Saturday, May 30, 2020

श्रीक्षेत्र वाकेश्वर बावधन



वाकेश्वर मंदीर, बावधन

राज्यातील प्राचीन मंदिरे ही महाराष्ट्राची श्रद्धास्थाने आणि शान आहे. विविधतेमुळे या मंदिरांची बरीच वैशिष्ट्ये आहेत.. बऱ्याचदा आपल्याला मंदिरांच्या बाबतीत जुजबी माहिती तर असते पण या मंदिरांचा इतिहास काय आणि ही मंदिरे साधारण किती प्राचीन आहेत याबद्दल माहीत नसते. बावधन गावच्या ईशान्येस ३ किलोमीटरवर असलेल्या वाकेश्वर मंदिराबद्दल थोडी माहिती होती. या पुरातन वास्तुबद्दलचे कुतूहल आणि पंचक्रोशीच्या या अमूल्य ठेव्याबाबतच्या उत्साहाने या पवित्र स्थानांबद्दल अधिक जाणून घेण्याची ऊर्जा मिळाली.

वैदिक धर्मानुसार सृष्टीतील निर्मिती आणि लय यामधील ताळमेळ साधण्याचे काम हे ‘महादेव’ या देवतेच्या संकल्पनेचे बीज आहे. देवांचाही देव महादेव म्हणून शिवशंकराची पूजा भक्तीभावाने केली जाते. शिल्पकला ऐन भरास आली तेव्हा ही सर्व शिल्प ठेवायची कुठे असा प्रश्न उदभवला आणि मंदिरांची निर्मिती झाली. हिंदू पुराणकथांमध्ये नद्यांना दैवी दर्जा देण्यात आला आहे. म्हणूनच, नद्यांना पवित्र मानले जाते आणि या नद्यांमधील पवित्र स्नानामुळे पापांचा सर्वनाश होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील बहुतेक हिंदु मंदिरे नद्यांच्या काठावर बांधली गेली असल्याचे आपणास आढळते. याचप्रेरणेतून वाकेश्वर महादेव मंदिर कृष्णा नदीच्या काठावर बांधले गेले असावे. 
 

वाकेश्वर हे बावधनच्या सांस्कृतीक परंपरेत महत्वाचे मंदिर मानतात. वाई सातारा रोड वर भद्रेश्वर मंदिराच्या थोडे पुढे वाई पासून ३ किमी अंतरावर आग्नेय दिशेला कृष्णा नदीच्या दक्षिण काठावर वाकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. कालदृष्ट्या हे मंदिर यादोत्तर काळातील (इ.स. १३१७ नंतर) परंतु शिवपूर्व काळातील (इ.स. १६७४ पूर्वी) असून शिखर मात्र उत्तर पेशवेकाळात (इ.स. १७६१-१८१८) विटा व चुना या माध्यमात बांधले आहे. हे शिखराचे काम बावधन मधील बाबुराव बल्लाळ खेर यांनी अठराव्या शतकात केले असावे असे दिसते. वाई परीसरात बांधलेली बहुतांशी मंदिरे हेमाडपंती वास्तू शैलील बांधली आहेत. या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे यात अखंड दगडांच्या प्रचंड आकाराच्या खांबांचा व चीपांचा वापर केलेला दिसतो.

मध्ययुगीन काळात (इ.स. ५ ते १५ वे शतक) प्रचलित असलेली एक वास्तुशैली म्हणजे हेमाडपंती किंवा यादव वास्तुशैली. हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत हे यादव राज्यांच्या पदरी मंत्री होते की ज्यांनी अनेक मंदिरे बांधली. या हेमाडपंती मंदिरांचे दगड सांधण्यासाठी चुना वा तत्सम द्रव्य वापरलेले आढळत नाहीत. कातीव दगडांना खाचा वा खोबणी पाडून एकावर एक दगड रचून भिंतींची बांधणी केलेली असते. खोबण्या अशा पद्धतीने पाडतात, की ते दगड एकमेकांत घट्ट बसतात आणि किरकोळ फटी राहू नयेत म्हणून क्वचित शिसे ओतीत. मंदिरांचे चौकोनी, षट्कोनी किंवा अष्टकोनी खांब एकसंध पाषाणात घडविलेले असतात. मंदिरांची शिखरे वैशिष्ट्यपूर्ण असून शिखराची रचना आणि मंदिराच्या पायाची रचना यात फार मोठा समतोल साधलेला आढळतो. या मंदिरांची छते पिरॅमिडसारखा चढत जाणाऱ्या पायऱ्यांनी बनविलेल्या छप्परासारखी केलेली असतात.

