Friday, May 22, 2020

माझे वडील यशवंत राजपुरे


चव्हाण "यशवंत राजपुरे"

यशवंत केसू राजपुरे म्हणजे माझे आजोबा. ३१ डिसेंबर २०१९ रोजी त्यांचे २४ वे पुण्यस्मरण झाले. त्यांच्या कार्याला आठवणींतुन जोडण्याचा माझा हा मनापासूनचा प्रयत्न आहे.

राजपुरी डोंगराच्या पायथ्याला, दोन डोंगरांच्या कोण्यात डोंगर उतारावर वसलेले बावधन पंचक्रोशीतील गाव म्हणजे; दरेवाडी. डोंगरांच्या दऱ्यात वसले म्हणून त्याचे नाव दरेवाडी पडले असावे. पावसाळ्यात जरी पाण्याची मालामाल असली तरी जानेवारी नंतर वाडीमध्ये पाण्याची नेहमी टंचाई भासत असे. गावच्या पूर्व बाजूस उंचावर तटबंदीत बांधलेल्या सलग तीन वाडयांचा समुदाय म्हणजे पुढचा अर्थात "म्होरला वाडा". या वाड्यातील केसू कृष्णा साळुंखे (राजपुरे) यांच्या पोटी यशवंत केसू राजपुरे म्हणजे माझे आजोबा यांचा जन्म झाला. आजोबांना सर्वजण "तात्या" म्हणून ओळखत. तात्यांचा जन्म दरेवाडी मध्ये १९२५ साली झाला. माता अनुसया आणि वडील केसु यांना एकूण चार आपत्य होती. तात्या हे दुसरे चिरंजीव.. थोरली बहीण हरीबाई कृष्णा शिर्के (म्हसवे).. त्यांचा पाठचा भाऊ भगवान आणि शेंडेफळ बबई शिर्के (म्हसवे).. अशी कुटुंबात सहा माणसं होती.

मेणवली मध्येे चौधरी व सणस, म्हसवे मध्ये शिर्के, बोपेगाव मध्ये जाधव आशा तात्यांच्या चार मावश्या. तसेच त्यांना दोन मामा. आपल्या मुलाचे पालन पोषण आणि संगोपन योग्य रीतीने व्हावे म्हणून आई अनुसयाने आजोबांना आपल्या माहेरी म्हणजे पसरणी येथे बंधूंकडे पाठवले होते. श्रीपती बाळा महांगडे हे त्यांचे थोरले मामा गडगंज शेतकरी होते. त्यांनी आपल्या भाच्याचा सांभाळ पोटच्या मुलाप्रमाणे केला. पसरणी (कोलन) हे कृष्णाकाठी वसलेले व निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव.. कृष्णेच्या डोहात पोहणे व शेती कामात मामांना मदत करणे हे त्यांचे काम. तात्यांना शाळेची आवड कमी असल्याने त्यांनी लहान वयात शाळेत जाणे सोडले. त्यांना अक्षर ओळख नव्हती पण ते हिशोबाचे पक्के होते. बुद्धीनेही चाणाक्ष होते. हिशोबाचे बारकावे, जीवन जगण्याच्या कला मामांनी त्यांना शिकवल्या. तात्यांचे बालपण मामाकडे गेले व हळूहळू ते तेथेच रमू लागले होते. पण तात्यांचे आजोबा कृष्णा सतू राजपुरे यांनी नातवाला आपल्या मूळगावी आणण्याचा निर्धार केला आणि आणि मग तात्यांना दरेवाडी ला यावे लागले.

तात्या दरेवाडीमध्ये आल्यावर शेती करून कमाई करून संसारामध्ये जमेल तेवढी मदत करत असत. धाकटा भाऊ भगवान यांचे शिक्षण चालू होते व त्यांचीही नोकरीसाठी धडपड चालू होती. हातावरचे पोट असल्यामुळे रोजच्या रोज कामावरून गेल्याशिवाय क्षुधाशांती होत नसे. गावातील व भावकीतील बरीच मंडळी त्यावेळी मुंबईत मिलमध्ये काम करून चरितार्थ चालवत असत. तेव्हा तात्यांचे चुलते कोंडीबा कृष्णा राजपुरे हे मिलमध्ये जॉबर म्हणून कामाला होते. चुलत्यांप्रमाणे आपणही मिलमध्ये काम करून कमाई करावी या उद्देशाने साधारण १९४२ च्या दरम्यान तात्या नोकरीच्या शोधात मुंबईला गेले. त्यांनाही मिलमध्ये नोकरी मिळाली. तात्यांना तेव्हा दरमहा पन्नास रुपये पगार मिळायचा. धाकटे बंधू भगवान इयत्ता तिसरी पर्यंत शिकले होते. त्यांना मोडी लिपी येत असे. यादरम्यान भगवान यांनाही मुंबई मध्ये नोकरी मिळाली होती. तेव्हा मुंबई येथे चले जाव चळवळीचे (८ ऑगस्ट १९४२) पर्व सुरू होते. १९४५ च्या दरम्यान तात्यांच्या मिलमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला, सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती त्यावेळी तात्या नोकरी सोडून घरी निघून आले. मिलमधल्या अपघाताच्या शांततेनंतर तात्या पुन्हा मुंबईला जाणार होते परंतु यावेळी भगवान यांचा मुंबईच्या साथीच्या आजाराने दुर्देवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर आजोबा कृष्णा सतू राजपुरे हे तात्यांना पुन्हा मुंबईला पाठवण्यास तयार नव्हते. धोका पत्करून मुंबईत जाण्यापेक्षा आपण शेतीमध्ये अपार कष्ट करून उदरनिर्वाह करू शकतो असे कृष्णा आजोबांनी सुचवले आणि तात्या आयुष्यभर शेतीत राहिले.

