पांडुरंगाचे पहिले दर्शन
नियती माणसाला जन्म देते आणि जगायला शिकवते, म्हणून जीवनातील सर्वात मोठा गुरू म्हणजे नियतीच ! आज मी माझ्या आयुष्यातील एका वेगळ्या अनुभवाबद्दल सांगणार आहे. आयुष्यात असे काही क्षण येतात जे तुम्हाला खूप मोठा धडा शिकवतात. ज्यातून नवीन ओळखी होतात, ही नाती आयुष्याची पुंजी म्हणून चिरकाल टिकतात. परमेश्वराच्या दर्शनासाठी गूढ घटना घडतात. आपल्याला या गोष्टी योगायोगाने घडल्या आहेत असे वाटत असले तरी यामागे विशिष्ट हेतू मात्र नक्की असतो.
सुमारे तीस वर्षांपूर्वी मी पहिल्यांदाच कोल्हापुरात एमएससीला प्रवेश घेऊन घरापासून दूर वसतिगृहात राहत होतो. आमचे नियमित वर्ग आणि प्रॅक्टिकलही सुरू झाले होते. विद्यापीठ परिसर आणि प्रणालीशी एकरूप होत होतो. मला विद्यापीठाकडून एक पत्र मिळाले की मी बीएस्सीमध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम आल्यामुळे कुलगुरूंनी "विद्यापीठ प्रतिनिधी" म्हणून माझे नामांकन केले आहे. माझ्या मेहनतीचा आणि अभ्यासाचा हा यथोचित सन्मान होता. पण म्हणतात ना सुख कधी एकटे येत नाही, त्याच्या पाठून दुःख येणारच असते. असाच काहीसा बाका प्रसंग कदाचित भविष्यात माझ्यावर येणार होता. कदाचित एका अनभिज्ञ क्षेत्रात नियती मला ढकलून देणार होती आणि मजा पाहत बसणार होती ! तेव्हा विद्यापीठ विद्यार्थी कार्यकारिणीची मला माहिती नव्हती.
माहिती घेतल्यानंतर मला समजले की विद्यार्थी कल्याण मंडळाची साधारण १२ जणांची कार्यकारीणी असायची त्यामध्ये अध्यक्ष, सचिव आणि १० सभासद असायचे. विद्यार्थ्यांचे सिनेटमधील प्रतिनिधी म्हणून विद्यार्थी कल्याण मंडळाचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहायचे. तोपर्यंत मी खेळाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीत भाग घेतला नव्हता कारण मी नेहमी अभ्यासाला प्राधान्य देत असे. त्यामुळे निवडणुका, मतदान आणि इतर वेळखाऊ गोष्टी अवास्तव वाटत. खरे सांगायचे तर मला त्या पदामध्ये रस नव्हता. परंतु माझे मित्र, शिक्षक आणि विद्यार्थी कल्याण विभागाचे तत्कालीन संचालक यांनी मला सांगितले की एक हुशार विद्यार्थी म्हणून परिषदेचे प्रतिनिधित्व करणे महत्वाचे आणि माझ्या भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त होईल, म्हणून मी विद्यापीठ प्रतिनिधी पदाचा राजीनामा देण्याचा माझा निर्णय मागे घेतला होता.
विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका कशा असतात, विद्यार्थी प्रतिनिधींना आपल्या गटात आणण्यासाठी कशी खेचाखेची असते किंवा निवडणुकीनंतरचा जल्लोष याबद्दल मी आदल्यावर्षी यामध्ये भाग घेतलेल्या माझ्या रूमपार्टनर मित्राकडून ऐकले होते. माझे शिक्षण गुणवत्तेने पूर्ण करण्यासाठी मला या वेळखाऊ गोष्टींपासून दूर राहायचे होते. दरम्यान, आमच्या निकटवर्तीयांनी मला निवडणुकीत अमुक एका उमेदवाराच्या पाठीमागे रहाण्यासाठी कळवले होते आणि यासाठी दिलेल्या वेळाने बुडालेला अभ्यासक्रम भरून काढला जाणार होता. मी त्यांना एका अटीवर होकार कळवळा होता की ही निवडणूक १०-१२ दिवसांवर येऊन ठेपलेल्या बीएआरसी च्या सायंटिफिक ऑफिसर पदाच्या मुलाखतीची मला तयारी करायला वेळ देईल. त्यामुळे या निवडणुकीत मला तितके स्वारस्य नव्हते.
