Monday, March 21, 2016

बावधन ची परंपरागत बगाड यात्रा



          छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील  'दक्षिणकाशी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाईच्या दक्षिणेस असणाऱ्या बावधन गावाला एक आगळं-वेगळंच पौराणिक तसेच ऐतिहासिक महत्व प्राप्त झालंय ते केवळ बगाडामुळं ! या बगाड यात्रेचा बावधनकरांना भलताच अभिमान ! याच बगाडयात्रेचा परिचय करून  देण्याचा हा छोटासा प्रयत्न - बावधन गावी पेशवेकाळापासून पश्चिम महाराष्ट्रात सुप्रसिध्द व वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणारी 'बगाडा'ची यात्रा भरते. हि यात्रा यावर्षी (२०१६) तारीख २७ ते २९ मार्च दरम्यान साजरी होत आहे त्याविषयी ... ..
          ‘काशिनाथाचं चांगभलं’च्या जयघोषात पारंपरिक वाद्यांच्या गजरात भैरवनाथाची बगाड यात्रा मोठय़ा उत्साहात पार पडते. हि यात्रा दरवर्षी फाल्गुन वद्य पंचमीला (रंगपंचमी) असते. या यात्रेच्या निमित्ताने विविध समाजातील, विविध जाती जमातीतील तसेच पै पाहुणे एकत्र येतात. बगाडासारख्या उत्सवात गावकरी मतभेद विसरून आनंद लुटतात. म्हणूनच या बगाडाच्या उत्सवाला म्हणजेच नाथांच्या यात्रेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत या यात्रेच्या रूपाने मानाचा शिरपेच खोवला जातो.
          या उत्सवादरम्यान गावकरी व भाविकांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण असते. किमान एक लाखापेक्षा जास्त लोक बगाड यात्रेस उपस्थित असतात. या बगाड गाड्याला ज्याची नवसपूर्ती झाली आहे असा पंचक्रोशीतील 'बगाड्या' होळी पौर्णीमेदिवशी निवडला जातो. गावाची यात्रा जरी फाल्गुन वद्य चतुर्थी, पंचमी व षष्ठी ला होत असली तरी खरी सुरुवात होळी पौर्णीमेदिवशीच होते. नवसाची परतफेड करण्यासाठी पंचक्रोशीतील लोक होळी पौर्णीमेदिवशी भैरवनाथाच्या मंदिरात जमतात. रात्री बारा वाजता विधीवत पूजा करून नवस केलेल्या व्यक्तींच्या नावे देवापुढे सिहांसनावर पुजारी कौल लावतात. एका कुणास उजवा कौल मिळाल्याचा ठराविक संकेत मिळाल्यावर त्या व्यक्तीस 'बगाड्या'चा मान मिळाला असे जाहीर केले जाते. बगाड्यास उजवा कौल मिळाल्यावर जमलेले सर्व भाविक एकच गजर करतात "काशिनाथाचे चांगभले". या गजरात किती ताकद आहे याची महती सर्व बावधनकरांना माहीत आहे. ताणमुक्त होण्यासाठी तसेच त्याच्यात आवश्यक हिंमत व मानासिक ताकद यावी म्हणून बगाड्या आपले भाऊबंद व मित्र परिवारासह लगेच भैरवनाथाच्या मंदिरास नाथसाहेबांचा गजर करत पाच फेऱ्या काढतो. भाऊबंद, गावकरी व मित्रमंडळी जबरदस्त गजर करीत बगाड्याला आधार तसेच पाठींबा देण्याचं महत्वाचं काम करतात. होळी पौर्णीमेपासून बगाडापर्यंत या बगाड्यास मंदिरातच राहावे लागते. या काळात बगाड्यास फक्त फलाहार करण्याची परवानगी आहे. यामागेही तसे शास्त्रीय कारण आहे. कारण या पाच दिवसात बगाड्याची पचनशक्ती वाढावी तसेच काही बिघाड होऊ नये म्हणून हलका आहार देवून खबरदारी घेतलेली असते. बगाड्याने होळी पौर्णिमेपासून काही धार्मिक संकेत पाळावयाचे अनिवार्य असते. मंदिराचे, देवाचे पावित्र्य तसेच बगाड्याचा सुचीर्भूतपणा या गोष्टीना असाधारण महत्व असते. हा दृढ संकेत अतिशय काटेकोरपणे पाळला जातो. काशीनाथाचे चांगभले हा तसा 'नाथासाहेबांच्या कृपेने भक्तांचं चांगलं होवो' अशा अर्थाचा गजर ! काशी हून आलेले नाथ म्हणजे काशिनाथ (भैरवनाथ)! आता हा बावधन पंचक्रोशीचाच गजर होऊन बसलाय. कधीही हा गजर होताच कोणत्याही बावधनकराच्या अंगावर शहारे आल्याखेरीज रहात नाही. हा एक आक्रमकतेचा तसेच एकीचा गजर म्हणून मानला जातो. बावधनकर याचा वापर हल्ली खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी, अवघड सामुहिक काम करताना, स्वत: ला प्रोत्साहित करण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी, सणा- सुदीला,  मिरवणुकीत सर्रास वापरतात.
          बगाड्यासाठी पौर्णिमेपासून रंगपंचमी पर्यंतच्या सर्व रात्रीचा वेळ हा देवपूजा तसेच उपयुक्त व्यायाम करण्यासाठी असतो. भाऊबंद, गावकरी व मित्रमंडळी मिळून जवळजवळ ५०० जणांचा संच रात्री एक वाजता या मोहिमेसाठी अनवाणी निघतो. हे भाविक बगाड्यासह गावापासून ईशान्य दिशेला तीन किलोमिटर वर कृष्णा नदीवर असलेल्या वाकेश्वर येथे दररोज जातात. कृष्णा नदीत स्नान करून वाकेश्वराला पाणी घालतात व दर्शन घेतात. परत येताना बगाड्या खांद्यावर कृष्णेच्या पाण्याची कळशी घेऊन येतो व गावातील वेगवेगळ्या मंदिरात जावून देवाना पाणी घातले जाते. त्यामध्ये नंदी, पाचीदेवळ येथील भैरवनाथाचे मुळ स्थान, सुंदराबाई, देव दत्त, लक्ष्मीआई, भैरवनाथ, भवानी माता, मारुती, जोतीबा, मोरोबा, श्री राम व जननी आई या सर्व देवदेवतांचा समावेश होतो. जननी आई ची आरती करून मग हे सर्वजण बगाड्याच्या घरी जातात. त्यांच्या घरी देव्हाऱ्यातील देवदेवतांची पूजा केली जाते. हे सर्व विधी संपवून पहाटे पाच च्या आत पुन्हा बगाड्या भैरवनाथाच्या मंदिरात येतो. यातील जी अनवाणी जाण्याची प्रथा आहे याला शास्त्रीय आधार आहे. पायात चपला नसल्याने अॅक्यूपंक्चर (सूचीछिद्रोपाय) तंत्रामुळे पायाला विषेश व्यायाम मिळतो तसेच बगाडादिवशी अनवाणी जाण्यामुळे त्रास होऊ नये हा मुख्य उद्देश असतो. पाणी भरलेली कळशी खांद्यावर घेवून चालण्याने भावटयांचा विषेश व्यायाम होतो कि जो बगाडादिवशी बगाड्याच्या शीड घट्ट धरण्याच्या कामी येतो. 'देवाचं बगाड घेणं' हे पूर्णत: स्वइच्छेवर असते त्यात कुणाचीही जबरदस्ती नसते. पण जेव्हा तुम्ही बगाड घ्यायचं ठरवता तेव्हा मात्र घालून दिलेले व पुर्वोपार चालत आलेले निर्बध तसेच रीती-रिवाज व शिरस्त हि पाळावीच लागते.
          बगाड म्हणजे दगडी चाके असणारा लाकडी रथ. या रथाची रचना ठराविक आकृतीबंध असते. त्याचे साहित्य म्हणजे लाकडी कणा, कुण्या, दोन दगडी घडीव चाके, दांड्या, बैल जुंपण्यासाठी जोटे किंवा जू, जुपण्या, मध्यभागी आडवे मोठे खाच असलेले चौकोनी लाकूड (वाघला), मध्यभागी उभा खांब (खांबला), बाहुली, शीड, पिळकावण्या, वाकापासून तयार केलेली चऱ्हाटे (जाड दोरखंड), पुढे बैल जुंपण्यास शिवळा इत्यादी. संपूर्ण बगाडाच्या रचनेत लोखंडाचा अजिबात वापर केलेला नसतो हे वेगळे वैशिष्ट्य.
          गावाच्या पश्चिम भागात असणाऱ्या 'थोरली विहीर' येथे बगाडाचे कणा, खांबला, दांड्या तसेच बुटे इ साहित्य ठेवलेले असते. हे साहित्य विहिरीबाहेर काढतात व वाजत गाजत भैरवनाथाच्या मंदिरात आणतात. अगोदर च्या बगाडातील जे साहित्य वापरण्यायोग्य आहे तेच पुढच्या वर्षी वापरले जाते अन्यथा दरवर्षी लाकडी साहित्य नव्याने केले जाते. या बगाडाचा गाडा तयार करणे म्हणजे या उत्सवातील महत्वाचा भाग मानला जातो.  बगाडाचा उत्सव जसजसा जवळ येतो तसतसा गावातील नागरिक या कामाला लागतात. बगाडाच्या रथाला साधारण ३ फुट उंचीची दोन भलीमोठी घडीव दगडी चाके असतात. हि दोन्हीही चाके दहा फुट लांबीच्या लाकडी कण्याला लावण्यात येतात. चाके निसटून पडू नयेत म्हणून कण्याला चाकाच्या बाहेर दोन लाकडी कुण्या बसवण्यात येतात. कण्यावर लाकडी बुटे बसवण्यात येते. हे घनाकृती लाकूड असून त्याला दांड्या बसवण्यासाठी साधारण दहा इंच व्यासाची दोन भोके पाडलेली असतात. यामध्ये मग साधारण बारा फुट लांबीच्या दोन दांड्या बसवल्या जातात. दांड्याना पुढे बैल जुंपण्यासाठी साधारण दहा फुट लांबीचे आडवे जू बांधण्यात येते. मग बैलगाडीच्या साठीप्रमाणे एक लाकडी साठी तयार करून दांड्यावर बसवली जाते. हि साठी घन आकार असलेल्या तसेच पुढे वाघाच्या तोंडाचा आकार असलेल्या वाघल्याला बसवण्यासाठी असते. वाघाल्याच्या मध्यावर दिड फुट रुंद एक भोक ठेवलेले असते. यामध्ये अठरा फुट उंचीचा एक लाकडी खांब (खांबला) रोवला जातो. खांबावर बाहुली बांधण्यात येते. हि बाहुली कळका पासून तयार केलेल्या व खांबावर आडव्या ठेवलेल्या जवळजवळ पंचेचाळीस फुट लांबीच्या शिडास गोल फिरण्यास तसेच वर आणि खाली करण्यास मदत करते. हे शीड दोरखंडामध्ये विशिष्ट पद्धतीने विणलेले असते. अशा रीतीने बगाड रथ पूर्ण करण्यात येतो. बगाडाच्या मार्गाक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी खांबावर मध्यभागी केलेल्या जागेवर वेगवेगळ्या तरफेतील दोन व्यक्ती स्थानापन्न झालेल्या असतात. याला पिळकावणी म्हणतात. पिळकावणी म्हणजे दोन दोरखंडावर एक लाकडी दंडुके पिळ देवून खांबाला बिलगून ठेवलेले असते. त्यावर एक माणूस सहजरीत्या उभा राहू शकतो. तसेच खांबाच्या मध्यापासून दोन लांबलचक दोरखंड सोडलेले असतात. यांना तोरण्या म्हणतात. तोरण्याच्या सहाय्याने बगाडाचा तोल सावरता येतो. तोरण्याना धरून पंचवीस ते तीस तरुण कायम सतर्क असतात. बगाडाच्या आदल्यादिवशी संध्याकाळी आठ पर्यंत मंदिरासमोर बगाड गाडा तयार केला जातो.
          यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य चतुर्थीस दुपार पासून भाविक लोक भैरवनाथाला हार, नैवेद्य तसेच इच्छेप्रमाणे अर्पण करावयाच्या भेट वस्तू (काचेच्या हंड्या, आरसे, झुंबर इ.) घेवून वाजत गाजत मंदिरात येतात. याच दिवशी भैरवनाथाचा विवाह सोहळा पार पडतो. या दिवशी दुपारच्या सुमारास योग्य मुहूर्त पाहून देवाला पोशाख चढवतात. बाशिंग बांधतात. यावेळी डवर गोंधळी समाज विधीवत पूजन करून देवाला बगाड्याच्या घरी केलेला पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण करतात. दिवसभर मंदिरात यात्रेकरूंची वर्दळ सुरु असते. संध्याकाळी देवाच्या तसेच बगाड्याच्या मिरवणूकीचा कार्यक्रम म्हणजेच छबिना असतो. चंद्रोदय झाल्यावर बगाड्यासह सर्वजण  नाथसाहेबांच्या पाचीदेवळ येथील मुळस्थानी जावून दर्शन घेतात. तिथे देवाकडून पंचाक्रोशीविषयीची वर्षभरासाठीची  भाकणूक केली जाते. वडीलधारी मंडळी बगाड उत्सव साजरा करताना घ्यावयाची काळजी याबद्दल सूचना करतात. त्यानंतर सर्वजण पुन्हा छबिण्यास गावात येतात. पंचक्रोशीतील ढोल शौकीन, लेझीम पतके, दांडपट्टा, गजे खेळणारे भाविक यावेळी आपली आवर्जून हजेरी लावतात. देवाची पायधूळ गावात पडते. सनई, डफडे, ढोल, लेझीम, दंडपट्टा यांचा खेळ पालखीपुढे चालू असतो. फुलांच्या छत्र्या देवापुढे उडविल्या जातात. छबिण्याच्या रात्री बारानंतर रंगपंचमी चा उत्सव असतो. बावधनकराना वेगळी रंगपंचमी खेळायला लागत नाही कारण छबिण्यादरम्यान देवावर गुलाल वाहील्यावर एकमेकाना गुलाल लावण्याची व आनंद लुटण्याची प्रथा आहे. छबिणा संपेपर्यंत सर्व लोक अगदी गुलाबी होऊन जातात. यादरम्यान लोक आपापसातील हेवेदावे विसरून एकमेकाच्या गळाभेटी घेतात. अशा रीतीने हा नाथाचा सण म्हणजे सामाजीक शांततेचा उत्सव असतो. रात्री दहाच्या दरम्यान सुरू झालेला छबिना साधारण पहाटे चार वाजेपर्यंत चालू असतो.
          छबिना संपल्यावर (यात्रेच्या दुसऱ्या म्हणजे रंगपंचमी दिवशी) बगाडाचा मोकळा गाडा गावकरी हातावर तसेच बैलावर बावधनच्या पूर्वेस गावापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री सोनेश्वर येथे ओढत नेतात. या मोकळ्या गाड्याबरोबर बगाड्याही चालत जातो.
          ओझर्डे गावच्या हद्दीतील कृष्णा नदीच्या तीरावरील श्री क्षेत्र सोनेश्वर हे बावधनच्या बगाडाच्या संदर्भातील महत्वाचे मंदीर होय. या मंदीरानजिक कृष्णा नदीवर पाण्याचे प्रचंड डोह आहेत. हे मंदीर अठराव्या शतकात ओझर्डे गावच्या पिसाळ देशमुख घराण्याने बांधले असावे असे सांगण्यात येते. घडीव दगडात बांधलेल्या या मंदिरात शंकराची पिंड आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक दगडी नंदी असून त्याच्या गळ्यात बगाड्याची मूर्ती कोरलेली आहे. या नंदीच्या गळयात असलेल्या बगाड्याची मूर्तीवरून बगाड हे सुमारे ३०० वर्षांपासून सुरु झाले असावे असा निष्कर्ष काढता येतो. याच सोनेश्वराच्या मंदिरापासून बगाडाची सुरुवात होते. बगाड्या कृष्णा नदीत आंघोळ करतो. विधीवत पूजन व आरती होऊन बगाड्याला विशिष्ठ पोशाख दिला जातो. ग्रामदैवतांची पूजा झाल्यावर बगाडास बैल जुंपण्यात येतात.