मंदिराचा परिसर विस्तीर्ण आहे. परिसरात अतिशय शांतता आहे. त्यात बरीच पिंपळाची झाडे आहेत व परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. या मंदिरास कृष्णाकाठच्या घाटाशेजारी १८६ फुट बाय २०४ फुट आकाराची (अंदाजे पाऊण एकर) तटबंदी आहे. तटबंदीच्या भिंतीची रुंदी साडेतीन फुट आहे. हे स्वयंभू वाकेश्वर मंदीर पूर्वाभिमुख असून तटबंदीचा मुख्य दरवाजा पूर्वेस आहे. या दरवाज्यासमोर दोनशे फुटावर एक पार आहे. मंदिराच्या परिसरात एक तळे आहे. या तळ्यास बारमाही पाणी असते. मंदिराच्या तळ्यातील पाणी तटबंदी भिंतीस असलेल्या गायमुखातून नदीच्या बाजूला अविरत पडते. हे तळे सोनजाई वरील काळुबाई तळ्याशी अंतर्गत प्रवाहाने जोडल आहे असे सांगितले जाते. उत्तरेस घाटावर जाण्यासाठी एक दरवाजा आहे. मंदीर तटबंदीच्या आतही एक पार आहे. मुख्य मंदिराशेजारी लहान लहान मंदिरे आहेत. यात दत्त व विठ्ठल मंदिरांचा समावेश आहे. मुख्य मंदिरासमोर तीन फुट उंचीच्या आठ फुट चौरस चौथऱ्यावर नंदीचा मंडप आहे. त्यातील नंदीची ऐट पाहण्यासारखी आहे. मुख्यमंदीर देखील तीन फुट उंचीच्या चौथऱ्यावर बांधले आहे. मादिराच्या तीन बाजूस कट्टे आहेत. या कट्ट्यावर मंदिराचे वीस आधारस्तंभ आहेत. सभामंडपात सात फुटाचे चार खांब आहेत. सभामंडप तसेच गाभारा आतून १४ फुट बाय १३ फुट आहे.  मंदिराच्या बाहेर नदीवर विस्तीर्ण घाट आहे. घाटाची लांबी अंदाजे ८० फुट तर रुंदी जवळपास ४० ते ५० फुट आहे. जवळच पूर्वेला बावधन गावची स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीचा नुकताच जीर्णोद्धार झालेला आहे, गावातील बहुतेक दशक्रियाविधी तेथेच होतात.
 

वाकेश्वर मंदिर घोटीव दगडांनी बांधले असून या पूर्वाभिमुख मंदिराची रचना कलात्मक आहे. मंदिरात हेमाडपंती शिल्पकलेतील सर्व वास्तूवैशिष्ट्ये आढळतात. बांधणीमध्ये पीठ (चौथऱ्याखालील स्तर), मंडोवर (भिंत) आणि शिखर अशी रचना आहे. शिखरावर मूर्तिकामासाठी कोनाडे असून त्यातील चुनेगच्चीतील काही मूर्ती सुस्थितीत आहेत. मंदिराचे विधान चांदणीच्या आकाराचे असून शिखरावर लहान शिखर आढळून येत नाही. मादिराच्या पिठावर मानव, अश्व, गज असा कोणताही स्तर नाही. बाह्य भिंतीवर थोडीसी शिल्पे पहावयास मिळतात. या मंदिराच्या पिठ व मंडोवरावर काही पाषाण शिल्पे आहेत. त्यापैकी हत्ती, शरभ हे प्राणी आणि दक्षिण व उत्तरेकडील अनुक्रमे गर्भगृहाच्या भिंतीवरील मुष्टीयोद्धे व गदाधारी  विष्णू लक्ष्मी दांपत्य हि शिल्पे लक्षणीय आहेत. शिखर काशीविश्वेश्वर मंदिरासारखे त्रिस्तरीय असून त्यावर कोनाड्यात चुनेगच्चीतील मूर्तिकाम आहे. यामध्ये देव देवतांची व मंदिर मालकांच्या पूर्वजांच्या कोरीव मूर्ती आहेत. या मंदिराच्या पायऱ्या चढून सभागृहात जाताना डाव्या हाताला हत्तींचे तर उजव्या बाजूला नागांचे शिल्पकोडे दृशीस पडते. कोडे सहजासहजी सुटत नाही. कमानीवरही बारीक कलाकुसर आहे.
 



