Saturday, November 7, 2020

प्रा. (डॉ.) केशव राजपूरे सरांनी गाठले जगातील अव्वल संशोधकांच्या यादीत शिखर

जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान 

अलीकडेच अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने विविध विषयात संशोधन करणाऱ्या शीर्ष २% वैज्ञानिकांची जागतिक यादी जाहीर केली. त्यात शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विषयाचे प्राध्यापक डॉ. केशव राजपुरे सर यांचे नाव पदार्थ संशोधन (मटेरियल्स) या विषयाच्या यादीत समाविष्ट झाले आहे. पदार्थ संशोधकांच्या जागतिक क्रमवारीत सर १४१० वे व भारतीय क्रमवारीत ३७ वे आहेत. जगाच्या ज्ञानात अधिकची भर पडावी म्हणून कोट्यावधी संशोधक अहोरात्र संशोधन करीत असतात. त्या समर्पित संशोधकांच्या गर्दीतून प्रभावी संशोधन जगासमोर मांडून शीर्ष २% च्या यादीत येणं ही काही सामान्य गोष्ट नाही. ही सरांची जन्मभूमी असलेल्या बावधन पंचक्रोशीस, कर्मभूमी असलेल्या शिवाजी विद्यापीठास तसेच अख्ख्या महाराष्ट्राला आणि पर्यायाने देशासाठी भूषणावह गोष्ट आहे. या गोष्टीमुळे सरांनी सर्वांचेच नाव मोठे केले आहे. ज्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने ही यादी जाहीर केली त्यांनी प्रत्येक संशोधकाचे कार्य, प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखांची संख्या, त्यांना मिळालेले सायटेशन्स, एच-इंडेक्स, संशोधनाची उपयोजकता यांसारख्या विविध निकषांवर संशोधक निर्देशांक तपासून यादीतील क्रमवारी ठरवली आहे. 

सरांचे संशोधन क्षेत्र मटेरियल्स म्हणजे पदार्थ हे सर्वसामान्यांच्या ओळखीचं जरी नसलं तरी सर्वात जवळचं आहे हे मात्र नक्की. कारण आपल्या सभोवताली जे काही दिसतं आपण ज्याला स्पर्श करू शकतो त्या सर्व गोष्टी ‘पदार्थ’ या एकाच छत्राखाली येतात. दिसणाऱ्या पदार्थांचे न दिसणारे गुणधर्म शोधून त्याला सर्व प्राणिमात्रांच्या सुखसोयीसाठी वापरात आणण्याचं कार्य पदार्थ संशोधक करीत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर, लिथियम हे एक निसर्गात अस्तित्वात असलेलं मूलद्रव्य आहे, पण त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास करून त्याच्यापासून बॅटरी बनवण्याचं श्रेय पदार्थ संशोधकांचं आहे. लिथियम निसर्गात कुठे सापडतं किंवा असे कुठले मूलद्रव्य असते हेही माहीत नसणाऱ्या व्यक्तीच्या खिशातील मोबाइलमध्ये लिथियम बॅटरी असते; यावरून आपल्याला पदार्थ संशोधनाचे व त्या विषयात संशोधन करणाऱ्या संशोधकांचे महत्त्व लक्षात येईल. हे फक्त एक उदाहरण झालं, अशी शेकडो (नाही लाखो) उदाहरणे देता येतील. पूर्वी सहज मोडणाऱ्या प्लास्टिकच्या खुर्च्या आता आदळल्या तरी मोडत नाहीत किंवा घराच्या रंग दिलेल्या भिंतीवर आता धूळ बसत नाही, यामागेही पदार्थ संशोधकांचे हात आहेत. शिवाजी विद्यापीठाला उच्च संशोधन मान्यता मिळवून देणारे प्रमुख संशोधन क्षेत्र म्हणजे मटेरियल सायन्स. आणि याच क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत सरांचा समावेश झाला आहे.

विविधांगी पदार्थांचा अभ्यास करून त्यांना विविध तंत्रज्ञानात वापरण्यायोग्य बनवण्यात प्रा. राजपुरे यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी विद्यार्थीदशेपासूनच नाविन्य आणि उत्कृष्टता यांची कास धरली होती. एम. एस्सी. प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाल्यानंतर चालून आलेल्या अनेक संधी सोडून त्यांनी पूर्णवेळ संशोधनाची ‘न्यारी वाट’ निवडली. स्टोरेज सेल अर्थात ऊर्जा विद्युत घट पासून झालेली सुरवात वेगवेगळे विषय हाताळत आता मेमरीस्टर (मेमरी रेजीस्टर) पर्यंत आली आहे. वातावरणातील घातक वायु तपासणाऱ्या पदार्थांवर (गॅस सेन्सर) त्यांनी काम केलं आहे. शरीरास घातक असणारी असणारी अतिनील किरणांचे (अल्ट्रा व्हायलेट) अस्तित्व दाखवणाऱ्या पदार्थांवर संशोधन शिवाजी विद्यापीठात त्यांनीच सर्वप्रथम सुरू केले. फोटोकॅटालायसिस म्हणजे सूर्यप्रकाश व सेमीकंडक्टर वापरुन पाणी शुद्धिकरणावर त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण संशोधन केले आहे, त्यावर त्यांचे दोन पेटंट देखील आहेत. 

फोटोकॅटालायसिस या विषयातील मोठे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे, याविषयावरील त्यांची व्याख्याने खूप गाजली आहेत. त्यांच्या नावे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले २०० संशोधन लेख (शोध निबंध) आहेत, त्या लेखांचा आजअखेर ७६२५ वेळा संशोधनात्मक उपयोग (सायटेशन) झाला आहे. संशोधन लेखांची संख्या व त्यांचा इतरांच्या संशोधनासाठी झालेल्या उपयोगावरून एच-इंडेक्स काढला जातो; त्यावरून संशोधकाचा संशोधनात्मक दर्जा ठरतो. सैद्धांतिकदृष्ट्या महत्तम एच-इंडेक्स संशोधन लेखांच्या संख्येइतका असू शकतो, पण सामान्यपणे तो १५ ते २० टक्क्यांपर्यंत आढळतो. पण सरांच्या बाबतीत तो (एच-इंडेक्स- ५३) एकूण शोध निबंध संख्येच्या जवळपास ३०% इतका आहे. याचा अर्थ सर करत असलेले पदार्थ विषयक संशोधन हे खरंच नावीन्यपूर्ण आणि समाजोभिमुख आहे. त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन कार्य विचारार्थ घेऊन २०१५ साली ‘महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स’ ने त्यांना कायमचे सदस्यत्व देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. संशोधनातील ही प्रगती व त्याबद्दलची तळमळ पाहून विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्याकडे संशोधन सुविधा केंद्र असणाऱ्या युसिक, सीएफसी विभागाच्या विभागप्रमुख पदाची आणि केंद्र सरकारच्या डीएसटी-सैफ केंद्राच्या समन्वयक पदाची जबाबदारी चार वर्षापूर्वी सोपवली आहे. त्यांच्याच विशेष प्रयत्नांमुळे त्या विभागात टीईएम, एक्सपीएस, एएफएम, स्मॉल अंगल एक्सआरडी, मायक्रो रमन यांसारखी पदार्थ संशोधनात उपयोगी असणारी अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणे आली आहेत. या सुविधेमुळे विद्यापीठातील संशोधनाची गुणवत्ता आणखीण वाढणेस मदत होईल.

सरांनी मिळवलेलं हे यश त्यांना एका रात्रीत मिळालं नाही, त्यामागे कित्येक वर्षांची तपश्चर्या व संयम आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक धडपडी मुलगा महत्त्वाकांक्षेच्या बळावर गरुड भरारी घेऊ शकतो याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. सरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात बावधन गावाच्या अनपटवाडी या छोट्याश्या वाडीत झाला. जन्मजात हुशारी लाभलेल्या सरांनी अगदी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सर्वोच्च गुणवत्ताधारी शिक्षण प्राप्त केले. १९९२ साली बी. एससी. त ९१ टक्के गुण प्राप्त करून त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले होते. पुढे एम.एससी. ला तीच गुणवत्ता टिकवून पुन्हा अव्वल स्थान कायम ठेवले होते. २००० ला त्यांनी फिजिक्समध्ये डॉक्टरेट मिळवली. संशोधनाचा विषय होता; सेमीकंडक्टर सेप्टम संचय घट वापरुन विद्युत उर्जेचा साठा. याठिकाणी संशोधनातले बाळकडू त्यांना मिळाले. १९९५ पासून सुरू केलेला हा संशोधन प्रवास २५ वर्षानंतरही जगातील नामवंत शास्त्रज्ञांच्या पंगतीत बसून अविरत सुरू आहे यातच त्यांच्या कौशल्यपूर्ण, गुणवत्ताधारी आणि अभिनव शास्त्रज्ञाची ओळख करून देते.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत १४ पी. एचडी., दोन एम. फील. झाले आहेत, सद्या त्यांच्या प्रयोगशाळेत पाच विद्यार्थी पी. एचडी. साठी संशोधन करीत आहेत. संशोधनासोबतच अध्यापणाचे कार्य देखील सर चोख बजावतात. एक मुरलेला संशोधक आणि, विद्यार्थीहितदक्ष व समर्पित शिक्षक अशीच त्यांची शैक्षणिक वर्तुळात ओळख आहे. सामान्यापासून असामान्य होण्यापर्यंत त्यांनी तुडवलेली वाट नक्कीच सोपी नव्हती. खूप कष्ट घेतलेत त्यांनी त्यासाठी! त्यांचा हा प्रवास कविवर्य बा. भ. बोरकरांच्या कवितेतील दोन ओळींद्वारे मांडता येईल.

“देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती 
वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती....”

सरांना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचे समजोभिमुख संशोधन सशक्त मानव जातीच्या उत्क्रांतीच्या कामी येवो हीच सदिच्छा.

शब्दांकन: सुरज मडके (8208283069)

संबंधित बातम्या:

Ranking link: http://shorturl.at/bdix8

https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/city/kolhapur/the-list-of-world-scientists-includes-five-from-shivaji-university/mh20201107170403301





1 comment:

  1. सर्वोत्तम कामगिरीचा सर्वोत्तम सन्मान खऱ्या अर्थाने झाला. सर आपले हार्दिक अभिनंदन. यशाचा आलेख उंचावत राहो.💐💐🤗🙏

    ReplyDelete