१९४९ च्या दरम्यान तात्यांचा विवाह जावली तालुक्यातील म्हसवे या गावच्या जानू बाबाजी शिर्के यांची कन्या अंजिराबाई यांच्याशी झाला. त्या वेळेला तात्या २४ वर्षांचे तर आजी नऊ वर्षांची होती. तात्यांची आई म्हणजे पणजी-आजीने सुनेला म्हणजे माझ्या आजीला अगदी मुलीप्रमाणे सांभाळले होते. विवाहाचे धागे-दोरे तात्यांची जेष्ठ भगिनी हरीबाई यांच्यामुळे जोडून आले होते कारण त्यांना म्हसवे या गावांमध्ये विवाहबद्ध केले होते. तात्यांच्या संसारात अंजनाबाई आजीची जोड आणि सहकार्य लाभल्यामुळे गती आली. तात्यांना श्रीमती फुलाबाई शिर्के (म्हसवे, सध्या खंडाळा), श्रीमती कलावती यादव (खंडाळा), कै शारदा निंबाळकर (सुरूर-वहागाव), सौ मीराबाई ढमाळ (अंबारवाडी, खंडाळा) आणि सुरेखा मतकर (विखळे) या पाच मुली व बाळासाहेब व केशव हे दोन चिरंजीव. त्या काळात मुलींचे विवाह लहान वयातच होत असत म्हणून त्यांच्या पालकांच्या दृष्टीकोनातून त्यांचं शिक्षण फार महत्वाचे नसायचे. त्यांच्या प्रत्येक मुलीला एक मुलगा आहे आणि मुलींची एकूण १३ नातवंडे आहेत. पण त्यांचे दोघे चिरंजीव पदव्युत्तर आहेत. बाळासाहेब हे एम.कॉम असून सुरुवातीपासूनच शेतीची देखभाल करत आहेत. डॉ. केशव शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत व युसीक-सीएफसी-सैफ या केंद्रीय सुविधा केंद्राचे विभागप्रमुख आहेत. त्यांचे भौतिकशास्त्र विषयातील संशोधनामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुमूल्य कार्य आहे. बाळासाहेब यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. दादांचा मुलगा आकाश मुंबई महानगरपालिकेमध्ये उपअभियंता या पदावर कार्यरत आहे. तसेच मुलगी वृषाली ही अतिशय हुशार असून तिने पुणे विद्यापीठामधून बी.एससी. फिजिक्स पदवी संपादन केली आहे. ति सध्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत आहे. डॉ. केशव यांना दोन मुली आहेत. थोरली स्नेहा अकरावी सायन्समध्ये शिकत आहे. तिला कविता करायचा छंद आहे आणि तिचे रेखाचित्र कौशल्य उत्कृष्ट आहे. लहान सानवी सातवीत शिकत आहे. सुरुवातीपासूनच ती तिच्या वर्गात अव्वल क्रमांकावर आहे. अशा प्रकारे तात्यांचा बायको, ७ मुले, ५ जावई, २ सुना आणि १८ नातवंडे मिळून कुटुंबाचा विशाल वटवृक्ष झाला आहे.  

तेव्हा अनपटवाडी च्या शिवारातील दत्तात्रय खेरे यांची साडेसात एकर जमीन तात्यांचे आजोबा कृष्णा सतू यांनी खंडाने कसायला घेतली. त्यावेळी या जमिनीला वार्षिक साठ रुपये खंड पडत असे. त्यावेळच्या शेतातील उत्पन्नावर हा खंड देणे देखील कठीण जात असे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९४८ ला कुळ कायदा संमत केला. "कसेल त्याची जमीन" असे तत्व घेऊन कुळ कायदा अस्तित्वात आला. दुसर्‍याची जमीन कायदेशीररित्या कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस त्याला कूळ म्हटले जायचे. या कायद्याने कुळांना अधिकार प्राप्त झाले. या कायद्यातील कलम ३२ ग नुसार दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीररित्या कसत असणाऱ्या व्यक्ती च्या नावे होऊ लागली. आजोबा कृष्णा सतू यांनी खंडाने घेतलेली जमीन कुळ कायद्यांतर्गत तात्यांच्या नावे लावली. जमीन कायदेशीररित्या घेतल्यामुळे जमिनीचे पैसे मूळ जमीनदार दत्तात्रय दिनेश खेरे यांना द्यायचे होते. दरेवाडीतील सर्व कामे आटोपून सकाळी सकाळी अनपटवाडी च्या शेतात यावे लागे. या भागदौडीचा त्रास होऊ लागल्यानंतर व आप्तेष्टांच्या कटकटीस कंटाळून अखेर त्यांनी अनपटवाडीतील शेतात वास्तव्य करायचं ठरलं. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी आमचं कुटुंब वाडीतील शेतात छप्पराची वस्ती करून राहिले.