आमच्या विभागाच्या वेलकम समारंभादिवशी काही मुलं आमच्या विभागात घुटमळत होती. कदाचित त्यांना माझी भेट घ्यायची होती. पण ते शक्य झाले नाही. ते माझ्या मागावर आहेत हे मला दिवसभर माहीत नव्हते. वेलकम समारंभ पार पडला आणि मला समजलं की काही अनोळखी मुलांचे माझ्याकडे काहीतरी काम होते. निवडणुका आणि ऐकलेल्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मी तर घाबरून गेलो. साधारण ८ वाजता मी माझ्या खोलीवर गेलो. मी पोहचलो इतक्यात तिथे दोन मूलं धावत धावत आली आणि "केशव राजपुरे तुम्हीच का" आणि "तुम्हीच युआर आहात का" असं विचारू लागली. मी "हो" असे सांगितले. माझा रूमपार्टनर तिथे होताच. त्यांनी लगेच त्यांच्या येण्याचे कारण सांगितले. म्हणाले की "पुढे येऊ घातलेल्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही आमच्या गटामध्ये यायला पाहिजे, आमच्या उमेदवारांना मत द्यायला पाहिजे आणि यासाठी तुम्ही आमच्या साहेबांकडे यायला पाहिजे" आणि हेही बोलले कि "साहेबांना मी तुमच्या सोबत आहे हे फक्त सांगा आणि लगेच माघारी या", "फक्त दहा मिनिटांचे काम आहे".
हे गृहस्थ माझ्या निकटवर्तीयाने सांगितलेल्या विरुद्ध गटाचे होते. हा सर्व प्रकार माझ्या पार्टनरच्या लक्षात आला. त्याने समयसूचक विवेकी विचार करून मला विरुद्ध गटात धाडसाने धाडण्याचे ठरवले. तो म्हणाला "केशव, काही हरकत नाही, तूला आठ दिवसांसाठी हॉस्टेल पासून दूर जावं लागेल असे दिसते. तिथ तुझी काळजी घेतली जाईल परंतु तुला यादरम्यान अभ्यासापासून दूर रहाव लागेल". मी त्याला म्हणालो "अरे, अवघ्या १० च दिवसांवरती माझी मुलाखत आलेली आहे आणि मी कसा जाऊ ? मला या निवडणुकांमध्ये काही रस नाही, मी आत्ताच या पदाचा राजीनामा देतो". दोघांपैकी एकजण बोलला की "भाऊ काळजी करू नका, आम्ही तुमच्या अभ्यासाची काळजी घेऊ आणि सरांना विनंती करू की मला ताबडतोब माघारी पाठवा."
माझा मित्र म्हणाला की "तसं काही करू नकोस", "तु यांच्या सोबत जा, मी मोठ्या साहेबांशी बोलून घेतो". मग मला धीर वाटला आणि ते म्हणत होते ते करायला मी तयार झालो. जाताना पार्टनरने मला काही पैसे दिले आणि मी काही पुस्तके एका पिशवीत घेतली व त्यांच्यासोबत गेलो. बघतो तर काय नवल ! होस्टेलच्या उताराला एक आलीशान गाडी उभी होती, त्यामध्ये कोणीतरी तत्कालीन नगरसेवक बसले होते ते म्हणाले "काही काळजी करू नका, आमच्या सोबत चला आणि आमच्या साहेबांना तुमच्यासोबत आहोत एव्हढंच सांगा". ती मोठी गाडी.. मी पुढील सीटवर.. ती दोन मूलं मागील सीटवर.. हे सगळ बघितल्यानंतर माझ्या मनात वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या. गाडी जसजशी पुढे जाऊ लागली तसतसे मला वाटायला लागले की आता ही माणसे मला कुठेतरी अज्ञातस्थळी चोप द्यायला घेऊन जात आहेत आणि मला सिनेस्टाईल किडनॅप केलं जाताय की काय अशी शंका माझ्या मनात आली. मला आठवतंय की ती गाडी एक मोठ्या बंगल्यासमोर थांबली. बंगल्यातील ऑफिसमध्ये त्यांच्या साहेबांशी माझी भेट घालून देण्यात आली. त्यांनी माझं नाव विचारलं, कोणत्या विभागातून युआर झालेला आहात हेही विचारलं आणि नंतर "तुम्ही काही काळजी करू नका" असा वरकरणी आधारही दिला.
त्यांना भेटल्यावर मी पूर्ण टेन्शन-फ्री झालो. निदान मला मार पडणार नाही याची खात्री झाली. त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना माझ्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करायला सांगीतली. मी म्हणालो "साहेब, माझी मुलाखत आहे, इथे अभ्यास होणार नाही, कृपया मला माघारी जाऊ देत, मी आपणासोबतच आहे". यावर ते म्हणाले "आता पुढील दोन आठवडे तुम्ही इथेच असणार. तुमचा आहे ओ पण इतरांचा भरवसा नाही ना. काय करणार ? नाईलाज आहे." एव्हाना मला ज्यांनी तिथे आणले होते ते तिथून गायब झाले होते. डबडबलेल्या लालबुंद नयनांनी आणि "उगाच विद्यापीठात पहिला आलो" या भावनावेशात गप्प राहण्याशिवाय मी काही करू शकत नव्हतो.
