Tuesday, April 28, 2020

विनायक शंकर अनपट (बापू नाना)


विनायक शंकर अनपट (बापू नाना)

वरच्या वाड्यातील वाघोजी अनपट यांच्या चार (रावजी, गोपाळा, श्रीपती, दौलती) अपत्यांपैकी, श्रीपती यांचा मुलगा शंकर ! ते गवंडीकाम करत व त्यांचा मुंबई येथील गोल देऊळ बांधण्यात सहभाग होता असे समजते. शंकर श्रीपती अनपट यांना एकूण ६ अपत्य ! त्यापैकी चार मुली व दोन मुलगे. त्या चार मुलींचा विवाह पुढील प्रमाणे विविध गावात झाला: १. बावधन चे पिसाळ, २. विठ्ठलवाडीचे शिंदे, ३. चांदकचे संकपाळ, ४. शेरेचीवाडी चे मोहिते. दोन मुलांपैकी एक जण किशोरवयात गेले व दुसरे विनायक शंकर अनपट हे अनपटवाडीत बापूंनाना या नावाने प्रचलित झाले. बापू नाना आणि अवखळपणा हे ठरलेलं समीकरण ! त्याच्या अवखळ स्वभावामुळे बऱ्याचदा त्यांना अडचणीत आणलं असलं तरी तो त्यांच्या जीवनाचा ट्रेडमार्क होता.

नानांचा जन्म १९३२ चा ! नानांनी चौथीपर्यंतची शिक्षण बावधन येथे पूर्ण केले. नानांना लहानपणापासूनच कुस्तीची प्रचंड आवड ! अनपटवाडीतील सदाशिव आण्णा, महादेव आण्णा, मारुती नाना, सुभेदार दादा हे नानांचे समकालीन कुस्तीपटू होते. त्यांच्या कुस्ती संबंधी एक प्रसंग सांगितला जातो तो म्हणजे एकदा बावधन पंचक्रोशीतील यात्रेमध्ये नामवंत मल्ल (परदेशी, दाणेबाजार तालीम, वाई) कुस्तीच्या फडात आला होता. त्यांची तब्बेत बघून कुस्ती करायला कोणी तयार नव्हते. अशावेळी बापू नानांनी त्यांच्यासोबत कुस्ती केली होती. त्याला नानांनी चित्तपट केले होते. तेव्हा त्यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल अनपटवाडीचे तत्कालीन नेतृत्व दत्तात्रय अनपट (तात्या) यांनी नानांना जरीचे खिस्तांग बक्षीस म्हणून दिले होते. हे मिळालेले पारितोषिक त्यांच्यातील अवखळता, आत्मविश्वास, हिय्या आणि धैर्यासाठी होते. कुस्ती हरलेल्याचा अपमान परदेशी सहन करू शकत नव्हता. पुन्हा त्यांनी वर्षभर मेहनत केली व अनपटवााडीतल्या पैलवानांना आव्हान केले. यावेळी त्यांच आव्हान गावातली दुसरेे मल्ल सदाशिव मांढरे यांनी स्वीकारलं व दुसऱ्यांदा परदेशी यांना चितपट केले.

चौथीतुन शाळा सोडल्यानंतर नाना वडिलांसोबत शेती करू लागले. नाना हे एकुलते एक चिरंजीव ! त्यामुळे शंकर श्रीपती अनपट यांनी त्यांच्या वाट्याची बरीचशी जमीन त्याकाळी विकली वा घाण ठेवली. अशात नानांच्या वाट्याला फक्त तीन एकरच क्षेत्र उरले. त्या स्वातंत्र्यपूर्व काळात उपजीविकेसाठी बरेचजण मिलमध्ये काम करण्यासाठी मुंबईला जात असत पण नानांनी आपला गाव, कुटुंब व शेती भली म्हणून गावीच राहणे पसंत केले. गावामध्ये सदाशिव आण्णांशी त्यांच खूप सख्य होतं. मल्ल म्हणून ते चांगले मित्र होतेच पण आण्णा नानांना खूप समजून घ्यायचे. त्यांचा नानांना मोठा आधार होता.

नानांचा विवाह १९४९ च्या दरम्यान पुण्याच्या हिराबाई बबनराव काळे (ताई) यांच्यासोबत झाला. ताईंचे आजोळ नांदवळ (बर्गे) व नानांची बावधन मधील भाची (यमुना पवार, नांदवळ) यांच्या नातेसंबंधातून हा विवाह ठरवला गेला असावा. ताई या शहरात वाढलेल्या होत्या त्यामुळे शेतातील कामाची सवय नव्हती. पण त्या सर्व काही शिकून नानांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिल्या व यशस्वी संसार केला. या उभयतांना एकूण पाच मुले व तीन मुली अशी आठ अपत्ये ! यामध्ये थोरले मोहन (इंदुमती संकपाळ, चांदक) व नंतर शिवाजी (नंदा सस्ते, सस्तेवाडी, बारामती), समिंद्रा जाधव (जाधववाडी, वेणेगाव), हनुमंत (रेणुका काळे, पुणे), शारदा मुळीक (बावधन), लतिका संकपाळ (चांदक), शहाजी (सुरेखा साळुंखे, खंडाळा) व सुनील (माधवी जगताप, रहमतपुर).

राग हा आपल्या मानसिक शत्रूंमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. रागापासून मुक्ती मिळावी अशी सर्वाचीच इच्छा असते पण बऱ्याचदा ते जमत नाही. नानांचा स्वभाव तसा चंचल, अवखळ व शीघ्रकोपी. त्यांना प्रचंड राग येत असे. मनाला न पटलेल्या गोष्टींबाबत त्यांची हलकीशी कुरबूर, चीडचीड ते संतापापर्यंत मजल जायची. मग रागाने बडबड करून, प्रसंगी शिव्या घालून, ते सगळा राग व्यक्त करून मोकळे व्हायचे पण मनात काही ठेवायचे नाहीत. त्याच्या या स्वभावामुळे ते सर्वांचा रोष पत्करायचे. त्यांना अन्याय सहन व्हायचा नाही मग तो दुसऱ्यावर झालेला का असेना. अन्यायाविरुद्ध नेहमी आवाज उठवायचे. माणसांन स्वभाव बद्लून चालत नाही कारण नैसर्गिक स्थायी स्वभावात बदल केल्यास माणसाला त्रास होतो. उतारवयात मात्र त्यांचा हा स्वभाव पूर्ण बदलला होता त्यामुळे तो काळ त्यांच्यासाठी परीक्षेचा होता. नानांच्या पत्नी हिराबाई (ताई) याउलट प्रेमळ, संयमी, तसेच शांत स्वभावाच्या होत्या. त्यांच्यामुळेच नानांच्या संसाराचा समतोल साधला गेला. ताई शांत असल्यातरी आचरणासाठी कडक शिस्तीच्या होत्या. त्यांनी सर्व मुले, मुली, सुना, नातवंडे यांना व्यवस्थित वळण लावली आहेत. ताईंच्या परिश्रम आणि समर्पणरुपी योगदानाचे एक उदाहरण हे आहे: शहाजी आबा मुंबईत नोकरी शोधण्यासाठी गेले होते. शिक्षण कमी असल्याने नोकरी मिळत नव्हती. अशावेळी आबांनी वायरमनच्या हाताखाली काम करण्यास सुरुवात केली. वायरमनचे काम करावयाचे झाल्यास पीडब्लूडी विभागाचा तारतंत्रीचा परवाना लागत असे आणि यासाठीची परीक्षा देण्यासाठी तेव्हा ३०० रुपये भरण्यास नव्हते. अशा वेळी ताईंनी, घराच्या गरिबीत जमीन गहाण असल्याने, भुईमूगाच्या शेंगा चाळण्यासाठी जाऊन हि परीक्षा फी पाठविल्यामुळे ते परीक्षा देवून उत्तीर्ण झाले आणि त्यामुळे आज इलेक्ट्रिक कामे करू शकतात. 

मोठे कुटुंब सांभाळत असताना वडिलोपार्जित तीन एकर जमिनीमधून जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळवता येईल याकडे त्यांचा कटाक्ष असे. ते शेतातील भाजीपाला बैलगाडीतून वाईला नेऊन विकत असत. १९७० च्या दरम्यान त्यांनी तिन्ही आंबा परिसरात जलसिंचनासाठी एक वीहीर खोदली. पण ती फार खोल नसल्याने तिला वर्षभर पाणी टिकायचे नाही. म्हणून १९८४ ला या विहिरीची घरातील माणसांच्या पाठबळावर पुन्हा खोदाई केली. यावेळची आठवण म्हणजे पूर्वी विहिरीवर वीजपंप नव्हते तर मोट असायची. अश्यावेळी बापू नाना मोट हाकत आणि ताई पिकांना पाणी देत. खर तर बाळंतीण सव्वा महिना झाल्याशिवाय गार पाण्यात हात घालत नाही परंतु ताई यांनी तेव्हा १२ दिवसाचे आपले बाळ आपली मुलगी समिंद्रा यांचेकडे सोडून पाणी धरत आणि नवऱ्याला शेतीकामात आवश्यक मदत करत असेही सांगितले जाते.

१९७२ च्या दुष्काळात मिलो खाऊन नानांच्या परिवाराने मोठे कुटुंब, कमी जमीन व अवर्षण परिस्थितीमध्ये आलेल्या परिस्थितीचा मोठ्या धैर्याने सामना केला. १९७५ साली दत्तात्रय अनपट यांच्या मदतीने ज्येष्ठ चिरंजीव मोहन दादा यांचा विवाह पार पडला. त्यानंतर पैसे कमावून कुटुंबास हातभार लावण्यासाठी दादा मिलमध्ये काम करण्यासाठी मुंबईला गेले. त्यानंतर शिवाजी (आप्पा) व हनुमंत (भाऊ) हेदेखील मुंबईला गेले. नानांचे कुटुंब कुठे स्थिरस्थावर व्हायला लागले होते तोच १९८३ झाली मिल बंद पडल्या व सर्वजण गावी परतले. यावेळी कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी नानांनी बकरी पालनाचा व्यवसाय चालू केला. तसे पाहता हे म्हणजे नव्वदच्या दशकात मराठा समाजातील व्यक्तींनी बकरी पालनाचे दुर्मिळ उदाहरण होतं. या कामांमध्ये त्यांना त्यांचे चिरंजीव हनुमंत यांची साथ लाभली. बकरी पालनामध्ये बकऱ्या मागे डोंगरात किंवा शिवारभर भटकणे व सायंकाळी तळावर वाघरा ठोकणे इत्यादी कामे त्यांनी कोणतीही लाज न बाळगता केली. एकदा बकरी चारताना ते लिंबाच्या दाऱ्याआसपास कड्यावरून पडले व जबर जखमी झाले पण सुदैवाने यातून वाचले. कुस्तीत कमावलेल्या शरीर संपदेमुळे नाना तेव्हा बचावले असे म्हटले तर वावगे ठरू नये. नानांच्या रागीट स्वभावामुळे बकरी सांभाळत असताना नानांची बऱ्याच लोकांबरोबर कलह झाल्याचे सांगितले जाते. बावधन येथील सदाशिव धनगर यांना त्यांच्या बकऱ्यांसाठी झाडपाल्यासाठी अनपटवाडी शिवारातील बाभळी खडसू नये असे बजावले होते तरीपण सदाशिव धनगर मुद्दामहून बाभळा खडसत असे. याामुळे सदाशिव धनगर यांच्याबरोबर मोठे भांडण झाले होते. अशा तंट्यामुळे पुढे नानांनी बकरी विकली व पुन्हा नव्या जोमाने शेतीवर लक्ष केंद्रित केले.

१९८४ मध्ये नानांची अनपटवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निवड करण्यात आली. असे मानलेेे जाते की नानांमधील अवखळपणा कमी करण्यासाठीच गावानं ही महत्त्वाची महत्त्वाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे १९८४-१९८९ या पंचवार्षिक योजनेसाठी नानांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडणूक पार पाडली गेली. त्यावेळेला त्यांचे ग्रामपंचायती मधील सहकारी होते: जयहिंद जगदेव अनपट (उपसरपंच), संभाजी केशव अनपट, संपतराव मन्याबा गोळे, शामराव जगदेव अनपट, शकुंतला मारुती अनपट व विमल सदाशिव अनपट. अनपटवाडीतील कुणाशी भांडण झाले की नाना नेहमी माणसांना वाडगाळ म्हणायचे, ज्यात ते स्वतः देखील असायचे. आणि ही वाडगाळ कधी सुधारायची नाहीत - असे त्यांचे म्हणणे. पण मारुती मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी जाहीर भाषणात सांगितले की मी चूक होतो. हि वाडगाळ राहिली नाहीत.

नानांच्या कारकीर्दीत गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने स्वजलधारा योजना मंजूर झाली होती. पुढे निवास भाऊंच्या कारकीर्दीत त्याचे काम पूर्ण झाले होते. नानांनी व बाळाप्पा यांनी पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी लागणारी जागा विनामोबदला दिली होती. आपल्या गावात दातृत्वगुण आधीपासूनच होते हे यातून दिसते. परबती मांढरेे आप्पा व बापूनाना यांनी वाकडेश्वर यात्रा वाडीमध्ये भरवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. अनपटवाडी च्या नवीन शाळेच्या इमारतीची मंजुरीही नानांच्या कारकिर्दीत आली होती. नानांच्या कारकीर्दीत अनपटवाडी गावाच्या विकासाची सुरुवात झाली होती असे मला वाटते. नाना कमी शिकले होते तरीही त्यांच समयसूचक आणि कडक बोलण एवढे प्रभावी असायचं की कुठलही कार्यालयीन काम अडले असं व्हायचं नाही.

१९८५ साली मोहन (दादा) यांनी मुंबई येथे माथाडी कामगार म्हणून सेवा सुरू केली. त्यांच्यापाठोपाठ हनुमंत (भाऊ) देखील माथाडी मध्ये जोडले गेले. शिवाजी (आप्पा) यांनी अनपटवाडी मध्येच शेतीचे कामकाज पाहिले. शहाजी (आबा) यांनी ज्ञानदिप बँकेची एजन्सी घेतली. १९८६ साली चंद्रकांत शिंदे यांच्या सहकार्यातून कनिष्ठ चिरंजीव सुनील (काका) हे ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये सेवस्त झाले. तेवढ्यात त्यांचे कुटुंब चांगलेच स्थिरस्थावर झाले होते. शेती व्यवसाय तसेच आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. त्यांची नातवंडे शिकू लागली आणि त्यांच्या सर्व मुलांची कुटुंबे वेगाने वाढू लागली.

ते लहान असताना त्यांच्या वडिलांनी जमीन विकली होती व काही जमीन गहाण ठेवली होती ही गोष्ट नानांना नेहमी सतावत असे. वाढलेल्या कुटुंबाला तीन एकर जमीन पुरणारी नव्हती. त्यामुळे त्यांच्या मुलांना ते नेहमी चॅलेंज द्यायचे की हिम्मत असेल तर एक एकर जमीन घेऊन दाखवा. मुलांनी नानांचे चॅलेंज स्वीकारले व दरेवाडी च्या शिवारामध्ये ५४ गुंठे जागा खरेदी केली. एवढेच नाही तर या जमिनीच्या सिंचनासाठी स्वतंत्र विहीर सुद्धा खोदली. नानांच्या दृष्टीनं हा क्षण खूप आनंदाचा होता. बापाने घालवलेली जमीन पोरांनी खरेदी करून मिळवली होती. नाना मुलांना कितीही रागावले किंवा बोलले तरी त्यांच्या बोलण्याचा राग धरून नानांना कुणीही उलटे बोलल्याचे आठवत नाही. त्यांच्याविषयी त्यांच्या मुलांच्या मनामध्ये खूप आदर होता.

२०१५ पासून मोहन (दादा) अनपटवाडी गावचे प्रथम नागरिक म्हणजेच सरपंच म्हणून काम पाहत आहेत. मागील पाच वर्षात गावात बरीच विकास कामे झाली आहेत. ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामात त्यांनी नेतृत्वरूपी योगदान दिले आहे. दादा श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) चे संस्थापक अध्यक्ष देखील होते. दादांचा मुलगा, प्रभाकर बीकॉम जीडीसी अँड ए करून ज्ञानदिपच्या विरार शाखेत शाखा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मुली राजश्री जाधव (चव्हाणवाडी) व सुकेशिनी शिंदे (बावधन) विवाहित आहेत. शिवाजी (आप्पा) यांचे ज्येष्ठ चिरंजीव गणेश ज्ञानदीप एजन्सी ओरिएंटल इन्शुरन्स, अंधेरी येथे कार्यरत आहे. तर दुसरा चिरंजीव राहुलने हॉर्टिकल्चर डिप्लोमा पूर्ण केला असून कृषी संबंधित कंपनीमध्ये मार्केटिंग व शेती असा दुहेरी व्यवसाय करत आहे. आप्पा यांच्या मुली शोभा ढेंबरे (तरडप, फलटण) व मीनाक्षी सोळस्‍कर (घाटदरे, खंडाळा) विवाहित आहेत. हनुमंत (भाऊ) माथाडी कामगार म्हणून नोकरी झाल्यानंतर सध्या शेळीपालन व शेती व्यवसाय करतात. त्यांचा चिरंजीव निलेश ज्ञानदीप एजन्सीमध्ये इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स ची कॉन्ट्रॅक्ट चे काम करतो. शहाजी (आबा) यांचा चिरंजीव अनिकेत ने बीएससी पूर्ण केली असून लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत आहे. कन्या अनिता एमकॉम असून मुंबईमध्ये एका कंपनीत कार्यरत आहे. सुनील (काका) यांचा मोठा मुलगा सुरज हा धनुर्विद्या मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. त्याने बऱ्याच स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत. लहान चिरंजीव चेतन सीए फाउंडेशन पूर्ण करून सीए विजय अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तयारी करत आहे. 

अशाप्रकारे नानांचे कुटुंब राजकीय, कृषी, बँकिंग, क्रीडा अशा विविधांगी क्षेत्रांमध्ये चमकत आहे. नानांच्या रूपानं पेरलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे अस म्हणायला काहीच हरकत नाही. नाना जरी स्वभावाने अवखळ व रागीट असले तरी मनाने साफ होते. त्यांचेच गुण त्यांच्या अपत्यांमध्ये आलेले आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर नानांनी घेतलेल्या खडतर परिश्रमाचे व ताईंनी मायेने लावलेल्या शिस्तीचे चीज झाले आहे हे मात्र नक्की. 

तंदुरुस्त शरीर असल्यामुळे तसा नानांना दुसरा आजार नव्हता पण त्यांना मेंदूच्या अपुऱ्या रक्त पुरवठ्यामुळे येणाऱ्या फिट्स चा त्रास होता. यासाठी दररोज एक गोळी घ्यावी लागायची. त्यादिवशी नानांच्या छातीत दुखायला लागले त्यामुळे त्यांना रात्री अकरा वाजता दवाखान्यात दाखवून आणलं. औषध घेऊन सगळ्यांना झोपायला सांगितले व १५ मार्च २००५ रोजी रात्री दोन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे म्हातारपणात स्वाभिमानी व कणखर नानांनी कॉट धरली नाही किंवा कोणाकडून सेवा करून घेतली नाही. 

नाना उत्कृष्ट कुस्तीगीर होतेच पण करारी, आत्मसन्मान जपणारे,  बाणेदार आणि आत्मविश्वासू देखील होते. नानांनी आई-वडिलांची काळजी घेतली, मुलांचे संगोपन केले, नीती धर्माचे आचरण ठेवले व अब्रूने जगले. तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या श्रीमंत माणसाचे जीवन जगले.

नानांच्या पवित्र स्मृतीस वंदन.

✍️आकाश बाळासाहेब राजपुरे
उपअभियंता, मुंबई महानगरपालिका 
संकलन व संपादन: केशव राजपुरे

Saturday, April 25, 2020

अमित (शशिकांत) भास्कर अनपट


अमित (शशिकांत) भास्कर अनपट
(जिद्दीच्या जोरावर आईवडिलांचे स्वप्न साकारणारा तरुण)
          
आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असणारे तरुण आपण पाहतो. अश्या तरुणांना आई वडिलांना बसणाऱ्या परिस्थितीच्या चटक्यांची पर्वा असते त्यामुळे प्रचंड त्रास सहन करून, येईल त्या परिस्थितीला सामोरे जाऊन, हे तरुण असाध्य अशी ध्येये साध्य करून दाखवतात. आपल्या यशाने आई वडिलांचे नाव समाजात मोठे करणे आणि त्यांना मानमरातब मिळवून देणे हेच अश्या तरुण मुलांचे प्रथम स्वप्न असते. हल्लीच्या ही स्वप्ने आणि कर्तव्ये अंधारमय होताना आपण पाहतो. पण याला अपवाद म्हणून काही तरुणांच्या प्रेरणादायी जीवनगाथा आपल्या समोर येतात आणि श्रमाच्या वाटेवर असणाऱ्या तरुणांना जगण्याची उर्मी देतात. असाच थक्क करणारा यशस्वी जीवनप्रवास आमच्या अनपटवाडी गावच्या एका तरुणाने साध्य करून दाखवला आणि आई वडिलांनाच नव्हे तर संपूर्ण गावाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखविली त्या अमित (शशिकांत) भास्कर अनपट यांचा हा अफलातून जीवनप्रवास !
          
वडील भास्कर तानाजी अनपट (आबा) आणि आई अलका यांच्या पोटी अमितचा जन्म दि. २७/०२/१९८३ ला मालाड, मुंबई येथे झाला. वडील मुंबई पोलिस सेवेत.. त्याकाळी हे कुटुंब मालाड, मुंबई स्थित होते. अमित चे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण डी.ए.व्ही. हायस्कूल, स्टेशन रोड मालाड (प) या शाळेत झाले. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत अमित मराठी माध्यमाच्या शाळेत शिकला हे आवर्जून सांगावेसे वाटते. 

शाळेमध्ये पहिल्यापासूनच अमित हुशार होता. दरवर्षी पहिल्या तीन क्रमांकांमध्ये त्याचा नंबर ठरलेला. अमितने लहानपणापासूनच चांगल्या सवयी अंगिकारल्या होत्या. त्यातील एक आवडती सवय म्हणजे पहाटे लवकर उठून अभ्यास करत बसणे. आई वडिलांना त्रास होऊ नये म्हणून अमित भल्या पहाटे उठून स्वतः पाणी गरम करायचा, अंघोळ करायचा आणि अभ्यासाला बसायचा. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये ही वृत्ती उपजतच त्याच्या अंगी होती. अमितचे एक वैशिष्ठ्य असे होते की त्याचा अभ्यास झाला नसेल तर तो रडायचा. अमितचे अभ्यासावर नितांत प्रेम होते. 

अगदी लहान असल्यापासूनच अमित आबांसारखाच आज्ञाधारक होता. जे काम हाती घेतले आहे ते योग्य रीतीने पूर्ण झाल्याशिवाय थांबायचे नाही असा अमितचा हट्ट असे. मुंबईला राहत असताना गणेशोत्सवामध्ये अमितच्या घरी गणपती नसायचा त्याची त्याला खंत वाटायची. त्यामुळे त्याने ही कसर आपल्या मित्रमंडळींना एकत्र करून चाळीमध्ये दीड दिवसाचा गणपती बसवून पूर्ण केली. ही पद्धत अजूनही चाळीमध्ये चालूच आहे. स्वतःच्या खंबीर मतांनी आणि नेतृत्वाने सतत आघाडीवर राहायचे हे बाळकडू अमितला मिळाले होते. 
          
अमितने एसएससीच्या बोर्ड परीक्षेमध्ये मोठ्या जिद्दीने ८२% गुण मिळवले. त्यानंतर महाविदयालयीन शिक्षणासाठी पाटकर कॉलेज मध्ये इयत्ता अकरावीला विज्ञान शाखेतून प्रवेश मिळवला. दोन वर्ष खूप अभ्यास करून इयत्ता बारावी विज्ञान मध्ये ८४% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तेव्हा फिजिक्स केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या तीन विषयांच्या मार्कसची सरासरी ९३% होती. अमितला इंजिनीअरिंग शाखेत प्रवेश घ्यायची इच्छा होती. चुलते रवींद्र अनपट (तात्या) आणि अमित अहोरात्र चांगल्या कॉलेज च्या शोधात होते. 

पुढे अमितला त्याच्या योग्यतेच्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. इंजिनीअरिंग साठी माटुंगा येथील युडीसीटी (सध्याची आयसीटी) या नामांकित कॉलेजमध्ये अमित ला टक्केवारीवर प्रवेश मिळाला. स्वप्न एकच होते की आता थांबायचे नाही, खूप कष्ट करून इंजिनीअरिंग ची पदवी घ्यायची आणि चांगल्या ठिकाणी नोकरीला लागायचे. सततच्या अभ्यासाने, जिद्द आणि चिकाटी मुळे अमितने इंजिनीअरिंग पदवी डिस्टिंक्शन मिळवून प्राप्त केली. घरच्यांना आपल्या मुलाने कष्टाचे चीज केले याचा अभिमान वाटला. 

इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर अमेरिकेमध्ये एमएस किंवा पीएचडी करायची त्यांची फार इच्छा होती. यूडीसीटी मध्ये शिकलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची ही इच्छा असते. त्यासाठी जीआरइ म्हणजेच ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन ही परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाला होता. पण जेव्हा अमेरिकेत शिक्षणासाठी लागणारा खर्च बघितला, तेव्हा असं लक्षात आलं की तो आपल्या क्षमतेबाहेर आहे. मग त्याचा विचार सोडून भारतातच सर्विस करण्याचा निर्णय झाला.

इंजिनीअरिंग मध्ये चांगल्या गुणांनी प्रवेश घेतल्यानंतर अमितला घरडा केमिकल्स या कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी मिळाली. त्याच्या हाताखाली त्याच्यापेक्षा वयाने मोठी असणारी दहा ते बारा माणसे होती. त्यांना काम कसे सांगायचे याबद्दल अमितला संकोच वाटायचा पण पर्याय नव्हता. यावरून अमितच्या ठायी वडीलधाऱ्या माणसांविषयी असणारे प्रेम दिसते.
          
इंजिनीअरिंगची पदवी आणि नोकरी मिळाल्यानंतरही अमित ला अजून शिकायचे होते. त्याला एम.बी.ए. ची पदवी घ्यायची इच्छा होती. ही इच्छा त्याने आबांना सांगितली त्यावर आबा म्हणाले की पुढच्या शिक्षणासाठी काम सोडून दे आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर. पण अमितला कामाचा अनुभव सुध्दा पाहिजे होता त्यामुळे त्याने घरडा केमिकल्स मध्ये नोकरी करत एम.बी.ए. करण्याचा निर्णय घेतला. त्याने दीड वर्ष कंपनी मध्ये काम केले. हे करत असतानाच त्याने एम.बी. ए. च्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास मोठ्या निकराने चालू ठेवला. अमितची कंपनी ठाणे जिल्ह्यात डोंबिवली येथे तर तो राहायला मालाड मध्ये आणि त्याचे क्लासेस चर्चगेट ला होते. ही तिन्ही ठिकाणे परस्पर विरूद्ध दिशेला होती. कंपनी चे काम तीन शिफ्ट मध्ये चालायचे. त्यावेळी क्लास साठी कामाची शिफ्ट बदली करणे म्हणजे तारेवरची कसरतच असायची. तरी सुद्धा अमितने यावर विचार करून तोडगा काढला. तो पहाटे सगळे आवरून साडेपाच ला घरातून निघायचा आणि रात्री साडेदहा वाजता घरी यायचा. यामध्ये कंपनीचे आठ तास काम, क्लासचे दोन तास आणि पाच तासांच्या प्रवासाचा काळ असायचा. असा दिनक्रम अमितने चालू ठेवला होता. घरी आल्यावर त्याला अभ्यासासाठी पुरेसा वेळच मिळायचा नाही त्यामुळे तो त्याचा अभ्यास पाच तासांच्या प्रवासातच करायचा. यानंतर एम.बी.ए. प्रवेश परीक्षा दिली आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. प्रथम गुणवत्ता यादीमध्ये पुण्याच्या बालाजी इन्स्टिट्यूट मध्ये एम.बी.ए. साठी प्रवेश मिळाला. येथे दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाला. एम.बी.ए. पदवी संपादन केली. आता त्याला कुठल्याही कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळणार होती. सतत कर्मरत असणाऱ्या माणसांना नियती सुध्दा मदत करत असते. उच्च ध्येयाने झपाटलेली माणसेच आयुष्यात यशाची शिखरे पादाक्रांत करत असतात.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमितला टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस) कंपनीचे कॉल लेटर मिळाले. या कंपनीमध्ये उत्कृष्ट मुलाखत देऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवली होती. कंपनीचे ट्रेनिंग पाच महिन्यानंतर होते. त्यामुळे पाच महिन्यांचा कालावधी अमितला मोकळा मिळणार होता. या वेळेचा सदुपयोग कसा करायचा असा प्रश्न अमितला पडला. त्यावेळी आबांचा विरोध असताना सुद्धा अमितने चार महिने कॉल सेंटर मध्ये काम केले आणि आयुष्यातील मोलाचा वेळ वाया जाऊ दिला नाही. 

त्यावेळी सर्व कुटुंब गावाकडे आले होते. आपल्या मातीची आणि संस्कृतीची जाण आणि अभिमान असणारा माणूस कितीही शिक्षित झाला तरी छोट्यातील छोटी कामे करतानाही मागे पुढे पाहत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमित! गावी आल्यावर कुटुंबाचे चिंचा फोडायचे काम चालू होते. अमित रोज फोडलेल्या चींचांचे पोते डोक्यावर घेऊन वाई ला विकायला जात असे. एके दिवशी डोक्यावर चिंचेचं पोते घेऊन जाणाऱ्या अमितला मोहन दादांनी विचारले असता तो म्हणाला की, " मला आता मोकळा वेळ आहे आणि म्हाताऱ्या माणसांसाठी एवढं काम केलं तर काय बिघडतंय?" तसेच उन्हाळ्यामध्ये जेव्हा शेणखत उकिरड्यातून शेतामध्ये टाकायचे असते तेव्हा अमितने डोक्यावर शेणाच्या पाट्या टाकून आपली आपण किती विनम्र आहोत हे दाखवून गावाची नाळ किती घट्ट आहे हे सिद्ध केल आहे. यावरून असे समजते की एम.बी.ए. झालेला तरुण आपल्या संस्कृतीशी आणि माणसांशी नाळ जोडून अश्या प्रकारे राहू शकतो! 

यानंतर अमित जूनमध्ये तिरुअनंतपुरम ला ट्रेनिंग साठी गेला. तिथे दोन महिने ट्रेनिंग यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर थेट अंधेरी मुंबई येथे नोकरीस लागला. अमितने अंधेरी मध्ये सात महिने काम केले. त्याच्या कामाच्या गुणवत्तेमुळे आणि कष्टाळू स्वभावामुळे त्याला यु.के. (लंडन) येथे काम करण्याची संधी आली. त्यावेळी परदेशी जावे का न जावे याबाबत घरात चर्चा झाली. त्यांचे चुलते रवींद्र यांनी त्यांच्या निर्णयास पाठिंबा दर्शवला. त्याने यु.के. मध्ये सलग दोन वर्ष नोकरी केली. तिथे असताना अमितला त्याच्या आईंची मोलाची साथ मिळाली. 

तिथून पुढे हैदराबाद येथे बदली झाल्यामुळे तो परत भारतात आला. त्याचे आजोबा दादांचा देखील अमित वर फार जीव होता. अमित हैदराबाद ला होता त्यावेळी दादा त्यांच्या आजारपणात अमितची आठवण काढत होते मग त्याला निरोप दिल्यावर तो लगेच आला भेटायला. रात्रभर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या जवळ राहिला. सकाळच्या प्लेन ने हैदराबाद ला पोचला. एअर पोर्टला पोचला आणि दादा गेल्याची बातमी मिळाली, त्याच प्लेनने तो परत आला. आजोबांची त्याला पाहण्याची शेवटची इच्छा तो पूर्ण करू शकला ही भाग्याची गोष्ट.. हैदराबाद मध्ये एक वर्ष काम करून परत अंधेरी, मुंबई येथे बदली झाल्यामुळे कामावर रुजू झाला. 

टीसीएस मध्ये काम करत असताना तोचतोचपणा जाणवत होता, काहीतरी आव्हानात्मक करायची इच्छा होती. यानिमित्तानं इतरांनाही रोजगार मिळेल असं काही करायच डोक्यात होतं. कंपनीमधील त्याचे मित्र असं काहीतरी करण्यासाठी २००९ पासून विचार करत होते. मग त्याच्यावर होमवर्क करायला त्यांनी सुरुवात केली. जवळजवळ चार वर्षानंतर ती कल्पना प्रत्यक्षात आली. अमित व त्याच्या मित्रांनी टीसीएस कंपनी सोडून भागीदारीत नवीन व्यवसाय करायचं ठरवलं.
२०१३ मध्ये टीसीएस कंपनीतील मित्रांच्या सोबत पुणे येथे इनक्सी डिजिटल मीडिया टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू करण्यात आली. कोट्यावधीचा टर्नओव्हर असलेली ही डिजिटल ॲडव्हर्टायझिंग कंपनी आहे. भारतभर कार्यक्षेत्र असलेल्या या कंपनीमध्ये जवळजवळ पन्नास कर्मचारी आहेत. अनपटवाडी गावासाठी ही फार मोठी भूषणावह गोष्ट आहे. गावचा एक तरुण इंजिनियर होतो काय, एमबीए होऊन एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला लागतो काय, परदेशात जॉब करून येतो आणि पुण्यात स्वतःच्या मालकीचं एक यूनिट सुरू करतो काय .. खूप मोठी उपलब्धी आहे ही ! अमितला नोकरी तसेच व्यवसायामध्ये त्याचे चुलते पृथ्वीराज अनपट (बाबा), रविंद्र अनपट (तात्या) तसेच सर्व आत्यांची मोलाची साथ आणि  वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.
 
अमितचा विवाह हमदाबाद, सातारा येथील उच्च शिक्षित असणाऱ्या वृषाली ढाणे यांच्याशी झाला. अमितच्या पत्नी फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षित आहेत. या दाम्पत्याला एक मुलगा तनिश आणि एक मुलगी कु. शरयू अशी दोन अपत्य आहेत. तो सध्या पुण्यातच स्थायिक झाला आहे. सामाजिक कार्याची पण अमितला आवड आहे. तो शहीद सैनिकांसाठी काम करणाऱ्या 'जयहिंद फाऊंडेशन' या संस्थेचा सदस्य सुध्दा आहे. विशेष म्हणजे या फाउंडेशनचा जो लोगो आहे तो अमित नेच तयार केलेला आहे, हे त्याचे फाउंडेशन मधलं योगदान आहे.

अभिमानाची गोष्ट म्हणजे अनपटवाडी गावातील पहिला एम.बी.ए. होऊन यु.के.(लंडन) यासारख्या प्रतिष्ठित ठिकाणी आपले कसब दाखवणारा अमित हा पहिला अनपटवाडीकर आहे. अमितचा हा थक्क करणारा प्रवास याची देही याची डोळा पाहून गावातील बऱ्याच जणांनी इंजिनीअरिंग पूर्ण केले. अमितचा भाऊ अर्जुन पृथ्वीराज अनपट हा सुध्दा अमित सारखा हुशार आणि कष्टाळू आहे. त्याने अमितच्या मार्गदर्शनाखाली एम.बी.ए. पूर्ण केले आहे. हे दोघे बंधू खरोखरच श्रम, जिद्द आणि चिकाटीची उदाहरणे आहेत. 
अमित हा मितभाषी, मायाळू, कोणावरही न रागावणारा, वडीलधाऱ्या माणसांचा मान राखणारा आपले काम प्रामाणिकपणे करणारा , सतत कार्यरत असणारा आणि प्रचंड यश व प्रसिध्दी मिळूनही आपले पाय जमिनीवर असणारा एक यशस्वी तरुण आहे. गावाचे आणि आपोआपच आपल्या आई वडिलांचे नाव मानाने घ्यायला लावणाऱ्या अश्या तरुणांची आज समाजाला नितांत गरज आहे. 
           
