Saturday, April 4, 2020

दत्तात्रय सदाशिव मांढरे


दत्तात्रय सदाशिव मांढरे; उच्चविद्याविभूषित प्राध्यापक

​अनपटवाडी सारख्या खेडेगावात राहून, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, विज्ञानातील भौतिकशास्त्र विषयात एम एस सी एवढी पदवी मिळवण ही सोपी गोष्ट नव्हती त्या १९७० च्या काळात.. होय मी बोलतोय ते आपल्या गावचे सुपुत्र उच्चविद्या विभूषित श्री दत्तात्रय सदाशिव मांढरे यांच्या विषयी..

श्री दत्तात्रय सदाशिव मांढरे यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४४ चा. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन, सोबत पाच सहा भांवंड, रोजीरोटी शेतीवर अशा परिस्थितीत त्यांचा शिक्षण प्रवास सुरू झाला. त्यांचे वडील, सदाशिव आण्णा त्यावेळेचे अतिशय नावाजलेले पैलवान होते. पण जसजशी मुलं मोठी होऊ लागली तसतशी अण्णांच्या लक्षात आलं की आपल्या पैलवानकी पेक्षा या मुलांच शिक्षण फार महत्वाच आहे. मग त्यांनी त्यांच्या आवडीचा छंद बाजूला ठेवून मुलांच्या शिक्षणावर जातीनं लक्ष दिल. मित्रहो शिक्षणाचा महत्व, त्यावेळी होतं, आजही आहे आणि भविष्यात राहणार आहे. हा विचार त्यावेळेला अण्णांच्या मनात आला ही फार मोठी गोष्ट होती.

१९५० साली अनपटवाडी मध्ये शाळा नसल्यामुळे बापूंनी बावधनच्या प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेतला. पहिल्यापासूनच अभ्यासात चुणचुणीत असलेले दत्तात्रय बापू सातवीच्या केंद्र परीक्षेत बावधन केंद्रामधून ८५ टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आले. फारच मोठी उपलब्धी होती ही मांढरे कुटुंबीयांसाठी ! मुलाच्या या यशामुळे आण्णांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याचवेळी त्यानी निश्चय केला की बापूंना शिकेल तिथपर्यंत शिकवायचं.. 

त्यावेळची आठवण सांगताना बापू सांगतात की या केंद्र परीक्षेत बसण्यासाठी ठराविक हजेरी भरावी लागत असायची. पण शेतीतील कामे भरपूर असल्यामुळे बापू नेहमी गैरहजर असायचे, त्यामुळे आवश्यक हजेरी भरली नाही. केंद्रप्रमुखांनी त्यांना परीक्षेला बसायला नकार दिला. तेव्हा त्यांचे नातेवाईक आणि इतर शिक्षकांनी विनंती केल्यामुळे यांना परीक्षेस बसायला मिळाले. मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं एवढेच नाही तर नियमित विद्यार्थ्यांच्या पेक्षा जास्त गुण मिळवून ते केंद्रात पहिले देखील आले. शिकण्याचा ध्यास मनात जर असेल तर कुठलाही अडथळा तुमचे शिक्षण थांबवू शकत नाही हे याचे उत्तम उदाहरण..

सातवीनंतर हायस्कूल शिक्षणासाठी त्यांनी द्रविड हायस्कूल वाई येथे १९५८ ला प्रवेश घेतला. त्या वेळेला तालुक्यामध्ये या हायस्कूलचे खूप नाव होते. हायस्कूलमध्ये वाई आणि परिसरातील उच्चभ्रू कुटुंबातील मुलं शिकायला असायची. बापूंची शिकायची जिद्द मोठी ! एसटी पास साठी पैसे नसायचे त्यामुळे दररोज अनपटवाडी ते वाई हा आठ किलोमीटरचा प्रवास चार वर्षांसाठी बापूनी पायी केला. त्यांनी किती कष्टाने शिक्षण घेतलं याची प्रचिती यातून येते. द्रविड हायस्कूल मधील सरांचे वर्गमित्र म्हणजे डॉक्टर अभय कानडे, आप्पांचे बंधू बाळ काका, ओझर्डे चे फरांदे हे होत.

