Wednesday, April 8, 2020

अनिल मारुती अनपट




आदर्शवत यशस्वी उद्योजक अनिल अनपट
(एक उद्योजक घडताना)
८ एप्रिल २०२०

शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन, अस्तित्वासाठी मुंबई येथे कमी शैक्षणिक अहर्तेमुळे सोसलेली ससेहेलपाट, अशा प्रसंगी प्रस्थापितांनी झि​​डकारले ने त्वेषाने पेटून उठून केलेला संघर्ष, अनपटवाडी गावचे युवकांचे प्रेरणास्थान श्री अनिल अनपट (भाऊ) यांच्या वाट्याला आल्यानेच ते आज यशस्वीतेच्या शिखरावर आहेत.

पार्वती काकू आणि मारुती अनपट (बाळू आप्पा) यांच्या आठ अपत्यांपैकी अनिल एक व उरलेल्या बहिनी ! अनिल भाऊंचा जन्म ५ ऑक्टोबर १९६५ चा. घरात आठ-दहा म्हशी, केळी बागायत, बाहेरची दमडीची मिळकत नाही, हालाकीचे दिवस यामुळे अनिल भाऊंसाठी शेती आणि इतर काम अनिवार्यच ! १९७१ ते १९७५ दरम्यान वाडीतील प्राथमिक शाळेत कोदे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ज्ञानार्जन केलं. अभ्यासात एवढे पारंगत नसलेले भाऊ गणितात मात्र पैकीच्या पैकी गुण मिळवायचे तेव्हा ! त्यांचे हे गणित कौशल्य पुढे आयुष्याचे गणित तर्किक विश्लेषण करून सोडण्यास मदतीला आले. त्यामुळे हे गणित त्यांनी बरोबरच सोडवून मार्गक्रमण केले. हे शाळेत असताना गावचे तत्कालीन कारभारी व त्यांचे वडील बाळाप्पा यांच्या दूरदृष्टीतून शाळेमध्ये शहाबादी फरशी घातल्याचे त्यांना आठवते. 

१९७५ ला चौथीतुन ते बावधन हायस्कूलला प्रवेश नाकारल्याने, बावधन च्या प्राथमिक शाळेत पाचवीसाठी गेले. सुरुवातीला गाडेबाग मधील प्राथमिक शाळा क्रमांक २ मध्ये व नंतर बावधन बस स्थानकाच्या समोरील शाळेत त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. १९७८ ला आठवीसाठी मग हायस्कूल शाळेत त्यांना नाविलाजाने प्रवेश द्यावा लागला. आठवीला चार तुकड्यांपैकी क तुकडीत ते शिकले. अभ्यासात सर्वसाधारण पण इतर उपक्रमात पुढे असणारे भाऊ तेव्हा त्यांच्यातील उनाडपणात चमकले. मुलांची भांडण तसेच वर्गात दंगा करण्यात अग्रक्रम पण बसायला शेवटच्या बाकावर. पण आयुष्याच्या शाळेत पुढील चाळीस वर्ष मात्र ते यशस्वीत्यांच्या पुढच्या रांगेत आहेत. 

मार्च १९८० च्या एसएससी च्या परीक्षेत त्यांना कमी गुण मिळाले आणि यात्रेच्या मुख्य दिवशी आलेला तुलनेत सोपा मराठी विषय घालवून बसले. त्यावेळी या प्रकाराबद्दल मराठीच्या तत्कालीन शिक्षकांनी उपरोधात्मक त्यांचा सत्कार केल्याचे त्यांना आठवते. अर्थात ऑक्टोबर वारीत तो विषय सोडवला पण आयुष्याच्या एका वर्षाच्या मोबदल्यात ! 

पार्वती काकूंच्या जिकिरीच्या पाठिंब्यावर भाऊंचा पुढील खडतर शिक्षण प्रवास सुरू झाला. १९८१ ते १९८३ किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयात तर त्यानंतर पुढं १९८५ पर्यंत वरिष्ठ महाविद्यालयात कला शाखेत त्यांनी शिक्षण घेतलं. आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी त्यांनी अभ्यासोत्तर उपक्रमात सक्रियपणे भाग घेतला. क्रीडा स्पर्धा, विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका, विद्यार्थी संघटना, मोर्चे, एनएसएस, एनसीसी - सगळीकडे यांचा सहभाग! राजू नाना मांढरे यांच्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थन केलं. निवडणुका दरम्यान संपर्कवलय वाढवण्यावर भर दिला तसेच समाज मानसिकता व राजकारण जवळून पाहिले. पुढच्या पिढीतील सहकारी मित्रांना उपदेशपर सल्ला, मार्गदर्शन, सहकार्य, तसेच प्रशिक्षण देण्यावर भर दिला. तसं बघितलं तर शैक्षणिक विद्वत्तेच्या कमतरतेमुळे त्यांचं महाविद्यालयीन जीवन आव्हानात्मक होतं. त्यामुळे पुन्हा एचएससी च्या परीक्षेत इंग्रजीत गटांगळी!