युवकवर्गासाठी आणि त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी अमित आणि त्याचा जीवनप्रवास दीपस्तंभ ठरेल आणि वेळोवेळी युवकांना प्रेरणा देत राहील. 
          
आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या अमितला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा ! तुझा व्यवसाय प्रगतीपथावर उत्तरोत्तर यश मिळवत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना !

✍️ 
दिलीप अनपट (98679 81995)
अनिकेत भोसले (8975711080)
केशव राजपुरे (9604250006)

Thursday, April 23, 2020

जनार्दन संपतराव गोळे

जनार्दन संपतराव गोळे सर
(निस्वार्थी दातृत्वशिल व्यक्तिमत्व)
         
"देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे" या विंदा करंदीकरांच्या काव्यपंक्ती आपणास सांगतात की ज्याच्याजवळ पुष्कळ आहे त्याने ते गरजूंना निस्वार्थीपणे दिले पाहिजे व यातच जीवनाचा खरा आनंद शोधला पाहिजे. समाजाला नेहमीच दानशूर व्यक्तींची गरज असते आणि ज्या समाजात अशी रत्नेे जन्माला येतात असा समाज नशीबवानच. सामाजिक गरज आणि बांधिलकी ओळखून आपण त्यांच्याप्रती देणं लागतो ही भावना मनात पक्की करून कार्य करणारी मंडळी आज बोटांवर मोजण्याइतकीच आहेत. त्यांपैकी प्रसिद्धीपासून अलिप्त असणारे आणि सामाजिक भान जोपासणारे आमच्या अनपटवाडी गावचे सुपुत्र जनार्दन संपतराव गोळे सर यांचा थोडक्यात जीवनपरिचय !
          
जनार्दन गोळे यांचे मूळ गाव कोरेगाव तालुक्यातील अरबवाडी असून त्यांचे कुटुंब त्यांच्या जन्मापूर्वी पासूनच अनपटवाडी गावामध्ये स्थायिक झाले होते.  वडील संपतराव मनोहर गोळे हे १९२३ पासून अनपटवाडी येथील त्यांचे मामा जगदेवराव विठोबा अनपट (खालचा वाडा) यांच्याकडे शिक्षणासाठी आलेले होते. संपतरावांचे इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंत चे शिक्षण अनपटवाडी येथे झाले. त्याकाळी शेती करत करत त्यांनी शिवणकाम कला सुद्धा आत्मसात केली होती. शिवणकाम करण्यासाठी ते वाईला सायकलवरून जात असत. किसनवीर चौकात त्यांचे ३५ ते ४० वर्ष टेलरिंगचे दुकान होते.  

पुढे संपतराव यांचे मामा जगदेवराव अनपट आणि वडील मनोहर गोळे यांनी लग्नासाठी वेळे येथील स्थळ आणले होते. संपतराव गोळे यांचा हा प्रथम विवाह. काही अपरिहार्य कारणांमुळे हा संसार चालू शकला नाही आणि काडीमोड झाला. यानंतर दत्तू तात्यांच्या मध्यस्थीने गावातील भिकू नारायण अनपट यांच्या कन्या वत्सला यांच्याशी संपतराव यांचा दुसरा विवाह झाला. मुळगाव जरी अरबवाडी असले तरी ते वाडीत लहानाचे मोठे झालेले, इथे राहून व्यवसाय वाईमध्ये करायचे आणि सासरवाडी सुद्धा वाडी झाल्यामुळे ते अनपटवाडीकर कधी झाले हे त्यांनाच कळले नाही. गोळे दाम्पत्याला चार अपत्ये..  जनार्दन, शिवाजी, नंदा (नावडकर) आणि सुवर्णा (भोईटे) असे दोन चिरंजीव आणि दोन कन्या ! यामध्ये जनार्दन हे ज्येष्ठ चिरंजीव त्यांचा जन्म ०१/०६/१९६६ ला झाला. त्यांचे आज्ज सासरे नारायण यांचे बंधू पांडुरंग बाळा अनपट यांच्या पत्नी अंजु नानी त्यांना चिरंजीव नसल्याने संपतराव यांचा मुलाप्रमाणे सांभाळ केला. त्यांच्या नातीचे माहेरपण व दोन्ही कुटुंब व्यवस्थित सांभाळल्या बद्दल नानीने आपली काही जमीन संपतराव यांना बक्षीसपत्र करून दिली होती. त्यांनी स्वतःच्या आई पेक्षा जास्त काळजी घेऊन नानीचा शेवटपर्यंत सांभाळ केला.

संपतराव गोळे यांचे लहान बंधू हरिश्चंद्र गोळे यांना अरबवाडी येथे शिक्षण घेणे सोयीचे नव्हते. त्यामुळे ते आपले बंधू संपतराव यांच्याकडे अनपटवाडीत शिकायला आले. हे वाई येथील द्रविड हायस्कूल मध्ये शिक्षण घेत होते. त्यांची सर्व जबाबदारी संपतराव यांच्यावर होती. घरात चार मुले, त्यांचे संगोपन, भावाचे शिक्षण यासाठी दोघे पतिपत्नी शेती करत, शिवणकाम करत आणि जोडधंदा म्हणून दूध संकलन हा व्यवसाय देखील करत होते. सातारच्या महाराजांची गावच्या डोंगरची जमीन तेव्हापासून आजतागायत त्यांच्याकडेच देखभालीसाठी म्हणजे वहीवाटीसाठी आहे. यात जनावरे व धनगरांना चराऊ रान देणे हा व्यवहार सध्या जनार्दन बघतात व शेतसारा सातारला पोहोचवतात. पुढे बीए सीपीएड करून हरिश्चंद्र मुंबई येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. 
        
जनार्दन यांना लहानपणापासूनच घरच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांचे पहिली ते तिसरी पर्यंतचे शिक्षण अनपटवाडी प्राथमिक शाळेत झाले. चौथी आणि पाचवी चे शिक्षण बावधन येथील प्राथमिक शाळा नं.२ येथे. तेव्हा संपतराव यांचे चार भाऊ मुंबईमध्ये चांगल्या नोकऱ्यांवर स्थिरस्थावर होते. त्यामुळे अभ्यासात चुणचुणीत असणाऱ्या जनार्दन यांना त्यांनी मुंबईला शिक्षणासाठी ठेवले. मग सहावी नंतरचे शिक्षण ठाणे जिल्ह्यात न्यू कळवा हायस्कूल, कळवा येथे झाले. पहिल्यापासूनच त्यांचे गणित फार छान ! १९८२ मध्ये त्यांना एसएससी च्या परीक्षेत ७१ टक्के गुण मिळाले होते. अभ्यासात हुशार असल्यामुळे जनार्दन यांना मेडिकल ला पाठवण्याचे हेतूने विज्ञान शाखेत घातले. बारावीत अपेक्षा इतपत गुण न मिळाल्याने त्यांचा पुढील शिक्षण प्रवास महाविद्यालयामार्गे झाला. त्यानंतरचे  महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे के.जे. सोमय्या विद्याविहार या कॉलेज मध्ये झाले. आवडतेेे विषय गणित असलेने विज्ञान शाखेत तुलनेने कठीण फिजिक्स हा विषय घेतला. पुढ १९८९ साली त्यांना मुंबई विद्यापीठाची बीएस्सी फिजिक्स ही पदवी डिस्टिंक्शन मिळवून प्राप्त झाली. उच्च शिक्षण घेण्यासाठी जनार्दन यांना त्यांचे सर्वव चुलत्यांनी मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले आहे. 

दरम्यानच्या काळात जनार्दन हे एलआयसी, पीएसआय पदासाठीच्या स्पर्धा परीक्षा देत होते. परंतु अपयश येत राहिले. त्यानंतर हायस्कूल किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक होण्याच्या दृष्टीने त्यांनी बी.एड. चे व्यावसायिक शिक्षण उल्हासनगर येथे पूर्ण केले. पुढं १९९० मध्ये विठ्ठलवाडी, कल्याण (पूर्व) येथे प्राथमिक  शिक्षक म्हणून रुजू झाले. येथील प्राथमिक शाळेत तीन वर्ष सेवा केल्यानंतर दि. ०१/०६/१९९३ पासून सेवेत कायम होऊन ते शिवाई विद्यामंदिर, भांडुप (पूर्व) येथे खाजगी अनुदानित हायस्कूल मध्ये इयत्ता नववी आणि दहावी या वर्गांचे अध्यापन करत आहेत. गणित व विज्ञान हे त्यांचे आवडते विषय... विज्ञान प्रदर्शनात त्यांचा सहभाग ठरलेला... शिष्यवृत्तीच्या मुलांना पंचवीस वर्षे गणित व बुद्धिमत्तेचे अध्यापन केल्यामुळे त्यांचा हुशार मुलांचा संपर्क जास्त... सहज हसत-खेळत रंजकतेने व वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवून विज्ञानाची गोडी निर्माण करणे हाच त्यांचा ध्यास.

तसा आयुष्यातील बराच काळ त्यांनी खाजगी, पाचवी ते दहावी साठी, क्लासेसमध्ये (१९८७ ते २००१) सुद्धा शिकवले आहे. मधल्या काळात परेल येथे भालचंद्र मुणगेकर यांच्या मिलिंद रात्रशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे जवळजवळ पंधरा वर्षे अध्यापनाचे काम केले. दिवसभर भांडुप येथील आपल्या हायस्कूलमध्ये सर्विस करून संध्याकाळी सात ते दहा दरम्यान रात्रशाळेत काम करत असत. या शाळेत शिक्षणापासून वंचित व शाळेच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या व पदोन्नतीसाठी शाळेत प्रवेश घेतलेल्या त्यांच्यापेक्षा वयस्कर विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळाली. दिवसभर काम करूनही आर्थिक दुर्बल असणाऱ्या व नोकरी करत शिक्षण घेणाऱ्यांची सेवा करण्याची संधी रात्रशाळेत मिळाली. 

आपल्या अंगच्या प्रामाणिकपणाने आणि मोठ्या जिद्दीने त्यांनी सहशिक्षक ते पर्यवेक्षक पदापर्यंत भरारी घेतली आहे. कळवा येथे स्वतः चे वन रूम किचन घर आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत आवड निर्माण झाली तर ते जिद्दीला पेटतात आणि मोठं मोठ्या पदां पर्यंत मजल मारू शकतात हे जनार्दन यांच्या यशावरून समजते. 
          
१९९० मध्ये जनार्दन यांचा विवाह अनपटवाडी मधील त्यांचे मामा बाळकृष्ण जगदेवराव अनपट यांची कन्या भारती हिच्या बरोबर झाला. जनार्दन यांना भारतीची मोलाची साथ लाभली आहे. या दाम्पत्याला दोन कन्यारत्न आहेत. ज्येष्ठ कन्येचे नाव कादंबरी असून ती बी. कॉम. च्या द्वितीय वर्षात शिकत आहे. दुसरी कन्या समृद्धी दहावीमध्ये शिकत आहे. दोन्ही मुली हुशार, कष्टाळू आणि समजूतदार आहेत. 

हे सर्व करताना जनार्दन यांना त्यांचे मूळगाव अराबवडी आणि अनपटवाडी असे दोन्हीकडे समन्वय साधून राहावे लागते. त्यांना मिळालेली सुट्टी ते अर्धी वाटून दोन्ही गावाकडील कामे करून आपली नाती जपत आले आहेत. अरबवाडीतील संपूर्ण कुटुंब हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. एकत्र कुटुंब व त्यातून विविधतेतून एकता व जीवन जगण्यास लागणारी जीवनमूल्ये एकमेकांशी वागण्याची व जगण्याची सर्व संस्कार या घरातून त्यांना मिळाले. आजी, चुलते, चुलत्या व सर्व भाऊ-बहिणी याबरोबर भावनिक अनुबंध अतिशय प्रेमळ. त्यांना अनपटवाडीची आठवण होईल असे कोणतेही वर्तन अरबवाडी येथे राहताना होत नाही. सर्वांबरोबर जिव्हाळा, स्नेह व आपलेपणा प्रचंड आहे. त्यामुळे जनार्दन यांना अनपटवाडी पेक्षा अरबवाडी तुलनेनं हृदयाच्या जवळ आहे.
          
शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे आणि पहिल्यापासूनच शिक्षणाचे महत्त्व समजल्यामुळे गावातील मुलांनी शिकून मोठं व्हावं असं त्यांना सारखं वाटतं. त्यातूनच ते अनपटवाडी गावातील शाळेला सढळ हाताने वारंवार मदत करतात. ते सुरुवातीपासूनच अनपटवाडी गावच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या श्री ग्रामविकास मंडळाचे सक्रिय सभासद असून मंडळाने दिलेली जबाबदारी पार पाडणे हेच आपले कर्तव्य समजतात. 

जनार्दन यांनी गावातील बऱ्याच सामाजिक कामांना मदत केली आहे. त्यांनी गावातील मारुती मंदिरामधील फरशी बसवण्यासाठी पूर्णपणे आर्थिक योगदान दिले होते. यातून त्यांचे गावावरील प्रेम दिसून येते. तसेच श्री. वाकडेश्र्वर मंदिरासाठी वर्गणी व्यक्तिरिक्त एक्कावन्न हजार रुपयांची सढळ मदत गावाला केली होती यावरून हा माणूस किती उदार मनाचा आहे याची जाणीव येते ! ते गावातील धार्मिक आणि अध्यात्मिक समारंभामध्ये नेहमी अग्रेसर असतात. अध्यात्म ओढीपोटी वडिलांनंतर ते दरवर्षी तीन चार दिवस पंढरपूरला वारी निमित्त जातात. ते नवमी व बार्शी दरम्यान पंढरपुरात असतात. त्यांनी जवळजवळ वीस वर्ष वारी केली आहे. 

आपल्या संस्कृतीमध्ये भूदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. याची प्रचिती तेव्हा आली जेव्हा जनार्दन यांनी गावाचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न मार्गी लावत असताना पाण्याच्या टाकीसाठी आपल्या मालकीची एक गुंठा जमीन विना मोबदला गावाला दिली. केवढे हे दातृत्व !  त्यांच्या मातोश्रीनी ही जागा देण्याची परवानगी नितीन मांढरे व सयाजी अनपट यांच्या आग्राहास मान देऊन दिली. आजच्या युगात अशी दानशूर माणसे शोधून सापडत नाहीत. केवळ ज्या गावाने आपल्याला आसरा दिला, ज्या गावाने आपल्या पिढ्या घडवल्या त्या गावाच्या मातीचे आपण देणं लागतो या जाणिवेतून या माणसानं गावचे पांग फेडलं आहेत. सर्वांसमोर सामाजिक दानत व दातृत्वाचा एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. 

जनार्दन हे अत्यंत शांत, मितभाषी, लाजाळू, मायाळू स्वभावाचे, कोणावरही न रागवणारे व्यक्तिमत्व ! सहकार्य भाव, अध्यात्माची व अध्यापनाची आवड, प्रामाणिकता, वाचन हे त्यांची इतर स्वभाववैशिष्ट्ये. गोळे सरांचा वाचनाचा व्यासंग दांडगा आहे. कळवा येथे त्यांच्या राहत्या घरी स्वतःचे असे एक ५०० पुस्तकांचे मोठे वाचनालय आहे. या वाचनालयात आध्यत्म ते विज्ञान अशा अनेक विषयांची आणि अनेक प्रकारची शेकडो पुस्तक आहेत. एवढं मोठं स्वतःच वाचनालय असण ही देखील आपल्या वाडीला अभिमानाची गोष्ट आहे. व्याख्याने ऐकणे व नाटक पहाणे ही त्यांची सवय अजून जोपासली आहे ! हे व्यक्तिमत्व आपल्या गावास लाभले याचा सर्व ग्रामस्थांना सार्थ अभिमान वाटतो. 
          
समाजातील दूरावा, एकलकोंडेपणा, अप्पलपोटेपणा, बेजबाबदारपणा व कृतघ्नता गावच्या विकासास हानिकारक असतात. परंतु हा समाज, हे गाव आणि ही माणसे माझी आहेत, मी त्यांच देणं लागतो ही कर्तव्य भावना जोपासणारे व कर्तव्याला समर्पित असणारे जनार्दन संपतराव गोळे सर हे गावाला सुपुत्र म्हणून लाभले याचा गावाला सार्थ अभिमान आहे.
          
सरांचे शिक्षण क्षेत्रामधील कारकीर्द व भावी आयुष्य सुखदायी, आरोग्यपूर्ण आणि यशस्वी होवो तसेच त्यांचे शुभहस्ते गावाची आणि समाजाची सेवा अशीच अविरतपणे घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!

✍️ दिलीप अनपट/ अनिकेत भोसले / केशव राजपुरे

रवींद्र एकनाथ अनपट



आश्वासक आणि खंबीर रवींद्र एकनाथ अनपट

वयाच्या तेराव्या वर्षी आईचे छत्र हरपले, बहिणींच्या संगोपनाची जबाबदारी पेलली, काम करत असताना बँक दिवाळखोरीत गेली, इंग्रजी विषयांमध्ये पदवीत्तर पदवी असूनही कायमस्वरूपी नोकरीस मुकल्या नंतरही खंबीरपणे व न डगमगता चरितार्थ चालवण्यासाठी, जीवन विमा प्रतिनिधी म्हणून काम करत यशस्वी जीवन जगणाऱ्या आश्वासक रवींद्र एकनाथ अनपट (तात्या) याची ही काटेरी यशोगाथा !

