Monday, April 12, 2021

सौरभ पाटील


सौरभ एक मेहनतशील प्रतिभा

दरवर्षी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभावेळी द्वितीय वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यास त्याच्या शैक्षणिक, कला, क्रीडा, लेखन, वक्तृत्व तसेच समाज कार्य यामधील उल्लेखनीय कामगिरी करता राष्ट्रपती सुवर्णपदक दिले जाते. विद्यार्थ्यांच्या कारकीर्दीत ही प्रतिष्ठित कामगिरी असल्याचे मानले जाते. भौतिकशास्त्र विभागातील एम एस भाग दोन चा वर्गप्रतिनिधी सौरभ संजय पाटील याने यावर्षी यासाठी अर्ज केला होता. अर्जाची छाननी करून त्याच्या नावाची शिफारस केल्यानंतर त्याच्यात दडलेली प्रतिभा लक्षात आली. नंतर त्याची मुलाखत घेण्यात आली आणि शिवाजी विद्यापीठातर्फे दिले जाणारे यावर्षीचे राष्ट्रपती सुवर्णपदक अपेक्षितपणे सौरभला जाहीर झाले. ती अर्थातच योग्य निवड होती. अस्सल प्रतिभेचा हा सन्मान होता. सुरुवातीपासूनच सौरभने शैक्षणिक उत्कृष्टता जपली आहे. प्रतिभावंत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी त्याची यशोगाथा एक प्रेरणास्त्रोत ठरेल. तरुणांसाठी ही प्रेरणादायक मशाल असू शकते.

कोल्हापूर जिल्यातील कागल तालुक्यातील कौलगे या खेडेगावातील प्राध्यापक डॉ संजय व संगीता पाटील यांच्या पोटी २१ जानेवारी १९९८ रोजी सौरभ चा जन्म झाला. शिक्षणाचे बाळकडू घरातूनच मिळाले ! पालक जरी शिक्षक असले तरी अशा घरी पाल्यांत प्रतिभेचा विकास होताना आपल्याला क्वचितच आढळतो. पण सौरभ च्या बाबतीत ती प्रतिभा अंतर्भूत असल्याने ती विकसीतच होत गेली.

त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जीवन शिक्षण विद्यामंदिर कौलगे या प्राथमिक शाळेत झाले. तो नेहमी अव्वल स्थानी राहत असे आणि सर्व परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवायचा. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत त्याला ३०० पैकी तब्बल २८४ गुण मिळाले होते. सहाव्या इयत्तेत असताना भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत तो जिल्ह्यात बारावा आला होता. तर सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पंचविसावा आला होता. गुणवत्ता ही नसानसात ठासून भरलेली होती याचे हे पुरावे होते. ज्या क्षेत्रात पाऊल ठेवायचे तेथे उत्कृष्टता मिळवायची हा ध्यासच जणू त्यांन लहानपणापासून घेतला होता. शिष्यवृत्ती परीक्षेतील यश हे जन्मजात प्रतिभा आणि मेहनती क्षमता असल्याचा पुरावा मानला जातो. या सुरुवातीच्या काळातील परीक्षा पाठांतरावर आधारित वाटत असल्या तरी नंतरच्या काळात त्याने यातील यश आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे प्राप्त केले होते हे सिद्ध केलं आहे.