जमीन तर नावावर झाली पण दरवर्षी पैशाचे हप्ते सुरू झाले. आता मात्र संसाराच्या खर्चासोबत एक नवीन खर्च वाढला गेला. दरवर्षी दिले जाणारे जमिनीचे हप्ते वेगवेगळे असायचे.. कधी जास्त तर कधी सारखेच. घरामध्ये तात्यांचे आजी-आजोबा, आई-वडील आणि या नवरा-बायको एवढयांचा खर्च आणि द्यावी लागणाऱ्या रकमेपाई ओढाताण सुरू झाली. त्यात त्यांना पाच मुली व दोन मुलगे अशी सात आपत्ये. वर्षाकाठचा हप्ता देण्यासाठी प्रसंगी आपल्या बायकोचे म्हणजे आजीचे चांदीचे एक किलो वजनाचे तोडे म्हणजे साखळ्या सोनाराकडे वर्षभर गहाण ठेवायच्या व पुढे पिकाचे पैसे आले की पुन्हा त्या त्यांच्याकडून सोडवायच्या असा कार्यक्रम असे. वडील केसू आप्पा यांच्यासोबत एका बैलजोडी वर ते शेती सांभाळत असत. दरेवाडी व अनपटवाडीतील सर्व जमीन कसायला खूपच मेहनत घ्यावी लागायची. घरखर्चाला पैसे मिळवण्यासाठी इतरांच्या जमिनीच्या ते मेहनती घेत.एवढे करूनही संसारात फारच ओढताना होई. खाणारी तोंडे जादा व कमावणारा एकटाच तसेच शेतीवर सर्व अवलंबून असल्यामुळे त्या वेळेला अगदी संघर्षातून त्यांना वाटचाल करावी लागली. किमान गरजा ठेवून व घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींत घरगाडा चालवावा लागला. ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान.. ही जगण्याची कला त्यांनी अवगत केली होती. याजन्मी आपल्या वाट्याला आलेले प्रारब्ध निमूटपणे भोगणे व कर्म फळाच्या आशा न धरणे ही त्यांची तेव्हा धारणा होती. स्वतःच्या अपेक्षांना थारा दिला नाही. घरच्या गरिबीने मुलांना हौस मौजेच्या वस्तू सोडाच पण शिक्षणासाठीच्या मूलभूत सोईसुद्धा मिळत नव्हत्या. अशा परिस्थितीत सर्वच मुलांनी तात्यांना शेतीकामात मदत केली होती.

पुढे हप्ते संपल्यानंतर ही शेती तात्यांच्या नावावर झाली. गरिबाला मिळालेली ही शेती बळकावण्याचा काहीजणांचा कावा होता. काही जणांनी त्यांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन ही शेती लाटण्याचा प्रयत्न देखील केला. अशावेळी आजी अंजूबाई यांनी त्यांना खंबीर साथ दिली. आजी मुळे ती जमीन टिकली व या ठिकाणी तात्यांच्या कुटुंबाचा निभाव लागला. अशावेळी तात्यांचे म्हसवे गावचे मेव्हणे कृष्णा शिर्के म्हणजेच घोडेवाले किशा बुवा यांनीदेखील गावातील जी माणसे त्रास देत त्या माणसांना-माझ्या मेव्हण्याला नाहक त्रास देऊ नये - असे म्हणून वेळोवेळी सुनावले होते व जरब ठेवली होती. त्यांचा तात्यांना खूपच आधार व पाठिंबा मिळाला.

त्याकाळी शेतीकामासाठी बैलांची नितांत गरज असे. शेतीसाठी अगदी धष्टपुष्ट व मोहक बैलजोडी त्यांनी पाळली होती. त्यांच्यासोबत सेवा केलेले शिल्या, निशान, सागर, पाखऱ्या व पोपट ही सगळी गुणी बैल दादांना आठवतात. दूध दुभत्यासाठी गाई आणि म्हशी असायचा. दूध व दुधाचे पदार्थ मुबलक असत. दरेवाडी ते अनपटवाडी हा डोंगर उतारावरील रस्ता चढ-उताराचा असल्याने उंच चाकाच्या बैलगाड्या उलटण्याची शक्यता असे. या कारणाने तात्यांनी इतरांपेक्षा भिन्न, लाकडी चाके असलेला व उंचीने कमी असलेला बैलगाडीचाच गाडा तयार केला होता. अजुनही या गाड्या ची जुनी चाके घराजवळ आहेत.

अनपटवाडी तील जमिनी बरोबरच खेरे ब्राह्मणाची दरेवाडीच्या पनाशी या शिवारातील शेतीदेखील तात्या बराच काळ कसत होते. ती जमीन देखील कुळ कायद्यांतर्गत तात्यांना मिळाली असती. पण जमीन मालकाचा दुराग्रह व अंतर्गत मत्सर यामुळे ती संधी तात्यांच्याकडून हुकली. तसेच हा खंड म्हणजे खर्चाचा जादाचा बोजा पडणार होता. त्यामुळे त्यावरून तात्यांनी आपला हक्क सोडल्याचे सांगितले जाते. आयुष्यभर तात्या इमानदार जीवन जगले. ते कुणावर रागावत नसत की त्यांची भांडण झालेली ऐकिवात नाहीत. त्यांना कुणी लहान मुलाने "यशवंत" या नावाने जरी हाक मारली तरी त्यास ते "ओ" देत असत. स्वभाव गुणच भोळाभाबडा असल्यामुळे गावगुंडी त्यांना कधी शिवली नाही. वडीलधाऱ्यांचा आदर व थोरामोठ्यांजवळ नम्रता ही ठरलेली. त्यांनी जन्मभर काबाडकष्ट केले मात्र कुणाची गुलामी पत्करली नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण हे सर्वश्रुत आहेत. योगायोगाने तात्यांचे ही नाव "यशवंत". दरेवाडी तुन अनपटवाडीत स्थायिक झाल्याने बर्‍याचजणांना आमचे राजपुरे हे आडनाव माहीत नसे. त्यात तात्यांचा स्वभाव अतिशय गरीब असल्याने चेष्टा व उपहासाने वाडीतील बरेचजण त्यांना यशवंतराव "चव्हाण" म्हणून हाक मारत असत. पण यावर तात्यांनी कधी नाराजी किंवा चिडून जाऊन वादावादी केल्याचे आठवत नाही. किती ती निरागसता व कसला तो संयम..  

तात्या रंगाने सावळे, मध्यम पण मजबूत बांध्याचे व साधारण ५ फूट ६ इंच उंचीचे व्यक्तिमत्व. ते दिसायला एवढे स्वरूपवान नव्हते, मात्र मनाने फार सुंदर होते. स्वभावाने गरीब व ओत पोत नम्रता भरलेली. स्वभावाने गरीब होऊन त्यांनी दिवस काढले. अंगामध्ये खिशाची बंडी, गुडघ्यापर्यंतची खाकी चड्डी, टोपी व असलीच तर फाटकी चप्पल हा त्यांचा सर्वसाधारण पेहराव. आयुष्यात त्यांनी कमी वेळा बस ने प्रवास केला. ते नेहमी पायी चालत गावी जात. म्हसवे, जरेवाडी, हातेघर, पसरणी ही त्यांच्या तास दोन तासाच्या आतच येणारी गाव. त्याकाळी ज्वारी, गहू, हरभरा यांची मळणी यंत्र नव्हती. तेव्हा ही सगळी काम चोपनी किंवा बैलाने रोलर फिरवून केली जात. सारवून स्वच्छ केलेल्या गोलाकार खळ्याच्या मध्यभागी एक लाकडी खांब म्हणजे तिवडा असे. रोलर ला बैल जूपून मळणी केली जाई. पहाटे तीनला उठून त्यांची रास सुरु होई ती जेवणापर्यंत चाले. मग वावडी वर उभा राहून धान्य वाऱ्याला दिले जाई. दरवर्षी तीस पोती धान्याची मळणी आजी व तात्या घरी करत.

तात्यांनी जन्मभर कष्ट उपसले. त्यांच्याइतके शरीरकष्ट कुणी केले नसावे. शेतीबरोबरच घरखर्च व शेतीच्या हप्त्यापायी त्यांना मजुरी करावी लागे. ते शेतातील कामे, बैलगाडीची कामे, ताली धरणे, शेतात चळी लावणे, विहीर खोदकाम, गाळ काढणे, झाडे तोडणे, गंज लावणे या आणि अशा सर्व प्रकारच्या कामानिमित्त पंचक्रोशीतील बऱ्याच जणांच्या घरी मजुरी करत.अनपटवाडीतील संपतराव गोळे आणि सदाशिव मांढरे यांचेकडे ते कायम कामे करत. बर्‍याच वेळा त्यांनी तात्यांना आगाऊ पैसे दिले आणि पैसे परत मिळण्यासाठी कधीही तगादा लावला नाही. यादोघांप्रती तात्यांच्या मनात फारच आदरभाव होता.

पावसाच्या पाण्याने होणारी डोंगरउतारावरील जमिनीची धूप थांबवण्यासाठी शेत बांधावर दगडाच्या ताली बांधल्या जायच्या. तालीच्या पायासाठी लागणारे  मोठाले दगड डोंगरातुन आणले जायचे. एक कारागीर म्हणून तात्या या ताली बांधकामातील मोठे तज्ज्ञ होते. या कामासाठी त्यांना लांबलांबून बोलावणे येई. थोडक्यात शेतातील स्थापत्य कलेची चांगली जण त्यांना होती. कुठला दगड कुठल्या ठिकाणी व कुठल्या दिशेने योग्य बसेल हे ते लगेच जाणत. मोठ्या दगडांच्या हालचालीसाठी आवश्यक ताकद व तंत्र त्यांच्याकडे होते. योग्य पद्धतीने मोठया मोठ्या दगडाच्या दहा दहा फूट उंचीच्या लांबलचक ताली त्यांनी बांधल्या आहेत. त्यांनी बांधलेल्या कित्येक ताली अद्याप मजबूत अवस्थेत आहेत.

