Wednesday, December 16, 2020

शहीद जोतिबा गणपती चौगुले प्रथम पुण्यस्मरण




शहीद जवान जोतिबा गणपती चौगुले यांना प्रथम पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन !!
(१६ डिसेंबर २०२०)

गडहिंग्लज तालुक्यातील उंबरवाडी-महागाव येथील शेतकरी कुटुंबात जोतिबा गणपती चौगुले यांचा २३ सप्टेंबर १९८२ रोजी जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा उंबरवाडी तर माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यालय महागाव येथे झाले. त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण गडहिंग्लजच्या घाळी तसेच शिवराज महाविद्यालयात घेतले. शालेय जीवनात त्यांना विविध क्रीडा प्रकाराची आवड होती. विशेषतः कब्बड्डी खेळात ते विशेष निपुण होते. खेळातील उत्कृष्टता, चांगली शरीरयष्टी व देशभक्ती यामुळे त्यांनी भारतीय लष्कराच्या सेवेद्वारे देशाची सेवा करण्याचे ठरविले. त्यादृष्टीने तयारी करून ते ५ एप्रिल २००२ रोजी महाविद्यालयात शिकत असतानाच बेळगाव येथे ६ मराठा लाईट इन्फ्रंट्रीमध्ये हवालदार या पदावर भरती झाले.

प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांची भुज गुजरात येथे नियुक्ती झाली होती. पुढे त्यांनी सांबा (जम्मू), सिक्कीम, लेह लडाख आणि पूणे येथे सेवा बजावली.या सेवेदरम्यान त्यांना दक्षिण आफ्रिका येथे वर्षभर कार्य करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते पाकिस्तानी सीमेवर जम्मूमधील राजुरी येथील सीमेवर तैनात होते. ता १६ डिसेंबर २०१९ रोजी सेवा बजावत असताना पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत त्यांना वीरमरण आले. आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी यशोदा तसेच एक बंधू आहेत. त्यांना अथर्व (वय नऊ) आणि हर्षद (वय चार) ही मुले आहेत. राष्ट्राच्या सेवेत आणखी एका कुटुंबाने आपला आधार गमावला आहे. वीरपत्नी यशोदा या पदवीधर असून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी नोकरी करण्यास तयार आहे. वीरपत्नी यशोदा यांचा भाऊदेखील सैन्यात नोकरी करत आहे. त्यांना त्यांच्या माहेरचा भक्कम आधार आणि पाठींबा असल्याने त्या समर्थपणे मुलांचा सांभाळ करत आहेत.

जयहिंद फौंडेशनने या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहीद कुटुंबीयांची लागलीच भेट घेऊन विचारपूस व सांत्वन केले होते. फौंडेशन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना मदतीचा हात देत आहेच तसेच त्यांच्या सुख-दुःखात सामील होत आहे.

या प्रथम पुण्यस्मरण दिनी शहीद जोतिबा गणपती चौगुले यांना जयहिंद फाऊंडेशन कडून विनम्र अभिवादन ! 🙏

जयहिंद फाऊंडेशन (सैनिक हो तुमच्यासाठी)

#जयहिंद #जयहिंदफाऊंडेशन #सैनिकहोतुमच्यासाठी
#JAIHIND #JaihindFoundation

No comments:

Post a Comment