सभागृहाच्या उत्तरेकडील भिंतीवर दोन हरीणांचे अलौकिक व नाविन्यपूर्ण असे जुळे शिल्प आहे. यात आठ पायांची आणि दोन धडे व दोन मुखे यांची रचना अशा पद्धतीने उत्थित शिल्पात खोदली आहे कि, त्यातून या चपळ प्राण्यांची गती व्यक्त होते. यांतील हरणांची शिल्पे प्रमाणबद्ध, वास्तव आणि नैसर्गिक वाटतात. प्रवेशद्वारावर कोरीव काम नाही. मंदिराचे सभागृह वीस दगडी स्तंभांवर दगडी छताने अच्छादिलेले आहे. या स्तंभांच्या मधल्या भागात कमलाकृती उत्थित शिल्पे कोरली आहेत. मंडपातून गाभाऱ्यात जाण्यासाठी तुलनेने अरुंद दगडी चौकट आहे. चौकटीच्या बाहेर डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. मंदिराचे गर्भागृह मंडपाच्या मानाने खोलगट आहे. त्यात आपणास अरुंद दगडी दरवाज्यातून पायऱ्या उतरून खाली जावे लागते. गर्भागृह चौरसाकार असून त्याचे छत घुमटाकार व मधोमध कमलाकृती आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. समोरच शिवपत्नी पार्वती मातेची मूर्ती उंचावर प्रतीष्ठापित केली आहे.

मंदिर परिसरात एक समाधी आहे. दगडी चौथऱ्यावर पदचिन्ह आहे. म्हणजेच ती पुरुष किंवा सती स्त्री किंवा वीर यापैकी कुणाचीतरी समाधी असावी असे वाटते. त्या काळात हे पवित्र आणि शांत ठिकाण ध्यानधारणा व्रत करण्यासाठी ऋषी मुनींनी वापरलेली दिसते. त्यांच्यापैकी सुद्धा कुणाचीतरी समाधी असू शकते. जर ती कुणा सतीची समाधी असेल तर ती इंग्रजपूर्व कालखंडातील असावी कारण ब्रिटिश सरकारद्वारा भारतातील सतीची जुलमी प्रथा बंद करण्‍यात आली होती.
 

बावधन मधील गाडेबाग आळीमधील सध्याचा राजे भोसले यांच्या वाड्यापासून ते अगस्तेश्वर मंदीर व वाकेश्वर मंदिर इथे जाणारे दोन गुप्त भुयारी मार्ग आहेत. मंदिराचे पुजारी दररोज सकाळी कुणाचीही सावली अंगावर न पडू देता ओल्या पडदेन, या भुयारी मार्गाने वाकेश्वर येथेही पूजा-अर्चा करायला जात असे बरेचजण सांगतात. मंदिर परिसराच्या तटबंदीत वायव्य कोपर्‍यात अद्याप या भूमिगत भुयाराची खूण आहे.या कोपऱ्यातून खाली उतरायला पायऱ्या आहेत आणि अंदाजे पाच बाय पाच बाय पाच फूट मापांची बंदिस्त जागा आहे आणि त्याच्या एका कोपऱ्यात भुयाराचा दरवाजावरील दगडी चिपेस चोकोनी छिद्र आहे. भुयाराचा दरवाजा आता सुरक्षिततेच्या कारणाने बंद आहे. काहीजणांच्या मते हि भुयारे अस्तीत्वात आहेत पण ती राजे भोसले वाडा ते मंदिर इतकी लांब  नसावीत. शत्रूंच्या हल्ल्याप्रसंगी स्वतःचा बचाव करण्यासाठी वाड्यापासून काही अंतरापर्यंत हि भुयारे असावीत. त्याचप्रमाणे मंदिरांच्या आवारातील ही  भूमिगत भुयारे ध्यानधारणा आणि छुप्या निवासासाठी असू शकतात असही लोक बोलतात.