यादरम्यान बावधन मधील रवी, संजय, गौतम कांबळे, राजेंद्र भोसले, अनिल भोसले तसेच शरद कदम यांच्याशी सलगी वाढली. वाई पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष श्री विजय नायकवडी हे त्यांचे बेंचमेट ! एस टी वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर गायकवाड व अनिल भाऊ यांची एनसीसी मार्फत नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचालन (२६ जानेवारी १९८५ ची आरडी परेड) मध्ये निवड झाली होती. तेव्हाच नेमकी भोपाळ वायू दुर्घटना २ डिसेंबर १९८४ ला झाली आणि हे संचालन रद्द झाले आणि त्यामुळे भाऊंची यात सहभाग घ्यायची सुवर्णसंधी निघून गेली. पण तरीसुद्धा तेव्हा गावासाठी ही फार मोठी उपलब्धी होती. 

काहीकाळ महाविद्यालयात वस्तू भांडाराचे प्रभारी देखील होते. किसनवीर महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात झालेली निवडक सादरीकरणे त्यांच्याच प्रयत्नाने अनपटवाडी यात्रेनिमित्त दाखवल्याचे मलाही आठवते. आम्हा मुलांसाठी तो एक अल्हादायक अनुभव होता. वडिलांच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे घर, शेती व इतर जबाबदाऱ्या त्यांच्यावर येऊन पडल्या. त्यामुळे शिक्षण अपूर्ण राहिले. तेव्हा दूध वाटपा बरोबरच भाजी व्यवसायही त्यांनी केला. दोन वर्षे शेतीदेखील केली. त्यावेळेस अतिशय कष्टाने आपल्या शेतीत राबून त्यांनी वांगी पिकाचे चांगले उत्पादनही घेतले. वांगी उत्पादनाच्या एका हंगामात जवळ जवळ पंधरा हजार रुपये कमावल्याचे ते अभिमानाने सांगतात. यावेळी घरगुती वाद-विवाद असूनही नूतन सरपंच श्री मोहन विनायक अनपट यांनी त्यांच्या विहिरीचं पाणी अनिल भाऊंना दिल्याचं ते विसरले नाहीत.

आयुष्यातील सुखाचा पाठलाग करताना कमवता होण्यासाठी मुंबईत जाऊन बाहेरच्या जगाची चव चाखायची असं वैतागून १९८७ ला ठरवलं. त्यावेळी अजून तीन बहिणींची लग्न बाकी होती. सुरुवातीला मुंबई येथील चिंचपोकळी येथील गावच्या गाळ्यावर दोन दिवस, लालबाग येथे विठ्ठल अनपट च्या रूमवर आठवडा व शेवटी धारावीतील संजय अनपट यांच्या रूमवर ते स्थिरावले. मित्रांसोबत मिळेल ते काम शोध सुरू केला. बांद्र्याला दिवसा पंधरा रुपये हजेरीवर रंगकाम देखील केले. मार्केटमध्ये कापडाच्या चार-चार लम्स वरच्या माळ्यावर पोचवण्याचं खडतर काम केलं. दिवसभरातील चार ट्रीपचे सहा रुपये मिळायचे तेव्हा.

वसंत काकांचे नांदवळचे मेव्हणे विलास पवार यांच्या ओळखीने अमरज्योती रोडलाईन्स या ट्रांसपोर्ट च्या ऑफिस मध्ये रोजंदारीवर गाड्या भरण्याचे मिळालेले काम तीन महिने केले. तसेच हमाली करण्यासाठी माथाडी सेवेत दाखल व्हावं असाही विचार आला. पण माथाडी युनियन मध्ये रजिस्ट्रेशन साठी तेव्हा चाळीस हजार रूपये देण्याची भाऊंची परिस्थिती नव्हती. जवळजवळ पाच महिने हे अंगमेहनतीच खडतर काम केल्यानंतर त्यांच्या नशिबात तुलनेनं सुलभ, पंख्याखाली बसून कार्यालय सांभाळण्याचे, काम आलं. 

सुदैवाने १९८९ साली पलटण रोड वरील एफ के रोडलाईन्स या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये तीनशे रुपये प्रति महिना पगाराची नोकरी मिळाली. धारावीतील रूम नाना आबांनी विकल्याने त्यांचा राहण्याचा आधार गेला. पुन्हा निवाऱ्याचा प्रश्न आ वासून पुढे ! काही दिवस गावच्या गाळ्यावर आश्रय शोधण्यासाठी केलेला प्रयत्न तेव्हा त्यांच्या दुर्देवाने असफल झाला. महिना तीस रुपये भाडे देऊन सुद्धा गाळ्यातून बाहेर जावं लागलं. आकाश फाटलेले स्थितीत मायचं आणि मनोधैर्य वाढविणारे नैतिक समर्थन अशोक अनपट यांच्या मामी यांनी देिले. त्यानंतर अगदी फॅमिली मुंबईत येईपर्यंत त्यांनीच डब्बा दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर भाऊंच्या आयुष्याने यशस्वीतेकडील एक महत्त्वपूर्ण वळण घेतलं.

अशा परिस्थितीत हाताश मनस्थितीत एफ के रोडलाईन्स चे मालक राजूभाई यांच्याकडे गावी परतत असल्याचे सांगून प्रलंबित पगाराची रक्कम मागायला गेले आणि काय आश्चर्य.. त्यांचे दैव पालटले. त्यांनी भाऊंच्या राहण्याची (ऑफिस मध्ये) फक्त सोयच केली नाही तर पगारामध्ये ५० रुपयांची वाढ केली. खानावळ, खोली भाडे व ट्रेन पास या खर्चाचे रुपये ११५ वाचणार होते. म्हणजेच पगारात तशी १६५ रुपये वाढ !

अनिल भाऊंनी मग मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ऑफिसमध्ये रोजनिशी, हिशोब वही, खतावणी, कागदपत्रांच्या नकला, चालकां साठी चे नियोजन अगदी पद्धतशीरपणे सांभाळले व मालकांचा विश्वास संपादन केला. या मालकांनी तीन महिन्यात त्यांचा पगार रुपये पाचशे प्रतिमहिना केला. त्यांचे नशीब चांगलं म्हणून त्याच ऑफिसमध्ये १९८९ मध्ये व्यवस्थापक पदावर महिना रुपये १००० च्या पगारावर त्यांना बढती मिळाली. त्यांच्या परीक्षेचा काळ संपला होता. ऐश्वर्याचे दिवस खुणावू लागले होते. मुंबई महानगरात जिथे साध्या हमालाच्या नोकरीस महाग झालेला अनिल आरामाशिर जीवन जगत होता. 

८ जून १९९३ ला सोमर्डीच्या प्रतापराव परामणे मामांची मुलगी साधना यांच्याशी अगदी नाट्यमय रीतीने त्यांचा विवाह संपन्न झाला. मामांनी सुरुवातीला होकार देऊन परत कुठल्यातरी कारणावरून नकार कळवून खळबळ माजवून दिली होती. पण तोपर्यंत अनिल भाऊ आणि साधना वहिनी यांनी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्याची खूणगाठ बांधली होती. यादरम्यान परामणे कुटुंबांकडून असलेल्या विरोधास दहशतीने उत्तर देण्यात आले होते. अनिल भाऊनाही धमकावलं त्यांनी ! मेव्हणे रवी परामणे बरोबर "साधनाचा होकार का नकार यावर" दहा हजारांची पैजही लागली होती. अर्थात ती पैज भाऊंनी जिंकली व वहिनींच्या मर्ढे येथील काकांच्या मध्यस्थीने विवाह सोहळा संपन्न झाला. त्यांच्या संसारवेलीवर मयुर व निकिता ही दोन फुलं ! मयुर अभियंता पदवीच्या शेवटच्या वर्षाला तर निकिताने बीबीए केले. लवकरच निकिताचा विवाह संपन्न होईल.

प्रगतीपथावर त्यांनी तेव्हा उत्पन्नाच्या साधनासाठी ट्रक देखील खरेदी केला होता. १९९६ ला अनिल भाऊंनी आपले कुटुंब मुंबईला हलवलं. सुरुवातीला कुर्ल्याला राहिल्यानंतर ते कनंमवारनगर, विक्रोळी येथे वास्तव्यास होते. त्यानंतर त्यांनी मुंबईस्थित अनपटवाडीकर यांच्यात एकोपा वाढवला. मित्रांची विचारपूस, त्यांच्या अडचणीत मदत केल्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांचा एक संच तयार होऊ लागला. मुंबईत एकमेकांना ओळख न दाखवणारे व अलिप्तता राखणारे गाववाले आता सभा-समारंभात एकत्र येऊ लागले. सख्यभाववृद्धी झाली. त्यातूनच श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) या संस्थेची निर्मिती मोहन अनपट आणि इतर जेष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८ ला झाली. सुरुवातीला महिना पन्नास रुपये जमा करणारे १२ सभासद यामध्ये होते. याकामी मित्र व मंडळाचे सचिव श्री हनुमंत मांढरे यांची मोलाची साथ त्यांना मिळाली तसेच हनुमंतनी त्यावेळी पुढाकार घेतला म्हणून ते शक्य झाले असं भाऊ सांगतात. या मंडळाच्या माध्यमातून गावची यात्रा पूर्ववत भरू लागली, शाळेची गुणवत्ता सुधारली, गाव विहिरीचे खोदकाम, ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक, मारुती तसेच वाकडेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार, पेयजल योजना, गटारीकरण व इतर अनेक ग्राम विकासाची जवळजवळ चाळीस लाख रुपयांची कामे झाल्याचे ते सांगतात. 

मार्च २००५ पर्यंत ते एफ के रोडलाईन्स मध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांच्या मालकांना ते डोईजड वाटू लागले व शेवटी अनिल भाऊ यांना ट्रान्सपोर्ट व्यवसायात सवतासुभा मांडायला भाग पाडले. वाशी येथे मार्केटमध्ये जीवन ज्योती रोडलाईन्स ही स्वतःची फर्म त्यांनी सुरू केली व गेली १५ वर्ष अतिशय उत्कृष्टपणे चालवली आहे. एक वेळ १६ कर्मचारी त्यांच्या ऑफिस मध्ये होते. या फर्मला समांतर काढलेली साधना वहिनी साठी कंपनी बुकींग सेवेसाठी ची ओम साई रोडवेज ही फर्म सुद्धा व्यवस्थित चाललेली आहे. 

२०१५ दरम्यान वडील आप्पांच्या आजारादरम्यान ते बराच काळ गावी वास्तव्यास होते. तेव्हा त्यांचे बंधु सीए विजय अनपट यांचे वाईमध्ये फर्स्ट क्राय डॉट कॉम हे डिपार्टमेंटल स्टोअर सुरू झालं होतं. त्यातूनच त्यांनी स्वतःचे फर्स्ट क्राय डॉट कॉम हे स्टोअर कोपरखैराने, नवी मुंबई येथे सुरू केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी मुंबईतील त्यांच्या स्थावर मालमत्तेत वाढ केली. नवी मुंबई व पनवेल परिसरात त्यांनी स्वतःची घर व कार्यालय केली आहेत.

समाजसेवेस वाहून घेतलेल्या श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. शहीद सैनिकांच्या कुटुंबासाठी झटणाऱ्या जयहिंद फाउंडेशन या संस्थेचे देखील ते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. नवी मुंबई ट्रान्सपोर्ट असोसिएशन कमिटी चे सक्रिय सभासद म्हणूनही कार्यरत आहेत. जीवनात परोपकार, आपुलकी, स्नेह, माणुसकी या नैतिक मूल्यांचे जतन हे त्यांचं नित्याचे झाले आहे. अतिशय समाधानच आयुष्य ते सध्या जगत आहेत. त्यांचा स्वभाव अतिशय गोड, निगर्वी, प्रामाणिक, कष्टाळू, समाजप्रिय, माणुसकीचे जतन करणारा असा आहे ! सर्वसमावेशकता, नेतृत्वगुण व उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्य हे त्यांचे गुण त्यांच व्यक्तिमत्त्व अधिक सुंदर बनवतात. 

बावधनच्या मातीतील ही ठिणगी परमेश्वराजवळ नेहमी सकारात्मक ऊर्जेची आणि परोपकारी वृत्ती जोपासण्यासाठी शक्तीची मागणी करते. पद, प्रतिष्ठा, मान या गोष्टी क्षणभंगुर मानणारे अनिल भाऊ शाश्वत आनंद प्राप्तीसाठी योगा व ध्यानधारणा करतात. वयाच्या चोप्पन्नाव्या वर्षी सुद्धा त्यांच्यात एवढी ऊर्जा कुठून येते याचे उत्तर आपल्याला यातून मिळतं. घर व कार्यालयातील भावनिक अंतर सुरक्षित ठेवल्यास जीवनात दुःख वाट्याला येणार नाही असे ते मानतात. भाऊंनी जीवनातील यश स्वप्रयत्नातुन आणि कष्टपूर्वक संपादन केले आहे म्हणून त्यांच्या दृष्टीने याची किंमत अमूल्य आहे. भाऊंच्या कार्यास सलाम व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

संदेश:
प्रतिकूल परिस्तिथीवर नक्की मात करता येते, त्या त्या संकटात परमेश्वर कुणालातरी मदतीला पाठवतो. फक्त आपली नीती आणि नियत चांगली पाहिजे.

अनिलला देखील कुणीतरी मोठं होण्यासाठी मदत केली. तोच आदर्श घेऊन अनिलने देखील अनेकांना मोठं केलं आणि आज ही करत आहे. त्यासाठी मनाचा मोठेपणा हवा. गावाचा अभिमान हवा.

✍️डॉ. केशव यशवंत राजपुरे

1 comment: