Saturday, May 30, 2020

श्रीक्षेत्र वाकेश्वर बावधन



वाकेश्वर मंदीर, बावधन

राज्यातील प्राचीन मंदिरे ही महाराष्ट्राची श्रद्धास्थाने आणि शान आहे. विविधतेमुळे या मंदिरांची बरीच वैशिष्ट्ये आहेत.. बऱ्याचदा आपल्याला मंदिरांच्या बाबतीत जुजबी माहिती तर असते पण या मंदिरांचा इतिहास काय आणि ही मंदिरे साधारण किती प्राचीन आहेत याबद्दल माहीत नसते. बावधन गावच्या ईशान्येस ३ किलोमीटरवर असलेल्या वाकेश्वर मंदिराबद्दल थोडी माहिती होती. या पुरातन वास्तुबद्दलचे कुतूहल आणि पंचक्रोशीच्या या अमूल्य ठेव्याबाबतच्या उत्साहाने या पवित्र स्थानांबद्दल अधिक जाणून घेण्याची ऊर्जा मिळाली.

वैदिक धर्मानुसार सृष्टीतील निर्मिती आणि लय यामधील ताळमेळ साधण्याचे काम हे ‘महादेव’ या देवतेच्या संकल्पनेचे बीज आहे. देवांचाही देव महादेव म्हणून शिवशंकराची पूजा भक्तीभावाने केली जाते. शिल्पकला ऐन भरास आली तेव्हा ही सर्व शिल्प ठेवायची कुठे असा प्रश्न उदभवला आणि मंदिरांची निर्मिती झाली. हिंदू पुराणकथांमध्ये नद्यांना दैवी दर्जा देण्यात आला आहे. म्हणूनच, नद्यांना पवित्र मानले जाते आणि या नद्यांमधील पवित्र स्नानामुळे पापांचा सर्वनाश होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील बहुतेक हिंदु मंदिरे नद्यांच्या काठावर बांधली गेली असल्याचे आपणास आढळते. याचप्रेरणेतून वाकेश्वर महादेव मंदिर कृष्णा नदीच्या काठावर बांधले गेले असावे. 
 

वाकेश्वर हे बावधनच्या सांस्कृतीक परंपरेत महत्वाचे मंदिर मानतात. वाई सातारा रोड वर भद्रेश्वर मंदिराच्या थोडे पुढे वाई पासून ३ किमी अंतरावर आग्नेय दिशेला कृष्णा नदीच्या दक्षिण काठावर वाकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. कालदृष्ट्या हे मंदिर यादोत्तर काळातील (इ.स. १३१७ नंतर) परंतु शिवपूर्व काळातील (इ.स. १६७४ पूर्वी) असून शिखर मात्र उत्तर पेशवेकाळात (इ.स. १७६१-१८१८) विटा व चुना या माध्यमात बांधले आहे. हे शिखराचे काम बावधन मधील बाबुराव बल्लाळ खेर यांनी अठराव्या शतकात केले असावे असे दिसते. वाई परीसरात बांधलेली बहुतांशी मंदिरे हेमाडपंती वास्तू शैलील बांधली आहेत. या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे यात अखंड दगडांच्या प्रचंड आकाराच्या खांबांचा व चीपांचा वापर केलेला दिसतो.

मध्ययुगीन काळात (इ.स. ५ ते १५ वे शतक) प्रचलित असलेली एक वास्तुशैली म्हणजे हेमाडपंती किंवा यादव वास्तुशैली. हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत हे यादव राज्यांच्या पदरी मंत्री होते की ज्यांनी अनेक मंदिरे बांधली. या हेमाडपंती मंदिरांचे दगड सांधण्यासाठी चुना वा तत्सम द्रव्य वापरलेले आढळत नाहीत. कातीव दगडांना खाचा वा खोबणी पाडून एकावर एक दगड रचून भिंतींची बांधणी केलेली असते. खोबण्या अशा पद्धतीने पाडतात, की ते दगड एकमेकांत घट्ट बसतात आणि किरकोळ फटी राहू नयेत म्हणून क्वचित शिसे ओतीत. मंदिरांचे चौकोनी, षट्कोनी किंवा अष्टकोनी खांब एकसंध पाषाणात घडविलेले असतात. मंदिरांची शिखरे वैशिष्ट्यपूर्ण असून शिखराची रचना आणि मंदिराच्या पायाची रचना यात फार मोठा समतोल साधलेला आढळतो. या मंदिरांची छते पिरॅमिडसारखा चढत जाणाऱ्या पायऱ्यांनी बनविलेल्या छप्परासारखी केलेली असतात.

मंदिराचा परिसर विस्तीर्ण आहे. परिसरात अतिशय शांतता आहे. त्यात बरीच पिंपळाची झाडे आहेत व परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. या मंदिरास कृष्णाकाठच्या घाटाशेजारी १८६ फुट बाय २०४ फुट आकाराची (अंदाजे पाऊण एकर) तटबंदी आहे. तटबंदीच्या भिंतीची रुंदी साडेतीन फुट आहे. हे स्वयंभू वाकेश्वर मंदीर पूर्वाभिमुख असून तटबंदीचा मुख्य दरवाजा पूर्वेस आहे. या दरवाज्यासमोर दोनशे फुटावर एक पार आहे. मंदिराच्या परिसरात एक तळे आहे. या तळ्यास बारमाही पाणी असते. मंदिराच्या तळ्यातील पाणी तटबंदी भिंतीस असलेल्या गायमुखातून नदीच्या बाजूला अविरत पडते. हे तळे सोनजाई वरील काळुबाई तळ्याशी अंतर्गत प्रवाहाने जोडल आहे असे सांगितले जाते. उत्तरेस घाटावर जाण्यासाठी एक दरवाजा आहे. मंदीर तटबंदीच्या आतही एक पार आहे. मुख्य मंदिराशेजारी लहान लहान मंदिरे आहेत. यात दत्त व विठ्ठल मंदिरांचा समावेश आहे. मुख्य मंदिरासमोर तीन फुट उंचीच्या आठ फुट चौरस चौथऱ्यावर नंदीचा मंडप आहे. त्यातील नंदीची ऐट पाहण्यासारखी आहे. मुख्यमंदीर देखील तीन फुट उंचीच्या चौथऱ्यावर बांधले आहे. मादिराच्या तीन बाजूस कट्टे आहेत. या कट्ट्यावर मंदिराचे वीस आधारस्तंभ आहेत. सभामंडपात सात फुटाचे चार खांब आहेत. सभामंडप तसेच गाभारा आतून १४ फुट बाय १३ फुट आहे.  मंदिराच्या बाहेर नदीवर विस्तीर्ण घाट आहे. घाटाची लांबी अंदाजे ८० फुट तर रुंदी जवळपास ४० ते ५० फुट आहे. जवळच पूर्वेला बावधन गावची स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीचा नुकताच जीर्णोद्धार झालेला आहे, गावातील बहुतेक दशक्रियाविधी तेथेच होतात.
 

वाकेश्वर मंदिर घोटीव दगडांनी बांधले असून या पूर्वाभिमुख मंदिराची रचना कलात्मक आहे. मंदिरात हेमाडपंती शिल्पकलेतील सर्व वास्तूवैशिष्ट्ये आढळतात. बांधणीमध्ये पीठ (चौथऱ्याखालील स्तर), मंडोवर (भिंत) आणि शिखर अशी रचना आहे. शिखरावर मूर्तिकामासाठी कोनाडे असून त्यातील चुनेगच्चीतील काही मूर्ती सुस्थितीत आहेत. मंदिराचे विधान चांदणीच्या आकाराचे असून शिखरावर लहान शिखर आढळून येत नाही. मादिराच्या पिठावर मानव, अश्व, गज असा कोणताही स्तर नाही. बाह्य भिंतीवर थोडीसी शिल्पे पहावयास मिळतात. या मंदिराच्या पिठ व मंडोवरावर काही पाषाण शिल्पे आहेत. त्यापैकी हत्ती, शरभ हे प्राणी आणि दक्षिण व उत्तरेकडील अनुक्रमे गर्भगृहाच्या भिंतीवरील मुष्टीयोद्धे व गदाधारी  विष्णू लक्ष्मी दांपत्य हि शिल्पे लक्षणीय आहेत. शिखर काशीविश्वेश्वर मंदिरासारखे त्रिस्तरीय असून त्यावर कोनाड्यात चुनेगच्चीतील मूर्तिकाम आहे. यामध्ये देव देवतांची व मंदिर मालकांच्या पूर्वजांच्या कोरीव मूर्ती आहेत. या मंदिराच्या पायऱ्या चढून सभागृहात जाताना डाव्या हाताला हत्तींचे तर उजव्या बाजूला नागांचे शिल्पकोडे दृशीस पडते. कोडे सहजासहजी सुटत नाही. कमानीवरही बारीक कलाकुसर आहे.
 



सभागृहाच्या उत्तरेकडील भिंतीवर दोन हरीणांचे अलौकिक व नाविन्यपूर्ण असे जुळे शिल्प आहे. यात आठ पायांची आणि दोन धडे व दोन मुखे यांची रचना अशा पद्धतीने उत्थित शिल्पात खोदली आहे कि, त्यातून या चपळ प्राण्यांची गती व्यक्त होते. यांतील हरणांची शिल्पे प्रमाणबद्ध, वास्तव आणि नैसर्गिक वाटतात. प्रवेशद्वारावर कोरीव काम नाही. मंदिराचे सभागृह वीस दगडी स्तंभांवर दगडी छताने अच्छादिलेले आहे. या स्तंभांच्या मधल्या भागात कमलाकृती उत्थित शिल्पे कोरली आहेत. मंडपातून गाभाऱ्यात जाण्यासाठी तुलनेने अरुंद दगडी चौकट आहे. चौकटीच्या बाहेर डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. मंदिराचे गर्भागृह मंडपाच्या मानाने खोलगट आहे. त्यात आपणास अरुंद दगडी दरवाज्यातून पायऱ्या उतरून खाली जावे लागते. गर्भागृह चौरसाकार असून त्याचे छत घुमटाकार व मधोमध कमलाकृती आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. समोरच शिवपत्नी पार्वती मातेची मूर्ती उंचावर प्रतीष्ठापित केली आहे.

मंदिर परिसरात एक समाधी आहे. दगडी चौथऱ्यावर पदचिन्ह आहे. म्हणजेच ती पुरुष किंवा सती स्त्री किंवा वीर यापैकी कुणाचीतरी समाधी असावी असे वाटते. त्या काळात हे पवित्र आणि शांत ठिकाण ध्यानधारणा व्रत करण्यासाठी ऋषी मुनींनी वापरलेली दिसते. त्यांच्यापैकी सुद्धा कुणाचीतरी समाधी असू शकते. जर ती कुणा सतीची समाधी असेल तर ती इंग्रजपूर्व कालखंडातील असावी कारण ब्रिटिश सरकारद्वारा भारतातील सतीची जुलमी प्रथा बंद करण्‍यात आली होती.
 

बावधन मधील गाडेबाग आळीमधील सध्याचा राजे भोसले यांच्या वाड्यापासून ते अगस्तेश्वर मंदीर व वाकेश्वर मंदिर इथे जाणारे दोन गुप्त भुयारी मार्ग आहेत. मंदिराचे पुजारी दररोज सकाळी कुणाचीही सावली अंगावर न पडू देता ओल्या पडदेन, या भुयारी मार्गाने वाकेश्वर येथेही पूजा-अर्चा करायला जात असे बरेचजण सांगतात. मंदिर परिसराच्या तटबंदीत वायव्य कोपर्‍यात अद्याप या भूमिगत भुयाराची खूण आहे.या कोपऱ्यातून खाली उतरायला पायऱ्या आहेत आणि अंदाजे पाच बाय पाच बाय पाच फूट मापांची बंदिस्त जागा आहे आणि त्याच्या एका कोपऱ्यात भुयाराचा दरवाजावरील दगडी चिपेस चोकोनी छिद्र आहे. भुयाराचा दरवाजा आता सुरक्षिततेच्या कारणाने बंद आहे. काहीजणांच्या मते हि भुयारे अस्तीत्वात आहेत पण ती राजे भोसले वाडा ते मंदिर इतकी लांब  नसावीत. शत्रूंच्या हल्ल्याप्रसंगी स्वतःचा बचाव करण्यासाठी वाड्यापासून काही अंतरापर्यंत हि भुयारे असावीत. त्याचप्रमाणे मंदिरांच्या आवारातील ही  भूमिगत भुयारे ध्यानधारणा आणि छुप्या निवासासाठी असू शकतात असही लोक बोलतात.


बगाड उत्सवादरम्यान शुचिर्भूतपणा टिकवण्यासाठी होळी ते रंगपंचमी दरम्यान बगाड्यासाठी पंचक्रोशीतील देवतांची पूजा अर्चा करण्याचा काळ असतो. यासाठी पवित्र गंगा कृष्णा नदीत स्नान करून सुरुवात करावी असा संकेत आहे. यासाठी वाकेश्वर हेच ठिकाण गावापासून जवळ आहे. त्यामुळे यादरम्यान आपल्या भाऊबंदासह बगाड्या दररोज मध्यरात्री वाकेश्वर येथे नदीमध्ये स्नान करतो व ओल्या पडद्याने महादेवाला पाणी घालून दर्शन घेऊन मग गावातील इतर देवदेवतांना पाणी घालतो. मार्गशीर्ष ते चैत्र मासादरम्यान पवित्र कृष्णानदीच्या महाबळेश्वर ते मिरज पर्यंतच्या वेगवेगळ्या तीर्थस्थानांवर चालणाऱ्या कृष्णाबाई महाउत्सवातील सुरुवात मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला बावधन मधील उत्सवाने होते. महाराष्ट्रात जेवढे कृष्णाबाईचे उत्सव साजरे केले जातात त्याची सुरुवात वाकेश्वर म्हणजे आत्ता बावधन मधील वरची आळी, शिवाजी चौक येथून केली जाते. पूर्वी हा उत्सव वाकेश्वर येथे होत असे. वाकेश्वर गावापासून लांब असल्याने तेथील उत्सव थांबवून पाच दिवस चालणारा हा उत्सव सध्या बावधन येथे साजरा केला जातो. वाकेश्वर हे बावधनवासीयांचे महत्वाचे श्रद्धास्थान आहे. आषाढी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्रीला कृष्णा नदीमध्ये स्नान करून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी बावधनकर आवर्जून जातात. तसेच प्रत्येक श्रावण सोमवार, आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भैरवनाथ आणि इतर देवतांच्या पालख्या पवित्र स्नानासाठी अद्यापही वाकेश्वरला जातात. श्रावणातील शेवटच्या सोमवारी अनपटवाडी गावातील वाकडेश्वर या ग्रामदेवतेची देखील पालखी वाकेश्वरला पवित्र स्नानासाठी जाते. ही परंपरा वाकडेश्वर मंदिराच्या पुनर्निर्माणानंतर सुरू झाली आहे. यामध्ये गावातील सर्व लहान थोर मंडळी उत्साहाने सहभागी होऊन या दिवशी कृष्णा नदीत पवित्र स्नान करतात. पालखीत देवतांची विधीवत पूजा करून वाकेश्वर मंदिरासमोर आरती केली जाते व प्रसादाचे वाटप केले जाते.

 


नंतर वाकेश्वर मंदिराचे मालक बाबूराव बल्लाळ खेर (गोविंद बल्लाळ खेर उर्फ बुंदेले भाऊ) नोकरी व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झाले. दर महाशिवरात्रीला मंदिराचे ट्रस्टी खेरांचे वंशज वाकेश्वराला अभिषेक घालायचे व विधीवत लघुरुद्र करून अकरा ब्राह्मणांना दक्षिणा देत. हल्ली ते इकडे येेत नाहीत. मग मंदिरातील पूजा आणि इतर जबाबदारी स्थानिक पिसाळ (पाटील) कुटुंबियांनी स्वतःहुन घेतली. सध्या युवराज पिसाळ (पाटील) मंदिरातील सर्व गोष्टींची काळजी घेत आहेत व देखभाल सांभाळत आहेत. श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीच्या दिवशी पिसाळ कुटुंब भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करते. या मंदिराच्या कळसाचा कधी जीर्णोद्धार झाला नाही पण वाईतील आहेर तसेच मुजुमदार आणि मंडळी यांनी स्वखर्च तसेच लोकवर्गणीतून खेरांचा मालकीहक्क शाबूत ठेवून मंदिराची किरकोळ डागडुजी व दुरुस्ती केल्याचे सांगितले जाते. बावधनला बाबुराव बल्लाळ खेर यांनी एक मोठा चिरेबंदी वाडा बांधला होता. हा वाडा जननी आई मंदिरा जवळ आहे. येथे कोणीही राहत नसल्याने छप्पर आणि भिंती कोसळल्या आहेत. सध्या तो पडलेल्या व बंद अवस्थेत आहे. याच खेरांनी बांधलेली प्रसिद्ध चौधरी बाळ विहीर (मोठी किंवा थोरली विहीर) आजही अस्तित्वात आहे.

अलीकडील गेल्या काही वर्षाच्या कालखंडात खेर यांच्या नातेवाईकांनी घरातील कागदपत्रे व नोंदींच्या आधारे वाकेश्वर येथे येऊन मंदिर परिसरात वायव्य कोपऱ्यात उत्खनन केले होते व त्यातून त्यांना काही गोष्टींचा उलगडा झाल्याचे लोक अजून सांगतात.

मंदिराच्या शेजारी बावधन गावची स्मशानभूमी असल्याने हे मंदिर एवढे प्रसिद्ध नव्हते. मध्यंतरी बराच काळ या मंदिर आणि परिसराकडे दुर्लक्ष झाले होते. पाटील कुटुंब जेव्हा वाकेश्वर परिसरातील आपल्या शेतात राहायला गेले त्यानंतर त्यांनी आपत्तीपासून रक्षण व आशीर्वादित ठेवण्यासाठी या परिसराचा आणि मंदिराचा कायापालट केला. आजही त्यांच्या कुटुंबातील युवराज पाटील हे देवपूजा, भक्ती व परिसर स्वच्छता याची काळजी घेत आहेत. जरी हे मंदिर वैयक्तिक मालकीचे असले तरी पुरातत्व विभागाने या दुर्लक्षित मंदिराकडे लक्ष देऊन त्यास पुनर्रजीवित करावे असे वाटते.

कलाकुसरीचा एक उत्तम नमुना, देवळाच्या खांबांची रचना, दगडावरील नक्षीकाम, देवळाचे टुमदार शिखर, देवळासमोरील नंदी या सर्व आकर्षक बाबींमुळे या देवळाचे महत्व सर्वश्रुत आहे. या निसर्गरम्य ठिकाणी नेहमी सहली येतात.

संदर्भ:
१. मराठी विश्वकोश
२. श्रीक्षेत्र वाई वर्णन, गो.वी. आपटे १९११
३. वाई: कला व संस्कृती, डॉ. सु. र. देशपांडे, २००५
४. भैरोबाचा नवस; बावधनचे बगाड, जयसिंगराव येवले, संजीवनी प्रेस, १९८३.

शब्दांकन: डॉ. केशव यशवंत राजपुरे
९६०४२५०००६
rajpure.com
https://rajpure.blogspot.com/2020/05/vakeshwar.html

ऋणनिर्देश: अजित आबा पिसाळ, विलास बापू पिसाळ, कौस्तुभ वैद्य, डॉ मुजुमदार, सदाशिव ननावरे, वैभव कदम, शिवप्रसाद कुलकर्णी, राजू कुलकर्णी वकील, मधुकर जोशी काका, तेजस अरबुणे, अनिकेत पिसाळ पाटील, युवराज पिसाळ पाटील, सोमेश्वर बागल, शिवलिंग क्षीरसागर, विष्णू धेडे, तसेच इतर काही जणांनी माहिती संकलनात बहुमोल सहकार्य केले. त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते म्हणून सर्वांचे सहकार्याबद्दल खूप खूप आभार. 

Sunday, May 24, 2020

सोनजाई देवस्थान बावधन



सोनजाई देवस्थान, बावधन

सह्याद्रीच्या पर्वत रांगांत वाई व बावधन पंचक्रोशीची विभागणी करणारी, पाचगणी पासून पूर्वेला, पूर्व पश्चिम पसरलेली सोनजाई डोंगर रांग आहे. पूर्वेकडील बाजूस कातळ खडकाचा खडा कडा असल्याने हरीत संपदा नाही व बराचसा भाग बोडका आहे. या डोंगराच्या आग्नेय पायथामूखास इतिहास कालीन बावधन गाव वसलेले आहे. उत्तरेकडे सोनजाई, दक्षीणेकडे वैराटगड व पश्चिमेला कार्तिक स्वामी डोंगरांच्या रांगांनी तयार झालेल्या बंदिस्त खोऱ्यात गाव व बारा वाड्यांची बनलेली बावधन पंचक्रोशी वसली आहे. या निसर्गरम्य सोनजाई पठारावर अंदाजे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील पुराणकालीन गुहा तसेच देवस्थान आहे. या देवस्थानाविषयी आज..

हिंदूंचे प्रामुख्याने चार पंथ आहेत:- वैदिक, वैष्णव, शैव आणि स्मार्त. शैव पंथात शाक्त, नाथ आणि संत असे पोटपंथ आहेत. नाथपंथीयांनी भारतभर हिंडून आपल्या सांप्रदायाचा प्रसार केला होता. महाराष्ट्रातील नाथ पंथाच्या इतिहासावरून या पंथाची सुरुवात सुमारे नवव्या शतकाच्या पूर्वार्धात झाली असावी असे मानतात. या पंथाची परंपरा आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, जालंदरनाथ, निवृत्तीनाथ अशी आहे. सांगली जिल्यातील वाळवा तालुक्यात मच्छिंद्रगड येथे मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. नाथ सांप्रदायात हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते. नाथपंथीय लोक सातारा जिल्ह्यातही वास्तव्य करून आपल्या पंथाचा प्रचार करत होते. हे नाथपंथिय लोक बावधनच्या उत्तरेकडील सोनाजाईच्या व दक्षिणेकडील जांभूळण्याच्या डोंगरावर तसेच खोऱ्यात येवून राहिले असावेत असे वाटते.

साधू पुरुषाला संपत्तीचा मोह नको म्हणून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाच्या झोळीतील श्रीलंकेहून आणलेली सोन्याची वीट ओझर्डे आणि बावधनच्या शिवारातील कृष्णा नदीच्या सोनेश्वर डोहात टाकली होती. त्यामुळे गोरक्ष मच्छिंद्रनाथांवर भयंकर रागावले. तेव्हा बावधनच्या उत्तरेस असलेला संपूर्ण डोंगरच मच्छिंद्रनाथांनी सोन्याचा करून टाकला आणि "तुला हवे तेवढे सोने घे" असे सांगितले. त्यावर गोरक्षानी मच्छिंद्रनाथांची माफी मागितली. या पुराण कथेचा नवनाथ ग्रंथात उल्लेख आहे. हाच तो बावधन च्या उत्तरेस असणारा सोन्याचा अर्थात सोनजाईचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे.


या नाथपंथीय भिक्षुक गोसावी समाजाचे सोनजाईच्या डोंगरावर मठामध्ये आजही वास्तव्य आहे. हे गोसावी धनगर समाजातील असून त्यांची वस्ती या संप्रदायाच्या निर्मितीपासून या डोंगरावर असल्याचे दिसते. नाथपंथातील जे अनेक पोटभेद आहेत त्यात कानफाटे गोसावी हा एक प्रकार आहे. हे लोक कान विदीर्ण करून त्यात कुंडले घालतात. त्यांना डवरी गोसावी असे म्हणतात. हे लोक अंगाला भस्म लावतात, जेवनाचे वेळी पुंगी वाजवून नंतरच अन्नग्रहण करतात. आजही शंख फुंकून, भस्म लावून हे लोक देवाची भक्ती करीत असल्याचे दिसते. "गुरु" हा रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त अभिनव नातेसंबंध आहे. "गुरु" केल्याने आपणास काही नियमांचे पालन करावे लागते. यात आपण कुणाचेतरी अनुयायी होता. मठावर नवरात्रात कान फुंकुन गुरु करण्याची प्रथा आहे व गुरु करण्यासाठी बहुजन समाजातील लोक आजही तेथे जातात.  

सोनजाईच्या डोंगरावर सोनूबाई आणि काळुबाई देवतांची मंदिरे असून ही दोन दैवते धनगरांची आहेत असे म्हणतात. ठोंबरे धनगराच्या भक्तीला प्रसन्न होऊन या देवता येथे आल्या आहेत अशी धारणा आहे. पूर्वीच्या काळी ठोंबरे धनगर आणि ब्राह्मण भक्त यांचे पूजा करताना कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचा गदारोळ होताच घरणीकंप झाला, पश्चिम बाजूचा कडा कडाडला, मोठाले आवाज ऐकू येऊ लागले, दरडी कोसळू लागल्या, धूळ उडून जमीन हादरू लागली. त्यामुळे ब्राह्मण घाबरला आणि जीव वाचवण्यासाठी पळून गेला. त्या ठिकाणी धनगर मात्र घाबरला नाही. त्याने पटकूर घेतलं आणि मूर्तीवर टाकून कोसळणारी मूर्ति सावरून धरली. धनगराची ही भक्ती पाहून देवी त्याला प्रसन्न झाली. अशा प्रकारची एक दंतकथा सांगीतली जाते. म्हणूनच धनगर लोक शेंडी काढून, करगोटा तोडून व संन्याशी गोसावी होऊन या देवीची पूजा आजतागायत करत आहेत. हा कथाभाग काल्पनिक असला तरी ही देवता सर्वांची आहे कारण या देवीची पूजा बहुजन समाजातील सर्वच लोक करतात. तसेच सोन्याच्या डोंगरावर बसलेली देवी ती सोनजाई असाही कथाभाग लोक सांगतात.

महाराष्ट्रातील अखंड अग्निजन्य खडक कोरीव कामासाठी अनुकूल आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गुहांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील या प्राचीन गुहा तत्कालीन व्यापारी मार्गावर किंवा एखाद्या मोठ्या व्यापारी केंद्राजवळ अस्तीत्वात होत्या, असे दिसते. सोनजाई डोंगरावर असलेल्या खडकातल्या पुराणकालीन लेण्या नाथ पंथीयापूर्वी हीनयान बौद्ध संप्रदायाच्या बुद्ध भिक्षूंच्या गुहा असाव्यात असा तर्क लावला जातो. म्हणजे या खोल्या सुमारे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील असाव्यात असा अंदाज करता येतो. सह्याद्रीतील सोनजाई रांग म्हणजे कोंकण आणि देशभाग जोडणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ असल्याने कोकणातून देशावर आलेले व्यापारी पूर्वी या डोंगरावर वास्तव्यास रहात असावेत असे वाटते तसेच या भागात तेव्हा एक मोठे व्यापार केंद्रही होते. म्हणून नंतरच्या काळातील या लेण्यांचे अस्तित्व तार्किक विचारांनी समर्थित आहे.

सोनुबाई देवीचे देऊळ डोंगरावर मध्यभागी दाट झाडीत खड्ड्यात बांधले आहे. हे मंदिर दगडात बांधलेल्या बंदिस्त दुमजली वाड्यात आहे. या ठिकाणी खडकात कोरलेली पाण्याची तळी व निवासासाठी खोल्या काढल्या आहेत. येथे नवरात्रात देवीचा जागर घालतात व तेव्हा अनेक लोक देवीच्या दर्शनासाठी येतात. मंदिराच्या दक्षिण बाजूस येथील भक्त गोसाव्यांची दफनभूमी आहे. त्यांच्या पैकी कोणाचाही कुठेही देहांत झाला तरीही त्याला विधिवत येथेच दफन केले जाते. शेजारीच भोनजाईचे दक्षिणाभिमुखी देऊळही आहे. डोंगरावर पश्चिमेच्या बाजूला काळूबाईचे मंदिर आहे. चिंचोळ्या डोंगरकड्याचा योग्य वापर करून त्यांनी हे छोटेसे दौलदार मंदिर बांधले आहे. समोर टुमदार दर्शन मंडप बांधला आहे. अनपटवाडी गावचे आत्माराम सुतार यांनी या बांधकामास योगदान दिले आहे. या देवतेचीही उपासना धनगर गोसावी परंपरेने करत असल्याचे दिसते. काळूबाईच्या मंदिरापाठीमागे डोंगराला मोठी दरी (खिंड) आहे. कृष्णा नदी दक्षिण वाहिनी करून ती बावधन वरून पुढे जावी यादृष्टीने भिमाने ती दक्षिणवाहिनी करण्याचा निश्चय केला होता. मात्र हे काम कोंबडा आरवायच्या आत पूर्ण व्हायला पाहिजे अशा प्रकारची अट देवीने घातली होती. त्यानुसार भिमाने एकच खोरे मारले इतक्यात कोंबडा अरवला. त्यामुळे भीमाचा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. हा संकल्प पूर्ण होऊ शकला असता तर नदीचा प्रवाह नैसर्गिक राहिला नसता. काळुबाई देविने मुद्दामून लवकर कोंबडा आरवून याच्यामध्ये घाट घातला होता अशा प्रकारची एक दंतकथा या भागातील लोक आजही सांगतात. या खिंडीला "भीमाचे खोरे" म्हणूनही संबोधले जाते.

या देवस्थानाची यात्रा नवरात्रात असते. पहाटे पाचला देवीची आरती होते. नऊ दिवस रात्रभर होम-हवन, प्रवचन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन असते. दररोज महाप्रसादाचे वाटप असते. दिवस बंद भक्तजन भजनाचा कार्यक्रम करतात. दसऱ्या दिवशी पालखीतून देवतांच्या मिरवणुकीचा छबिना दिवसभर रंगतो. छबिन्यासाठी बावधन व वाई पंचक्रोशीतून बरीचशी ढोल वादक मंडळी येतात. सकाळी अकरा ते संध्याकाळी चार पर्यंत छबिना चालतो. वाहतुकीची सुविधा नसलेल्या व दुर्जन भागात वसलेल्या या तुलनेने कमी लोकप्रिय तीर्थक्षेत्राच्या यात्रेत फेरीवाले, खेळण्याची व खाऊची मोजकीच दुकाने येतात. यात्रेनिमित्त सोनजाई मठामार्फत प्रसादाचे वाटप केले जाते. पंचक्रोशीत या देवतेच्या महातम्याचा प्रभाव असल्याने यात्रेदिवशी बावधन मधील भाविक कडाकणी व धपाट्याचा नैवेद्य सोनजाईला घेऊन जातात.

मठ म्हणजे साधू किंवा बैरागी किंवा भिक्षुक गोसाव्यांचे निवासाचे तसेच एकांतात साधना करण्याचे ठिकाण. सोनजाई मंदिराच्या आवारात मठाच्या चार खोल्या आहेत. त्या ठिकाणी मुख्य चालक गोसाव्याबरोबर सात ते आठ इतर सहकारी असतात. इथे राहणारे सर्व भक्त ब्रह्मचारी असतात. त्यामुळे येथील गोसाव्यांचा वंश विस्तार होत नाही. त्यांना देवाची भक्ती, मठाची देखभाल, शेती करणे व मठाची जनावरे सांभाळण्याचे काम करावं लागतं. मठ व देवस्थानच्या मालकीची सोनजाई डोंगरावर पाची देऊळ कडा ते बुवासाहेब खिंड इथपर्यंत कडेपठार व दोन्ही बाजूला डोंगर जमीन आहे. मंदिराच्या पूर्वेकडील माथा पठारावर बैलांच्या साह्याने जिराईत शेती केली जाते. तसेच पश्चिमेकडील वारली डोंगर शिवारात जनावरांना चारण्यायुक्त कुरण आहे. आता यात सागवानचे चांगले वन तयार झाले आहे. सोमजाईवर ५० जनावरांची व्यवस्था होईल एव्हढा भव्य गोठा आहे. पूर्वी देशी खिल्लार गाई, बैल व म्हशी अशी मिळून ३० ते ४० जनावरे मठावर असायची. पूर्वी बकरीही असायची. गेल्या आठ दहा वर्षांत तेथील कष्टाळू व कर्तुत्ववान गोसावी सेवकांची संख्या रोडावल्यामुळे खिल्लार गाई व बैल या जनावरांची संख्या कमी झाली आहे. म्हशी व बकरी पालन पूर्णतः बंद झाले आहे. जनावरांमध्ये प्रामुख्याने पाच ते सहा बगाड गाड्यास जुंपण्यायुक्त बैलांचा समावेश असतो. तसेच बावधन मधील धनगर वाड्याच्या वरच्या बाजूस व बावधन ओढा येथील उंची पिपळ या ठिकाणीदेखील मठ व जनावरांसाठी गोठे आहेत. उन्हाळ्यात सोनजाई येथील मठावर पाणी तसेच चारा कमी पडल्यावर ही जनावरे या गोठ्यांवर आणली जातात.

माठावरील गोसावी समाजाच्या बैलांना बावधनच्या बगाडात पिसाळ तरफे कडून नाथसेवा करण्याचा मान असतो. नेहमी मठाची खिल्लार जातीची पाच ते सहा बैल बगाडात नक्कीच असतात. घरच्या गाईची जातिवंत खिल्लार खोंड पाळून जोपासायचा छंद त्यांनी अद्याप जपलाय. या बैलांवर वर्षभर जरी मठाची शेती केली जात असली तरी मूळ उद्देश बागाडासाठी बैल तयार करणे हाच असतो. धष्टपुष्ट व शक्तिशाली बैल हा त्यांच्या बागाडातील बैलाच्या ताफ्याचे आकर्षण असते. या बैलांचे बागाडात विशेषत धुर्वी व चावरीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन असते.

मठावरील सर्व कारभार व उदरनिर्वाह भक्तांनी दिलेल्या भिक्षा व दानावर पूर्णतः अवलंबून असतो. ही भिक्षा पैसे, वस्तू, धान्य, पशू इत्यादी स्वरूपाची असते. हे गोसावी भगवे कपडे चढवून देवाची भक्ती व सेवा करत असायची. पण याचे सोवळ त्यांना पाळता येत नसल्यामुळे आता ते साधारण कपडे परिधान करतात. ही मंडळी पौष महिन्यांमध्ये भिक्षेसाठी बाहेर पडतात. पूर्वेकडील तालुक्यात धनगर समाज जास्त विखुरलेला आहे त्यामुळे तेथून पुरेशी भिक्षा मिळते. या मदतीच्या माध्यमातूनच त्यांनी डोंगरावर जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे.

पूर्वी माठावरील गोसावी सर्वांचा स्वयंपाक, जनावरांच्या धारा काढून सर्व जनावरांना चारून आणण्याचे काम करत असत. तेव्हा मठावर जनावरे, दूध दुभत्याची चंगळ असे. सध्या कमी मनुष्यबळामुळे त्यांनी जनावरांची संख्या कमी केली आहे. यामुळे मठावरील कामाचा बोजा कमी झालाय. म्हणून त्यांनी त्यांच्या समूहातील लहान मुलांना शिक्षित करायला सुरुवात केली आहे. काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी श्रद्धा सांभाळून अंधश्रद्धेस फाटा दिलेला आहे. तरीपण पुढे त्यांना ब्रह्मचारीच राहावे लागणार हे मात्र नक्की.

फुलांचे ताटवे, वनराईची दाट सावली व थंडगार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हे स्थळ निसर्गरम्य बनले आहे. पठारावरून आपण बावधन व वाई पंचक्रोशी चे "बर्ड आय व्हीव" ने विहंगम दृश्य बघू शकतो. बऱ्याच शाळांच्या सहली या निसर्गरम्य ठिकाणी येतात तर काही हौशी लोक वनभोजनासाठी या स्थळाची निवड करतात. दसर्‍याच्या उत्सवात पतंगाच्या काटाकाटीचे खेळ लोक हौसेने येथे खेळतात. तसं बघायला गेलं तर सोनजाई मठ जलसंपत्तीच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. मठावर असलेल्या तळ्याचे पाणी उन्हाळ्यात कमी होते व शेवाळाने खराब होते. म्हणून ही कमतरता टाळण्यासाठी तसेच प्रदूषण मुक्तता व्हावी यासाठी ते पर्यायी पाणी व्यवस्थेचा विचार करत होते. अलीकडेच त्यांनी पवनगंगा नदी काठाच्या विहिरीतून लिफ्टने सोनजाईवर पाणी उचलण्याचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे आहे. आशा आहे की हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येईल. यामुळे हे दुर्गम व पवित्र ठिकाण भक्तांसाठी व पर्यटकांसाठी अजून सुंदर व सुविधांनी युक्त होईल.

मठाला जाण्यासाठी मोठी सडक किंवा घाट रस्ता नाही. वाई तसेच बावधनच्या बाजूने छोटी पायवाट अस्तित्वात होती. डोंगराच्या वरच्या टप्प्यात असलेल्या अखंड पाषाण खडकामुळे रस्ता करणे सहज शक्य झालं नाही. वाईच्या बाजूने तर खडा डोंगर असल्याने घाट रस्ता करणे शक्यच नाही. त्यामुळे हे देवस्थान दुर्गम बनले आहे. बावधनच्या बाजूने शेवटचा टप्पा सोडून इतर भागात घाट करणे थोडे सोपे होते. त्यामुळे अलीकडेच डोंगराच्या माथ्यावर छोटा ट्रॅक्टर जाऊ शकेल एवढा रस्ता त्यांनी तयार केला आहे. उभ्या खडकांमुळे शेवटच्या टप्प्यावर निमुळता रस्ता तयार झाला आहे. पण सध्यातरी पूर्वीपेक्षा सोनजाई ची वाट सुलभ झाली आहे असे वाटते. यामुळे या धार्मिक व प्रेक्षणीय निसर्गसौंदर्य लाभलेल्या ठिकाणाला भेट देणार्‍यांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

तसं बघितलं तर वाईच्या बाजूने दररोज सकाळी व्यायाम करणारे बरेच लोक दिवस उजाडण्यापूर्वी डोंगर सर करतात. जर दररोज दोनशे ते पाचशे भाविक या देवस्थानास भेट देऊ शकले, तसेच यात्रेवेळी एक लाखापेक्षा जास्त भाविक देवस्थानावर हजर राहू शकले तर शासनाचा तीर्थक्षेत्राचा किमान "क" वर्ग दर्जा मिळू शकतो. हे शक्य झाले तर शासनाकडून देवस्थान विकासासाठी भरीव निधी उपलब्ध होऊ शकतो. भविष्यात हे थंड हवेचे ठिकाण तीर्थक्षेत्र व छोटेसे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यास मदत होईल.

सह्याद्रीच्या रांगांतील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आणि आपल्या श्रद्धेच्या पवित्र ठिकाणास भेट देण्यासाठी सोनजाईला नक्की जायला हवे.

संदर्भ:- भैरोबाचा नवस; बावधनचे बगाड, जयसिंगराव येवले (माजी मुख्याध्यापक, बावधन हायस्कुल), संजीवनी प्रेस, १९८३.

© डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल नंबर: ९६०४२५०००६
www.rajpure.com
rajpure.blogspot.com 

Friday, May 22, 2020

माझे वडील यशवंत राजपुरे


चव्हाण "यशवंत राजपुरे"

यशवंत केसू राजपुरे म्हणजे माझे आजोबा. ३१ डिसेंबर २०१९ रोजी त्यांचे २४ वे पुण्यस्मरण झाले. त्यांच्या कार्याला आठवणींतुन जोडण्याचा माझा हा मनापासूनचा प्रयत्न आहे.

राजपुरी डोंगराच्या पायथ्याला, दोन डोंगरांच्या कोण्यात डोंगर उतारावर वसलेले बावधन पंचक्रोशीतील गाव म्हणजे; दरेवाडी. डोंगरांच्या दऱ्यात वसले म्हणून त्याचे नाव दरेवाडी पडले असावे. पावसाळ्यात जरी पाण्याची मालामाल असली तरी जानेवारी नंतर वाडीमध्ये पाण्याची नेहमी टंचाई भासत असे. गावच्या पूर्व बाजूस उंचावर तटबंदीत बांधलेल्या सलग तीन वाडयांचा समुदाय म्हणजे पुढचा अर्थात "म्होरला वाडा". या वाड्यातील केसू कृष्णा साळुंखे (राजपुरे) यांच्या पोटी यशवंत केसू राजपुरे म्हणजे माझे आजोबा यांचा जन्म झाला. आजोबांना सर्वजण "तात्या" म्हणून ओळखत. तात्यांचा जन्म दरेवाडी मध्ये १९२५ साली झाला. माता अनुसया आणि वडील केसु यांना एकूण चार आपत्य होती. तात्या हे दुसरे चिरंजीव.. थोरली बहीण हरीबाई कृष्णा शिर्के (म्हसवे).. त्यांचा पाठचा भाऊ भगवान आणि शेंडेफळ बबई शिर्के (म्हसवे).. अशी कुटुंबात सहा माणसं होती.

मेणवली मध्येे चौधरी व सणस, म्हसवे मध्ये शिर्के, बोपेगाव मध्ये जाधव आशा तात्यांच्या चार मावश्या. तसेच त्यांना दोन मामा. आपल्या मुलाचे पालन पोषण आणि संगोपन योग्य रीतीने व्हावे म्हणून आई अनुसयाने आजोबांना आपल्या माहेरी म्हणजे पसरणी येथे बंधूंकडे पाठवले होते. श्रीपती बाळा महांगडे हे त्यांचे थोरले मामा गडगंज शेतकरी होते. त्यांनी आपल्या भाच्याचा सांभाळ पोटच्या मुलाप्रमाणे केला. पसरणी (कोलन) हे कृष्णाकाठी वसलेले व निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव.. कृष्णेच्या डोहात पोहणे व शेती कामात मामांना मदत करणे हे त्यांचे काम. तात्यांना शाळेची आवड कमी असल्याने त्यांनी लहान वयात शाळेत जाणे सोडले. त्यांना अक्षर ओळख नव्हती पण ते हिशोबाचे पक्के होते. बुद्धीनेही चाणाक्ष होते. हिशोबाचे बारकावे, जीवन जगण्याच्या कला मामांनी त्यांना शिकवल्या. तात्यांचे बालपण मामाकडे गेले व हळूहळू ते तेथेच रमू लागले होते. पण तात्यांचे आजोबा कृष्णा सतू राजपुरे यांनी नातवाला आपल्या मूळगावी आणण्याचा निर्धार केला आणि आणि मग तात्यांना दरेवाडी ला यावे लागले.

तात्या दरेवाडीमध्ये आल्यावर शेती करून कमाई करून संसारामध्ये जमेल तेवढी मदत करत असत. धाकटा भाऊ भगवान यांचे शिक्षण चालू होते व त्यांचीही नोकरीसाठी धडपड चालू होती. हातावरचे पोट असल्यामुळे रोजच्या रोज कामावरून गेल्याशिवाय क्षुधाशांती होत नसे. गावातील व भावकीतील बरीच मंडळी त्यावेळी मुंबईत मिलमध्ये काम करून चरितार्थ चालवत असत. तेव्हा तात्यांचे चुलते कोंडीबा कृष्णा राजपुरे हे मिलमध्ये जॉबर म्हणून कामाला होते. चुलत्यांप्रमाणे आपणही मिलमध्ये काम करून कमाई करावी या उद्देशाने साधारण १९४२ च्या दरम्यान तात्या नोकरीच्या शोधात मुंबईला गेले. त्यांनाही मिलमध्ये नोकरी मिळाली. तात्यांना तेव्हा दरमहा पन्नास रुपये पगार मिळायचा. धाकटे बंधू भगवान इयत्ता तिसरी पर्यंत शिकले होते. त्यांना मोडी लिपी येत असे. यादरम्यान भगवान यांनाही मुंबई मध्ये नोकरी मिळाली होती. तेव्हा मुंबई येथे चले जाव चळवळीचे (८ ऑगस्ट १९४२) पर्व सुरू होते. १९४५ च्या दरम्यान तात्यांच्या मिलमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला, सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती त्यावेळी तात्या नोकरी सोडून घरी निघून आले. मिलमधल्या अपघाताच्या शांततेनंतर तात्या पुन्हा मुंबईला जाणार होते परंतु यावेळी भगवान यांचा मुंबईच्या साथीच्या आजाराने दुर्देवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर आजोबा कृष्णा सतू राजपुरे हे तात्यांना पुन्हा मुंबईला पाठवण्यास तयार नव्हते. धोका पत्करून मुंबईत जाण्यापेक्षा आपण शेतीमध्ये अपार कष्ट करून उदरनिर्वाह करू शकतो असे कृष्णा आजोबांनी सुचवले आणि तात्या आयुष्यभर शेतीत राहिले.

१९४९ च्या दरम्यान तात्यांचा विवाह जावली तालुक्यातील म्हसवे या गावच्या जानू बाबाजी शिर्के यांची कन्या अंजिराबाई यांच्याशी झाला. त्या वेळेला तात्या २४ वर्षांचे तर आजी नऊ वर्षांची होती. तात्यांची आई म्हणजे पणजी-आजीने सुनेला म्हणजे माझ्या आजीला अगदी मुलीप्रमाणे सांभाळले होते. विवाहाचे धागे-दोरे तात्यांची जेष्ठ भगिनी हरीबाई यांच्यामुळे जोडून आले होते कारण त्यांना म्हसवे या गावांमध्ये विवाहबद्ध केले होते. तात्यांच्या संसारात अंजनाबाई आजीची जोड आणि सहकार्य लाभल्यामुळे गती आली. तात्यांना श्रीमती फुलाबाई शिर्के (म्हसवे, सध्या खंडाळा), श्रीमती कलावती यादव (खंडाळा), कै शारदा निंबाळकर (सुरूर-वहागाव), सौ मीराबाई ढमाळ (अंबारवाडी, खंडाळा) आणि सुरेखा मतकर (विखळे) या पाच मुली व बाळासाहेब व केशव हे दोन चिरंजीव. त्या काळात मुलींचे विवाह लहान वयातच होत असत म्हणून त्यांच्या पालकांच्या दृष्टीकोनातून त्यांचं शिक्षण फार महत्वाचे नसायचे. त्यांच्या प्रत्येक मुलीला एक मुलगा आहे आणि मुलींची एकूण १३ नातवंडे आहेत. पण त्यांचे दोघे चिरंजीव पदव्युत्तर आहेत. बाळासाहेब हे एम.कॉम असून सुरुवातीपासूनच शेतीची देखभाल करत आहेत. डॉ. केशव शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत व युसीक-सीएफसी-सैफ या केंद्रीय सुविधा केंद्राचे विभागप्रमुख आहेत. त्यांचे भौतिकशास्त्र विषयातील संशोधनामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुमूल्य कार्य आहे. बाळासाहेब यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. दादांचा मुलगा आकाश मुंबई महानगरपालिकेमध्ये उपअभियंता या पदावर कार्यरत आहे. तसेच मुलगी वृषाली ही अतिशय हुशार असून तिने पुणे विद्यापीठामधून बी.एससी. फिजिक्स पदवी संपादन केली आहे. ति सध्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत आहे. डॉ. केशव यांना दोन मुली आहेत. थोरली स्नेहा अकरावी सायन्समध्ये शिकत आहे. तिला कविता करायचा छंद आहे आणि तिचे रेखाचित्र कौशल्य उत्कृष्ट आहे. लहान सानवी सातवीत शिकत आहे. सुरुवातीपासूनच ती तिच्या वर्गात अव्वल क्रमांकावर आहे. अशा प्रकारे तात्यांचा बायको, ७ मुले, ५ जावई, २ सुना आणि १८ नातवंडे मिळून कुटुंबाचा विशाल वटवृक्ष झाला आहे.  

तेव्हा अनपटवाडी च्या शिवारातील दत्तात्रय खेरे यांची साडेसात एकर जमीन तात्यांचे आजोबा कृष्णा सतू यांनी खंडाने कसायला घेतली. त्यावेळी या जमिनीला वार्षिक साठ रुपये खंड पडत असे. त्यावेळच्या शेतातील उत्पन्नावर हा खंड देणे देखील कठीण जात असे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९४८ ला कुळ कायदा संमत केला. "कसेल त्याची जमीन" असे तत्व घेऊन कुळ कायदा अस्तित्वात आला. दुसर्‍याची जमीन कायदेशीररित्या कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस त्याला कूळ म्हटले जायचे. या कायद्याने कुळांना अधिकार प्राप्त झाले. या कायद्यातील कलम ३२ ग नुसार दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीररित्या कसत असणाऱ्या व्यक्ती च्या नावे होऊ लागली. आजोबा कृष्णा सतू यांनी खंडाने घेतलेली जमीन कुळ कायद्यांतर्गत तात्यांच्या नावे लावली. जमीन कायदेशीररित्या घेतल्यामुळे जमिनीचे पैसे मूळ जमीनदार दत्तात्रय दिनेश खेरे यांना द्यायचे होते. दरेवाडीतील सर्व कामे आटोपून सकाळी सकाळी अनपटवाडी च्या शेतात यावे लागे. या भागदौडीचा त्रास होऊ लागल्यानंतर व आप्तेष्टांच्या कटकटीस कंटाळून अखेर त्यांनी अनपटवाडीतील शेतात वास्तव्य करायचं ठरलं. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी आमचं कुटुंब वाडीतील शेतात छप्पराची वस्ती करून राहिले.

जमीन तर नावावर झाली पण दरवर्षी पैशाचे हप्ते सुरू झाले. आता मात्र संसाराच्या खर्चासोबत एक नवीन खर्च वाढला गेला. दरवर्षी दिले जाणारे जमिनीचे हप्ते वेगवेगळे असायचे.. कधी जास्त तर कधी सारखेच. घरामध्ये तात्यांचे आजी-आजोबा, आई-वडील आणि या नवरा-बायको एवढयांचा खर्च आणि द्यावी लागणाऱ्या रकमेपाई ओढाताण सुरू झाली. त्यात त्यांना पाच मुली व दोन मुलगे अशी सात आपत्ये. वर्षाकाठचा हप्ता देण्यासाठी प्रसंगी आपल्या बायकोचे म्हणजे आजीचे चांदीचे एक किलो वजनाचे तोडे म्हणजे साखळ्या सोनाराकडे वर्षभर गहाण ठेवायच्या व पुढे पिकाचे पैसे आले की पुन्हा त्या त्यांच्याकडून सोडवायच्या असा कार्यक्रम असे. वडील केसू आप्पा यांच्यासोबत एका बैलजोडी वर ते शेती सांभाळत असत. दरेवाडी व अनपटवाडीतील सर्व जमीन कसायला खूपच मेहनत घ्यावी लागायची. घरखर्चाला पैसे मिळवण्यासाठी इतरांच्या जमिनीच्या ते मेहनती घेत.एवढे करूनही संसारात फारच ओढताना होई. खाणारी तोंडे जादा व कमावणारा एकटाच तसेच शेतीवर सर्व अवलंबून असल्यामुळे त्या वेळेला अगदी संघर्षातून त्यांना वाटचाल करावी लागली. किमान गरजा ठेवून व घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींत घरगाडा चालवावा लागला. ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान.. ही जगण्याची कला त्यांनी अवगत केली होती. याजन्मी आपल्या वाट्याला आलेले प्रारब्ध निमूटपणे भोगणे व कर्म फळाच्या आशा न धरणे ही त्यांची तेव्हा धारणा होती. स्वतःच्या अपेक्षांना थारा दिला नाही. घरच्या गरिबीने मुलांना हौस मौजेच्या वस्तू सोडाच पण शिक्षणासाठीच्या मूलभूत सोईसुद्धा मिळत नव्हत्या. अशा परिस्थितीत सर्वच मुलांनी तात्यांना शेतीकामात मदत केली होती.

पुढे हप्ते संपल्यानंतर ही शेती तात्यांच्या नावावर झाली. गरिबाला मिळालेली ही शेती बळकावण्याचा काहीजणांचा कावा होता. काही जणांनी त्यांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन ही शेती लाटण्याचा प्रयत्न देखील केला. अशावेळी आजी अंजूबाई यांनी त्यांना खंबीर साथ दिली. आजी मुळे ती जमीन टिकली व या ठिकाणी तात्यांच्या कुटुंबाचा निभाव लागला. अशावेळी तात्यांचे म्हसवे गावचे मेव्हणे कृष्णा शिर्के म्हणजेच घोडेवाले किशा बुवा यांनीदेखील गावातील जी माणसे त्रास देत त्या माणसांना-माझ्या मेव्हण्याला नाहक त्रास देऊ नये - असे म्हणून वेळोवेळी सुनावले होते व जरब ठेवली होती. त्यांचा तात्यांना खूपच आधार व पाठिंबा मिळाला.

त्याकाळी शेतीकामासाठी बैलांची नितांत गरज असे. शेतीसाठी अगदी धष्टपुष्ट व मोहक बैलजोडी त्यांनी पाळली होती. त्यांच्यासोबत सेवा केलेले शिल्या, निशान, सागर, पाखऱ्या व पोपट ही सगळी गुणी बैल दादांना आठवतात. दूध दुभत्यासाठी गाई आणि म्हशी असायचा. दूध व दुधाचे पदार्थ मुबलक असत. दरेवाडी ते अनपटवाडी हा डोंगर उतारावरील रस्ता चढ-उताराचा असल्याने उंच चाकाच्या बैलगाड्या उलटण्याची शक्यता असे. या कारणाने तात्यांनी इतरांपेक्षा भिन्न, लाकडी चाके असलेला व उंचीने कमी असलेला बैलगाडीचाच गाडा तयार केला होता. अजुनही या गाड्या ची जुनी चाके घराजवळ आहेत.

अनपटवाडी तील जमिनी बरोबरच खेरे ब्राह्मणाची दरेवाडीच्या पनाशी या शिवारातील शेतीदेखील तात्या बराच काळ कसत होते. ती जमीन देखील कुळ कायद्यांतर्गत तात्यांना मिळाली असती. पण जमीन मालकाचा दुराग्रह व अंतर्गत मत्सर यामुळे ती संधी तात्यांच्याकडून हुकली. तसेच हा खंड म्हणजे खर्चाचा जादाचा बोजा पडणार होता. त्यामुळे त्यावरून तात्यांनी आपला हक्क सोडल्याचे सांगितले जाते. आयुष्यभर तात्या इमानदार जीवन जगले. ते कुणावर रागावत नसत की त्यांची भांडण झालेली ऐकिवात नाहीत. त्यांना कुणी लहान मुलाने "यशवंत" या नावाने जरी हाक मारली तरी त्यास ते "ओ" देत असत. स्वभाव गुणच भोळाभाबडा असल्यामुळे गावगुंडी त्यांना कधी शिवली नाही. वडीलधाऱ्यांचा आदर व थोरामोठ्यांजवळ नम्रता ही ठरलेली. त्यांनी जन्मभर काबाडकष्ट केले मात्र कुणाची गुलामी पत्करली नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण हे सर्वश्रुत आहेत. योगायोगाने तात्यांचे ही नाव "यशवंत". दरेवाडी तुन अनपटवाडीत स्थायिक झाल्याने बर्‍याचजणांना आमचे राजपुरे हे आडनाव माहीत नसे. त्यात तात्यांचा स्वभाव अतिशय गरीब असल्याने चेष्टा व उपहासाने वाडीतील बरेचजण त्यांना यशवंतराव "चव्हाण" म्हणून हाक मारत असत. पण यावर तात्यांनी कधी नाराजी किंवा चिडून जाऊन वादावादी केल्याचे आठवत नाही. किती ती निरागसता व कसला तो संयम..  

तात्या रंगाने सावळे, मध्यम पण मजबूत बांध्याचे व साधारण ५ फूट ६ इंच उंचीचे व्यक्तिमत्व. ते दिसायला एवढे स्वरूपवान नव्हते, मात्र मनाने फार सुंदर होते. स्वभावाने गरीब व ओत पोत नम्रता भरलेली. स्वभावाने गरीब होऊन त्यांनी दिवस काढले. अंगामध्ये खिशाची बंडी, गुडघ्यापर्यंतची खाकी चड्डी, टोपी व असलीच तर फाटकी चप्पल हा त्यांचा सर्वसाधारण पेहराव. आयुष्यात त्यांनी कमी वेळा बस ने प्रवास केला. ते नेहमी पायी चालत गावी जात. म्हसवे, जरेवाडी, हातेघर, पसरणी ही त्यांच्या तास दोन तासाच्या आतच येणारी गाव. त्याकाळी ज्वारी, गहू, हरभरा यांची मळणी यंत्र नव्हती. तेव्हा ही सगळी काम चोपनी किंवा बैलाने रोलर फिरवून केली जात. सारवून स्वच्छ केलेल्या गोलाकार खळ्याच्या मध्यभागी एक लाकडी खांब म्हणजे तिवडा असे. रोलर ला बैल जूपून मळणी केली जाई. पहाटे तीनला उठून त्यांची रास सुरु होई ती जेवणापर्यंत चाले. मग वावडी वर उभा राहून धान्य वाऱ्याला दिले जाई. दरवर्षी तीस पोती धान्याची मळणी आजी व तात्या घरी करत.

