Tuesday, April 14, 2020

बाळासाहेब वामन सुतार

श्री. बाळासाहेब वामन सुतार; नशीबवान सरपंच

आपला समाज जाती, धर्म, पंथ आणि संप्रदाय यांनी बनलेला आहे. समाजात अठरा पगड जातींचा समावेश आहे. ज्या घरामध्ये मनुष्याचा जन्म होतो त्या घराची जात जन्माबरोबर त्या माणसाला चिकटते. खरं तर जात आणि​​ धर्म हे समाजाला लागलेले कलंक आहेत. परंतु विविध जाती आणि धर्म आपल्या समाजाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावत आहेत हे देखील वास्तव. याचेच उदाहरण द्यायचे झाले तर आमचे गाव अनपटवाडी. आमच्या या गावामध्ये बारा बलुतेदारांपैकी एक सुतार कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये कै वामन सुतार आणि कै दिनकर सुतार हे दोघे बंधू. दोघेही त्यांच्या सुतारकामामध्ये कुशल आणि प्रवीण होते. त्यांपैकी वामन सुतार हे नावाप्रमाणेच छोटी मूर्ती होते. शेतकऱ्यांची लाकडी अवजारे, लाकडी वस्तू तसेच बगाडाचे काम असो ते अत्यंत परिश्रमाने आणि कुशलतेने करत. 

वामन सुतार यांना तीन चिरंजीव बाळासाहेब, किरण, अरुण आणि चार कन्या सुशीला, कुसुम, रेखा आणि प्रमिला. मुलांमध्ये बाळासाहेब हे थोरले. सात मुलं असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह गावातून मिळणारे धान्य (गावकीच बयतं) आणि केलेल्या मजुरीच्या मोबदल्यात मिळालेले धान्य व पैसे यांच्या आधारावर. त्यांची पत्नी शांताबाई यांनी त्यांना या काळात आधार देऊन संसार केला.  श्री. वामन सुतार यांच्या मृत्युनंतर घराची सगळी जबाबदारी थोरला मुलगा बाळासाहेब यांच्यावर आली. बाळासाहेबांचे शिक्षण जेमतेम चौथी पर्यंत झालेले होते. त्यामुळे वाचन आणि लिखाणाचा अभाव होता. परंतु पुस्तकी ज्ञान नसले तरी व्यवहारज्ञान खूप होत. त्यावेळचे त्यांचे वर्गमित्र जनार्दन गोळे, अनिल भाऊ त्यांना आठवतात. शाळेत असताना बाळासाहेब यशवंत राजपुरे यांच्या जवळ अभ्यासाला असंत. शिक्षण आणि नोकरी करायची आवड नसल्याने त्यांनी सुतारकाम हा आपला पारंपरिक व्यवसाय चालू ठेवला. शेजारच्या गावात शेतीची अवजारे बनवणे आणि दुरुस्त करणे या कामांवर त्यांचा उदरनिर्वाह चालला होता. ते लाकुडकाम करण्यात अतिशय तरबेज होते. जुनी घरे आणि फर्निचर बनवणे ही कला त्यांनी त्यांच्या मोरगावच्या मेहुण्याकडून शिकली होती. घरबांधणी ची कामे सुध्दा ते घेत असत. या कालावधीत कुटुंब सांभाळत असताना लहान भावांची लग्ने केली.

बाळासाहेब उत्कृष्ट ढोल वादक आहे. त्याच्याकडे स्वतःची कडी आहेत. पंचक्रोशीत कुठेही छबिना असेल तर बाळू हमखास तिथे जातो. गावात कुठलेही कार्य असेल, ढोल वाजवायचा असेल तर बाळूचा ढोल ठरलेला.. तसेच बगाडासाठी चांगले बैल पाळण हा त्याचा छंद आहे. त्यांन आत्तापर्यंत चांगले चांगले बैल पाळलेले आहेत आणि जपलेले देखील आहेत. बावधन बगाडाचा गाडा करण्याचा मान बाळूच्या सुतार भावकीकड आहे. आता त्यामध्ये बाळूच वरिष्ठ आहे. त्याला गाडयाच्या सगळ्या खाणाखुणा माहीत आहेत. बगाड यात्रेदिवशी दिवसभर बाळू आणि मंडळी गाड्यासोबत डागडूजीसाठी सुतारकामाची हत्यारे घेवून असतात. सलग चार ते पाच दिवस गाडा करण्यात ही मंडळी सतत व्यस्त असतात. गाडा तयार करत असताना आपल्या गावच्या सुतारांचा एक वेगळा मान असतो. हा मान अनपटवाडी गावातील सुतारास आहे ही फार मोठी गोष्ट आहे गावासाठी. मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे पूर्वी मंदिर न उघडता सर्व तुळाया आणि खांब व्यवस्थित बदलून डागडुजी अतिशय कौशल्याने त्यांनी केल्याचे आम्हाला माहिती आहे.

१९८६ साली त्यांचा विवाह सोमेश्वर येथील हेमलता यांच्याशी झाला. पण दुर्देवाने जवळजवळ २० वर्षे त्यांना अपत्यप्राप्ती झाली नाही. मग हेमलता यांच्या पुढाकाराने २००६ मध्ये बाळासाहेब यांचा दुसरा विवाह सुवर्णा यांच्याशी झाला. त्यांना मुलगा अभिजीत व कन्या वैष्णवी ही दोन अपत्य. यांचे बंधू किरण यांची अभिषेक व ऋषिकेश अपत्य बारावी नंतर नोकरी व्यवसाय करत आहेत. धाकले बंधू अरुण यांच्या प्रिया (बीकॉम ३), अबोली (बारावी) व इंद्रायणी (दहावी) या तिन्ही मुली अतिशय हुशार आहेत व शिक्षण घेत आहेत. या सगळ्यांच्या पालकत्वाची जोखमीची जबाबदारी बाळासाहेब अजूनही पेलत आहेत.

