Saturday, May 6, 2017

सुखाची व्याख्या

हे माझे प्रवास वर्णन आणि त्या अनुषंगाने आलेले मनातील विचार दिनांक १५.०५.२०१७ रोजी माझ्या मूळगावाहून येतानाचे आहेत.

अलिकडेच माझ्या मुळगावी बावधनला गेलो होतो. एका दिवसाची धावती भेट होती. संध्याकाळी कोल्हापूरला परत येत असताना पाचवड मध्ये एका आराम बस मध्ये बसलो. माझ्या बरोबर १५ ते २० वयोगटातील आठ ते दहा तरुणही चढले. योगायोगाने त्यांनाही कोल्हापुरलाच यायचे होते. अंगात टी शर्ट, स्पोर्ट ची विजार, स्पोर्ट शूज व पाठीवर पिशवी ! त्यांच्या पेहराव्यावरून व चर्चेवरून कदाचित ते लष्करातील मुलाखती साठी जात असावेत हे लक्षात आले. या मुलाखाती विद्यापीठाच्या आवारातच असल्याने माझ्या लक्षात आले कि आम्हाला एकाच परिसरात जायचे आहे. कारण गेले २ आठवडे झाले सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्यातील उमेदवारांच्या तालुकावार मुलाखती होत आहेत हे मी पहात होतो. माझ्या हेही लक्षात आले की कदाचित आज सातारा जिल्यातील वाई किंवा जावली तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखतीची तारीख असावी.

बस वाहक त्याना गाडीच्या पाठीमागच्या सिट वर बसवून पुढे केबीन मध्ये गेला. थोड्या वेळाने जरा अंदाज आल्यावर या घोळक्याने आपापसात गमंत करायला सुरुवात केली. त्यामध्ये अगदी टारगट भाषेत टीप्पणी हे तर आलेच. तरी बरं हे सगळे एका गावाची नव्हती ! एकूणच, त्यांचे हे प्रकार एक प्राध्यापक म्हणून मला अजिबात रुचले नाहीत. थोडा अस्वस्थ झालोही. पण काय करणार ? या पिढीला जरा बोललं तर ते आऊ चा बाऊ करून गोंधळ घालतील हि भीती. तसेच हा प्रकार सार्वजनिक ठिकाणी चालू होता, माझ्या नोकरीच्या ठिकाणी नव्हता. बरं हा प्रकार एव्हढ्या मोठ्याने चालला होता कि कुणीही सुजाण अस्वस्थ होईलच. टारगट मुलांच्या धिंगाण्यामुळे इतर प्रवासीही वैतागले. काही तरुणी व महिलाही आमच्याबरोबर प्रवास करत होत्या. विशेष म्हणजे त्याना कुणाचेच भय वाटत नव्हते. त्यात आराम बस राजस्थान परवान्याची त्यामुळे महाराष्ट्रात ते कशाला पंगा घेतील. ते अगदी गप गुमान !  वाटलं, हि पुढं लष्करात जावून काय देशसेवा करणार ? मनाशी म्हंटलं असू देत कि २ तासांचा तर प्रश्न आहे.

या वेळी थोडा शांत विचार केला व म्हंटलं आपणही या मुलांच्या वयाच्या टप्प्यातून कधीतरी गेलो आहेच की ! मला यांचं हे वागणं का पटत नाही ? हे वागतायत ते बरोबर की चूक. आठवलं तो माझ्या कॉलेज जीवनातील असाच एक प्रसंग !

मी तेव्हा लोणंद महाविद्यालयात द्वितीय (१९९०) वर्षात असावा. तेव्हा मी खंडाळ्याहून महाविद्यालयात ये जा करी. सकाळची खंडाळा ते लोणंद ही बस आम्हा कॉलेज तरुणांनी भरायची.  बस मध्ये आमच्या संचातील ८ ते १० मित्र मंडळी जवळजवळच्या ३ -४ बाकड्यावर बसलो होतो. सर्वजण विनोद, चुटकुले सांगण्यात रममाण झालो होतो. आम्हाला आमच्या आसपास कोण बसले आहे याचेही भान नव्हते. अगदी दिलखुलास गप्पा व विनोद सांगणं चालू होतं. टाळया, हश्या, दाद, हे इकत्र चालू होतं. अगदी हुबेहूब वर सांगितलेल्या मुलाखाती द्यायला निघालेल्या तरुणाप्रमाण ! अगदी देहभान विसरून हा प्रकार चालला होता.  आमच्याबरोबर प्रवास करणाऱ्या इतर प्रवाश्यांची पर्वा ती का करावी अशी अवस्था ! आम्ही काहीच चूक करतं नाही ही भावना ! जीवनाच्या प्रत्येक अमूल्य क्षणांचा मनसोक्त उपभोग घेणं चालू होतं ! आता जरी ते प्रसंग आठवले तर अंगावर शहारे येतात. तेवढ्यात एक वयोवृध्द गृहस्थ आमच्याजवळ आले व आम्हाला म्हंटले- पोरांनू जरा हळू ... .... .... मला विचारले - मला ओळखलं का ? माझ्या परिचयाचे हे आजोबा मला का आठवत नव्हते हे समजेना... ..... .... ते म्हणाले - बरं असू देत, काय म्हणतय तुझं शिक्षण ? दहावीला पहिला आल्यावर आम्ही बैलगाडीत मिरवणूक काढून तुझा सत्कार केला हुता तवापास्न आत्ताच तुला बघतुया... दादाच बरं चाललयं ना ? - मग मात्र मी खजील झालो, चेहरा रडवेला झाला ... आपण त्याना त्रास होईल एव्हढा दंगा करायला नको होता, किंवा मौज करायची ती जागा योग्य नव्हती....  गप्प झालो, त्यांच्या पाया पडलो ...... ..... .... सगळे मित्र माझी टर उडवायला लागली ... ...  अरे काय मनावर घेतो आहेस.... सोडून दे.... मी मात्र सोडून द्यायला तयार नव्हतो... आनद लुटायला पाहिजे पण आपण कुठे काय करतोय याच भान नक्कीच पाहिजे...