          यानंतर खऱ्या अर्थाने बगाड रथास प्रारंभ होतो. बगाड्याच्या पायाखाली एक झोपाळ्याची दोरी असते. आणि पायाला रुतु नये म्हणून त्या दोरीला पागोटयाचे कापड गुंडाळलेले असते. बगाड्याला लोखंडी गळात अडकवून तो गळ शिडाला घट्ट बांधलेला असतो. उद्देश हा कि गाड्याच्या झोल्याने जरी त्याचा तोल गेला तरी तो आपोआपच सावरला जाईल. अशा तऱ्हेने जागच्या जागेवर पाच वेढे काढून बगाड्या बोंब ठोकतो आणि काशिनाथाचे चांगभले म्हणून बगाडाला सुरुवात होते. चांगभले म्हणताच गाड्याला जुंपलेले मानाचे बैल धूम ठोकतात व गाडा भरधाव वेगाने गावाकडे मार्गाक्रमण करतो. यात्रेस आलेले सर्व भाविक ‘काशिनाथाचे चांगभले’चा गजर करीत देवाचे दर्शन घेतात व रथाच्या मिरवणुकीत सहभागी होतात. अगदी लहान मुलांपासून ते अबालवृद्ध यांचेपर्यंत हा गावचा गाडा म्हणजे कुतूहलाचा विषय ! सर्वचजण या उत्सवाची अगदी आतुरतेने वाट बघत असतात. 
          बगाडाच्या मागे वाजतगाजत ग्रामदैवताच्या पालख्या असतात. एका वेळी किमान दहा ते बारा बैल बगाडाच्या रथास जुंपण्यात येतात. बैलाच्याद्वारे बगाड ओढून गावात आणले जाते. बावधन गावात बगाड येईपर्यंत शिवाराप्रमाणे बैल जोडय़ा बदलण्यात येतात. बगाडाला बैल जुंपणे, ही नाथांची सेवा करणे, असे बावधनकर ग्रामस्थ अभिमानाचे समजतात. त्यामुळे बगाडासाठी बैल धष्टपुष्ट करतात. त्यासाठी शेतकरी दोन महिन्यांपासून आपल्या बैलांची निगा राखून त्यांना खुराक देऊन तयार करतात. यावेळी खास खिलारी बैल पाहण्यासाठी शेतकरी लांबून येतात. बैल जुंपण्याचा मानही ठरलेला असतो. बावधन पंचक्रोशीतील सर्व घटकांच्या बैलांस जुंपण्याचा मान मिळतो.
          बगाडाला जुंपलेल्या बैलांच्या ज्या वेगवेगळ्या जागा असतात त्यांचे सांकेतिक शब्दही जरा वेगळे आहेत त्यामध्ये धुरवी, चावरी, सहा बैली, आठ बैली इत्यादी आहेत. धुरवी म्हणजे अतिशय अवघड अशी मुख्य गाड्याच्या जूटाची जागा. या ठिकाणी अगदी ताकदवान व पल्लेबाज बैल असावे लागतात. येथे जुंपलेल्या बैलाना बगाडाचं पूर्ण ओझं पेलवून गाडा ओढायचादेखील असतो. विशेषत: गाडा ओढताना ठेच लागणे, हेलकावा बसल्याने जूटाला टांगले जाणे, ओझे न पेलल्यामुळे मानेवर गाडा पडणे असे अनुचित प्रकार हौऊ नये म्हणून या बैलांचे मालक अतिशय चाणाक्ष व तत्पर असतात. धुरावीच्या आपल्या बैलाच्या बाजूस असणारी जुपणी हातात धरणे व गाडा नियंत्रणात ठेवणे म्हणजे 'खणसा' धरणे असे म्हणतात. हा खणसा धरायला उमदा आणि शक्तिशाली माणूस आवश्यक असतो. त्याबद्दल सांगायचे तर असे म्हणता येईल - 'येथे पाहिजे जातीचे, येळ्या गबाळ्याचे काम नोहे' ! शिवळेत जुंपलेली बैलजोडी म्हणजे 'वांडे' ! अशी कमीत कमी चार वांडी बगाडाला जोडलेली असतात. चावरी म्हणजे धुरवी च्या पुढची जोडी-वांडे. गाडा ओढण्यासाठी कसाची व महत्वाची जागा! प्रत्येक गावकऱ्याची आपला बैल चावरीला जुंपावा हि इच्छा असते. चावारीला बैल जुंपून देवाचा रथ ओढून नाथसेवा केल्याची भावना असते. चावरीला अतिशय ताकदवान व अनुभवी बैल असावे लागतात. तसेच