Thursday, January 26, 2017

सुंदर माझं गाव

सुंदर माझं गाव

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी म्हटले होते की, खरा भारत हा खेड्यात राहतो. सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील बावधन हे राजकीय आणि सामाजिकदृष्टया प्रतिष्ठेचे गाव ! या गावच्या पोटातील अनेक वाड्या वस्त्यामुळे हे तसे विभागातील मध्यवर्ती ठिकाण ! या अशा वाड्यापैकी सह्याद्रिच्या कुशीत वसलेले एक टुमदार आणि सर्वगुण संपन्न खेडे म्हणजे अनपटवाडी ! कुणाचीही दृष्ट लागण्यायोग्य गाव ! नैसर्गिक देणगीबरोबरच अलीकडे गावाने सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीने स्वत:च्या सौदर्यात भर टाकली आहे.

समर्थ रामदास स्वामिनी सज्जनगडावर असताना समाजाला संघटित तसेच शक्तिसंपन्न बनवण्याच्या हेतूने वेगवेगळ्या गांवी जावून सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी शेकडो मारुती मंदिरांची स्थापना केली. अनपटवाडीत असलेले मारुती मंदीर हेही तेव्हा स्थापन झाले ही आख्याईका आहे. याचा अर्थ या गावची निर्मिती जवळ जवळ ३५० वर्षांपूर्वी झाली असावी असा अंदाज करता येईल. सुरुवातीला आठ ते दहा कुटुंबानी एकत्र राहून तयार केलेली वस्ती आता खूप विस्तारीत झालेली दिसते. गावची रचना ही अगदी विशिष्ट पद्धतीची आहे. मध्यभागी मारुतीचे मंदीर, खालची, वरची आणि मधली आळी ! गावात सुरुवातीला सहा वाडे- तटबंधी असलेली घरे - असावेत. वाड्याच्या आतील रचना भारतीय वास्तुशास्त्रावर आधारित आहे. वाड्याच्या मध्यभागी भरपूर सूर्यप्रकाश व शुद्ध हवा यासाठी खुला चौक, चपट्या विटा व चिरेबंद घडीव दगडातील भक्कम बांधकाम, चहुबाजूनी तटबंदी, टेहळणी बुरुज आहेत. यामुळे या वाड्यांत काही मराठी दूरदर्शन मालिकांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

सध्या गावामध्ये अनपट, मांढरे, घाडगे, गोळे, राजपुरे, व सुतार यांची जवळजवळ १०० कुटुंबे आहेत तर गावाचे लोकसंख्या अंदाजे ५०० असावी. बावधन पंचक्रोशीतील अंदाजे ४०० एकर क्षेत्र या गावाकडे वहीवाटीस आहे. अनपटवाडी हे तुलनात्मक दृष्टीने पाहता पंचक्रोशीतील सुशिक्षित तसेच सुसंकृत मंडळींचे गाव म्हणायला काहीच हरकत नसावी. घराघरातून इंजीनियर, डॉक्टर, सिए, अधिकारी, वकील, शिक्षक तसेच व्यावसाईक निर्माण झाले आहेत. नवीन पिढी देखील त्यांच्यातील उत्कृष्टता साध्य करण्यात गुंतलेली आहेत. पालकांकडून प्रेरणा घेऊन ते उत्कृष्टता राखण्यासाठी त्यांच्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत. इथल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खेळात देखील आपले नैपुण्य राज्य तसेच देश पातळीवर सिद्ध केले आहे.

गावची 'एकी' ही वैशिष्ट्यपूर्ण पण महत्वाची बाब या गावाकडून शिकण्यासारखी आहे. १९७५ सालापासून अनपटवाडी गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाली आहे. गेल्या ४० वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासात निवडणुकीवरून किंवा इतर कोणत्याही कारणास्तव गावात कधीही पराकोटीचे तंटे बघायला मिळाले नाहीत. सर्व जेष्ठ नागरिक आपली गावाविषयीची जबाबदार तसेच सक्रिय भूमिका निभावत आहेत. गेल्या चार ग्रामापंचायात निवडणुका बिनविरोध करून गावाने सर्वांसाठी एकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. याअगोदर च्या पंचवार्षिक निवडणुकीत गावाने सर्व स्त्री सदस्य निवडून देवून स्त्री-पुरुष समानतेची एक वेगळी वाट पाडली आहे. या गावातून शिक्षण घेवून बहुतांशी लोक इतर मोठ्या शहरात सेवा करत आहेत.