सन २००५ साली अनपटवाडी गावाच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सरपंच पद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव होते. योगायोग म्हणजे गावामध्ये इतर मागासवर्गाची ची फक्त सुतारांची घरे होती. त्यामुळे सरपंचपद सुतारांकडे द्यावे लागणार होते. यावेळी गावाने एकमताने बाळासाहेबांना सरपंच केले. सन २००५ ते २०१० या कालावधीत गावाचा प्रथम नागरिक होण्याचा बहुमान बाळासाहेबांना मिळाला. अशाप्रकारे ते नशिबाने गावाचे सरपंच झाले. पाच वर्षांच्या काळात नितीन शिवराम मांढरे, संतोष नानासाहेब अनपट व इतर पंच मंडळींनी त्यांना फार मदत केली आणि कारकीर्द सहज सुलभ होण्यास हातभार लावला. चौथी पर्यंत शिक्षण असल्यामुळे बाळासाहेबांना लिहिताना आणि वाचताना समस्या येत होत्या. त्यामुळे गावासाठी आलेल्या योजना आणि इतर गोष्टी समजावून घेण्यासाठी ते गावातील शिकलेल्या माणसांवर अवलंबून असत. केशव राजपुरे यांनीदेखील त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि सल्ला दिल्याचे त्यांना आठवते. पाच वर्षांच्या काळामध्ये त्यांना माइक वर बोलन कधी जमलं नसेल पण ते त्यांच्या कृतीतून त्यांनी पूर्ण केल. मुळात त्यांचा स्वभाव अतिशय शांत, मृदू, संयमी, निर्मळ आणि परिश्रमी असल्यामुळे या पाच वर्षांमध्ये जास्त हेवेदावे न होता गावाच्या विकासाला चालना मिळाली. यादरम्यान त्यांनी कुणालाही दुखावलं नाही. 

२००० सालापासून गावाने गावात संत गाडगे महाराज ग्राम स्वछता अभियान आणि इतर उपक्रम यशस्वीपणे राबविले होते. या ग्रामस्वच्छता अभियानामधे संपूर्ण गावाने एकत्र येऊन गाव स्वच्छ केले आणि तालुका व जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याचे फलित म्हणून २००७ मध्ये सरपंच बाळासाहेब सुतार, नितीन मांढरे, ग्रामसेवक गाढवे आणि गावकरी यांच्या परिश्रमातून अनपटवाडी गावाला ग्रामस्वच्छता अभियानातील तालुका स्तरावरील सर्वोत्कृष्ट पुरस्कार (निर्मल ग्राम पुरस्कार) मिळाला होता. गावासाठी आत्तापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांमधील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. बाळासाहेब सरपंच असताना गावाची झालेली ही सर्वोच्च कामगिरी होती. विशेष म्हणजे  हा पुरस्कार भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आणि प्रथम नागरिक, ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शुभहस्ते अनपटवाडी ग्रामपंचायतीस मिळाला. हा पुरस्कार घेण्यासाठी सरपंच बाळासाहेब सुतार यांना दिल्ली दरबारी जावे लागले त्यामुळे ग्रामस्थ ही एक ऐतिहासिक घटना आहे असे समजतात. त्यावेळेला गाढवेवाडीचे सरपंच सुरज गाढवे व बाळासाहेब हे दोघंच दिल्लीला गेल्याचे ते सांगतात. या पुरस्कारामुळे गावाचे नाव संपूर्ण जिल्ह्यात झाले. स्वच्छता हाच परमेश्वर आहे असे इथल्या ग्रामस्थांचे मत आहे. ' स्वच्छतेकडून - समृद्धीकडे' हा मंत्र याच सरपंचांच्या कार्यकाळात नावारूपाला आला आणि गावाचा कायापालट झाला असे गावकरी आनंदाने सांगतात. 

'न भूतो न भविष्यति' या उक्तीनुसार स्वप्नातही ज्यांना आपण सरपंच होऊन गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवू असे वाटत नव्हते त्यांनी परिश्रमाने, गावकऱ्यांच्या साहाय्याने, कुशलतेने आणि आपल्यावर आलेल्या जबाबदारीचे मोल समजून अनमोल कार्य केले आणि गावाला जिल्ह्यात एका उंचींवर नेवून ठेवले ते बाळासाहेब अतिशय शांत आणि मृदू स्वभावाचे आहेत. परिश्रम हा गुण त्यांच्या वाडवडीलांकडून त्यांना मिळालेला आहे. अचानक आलेल्या जबाबदारीने घाबरून न जाता इतर लोकांची मदत घेऊन आणि आत्मविश्वासाने सामोरे जावून कार्य कसे यशस्वी करावे याचा प्रत्यय आपणास बाळासाहेबांकडे पाहून येतो. अल्पशिक्षित, स्वभावाने साधा भोळा असणारा, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सरपंच गावाला मिळाला याचा गावकऱ्यांना अभिमान आहे. त्यांच्या हातून अनेक समाजोपयोगी कामे व्हावीत हीच आशा. श्री. बाळासाहेबांना भावी आयुष्य सुख समृद्धीचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा !

माहिती संकलन व शब्दांकन
श्री.जनार्दन गोळे, केशव राजपुरे, नितीन मांढरे व अनिकेत भोसले



1 comment:

  1. समाजातील सर्व घटकांशी आपण एकरुप होता ... छान लिहीलय

    ReplyDelete