Wednesday, July 19, 2017

अक्षय पात्र

अणुउर्जेचे 'अक्षय पात्र' विकसित:

स्वदेशी बनावटीचा पहिला ‘फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ विकसित करण्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. कल्पकम येथे उभी करण्यात आलेली ही अणुभट्टी प्रत्यक्ष कार्यरत होण्यासाठी सज्ज झाली आहे. या प्रकारच्या अणुभट्टीमध्ये वापरण्यात येणाऱ्या इंधनापेक्षा वीजनिर्मितीनंतर जास्त अणुइंधन तयार होते. त्यामुळेच अशा अणुभट्टीला ‘अक्षय पात्र’ अशी उपमा देण्यात आली असून, ती विकसित करणारा भारत हा रशियानंतरचा दुसरा देश ठरला आहे.

या अणुभट्टीमध्ये प्रक्रियांची साखळी सुरू करण्यासाठी न्यूट्रॉनचा वापर करण्यात येतो. पारंपरिक अणुभट्ट्यांच्या तुलनेमध्ये यातील न्यूट्रॉनचा वेग जास्त असल्यामुळे या अणुभट्टीला ‘फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ असे म्हणतात. कल्पकम येथील अणुभट्टीमध्ये थोरियमचे विशेष रॉड वापरण्यात आले आहेत. त्यामुळे या अणुभट्टीमध्ये यू-२३३ हे समस्थानिकही तयार होऊ शकते.

हे आपल्या शास्त्रज्ञ समुदायाचे दीर्घकालीन ध्येय होते. हे भौतिकशास्त्रातील मूलभूत संशो​​धनाचे निष्कर्ष आहेत. पुढे आपल्या अभियंत्यांनी त्यांची भूमिका निभावली आणि अनुऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्यामध्ये आपण श्रेष्ठत्वाकडे वाटचाल करीत आहोत. स्वदेशी बनावटीचा पहिला 'फास्ट ब्रीडर रिअॅक्टर' विकसित करण्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. ती विकसित करणारा भारत हा रशियानंतरचा दुसरा देश आहे. आपणा सर्वास अभिमानास्पद अशीच गोष्ट आहे. आपले शास्त्रज्ञ आणि अभियंते खरच कौतुकास पात्र आहेत. अनेक वेळा असं होतं कमी माहितीमुळे आम्ही आमच्या प्रतिभेला कमी लेखतो. कमतरता यशासाठी कारण कसे बनते याचे हे उत्तम उदाहरण आहे. भारतात युरेनियमचे प्रमाण कमी आहे. भारतास साठे नसल्याने युरेनियमची आयात करावी लागते. तसेच भारत युरेनियमची आयात करू शकत नाही, किंबहुना प्रगत देश भारताची अणुउर्जेवरील संशोधनातील घोडदौड बघता आपणास निर्यात करीत नाहित. भविष्यातील ऊर्जेची गरज लक्षात घेता डॉ. होमी भाभा यांनी तीन टप्प्यांत आण्विक कार्यक्रम तयार केला होता. अणुऊर्जा कार्यक्रमातील तिसरा टप्पा थोरियमवर आधारित अणुभट्टय़ांच्या निर्मितीशी संबंधित आहे, यात थोरियम, युरेनियम -२३३ चक्राचा वापर केला जातो. थोरियम की जे भारतात मुबलक प्रमाणात आहे याचा वापर अणुभट्टीत इंधन म्हणून केला जातो. अणुऊर्जा आयोगाने उपलब्ध संसाधनांमधून सर्वोत्तम करण्याकरिता शास्त्रज्ञांना प्रोत्साहित केले त्याचेच हे फळ म्हणावे लागेल.

- केशव राजपुरे