पूर्वी घरांना गवत आणि पाचटीचे छप्पर असे. पावसाळ्यापूर्वी प्रत्येकजण आपल्या छप्परची दुरुस्ती करत असत. त्याला घर शेखरणी असे म्हणत. तात्या या घर शेखरणी कामात अतिशय पारंगत होते. त्यांचे काम इतके अचूक असे की त्यांनी शेखरलेल्या घरातून पावसाच्या पाण्याची गळती कधी होत नसे. जनावरांसाठी छप्पराचा गोठा तयार करायची कला त्यांच्याकडे होती. शेतातील वैरणीची गंज लावणे हा तर त्यांच्या हाताचा मळ. कुठलेही साधन किंवा मापक न घेता त्यांचे लावणी फारच उत्कृष्ट असे. गंज ते इतक्या योग्य सममितीत लावायचे की काही झाले गंज जागची हालत नसे, वैरण ढासळत नसे तसेच वैरण पावसाळ्यातदेखील भिजत नसे. 

इतर मजुरीच्या कामांबरोबरच तात्यांनी पंचक्रोशीतील बऱ्याच विहिरींची खोदाईची कामे केल्याचे सांगतात. विहीर कामात ताकद, दम व कष्टाची आवश्यकता असायची तिथे तात्या असत. विहिरीत खडक लागला की त्यांचे काम विहीरीच्या तळाला असे. कातळ खडक फोडायचे कौशल्य त्यांच्याकडे होते. त्यामुळे यासाठी त्यांना कायम बोलावले जाई. सुरंगासाठी नेम घेणे व सुरुंग उडवायची ची कामे तात्या करत. तात्या कधी घरी निवांत एक दिवस राहिलेले ऐकिवात नाही. त्यांचा स्वभाव कामसू आणि आराम त्यांच्या दिनचर्येत नसे. त्यांच्या काळात तात्यांनी बावधन मधील केशव बाबा यांची विहीर, काळ्यारानातील त्रिंबक भोसले यांची विहीर, दरेवाडीतील यशवंत वाडकर यांच्या दोन विहिरी, चुलत्यांची मळवी ची विहीर, कणुर येथील चौथाई तील मारुती राजपुरे यांची विहीर, म्हातेकरवाडीतील आण्णा बाबांच्या काकांची विहीर; अशा अनेक विहिरींवर कष्टमय मजुरी केली होती. त्याकाळी दिवसाला सव्वा रुपये हजेरी असायची, तेवढ्या पैशात तेव्हा एक किलो साखर विकत मिळत असे.

बरेच दिवस दरेवाडीतील यशवंत वाडकर (येसू आबा) यांनीदेखील तात्यांचा संसार गाडा चालवण्यास आर्थिक व नैतिक पाठिंबा दिला, कौटुंबिक अडचणी सोडविल्या व साथ दिली. तात्यांनी नातेवाईकांशीचे सर्व संबंध जपले व नेहमी नात्यांची काळजी घेतली.  तात्यांची मावळण (आत्या) अनपटवाडीतील केशव अनपट यांच्या घरात दिली होती. त्यांना शेवटी अंधत्व आले होते. अशा परिस्थितीत तात्या आपल्या आत्यास पाठीवर घेऊन माहेरी आणत. तिचा उचित पाहुणचार व साडीचोळी करून पुन्हा सासरी नेऊन सोडत. ज्या थोरल्या मामांनी तात्यांना त्यांच्या बालपणी सांभाळले त्या मामांच्या म्हातारपणातील आजारपणात देखील बराच काळ तात्यांनी त्यांचा सांभाळ केला.

तात्यांच्या घरात गरिबी होती तरी घरातून कुणीही उपाशीपोटी जात नसे. धनधान्याची तशी आबाळ नसायची. तात्यांकडे माणुसकी व दानत होती. बारा बलुतेदारांसाठी तर तात्यांचे घर म्हणजे आपलेच घर असे. तेव्हा घरात घरातीलच वस्तू वापरात असत. त्यांना फक्त चहा, साखर, काडीपेटी आणि रॉकेल साठी दुकानात जावे लागे. शेतातील अन्नधान्य तसेच शेंगतेल भरमसाठ असे. तेव्हा शेतातील कामे एकजुटीने होत. शेतकामासाठी सहकार्य भावनेतून "वारंगुळा" करून कामे करण्याची पद्धत असे. त्या वेळेलाही शेतकामासाठी मजूर मिळत नसत तरी कुठलेही काम नडत नसे. लोकांशी संवाद साधण्याचा त्यांचा अंदाज मात्र काही न्यारा असे.

त्यांच्या मजुरीच्या कार्यकालात त्यांना बऱ्याच जखमा झाल्या, बळावल्या व बर्‍याही झाल्या होत्या. पण एकदा डोंगरात गेले असताना दगड पायावर पडून झालेली जखम मात्र बरेच दिवस बरी झाली नव्हती. त्यात ते डॉक्टरांच्याकडे जायला नको म्हणत. अशात संसर्ग होऊन जखम चांगलीच चिघलळी होती. पण तशातही त्यांनी कष्टाची कामे चालूच ठेवली होती. स्वतः हा त्रास सहन करून कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी कमाईसाठी मजुरीवर जाताना थांबले नाहीत.

माझे वडील दादा कळते झाल्यापासून, अगदी शिक्षणा दरम्यानही तात्यांना शेती कामात मदत करत असत. वडील केसु यांच्या निधनानंतर तात्यांना हा हक्काचा आधार मिळाला होता. तात्यांनी दादांना शेतीबद्दल संपूर्ण माहिती शिकवली व शेतीकामात निपून केले. या गोष्टीमुळे दादांना तात्यांच्या म्हातारपणात व निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पेलायला मदत झाली. आम्हा सर्वांसाठी तात्या नंतर दादा हेच वडिलांच्या स्थानी आहेत.

त्यांच्यासाठी शेती व मजुरीवर घरखर्च तसेच मुलांचा शिक्षण खर्च करणे जिकरीचे होई. त्यामुळे आजी आजोबांसाठी तेव्हा कुटुंब चालवणे खूप कठीण जाई. घरात अठरा विश्व दारिद्र्य. घरातील गरजा भागवण्यासाठी पैसे नसायचे. त्यात मुलांचा शिक्षण खर्च म्हणजे संसार वस्तुत फाटा. त्यामुळे आजींचा मुलांच्या शिक्षणासाठी मनाविरुद्धचा विरोध असायचा. पण त्या गरिबीत सुद्धा आपल्या मर्यादेत राहून दोघांनी आपल्या मुलांना शिकवलं. मुलांच्या शिक्षणादरम्यान ज्यादाची मजुरीची कामे करून त्यांना लागणारे साहित्य, पास व इतर सुविधांची पूर्तता त्यांनी केली. तात्यांच्या तडजोडीस व त्यागास जोड नव्हती.

काकांच्या शिक्षणानंतर त्यांनी लवकरात लवकर नोकरीत कायम होऊन स्थिरस्थावर व्हावे ही तात्यांची अपेक्षा होती. तोपर्यंत काकांच्या सहाद्यायांची दहा- दहा वर्षे कायम सेवा झाली होती व त्यांची कुटुंबे स्थावर झाली होती. तात्यांना काकांच्या स्थिर-स्थावरतेची चिंता लागून राही. ते त्यांच्या मित्रांजवळ भावनिक निरोप देत की- आता बस झालं शिक्षण, लवकरात लवकर नोकरीचं बघा. काकांचे मित्र ही त्यांना विश्वासात घेऊन काकांच्या वतीने आश्वासन देत की- तात्या थोडं थांबा, तो लवकरच साहेब होईल. पण लेकाच्या साहेबपणातील सुख तात्यांच्या नशिबी नव्हते व शिक्षणा दरम्यानच ते निघून गेले.

त्यांचा स्वभाव खूप मायाळू, प्रेमळ, हळवा, सरळमार्गी व समोरच्यावर छाप पाडणारा होता. आपल्या सर्व लेकरांचा ते लाड करत. त्यातल्या त्यात लेकींच्‍यावर त्यांचा फार जीव असे. आपल्या मुलींना ते ज्यादा शिकवू शकले नाहीत पण त्यांच्या योग्यतेची गरीब लायकी का होईना, स्थळ मिळवून कर्जबाजारी न होता लग्न लावून दिली होती. लेकी नांदुन माहेरी आल्या की तात्यांचे पाय जमिनीवर नसत. काही दिवसांच्या मुक्कामानंतर त्या परत सासरी जाताना तात्या खूप भाऊक होत. बऱ्याचदा त्यांना रडू आवरत नसे. त्यांची लहान मुलंही हा प्रकार बघून खूप रडायचे. त्यांच्या याच स्वभावामुळे तात्यांनी आपल्या धाकट्या बहिणीचा तिच्या लग्नानंतरही आजारपणात बराच काळ सांभाळ केला होता.

या कष्टमय प्रवासात तात्यांनी आपल्या मुलांवर खूपच आदर्शवत संस्कार घडवले म्हणूनच मुलांच्या आयुष्यातील मानवतेची मुळं इतकी घट्ट आहेत की आयुष्यात कधीही कोणी याबाबत त्यांच्याकडे बोट दाखवू शकत नाही. ते नेहमी वर्तमानात जगले व भविष्य संबंधी कधी चिंता करत नसत. आज आनंदाने जगूया उद्याचा विचार उद्या करू हे तत्त्व त्यांनी कायम अवलंबले. फुकटच्या वस्तू व यशाची अपेक्षा करू नका- ही त्यांची कायमची शिकवण मुलांसोबत आहे. खोटे बोलून कुणालाही लुबाडून मोठे होऊ नका हा संदेश मुलांनी कायम जपला आहे. स्वतः अनपढ असूनसुद्धा त्यांनी आपल्या मुलांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृत देखील बनवले आहे. त्यांच्या संस्काररुपी शिदोरीवर त्यांची सर्व अपत्ये वळणदार आयुष्य जगत आहेत.