१९६५ ला अकरावीच्या म्हणजे मॅट्रिकच्या परीक्षेत बापू ६७ टक्के गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ओझर्डे येथील मित्र फरांदे यांचा प्रथम क्रमांक आल्याचे ते सांगतात. या गुणांची आत्ताच्या गुणांशी तुलना होऊ शकत नाही. कारण एवढे गुण मिळवलेला विद्यार्थी पुढे जाऊन सातारला प्रवेश घ्यायला जातो तेव्हा तिथले प्राचार्य म्हणतात *तुम्ही आमच्या कॉलेजला हा विद्यार्थी म्हणजे गिफ्ट दिले*, यावरून या मार्कांची महानता लक्षात येते. हे त्यांनी अविरत आणि प्रामाणिकपणे केलेल्या कष्टांचे फळ होतं. अण्णांनी मग यांच्या शिक्षणाबाबत मागं पाऊल टाकायचं नाही असा ध्यास घेतला. 

पुढे प्रि डिग्री आणि बीएससी सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी करायची असा ध्यास त्यांनी घेतला होता. आता साताऱ्यात राहायचं कुठं हा प्रश्न होता तसेच शिक्षण खर्चात वाढ होणार होती. त्यावेळेला त्यांचे आवडते शिक्षक प्राचार्य बी एस पाटील यांनी समय सूचक मार्गदर्शन आणि मदत केली. त्यांना रयत शिक्षण संस्थेच्या बरॅक्स हॉस्टेलला प्रवेश मिळवून दिला. महिना ३० ते ४० रुपये खर्च व्हायचा तेव्हा. घरून एवढ्या खर्चाचाही बंदोबस्त व्हायचा नाही कधीकधी ! अशावेळी वस्तीगृहातील मित्र मुरलीधर डोंगरे, यादव, रणखांबे, महाडीक, सावंत व त्यांचे बंधू उत्तम भाऊ यांच्याकडून खूपच पाठबळ मिळाल. यामध्ये राम पवार, मानसिंग जगताप आणि डोंगरे हे त्यांचे खास..

अशावेळी त्यावेळेला मुंबईला असणारे अनपटवाडी चे नागरिक ज्यामध्ये जगदेव विठोबा अनपट, मारुती हरी अनपट, शिवराम साहेबराव मांढरे, रामचंद्र बजाबा अनपट, सर्जेराव केशव अनपट, कृष्णात तुकाराम मांढरे, रामचंद्र तात्याबा मांढरे, लक्ष्मण बजाबा अनपट, बळवंत बयाजी अनपट, विष्णू राजाराम मांढरे व हभप दत्तात्रेय बुवा कळंबेकर (जावळी) या मंडळींनी महिना पाच रुपये वर्गणी काढून त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली हे बापू कधीही विसरत नाहीत. गावकऱ्यांनी केलेली मदत सर्विस लागल्यानंतर त्यांनी गावातील इतर गरजू मुलांना (किसन लक्ष्मण अनपट) दिली तो भाग वेगळा. पुढे किसन अनपट यांनी स्वतः सर्विस लागल्यानंतर ही मदत भीकू आनंदराव अनपट यांना केल्याचे सांगितले जाते. भिकू नानांनी परत त्यांना केलेली मदत पुढच्या पिढीच्या उपयोगासाठी पोपट मास्तर यांच्याकडे जमा केली होती.. याचा अर्थ असा की प्रत्येकाला केलेली मदत त्यांन पुढच्या पिढी तील गरजू ला हस्तांतरित केली होती ..