चावरी च्या पुढे सहा बैली व आठ बेली अशी वांडी असतात. गाडा सुरुवातीला जेव्हा शेतातून जात असतो तेव्हा चार वांडी लागतात पण 'आळ वाट' सोडल्यावर पुढे तीन वांडी पुरेसी होतात. गाडा गावाजवळ आल्यावर सर्व बैल सोडून हातावर ओढला जातो. बगाडाच्या मार्गाक्रमणाच्या वाटेत ठराविक ठिकाणी बगाड थांबवून फेऱ्या काढण्याचा संकेत आहे. काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी पाच फेऱ्या मारल्या जातात. या फेऱ्या च्या वेळी  बगाड्या चारी दिशाना नमस्कार करून बोंब ठोकण्याची पद्धत आहे. बगाड्या च्या हातात कडू लिंबाचा पाला असतो. व अधूनमधून हा पाला खात असतो. कडूलिंब हा अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म धारण करणारा म्हणून ओळखला जातो. कडूलिंबामुळे शरीराला त्रस्त करणारे काही संसर्ग कमी होतात. तहान लागत नाही उष्णता कमी होते. दिवसभर टांगलेल्या अवस्थेत असताना हा कडूलिंबाचा पाला बगाड्याच्या उपयोगी येतो.
          हा उत्सव सहसा मार्च मध्ये असतो की ज्यावेळी कडक उन्हाळा चालू असतो. बगाडा दरम्यान लोक संपूर्ण पांढऱ्या रंगाचा सुती पेहराव घालतात. या मागे एक वैज्ञानिक कारण असे आहे की पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही तसेच पांढरी कपडे आपले शरीर थंड ठेवण्यासाठी उपयोगी असतात. पांढरी टोपी उच्च तीव्रतेच्या सूर्यकिरणापासून आपल्या मस्तकाचे संरक्षण करते. सुती कपडे उष्णता शोषत नाहीत. बगाडात कोणालाही काळ्या रंगाचे कपडे, चामड्याच्या चपला किंवा कमरेचे चामड्याचे पट्टे तसेच काळा गोप वापरण्याची परवानगी नाही.तसेच बगाडामध्ये कुणालाही कसल्याही प्रकारचे व्यसन करण्याची अनुमती नाही. हा पूर्वापार चालता आलेला एक संकेत आहे व सर्व गावकरी कटाक्षाने पाळतात.
          परंपरेने बगाडामध्ये प्रत्येक समाजावर (बारा बलूतेदारांवर) काही ना काही जबाबदारी दिली गेली आहे. या मानकऱ्याना बगाडामध्ये मानाचे स्थान असते. गाडा तयार करण्याचे काम सुतार घराण्याकडे आहे. गाड्याच्या यठनाची महत्वाची गाठ देण्याचा मान  पिसाळ भावकीला आहे. छबिन्याच्या दिवशी बगाड्याबरोबर असणाऱ्या मशालीला तेल पुरवण्याचा मान तेली समाजाकडे तसेच वर्षभर देवाला फुले पुरवण्याचा मान माळी समाजाकडे आहे. देवाची सेवा करण्याचा मान गावातील गुरव समाजाकडे असतो. सोनेश्वरापासून मंदिरापर्यंत बगाड नेताना व परतताना कण्यामधील चाकाला तेल देण्याचा मान तेली समाजाकडे आहे. बगाड्याला गळ देण्याचा मान मुसळे तसेच नाभिक समाजाकडे, शिडावर बसण्याचा मान दाभाडे यांचेकडे तर पिळकावणीवर उभे रहाण्याचा मान भोसले व पिसाळ तरफेकडे तसेच बगाडाच्या गाड्यावर बसण्याचा मानही तरफेवर ठरवून दिला गेला आहे. देवाला कपडे देण्याचा मान परीट समाजाकडे, डवर पूजन, देवाला वाजत गाजत नेणे, देवाच्या लग्नाची गोष्ट - आख्याइका सांगून देवाचे सेवेकरी राहण्याचा मान डवरी-गोंधळी समाजाकडे, चर्मकार समाजाला मशाल धरण्याचा तसेच देवाला चामड्याचा जोडा देण्याचा मान असतो. भुई समाजाला धुळवडी दिवशी पाण्यात