तात्यांनी जन्मभर कष्ट उपसले. त्यांच्याइतके शरीरकष्ट कुणी केले नसावे. शेतीबरोबरच घरखर्च व शेतीच्या हप्त्यापायी त्यांना मजुरी करावी लागे. ते शेतातील कामे, बैलगाडीची कामे, ताली धरणे, शेतात चळी लावणे, विहीर खोदकाम, गाळ काढणे, झाडे तोडणे, गंज लावणे या आणि अशा सर्व प्रकारच्या कामानिमित्त पंचक्रोशीतील बऱ्याच जणांच्या घरी मजुरी करत.अनपटवाडीतील संपतराव गोळे आणि सदाशिव मांढरे यांचेकडे ते कायम कामे करत. बर्‍याच वेळा त्यांनी तात्यांना आगाऊ पैसे दिले आणि पैसे परत मिळण्यासाठी कधीही तगादा लावला नाही. यादोघांप्रती तात्यांच्या मनात फारच आदरभाव होता.

पावसाच्या पाण्याने होणारी डोंगरउतारावरील जमिनीची धूप थांबवण्यासाठी शेत बांधावर दगडाच्या ताली बांधल्या जायच्या. तालीच्या पायासाठी लागणारे  मोठाले दगड डोंगरातुन आणले जायचे. एक कारागीर म्हणून तात्या या ताली बांधकामातील मोठे तज्ज्ञ होते. या कामासाठी त्यांना लांबलांबून बोलावणे येई. थोडक्यात शेतातील स्थापत्य कलेची चांगली जण त्यांना होती. कुठला दगड कुठल्या ठिकाणी व कुठल्या दिशेने योग्य बसेल हे ते लगेच जाणत. मोठ्या दगडांच्या हालचालीसाठी आवश्यक ताकद व तंत्र त्यांच्याकडे होते. योग्य पद्धतीने मोठया मोठ्या दगडाच्या दहा दहा फूट उंचीच्या लांबलचक ताली त्यांनी बांधल्या आहेत. त्यांनी बांधलेल्या कित्येक ताली अद्याप मजबूत अवस्थेत आहेत.

पूर्वी घरांना गवत आणि पाचटीचे छप्पर असे. पावसाळ्यापूर्वी प्रत्येकजण आपल्या छप्परची दुरुस्ती करत असत. त्याला घर शेखरणी असे म्हणत. तात्या या घर शेखरणी कामात अतिशय पारंगत होते. त्यांचे काम इतके अचूक असे की त्यांनी शेखरलेल्या घरातून पावसाच्या पाण्याची गळती कधी होत नसे. जनावरांसाठी छप्पराचा गोठा तयार करायची कला त्यांच्याकडे होती. शेतातील वैरणीची गंज लावणे हा तर त्यांच्या हाताचा मळ. कुठलेही साधन किंवा मापक न घेता त्यांचे लावणी फारच उत्कृष्ट असे. गंज ते इतक्या योग्य सममितीत लावायचे की काही झाले गंज जागची हालत नसे, वैरण ढासळत नसे तसेच वैरण पावसाळ्यातदेखील भिजत नसे. 

इतर मजुरीच्या कामांबरोबरच तात्यांनी पंचक्रोशीतील बऱ्याच विहिरींची खोदाईची कामे केल्याचे सांगतात. विहीर कामात ताकद, दम व कष्टाची आवश्यकता असायची तिथे तात्या असत. विहिरीत खडक लागला की त्यांचे काम विहीरीच्या तळाला असे. कातळ खडक फोडायचे कौशल्य त्यांच्याकडे होते. त्यामुळे यासाठी त्यांना कायम बोलावले जाई. सुरंगासाठी नेम घेणे व सुरुंग उडवायची ची कामे तात्या करत. तात्या कधी घरी निवांत एक दिवस राहिलेले ऐकिवात नाही. त्यांचा स्वभाव कामसू आणि आराम त्यांच्या दिनचर्येत नसे. त्यांच्या काळात तात्यांनी बावधन मधील केशव बाबा यांची विहीर, काळ्यारानातील त्रिंबक भोसले यांची विहीर, दरेवाडीतील यशवंत वाडकर यांच्या दोन विहिरी, चुलत्यांची मळवी ची विहीर, कणुर येथील चौथाई तील मारुती राजपुरे यांची विहीर, म्हातेकरवाडीतील आण्णा बाबांच्या काकांची विहीर; अशा अनेक विहिरींवर कष्टमय मजुरी केली होती. त्याकाळी दिवसाला सव्वा रुपये हजेरी असायची, तेवढ्या पैशात तेव्हा एक किलो साखर विकत मिळत असे.

बरेच दिवस दरेवाडीतील यशवंत वाडकर (येसू आबा) यांनीदेखील तात्यांचा संसार गाडा चालवण्यास आर्थिक व नैतिक पाठिंबा दिला, कौटुंबिक अडचणी सोडविल्या व साथ दिली. तात्यांनी नातेवाईकांशीचे सर्व संबंध जपले व नेहमी नात्यांची काळजी घेतली.  तात्यांची मावळण (आत्या) अनपटवाडीतील केशव अनपट यांच्या घरात दिली होती. त्यांना शेवटी अंधत्व आले होते. अशा परिस्थितीत तात्या आपल्या आत्यास पाठीवर घेऊन माहेरी आणत. तिचा उचित पाहुणचार व साडीचोळी करून पुन्हा सासरी नेऊन सोडत. ज्या थोरल्या मामांनी तात्यांना त्यांच्या बालपणी सांभाळले त्या मामांच्या म्हातारपणातील आजारपणात देखील बराच काळ तात्यांनी त्यांचा सांभाळ केला.

तात्यांच्या घरात गरिबी होती तरी घरातून कुणीही उपाशीपोटी जात नसे. धनधान्याची तशी आबाळ नसायची. तात्यांकडे माणुसकी व दानत होती. बारा बलुतेदारांसाठी तर तात्यांचे घर म्हणजे आपलेच घर असे. तेव्हा घरात घरातीलच वस्तू वापरात असत. त्यांना फक्त चहा, साखर, काडीपेटी आणि रॉकेल साठी दुकानात जावे लागे. शेतातील अन्नधान्य तसेच शेंगतेल भरमसाठ असे. तेव्हा शेतातील कामे एकजुटीने होत. शेतकामासाठी सहकार्य भावनेतून "वारंगुळा" करून कामे करण्याची पद्धत असे. त्या वेळेलाही शेतकामासाठी मजूर मिळत नसत तरी कुठलेही काम नडत नसे. लोकांशी संवाद साधण्याचा त्यांचा अंदाज मात्र काही न्यारा असे.

त्यांच्या मजुरीच्या कार्यकालात त्यांना बऱ्याच जखमा झाल्या, बळावल्या व बर्‍याही झाल्या होत्या. पण एकदा डोंगरात गेले असताना दगड पायावर पडून झालेली जखम मात्र बरेच दिवस बरी झाली नव्हती. त्यात ते डॉक्टरांच्याकडे जायला नको म्हणत. अशात संसर्ग होऊन जखम चांगलीच चिघलळी होती. पण तशातही त्यांनी कष्टाची कामे चालूच ठेवली होती. स्वतः हा त्रास सहन करून कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी कमाईसाठी मजुरीवर जाताना थांबले नाहीत.

माझे वडील दादा कळते झाल्यापासून, अगदी शिक्षणा दरम्यानही तात्यांना शेती कामात मदत करत असत. वडील केसु यांच्या निधनानंतर तात्यांना हा हक्काचा आधार मिळाला होता. तात्यांनी दादांना शेतीबद्दल संपूर्ण माहिती शिकवली व शेतीकामात निपून केले. या गोष्टीमुळे दादांना तात्यांच्या म्हातारपणात व निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पेलायला मदत झाली. आम्हा सर्वांसाठी तात्या नंतर दादा हेच वडिलांच्या स्थानी आहेत.

त्यांच्यासाठी शेती व मजुरीवर घरखर्च तसेच मुलांचा शिक्षण खर्च करणे जिकरीचे होई. त्यामुळे आजी आजोबांसाठी तेव्हा कुटुंब चालवणे खूप कठीण जाई. घरात अठरा विश्व दारिद्र्य. घरातील गरजा भागवण्यासाठी पैसे नसायचे. त्यात मुलांचा शिक्षण खर्च म्हणजे संसार वस्तुत फाटा. त्यामुळे आजींचा मुलांच्या शिक्षणासाठी मनाविरुद्धचा विरोध असायचा. पण त्या गरिबीत सुद्धा आपल्या मर्यादेत राहून दोघांनी आपल्या मुलांना शिकवलं. मुलांच्या शिक्षणादरम्यान ज्यादाची मजुरीची कामे करून त्यांना लागणारे साहित्य, पास व इतर सुविधांची पूर्तता त्यांनी केली. तात्यांच्या तडजोडीस व त्यागास जोड नव्हती.

काकांच्या शिक्षणानंतर त्यांनी लवकरात लवकर नोकरीत कायम होऊन स्थिरस्थावर व्हावे ही तात्यांची अपेक्षा होती. तोपर्यंत काकांच्या सहाद्यायांची दहा- दहा वर्षे कायम सेवा झाली होती व त्यांची कुटुंबे स्थावर झाली होती. तात्यांना काकांच्या स्थिर-स्थावरतेची चिंता लागून राही. ते त्यांच्या मित्रांजवळ भावनिक निरोप देत की- आता बस झालं शिक्षण, लवकरात लवकर नोकरीचं बघा. काकांचे मित्र ही त्यांना विश्वासात घेऊन काकांच्या वतीने आश्वासन देत की- तात्या थोडं थांबा, तो लवकरच साहेब होईल. पण लेकाच्या साहेबपणातील सुख तात्यांच्या नशिबी नव्हते व शिक्षणा दरम्यानच ते निघून गेले.

त्यांचा स्वभाव खूप मायाळू, प्रेमळ, हळवा, सरळमार्गी व समोरच्यावर छाप पाडणारा होता. आपल्या सर्व लेकरांचा ते लाड करत. त्यातल्या त्यात लेकींच्‍यावर त्यांचा फार जीव असे. आपल्या मुलींना ते ज्यादा शिकवू शकले नाहीत पण त्यांच्या योग्यतेची गरीब लायकी का होईना, स्थळ मिळवून कर्जबाजारी न होता लग्न लावून दिली होती. लेकी नांदुन माहेरी आल्या की तात्यांचे पाय जमिनीवर नसत. काही दिवसांच्या मुक्कामानंतर त्या परत सासरी जाताना तात्या खूप भाऊक होत. बऱ्याचदा त्यांना रडू आवरत नसे. त्यांची लहान मुलंही हा प्रकार बघून खूप रडायचे. त्यांच्या याच स्वभावामुळे तात्यांनी आपल्या धाकट्या बहिणीचा तिच्या लग्नानंतरही आजारपणात बराच काळ सांभाळ केला होता.

या कष्टमय प्रवासात तात्यांनी आपल्या मुलांवर खूपच आदर्शवत संस्कार घडवले म्हणूनच मुलांच्या आयुष्यातील मानवतेची मुळं इतकी घट्ट आहेत की आयुष्यात कधीही कोणी याबाबत त्यांच्याकडे बोट दाखवू शकत नाही. ते नेहमी वर्तमानात जगले व भविष्य संबंधी कधी चिंता करत नसत. आज आनंदाने जगूया उद्याचा विचार उद्या करू हे तत्त्व त्यांनी कायम अवलंबले. फुकटच्या वस्तू व यशाची अपेक्षा करू नका- ही त्यांची कायमची शिकवण मुलांसोबत आहे. खोटे बोलून कुणालाही लुबाडून मोठे होऊ नका हा संदेश मुलांनी कायम जपला आहे. स्वतः अनपढ असूनसुद्धा त्यांनी आपल्या मुलांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृत देखील बनवले आहे. त्यांच्या संस्काररुपी शिदोरीवर त्यांची सर्व अपत्ये वळणदार आयुष्य जगत आहेत.

ऑक्टोबर १९९५ च्या दरम्यान वार्धक्य व प्रकृती अस्वस्थ यामुळे तात्या आरामासाठी त्यांचेेेे खंडाळ्याचे भाचे सदाशिव शिर्के व लेक फुुलाबाई यांच्याकडेे महिनाभर राहिल्याचे आठवते.  ही मात्र त्यांच्या आयुष्यातील पहिलीवहिली we're सक्तीची विश्रांती होती. त्यानंतर ते पुन्हा अनपटवाडीस आले. त्या वयात मात्र त्यांना घरातील किरकोळ वादही सहन होत नसत. इतके दिवस जीवापाड संभाळलेला संसारगाडा आपली पुढची पिढी व्यवस्थित चालवते का याचं दडपण त्यांना कायम असे. धाकट्या मुलाचे स्थिर-स्थावरता व सुखी संस्कार बघणं बाकी होते. अशातच या कष्टकरी तसेच परिस्थितीने गरीब पण मनाने श्रीमंत तात्या आजोबांचा माझ्या आईकडील आजोबांच्या रक्षाविसर्जन कार्यक्रमादरम्यान ३१ डिसेंबर १९९५ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने देहांत झाला. तात्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन.

शब्दांकन: वृषाली बाळासाहेब राजपुरे
संपादन: डॉ केशव यशवंत राजपुरे

Saturday, May 16, 2020

अगस्तेश्वर मंदीर, पांढरेचीवाडी, बावधन


अगस्तेश्वर मंदीर, पांढरेचीवाडी, बावधन
 
अलीकडेच डेक्कन महाविद्यालय, पुणे येथील पुरातत्वशास्त्र विभागातील संशोधक शंतनु वैद्य व जयेंद्र जोगळेकर यांनी २०१६ साली बावधन पंचक्रोशीतील काही ठिकाणांच सर्वेक्षण करून दोन शोध निबंध प्रकाशित केले होते, ते वाचनात आले. त्यांच्या संशोधनाचा मूळ उद्देश दख्खनच्या पठाराचा पुरातत्व संदर्भातून अभ्यास व सह्याद्री घाट या कोकणातील तत्कालीन व्यापाऱ्यांच्या देशावर जाण्याच्या प्रवेशद्वाराच्या भागातील दगडात कोरलेल्या गुहांचा अभ्यास करून, तेथील वस्तूंचे सर्वेक्षण करून काही ऐतिहासिक वस्त्यांचा सुगावा लागतोय का हे पाहणं होतं. यासाठी त्यांनी पांढरेचीवाडी, आ सले, कडेगाव आणि वाई या ठिकाणचे सर्वेक्षण केले होते. तिथून काही पुरावे गोळा करून त्याची अनुमाने या पेपरमध्ये मांडली आहेत. कोकण ते घाट या व्यापाऱ्यांच्या मार्गाक्रमणात ते डोंगरात दगडात कोरलेल्या सुरक्षित गुहांमध्ये वस्त्या करत असत असे संशोधकांना वाटते. यामध्ये बावधन च्या उत्तरेस असणाऱ्या पाचीदेऊळ व परिसरातील (विसाव्याच्या धोंड्याच्या वर) तसेच वाईच्या उत्तरेस असलेल्या सुलतानपूर आणि लोहारे येथील दगडी गुहांचा संदर्भ आहे. पांढरेचीवाडी येथे मिळालेल्या पुरातन वस्तूंवरून व तिथे अस्तित्वात असलेल्या अगस्तेश्वर या पुराणकालीन मंदिर याच्यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की हे मंदिर मध्ययुगीन (तेराव्या ते आठराव्या शतका दरम्यान) बांधले असावे. मंदिराच्या शेजारील परिसर तेली समाजातील माणसांनी शेतीसाठी किंवा इतर कारणाने खोदून सपाट केला आहे. तिथल्या मातीचे ढिगारे आणि विटा यांचे निरीक्षण केले असता असे लक्षात आले की ते सातवाहन काळातील (मंदिर निर्माण होण्यापूर्वी चे) अवशेष आहेत. म्हणजे सातवाहन काळापासून बावधन पंचक्रोशीत वसाहती होत्या.


असे ऐकण्यात होतं की बावधन मधील गाडेबाग आळीमधील सध्याचा राजे भोसले यांच्या वाड्यापासून ते अगस्तेश्वर मंदीर व वाकेश्वर मंदिर इथे जाणारे दोन गुप्त भुयारी मार्ग आहेत. माहिती काढल्यानंतर असं लक्षात आलं की हा वाडा आणि अगस्तेश्वर मंदिर यामध्ये काहीतरी संबंध होते. छत्रपती संभाजी राजेंचे चिरंजीव व साताराच्या गादीचे पहिले संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांनी बावधनमधील भैरवनाथ व अगस्तेश्वर देवस्थानांचे वतन कानिटकर या ब्राह्मण घराण्याकडे दिले होते. अठराव्या ते एकोणिसाव्या शतकादरम्यान कानीटकर बावधन मध्ये या अकरा गुंठ्यात बांधलेल्या भव्य वाड्यात वास्तव्यास होते. ते मोठे शिवभक्त होते व मंदिराचे पुजारी होते. दररोज सकाळी ओल्या पडदेन, कुणाचीही सावली अंगावर न पडू देता ते या भुयारी मार्गाने अगस्तेश्वर येथे महादेवाची पूजा-अर्चा करायला जात. वाड्याच्या मागे अजूनही घोड्याची पागांची जागा व गुप्त तळघर अस्तित्वात आहे. तेव्हा बावधन मध्ये तीन वेशीच्या आत तटबंदीमध्ये ब्राह्मणांच्या वस्त्या होत्या. त्यामुळे पंचक्रोशीत असणाऱ्या अगस्तेश्वर या मंदिराबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी मन कासावीस झाले.

अगस्ती हे वैदिक ऋषी होते. त्यांचे वडील पुलस्तऋषी हे ब्रह्मपुत्र होते अशी अख्यायिका आहे. अगस्ती हे वशिष्ठ ऋषींचे मोठे बंधू होते. कलीयाला वरदान देण्यासाठी प्रभू शंकर यांनी त्यांची निर्मिती केली होती असे सांगितले जाते. त्यांचा जन्म काशी इथला. विदर्भातली राजकुमारी लोपमुद्रा यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. अगस्ति ऋषी हे ऋग्वेदाच्या अनेक स्तोत्रांचे लेखक आहेत. राजा दशरथचे ते राजगुरू होते. दक्षिण तसेच आग्नेय आशिया मध्ये  सापडणाऱ्या प्राचीन मंदिरांमध्ये असणाऱ्या शिल्पकलेत सापडणारे ऋषी म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जाते. असं म्हटलं जातं की आर्य समाजाच्या प्रसारासाठी अगस्ती ऋषी हे दक्षिण भारताकडे आले होते. त्यावेळी उत्तराखंड, तामिळनाडू, महाराष्ट्र तसेच दक्षिण भारतात या ऋषींनी समाज प्रसारासाठी आश्रम बांधले. ते स्वतः शिवभक्त असल्यामुळे या आश्रमांच्या परिसरात महादेवाची मंदिर बांधण्यात आली. यातूनच बावधन च्या दक्षिणेला अर्धा किलोमीटर वर असलेल्या पांढरेचीवाडी गावच्या शिवारात अगस्तेश्वर हे मंदिर वसलेले आहे. अगस्तेश्वर महाराजांचे मठ काशी, नाशिक तसेच नागपूर येथे असल्याचे सांगितले जाते. 

या गावच्या शिवारात तसेच शेतात सापडणारी बहुतांशी माती ही पांढऱ्या रंगाची आहे आणि ह्या मातीच्या ओळखीवरूनच या गावाचे नाव पांढरेचीवाडी पडले असावे असे वाटते. पांढरेचीवाडी गावच्या पश्चिमेला अर्धा किलोमीटर अंतरावर बारोळी कडून येणारा एक ओढा तसेच कनुर कडून येणारा एक ओढा याचा संगम आहे. तोच ओढा पुढे जाऊन थोरला ओढा (पवनगंगा) म्हणून पांढरेचीवाडीच्या दक्षिणेकडून वाहून पुढे कृष्णा नदीस मिळतो. असे सांगितले जाते की कनुरहून आलेल्या ओढ्याचा पांढर्‍याचीवाडी गाव येण्याअगोदरचा नैसर्गिक प्रवाह पूर्वजांनी जमिनींच्या लागवडीसाठी दक्षिणेकडे वळवला होता. खरंतर या ओढ्याच्या मूळ प्रवाह पांढरेचीवाडी च्या उत्तरेकडून असून हा ओढा बारूळीच्या ओढयास पांढरेचीवाडी गावाच्या पूर्वेस मिळत होता. दहा वर्षांपूर्वीच्या मुसळधार पावसाने आलेल्या पुरात ओढ्याने आपली नैसर्गिक प्रवाहाची दिशा घेतल्याचे सगळ्यांनी पाहिले आहे. तसा हा ओढा खूप जुना वाटतो कारण पाण्याने कातळ खडक देखील खुप कापलेला आहे. तसेच मंदिराच्या आसपासच्या परिसरात तेली समाजाची शेती व दफनभूमी अस्तित्वात आहे. अजूनही त्या परिसरात त्यांच्यातील मयतांचे दफन केले जाते.

बावधन च्या दक्षिणेला अर्धा किलोमीटर अंतरावर व पांढरेचीवाडी गावापासून पश्चिमेला झाडांच्या बागेत ओढ्याच्या काठी अगस्तेश्वर हे मंदिर वसलेले आहे. मंदिराला पाच फूट रुंदीची व पाच मीटर उंचीची साधारण तीस मीटर बाय वीस मीटर परिसरात तटबंदी आहे. मुख्य मंदिर वीस बाय वीस फूट जागेत वसलेले आहे. दर्शन मंडप पंचवीस फुटांचा आहे. दर्शन मंडपाच्या पुढे नंदी व ध्यानधारणेसाठी षटकोनी आकाराचे चौथरे अशी रचना केलेली आढळते. लिंग असलेले मुख्य मंदिर छोटे आहे. कदाचित हे मंदिर पुरातन मंदिर असावे हे त्याच्या वास्तुशैली वरून लक्षात येते. पण या मंदिराच्या दर्शन मंडपाचे वास्तुशिल्प आणि बावधन गावामधील भैरवनाथ मंदिरांचे दर्शन मंडपाचे वास्तुशिल्प समान असल्यामुळे असे वाटते की भैरवनाथ व अगस्तेश्वर मंदिरांची कानिटकर घराण्याने पुनर्बांधणी केली असावी. मंदिराच्या आवारात अजून एक छोटेसे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला पुरातन मठाची मोकळी जागा आहे. ही इमारत जरी अस्तित्वात नसली तरी तिथल्या अवशेषावरून असे लक्षात येते की त्यावेळी महाराजांनी समाधी घेण्यासाठी विशिष्ट आकारांच्या दगडात समाधीस्थळ बांधली होती. मंदिराचा पाया अतिशय भक्कम आहे. पाया जवळजवळ सात ते आठ फूट खोल व पाच फूट रुंद आहे. या पायामध्ये मोठाले दगडाचे गोटे असल्याने मंदिरास भक्कमता आली आहे. मंदिराच्या पूर्वेला साधारण १०० मीटर अंतरावर एका जुन्या वाड्याचे पायाचे बांधकाम होते, सद्ध्या तिथे काहीही अवशेष शिल्लक नाहीत. हा वाडा कुणाचा? याची माहिती घ्यावी लागेल. तेली समाजाची या जागेवर स्मशानभूमी आहे.

मंदिरापासून साधारण ५० मीटर अंतरावर मठाची जागा आहे. येथे एक दगडी चौथरा आहे. या ठिकाणी गोसावी वस्ती होती. या कुटुंबातील पुर्वजापैकी एकाने  या ठिकाणी समाधी घेतली होती असे म्हणतात. अंदाजे ६० ते ६५ वर्षापुर्वी पर्यंत हे गोसावी कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास होते. नंतर त्यांनी ते शेत बावधन मधील गारडे यांना विकले व गाव सोडून गेले. त्या ठिकाणी एक दगड मातीची इमारत होती ती आता अस्तित्वात नाही. चौथऱ्या शेजीरी साधारण ७ ते ८ फुट अंतरावर प्रत्यक्षात समाधी घेतलेली जागा सापडली होती. जमीनी खाली दगडी बांधीव काम व त्यावर दगडी फरशी ठेवलेली. त्याबाबत गारडे यांनी कै. दत्तात्रय जोशी काका यांना विचारले होते. त्यांनी त्या ठिकाणी समाधी आहे आणि ते काढू नका- असे सांगितले होते. दगडी चौथरा हा स्मृतीस्थंब असावा असे वाटते. त्याचे ऊत्खणन झाले तर अधिकची माहिती समजेल. याच गोसाव्यांचे एक नातेवाईक- भारती (गोसावी) आपल्या गावात राहतात. पूर्वी ते भिक्षा मागत असत.

मुख्य मंदिराच्या पुर्वेला २५ ते ३० फुट अंतरावर साधारण १५ फुट ऊंचीचे एक दगडी मंदिर आहे. त्याला अडीच तीन फुटाची चौकट आहे. त्यातून आत गेल्यानंतर साधारण ४ ते ५ फूट खोलीचा विटा व दगडात बांधलेला भराव असून वर साधारण दिड बाय दिड फुटाचा दगडी फरशी ठेवण्यासाठी जागा आहे. तिथे एक काळा चौकोन दिसतो. हे दगडी मंदिर समाधी साठी बांधले होते का ? त्यामध्ये समाधी  घेतली आहे का ? हे सांगता येत नाही. या मंदिराच्या शेजारी ८ ते १० फूट अंतरावर तेवढयाच ऊंचीचे अजून एक मंदिर होते पण आता ते पडक्या अवस्थेत आहे. ४o वर्षापुर्वी ते चांगल्या अवस्थेत होते असे सांगतात.  त्यामध्ये एक शिवलिंग होते पण त्यामध्ये बांधीव खड्डा नव्हता. मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या बाहेर दिपमाळ व जुना नंदी आहे. देवीची जुनी मुर्ती, कोरीव काम केलेल्या दगडी बाहेर पडलेल्या दिसतात. यांसाठी वापरलेला दगड हा फार पुरातन वाटतो. मंदिराच्या संरक्षक भिंतीतुन एक दगडी तोड ढिली होऊन निघालेली दिसत आहे. बावधनमधील कानिटकरांच्या वाड्यातील भुयारी मार्ग इथे निघत असावा. हा मार्ग सुरक्षेच्या कारणाने सद्ध्या बंद आहे. मंदिराच्या मधल्या मंडपातील गणेश मूर्ती व गाभाऱ्यातील देवीची मूर्ती तसेच कळस यांचा जीर्णोद्धार सप्टेंबर २०१० मध्ये झालेला आहे. मंदिरातील मुख्य लिंग पूर्वीचेच असून त्याला फक्त वज्रलेप केलेला आहे. अफजलखान राजेंना पकडायला बराच काळ वाई प्रांतात राहण्यास होता. त्यादरम्यान त्याने वाई परिसरातील बरीच मंदिरे उध्वस्त केली. त्यात त्यावेळचे त्यांचे महसुली गाव "अफजलपूर" म्हणजेच सद्ध्याचे "बावधन" मधील अगस्तेश्वर मंदिर हे सुद्धा असेल.त्या भग्न मंदिराचे अवशेष मंदिराच्या आवारात पडले असावेत.   

बावधन येथील ब्राह्मण वस्तीचा भाग सुरक्षा व पूजेचे सोवळे पाळण्यासाठी तटबंदी व वेशी बांधून बंदिस्त केल्याचे वाटते. हि मंडळी स्वातंत्रलढ्यात तसेच महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर बऱ्याच अंशी उदरनिर्वाहासाठी स्तलांतरित झाली असावी. त्यामुळे अगस्तेश्वर मंदिराची जबाबदारी गावखात्याने स्वतःकडे घेतली असावी. त्यानंतर ब्राह्मण समाजाचे गाडेबाग आळीतील वाडे इतरांनी विकत घेतले होते. पांढरेचीवाडी गावांमध्ये तरटे, ननावरे आणि रासकर या माळी समाजातील घराण्यांची वस्ती आहे. हे गाव बागायत शेतीबरोबरच विशिष्ट जातीच्या पेरुंच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या या मंदिराचे सगळे कारभार हे अगस्तेश्वर मंडळ, पांढरेचीवाडी यांचे मार्फत चालवले जातात. जवळजवळ पाच एकर परिसरात वसलेले हे मंदिर व शेजारील मोकळी जागा सातारच्या महाराजांच्या नावावर आहे. बावधन गाव हे सातारचे महाराज उदयनराजे यांना महसूल देणारे गाव अशी अजूनही ओळख आहे. २००३ साली मंदिरासाठी वीज पुरवठा घेते समयी या सर्व गोष्टींचा उलगडा झाल्याचे सांगितले जाते.