पण समयसूचक मदत करण्याची भावना या गावच्या लोकांमध्ये सुरुवातीपासूनच होती ती अद्याप टिकून आहे. नोकरीनिमित्त परगावी असलेल्या प्रत्येक गावकऱ्यांच्या मनात गावाविषयी तळमळ तसेच ओढ असतेच. गावच्या विकासासाठी  आपण कमावलेल्या पैशातील काही पैसे खर्च करायचे हा इतिहास आहे. तसं बघायला गेलं तर हा ऐच्छिक विषय असतो.. पण या गावासाठी तो ऐच्छिक राहिलेला नाही.

सुरुवातीपासूनच गणित आणि विज्ञान हे सरांचे आवडते विषय ! त्यातल्या त्यात भौतिकशास्त्र शिकण्यासाठी आवश्यक अशा गणितावर विशेष कल ! त्यामुळे बीएससी साठी त्यांनी तुलनेन अवघड अशा भौतिकशास्त्र विषयाची निवड केली. १९६६ मध्ये बीएससी पदवी प्रावीण्य घेऊन त्यांनी फर्स्ट क्लासमध्ये मिळवली. तीसुद्धा त्यावेळची अतिशय मोठी उपलब्धी होती .. गावाच्या दृष्टीने, पंचक्रोशीच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची गोष्ट होती. मुलाच्या प्रत्येक यशानं हुरळून जाणारा बाप म्हणजेच आण्णा खूपच आशादायी होऊ लागले होते. मुलांन अजून शिकावं हा त्यांचा ध्यास मात्र संपत नव्हता. पण इतर भावंडांच्या शिक्षणाचा खर्च तसेच घरखर्च यामुळे ते त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च तेव्हा राखून ठेवू शकत नव्हते.. ह्या दरम्यान त्यांचे बंधू भाऊ हे मुंबईला गोदी मध्ये रुजू झाले. 'मी शिकलो नाही म्हणून काय झालं माझा भाऊ तर शिकतोय' या भावनेतून लहान असूनही मोठ्या भावाच्या शिक्षणास हातभार भाऊंनी लावला.

त्यामुळे पदवी मिळविल्यानंतर त्यांना सर्विस ची नितांत गरज भासू लागली. त्यावेळी भौतिकशास्त्र विषय घेऊन फर्स्टक्लास मिळवलेले विद्यार्थी दुर्मिळ ! त्यामुळे गुणवत्तेच्या जोरावर त्यांना वाघोली हायस्कूल मध्ये विज्ञान शिक्षकाची सर्विस ताबडतोब मिळाली. त्यांनी जरी तेव्हा तात्पुरती सोय म्हणून सर्विस पत्करली होती तरीही भौतिकशास्त्र विषय घेऊन एम एस सी पूर्ण करण्याची जिद्द त्यांनी कायम सोडली नव्हती. १९६६ ते १९६८ पर्यंत ते वाघोली हायस्कूल येथे कार्यरत होते. त्यांनी ठरवलं असतं तर बी.एड ही करू शकले असते परंतु त्यांना ते करायचं नव्हतं किंबहुना हायस्कूलचे शिक्षक व्हायचं नव्हतं. कायम एम एस सी चा ध्यास समोर होता. 

सायन्स कॉलेज सातारा येथून १९६८ ते ७० या दरम्यान स्पेक्ट्रोस्कॉपी ह्या स्पेशलायझेशन मधून एमएससी भौतिकशास्त्र प्रथम वर्गात मिळवून पूर्ण केली. या ठिकाणी सुद्धा अतिशय जिद्दीने अभ्यास करून त्यांच्या आवडीची पदवी त्यांनी मिळवली होती. एमएस्सी झाल्यामुळे आता वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्यास ते योग्य झाले होते. त्यामुळे एमएस्सी झाल्या झाल्या त्यांना सायन्स कॉलेज सातारा इथेच प्राध्यापक पदाची नोकरी मिळाली. एक शिक्षक म्हणून त्यांना भौतिकशास्त्र विषयातील क्लासिकल मेकॅनिक सारखा अतिशय अवघड विषय शिकवायला आवडायचा. आणि तो विषय त्यांनी कित्येक वर्ष महाविद्यालयात शिकवला. त्यांच्या शिकवण्या मध्ये फार हातखंडा होता. कोणत्याही लेक्चर ते पूर्ण अभ्यास करूनच घेत असत. ते विद्यार्थीप्रिय असे शिक्षक होते.