ऑफिसच्या मागील खोलीत माझ्यासारखे आणखी १५ ते २० जण बसले होते. मी तिथे गेल्यावर "हा कोण नवीन मासा गळाला लागला?" अशी भावना मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सर्वानी माझी "कशी फसगत झाली" यावर उगीच माझ्या मनाच्या जखमेवरील खपली काढावी अशा स्वरात विचारपूस केली. मग मी त्यांच्यातच बसलो, कोल्ड ड्रिंक पिलो आणि काही वेळात त्यांच्यातील झालो. त्यांच्या चर्चेतून माझ्या लक्षात आले की त्यामध्ये काही कॉलेज युआर, जीएस तर काही विद्यापीठ प्रतिनिधी मूलं होती की जी पुढे विद्यार्थी कार्यकारणीच्या निवडणुकीत मतदान करणार होते. आणि ही सगळी मूलं "आपल्याच बाजूने एकगठ्ठा मतदान व्हावे" म्हणून निवडणूक होईपर्यंत ताब्यात घेतली होती. थोडक्यात सर्व प्रेमाच्या काटेरी कवेत अडकले होते. त्यातील काही स्वेच्छेने तर माझ्यासारखे काही मनाविरुद्ध हजर होते !
तिथे मला खाण्यापिण्याची किंवा गैरसोयीची काळजी नव्हती, मला फक्त एकच काळजी होती ती म्हणजे "मला मुलाखत देता येणार नव्हती" आणि तिथे मला स्वातंत्र्य नव्हते. बंद खोलीत ठेवले असल्याने आम्ही पळून जायचं सोडा इतर काहीही करू शकत नव्हतो. मग रात्री ११ च्या सुमारास आम्हाला एका मिनी मॅटॅडोरमध्ये दाटीवाटीने बसवले. अगदी अवघडून आम्ही त्या मॅटॅडोरमध्ये बसलो होतो खरे पण आम्ही कुठे जात होतो हे कोणालाही माहीत नव्हते. अगदी सिनेमात घडावं असं नाट्य सुरु होतं, ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि आमचा अज्ञातस्थळाकडील पुढचा प्रवास सुरू झाला. मॅटॅडोर कोणत्या बाजूला जात होती ही समजतं नव्हतं कारण मी खाली बसलो होतो. बाजूला कुजबूज ऐकू येत होती की आपल्याला बहुतेक पंढरपूरला घेऊन जात आहेत कारण साहेबांची काही माणसं सोबत होतीच. निवडणुकीदिवशी असेच डब्ब्यात डालून परत आणतील आणि एकदाची सुटका होईल, अशीही चर्चा होती.
मला प्रश्न पडला कि पंढरपूर इथे यांचा तळ आहे का... आणि इतक्या लांब कशाला ? कोल्हापूर जवळ बरीच ठिकाणं होती कि.. कदाचित त्यांनी हा तळ निवडला कारण तो सर्व विद्यार्थ्यांच्या घरापासून खूप दूर होता आणि आमच्याकडे परत येण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यांच्यासाठी ते ठिकाण कोल्हापूरपासून दूर होतं पण माझ्यासाठी पहिल्यांदाच विठोबाच्या दर्शनाचं जवळचं ठिकाण होतं. त्यामुळे त्यानेच माझ्यासाठी ही सहल आखली असावी ही क्षणभर माझी धारणा झाली. तिथे किती दिवस राहणार? काय करायचं? कसा वेळ जाईल ? होईल का अभ्यास ? या विचारात मी डुलक्या मारायला लागलो. कदाचित आम्हाला तिथे नेऊन मारतील या भीतीमुळे झोप येत नव्हती. रात्रभर प्रवास करून आम्ही सकाळी पंढरपूर जवळ आलो आणि तिथून पांडुरंगाच्या मंदिराचे शिखर पहायला मिळाले. मी पहिल्यांदाच पंढरपूरला भेट देत होतो. योग पण पहा आणि कसल्या अवस्थेत ? अडचणीतून पांडुरंग भेट योग.. डोळे घट्ट मिटून चालत्या गाडीतूनच बराच वेळ मी पांडुरंगाकडे प्रार्थना करत होतो की "मला या सर्व बंधनातून मुक्त कर, यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवं आणि मला मुलाखत देण्याचे बळ दे".
साहेबांच्या माणसांनी मात्र आम्हाला दर्शनासाठी नेले नाही. सकाळी आठच्या सुमारास ते थेट उसाच्या मळ्यांनी वेढलेल्या एका फार्महाऊसवर घेऊन गेले. विशेष म्हणजे तिथे आमच्यासारखे आणखी ७०-८० विद्यार्थी खूप मजा करत असल्याचे दिसले. कोणीतरी सांगितले की गेल्या आठवड्यापासून ते तीथे होते. ते एकतर स्वतःच्या इच्छेने किंवा आमच्यासारखे बळजबरीने तिथे आले होते. कुणी मोठ्या विहिरीतील मोटारीच्या पाण्याच्या झोताखाली अंघोळ करत होते, कुणी फराळ करत होते, कुणी नाश्ता करत होते, कुणी व्हीसीआरवर सिनेमा पहात होते, कुणी सोफ्यात टाकलेल्या ५०-६० गाद्यावर लोळत सिनेमा बघत होते, कुणी गप्पा मारत होते. अनेक मुलं या सर्वांवर गुप्त पाळत ठेवत असल्याचे दिसले. मग मला कळले की आपण पूर्णपणे फसलो आहोत आणि इथे राहण्याशिवाय पर्याय नाही. सर्वकाही पांडुरंगावर सोडून मी वेळ घालवू लागलो.
मग मी आंघोळ करून जेवण विभाकडे गेलो. तिथे मला शिवाजी विद्यापीठाच्या सोलापूर उपकेंद्रातील सुरवसे नावाचा आणखी एक युआर भेटला. त्याने माझी विचारपूस केली आणि त्याला समजले की त्याच्याप्रमाणे हाही मुलगा मनाविरुद्ध इथे आला आहे. त्याचीही माझ्यासारखी फसगत झाली होती. समदुःखी भेटल्याने मला हायसे वाटले. शौर्याने संकटांवर मात करणारे वाई तालुक्यातील प्रसिद्ध असे बावधन हे माझे गाव ! या गावची माती आणि लोकांच्या रक्तात चैतन्य भरलेले असते. हे गुण माझ्यात नैसर्गिक असल्याने, मी माझ्या सोबतीच्या मदतीने या बंधनातून मुक्त होण्याचे मोठ्या धैर्याने ठरवले.
त्यामुळे आम्ही तिथल्या माणसांच्या हातावर तुरी देण्याचा आणि तिथून पलायन करण्याचा बेत आखला. पण त्या बंदोबस्तातून सटकायचं कसं ? काय करायचं याविषयी जेवत असताना चर्चा करू लागलो आणि पोटभर जेवलो. निघण्याचा निर्णय झाला खरा पण मला कोल्हापूर आणि त्याला सोलापूरला जाण्याइतपत आमच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. माझ्याकडे असलेल्या पैशाने दोघांपैकी एकजण आपापल्या ठिकाणी जाऊ शकत होता. कोण जाणार? बाहेर पडल्यावर दोघांनाही पैसे लागणार होते. आम्हाला वाटले की आधी या कैदेतून बाहेर पडावे, तिकिटाच्या पैश्याची काहीतरी सोय होईलच !
मला वाटले पांडुरंगाने माझी प्रार्थना ऐकली आणि त्याला माझ्या सुटकेसाठी पाठवले आहे. माझा विश्वास वाढला. सोलापूर जिल्ह्य़ातील असल्याने त्याला तो परिसर, तिथले बस थांबे व बसच्या वेळा माहीत होत्या. त्याने सुचवले की, आम्ही फक्त बनियान आणि पँट घालून शेतातून फार्म हाऊस सोडू. तसेच आम्ही अभ्यासासाठी जाणार आहोत हे दाखवण्यासाठी सोबत उशी आणि चादर घेऊन जाऊ. पण यात मोठा धोका होता. आमचा प्लॅन फेल झाला असता तर आम्हाला फार वाईट मार पडला असता. पण प्लॅन यशस्वी होणार याचा विश्वास होता.
सुरवसे ने सांगितलं की ३-४ किलोमीटर अंतरावर एक गाव आहे त्या गावात साधारण १ वाजता पंढरपूरला जाणारी बस येते. ती बस पकडून पंढरपूरला जायचे ठरले. जेवणानंतर आम्ही शर्ट, चपला काढून पिशवीत टाकल्या, पुस्तकं हातात घेतली. सतरंजी आणि दोन उश्या घेऊन आम्ही तिथून निघालो. तिथे पहारा करणाऱ्या मुलांनी आम्हाला "कुठ चाललाय?" असं विचारलं. सुरुवातीला मी घाबरलो होतो पण लगेच भानावर येत त्याला आत्मविश्वासाने उत्तर दिले की "येथे खूप गोंधळ आहे आणि आम्हाला अभ्यास करायचा आहे, म्हणून आम्ही शेतात चाललोय आणि कुठेतरी बांधावर सावलीत बसून अभ्यास करू". स्वइच्छेने आलेल्यांपैकी आम्ही आहोत असे त्यांना वाटले असेल. त्यांनी आमच्या लबाडीवर विश्वास ठेवला आणि आम्हाला जाऊ दिले. आमची ती चाल यशस्वी झाली होती.