सुशिक्षित कुटुंबात २५ जानेवारी १९७० रोजी जन्मलेल्या रवीस उषा, आशा, वैशाली व निषा या चार बहिणी ! तसेच भास्कर, पृथ्वीराज, मालन, वंदना, मंदा आणि सुवर्णा ही चुलत नव्हे सख्खीच भावंड.. रवी चे वडील एकनाथ केशव अनपट त्यावेळेचे मॅट्रिक. १९५९ मध्येच ते पोलिस सेवेत रुजू झाले. कदाचित पोलीसमध्ये भरती झालेले ते पहिले वाडीकर असावेत. तान्याबा दादा व सर्जेराव तात्या मुंबई सोडून गावी आले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या एकत्र कुटुंबाचा खर्च करण्याइतपत बापूंचा पगार नव्हता त्यामुळे मुलांची शिक्षण हालाकीतच झाली. अनपटवाडी प्राथमिक शाळेत तिसऱ्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्राथमिक शाळा बावधन व पाचवी नंतरच्या शिक्षणासाठी बावधन हायस्कूल, बावधन येथे रवीला शिक्षण प्रवास झाला. तशी त्याची अभ्यासातील प्रगती सरासरी. 

दरम्यान रवीच्या वयाच्या तेराव्या वर्षी, जेव्हा तो सातव्या इयत्तेत होता तेव्हा त्याच्या आई गरोदरपणात काविळीने आजारी पडल्या होत्या. तब्येत खालावल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी ॲडमिट केले होते. रवी आपल्या लहान भावंडां सोबत, त्यांच्या देखभालीसाठी वाडीतच होता. आईंची तब्येत आणखीन खालावल्याने त्यांनी रवीला भेटण्यासाठी पुण्याला बोलावून घेतले. मुलींच्या सांभाळासाठी आपल्या बहिणी कडून पैसे घेऊन रवीस दिले व मुलींचे सर्वकाही व्यवस्थित करण्याचे वचन घेऊन प्राण सोडले. रवी साठी हा खूपच मोठा मानसिक धक्का होता. फार लहान वयात ही भावंड आईच्या प्रेमास पोरकी झाली होती. तरीपण अशा परिस्थितीत तो भेदरला नाही तर निडरपणे परिस्थितीस सामोरे गेला. भावंडांना विश्वासात घेऊन आधार दिला. या घटनेने रवीचे आयुष्यच बदलून गेले. या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीवर अप्रत्यक्षपणे परिणाम झाला.

रवीपेक्षा एक वर्षाने लहान असल्यामुळे मी वर्गात एक वर्षाने त्याच्या पाठीमागे. वास्तविक दहावीपर्यंत मी माझ्यासाठी नवीन पुस्तक संच कधीही खरेदी केले नाहीत. मी रवीची जुनी पुस्तके वापरली आहेत. वर्षाच्या अखेरीस मी त्याला चांगल्या स्थितीत परत करण्याच्या अटीवर रवी मला ही पुस्तके देत असे. ही पुस्तके वापरणार्‍या विद्यार्थ्यांची साखळी होती. रवीपासून ते माझ्याकडे, माझ्याकडून त्याची बहीण मंदाकडे, मंदापासून उषा, उषापासून आशा व मग माझी बहिणी सुनंदाकडे.... पुस्तकांची पण मला कामाला वाटायची. सलग सहा वर्षे कसेही वापरून ते स्वतः सुस्थितीत राहायची. हे आमचे भाग्य होते की त्या दरम्यान पुस्तक महामंडळाने  अभ्यासक्रम बदलला नाही. आमच्या शैक्षणिक कारकीर्दीत रवीने अशा प्रकारची सहकार्याची भावना जपली होती हे आठवल्यावर अभिमान वाटतो.

आमच्या बालपणी आम्ही एकत्र खेळलो, पोहलो, एकत्र कुस्त्यांच्या स्पर्धेत भाग घेतला होता. एक प्रसंग मला आठवतो: रवी आणि मी आमच्या वरच्या छपरात खेळत होतो. तेव्हा पताका बनवायची वेगळी कात्री आमच्या घरात होती. काहीतरी कापण्यासाठी आम्ही ती कात्री घेतली आणि कापलं न जात असल्यामुळे ती आपटून प्रयत्न केला पण त्याच्यात ती कात्री तुटली.  आमच्या  आईच्या भितीने आम्ही दोघ फार टरकलो होतो. आमच्या घरांच्या ताटीत ती कात्री फेकूण दिल्याचं  मला अजून आठवते. मी रडायला लागलो.. रवी म्हणाला घाबरू नकोस मी सांगेन माझ्याकडून तूूटली.. ही फार छोटी गोष्ट असेल पण ती अजूनही आम्ही घरात सांगितली नाही..

अशा पार्श्वभूमीवर रवीचा गावात टारगटपणा वाढला होता. अभ्यासाकडे थोडस दुर्लक्षही झालं होतं. तेव्हा याच्यात बदल घडवणारी दोनच माणसं होती; त्याचे दोन बंधू. त्याच्यात सुधारणा व्हावी तसेच अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून सुरुवातीस नववी व दहावीच्या शिक्षणासाठी त्याला सातारा येथे बंधू पृथ्वीराज बाबा यांचेकडे ठेवण्यात आले. आयटीआय करून पृथ्वीराज बाबा तेव्हा सातारा एमआयडीसीमध्ये अल्फा लावल या कंपनीत काम करत होते. त्यानंतर १९८६ मध्ये सातारच्या भवानी विद्यामंदिर येथून तो द्वितीय वर्गात एसएससी उत्तीर्ण झाला. आपल्या बहिणीचा सांभाळ करण्याच्या जबाबदारीत दबला होता. पोलिसातील नोकरीमुळे वडील नेहमी घरापासून दूर असत. दोन्ही बंधू नोकरीनिमित्त परगावी. घरी दोन चुलते व भावंड ! शिक्षणासाठी तो दूर होता तरी सर्वकाळ भावंडांतच असल्यासारखा असायचा. त्या वयात देखील तो फारच आज्ञाधारक, आत्मविश्वासू, कर्तव्यतत्पर, बदलानुकारी, सर्वसमावेशक विचारी व कुठलेही काम करायला न लाजणारा असा आदर्शवत विद्यार्थी होता.

मग पुढील शिक्षणासाठी रवीने सातारा येथेच राहावे असे ठरले. छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा येथे त्याने महाविद्यालयीन शिक्षण सुरू ठेवले व तुलनेन सुलभ कला शाखेत प्रवेश घेतला. या दरम्यान त्याला गरीब कुटुंबातील विवेकानंद रणखांबे सारखा अतिशय चुणचुणीत व प्रेमळ सहाध्यायी भेटला. ते एकमेकांना पूरक होते त्यामुळे मैत्री झाली. नंतर जेव्हा मी एमएससीसाठी शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेतला तेव्हा रवीच्या सांगण्यावरूनच विवेकानंद माझा रूम पार्टनर झाला होता. त्यादरम्यान विवेकानंदांच्या सहवासाचा मला फार मोठा फायदा झाला होता. केवळ त्याच्यामुळेच विवेक माझा मित्र झाला. १९८८ ला रवी एचएससी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. 

बारावी पूर्ण झाल्यावर लगेच नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्वच्छता निरीक्षक पदासाठी डिप्लोमा १९८९ ला बेळगाव येथून पूर्ण केला. सुरुवातीपासूनच त्याला काटकसरीची सवय होती. घरातील १२ माणसांचे कुटुंबात फक्त तीन माणसे कमावती व आपण अजून शिकतोय ही भावना, त्यामुळे सातारा मधील अंतर्गत प्रवास पायी किंवा सायकलवरून ! पैसे वाचवण्याचे हेतूने बऱ्याचदा गावावरून आणलेल धान्याचं पोतं डोक्यावर घेऊन स्टॅंड ते अजिंक्य कॉलनी (चार भिंती) यादरम्यानच अंतर न लाजता पायी चालायचा. 

स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर या पदासाठी जाहिरात आल्यावर त्याची मुलाखत ही लागली होती. तेव्हा नेत्यांच्या शिफारशी मिळाल्या नाहीत तसेच आर्थिक कमतरतेमुळे रवी ही नोकरी मिळवू शकला नाही. या काळी चांगल्या शरीर संपदेमुळे तो एक चांगला कुस्तीपटू झाला होता. पंचक्रोशीतील यात्रा दरम्यान त्याने कुस्त्यांच्या फडात भाग घेतला होता. त्याला व्यायामाची सवय होती त्यामुळे खेळात तरबेज असायचा. १९९१ दरम्यान त्याने पाटण येथे सैन्यभरती मध्ये देखील सहभाग घेतला होता. पण तेव्हा पोटजात प्रमाणपत्र नसल्याने त्याची सैन्यातील सेवा करण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती.

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पदवीसाठी शिकत असतानाच नोकरी मिळवण्याचा प्रयत्न चालू होता. पण तेव्हा नोकरीने त्याला हुलकावणी दिली. त्यातच त्याने आपल्या बीए पदवीसाठी सर्वात कठीण अशा इंग्रजी विषयाची निवड केली होती. नोकरी शोधात त्याच एक शैक्षणिक वर्ष वाया गेले होते त्यामुळे माझ्या पुढच्या वर्गात असूनही १९९२ साली माझ्याबरोबर त्याने इंग्रजीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

आता प्रमाण तेव्हा देखील बीए पदवीधारकांना सहजासहजी नोकऱ्या मिळत नसत. म्हणून नोकरी शोध थांबवून त्याने एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाविद्यालयात एम ए (इंग्रजी) अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. कदाचित तो पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर प्राध्यापकाच्या नोकरीच्या अपेक्षेत होता. तेव्हा त्याला त्याचे भविष्य माहीत नव्हते. तरीही तो आपले करिअर घडवण्यासाठी त्याच्या पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करत होता. मी ही तेव्हा एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा प्रयत्न करीत होतो. त्याच्याकडे तेव्हा बहुविकल्पी प्रश्नपुस्तिका होती. त्याला वाटले की हे त्याच्यापेक्षा केशवसाठी अधिक उपयुक्त ठरेल. मग त्याने ते पुस्तक मला दिले. तेव्हा पुस्तकाची किंमत ५०० रुपये होती. तो खूप उदार आहे. भावंडे मोठी होत होती व त्यांच्या शिक्षणावरील खर्चही ! दरम्यान १९९४ ला त्याने एम ए इंग्रजी पूर्ण केले. माझ्यामते तेव्हा तो बुवासाहेब मांढरे यांचेनंतर गावातील इंग्रजी विषयातील दुसरा पोस्ट ग्रॅज्युएट होता.

दरम्यान घरांमध्ये त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या चर्चा व्हायला लागल्या. सर्विस मध्ये नसून कामावताही नसल्यामुळे तो लग्नाबाबत तेवढा आत्मविश्वासू नव्हता. पण कार्य तर करावी लागणार होती. अशा परिस्थितीत त्यांचे चुलते व बंधू खंबीरपणे नेतृत्व करून आधार देत होते. दरम्यान बहिण उषाचा निसरे (पाटण) येथील रवींद्र जाधव यांचेशी तर आशाचा नेरले (इस्लामपूर) येथील संजय पाटील यांच्याशी विवाह झाला व त्याच्या जबाबदारीचं ओझं थोडं कमी झालं. तरीही तो नोकरीसाठी प्रयत्न करत होताच. सर्जेराव तात्यांचा नोकरीऐवजी टेलरिंगचा व्यवसाय करण्याचा सल्ला त्याला आवडला नव्हता. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर टेलरिंग म्हणजे शिकून उपयोग नसल्यासारखेच म्हणून तेही नाकारल.

मग सर्विसच्या शोधात तो मुंबई पोलीस मधील त्यांचे बंधू भास्कर आबांकडे मुंबईला गेला. आबांनी रवीला आपल्या घरीच ठेवून घेतले. आजतागायत आबा-वहिनींनी रवीला आपल्या मुलाप्रमाणेच वागवले आहे. त्याच्या वाईट दिवसात त्याला सर्व प्रकारचा पाठिंबा व मदत केली. दरम्यान छोटी मोठी कामं करून पैसा मिळवण्याचा त्याचा उद्योग सुरू झाला. तेव्हा मुंबईतील सातारकरांसाठी आरबवाडीचे हरीभाऊ गोळे यांच्या प्रयत्नातून आपुलकी सहकारी पतसंस्था सुरू झाली होती. संस्थेच्या सुरवातीच्या विस्ताराच्या काळात ते डेली कलेक्शन करणारी मुलं व ऑफिस कर्मचाऱ्यांच्या शोधात होते. आपले शिक्षण बाजूला ठेवून रवीने तेव्हा आपुलकी साठी एका दिवसात वडाळा ते मशिद बंदर पायी चालून कलेक्शन केले आहे. यावेळेला त्यांना लालसिंग भाऊ यांचे मार्गदर्शन, आधार व मदत झाल्याचे ते सांगतात. त्याने संस्थेसाठी खूप परिश्रम घेतले होते. दैनंदिन कलेक्शन सोबत ओळखीने भरपूर ठेवी मिळवून दिल्या होत्या. काही काळ पतसंस्थेत लिपिक व रोखपाल देखील होता. संस्थेच्या भायखळा येथील मुख्य शाखेबरोबरच सातारा, वाई, कलवा व कुर्ला येथील शाखाविस्तारामध्ये रवी चा मोठा वाटा होता. त्याने कमवलेले पैशातून आबा वहिनी यांना आर्थिक मदत करावी असं त्यांचं मत होतं पण आबाना ते रुचत नसे. मग आबा वहिनी यांनी त्याला आपल्या नावावर बँकेत खाते उघडून मदत त्याच्यात भरायला सांगितले. पण रवी कडून आपण पैसे घेतो या गोष्टीची त्यांच्या मनात कायम सल होती. नंतर आबांनी याच पैशातून रवीस लागेल तेव्हा अधिकची मदत केली.

रवीच्या दुर्देवाने काही कारणास्तव आपुलकी पतसंस्था दिवाळखोरीत गेली आणि बुडाली. सर्वांच्या ठेवी बुडाल्या. पैसे परत मिळवण्यासाठी माणसांनी या सर्वांचा पाठलाग केला. त्याच्या ओळखीच्या ठेवीदारांनी सर्व प्रकारच्या शब्दात शेरे मारले. खूप बोलले रवीला. पण रवी ने त्याची चूक नसतानाही कुणालाही प्रत्युत्तर केले नाही. पण त्यांचे पैसे परत मिळवून द्यायची जिद्द बाळगली. त्यातील बऱ्याच ठेवी त्याच्या प्रयत्नातून परत मिळवून देण्यात आल्या आहेत. यामुळे मित्र, नातेवाईक व संपर्क वलयात बऱ्याच जणांचा त्याने रोष ओढवून घेतला. पैसा ही अशी गोष्ट आहे की जी विकसित संबंध तात्काळ खंडित करते. यामुळे त्याच्यापुढे कमाईच्या स्त्रोताचा प्रश्न पुन्हा एकदा समस्या म्हणून उभा राहिला होता. जानेवारी २०२० मध्ये शासनाने आपुलकी पतसंस्थेस मुंबई नागरी सहकारी पतपेढी मध्ये विलीन करून सर्वांच्या ठेवी परत करण्याचे वचन दिले आहे. 

सहकार व्यवस्थापनाचा डिप्लोमा इन मॅनेजमेंट देखील २००० साली पूर्ण केला. शेवटी त्याने जीवन विमा पॉलिसी प्रतिनिधी म्हणून व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. सर्व्हिस बाबतीतील विमा प्रतिनिधी हा सर्वोत्तम पर्याय आहे असं ठरवून इतरत्र नोकरी पर्याय न सोधता स्वतःला या व्यवसायात गेले वीस वर्ष त्याने समर्पित केले आहे. त्याच्या शिक्षणाच्या मानाने ही सर्वात चांगली नोकरी नसेलही पण त्याने शेवटी ठेविले अनंते तैसेची रहावे या उक्तीप्रमाणे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून हा निर्णय घेतला. अद्याप दोन बहिणी लग्नाच्या होत्या. स्वतःचे ही लग्न नव्हते. मुंबईत घर घ्यायचे स्वप्न अपूर्ण होते. शेवटी सर्जेराव तात्यानी त्यास लग्नास तयार केले. त्याने आईला दिलेला शब्द मनात होताच. मग अगोदर वैशालीचे लग्न धामणेर च्या दीपक क्षीरसागर यांच्या बरोबर झाल्यानंतर स्वतःच्या लग्नास तयार झाला.

मे २००० मध्ये ऊरूळ (चाफळ) येथील अनघा वहिनींशी वयाच्या तिसाव्या वर्षी चाफळ येथील राम मंदिरात अतिशय साध्या पद्धतीने त्याचा विवाह पार पडला. अनघा वहिनी देखील बीए इंग्रजी आहेत. तसेच कम्प्युटरचा डिप्लोमा देखील झाला आहे. रवीस त्यांच्या संसारास सुयोग्य जोडीदार मिळाला होता. विवाहा दरम्यान वाचवलेल्या पैशातून तसेच त्याने बँकेत टाकलेल्या मदत रुपये आर्थिक ठेवीतून सह्याद्रीनगर, मुंबई येथे स्वतःचे घर घेतले. लग्नानंतरही वहिनींना मुंबईला न्यायला तो तयार नव्हता. पण घरातील जेष्ठांनी मन वळल्यानंतर तो तयार झाला. अजून निषाचे लग्न बाकी होते. जबाबदारी होतीच.. त्यात स्वतःचा संसार सुरू केला. त्यांच्या संसारवेलीवर शामा (अबोली) व सोहम ही दोन पुष्प ! अबोलीने भरतनाट्यम चा आठ वर्षाचा डिप्लोमा केलाय व बीएस्सी कम्प्युटर सायन्स करते. तर सोहम दहावीत शिकतो. दोघेही मुले हुशार आहेत व अभ्यासात ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवत आहेत. 

२००३ मध्ये सालपे (वाठार) येतील रमाकांत शिंदे यांच्याशी धाकटी बहीण निषाचा विवाह पार पडला व रवी आईस दिलेल्या वचनास जागला. त्याबरोबरच एकत्रित कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडल्या, त्यामध्ये इतर भावंडांची शिक्षणं, लग्न, शेती या गोष्टी आल्याच. दादा, तात्या, बापू, आबा आणि बाबांच्या आशीर्वादाने, सहकार्याने व मार्गदर्शनाने त्याची आयुष्यातील सर्व नैतिक कार्यकर्तृत्वातून अतिशय कष्टाने मुक्तता झाली. मुंबईत असताना अमित व अपर्णा यांच्या करिअर जडणघडणीत जातीने लक्ष घातले व मार्गदर्शन केले. अमितच्या इंग्लंडमध्ये काम करण्याच्या निर्णयाचे त्याने समर्थन केले होते.

दादा, आत्या, बापू यांच्या शेवटच्या काळात सगळी सेवा केली. बापूंच्या व्यसनाबद्दल कधीच तक्रार केली नाही. बापूंच्या अखेरच्या सहा महिन्यात त्यांनी वाडीत राहायची इच्छा व्यक्त केली होती. रवीने आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या तसेच नोकरीचा विचार न करता त्यांची सेवा करण्यासाठी सहा महिने गावी मुक्काम केला होता. तसं बघितलं तर बापूंच्या सेवानिवृत्तीनंतर जवळजवळ तीस वर्ष त्यांची एक रुग्ण म्हणून रवीने संयमानं सेवा केली. त्याच्या इथपर्यंतच्या प्रवासातील जबाबदारीच्या प्रचंड दबावाखाली असतानादेखील मानवतेच्या तत्वांपासून तो अजिबात विचलित झाला नाही. पडेल ते काम करण्याची तयारी ठेवली. कसल्याही परिस्थितीत नाउमेद व्हायचे नाही व खंबीरपणे संकटांना सामोरे जायचं एवढंच त्याला ठाऊक !

त्याने विमा व्यवसायात स्वकष्टाने बरेच कौशल्य, नाव व संपदा कमावलेली आहे. कदाचित इतर क्षेत्रात सर्विस करून तो इथपर्यंतच आला असता. एका विशिष्ट परिस्थितीत घेतलेल्या करिअर निवडीच्या तुलनेने सुयोग्य निर्णयानंतर तो निव्वळ प्रामाणिक कष्टानं इथपर्यंत आलाय. अशा या खंबीर, दयाळू, कष्टाळू, जबाबदार, आईस दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करणाऱ्या रवी तात्याचा प्रवास खरच काटेरी पण प्रेरणादायी आहे. त्याच्या उर्वरित आयुष्याच्या वाटा पुष्पमय होवोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

✍️ डॉ केशव यशवंत राजपुरे

मोबाईल: 9604250006

www.rajpure.com/


Monday, April 20, 2020

कै भिमराव रामचंद्र अनपट



अल्पायुषी स्थितप्रज्ञ कै भीमराव रामचंद्र अनपट

ग्रॅज्युएट असूनही उत्साहाने शेती करणारे, बस वाहक म्हणून खुशीने सेवा केलेले, कर्तव्यासाठी कुटुंबापासून दूर असूनही सगळ्या गोष्टींचे सुयोग्य व्यवस्थापन केलेले, मुलांना साक्षर करून चांगलं व्यक्तिमत्त्व बनवण्याची इच्छा ठेवलेले, शांत, निगर्वी, संयमी, समंजस व स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्त्व म्हणजे कै भिमराव रामचंद्र अनपट (आण्णा) यांचे विषयी आज..

वरच्या वाड्यातील रामचंद्र बजाबा अनपट (रामभाऊ) आणि तानुबाई यांचे गोविंद, प्रल्हाद, विजय नंतरचे भिमराव हे चौथे चिरंजीव ! त्यांची १.६.१९५८ ही जन्मतारीख ! रामभाऊ मिल कामगार.. पण नंतर शेतीसाठी नोकरी सोडून गावी आले होते. मोठे बंधू गोविंद त्यावेळेस मोरारजी मिलमध्ये होते. दुसरे बंधु प्रल्हाद यांचे लग्नानंतर लगेच काविळीच्या आजारात दुर्दैवी निधन झाले होते. तिसरे बंधू विजय मुंबईत असताना वयाच्या विसाव्या वर्षी सिग्नलवर झालेल्या एका अपघातात पायाने अधू झालेले.. अशा परिस्थितीत भीमराव यांचा शिक्षण प्रवास सुरू झाला.

त्यांचे चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण अनपटवाडी च्या शाळेत तर पाचवी ते सातवी शिक्षण प्राथमिक शाळा बावधन येथे.. पुढील एसएससी पर्यंतचे उच्च शालेय शिक्षण बावधन हायस्कूल मधून.. वाडीतील त्यांच्या वर्ग मित्रांमध्ये अर्जुन दादा व माझे बंधू बाळू दादा.. अनियमितता तसेच मर्यादित शैक्षणिक कौशल्यामुळे त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीतील तीन वर्षे गमावली होती. या कारणांमुळे इतर मित्रांनी त्यांना अभ्यास व नोकरीमध्ये मागे टाकले होते. त्याकाळात शिकण्याची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांचे बंधू गोविंद नाना यांनी त्यांच्यासाठी पाचशे रुपयांची नवी कोरी सायकल विकत घेऊन दिली होती. नेहमीच ही सायकल मित्रांसाठी द्यायला तसेच त्यांना डबल शीट न्यायला ते उत्साहाने तयार असत. त्यांनी १९७६ साधी द्वितीय श्रेणी मध्ये एसएससी पूर्ण केली.

गावातील शेती बघून त्यांनी किसनवीर कनिष्ठ महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून एचएससी १९७८ ला पूर्ण केली. शेती करण्यास शारीरिक दृष्ट्या ते घरात एकटेच तंदुरुस्त असल्याने तेव्हा शिक्षण व शेती या दोन्ही आघाड्यांवर एकत्र लढताना त्यांना खूप कसरत करावी लागली. त्यांचा स्वभाव अतिशय शांत, मनमिळावू, उदार व स्थितप्रज्ञ असा होता. त्यांच्यासाठी शेती करणे मुख्य व शिक्षण दुय्यम होते. ते अतिशय दिलदार व शाही स्वभावाचं व्यक्तिमत्व होतं. भांडण वादावादी पासून नेहमीच दूर असणारे अण्णा नेहमी सामंजस्याची भूमिका ठेवणारे !

मग त्यांनी शेती बघतच वाई येथील किसनवीर महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणे सुरू ठेवले. महाविद्यालयात असताना अभ्यासक्रमा व्यतिरिक्त खेळ, एनएसएस, रनिंग, योगा सारख्या गोष्टींमध्ये हिरीरीने भाग घेत असत. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिकत असताना शेतीवरील उत्पन्नावर विसंबून राहावं लागत असे. शेतात बागायत करून चरितार्थासाठी चलन मिळवत असत. शेतातील भाजीपाला वाईचा मंडईत विकत असत. हे करत असताना अभ्यासातील चिकाटी विलक्षण होती. अण्णा हे आमच्या दादांचे मित्र ! त्यामुळे ते एकत्र अभ्यास करायचे. त्यांच्याकडे गाईड उपलब्ध असायची त्यामुळे दादांना याचा अभ्यासात फार फायदा झाला. दिवसा काम असल्याने त्यांचा अभ्यास रात्री असे. तेव्हा शेतात व आमच्या घरात वीज नव्हती त्यामुळे वैरणीच्या पेंड्याने बनवलेल्या कोपीत व कंदिलाच्या मंद प्रकाशात हे दोघे मित्र करिअर घडवण्यासाठी अभ्यास करत. आम्हीही त्यांच्या कित्ता गिरवत असू. आपले वडील बंधू तसेच वाड्यातील सर्व वडीलधार्‍या माणसांचा आदर राखत व मान ठेवत. नानांच्या मुलांची शिक्षण व लग्न कार्यात पालकाची भूमिका निभावून जबाबदाऱ्या पूर्ण केल्या होत्या. अशात १९८१ साली वाणिज्य शाखेचे पदवीधर (बीकॉम) झाले. 

त्यावेळेस १९७८ दरम्यान शासनाने सुरु केलेल्या व जिल्हा परिषदेमार्फत चालवलेल्या राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमास निरक्षरांना प्रशिक्षित करण्यासाठी साक्षर ग्रॅज्युएट ची जरुरी होती. ज्यांनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले नाही किंवा अर्धवट शिक्षण घेतले असे १५ ते ३५ वयोगटातील तरुण म्हणजे निरीक्षर. त्यावेळी असे बरेच जण गावात होते. संपूर्ण गाव साक्षर होण्यासाठी भूमिकेतून भीमराव आण्णा व दादा यांनी या कार्यक्रमात प्रशिक्षण दिले होते. शासनाच्या सर्व शिक्षा अभियानातील त्यांचे हे मोठे योगदान होते.

पदवीनंतर नोकरीच्या शोधात ते मुंबईला गेले. ते तिथे गुजरात खादी ग्रामोद्योग मंडळात काम करत असलेले गावकरी मित्र सुरेश शंकर अनपट यांना भेटले. अण्णांनी सुरेश अनपट बरोबर दोन वर्ष या मंडळात उत्कृष्ट काम केले. सुरुवातीचा काही काळ त्यांनी क्लार्कचे काम केले. पण दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) वाहक पदासाठी ब्यच व बिल्ला काढला होता. मग कॉल च्या प्रतीक्षेत गावी येऊन शेती करू लागले. शेवटी त्यांना कॉल आला व चांगल्या मुलाखतीनंतर ते १९८४ झाली एसटी महामंडळात बस वाहक या पदावर सेवेत रुजू झाले. त्यावेळेसही बी कॉम होऊन बस कंडक्टर ची नोकरी निवडणे हा सर्वोत्तम पर्याय नव्हता. ती कायमस्वरूपी नोकरी असल्याने त्या परिस्थितीत तरी तो योग्यच निर्णय होता. त्यांनी आपल्या २५ वर्षांच्या एसटीमधील सर्विस मध्ये अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या डेपोमध्ये काम केले. यामध्ये वसई (सहा वर्ष), विटा (सहा वर्ष), मेढा (चार वर्ष) आणि सातारा (नऊ वर्ष) यांचा समावेश होतो.

नोकरीत स्थिरस्थावर झाल्यानंतर १९८७ झाली लिंब येथील सविता सावंत यांच्याशी त्यांचा शुभविवाह झाला. त्यांना सुप्रिया विकास चव्हाण (बीकॉम), शुभांगी विकास परमने (एमकॉम), सायली (बीसीए) आणि संदेश (बीई मेकॅनिकल) ही चार अपत्य ! आपल्या शिक्षणादरम्यान आलेल्या अडचणी मुलांना येऊ नये ही त्यांची कायम इच्छा व मुलांना साक्षर करून मोठे करायची तळमळ !

ती घरापासून दूर डेपोत सर्विसला होते तरी कुटुंबाशी जास्त जोडलेले होते. घरातील सर्व व्यवहार, शेती व मुलांचे शिक्षण सहचारिणी सविता वहिनींच्या मदतीने व्यवस्थित सांभाळत असत. एकूण सर्विस ठिकाणी राहून लक्ष मात्र घरातील पिल्लांकडे ! गावांमध्ये तसेच वाड्यात कुठलाही कार्यक्रम असला की जातीनिशी हजर .. सर्वांमध्ये मिळून मिसळत वागत.. जीवनात सर्व्हिस च्या ठिकाणी व कुटुंबासाठी त्यांनी खूप प्रवास केला. कितीही अडचणी आल्या तरी थकले मात्र नाहीत. आपल्या अल्प पगारात कुटुंबांचा व मुलांच्या शिक्षणाचा खर्च योग्यरीतीने भागवत असत. याच कारणामुळे त्यांनी कित्येकदा डबल ड्युटी व ओव्हरटाईम ड्युटी केल्या होत्या. स्वतःकडून प्रत्येक गोष्टींसाठी झालेल्या खर्चाच्या नोंदी (डायरी) ठेवायची त्यांना फार छान सवय होती. त्यांना भजन गायनाचा फार मोठा छंद.. गावातील हौशी भजनी मंडळीत त्यांचे वडील रामभाऊ एक होते. कदाचित त्यांच्याकडून ही आवड निर्माण झाली असावी.

नंतर मुलांच्या शैक्षणिक गैरसोयींमुळे त्यांनी आपले कुटुंब नोकरीचे मध्यवर्ती केंद्र सातारा येथे हलवले (२०००). सुरुवातीला शनिवार पेठेत भाड्याच्या घरात संसार थाटला. आयुष्यात बऱ्याच अडचणींना सामोरे गेले पण मुलांच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. त्यांचा स्वभाव अतिशय समजूतदार ! कुठल्याही गोष्टीवर चिडचिड नाही.. मुलांना अतिशय मायेनं समजावून देणार.. कुठल्याही गोष्टीचा स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण दुसऱ्याला होता कामा नाही यासाठी दक्ष ! ते ग्रॅज्युएट होते पण शिक्षणाचा अजिबात गर्व नव्हता तसेच अतिशय साधे राहणीमान ! स्वभावाने राजा माणूस ! यादरम्यान प्रतापगंज पेठेत स्वतःचे घर विकत घेतलं. त्यांच्या दृष्टीने ही स्वकमाईची फार मोठी मालमत्ता होती. 

आयुष्याच्या पुढील चरणात सर्विस ठिकाणी तसेच सामाजिक जीवनात त्यांना कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. कोर्टकचेरी साठी बराच वेळ आणि पैसा खर्च करावा लागला. त्यांच्यावर झालेल्या खोट्या आरोपामुळे त्यांना सर्विस मधून सहा महिन्यांसाठी निलंबित व्हावं लागलं होतं. सुदैवानं ते खोटे आरोप सिद्ध झाले नाहीत व पूर्ववत त्यांना सेवेत रुजू करून घेतले, तो भाग वेगळा.. या सर्व गोष्टींना सामोरे जात असताना दुर्दैवाने त्यांना सातारमधील त्यांचे घर विकावे लागले. ती तणावग्रस्त परिस्थिती सुद्धा सहन केली व व्यवस्थित हाताळली. या कठीण परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाचा मोठा पाठिंबा आणि साथ त्यांना मिळाली म्हणून ते तो संघर्षाचा काळ लोटू शकले. अशा या सुशिक्षित व आदर्शवत व्यक्तिमत्वाची जीवनरेखा तशी तुलनेन लहानच होती. ९ नोव्हेंबर २००९ रोजी वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षी त्यांच्यावर काळाने झडप घातली व सेवा बजावत असताना बसच्या अपघातात पनवेल जवळ त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या मृत्यू समयी मुलांची शिक्षण अर्धवट होती व अजून लग्न व्हायची बाकी होती. नियतीने त्यांचा संसाराचा डाव अर्ध्यातच मोडला होता.

त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर फारच कठीण परिस्थिती ओढावली होती. या समयी पुतणे किशोर, इतर कुटुंबीय व वाड्यातील इतरांनी त्यांच्या कुटुंबाला आवश्यक आधार दिला. आण्णा गेल्या नंतर सविता वहिनी नी मुलांना आण्णाची कमी कधीच भासू दिली नाही. मुलांसाठी आई आणि वडील या दोन्ही भूमिका पार पाडत आहेत. आपल्या पतीच्या जाण्याच्या व्यथा विसरून त्या आपल्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत. जाऊबाई शारदा वहिनी यांची त्यांना सोबत कायम.. त्यानंतर मुलांची शिक्षण पूर्ण करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. २०११ मध्ये सुप्रिया ने बिकॉम तर २०१५ मध्ये शुभांगी ने एमकॉम पूर्ण केले. तेव्हाच सायलीनेही बीसीए पूर्ण केल. दरम्यान २०१२ मध्ये सविता वहिनींनी चिरंजीव संदेशच्या मदतीने वाडीमध्ये घर बांधले. कर्मधर्मसंयोगाने २०१४ ला सुप्रिया चे तर २०१८ ला शुभांगी चे लग्न झाल. चिरंजीव संदेश आता पुणे येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये शिकत आहे. पुढे सायली व संदेश यांची लग्न होतील, संदेशच ठीक होईलच पण आण्णांचे या सर्वांप्रतीचे समर्पण कायम लक्षात राहील. आज-काल त्यांची मुलं भेटली की अण्णांच्या आठवणी जाग्या होतात व नकळत पापण्यांच्या कडा ओलावतात.

आण्णा आज जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी उपलब्ध स्त्रोतांमध्ये कुटुंबाच्या संगोपनासाठी केलेला समर्पण रूपी संघर्ष कायम स्मृतीत राहील. अशा या दिलदार आदर्शवत व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतीस त्रिवार वंदन.

✍️डॉ केशव यशवंत राजपुरे

आदर्श सरपंच नितीन शिवराम मांढरे


तरुणांचा आयडॉल आदर्श सरपंच नितीन मांढरे (काका)

समाजऋणातून उतराई होण्यासाठी आपण गावासाठी विधायक कार्य केले पाहीजे ही खूणगाठ मनाशी बाळगून काही माणसं वावरत असतात. नितीन या शेतकरी युवकाचा विधायक कार्यात नेहमी सहभाग ! विघ्नहर्ता गणेश मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम असोत किंवा श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) चे सामाजिक कार्य असो नितीन प्रत्येक गोष्टीत पुढे.. त्याच्या याच कार्यतत्परतेचा व जबाबदारपणाचा अंदाज गावकऱ्यांना आला व मतदान अधिकार मिळाल्या मिळाल्या त्यांनी या युवकाला वयाच्या एकविसाव्या वर्षी बिनविरोध सरपंच केले. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जिल्हा परिषदेचा मानाचा आदर्श सरपंच पुरस्कार तसेच आर आर आबा लोकविकास प्रतिष्ठानचा आदर्श सरपंच पुरस्कार असे दोन पुरस्कार स्वकर्तुत्वावर मिळवणारे तसेच गावच्या विकासासाठी सतत झटणारे अनपटवाडीचे लाडके आदर्श सरपंच नितीन मांढरे (काका) यांच्या विषयी..

दोन भाऊ आणि एक बहीण असणाऱ्या कुटुंबात मालन व कै शिवराम साहेबराव मांढरे यांच्या पोटी २७/१२/१९७९ ला नितीनचा जन्म झाला. नाणी आणि नोटा तयार करण्याचा कारखाना, म्हणजे टांकसाळमध्ये मुंबई येथे त्याचे वडील सेवेत होते. नितीनचे पहिली ते तिसरीचे प्राथमिक शिक्षण अनपटवाडी येथे झाले. चौथीची केंद्र परीक्षा प्राथमिक शाळा कणूर, तर पाचवी ते दहावी बावधन हायस्कूल, बावधन असा त्याचा शिक्षण प्रवास ! तो अभ्यासात थोडा कमकुव होता. १९९२ ला त्याच्या वडिलांचं निधन झालं. थोरले बंधू शशिकांत अनुकंपावर वडिलांच्या जागेवर सर्विसला लागले. दुसरे बंधु माणिक ट्रकचालक, त्यामुळे नेहमी घरापासून लांब. अशा परिस्थितीत कुटुंबाची व शेतीची सर्व जबाबदारी नितीनवर ! त्यामुळे १९९५ ची एसएससी ची परीक्षा त्याला उत्तीर्ण होता आले नाही. अर्थात पुढ त्यानं मुक्त विद्यापीठाची बिए पदवी मिळवली. लहान वयात शेतीची जबाबदारी नितीनवर आली त्यामुळे घरगडी भैय्या मामा व इतर सहकारी यांच्यासोबत घरकाम व शेती केली. तेव्हा त्यांची बावधनची आत्या व कै पोपट पिसाळ (पाटील) मामांचे नितीनवर लक्ष होतेच. उपजतच नेतृत्वगुण असणाऱ्या नितीनला मग समाजकार्याची आस लागली.

दरम्यान १९९८ मध्ये मुंबईतील चाकरमान्यांच्या गावच्या विकासासाठीच्या श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडीची स्थापना झाली. योगायोगाने २००० साली नितीनला मतदानाचा अधिकार प्राप्त होणार होता. त्यावेळेला ग्रामपंचायत निवडणुकाही तोंडावर आल्या होत्या. नितीनचे व्यक्तिमत्व आणि गावच्या विकासासाठी काम करण्याची ऊर्मी, ग्रामस्थांनी हेरली आणि त्याला बिनविरोधपणे गावचे नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यावेळी गावासाठी एक महत्त्वाचा निर्णय झाला. त्यानंतरच्या २० वर्षातील आजतागायतच्या सर्व ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करून गावाने पंचक्रोशीत एक रेकॉर्ड केले आहे. तसं बघायला गेलं तर नितीनच्या कुटुंबियांचा निवडणूक व त्याच्या राजकारणातील प्रवेशास विरोध होता. पण जेव्हा ही  निवडणूक बिनविरोध होणार हे समजलेे तेव्हा त्याचे मामा कै पोपट पिसाळ (पाटील) यांच्या सांगण्यावरून घरच्यांनी त्याला परवानगी दिली. पुढे नितीनने आपल्या कर्तुत्वानेेे घरातल्यांचा  हा निर्णय सार्थ करून दाखवला.

त्यावेळेला तो वयाने आणि अनुभवांने लहान होता. तसेच आवश्यक आत्मविश्वासाची सुद्धा कमतरता होती. अशावेळी मंडळाचे हनुमंत मांढरे, अनिल अनपट तसेच गावपातळीवरील सर्जेराव तात्या, नाना आबा, काका, निवास भाऊ, वसंत काका, हिरा आत्या व इतर वरिष्ठ गावकऱ्यांचे त्याला सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्यावेळचे त्यांचे सर्व पंचायत सदस्य; रजनीकांत अनपट, सविता अनपट, किसन अनपट, किरण सुतार, अरुण सुतार व मंगल सुतार यांनीही त्याला पूर्णपणे सहकार्य करून पाठिंबा दिला. ग्रामविकासाच्या कार्यासाठी मंडळ आणि गावकरी यांच्यातील दुआ नितीनच्या नेतृत्वाखाली मिळाला होता. ग्रामपंचायत चालवण्यासाठी आवश्यक ती सर्व तंत्रे व कार्यपद्धती त्याने अल्पावधीत ग्रहण केली आणि या युवा नेतृत्वाच्या गतिमान ग्रामीण विकासाच्या झंझावातास सुरुवात झाली.

गावच्या विकास कामात नितीनने, आधी केले मग सांगितले, अशी भूमिका घेतल्यानेच गावचा गतिमान विकास होऊ लागला. सुसूत्र ग्रामविकासाच्या अंमलबजावणीसाठी आण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीला सुद्धा नितीनच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी भेट देऊन तिथल्या गावाची आणि कार्यपद्धतीची पाहणी केली होती. तत्कालीन खासदार लक्ष्मणराव पाटील व आमदार मदनराव पिसाळ यांच्या माध्यमातून नाबार्ड योजनेमधून बावधन ते अनपटवाडी या रस्त्याचे डांबरीकरण २००१ मध्ये झाले ते त्याच्या कालावधीत. ग्राम विकास मंडळाने नाबार्ड बँकेशी पत्रव्यवहार करून मंजूर निधी लवकर मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले होते. प्रथमच गावाला पक्का रस्ता मिळाला होता. त्याच्या प्रयत्नातून २००२ मध्ये वाई अनपटवाडी बस सेवा प्रथमच सुरू झाली. राज्य शासनाच्या स्वजलधारा पाणीपुरवठा योजनेतून ग्राम विकास मंडळाच्या सहकार्याने दुष्काळा दरम्यान पाण्याची सोय करण्यामध्ये त्याचे योगदान होते. त्यावेळेला थोरल्या ओढ्या शेजारी स्वतःसाठी बघून ठेवलेली विहिरीची जागा नितीनने मोठ्या मनाने गावासाठी दिली होती ही लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट. 

तेव्हा निर्मलगाव व ग्रामविकासाच्या विविध योजना शासनदरबारी चालू होत्या. त्यामधील संत गाडगे महाराज निर्मलग्राम योजनेअंतर्गत गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त होणे ही एक अट होती. तेव्हा बऱ्याच घरांमध्ये शौचालयं नव्हती. मग ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह सोसायटी बँकेच्या मदतीने घर तारण ठेवून पाच हजार रुपयांची कर्ज उपलब्ध करून शोषखड्डेची शौचालये काढण्यात नितीनने पुढाकार घेतला. व गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्यात मोठे योगदान दिले. तोपर्यंत बँका शौचालय काढण्यासाठी कर्ज देत नसत. आपल्या गावाचं उदाहरण बघून बँकांना शौचालय काढण्यासाठी कर्ज देण्यासाठीचा शासनाने आदेश काढला. राज्याला दिशा देणारा निर्णय गावामुळे घेतला गेला. स्वच्छता अभियान चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी २००४ मध्ये गावाने स्व मंगेश नानासाहेब अनपट याच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्वच्छता अभियान कमिटीची स्थापना केली होती. नितीनच्या मार्गदर्शनाखाली या कमिटीने अतिशय उत्कृष्ट काम केलं. 

मांढरे भावकीला गणपती धार्जिण नव्हता त्यामुळे १९९४ च्या दरम्यान हनुमंत मांढरे याच्या पुढाकाराने नितीनने गावामध्ये दुर्गा उत्सव मंडळाची स्थापना केली. नवरात्रीच्या उपवासाच्या काळात स्त्रियांसाठी एक धार्मिक उत्सव तसेच समाजात एकोपा वाढावा आणि समाज प्रबोधन व्हावे या उद्देशातून संस्कृतिक कार्यक्रमयुक्त दुर्गा उत्सव साजरा केला जातो. तेव्हापासून या उत्सवाच्या यशस्वी नियोजनामध्ये दुर्योधन मांढरे व इतर भावबंद हे हिरीरीने भाग घेत आहेत. समाजसेवेचा घेतलेला वसा नितीन दुर्गा उत्सव मंडळाच्या माध्यमातून पूर्ण करत आहे. हा उत्सव आता गावचा उत्सव म्हणून साजरा होत आहे.

समाज प्रबोधनासाठी गावात एक मध्यवर्ती गणेश मंडळ असाव, अशी कल्पना स्व मंगेश नानासाहेब अनपट याच्या मनात २००० दरम्यान आली. मग विशाल अनपट याच्या अध्यक्षतेखाली गावातील इतर सहा मित्रांच्या मदतीने विघ्नहर्ता गणेश मंडळाची स्थापना झाली. या अगोदरही गावामध्ये गणपतीचे मंडळ अस्तित्वात होते पण त्याचे कामकाज पुढे चालू राहिले नाही. नितीन सुरुवातीपासूनच विघ्नहर्ता मंडळाचा मार्गदर्शक व सक्रिय कार्यकर्ता राहिला आहे. सुरुवातीला ठराविक समूहापुरतं मर्यादित असलेलं हे मंडळ आता गावाचं मंडळ म्हणून नावारूपास आल आहे. या मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वेगवेगळ्या समाजोपयोगी स्पर्धा नेहमीच आयोजित केल्या जातात. या मंडळाच्या कार्यक्रमातून गावांमध्ये समाज प्रबोधनाबरोबरच एकोपा वाढला व माणसं हेवेदावे विसरले. ग्राम विकास मंडळ व ग्रामस्थ यांच्या कल्पना सत्यात उतरवून योग्य अंमलबजावणीचे काम नितीनच्या नेतृत्वाखाली या मंडळाचे कार्यकर्ते नेहमीच करत आले आहेत. त्यामध्ये गावची स्वच्छता असेल, बाहेरील भिंतींना रंग देण्याचे काम असेल, महसूल वसुली असेल, नितीनच्या देखरेखीखाली काम करण्यास ही मंडळी कायम तत्पर..

नितीनच्या यशस्वी कारकीर्दीमध्ये ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन २००४-२००५ साली प्रथम क्रमांक मिळवला. सातारच्या आर आर आबा लोकविकास प्रतिष्ठानच्या सचिव प्रा संध्याताई चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सांडपाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतीला सातारा जिल्हा परिषदेच्या पाणी, सांडपाणी व्यवस्थापनासाठीच्या वसंतराव नाईक पुरस्काराने गौरवण्यात आले. शंभर टक्के वसुली व वेगवेगळ्या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीच्या कामासाठी २००४ साली गावाला यशवंत ग्राम पुरस्कार या सन्मानाने गौरवण्यात आले. याकामी विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या सर्वच सदस्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले.

या पुरस्काराने गावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली. इतर गावचे ग्रामस्थ मार्गदर्शनासाठी गावाला भेटी देऊ लागले. यामुळे इंडोनेशियातील जागतिक बँकेच्या उच्चस्तरीय समितीने या आदर्श गावास भेट दिली होती व समाधान व्यक्त केले होते. यामध्ये बँकेचे सीनियर सोशल डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट आर आर मोहन, इंडोनेशियातील प्रतिनिधी ए वी हर्मिवासरी व श्रीमती सुमा सलीम हे तीन सदस्य होते. गावातील स्वच्छतागृहे पाहून ते फारच प्रभावित झाले होते. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या नाबार्ड समितीने सुद्धा गावाला भेट देऊन कौतुक केले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदाळेेे साहेेब व जगदीश पाटील साहेब यांनी देेेेखील निर्मल गावास भेट देऊन कौतुक केले होते. या कार्यकालामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष हेमलता ननावरे व पंचायत समिती उपसभापती  ललिता पिसाळ यांचे सहकार्य मिळाले.

नितीनने अनपटवाडीला निर्मलग्राम करून वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेच परंतु बावधन शेजारील अनपटवाडीस स्वतःचे वेगळे अस्तित्व आणि ओळख निर्माण करून दिली. नितीनच्या कार्याची दखल घेऊन आकाशवाणीच्या अठरा केंद्रांवर संपूर्ण राज्यभर त्याची ग्रामस्वच्छता व निर्मलग्रामविषयी मुलाखत १६ मार्च २००६ रोजी प्रसारित करण्यात आली. तसेच पुणे व सातारा आकाशवाणी केंद्रावर गांडूळ खत निर्मिती बाबतची नितीनची मुलाखतही यानंतर प्रसारित झाली होती. नितीन ला निर्मलग्राम राज्यस्तरीय समितीत सदस्य म्हणून निवडण्यात आले होते त्यामुळे त्याला राज्यभर फिरता आले व राज्यातील इतर गावांमधल्या सुधारणांचा अभ्यास करता आला. त्याच्या कार्यकालात त्याने यशदा, पुणे येथे पंचायत समिती मार्फत ग्रामसुधाराविषयी सूक्ष्म नियोजनावर सोळा दिवसांची एक कार्यशाळा पूर्ण केली होती. यातील अनुभव गावपातळीवर काम करताना त्याला फार उपयोगी आला.

नितीनच्या कारकिर्दीत गावाने केंद्र सरकारच्या निर्मल ग्राम पुरस्कार स्पर्धेत बाजी मारली होती (२००४) पण दुर्दैवाने त्या वेळेला पुरस्काराला गवसणी घालता आली नाही. पण पुढे २००७ मध्ये तत्कालीन सरपंच बाळू सुतार यांना संपूर्ण सहकार्य करून नितीनने गावाला निर्मलग्राम पुरस्कार मिळवून देण्यात खूप मोठा पुढाकार घेतला. गावास मिळालेल्या या सर्वोच्च पुरस्कारात नितीनचे खूप मोठे योगदान होते. गावाला हा पुरस्कार राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिल्ली येथे विशेष समारंभात मिळाला होता. हा सर्वोच्च पुरस्कार खरंतर गावच्या प्रामाणिक प्रयत्नांचा गौरव होता. यामध्ये तत्कालीन ग्रामसेवक श्री संतोष गाढवे (आण्णासाहेब) यांचेही सहकार्य व योगदान असल्याचे नितीन म्हणतो. 

समाजात नेहमीच वाद असतात आणि हे कुटुंबातून सुरू होतात. अनपटवाडी गावातही तेव्हा काही वाद होते. परंतु नितीनने ग्रामस्थांच्या मदतीने स्वकौशल्यातून सर्व वाद मिटवून गावात मैत्रीपूर्ण व निरोगी वातावरण तयार करण्यात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे २००९ साली नितीनच्या अध्यक्षतेखाली गावाने महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानात तालुक्यात पहिला पुरस्कार मिळवला. तालुक्‍यातील बऱ्याच गावांना निर्मलग्राम तसेच तंटामुक्त करण्यात नितीनचे यशस्वी योगदान राहिले आहे.

२००८-२००९ मध्ये नितीन ग्रामशिक्षण समितीचा अध्यक्ष होता. गावातील शिक्षणयोग्य सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतल्याबद्दल शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते कौतुकाचा विशेष पुरस्कार गावास प्राप्त झाला होता. योग्य व नेटके नियोजन तसेच सुयोग्य अंमलबजावणी च्या जोरावर गावाने स्वच्छ आणि सुंदर अंगणवाडी पुरस्कारही पटकावलेला आहेच. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अनपटवाडी प्राथमिक शाळेत निव्वळ आवश्यक पटसंख्येअभावी वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर असताना, बावधन व परिसरातील पालकांना भेटून नितीनने नवीन प्रवेश मिळवून दिले व वर्ग चालू ठेवण्यास योगदान दिले.

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागासाठी इको व्हिलेज संकल्पना जाहीर केली होती. यामध्ये खेड्यांना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश होता. यामुळे गावांमध्ये पाणी, स्वच्छता, वीज, शाळा आणि बाजारपेठा या किमान मूलभूत सुविधा होणार होत्या. याही प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी गावाला २००९ मध्ये इको व्हिलेज पुरस्कार मिळाला होता. ग्लोबल व्हिलेज बनविण्याच्यादृष्टीने, हे गावाला मिळालेलं एक महत्त्वाचे यश होत. नितीनने पूर्ण सहभाग घेवून या क्रियाकलापास समर्थित केले.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, इन्फोटेकचा वापर आणि नूतनीकरणयोग्य उर्जा स्त्रोतांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेड्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने तालुका पातळीवर दिला जाणारा स्मार्ट व्हिलेज पुरस्कार ही या गावास मिळाला आहे. हा पुरस्कार म्हणजे गावाने गेल्या दोन दशकांत सर्व क्षेत्रात केलेल्या निरंतर विकासाचे फलित आहे. गावाला आतापर्यंत वेगवेगळ्या पुरस्कारांच्या माध्यमातून पंधरा लाखाच्या वर बक्षिसे प्राप्त झाली आहेत. नितीनने सहकार्‍यांसोबत समाजाच्या विकासासाठी  केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा हा परिणाम आहे. नितीन व ग्रामस्थ यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच गाव आज इतक्या उंचीवर आलेलं आहे की ही उंची टिकवून ठेवणे हे सुद्धा नवीन पिढी समोर एक आव्हान आहे.

गावामध्ये नितीनने एक गाव एक गणपती, दारूबंदी, गुटखाबंदी, वनराई बंधारे, वृक्षारोपण, श्रमदानातून रस्ते बांधणे, महिला बचत गटांची निर्मिती, जनावरांची शिबिरे, वाई अनपटवाडी एसटी सुरू करणे, लोकवर्गणीतून पीक पाणी योजना, विहीर खोदाई, पाणीपुरवठा योजना, गटारे व सांडपाणी व्यवस्थापन, भूकंपग्रस्त व पूरग्रस्तांना मदत, मंदिर जीर्णोद्धार, ग्रामपंचायत कार्यालयाची बांधणी, पूल बांधणी, पतीसह पत्नीच्या नावे घर करणे, निर्मल ग्राम, यात्रे वेळी तमाशा प्रथेला बंदी घालून तो निधी ग्राम विकासासाठी व देवाच्या मिरवणुकीसाठी वापरणे, अनपटवाडी गावाचा रस्ता डांबरीकरण करणे इत्यादी अनेक विधायक कामे करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. वयाच्या तिशीतले दशक; त्याच्या उमेदीचा काळ त्याने स्वतःचा संसार उभा करण्याएवजी गावाचा विकास करण्यासाठी खर्च केला होता. सर्वांच्या दृष्टीने सर्वोच्च त्याग देऊन केलेली आदर्श सरपंच नितीनची ही एक यशस्वी कारकीर्द मानली जाते.

जननायक आमदार मकरंद (आबा) पाटील यांनी नितीनची सामाजिक कार्याची आवड तसेच ग्रामविकासाची धडपड, कार्यकुशलता व क्षमता ओळखली व तात्काळ आपल्या विश्वासू गटात त्याला सामील करून घेतले. त्यांनी त्याला पक्षामध्ये काम करून मोठ होण्याची संधी दिली असे म्हणायला काहीच हरकत नाही. नितीनने संधीचं सोनं केलं व आपल्या कार्याच्या जोरावर आबांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. नितीन आबांसाठी एक विश्वासू व एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आजपर्यंत आबांनी सोपवलेल्या सर्व कामांचा त्याने निपटारा केला आहे. आबांनीही आज पर्यंत नितीन घेऊन गेलेल्या सर्व कामासाठी वेळ देऊन, काम यशस्वी करण्यामध्ये योगदान दिले आहे. नितीन गावांमध्ये झालेल्या विकासकामांचे श्रेय आबांचेच आहे हे मानतो.

नंतरच्या काळामध्ये तालुक्यांमध्ये त्याची एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली. २००७ च्या पंचायत समिती निवडणुकीत त्याने बावधन गणातून सेवा करण्याची पक्षाला मागणी केली होती पण तेव्हा त्याला संधी मिळाली नाही. पण पुढे त्याच्या अनुभवामुळे व पक्षश्रेष्ठींची विश्वासाहर्ता जपल्याचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी त्याची निवड झाली (२००६) आणि त्याच्या कार्याचा गौरव झाला. या पदावर कार्यरत असताना त्याने पक्षादेशाप्रमाणे वेगवेगळ्या पातळ्यांवर सर्व जबाबदाऱ्या यथायोग्य रीतीने पार पाडल्या, पक्षाचा प्रचार व प्रसार केलाच व पक्षामध्ये आपली पत राखून ठेवण्यात यशस्वी झाला. यामध्ये वेगवेगळ्या गावातील युवक मेळावे, रक्तदान शिबीरे, नेत्र चिकित्सा शिबीरे, स्त्री-भ्रूणहत्या विरोधी अभियानात भाग, मुलांना प्रवेश मिळवून देन, त्यांच्या फीमध्ये सवलत मिळवून देणे, गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देणे तसेच व्यसनमुक्तीसाठी अध्यात्मिक प्रवचनांचे यशस्वी आयोजन त्या दरम्यान त्याने केले. स्त्रीभ्रूणहत्या विरोधी अभियानातील त्याच्या कार्याची श्री सद्गुरु धार्मिक यव परमार्थिक ट्रस्ट इंदोर या संस्थेने देखील नोंद घेतली होती. त्याबद्दल संस्थेने त्याचे कौतुक केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या होत्या. यादरम्यान तालुक्यातील बऱ्याच गरजूंना संजय गांधी निराधार योजनेतून पेन्शन चालू करून दिल्या आहेत. तसेच आबांच्या माध्यमातून बऱ्याच गरजूंना वाई तसेच खंडाळा येथील एमआयडीसीमध्ये व इतर ठिकाणी नोकरीसुद्धा लावल्याचे तो सांगतो.

माजी मंत्री आमदार मदनराव पिसाळ, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील, कृषी सभापती शशिकांत पिसाळ, माजी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ तसेच दिलीप बाबा पिसाळ या सर्वांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभल्यामुळेच नितीन त्याच्या कारकीर्दीत गावाच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करू शकला.

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांनाही समानतेची वागणूक मिळाली पाहिजे व ग्रामविकासाच्या व स्त्री वर्गाला शासन दरबारच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात या भावनेतून २०१० साली अनपटवाडीमध्ये महिलाराज ग्रामपंचायत स्थापनेत ग्राम विकास मंडळ अनपटवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली नितीनने यशस्वी पुढाकार घेतला होता. तेव्हा गावचे सरपंचपद महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल होत. सौ संध्याताई अनपट यांना सरपंच म्हणून निवडून देण्यात आले होते. पंचायतीमध्ये तेव्हा सर्व सौ नंदिनी घाडगे (उपसरपंच), साधना अनपट, छबुताई अनपट, सुजाता मांढरे व मंगल सुतार या पंच होत्या. त्यावेळच वैशिष्ट म्हणजे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिपाई, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य सर्व महिला होत्या आणि खऱ्या अर्थाने तेव्हा पंचक्रोशीमध्ये महिलाराज येऊन गेल. पुरुषांबरोबरच गावातील स्त्रियांना अभिव्यक्ती-अनुभवसंपन्नता आणि क्षमतावर्धनासाठी फार मोठी संधी निर्माण करून समानतेचं फार मोठं उदाहरण समाजापुढे ठेवल होत.

२०१० मध्ये संसर (बारामती) येथील अश्विनी निंबाळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना शिवांजली व अनिश ही दोन मुलं ! २०१२ मध्ये पंचायत समिती निवडणुकीमध्ये, गण महिलांसाठी आरक्षित असल्याने, बावधन गणामधून अश्विनी वहिनींना नितीन च्या पाठिंब्यावर पक्षातर्फे सेवा करण्याची संधी मिळाली. तसं बघायला गेलं तर नितीनची आर्थिक परिस्थिती एवढी भक्कम नाही. त्यामुळे या निवडणुकीदरम्यान लोकवर्गणीतून व मित्रांच्या मदतीने निवडणुकीस लागणारा निधी उभा केला होता. निवडणुकांवेळी आपण जेवणावळी, पैशांची उधळपट्टी झालेली नेहमी पाहतो पण गावाने ही निवडणूक म्हणजे माझ्या घरातील उमेदवाराची निवडणूक असं समजून अतिशय प्रामाणिकपणे प्रचार केला. गरज पडल्यास ग्रामस्थांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले होते. ह्या निवडणुकीदरम्यान अश्विनी वहिनींना तिकीट मिळण्यासाठी सगळ्यांनीच जिकरीचे प्रयत्न केले व त्यांना त्यांच्या प्रयत्नांत यश आले. शेवटी बावधन गणामधून अश्विनी वहिनी वाई पंचायत समितीच्या सदस्य म्हणून निवडून गेल्या. त्यांच्या या यशामध्ये गावातील प्रत्येक घटकाचा सिंहाचा वाटा होता. तसेच या निवडणुकीच्या दरम्यान वहिनी गरोदर असून देखील त्यांनी सगळ्या प्रचार सभांमध्ये भाग घेतला होता. सद्ध्या त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यरत आहेत.

हा वहिनींचा समाजसेवेचा पहिलाच अनुभव होता तरी या कार्यकालात गावासाठी त्यांनी पंचायत समिती मार्फत जवळजवळ वीस लाखाची विकासकामे करून घेतली. त्यामध्ये अनपटवाडी- वाकडेेेेश्र्वर रस्ता, एसटी पिकअप शेड, स्मशानभूमी दुरुस्ती, बंदीस्त गटर, वस्तीसाठी हातपंप, वाकडेश्वर मंदिराभोवती पेविंग ब्लॉक, मंदिरा समोरील फूटपाथ, सभामंडपावरील पॅरासिट वॉल, मंदिरातील अंतर्गत कमानी, बोलकी अंगणवाडी प्रकल्प तसेेच शाळेसाठी डिजिटल क्लासरूम या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे नितीन आणि वहिनी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडल्याचे आम्हाला माहित आहे. नितीनच्या वीस वर्षाच्या कारकीर्दीमध्ये कुटुंबातल्या सर्व सदस्यांच्या पाठिंब्याचेे महत्त्वाच योगदान आहे असे त्याला वाटते. 

ग्राम विकास मंडळ अनपटवाडी च्या दूरदृष्टीतून साकारलेल्या लेक वाचवा लेख वाढवा अभियानात सुद्धा नितीनने शतप्रतिशत योगदान दिलेले आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत गावातील जवळजवळ २२ लेकींच्या नावे प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या ठेवी सैनिक सहकारी बँक वाई येथे ठेवलेल्या आहेत. हे अभियान महाराष्ट्र शासनाने सुरू करण्याअगोदर गावाने सुरू केले होते ही महत्त्वाची बाब आहे. शासनाने या प्रकल्पाचे कौतुक करून नायगाव (ता. खंडाळा) येथील कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या उपस्थितीत गावाला पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. शासनाने हे महत्वपूर्ण अभियान अनपटवाडी गावचे अनुकरण करून केले आहे.

आपल्या कारकिर्दीनंतरचे सरपंच बाळू सुतार, संध्याताई अनपट तसेच मोहन अनपट यांनाही त्याचं अतिशय प्रामाणिक सहकार्य आणि पाठिंबा राहिलेला आहे. या दरम्यान त्याच्या अनुभवाचा व कार्यकुशलतेचा गावाला फायदाच झालेला आहे. त्याला पदाची व प्रतिष्ठेची कधीच हाव नव्हती व नसेल. गावच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी त्याने आपले जीवन समर्पित केले आहे. त्याने नेहमीच शाळेतील शिक्षकांना सहकार्य आणि मार्गदर्शन केले आहे. ग्रामविकासाच्या विविध योजनांच्या मंजुरी व अंमलबजावणीसाठी त्यांने वैयक्तिकरित्या रस घेतला आहे. कुठल्याही केलेल्या कामाचं तो श्रेय घेत नाही. तरीपण नितीनच्या अनुभवाच्या जोरावर आणि त्याच्या प्रामाणिक प्रयत्नातून आणि सहभागातून गावच्या वेगवेगळ्या विकास कामांची अंमलबजावणी झालेली आहे. काहीं नवीन कामे मंजूर करण्यामध्ये सुद्धा सहभाग राहिलेला आहे. वाई तालुका कृषी विभागाचा कृषी मित्र म्हणून गेले तीन वर्ष नितीन काम करत आहे. ही गावाच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. अलीकडेच पक्षाच्या बावधन गटाचे मीडिया सेलचे अध्यक्ष म्हणून त्याची निवड झाली आहे. तसेच बावधन पंचक्रोशीतील सर्व गावांमध्ये सुसूत्र ग्रामसुधारासाठी स्वतःच्या अध्यक्षतेखाली बुथ कमिटीची स्थापना सुद्धा त्याने केलेली आहे. श्री वाकडेश्वर मंदिर जीर्णोद्धार प्रसंगी पंचक्रोशी तसेच तालुका पातळीवर भरपूर आर्थिक निधी उभा करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. नितीनमधील नेतृत्व गुण त्याच्या आजी ताई मांढरे व आई मालन यांचे पासून आले आहेत. या दोघींनीही करिअरमध्ये नितीनचे मनापासून समर्थन केले आहे. नितीनचे सर्व मित्र आणि सहकाऱ्यांची नितीनपेक्षा जास्त जपणूक या दोघींनी केली आहे. नितीनच्या बालवयातच वडील गेले होते पण त्यांच्या आईंनी त्याला कधीही वडिलांची आठवण येऊ दिली नाही हे वास्तव आहे.

सरपंच बाळू सुतार, संध्याताई अनपट तसेच मोहन अनपट त्यांच्यासोबत काम करत नितीनने केलेल्या प्रयत्नातून आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या फंडातून जवळ-जवळ *एक कोटी रुपयांची खालील विकास कामे* पूर्ण केलेली आहेत: स्मशानभूमी इमारत आदलाबदल करणे प्रश्न मार्गी, मंदिराचा सभामंडप, मार्बल, मंदीराचे रेलिंग कंपाऊंड, नवीन पाईपलाईन आणि पाण्याची टाकी, बंधारे, रस्ता डांबरीकरण, अंगणवाडी इमारत, शाळेचे वॉल कंपाऊंड, शाळेतील हातपंप, गावातील हायमास्ट लाईट, व्यायामशाळा. तो सहभागी असलेल्या सामूहिक प्रयत्नांतून मंजूर झालेले प्रकल्प (अंदाजे साडेचार कोटी रुपये): अनपटवाडी ते सुतार वस्ती, अनपटवाडी ते वाकडेश्वर मंदिर तसेच अनपटवाडी ते शाळा ही स्ट्रीट लाईट, अनपटवाडी ते सुतार वस्ती रस्ता खडीकरण इ.. नुकताच मंजूर झालेला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील बावधन म्हातेकर वाडी रस्ता व थोरला ओढा पूल साठीसुद्धा नीतीनने आमदार मकरंद आबांजवळ पाठपुराव्याने सकारात्मक प्रयत्न केले आहेत. हे सर्व करत असताना त्याला गावातील प्रत्येक घटकाचा शतप्रतिशत पाठिंबा आणि सहकार्य लाभले आहे आणि म्हणूनच हे सर्व शक्य झालं हा त्याचा दावा आहे. तालुका पातळीवर पंचक्रोशीचे प्रतिनिधित्व करत असताना बावधन व वाड्यांमधील सर्व कार्यकर्त्यांची साथ आणि सहकार्य लाभत असल्यामुळेच नेतृत्व करणं सहज शक्य झालं असे त्याला वाटते. बावधन गणातील जवळजवळ सर्वच गावामध्ये विकास कामे करून नितीनने आपले योगदान दिले आहे.

नागेवाडी लघुपाटबंधारे प्रकल्प आपल्या पंचक्रोशीला नवसंजीवनी देणारा ठरला आहे. २००० ला बांधकाम पूर्ण होऊन देखील प्रकल्प रखडला, बऱ्याच दिव्यातून गेला. प्रकल्पाच्या कालव्याचे पूर्ण खोदकाम होऊनही धरणातून कालव्यात पाण्याचा विसर्ग होत नव्हता. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार मकरंद आबा, दिलीप बाबा, शशी दादा, मधू आप्पा व नितीन यांनी पुढाकार घेऊन योगदान दिलेले आहे. या संदर्भातल्या सर्व मिटिंगना नितीन उपस्थित होता. पुणे, सातारा तसेच मंत्रालयात बरेच हेलपाटे झाले. त्यामुळे २०१७ मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आले व आपल्या हक्काचा पाण्याचा स्त्रोत आपल्याला मिळाला. नितीन एवढेच करून थांबला नाही. या कालव्यांनंतरच्या पोटपाटामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्या सर्वांच्या नुकसानभरपाईसाठी संबंधित विभागात प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करून भरपाईच्या निधीचे वाटप करण्यासाठी त्याने सर्वात जास्त प्रयत्न केले आहेत. गेल्यावर्षी गावातील शेतकऱ्यांच्या उसाचा निर्माण झालेला मोठा प्रश्न नितीनने सोडवून दोन दिवसात गावचा ऊस कारखान्याला पाठवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी स्वतःच्या अध्यक्षतेखाली नितिनने वाकडेश्वर शेतकरी मंडळाची स्थापना केलेली आहे.

नितीनचा स्वभाव अतिशय शांत, मितभाषी, सालस, निर्मळ, विवेकशील, व्यक्तिनिष्ठ व नम्र असा आहे. हे सगळे गुण त्याच्या नैसर्गिक सौंदर्यात अजून भर घालतात. तो कोणालाही तोडून बोलल्याचं मी ऐकले नाही. आयुष्यात त्यानं माणसे जोडली आहेत तोडली नाहीत. त्यामुळे नितीन म्हणजे एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व ! त्याच्याकडे कुठलेही काम घेऊन गेलो तरी तो आपल्यासाठी मदतीस नेहमी तयार असतो. त्याला संपर्क कार्यालय लागत नाही, माणूस भेटलं की त्याचं काम सुरू ! गावच्या सामाजिक विकासासाठीची त्याची भक्ती इतकी प्रचंड आहे की त्याचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती व घरच्या आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष झाल्याचे त्याला भान नाही. 

नितीनला तालुका स्तरावरच नव्हे तर जिल्हास्तरावर एक मानाचे व आदराचे स्थान आहे. शासन दरबारी कुठल्याही कार्यालयांमध्ये त्याची ओळख असतेच. त्याची कार्यकुशलता वेगळ्या ढाच्याची असल्यामुळे त्याची सर्व कार्यालयांमध्ये पत प्रतिष्ठा आहे. कोणतेही काम करण्याची नितीनची उमेद व पाठपुरावा यामुळे संपूर्ण तरुणाईचा तो आयडॉल ठरत आहे. नितीन हे सगळं कुटुंब, शेती, नातेवाईक, गाव, समाजकारण (८०%)-राजकारण (२०%) या सगळ्यांचा सुवर्णमध्य साधून लीलया करत असतो. त्याचं निस्वार्थी आणि निष्कलंक राजकारण, त्याचा कार्यमग्न, धडपडी, सर्वसमावेशक व विनम्र स्वभाव तालुक्याच्या राजकारणात भविष्यात महत्त्वाचा ठरणार आहे.

चांगली भूमिका, चांगली ध्येय, चांगले विचार तसेच चांगले कार्य असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात .. मनातही .. शब्दातही आणि आयुष्यातही .. नितीन काका त्यातील एक.. स्वकर्तुत्वावर तालुक्यात ओळख असणाऱ्या नितीनला सर्वोत्तम आरोग्य व स्वप्नपूर्तीचा भविष्यकाळ लाभो ह्याच शुभेच्छा.

✍️ डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल: ९६०४२५०००६

Friday, April 17, 2020

दिलीप आनंदराव अनपट

संघर्षाचे दुसरे नाव दिलीप
(दिलीप झाला दिलीप शेठ)

घरात अठरा विश्व दारिद्र्य, वडील परागंदा, कुटुंबाची जबाबदारी आईच्या मोलमजुरीवर.. अशा खडतर परिस्थितीत मार्ग काढून स्वकष्टाने जीवन मार्ग बदलून, शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणारे, आमचे मित्र लघुउद्योजक श्री दिलीप आनंदराव अनपट अर्थात बापू यांचा प्रेरणादायी जीवन संघर्ष आज आपणा समोर मांडतोय.

बयाजी मुकिंदा अनपट यांना यशवंत, आनंदराव, बळवंत व हनुमंत ही चार आपत्य ! आनंदराव यांचा स्वातंत्र्यपूर्वकाळात साधारण १९३० चा जन्म ! स्वातंत्र्यानंतर आनंदराव भारतीय सैन्यदलात दाखल झाले. १९६२ च्या भारत-चीन युद्धाचा ते भाग होते. त्यांना थोरला भिकू आणि धाकला दिलीप ही दोन अपत्य ! दिलीप चा जन्मदिनांक १५/११/१९६६. दिलीप सहा वर्षांचा असताना त्यांचे वडील युद्धाच्या भितीने तसेच अविचाराने कुटुंबाला वाऱ्यावर सोडून परागंदा झाले. आठ वर्षांनी परत घरी आले पण पुढे आजारात १९७३ ला त्यांचे देहावसान झाले. तेव्हा भिकू नाना सहावीला तर दिलीप अजून शाळेत जायचा होता. अचानक ओढावलेल्या गरिबीने दिलीपची आई यमुना काकी यांना चरितार्थ चालवण्यासाठी मोलमजुरी करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

अशा हालाखीच्या परिस्थितीत दिलीपचा शिक्षण प्रवास सुरू झाला. शिक्षण कसलं... अस्तित्वाची लढाई ती !  कोदे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली १९७५ ते १९७८ दरम्यान अनपटवाडी येथील प्राथमिक शाळेत त्याने पहिली ते तिसरी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. भिकू नाना यांनी दिलीपच्या शिक्षणावर जातीने लक्ष दिले होते. नंतर चौथी ते सातवी दरम्यानचे शिक्षण बावधन येतील प्राथमिक शाळा क्रमांक एक मध्ये पूर्ण केले. 

तो त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा होता. पैशाअभावी दोन्ही भाऊ पुढील शिक्षण घेऊ शकत नव्हते. म्हणून त्यांना तेव्हा जगण्यासाठी स्त्रोत मिळवण्यासाठी आईस मदत करावीच लागत होती. त्या कोवळ्या वयात त्याने शेतातील कामे, घर कामावर बिगारी तसेच विहीर खोदायची कामे केली होती. त्याचे वाईतील मावस भाऊ चंद्रकांत जायगुडे, वाडीतील हिंदा बापू, नारायण नाना, घाडगे मामा यांच्यासोबत पंचक्रोशीत तसेच तालुक्यात इतरत्र ही कामे त्या वयात केली. उडतारे, लोहारे, केंजळ या गावातून मजुरी करून दिवसा बारा रुपये हजेरीवर काम केल्याचे त्यांच्या कायम स्मरणात आहे. त्याने चौधरी आणि माळ्याच्या विहिरीच्या खोदाईवर पंधरा रुपये हजेरीवर काम केलेले आहे.

आयुष्याच्या या टप्प्यावर तो जगण्यासाठी हातपाय हलवावेच लागणार हा फार मोठा धडा शिकला. त्यांचे इतर मित्र मात्र अभ्यासात मग्न होते. दिलीप त्याच्या आयुष्याची तुलना मित्रांच्या आयुष्याशी करण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेव्हा इतरांसाठी शिक्षण तर दिलीपसाठी कठोर परिश्रम ही प्राथमिकता होती. कोवळ्या वयातील त्या कष्टांनी त्याचे आयुष्यच बदलून गेले. त्याचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. निव्वळ आपल्या भावाच्या समाधानासाठी तो शिकत गेला. शेवटी व्हायचे तेच झाले. तो सातवीच्या केंद्र परीक्षेत आयुष्यात पहिल्यांदाच नापास झाला. मग त्याच वर्गात पुन्हा एक वर्ष काढून दुसऱ्या प्रयत्नात दिलीप केंद्र परीक्षा उत्तीर्ण झाला. पुढे मग पुढील शिक्षण बावधन हायस्कूल मध्ये..

दरम्यान १९८२ मध्ये बंधू भिकू नाना बीईएसटी बस वाहक म्हणून रुजू झाले. पैशाच्या स्त्रोताचा प्रश्न मिटला होता. नानांनी दिलीपला शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला सांगितले. दरम्यानच्या काळात वाडीतील छप्पर वजा झोपडी काढून मजबूत घर बांधत होते (१९८४). पण परत एकदा आयुष्याने त्याच रूप त्यांना दाखवलं. दुर्देवाने चुकीच्या आरोपामुळे भिकू नाना यांना नोकरीवरून निलंबित केले गेले. घर अर्धवट राहिल नाही कारण कंत्राटदाराने पत्रा खरेदीसाठी हातभार लावला. पण परत संघर्ष वाट्याला ! या आपत्तीमुळे दिलीप निराश झाला. अभ्यास आणि शिक्षण एव्हाना त्याच्यापासून फारच दूर गेले होते. पुन्हा एकदा दिलीप आठवीत सलग पुढच्या वर्गात अनुत्तीर्ण झाला. भिकू नानाने दिलीपला आत्मविश्वास दिला आणि प्रामाणिकपणे अभ्यास सुरू ठेवण्यास सुचवले. यादरम्यान मीही त्याच्या संपर्कात आलो. तसं बघितलं तर आम्ही समदुखी.. माझ्या घरी वीज नव्हती त्यामुळे रात्रीचा अभ्यास नाही, मग संध्याकाळी दिलीपच्या घरी वीज असलेने अभ्यास त्याच्यासोबत लाईट मध्ये! पण दिवसभर मोलमजुरीची कामे केल्याने दिलीपला कंटाळा येई व त्यामुळे माझ्याबरोबर अभ्यास क्वचितच करी. त्याच्या घरातील वीज सुविधा मी पूर्णपणे वापरली पण तो मात्र अभ्यासाविना भविष्य अंधारात ठेवलेला. अपुरा अभ्यास आणि गुणवत्तेच्या अभावाने १९८७ मध्ये दहावीच्या बोर्ड परीक्षेत आणखी एका अपयशाला त्यास सामोरे जावे लागले. तो दहावी नापास झाला कारण त्याचा संघर्ष अजून संपला नव्हता. 

१९८८ मध्ये शाळेचा नाद सोडून कमाई करण्यासाठी मुंबईला बंधू भिकू नाना यांच्याकडे गेला. तेव्हा नाना कुर्ल्यात राहून रस्त्यावर भाजीपाल्याचा व्यवसाय करीत. दिलीपने या धंद्यात पडू नये हे नानाचे मत.. मग मनू घाडगे यांचे मित्र माणिक यांनी दिलीपला एका छपाई कारखान्यात महिना २७५ रुपयांच्या नोकरीवर जोडून दिले. यादरम्यान दिलीप कुर्ल्यात राहत असे पण खोलीत पुरेशी जागा नसल्याने फुटपाथवर झोपत असे. मुंबईत जाऊनही ससेहोलपट थांबली नव्हती. कसेबसे दिड वर्षे या नोकरीत काढल्यानंतर त्यांचे वर्गमित्र अनिल अनपट यांनी त्यांची नोकरीतील अडचण दूर केली.

अनिल ने दिलीप ला मोहम्मद अली रोडवरील मिनरा मशिदीसमोर कॉस्मो गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरी मिळवून दिली (८ फेब्रुवारी १९८९). तेव्हा तिथे त्याला साडेचारशे रुपये पगार होता. दरम्यान २२ फेब्रुवारी १९९२ ला त्यांचा चाफळ येथील लतिका पाटील यांच्याशी विवाह झाला. त्यांना दिपाली आणि दिपेश ही दोन मुलं ! दिपालीने गणित विषयात बीएस्सी पूर्ण करून जर्मन भाषेचा अभ्यास देखील पूर्ण केला आहे. गेली तीन वर्षे झालं ती अंधेरी येथील गिब्बस हेल्थकेअर सोल्युशन्स कंपनीत कार्यरत आहे. अलीकडेच तिचं लग्न झालं आहे. दिपेश ने बारावी पूर्ण केली असून वडिलांना व्यवसायात मदत करीत आहे. 

वहिनिंनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षण देण्यात पूर्णपणे योगदान दिले आहेच. म्हणूनच दिलीप संसाराबाबतीत पूर्णपणे पत्नीवर विसंबून राहून निर्धास्तपणे आयुष्यातील अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करू शकला. असं मानलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. दिलीपच्या बाबतीत प्रत्येक परीक्षेच्या समयी मदतीस धावून येणारी त्याची अर्धांगिनी पत्नीरुपी दुर्गामाता आहे. दिलीप स्वतः जरी शिकू शकला नसला तरी आपल्या मुलांना साक्षर करण्यासाठी वहिनींच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. 

१९९४ मध्ये दिलीप आपल्या कुटुंबास मुंबईत घेऊन आला. सुरुवातीला कुर्ला येथे एक वर्ष भाड्याच्या खोलीत ते राहत होते. दरम्यान नानानी बीईएसटी विरुद्धचा साडेआठ वर्षांचा लढा जिंकून परत वाहक सेवा सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी शांतीनगर ला एक घर विकत घेतले आणि कुटुंब तिकडे हलवले. १९९७ मध्ये त्यांनी हजूरी येथे आणखीन एक घर विकत घेतले. दरम्यान १९९७ मध्ये नानांचे दुसरे लग्न करून दिले. त्यांना अश्विनी व आशिष ही दोन मुलं. यानंतर मात्र दिलीपच्या आयुष्यातील अवघड टप्पा आला. नानांच्या आजारपणाचा काळ ! जवळजवळ नऊ महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते पण ऑगस्ट २००३ मध्ये सर्वतोपरी प्रयत्न करूनही नानाने या जगाचा निरोप घेतला. खूप मोठा आधार गेला होता.. त्यात कुटुंबाच्या जबाबदारीच दडपण.. हा दिलीपच्या आयुष्याचा अतिशय निराशेचा काळ होता ज्यावेळी तो पूर्णपणे हादरला होता. 

या कठीण परिस्थितीत पत्नी लतिका वहिनी यांनी त्याला केलेली सर्वतोपरी मदत आणि दिलेला आधार खूपच महत्त्वाचा होता. तेव्हा त्यांनी दिलेले समर्पण निव्वळ अमूल्य आहे. पतीच्या संघर्षात खांद्याला खांदा लावून त्यांनी समर्थन दिले आहे. ही त्यांच्याकडील दिलीप साठी निर्णायक मदत होती. या काळात मित्र अनिल व हनुमंत यांनीही दिलीपला पूर्णपणे समर्थन देऊन संरक्षणही दिले. विचारांमध्ये सकारात्मकता ठेवून दिलीप या परिस्थितीतूनही बाहेर आला. 

दिलीपने नानांच्या कुटुंबास संपूर्ण आधार दिला, मुलांना साक्षर केले तसेच त्याच्या मुलीचे लग्न देखील केले. या परिस्थितीत त्यांची दोन्ही मुलं मुंबई येथे दिलीपकडेच शिकायला होती. आपल्या दोन मुलांबरोबरच दिराच्या दोन मुलांचे संगोपन करून त्यांना शिक्षण देण्याचं महतकठीण काम वहिनींन केलं. हे करण्यासाठीचे व्यापक विचार व माणुसकी वहिनी नी जपलेली आहे. जरी संघर्षाच्या या लढाईत दिलीप एका मोर्चावर लढत देत होता तरी संसाराच्या मोर्चावर वहिनी तितक्याच झगडत होत्या व समर्पण देत होत्या.

२०१५ मध्ये त्याच्या आयुष्याने अनपेक्षित वळण घेतले. मशिद बंदर येथे एक तर वाशी येथे दुसरी अशा त्यांच्या कंपनीच्या दोन शाखा होत्या. २०१५ दरम्यान दिलीपला वाशी शाखेत हलवण्यात आले. दुर्देवाने मालकाने त्यांना अपेक्षित वागणूक न दिल्याने त्याला सव्वीस वर्षांच्या अखंड सेवेनंतर कॉस्मो गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनी सोडण्याचा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागला. पुन्हा एकदा जीवनात संघर्ष ! मग दिलीपने वाशी येथे स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पण यासाठी आवश्यक निधी उभारण्याचा प्रश्न अनुत्तरित होता. अनिल भाऊ, राजू मांढरे आणि हनुमंत मांढरे यांनी त्याचे कार्यालय सुरू करण्यास समयसुचक आर्थिक मदत केली. मार्च २०१५ मध्ये दिपेश रोडलाईन्स नावाची ट्रक टर्मिनल बिल्डींग वाशी येथे दिलीपची स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी अस्तित्वात आली. तेव्हापासून आजतागायत त्याची कंपनी कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत आहे व या व्यवसायात पत टिकवून आहे. 

दिपेश दिलीपच्या व्यवसायात मदत करत आहेच. त्याबरोबरच दिपेशने मित्र संजीव गुप्ता यांच्या भागीदारीत त्याच इमारतीत श्री गणेश रोड कॅरिअर नावाची ट्रान्सपोर्ट व्यवसायातील आणखीन एक फर्म सुरू केली आहे. याही कंपनीची उत्तम वाटचाल सुरू आहे. मोलमजुरी पासून सुरुवात करून दिलीपने ट्रांसपोर्ट व्यवसायात उच्च स्थान मिळवले आहे ते निरंतर प्रामाणिक व कष्टमय प्रयत्नांमुळेच ! तो आता एक रेगुलर आयकर दाता झाला आहे ही गोष्टच त्याच्या यशस्वितेची पोहोच आहे. दिलीपच्या इथपर्यंतच्या प्रवासाचे परीक्षण केले तर असे लक्षात येईल की त्यांनी खूप मोठा आणि खडतर प्रवास केला आहे. 

एक वेळ तर अशी होती की वडीलांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबास घराबाहेर हाकलून दिले होते. गावातच त्यांच्या नातलगांच्या घराबाहेरील गोठ्याच्या जागेत ते राहिले होते. तेव्हा दिलीप अतिशय लहान होता. नातेवाईकही त्यांच्या त्या परिस्थितीत त्यांना पुढे आधार देण्यास तयार नव्हते. काही काळानंतर तेही त्यांचा द्वेष करु लागले आणि त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की दिलीपने त्यांचे घर सोडून जावे. पण दिलीप ची आई खूपच खंबीर होती. घरात नवरा नसताना दोन मुलांचा घरची कामे, शेतातील कामे, वाकळा शिवणे, पाझर तलावावर मजुरी करून सांभाळ केला आणि संघर्षमय प्रवास सुरू ठेवला. त्यावेळी त्यांचे नातेवाईक व तेव्हाचे गावचे नेतृत्व दत्तू तात्या यांनी अवघड परिस्थितीत या कुटुंबास आधार दिला. तात्यांनी त्यांची घरच्यांनी नाकारलेली जमीन व घर त्यांना परत मिळवून दिलीच पण त्यांचे सर्व हक्क सुद्धा परत मिळवून दिले. दिलीप तात्यांचा यासाठी कायमचा ऋणी आहे.

दिलीप त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या वळणांवर बऱ्याच मित्रांना भेटला. आम्ही सुरुवातीच्या काळात एकत्र होतो. त्यानंतर अनिल ने त्याच्या जीवनरूपी ट्रेनला मार्गस्थ केले. त्याचे ऑफिस सोबती योगेश पुरोहित यांनी सर्व प्रकारच्या कार्यालयीन कामात दिलीपला पारंगत केले व मोलाचे नैतिक पाठबळ दिलं. पुढे हनुमंत व अनिलने त्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत मोठ्या भावाप्रमाणे पूर्ण मानसिक पाठबळ दिलं आणि व्यवसाय सुरू करून दिला. त्यांचे अजूनही त्याच्यावर लक्ष आहे. मित्र हा त्याच्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे, एक महत्त्वाची संपत्ती ! मैत्रीच्या नातेसंबंधाची तो नेहमी कदर करतो. 

जरी याठिकाणी दिलीप च्या आयुष्यातील संघर्ष अधोरेखित होत असला तरी वहिनींनी याप्रसंगी दिलेली साथ व त्यांचे समर्पण म्हणजे पडद्यामागे झाकोळलेलं योगदान आहे. निव्वळ त्यांची समर्थ सोबत होती म्हणून दिलीप आयुष्याच्या लढाईस यशस्वीपणे सामोरे जाऊ शकला.

दिलीप ग्राम विकास मंडळ अनपटवाडी या संस्थेचा खजिनदार व जयहिंद फाउंडेशन या शहीद कुटुंबाला समर्पित सामाजिक संस्थेचा सक्रिय सभासद आहे. या माध्यमातून त्याची सामाजिक जबाबदारी सांभाळत आहे. जीवनाचे विविध रंग आणि चेहरे पाहिलेले ते एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे. एसएससी नापास झालेला विद्यार्थी एका रात्रीत एका फर्मचा मालक होऊ शकत नाही. त्यामागे बऱ्याच दिवसाची संयमी भूमिका, पडेल ते कष्ट करण्याची वृत्ती आणि महान तपश्चर्या आहे. एक एसएससी नापास विद्यार्थी एक यशस्वी उद्योजक होतो काय आणि व्यवसायाच्या निमित्ताने विमान प्रवास करतो काय हे निव्वळ त्याच्या कर्तृत्वाचे फळ आहे. एकेकाळी मोलमजुरी करणाऱ्या दिलीपने प्रामाणिक प्रयत्नाने आपली ओळख दिलीप शेठ अशी केली आहे. अल्पशिक्षित असला तरी आपणही नक्की शेठ होऊ शकता, विश्वास ठेवा तुमच्यातील स्व वर ! दिलीपच्या उर्वरित कार्यकाल व आयुष्यास हार्दिक शुभेच्छा.

डॉ केशव यशवंत राजपुरे