या मंदिराचे अलिकडील काळाचे वैशिष्ट्य म्हणजे; श्रावण महिन्यातील सत्यनारायणाच्या १०८ सामूहिक पुजांचे आयोजन. पांढरेचीवाडी येथील अगस्तेश्वर मंडळ यांचेमार्फत श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावास्येला हे आयोजन केले जाते. ही परंपरा गेल्या ५४ वर्षांपासून अखंड सुरू आहे. या अगोदर या मंदिरात अभिषेक घालण्याची पद्धत होती. यामध्ये मध्यभागी एक महापूजा असते व सभोवताली नंबर प्रमाणे १०८ पूजा बांधल्या असतात. भाविकांकडून शंभर ते दीडशे रुपयांची अल्प फी घेतली जाते. कमी खर्चात श्रावण महिन्यात शंकराच्या मंदिरात पूजेच्या रुपांनी एका सामुदायिक सोहळ्याचे आयोजन केल्याचे समाधान माणसांना मिळतं. याप्रसंगी महाप्रसादाचे वाटप केले जाते. पूर्वी काळ्या घेवड्याची उसळ व कायलीत तयार केलेली लापशी चा महाप्रसाद असायचा. बावधन पंचक्रोशीत या पूजेत सहभागी होणे म्हणजे अत्यंत समग्र गोष्ट मानली जाते.

भारतीय संस्कृतीने पुरातन परंपरा जपून आकार घेतला आहे. आपली संस्कृती ही हजारो वर्षांच्या इतिहासामुळे, विलक्षण भूगोलामुळे आणि समाजाच्या वैविध्यामुळे आकारास आली आहे. आपण विविध कारंणानी झालेले बदल पचवूनदेखील स्व‌तःचे परंपरागत प्राचीनत्व टिकवून ठेवले आहे. आपल्या देशातील या पुरातत्व मालमत्तेचा अभ्यास करणे आणि त्यांचे जतन करणे खूप महत्वाचे आहे. हे आपल्या संस्कृतीचे पुरावे आहेत. याचा अर्थ असा की बावधन आणि त्याची पंचक्रोशी कमीतकमी सातवाहन काळातही अस्तित्वात होती. मध्यमयुगीन अगस्तेश्वर मंदिर आणि पुराणकथांचे पुराव्यांचा बावधन पंचक्रोशीतील लोकांना अभिमान आहे.

संदर्भ: 
१) शंतनु वैद्य आणि जयंत जोगळेकर, हेरिटेज: जर्नल ऑफ मल्टीडिसिप्लिनरी स्टडीज इन आर्किऑलॉजी, ४ (२०१६) ४०१-४१६ (आयएसएसएन २३४७-५४६३)
२) जयंत जोगळेकर आणि शंतनु वैद्य, मन अँड इन्व्हरमेंट, एक्सएलआय (१), (२०१६) ११४-११८.

© डॉ केशव राजपुरे
मोबाईल नंबर: ९६०४२५०००६
www.rajpure.com
rajpure.blogspot.com
(माहिती स्त्रोत: पप्पूराजे भोसले, सदाशिव ननावरे, सचिन अनपट, तेजस अरबुणे व इंटरनेट)

Friday, May 15, 2020

श्री क्षेत्र राजपुरी


श्री क्षेत्र राजपुरी
(कार्तिक स्वामी गुहा)  

जावळीच्या खोऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणीच्या अग्नेय बाजूस जवळ जवळ सात किलोमीटर अंतरावर राजपुरी हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे. तसं बघायला गेलं तर हे गाव जावली, वाई आणि महाबळेश्वर तीन तालुक्यांच्या सीमेवर वसले आहे. समुद्रसपाटीपासून अंदाजे ४४०० फूटावर असलेल्या या डोंगरउतारावर वसलेल्या गावची लोकसंख्या १६०० च्या आसपास आहे. गावाच्या उत्तरेस एक किलोमीटरवर कपारीला वसलेले वाकडेश्वर हे राजपुरीचे ग्रामदैवत आहे. गावानजिक १०० ते १२५ फूट उंचीच्या पाषाणातीत कड्याला लागून कोरीव गुहांचा समूह आहे. हेच ते श्रीक्षेत्र राजपुरी नावाचे गुहा असलेलं भगवान कार्तिकेय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं पवित्र ठिकाण !

पौराणिक कथेनुसार कार्तिकेय किंवा कार्तिक स्वामी हे भगवान शिव पार्वतीचे चीरतरुण ज्येष्ठ पुत्र होते. त्यांच्या जन्माबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते. भगवान शिव शंकर यांच्या वराने तारकासुर नावाचा अधार्मिक राक्षस खूप शक्तिशाली झाला होता. देवगणात अत्याचार करून त्यांने खूप धुमाकूळ घातला होता. वरदानानुसार केवळ शिवपुत्रच त्याला ठार करू शकत होते. मग विष्णु भगवान व देवादिकांनी शिव -पार्वती यांचेकडे यासंदर्भात विनंती केली. पण तेव्हा ते अज्ञातवासात जंगलात होते तिथे त्यांना हा पुत्र प्रसाद झाला. अज्ञातवासातील या अपत्याचा सप्तऋषिच्या बायका, कृतिका यांनी सांभाळ केला म्हणून त्याचे नाव कार्तिकेय किंवा कार्तिक स्वामी असे पडले. पुढे कार्तिकेय मोठा झाल्यानंतर त्यांनी तारकासुराचा वध केला. कार्तिकेय यांना देवांकडून चीरतरुण राहण्याचा आशीर्वाद लाभला होता.

कैलास पर्वतावर असताना कार्तिकेय व गणेश या भावंडांमध्ये अगोदर कोणी लग्न करायच यावरून वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी त्या दोघांमध्ये पृथ्वीभोवती प्रदक्षणा घालण्याची शर्यत लावली होती. कार्तिकेय यांनी आपल्या मोर या वाहनावर बसून प्रदक्षणा सुरू केली होती. पण गणेशजीनी स्नान करून आपले मातापिता शिव-पार्वती यांच्या भोवती एक प्रदक्षणा पूर्ण करून पृथ्वीभोवती प्रदक्षणा घातल्याचा दावा केला होता व शर्यत जिंकली. नारदांनी ही गोष्ट कार्तिकेय यांना सांगितली. या गोष्टीवर रागावून कार्तिकेय लग्नचं न करण्याचा निग्रह करून कैलास पर्वत सोडून दक्षिणेकडे आल्याचे पुराण ग्रंथात सांगितले आहे. दक्षिण भारतातील वेगवेगळ्या डोंगरातील लेण्यांमध्ये त्यांचे वास्तव्य होतं. महाराष्ट्रामध्ये पंचवटी, नाशिक व पुणे येथे कार्तिक स्वामींची मंदिरे आहेत. दक्षिण भारतात विशेष करून तामिळनाडूमध्ये प्रचंड प्रमाणात कार्तिकेय विषयी श्रध्दा आहे. श्री क्षेत्र राजपुरी येथील पुराणकालीन लेण्यांना भगवान कार्तिकेय यांच्या लेण्या असे म्हटले जाते. भारतात बुद्धकालीन (इ.स.पु. ६०० ते इ.स.पु. ४००) एकूण १२०० लेण्या आहेत त्यापैकी जवळपास ९०० लेण्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. लेण्या कोरण्यासाठी आवश्यक मोनोलिथिक रॉक (अखंड खडक) महाराष्ट्रात आहे.

राजपुरी गावापासून लेण्यांकडे जाणारी छोटी पायवाट आहे, ज्या ठिकाणी जवळजवळ ७५ पायऱ्या उतरून आपल्याला खाली जावे लागते. हा मार्ग राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी १९४३ साली बांधला आहे. या दरम्यान बाबांचे या गावात १५ दिवस वास्तव्य होते. गावातील दलित समाजाच्या मदतीने त्यांनी या पायऱ्या बांधल्या होत्या. इतिहास ग्रंथांमध्ये १० व्या आणि ११ व्या शतकात कोरलेल्या या पवित्र लेण्यांविषयी त्रोटक माहिती उपलब्ध आहे. या ठिकाणी एकूण सहा गुहा व तीन पाण्याचे कुंड आहेत. एक क्रमांकाच्या गुहेमध्ये भगवान विष्णूंची मूर्ती आहे. भगवान विष्णु शेषनागवर शयन मुद्रेमध्ये विराजमान आहेत. गुहा क्रमांक दोन आकाराने ९ फूट बाय ९ फूट बाय ६ फूट अशी आहे. गुहेमध्ये भगवान कार्तिकेय यांची मूर्ती आहे. संपूर्ण अंधारात असलेल्या गुहा क्रमांक तीनमध्ये विष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीच्या पायापासून गुप्त गंगा प्रकट झाली आहे. आकाराने लहान असलेल्या गुहा क्रमांक चार मध्ये शिवलिंग प्रस्थापीत केलेले आहे.यात वेगवेगळे वीरगळ (कन्नड शब्द वीरकल्लू) म्हणजेच दगडात कोरीव काम केलेले स्तंभ आहेत. गुहा क्रमांक पाच मध्येही शिवलिंग प्रस्थापीत केलेले आहे. या गुहेत गणेश व भवानीमातेची मूर्ती आहे. या गुहेच्या समोर बाहेरीळ बाजूस मोठा नंदी आहे. सहाव्या गुहेचा दरवाजा गोलाकार आहे. ही एक रिकामी खोली आहे. लेण्यांच्या बाहेर देवनागरी व पाली भाषेत लिहिलेला शिलालेख आहे. हा गुहांच्या सातवाहन काळातील अस्तित्वाचा पुरावा आहे.

या आकाराने छोट्या व साध्या पद्धतीने तयार केलेल्या लेण्या आहेत. या प्राचीन कालीन लेण्यांना महाभारतातील घटनांचा संदर्भ असल्यामुळे एक ऐतिहासिक महत्त्व देखील आले आहे. पांडवांनी वनवासाच्या दरम्यान या लेण्यात आश्रय घेतला असल्याची कथा सांगितली जाते. विशेष म्हणजे या गुहांमध्ये स्त्रियांना दर्शनासाठी सर्वकाळ प्रवेश नाही. कार्तिकेय स्वामींनी महिलांना दिलेला शाप आणि उशाप यामुळे महिलांना असलेल्या गुंफाबंदीचं समर्थन आणि ३ वर्षांतून एकदा दिला जाणारा प्रवेश याबद्दलची माहितीही वाचायला मिळते. गेल्यावेळी नोव्हेंबर २०१८ मध्ये स्त्रियांना कार्तिक स्वामीं गुहांचे दर्शन झाले होते. पुढील योग २०२१ मध्ये येईल असे सांगितले जाते. याबाबतही एक पौराणिक कथा सांगितली जाते: कायम कुमारपण जगलेले कार्तिकस्वामी यांच्यामध्ये आपल्या बाल हट्टातून माता पार्वती यांच्यावरील रागातून स्त्रीदृष्टपणा आला होता. एकदा पार्वती यांच्यावर रूसून - तुझे तोंड पाहणार नाही असे त्यांनी म्हटले होते. या कारणांमुळे स्त्रियांना कार्तिक स्वामी गुहांमध्ये सर्वकाळ प्रवेश नाही. 

या बरोबरच गुहांच्या तोंडाशी दत्त कुंड, मल्लिकार्जुन कुंड व विष्णू कुंड या तीन कुंडांचा पवित्र संगम झालेला आहे. पवित्र गंगा या पाण्याच्या कुंडातून वाहतात असे म्हटले जाते. इथे वर्षातील सर्वकाळ पाणी उपलब्ध असते. चिंतामणीहारू महाराज यांच्या मते या कुंडात आंघोळ केल्यास माणसाची पापे व रोगराई धुवून निघते. ऐन उन्हाळ्यातही डोंगरांच्या माथ्यावर या कुंडामध्ये पाणी कुठून येतं हा नेहमीचाच रहस्यमय प्रश्न आहे. डोंगराच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत खडकातून होणाऱ्या पाण्याच्या केशिका (कॅपिलरी) बल क्रियाद्वारे हे पाणी वर येत असावे असे शास्त्र सांगते. पाण्याच्या उगमाची स्त्रोत्र काहीही असले तरी तिथलं पाणी खूपच थंडगार, चवदार आणि औषधी आहे हे बर्‍याच जणांनी अनुभवल आहे.

या लेण्या म्हणजे भारतीय पुरातत्व विभागाच्या संरक्षणात नसलेलं देवस्थान किंवा लेण्या असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यांनी या ऐतिहासिक लेण्यांच्या जतन व देखभालीसाठी काळजी घ्यायला हवी. अलीकडेच राजपुरी गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. सरकारच्या निधीतील पैसा या देवस्थानाच्या श्रेणीसुधारणीस आणि विकासासाठी वापरला जाऊ शकतो. भाविकांना चांगल्या सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने ठोस आणि भरीव निधी ग्रामस्थांना मिळेल अशी आशा आहे. यानंतर या क्षेत्राचा समाधानकारक विकास आणि भक्तांना आधुनिक सेवा सोयी देण्यासाठी ग्रामस्थांना काही अडचण येणार नाही.

हा प्राचीन राष्ट्रीय ठेवा जतन करून त्याचे संरक्षण करणे व आपल्या पंचक्रोशीतील संस्कृतीचे जतन करणे हे फार महत्त्वाचे आहे. आपणही ह्या निवांत आणि थंड हवेच्या पवित्र स्थानास भेट देऊन या ऐतिहासिक ठेवींचा साक्षात्कार घेऊ शकता.

© डॉ केशव राजपुरे
मोबाईल नंबर: ९६०४२५०००६
www.rajpure.com
rajpure.blogspot.com   

Sunday, May 10, 2020

अंजुबाई राजपुरे; प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधू आई


प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधू माझी आई..
(जागतिक मातृदिन, १० मे २०२०)

"बालपण देगा देवा" हे सर्वांनाच वाटण्यामागचे कारण आईच्या मायेच्या ओढीत दडलेल आहे. आई बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच हवीहवीशी असते. मलाही ती हवीहवीशी आहे. आजच्या जागतिक मातृदिनी माझ्या प्रेमस्वरूप आई विषयी...