ऑक्टोबर १९९५ च्या दरम्यान वार्धक्य व प्रकृती अस्वस्थ यामुळे तात्या आरामासाठी त्यांचेेेे खंडाळ्याचे भाचे सदाशिव शिर्के व लेक फुुलाबाई यांच्याकडेे महिनाभर राहिल्याचे आठवते.  ही मात्र त्यांच्या आयुष्यातील पहिलीवहिली we're सक्तीची विश्रांती होती. त्यानंतर ते पुन्हा अनपटवाडीस आले. त्या वयात मात्र त्यांना घरातील किरकोळ वादही सहन होत नसत. इतके दिवस जीवापाड संभाळलेला संसारगाडा आपली पुढची पिढी व्यवस्थित चालवते का याचं दडपण त्यांना कायम असे. धाकट्या मुलाचे स्थिर-स्थावरता व सुखी संस्कार बघणं बाकी होते. अशातच या कष्टकरी तसेच परिस्थितीने गरीब पण मनाने श्रीमंत तात्या आजोबांचा माझ्या आईकडील आजोबांच्या रक्षाविसर्जन कार्यक्रमादरम्यान ३१ डिसेंबर १९९५ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने देहांत झाला. तात्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन.

शब्दांकन: वृषाली बाळासाहेब राजपुरे
संपादन: डॉ केशव यशवंत राजपुरे

26 comments:

  1. डॉ.के.य.राजपूरे सर, आपले कथन मी वाचले. कै.तात्यांचा आशिर्वाद तूमच्या पाठीशी आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गाव किंव्हा तालुका / जिल्हा अथवा विद्यापीठ स्थरावर पुरस्कार ठेवावा. तूमच्या संघर्षमय राजपूरे घराण्याला सलाम....

    आपला मित्र,
    श्री.किरण मधाळे, सहयोगी प्राध्यापक भौतिकशास्त्र
    वालचंद अभियांत्रीकी महा. सांगली.

    ReplyDelete
  2. लेखन हे साधन आपणास वरदान म्हणूनच लाभलेलं आहे. गेलेला काळ माणसे आणि भावनांसहीत डोळ्यांपुढे आहे असा उभा राहिला. तात्यांचे जीवन आदर्शवत होते. त्यांच्या विषयीचा हा लेख वाचून प्रचंड प्रेरणा मिळाली. आपले लेखन आणि संपादन उत्कृष्ठ !

    ReplyDelete
  3. कुमारी.वृशाली फारच छान माहिती ऊपल्ब्ध करून संकलन केली आहे.मला वाटते दादा डाॅ.केशव व आजी मुळे सविस्तर माहिती मिळाली आसणार.तरीसुधा माहीती संकलन माडनी व उत्कृष्टरित्या लेखन.अप्रतिम आसेच आहे.घराचा वारसा पुढे चालु राहनार आसे दिसते.कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणायला ते खरे आहे.वृशाली तुझे अभिनंदन हार्दिक शुभेच्छा 🌷🌷👍👌🙏🙏

    ReplyDelete
  4. खूप छान लेख.. अगदी समोर सगळे घडतय असे वाटले.. सुंदर लेखनशैली..

    ReplyDelete
  5. 🙏pranam tumchya vadilana...khup ch athak parishram sahan krnari ek sevabhavi ani manmilavu ...ashi hi tyanchi vrutti...tumch khup ch bhagy sir...asa Dev mansachya ayushyacha tumhi pn ek mahtvpurn bhag ahat👍😊

    ReplyDelete
  6. मामा अतिशय सुंदर लेखनी केली डोळ्यातुन पाणी आले.

    ReplyDelete
  7. Excellent Dear Keshu, Heart Touching

    ReplyDelete
  8. 👆🏼👆🏼Nice heartbreaking writing ,Dr keshav Rajpure🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  9. खूप छान लेख, अतिशय सुंदर लेखनशैली.....👍

    ReplyDelete
  10. वृषाली ,
    तात्या यांचा बदल खूप छान जिवन प्रवास लिहिलेला आहे तसेच तात्या यांनी घेतलेले कष्ट कायम स्मरणात राहतील.
    वृषाली आणि आप्पा यांना लिखाण बदल खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  11. खूप सुंदर आहे लिहिले

    ReplyDelete
  12. खूप छान लिहिलं आहे. वस्तूनिष्ठ वर्णन असल्यामुळे प्रभावी आहे.

    ReplyDelete
  13. खूप छान लिहिलं आहे. वस्तूनिष्ठ वर्णन असल्यामुळे प्रभावी आहे.
    अभिनंदन वृषाली.

    ReplyDelete
  14. अभिनंदन वृषाली

    खूप छान लिहिलं आहे.

    ReplyDelete
  15. कुमारी वृशाली व डॉ. केशव खुप छान पद्धतीने तात्यांचा जीवनपट मांडला आहे. त्यांच्या अनेक *आठवणी* ताज्या झाल्या. त्या मधिल एक *चव्हाण* ,खरच ते जीवनात ही *यशवंत* नावा प्रमाने आहेत.
    तुमच्या जीवनात *पाया रचला* आहे. स्वभावाने अतिशय हळवे, प्रेमळ, शांत, मायाळू, कष्टाळू होते. मी हे अनुभवलेले आहे.यातुन पुढिल पिढीला *प्रेरणा* मिळेल....!तात्यांच्या स्मृतीस विनम्र *अभिवादन* ��������
    *आपल्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा ...!* ������
    Ravindra Anpat