शेतामधून आम्ही चालत होतो. दिसू नये म्हणून मुद्दाम आम्ही आडव्या बांधावरून चालू लागलो. चालत चालत सापडणार नाही अशा सुरक्षित अंतरावर, म्हणजेच धूम ठोकण्याच्या टप्प्यात पोहोचल्यावर आम्ही शर्ट आणि चपला घातल्या. सतरंजी आणि उश्या तिथेच टाकून दिल्या आणि सुसाट पळत सुटलो. मनात भीती होतीच कि सापडलो तर मार खावा लागणार. त्या बांधावरून आम्ही दोघ एवढ्या प्रचंड वेगाने सैरावैरा धावत होतो कि कोणत्या गावाकडे जात होतो हे मला समजत नव्हतं. क्षणभर शंकेची पाल चुकचुकली की आपण नेमकं त्या गावाकडे चाललोय की हा मुलगा आपल्याला दुसऱ्या गटामध्ये नेऊन परत एकदा अपहरण करतोय. दरम्यान तिथं शेतात काम करणाऱ्या बायका आम्हाला विचारत होत्या "पोरांनो का पळताय ? पळू नका. थांबा. अरे तुम्हाला कोण मारतंय का ?" आम्ही त्या कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. कारण या गोष्टीचा आनंद होता की या सगळ्यातून आम्ही सुटतोय आणि आता आपण बंदीवासात नाही, मुक्त झालोय. साधारण १२.३० ला आम्ही एका गावत पोहोचलो, सावलीला थांबलो आणि एका घरामध्ये मागून पाणी पिलो. त्यामुळे जरा आराम मिळाला. अंदाजे १ वाजता बस आली. बसमध्ये तोबा गर्दी होती, कशिबशी बसायला जागा मिळाली. बस पंढरपूरच्या दिशेने निघाली आणि खात्री झाली की आपण एकदाचे सुटलोय.
पंढरपूरला पहिल्यांदाच आलो असल्याने दर्शन घेण्याच्या उद्देशाने आम्ही विठ्ठल मंदिरनजीकच्या थांब्यावर उतरलो. त्यावेळी दर्शन मंडपाचे बांधकाम नुकतेच सुरू झालं होतं. आम्ही नामदेव पायरीकडे दर्शनासाठी निघतो तो काय ? सिनेमातील खलनायकच्या इंट्री प्रमाणे फार्महाउसवरील पहारेकरू मुलांची एक जीप मंदिर परिसरात आली आणि नामदेवपायरीसमोर थांबली. नशीब आम्ही त्यांच्या दृष्टीस पडलो नाही. आम्ही घाबरून दर्शन मंडपाचे जे बांधकाम सुरू होते तेथील एका कॉलमच्या आड जाऊन लपलो. जोपर्यंत ती गाडी परत गेली नाही तोपर्यंत स्तब्ध आणि त्यांच्या जाण्याकडे लक्ष ठेवून ! १५ मिनिटांनी ती गाडी गेली, तेव्हा आम्ही जाऊन पांडुरंगाचं चरणस्पर्श करून दर्शन घेतलं. त्यावेळी मी पांडुरंगाचे आभार मानले आणि म्हणालो की "परमेश्वरा, मी सकाळी तुमच्याकडे याचना केली आणि तुम्ही माझी तिथून सुखरूप सुटका केली, आता मला सुरक्षितपणे कोल्हापुरात जाऊ दे, म्हणजे मी मुंबईला जाऊन मुलाखत देऊ शकेन".
माझ्याकडे कोल्हापूरला जाण्याएवढे पैसे होते पण या मित्रामुळे मी बाहेर पडलो होतो त्यामुळे त्यालाही त्याच्या घरी जाण्यासाठी मदत करणे माझा धर्म होता. तो म्हणाला की "पंढरपूरमध्ये माझ्या ओळखीचे एक टेलर आहेत, त्यांच्याकडे माझ्यासाठी पैसे मागूया, मग आपण आपापल्या गावी जाऊया". आम्ही विठ्ठल मंदिराच्या शेजारील एक गल्लीत शिरलो तर त्या टेलरचे दुकान बंद ! मग मी त्याला म्हणालो की "अरे, मग मी तरी जाऊ का कोल्हापूरला ?" यावर तो विनवणी करू लागला की "अरे, मी सोलापूरला कसा जाणार ?". तो म्हणाला "आपण असं करूया की येथून जवळच मंगळवेढा येथे माझे मामा राहतात, आपण त्यांना हक्काने पैसे मागूया, मग तु मंगळवेढ्यावरुन कोल्हापूरला जा". मग मात्र पुन्हा एकदा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली कि "हा हळूहळू मला सोलापूरकडे तर घेऊन जात नाही ना ?".
सुरवसे मला दुसर्या गटात नेण्याचा प्रयत्न करत आहे असे मला राहून राहून वाटत होते. पण मी करणार तरी काय होतो ना ? त्याला मदत करायची तर आता हाही एक प्रयत्न करून बघूया- असा विचार केला. या मित्रावर विश्वास ठेऊया. नाईलाजाने का होईना मी त्याच्यासोबत मंगळवेढ्याला जायला तयार झालो. माझ्याजवळील जवळ जवळ निम्मेअधिक पैसे संपले होते, त्यामुळे तो म्हणेल ते करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता आणि कोल्हापूरला जाण्याएवढे पैसेही उरले नव्हते. मंगळवेढ्याला मामाच्या घरी गेल्यावर त्याच्या मामा मामीने आमची छान उठाबस केली. पुन्हा एकदा आम्हाला जेवू घातले. साधारण ४ वाजले होते, त्यावेळी आम्ही दिवसातून दुसऱ्यांदा जेवलो होतो. जेवल्यानंतर हा कुठे मामाला बोलायला आणि पैसे मागायला तयार होतोय ? ना की घडला प्रकार सांगायला तयार होता. मग मला भीती वाटू लागली. यात काहीतरी काळबेर आहे आणि हा मला दुसऱ्या गटात घेण्यासाठी सोलापूरला घेऊन चाललाय असं मन खाऊ लागलं. कारण तो त्यावेळी म्हणाला होता की "मामानी जर पैसे नाही दिले तर आपण सोलापूर ला जाऊया, तिथे मी हॉस्टेल ला राहतो, तिथे माझ्याकडे पैसे आहेत ते मी तुला देतो, मग तु जा कोल्हापूर ला". मग माझ्या मनात चर्रर्र झालं, पण माझ्याकडे त्याच्यासोबत जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. पण त्याक्षणी बंदिवासापेक्षा मित्राची प्रेमळ बेडी अधिक सुसह्य होती. अर्थात अनपेक्षित घटनांची भीती मनात होतीच.
मग आम्ही सोलापूरला जायचं ठरवलं. मंगळवेढा ते सोलापूर हे अंतर २ तासांत पूर्ण होणार होतं. माझी पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर येथे जाण्याची ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे हे सर्व माझ्यासाठी नवीन होतं. आपण कुठल्यातरी नवीन संकटात सापडणार आहोत याची भीती वाटू लागली. त्या मित्रास सारखा म्हणत होतो, “तू मला फसवत आहेस. तू मला पैसे देणार नाहीस.” मग तो म्हणाला, “माझ्यावर विश्वास ठेव, माझी सायकल सोलापूर बसस्थानकावर ठेवली आहे. सायकल रूमवर घेऊन जाऊ, तिथे मी पैसे देईन, मग तु कोल्हापूरला जा."
हे ऐकून मला पुन्हा शंका येऊ लागली की “त्याने सायकल स्टँडवर का ठेवली असेल?”. त्यामुळे साहजिकच हा सुनियोजित अपहरणाची योजना असेल. त्याच मनावस्थेत आम्ही रात्री आठच्या सुमारास सोलापूरच्या बस स्टँडवर उतरलो. भीतभीत मी त्याच्या सायकलवर बसलो. एका छोट्याशा गल्लीतून आम्ही त्याच्या खोलीवर पोहोचलो. तिथे पोचल्यावर त्याच्या मित्रांनी जल्लोष केला कारण त्यांचा मित्र सुखरूप परतला होता. हे बघून हायसं वाटलं पण मनातून अजून टरकून होतोच. मग त्या मित्राने एक गोष्ट केली, तो म्हणाला, "हे बघ, मी तुला इथे आणले आहे. मी माझा शब्द पाळतो. हे घे पैसे." तोपर्यंत माझा त्याच्यावर विश्वास बसला होता म्हणून पैसे मिळाल्यावर मी त्याला लगेच म्हणालो “मला स्टँडवर परत सोड”. तो म्हणाला “बघ, तुला रात्रभर परत प्रवास करायचा आहे. डबा आलाय, आपण जेवूया”. डबा आल्याचे ऐकून मला आणखी धक्का बसला, कसेबसे जेवण केले. पण तो दिलेल्या शब्दास जागला आणि परत सायकलवर स्टॅण्डवर सोडायला आला. सुटकेच्या मोहिमेत मोलाची साथ दिल्याबद्दल त्याचे मनस्वी आभार मानून मी बसमध्ये चढलो. त्याने "कोल्हापूर स्टँडवर सुद्धा सावधपणे उतरा, कारण तिथेही कदाचित त्यांची लोकं असतील" अशी सूचना केली. यावेळी मात्र मनात पाल चुकचुकली नाही.