रयत शिक्षण संस्थेतील त्यांच्या सेवेमध्ये त्यांनी सायन्स कॉलेज सातारा, रामानंदनगर येथील महाविद्यालय, सद्गुरू संत गाडगे महाराज महाविद्यालय कराड, व पनवेल या ठिकाणी अविरत ३४ वर्ष सेवा केली. यातील जवळजवळ २२ वर्षे सेवा ही सातारा येथे केली. सरांच्या स्वभाव वैशिष्ट्या विषयी म्हणाल तर ते अतिशय शांत, मनमिळावू, अभ्यासू, जिद्दी, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या विषयी तळमळीचे तसेच सडेतोड स्वभावाचे होते. शिक्षण किंवा सेवे दरम्यान त्यांनी त्यांच्या अनपटवाडी येथील घराकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. सर्व बहिणींची लग्न, बंधूचा संसार व इतर गोष्टी जातीनिशी बघितल्या. 

त्यांचे समकक्ष मित्र म्हणजे बावधन मधील नारायण विठ्ठल भोसले, आनंदराव पिसाळ, कन्नूर येथील गोपाळ जठार तसेच एम एस सी दरम्यान चे पवार व डोंगरे यांची ते आठवण काढतात. त्यांच्या आवडत्या शिक्षकांमध्ये त्यांचे प्राथमिक शाळेतील रासकर गुरुजी, हायस्कूलमधील नातू, पटवर्धन, यार्डी, व विनायक कुलकर्णी सर या सर्वांच्या शिकवण्याचा आणि आचरणाचा प्रभाव पुढे एक शिक्षक म्हणून व्यक्तिमत्त्व घडत असताना त्यांच्यावर प्रभाव पडला असे ते मानतात. द्रविड हायस्कूल मधील विनायक कुलकर्णी त्यांचे गणित शिक्षक. त्यांच्या क्लासला सर पहिल्या बाकावर बसायचे. उत्तम शिक्षक होते. परंतु बापूंचा खोडकर स्वभाव असा कि ते पहिल्या बाकड्यावर बसूनसुद्धा त्यांच्या वहीमध्ये 'काय रे विन्या गणित शिकवतो वाटतं' अशा पद्धतीची वाक्य लिहायचे. यासाठी त्यांनी शिक्षाही भोगलेलली आहे. सरांमध्ये विनोदी वृत्ती सुद्धा होती याचा हा दाखला. 

त्यांचा स्वभाव अतिशय मितभाषी, निगर्वी व मनमिळवू.. त्यांचं आरोग्यही सुरुवातीपासून अतिशय ठणठणीत त्यांनी राखलेल आहे. 'साऊंड माइंड इन साउंड बॉडी' या उक्तीप्रमाणे.. ते म्हणतात की विद्यार्थिदशेपासून शिक्षकी पेशा पर्यंत आपल्या कार्यकालात एकाही व्यक्तीशी त्यांच भांडण झाल्याचे त्यांना आठवत नाही. किती तो सोशिकपणा, किती तो संयम. त्यामुळे आयुष्यामध्ये शत्रू कोणी नाहीच. किती सांभाळून, समजावून, समोरच्या कलांन वागण्याचे तंत्र त्यांनी अवलंबलं आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये ताण तणाव नाही. अतिशय आनंदात ते अद्यापही जगत आहेत.

ज्या समाजातून आपण आलो, ज्यान आपल्याला मोठं केलं तो समाज अजूनही तिथेच आहे. त्या समाजाला  ज्ञानी आणि प्रगत करायचा असेल तर आपल्या अनुभवाचा, आपल्या ज्ञानाचा व सुयोग्य मार्गदर्शनाचा लाभ व्हायलाच पाहिजे ही त्यांची भावना ! याच कर्तव्य भावनेतून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर, २००९ साली त्यांनी एक्स वायसियंस (सायन्स कॉलेज सातारा, माजी विद्यार्थ्यांची संघटना) या संस्थेची उभारणी केली. सभासदांच्या ठेव रकमेच्या व्याजातून ही संघटना गरजू, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचे काम करते. वेळोवेळी या विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन ठरलेलच.

गावानं जेव्हा-जेव्हा बापूंना मदतीसाठी साद दिली त्यावेळेस सुयोग्य मदत करून बापूंनी त्या संधीचं सोनं केलं, आपल्यातील दातृत्व सिद्ध करून समाजभानास जागले असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामध्ये गावच्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एक लाखापेक्षा जास्त मदत बापूंनी केल्याचे आठवते. अजूनही गावातील तरुण होतकरू मुलांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेता येत नसेल तर त्यांच्यासाठी चाकरमान्या मंडळींच्या मार्फत एखादा फंड उभा करण्याची इच्छा बापूंची आहे. 

सरांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा व मार्गदर्शनाचा अप्रत्यक्षपणे आपल्याही गावाला भरपूर उपयोग झाला. इथले विद्यार्थी प्रेरित झाले. या गावातील माणसं उच्चविद्याविभूषित होऊ शकतात हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. त्यांच्याकडे बघून लालभाऊ, राजूभाऊ, बापूंच्या बहिणी, माझे बंधू दादा पोस्टग्रेज्वेट होऊ शकले. माझ्यासारखा मजूर शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या केशव ने पीएचडी पूर्ण केली ही बापूंच्या प्रेरणेतून ! अजूनही बापूंनी आपल्या गावाशी टिकलेली नाळ कायम ठेवावी आणि इथल्या तरुण पिढीला प्रेरित करावं ही माफक अपेक्षा.. 

बापूंना दिपक, महिंद्र व मंगेश ही तीन मुलं. यापैकी महिंद्रा व मंगेश अभियंता तर दिपकने विज्ञान विषयातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल आहे. सातारा येथील करंजे नाका या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत. मुलेही उच्च शिक्षण घेऊन स्थिरस्थावर झालेले आहेत. त्यांच्या स्नुषा देखील उच्चविद्याविभूषित आहेत. 'आयडियल लर्नड फॅमिली' म्हटलं तर वावगं ठरू नये. वयोमानपरत्वे बापूंना आता गावात प्रत्यक्ष येऊन गावच्या विकासासाठी हातभार लावण शक्य नसेल कदाचित. आशा वेळी त्यांचे तिन्ही चिरंजीव त्यांच्या वतीने हे दातृत्वाचे कार्य पुढं नेऊ शकतात. त्यात आर्थिक योगदानच असावं असं नाही. त्यांचा बहुमूल्य वेळ आणि त्यांच गावात असण हे देखील फार मोठं योगदान ठरू शकेल.

असं हे अतिशय महान आणि अभ्यासू व्यक्तिमत्व हे आपल्या अनपटवाडी गावचं एक अंग आहे. हा माणूस या ठिकाणी जन्म घेऊन या मातीत वाढून एम एस सी आणि प्राध्यापक एवढी त्या काळी जर झेप घेऊ शकत असेल तर तुम्हा सर्व तरुण मंडळींसाठी ही एक प्रेरणा ठरेल. कारण आता शिक्षण आणि आणि आर्थिक सुविधा यांची वानवा नाही. *वानवा आहे ती जिद्दीने अभ्यास करण्याची, निश्चयी स्वभावाची आणि मेहनतीची* ! मित्रहो या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मध्ये आणल्या तर तुम्ही सुद्धा बापूसारखं एक यशस्वी व्यक्तिमत्व होऊ शकता याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो.. बापूंच्या निवृत्तीनंतरच्या यशस्वी, आनंदी व निरोगी आयुष्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.

केशव राजपुरे..



1 comment: