Sunday, June 10, 2018

मार्कच्या खिरापती

दहावीच्या परीक्षेत 'मार्कच्या खिरापती' विषयी केलेलं संख्यात्मक विवरण आणि याविषयीचं परखड मत वाचलं .. आपल्या शैक्षणिक पद्धतीत गुण हे विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता मोजमापाच एक मापदंड आहे. त्यामुळे ज्याला जादा गुण तो तुलनात्मकदृष्ट्या अधिक हुशार हे जरी खरं असलं तरी बहुतांशी बाबतीत वास्तव वेगळं असतं म्हणून त्यांनी मांडलेलया मताशी मीही सहमत झालो ! आपल्या इथं वैद्यकीय विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळवण्यासाठी या परीक्षांमध्ये मिळवलेलया गुणांचा निकष असतो. त्यामुळे सर्वचजण हरतर्हेने कठोर परिश्रम करतात आणि या टप्प्यावर अधिक संख्येने गुण मिळविण्याचा प्रयत्न करतात. हे निकष बदलण्याची ​​वेळ आलीय असे वाटते. विचारी मनं तयार करणारी पिढी घडवण्याऐवजी प्रशिक्षित रोबोट्स घडवणारी आपली शैक्षणिक प्रणाली बदलायला हवी.

आजकाल विद्यार्थ्याला परीक्षेत ९०% किंवा त्याहून अधिक गुण मिळाले की त्याचे शिक्षक आणि पालक स्वतःच्या समकालीन मार्कशी तुलना करतात आणि त्याचा गुणांक बोर्डात आलेल्या मुलाएव्हढा आहे अस ठरवून मोकळे होतात. पण वस्तुस्थिती वेगळी आहे अस मला तरी वाटतंय ! मला इथे तुलना अजिबात करायची नाही .. पण माझ्या विचारावर आपण नक्कीच विचार कराल आणि मताशी सहमत व्हाल. अलीकडे विद्यार्थी त्यांचे मागील परीक्षेत मिळालेलया गुणांच प्रतिनिधित्व करताना दिसत नाहीत. मला सांगायचंय की त्यांना त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त गुण मिळाल्याचा भास होतो. कधी कधी अस वाटतं की हे विद्यार्थी परीक्षेसाठी केलेला अभ्यास नंतर विसरतात ! भौतिकशास्त्राचाच विचार करायचं म्हंटलं तर - ते फॅरॅडेचा नियम बरोबर सांगतील पण पंखा कोणत्या तत्वावर फिरतो असं विचारलं तर गडबडतील. विद्यार्थी खूपच 'व्यावहारिक' झाल्याचं जाणवतंय ! ते विद्यार्थ्यापेक्षा परीक्षार्थीच अधिक बनलेत, किंबहुना परिस्थितीने बनवलेत असं म्हणणं वावगं ठरू नये. घेतलेल्या ज्ञानाचा सुयोग्य वापर कराय लावणारी परीक्षा पद्धती अस्तीत्वात यायला हवी असे वाटते. अशा रीतीने केलेलं विद्यार्थ्याचं रास्त मूल्यांकन होईल आणि त्यांनी मिळवलेली श्रेणी योग्य असेल. 

इथे लोक परीक्षेत उत्तीर्ण होतात आणि इतरांना परीक्षा उत्तीर्ण होण्यास शिकवितात आणि कुणालाच काही कळत नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यात व्यावहारिक दृष्टीकोण वाढीस लागलाय ! शिकणं म्हणजे पाठ करणं आणि विसरणं नव्हे तर मिळवलेल्या ज्ञानाच्या जोरावर अद्भुत आणि स्वतंत्र विचार करणारं मन विकसित करणं आहे - हे सारे विसरलेतच जणू ! तरी बोर्डानं गुणवत्ता यादी प्रसिद्ध करायची बंद केली आहे म्हणून बरं ! नाहीतर या परीक्षा म्हणजे एक जीवघेणी स्पर्धाच जणू ! काही पालकांना त्यांच्या पाल्याचे मार्क्स हे प्रतिष्ठतेचा प्रश्न वाटतो.. खाजगी शिकवण्या इतक्या वेगाने विकसित झाल्या आहेत की शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित वर्गांसाठी वेळ देणं कठीण झालंय ! त्यांचा श्वास गुदमरतो या बोर्डाच्या इयत्ता दरम्यान ! जर आम्ही परदेशी शिक्षण व्यवस्थेचा संदर्भ घेतला तर व्याख्यानाच्या तासांच्या ६० मिनिटांमधील, शिक्षक फक्त २० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी बोलतो. बाकीच्या वेळी विद्यार्थी चर्चा करतात. नाविन्यपूर्णता, अद्भुतता, सध्याच्या गरजा, समस्या आणि उपाय यावर त्यांचे अभ्यासक्रम आधारीत असतात. मग कसे तयार होणार अद्भुत आणि स्वतंत्र विचार करणारी मनं ?

सद्धाच्या शैक्षणिक व्यवस्थेतील पोकळी लक्षात घेऊन प्रत्यकाने आपली शैक्षणिक वाटचाल चालू ठेवायला हवी. कमावता करणारं शिक्षण घेतानाच आपल्या मनाला विचारी बनवणारं प्रशिक्षणही देता येतं का ते पाहावं ! जन्माने प्रत्येकजण जसा वेगवेगळा असतो तसाच विचारानेही ! मग वैचारिक नाविन्यता आणायची असेल तर प्रत्यकाने आपले जीवन वेगळ्या प्रकारे म्हणजे नावीन्यरितीने जगले पाहिजे. विचारी मन विकसित करायचं असेल तर जीवनात अद्भुतता आणि उत्कृष्टता अंगिकारली पाहिजे. जर अशी प्रणाली देशात अस्तित्वात असेल तर कोणत्याही परीक्षेत किती गुणा मिळाले हे दुय्यम होईल.

- केशव राजपुरे 

No comments:

Post a Comment