कदाचित बस मध्ये आम्ही व मुलाखाती द्यायला चाललेले हे तरुण सुखाचा पूर्ण आस्वाद घेत होतो. हे व असे अनेक प्रसंग असतात कि ज्यातून आपण अगदी देहभान विसरून मनमुराद आनंद लुटत असतो. काय ते जीवन होते. आता आठवलं तरी हेवा वाटतो त्या क्षणांचा ! ताण तणाव विरहीत आयुष्य म्हणजे तरी वेगळं काय असू शकतं. त्यांच्या चेहऱ्यावर दडपण वा इतरांची भीती या कशाचाही लवलेश दिसत नव्हता. मौज मजा म्हणजेच जीवन हे जणू त्यांचा वर्तमान वाटत होता ! हळूहळू मला त्यांच्या सर्व हालचाली हव्याहव्याश्या वाटू लागल्या. क्षणभर असही वाटलं कि आपणही त्यांच्यासोबत दंगा मस्ती करावी. किंचाळाव, मजा करावी !  पण लगेच भानावर आलो, मी शिक्षक, मी हे करू शकत नाही किंबहुना करू नये. का करू नये हा प्रश्न वेगळा आहे. काही वेळापुर्वी ज्यांचा राग आला होता, हेवा वाटायला लागला त्यांचा ! का कुणास ठाऊक मनात कुठतरी आपणही थोड्या वेळासाठी लहान व्हावं वाटलं. क्षणभर आपला संसार, जबाबदाऱ्या, पद, प्रतिष्ठा या सर्व गोष्ठी बाजूला ठेवून मुक्तपणे स्वताला व्यक्त करावं असं वाटलं. पंचेचाळीशीत हे करूशी वाटणं म्हणजेच आपल्याला काही गोष्ठीतून दररोज थोडा वेळ तरी मुक्तता हवी. पण १९९० चा बस मधील प्रकार आठवला व गप्प बसलो ... राहिलं ....

आजकाल -सुख म्हणजे नक्की काय? - हा प्रश्न मला सारखा पडतोय. प्रत्येकाची सुखाची व्याख्या निराळी असते. पण कधी कधी मनाला होणारा मनमुराद आनंद म्हणजेच सुख का? माझ्या मते आपल्याला जे करण्याची अगदी आतून ओढ असते ते करण्याची इच्छा निर्माण होणं म्हणजे सुख !  मनाला समाधान मिळण्याला सुख म्हणत असावेत. एखादं आवडीचं गाणं ऐकलं की मन प्रफुल्लित होतं, मनाला बरं वाटतं. एखादा छान चित्रपट पाहिला की समाधान वाटतं. एखादं चांगलं पुस्तक वाचलं की समृद्ध वाटतं. एखादी परीक्षा उत्तीर्ण झालो की मनाला उभारी येते. कुणाशी छान गप्पा मारल्या की एक नवी ऊर्जा मिळते. आणि अशाच घटनांच्या शृंखलेतून आनंद मिळत जातो. ज्या क्षणाला असा आनंद मिळतो, तो क्षण खरा सुखाचा धनी! तो क्षण आपला. अशा क्षणांची मालिका तयार करण्याची क्षमता मिळवणं म्हणजे सुखाची तयारी करणं असं मला वाटतं. आणि अशा ऊर्जाक्षणांमध्ये चिंब भिजणं म्हणजे सुख असावं.

शेवटी न रहावून एका उमेदवाराला बोलावले व विचारले - तुम्ही कोल्हापूरला सैनिक मुलाखती साठी तर जात नाही ना ? तो हो म्हणाला... त्याने मला विचारले आम्हाला सांगाल का कसे विद्यापीठापर्यंत जायचे.  मग त्याला मुलाखत तळापर्यंत कसे जायचे हे मी शांतपणे सांगितले. त्याने माझे आभार मानले.. मला म्हणाला तुम्ही सातारा जिल्यातील अन इकडे नोकरी कशी ? त्याला काय सांगणार ही मिळवण्यासाठी काय करावे लागले ते, अन आता बदली... शक्य नाही.. तेवढ्यात दुसरा उमेदवार म्हणाला - काका आमची बडबड जरा जास्त च झाली का ? आम्ही दंगा करायला नको होता का ? मी त्याला एव्हढच म्हणालो - अरे, आजपासून ४-५ वर्षानंतर तुम्ही जर एकत्र आला तर अशी मोज मजा कराल का? तो "नाही" - म्हणाला.

या प्रसंगातून घडणाऱ्या घटना तितक्या महत्वाच्या नसून तुम्ही त्या घटनांकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघता, कोणत्या नजरेतून पाहता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. यातून आपल्याला हि शिकवण मिळते, की आपणदेखील आपल्याबाबतीत घडणारी प्रत्येक लहान मोठी घटना ज्ञानाच्या प्रकाशात पहावी, महादृष्टीने पाहावी.

- केशव यशवंत राजपुरे
९६०४२५०००६

No comments:

Post a Comment