टाकलेली (थोरली विहीर) बगाडाची लाकडे काढण्याचा मान तसेच छबिना व बगाडा दिवशी देवाच्या पालखीला खांदा देण्याचा मान आहे. धनगर समाज माघ अमावस्येला देवाला घोंगडी भेट देतात. खाटिक तसेच रामोशी समाजाला देवाची देणी देण्याचा मान तसेच मातंग समाज बगाडाच्या वेळी वाजंत्री (सनई व डफड) असतात. बगाडात देवाचा जो घोडा असतो त्याच्या नावाने भैरवनाथाच्या मंदिरात घोड्याचा नाल ठोकण्याचा मान लोहार समाजाला आहे. होळीच्या आदल्या दिवशी बगाड्याचा गळ आणण्याचा मान नाभिक समाजाला आहे. बगाडाचे शीड मागच्या बाजूने धरण्याचा मानही गावातील मानकरी यांचा आहे. यामध्ये माळी समाजाला प्राधान्याने मान देतात. तसेच गावातील माहितगार तसेच ताकदवान माणसेच हे काम करू शकतात कारण बगाड गाड्याचे पूर्ण नियंत्रण या शिडाच्या मागच्या बाजूवर अवलंबून असते. मुस्लीम समाज देखील या देवगाड्याचा त्यांच्या पात्रतेच्या कामात सहकार्य करून आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदवतात. म्हणजे बगाड यात्रेदरम्यान गावात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे भावना पाहायला मिळते.
          बगाड जननी आई च्या भेटीसाठी जाते तेव्हाही बगाड्याचा मान 'मानाच्या बगाड्यास' असतो. एकूणच बगाडामध्ये सर्वच समाजाला वाड्या वस्त्यांना मान दिला गेला असल्याने सामाजिक ऐक्य टिकण्यास मदत होते. बगाडामध्ये काम करणाऱ्या, देवाची सेवा करणाऱ्यास त्यांच्या सेवेच्या बदल्यात इनामी जमिनीही दिल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे यात्रा काळात गावकरी स्वत: तसेच कुणालाही व्यसन करू देत नाहीत. आज व्यसनमुक्त भारत हि खरी काळाची गरज आहे. तंबाखू, सिगारेट व दारू ह्या सारख्या व्यसनांना या उत्सवादरम्यान आजीबात थारा नसतो. व्यसन केलेल्या माणसाला बगाड गाड्या आसपास अजिबात येवू दिले जात नाही.
          अशा प्रकारे संध्याकाळी पाच नंतर सोनेश्वरावरून निघालेले हे बगाड भैरवनाथाच्या मंदिरासमोर येते आणि बगाड सुरक्षित पोहोचल्याचा लोक उसासा टाकतात. नंतर बगाड्याला खाली उतरवून मंदिरा मध्ये नेतात आणि एक ग्लासभर दूध प्यायला देतात. या सर्व धार्मिक विधीनंतर बगाडाच्या उत्सवाची सांगता होते.
          तिसऱ्या दिवशी (फाल्गुन वद्य षष्टी) लोकनाट्य तमाशा, कुस्त्या, मुझीकल नाईट इ भरगच्च कार्यक्रमांचा या उत्सावात समावेश असतो. तमाशा बघण्यासाठी  पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने रसिक गर्दी करत असतात. लाल मातीतला मर्दानी समजला जाणारा कुस्तीचा खेळ दुपारी असतो. गावाबरोबरच इतर गावातली मंडळीही सहभागी होतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण कुस्ती खेळण्यासाठी सहभागी होतात. यात्रौत्सवात कुस्तीत जिंकणार्‍याला वस्तुच्या तसेच रक्कम स्वरुपात बक्षीसे दिली जातात. या दिवशी गावामध्ये खूप गर्दी असते. गावकरी, पंचक्रोशीतील नागरिक तसेच पै पाहुणे याबरोबरच महाराष्ट्र च्या काना कोपऱ्यातून आलेले रसिक या वेळी गावात उपस्थित असल्याने ही गर्दी होते.