मी साधारण ९ वाजता तिथून कोल्हापूरकडे निघालो आणि मध्यरात्री ३ च्या आसपास पोहोचलो असेल. मनात आणखी अशी भीती होती की त्या गटाने मला पुन्हा पकडलं तर बेदम मारहाण करतील, मी तेथून पळून आल्याचा जाब विचारतील आणि पुन्हा मला त्या गटामध्ये घेऊन जातील व माझी मुलाखत बुडेल. या सगळ्या भीतीमध्ये मी रिक्षामध्ये बसलो. रात्री रिक्षाला दिडपड भाडे असते, मला आठवते की तेव्हा रिक्षाभाडे जवळ जवळ ३० रुपये झाले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास मी हॉस्टेलच्या खालील बाजूस अंबाई डिफेन्स मध्ये उतरलो व माझ्या रूम वर न जाता ३ नंबर हॉस्टेल च्या माझ्या दुसऱ्या एक मित्राच्या रूम वर गेलो. झालेला सर्व प्रकार मी त्याला सांगितला. हॉस्टेलवर पोहोचल्याचा खूपच आनंद झाला होता. मी त्या माणसांच्या हातात तरी लागणार नव्हतो आणि मुंबई ला गेल्यावर ते मला पकडायला येणार नव्हते. फक्त आता आठवडा त्यांची नजर चुकवत कसा काढायचा हाच विचार सुरु होता तरीही मुलाखत दिल्यानंतर मी पुन्हा त्यांच्या स्वाधीन व्हायला तयार होतो.
नंतर माझ्या रूम पार्टनरला निरोप पाठीवला. तो धावत पळतच आला आणि मला बघून त्याला आशर्याचा धक्काच बसला. त्या दोन रात्री आणि एक दिवसाचा इतिवृत्तांत ऐकल्यानंतर तो चाट पडला आणि म्हणाला की "काही काळजी करू नकोस, तुझ्या जे मनात आहे त्यापद्धतीने आपण सगळ करू, फक्त आता तुला ८ दिवस इतरत्र राहावे लागेल.". “तुला तेथे शक्य आहे का?”. मी म्हणालो- “ठीक आहे”, तो - “टाकाळ्यावर माझे दाजी एकटे राहतात आणि ते तुझी सर्व प्रकारची काळजी घेतील”. मी तात्काळ “हो” म्हणालो. नंतर मुंबईला जाण्यायोग्य काही कपडे, पैसे व बॅग घेऊन मी माझ्या मित्राच्या सायकलवरून टाकाळ्याला गेलो व त्याने मला दाजींच्या स्वाधीन केलं व म्हणाला "दाजी ट्रेनने तुला मुंबईला पाठवतील".
तिथे पोहचल्यावर दाजींशी बोललो, त्यांचा स्वभाव ईतका प्रेमळ की कुणीही त्यांच्या प्रेमात पडावं. त्यांनी माझी अतिशय आपुलकीने, अगदी आपल्या मेहुण्या प्रमाणे विचारपुस केली व काळजी घेतली. त्यांनी मला सांगितलं की जरी मी नोकरी निमीत्ताने दिवसभर घरच्या बाहेर गेलो तरी तु आतून दरवाजा बंद करून घेऊन तुझा अभ्यास कर. तुझ्या अभ्यासाला काही अडचणं असणार नाही. सकाळी आम्ही दोघे त्यांच्या मेसमध्ये जेवायचो मग दाजी ऑफिसला जायचे, संध्याकाळी परत आल्यानंतर त्यांच्यासोबत मेसला जेवायला जायचो. असा एक आठवडाभर त्यांच्यासोबत राहिलो. त्यावेळी दाजीनी मला जे वात्सल्य दिलं, जो आधार दिला, पाठींबा दिला तो खरच न विसरण्याजोगा आहे. मला माझ्या हॉस्टेल पेक्षा त्या ठिकाणी जास्त सुरक्षित वाटत होतं आणि माझ्या सोबत घरातीलच कोणीतरी आहे असे भासे. पांडुरंगाने माणसातील देव माझ्यासाठी पाठविला अशी माझी धारणा त्यावेळी झाली होती.
