेच कारण असावं कदाचित माणूस सामाजिकदृष्ट्या अलिप्त आणि गप्प गप्प झालेला दिसतो. पण ही त्याची शांतता एखाद्या सुप्त ज्वालामुखी सारखी असू शकते. त्याचा कधी उद्रेक होईल ते सांगणे अवघड.. पण आजाराचे योग्य निदान झाले तरच इलाज योग्य करता येईल.

आज कोरोनाने माणसाच्या प्रगतीच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. अनिश्चिततेच्या जीवन गंगेत जगायचं कसं हे शिकवलं असताना अध्यात्माची कास धरून मानव जन्माचा अर्थ समजून घेतला पाहिजे. मुळात मानव जन्म हाच संचित कर्माचे प्रतीक असताना या जन्मात विनय, आदर तसेच मानवतेने वागायचे सोडून वास्तवतेशी फाटा घालत माणूस आभासी दुनियेत का जगत आहे हे आकलनाच्या पलीकडे आहे.

विकारात मन विवेकबुद्धी घालवून बसते. श्वास लय सोडून देतो. शरीरात जैवरासायनिक क्रिया संवेदना उत्पन्न करतात. हे झालेले बदल आपल्या लक्षात येत नाहीत. मग काय करावं ? अशा वेळी आत्मनिरीक्षण करत शरीराच्या सत्यत्तेचा आंतरिक अनुभव घ्यायला शिकायला पाहिजे. याने चित्त शुद्ध होईल आणि मग बघा हा गप्प गप्प झालेला माणूस पुन्हा कसा माणसात जाऊन माणसाशी माणसा सम वागेल. मनावरील सर्व ओझे झुगारून मनसोक्तपणे व्यक्त होईल आणि आनंदाच्या डोहात डुंबून जाईल.

- डॉ केशव राजपुरे


Thursday, January 6, 2022

सिंधुताई (माई) सपकाळ

सिंधुताई (माई) सपकाळ यांचे मंगळवार दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले. या निमित्ताने माझ्या भावनांना करून दिलेली वाट..
असं म्हणतात जन्माला आलेला प्रत्येकास मरण चुकले नाही आणि एक ना एक दिवस त्याला परतीचा प्रवास करावाच लागतो. पण इहलोकातील प्रवास कधी थांबणार हे आपणाला माहीत नसते. त्याचा इथला कार्यकाल संपला की जाणे क्रमप्राप्त असते. पण काही माणसं कायम आपल्यातच असावीत असं वाटण्याचं कारण म्हणजे त्यांनी जन्मभर जपलेला मानवतेचा वसा.. माई त्यापैकी एक. कारण सर्व जन्मामध्ये मानवजन्म हा महान मानला जातो. आणि मानवसेवा हीच खर्‍या अर्थाने ईश्वरसेवा असते. माई जन्मभर ही सेवा करत राहिल्या. दुरित, दीनदयाळ, निराधार लोकांचा आधार होऊन त्यांना सुसह्य आयुष्य जगण्यास मदत करण्याचे दैवी कार्य माईंनी जन्मभर केलं. म्हणून या समाजासाठी त्या हव्याहव्याश्या...

मी त्यांना कधी भेटलो नाही. त्यांच्याविषयी, त्यांच्या समाज कार्याविषयी जे वाचनात आलं, तसेच सिनेमाच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट जो समजला तेवढाच त्यांचा मला परिचय.. सिंधुताईंचा जीवन प्रवास सर्वांना अवगत आहेच. त्यांचं अख्ख जीवनच संघर्षमय ! संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला जणू ! सुरुवातीला स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष आणि नंतरच्या काळात पोरक्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष.. पण प्रत्येक वेळी या सगळ्यांचा सामना करत त्यांनी एक यशस्वी आयुष्य जगलं..

परमेश्वर देखील संघर्ष देताना योग्यतेच्या माणसाच्याच वाट्याला देतो. प्रतिकूलतेत दिलेला लढा माणसास जीवनातील पुढे येऊ घातलेल्या संघर्षाचा सामना करण्यास अधिकच बळ प्रदान करतो. त्यांनी जीवनात बरेच लढे दिले त्यामुळे जीवनाची लढाई लढताना त्या अधिकाधिक कणखर होत गेल्या. इतक्या बळकट की संकटांनीही त्यांच्यापुढे मान झुकवावी लागली होती..

प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेतल्याने कायम कष्टमय सोशीत जीवन त्यांच्या वाट्याला आलं. गुलामासारखं जगणं त्यांना मान्य नव्हतं. म्हणून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर समाजाने त्यांना बेघर, भिकारी बनवलं. पण जेव्हा त्यांना आपल्यानीही नाकारलं तेव्हा मात्र आयुष्यातून हद्दपार होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्यांच्यामध्ये दडला होता माणसातला देव.. तेव्हा समाजासाठी त्यांनी बरंच काही करणं बाकी होतं. इतरांच्या पेक्षा वेगळी अशी समाज भावना परमेश्वराने त्यांना प्रदान केली होती. अशा परिस्थितीत हार न मानता आलेल्या प्रसंगांना समर्थपणे तोंड देणे एवढेच त्यांनी लक्षात ठेवलं होतं.