त्याचा पुढचा शैक्षणिक प्रवास दऱ्याचे वडगावच्या गुरुकुल विद्यालय व अर्जुननगर येथील मोहनलाल जोशी विद्यालय येथे झाला. त्याचे वक्तृत्व आणि निबंध लेखन कौशल्य या दिवसात बहारास आले. माहित असलेल्या शालेय, तालुका, जिल्हा तसेच विभागीय पातळीवरील जवळ जवळ सर्व स्पर्धांमध्ये त्याने भाग घेतला आणि यशश्री खेचून आणली. शालेय जीवनात त्याने ४० तर महाविद्यालयीन जीवनात ५५ स्पर्धांमध्ये बक्षीसं मिळवली आहेत. वक्तृत्वामध्ये त्याचे विशेष कौशल्य आहे. इतरांची भाषण, अवगत ज्ञान तसेच केलेले विचारमंथन याआधारे तो या स्पर्धांची तयारी करत असे. या स्पर्धांसाठी त्याच्याजवळ भाषणाचे किंवा निबंधाचे लेखी प्रारूप फारच क्वचित असे. उस्फुर्तपणे व्यक्त व्हायची त्याला सवय आहे. नाविन्यपूर्ण विचाराने व्यक्त होणारी तरुण पिढी घडवणे हाच तर आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा मुख्य हेतू आहे. मला वाटते त्याच्या बाबतीत हा हेतू साध्य झाला आहे.

माध्यमिक शाळेत असताना दरवर्षी विज्ञान प्रदर्शनात त्याचा सहभाग ठरलेला ! साध्या प्रात्यक्षिकांद्वारे तो तरुणांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून विज्ञान लोकप्रिय करायचा प्रयत्नात असे. म्हणूनच ३८ व्या कोल्हापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्याच्या प्रयोगास प्रथमांक मिळाला होता. गंगटोक सिक्कीम येथे झालेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात तो सहभागी झाला होता. त्याच्या जीवनाच्या त्या वळणावर वैज्ञानिकता त्याच्यात रुजली होती.


२०१४ साली दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून त्याने विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आणि परत एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. दहावीच्या गुणांवर त्याने शासनाची राजर्षी शाहू शिष्यवृत्ती मिळवली होती. डॉक्टर किंवा अभियंता होण्याऐवजी शास्त्रज्ञ होण्याचा दृढनिश्चय असल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने विज्ञान विद्याशाखेत प्रवेश घेतला. तरुणांमध्ये संशोधकता रुजली की ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जातात व त्यांच्यातील चौकसबुद्धी आणि चाणाक्षपणास चालना मिळते. सौरभसाठी हाच अजेंडा समोर होता त्यामुळे त्यांन कुतूहलपूर्वक शिक्षण घेतल. कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयातून त्याने ८४ टक्के गुणांसह बारावीच्या परीक्षेत यश संपादन केले. पुढं इतर व्यवसायिक शिक्षणाकडे आकर्षित न होता त्यांन विज्ञान विषयातून पदवी शिक्षण घेण्याचा मानस ठेवला.

त्यानंतरचे पदवी शिक्षण त्याने विवेकानंद महाविद्यालयात राहूनच पूर्ण केले. तो सलग तीन वर्ष गुणवत्ता शिष्यवृत्ती चा मानकरी होता. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या डीएसटी इन्स्पायर शिष्यवृत्तीचा देखील तो मानकरी आहे. महाविद्यालयीन जीवनामध्ये वक्तृत्व, वाद-विवाद तसेच युवा महोत्सवानिमित्त आयोजित सर्व स्पर्धांमध्ये आणि अतिरिक्त कार्यक्रमांमध्ये तो सक्रिय सहभाग नोंदवत असे. या कार्यक्रमांमध्ये तो नेहमी विजेत्या संघाचा सदस्य असे. राष्ट्रीय सामाजिक योजना शिबिरात सौरभ सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक ठरलेला असायचा. तसेच तो मुंबई येथील राज्यस्तरीय लोकसेवा अकादमी, आदर्श युवक तसेच न्यूजपेपर गंगाधरचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि सर्च मराठी युट्यूब चॅनेलचा युथ आयकॉन पुरस्कारांचा विजेता देखील आहे.