बगाड उत्सवादरम्यान शुचिर्भूतपणा टिकवण्यासाठी होळी ते रंगपंचमी दरम्यान बगाड्यासाठी पंचक्रोशीतील देवतांची पूजा अर्चा करण्याचा काळ असतो. यासाठी पवित्र गंगा कृष्णा नदीत स्नान करून सुरुवात करावी असा संकेत आहे. यासाठी वाकेश्वर हेच ठिकाण गावापासून जवळ आहे. त्यामुळे यादरम्यान आपल्या भाऊबंदासह बगाड्या दररोज मध्यरात्री वाकेश्वर येथे नदीमध्ये स्नान करतो व ओल्या पडद्याने महादेवाला पाणी घालून दर्शन घेऊन मग गावातील इतर देवदेवतांना पाणी घालतो. मार्गशीर्ष ते चैत्र मासादरम्यान पवित्र कृष्णानदीच्या महाबळेश्वर ते मिरज पर्यंतच्या वेगवेगळ्या तीर्थस्थानांवर चालणाऱ्या कृष्णाबाई महाउत्सवातील सुरुवात मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला बावधन मधील उत्सवाने होते. महाराष्ट्रात जेवढे कृष्णाबाईचे उत्सव साजरे केले जातात त्याची सुरुवात वाकेश्वर म्हणजे आत्ता बावधन मधील वरची आळी, शिवाजी चौक येथून केली जाते. पूर्वी हा उत्सव वाकेश्वर येथे होत असे. वाकेश्वर गावापासून लांब असल्याने तेथील उत्सव थांबवून पाच दिवस चालणारा हा उत्सव सध्या बावधन येथे साजरा केला जातो. वाकेश्वर हे बावधनवासीयांचे महत्वाचे श्रद्धास्थान आहे. आषाढी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्रीला कृष्णा नदीमध्ये स्नान करून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी बावधनकर आवर्जून जातात. तसेच प्रत्येक श्रावण सोमवार, आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भैरवनाथ आणि इतर देवतांच्या पालख्या पवित्र स्नानासाठी अद्यापही वाकेश्वरला जातात. श्रावणातील शेवटच्या सोमवारी अनपटवाडी गावातील वाकडेश्वर या ग्रामदेवतेची देखील पालखी वाकेश्वरला पवित्र स्नानासाठी जाते. ही परंपरा वाकडेश्वर मंदिराच्या पुनर्निर्माणानंतर सुरू झाली आहे. यामध्ये गावातील सर्व लहान थोर मंडळी उत्साहाने सहभागी होऊन या दिवशी कृष्णा नदीत पवित्र स्नान करतात. पालखीत देवतांची विधीवत पूजा करून वाकेश्वर मंदिरासमोर आरती केली जाते व प्रसादाचे वाटप केले जाते.

 


नंतर वाकेश्वर मंदिराचे मालक बाबूराव बल्लाळ खेर (गोविंद बल्लाळ खेर उर्फ बुंदेले भाऊ) नोकरी व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झाले. दर महाशिवरात्रीला मंदिराचे ट्रस्टी खेरांचे वंशज वाकेश्वराला अभिषेक घालायचे व विधीवत लघुरुद्र करून अकरा ब्राह्मणांना दक्षिणा देत. हल्ली ते इकडे येेत नाहीत. मग मंदिरातील पूजा आणि इतर जबाबदारी स्थानिक पिसाळ (पाटील) कुटुंबियांनी स्वतःहुन घेतली. सध्या युवराज पिसाळ (पाटील) मंदिरातील सर्व गोष्टींची काळजी घेत आहेत व देखभाल सांभाळत आहेत. श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीच्या दिवशी पिसाळ कुटुंब भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करते. या मंदिराच्या कळसाचा कधी जीर्णोद्धार झाला नाही पण वाईतील आहेर तसेच मुजुमदार आणि मंडळी यांनी स्वखर्च तसेच लोकवर्गणीतून खेरांचा मालकीहक्क शाबूत ठेवून मंदिराची किरकोळ डागडुजी व दुरुस्ती केल्याचे सांगितले जाते. बावधनला बाबुराव बल्लाळ खेर यांनी एक मोठा चिरेबंदी वाडा बांधला होता. हा वाडा जननी आई मंदिरा जवळ आहे. येथे कोणीही राहत नसल्याने छप्पर आणि भिंती कोसळल्या आहेत. सध्या तो पडलेल्या व बंद अवस्थेत आहे. याच खेरांनी बांधलेली प्रसिद्ध चौधरी बाळ विहीर (मोठी किंवा थोरली विहीर) आजही अस्तित्वात आहे.

अलीकडील गेल्या काही वर्षाच्या कालखंडात खेर यांच्या नातेवाईकांनी घरातील कागदपत्रे व नोंदींच्या आधारे वाकेश्वर येथे येऊन मंदिर परिसरात वायव्य कोपऱ्यात उत्खनन केले होते व त्यातून त्यांना काही गोष्टींचा उलगडा झाल्याचे लोक अजून सांगतात.