सामाजिक बांधीलकी आणि ग्रामविकासाची तळमळ उराशी बाळगून या 'एकी' जपणाऱ्या चाकरमान्यांनी एकत्र येवून १९९८ साली श्री ग्रामविकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) या सामाजिक संस्थेची निर्मिती केली आहे. हि संस्था समाजातील होतकरू, सामाजिकदृष्ट्या संवेदनशील, तसेच शैक्षणिक, सांकृतिक, कला, क्रीडा या क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करून आपल्या पंचक्रोशीचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणीजनांचा सन्मान करते. या 'एकी' तूनच चार वर्षांपूर्वी या संस्थेच्या मदतीच्या जोरावर गावातील श्री वाकडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार तसेच पुनर्निर्माणाचे काम यशस्वीपणे झालेले दिसते.  याबरोबरच गावातील इतर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम देखील या संस्थेच्या पुढाकारातून झाले आहे. सन २००९ साली गाव निर्मल ग्राम म्हणून घोषीत करण्यात आले आहे. हे गाव स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही आहे. तसेच गावात सरकारी योजनेमधुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्वाची पोहोच पावती म्हणजे गावच्या सरपंचांना २००५ साली राष्ट्रपतींच्या हस्ते 'आदर्श सरपंच' पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा या गावाच्या इतिहासातील सर्वात अभिमानाचा क्षण आहे.

गावाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील त्यापैकी काही: गावात मुलगी जन्मल्यास येथे प्राधान्याने तिचे जतन आणि वाढ करण्यावर भर दिला जा​​तोय. यासाठी त्या बालिकेच्या नावावर काही निश्चित पैसे ठेव रक्कम जमा केली जाते. येथे महिलांना प्रतिष्ठित तसेच सन्मानाची वागणूक दिली जाते. इथे जवळ जवळ सर्वांचे वाढदिवस साजरे केले जातात किमान शुभेच्छा दिल्या जातात. सर्वजण गावकऱ्यांच्या सुख-दुख:त मनपूर्वक सहभागी होताना दिसतात. गावात 'एक गाव एक गणपती' सारखे लक्षवेधी उपक्रम सदैव चालू आहेत. अतिशय मनोभावे नवरात्री उत्सव साजरा केला जातो. गावातील कोणत्याही कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप होवू दिला जात नाही. वारंवार घेतले जाणारे वृक्षारोपण तसेच रक्तदान शिबिरासारखे उपक्रम आता नेहमीचे झाले आहेत.

हे गाव जरी डोंगर दऱ्यात वसले असले तरी या गावचे साक्षरतेचे प्रमाण फार मोठे आहे. गावात  जिल्हा परिषदेची दर्जेदार प्राथमिक शाळा असून येथे इयत्ता ४ थी पर्यंत शिक्षण मिळते. या गावच्या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. गावची शाळा हे गावचे एक वैशिष्ट आहे. या शाळेस 'आदर्श शिक्षक' पुरस्कार विजेते शिक्षक लाभाले हे गावचे भाग्य. शाळेस अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल 'आदर्श शाळा' पुरस्कार तसेच गुणवत्ता धारणेचे 'आयएसओ' मानांकन देखील मिळाले आहे. या गावच्या मुलभूत विकासात शाळेचा मोलाचा वाटा आहे. कुणाला जर आपल्या मनातलं  निसर्गरम्य खेडेगाव शोधायचं असेल तर त्यांनी बावधनच्या नैऋत्येस अडीच किलोमीटर वर असलेल्या अनपटवाडीची निवड करावी.

डॉ केशव राजपुरे   

No comments:

Post a Comment