तो आठवडा मी खूपच तणावमुक्त होतो. कुणाचाही संपर्क नाही. निवडणूक तर पूर्ण विसरून गेलो होतो. दरम्यान मी दादांना पत्र पाठवले की मी मुलाखतीसाठी मुंबईला जात आहे आणि १५ दिवसांनी परत येईन आणि कळवेन. बघता-बघता मुंबईला जायची वेळ झाली. मुंबईत माझा मित्र हनुमंत यांच्या विक्रोळी येथील घरी थांबणार होतो. कारण तेथून बीएआरसी जवळच होती. दाजींनी मला कल्याण ते मुंबई दरम्यान कोणती लोकल ट्रेन आहे, स्लो आणि फास्ट ट्रेन आहे, स्लो आणि फास्ट ट्रॅक कुठचे आणि कुठे स्टेशनची नावे लिहिलेली असतात हे अवगत केलं. मी ट्रेनने सकाळी ६ वाजता कल्याण स्टेशनवर उतरलो, लोकल ट्रेनमध्ये प्रथमच प्रवास केला आणि विक्रोळी स्टेशनवर उतरलो. तेव्हा हनुमंत हरियाली व्हिलेजमध्ये राहत होता. त्याला भेटून आनंद झाला. त्यालाही इतंभूत माहिती सांगितली. मुंबईला देखील ती माझी पहिलीच भेट होती. मी तिथे २ दिवस काही ठिकाणं फिरलो. तीसऱ्या दिवशी बीएआरसी मध्ये मुलाखतीस गेलो. व्यवस्थित अभ्यास झाला नसल्याने म्हणा किंवा झालेल्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर कमी झालेला आत्मविश्वास म्हणा माझी मुलाखत तितकी चांगली झाली नाही. आणि म्हणूनच त्यावेळी माझी निवड झाली नाही. शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक होण्याचे नशीबात असल्याने कदाचित माझी तेथे निवड झाली नसावी. दुसऱ्या दिवशी मी ट्रेनने कोल्हापूरला परतलो आणि वसतिगृहात पोहोचलो. तोपर्यंत निवडणूकीचे वातावरण संपले होते.
कोल्हापुरात मला एक बातमी समजली की ज्या मतदानासाठी आम्हाला तळावर नेलं होतं ते बिनविरोध झालं आहे. तुकोबारायांची समर्पक रचना येथे चपखल बसते- याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मला ना मतदान करावे लागले ना कुणाच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेवट मात्र गोड झाला. पण या सगळ्या प्रकारात माझ्यासारख्या होतकरू विद्यार्थ्याची त्रेधातिरपीट मात्र झाली होती. कोणत्या माणसावर विश्वास ठेवायचा, प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास कसा करायचा, रात्र वैऱ्याची असताना तग कसा धरायचा, सहीसलामत कशी सुटका करायची, त्यातून ध्येय कसे साध्य करायचे या सर्वाचा अनुभव मला आला आणि याद्वारे आयुष्यतील महान धडा मिळाला. या सर्वातून खूप काही शिकायला मिळाले. पांडुरंग कृपेने माझी यातून सहीसलामत सुटका झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पांडुरंगाने माझ्या प्रार्थनेस साद देत मला आशीर्वाद दिले, मला अडचणीतून बाहेर काढण्यास मदत केली आणि माझ्या मुलाखतीचा मार्ग चोखाळला अशी माझी धारणा होऊन बसली. या अनुभव दर्शनातून अदृश्य नियंत्रण शक्ती उमगली. ३० वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेकडे मागे वळून पाहताना आजही काळजात धस्स होतं. मला नवल वाटते की त्या काळात मी स्वतःला अशा भीती च्या स्थितीतही कसे सांभाळू शकलो असेल. कदाचित त्या प्रसंगांना धैर्याने तोंड देण्याची आंतरिक शक्ती परमेश्वराने दिली असावी.
त्याच दिवशी अजहर एकादश आणि तेंडुलकर एकादश हा क्रिकेट चा प्रदर्शनिय सामना कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम येथे आयोजित केला होता. या सामन्याचे मोफत पास आमच्या त्या गटाला मिळाले होते. अर्थात मी त्यांच्यासोबत नसल्यामुळे मला मिळाले नाही. मी मात्र दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये स्कोर बघून सामना पाहिल्याचा आनंद घेतला. आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना आपल्यातील सुप्त गुण बाहेर आणते. पण आपणास आपल्या रोजच्या व्यस्त दिनचर्येत कोणताही व्यत्यय नको असतो. त्यामुळे आपणास हे प्रसंग समस्या वाटतात. जीवनात अशी विघ्न गरजेची असतात. कारण यामुळे दोन उद्देश साध्य होतात. एक म्हणजे जीवनात अनपेक्षित गोष्टी घडतात ज्यांचा आपण इतरवेळी आनंद घेऊ शकत नाही. दुसरं म्हणजे कठीण प्रसंगांना सामोरे गेल्याने आपली निर्णयक्षमता अधिक मजबूत होते.
- केशव राजपुरे