    ReplyDelete
  16. अगदी सहज आणि भावस्पर्शी लेखणीतून त्याकाळातील जीवनशैली समजते. आत्ताच्या पिढीबद्दल तक्रार अशी नाही, पण त्याकाळी केवळ काबाडकष्ट हीच त्यांची जीवनशैली होती, यांचा आदर्श घ्यावा असे नाही, पण जाणीव नक्की असावी.तात्या व आई यांचे कष्ट आणि कुटुंबातील प्रत्येकासाठी केलेले काम व कृतीतून दाखवून दिलेला आदर्श यामुळे राजपुरे परिवार आज प्रेरणास्त्रोत आहे. या लेखातोल र्हदयापासुन आलेले शब्द लाखमोलाचे आहेत

    ReplyDelete
  17. वृषाली मॅडम सुंदर अप्रतिम शब्दात आजोबाचा जीवनपट वर्णन केला आहे जसं आपन सिनेमा पाहतो आणी त्यातील सर्व कलाकार डोळ्यांसामोर येतात अगदी तसचं आजोबाचे कष्टमय जीवन डोळ्यासमोर येतो खरचं राजपुरे पुर्ण कुटुंब आज समाजाला प्रेरणास्थान आहे आज संपूर्ण कुटुंब जीवनाच्या प्रत्येक वळणावर संघर्ष करून टॉपला विराजमान आहे नक्किच आजच्या पीढ़ीला हे लेख आदर्श राहतील
    मॅडम तुमच्या लेखणीला मनःपूर्वक सलाम आणी आजोबांना नतमस्तक

    ReplyDelete
  18. वृषाली मॅडम सुंदर अप्रतिम शब्दात आजोबाचा जीवनपट वर्णन केला आहे जसं आपन सिनेमा पाहतो आणी त्यातील सर्व कलाकार डोळ्यांसामोर येतात अगदी तसचं आजोबाचे कष्टमय जीवन डोळ्यासमोर येतो खरचं राजपुरे पुर्ण कुटुंब आज समाजाला प्रेरणास्थान आहे आज संपूर्ण कुटुंब जीवनाच्या प्रत्येक वळणावर संघर्ष करून टॉपला विराजमान आहे नक्किच आजच्या पीढ़ीला हे लेख आदर्श राहतील
    मॅडम तुमच्या लेखणीला मनःपूर्वक सलाम आणी आजोबांना नतमस्तक

    ReplyDelete
  19. प्रथमतः वृषालीचे कौतुकासह मनस्वी अभिनंदन. खूपच सुंदर शब्दांमध्ये तिने आपल्या आजोबांचे जीवनचरित्र शब्दांकित केले आहे प्रत्येक शब्द न् शब्द तात्यांच्या कष्टाची जाणीव करून देत आहे.नक्कीच त्यांचा कृपाशीर्वाद तुमच्या कुटुंबावर आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या कृतीतून तात्यांचे यशवंत नाव सार्थ केले आहे.
    कै.तात्यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमच्या कुटुंबाच्या यशस्वीतेला मनःपूर्वक शुभेच्छा.

    ReplyDelete
  20. खूपच सुंदर लिहिले आहे सर...

    ReplyDelete
  21. अप्रतिम लेखन....मोजक्याच लोकांना आपल्या भावना इतक्या सुंदर मराठी भाषेत शब्दबंध करता येतात....खूपच मस्त लिहलंय सर तुम्ही...

    ReplyDelete
  22. Very nice expressed your views about family and condition .Really nice effort

    ReplyDelete

  23. आपण तात्यांचा वर्णिलेला प्रवास हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी आहे.वडील हे कुटुंबासाठी सावली देणाऱ्या वटवृक्षासारखे असतात.आईच्या डोळ्यांतून झरणाऱ्या अश्रूंची कथा सार्‍यानाच माहीत आहे,पण बाप नावाच्या पुरूषाच्या चेहर्‍यावरील जबाबदारीचा मुखवटा दूर केला तर त्यामागे चेहर्‍यावर ओघळणारे देखील अश्रूच असतात. ते त्याच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून "वडील" नावाचं वल्हं हातात धरून भवसागर पार करता येतो.आपल्या कृतीतून आपण तात्यांचे नाव सार्थ केले आहे.आपल्या लेखणीला, संस्कारक्षम वाङमयाला माझा अंतःकरण पूर्वक मानाचा मुजरा! 🙏🙏

    ReplyDelete
  24. उत्तम लेख. आपल्या परीवारा याविषयी सर्वतोपरी माहिती असणे कधीही छानच.
    राजपुरे सर यांचे अभिनंदन.

    -जाधव सर

    ReplyDelete
  25. खूप छान सर. खरं पहिलं तर जुन्या पिढीएवढे कष्ट पुढील पिढ्याच्या वाटल्या आलं नाही आणि आलच तर बहुदा ते त्यांच्या कष्टाच्या मनाने कमीच. मात्र अशा बिकट परिस्थितीत जिद्द न हरता नेटाने संसाराचा गाडा आणि तो ही कोणतीही कुरकुर न करता हाकणे इतके सोपस्कर नसावं.वृषाली मॅडम आणि आदरणीय डॉ. राजपुरे सर, खरं तर तात्याबद्दलचे विस्तृत वर्णन आपल्या लेखणीतून डोळ्यासमोर उभे केलेत. तात्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

    ReplyDelete