मंदिराच्या शेजारी बावधन गावची स्मशानभूमी असल्याने हे मंदिर एवढे प्रसिद्ध नव्हते. मध्यंतरी बराच काळ या मंदिर आणि परिसराकडे दुर्लक्ष झाले होते. पाटील कुटुंब जेव्हा वाकेश्वर परिसरातील आपल्या शेतात राहायला गेले त्यानंतर त्यांनी आपत्तीपासून रक्षण व आशीर्वादित ठेवण्यासाठी या परिसराचा आणि मंदिराचा कायापालट केला. आजही त्यांच्या कुटुंबातील युवराज पाटील हे देवपूजा, भक्ती व परिसर स्वच्छता याची काळजी घेत आहेत. जरी हे मंदिर वैयक्तिक मालकीचे असले तरी पुरातत्व विभागाने या दुर्लक्षित मंदिराकडे लक्ष देऊन त्यास पुनर्रजीवित करावे असे वाटते.

कलाकुसरीचा एक उत्तम नमुना, देवळाच्या खांबांची रचना, दगडावरील नक्षीकाम, देवळाचे टुमदार शिखर, देवळासमोरील नंदी या सर्व आकर्षक बाबींमुळे या देवळाचे महत्व सर्वश्रुत आहे. या निसर्गरम्य ठिकाणी नेहमी सहली येतात.

संदर्भ:
१. मराठी विश्वकोश
२. श्रीक्षेत्र वाई वर्णन, गो.वी. आपटे १९११
३. वाई: कला व संस्कृती, डॉ. सु. र. देशपांडे, २००५
४. भैरोबाचा नवस; बावधनचे बगाड, जयसिंगराव येवले, संजीवनी प्रेस, १९८३.

शब्दांकन: डॉ. केशव यशवंत राजपुरे
९६०४२५०००६
rajpure.com
https://rajpure.blogspot.com/2020/05/vakeshwar.html

ऋणनिर्देश: अजित आबा पिसाळ, विलास बापू पिसाळ, कौस्तुभ वैद्य, डॉ मुजुमदार, सदाशिव ननावरे, वैभव कदम, शिवप्रसाद कुलकर्णी, राजू कुलकर्णी वकील, मधुकर जोशी काका, तेजस अरबुणे, अनिकेत पिसाळ पाटील, युवराज पिसाळ पाटील, सोमेश्वर बागल, शिवलिंग क्षीरसागर, विष्णू धेडे, तसेच इतर काही जणांनी माहिती संकलनात बहुमोल सहकार्य केले. त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते म्हणून सर्वांचे सहकार्याबद्दल खूप खूप आभार. 

10 comments:

  1. फारच मेहनतीने तयार केलेला सुंदर व माहितीपूर्ण लेख.

    ReplyDelete
  2. सुंदर शब्दांकन आणि मंदिर आणि इतिहास या बाबतची माहिती उत्तम

    ReplyDelete
  3. खूपच छान माहिती मिळाली, आपण करीत असलेल्या संशोधनास खूप खूप शुभेच्छा!

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर लेखन. आपल्या लेखनामुळे या मंदिरांना उर्जितावस्था आली.ज्यामुळे नक्कीच भाविकांना या देवस्थानविषयी महत्वपूर्ण माहिती मिळाली.यामुळे नक्कीच या देवस्थानचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होणार आहे.
    आपल्या पुढील लेखनास मनस्वी शुभेच्छा.

    ReplyDelete
  5. मंदिरे ही समाजाच्या सुसंस्कृत विचारसरणीची प्रतीके आहेत. समाजाचा इतिहास आणि भावना मंदिरांमधून समजतो. आजपावेतो आपल्या जवळ असलेल्या वास्तूंच्या इतिहासाची आपणास माहिती नसते. सर आपल्या लेखनामुळे मंदिराची पूर्ण माहिती समजली. आपण घेतलेले परिश्रम उत्कृष्ठ आहेत, समाजासाठी उपयुक्त आहेत !💐💐

    ReplyDelete
  6. अजित लोहार यवलुज

    अरे वा बावधन मधील हे मंदिर खुप प्रसिद्ध आहे आणि येथील बगाड़ यात्रा पण खुप मोठी असते

    ReplyDelete
  7. अजित लोहार यवलुज

    अरे वा बावधन मधील हे मंदिर खुप प्रसिद्ध आहे आणि येथील बगाड़ यात्रा पण खुप मोठी असते

    ReplyDelete
  8. अजित लोहार यवलुज

    अरे वा बावधन मधील हे मंदिर खुप प्रसिद्ध आहे आणि येथील बगाड़ यात्रा पण खुप मोठी असते

    ReplyDelete
  9. अभ्यासपूर्ण लेखन

    ReplyDelete