वैराटगडाच्या पायथ्याशी वसलेल्या जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील सरसूबाई जानू शिर्के यांच्या पोटी माझी आई अंजुबाई उर्फ अंजिरा हिचा साधारण १९३५ ते १९४० दरम्यान जन्म झाला असावा. जावली तालुक्यातील हातगेघर (गोळे) हे आईचे आजोळ ! आईला दोन भाऊ व तीन बहिणी. या भावंडात आईचा दोन नंबर. या गावांमध्ये बावधन येथील कांबळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आईने जेमतेम तिसरीपर्यंत शिक्षण घेतले हे तिला आठवते. आई मराठी वाचू शकते. अतिशय रूपवान व सर्व प्रकारच्या कामांमध्ये तरबेज आईचा त्यावेळी वयाच्या नवव्या ते दहाव्या वर्षीच दरेवाडी येथील साधारण व्यक्तिमत्व यशवंत राजपुरे यांच्याशी बालविवाह झाला. त्यावेळेला अतिशय लहान असल्यामुळे आईला खांद्यावर उचलून दरेवाडीला आणल्याचे सांगतात. या कोवळ्या वयात घरातील कष्टाची कामे पडू नये व माहेरची आठवण येऊ नये म्हणून आईला सुरुवातीची दोन वर्षे आमच्याच भावकीतील दुसऱ्या वाड्यात (खालचा वाडा) ठेवल्याचे सांगितले जाते. 

घरी आल्यापासून अगदी सुरुवातीपासून आईंने घरातल्या सर्व कामात उस्फूर्तपणे समर्पण दिल्याचे सांगितले जाते. दरेवाडी येथील पाच एकर व अनपटवाडी येथील सहा एकर शेती करताना सर्व प्रकारची कष्टमय कामे तिने केली होती. माझे वडील मजुरी करत. आईने वडिलांच्या खांद्याला खांदा लावून पहिल्यापासूनच अतिशय मन लावून संसार केला. वडिलांना आवश्यक ती साथ दिली. तसं बघितलं तर वडील रंगाने सावळे व दिसायला आईइतके रूपवान नव्हते. तरी सुद्धा आपल्या जबाबदारी आणि कर्तव्यापासून आई कधीही हटली नाही. गरीब व भोळ्याभाबड्या नवऱ्याबरोबर संसार कसा करावा त्याचे तीने इतरांना उदाहरण घालून दिलेलं आहे. मोठं घर, मोठं कुटुंब, आणि तशीच शेतीतील जबाबदारीची काम या सगळ्यांचा डोलारा तिने सुरुवातीपासून अगदी यशस्वीपणे सांभाळला आहे.

तिचा दिवस भल्या पहाटे सुरू होई. त्यावेळी गावात पिठाच्या गिरण्या नसायच्या. जात्यावर सर्वप्रकारची दळण ती दळत असे. दळत असताना तिच्या सुमधुर आवाजात गायलेली कित्येक गाणी मला आठवतात. घरात लवकर स्वयंपाक करणे व सकाळच्या प्रहरी शेतात कामाला बसणे हा नित्यनेम. शेतातील पेरणी व मोगणी सारखी गड्याची कामे सुद्धा आईने केलेली मी पाहिली आहेत. दोन्ही वेळचा स्वयंपाक, शेण पाणी व शेताची सर्व कामे करून तिला कधी थकल्याचे मी पाहिलं नव्हतं.

माझ्या आईला पाच मुलं आणि पाच मुली अशी एकूण दहा अपत्य ! यापैकी माझे तीन भाऊ वेगवेगळ्या वयात निर्वतले. आम्हा सर्व भावंडांचा सांभाळ व संगोपन आईने संसार सांभाळत केला. कुटुंबाचा विस्तार झाल्याने गरजा वाढल्या. मुली मोठ्या ! त्यामुळे मुलींच्या मदतीने संसार गाडा चालवण्यास सुरुवात केली. गरिबीत सुद्धा आपल्या मर्यादेत राहून मुलांना शिकवलं. मुली मोठ्या झाल्या.. त्यांचीही लग्न परिस्थितीने गरीब पण सुसंस्कृत घरांमध्ये मागे कोणतेही कर्ज न ठेवता लावून दिली. मुलांना पहिल्यापासूनच चांगली वळणं लावली. फाटक्यात राहा पण नेटके रहा अशी तिची कायम शिकवण.

माझं मूळ गाव दरेवाडी. माझ्या वडिलांनी माझ्या जन्माच्या वेळी गावापासून तीन किलोमीटरवर असलेल्या अनपटवाडी या माझ्या जन्मगावी बामणाची सहा एकर शेती कसायला घेतली होती. घरातील सर्व कामे आटोपून आई सकाळी सकाळी अनपटवाडी च्या शेतात असायची. नंतर या भागदौडीचा त्रास होऊ लागल्यानंतर घरातल्यांच अनपटवाडी तील शेतात वास्तव्य करायचं ठरलं. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी आमचं कुटुंब वाडीतील शेतात छप्पराची वस्ती करून राहिले. नवीन जागा, नवीन गाव व नवीन माणसं या सगळ्यात सामावून जायला सुरुवातीला वेळ लागला. पण हे कठीण आव्हान कुटुंबाच्या साथीने आईने लीलया पार पडल. पुढं ही शेती कुळकायद्याअंतर्गत वडिलांच्या नावे झाली. यांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन काही जणांनी ही शेती स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनांमध्ये आईने वडिलांना अतिशय खंबीरपणे साथ दिली व सगळ्या घटना निभावून नेल्या. निव्वळ आई त्याठिकाणी होती म्हणून ती जमीन आणि या नवीन गावातील वास्तव्य टिकलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

पहिल्यायापासून कष्ट उपसायची सवय असल्यामुळे व त्या कष्टाच्या मोबदल्यात अवश्यक संसारोपयोगी गरजा भागवता येत नसल्यामुळे नंतर नंतर तिचा स्वभाव कडक बनत गेला. नवीन गावातील माणसांचे अनुभव हेसुद्धा त्याला काही अंशी कारणीभूत होते. ती फार स्वाभिमानी. स्वतःच्या सर्व गोष्टी स्वतः करी. कुणावरही अवलंबून राहिल्याचे मला आठवत नाही. त्यामुळे अन्याय व कपटाची तिला नेहमीच चिड. तिचा आवाज खूप मोठा.. साधी गोष्ट सांगायचं म्हटलं तरी ओरडून सांगायची ही तिची मूळ सवय. तिचा कडक आणि शीघ्रकोपी स्वभाव कायम तिला इतर माणसापासून दूर घेऊन गेला. तिच्या कडक आवाजा पाठीमागची मृदूता कुणालाही कळली नसावी. ती कितीही कडक स्वभावाची असली तरी आतून मात्र कापसासारखी मऊ आहे हे फक्त आम्हा भावंडांनाच माहित आहे.

हौस-मौजे च्या गोष्टी घेण्यासाठी पैसे नसले म्हणून तिने कधीही घरांमध्ये तक्रार केल्याचे आठवत नाही. प्राप्त साधन व आर्थिक स्थितीत घर पुढे चालवणे हे कसरतीचे काम तिने आयुष्यभर केलं. मुलांना नवीन कपडे कुणी पाहुण्यांनी घेतली तरच.. लग्नसमारंभात किंवा कुठे नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर मिळालेली नवीन साडीच तिच्यासाठी हौसेची गोष्ट. घरात अठरा विश्व दारिद्र्य. घरातील गरजा भागवण्यासाठी पैसे नसायचे. अशा परिस्थितीत मुलांना शिक्षणासाठी ती पैसे आणणार कुठून होती ? तरीसुद्धा आपल्या दोन्ही मुलांना आपल्या जोडीदाराच्या मदतीने तिने उच्चशिक्षित केलं म्हणजे फार मोठे काम तिच्यातून झालं आहे हे सर्वजण जाणतात. 

गरज भासल्यास कमाईपोटी बऱ्याचदा नवरा-बायको मजुरीला जात असत. आठवड्याची मजूरी घेत असताना वडील अनपढ असल्याने सही ऐवजी अंगठा करत. जेव्हा आईचा नंबर येई तेव्हा ती सही येत असताना सुद्धा नवऱ्याला कमीपणा वाटायला नको म्हणून अंगठा निशाणी देई. ही गोष्ट मात्र उभ्या आयुष्याात तिने वडिलांना कधीही माहीत होवू दिली नाही. किती तो सालसपणा.आणि किती तो आदर भोळ्याभाबड्या साथीदारा याविषयी !

कुठल्या गावाला किंवा नातेवाईकांच्याकडे जाणे हे तिच्या कधी नशिबात नसे. कारण बारा महिने काम, काम आणि काम! आणि मिळालीच फुरसद तर पैसे नसायचे. पण आपल्या म्हसवे या माहेरची माघ पौर्णिमेची यात्रा मात्र ती कधी चुकवत नसे. जवळ पैसे नसले तरीसुद्धा व्याजवाडी खिंडीतून पायी प्रवास करून मी आणि माझी बहीण कित्येक वेळा तिच्यासोबत गेलेलो अजून मला आठवते. भल्या सकाळी पायी सुरू झालेला हा जवळजवळ पंधरा किलोमीटरचा प्रवास जेवणाच्या वेळेपर्यंत संपे. हा त्रास सहन करून सुद्धा ती जायची कारण यावेळी तिचे भाऊ आणि बहिणी येत असत. त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणं तिला जमत नसे. भावंडांच्या मुलांच्या अंगावर नवीन कपडे व आपल्या मुलांच्या अंगावर जुनी कपडे पाहून तिचा हिरमुसलेला चेहरा कधी माझ्या ध्यानातून जाणार नाही. तरी सुद्धा तिला आपल्या कुटुंबांचा, मुलांचा आणि सासरच्या सर्वांचा खूप अभिमान असायचा व अजुनही आहे.

माहेरची ओढ टाळून आयुष्यभर संसारासाठी व मुलांच्या संगोपनासाठी सासरी राहून आपला चंदनदेह झिजवणारी आई ही विधात्याची सर्वोत्तम भेटच. तिच्यातील काटकपणाचा दाखला द्यायचं म्हटलं तर आत्तापर्यंत तिची चार ऑपरेशन झाली आहेत. आतापर्यंत शेतात काम करत असताना दोन वेळा विहिरीत पडून तसेच एकदा सर्पदंश होऊनही ती वाचलेली आहे. तिने आपल्या मुलांचे खाण्यापिण्याचे लाड केले पण कामासंदर्भात अजिबात लाड केले नाही. सगळ्यांनी काम करायलाच पाहिजे. मुलींना घरातील व शेतातील सर्व कामे आलीच पाहिजेत ही तीची धारणा. आणि याच गोष्टीमुळे लग्नानंतरही मुलींच्या कुठल्याही कर्तव्याबाबतच्या तक्रारी आईकडे आल्या नाहीत. आईसारखे कुठल्याही परिस्थितीत झगडत संसार करण्याचे गुण सर्व मुलींच्यामध्ये यामुळेच तर आले.

आई जर सोबतीस असेल तर कधीच आबाळ होत नाही. तिचे फक्त आपल्यासोबत असण आपल्यातील आत्मविश्वास आणि आत्मबल प्रचंड प्रमाणात वाढवते. काही दिवसापूर्वी आमच्या कुटुंबावर ओढवलेल्या संकटसमयी माझ्या धीरोदत्त आईनेच धाडसानं वेळ सांभाळून नेली आणि सर्व गोष्टी पूर्वपदावर आणल्या. त्यानंतर मुलींना आईची माया दिली व आधार दिला. निव्वळ तिच्या सान्निध्यामुळे आम्ही सर्वकाही विसरू शकलो. आईच्या मायेची शिदोरीच अशी असते की ती उरतही नाही आणि पुरतही नाही.

आई जन्मभर स्वाभिमानी आयुष्य जगली व अजून जगत आहे. आजारपणाचे सर्व त्रास तिने सोसले. वयाच्या ७० वर्षापर्यंत तिला जमत असलेली घरातील व शेतातील सर्व कामे विना तक्रार केली आहेत. तिच्या अगोदर तिच्या मुली थकल्या पण ती अजून थकली नव्हती. दोन वर्षापूर्वी उद्भवलेल्या हृदयविकाराच्या आजारानंतर मात्र ती थोडी खचली आहे. थोडासा आत्मविश्वास कमी झालाय. दिसायला कमी आले आहे व ऐकू कमी येते. यावयात देखील तिला कोणी नाव ठेवलेलं किंवा दोष दिलेलं सहन होत नाही. समोरच्याला जिथल्या तिथं उत्तर देऊन सुनावल्या शिवाय तिला चैन पडत नाही. आपल्या जोडीदारासोबत अतिशय कष्टातून कमावलेली व सांभाळलेली वडिलोपार्जित जमीन आपल्यानंतर आपली अपत्य व नातवंड यांनी त्याच पद्धतीने जपावी व चांगलं कुटुंब म्हणून नाव कमवाव ही तिची प्रांजळ भूमिका. माझ्या कुटुंबाला गावात कोणी नावं ठेवू नये यासाठी तिची कायम धडपड.

आता सुना नातवडांच्या जमान्यात आपणास तेवढं महत्त्व राहिले नाही असं तिला वाटतं. अजूनही स्वतःची काम ती स्वतः करते. ती पहिल्यासारखे काम करू शकत नाही, त्यामुळे तिला वाटतं आपण घरात आयात कसं खावं. त्यामुळे तिची नेहमी खटपट चालू असते. आपल्यानंतर आपल्या मुलांमध्ये सख्य असावं तसेच शेवटपर्यंत एकत्रित कुटुंब रहाव म्हणून तिने दिलेले संस्कार फळाला यावं अशी तिची कायम आराधना असते.

अनेकदा ती स्वत: ला नवीन पिढीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरते. समोरच्याला अनावश्यक सल्ला आणि कुटुंबावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्रासाला बळी पडते. मला कोणी समजून का घेत नाही असं कधी-कधी तिला वाटतं. वयोमानपरत्वे तिचं चिडण व रागावण बंद झाले आहे. ती आतल्या आत कुढत स्वतःशीच बोलत असते. कदाचित आपण कुठून कुठपर्यंत आलोय याचे परीक्षण करत असावी. पण आमच्या कुटुंबाला ती त्रास नाही तर खूप मोठा आधार आणि मार्गदर्शकस्तंभ आहे. आम्ही तिच्या आशीर्वादाचे आणि मार्गदर्शनाचे कायम याचक राहू. यासाठी आम्ही आमच्या आईच्या ऋणातच राहणे पसंत करू. 

अशा प्रेमळ, सहनशील, काटक, कुटुंबवत्सल, मेहनती आणि स्वाभिमानी आईच्या पोटी आम्ही जन्म घेऊन खूप धन्य झालो. जागतिक मातृदिनी आईस हार्दिक शुभेच्छा. माझ्या आईस निरोगी उदंड आयुष्य मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

© डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल नंबर: ९६०४२५०००६
www.rajpure.com
rajpure.blogspot.com