त्यांनी जीवनामध्ये अन्याय, अत्याचार, दारिद्र्य जवळून पाहिलं होतं. आपल्यासारखं गुलामगिरीचे जीवन इतरांच्या वाट्याला येऊ नये हे त्यांना त्यावेळेला नक्कीच वाटलं असणार. क्षूधाशांतीसाठी रेल्वे स्टेशनवर भीक मागणं हा एकमेव पर्याय त्यांच्या समोर जेव्हा होता त्यावेळेला त्या डगमगल्या नाहीत. त्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःला सावरलं, सांभाळलं, आलेल्या आयुष्याचा स्वीकार करून तशातच मार्गक्रमण सुरु ठेवलं. प्रसंगी स्मशानात मुक्काम करत तिथल्या सिध्याच्या पिठाची भाकर करून दिवस काढण्याचे प्रसंग त्यांच्यावर आले होते. किळसवाण दारिद्र्य आणि हीन जींन दुसऱ्यांवर येऊ नये म्हणून त्यांनी अनाथ तसेच बेघरांसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी त्या दारोदार भीक मागू लागल्या.

कितीतरी दिवस हे काम त्या निरंतर करत होत्या. नंतर त्यांनी लोकसहभाग आणि देणगीतून उभारलेल्या निधीतून लहान मुलांसाठी अनाथआश्रम सुरू केला. हा आश्रम चालवणं खूप अवघड काम होतं. परंतु त्या निग्रही आणि प्रयत्नवादी असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश येत गेलं. सध्या त्यांनी निर्माण केलेल्या चार अनाथाश्रमापैकी फक्त एक आश्रम शासन अनुदानित आहे. त्या हयात असेपर्यंत तीन आश्रम चालवण्यासाठी त्या कसोशीने प्रयत्न करत. नेहमी मदत मागण्यासाठी दारोदार हिंडत.

त्यांच्या चेहर्‍यावरची तुकतुकी आणि ताणतणाव रहितपणा हे त्यांचं आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व दर्शवत असे. संकटांवर मात करण्यासाठीची अंगभूतशक्ती आणि अनंत अडचणी असूनही आनंदात राहण्यासाठी लागणारा किमान आवश्यक आत्मविश्वास यांचा तो परिपाक होता.

त्यांच्या अनपेक्षितपणे आपल्यातून जाण्यानं या समाजाची न भरून येणारी फार मोठी हानी झाली आहे. कितीतरी बेघर मुलं वात्सल्य रुपी माईस आणि ममतेस पोरकी झाली आहेत. पण भौतिक रूपानं त्या जरी आपल्यातून निघून गेल्या असतील तरी त्यांचे विचार आणि दीपस्तंभरुपी कार्य कायम आपणासोबत असेल. माईंचं कार्य पुढे नेणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली असेल. 

वाई तालुक्यातील वेळे येथील यशोधन ट्रस्ट ही देखील माई सिंधुताई सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेली अनाथ तसेच बेघर मनोरुग्णांसाठीची संस्था आहे. तेथे ७५ हून अधिक बेघर आणि मानसिक असंतुलित स्त्री-पुरुष राहतात. श्रीयुत रवी बोडके या सर्वांची काळजी घेण्याचे दैवी कार्य करत आहेत. ही संस्था देणगी तसेच लोकांच्या योगदानातून चालवली जात असल्याने त्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देणे खूप महत्त्वाचे आहे.

आश्रम चालवण्यासाठी त्यांच्याकडे निधीची कमतरता असल्याने त्यांना मिळणाऱ्या देणग्या आणि सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. राष्ट्र आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि देणं म्हणून ते हे सर्व करत आहेत. अनेक वेळा त्यांना आपल्या सर्व आश्रितांच्या एका वेळच्या जेवणाची सोय करणे अवघड असते. किंबहुना ते माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींच्या संदर्भात मदतीची अपेक्षा करतात.

त्यानंतर त्यांच्या योग्य मानसिक उपचार आणि वैद्यकीय खर्चाची चिंता असते. निराधार मनोरुग्णांचा मानसिक आजारातून पूर्ण बरा झाल्यानंतर पत्ता देखील मिळतो पण अशावेळी घरचे लोक त्याला स्वीकारायला धजवत नाहीत. अशा परिस्थितीत हार न मानता येईल त्या अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. बर्‍याचदा रवी बोडके आश्रमातील मृत आश्रियांसाठी वारस झाले आहेत. याकामी यशोधन ट्रस्टला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे.

जर आपण खरोखरच माईंच्या विचारांचे पाईक असाल तर आपण यशोधन सारख्या अनाथाश्रमाना मदत केली पाहिजे, समर्थन केले पाहिजे आणि याद्वारे काही अंशी सिंधुताईंचे कार्य चालू ठेवण्याची संधी मिळते ते पाहावे..

आपण आपल्या आजूबाजूच्या गरजू निराधार व्यक्तींना या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी स्वतंत्रपणे मदत करू शकतो. परताव्याची अपेक्षा न करता आपण अनेक गोष्टी करू शकतो. आपण असे केल्यास, मला खात्री आहे की देव तुमचा हिरमोड करणार नाही. या मदतीचा परतावा म्हणून कुठे न कुठ तरी अदृश्य दुवा नक्कीच मिळेल..

माईंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांच्या कार्यास सलाम व परमेश्वराजवळ हीच प्रार्थना की त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. आशा आहे की देव लवकरच मानवजातीची सेवा करण्यासाठी त्यांच्या उपनियुक्तांच्या यादीतून दुसरी सिंधुताई पाठवेल.

- डॉ केशव यशवंत राजपुरे
९६०४२५०००६