Thursday, April 23, 2020

जनार्दन संपतराव गोळे

जनार्दन संपतराव गोळे सर
(निस्वार्थी दातृत्वशिल व्यक्तिमत्व)
         
"देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे" या विंदा करंदीकरांच्या काव्यपंक्ती आपणास सांगतात की ज्याच्याजवळ पुष्कळ आहे त्याने ते गरजूंना निस्वार्थीपणे दिले पाहिजे व यातच जीवनाचा खरा आनंद शोधला पाहिजे. समाजाला नेहमीच दानशूर व्यक्तींची गरज असते आणि ज्या समाजात अशी रत्नेे जन्माला येतात असा समाज नशीबवानच. सामाजिक गरज आणि बांधिलकी ओळखून आपण त्यांच्याप्रती देणं लागतो ही भावना मनात पक्की करून कार्य करणारी मंडळी आज बोटांवर मोजण्याइतकीच आहेत. त्यांपैकी प्रसिद्धीपासून अलिप्त असणारे आणि सामाजिक भान जोपासणारे आमच्या अनपटवाडी गावचे सुपुत्र जनार्दन संपतराव गोळे सर यांचा थोडक्यात जीवनपरिचय !
          
जनार्दन गोळे यांचे मूळ गाव कोरेगाव तालुक्यातील अरबवाडी असून त्यांचे कुटुंब त्यांच्या जन्मापूर्वी पासूनच अनपटवाडी गावामध्ये स्थायिक झाले होते.  वडील संपतराव मनोहर गोळे हे १९२३ पासून अनपटवाडी येथील त्यांचे मामा जगदेवराव विठोबा अनपट (खालचा वाडा) यांच्याकडे शिक्षणासाठी आलेले होते. संपतरावांचे इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंत चे शिक्षण अनपटवाडी येथे झाले. त्याकाळी शेती करत करत त्यांनी शिवणकाम कला सुद्धा आत्मसात केली होती. शिवणकाम करण्यासाठी ते वाईला सायकलवरून जात असत. किसनवीर चौकात त्यांचे ३५ ते ४० वर्ष टेलरिंगचे दुकान होते.  

पुढे संपतराव यांचे मामा जगदेवराव अनपट आणि वडील मनोहर गोळे यांनी लग्नासाठी वेळे येथील स्थळ आणले होते. संपतराव गोळे यांचा हा प्रथम विवाह. काही अपरिहार्य कारणांमुळे हा संसार चालू शकला नाही आणि काडीमोड झाला. यानंतर दत्तू तात्यांच्या मध्यस्थीने गावातील भिकू नारायण अनपट यांच्या कन्या वत्सला यांच्याशी संपतराव यांचा दुसरा विवाह झाला. मुळगाव जरी अरबवाडी असले तरी ते वाडीत लहानाचे मोठे झालेले, इथे राहून व्यवसाय वाईमध्ये करायचे आणि सासरवाडी सुद्धा वाडी झाल्यामुळे ते अनपटवाडीकर कधी झाले हे त्यांनाच कळले नाही. गोळे दाम्पत्याला चार अपत्ये..  जनार्दन, शिवाजी, नंदा (नावडकर) आणि सुवर्णा (भोईटे) असे दोन चिरंजीव आणि दोन कन्या ! यामध्ये जनार्दन हे ज्येष्ठ चिरंजीव त्यांचा जन्म ०१/०६/१९६६ ला झाला. त्यांचे आज्ज सासरे नारायण यांचे बंधू पांडुरंग बाळा अनपट यांच्या पत्नी अंजु नानी त्यांना चिरंजीव नसल्याने संपतराव यांचा मुलाप्रमाणे सांभाळ केला. त्यांच्या नातीचे माहेरपण व दोन्ही कुटुंब व्यवस्थित सांभाळल्या बद्दल नानीने आपली काही जमीन संपतराव यांना बक्षीसपत्र करून दिली होती. त्यांनी स्वतःच्या आई पेक्षा जास्त काळजी घेऊन नानीचा शेवटपर्यंत सांभाळ केला.

संपतराव गोळे यांचे लहान बंधू हरिश्चंद्र गोळे यांना अरबवाडी येथे शिक्षण घेणे सोयीचे नव्हते. त्यामुळे ते आपले बंधू संपतराव यांच्याकडे अनपटवाडीत शिकायला आले. हे वाई येथील द्रविड हायस्कूल मध्ये शिक्षण घेत होते. त्यांची सर्व जबाबदारी संपतराव यांच्यावर होती. घरात चार मुले, त्यांचे संगोपन, भावाचे शिक्षण यासाठी दोघे पतिपत्नी शेती करत, शिवणकाम करत आणि जोडधंदा म्हणून दूध संकलन हा व्यवसाय देखील करत होते. सातारच्या महाराजांची गावच्या डोंगरची जमीन तेव्हापासून आजतागायत त्यांच्याकडेच देखभालीसाठी म्हणजे वहीवाटीसाठी आहे. यात जनावरे व धनगरांना चराऊ रान देणे हा व्यवहार सध्या जनार्दन बघतात व शेतसारा सातारला पोहोचवतात. पुढे बीए सीपीएड करून हरिश्चंद्र मुंबई येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. 
        
जनार्दन यांना लहानपणापासूनच घरच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांचे पहिली ते तिसरी पर्यंतचे शिक्षण अनपटवाडी प्राथमिक शाळेत झाले. चौथी आणि पाचवी चे शिक्षण बावधन येथील प्राथमिक शाळा नं.२ येथे. तेव्हा संपतराव यांचे चार भाऊ मुंबईमध्ये चांगल्या नोकऱ्यांवर स्थिरस्थावर होते. त्यामुळे अभ्यासात चुणचुणीत असणाऱ्या जनार्दन यांना त्यांनी मुंबईला शिक्षणासाठी ठेवले. मग सहावी नंतरचे शिक्षण ठाणे जिल्ह्यात न्यू कळवा हायस्कूल, कळवा येथे झाले. पहिल्यापासूनच त्यांचे गणित फार छान ! १९८२ मध्ये त्यांना एसएससी च्या परीक्षेत ७१ टक्के गुण मिळाले होते. अभ्यासात हुशार असल्यामुळे जनार्दन यांना मेडिकल ला पाठवण्याचे हेतूने विज्ञान शाखेत घातले. बारावीत अपेक्षा इतपत गुण न मिळाल्याने त्यांचा पुढील शिक्षण प्रवास महाविद्यालयामार्गे झाला. त्यानंतरचे  महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे के.जे. सोमय्या विद्याविहार या कॉलेज मध्ये झाले. आवडतेेे विषय गणित असलेने विज्ञान शाखेत तुलनेने कठीण फिजिक्स हा विषय घेतला. पुढ १९८९ साली त्यांना मुंबई विद्यापीठाची बीएस्सी फिजिक्स ही पदवी डिस्टिंक्शन मिळवून प्राप्त झाली. उच्च शिक्षण घेण्यासाठी जनार्दन यांना त्यांचे सर्वव चुलत्यांनी मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले आहे. 

दरम्यानच्या काळात जनार्दन हे एलआयसी, पीएसआय पदासाठीच्या स्पर्धा परीक्षा देत होते. परंतु अपयश येत राहिले. त्यानंतर हायस्कूल किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक होण्याच्या दृष्टीने त्यांनी बी.एड. चे व्यावसायिक शिक्षण उल्हासनगर येथे पूर्ण केले. पुढं १९९० मध्ये विठ्ठलवाडी, कल्याण (पूर्व) येथे प्राथमिक  शिक्षक म्हणून रुजू झाले. येथील प्राथमिक शाळेत तीन वर्ष सेवा केल्यानंतर दि. ०१/०६/१९९३ पासून सेवेत कायम होऊन ते शिवाई विद्यामंदिर, भांडुप (पूर्व) येथे खाजगी अनुदानित हायस्कूल मध्ये इयत्ता नववी आणि दहावी या वर्गांचे अध्यापन करत आहेत. गणित व विज्ञान हे त्यांचे आवडते विषय... विज्ञान प्रदर्शनात त्यांचा सहभाग ठरलेला... शिष्यवृत्तीच्या मुलांना पंचवीस वर्षे गणित व बुद्धिमत्तेचे अध्यापन केल्यामुळे त्यांचा हुशार मुलांचा संपर्क जास्त... सहज हसत-खेळत रंजकतेने व वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवून विज्ञानाची गोडी निर्माण करणे हाच त्यांचा ध्यास.

तसा आयुष्यातील बराच काळ त्यांनी खाजगी, पाचवी ते दहावी साठी, क्लासेसमध्ये (१९८७ ते २००१) सुद्धा शिकवले आहे. मधल्या काळात परेल येथे भालचंद्र मुणगेकर यांच्या मिलिंद रात्रशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे जवळजवळ पंधरा वर्षे अध्यापनाचे काम केले. दिवसभर भांडुप येथील आपल्या हायस्कूलमध्ये सर्विस करून संध्याकाळी सात ते दहा दरम्यान रात्रशाळेत काम करत असत. या शाळेत शिक्षणापासून वंचित व शाळेच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या व पदोन्नतीसाठी शाळेत प्रवेश घेतलेल्या त्यांच्यापेक्षा वयस्कर विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळाली. दिवसभर काम करूनही आर्थिक दुर्बल असणाऱ्या व नोकरी करत शिक्षण घेणाऱ्यांची सेवा करण्याची संधी रात्रशाळेत मिळाली. 

आपल्या अंगच्या प्रामाणिकपणाने आणि मोठ्या जिद्दीने त्यांनी सहशिक्षक ते पर्यवेक्षक पदापर्यंत भरारी घेतली आहे. कळवा येथे स्वतः चे वन रूम किचन घर आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत आवड निर्माण झाली तर ते जिद्दीला पेटतात आणि मोठं मोठ्या पदां पर्यंत मजल मारू शकतात हे जनार्दन यांच्या यशावरून समजते. 
          
१९९० मध्ये जनार्दन यांचा विवाह अनपटवाडी मधील त्यांचे मामा बाळकृष्ण जगदेवराव अनपट यांची कन्या भारती हिच्या बरोबर झाला. जनार्दन यांना भारतीची मोलाची साथ लाभली आहे. या दाम्पत्याला दोन कन्यारत्न आहेत. ज्येष्ठ कन्येचे नाव कादंबरी असून ती बी. कॉम. च्या द्वितीय वर्षात शिकत आहे. दुसरी कन्या समृद्धी दहावीमध्ये शिकत आहे. दोन्ही मुली हुशार, कष्टाळू आणि समजूतदार आहेत. 

हे सर्व करताना जनार्दन यांना त्यांचे मूळगाव अराबवडी आणि अनपटवाडी असे दोन्हीकडे समन्वय साधून राहावे लागते. त्यांना मिळालेली सुट्टी ते अर्धी वाटून दोन्ही गावाकडील कामे करून आपली नाती जपत आले आहेत. अरबवाडीतील संपूर्ण कुटुंब हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. एकत्र कुटुंब व त्यातून विविधतेतून एकता व जीवन जगण्यास लागणारी जीवनमूल्ये एकमेकांशी वागण्याची व जगण्याची सर्व संस्कार या घरातून त्यांना मिळाले. आजी, चुलते, चुलत्या व सर्व भाऊ-बहिणी याबरोबर भावनिक अनुबंध अतिशय प्रेमळ. त्यांना अनपटवाडीची आठवण होईल असे कोणतेही वर्तन अरबवाडी येथे राहताना होत नाही. सर्वांबरोबर जिव्हाळा, स्नेह व आपलेपणा प्रचंड आहे. त्यामुळे जनार्दन यांना अनपटवाडी पेक्षा अरबवाडी तुलनेनं हृदयाच्या जवळ आहे.
          
शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे आणि पहिल्यापासूनच शिक्षणाचे महत्त्व समजल्यामुळे गावातील मुलांनी शिकून मोठं व्हावं असं त्यांना सारखं वाटतं. त्यातूनच ते अनपटवाडी गावातील शाळेला सढळ हाताने वारंवार मदत करतात. ते सुरुवातीपासूनच अनपटवाडी गावच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या श्री ग्रामविकास मंडळाचे सक्रिय सभासद असून मंडळाने दिलेली जबाबदारी पार पाडणे हेच आपले कर्तव्य समजतात. 

जनार्दन यांनी गावातील बऱ्याच सामाजिक कामांना मदत केली आहे. त्यांनी गावातील मारुती मंदिरामधील फरशी बसवण्यासाठी पूर्णपणे आर्थिक योगदान दिले होते. यातून त्यांचे गावावरील प्रेम दिसून येते. तसेच श्री. वाकडेश्र्वर मंदिरासाठी वर्गणी व्यक्तिरिक्त एक्कावन्न हजार रुपयांची सढळ मदत गावाला केली होती यावरून हा माणूस किती उदार मनाचा आहे याची जाणीव येते ! ते गावातील धार्मिक आणि अध्यात्मिक समारंभामध्ये नेहमी अग्रेसर असतात. अध्यात्म ओढीपोटी वडिलांनंतर ते दरवर्षी तीन चार दिवस पंढरपूरला वारी निमित्त जातात. ते नवमी व बार्शी दरम्यान पंढरपुरात असतात. त्यांनी जवळजवळ वीस वर्ष वारी केली आहे. 

आपल्या संस्कृतीमध्ये भूदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. याची प्रचिती तेव्हा आली जेव्हा जनार्दन यांनी गावाचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न मार्गी लावत असताना पाण्याच्या टाकीसाठी आपल्या मालकीची एक गुंठा जमीन विना मोबदला गावाला दिली. केवढे हे दातृत्व !  त्यांच्या मातोश्रीनी ही जागा देण्याची परवानगी नितीन मांढरे व सयाजी अनपट यांच्या आग्राहास मान देऊन दिली. आजच्या युगात अशी दानशूर माणसे शोधून सापडत नाहीत. केवळ ज्या गावाने आपल्याला आसरा दिला, ज्या गावाने आपल्या पिढ्या घडवल्या त्या गावाच्या मातीचे आपण देणं लागतो या जाणिवेतून या माणसानं गावचे पांग फेडलं आहेत. सर्वांसमोर सामाजिक दानत व दातृत्वाचा एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. 

जनार्दन हे अत्यंत शांत, मितभाषी, लाजाळू, मायाळू स्वभावाचे, कोणावरही न रागवणारे व्यक्तिमत्व ! सहकार्य भाव, अध्यात्माची व अध्यापनाची आवड, प्रामाणिकता, वाचन हे त्यांची इतर स्वभाववैशिष्ट्ये. गोळे सरांचा वाचनाचा व्यासंग दांडगा आहे. कळवा येथे त्यांच्या राहत्या घरी स्वतःचे असे एक ५०० पुस्तकांचे मोठे वाचनालय आहे. या वाचनालयात आध्यत्म ते विज्ञान अशा अनेक विषयांची आणि अनेक प्रकारची शेकडो पुस्तक आहेत. एवढं मोठं स्वतःच वाचनालय असण ही देखील आपल्या वाडीला अभिमानाची गोष्ट आहे. व्याख्याने ऐकणे व नाटक पहाणे ही त्यांची सवय अजून जोपासली आहे ! हे व्यक्तिमत्व आपल्या गावास लाभले याचा सर्व ग्रामस्थांना सार्थ अभिमान वाटतो. 
          
समाजातील दूरावा, एकलकोंडेपणा, अप्पलपोटेपणा, बेजबाबदारपणा व कृतघ्नता गावच्या विकासास हानिकारक असतात. परंतु हा समाज, हे गाव आणि ही माणसे माझी आहेत, मी त्यांच देणं लागतो ही कर्तव्य भावना जोपासणारे व कर्तव्याला समर्पित असणारे जनार्दन संपतराव गोळे सर हे गावाला सुपुत्र म्हणून लाभले याचा गावाला सार्थ अभिमान आहे.
          
सरांचे शिक्षण क्षेत्रामधील कारकीर्द व भावी आयुष्य सुखदायी, आरोग्यपूर्ण आणि यशस्वी होवो तसेच त्यांचे शुभहस्ते गावाची आणि समाजाची सेवा अशीच अविरतपणे घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!

✍️ दिलीप अनपट/ अनिकेत भोसले / केशव राजपुरे

3 comments:

  1. वंदनीय गोळे सरांच्या कार्याला सलाम... छान लेखन

    ReplyDelete
  2. आदरणीय गोळे सरांच्या कार्य कर्तृत्वाला त्रिवार वंदन.शिक्षकी पेशाला उच्च स्थानावर नेऊन ठेवणारं व्यक्तीमत्व आपण आपल्या लेखनीतून खूपच सुंदर रित्या साकारले आहे.वाचन संस्कृती जपणारे सरांच्या मुलींची नाव ही त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी कादंबरी आणि समृद्धी. प्रतिकूल परिस्थितीतही सरांना साथ देणारी सौ.भारती अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्त्व.
    सरांच्या दातृत्वाला व त्यागी वृत्तीला त्रिवार वंदन.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete