Sunday, February 27, 2022

अमित, मराठी प्रतिभेची यशोगाथा

आधुनिक मराठी प्रतिभेची यशोगाथा



दे आसरा या फाउंडेशन च्या वेबपोर्टल वरील सप्टेंबर २०२० च्या यशस्वी उद्योजक या मासिकामध्ये "डिजिटल उद्योजकतेचा भाषिक अविष्कार" हा प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने ताठ होईल असा जोत्सना नाईक यांचा उत्कृष्ट लेख वाचला. यामध्ये त्यांनी राजेंद्र, रोहित, तृषांत आणि शशिकांत चार मराठमोळ्या तरुणांनी परदेशातील लठ्ठ डॉलर पगाराकडे पाठ फिरवून पुणे येथे स्थापित केलेल्या युणुस्कू अर्थात अडजेब्रा या अकरा भारतीय भाषातील वर्तमानपत्र व मासिकांच्या संकेतस्थळांना जाहिराती देणाऱ्या कंपनीस फारच कमी वेळात कसे नावारूपास आणले आहे याचे नेमके वर्णन केलेले आहे.

रोहित बागड, राजेंद्र चंदे, तृषांत उगलमुगले व शशिकांत उर्फ अमित अनपट हे चौघे देखील अभियांत्रिकी आणि व्यवसाय प्रशासनातील पदवीधर तरुण नोकरीनिमित्त अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या वेगवेगळ्या देशात कार्यरत होते. खाजगी कंपनीत वेगवेगळ्या ठिकाणी सेवा करत असताना कंपनीत सर्विस ऐवजी भारतातच यशस्वी व्यवसाय करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. सुरुवातीला साडेसात लाख भाग भांडवलावर २०१३ मध्ये पुण्यात बालेवाडी येथील आपल्या मित्राचे भाडेतत्वावर घर घेऊन ईमेल मार्केटिंग प्रॉडक्टसाठी "युनुस्कू" ही कंपनी स्थापन करण्याच धाडस त्यांच्यापैकी एकाने केलं. मार्गात येणाऱ्या विविध अडथळ्यांवर मात करून त्यांनी हा व्यवसाय वाढवला आणि कोट्यावधीची उलाढाल असणारी कंपनी आता ते चौघेजण एकत्र येऊन चालवत आहेत. सध्या त्यांच्या कंपनीमध्ये महिना वीस हजार पासून दीड लाख रुपये पगार घेणारे जवळजवळ पंचावन्न कर्मचारी आहेत ही गोष्टच त्यांच्या यशस्वितेची पोहोच देतात.

लेखांमध्ये या कंपनीची सुरुवात, विस्तार, वाढ आणि यशस्विता याबद्दल बारीक-सारीक तपशील देऊन सांगितलेल आहे. तसेच ही कंपनी नक्की कशा पद्धतीचे काम करते याचा ऊहापोह देण्यात आला आहे. कुठलेही संकेतस्थळ, विशेषत; वर्तमानपत्र आपण कॉम्प्युटर वर उघडले की आपल्याला मुख्य संदर्भा व्यतिरिक्त आपल्याशी निगडीत जाहिराती दिसू लागतात. या जाहिराती पुरवण्याचे काम ही कंपनी करते. हे फर्म उभा करताना जोखीम तसेच फार मोठे आव्हान होतं. यासाठी त्यांनी त्यांचे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव पणास लावले म्हणून आता ते यशस्वीतेच्या शिखरावर आहेत. मातृभुमीत राहून आपल्या लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून देशसेवा करण्याची आधुनिक मराठी प्रतिभेची यशोगाथा म्हणून आपण या कथेकडे जरूर पाहू शकतो. ही यशोगाथा वाचल्यानंतर अभिमानानं ऊर भरून येतो. 

या चार तरुणांपैकी शशिकांत उर्फ अमित अनपट हा माझ्या बावधन अनपटवाडी गावचा... त्याची यशोगाथा मी माझ्या ब्लॉगवर अगोदर प्रकाशित केली आहेच. तरी पण या लेखाच्या पार्श्‍वभूमीवर असे सांगावेसे वाटते की खेडेगावातील ग्रामीण शेतकरी कुटुंबातून येऊन एका यशस्वी उद्योजक समूहाचा भाग बनायचे कौशल्याचे आणि चिकटीचे काम अमितने केलेल आहे. अभियांत्रिकी शाखेतून शिक्षण घेऊन यशस्वितेचे दरवाजे ठेवणाऱ्या सर्व मराठी मुलांसाठी अमित हे एक उत्तम उदाहरण आहे. नामांकित कंपनीत डॉलर्स मिळवताना आपल्या कारकीर्दीविषयी चौकटी बाहेर जाऊन निर्णय घेताना सामान्यतः आम्हाला भीती वाटते. परंतु अशावेळी त्याच्या पालकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचे समर्थन केले म्हणूनच अमित धाडसानं त्याने केलेला मानस पूर्ण करू शकला हेही लक्षात घ्यायला पाहिजे. अमितच्या या महान कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याची ही संधी मी घेत आहे. नजीकच्या भविष्यात आणखीन भरगोस यश आपल्या पदरी पडेल यासाठी अमित आपणास हार्दिक शुभेच्छा.

मूळ लेख: www.deasra.in

- केशव यशवंत राजपूरे

No comments:

Post a Comment