          अलीकडे गेल्या काही वर्षांपासून गावाने बगाडातील सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी यात्रा कमिटी स्थापन केली आहे. यासाठी बगाडाच्या पुढे एका ट्रक्टर-ट्रोलीमध्ये ध्वनिक्षेपकांवरून सुचना देण्याची व्यवस्था केली आहे. पैपाहुणे यांना यात्रेचा दुरून आनंद घेण्याच्या तसेच गावकऱ्याना योग्य त्या सूचना केल्या जातात. त्यामुळे श्रेयवाद, मोठेपणा, गैरसमज यामुळे आपापसात होणारे मतभेद बंद झाले आहेत. त्यामुळे बगाड यात्रा अगदी सुरळीत पार पडते आहे. बगाडा दरम्यान सर्व जुने मित्र एकमेकांना भेटतात व पूर्णवेळ आनंदी वातावरणात घालवतात. तसेच गावकऱ्याना त्यांचे सर्व नातेवाईक भेटतात. माहेरवाशीणीना गावाचा उत्सव तसेच आपल्या नातेवाईकांची भेट घेता येते. गावातील प्रत्येकजण आपल्या नातेवाईक व मित्रांना या यात्रेविषयी इतमभूत माहिती देत असतो.तसा हा बैलांचा खेळ ! त्यामुळे गावोगावचे बैल शोकीन बैल बघण्यासाठी तसेच बैलाचे बगाडातील काम बघण्यासाठी हजेरी लावतात व या आनंदी सोहळ्याचा मनमुराद आनद लुटतात.
          बावधनचे बगाड म्हणजे उत्सव व 'ईर्षेचा खेळ' असे म्हंटल्यास वावगे ठरू नये. धनधान्याची सुबत्ता तसेच धनिक असणाऱ्या समूहास (तरफ) गावात वर्चस्व प्रस्थापित करण्याची कल्पना सुचायची. तसं बघायला गेलं तर पूर्वी बगाड म्हणजे देवाच्या उत्सवा बरोबरच गावातील दोन मुख्य तरफांमधील उन्नतीची स्पर्धाच अधिक असायची. बगाडाच्या हौसेपोटी हि मंडळी अगदी धष्टपुष्ट बैल विकत घ्यायची त्यांना बगाडाचे विशिष्ट प्रशिक्षण देवून बगाडाला जुंपुन दुसऱ्या तरफेतील बैलांचा गाडा ओढण्याच्या स्पर्धेत पाडाव करायाचा. यासाठी गाड्याच्या शिवळामध्ये एका बाजूला एका तरफेची बैल व दुसऱ्या बाजूला दुसऱ्या तरफेची बैल अशी प्रथा होती. दुसऱ्या तरफेला शह देवून बैलानी पाडाव केल्यावर गावात या तरफेचे वर्षभर 'वर्चस्व' असा छुपा संकेत ! आता यात्रा कमिटीमध्ये बैल जुंपण्यासाठी वेगवेगळे खुत्ते (गाड्याचा थांबा) ठरवून दिले जातात व त्या त्या खुत्त्यावर गावातील मानकरी आपापली (फक्त एका तरफेची) बैल जुंपतात व हि परंपरागत चालत आलेली छुपी स्पर्धा कमी झालेली जाणवतेय. पण या रांगड्या खेळातून मिळणारा आनंद पूर्वीप्रमाणे तसाच्या तसाच राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक माहेरवाशीणीप्रमाणेच गावाबाहेर नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या चाकरमान्यानाही या नाथाच्या उत्सवाची ओढ लागलेली असते. या गावातील चाकरमानी मंडळी यादिवशी कुठेही असोत तसेच त्यांना कसलेही काम असलेतरी देवावर गुलाल टाकण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात.
          बगाड म्हणजे बगाड नसते, सोहळा असतो नाथसाहेबांचा
          प्रत्येक वर्षाची वाट पाहणाऱ्या, सोहळा तो प्रेमांच्या नात्याचा..........
          थोडक्यात बावधन ची बगाड यात्रा म्हणजे धाडसी खेळ, गावपातळीवरची स्पर्धा, इर्षा, सामाजिक ऐक्य, रूढी, परंपरा तसेच संस्कृती यांचे अनोखे दर्शन असते. 







प्रा (डॉ) केशव यशवंत राजपुरे
_______________________________________________

No comments:

Post a Comment