Thursday, September 14, 2017

ग्रुपअड्मीन

व्हाट्सएप ग्रुपअड्मीन : एक आव्हान

आपण एखाद्या  व्हाट्सएप ग्रुपचा अड्मीन असल्यास आपल्या भूमिकेचा विचार केला पाहिजे. व्हाट्सएप ग्रुपचाट आणि सोशल नेटवर्क साईट मध्ये अग्रेसर माध्यम आहे. त्यात ग्रुप अड्मीन फारच महत्वाचा घटक. तोच असा माणूस असतो की त्याला माणसे एकत्र यावीत असे वाटते. खरच त्याचा उद्देश हा प्रामाणिक असतो की चार टाळकी एकत्र आली तर काहीतरी समाजोपयोगी कार्य करता येईल. माणसांना एकत्र आणण्यासाठी हे एक महत्वाचे व्यासपीठ असतेच. तोच माणूस असतो की त्याच्या ग्रुप मधील सभासद चून चून के निवडतो. सुरुवातीला ही निवड करताना तसे कमी आडाखे किवा मापदंड असतात कारण सभासदांची संख्या मर्यादित असते. जस जसा ग्रुप फुगू लागतो तस तसा अड्मीन निवडक होतो.

सुविचारांची देवाण-घेवाण करणं, या ताणतणावयुक्त जगात ध्यान धारणा करणं तसेच स्वतःला व्यक्त करण्यासाठीच फार उपयुक्त माध्यम म्हणजे व्हाट्सएप आणि व्हाट्सएप ग्रुप्स ! कित्येक लेखक आणि कवी या गॅझेटमुळेच जन्माला आले आहेत ही फार मोठी जमेची बाजू आहे. नवोदितांसाठी खूप काही शिकण्याचं व्यासपीठ तर आहेच पण एक चांगलं व्यक्तीमत्व घडवण्यात या गॅझेटचा मोठा हातभार होवू शकतो !

सुरुवातीला सभासद निवडताना सभासदांची पार्श्वभूमी (शिक्षण, व्यवसाय, मित्रपरिवार इ) तेव्हढी महत्वाची वाटत नाही. याची निवड निव्वळ त्याच्या सोशल नेटवर्किंग साईट वरील सक्रीयतेवर केली जाते. त्याने आपल्या पोस्ट्सना दिलेल्या प्रतिक्रियेवरून त्याची एक मनात प्रतिमा तयार झालेली असते. त्या प्रतिक्रिया बनावट किंवा वास्तविक याचाही विचार तेव्हा नसतो. तो आपला पाठलाग करतो आणि आपण त्याचा. अलीकडे सदस्याबद्दलची माहिती त्याच्या फेसबुक प्रोफाइलवरून सत्यापित केली जाते. कोण जाणे दाखवायचा चेहरा खऱ्यापेक्षा वेगळाच निघाला तर !  नंतर समूहात सदस्यांची जोडणी दर कमी होतो. ग्रुप वास्तविक अर्थाने सक्रिय होतो. अड्मीनला आपण व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून करत असलेल्या कार्याचा अभिमान वाटायला लागतो.

शुभप्रभात / शुभरात्री चे संदेश, उत्सव, राष्ट्रीय सणांच्या शुभेच्छा, वाढदिवस साजरा करणे यासारख्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाते. लोक एकत्र करून विचार एकत्र आणायची प्रक्रिया सुरू होते. मोठे सामाजिक समूह समाजसेवेच्या पाठीमागे लागतात. लोकांपेक्षा विचारांना एकत्र करणे नेहमीच अवघड असते.. दुर्दैवाने काहीतरी घटना घडते आणि संपूर्ण ग्रुपची परिस्थिती बदलते. त्या घटनेवर शेकडो लेख शेयर केले जातात. हजारो प्रतिक्रिया पाठवल्या जातात. तासंतास ग्रुपवर चर्चा चालते. यातून विचारांचे ध्रुवीकरण व्हायला लागते आणि विचारांपाठोपाठ माणसांचे ध्रुवीकरण ! ज्या सामाजिक उद्देशाने माणसे एकत्र आलेली असतात तो कधी बाजूला गेला तेच कळत नाही. कधीकधी जाती धर्मावर आधारित पक्षपाती ध्रुवीकरण होते त्याचे वाईट वाटते. माणसे मग सोयीस्कररीत्या विचार बदलतात. त्याची चर्चा ग्रुपवर. मनं विटतात इतक्या चर्चा ताणल्या जातात. बिच्चारा ग्रुपअड्मीन हे तटस्थपणे बघत असतो ! त्याला क्षणभर विचार पटतात, दुसऱ्याक्षणी पटत नाहीत. तळ्यात मळ्यात अशी परिस्थिती !

कधीकधी पोस्टच्या प्रकारावर वादविवाद होतात. काहीवेळा पोस्टची पुनरावृत्ती होते, काही न्यायप्रविष्ट तर काही धार्मिकता सांगणाऱ्या पोस्ट्स मुळे ग्रुपमध्ये वादविवाद सुरू होतात. ग्रुपअड्मीनला सभासदांच्या आक्षेपार्ह पोस्ट्ससाठी तुरुंगात टाकला जावू शकतो- हे वारंवार सांगितलेही जाते.  मग ग्रुप अड्मीन सर्व सभासदांना वैयक्तिक चर्चा न करता सबुरीने घ्यायचे जाहीर आवाहन वैगेरे करतो. काही सदस्यांनी अशा सूचना वैयक्तिक वाटू लागतात आणि ग्रुप अस्थिर व्हायला लागतो. त्याला माहीत असते की कोणाच्याही धार्मिक भावनांवर परिणाम करणारे कोणतेही विधान किंवा पोस्टस ग्रुपवर टाकणे गुन्हा आहे आणि असं काही घडल्यास आपण नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अशा स्थितीत ग्रुप अड्मीन पोलिसांच्या रडारखाली येतो आणि सायबर गुन्हा कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि आयपीसी अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. अड्मीन ची परिस्थिती फारच विचित्र होते. त्याला आता हळू हळू वाटू लागते की हा ग्रुप तयार केला नसता तर बरा झाल असत वगैरे ..

मानवजातीच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या फायद्यासाठी तसेच विकासाठी अशा सुविधांचा उपयोग केला जाऊ शकतोय. लोकांना एकत्र आणून चर्चेस एक महत्वाचं व्यासपीठ तयार केल जाऊ शकतय. विचार बदलू शकतात. अशा ग्रुपद्वारे विचारांवर विचार करता येतात. एकीची शक्ती अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठी तसेच विधायक कार्य घडवून आणण्यास वापरता येते. वायफळ चर्चा, मतभेद, मतांचे ध्रुवीकरण, आंदोलने यामुळे ग्रुपविषयी आगडपाखाड न करता निराशा बाजूला ठेवायला पाहिजे या ग्रुप अड्मीननी. ग्रुपमध्ये मतैक्य राखण्यासाठी त्याच्या कौशल्यांचा उपयोग करायाला हवा. वेळी एकाद्यास समयसूचक शिक्षा का द्यायची होईना पण लोकहितासाठी अशा चागल्या उपक्रमांमध्ये बाधा येणार नाही हे त्यांनी बघावं. जश्या "व्यक्ती तितक्या प्रवृत्ती" तसंच जमाव नियंत्रित ठेवण ही सुद्धा एक कला आहे. ही ज्याला जमली तो खरा अड्मीन !

- प्रा. केशव राजपुरे 

No comments:

Post a Comment