यादरम्यान खासदार धनंजय महाडिक यांच्या विद्यार्थी संसद मध्ये 'प्रश्न तुमचे प्रश्न मी मांडणार संसदेत' या कार्यक्रमाद्वारे नवी दिल्ली येथे गेलेल्या २६ विद्यार्थ्यांच्या चमूमध्ये देखील त्याची निवड झाली होती. यामुळे त्याला आपली संसद आणि त्याच्या कारभारा विषयी सविस्तर माहिती घेण्याची संधी मिळाली. व या कार्यक्रमात त्याची मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या समवेत भेट झाली होती. आपण ज्या समाजातून आलो त्या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून आपल्याला मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेतून त्याने गरजू मुलांना आर्थिक मदत करत शैक्षणिक पालकत्व स्वीकारले होते. जर अशी विचारसरणी विद्यार्थीदशेत रुजली असेल तर भविष्यात त्याच्याकडून भरीव समाजकार्य अपेक्षित करायला काय हरकत आहे ?


तो विवेकानंद महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन आणि क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धांमधील कामगिरीच्या जोरावर अष्टपैलू व्यक्तीमत्वासाठीच्या प्रथम "स्टुडंट ऑफ द इअर" पारितोषिकाचा मानकरी ठरला होता. प्राधान्यक्रम, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा व नाविन्यपूर्ण विचार हे त्याच्या यशाचे सूत्र आहे. भौतिकशास्त्र हा विषय जीवनात उपयुक्त अशा विश्लेषणात्मक आणि तर्किक मानसिकतेसाठी उपयोगी पडतो. म्हणून त्यांने बीएससीसाठी भौतिकशास्त्र हा प्रमुख विषय निवडला. बीएससी च्या तिन्ही वर्षात तो ९५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून प्राविण्यासह विद्यापीठात प्रथम आला होता. संशोधन करीयर डोळ्यासमोर ठेवून २०१९ साली त्याने एमएससी भौतिकशास्त्र या विषयास प्रवेश घेतला. इथेही तो प्रगतीपथावर आहे. लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर शक्य होईल तेव्हा प्रकल्पांमध्ये योगदान देत आहे. स्थानिक वर्तमानपत्रात कोरोनाविषयी चार संशोधन लेेख प्रसिद्ध केले तसेच जवळजवळ पन्नास ऑनलाईन कार्यशाळा मध्ये सहभाागी झाला आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्याने सहभाग नोंदवला आहे तर काही ठिकाणी शोधनिबंध सादरीकरण देखील केले आहे. त्याने त्या जगाचे अन्वेषण करण्यास सुरवात केली आहे, ज्यामध्ये त्याला आपली कारकीर्द बनवायची आहे.




सौरभने आजवर समाजिक कार्यात देखील भरीव कामगिरी केली आहे. त्याला मिळालेल्या इनस्पायर शिष्यवृत्तीतून त्याने चेतना अपंगमती विद्यालयातील दिपक वडार या विद्यार्थ्यांचे एक वर्षासाठी शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेले होते. तसेच कुरुकली येथील नंदी बैलावर उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबाच्या घराला आग लागली होती व त्यांचे फार मोठे नुकसान झाले होते. सौरभने त्या घरातील सहावीत शिकत असलेल्या मुलीचा सहावी ते दहावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च उचलला आहे. वृद्धाश्रम, जनजागृती रॅली यात त्याने हिरिरीने भाग घेतला आहे. त्याने कोविडच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेचा कोविड- १९ चा प्रोग्रॅम पूर्ण केला आहे.



मला भावलेला त्याचे गुण म्हणजे विनय, साधेपणा आणि जतन करण्याची सवय. त्याचे पहिलीपासून आत्तापर्यंतचे सर्व गुणपत्रके, प्रमाणपत्रके, फोटो, सर्व कागदपत्र इतकी छान आणि व्यवस्थित जतन करून ठेवले आहेत की काय बोलता सोय नाही .. 


 
शैक्षणिक प्रवासात स्वत: ला सिद्ध ठेवणे खूप कठीण काम असते. त्याने हे प्रभावीपणे केले आहे. शिक्षणातच नव्हे तर इतर गोष्टीतही त्याने उत्कृष्टता प्राप्त केली आहे. खर्‍या अर्थाने तो अष्टपैलू आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून येणार्‍या तरुणांसाठी तो युवा प्रतीक आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. मी त्याला जीवनातल्या सर्व यशांची शुभेच्छा देतो.

डॉ केशव यशवंत राजपुरे
 

सौरभ संजय पाटील विशेष मुलाखत






 


9 comments:

  1. Very nice Sir.Thanks for sharing such a good blog.

    ReplyDelete
  2. Very much inspirational and motivational journey of Sourabh Patil and very well written by you Sir👍👍 Thank you so much sharing the same. You are really doing great work with this blog Sir ... This will definitely ignite hundreds of young minds..and motivate them to shift towards better purpose of life. Thank you so much again Sir..please keep posting.. And keep inspiring...

    With respectable regards,
    Yours sincerely,
    Ulka

    ReplyDelete
  3. 💐💐💐मनापासून अभिनंदन तसेच भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

    ReplyDelete
  4. सर, लेख खूप छान, विस्तृत, सविस्तपणे लिहला असून चि. सौरभ ची शैक्षणिक यशोगाथा अगदी प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत मांडली आणि सदर गाथा इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा दायी ठरेल यात वादच नाही. परंतु तुम्ही ही बाब शेअर करून मोलाचे कार्य केले आहे तसेच विद्यार्थ्याचा गुण गौरव व कौतुक करणारा तुमच्यासारखा शिक्षक सुद्धा तेवढाच महान मानावा लागेल. सर,दोघांचेही अभिनंदन !!

    ReplyDelete
  5. आदरणीय सर

    लेख अतिशय समर्पक व प्रेरणादायी आहे

    धन्यवाद

    ReplyDelete
  6. डाॅ केशवराव राजपुरे सर आपले सर्व प्रथम मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आपण सौरभ पाटील या विद्यार्थ्यांचा जो लेख लिहिला आहे. तो अविस्मरणीय असा आहे. तुमच्या सानिधयात आल्या वरती आसे हिरे घडत आहेत. हेच तुम्ही जे शाळेसाठी विद्यार्थ्यासाठी रात्रंदिवस कष्टाचे फळ आहे.विद्यापिठ, जिल्हा, महाराष्ट्र, देशासाठी आसी मुले घडत आहेत.यामुळे भारत देशाचे नाव उज्ज्वल व्हायला वेळ लागणार नाही.तुमच्या किर्तीचा डंका आसाच जगभर वाजत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच कुमार सैरव पाटील याचे मःन पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा.सैरव पाटील याच्या प्रगतीचा डंका आसाच वाजत रहावो. सैरव ने जे यश प्राप्त करून स्वताचे, आई वडिलांचे,गुरूजनांचे,विद्यापीठाचे, जिल्हायाचे महाराष्ट्राचे व देशाचे,नाव उज्ज्वल केले आहे. त्या बद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन.दिवस रात्र मेहनतीचे हे फळ आहे. यात तिळमात्र शंका नाही.तुझी अशीच उत्तरो उत्तर प्रगती होत राहो हिच श्रीचर्णी प्रार्थना. परत एकदा तुझे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा.जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी विद्यापीठ.क्रमश 🇮🇳🇮🇳🚩🙏🙏दिलीप अनपट.काही चुकलं असल्यास क्षमस्व 🙏🙏

    ReplyDelete
  7. खूपच छान!सौरभ बद्दलची एवढी संकलीत माहिती ही फक्त एक उत्कृष्ट शिक्षकच देऊ शकतो.सौरभच्या भावी वाटचालीत सर आपला खूपच मोलाचा वाटा आहे .आपणाकडून सौरभ सारखे लाखो विद्यार्थी घडवले जावेत ही शुभेच्छा!सौरभला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

    ReplyDelete